फॉलोअर

रविवार, १७ डिसेंबर, २०२३

घुसमट


आबा गोखले आज तब्बल सहा महिन्यांनी मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. त्यांचे वय पंच्याऐंशीच्या वर असावे, नेमके किती? हा वयाचा आकडा मोजणे त्यांनी आताशा बंद केले होते. एव्हढे वय असूनही तसे ते ठणठणीत म्हणावे असेच होते.वयपरत्वे येणारी दुखणी अधून जरा दणका देत होती पण मूळचा मजबूत देह फार काही पडझड व्हायची नाही.. लवकरच ते दुखण्यातून रिकव्हर होत आणि पुन्हा उभे राहत. सावकाशपणे मजबूत पावले टाकीत ते सोसायटीच्या गेटबाहेर पडले . जरा डावीकडे चार आठ पावले चालत गेले की सुरेख गार्डन होत आणि त्याला लागूनच जॉगिंग ट्रॅक... नेहमीच्या बाकावर सिनियर सिटीझन्सचा गप्पांचा अड्डा रंगला होता.. कुणीतरी मोठ्याने हाळी दिली, 


"काय म्हणताय आबा ? कसे काय आहात?"


"मी मस्त मजेत!" 

सवयीने म्हणत आबांनी ट्रॅक पकडला. कट्ट्यावर बसलेले सगळे आता त्यांच्या लेकाचे सदाचे मित्र.. "एखाद दोन वर्षात सदा बँकेतून निवृत्त होईल आणि तो कदाचित इथे रमेल", त्यांच्या मनात आले. त्यांच्या वयाचे, त्यांचे मित्र म्हणावे असे कुणी आता जिवंत उरले नव्हते. त्यांना बबन आठवला.. त्यांचा जिवलग मित्र.त्याला जाऊनही दोन वर्षे उलटली होती. बबन त्याच्या शेवटच्या दिवसांत अंथरुणाला खिळवून होता. आबांच्या दिवसांतून दोन चकरा तरी त्याच्याकडे व्हायच्याच.. कधी त्याला पुस्तक वाचून दाखव कधी जुन्या आठवणींची उजळणी तर कधी कुमार गंधर्वांची गाणी..त्याला वेदना असह्य झाल्या की तो म्हणत असे ,


"आबा तुझ्या त्या देवाला सांग बाबा .. मला काही स्वर्ग नको बोलाव म्हणा आता.. थकलो रे!"


आबा कसनुस हसत म्हणायचे,

"बबन ,त्याने श्वास मोजून पाठवलेले असतात. बाबारे! त्या आधी सुटका नसते."


एके रात्री बबन गेला सुटला बिचारा. बबन, संजू, अण्णा, रामेश्वर सगळे होते तेव्हा ह्याच बाकांवर आपल्या कसल्या गप्पा रंगायच्या. राजकारणावर तर कडाडून वाद होत मग टपरीवर चहा प्यायला जायचे.. "जगण्यात गंमत होती नाही!" आबा पुन्हा एकदा स्वतःशीच बोलले हल्ली ते स्वतःशीच फार बोलत तेही मनातल्या मनात. जेमतेम एका राऊंडमध्ये आबांना धाप लागली त्यांनी बाकावर बसून घेतले. बाकावर त्यांचा नावडता विषय सुरू होता "घरातील वयस्कर व्यक्तींमुळे झालेली पंचाईत" ह्या विषयावर बोलणारा कुणीही तरुण राहिलेला नव्हता पण त्यांच्याहूनही अधिक वयाचे दीर्घायु मायबाप जिवंत असलेल्यांची पार गोची झाली होती. आपण जणू तिथे नाहीच आहोत अश्याप्रकारे आबांनी बसून घेतले, कानावर पडणारे आत झिरपू द्यायचे नसते हा अलिखित नियम त्यांच्या वाढत्या वयाने त्यांना शिकवला होता.


कुणाच्यातरी वडिलांनी खोलीचे दार लावून घेतले. बराच वेळ न उघडल्याने काळजी वाटून मुलाने फायर ब्रिग्रेडला बोलावून बाल्कनीतून आत शिरून दार तोडले. एव्हढा गोंधळ झाल्यानंतर लक्षात आले की म्हातारबुवा फक्त गाढ झोपले होते. "लेका तुला काय बापाचे प्रेत दिसेल अशी अपेक्षा होती की काय?" नेहमीसारखे आबा मनातल्या मनात स्वतःशी बोलले. कुणाच्या तरी नव्वदीच्या मातोश्री जिना चढून वर तर गेल्या पण त्यांना खाली उतरताच येईना. आता पासष्टीच्या मुलाने काय  करावे तोच म्हातारा झालाय तो उचलेल तरी कसा? मग चक्क चार माणसे बोलावून मातोश्रींना उचलून खाली आणण्यात आले. "बघा गडयांनो जिवंतपणीच चार माणसे बोलवावी लागली." बोलणारा हसला तो दुःखानी, त्राग्यानी की उपहासानी? आबांना प्रश्न पडला. कुणाला आता रिटायर्ड झाल्यानंतर वडिलांच्या आजारपणाचा खर्च परवडत नव्हता, कुणाला परदेशातील लेकाकडे जायचे होते पण वयस्कर आईवडिलांमुळे अडकून पडायला झाले होते. कुणाला नातवंडांसोबत राहता येत नव्हते, कुणाला लेकीच्या बाळंतपणाला जाता येणार नव्हते, कुणी सेवा करकरून थकले होते तर कुणी स्वतःचे दुखणे सांभाळू की आईवडिलांचे ह्या विवंचनेत होते. होता होता विषय उपासनी जोडप्यावर सरकला आणि आबांच्या अंगावर सरसरून काटा आला. कोविडच्या दुसऱ्या लाटेत साठीचे उपासनी पतिपत्नी एकाच दिवशी गेले मात्र  नव्वदीच्या घरातले उपासनी आजीआबा ठणठणीत होते. त्यांचे दुःख आठवले आणि आबा अंतर्बाह्य थरथरले. एव्हढ्यात कुणाच्या तरी ते लक्षात आले असावे.. हा विषय नको असे कुणीतरी खुणेनेच सुचवले. 


आबा थरथरत उठले आणि घराकडे निघाले. आता त्यांच्या पायातले त्राण जणूकाही कुणीतरी काढून घेतले होते. हळूहळू एकेक पाऊल उचलत ते चालू लागले. नंदकिशोर उपासनी आणि आबा गोखले सख्खे शेजारी गेली कित्येक वर्षे एकमेकांच्या साथीने सुख दुःख वाटून घेतलेले. त्यांना अनेकदा भेटावेसे वाटूनही अगदी एका भिंतीआड जाणे आबांना नकोसे वाटत होते. "किशोरला कोणत्या तोंडाने भेटू? देवा रे! मी जगून काय करतोय?" अतीव दुःखाने आबांचे डोळे झरझर वाहू लागले. ते घरी पोहोचताच स्पृहाच्या लगेच लक्षात आले की आबांचे काहीतरी बिनसले असावे. त्यांना पाण्याचे भांडे देत ती सहजपणे म्हणाली,


"बरं वाटलं का आप्पा? कित्ती दिवसांनी बाहेर पडलात ना!"


तिला काहीच उत्तर न देता आबांनी पेपर हातात धरला आता तोही वाचवेना. "जरा पडतो.."  म्हणून ते त्यांच्या खोलीत आडवे झाले. समोरच्या भिंतीवर संपदाचा, त्यांच्या पत्नीचा हसरा गोड फोटो होता. त्याला चढवलेला चंदनाचा हार मात्र त्यांना अजूनही बोचला. संपदाला जाऊनही वीसेक वर्षे झाली होती..  वटपौर्णिमेचा दिवस होता, नेहमीप्रमाणे मनापासून तयार होत नथ घालून पूजेला निघालेल्या संपदाला आबांनी मोगऱ्याचा गजरा दिला.. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होतं. वडाच्या पूजेला गेलेली संपदा तिथेच कोसळली, ते अखेरचीच. दवाखान्यात नेण्याजोगे सुद्धा काही उरले नव्हते. भेटायला येणारे सगळे म्हणत होते आबांच्या पत्नी किती पुण्यवान!.. आणि आबांचे मन मात्र स्वतःला कोसत होते.. एकटेपणाचे ओझे दिसते तितके हलके नसते.. जो उचलतो त्याचे त्यालाच ठाऊक. आबांचा आणि तिचा संसार अत्यंत सुखाचा होता दोघे जणू एकमेकांत विरघळून गेले होते. दोन मुलींच्या पाठीवर सदानंदाचा जन्म, मुलींचे सुस्थळी लग्न, सदाला बँकेत उत्तम नोकरी, अतिशय प्रेमळ सुस्वभावी सून स्पृहा आणि नातवंडे .. आयुष्य म्हणजे नुसते आनंदी आनंद.आता तर थोरल्या लेकीला नातवंड झाले होते म्हणजे ते पणजोबा सुद्धा झाले. आता सुखासुखी डोळे मिटावेत एव्हढेच त्यांना वाटत असे. दर वेळी दुखण्याने जायबंदी झाले की ते आपल्या पत्नीला म्हणत, 


"अहो!किती दिवस असा  एकटा राहू मी? बोलावून घ्या आता तुमच्याकडे"


पण दर दुखण्यातून अत्यंत आश्चर्यकारकरीत्या ते बरे होत आणि घरी परत येत. तशी घरी कसली उणीव नव्हती त्यांची खोली सुसज्ज होती .. टीव्ही एसी , लेकींशी खास गप्पा मारायला फोन , पुस्तके अगदी गरज पडली तर दिमतीला माणूस सुद्धा ठेवला जाई. लेक सून मायेने , न कंटाळता त्यांची काळजी घ्यायचे. दोन्ही नातवंडे अमेरीकेत स्थायिक झालेली.. असे सगळे आलबेल असूनही आबांना आताश्या जगण्याचा कंटाळा आला होता. सगळ्यात जास्त भीती त्यांना वाटायची ती, 

"आपल्या घरच्यांना आपला कंटाळा तर नाही ना येणार?"


