फॉलोअर

बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

मराठी .....दीण ??

मराठी... दीण ? 😳
●●●●●●●●●●●●●●●●●●
          मराठी भाषा शुद्धी करीता कडवे  प्रयत्न केलेत त्या क्रांतीसुर्य सावरकरांचा काल स्मरणदिन तर आज मराठीच्या किर्तीची भगवी पताका ज्ञानपीठावर झळकवणाऱ्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस ... मराठी राजभाषा दिन ...भल्या पहाटे मोबाईल चमकला नी मेसेज झळकला (भ्रमणध्वनी आणि संदेश असला शो ऑफ नाही हं!) " मराठी दीणाच्या शुभेच्छा!" मला उलट्या हाताची सणसणीत कानाखाली वाजवल्याचा भास झाला.खरेच मला त्या व्यक्तीची मराठी दीन झाल्याचा भास झाला ... (दिन म्हणजे दिवस तर दीन म्हणजे दया वाटावी असा. दीण .. अजून शोध लागायचा आहे.)
            अनेकदा लोक आम्ही कित्ती शुद्ध बोलतो हे दाखविण्याच्या अट्टहासात मोठे घोळ घालून ठेवतात. एक सन्माननीय निवेदनकर्ते कायम छापील बोलायचा प्रयत्न करीत... एकदा असेच त्यांनी प्रमुख अतिथींना मंचकावर विराजमान होण्यास सांगितले... त्या महिला अतिथी रागाने डोळे लाल करत निघून गेल्या... 😡काय झाले? हे जराही न कळल्याने महाशयांना धावत जाऊन माफी मागणेही जमेना. आयोजकांच्या विनंतीवरून कश्या बश्या वक्त्या परतल्या ...कार्यक्रम पार पडला. 'मंचक' ह्या शब्दाचा अर्थ पलंग असा होतो 😂 मंच हा शब्द रंगमंच चा तुकडा तोडून वापरला जातो. खरेतर काहीतरी कला नृत्य नाट्य गायन वगैरे सादर केले जाते तो रंगमंच ... विचारांची  जागृती उद्बोधन होते ते व्यासपीठ ... आजकाल व्यासांचे नाव नको म्हणून विचारपीठ म्हणतात.तेही चालेल पण मंचक?? 😄😄
                 आम्ही शुद्ध बोलतो हे दाखविण्याच्या हव्यासापोटी सर्वाधिक बळी जातो तो 'न ' या वर्णक्षराचा... सरसकट एकाच न्यायाने 'ण ' वापरून भोजण, अण्ण, णेवेद्य , गायण , वादण अशी दाणादाण उडवून दिली जाते . दुसऱ्या बाजूला बाणातला  ' ण ' वापरीन तर शपथ... असेही लोक असतात. " आपन आज या ठिकानी श्रद्धांजली व्यक्त करन्यास भेटन्याचे म्हनालो पन मला येने जमले नाही." हे ऐकून मी फोटोतून " बरं झाल नाही आलात "असे  म्हणाले असते...नको तो न चा पाढा ...😝
            प्रत्येक कोसावर मराठी वेगळी आहे... निश्चित आहेच . तो लहेजा , ते वैशिष्ट्य जपलेच पाहिजे ...  त्या ढंगात सौंदर्य आहे .  कोल्हापूरचा रांगडी बाज, वर्हाडची " आल्तो गेल्तो" , कोकणचे सानुनासिक ," शिंच्या कुठे उलथलांस " मराठवाड्यातील  " करायली, यायली जायली" अशी इ कारांत क्रियापदे..... मुंबईची अनेक भाषांची भेळ मराठी..... अगदी आमच्या नाशकातली देखिल मराठी वेगळी आहेच. अर्थात सगळेच छापील बोलू लागले तर पुण्याला विचारेल कोण?? 👊 तरी देखिल अर्थाकडे संपुर्ण दुर्लक्ष करणे ... विचित्र अर्थाने शब्द वापरणे सार्वजनिक ठिकाणी बरे नाही... असे माझे प्रांजळ मत आहे. 'आदरनीय ' म्हटले की मला उगाच तो वक्ता दयनीय, शोचनीय वगैरे वाटू लागतो.
     मराठीचे संवर्धन आणि जतन या विषयावर आज सगळ्या शोषण मिडीयावर दळण दळले गेले . परंतु मराठीचे सौंदर्य ज्या इवल्या गोष्टीत दडले आहे त्या जपण्याचे काय? अभिजात मराठी ... तिचे काय? पुढल्या पिढीकडे जाणाऱ्या वाराश्यात ती सुरेख नटलली जायला हवी... कानामात्रांचे योग्य अलंकार लेवून जशी तुम्हा आम्हाला मिळाली तशी लेकरांना मिळो... सात्विक, सकस ,उदात्त ..

