परवा सुट्टीच्या निमित्ताने लेकीला खेळायला पार्कमध्ये घेऊन गेले...तिला मोकाट सोडलं की मी वाचायला मोकळी...अश्या वेळी चौफेर नजर जाईल अश्या एखाद्या बाकावर बसून माझे वाचन सुरू होते.ह्या वेळी मला पुस्तकांची मुळीच गरज नसते. मी माणसं वाचते.होय! मला येतात वाचता. त्यांचा साधा वावर ,देहबोली खूप काही सांगून जाते. तर परवा एक काकू दिसल्या.. दोन नातवंडांना खेळायला सोडून त्या उभ्या राहिल्या...त्या हाताने नाकाला ,गालाला, कानाला नि डोक्याला स्पर्श करत होत्या....सतत ह्याच क्रमाने. थोड्या वेळात माझ्या लक्षात आलं त्यांची एकाच लयीत सुरू असणारी ही क्रिया नॉर्मल नाही.बाकी त्या नीट वाटत होत्या... माझं त्यांच्याकडे पाहणं त्यांना कळलं असावं त्यांनी हात मागे बांधून घेतला... मात्र थोड्याच वेळात पुन्हा तेच.हात रिकामा असला की त्यांच्याही नकळतपणे ही क्रिया त्या एकाच क्रमात सातत्याने करीत होत्या. बिचाऱ्या ! मनाचं हे अस्थैर्य गाठेपर्यंत किती मन मारलं असणार त्यांनी?हे बिचारेपण पावलागणिक बघायला मिळेल तुम्हाला.... आपल्या अवतीभवती अश्या अनेक बिचाऱ्या असतात.मन मारून घुसमटून गेलेल्या,आत्मविश्वास हरवलेल्या,सतत उगाच घाबरणाऱ्या....... कुणी लादलेलं असतं हे बिचारेपण?? खरं सांगू... हे तिचं तिनेच ओढवून घेतलेलं असतं.
लग्न होऊन नवी नवरी म्हणून ज्या घरात जातो तिथं जुळवून घ्यावंच लागतं हे जरी मान्य असलं तरी स्वतः स्वतःवर अन्याय करेपर्यंत ... हे मात्र मान्य करता येत नाही. स्वतःच्या क्षमता आणि स्वतः ची प्रतिमा तुमची तुम्हीच घडवत असता, मात्र कालांतराने त्याचा त्रास होऊ लागला की त्याचं खापर दुसऱ्या कुणावर तरी फोडायची सवयच सुखावून जाते.. त्यातून उरते ती एक कंटाळवाणी, रडुबाई. आत्म-सन्मानासाठी आसुसलेली ही रडुबाई मग 'त्यागमूर्ती' नावाची सोनेरी शाल पांघरून मिरवू पाहते.त्यातूनच मग येता जाता मुलांना म्हणायचं ,"मी तुमच्यासाठी नोकरी सोडली/ केली नाही" किंवा,"आज तुझं जे करियर झालंय ते माझ्या त्यागामुळे" 😊 जरा विचार करा कशी गंमत आहे!!! तुम्ही नोकरी करायची की सोडायची हा निर्णय तुमचा स्वतःचा असतो, त्या तान्ह्या बाळाला कुठं काय कळतं? आईने कमावलेल्या पैश्याने जर तिची किंमत ठरत असेल तर त्यासारखं दुर्दैव नाही. साधारण 16/17 वर्षांची मुलगी असणारी एक मैत्रीण सतत रडत असते की "माझी लेक मला बावळट समजते तिला माझं काहीच आवडत नाही...." वगैरे वगैरे.. अखेर गाडी त्यागमूर्तीच्या स्टेशनवर येत,"ह्यांनी मला नोकरी सोडायला लावली " वर येते. मुलांनी किंमत द्यावी वाटते ना! पण स्वतः स्वतःला तुम्ही किंमत देताय का? मी देवानी घडविलेली एक awesome कलाकृती आहे हे तुमचं तुम्हाला तरी वाटतंय का? अखंड पडती बाजू घेत, मोलकरणी सारखी प्रत्येक वस्तू धावत जाऊन हातात देणारी, कायम easy available असणारी, स्वतःचं कुठलंही वेळापत्रक नसणारी, रिकामटेकडी, पडल्या तोंडाने वावरणारी अन्यायग्रस्त आई ...आपणच खतपाणी घालून वाढवत असतो. दिवसभराच्या 24 तासांत 2 तास स्वतः साठी खरंतर प्रत्येकीने काढायला हवेच. एक तास शारीरिक आरोग्यासाठी आणि एक तास मानसिक आरोग्यासाठी. आपण माणूस आहोत यंत्र नाही हे जर तुम्हाला स्वतःलाच पटणार नसेल तर इतरांना ते का पटावे??शारीरिक आरोग्यासाठी औषधोपचार तरी घेता येतील पण ढासळलेल्या मनाचं काय?मग सोईस्करपणे हार्मोन इंबॅलन्स या लेबलखाली झाकून घ्यायचं.