सदानंद बँकेत मोठ्या हुद्द्यावर, त्यात लॉक डाऊनमध्ये बँका सुरूच होत्या. सगळी काळजी घेऊनही कसा कोण जाणे एक दिवस सदाला ताप भरला.. दोन दिवसांत घरातले सगळेच कोविड पोझिटिव्ह निघाले. चार सहा दिवसांत आबांना धाप लागू लागली अखेर ऍडमिट करावेच लागले. पुढे जवळपास बावीस दिवस आबा व्हेंटिलेटरवर होते. ते जिवंत परतणार नाहीत अशी अटकळ असताना ते एकेदिवशी शुद्धीवर आले आणि बरे होऊन घरी परतले. स्पृहा आणि सदाला सुद्धा आपले परत येणे अपेक्षित नसावे, त्यांना उगाच वाईट वाटले. सदा आणि स्पृहा सुद्धा  जवळपास आठ दिवस ऍडमिट असल्याचे त्यांना कळताच आपल्यापायी पोरांना किती त्रास झाला असेल ह्याची खंत त्यांना पोखरून गेली.ह्या सगळ्या अवघड काळात सोसायटीतील सगळे लोक जमेल तशी मदत करत होते . डबे देणे, औषधे आणून देणे, ऍडमिट कुठे करता येईल ह्याची, ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करणे सारे सारे शेजारच्या लोकांनी केले. नंदकिशोर उपासनींच्या कुटुंबाशी त्यांचा विशेष स्नेह. आबा आणि सदाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी, बेड मिळावा, ऑक्सिजन मिळावा म्हणून  त्यांनीच तर केव्हढी धावपळ केली होती. उपासनींचा लेक सदापेक्षा चारपाच वर्षे मोठा. एका सकाळी ती दुर्दैवी बातमी आली सकाळी आठ वाजता उपासनींची सुनबाई तर दहा वाजता लेक कोविडच्या लाटेने गिळला होता. बाहेरगावी असणारी दोन्ही नातवंडे कशीबशी परत आली आणि जेमतेम विधी पूर्ण करून परतली सुद्धा .आता घरात उरलेले दोन दुर्दैवी जीव नंदकिशोर आणि त्याची पत्नी.. रोज आपण जिवंत असल्याच्या वेदनेने मरत होते. नव्वदीच्या आतबाहेर असणाऱ्या मायबापाला साठीच्या लेकसुनेची तिरडी उचलावी लागली होती ह्यापेक्षा जास्त दुर्दैवी कदाचित कुणीच नसेल. त्यांचा तो विलाप पाहून आबांनी अंथरूण धरलं होतं.. काही महिने आबा गलितगात्र होते पण नेहमीप्रमाणे निलाजऱ्या वठलेल्या खोडागत त्यांना पुन्हा एकदा जीवनाची पालवी फुटली. ह्या घटनेला काही महिने उलटून गेले पण अजूनही आबांना उपासनींना भेटण्याची भीती वाटत होती. न जाणो ते म्हणतील..


"कोविडमध्ये हा मसणात गौऱ्या गेलेला म्हातारा जिवंत राहिला आणि आमची त्याच्या अर्ध्या वयाची धडधाकट मुले गेली."


उपासनींचा मुलगा आणि सुनेच्या मृत्यूला केवळ दुर्दैव एव्हढेच एक कारण म्हणता येऊ शकले असते. आबांचा तसा थेट संबंध नसूनही त्यांना अपराधी वाटत असायचे. उपासनींची आठवण जरी कुणी काढली तरी आबांचा गळा भरून येई , छातीवर दडपण जाणवे.. एक विलक्षण घुसमट त्यांना गुदमरून टाकत असे. उपासनी हल्ली कुठेच बाहेर पडत नसावेत.. घरकामाला दोन माणसे नातवंडे लावून गेली होती.दूधाची पिशवी बाहेर लटकवली असायची ती बरेचदा दिवसभर तशीच लटकत असायची. अनेकदा भेटीला म्हणून त्या दिशेला वळवलेले पाऊल आबा पुन्हा माघारी फिरवत. आपण भेटीला जायला हवे, असे अगदी मनापासून वाटूनही भेट घेणे ते टाळत गेले. ह्या टाळण्याने कदाचित त्यांची घुसमट वाढत गेली. त्यांच्या लेकाच्या सदाच्या हे जरासे लक्षात आले असावे त्याने थेट विषयाला हात घालत म्हटले देखील,


"आबा एकदा भेटून या उपासनी काकांना तुम्हाला मोकळे वाटेल. कुणाचे मरण कुणाच्या हातात असते का? ज्याची वेळ येईल तो जातोच त्याला कुणीही अडवू शकत नाही."


उत्तरादाखल आबांनी होकारार्थी मान हलवली. आज जेवण झाले की कसेही करून भेटीला जायचेच त्यांनी निश्चित केले. जेमतेम आमटी भात चिवडून ते उठले जड पावलांनी ते शेजारच्या घरापर्यंत पोहोचले.. एव्हढेशे अंतर पण किती जड झाली होती पावले.. दाटून आलेला आवंढा गिळत त्यांनी दारावरची बेल दाबली.कामवालीने दार उघडून त्यांना बसा म्हटले आणि पाण्याचे भांडे पुढे केले.आतल्या खोलीतून संथ पावले टाकीत नंदकिशोर उपासनी बाहेर आले.. "बापरे! नुसता हाडांचा सापळा उरलाय हा" आबा मनात म्हणाले. दोन मिनिटे निरव शांततेत गेले.. आबांचे डोळे झरझर वाहत होते. एखाद्या अपराध्या सारखे आबा खाली मान घालून बसले होते. क्षणभर दोघांची नजरानजर झाली आणि नंदकिशोरने हंबरडा फोडला..


"आबा आबा! किती उशीर केलास रे भेटीला.. मी तुझी रोज वाट बघत होतो."


आबा शांतपणे उठत त्याच्या शेजारी बसले आणि पाठीवर हात ठेवत म्हणाले..


"किशोर कोणत्या तोंडाने भेटीला येऊ रे! पायात बळ नव्हतं रे! काय सांत्वन करू तुझं मी तरी.."


आबांच्या नजरेला नजर न देता खाली मान घालून किशोर म्हणाले,

"मला वाटलं तुलाही इतरांसारखं वाटलं.. माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या जागी आम्ही दोघे का गेलो नाही? शक्य असते तर तसच नसत का रे केलं? ह्या अश्या जिवंत असण्याला काय अर्थ आहे तूच सांग?"


आबांना कळून चुकलं ही घुसमट आपली एकट्याची नाही.. कदाचित वय वाढलेल्या प्रत्येकाची आहे. माणसाने निरुपयोगी ठरेपर्यंत जगूच नये खरेतर.. दुसऱ्याला आपल्या मरणाची वाट पहायला लावण्यासारखे दुःख नाही. पण त्याहीपेक्षा मोठे दुःख हेच असावे "जिवंत असल्याचे कानकोंडेपण " दुसरा कुणी तसा व्यक्त होत नसेलही पण स्वतःच मन स्वतःला जिवंत असल्याबद्दल गुन्हेगार मानत राहतं... बराच वेळ आबा किशोरच्या पाठीवर हात फिरवत होते.. ही घुसमट कश्यानेच कमी होणार नाही ह्याची खात्री असूनसुद्धा.

✒️यशश्री रहाळकर



रविवार, १३ ऑगस्ट, २०२३

बायकांची जात

मुलगी ह्या वयोगटातून बाहेर पडल्यावर "बायका" ह्या गटात जाणे क्रमप्राप्तच होते.बायका, बायकांच्या गप्पा आणि बायकांचे ग्रुप्स.... सोशल मीडियावर यथेच्छ टिंगल करण्याचं हक्काचं गिऱ्हाईक (त्यात  बऱ्याच अंशी तथ्य आहे हे खरे!) वेगवेगळ्या कारणांसाठी, वेगवेगळ्या वयोगटातील , अगदी वेगळी जडणघडण असणाऱ्या बायकांच्या ग्रुपमध्ये सामील होताच मला एक साक्षात्कार झाला तो असा की "इथे तुमचा आत्मविश्वास आणि आनंद सुरुंग लावून त्याहीपेक्षा Dynamite लावून उडवून टाकण्यात येणार आहे." बहुतांश बायका एकमेकींना भेटल्यावर उणीदुणी काढणे, निरर्थक स्पर्धा करणे, अकारण टीका टिप्पणी करणे आणि अनावश्यक टोमणेबाजी करत आपला वेळ अक्षरशः फुकट घालवत असतात..( मी तरी ह्या क्षणी वेगळं काय करतेय म्हणा😂) बरं! हे सगळं केवळ मैत्रिणींच्या ग्रुप पुरतेच मर्यादित नाही तर कालिग्स,बहिणी, जावा, नणंद भावजय,आणि कोणत्याही नात्यातल्या स्त्रियांच्या ग्रुप मध्ये हे असेच सुरू असते. "बाईच बाईची शत्रू असते" हे विधान सुद्धा टीका टिप्पणीला कंटाळलेल्या एखाद्या बाईनेच केले असावे. सुरवातीच्या काळात मला ह्या साऱ्या वागण्याचा भयंकर त्रास व्हायचा नंतर मात्र ही बहुतेक बायकांची सहज प्रवृत्ती आहे हे माझ्या लक्षात आलं.

अगदी सहजपणे जेव्हा एखादी म्हणते,

"अग काय हे .. पांढरे झालेत तुझे केस.."

"अग काय हे .." ह्या पंचलाईनने तर धडकी भरते हल्ली... ह्या तीन शब्दांतून आपली काळजी असल्याचा सूर लावत पुढच्या क्षणी स्वतःला गॅलिलिओ किंवा न्यूटन समजत नवीन शोध लावतोय जणू असा आव आणायचा... अग बाई.. नसेल जमले तिला डाय करणे आणि पांढरे झालेत केस ,हे चारचौघात ओरडून सांगायची काय गरज ? तिच्याकडे आरसा आहे म्हणजे ती बघत असणारच ना! अगदी तसच एखादीच वजन वाढलंय किंवा कमी झालंय हे तिला तिचे दोन डोळे आणि तिचे कपडे सांगतच असतात, ते वेगळं कुणी सांगायची गरज असते का? एखाद्या छान तयार होऊन प्रसन्न चेहऱ्याने आलेल्या व्यक्तीचा कोणतातरी डाग बरोबर दिसतो, कुणाच्याही व्यक्तीगत समस्या अनावश्यक चर्चिल्या जातात, एकमेकींचे फॅशन सेन्स, कपडे दागिने तोलून पाहिले जातात... खरंच ह्याची गरज असते का? 

कितीही निर्मळ मन आणि प्रांजळपणाचा आव आणला तरीही "वजन वाढलंय का ग तुझं?" ह्या प्रश्नात काही निरागसता नक्कीच नसते. मुळात असे प्रश्न विचारणे ज्यांची उत्तरे माहीत आहेत हे शुद्ध मूर्खपणाचे लक्षण नाहीये का? त्या प्रश्नाच्या विचारण्याने ना तुमची काळजी जाणवते, ना उत्सुकता दिसून येते .. दिसतो तो केवळ भोचकपणा .. एखाद्या छान प्रसन्न चेहऱ्याचे 12 मात्र वाजतात. हाच किंवा तत्सम प्रश्न स्वतःला विचारला तर आवडेल का? हा साधा विचारही बायका करत नाहीत... अस समजू नका की फक्त गृहिणीच हा आगाऊपणा करतात अगदी उच्चशिक्षित मोठ्या पदावर काम करणाऱ्या बायका सुद्धा अपवाद नाहीत. आपल्या छान टापटीप काम करणाऱ्या एखाद्या कलीगला कसा कपड्यांचा सेन्स नाही, ह्यावर यथेच्छ चर्चा केली जाते. 

