फॉलोअर

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

शांताबाई


"सिंधों ! अग यें सिंधों ! इक्डे यें बघों...."

आजही कित्येकदा डोळे मिटलेले असतात आणि कानात तिची सानुनासिक साद घुमत राहते... मधली उणीपुरी तीस वर्षे गळून पडतात आणि मी मनाने आमच्या जुन्या घरात पोहोचते सुद्धा.. माळवदाचं घर, त्यातली ती खांबा-खांबांची मधली खोली, वर जाणारा लाकडी जीना आणि वर तिची पिटुकली खोली... सगळं चित्र काढल्यागत झपझप डोळ्यांसमोर साकार होतं...  ती शतकाच्या दोन दशके मागे आणि मी जेमतेम अर्ध दशक गाठलेलं .. तरीही वयाचा अडसर न होता, तिची आणि माझी खास गट्टी होती... श्रीमती शांताबाई दिनकर केतकर माझी पणजी आज्जी ... सगळे तिला "मोठी आई" म्हणायचे. फार थोड्या लोकांच्या नशिबात आजी-आजोबांचे प्रेम असते आणि त्याहून अगदीच भाग्यवान लोकांना पणजी आजी/आबा असतात ... मी त्यांपैकीच एक. 

मोठी आई बाकी नावालाच "शांता" होती बाकी तिचा आणि शांततेचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नव्हता. ती अगदी हाय पिच मध्ये तिच्या सुनांची (म्हणजे माझ्या आजींची) नावे घेऊन किंचाळत असायची... आणि ह्या मात्र स्थितप्रज्ञासारख्या आपापली कामे शांतपणे करीत असत.... बरेच वर्षांची सवय असावी.. माझ्या वाट्याला मोठी आई आली तीच अंगभर सुरकुत्यांचे जाळे घेऊनच, कमरेत वाकलेली , आणि डोळ्यांवर जाडा काळ्या फ्रेमचा चष्मा असणारी... तिचा मूळ रंग कोणता होता देवास ठाऊक? पण कष्ट करकरून ती पुरती रापलेली होती. कथ्था आणि खरबूजी फुलाफुलांची नऊवारी ती चापून चोपून नेसायची... अजूनही आठवते मला ती तशीच ... ती मूळची हट्टी होतीच आणि आपलं तेच खरं करूनही घ्यायची. स्वभावाने बोलघेवडी आणि बिनधास्त होती... अगदी समोरच्या बाईला,

"लेक नकटी आहे गो नाकाने कांदे नको सोलू" 

असे खुशाल म्हणून मोकळी व्हायची. आमचीच काय ती साऱ्या गल्लीची मोठी आई होती... जाणारा येणारा प्रत्येक जण तिच्यापाशी घडीभर टेकायचाच... आणि नाहीच थांबला कुणी तर...

"म्हैस व्याली काय रे रामभाऊ?"... म्हणून ती अडवायची मग काय पळणाऱ्याला थांबवेच लागे.

ती बहुतेक सगळ्यांच्या चार पिढ्यांना ओळखायची... त्यामुळे हा दुर्गाचा नातू, तो सदाशिवाचा बाळू, रामनाथचा धाकटा ... असे अगम्य परीचय तिच्या पुरते फिक्स असायचे, आम्हाला ते काही कळायचे नाही हा भाग वेगळा.

सगळी गल्ली तिची जिवलग होती सगळ्याच तिच्या लेकी सुना होत्या... तिचा नशिबावर खूप विश्वास होता... तशी नशिबाने तिला अजिबातच साथ दिली नव्हती तरीही.. ती लॉटरीचे तिकीट घ्यायची... आणि गंमत म्हणजे दोनचार वेळा लागले सुद्धा. एकदा दोन की तीन हजार रुपयांची लॉटरी लागली तिला आणि गल्लीतल्या सगळ्या लेकिसुनांना तिने पैसे चक्क वाटून टाकले... त्या सगळ्या तिच्या केवळ तोंडदेखल्या सूना नव्हत्या ती त्यांच्यावर मायाही करायची आणि तितकाच हक्कही गाजवायची. आमच्या घरी एक भलीमोठी सतरंजी होती आणि एक आंबेफोडणी (लोणच्याचा कैऱ्या फोडायची विळी) ... ह्या दोन वस्तू अख्ख्या गल्लीत केवळ आमच्या घरी होत्या आणि त्या आमच्या घरी कधीच नसायच्या... मग जेव्हा कधी त्या लागायच्या तेव्हा शेवटी कुणाकडे कार्य झालं किंवा शेवटी लोणचं कुणी घातलं असा अंदाज घेऊन मागून आणाव्या लागत असत.

मोठी आई आणि मी पायऱ्यांवर बसून गप्पा मारतोय, असं चित्र आजही स्पष्ट दिसतं डोळ्यांपुढे, गप्पा काय मारायचो ते मात्र आठवत नाही. तिला पान खायची भारी आवड होती . वयपरत्वे दात गेल्याने चावून खाता येईना मग ती ते एका पितळी खलबत्त्यात कुटून कुटून खायची. पानाने तोंड चरबट होऊ नये म्हणून त्यात एक  गोड गोळी सुद्धा घालायची. ह्या गोड गोळ्या दहा पैश्याला दहा मिळायच्या... त्या आणण्याची जबाबदारी अस्मादिकांच्या शिरावर असायची...घरासमोरचा रस्ता ओलांडून माऊली नावाचे एक दुकान होते तिथे ह्या रंगीबेरंगी गोड गोळ्या बरणीत भरलेल्या असायच्या. त्या आणून देण्याचा टॅक्स म्हणून मग 2 गोळ्या मला देण्यात येत होत्या. मोठ्या आईची आठवण म्हणून मी तो पितळी खलबत्ता आजही जपून ठेवला आहे आणि माहेराहून हक्काने तोंड उघडून मागून घेतलेली ती एकमेव वस्तू आहे.... माझ्यासाठी सगळ्यांत किंमती , अनमोल आहे तो.

माझ्या आईवरही नातसून म्हणून तिची अतिशय माया होती... तिने तिच्या खोलीत काही खास केले की ती डब्यात डबा घालून आईच्या नावे झाकून ठेवायची आणि सगळ्यांत धाकटा काका बरोब्बर ते फस्त करायचा... त्याच वय आणि स्वभाव हूड ... दोघांचे क्षणभर पटले नाही कधी... सतत ती त्याच्या नावे आजीला बोल लावायची आणि मग तो अजून खोड्या काढायचा. मोठी आई कटाची आमटी अप्रतिम करायची, ती मला आठवते तशी शेवटचे काही महिने सोडले तर बरेच वर्षे चांगली कामे करायची... घरकामांचा तिचा उरक फार होता... मात्र सोबत तिचे तोंडही त्याच वेगाने वाजायचे. माझी आजी आवर्जून सांगायची की , "मोठ्या आईंनी आमची बाळंतपणे खूप व्यवस्थित केली अजिबात सव्वा महिना खाटेखाली उतरू दिलं नाही." सतत काम करणे हा तिचा पिंड होता.. ती स्वस्थ बसलेली दिसणे दुर्मिळच होते. हातात माळ घेऊन जप तरी करायची नाहीतर वाती तरी वळायची ती बसल्या जागी.