।। माय मराठी अभिमान मराठी।।

🔏©यशश्री रहाळकर
नाशिक
27/02/19

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

भोपळ्याचं झाड ... अखेर

पूर्वार्ध :- https://kattayashashri.blogspot.com/2019/02/blog-post_21.html?m=1
भाग 2 :-  https://kattayashashri.blogspot.com/2019/02/2_23.html?m=1
आता अखेर......           
                     देवरूषीला मोठ्या मिन्तवारी करून गावकऱ्यांनी कुठूनसा आणला खरा...... पण झाडाचं नाव आणि घडला प्रकार ऐकताच तो पळून जाऊ लागला. डॉ. यथार्थ हात जोडून त्याला म्हणाले,   "वाट्टेल तेव्हढे पैसे मी देईल काय सांगशील ते करीन माझ्या लेकीला वाचव." अचानक त्यांच्या डोळ्यात पाहत देवरूषी म्हणाला, " झाडानं जीत्ता सोडला व्हय रं तुला??"  बसकण मारत त्यानी आपल्या जवळील वस्तूंची मांडामांड सुरू केली. कसली कसली लाल काळी मंडळे काढली ... काळे तीळ शेळीचा केस... काय काय विचित्र गोष्टी गावकरी भराभर पुरवत होते आणि तो मांडत बसला...... अचानक त्याने भोपळ्याच्या झाडाचे फळ आणि पाने मागितली. सारेच मागे सरले...   हे शक्य नाही . नाही नाही म्हणत माना हलवू लागले . अचानक डॉ. यथार्थला काहीतरी आठवले... धावत जाऊन त्यानी गाडीतून बॅग काढून आणली त्यात भोपळ्याचे फळ आणि पाने होती... सकाळीच त्याने ती परीक्षणाचे नमुने म्हणून गोळा केली होती.सगळे बसल्या जागेवर उडालेच...सगळ्यांची तोंडे आश्चर्याने वासली होती... " हे तू आनलस व्हय रं पावन्या??" देवरूषी ने विचारले. डॉ. यथार्थनी होकारार्थी मान डोलवत पुन्हा मनातला प्रश्न पुढे केला,
" पण मला कसं काही झालं नाही? मी कसा वाचलो??" देवरूषीने त्याला समोरच्या लाल मंडळात बसवले ... मोठमोठ्याने तो काहीबाही म्हणू लागला.
               त्या दोघांच्या मधल्या जागेत अग्नी पेटवून त्या देवरूषीने आहुती टाकायला सुरुवात केली .डॉ. यथार्थनी त्या लसलसत भडकलेल्या ज्वालांकडे एकवार एकटक पाहिले...न सहावून डोळे मिटून घेतले. पुन्हा तेच दृश्य तिच हाक वनाची " Please पपा तुम्ही हे करू शकता ह्या झाडाला मुक्ती द्या." वना ssवना ss हाकारात ते भानावर आले ... घामाघूम झाले होते धाप लागली होती.
           घडला प्रकार त्यांनी देवरूषीला सांगितला. डोळे मिटून देवरूषी किंचाळला ... " तुझी लेक बोलावतेय तुला पन तिला  वाचीव न्हाई म्हनत...झाडाले मुक्ती दे म्हणतेय .. खरं बोल" त्याने दरडावून विचारले तरीही डॉ. यथार्थचे उत्तर तेच होते. देवरूषी ने त्याच्या  डोक्यावर एक काळी विचित्र काठी ठेवत भोपळ्याचे फळ त्या आगीसमोर जोरदार आपटून फोडले आश्चर्य म्हणजे एकही बी नव्हती त्या विचित्र फळात...कसा तरी घाणेरडा चीक बाहेर पडला आणि आगीत भस्मसात होत काळा ठिक्कार पडला .. अचानक आगीडोंब उसळला ... त्या आगीत जणू एखादा चित्रपट पहावा तसा झाडाचा भूतकाळ यथार्थ पाहू लागले.
                स्वातंत्र्यपूर्व काळ असावा..रेमंड नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्या कडे मऱ्या ढोर नावाचा गडी  कामाला होता. रेमंडला झाडांची खूप आवड ... झाडांची निगा राखण्यासाठी त्यानं मऱ्याला ठेवला.या मऱ्याच झाडांवर विलक्षण प्रेम... तो मायेनं झाडं लावायचा नी ती छान फुलायची... त्याच्या हातानी झाडं सहजी जगत. त्यानी रेमंड ची बाग सुंदर फुलवली ... अनेक वर्षे काम करत असल्याने त्याची मऱ्यावर विलक्षण माया बसली ... आपल्या मायभूमीत परततांना तो मऱ्याला सोबत घेऊन परतला.
            उभे आयुष्य त्याने रेमंडच्या बागेची देखभाल केली. रेमंडच्या अखेरच्या दिवसांत त्याने बरीच मोठी संपत्ती मऱ्या ला दिली आणि आपल्या बागेतील काही झाडांच्या बिया आणि रोपे देखिल दिले. रेमंड च्या मृत्यूनंतर मऱ्या मायदेशी त्याच्या गावाला सुलतानपूरला परतला. तसा तो एकटाच होता ना लग्न ना पोरबाळ...
               आपण अन आपली झाडं यांच्याबरोबर उतरणीला लागलेले आयुष्य काढावे असा विचार करत त्याने मूळ गावापासून जरा लांब शांत ठिकाणी हा वाडा घेतला .. जरा पडका होता पण डागडुजी करून सुंदर नटला... आजूबाजूला त्याने सुंदर बाग फुलवली. परदेशातून आणलेले विविध बियाणे आणि रोपे त्यानी रुजवायचा खूप प्रयत्न केला .. पण व्यर्थ एकही रुजेना.दर वेळी तो खट्टू होऊन जातं असे.