विशेष गंमतीचा भाग असा की बायकांना बहुतेक वेळेला सामाजिक, राजकीय, आर्थिक अगदी आजूबाजूला घडणाऱ्या घटना ह्यावर मात्र बोलायचेच नसते. म्हणजे अगदी युक्रेन-रशिया प्रश्नावर बोला असे म्हणत नाही मी पण कमीत कमी एखादे आवडते पुस्तक, एखादा आवडता सिनेमा ह्यावर बोलायला काय हरकत आहे? पण नाही! आम्हाला दिसेल त्या बाईतील दोष काढायची हौस तेव्हढी असते. एखादीचा उत्साहाने फुलून आलेला फुगा फटकन टाचणी लावून फोडला की आम्ही कृतकृत्य होतो. खरंतर ,आपल्याला शिक्षणाची संधी मिळण्यासाठी, एक व्यक्ती म्हणून  जगण्याचे सारे हक्क मिळण्यासाठी, समानतेसाठी, व्यक्तिस्वातंत्र्यासाठी केवढा संघर्ष केलाय कित्येक पिढ्यांनी... आणि आपण काय करतोय ? एकमेकींच्या रेषा पुसून आपली रेषा मोठी करण्याचा उगाच प्रयत्न करतोय. 

काही दिवसांपूर्वी मी एका कार्यक्रमाला गेले असता "तुझा DP तुझाच आहे ना ग?" अशी खोचक प्रतिक्रिया ऐकून मी थक्क झाले... म्हणजे मी आधार कार्डचा फोटो dp म्हणून ठेवावा अशी तरी अपेक्षा असावी किंवा ऐन उन्हात 14 तास एक ट्रेन, दुसरी ट्रेन असा प्रवास करताना मी अगदी पार्लरमध्ये जाऊन आल्यागत दिसण्याचा चमत्कार घडावा ??... किती वर्षे अजून आपण ह्या वरवरच्या रंगरंगोटीवर बोलत (वाईटच) राहणार? अतिशय तरल नादमधुर लिहीणाऱ्या माझ्या लेखिका/ कवयित्री मैत्रिणी तरी ह्या साऱ्याला अपवाद असतील असे वाटले होते पण माझा साफ अपेक्षाभंग झाला. का आपण भेटल्यावर एखादी कविता, एखादी कथा ह्यांवर चर्चा करत नाही. "हे काय तू स्टेजवर ड्रेस घालून जाणार?" किंवा ही किती जाड झालीये आणि ती कशी काळवंडलीये ... पुरे करा यार! मानेवर देवाने डोकं नावाचा अवयव दिलाय तो फक्त आज काय भाजी करू हे ठरवण्यापुरताच का?

प्रत्यक्षात आपल्यापैकी प्रत्येक जण वेगवेगळ्या पातळ्यांवर लढणारी योद्धा असते.. प्रत्येकीच रणांगण वेगळं मात्र युद्ध अटळ आहे. घराबाहेर हसतमुखाने पडणारी प्रत्येक स्त्री त्या चेहऱ्याआड काय काय लपवत असते हे तिचं तिलाच ठाऊक.. साधं हे सुद्धा समजून घेऊ शकत नसू तर बाईपण कसलं? साधारण माझ्या आजीच्या पिढीतील बायकांकडे सगळ्या समस्यांवरचे एकच शाश्वत उत्तर होते ,"बाईची जात म्हटले की हे सर्व आलेच." ही so called बायकांची नेमकी जात काय असते हे कळायला मला अर्धे आयुष्य घालवावे लागले. एकाच जातीच्या असूनही आपण बायका एकमेकींना आधार देऊ शकत नाही, कौतुक करणे तर दूरच पण सतत दूषणे मात्र देत राहतो. ह्या सततच्या टीकेमुळे एखादी 'ती' मनानी पार खचून जाऊ शकते... ह्याची जाणीवही आपल्या अगदी सहज?? विधानापाठी नसते.

आता हे सगळं वाचून झाल्यावर जर तुम्हाला "मी नाही बाई त्यातली!" असे वाटत असेल तर तुमचे मनापासून कौतुक आहे. "प्रत्येक स्त्री अशीच असते ",असे बेजबाबदार विधान मी नक्कीच करणार नाही मात्र बहुतांश स्त्रिया कळत नकळत असेच वागताना दिसतात... मला वाटत आपल्या शब्दांना आणि संवादांना सकारात्मक पद्धतीने वळवण्याची नितांत गरज आहे. 
#यशश्री_रहाळकर

मंगळवार, १७ मे, २०२२

पाठवणी

चैतन्य घरी परतला तशी आदळ-आपट, धुसफूस पुन्हा एकदा सुरू झाली. आप्पांना त्याचा निर्णय पटला नव्हताच , पण त्याहूनही त्यांना आपण बाप म्हणून नालायक ठरतोय अशी भीती जास्त असावी. चैतन्यची आई ,सुधाताईंना पटण्या न पटण्याचा मुद्दा नव्हताच, ह्या बाप-बेट्याच्या भांडणात त्यांची घुसमट होत होती, हे मात्र खरे. थोरला मंदार नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर दीन भाव घेऊन,  आपण त्या गावचेच नाहीत असे दाखवत शूज पॉलिश करत होता. त्याला मनातून चैतन्यचा निर्णय पटला असला तरी उघडपणे त्याला पाठिंबा देण्याची धमक त्याच्यापाशी नव्हती. घरातल्या एका व्यक्तीला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.  ती व्यक्ती म्हणजे मंदारची पत्नी समृद्धी. चैतन्यच्या निर्णयावर समृद्धीचे स्वप्नरंजन सुरु देखील झाले..

"आता हे घर आपलेच असं म्हणायला हरकत नाही. आता मंदारशी बोलून आपण चान्स घ्यायला हवा... घरासाठी म्हणून भरपूर सेविंग झाले आहे त्यातून कुठेतरी मस्त फिरून येऊ.. गोवा किंवा .. केरळ..."

मनातल्या मनात समृद्धीने बरेच बेत आखले. खरेतर, चैतन्यचा निर्णय सगळ्यांच्याच भल्याचा होता फक्त आड येत होते पुरुषप्रधान संस्कृतीने पोसलेले इगो.

आप्पा नाडकर्णी आयुष्यभर कारकून म्हणूनच जगले... गावाकडून शहरात आलेली त्यांची पहिली पिढी. सगळी हयात वन.बी.एच.के.चा अडीच खणी फ्लॅट मिळवण्यात घालवली. बरीच वर्षे चाळीतील एका खोलीत संसार केलेले हे कुटूंब..पत्नी सुधा, सगळ्यांशी जमवून घेणारी साधी सरळ गृहिणी. मोठा लेक मंदार त्यांच्यासारखाच .. एका कंपनीत अकाऊंट डिपार्टमेंटला इमाने इतबारे काम करायचा. त्याची पत्नी समृद्धीसुद्धा एका औषधांच्या कंपनीत पॅकिंग करायची.. लग्नाला सहा वर्षे होऊन गेले होते पण जागेचा प्रश्न जागेहून अधिक मोठ्ठा होता.. उद्या धाकट्या दिराचे लग्न झाल्यावर जागा कशी पुरणार ? ह्या विचाराने पछाडून समृद्धीने अजून चान्स घेतला नव्हता . ती आणि मंदार शेजारचा फ्लॅट घेता यावा म्हणून पै पै वाचवत होते.

आप्पांचा धाकटा चैतन्य मेहनती होता आणि त्याहूनही अधिक महत्वाकांक्षी होता. दहावी होताच त्याने कॉमर्स शाखा घेत बँकेच्या परीक्षांचा अभ्यास सुरू केला. ग्रॅज्युवेट होताच त्याने स्पर्धा परीक्षांचा सपाटा लावला. नॅशन्लाईज बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून तो निवडला गेला आणि आप्पांना आभाळ ठेंगणे झाले. चैतन्यच्या रुपात परमेश्वराने आपल्याला आयुष्यभराच्या कष्टाचे फळ दिले आहे, असेच त्यांना वाटे. आता सुखाचे , आर्थिक स्थैर्याचे दिवस येतील असे सुधाताईंनाही वाटत होते. चैतन्य अतिशय सुस्वभावी, नम्र, निर्व्यसनी मुलगा.. त्याचे एकूणात वागणे बोलणे त्याचे साहेब मोहोळकरांना अतिशय प्रभावित करून गेले. आपल्या एकुलत्या एक लेकीसाठी... मुग्धासाठी चैतन्य त्यांना अत्यंत योग्य जोडीदार वाटत होता... एक दोन फॉर्मल भेटीतून त्यांनी चैतन्य आणि मुग्धाची गाठभेटही घालून दिली.

मुग्धा एकुलती एक असली तरी लाडोबा नव्हती. तिने कथक नृत्यात आपली करियरची वाट निवडली होती.. घराच्या वरच्या मजल्यावरच्या हॉलमध्ये ती नृत्याचे क्लासेस घ्यायची. त्याचबरोबर देशविदेशातील अनेक मोठमोठ्या स्टेज प्रोग्रॅममध्ये तिच्या टीमसह सहभागी व्हायची.. ती स्वतंत्र विचारांची आधुनिक मुलगी होती. तिची स्वतःची स्वप्ने होती आणि त्यात अडथळा आणणारे लग्न तिला नको होते.. शिवाय आईवडिलांना आपल्या शिवाय कुणीही नाही, त्यांना कसे सोडून जाऊ?.. ही विवंचना होतीच. ह्या सगळ्याचा आणि एकूणात परिस्थितीचा विचार करून मोहोळकर साहेबांनी मुग्धा आणि चैतन्यच्या लग्नाचा विषय आप्पा नाडकर्णींकडे काढला. एव्हढा मोठा साहेब मागणी घालतोय म्हटल्यावर पहिल्यांदा तर आप्पांची कॉलर गर्वाने ताठ झाली पण जेव्हा मोहोळकरांनी चैतन्यला "घरजावई" करून घेणार असल्याचे बोलून दाखवले तेव्हा आप्पांचा संताप झाला. आप्पांना व्यवहार कळत होता पण आपल्या मुलावर आपला हक्क राहणार नाही, त्याला अगदी गुलाम असल्यागत ठेवतील वगैरे विचार त्यांच्या मनात घालमेल करू लागले. चैतन्यला मुग्धा मनापासून आवडली होती.. आणि मोहोळकरांचा निर्णय सुद्धा... मोहोळकरांचा सहा खोल्यांचा प्रशस्त बंगला तो नजरेआड करू शकत नव्हता... त्याचबरोबर त्यांचा जावई म्हणून वरच्या, अधिक वरच्या हुद्द्यावर जाण्याची इच्छा सहज पुर्ण होणार हेही त्याला कळून चुकले होते.

"आप्पा! तुम्ही एकदा माझं म्हणणं ऐका...फक्त चिडून, संतापून काहीही होणार नाहीये."
चैतन्य त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला.

"माझं मत काहीही असलं तरी फरक पडणार आहे का? तुझा निर्णय झालाय. तो तू परस्पर घेऊन टाकला आहेस.. मग आता हा मानभावीपणा कशासाठी?"
आप्पा फणकाऱ्याने म्हणाले.