माझ्या आजीला वस्तू चटकन कुठे ठेवली ते काही आठवायचे नाही मग ती घरातील देवघरात ठेवायची... असे करत करत अर्धा संसार देवघरात गोळा होई. एकदा मोठी आई पूजेला बसली मी बाजूला सहाणेवर चंदनाचे खोड उगाळत बसले... देवासमोर वस्तूंचा एव्हढा डोंगर होता की देवच दिसेनात... मग मोठ्या आईने एकेका देवाचे नाव घेऊन (किंचाळत) एकेक वस्तू बसल्या जागेहून फेकायला सुरुवात केली... घरभर तिने दाणादाण उडवली... पेपर, चष्मा, सुटे पैसे, बिले, याद्या, पत्रिका घरभर चहूदिशेला पसरून फेकल्या. आजही तो प्रसंग आठवला की हसू आवरत नाही मला... केशवाय नमः माधवाय नमः इतक्या रागाने त्या नारायणाच्या शत्रूनेही म्हटले नसेल... सगळे देव ताम्हणात झोडपून काढत तिची पूजा होत असे. 

सगळ्यांमध्ये राहूनही स्वतंत्र कसे रहायचे ह्याचा ती आदर्श वस्तुपाठ होती. ती सणावाराला किंवा मन मानेल तसे दोन पैकी कोणत्याही सुनेकडे जेवायला जायची पण तिची स्वतंत्र खोली आणि स्वतंत्र खाणेपिणेही करायची... ते तिच्या खोलीत.. दोन्ही घरांच्या मध्ये जिन्यावरच्या खोलीत बरीच वर्षे तिने तिचे तिचे केले... अर्थात म्हणून तोडुनही टाकले नाही कुणाला पण व्यवहार सुद्धा चुकवला नाही. काका आजोबांचा दुधाचा व्यवसाय होता ,त्यांना (स्वतःच्या मुलाला) ही मानी बाई चक्क पैसे द्यायची दुधाचे... प्रेम वेगळे व्यवहार वेगळा हे शिकवले तिने. तिच्या शेवटच्या काही महिन्यांत तर तिची फार गंमत यायची तिचे काळवेळेचे गणित पार बिघडले होते ती मध्यरात्री सकाळ झाली म्हणून सगळ्यांना उठवायची तोपर्यंत तिचे स्नान पूजा वगैरे झालेले असायचे आणि घड्याळात रात्रीचे दोन /तीन वाजलेले असत... मग सगळे तिला समजावत की अजून रात्र आहे पण तिला काही ते पटायचे नाही.

माझ्यापाशी तिच्या फार मोजक्या स्मृती आहेत त्यातल्याही कित्येक काळाच्या ओघात पुसून गेल्या... पण ती मला भेटत गेली ती बाबांच्या गप्पांमधून. बाबांचे तिच्यावर आणि तिचेही बाबांवर विलक्षण प्रेम... पहिला नातू म्हणून असेलही कदाचित. बाबा तिच्याविषयी भरभरून बोलायचे... त्यांच्या शेवटच्या काही दिवसांत तर ती त्यांना दिसत असे😢 .. ते ती समोर बसलीये असे सांगत तिच्याशी गप्पा मारत. त्या त्या वेळी वाटायचं.. ,"आता तिच्याशी बोलता आलं असतं तर..? ".. कदाचित ती अधिक चांगली कळली असती. 

शांताबाई  उर्फ मोठ्या आईचे आयुष्य कोणत्याही कादंबरीपेक्षा कमी नव्हते . बडोद्याचे माहेर असणारी ही जोश्यांची लेक , हरिहरेश्वर जवळच्या केतकीच्या केतकरांना कशी दिली हे माझ्यासाठी एक कोडंच आहे.माझे पणजोबा इंग्रजांच्या काळात लष्करात होते... कोणत्यातरी युद्धात ते गेले आणि ऐन तारुण्यात २६ व्या वर्षी ती विधवा झाली. पदरात दोन मुले एक मुलगी आणि मिळालेला जमिनीचा तुकडा  विदर्भातील एका खेड्यात... तेव्हाची परिस्थिती अत्यंत बिकट होती . तेव्हा कुणीही ताक विकायचे नाही मग ही मुलांना घेऊन गोठयांमधून ताक आणायची... घरातील दोन मुलांपैकी जो शिकत होता त्याला म्हणजे माझे आजोबा, दादांना एक पूर्ण भाकरी मिळत असे आणि दुसऱ्याला अर्धीच भाकरी.... तिने प्रचंड कष्ट केले . थकली नाही परिस्थितीपुढे झुकली नाही... ऐन तरुण वयात, ती निडरपणे शेतात राखणीला जायची. दर वेळी कुणाला मदतीला बोलावणार, आपणच आपलं काम करून मोकळं व्हायचं... असं तिचं म्हणणं असायचं.

लेकीचं त्या काळातल्या प्रथेनुसार योग्य वेळी लग्न लावून दिलं.. मुलगा पाहण्याची वगैरे पद्धत नव्हती. त्या मुलाचा कान तुटका असावा... नवरीला मैत्रिणींनी," तुझा नवरा कान्या" असं चिडवलं... पोर वयच ते तिने ते इतकं जिव्हारी लावून घेतलं की ऐन तुळशीच्या लग्नाच्या दिवशी तिने तिची जीवनयात्रा संपवली... मोठ्या आईसारख्या प्रचंड खंबीर बाईचे तेव्हा काय झाले असेल, मी कल्पनाच करू शकत नाही. तेव्हापासून आमच्या कडे प्रत्येक कार्यात तिची आठवण काढून एक सवाष्ण जेवू घातली जाते, तुळशीचे लग्न करत नाहीत ते 'लेकीबाळींना साहत नाही' असे तिचे मत होते. पुढे ती घरातील मुलींच्या बाबतीत फार हळवी होत गेली... माझी आत्या तिची फार लाडकी होती... एकंदरच तिची तिच्या नातींवर आणि मग माझ्यावर म्हणजे पणतीवर सुद्धा विशेष माया होती. तो तिच्या मनातील कदाचित खूप हळवा कोपरा असेल.

पुढे दिवस पालटले, दादांना नोकरी लागली, शेतीत जम बसला... तिने चांगले दिवस सुद्धा पाहिले. माझी आई म्हणजे तिची पहिली नातसून.. आपली खंत एकदिवस बोलून दाखवत ती म्हणाली,

 "लता! तुला आजेसासू म्हणून माझी नथ मी द्यायला हवी होती ग ! पण तेव्हढा एकमेव दागिना उरला जो माझ्या लेकाचा दहावीचा फॉर्म भरताना मोडावा लागला..." 

