स्त्री देह धारण करून जन्मलेल्या तुमच्या आत्म्याचं महापातक काही असेल तर ते म्हणजे स्वयंपाकात रुची नसणे...पुढे गती नसणे ओघानं आलंच. कारण स्वयंपाकाची आवड असल्याशिवाय प्रयोग होत नाहीत, मग जुजबी चालढकल चालते आणि त्यात गती असणं अशक्यप्राय बनतं.त्यातही तुम्ही एखादा नरक स्कीप करून आले असाल तर तुमची सासू सुगरण असते आणि साहजिकच तिचं लेकरू उर्फ पतीपरमेश्वर प्रचंड खवय्या (स्पष्टपणे सांगायचं तर खादाड)असतो.. तुमच्या प्रत्येक पदार्थाला नाके मुरडून मुरडून तो तुमची जिरवतो आणि नवीन काही पदार्थ करण्याचा एकवटलेला राहिला साहिला उत्साह वाहून जातो. बरं... आपण ज्या समाजात राहतो ना तिथं एकवेळ तुम्ही निरक्षर असलं तरी चालतं पण स्वयंपाक मात्र यायला हवाच... खरेतर आज प्रत्येकाला जुजबी स्वयंपाक यायला हवा... घरापासून दूर राहणारे, परदेशी शिकायला गेलेले मुले मुली थोडेफार पदार्थ गरजेपोटी शिकतातच.. मात्र एखाद्या बिचारीला रोजचे वरण, भात, भाजी, पोळी तर निभावता येते पण बाकी स्वयंपाकात फार काही उजेड पडत नाही ...तिचा निभाव लागणे अवघड होते. त्यात ती जर गृहिणी असेल तर तिने बल्लवाचार्य असलेच पाहिजे...अश्या वेळी तिला सुगरणींच्या दरबारात हजेरी द्यावीच लागते. वेळ पडली तर लोटांगणे देखिल घालावी लागतात....
सुगरण ह्या शब्दामुळे सगळ्यांत पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतो तो सुगरण पक्षी.. घरटे तर सगळेच पक्षी विणतात मात्र सुगरणींचा खोपा म्हणजे कमाल कौशल्य, नजाकत,नेटकेपणाचा कस. याच दाखल्या वरून एखाद्या निष्णात अन्नपूर्णेला सुगरण म्हणत असावेत..थोडक्यात स्वयंपाक काय कुणीही करतं.. पण स्वयंपाक करतांना कमाल कौशल्य वापरते ती सुगरण...अशी आपली माझी व्याख्या.यात एक गफलत अशी की सुगरण पक्षी घरटे विणतो आणि पक्षीण केवळ हवं ते, योग्य वाटेल ते घरटं निवडते...आपल्या जगात सुगरण तिचं असते.. (काही प्रसिद्ध शेफ असतात पण घरी त्यांच्या बायकाच करतात स्वयंपाक) वेगवेगळ्या पाककृतींवर हुकमी अधिसत्ता गाजवणारी साम्राज्ञी.... मुदपाकखान्यात जाताच तेल तिखट मीठ जिन्नस तिला पाहून चळाचळा कापतात आणि निमूट प्रमाणात पडतात...जिचं कोणतंच पीठ कधी सैल होत नाही आणि जी सातत्याने आपले अगाध ज्ञान तपश्चर्येच्या विविध प्रयोगांनीशी अधिक सिद्ध करत असते... ती खरी सुगरण. जिचा नवरा कधीही आईच्या हातचे अमुक ढमुक असे तुणतुणे वाजवत नाही.. आणि पोरे बाळे आईच्या कौतुकाचे गुणगान गाताना थकत नाही... होय तिचं तर खरीखुरी सुगरण....यात तिच्या सासूने कौतुक (चुकून) केले तर ती मास्टर शेफ असणारच ..... काय सांगता?? असे काहीच घडत नाही तुमच्याकडे...आता नमनाला घडाभर तेल ओतले आहेच तर सांगते... आधी अशी वरील नमूद लक्षणांनी युक्त सुगरण स्त्री शोधावी... नंतर तिच्या दरबारी लीन व्हावे... हीच सुगरण बनण्याची पहिली पायरी आहे आता तुम्ही सुगरण झालाच म्हणून समजा