आप्पांचा आवाज चढला तश्या सुधाताई आणि मंदार थरथरत आजूबाजूला उभे राहिले... समृद्धी एकीकडे स्वयंपाकाची तयारी करत कानोसा घेऊ लागली.

चैतन्य आप्पांच्या ह्या असहकाराला पुरता वैतागला होता.., तो जरा चिडूनच पण आवाजाची पट्टी राखत म्हणाला..
"आप्पा.. मी बोलूया म्हणतोय कधीचा.. तुम्ही तुमची बाजू मांडा मी माझी मांडतो.. आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया..."

"अरे गाढवा! आता काय समजून घ्यायचे आहे मी ? माझा स्वाभिमान नसणारा बुळ्या मुलगा साहेबांचा घरजावई होणार... हे पेढे वाटून सांगू का गावभर? लाज वाटते मला तुझा बाप म्हणवून घ्यायची.आपली स्वप्ने पूर्ण करण्या एव्हढं बळ असावं पुरुषाच्या मनगटात ... तू त्या साहेबांच्या मुलीशी लग्न केलेस की मेलास आम्हाला.."
आप्पा बंदुकीतून गोळ्या सुटाव्यात असे ताडताड बोलत होते.

"अरे शुंभा, बायकोचा बैल का व्हायचंय तुला? त्या मुलीला काय सोनं लागलंय का? आणि ते प्रेम का काय असेल तर तिने जमवून घ्यायचं तुझ्या घरात... " आप्पा कडाडले.

"तिनेच का जमवून घ्यायचं आप्पा?? मी का नाही? संसार तर दोघांचा असतो ना मग कसले मानापमान? सोय महत्वाची नाही का?" चैतन्यचा प्रश्न सडेतोड होता.

आता परिस्थिती अधिक चिघळण्यापूर्वी सुधाताईंनी संभाषणात उडी घेत सामंजस्याचा स्वर लावत म्हटले
"चैतन्य.. ह्याच घरात, अडचणीत तू रहा असे नाही रे बाळा आम्ही म्हणत.. तू वेगळं घर घे ना तुझं स्वतंत्र किंवा .. किंवा भाड्याने घे एखाद जवळपास..."

"म्हणजे सगळं आयुष्य मी एक घर मिळवण्यात संपवून टाकायचं... "
चैतन्यच्या ह्या उत्तरावर अधिकच भडकलेले आप्पा पिंजऱ्यातल्या वाघागत खोलीतच गरागरा फेऱ्या मारू लागले.

आता चैतन्य काकुळतीला येऊन अजिजीच्या स्वरांत म्हणाला,
"आप्पा-आई...मोहोळकर साहेबांची मुग्धा एकुलती एक लेक. त्यांचा बंगला उद्या तिचाच होणार आहे. तिच्या क्लासचा तिथे उत्तम जम बसला आहे...त्यांनाही आधाराला कुणीतरी हवेच आहे... असे असताना मी घरभाड्यावर पैसे का घालवू? मी त्या पैशांची बचत करू शकतो , तुम्हाला त्यातून मदत करू शकतो..."

"भले शाब्बास ! स्वतःच्या आईवडिलांना वाऱ्यावर सोडून तिच्या आईवडिलांना आधार द्यायला निघालेत आपले वीर.. त्या घरात तू गुलामासारखा राबून , बटीकासारखा कमावलेला एक पै नको आम्हाला."
सुधाताईंसमोर हात वेडावत आप्पा बडबडत होते.

"आपल्या घरात तुम्ही सून आणणार किंवा वहिनी आलीये पूर्वी ..ती काय बटीक म्हणून का?? नाही ना! ती आपल्या कुटुंबाचा भाग झालीये.. तसा विचार का करत नाही तुम्ही?  माझं लग्न झालं म्हणजे मी काही तुम्हाला सोडणार नाहीये सणावाराला एकत्र येऊ, अडल्या-नडल्याला धाऊन येऊ... मी या घरात नसणार पण दादा वहिनी आहेत ... ह्या घराची त्यांना गरज आहे.. माझा पैसा वाचेल तो आपल्याला राहून गेलेल्या हौशी, न सांगता येणारी आजारपणं ह्यासाठी ठेवता येईल. दादाला बाळ झाल्यावर त्याला उत्तम शाळेत शिकवता येईल.. मुळात एकमेकांमुळे होणारा खोळंबा टाळल्याने आपल्यात प्रेम राहील..."
चैतन्य कितीतरी गोष्टी बोलत होता...

मंदार उघडपणे दाखवत नसला तरी त्याला सारे पटत होते... खरेतर, चैतन्यचा निर्णय पूर्ण विचारांती घेतलेला आणि सगळ्यांच्या भल्याचा होता. आईची गेले कित्येक वर्षांची राहून गेलेली चारधाम यात्रा त्याला पुरी करायची होती, आप्पांचे 'चार चाकी गाडी' घ्यायचं स्वप्न पूर्ण करायचं होतं... त्याला ह्या घरातून व समस्यांपासून पळून जायचं नव्हतं तर त्या समस्या सोडविण्याचा मार्ग तो शोधत होता ... हा मार्ग त्याला मोहोळकर साहेबांच्या प्रस्तावात सापडला होता. सर्वसामान्य माणसाचे अख्खे आयुष्य एक घर घेण्यात संपून जाते, मग जगायचे मात्र राहून जाते. मुग्धाशी लग्न करून त्या घरात रहायला गेल्याने त्याचा हा प्रश्न कायमचा मिटणार होता.. मोहोळकर साहेब आणि त्यांच्या पत्नी स्वभावाने उत्तम होते, मुग्धाचा तर प्रश्नच नव्हता.. आप्पांचा विरोध पाहता त्याने रजिस्टर लग्न करायचे ठरवले होते. बरेच दिवसांपासून ही निरर्थक चर्चा सुरू होती पण निष्पन्न काहीही होत नव्हते.. अखेर चैतन्यचे लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले.

सुधाताई ह्या साऱ्या वादाने मनातून पुरत्या कोलमडल्या होत्या, आता लेकाला पुन्हा भेटता येईल की नाही ह्या संभ्रमात ओल्या डोळ्यांना पदर लावत त्यांनी विचारले,
"तुझी आठवण आली तर रे चैतु.. काय करू मी ? कुठे भेटशील मला??..."

आईचे हात घट्ट धरत चैतन्य म्हणाला,
"माझ्याजागी जर मुलगी असती आणि ती सासरी निघाली असती तर काय केलं असतंस आई तू?अगदी तेच करायचंय तुला... "
चैतन्य सहज संवाद साधत म्हणाला...

"त्या घरी मी गुलाम नसणार ग.. कुटुंबातील एक व्यक्ती असेन... तू हवं तेव्हा मला भेटायला येऊ शकशील. अगदी हक्काने चार दिवस राहू शकशील तसाच मी सुद्धा तुझ्याकडे येईन ना ... पण कायमचे एकत्र राहणे फक्त जमणार नाही... पण.. पण एक विचार कर ना की मी वेगळे घर घेऊन राहिलो तरी फार वेगळं काही होणार नाहीये."

"लोक काय म्हणतील ह्याचा विचार केलाय का तू? शेण घालतील आमच्या तोंडात शेण!"
आप्पा पुन्हा दरडावत म्हणाले.

"लोक?? कोणते लोक म्हणताय आप्पा तुम्ही? दोन वर्षांपूर्वी तुम्हाला हार्ट अटॅक आला होता तेव्हा हे लोक कुठे होते? कोण होत आपल्या सोबत हॉस्पिटलच्या चकरा मारायला, बँकेत जाऊन पैश्याची जुळवाजुळव करायला... तेव्हा आपणच आपले होतो. आपले प्रश्न आपले असतात , लोक काय उद्या सगळं विसरून जातात.."
चैतन्यचा प्रत्येक मुद्दा आप्पांना अधिकाधिक निरुत्तर करत होता.

"माझा निर्णय जगावेगळा असेल पण तो योग्य आहे ह्याची मला खात्री आहे. माझ्या कुटुंबानी ह्या शुभदिवशी माझ्या सोबत माझ्या आनंदात सहभागी व्हावे एव्हढीच माझी इच्छा आहे."
चैतन्यचे बोलणे संपायच्या आत आप्पांनी नकारार्थी मान हलवली..पण तो न थांबता पुढे बोलत राहिला.

"लग्न म्हणजे तरी काय हो?? दोन वेगवेगळ्या घरात वाढलेल्या दोन जीवांनी एकत्र येत पुढचा आयुष्याचा प्रवास सोबतीने करायचे ठरवणे. साथ सोबत, आधार महत्वाचा . 'जोडीदार असणे' म्हणजे सांभाळून घेणेही आलेच. इथून पुढे तुमची जशी जबाबदारी माझी आहे तशीच मुग्धाच्या आईवडिलांचीही जबाबदारी माझी असणार...  ह्याहून फार काही वेगळं नाहीये आप्पा... "
चैतन्य थकून गेला ह्या साऱ्या वादविवादाने... पायात चपला सरकवून तो चालायला निघून गेला.

आप्पांना मनातून अजूनही त्याचे चुकले असेच वाटत होते..
"माझा हातातोंडाशी आलेला , एव्हढा हुशार, सुसंस्कारी मुलगा पळवला त्या मोहोळकराने... भलं होणार नाही त्याचं..."
म्हणत हतबल आप्पा वाहणारे डोळे पुसू लागले.

सुधाताई मूळच्या संयतपणे म्हणाल्या..
"मुले म्हणजे आपली ठेव असते आयुष्याच्या बँकेतली .. त्यावरचे व्याज मिळतेय ह्यातच आनंद मानायचा.पण खर सांगू मुद्दल गेलेले नाहीये अजून हातातून..."

आप्पांना हे अपेक्षित नव्हते. ते चेहऱ्यावर प्रश्न घेऊन उभे होते.. सुधाताई सारे बळ एकवटत म्हणाल्या..

"दोन दिवसांनी लेकाची पाठवणी करायची आहे. चला ! तयारीला लागलं पाहिजे.. मुलांच्या आनंदात आनंद मानायचा आपण..."

आप्पा पुरुषप्रधान संस्कृतीत जगले, वाढले होते. त्यांना कदाचित हे समजून घेणं तितकसं सोपं वाटणार नव्हतं ... मात्र येत्या काळात अश्या प्रकारची मुलाची पाठवणी करण्याची वेळ अनेक आप्पांवर येऊ शकते... ती वेळ फार दूर नाही. चला! पाठवणीची तयारी करायला हवी.