ती भन्नाट होती... मानी होती , कष्टीक होती आणि मुख्य म्हणजे कमालीची खंबीर होती. माई गेली (माझी आजी), बाबाही गेले... तिला माझ्याशी जोडणाऱ्या दोन्ही साखळ्या गळून पडल्या... पण अजूनही ती माझ्यात कुठेतरी आहे अंशरूपाने असेल कदाचित.... विपरीत परिस्थिती, परीक्षेची वेळ येते, मन निराश होतं... तेव्हा तेव्हा मी पाय घट्ट रोवून खंबीरपणे उभी राहते... ती मी एकटी नसते तर माझ्यातले तिचे DNA असतात. "जिथे आयुष्य संपल्यात जमा असतं तिथे एक नवी सुरुवात करता येते"...ती मला सांगत असते.

कै शांताबाई केतकर ह्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन! 🙏

✒️ यशश्री रहाळकर

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

पारंब्या

आज अनेक वर्षांनी नाशिकला आजोळी निवांतपणे राहायला आली. मुंबई (मध्य) मध्येच जन्मून वाढलेली आणि आता पस्तिशी गाठलेली मेघना पक्की मुंबईकर... लग्नानंतरही तिथलीच झालेली.... मात्र तिची ती लहानपणची आजोळची ओढ अजूनही तशीच.... तेव्हा उन्हाळी शिबीर वगैरेचे फॅड नसल्याने बहुतेक सुट्टया उन्हाळी असो वा दिवाळी, आजोळीच मस्त मज्जेत जात. मुंबईकरांना पहायलाही न मिळेल इतक्या गाई-गुरं,नदीचं  पाणी  आणि मंदीरच मंदिरं... तिची आजी 'नानी' अन् तिच्या गोष्टी, मेघना रमून जाई. तिला एक मामा 'सदा' नाव त्याचं, मामी 'माधवी' अन् त्यांना दोन लेक या शिवाय तिची प्रिय नानी अस तिच आजोळ. आजोबा मेघनाच्या आईच्या अगदी लहानपणीच वारलेले.. सदा मामा अन् त्याची मुले पौरोहित्य अन् किराणा दुकान, पूजा साहित्य असे पारंपारीक व्यवसाय करत. सगळे समाधानी ,आनंदी लोक. नेहमीच मोठ्या उत्साहाने, प्रेमाने तिचे स्वागत होत असे.

आज जवळजवळ आठ वर्षांनी ती नानीकडे निवांत आलेली.. दारातच नानीने तुकडा पाणी ओवाळून टाकले. कोडकौतुक , भेटीगाठी अन्  प्रेमाच्या वर्षावात चिंब भिजून निघाल्यानंतर बंगळीवर बसत ती म्हणाली,

"बरेच बदल केलेत ग वाड्यात, नवा झाला अगदी! पण बंगळी मात्र तशीच आहे ना ग नानी ?" 

"चितळे बाई... अधून मधून पाय लागू द्यात गरीबाच्या घराला"

म्हणत मामानं टपली मारली.राजू-विजू मामाचे लेक, एक पटकन बॅग घेऊन गेला अन् एक मस्त चहाचे कप घेऊन आला. पाठोपाठ मामी पोहे घेऊन आली. ख्याली खुशाली झाल्यावर नानी सगळ्यांना म्हणाली ...

"ती माझ्याशी गप्पा मारायला आलीए हो! तुम्ही सगळे लागा कामाला. आम्हा दोघी मैत्रिणींना जरा निवांतपणा द्या बघू." 

पडत्या फळाची आज्ञा मानून जो तो आपल्या  वाटेला पळाला. नानी तशी कडक अन् जरबेची बाई फक्त माझ्यासाठी ती "ए नानी" माझी Best friend. अगदी हृदयस्थ गप्पा आम्ही एकमेकींशी मारायचो... तसा आठवड्याला एखाद/दुसरा फोन मेघना करायची नानीला... पण प्रत्यक्ष गप्पांची सर का येते त्याला ? 

गप्पांची गाडी मेघनाची नोकरी, मुलगा, त्याचा अभ्यास, जावईबापू, मेघनाचे आई बाबा, सदा मामा, राजू विजू, माधवी असा अगदी संपूर्ण प्रवास करून आली. या सगळ्या गप्पांच्या नादात रात्र कधी झाली कळलही नाही. मामीने दिवे लावले अन् ...

"गप्पांनीच पोट भरलं की जेवायचय" 

म्हणत हाक मारली.

"आले आले!" 

म्हणत दोघीही आत वळल्या. बाहेरूनच नाही तर आतूनही घराचा चेहरामोहरा पार बदलून गेलेला मेघनाला जाणवला. डायनिंग टेबलवर मामीनं पानं मांडली होती अन् घर अगदी नवं... तिच्या घरासारखं काहीसं आहे, हे नाही आपलं आजोळ, तिला सर्रकन जाणवून गेलं. 

"विजूss बापट आबोबांना डबा दिला काय रे?"

असं विचारत नानी जेवू लागली. अगदी पारंपारीक जेवण नेहमीचंच चटण्या, कोशिंबीरी, दही भात सगळं साग्रसंगीत. मेघना शांतपणे जेवू लागली. राजूविजू जेवणानंतर घर दाखवायला म्हणून घेऊन गेले. त्यांच्या स्वतंत्र attached टॉयलेट बाथरूम आणि सुखसोईच्या खोल्या ,मस्त रंगसंगती ,Wall painting, मामामामीची खोली सुरेख, अद्ययावत किचन, त्यात फूड प्रोसेसर पासून microwave पर्यंत सगळी उपकरणे, अगदी चहाकॉफी मशीन सह नटलेलं. वरती दोन प्रशस्त हॉल, आणि आजूबाजूला नव्याने बनविलेल्या निवासी तेरा ते पंधरा रुम्स. अगदी आनंदान राजू-विजू सारं दाखवत होते, सांगत होते काहीबाही. तोंडदेखल कौतुक करत मेघना विचार करत होती इथे चौसोपी अंगण होतं, इथं कठड्याचा लाकडी जिना, इथं ओसरी तिथे कणगी.... कुठे आहे सगळं ??

सगळ्यात जास्त नवल तिला याचच वाटत होत की नानीने या सगळ्याच्या परवानगी कशी बरे दिली ? नानीची खोली त्याच जागी तशीच होती. काही पेट्या, भिंतीचा तोच पिवळा रंग, आबोबांचा फोटो अन् भलाथोरला सागाचा पलंग. तिथेच जरा टेकते न टेकते तोच आजी तेल घेवून आली. तिची आणि नानीची जुनी सवय भरपूर तेल नानी हळूवारपणे तिच्या केसात जिरवायची.. अगदी लहानपणीपासून. राजू - विजू जाताच नानी तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली...

 "आजोळ शोधतेस बयो हरवलेलं? तुझी आई तसलीच, अशीच फिरत राहीली घरभर बालपण शोधत."
 
"तुला ग कस कळल नानी? मनकवडी गं माझी ती " 

म्हणत मेघना नानीच्या गळ्यात पडली. 

"झाल्या की नाही आजी नातीच्या गुजगोष्टी?" 