तुमचा जर समज असेल की अशी सुगरण मैत्रीण, बहीण , काकू...वगैरे आशीर्वादाचा हात मस्तकावर ठेवेल आणि तुम्ही सुगरण व्हाल तर ही केवळ अंधश्रद्धा आहे.☺ त्या सुगरणीला डोळ्यांदेखत एखादा पदार्थ करतांना पाहून आपण तस्साच करू शकू हा फाजील आत्मविश्वास शुद्ध वेडगळपणाच आहे... माझी एक सुगरण मावशी... गॅसच्या चारही शेगड्यांवर एकाच वेळी चार फोडण्या टाकते... तिचे चारही पदार्थ अप्रतिम चविष्ट होतातच... कश्यात काही अधिक उणे नाही...अश्यावेळी तिच्या झटपट हालचाली एखाद्या कसलेल्या गायकाच्या गान-मैफिली सारख्या सच्च्या आणि काळजाला भिडणाऱ्या असतात...आहाहा! ... पण नंतर त्यातला एकही पदार्थ काय घालून अन काय प्रमाणात घालून केला हे मात्र मी सांगूच शकत नाही.स्वयंपाक करून येऊ शकतो पण नुसता पाहून मुळीच नाही....त्यात ह्या सुगरणींना तुम्ही पाककृती .. रेसिपी हो! विचारूच नका... त्यांच्या हातांना वस्तू न मोजता प्रमाणात घालायची सवय झालेली असते. एखाद्या मेरीट स्टुडंटने उत्तरे दाखवली तरी आपल्याला ती कॉपी करता येऊ नयेत इतकी अवघड असतात... जसे शीग लावून डाळ घे, गुलाबी रंगावर परतून घे (गुलाबी???), पोटातून ओल्या असतांना वाटून घे, अधमुरं दही घाल... एका बाजूने तळ, जास्त घट्ट नाही अन् जास्त पातळ नाही,साखर घाल उगाच आपली नावाला???? देवा रे! ह्या सगळ्याचा बाप म्हणजे 'पाक'.... ह्या पाकावरूनच पाककला हे नाव यथार्थपणे सिद्ध होते. अर्ध कच्चा अर्ध गोळीबंद पाक करून माझी आजी लाडू मुरत घालायची... काही तासांनी ते वळले जात.. चव अर्थात झक्कास... मात्र त्याच क्षणी मी आयुष्यात पाकातले लाडू न करण्याची भीेष्मप्रतिज्ञा केली. पाक ह्या शब्दाचा अर्थ पवित्र होत असला तरी तो फसला की जी काय नासधूस होते ते महापातकच होय.
एखाद्या सुगरणीला मार्गदर्शनाला बोलावून बाजूला उभे करावे नि आपण शिकावे असा विचार करत असाल तर तोही साफ आपटणार. सुगरण स्त्री नुसती बाजूला बसू शकत नाही. तिचे हात स्वयंपाक घरात लगेच शिवशिवतात... तुम्ही मंद आचेवर रवा भाजत असतांना ती खवा भाजून , नारळ खवून,पाक करून पुढच्या चार पायऱ्या पूर्ण करणार...थोडक्यात पदार्थ 75% तिचं करणार... नंतर स्वतंत्रपणे नारळीपाकाचे लाडू तुम्हाला कसले येताहेत.... मग दर वेळी धरा तिचेच पाय.... वर त्या लाडूला तुमचे वंशज मावशीचे किंवा काकूंचे लाडू असे नाव देणार हे वेगळेच.रेसिपीची पुस्तके देखिल मिळतात अगदी ढिगाने... झटपट नाश्ता 101 डिश, रोजचे पदार्थ 151 पाककृती, आईसक्रीमचे 501 प्रकार,1001 गोड पदार्थ असे चढत्या क्रमाने उपलब्ध पुस्तके घेतल्यावर शेवटी एक जमला तर शप्पथ! ह्या मुद्द्यावर यावे लागते... बाई ग तुझे 999 ठेव तुलाच मला एक तरी नीट जमू दे...... अर्धा इंच आलं , 137gm मैदा ,2.4gm खायचा सोडा... असं कुणी करतं का राव ??त्यात ह्या पुस्तकांतील देखणी चित्रे बघून अवसान ढासळते... आणि कुरुक्षेत्रावर उभ्या अर्जुनासारखे आपण शस्त्रच खाली ठेवतो.