✒️यशश्री रहाळकर


 

शुक्रवार, २५ मार्च, २०२२

अनवट


काल परवा पर्यंत मुलामाणसांनी गजबजलेला 'राधानिल' बंगला आज कमालीचा शांत होता. एरव्ही एव्हढ्या मोठ्या बंगल्यात दोघेच तर असत, अनिलराव अन् अनुराधा ताई रानडे, बागकामाचा माळी, दिवसभर कामाच्या बाई अन् त्यांची मोठी लेक कधीतरी दिसे तेव्हढीच काय ती वर्दळ. तसे अधूनमधून येणारे मित्र - गणगोत असायचे, बाकी राधानिलमध्ये अर्थातच दोघेच अनुराधा अन् अनिल. त्यांच्याच तर नावांची सांगड घालत ठळक पितळी घडीव पाटी डौलात चमकायची. दोनेक दिवसांपूर्वी मात्र त्यांचा सारा परीवार जमला होता ....लग्नाचा पन्नासावा का काय तो वाढदिवस साजरा करायला घरगुती कार्यक्रम... असे अनुराधा ताई काहीतरी म्हणाल्या होत्या. "आज सकाळी फिरायला दिसल्या नाहीत"... असे कुजबुजत सकाळी सोबत फिरायला जाणाऱ्या बायका आपापल्या घरांकडे वळल्या.

अनुराधा आज जरा उशीराच उठली. निवांतपणे बंगळीवर बसत स्वस्थपणानं डोळे पुन्हा एकदा मिटून घेतले. आज चहाचे आपल्यालाच बघावे लागणार हे जाणून अनिलरावांनी स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला. प्रेम, उत्साह, आनंद आणि कौतुकाने सजलेला सारा सोहळा अनुराधा पुन्हा पुन्हा आठवू लागली, अन् त्या साऱ्यावर विरजण घालणारे ताईचे शब्द, ...  "तिला आई आहे.".... वारंवार त्यांच्यावर आघात करू लागले. भरलेले डोळे उघडून पाहतात तो हातात चहाचा कप अन् बिस्कीट्स घेऊन अनिलराव उभे,

"काय मुलानातवंडांच्या आठवणीत आम्हाला विसरलात ना ?"

काहीही न बोलता चहाचा कप हातात घेत अनुराधा सावकाश घोट-घोट पिऊ लागली.

"अजून आज ताईची चक्कर कशी नाही झाली ?"

विचारत पेपर उघडून अनिलरावांनी जगाच्या घडामोडीत स्वतःला गुंतवून टाकले.

अतीव थकव्याने अनुराधा त्याच झोपाळ्यावर आडवी झाली.... आपल्या संपूर्ण आयुष्याचा पट चित्रपटासारखा त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर ती उलगडून बसली. अनिलराव बँकेत मोठ्या पदावर कार्यरत होते तर अनुराधा शिक्षिका... दिसायला देखण्या, रसिक ,भाषा शिक्षिका. अनिलराव बँकेत सुरुवातीला कॅशियर पण पुढे परीक्षा देत देत मॅनेजर होत रिटायर्ड झाले. अनुराधा देखिल विद्यार्थ्यांची लाडकी, आसपासच्या अन् सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाला आपलसं करणारी. त्यांच सारं जग म्हणजे त्यांची तीन अपत्य. पहिली लेक आरोही, पाठोपाठ दोन वर्षांनी ओंकार आणि जरा उशीराच म्हणजे जवळजवळ आरोही दहा वर्षांची झाल्यावर झालेली अनुप्रिता.

शेंडेफळ अनुप्रिता तिची प्रचंड लाडकी, तिचंच रूप घेऊन आलेली अनुप्रिता केतकी गोऱ्या वर्णाची , घाऱ्या डोळ्यांची बाहुलीच जणू.  ती अभिमानानं सांगायची "अनुप्रिता म्हणजे देवाचं Sweet Surprise" आहे. बडबडी, चंचल, सगळ्या स्पर्धा गाजवणारी अनुप्रिता.... हैद्राबादच्या जहागिरदार या  गडगंज घराण्यातील  आशिष सारख्या देखण्या डॉक्टरने  तिला मागणी घातली काय, ती राजाची राणी यथावकाश दोन मुलांची आई झाली. दोघेही गोरेघारे हो !.. सारे स्वप्नवत. अनुप्रिता त्यांच्या काळजाचा तुकडा, तिच्या साऱ्या आठवणी त्यांना सुखावणाऱ्याच... अनुप्रिता..  लाडाचे नाव अनु... अनु तिच्या कलागुणांमुळे इतकी प्रसिद्ध होती की अनेक लोक त्यांना 'अनुची आई' म्हणूनच ओळखत. मुलांना सुट्ट्या असल्या की ती महिनाभर हक्काने माहेरी येई अन् तिच्या साऱ्या हौशी , आवडीनिवडी, हट्ट पुरवणे हा अनुराधाचा आवडता कार्यक्रम असायचा. तिच्या मुलांच्या मौंजीत तर काय करू आणि काय नाही असे झाले अनुराधाला. दागिन्यांनी महालक्ष्मी सारख्या सजलेल्या आपल्या देखण्या लेकीकडे ती कितीतरी वेळा कौतुकानं पाहत अन् दृष्ट काढीत होती .... तिच्या प्रतिष्ठा शोभेल अशी पैठणी, सोन्याचे दागिने खास तिच्या पसंतीने बनवून घेतले होते.

अनुराधाचा लेक ओंकार...रूपानं बेताचा पण प्रचंड हुशार. प्रत्येक परीक्षेत पहीला तोच असायचा, प्रचंड अभ्यासू... त्याच्या परीक्षांचे निकाल म्हणजे अनुराधाचा अभिमानाने मिरवण्याचा काळ. अतिशय प्रक्टीकल असलेला ओंकार झपाझप परीक्षा देत इंजीनियर होऊन MS साठी अमेरीकेत गेला ..तो तिथलाच झाला. अनिलराव जरा दुखावले पण मुलाच्या हट्टापुढे काय चालणार ? लग्न मात्र त्यानी आईवडीलांच्या पसंतीने स्वातीशी केलं. सून आवडायची अनुराधाला. दोनेक वेळेला जाऊनही आले दोघे अमेरीकेला. लेकाने सुट्ट्या घेऊन भरपूर फिरवल हो ! त्यालाही मुलगेच दोन ,जुळी.. बाळंतपणाला काय काय घेऊन गेल्या त्या भारतातून..... नातवंड, सून सगळे लाघवी. वर्ष दोन वर्षांनी येतात. काय काय घेऊन येतात साऱ्यांना अन् यादीही देऊन ठेवतात , पूर्ण कार्यक्रमाची ..... म्हणजे किती दिवस येणार, कुठे जाणार, काय करणार वगैरे वगैरे. तो आला की त्यांचे दिवस कुठे येत अन् कुठे जात काही कळायचे नाही. आठ-दहा दिवसात मुलाला अन् नातवंडांना त्या नजरेत भरून घेत.

अनिलरावांच्या हाकेन तिची विचारांची तंद्री भंग पावली...

"अगबाई दहा वाजले का? आज बाई आल्या नाहीत अजून.... नाश्ता करायला घेते, तुम्हाला BPची गोळी घ्यायची असेल ना!"

म्हणत धडपडत उठू लागली. अनिलरावांनी खुणेनेच त्यांना बसायला सांगितल अन् उपम्याच्या प्लेट भरून आणल्या. नारळू पेरून केलेला साजूक तूपातला त्यांना आवडतो तसाच उपमा....

"ताई आली होती वाटतं."
त्या नकळत म्हणाल्या.

"हो ना ! आज बाई आजारी आहेत म्हणे, त्यांनी ताईला सकाळी फोन करून सांगितलं. तिनीच मग नाश्ता केला. पोळी भाजी आणलीये करून अन् कुकर लाऊन गेली ती."
अनिलराव म्हणाले.

आश्चर्यान उपमा खात त्या उदगारल्या,

"अग बाई माझी झोप म्हणावी का कुंभकर्णाची... काsही कळलेच नाही."

ताई, त्यांची मोठी लेक.. आरोही, गावातच राहायची. तिच्या कॉलेजच्या वाटेवर त्यांच घर, येता जातांना डोकवायची. अनिलरावांना गेल्या वर्षी हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर तर फारच हळवी झाली.... त्यांची सारी कामे, बँकेत जाणे, वेगवेगळ्या तपासण्या, डॉक्टर, भाजी, किराणा सारे सारे तिच पाही.. अनुराधा रिकाम्या प्लेट ठेवायला उठली. तिला आज प्रकर्षाने जाणवल. भिंतीवर ओंकार, अनुप्रिता आणि त्यांच्या मुलांचेच फोटोज् फक्त लावलेत आपण... पुन्हा एकदा जखमेची खपली निघून रक्त भळभळाव तसे ताईचे शब्द आठवले,

"तिला आई आहे ."

त्यांचा हुंदका ऐकून अनिलराव एकढेच म्हणाले,

"तुला जाणीव झाली हेच महत्वाचे "
त्यांनी शब्दकोडे सोडविण्यास सुरुवात केली.

आपल्या आयुष्याच्या न सुटणाऱ्या कोड्याकडे अनुराधा तटस्थपणे पाहू लागली ...आरोही, तिची पहिलीच लेक... ज्या बाळानं तिला आईपण दिलं ती आरोही. तिची चाहुल, तिचा जन्म, पहिलं पाऊल, पहिल्यांदा तिनं आई म्हणून मारलेली हाक सारं सारं आठवलं त्यांना. आरोही अनिलरावांचा जीव की प्राण होती. रूपानं सामान्य बुद्धीनंही बेताचीच. ओंकार अन अनुची ताई झाली अन् मूळची गंभीर मितभाषी आरोही अधिक गंभीर, अबोल होत गेली. त्यांची ताई म्हणून सारेच तिला ताई म्हणू लागले. त्यांची दुखणी खुपणी, अभ्यास परीक्षा सारे काही तिच सांभाळायची. अनुराधाची नोकरी जणू काही तिच्याच आधाराने चालायची. सारं घर ती लीलया सांभाळायची. कधीही तिने काही हट्ट केला, मागणी केलेली त्यांना आठवत नाही. Physics फार आवडता विषय तिचा . BSc होत नाही तोच बाई आत्या म्हणजे त्यांच्या मोठ्या नणंदेनी.... कुलकर्णीचं ठिकाण सांगितलं. ताईच्या सर्वतोपरी सामान्यत्वाचा विचार करता लग्न करण्यास आपण चटकन होकार दिला. 'चुकल का काही आपलं??', त्या पुन्हा पुन्हा आठवू लागल्या.

लग्न जुळवणं बाई आत्यांचा आनंदाचा छंद... घरातल्या जवळपास सगळ्यांचेच लग्न जुळवणे, गाठीभेटी, व्यवहार त्या मोठ्या मानाने मिरवत करत..... आणि आत्तापर्यंत त्यात त्यांना यशही आलेले होते. आरोहीसाठी सतिश कुलकर्णीच ठिकाणंही त्यांनीच आणलं. मुलगा क्लार्क म्हणून वडीलांच्या जागी सरकारी नोकरीत लागलेला B.Com. निर्व्यसनी. बाई आत्यांनी आरोहीच्या रूपाचा काटेरी उल्लेख केला अन् ही काय पुढे शिकणार ? जेमतेम II Class टाक उजवून सांगितले.... मिही तयार झाले सहजच अन् माझ्या आरोहीला उजवून टाकले. घरात दोन धाकट्या नणंदा, नुकताच नवरा गेल्याच्या दुःखातून न सावरलेली सासू... त्यांनी काही मागितले नाही. त्यातच त्याच वर्षी ओंकार अमेरीकेला जाणार म्हणून मोठी रक्कम त्याच्या शिक्षणासाठी गुंतवली... ताईचं लग्न रजिस्टर झालं. आपली नोकरी सुरू होती त्यामुळे सणवारही आपण टाळलेच, तशी त्यांनाही हौसमौज नव्हतीच. कोणत्याही सणाचे म्हणून विशिष्ठ पैसे मिळाले की ताईची सासू खुष होई, तश्या लोभी नव्हत्या त्या;  पण ताई एकदाच म्हणावी होती...

