#आगळीक
आज तिला उठणेच अशक्य झाले होते, गेले दोन दिवस होत्या त्या गोळ्या घेऊन ढकलले तिने; पण आज ठसठसणाऱ्या अंगाने आणि ठणकणाऱ्या डोक्याने पार असहकार पुकारला होता. थोडीशी कणकण सुद्धा असावी. ह्या पूर्वी म्हणजे धाकट्या लेकाच्या वेळी बाळंतपणासाठी म्हणून सव्वा महीना काय झोपली असेल तेव्हढंच..... तशी ती मूळची काटक, खेड्यात वाढलेली, डबल हड्डी , कामाला वाघ... तिचं सारं जग म्हणजे तिचं घर, संसार आणि तिची माणसं...
नवऱ्याने नाईलाजाने सुट्टी घेतली आणि तिला डॉक्टरांकडे नेऊन औषधे आणली... सुट्टी घेतल्याचे चार वेळा बोलून दाखवत तो त्याच्या पेंडिंग कामांना लागला. लेकीला क्लासला उशीर झाल्याने तिने त्रागा सुरू केला... मेलेल्या मनानी ती स्वतःला ओढत कामाला लागली. सासूबाईंना आज ज्यूस मिळायला उशीरच झाला... त्या गेले काही महिने आडव्याच होत्या .. त्यांचे आवरताना उशीर झाल्याने सतत कटकट सुरू होती. मुलाला आज पास्ता हवा होता डब्यात तिने तो न दिल्याने तो रुसला होता. आपण आजारी आहोत हे सुद्धा विसरून गेली ती😢
तिला आठवत होतं .. नवरा आजारी पडल्यावर व्याकुळ झालेली ती. मुलांच्या आजारपणात रात्र रात्र जागून त्यांचे पाय चेपून देणारी ती....सासूच सगळंच आईच्या मायेने करणारी ती... "तुला बरं वाटतंय का? आराम कर" ह्या दोन वाक्यांना ती आसुसली होती... कदाचित तिच्या अपेक्षा फार फार मोठ्या असाव्यात...
नेहमीसारखा रात्री तिच्या आईचा फोन आला. आईच्या रोजच्याच ,"कशी आहेस ग बाळा!" ह्या प्रश्नाला नेहमीसारखं , "मजेत!" हे उत्तर तिला देताच आलं नाही. तिचा गळा भरून आला आणि डोळे पाझरू लागले.
✒️ यशश्री रहाळकर