म्हणत सदा मामा डोकावला. त्याने जुन्या नाशकातील दहीपूलावरून खास लस्सी आणली होती. त्या अगदी नेहमीच्याच स्वादानं तिला मस्त गारेगार वाटलं आतून, मनंही शांत होत गेलं... मग सारेच पांगले अन् तिनही आजच्या गोधडीत गुरगुटून घेतलं.

सकाळी तिला नेहमीच्या सवयीने लवकर जाग आली. कडक आल्याचा चहा होताच आजी म्हणाली,

"चल जरा फिरून येऊ" 

मग काय मेघना अन् नानी मागच्या आळीतून निघाल्या. मेघनाला सगळं नविन , ज s रा बदललेलं दिसत होतं. रविवार कारंजाची बरीच जुनी घरे, वाडे बदलून तिथे फ्लॅट झाले होते. काही जुनी दुकाने, बोळा सोडल्यास सारे नवीन... रामकुंड बदललेलं, मंदीर, पायऱ्या, पार बदललेले. अभावितपणे ती म्हणाली ,

“नानी! काय हे? सगळंच पार झपाट्याने बदललं की गं!"

एका मंदीराच्या ओट्यावर थबकत नानीने  "बैस" अशी खूण केली.

" आपणही नाही का ग बदललो? मी जख्ख म्हातारी झाले अन् तू कुठे परकरी पोर राहीलीस " 

म्हणत नानी टाळी देत हसली. नानीने बोलण्याची लय पकडली की बोलत राही अन् मेघना ते मनापासून ऐकत राही. 

"सगळच सतत बदलतच असतं गं राणी! कठीण असतं ते त्याला स्विकारण. आता हेच बघ भुश्याच्या शेगडी आणि लाकडांच्या पितळी बंबापासून सुरु झालेलो आम्ही आज गिझर, गॅस शेगडी, सोलरकुकर ही मज्जेत वापरतो... पण बघ हे सारे सोयीचे लाभदायी बदल आपण माणसं चटाचट स्विकारतोच. वय वाढतं, शरीर थकतं... मग कित्येक गोष्टी पचत नाहीत पण हे ग कुठे स्विकारतो?" 

तितक्यात तिच्या दोन मैत्रिणी भेटल्या अन् आजी नातीच्या गप्पांची गाडी त्यांच्याकडे वळली. त्यांचा निरोप घेऊन घराकडे निघाल्या तेव्हा मेघना नानीला मूळ विषयाकडे वळवत म्हणाली..

"तर नानी.. आपला विषय तसाच राहीला बदल"

“अहं! आपला विषय आहे बदलाचा स्वीकार."

एकेक एकेक रस्ता चालत नानी जोशी वाड्यापुढे थबकेली जरा, 
"तुला मोहन आणि रेखा आठवतात काय जोशींचे?" 

तिने होकारार्थी मान हलवताच... नानी म्हणाली 

"तर त्यांची आई, मैत्रिण माझी... पोराच्या लग्नाच्या काळजीने खंगून गेली, गेली मागल्या दिवाळीत. मोहन साधा कारकून बँकेतला ....कळवळून म्हणायचा बापाला.. 'आपण या जागी घर बांधून घेऊ बिल्डर कडून' पण नाही. कुळाचाराचे देव होते घरी कसे नी काय? बाप बधला नाही. या जुनाट वाड्यात पोरगी देईना कुणी. आता दोघे मुंजे राहताहेत... तोंडही बघत नाहीत एकमेकांच.." 

मागली आळ ओलांडत दोघी लोणारी गल्ली ओलांडू लागल्या. मेघनाची श्रवणभक्ती चाललेली नुसतीच, मात्र अगदी मनापासून...

“काय असतं ना मेघना, (असे म्हटलं की आजी काहीतरी गुपित सांगते... मेघनाने कान टवकारले) काही बदल माणसाला अगदी नकोसे असतात पण त्याचा योग्य वेळी स्विकार करण म्हणजे माणूस म्हणून जगणं. त्या काळात तुझी आई शिकलो हुशार होती, नोकरी करते म्हणाली, लवकर लग्न करणार नाही म्हणाली... मी स्विकारलं. सदा शिकला नाही, तो लहान असूनही आधी त्याचं लग्न लावून दिलं, त्याला दहा वर्षे मूल नव्हतं... हेही मी स्विकारलं आनंदानं. तुझ्या आईनं एकच मूल बास म्हटलं, हेही मी स्विकारलं.खरंतर, हे सारे बदल माझ्या आयुष्याबद्दलच्या कल्पनेच्या अगदी विरुद्ध होते ... पण मी त्यांना आनंदानं स्विकारलं. आपण बदल करतो वा होतात ते ..पण आपण त्यांचा स्वीकार करावा सहज, मग सारं सोप होऊन बसतं."

एक खोल श्वास घेत ती क्षणभर थबकली...

 "कोपऱ्यावरचे बापट.. विनुभाऊ आठवतात ना! तू खेळायचीस ती आरती गं!"
 
"हं हं आरतीचे आबा ,त्यांचं काय गं ?"

मेघनाने उत्सुकतेने विचारलं..

एक दीर्घ उसासा टाकत नानी सांगू लागली,

"मागच्या पावसाळ्यात त्यांचा जुनाट वाडा पडला.. ढिगाऱ्याखाली त्यांचा लेक ,आरतीचे बाबा सापडून वारले. अठ्याऐंशी वर्षांच्या बापाला साठीच्या लेकाला खांदा द्यावा लागला. वाईट झालं..... खूप वाईट झालं... पण गेली पाच सहा वर्षे तोच लेक घराच्या नूतनीकरणासाठी कोणकोण बिल्डर आणत होता. तेव्हा विनूभाऊ म्हणायचे माझी तिरडी म्हणे याच वाडवडीलांच्या घरात बांधा... आता सून माझा नवरा तुम्ही मारला सांगून निघून गेलीये, कायमची आरतीकडे... विनूभाऊ भ्रमिष्टासारखे फिरतात.पलीकडच्या वाड्यातल्या खोलीत राहतात एकटेच...वाईट वाटतं. आम्ही एकेक जण ठरवून डबे पाठवतो. .... पण काय गं..हे अस जगणं शाप आहे शाप.. " 

मेघनाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं अन् वाटल .. खरंच, आपली आजी कित्ती दूरदर्शी आहे. तिने मुलं नातवंड साऱ्यांच्या सोयीनं तिचं प्रिय घर, जिथे तिच्या आठवणी होत्या तेही किती सहज बदललं....
मनकवडी नानी हसत म्हणाली,...

 "अं हं! मी नाही गं काही बदलले मात्र अडसर न होता स्विकारले बदल... आयुष्यात माणसानं वड व्हावं , बरंका ! बघ तो समोरचा वड, २५० वर्षे उभा आहे. लोक पूजतात त्याला ...का माहितीये ? नव्या पारंब्यांतून तो रुजत जातो, जमिनीत पुन्हा पुन्हा... रुजणं थांबवत नाही, न कंटाळता नव्या नव्या पारंबीतून रूजत जातो.. अधिक खोल. आपणही असंच व्हावं गं... आपल्या घरट्यात ! नवीन नवीन कल्पना ,विचार, साऱ्या नकोशा बदलांचा सहज स्विकार करत राहावा... मग झाड भक्कम होत बरंका आतून... केवळ या पारंब्यामुळे.."
 