"माणसं वाईट नाहीत म्हणून चांगली आहेत म्हणायचं... इतकंच"

तक्रार करणं हा तिचा स्वभावच नव्हता. एकूणात कधीच तिची काहीच हौसमौज केली गेली नाही. गावातच राहते म्हणून माहेरी राहता यायचे नाही. मात्र तिच्या सासरी, भावंडात, मैत्रिणीत, सगळ्यांनाच ती प्रिय होती. कुटुंबाला हातभार म्हणून B.Ed. करत लगेचच नोकरी स्विकारली तिने... पुढे M.SC. करत त्याच शाळेच्या संलग्न कॉलेजला Lecturer झाली. सारं मेहनतीने, सावकाश तिला कधीच स्पर्धा करावीशी वाटत नव्हती. यथावकाश नणंदांची लग्ने झाली, वृद्धापकाळाने सासुबाई निर्वतल्या. ती अजूनही धरून आहे साऱ्यांना. आरोही गेल्याच महिन्यात Ph.D. झाली. तिच्या या यशाने अनिलरावांना कोण आनंद झाला. भेटेल त्याला कौतुकानं सांगत सुटले. आता नवीन सत्रात जुलैमध्ये ती प्राचार्या होणार,अशी शक्यता असल्याचेही त्यांना कळले होते.

ताईला एकुलती एक लेक समिधा, त्यांची ही एकटीच नात, त्यांची खूप लाडकी.  तिला गोष्टी सांगणे, तिच्याशी गप्पा मारणे अनुराधाला फार फार आवडायचे . तिच्यावेळी ताईचं बाळंतपण कसंबसं रेटलं त्यांनी... ऐन फेब्रुवारीत त्यांना सुट्या घेता येईनात....परीक्षांमुळे जेमतेम सव्वा महीन्यात त्यांनी ताईला सासरी पाठवले. खरंतर ताईला तिथे कामाला जुंपून घ्यावे लागणार हे कळत असूनही त्यांनी स्वार्थ साधला. अनुची दोन्ही बाळंतपणे मात्र त्यांच्या रिटायर्डमेन्ट नंतरची ...त्यात हैद्राबाद दूर म्हणून चांगले सहा सहा महिने ठेऊन घेतलं त्यांनी अनुप्रिताला... तसे तिचे लग्न, प्रत्येक सण थाटामाटात झाला होता अन् अनुराधाला वेळ असल्याने तिने तो मोठ्या हौशीने,मजेत साजराही केला होता.

समिधा, ताईची लेक अगदी तिचीच प्रतिकृती. या वर्षी ग्रॅज्युवेशन फायनलला होती.... तशीच शांत, मनमिळावू फक्त ताईइतकी गंभीर नाही तर आनंदी.... खळखळून हसायची तर खूप गोड दिसायची. समिधा पाचएक वर्षांची असेल तेव्हाची गोष्ट... आता दुसरा चान्स घेण्याविषयी कुणीतरी ताईला चिडवत होतं... ताई म्हणाली होती,

"दूसरे मूल म्हणजे पहिल्या मुलावर अन्याय असतो ग.."

खरं होत का तिचं? मी अन्याय केला होता तिच्यावर?? परवाच्या कार्यक्रमांत बाई आत्यानी जेव्हा समिधासाठी स्थळ आणलं आणि तिच रुप सामान्य ,लग्न उरकून टाक असं सांगितलं ... तेव्हा ताई शांतपणे म्हणाली,

"तिचं लग्न उरकून टाकायला ती आरोही रानडे नाही आत्या....आणि हो ! सगळ्यात महत्वाची गोष्ट... "

अनुराधाकडे रोखून पाहत ती कडव्या स्वरात म्हणाली

"तिला आई आहे."

क्षण दोन क्षण पराकोटीच्या शांत नजरेनं तिनं अनुराधाकडे रोखून पाहीलं अन् पुन्हा चेहऱ्यावर मूळचे गांभीर्य परत आणत ती कामांकडे वळली. दाखवत नसले तरी ती बोच साऱ्यांना जाणवलीच... प्रसंग संपला एकेक जण मार्गस्थ झाला. घरात दोघेच उरले पुन्हा.

"अहो एकच शब्द अडलाय कोड्यातला "

अनिलरावांनी पुकारा केला.

"कोणता हो ?" म्हणत अनुराधा टेकली.

"कधीही कुणी न चाललेली वाट, माहीत नसलेली वाट"  अनिलरावांनी विचारले.

"चार अक्षरी"...बोटे नाचवत म्हणाले.

"अनवट ".... त्या स्वतःलाच सांगितल्या सारख्या पुटपुटल्या. अनिलरावांनी कोडं सुटल्याच्या आनंदात टाळी वाजवली. एक कोडं अनुराधालाही सुटलं होतं. त्यांना त्यांच्या पन्नाशीच्या लेकीची आई व्हायचं होतं. त्यांनी तडक जावयाला फोन केला..

"सतिशराव ! हो हो, मीच आरोहीची आई बोलतेय. उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन महिने आरोहीला माहेरपणाला आणेन म्हणतेय. तुम्ही परवानगी द्या म्हणजे झालं... अहो... एकदा का ती प्राचार्य झाली की कसली येतेय? क्षणभर उसंत मिळणार नाही मग तिला. हो हो.... उदयाच गाडी पाठवते; पण तिला सांगू नका हं! Surprize देऊया. समिधाला Bag भरायला सांगते."

अनिलरावांकडे वळत त्या म्हणाल्या,

"माझी पेन्शन झाली का हो जमा ?"

"आता काय घेताय ? " अनिलरावांनी विचारले.

"आरोहीला पांढरी शुभ्र पैठणी घेईन म्हणते - प्राचार्य झाली म्हणजे 15 ऑगस्टला तिच्या हस्ते ध्वजारोहण होईल ना !"

अनिलराव समजून पुटपुटले.... "अनवट वाटा.. चांगलं आहे."

✒️ यशश्री रहाळकर


मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

हळवा कप्पा

          अण्णा किर्लोस्करांना सगळा गाव "सद्दाम" अश्याच नावाने ओळखायचा.. अर्थात त्यांच्यापुढे बोलायची धमक नव्हती कुणातच पण माघारी सगळे सद्दामच म्हणत. 90च्या दशकात इराकच्या सद्दाम हुसेनने घातलेला धुमाकूळ लक्षात घेता , दिवाळीतील सुतळी बॉम्बच्या डब्यांवरसुद्धा सद्दामचे चित्र असायचे... एकदम कडक वाजणारा फटाका म्हणून तो तुफान विकला जायचा... तर असे कडक वाजणारे म्हणून अण्णा सद्दाम झाले. एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल की अण्णा नेमके कसे असतील? लोकशाहीची शाल पांघरलेला हुकूमशाह, अशी काही जरब होती त्यांची की भल्याभल्यांनी गुडघे टेकले होते. त्यांच्या घरी एक पितळी बंब होता... त्यात भल्या पहाटे लाकडे घालून पेटवायचे काम त्यांचे होते... तशीच लाकडे ते तोंडातही पेटवत असावेत.. पहाटे पाचला शिव्यांच्या लाखोलीने त्यांची आणि पर्यायाने शेजारी म्हणून आमची 'मंगल प्रभात' होत असे.


          संतापी ह्या शब्दाला पर्यायवाची शब्द अण्णा द्यावा,  इतके अण्णा संतापी होते. अखिल ब्रह्मांडात त्यांचे कुणाशीच सख्य नव्हते, त्यांना एकही मित्र नव्हता, त्यांचे नातेवाईकसुद्धा  भिऊनच असायचे. अगदी सख्खी मोठी बहीण गावातच रहायची पण ती चाळीस वर्षांत कधीही ह्यांच्या घरी फिरकलीच नाही... तिच्याही नवऱ्याशी अण्णांचे वाजले होते, इतके की तो मनुष्य गेला तरी अण्णा काही अंत्ययात्रेला गेले नाहीत. अण्णा तिरसट आणि कोपिष्टपणाचे अद्भुत मिश्रण होते... वाढत्या वयासोबत त्यांच्या ह्या मूळ प्रवृत्ती देखिल वाढत गेल्या. मी त्यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हाच ते सत्तरीच्या घरात असतील. सहा फूट उंच, शिडशिडीत, काळाभोर रंग , त्यात रापलेला काटक देह, झुपकेदार मिशा आणि त्यावरच्या चेहऱ्यावर प्रचंड संताप.... फाटकाचे दार लावले नाही म्हणून ते मला इतके ओरडले की मी तिथेच मुळूमुळू रडायला लागले... त्यांच्या नाती म्हणजे माझ्या मैत्रिणी आम्ही पुन्हा कधीही त्यांच्या घरी खेळायला गेलो नाही. 


          त्यांची मुलेच काय  नातवंडेसुद्धा त्यांच्या वाऱ्याला उभी राहत नसत... मुले दिसली की ते त्यांना कामाला लावत... काम काय तर वीटा उचलणे. घरातील कोणत्यातरी कामाच्या वेळी उरलेल्या वीटा ते थप्पी करून एका जागी लावत मग दर आठवड्याला त्यांची जागा बदलत असे. ह्या वीटा प्राचीन धरोहर असल्यागत वर्षोनुवर्षे ते सांभाळत होते... न थकता आत बाहेर हलवत होते. त्या विटांपैकी एखादी कमी जास्त झाली तर ??? ते वीटा मोजून ठेवत.... एकदा गल्लीतल्या मुलांनी क्रिकेट खेळायला स्टम्प उभे करायला तीन वीटा उचलल्या आणि झाले त्यांच्या तीन पिढ्यांचा अर्वाच्च उद्धार करत अण्णा त्यांच्या अंगावर असे काही धावून गेले की पुढचा महिनाभर कुणीही क्रिकेटचे नावच घेतले नाही. अण्णा सतत कष्ट करत असायचे बरेचदा ते निरर्थक असत पण कदाचित ते तेव्हढाच वेळ शांत बसतात म्हणून घरच्यांना बरे वाटे. घरी गाय वासरू होते त्याचे सगळे तेच करत, कडबा ढेप सरकी कालवून देणे, बंबासाठी  लाकडे फोडणे, झाडलोट करणे , झाडांना खत घालणे, पाणी देणे असे सतत त्यांचे काहीना काही सुरू असे.