इतक्या इवल्या गोष्टीत बायका निष्कारण मन मारत असतात.. की कीव येते. एक मैत्रीण काही कामानिमित्त सहजच माझ्या घरी आली ..भाजी करत होते तर तिला पोळी भाजी खा म्हणून आग्रह केला...तिची अत्यंत आवडती साधी मेथीची भाजी तिने 20/ 22 वर्षांनी खाल्ली होती.😢 घरांत सासूबाई आणि नवऱ्याला आवडत नसल्याने हिने मेथी आणलीच नाही.आता बोला!स्वतःपुरती भाजी आणून करण्याचं स्वातंत्र्य होतं, पैसा होता... स्वतः साठी कधीतरी एक भाजी जास्तीची करायला काय हरकत आहे? आणिक एकीने हिवाळ्यात पौष्टिक लाडू केले मात्र स्वतः ती ते खातच नव्हती, "तेव्हढेच मुलांना चार दिवस जास्त पुरतील" असे तिचे उत्तर. बाई ग ! तुला एका ऐवजी 2 किलो लाडू करणे आर्थिक शारीरिक सगळ्याच दृष्टीने सहज शक्य आहे ... मग कशाला हा फुकाचा त्याग??
हे सारं पुन्हा बोचलं ते ,"आई कुठे काय करते?" या सिरियलच्या निमित्ताने.. या सिरियलच्या प्रोमोजच मला इतके क्लेशकारक वाटले की ह्या अश्या अनेक आई मला आजूबाजूला दिसू लागल्या.... त्याच वेळी या साऱ्याची दुसरी बाजूही मला तेव्हढीच ठळकपणे जाणवली. सिरियलमधली आई घरातील सगळ्यांसाठी बदाम भिजत घालत असते.. मात्र आईला कश्याला हवेत ? म्हणून स्वतःसाठी मात्र नाही. कुणी सांगितलं बाई तुला हे?स्वतःला बिचारी कोण करतंय इथे? "आईला सुट्टी नसते" का ग बाई? तिनेही हक्काने एक दिवस उशीरा उठावे किंवा दुपारी मस्त लोळत पडावे ... घरात खुशाल सांगून टाकावे ,"आता आग लागली तरी 2 तास उठवू नका कुणी मला." .... काय हरकत आहे? आईपण म्हणजे तुमच्यातील जिवंत माणसाला तुरुंगात डांबणे नव्हे. गंमत म्हणजे हा तुरुंग तुमचा तुम्हीच निर्माण करता आणि स्वतःलाच त्यात अडकवून घेता.