बोलता बोलता घर आलं. अंगणातल्या बंगळीवर बसत नाही तोच नानी कौतुकानं सांगू लागल्या ,

"राजूचे लग्न ठरतेय गो! एवढ्या गप्पात महत्वाचेच विसरले. त्र्यंबकची पौरोहित्य घरात असणारी पोर ...लाघवी आहे, कष्टीक आहे. घेईल सांभाळून साsरं घरातलं... आपला गोतावळा येणारा-जाणारा सारं निभावेल असं वाटतय.... आता सदा अन् माधवी ठरवतील तसे काय ?"

हातात सांजाच्या बश्या घेऊन प्रसन्न चेहऱ्याने मामी पुढे झाली. मामा तिथेच खुर्चीवर टेकला. नानी मामाला म्हणाली,

"सदा माधवीला पैठणी घेणार आहे हो मी लेकाच्या लग्नात, खास येवल्याला कारखान्यात नेऊन विणून घेईन पण तिच्या पसंतीने बरंका! "

मामी मिश्कील हसत म्हणाली ,
"ते नंतर बघूच हो तेव्हाचं तेव्हा... पण लाडक्या नातीला काय खरेदी करणार माहेरपणची... नाही नाही आजोळ पणची ??"

नानी उत्तरली....
 "पैठणी कपड्याचे ड्रेसेस मिळतात हल्ली म्हणे..., तेच घेईन म्हणते " 
 
मेघनाला या अजस्त्र वडाची नव्यानं लुकलुकणारी पोपटी पारंबी दिसली.

✒️यशश्री रहाळकर

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

उपाशी



"छिनाल! रंग फासतेय बघ... बघ...तोंडाला... उद्या बाजारात बसेल. रांडेची अवलाद! तुझ्या आयशीने आमची बदनामी केली ती कमी आहे का ग? आता तू पळून जा यारासोबत...."

आजीच्या तोंडाची तोफ धडधडू लागली आणि मिनूला आपलं नेमकं काय चुकलंय हे कळेनासं झालं... नुकतीच ती कॉलेजला जायला लागली होती, आणि बरोबरीच्या मुलींप्रमाणे एकदा लिपस्टिक लावावे असे तिला वाटले. एका मैत्रिणीने सहज तिला ते लावूनही दिले...  कॉलेज संपवून ती घरी आली आणि आजीच्या डोळ्यांत संताप उतरला. आजीच्या शिव्या, तिची चिडचिड आणि एकूणच सगळा त्रागा मिनूवर नसून तिच्या आईवर असतो, हे लक्षात घेण्याइतपत ती आता मोठी झालेली होती. आणि दुसरं असंही की ,"पळून गेलेल्या आईची मुलगी" हे ऐकून ऐकून तिचं मन पुरतं बोथट झालं होतं. मिनू 3 वर्षांची असताना तिची आई कुणाचा तरी हात धरून पळून गेली होती ... म्हणजे तिला तरी हे सगळं असंच वारंवार सांगितलेलं होतं. पुढे कधीही तिची आई तिला भेटली नव्हती, ना पत्र ना फोन ना तिची साधी चौकशी केली कधी.... मिनू भरल्या घरात आपले बाबा, काका-काकू, त्यांचे दोन मुलं आणि आजीसोबत राहत असे पण खरंतर ती मनाने एकटी होती....  सतत तिला झिडकारले जाई, तुच्छतेने हिणवले जाई... ह्या सगळ्यांमागे एकच कारण होतं ,"ती पळून गेलेल्या आईची मुलगी होती" ... घराबाहेरच्या जगातही, अगदी शाळेत घातल्यापासून ते आजवर कुणी कीव केलेली तर कुणी टीका टोमण्यांनी तिला घायाळ केलं होतं. सरळमार्गी मिनू खालमानेने मुकाटपणे आला दिवस ढकलत होती.

मिनूचे बाबा म्हणजे मुखदुर्बळ दुकानदार माणूस.... अंगावर एकच एक ढगळ ड्रेस पार कळकट होईपर्यंत घालायचे, चेहऱ्यावर सतत एक अपराधी, बिचारे भाव. ते मिनूशी फार बोलत नसत पण गाईसारख्या स्नेहार्द दृष्टीने बघायचे... मिनूवर त्यांची माया होती . तिला काही कमी पडू नये म्हणून ते धडपडत असायचे. आजीला न कळू देता बऱ्याच वस्तू, पैसे मिनूला द्यायचे. ह्या माणसाच्या सुखाच्या काही परीभाषा आहेत की नाहीत? आनंद, दुःख वगैरे होते की नाही हे कळायला मार्ग नव्हता. त्यांनी  मिनूचा विचार करता दुसरे लग्न केले नव्हते... म्हणजे आजी तरी असं सतत म्हणायची,

"ती बाजारबसवी हे पोरीचं लोढण गळ्यात बांधून गेली आणि माझ्या दिनूने पोरीच्या सुखाकडे पाहून दुसरं लग्नही केलं नाही.... न जाणो सावत्र आई छळ करील पोरीचा! एव्हढं पुरुषाचं काळीज पण त्यालाही पाझर फुटला पण ही आई म्हणावी का चांडाळीण ? खुशाल पोर टाकून पळाली."

'मीनल दिनकर पाचपांडे' ह्या नावाच्या जोडीला मार्कशीटवर 'आईचे नाव' खाली मीनाक्षी हे नाव दिसायचे तेव्हढीच मिनूची आणि आईची ओळख. एकदा तिने बाबांच्या कपाटात अगदी तळात कागदाखाली एक लग्नातील फोटो पाहिला होता त्यात बाबांच्या शेजारी उभी असणारी बाई कदाचित ही मीनाक्षी म्हणजे आपली आई असावी. फोटोवरून तरी बरी असावी दिसायला इतकेच कळत होते. ह्या विषयावर विचारावे तरी कुणाला? "आई" हा शब्द किंवा तिचे नाव सुद्धा घेतले तरी आजी खाऊ की गिळू अश्या नजरेने बघत गरळ ओकायला लागायची. मिनूला मात्र खूप उत्सुकता होती ह्या मीनाक्षी नावाच्या बाईला उर्फ आईला भेटण्याची... कारण ही ती बाई होती जिने मिनूचं आयुष्य तिचा काहीही दोष नसतांना नरक करून टाकलं होतं.  

मिनूला कॉलेजला जायला लागून बरोब्बर महिना झाला असेल आजीने तिच्या लग्नाचा घाट घातला. तिच्या बाबांनी चेहऱ्यावर अधिकच केविलवाणा भाव आणत आपली बाजू रेटली,

"लहान आहे पोर अजून! जेमतेम १८ ची तर झालीये... अजून काही वय झाले नाही. शिक्षणात गती आहे तिला डिग्री घेऊ द्या..."