                  एक भोपळ्या सारखे दिसणारे झाड मात्र रुजले ....☺ ते इवल रोप पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.त्याच वेळी गावात अचानक काही दुर्दैवी घटना घडल्या अनेक तरुण मुले अचानक रात्रीतून मृत्युमुखी पडले....त्याचं खापर या अघोरी झाडावर फोडण्यात आलं. मुलांनी कुठल्याश्या प्रकारची हातभट्टीची दारू प्यायल्याचे मात्र सारेच विसरले. खरंतर ते इवल झाड नुकतच कुठे रुजलं होतं. अंतस्थ प्रकार असा की मऱ्याच्या संपत्ती वर आणि घरावर डोळा ठेवणारे अनेक जण गावात होते. त्यांनी तुझे हे झाड राक्षसी आहे अश्या कथा पसरवल्या ... लोक ते झाड नष्ट करायला धावून आले. मऱ्याने अडवायचा खूप प्रयत्न केला ... म्हातारा दुबळाच तो ... या सगळ्या प्रकारात मऱ्याचा बळी गेला. तिथेच त्याला पुरून एक थडगे बांधले गेले. आता तो वाडा रंगमहाल बनला. अवैध कृत्यांना उत आला... ते झाड मातीतून पुन्हा वर आलं नी जोमानं वाढतंय याकडे सगळ्यांच दुर्लक्ष झालं.
                   झाडाची मूळे मऱ्याच्या थडग्यापर्यंत पोहोचली अन झाड राक्षसी वेगानं वाढू लागलं ... मऱ्याच्या व्यथा वेदना.. त्या परदेशी झाडाला वाढवण्याचं अधुरं स्वप्न सारेच जणू खतपाणी बनून त्या झाडाला वाढवू लागलं त्या झाडाला कुणीही पाणी घालत नव्हतं तरी ते वाढत होतं.. अजस्त्र अवाढव्य... आता पट्ट्यात येईल त्याला झाड हाक घालू लागलं अन शोषून घेऊ लागलं ...शास्त्रीय भाषेत  झाड परजीवी झालं होतं. त्या negative energy वर ते फोफाऊ लागलं मग काय अविधी कृत्यांना उत आला
.. लोक गायब होतात म्हणून अमावस्येला कोंबडे बकरे कापले जाऊ लागले... अनेक दंतकथा पसरल्या.
             भडकलेल्या ज्वाळा अचानक शांत होत विझल्या ... भोपळ्याच्या झाडाचं पान हवेत भिरभिरलं नी डॉ. यथार्थच्या मस्तकावर जखम झाली तिथे पडल. डॉ. यथार्थ काय समजायचं ते समजून चुकले. तात्काळ त्यांनी एक कुऱ्हाड फावडे , थोडे रॉकेल नी माचीस मागितली नी धावत सुटले भोपळ्याच्या झाडाच्या दिशेने... त्यांच्या पाठी देवरूषी नी सारा गाव काय होतंय हे पाहायला गेला. सरळ कुंपण ओलांडून आत येत त्यांनी थडग्याकडे धाव घेतली थडग्याला हात जोडून ते म्हणाले ," मऱ्या दादा तुमचे बाग लावायचे स्वप्न नक्की पूर्ण करीन .. वेगवेगळ्या देशांतून आणलेली झाडे येथे लावीन मी वचन देतो ..मी वचन देतो " म्हणत त्यांनी थडगे फोडण्यास सुरुवात केली. अचानक झाडाची सळसळ वाढली . झाडाच्या अजस्त्र फांद्या विव्हळू लागल्या ... जोरजोरात मोठमोठे भोपळे डॉ. यथार्थांच्या दिशेने फेकले जाऊ लागले... कडकडा फांद्या मोडून पडू लागल्या... अविचलपणे ते आपले काम करीत राहिले ... झाडाच्या माराने त्यांना फोडून काढले होते..... थडगे पूर्ण फुटले पुन्हा एकदा हात जोडून त्यांनी ते पेटवून दिले... पानांच्या आवाजाने रौद्र तांडव सुरू केले . थडगे पूर्ण पेटून विझले आणि गगनभेदी आवाजाने झाड वाड्याच्या दिशेने मोडून पडले. त्या अजस्त्र झाडाचा आवाज असा होता की सगळ्यांनी कानावर हात ठेवले... झाड वाड्यावर पडले आणि वाडा आणि ते हिरवे कंच झाड़ जळून त्याचा कोळसा झाला... विशाल राक्षसी धूर आकाशात तोंड वासून नष्ट झाला.
               झाडाच्या बुंध्याशी वनश्री पडलेली होती देहाचं मुटकुळ करून ... बेशुद्ध होती रक्त शोषले गेल्याने फिकुटलेली पण जिवंत होती . अत्यानंदाने त्यांनी तिला जवळ घेतलं ... गावकरी मदतीस धावले तातडीने त्यांना काही प्रथमोपचार करून जिल्हा रुग्णालयात हलवले... वनश्री ला अनेक बाटल्या रक्त चढवावे लागले ... पंधरा दिवसांनी ती पूर्ण शुद्धीत परतली.... हे दुखणं कदाचित तिला पुढचे अनेक दिवस पुरणार होते...पण ती सुखरूप होती. डॉ. यथार्थ देखील जीवघेण्या आघातातून आठवडाभरात बरे झाले . अजूनही डावा हात मोडला असल्याने गळ्यात लटकवून फिरत होते. त्यांना कसं काही झालं नाही ? हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता... झाड त्यांच्यावर वार करत होते पण त्यांना नेऊ शकले नाही . डॉ. यथार्थ सारे उमजून हसले... आयुष्यभर त्यांनी झाडांवर प्रेम केले होते त्याचं संरक्षक वलय त्यांच्या भवती असावे... तिथं असणाऱ्या negative energy ला त्यावर मात करता आली नाही. 
               वर्षभरात ते मोठ्या ट्रक सोबत आणि बॉटनी चे आपले बरेच सहयोगी विद्यार्थी घेऊन परतले.... त्या भोपळ्याच्या झाडाच्या आवारात अनेक परदेशी झाडांचे रोपं त्यांनी केले... पूर्णवेळ तेथे कामाला गाडी माणसे स्व खर्चाने लावून आगळ्या प्रजातींचे सुरेख उद्यान फुलवले ... सगळीच्या सगळी झाडे उत्तम रुजली ..  ही आगळी बाग पाहायला दुरदुरुन लोक येत... गाव प्रसिद्ध झाले... मात्र उद्यानाचे नाव मात्र तेच  होते..... "भोपळ्याची बाग "
©यशश्री रहाळकर

शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९

भोपळ्याचं झाड (भाग 2)

भोपळ्याचं झाड (भाग 2)
पूर्वार्ध 
https://kattayashashri.blogspot.com/2019/02/blog-post_21.html?m=1
                डॉ यथार्थ आचार्य मुळातून हादरले होते . या भाकड कथा नी अंधश्रद्धांवर त्यांचा विश्वास नसला तरी देखिल.... झाडांवर माया करणारा एक प्राध्यापक खंबीर होता पण लेकीच्या मायेनं एक बाप व्याकुळ झाला होता. चेहऱ्याची रेषही न ढळू देता त्यांनी आपला हात तिच्या डोक्यावर ठेवला. स्थिर नजरेनं तिच्याकडे पाहत म्हणाले " वना बाळा फार थकलीयेस तू! जरा आराम कर ...बरं वाटेल. " ते हात धुवायला म्हणून उठले परत येऊन पाहतात तर वना तिथं नव्हतीच.
                 आपण पाहतोय ते खरं की भास क्षणभर कळलेच नाही त्यांना ...हॉटेलच्या पोऱ्यानं तिला बाहेर पडताना पाहिलं होतं.. त्याच दिशेनं पुढे पुढे जात भेटेल त्याला विचारात डॉ. यथार्थ अक्षरशः धावत सुटले. काही क्षणांचाच तेव्हढा फरक ... कुठे असेल वना? त्यांच्या मनात वादळ उभं राहिलं. पत्नीच्या पश्चात प्रेमानं वाढविलेला हा इवला जीव वनश्री त्यांच्या जगण्याचं एकमेव कारण होती. तासाभरात नवीन पाहुणी गायब झाल्याच्या , झाडानी नेल्याच्या कहाण्या गावभर पसरल्या. मदत करणे तर दूरच जो तो डॉ यथार्थना बोल लावू लागला.
                    डॉ यथार्थ गावातली काही जाणती माणसे  घेऊन शोध घेत घेत गावभर हिंडू लागले. हा जत्था गावाच्या दक्षिणेस पोहोचला ... शेवटच्या टोकावरील मोकळ्या उजाड जागी  भग्न वाड्यापाठी ते झाड होतं.त्याखाली असणाऱ्या थडग्याजवळ पुतळ्या सारखी बसलेली वनश्री त्यांना दिसली.... ते मोठमोठ्याने हाका मारू लागले " वना ए वना अग! अशी न सांगता निघून का आलीस.. काय झालं माझं काळजीनं पाहिलेस का? " पण त्यांच्या हाका तिच्यापर्यंत पोहोचतच नव्हत्या मुळी.. त्यांनी जाऊन तिला गदागदा हलवत म्हटले .. " पुरे कर हा वेडेपणा .. चल चल बरं आपण घरी जाऊ ."  अचानक ते चपापून मागे सरकले .. त्यांचा विश्वास बसेनासा झाला त्यांच्याच डोळ्यावर ... वनाचे डोळेच काय हळूहळू चेहराही हिरवट होत चालला होता... काय प्रकार आहे हा?? खरंच कमला बाईंनी सांगितल्या प्रमाणे भुताखेताचा प्रकार आहे का? त्यांच्यातील विज्ञानवादी विचारवंताने हतबल होऊन शरणांगती पत्करली होती.
                गढूळून टाकणाऱ्या आर्त आवाजात वनश्री म्हणाली " पपा माझं बोलणं बाकी आहे अजून. ते अपूर्ण सोडून मी कशी येऊ .तुम्ही निघा ..." पाहणारे लोक स्तब्ध झाले होते कुणालाच काय करावे सुचेना . त्या झाडापुढे गुडघे टेकून डॉ यथार्थ बसले हात जोडून विनऊ लागले " मी आयुष्यभर प्रेम केलं झाडांवर ... त्याच हे फळ का ?? काय अपराध आहे माझ्या लेकीचा सोड तिला .. मला घेऊन जा .. Please..." बापाचं काळीज काय असतं हे त्या क्षणी त्यांना उमगलं होतं... शेवटी पुन्हा लेकीकडे वळत त्यांनी घरी चालण्याचा आग्रह सुरू केला..... एव्हढ्यात झाडाची एक फांदी कडकडाट करत मोडली अन थेट त्यांच्या डोक्यात पडली. बेशुद्ध अवस्थेत पुढे काय चालले आहे हेही त्यांना उमजेना.
                मध्यरात्री कधीतरी त्यांना जाग आली तेव्हा ते एका घरात होते ... गावातील काही माणसांनी त्यांना उचलून आणलं असावं.डोक्याला खोक पडली असावी... तिथं पट्टी बांधलेली होती. अचानक ते "वना वना " अश्या हाका मारत उठले.... आजूबाजूला बसलेल्या माणसे त्यांना रोखत म्हणाली " ओ पाव्हनं... कुठं निघाला? तुमाला कसं आनलं उचलून आमचं आमाले म्हैत." माझी लेक माझी लेक म्हणत धावत सुटलेल्या डॉ यथार्थना चार जणांनी बळेच धरून ठेवलं... एक वयस्कर माणूस त्यांच्या जवळ येत म्हणाला " आरं बाबा जीवांनी गेलास तू तर तुझी लेक कोन वाचिवनार?" सारे उमजून ते शांत बसले .देवरूषी ला बोलावणं केलं होतं आता तोच काहीतरी करू शकेल... कुणीतरी त्यांना ते का आणि कशाकरता आले हे विचारलं मग आपल्या झाडांच्या अभ्यासापासून ते कमला बाईंच्या माहिती देण्यापर्यंत सारं त्यांनी सांगून टाकलं .लोकांच्या चर्चा मेलेल्या मनानं ऐकत ते निपचित पडून होते...अचानक त्यांनी विचारलं " मी सुद्धा गेलो होतो ना तिथं  त्या झाडाजवळ .मला कसं काही झालं नाही."प्रश्नार्थक चेहऱ्यानं कुणीतरी दिलेले भांडभर पाणी ते घटाघटा प्यायले.
             आपण कमला बाईंचं ऐकलं असतं तर .... आता काहीतरी केलंच पाहिजे म्हणत त्यांनी मोबाईल काढला पण उपयोग शून्य त्याला रेंज नव्हती..सकाळी गावपाटालाच्या लँड लाईन फोनवरून संपर्क करू शकाल असं आश्वासन गावकीनं दिलं. दिवसभराच्या थकव्यानं आलेला शीण, डोक्यावरचा मार आणि मानसिक ताण या तिन्हींचा एकत्र परीणाम स्वरूप त्यांना बसल्या बसल्याच झोप लागली. स्वप्नात त्यांना वनश्री दिसली पूर्ण हिरवी झालेली सर्वांगाला वेली लपेटून उभी...... तिच्या डोळ्यांत कोणताच भाव नव्हता वेदना नव्हती... त्यांना म्हणाली " पपा ह्या झाडाला मुक्ती द्या . सोडवा त्याला Please... तुम्हीच हे करू शकता ." तेव्हढ्यात देवरूषी आल्याची पुकार झाली अन त्यांचं स्वप्न भंगलं.
क्रमशः...
कथेचा शेवट लवकरच ..
©यशश्री रहाळकर
         नाशिक





गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१९

भोपळ्याचं झाड

भोपळ्याचं झाड
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
              वनश्रीनं आपल्या नावाचं सार्थक करण्याचा जणू चंग बांधला होता. पुणे विद्यापीठात बॉटनी सेक्शन चे HOD असणाऱ्या तिच्या वडिलांचं झाडा फुलांचं वेड तिच्याही मनात झिरपल होतं....डॉ. यथार्थ आचार्यांनी ,आईच्या पश्चात  एकाट्यांनी तिला मोठ्या मायेनं वाढवलं होतं..ते या झाडांच्या सहवासात. बंगल्याभवती चिक्कार झाडी नी बाग. वनश्रीला झाडांची उत्तम जाण आणि ज्ञान दोन्ही होते. नुकतेच तिने MSC बॉटनी सारख्या क्लिष्ट पण प्रिय विषयात पुरे केले होते. पण पुढे वडीलांसारखी प्राध्यापकी न करता... PHD साठी संशोधन करायचा तिचा मानस होता. विषय देखिल मोठा आगळाच निवडला तिनं ....100 वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण झालेल्या झाडांचा रचनात्मक अभ्यास.
                   त्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी अत्यानंदानं डॉ यथार्थ ह्यांनी आपल्या लेकीच्या हाती तिचा विषय युनिव्हर्सिटी ने मान्य करून संशोधनाला परवानगी दिल्याचं पत्र दाखवलं. वनश्री मात्र अजूनही गंभीरपणे विचार करत होती, " पपा खरी समस्या तर पुढे आहे. मुळात 100 वर्षे पूर्ण केलेली झाडे फारच कमी आहेत. Sample size लहान असून कसा चालेल?" नाश्ता वाढता वाढता कमला बाईचे हात अचानक थबकले...ह्या कमला बाई वनश्रीच्या जन्मापासून सांभाळ करणाऱ्या बाई.. आईविना पोरक्या पोरीला त्यांनी मायेनं सांभाळलं घरातील सारी कामे त्या करीत पण या दोघा बापलेकीने त्यांना कायम आदरानं वागवलं.
                    "नग नग पोरी! ती इशाची परिक्षा..... ही अशी झाडं झपाटल्याली असतात. जीव घेतात येड करून सोडतात." ....आता मात्र वनश्री खळखळून हसू लागली. कमला बाई तरीही ठामपणे म्हणाल्या, " काई झाडं वादलवाऱ्यात मोडत न्हाईत.. उनपावसाचा काय बी परिनाम न्हाई होत... कित्येक वरीस जगत्यात कारन कारन.. भूतं खेतं असत्यात वस्तीला ." आता मात्र डॉ यथार्थ ना देखील हसू आवरले नाही. "बघ बघ वना!  तुझ्या संशोधनाचा आधीच कमला बाईंची PhD झाली सुद्धा."
                चिवट जिद्दीनं कमला बाई बोलत राहिल्या ." आसं झपाटल्यालं झाड असतंया ...मानसं वढून नेतया... गावकी त्याला कोंबड देतीय दर अमूशेला.. मी सोता पाहिलंय.. आमच्या गावात हाये एक भोपळ्याचं झाड... दोनसे वरीस जुना हे हे अश्या फांद्या" कमला बाईंचे हातवारे टिपत वनश्री हसू आवरून म्हणाली " अहो मावशी बाई ! भोपळ्याचा वेल असतो झाड नाही." डॉ. यथार्थ मात्र गंभीरपणे म्हणाले " वना कदाचित परभक्षक झाडांच्या प्रकारातील असावे.. काय ते शोधलेच पाहिजे."
                    वनश्री झपाटून कामालाच लागली.कमला बाईंचं गाव ' सुलतानपूर '  प्रचंड आडवळणाच पण इंटरनेट वर सहजी माहिती मिळाली. त्या झाडानं बरीच प्रसिद्धी मिळवून दिली होती.खरेच तसल्या वर्णनाचं झाड होतं . भोपळ्यासारखी गोल मोठ्ठी फळे लागणाऱ्या या झाडाला बोलीभाषेत भोपळ्या चे झाड म्हणत असले तरी त्याचे शास्त्रीय नाव होते क्रिसेंशिया कुजेटा . सिग्नोनियेसी फॅमिली तील हे झाडं भारतात आलंच कसं??  कॅलॅबॅश ट्री असं नाव असनारं हे झाड बेगर्स बाउल म्हणूनही ओळखले जाते.पुर्वीच्या काळी ह्या फळापासून एकतारी नावाच्या तंतू वाद्याचा तुंबा बनविला जाई... तर वाळलेलं फळ भिक्षापात्र म्हणून वापरले जाई "म्हणून बेगर्स बाऊल काय ?" वनश्री स्वतःलाच म्हनाली.
          अशी सगळी माहिती आणि सगळ्या कपोलकल्पित कथांना एकत्र करून वनश्रीने सायंकाळी आपल्या वडीलांपुढं भलं मोठ्ठ बाडच ठेवलं. त्यात झाडांबद्दलचे संशोधन अगदीच नगण्य आणि झाड कसं राक्षसी वगैरे असल्याच्या कथाच अधिक होत्या  ..... डॉ. यथार्थ आचार्य निसर्गपूजक निसर्गाला देव मानणारे होते ... झाड या निसर्गाचा सजीव घटक... हे भूत नी यांच्या कथा .. गम्मत वाटली आणि कमालीचं कुतूहल देखिल.
                 दोघा ही बाप लेकीने दुसऱ्याच दिवशी प्रत्यक्ष सुलतानपूरला जाऊनच पाहायचं ठरवलं .... रात्री जेवणाच्या वेळी वनश्रीने कमला बाईंना विचारले .." येताय का उद्या तुमच्या गावाला .. झाडाची भेट घेऊन येतोय तुमच्या" भीतीनं थरथरणाऱ्या कमला बाईंच्या हातून भांड गळून पडलं....फडाफडा स्वतः च्या तोंडात मारत त्या म्हणाल्या " कुटनं दुर्बुद्धी झाली रं देवा! म्याच चांडाळीन सोन्या सारकी पोर हाय तू नग जाऊस त्या झाडाच्या नादानं" ... तिला समजावून शांत करण्यासाठी वनश्री आणि डॉ यथार्थ यांचा बराच वेळ खर्ची पडला.
                दुसऱ्या दिवशी सकाळी थोडासा नाश्ता बरोबर पॅक करून घेत दोघ निघाले... नाशिक जिल्ह्यातील  जव्हार रस्त्यावर कुठल्याश्या 2/3 पाड्यांना ओलांडले की लागणारा रस्ता सुलतानपुर कडे नेतो . या माहितीवर दोघे निघाले खरे पण जव्हार रस्त्याला लागताच अनेकदा अनेक वळणे चुकवीत टळटळीत दुपारी अखेर सुलतानपूर पाटी दिसली ... काही खाल्लेलं नव्हतं... वळणावरच्या एक टपरीत जरासं थांबताच ... कोण कुठले चौकश्या सुरू झाल्या मात्र भोपळ्याच्या झाडाचं नाव घेताच लोकांनी बोलणंच  बंद केलं...  चहा पिऊन तरतरीत होत पुन्हा गावाच्या दिशेनं निघाले. अंतर खरंतर जेमतेम 20 km पण खाच-खळग्यानी अक्षरशः घुसळून काढले..... दमून भागून कसेबसे गावात पोचले तरी लगेच झाडाची चौकशी सुरू केली त्यांना लगोलग परतायचेही होतेच ना!
               वेशीवरच्या पारावर बसलेल्या वृद्धांनी त्यांना परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला... नाना कथा रंगवून सांगितल्या ... झाड कसं हात लावणाऱ्याला वेडं करून सोडत इथपासून ते झाड खेचून नेत इथपर्यंत... अखेरीस हे दोघे बधत नाहीसे बघून दुरूनच तो परीसर दाखवत लोकांनी पळ काढला. तारांचे कुंपण ओलांडून वनश्री ने पाय आत ठेवला.. गाडी पार्क करून डॉक्टर देखील पोहोचले .. झाडामागे एक भग्न वाडा असावा. ... खरेच वातावरण भीतीदायक होते.. अस्ताव्यस्त पसरलेलं ते झाड भयावह दिसत होते... वनाला त्या खाली एक थडगे दिसले .. मध्येच एक वाऱ्याची झुळूक आली नी त्या थडग्यावरील शिळी फुले उडून गेली झाडाची ताजी फुले टपटप करत त्या थडग्यावर बरसली... मंत्रमुग्ध होत वनश्री पाहत होती . तिथल्या प्रत्येक घटनेत एक सुसंगती होती... एक आगळे आकर्षण होते... एव्हाना डॉ. यथार्थ यांनी झाडाला स्पर्श केला चहुबाजूंनी निरीक्षण केले आणि संशोधनासाठी sample गोळा करायला सुरुवात केली...वनश्री एकटक त्या झाडाकडे पाहत होती जणू ते संवाद साधत आहे तिच्याशी..." वना ए वना ..अग हे बघ फळ या झाडाचं.." या पापांच्या हाकेसरशी भानावर येत ती झाडाच्या मागील बाजूस गेली...फळ पाने फुले फांदी सारेच नमुने बॅगेत भरत... ते निघालेही.. निघतांना अभावितपणे वनाचे हात त्या कबरीपाशी जोडले गेले..
                   एके ठिकाणी ते दोघे जेवणासाठी म्हणून थांबले...इतका वेळ शांत निःशब्द बसलेल्या वनश्री ला पाहून पपानी विचारलं .. " काय डोक्यात संशोधन सुरू झालेलं दिसतंय... आपली नजर एकटक त्यांच्यावर रोखून वनश्री म्हणाली .........." मला जायला हवं ... ते झाड बोलावतय मला. रडतय बिचारं .. खूप काही सांगायचंय त्याला.मला गेलंच पाहिजे" क्षणार्धात काही उलगडा होई पर्यंत डॉक्टरांना जाणवला तिच्या बुबुळांचा रंग गहिरा हिरवा झाला आहे ..
क्रमशः......
©यशश्री रहाळकर