यु ट्यूब वरच्या रेसिपी किंवा एखाद्या नकटीचे रेसिपी शो जर तुम्ही फॉलो करत असाल ना तर एक लक्षात घ्या ... तुम्हाला 2 महिन्याच्या किराण्याएव्हढे पदार्थ निव्वळ सजावटीला लागणार आहेत...2 कप काजूची पूड / वाटीभर पिस्त्याचे काप/ दोन वाट्या ताजी साय/ वाट्यांनी तेल तूप अबब! एव्हढं घालूनही पदार्थ तस्साच होत नाही... कारण झटपट भिजवणे,चटपट परतणे,120 ला बेक करणे आणि हलक्या हातानं चिमूटभर सोडा घालणे अश्या क्रिया काही जमत नाहीत...मग तुम्ही निर्लेप चे तवे, कढई...मॉल मधून भरमसाठ किंमतीला आणता. गेला बाजार मातीचे,तांब्याचे,बीडाचे आणि कश्या कश्याचे भांडे आणता. (सध्या स्टीलच्या कढया/ कुकर्सचे कौतुक बोकाळले आहे).एव्हढं करून तयार झालेला पदार्थ खाताच... खाववत नाही अन फेकवत नाही अशी अवस्था होते... नेमकं काय बिघडलं ते मात्र उमजत नाही...मात्र पुन्हा तो पदार्थ करायची हिम्मत खचते... घरात तुमच्याशिवाय कुत्रेही त्याला तोंड लावत नाही..नवरा झापतो ते वेगळं...आणि दर वेळी त्या पदार्थाचे नाव घेऊन तुमचा उद्धार होतो ... जसं एखादा केक... तूप साखरेचं प्रमाण बिघडून बसला थोडक्यात फसला तर घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला चोमडे कन्यारत्न ,"बाबा बेकरीतून विकतच आणा हं केक... आईच्या केकच्या वड्या होतात" ... मग बापलेक टाळी देत हसतात किंवा दर वेळी मॉल मध्ये केकच्या सामानाचे सेक्शन आले रे आले की नवरा काहीतरी अश्लाघ्य दिसल्या सारखा तुम्हाला तिथून खेचू लागतो... चार लोक पाहताहेत याचीही पर्वा न करता.... हात जोडत "आता पुन्हा नको ग बाई" विनवणी करू लागतो. मग सुगरण व्हायचे कसे??उत्तर सोप्पे आहे...सुगरणींचा दरबार जॉईन करून
सुगरणींचा दरबार ... अर्थात विविध सोशल मीडियावर(fb, whats app वगैरे) असणारे पाककृतींचे ग्रुप... यांची नावे साधारण रुचिरा, सुगरण, आईच्या हातची चव, पूर्णान्न वगैरे पठडीतील असतात. पुढे त्याचे व्हेज/ नॉनव्हेज झटका असे मुख्य दोन प्रवाह आहेत. प्रादेशिक वादातून त्यात राजस्थानी चविष्ट पदार्थ, साऊथचे रस्सम, अस्सल महाराष्ट्रीयन, बंगाली स्वीटस, गुजराथी चाट..... असे अनेक उपप्रकार पडतात.जरा देशाच्या सीमा ओलांडायच्या असतील तर कॉन्टिनेन्टल, थाई, इटालियन... वगैरे देखील दरबार आहेत. या दरबारात जगभरातील अनेक विद्यार्थी डोके टेकवितात... अनेक पदार्थांवर हुकूमत असणाऱ्या सुगरणी अहोरात्र लोकांच्या उत्थानासाठी झटत असतात. भिशीचा मेन्यू, पार्टी चा मेन्यू... इथपासून तर चार माणसांना किती वाट्यांचा रस लागेल, दहा माणसांना किती बटाट्याची भाजी लागेल असे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. एखाद्या पदार्थाची कृती तर मिळेल पण तो बिघडल्यास काय करायचे ह्याचे प्रात्यक्षिक देखील मिळणारच.. अनारसे हसले तर काय करायचे अन लाडू वळले जात नाही तर कसे बांधायचे.... उरलेल्या अन्नाचे नवीन पदार्थात बेमालूम रूपांतर ...सारे सारे अगाध ज्ञान येथेच प्राप्त होते. त्याचबरोबर तुम्ही कितीही बेसिक प्रश्न विचारला जसे "पुरी टम्म फुगायला काय करायचे?" तर कुणीही तुमची टिंगल करत नाही.. उलट सुगरण गुरूंना एक प्रकारचा ज्ञान दानाचा अवीट आनंद त्यातून प्राप्त होतो. दुसऱ्या बाजूला तुमच्या घरच्या कुणालाही नाके मुरडू देत पण ग्रुप वर कंमेंट अन लाइक्स ची बरसात तुम्हाला प्रोत्साहन देत असते.हळूहळू तुम्ही पाककलेत पारंगत होत जाता....मुळात स्वयंपाक करणे ही आनंददायी प्रक्रिया असल्याची ज्ञानप्राप्ती तुम्हाला याच दरबारात होते. अधून मधून गुरूंचा जयघोष मात्र करायलाच हवा हं !... त्याशिवाय त्यांना आनंद मिळणार तो कसा?