तशी आजी नेहमीच्या कर्णकर्कश आवाजात हातवारे करत फुत्कारली..

"त्या त्या कुळबुडवीचे रक्त आहे ... बघ हो दिनू! माय गेली संसार टाकून, पोरीला कितीसा वेळ लागणार आहे पाऊल वाकडं पडायला... आज ताब्यात आहे तोवर अक्षदा टाकून मोकळा हो!"

मिनूवर कितीही माया असली तरी दिनू गप्प झाला... त्याला त्याची बायको ताब्यात ठेवता आलेली नव्हती... ती पळून गेल्याच्या आगीची धग मिनूसारखी तो सुद्धा सोसत होता. पुरुष म्हणून तो सर्वार्थाने कुचकामी ठरला होता... त्याला साधा एका बाईवर अंकुश ठेवता आलेला नव्हता. तो ज्या समाजात वावरत होता तिथली "पुरुष" ह्या शब्दाची व्याख्या निराळी होती... इथे वर्चस्वाच्या कक्षेत तो सपशेल नापास झाला होता. त्याने एकवेळ बायकोला बेदम मारहाण केली असती तरी ठीक होतं, दुसरी बाई ठेवली असती तरीही चालणार होतं ... पण त्याला त्याचीच बाईल म्हणजे रूढार्थाने त्याची संपत्ती सांभाळता आलेली नव्हती... आता त्याला आवाज कुठे होता बोलायला?

पहायला येणाऱ्या पहिल्याच मुलाशी मिनूचे लग्न ठरले. मुलगा कुठल्याश्या गावातील शाळेत क्लार्क होता. मुलाला आई-वडील कुणीही नव्हते, कोणत्यातरी नातेवाइकांकडे तो वाढला होता. त्याला मिनू पसंत पडली आणि मिनूचे मत विचारात घेण्याची गरज घरच्या मंडळींना वाटली नाही. बाकी , अश्या पळून गेलेल्या आईच्या मुलीला याहून कोणतं चांगलं ठिकाण मिळणार होतं? साध्याच पद्धतीने घरच्याघरी मिनूचे लग्न झाले... पाठवणीच्या वेळी देखिल आजीने मिनूच्या आईचा उद्धार केलाच..

"संसार सुखाचा कर हो! आणि चित्त संसारात असू दे... उठसूठ इकडे यायचे नाही ... लक्षात ठेव! तुझ्या आईने लावलेला कलंक झेलला मी पण तू आता तसलं काही केलंस तर डोळेच मिटेन मी."

मिनलचा नवरा सोपान तसा माणूस म्हणून बरा होता. दोन खणी घरात त्यांचा संसार सुरू झाला... 

"तसे आपले बाबा पण माणूस म्हणून बरेच होते की..."

मिनूच्या मनात येऊन जाई.

सोपान अगदी सरळमार्गी, आपण बरं आणि आपलं काम बरं असे जगणारा, फारशी स्वप्ने नसलेला एककल्ली माणूस. त्याने लहानपणापासून पोरकेपणाचे दुःख सहन केले होते..बरीच वर्षे एकट्याने काढली... आता मात्र स्वयंपाकपाणी आणि घरकाम करायचा कंटाळा यायचा त्याला, मग समाजमान्य मार्ग म्हणून लग्नाला उभा राहिला. शेतीवाडी पैसा अडका, आईवडील नसणाऱ्या ह्या पोराला कोण मुलगी देईल?? मिनूला त्याने लगेच होकार दिला आणि लग्न झालेही... त्याची फार मोठी स्वप्ने , फार अपेक्षा नव्हत्याच. कधीमधी मिनूचे बाबा तिच्या भेटीला येऊन जात.... एव्हढाच काय तो बदल होई . बाकी दिवस आला तसा मावळायचा... आणि रात्र...???? कधीतरी उपचार म्हणून नवरा तेही काम उरकून घ्यायचा.... त्यात रंगत नव्हती, उपभोग नव्हता,... आनंद , उन्माद ,चित्कार असे काहीही नव्हते... होता तो एक सपकपणा एकदाचे उरकून घ्यायचे ह्या भावनेतून निर्माण झालेला.... आपण लग्न केलंय तर हे केलंच पाहिजे म्हणून नवरा एक काम असल्यागत उरकायचा, मिनूलाही एकदाचे कर्तव्य करून टाकू म्हणून संपवायचेच असायचे.... दोघांमध्ये संवाद नव्हताच तासन तास दोघे असूनही घरात नीरव शांतता असायची. धुणीभांडी, स्वयंपाक, पाणी भरणे ह्या कामात मिनू स्वतःला बुडवून घ्यायची.

मात्र एक दिवस वादळ घेऊन आला... मिनूचे बाबा सकाळी लवकरच मिनूच्या घरी आले . आपला जावई सोपानला विनंती करत म्हणाले,

"जावई बापू! लेकीला चार दिवस माहेरी नेईन म्हणतोय... लग्न झाल्यापासून नेलेच नाहीये."

सोपानला नकार देण्याचे काही कारणच नव्हते. चार कपडे कोंबून मिनू तयार झाली... बसमध्ये दिनू आपल्या लेकीला बारीक खुसपुष्या आवाजात सांगू लागला...

"तिला तुला भेटायचे आहे. अखेरची इच्छा म्हणून..."

"तिला म्हणजे कोणाला बाबा??"

"मीनाक्षीला ... तुझ्या आईला.."

त्या दोघांमध्ये बसच्या खडखडाटात सुद्धा एक भयाण शांतता पसरली. मिनूला अनेक प्रश्नांचे भेंडोळे बांधत निघाले होते.... ह्या भेटीची तिने कधी कल्पनाच केली नव्हती, असे नाही पण बाबा असे चोरून आपल्याला आईकडे नेतील असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. अनेक गोष्टींसाठी तिला जाब विचारायचा निश्चय करून मिनू शांत बसली. 

"अखेरची इच्छा ... म्हणजे आजारी दिसतेय ती."

मिनू मनातच म्हणाली. 
अखेर दोघे बाप लेक एका बंगल्यात पोहोचले. गेटवरच्या गार्डने अदबीने त्यांना आत नेले. एका खोलीत ती बसली होती... मीनाक्षी... तिची पळून गेलेली आई. खोलीत फार उजेड नव्हता, त्यात पिवळसर दिवा... ती हुबेहूब फोटोतली होती. गोरा रंग ,टपोरे डोळे, अपरे नाक आणि गालावर गोड खळी. आता जराश्या वयाच्या खुणा जाणवत होत्या आणि ती थोडी थकलेली, फिकुटलेलीही असावी. मात्र चेहरा तेजस्वी आणि आत्मविश्वासाने निथळत होता.

"आपण हिच्यासारखे अजिबातच नाही. रंग रूप सगळे बाबांचेच घेतले की आपण! "
मिनूच्या मनात आले.