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

वदनी कवळ घेता

                  🙏 वदनी कवळ घेता  ☺
                🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
            
            काल कित्येक दिवसांनंतर जुन्या नाशकात भोजनाचा योग आला... कपलेश्वराला याच तिथीला गेली 45 वर्षे सातत्याने अभिषेक करणाऱ्या एका स्नेह्यांकडे प्रदोषाचा प्रसाद लाभला .'पाटांवरील पंगत आणि वदनी कवळ चा गजर '.. हल्ली nostalgic व्हायला होतं. जुन्या नाशकात आणि त्र्यंबकेश्वरला अजूनही हे ' भोजना ' चं सुख अनुभवता येतं. 'भोजन ' आणि 'जेवण'  ही आताश्या दोन भिन्न प्रकरणे वाटू लागली आहेत. त्यातही भोजनाचा लाभ क्वचितच कधीतरी ... ह्या पंगती प्रपंचात आजकाल कुणी पडत नाही ;असं म्हणतांना आपण बरंच काही गमावलं आहे .
             'जेवण 'म्हटलं की सर्रास डोळ्यांपुढे नाचतात  छोले , मिक्स व्हेज, पनीरच्या भाज्या, बिर्याणी, भिंडी दो प्याजा, राजस्थानी पकोडे, बंगाली मिठाया झालंच तर चायनीज स्टारटर्स आणि इटालियन सॅलड वगैरे वगैरे... खच्चून भरलेल्या ताटात ढकला ढकल करत उभ्या आडव्याने बुफेत मिळवलेले जेवण नामक दिव्य ... 'अवघेची सारे पोटाचसाठी' म्हणत स्वाहा केलेलं. बरेचदा तर अगम्य काही... साधारण 90 च्या दशकात पुण्या मुंबई चे लोण म्हणत आलेले हे बुफे 2000 च्या सुमारास खेड्यापाड्यांत पोहोचले .त्यावेळी एका आजोबांनी बुफे ला ' गिधाड भोजन 'असे हिणवल्याचे आजही आठवतेय.. 😂😂 वेळेची कमी आणि सोयीचा भाग म्हणून आलेल्या या जेवणाने आपले खास महाराष्ट्रीयन पदार्थ जवळपास हद्दपारच केले.
            ' भोजन ' ....मात्र पुढ्यात ताटभर वाढलेलं सुग्रास अन्न, पाटांभवती रांगोळ्या, उदबत्तीचा घमघमाट आणि साजूक तुपाची धार भाताच्या मुदीवर वाढतांना वदनी कवळ म्हणत केलेला जय जय रघुवीर समर्थ! चा पुकारा ... अजूनही या जेवणात डावीकडे मीठ, लिंबू , चटण्या , कोशिंबिरी ताटांच्या समोरील बाजूस वाट्यामध्ये कढी, खीर आमटी वगैरे उजव्या हाताला बटाट्याची सुकी भाजी अन त्या खाली अळू ची पातळ भाजी मध्यभागी मसाले भात साधं वरण भात पोळी , गिलकी भजी यांचे स्थान ... हाच अगदी असाच मेन्यू जुन्या नाशकात प्रत्येक कार्यक्रमात असतो ... अगदी तेरवी किंवा श्राद्ध प्रसंगी ह्यात आमसूल चटणी, वडे, तांदळाची खीर, डांगर +गवार भाजी यांची भर पडते . बाकी सगळे तसेच्या तसे.... बदल ही काळाची गरज आहे हे निश्चित पण कधीकधी काही गोष्टी बदलूच नये असे वाटते .
                पूर्वी लग्नात ठराविक पदार्थ असत ... नाश्त्याला उपमा,  रात्री जेवणात गोड आंबट वरण, शिरा क्वचित बुंदी ,लग्नात लाडू किंवा जिलबी मठ्ठा. आमच्या विदर्भात तर उन्हाळी लग्नात एखाद्या मोठ्या ड्रम मध्ये मठ्ठा केला जाई .. वाटेल तेव्हा वाटेल तितका प्यायचा . एखाद्या श्रीमंतांच्या लग्नात आमरस पुरी असायची बाकी भरली वांगी मसाले भात . वाढण्यात आपुलकीचा आग्रह आमंत्रणात प्रेम माया 🙏 पोटाच काय मनही भरून जाई
              एका जुन्या मैत्रिणीचे वडील आजारी होते त्यांना भेटायला म्हणून सगळ्या एकत्रच गेलो. तिच्या आईनं गरमागरम कांदे पोहे हाती दिले . त्यावर शुभ्र नारळाचा चव , हिरवीगार कोथिंबीर, पिवळे धमक लिंबू आहाहा ! कित्येक वर्षांनी कुणीतरी असे मस्त पोहे दिल्याचं आठवलं.यथेच्छ चापून डिश ठेवायला म्हणून स्वयंपाक घरात गेले तर मैत्रीण आईला झापत होती  " पोहे काय ग केलेस ,कित्ती चीप वाटतं. मला सांगितलं असतं तर येतांना ढोकळे नाहीतर राजस्थानी मिठाई वाल्याकडून चाट वगैरे आणला असता." मी विस्मयाने पाहत राहीले..... 😳 ताजे चविष्ट पोहे आपले म्हणून चीप .  कुणीतरी कधीच्या काळी करून ठेवलेले ढोकळे, इडली मात्र 😋 वाव!
             आपले सगळे सोडून काहीतरी नवीन म्हणजे झक्कास काहीतरी असे आपले समीकरण झाले आहे . नाश्त्याला केला जाणारा गोडाचा  शिरा , उन्हाळ्यातील साठवणीचे पदार्थ , पापड लोणची, साखरंबे ,इतकेच काय तर लग्नात मिळणारा चिवडा लाडू हद्दपार होत त्याची जागा मिठाया आणि पुढे चालून dry fruits ने घेतली आहे. त्या चिवड्याचीही  काय गंमत होती ... असे बरेच चिवडे एकत्र करून कांदा, कैरी ,टोमॅटो घालून एकत्र केले जाई ... सगळ्या लेकी सूना त्यावर ताव मारीत. मुळात खाणं म्हणजे वाटून हे संस्कार होते. उन्हाळ्यात पन्हे सरबते होत ... हिवाळ्यात कढी भजी , शेंगुळे होत. खाण्यात आणि खाऊ घालण्यात असीम आनंद होता. कुणाच्याही घरी गेलो अन खाणे चालू असले की लगेच आपणही बसायचे .. शिळ्या पोळीचा कुचकरा असो किंवा लोणचं पोळी चवीने जेवायचे हे अगदी उत्तम राजरोस  सामाजिक वर्तन होते.
                   दिवाळी नंतरचे दिवस असावेत ..... सासूबाईंच्या एका मैत्रीणीकडे कागदपत्रे पोहोचवायला म्हणून गेले. पुढ्यात आलेली फराळाची डिश मी चवीनं खाल्ली. अत्यंत निगुतीने केलेल्या त्या प्रत्येक पदार्थाची अप्रतिम चव होती.  काकू अनाहूतपणे म्हणून गेल्या,
" कित्येक दिवसांनी कुणीतरी फराळ खाल्ला. नाहीतर डिश भरा आणि  माघारी नेऊन डब्यात रिकाम्या करा." काकूंच्या डोळ्यात पाणी होतं.....😢 रस्त्या रस्त्यावर विकायला ठेवलेले चिवड्याचे डोंगर पाहिले की पोटात तुटतं . काय होतं कळत  नाही पण काहीतरी खूप मौल्यवान हरवल्या सारखं वाटत राहतं.
            दुसऱ्या बाजूला  फॅशन म्हणून हुरडा पार्टी, चौरंग पाटावरचे जेवण, चुलीवरचे जेवण यांचे पेव फुटले आहे . भरमसाठ पैसे अक्षरशः ओतून ही महाराष्ट्रीयन कुझीन ची मिजास मिरवली जाते. कित्येक ट्रेंडी पदार्थांचे मूळ आपल्या कडील आहे जसे टर्मरीक लाट्टे नावानं आणि भरमसाठ किंमत मोजून घेतल्या जाणारा पदार्थ आपले दूध हळद आहे 😆
              मुळात जुनं ते सोनं वगैरे मानणाऱ्या लोकांपैकी मी नाही. पण काही चवी पिच्छा पुरवत राहतात आयुष्यभर... चुलीत भाजलेले चिंचोके, कैरी चिंच पाडून मीठ लावून खाल्लेल्या , आंब्याचा रस करतांना चोखून खाल्लेल्या साली नी कोयी ,😋 वाळवणाचा चीक, ओलेच पळवलेले पापड अजूनही रेंगाळतात जिभेवर . ...." उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म " चा  अर्थ पटवून देत.
🔏© यशश्री रहाळकर
           नाशिक
         18/02/19

शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१९

श्रद्धांजली

आई भवानी तुझ्या कृपेने शिवराय जन्मले पाहिजे
हिरवा रंग कोळून तिरंगा भगवा झाला पाहिजे ।।धृ.।।

पुरे झाली सहिष्णुता आता क्रांतीचे वादळ पाहिजे
चर्चा बैठका बास आता अंतिम तोडगा पाहिजे
आता भगव्या रंगाने पांढरी वेस ओलांडली पाहिजे ।।१।।
हिरवा रंग कोळून तिरंगा भगवा झाला पाहिजे ....

कितीक मरणे अजून आता भारत मातेने झेलावी?
किती शहिदांच्या मातांची कूस पोरकी अजून करावी ?
कधीतरी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंच पाहिजे।।२।।
हिरवा रंग कोळून तिरंगा भगवा झाला पाहिजे ....

नीच हल्ले भ्याड त्यांचे लांडग्यासही वाटेल लाज
त्या शहिदांच्या लेकरांना आश्वस्त कोण करणार आज ?
सांडलेल्या रक्ताच्या एका थेंबासाठी 100 दहशतवादी मारले पाहिजे ।।३।।
हिरवा रंग कोळून तिरंगा भगवा झाला पाहिजे ....