मी मिळवती (नोकरी करणारी )आणि गृहिणी ह्या दोन्ही आघाड्यांचा अनुभव घेतलेला आहे. नोकरी करणारीचे प्रश्न प्रचंड भिन्न असतात पण म्हणून तिच्यासाठी कुणी फुलांच्या पायघड्या घालत नाही.गृहिणी म्हणजे अगदीच परावलंबी बिचारी करत तिचा उदोउदो करणेही अगदीच चुकीचे आहे.दुरून डोंगर साजरे म्हणतात ना हे तसे आहे.कधी प्राप्त परिस्थिती किंवा अन्य कारणांमुळे जर मनाविरुद्ध गृहिणीपण वाट्याला आले तरीही ते आत्मसन्मानाने निभावणं किंवा बिचारी होत रडत बसणं ... पर्याय आपल्याच हातात आहे.काही 'आई' त्यांची पुढे मंदिरे बांधावी इतक्या महान असतात.... 17 / 18 वर्षांच्या घोड्या मुलांचे कपडे मोरीत नेऊन ठेवणे,आंघोळीचे पाणी साबण काढून तयार ठेवणे, त्यांनी फेकलेले कपडे गोळा करून धुणे, त्यांच्या शाळा/ कॉलेजच्या बॅग भरून देणे, खोली/कपाटे आवरणे, अगदी घाईत ग बबड्या माझा म्हणत जेवू घालणे... ह्या साऱ्यातून आपल्याच मुलाला परावलंबी पांगळ करतोय आपण. आपली फुकटची कामे वेडी माया वाढवते आणि मुले केरपोतेऱ्याची किंमत देतात हे वेगळे... पण उद्या शिक्षणासाठी परगावी किंवा दुसऱ्या देशात गेल्यावर त्याचे काय होईल हा साधा विचार नाही. उद्या त्याच्या बायकोकडून ह्या मूर्ख अपेक्षा तो करेल आणि त्याचा परिणाम त्याचा संसार मोडण्यात होईल.मुलगा असो वा मुलगी उद्या त्याचा मोडलेला संसार सावरण्यापेक्षा आजच नीट सवयी लावा ना त्यांना. आई म्हणून डबा भरुन ठेवणे तुमचे काम ..मान्य पण तो स्कूलबॅगमध्ये त्याचा त्याला भरू द्या. लहानपणी मुलांना मदतीला घेऊन त्यांचे कपाट/ पसारा आवरा... पुढे तो त्यांचा त्यांना आवरायला लावा. त्यांचे उद्याची तयारी आजच रात्री करून ठेवायची सवय लावा. चहा कॉफी बनवणे, सँडविच करणे, नाश्त्याचे बनवणे ह्या अत्यावश्यक गोष्टी त्यांना त्यांच्या यायला हव्या.
थोडक्यात त्यांच्या मागे पुढे धावत जाण्याने आपली प्रतिमा आई म्हणून उंचावणार नाही हे लक्षात घ्या. माझी एक मैत्रीण संध्याकाळी घड्याळात साडे सात वाजले की बेचैन व्हायला लागते... बरोब्बर 8 वाजता तव्यावरची पोळी ताटात वाढून नवरा आणि मुलाला ती जेवायला वाढते. यात जराही बदल चालत नाही. त्यांच्या घरी करून ठेवलेली पोळी एकही दिवस चालत नाही.तिचा लेक 24 वर्षांचा आहे... म्हणजे गेली 24 वर्षे ही त्रासदायक सवय तिची तिनेच लावली ना! मग आता ते नकोस वाटून उपयोग काय? उद्या ही म्हातारपणी हे पेलवू शकेल का? उगाच सुपर वुमन व्हायला जायचे अन तोंडघशी पडायचे ह्यातला प्रकार.मी तर म्हणते सासूने लावलेल्या अश्या भन्नाट त्रासदायक सवयी देखील टाळाटाळ करून आपण बदलायला हव्यात..शक्य तेव्हा जरूर करा ना पण कधीतरी ऍडजस्ट करणेही शिकवा घरच्यांना. मी गृहिणी म्हणजे मोलकरीण आहे हे कुणालाही गृहीत धरू देऊ नका .. अगदी स्वतःलाही.
सिरीयल मधली शिफॉन साड्यांत वावरणारी, जाहिरातीतील काही सेकंदासाठी आई झालेली उड्या मारणारी किंवा नातेवाईक, मुलांच्या मित्रांची यम्मी मम्मा पाहून तुम्हाला जर न्यूनगंड वाटत असेल तर एक गोष्ट कायम लक्षात घ्या...समजा तुमचे मूल बदलून सुंदर हुशार बाळ मिळेल असं कुणी म्हणाल तर चालेल का? नाही ना! नक्कीच तशीच आपल्या मुलांना मिळालेली आई बदलण्याची गरज काय? आपल्यातल्या क्षमतांवर विश्वास ठेवा. एक आई आपल्या मुलांसाठी जे करू शकते ते जगातील दुसरी कोणतीच व्यक्ती करु शकणार नाही.आपल्या त्या लाडक्या मुलांसाठी एक आनंदी प्रसन्न निरोगी आई देणं हेही आपलं कर्तव्य आहेच.त्याचसाठी स्वतःला वेळ द्या... आणि मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.तुम्हाला मिळणारा वेळ अनेक छंदांसाठी वापरा ते तुम्हाला भरभरून आनंद आणि वेळ पडल्यास पैसा ओळख देखील देतील... छंद जसे बाग फुलवणे, शिवण,बेकरी विणकाम, वाचन, चित्रकला, गायन ,वादन वगैरे अगदी घरबसल्या करता येण्याजोगे आहेत.