दोन क्षण काटकोनावर उभे असणारे ते तिघे आणि भयाण शांतता पसरली... तिने सहेतुक दिनुकडे पाहिले. मिनूला त्या आई नावाच्या अनोळखी बाई जवळ सोडून दिनू "आलोच!"  म्हणत खोलीबाहेर पडला. खोलीचे दार उघडून हातात चहाचा ट्रे घेऊन कामवाली आत आली.

"शेवंता ! आता आम्हाला disturbe करू नकोस."
तिने बजावले... आणि पाठोपाठ दार आतून बंद केले.

"बस ना ग तू! अशी अवघडून उभी नकोस राहू."
म्हणत तिने हातानेच खूण करत मिनूला बसायला सांगितले. 

मनातून खूप खूप चिडायची इच्छा होत असूनही सवयीने मिनू गप्प बसली. दोन क्षण शांततेत मनाशी काहीतरी जुळवाजुळव करत मीनाक्षी म्हणाली...

"मिनू मी तुझी जन्मदात्री... आई म्हणण्याचा अधिकार मला नाहीये... माहितीये मला."

मिनू तरीही गप्प बसली...
डोळ्यांतले पाणी पुसत मीनाक्षी पुढे म्हणाली...

"मला तुला भेटायचं होतं एकदाच ... शेवटचं. दुसरी काही इच्छा बाकी नाहीये माझी. फक्त तुला डोळे भरून पहायचं आणि कडकडून मिठीत घ्यायचं होतं ग!"

आता मात्र आयुष्यभराच्या संतापाचा लाव्हा ओकत मिनू म्हणाली...

"हे बघा! मला कुणीही आई नाही. ती तेव्हाच माझ्यासाठी मेली जेव्हा ती कुणाचा तरी हात धरून, मला टाकून पळून गेली.  त्यानंतरही तिचे भूत मला "पळून गेलेल्या बाईची मुलगी" म्हणत छळत राहिले. बाबांनी मला इथे कश्याला आणलंय मला माहित नाही..."

"तुझा राग अपेक्षित आहेच मला. फक्त तो राग माझी बाजू समजून... किमान ऐकून घेतल्यावर कायम ठेवू शकशील तू??"

मिनू काय उत्तर देणार ? निःशब्द झाली ती.

"मिनू! माझ्यावर विश्वास ठेव ... मी कधीही पळून गेले नव्हते... तुला टाकून जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता माझ्यापुढे.... तुला मी लिहिलेली पत्रे, भेटीचा प्रयत्न तुझ्या आजीने तुझ्यापर्यंत पोहोचू दिलाच नाही."

मिनू अविश्वासाने ऐकू लागली. आजवर उठता बसता आपल्याला मिळणारा शिव्यांचा आहेर खरा की अजून काही?? कदाचित आपल्यापुढे मांडलेली बाजू अर्धवट असू शकते.

तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव वाचून मीनाक्षी म्हणाली..
"एक स्त्री म्हणून , एक माणूस म्हणून मला समजून घेशील का?"

मीनाक्षी शून्यात पाहत सांगू लागली..

"तात्या, माझे वडील गेले आणि मामाने माझे लग्न तुझ्या बाबांशी लावून दिले. तुझे बाबा माणूस म्हणून वाईट नव्हते पण जोडीदार म्हणून कमी पडायचे. आमच्या खाजगी आयुष्यात सतत ताण असायचा कारण हे त्यांना आणि मलाही ठाऊक होते की आम्ही एकमेकांना सुखी करू शकत नाही. माझे जगण्याचे आयाम, माझी स्वप्ने आणि माझ्या गरजाही खूप वेगळ्या होत्या... अगदी शारीरिक गरजा सुद्धा... "

क्षणभर विचार करून मीनाक्षी म्हणाली...
"आता तू पुरेशी मोठी झाली आहेस, विवाहित आहेस हे समजून घ्यायला. दिनू सगळ्याच बाबतीत कमी पडत होता... एखादं काम उरकल्यासारखा तो प्रणय पुरा करायचा... मला मात्र त्याहून अधिक हवे होते.. उपाशी होते ग मी. तळमळत असायचे दिवसरात्र... दिनूला हे कळत नव्हते असे नाही पण... पण त्याला आता स्वतःला बदलणे शक्य नसावे. त्यात कधीतरी निसर्गाने संधी साधली. तुझा जन्म झाला... हवासा नक्कीच नव्हता माझ्यापुरता तरी."

मिनूने चमकून पाहिले.. आपला जन्म नकोसा... किती थेट बोलतेय ही?

"मी खरं बोलणार आहे मिनू... माझ्याकडे फार वेळ नाही. ट्युमर माझ्या मेंदुभर पसरला आहे... फारतर एखादा महिना काढता येईल मला.....  तर कुठे होतो आपण?? हां! तुझ्या जन्मानंतर आलेल्या पोस्ट पार्टेम डिप्रेशनने मी पुरती खचले. आपल्या समाजाचा एक अलिखित नियम आहे .. संसारी स्त्रीने दागिने , कपडेलत्ते, गाडी बंगला वगैरेंसाठी हट्ट केला तर हरकत नाही. तिने वेगळी चूल मांडली तरी चालेल पण तिने  काही गरजांबद्दल ब्र सुद्धा काढायचा नाही. नव्हे कुलीन घरातील बायकांना तश्या गरजाच नसतात... नवऱ्याने एखाद्या भिकाऱ्यापुढे तुकडा फेकावा तसे शरीरसुख झोळीत पाडून घ्यायचे. तो देईल तसे, तो देईल तेव्हढंच."

मिनू अंतर्मुख झाली... असं असू शकतं नक्कीच असू शकतं... एक स्त्री म्हणून तिनेही हेच अनुभवलं होतं का?

"अगदी परकं कुणी कश्याला? माझ्या आईला जेव्हा मी या संदर्भात सांगितलं तेव्हा तिने शिव हरी करत कानावर हात ठेवले. तिच्या मते , काही पुरुष त्या बाबतीत अधिक आक्रमक असतात मग बायकांना ते जीव नकोसा करतात.. तुझा नवरा तसा तर नाही ना! आता तर मुलगीही झालीये म्हणजे पुरुष आहे हे सिद्ध केलंय त्याने... जे जसं सुरू आहे ते तसच राहू दे.... हळूहळू आमचा दोघांचाही  प्रणयाचा एकंदर उत्साह मावळला आणि आमचं लग्न केवळ कागदोपत्री उरलं.."

मीनाक्षी क्षणभर थांबली.. समोरचे पाणी ती घटाघटा प्यायली... 

"मी महत्वाकांक्षी होते. बँकेच्या परीक्षा देत सहज नोकरी मिळवली... स्वतःच्या पायावर उभी राहिले आणि पहिला निर्णय कोणता घेतला असेल तर ह्या अश्या निरर्थक 'सुखी संसाराच्या' नाटकातून सुटका करून घ्यायची. एकच अडचण होती त्या वेळी ती म्हणजे तू...  तू जन्मली असल्याने मी संसार सोडण्याचा निर्णय कधीही घेणार नाही अशी जवळपास खात्रीच होती दिनू आणि त्याच्या कुटुंबाला..."