          त्यांच्या घरी दोन तीन बिऱ्हाडकरू भाडेकरी होते... दोन चार महिन्यांतच ते पळून जात... अण्णा प्रत्येकाशी भांडायचे... कारण अतिक्षुल्लक असायचे. दूधवाला, पेपरवाला, भाजीवाले, घरकामाची बाई .. कुणीही त्यांच्याकडे टिकायचे नाही. घराभवती त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे ,फुलझाडे लावली होती... सतत ते त्यांची मशागत करायचे , काळजी घ्यायचे... मात्र एकही फुल किंवा फळ कुणीही त्यांना न विचारता तोडलेले चालत नसे... अर्थात त्यांना विचारायची हिंमत कुणातच नव्हती, हा भाग वेगळा. एकदा नव्यानेच रहायला आलेल्या शेजारच्या मुलीने रामफळासाठी हट्ट केला तिच्या वडिलांनी सहज तोडून दिले . त्यांच्याशी अण्णांचे भांडण इतके विकोपाला गेले की चार माणसांनी मधे पडून ते कसेबसे सोडवले.


          अण्णा हे त्यांचे  कागदोपत्री नाव नव्हे ते "महादेव" असावे, हा योगायोग नव्हता तर ते त्याच्याच सारखे तांडवही करायचे.  त्या शंभू महादेवाला तिसरा डोळा उघडावा तरी लागे पण ह्या मनुष्याला त्याचीही गरज नव्हती.... महादेवासारखेच आयुष्याचे हलाहल ते प्यायलेही होते. जन्माला आले तशी आई गेली पुढे काही वर्षांनी वडीलही गेले, पोरकेपणानेच त्यांना वाढवले. नाही म्हणायला सावत्र आई आणि दोन धाकटी सावत्र भावंडे होती. चार घरी वार लावून शिक्षण पूर्ण केले, स्वतः ढोर मेहनत करून त्यांनी घरदार उभे केले... घराच्या भिंतीही त्यांनी स्वतः लिंपलेल्या होत्या. वाट्याला आलेल्या अवहेलना आणि कटू अनुभवांमुळे ते अधिकच संतापी होत गेले. ह्या सगळ्यांत एकच व्यक्ती अशी होती जिने खऱ्या अर्थानं आयुष्यभर त्यांना साथ दिली, एव्हढेच नव्हे तर त्यांच्याशी त्यांच्या कलाकलाने जुळवून घेतले... ती व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी नानी.


नानी अण्णांच्या अगदी विरुद्ध... इवलीशी ठेंगणी, नाजूक, गोरीपान .. केशरी पातळ नेसले की अगदी  पारीजाताचे फुल वाटायची. त्यांची अगदी जया-अमिताभची जोडी होती. स्वभावानेही नानी अगदी लाघवी , सगळ्यांना धरून ठेवणारी आणि कमालीची शांत होती. नानी तोंडात खडीसाखर आणि डोक्यावर बर्फाची लादी घेऊन वावरत होती. तिला एक पक्के ठाऊक झाले होते की आपल्यालाच चार माणसांना धरून रहायचे आहे. प्रत्येकाच्या अडल्या नडल्याला ती धावून जात असे, प्रत्येकाच्या लेकिसुनांची चौकशी करणे, अण्णांच्या अपरोक्ष मुलांना बागेतली फळे दे, झाडाच्या कैऱ्या दे, लिंब दे असे सारे ती करायची. कुणाच्याही घरी काही कार्यक्रम असला की नानी पदर खोचून कामाला हजर असायची.


          अण्णांच्या संतापातून नानीचीही सुटका नसायची... मात्र अश्या वेळी ती पुतळा झाल्यागत शांत बसून घ्यायची मग थोड्या वेळाने काही झालेच नाहीये असे दाखवत अण्णांना जेवायला वाढायची. त्या काळानुसार नानींना चार अपत्ये होती. सुना, जावई, नातवंडे अगदी नातसुना, पणतू , पणती सुद्धा होते... त्या घरात येणारा प्रत्येक माणूस केवळ नानीच्या प्रेमाखातर आणि शक्यतो अण्णा बाहेर पडलेत किंवा झोपलेत असे पाहून यायचा.मी माहेरी गेले आणि नानींची चक्कर झाली नाही असे कधीही झाले नाही... माझ्या मैत्रिणीची आजी आणि माझ्या आजीची मैत्रीण असे दुहेरी नाते असल्याने नानी यायच्या,चार समजुतीच्या संसारी गोष्टी सांगायच्या.. म्हणायच्या,


"तुम्ही हल्लीच्या मुली कशा ग? कुणाशीच कसे जमत नाही तुमचे..?"


नानींना नवरा कमी की काय असा सासुरवास होता... त्यात सावत्र सासू म्हणजे दुस्वासात भरच....कदा बोलता बोलता त्या म्हणाल्या,


"दूध उतू गेलं म्हणून उलथने तापवून चटका दिला सासूबाईंनी..."


बापरे! माझ्या अंगावर सरसरून काटा आला, मी रागानेच म्हणाले,


"कश्याला केले हो तुम्ही हे असले संसार? सोडून निघून जायचे सरळ...."


माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत नानी म्हणाली,

"कुठे?.. कुठे निघून जायचे?? माझे वडील जमदग्नीचा अवतार तुमचे अण्णा परवडले."


देवा रे !या मनुष्याहून अधिक संतापी प्राणी पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे?? कमाल आहे.. नानी पुढे म्हणाली,..


"अण्णा तसे मायाळू आहेत ग! फक्त त्यांचं  बिनसलं की बिनसतं... मनात दाटलेला सगळा राग काढतात कुणावर तरी... जसे सापाला देवाने विष दिलंय तसा ह्यांना संताप... त्यात त्यांचा तरी काय दोष."


आम्ही सगळ्या उपस्थित आबालवृद्ध स्त्रियांनी नानीपुढे दंडवत घातला... काही भारतीय स्त्रिया त्यांचे मंदीर बांधावे इतक्या महान असतात, नानी त्यातलीच एक.


          या वेळी मी माहेरी गेले तेव्हा नानी आजारी असल्याचे कळले आणि मीच त्यांना भेटायला गेले. अण्णा नव्वदी पार केलेले पण अजूनही सत्तरीचे वाटत होते... नानी मात्र गलितगात्र होऊन अंथरुणाला खिळली होती... तिच्या इवल्याश्या देहात असलेलं सगळं चैतन्य एकवटून ती नेहमीसारखी गोड हसली. आता चित्र अगदीच पालटले होते... अण्णांचा भित्रा ससा झालेला मी पहिल्यांदा पाहिला. काय झाले कसे झाले? चौकशी होईपर्यंत अण्णा चक्क सरबताचे दोन ग्लास भरून पुढ्यात उभे, मी भूत बघितल्यागत अविश्वासाने पाहत होते. अण्णा मृदू आवाजात म्हणाले,


"तुझ्यासोबत तरी घेईल ती थोडेसे.. दोन दिवस झाले जेवण जात नाहीये.."


अण्णांच्या डोळ्यांत पहिल्यांदा मी पाणी पाहिलं... मग आम्ही नानींना थोडे बसते केले... पाठीला भराभर जाऊन अण्णांनी मऊ उश्या लावल्या... आणि चमच्याने सरबत पाजू लागले.  नानींनी क्षीण आवाजात विचारले,


"तुम्ही घेतलं का? अग बी पीची गोळी असते ह्यांना, अजिबात लक्ष देत नाहीत स्वतःकडे, उद्या मी गेल्यावर कसे होणार ह्यांचे??"


बास ! नानींचे ते शब्द ऐकले आणि अण्णा लहान मुलागत धाय मोकलून रडू लागले... नदीच्या प्रवाहाने पहाड खचताना मी पहिल्यांदाच पाहत होते. हात जोडून थरथरत म्हणाले,


"ऎकलंस ना! कसं बोलते पहा ही... ही निघून गेली तर माझं काय होईल? कसा जगू मी? सवय झाली होती ग आयुष्यभर मी संतापायचं आणि हिने सावरून घ्यायचं, कुणी कुण्णी नसतं ग माझ्यासारख्या फाटक्या तोंडाच्या माणसाचं... "

अण्णा डोळे पुसत आतल्या खोलीत निघून गेले.


 नानी पुन्हा गोड हसत मला म्हणाली,

"बघा तुमचे अण्णा?? मी आजारी पडले आणि लहान मुल झालेत अगदी सतत उशाशी बसून असतात, कसला कसला जप करतात, माझं सगळं करतात... कधीतरी मांडीवर डोकं ठेऊन म्हणतात... तुम्ही जाऊ नका हो!... आता कसं व्हायचं बाई ह्या माणसाचं? म्हणून माझाही जीव सुटत नाही.."


          माझे डोळे माझ्याही नकळत ओसंडून वाहत होते. नानी त्या जीवघेण्या दुखण्यातून पुढे बऱ्या झाल्या... आणि अण्णा मात्र आयुष्याचा धडा शिकले. कदाचित खूप उशीर झाला होता पण देवाने त्यांना एक सुरेख संधी दिली होती.. हृदयातील हळवा कप्पा उघडून पाहण्याची. खरेतर, उतारवयात नवऱ्याला बायकोसारखी दुसरी सोबत नसते.. ती कधी आई होत सांभाळून घेते तर कधी मैत्रीण होत आयुष्य अधिक आनंदी करते... 'ती'च खरी सखी , खऱ्या अर्थानं अर्धांगिनी असते... फक्त एक खंत वाटते की हे कित्येक पुरुषांना खूप उशीरा कळते. फार उशीर होण्यापूर्वी एकदा आपल्याही मनाचे असे काही कुलूप घातलेले बंद कप्पे असतील तर ते जरूर उघडून पहा.... तिथे खजिना नक्कीच सापडेल.

✒️ यशश्री रहाळकर







मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

कोsहम् ?


         स्नेहल दोन महिन्यांपूर्वीच सोळा वर्षांची झाली होती.तिच्या बरोबरीच्या मुली केव्हाच वयात आल्या होत्या. हल्ली मुली अगदी बाराव्या तेराव्या वर्षीच वयात येतात. एका दृष्टीने स्नेहलच्या आईला... सीमाला हे बरेच वाटत होते. बाराव्या वर्षी कुठे काही जाण असते हो देहाची? आणि तसेही काही मुली उशिराच वयात येतात... अशी स्वतःची समजूत घालून घेत सीमा निश्चिन्त होती...  मात्र सीमाची धाकटी लेक सोनलची मासिक पाळी सुरू झाली आणि आता मात्र सीमा जराशी चिंतेत पडली.. सोनल जेमतेम बारा वर्षांची... मोठ्या स्नेहलहून चार वर्षांनी लहान... तिच्या शरीरात भराभर होणारे बदल आईच्या चकार नजरेतून सुटले नाहीत. मात्र स्नेहलच्या बाबतीत कसलेच चिन्ह दिसेना, एका कळीचे फूल होण्याच्या प्रवासाची सुरुवात अजून झालीच नव्हती का? , ह्या काळजीने ग्रासल्यावर तिने हा विषय आपला नवरा... संकेतच्या कानावर जरा संकोचानेच घातला. संकेतने विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना लगेचच एका गायनॅकोलॉजिस्ट डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन दिली. सीमा आणि स्नेहल डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये बसलेल्या असताना त्यांच्या आयुष्यात हाच क्षण मोठे वादळ घेऊन येणार आहे , ह्याची जराही कल्पना त्यांना नव्हती.