💐भावपूर्ण श्रद्धांजली🙏

©🔏यशश्री रहाळकर
           नाशिक
        15/02/19

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम असतं 💘

💞💞💞💞💞💞💞💞
      
         " प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं " असं म्हणणाऱ्या पाडगावकरांची (माफी मागून) मोहक कविता वाचत तारुण्यात पदार्पण वगैरे केलेल्या मला प्रत्यक्षात मात्र हे 💓 'सेम ' असतं असं मुळीच वाटलं नाही ...लग्नाआधी प्रेम करून थांबलेलं प्रेम , विवाहाच्या वळणावर पोहोचून थांबलेलं प्रेम, विवाह करून नंतर कधीतरी सुरू झालेलं प्रेम (जोडीदारावर किंवा दुसऱ्याच कुणावर 😝), arrange marriage वाले किंवा love marriage वाले प्रेम किंवा नव्यानेच ज्ञानात भर पडलेलं इश्कवाला वाला love प्रेमाच्या अनेक तऱ्हा ,अनेक रूपं... आता ह्याचं वर्गीकरण करून खरं प्रेम ,आकर्षण किंवा शाश्वत प्रेम वगैरे वगैरे शाब्दिक घोडे नाचवून कोणतेही उदात्तीकरण मला मान्यच नाही. मुळात प्रेमाच्या कक्षेत कितीतरी भावनांना आपण उगाच ओढत बसतो.
           प्रेमाची व्याख्या आपली आपल्यातरी कुठे उमजली असते नीटशी... ... हेच बघा आईचं प्रेम सगळ्यात पवित्र मानतो आपण त्याला म्हणतात " ममता" .. वडिलांच्या प्रेमात काळजी असते ,....भावाच्या प्रेमात संरक्षण...बहिणीच्या प्रेमात माया असते ...प्रियकराच्या आकर्षण... पतीपत्नीच्या प्रेमात जबाबदारी असते.. नातं निभावायची . ...लेकाच्या प्रेमात हक्क असतो लेकीच्या प्रेमात ओढ असते.... प्रेम प्रत्येक नात्यांनीशी आपल्या समवेत वेगवेगळ्या भावनांचं कोटींग घेऊनच येतं ....
          यापलीकडे जाऊन " केवळ प्रेम" अशी एकटी जागा व्यापणार काही असतं का हो?? असायला हवं नाही का! मनुष्य उपजत स्वार्थी स्वभावानुसार सर्वाधिक प्रेम करतो ते स्वतः वर... मग आपल्या गरजेच्या, सोईंच्या, फायद्याच्या अश्या व्यक्तींचे एक वर्तुळ बनवत जातो ....वाढवत जातो. तरीदेखील सर्वाधिक प्रेम असते ते स्वतः वरच ...या स्वार्था पल्याड विचार करून जेव्हा माणूस दुसऱ्या कुणाचा विचार करतो ... तिथेच सुरुवात होते प्रेमाची...ज्यात फायदा तोटा नफा नुकसानीची गणिते नसतात... देवघेवीच्या पलीकडे जाणारं संपूर्ण समर्पण असतं प्रेम ....
           अर्थात याचा नको तो अर्थ घेत ......प्रेम म्हणजे त्याग म्हणत घरादारावर तुळशीपत्र ठेऊन ... रस्त्यावरच्या उनाड मुलाचा हात धरून पळून जाणाऱ्या बिंडोक मुलींनी " प्रेमासारख्या " पवित्र भावनेला बदनाम करून ठेवले आहे .😢
              आपल्या सिनेमांनी तर प्रत्येक मनावर जणू बिंबवलं आहे की कॉलेज मध्ये जायचे कश्याला? तर प्रेमात पडायला.... love at first sight वाल्यांचे तर पायच धरावेशे वाटतात... 30/35 वर्षे practice असलेला डॉक्टर देखील ढीगभर tests केल्याशिवाय नेमकं काय झालंय ते सांगत नाही ...यांना दिव्य दृष्टी प्राप्त असावी बहुदा.
              यावर माझ्या जवळच्या मैत्रिणीनं "तुम्ही arranged marriage वाले जळता आमच्या वर " अशी खोचक कुजकट प्रतिक्रिया दिल्या वरही... मी शांतपणे तिला विचारलं ... " लग्नानंतर प्रेमात पडू नकोस कुणी सांगितलं?" व्यवहार म्हणून केलेल्या लग्नानंतर हळूहळू जोडीदार उमजत जाणं अन नकळत त्याच्या प्रेमात पडणं ...हेही प्रेमचं नाही का! आमच्या ह्या प्रेमात प्रपोज, रिंग , heart shape चे gift , डिनर नसेल कदाचित ... पण आधार असतो , विश्वास असतो... सगळ्यात महत्वाचे म्हणजे धीर असतो. आयुष्य उतरणीला लागल्यावर उतारवयात एकमेकांचे हात हातात घेऊन जाणाऱ्या आजीआजोबांना पाहिलं की वाटतं हेही प्रेमच ना!
               काही दिवसांपूर्वी एक शहीद जवानाच्या अंत्यविधीला हातात 3 महिन्यांचं बाळ घेऊन कोरड्या डोळ्यांनी उभ्या असलेल्या तिला पाहिलं... असं प्रेम ज्याला कोणत्याही व्याख्येची गरजच नाही.....😢
            प्रेमादिवसाची खरंच आवश्यकता आहे ... एकदा क्षणभर थांबून उजळणी करण्यासाठी ... वेगवेगळ्या वाटांनी येणाऱ्या प्रेमाला वाट करून देण्यासाठी, मनाची बंद कवाडे उघडून खुल्या मनानं जगण्यासाठी...

     " आज क्षणभरासाठीच मला
                  मागे वळून पाहायचं
        ममतेचं देणं तिचं
                   दुप्पट करून चुकवायचं
       काळजी घेतली आयुष्यभर
                आता त्यांची सावली व्हायचं
       काही क्षणांना स्वतः पलीकडे
                 मायेच्या माणसांना द्यायचं
        गळा मिठीत पिल्लाच्या त्या
                 सारंच विसरून जायचं
        प्रेमाचे सारेच रंग गुंफून
                 इंद्रधनुष्य ते विणायचं
         त्यालाही सांगेन म्हणतेय आज
                  प्रेम मनांत साठलेल
         आयुष्याच्या खाचखळग्यात
                    भक्कम होऊन उरलेलं....."

          जगतोय म्हणजे प्रेम करतोच आहोत आपण... फक्त गरज आहे ते व्यक्त करण्याची . आजच्या दिनाचं सोनं करूया ..प्रेम व्यक्त करूयात .. त्या सगळ्यांवर ज्यांनी खूप प्रेम दिलंय... न मागता👍

Happy Valentine's Day!💞

🔏© यशश्री रहाळकर
          नाशिक
       14/02/19

मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९

कविता- अधुरं स्वप्न

10 फेब्रुवारी 2019 वाघोली येथे झालेल्या काव्यधारा साहित्य मंच आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत विषय दिला होता 'अधुरं स्वप्न '. माझ्या या कवितेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले तिच आज माझ्या blog च्या वाचकांसमोर ठेवतेय.
अधुरं स्वप्न
अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी या पंचकन्यांच नामस्मरण आजही करतो आपण
एव्हढेच नव्हे तर घडवतोय अजूनही आपल्यातल्याच काही..
महानतेच्या सोनेरी आवरणात गुंडाळून आयुष्याची लक्तरे सांभाळीत ...
किती सोपं असतं ना एखादीला अहिल्या ठरवणं ... एखाद्या वासनांध इंद्राच्या कपटासाठी,
तिच्या आयुष्याची शिळा अन त्याचं पुरूषत्व इंद्रपद राजरोस भूषविणारं ....
द्रौपदी तर खडा मारला तिथं भेटतील ...
नाक्यानाक्यावर नजरेनं मनातल्या मनात तर कधी 
भर चौकात विवस्त्र केल्या जाणाऱ्या .... आपल्याच कुणातरी नात्यातल्या सोयऱ्याकडून....
जोडीदार निवडीचंही स्वातंत्र्य नसणाऱ्या कित्येक द्रौपदी ओढताहेत संसाराचा गाडा ;
मन मारून लादलेेला नवरा अन नकोसं बाईपणाचं ओझं सावरीत
नवऱ्याच्या वाटचा वनवास हसतमुखाने भोगल्यानंतरही कित्येक सीतांना द्यावीच लागते पावित्र्याची अग्नीपरीक्षा ...
ती देउनही तिलाच  सोडलं जातं एकटीला रानावनात पोटात पोर असतांना
वाली आणि सुग्रीवाच्या वादात भरडल्या जाते निरपराध तारा ...
आजही तिच्याच डोक्यात दगड घातला जातोय जमिनीच्या तुकड्याच्या मालकीसाठी
कित्येक मंदोदरी भेटतात आजही नवऱ्याची सारे पापे पचवून हसतमुखानं संसाराचा तोल सावरीत
दिमाखात गृहीणीपद भूषवित मुले वाढवित तोंडातून ब्र सुद्धा न काढता
पुराणातली वांगी पुराणात म्हणावी का ?? असे असतांना
जेव्हा आजही तिच्या जगण्याचे आडवे उभे अक्षांश रेखांश काडीमात्र बदलले नासतांना
आजही रोज कित्येक अपुऱ्या स्वप्नांचे गाठोडे उशाशी घेऊनच झोपते ती...
अबला दुबळी देवघेवीची वस्तू ..आवाज उठवला की अचानक  फेमिनिस्ट असते ती
तिच्या या गाठोड्यात सर्वात वरती स्वप्न आहे मातृशक्ती जिजाऊंच
प्रत्येक स्त्रिला सन्मान आणि जगणं स्वाभिमानाचं
एक स्वप्न जोतिबाच्या सावित्रीचं प्रत्येक लेकीला शिक्षण देण्याचं ..
एक स्वप्न झाशीच्या राणीचं आयुष्यातल्या प्रश्नांशी तलवार उपसून लढण्याचं
रमाबाई रानडेंच आत्मनिर्भरतेच स्वप्न , डॉ आनंदी गोपळांच प्रत्येकीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच स्वप्न
सारीच अपुरी स्वप्ने गाठोड्यात बंद
अन गाठोड्यावर पडली आहे निरगाठ  ...
एक स्वप्न माझही आहे ती निरगाठ सोडण्याचं
सारे स्वप्ने मोकळी करून प्रत्येकीला वाटण्याचं ...
गाठोड्याला उशाशी घेउन शांत मी झोपणार आहे
आज गाठोड उघडण्याचं अधुर स्वप्न मी पुरं करणार आहे .
©यशश्री रहाळकर
( ही पोस्ट संपुर्ण आणि केवळ नावासह forward करण्यास हरकत नाही )


शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

C for credit

"C" for credit 
            ©®
सोशल मिडियावरील उचलेगिरी
🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏
           गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर एक तीव्र साथीचा रोग झपाट्याने संक्रमित होत आहे... तो म्हणजे  "उचलेगिरी ".... अर्थातच आपल्याला आवडलेल्या पोस्ट मधील व्यक्तीचे नाव काढून आणि पुढे जाऊन तेथे आपले नाव जोडून Credit ढापणे .. लाटणे .. बळकावणे ... हिरावणे .... असे सगळे " लाजिरवाणे" कृत्य साळसूद निलाजरेपणाने करणे.
        अनेक प्रतिथयश कवी , लेखकांच्या लेखणीतून झरणारे मोती उचलून हे उचले त्याची माळ गळ्यात मिरवित असतात . खरतर एखादी आवडलेली पोस्ट लेख वा कविता जशीच्या तशी forward करणे अधिक सोपे नव्हे काय ? पण ही मंडळी आपल्या विशेष कौशल्यांचा वापर करून अधिकचा रिकामटेकडा वेळ वापरून पोस्ट मोडून तोडून स्वतःसाठी वापरतात... whats app आणि facebook वर तर ह्या आजाराने संक्रमित अनेक लोक सहजी सापडतात. दुसऱ्याचे श्रेय सोयिसकररित्या हिरावून घेण्याची ही विकृती नव्हे तर काय?🙇🏻‍♀
            मृणाल कुलकर्णी ह्या नावासारख्याच चिरतरूण असणाऱ्या माझ्या सखीन  स्वतःच्या मंगळागौर गृपची ॲड नाजूक शब्द गुंफून अगदी नजाकतीने पेश केली ... नी हाय रे दुर्दैवा !!!... अल्पावधीतच अनेकांनी त्यात फक्त आपले नाव बदलून तिच ॲड पुढे केली. तनुजा जोशी डांगे नामक मैत्रीण वेट लॉस प्रोडक्ट संबंधित अत्यंत खमंग तडकेबाज लेख लिहिते .... नुकताच एकीने तिचा लेख facebook वर तसाच्या तसा आपल्या प्रोडक्ट साठी उचलला..अनेकींच्या निषेध,  विरोध,  नारेबाजीला घाबरून तिने तो काढून टाकला खरा पण साधी माफी मागण्याचे सौजन्य नाही.
आपण ' इदम्न मम ' म्हणायला कधी शिकणार ... जे ज्याचे आहे त्याचे श्रेय मिळूदेत की त्यालाच.
            यातही ladies first ...बायकांचा या बाबतीत कुणीही हात धरू शकत नाही .... ज्यांची नावे घेण्याचीही आपल्याला  हिम्मत करावी लागते... त्या गुलझार , जावेद अख्तर  वगैरे मंडळींच्या शायरी खुशाल आपल्या म्हणून खपवतात. एकीने तर कळसच गाठला... तिने पोस्ट केलेला शेर मिर्झा गालिब यांचा असल्याचे तिला स्पष्ट करताच " कोण वाचतय ग हल्ली... तुला जरा माझ कौतुक झालेल खपत नाही!" असे उत्तर दिले . मनाला नाही तरी copyright ला तरी घाबरा...😔
          वपु काळे यांच्या पुस्तकातील उतारे अन वाक्ये Good Morning thoughts म्हणून वापरताना वपुंचे आदराने नाव घेतले तर बिघडले कुठे? याहून मजेशीर प्रकार म्हणजे वाटेल तो प्रसंग आणि कथा महान लेखकांच्या नावाने खपविणे ... पुलंच्या आयुष्यात प्रत्यक्षात न आलेल्या प्रसंगांवर तर अक्खे पुस्तक लिहिता येइल.
इतिहासाचे विकृतीकरण ही याच आजाराची पुढील गंभीर अवस्था.
            एका अत्यंत जवळच्या व्यक्तीने मला एका मासिकासाठी लेख लिहायला लावला ... आणि पुढे भरपूर buttering करून... लेख प्रसिध्द व्ह्यायलाच हवा... मात्र तुझे नाव कसे देणे शक्य नाही वगैरे सांगत तो लेख स्वतःच्या नावाने छापला.... हे म्हणजे दुसऱ्याचे चोरून  आणलेले मूल स्वतः म्हणून वाढवणेचं .... या जगात सार काही ready made नसते हो मिळत ... प्रतिभा ही त्यातीलच एक दैवी देणगी.... तिचा सन्मान करा .
          आपण forward करत असलेल्या पोस्ट म्हणजे आपण त्या मतांशी  सहमत आहोत असे स्पष्ट होते... याची जाणीव खरच असते का? या सोशल मीडियाने आपल्याला साक्षर केले पण सुशिक्षित मात्र आपले आपल्यालाच व्हायला हवे. सोशल मिडीयावरील लहानमोठ्या tips , लेख , कविता ... आवडल्यास जरूर नावानिशी forwad करण्यातून आपण आपलीच प्रतिमा उंचावत असतो... Credit ह्या शब्दाचा अर्थ जसा पत प्रतिष्ठा आहे तसाच विश्वास आणि श्रध्दा देखिल आहे... त्याचप्रमाणे गुणान्मुळे प्राप्त झालेला सन्मान म्हणजे देखिल Credit .... असा सन्मान ज्याचा त्याला मिळू द्या...
लेख कविता म्हणजे आत्मजा.... आत्म्यापासून जन्मलेली.. असू देत कसेही ... पण आमचा तो बाब्याचं 👌🏻👌🏻 हजारोंचे गॅझेट्स वापरणाऱ्यानो..मन ही थोडस मोठ करा की..😊
         माझी ' माहेरपण' नावाची कविता whats app वर गाजली ... पण दुर्दैवाने माझे नाव गाळून ...याच विषयावर चर्चा करताना सीमा नावाच्या माझ्या  साहित्यप्रेमी मैत्रीणीने मोठी मार्मिक टिप्पणी केली होती...      " वेद अपौरूषेय होते असं म्हणतात ..तसं चांगल्या लेखांचे लेखक वाँटसेपवर गायब होतात."
         आवड म्हणून ..छंद म्हणून काहीबाही पण उत्तम लिहिणाऱ्या एखाद्या माझ्या ला मिळू देत ना कौतुकाची थाप  !!! शेवटी काय तर... दुसऱ्याचा मौल्यवान ऐवज स्वतःचा सांगणारा चोरच असतो.... प्रत्येक वेळी कायद्याचा बडगा कशाला??
✒© यशश्री रहाळकर
(लेख  आवडल्यास तोडफोड न करता नावासह Forward कराल अशी अपेक्षा बाळगते... धन्यवाद🙏🏻 )