अचानक आवेगाने मिनूचे हात हातात घेऊन ती म्हणाली..

"तुझी गुन्हेगार आहे ग मी ... माझा स्वतःचा विचार केला  पण तुला पुढे स्वतःकडे ठेवेन, तुझी कस्टडी आई म्हणून मिळवेन असे ठरवले आणि घराबाहेर पडले. मी कुणासोबत पळून गेलेच नव्हते तसे कुणीही स्पेशल माझ्या आयुष्यात तेव्हा नव्हतेच. मी माझ्या मेलेल्या लग्नाला कंटाळून त्यातून बाहेर पडले होते. ... माझी भूक मोठी होती मी उपाशी होते...पोटाबरोबरच आणिक एक भूक असते ग देहाची भूक... काय करणार होते मी तिचे?? माझी ही उपासमार समजून घेण्याइतपत समज, मन किंवा जाणीवाच नव्हत्या कुणाकडे..."

मिनूने शून्य चेहऱ्याने तिचे हात झटकत म्हटलं,
"तुझ्या एका निर्णयामुळे माझं आयुष्य बदलून गेलं... तू ज्या क्षणी मला सोडून दुसरा पर्याय निवडला त्या क्षणी संपलं आपल्यातलं सारं..."

थंडपणे सुस्कारा सोडत मीनाक्षी म्हणाली...
"स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते... बरोबर ना! पण हे कुणी लक्षात का घेत नाही की त्याआधी ती माणूस असते. एक नकोसं आयुष्य, नकोसा जोडीदार आणि संपलेलं लग्न संपवून मी बाहेर पडायचं ठरवलं तर चुकलं कुठे?? तुझ्या आजीने एकप्रकारे ब्लॅकमेल केलं मला ... दिनू डिव्होर्स देईल पण आयुष्यात तुला मुलीला भेटू देणार नाही , अशी कडवट भूमिका घेतली त्यांनी. तुझ्या आणि इतर लोकांच्या मनात मी अगदी शरीरसुखाला उतावीळ बाई आहे, कशी कुणाचा हात धरून पळून गेले वगैरे रंजक कहाण्या रचून रचून सांगत गेली, मला बदनाम करत गेली... ह्या साऱ्या प्रकारांत त्यांनी त्यांचा इगो वाढवत , सुखावत नेला... काहीही करून मी त्यांना शरण यायला हवी होते. पण अखेर आम्ही वेगळे झालोच. माझा सगळा राग तुझ्यावर निघत गेला... मी कोर्टात तुझ्या कस्टडीसाठी अर्ज केला होता पण ही वाईट चालीची बाई आमच्या मुलीला विकून टाकेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली..."

मीनाक्षी संतापाने अंतरर्बाह्य थरथरत होती...
"मी तुला भेटू नये, बोलू नये ह्याची सगळी काळजी त्यांनी घेतली. खरं सांगू, पुढे मलाही मनाजोगा जोडीदार मिळाला मी रमले माझ्या जगात, अगदी तुला विसरून पुढे सुद्धा गेले. हे जीवघेणं दुखणं उमळलं आणि आयुष्यातील सगळी पापे भुतांसारखी फेर धरून नाचू लागली....  तुझ्यावर मी अन्याय केलाय, आणि मी त्या ओझ्यातून मोकळी होऊ इच्छिते... मला माफ करशील बेटा?"

हात जोडून आसवे ढाळणाऱ्या मिनाक्षीकडे पाहून मिनूच्या मनात कणव दाटून आली....

"काय दोष होता हिचा आणि काय दोष होता माझा तरी?? एखाद्या व्यक्तीचे माणूस म्हणून अन्न, वस्त्र, निवारा हे जसे मूलभूत अधिकार आहेत तसाच शारीरिक सुख हा अधिकार नाही का?? तिने त्याची निवड केली म्हणून ती वाईट कशी??"

असा विचार करत माणुसकीच्या सहृदय भावनेने तिने आपल्या आईला प्रेमाने जवळ घेतले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवू लागली. तिचे बाबा नेमके त्याच वेळी दार उघडून आत आले आणि म्हणाले... 

"मिनू ! आपल्याला निघायला हवं आता. मी घरी खोटं सांगून आलोय."

त्या परिस्थितीत सुद्धा ह्या बाप नामक बांडगुळाची कीव वाटली मिनूला... ती निश्चयाने म्हणाली,

"जिने आयुष्याच्या प्रवासात माझी साथ सोडली तिला मी सोडू शकत नाही बाबा... मी पुढचे काही दिवस इथेच आईजवळ राहणार आहे.आमच्या खूप गप्पा बाकी आहेत अजून..."

दिनूचा चेहरा अविश्वासाने पांढरा फटक पडला... तो संदिग्ध स्वरांत विचारता झाला..

"आणि जावई बापूंना काय सांगू??"

मिनू आपल्या आईच्या डोळ्यांत डोळे घालून मिश्कीलपणे हसत म्हणाली,

"सांगा मिनू पळून गेली तिच्या पूर्वी पळालेल्या आईसोबत."

✒️यशश्री रहाळकर













सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

उंच टाचांच्या सँडल्स


स्त्री-मुक्तीच्या उंच टाचांच्या सँडल्स ती ,
उंबऱ्याबाहेरच काढून घरात येते.
तिला ठाऊक असतं, अनवाणी जायचं असतं
पितृसत्ताक देवतांच्या "घर" नावाच्या मंदिरात..

आदीम वर्चस्वाच्या अदृष्य काचा असतात 
जागोजाग फरशीवर विखुरलेल्या...
कधी पाऊल रक्तबंबाळ होईल...खात्री नसते.

भक्तिभावाने लीन होत, घुमत राहते ती
संस्कृती रक्षणाचे जोखड मानेवर तोलून धरत...
कधी सन्मानाच्या चार काळ्या मण्यांसाठी, 
कधी गर्भाशयाला मालकीचे लेबल जोडण्यासाठी, 
अन् कधी नुसत्याच "घर" नावाच्या मंदिरातील प्रवेशासाठी.

तिला अनुभवांनी माहीत झालेलं असतं...
स्त्री मुक्त वगैरे होत असेल तर ती घराबाहेर..
संसार नावाच्या पवित्र होमात, 
हे "असलं" अमंगळ निषिद्ध असतं.

"घर" नावाच्या पवित्र स्थानातून बाहेर पडणारी...
म्हणून आदराने पाहतात लोक तिच्याकडे...
"माणूस" म्हणून नाही पण किमान स्त्री म्हणून तरी....

मग ती बिनधास्तपणे उंच टाचांच्या सँडल्स ,
ताठ मानेने लोकांमध्ये मिरवत जाते.
सभांमध्ये निडरपणे भाषणे ठोकत जाते स्त्री मुक्तीवर...

घरात मात्र उपकारांच्या ओझ्याखाली दबून, 
झुकून नतमस्तक होते ती...
घराबाहेर तरी तिला "त्या" उंच टाचांच्या सँडल्स
घालायची परवानगी दिल्याबद्दल...
✒️यशश्री रहाळकर