वेळ मिळत नाही ही तक्रार न करता वेळ काढा.काही कामे खरंच इतकी अनावश्यक असतात ती टाळा.रोज कचऱ्याची डस्टबीन घासण्याची गरज आहे का?आवरआवरी च्या नावाखाली किती वेळ घालवायचा?एकासाठी पोहे दुसऱ्यासाठी उपमा नाश्त्याला करणं बंद करायचं रोज एक पदार्थ होईल आज एकाने ऍडजस्ट करा उद्या दुसऱ्यानं... हे ठणकावून सांगा. स्वच्छतेच्या नावाखाली सिलेंडर धुणारी व्यक्ती माहीत आहे मला....मुळात शक्य नाहीत ती कामे मोलाने द्या, अनेक गोष्टी जसे डाळी,पापड लोणचे तयार घ्यायला लागा. आपण कामाला जुंपलेला हमाल नव्हे.. वेळ काढून घराबाहेर पडा चार मैत्रिणीत मिसळा मात्र ते गॉसिप करण्यापुरते नव्हे तर .. सतत काहीतरी नवीन शिका, स्वतः चे वाहन चालवा.. बँकेचे व्यवहार समजून घ्या... स्वतंत्र व्हा. आई कुठे काय करते? म्हणण्यापेक्षा अभिमानाने आई कित्ती काय काय करते हे पटवून द्या.
नवरा किंवा मुलांना माझं कौतुक नाही म्हणत बायका रडवेल्या होतात. कशाला कुणी हवंय कौतुक करायला तुम्ही स्वतः स्वतःचं कौतुक करा ना! आवडीच्या रंगांची साडी नेसा आवडीचा पदार्थ करून खा... काय हरकत आहे एक दिवस स्वतःसाठी जगायला.अनेकदा बायकांना स्वतः चा आवडता रंग सांगता येत नाही... हॉटेलमध्ये गेलं की मेन्यू कार्ड नवरा पाहणार .. सांगा एकदिवस मला अमुक खायचं आहे. महिन्यातला एक दिवस हक्काची सुट्टी घ्या पार्सल आणून खा नवरा मुले तर खुश असतातच पण वेड्या बायकाच कटकट करतात... सुट्टी घ्या निवांत दिवस घालावा.दिवाळीचे बजेट 5000₹ समजा सगळ्यांचे कपडे घ्यायचे ठरले तर लेकीला आवडला म्हणून 3000₹ चा ड्रेस घ्यायचा आणि "मला कश्याला साडी" म्हणत रडायचं थांबवा... निरर्थक त्याग करणं तातडीने थांबवा.खड्यात गेली दुनिया .. एका मर्यादेनंतर स्वतः ला शब्दांची जखम करून घेणं बंद करा ...कुणी काहीही म्हणू देत काही फरक पडत नसतो जगण्यात. सर्वांत महत्वाचं म्हणजे आरोग्याबाबत जागरूक रहा फक्त घरच्यांची काळजी अन स्वतः कडे दुर्लक्ष असे होऊ नये... दुखणी अंगावर काढायची बायकांची वाईट सवय असते.थोडेसे टोकाचे विधान वाटेल पण भारतात सगळ्यात स्वस्त काही असेल तर स्त्रिया .. एखादी मेली खंगून तरी दुसरी बायको मिळायला महिनाभरही थांबावे लागत नाही इथे.कुणीही इथे अमर नाही, आपण कधी मरणार हे आपल्यालाही ठाऊक नाही. शेवटच्या दिवसांत माझे जगायचेच राहून गेले हे दुःख कवटाळत जाण्यापेक्षा तृप्त समाधानी मनाने निरोप घेऊया... पण त्यासाठी आधी भरभरून जगून तर घेऊयात.