एकदा तुम्ही ह्या दरबाराचे पाईक झालात की काही पथ्ये/ नियम कटाक्षाने पाळावे लागतात. इन्स्टंट हा शब्द कायमचा मनातून काढून टाकणे, स्मार्ट वर्क न करता हार्ड वर्कच करणे, पारंपारिक पदार्थांचा ज्वलंत अभिमान बाळगणे..."पोळ्यांची बाई" म्हणजे शिव शिव ... कसे काय लोक खातात बाईच्या हातच्या पोळ्या.. माझ्या अश्या मऊसूत होतात. .... विकत पदार्थ आणणे महापाप. घरचेच अन्न चवीचे बाहेरचे वाईटात वाईट... "माझ्या मुलांना माझ्याच हातचा पिझ्झा आवडतो बाहेरचा मुळीच नाही" असे सांगणारीच्या मुलांना आपण कालच पिझ्झा हट मध्ये पाहिल्याचे मुळीच बोलायचे नाही. नवऱ्याला पौष्टिकतेच्या नावाखाली उकडलेल्या भाज्या खाऊ घालणाऱ्या सखीचा नवरा कालच शेजारच्या टेबलवर बसून मिसळ आणि जिलब्या चापत होता हे विसरून जायचं. वाटण.. पाट्या वरवंट्याच.. मिक्सरची चव छ्या! वेलची खलबत्त्यात कुटून , जायफळ सहाणेवर उगाळून, नारळ खवून, पीठं घरघंटीची, कुंडीतल्या मिरच्या अन कढीपत्ता ... कितीही तयार मिळालं तरी सगळं कसं घरीच करायचं.... शिवाय अजून एक सिद्धी प्राप्त असायला हवी मुलांना न आवडणाऱ्या भाज्या / फळं बेमालूम त्यांना खायला घालायची.मी कसे कमी तेल वापरते.. मी कशी आरोग्य जपते हेही सांगणे जमले पाहिजे... तूप जरा करपले तर काय करायचे? असा प्रश्न असेल तर खरे उत्तर आहे पुढील वेळी अधिक लक्ष देऊन काळजीपूर्वक करायचे... मात्र हे उत्तर दरबारात चालत नाही त्यात लवंग घाल, विड्याचे पान घाल असे काही बाही सुचवीत राहायचं. साधी इडली किंवा थालपीठ केलं ना तरी फोटो काढायचा नि दरबारी पेश करायचा... अय्यो!भाजणी विकतची आहे किंवा इडलीचे पीठ अप्पाचे आहे हे कश्याला सांगायचे??अश्या प्रकारे दरबारात हजेरी लावली की लोक हळूहळू तुम्हाला सुगरण म्हणून ओळखू लागतात. मग बिंधास्त सांगायचे दोन वाटी रव्याला 2 वाट्या साखर लागतेच ग! चांगलं दीड वाटी तूप घे...... तिच्या घरचं जातंय ना! झाला लाडू तर ठीक नाहीतर बसेल बोंबलत.
© यशश्री रहाळकर