     एक साधे सरळ आयुष्य जगणारी सीमा आपल्या छोट्याश्या चौकोनी संसारात खुष होती. नवरा संकेत शाळेत क्लार्क होता. दोघी लेकी ,मोठी स्नेहल दहावीत धाकटी सोनल सहाव्या वर्गात शिकत होत्या. फावल्या वेळात संसाराला मदत म्हणून सीमा शिवणकाम करायची... फार मोठी स्वप्ने नाहीत आणि जगण्याच्या फार गरजाही नाहीत....त्यांच्या लेकी आणि छोटसं घरकुल ह्यातच अवघं विश्व सामावलेलं होतं. सारं काही सुरळीत सुरू होतं पण दुधात मिठाचा खडा पडावा तसं काहीसं झालं.


         डॉक्टरांनी स्नेहलची प्राथमिक तपासणी केली आणि तिची सोनोग्राफी काढून आणायला सांगितले. दोनच दिवसांत पुन्हा मायलेकी रिपोर्ट घेऊन क्लिनिकला हजर झाल्या...  डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून सीमा भोवळ येऊन तिथेच पडली. संकेतला फोन करून बोलावून घेण्यात आलं... आणि डॉक्टरांनी त्यांना दोन दिवसांनी पुन्हा भेटून सविस्तर बोलायला सांगितलं.. सीमा दोन दिवस त्याच धक्क्यात होती. संकेतने शेवटी स्वतः डॉक्टरांची भेट घेण्याचा ठरवलं. डॉक्टरांनी शांतपणे स्नेहलचे सोनोग्राफीचे रिपोर्ट पुढे करत सांगितले,


"हे बघा मि. संकेत ... तुमच्या मुलीला स्नेहलला गर्भाशयच नाहीये... म्हणजे जन्मतः काही दोष घेऊन बाळ जन्म घेते त्यातलाच हा एक दोष आहे."


"अहो काय बोलताय काय डॉक्टर तुम्ही?? असे कसे असेल ? आमची स्नेहल अगदी नॉर्मल आहे .. इतके वर्षांत तिला कसलाही त्रास झालेला नाही."

संकेतला भर ए. सीत दरदरून घाम फुटला.


          स्नेहलच्या अजूनही काही तपासण्या करणे आवश्यक आहे. तिची केस प्रचंड रेअर आहे, अगदीच वेगळी आहे.. आपण एका डॉक्टरांच्या एक्स्पर्ट टीमलाच तिचे रिपोर्ट दाखवू ,असेही त्या डॉक्टरांचे म्हणणे होते. दरम्यान अजूनही कुणाकडे रिपोर्ट दाखवून सेकंड ओपिनियन जरूर घ्या.. असेही सांगायला त्या कचरल्या नाहीत. त्या त्यांच्या उत्तरावर ठाम होत्या... स्नेहलला जन्मजात गर्भाशय नव्हतेच. नशीबापुढे हताश झालेला संकेत जड पावलांनी घरी परतला... त्याची आणि सीमाची नजरानजर झाली आणि तिचा बांध फुटला...


"असे हो कसे झाले?? आजवर साधा ताप नाही आला कधी पोरीला... काहीतरी चूक झालीये डॉक्टरांची. आपण .. आपण दुसऱ्या डॉक्टरांना दाखवू."


          पुढे काही दिवस दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या डॉक्टरांचेही मत घेण्यात आले. तीन- चार वेळा आतून बाहेरून अशी स्नेहलची सोनोग्राफीही करण्यात आली... ह्या सगळ्या खटाटोपात सत्य बदलणार नव्हते स्नेहलला जन्मजात गर्भाशयच नव्हते. स्नेहल ह्या सगळ्यात बावरून गेली होती... आपल्याकडे काहीतरी नाहीये जे असायला हवं होतं एव्हढंच तिला कळलं. तिच्या पासून सत्य किती दिवस लपवून ठेवणार होती सीमा? शेवटी पुन्हा पहिल्याच डॉक्टरांना गाठून सीमाने पदर पसरला... 


"काहीतरी ट्रीटमेंट असेल ना हो डॉक्टर... काहीतरी करा.."

आईचा भाबडा आशावाद बोलत होता... एव्हाना तिने सगळ्या देवांना साकडं घालून झालं होतं.


डॉक्टरांनी शांतपणे सीमा आणि संकेतशी बोलायला सुरुवात केली..


"आता तुम्ही सावरले आहात असे गृहीत धरून सविस्तर बोलते.... एखादा अवयव जन्मजात नसेल तर तो आपण तयार करू शकत नाही पण हो काही केसेसमध्ये गर्भाशय रोपण यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे... तुमच्या मुलीच्या बाबतीत ती शक्यता पडताळून पाहण्यासाठी आणि अजून अधिक गुंतागुंतीच्या समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी आपल्याला अधिक तपासण्या कराव्या लागतील... तसेच तज्ञांचे मतही विचारात घ्यावे लागेल.."


आता फार काळ न दवडता, "डॉक्टर सांगतील तसे करूयात" , असे ठरवून दोघे घरी परतले. तिथूनच स्नेहलचा एक प्रचंड थकवणारा प्रवास सुरु झाला... गर्भ फलनाच्या वेळी गुणसूत्रांच्या ज्या जोड्या जुळतात त्यातल्या लिंगनिश्चिती करणाऱ्या गुणसूत्रांच्या जोडीत गोंधळ उडाला की असे होत असावे.... पुढे तीन महिने विविध तपासण्यांचा आणि रोज कुणातरी वेगळ्या डॉक्टरांना भेटण्याच्या चक्रातून स्नेहलची अखेर सुटका झाली. 


          डॉक्टरांच्या एका ग्रुपने स्नेहल आणि तिच्या आईवडिलांसह एक सेशनच घेतले. त्यातल्या तज्ञांच्या मते, स्नेहलची केस जनुकीय अभ्यासकांसाठी एक कोडेच आहे. जगभरात अश्या जवळपास पाच हजार केसेस आहेत ज्या स्त्रियांना जन्मजात गर्भाशयच नाही. बाकी त्यांचे आयुष्य वयात येण्याच्या टप्प्यापर्यंत नॉर्मल होतं. MRKH अर्थात Mayer-Rokitansky-Kuster-Hauser snydrom असे तिच्या समस्येचे क्लिष्ट नाव होते. ह्यात प्रामुख्याने बाह्य अवयवांची वाढ नॉर्मल होत असली तरी शरीरांतर्गत अवयव अविकसित राहतात किंवा नसतातच. हा एक प्रकारचा जेनेटिक डिफेक्ट असून त्याच्या जोडीला एखादी किडनी सुद्धा अविकसित अर्थातच निरुपयोगी असण्याचा धोका असू शकतो. स्नेहलच्या बाबतीत दोन्ही किडनी उत्तम काम करत होत्या पण तिची समस्या त्याहून क्लिष्ट होती. Intersex प्रकारातील 46,XY  असे तिचे मेडिकल भाषेतील निदान होते. अगदी सहज सोप्या भाषेत सांगायचे तर ती अर्धी स्त्री अर्धा पुरुष होती... बाह्य इंद्रिये स्त्री सूचक असली तरी अंतर्गत पुरुष इंद्रिये अविकसित अवस्थेत होती. तिला ओव्हरीज अर्थात अंडकोष नव्हतेच तर त्या ऐवजी अविकसित टेस्टीज , वृषणकोष होते... ही अशी  जनुकीय दोषांची केस काही कोटींत एखादीच ... तिच्या जनुकीय रचनेचा अभ्यास करणे शास्त्रज्ञांना खूप महत्वाचे ठरणार होते. त्यासाठी पालकांची परवानगी मिळावी म्हणून सगळे प्रयत्नशील होते.


सेशनमध्ये डॉक्टरांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणाऱ्या सीमाचा शेवटी कडेलोट झाला...


"केव्हाची ऐकतेय मी केस केस , असं संबोधता आहात तुम्ही माझ्या मुलीला. तुमच्यासाठी ती फक्त एक केस असेलही, एक नंबर पण त्याआधी ती जिवंत माणूस आहे हे तुम्ही लोक बहुदा विसरले आहात."


तिच्या संतापापुढे सगळेच जरा वरमले. .. संकेत बापाच्या मायेने विचारता झाला....


"बाकी ती एक निरोगी आयुष्य जगू शकेल ना डॉक्टर..?"


          डॉक्टरांनी होकारार्थी मान हलवली आणि ते दोघे स्नेहलला घेऊन घरी परतले. एक लढाई नशीबासोबत ते पराभूत होऊन आले होते... दुसरी लढाई समाज नावाच्या राक्षसाशी बाकी होती. सगळे मेडिकल इथिक्स बाजूला ठेवून क्लिनिकच्या स्टाफ पैकी कुणीतरी नाव फोटोनिशी "जेनेटिकल चमत्कार" अश्या सवंग मथळ्याची बातमीच छापून आणली. आता जे काही होणार होतं ते ह्या जेनेटिकल दोषापेक्षाही भयंकर होतं.


          चारचौघात सहज लपून जाईल अशी स्नेहल अचानक चर्चेचा  विषय बनली. आडून आडून चौकशी करणारे शेजारी आता थेट घरात घुसून सांत्वन करू लागले. संकेतलाही कामाच्या ठिकाणी अनंत प्रश्न पडलेल्या लोकांना तोंड द्यावे लागे... त्या सगळ्यांचे साधे सरळ आयुष्य ढवळून निघाले. कुणी तिची कीव करत होतं तर कुणी टिंगल. रोज सोबत शाळेत जाण्याऱ्या, एका बेंचवर बसणाऱ्या मुलींच्या आईंनी त्यांना स्नेहलशी मैत्री तोडायला सांगितली... बिचाऱ्या स्नेहलला तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागत होता. तिचे भविष्य आता काय ह्या वंचनेत अखंड आईबाबा बुडालेले असायचे , त्याचाही उगाचच एक अपराधी चरा तिच्या काळजावर खोलवर उमटून गेला. आपण नेमके कोण आहोत.. एक स्त्री की एक पुरुष? असा प्रश्न सतत त्या पुरत्या वयातही न आलेल्या मुलीला सतत बेजार करत होता. एकदा शाळेतील मुलींच्या वॉश रुम्सच्या भिंतीवर कुणा टारगट मुलाने ,


"स्नेहल कोण आहे ती की तो?" 


असे खरडून ठेवले आणि तशीच धावत स्नेहल घरी आली. आईच्या मांडीवर स्वतःला झोकून देत कितीतरी वेळ ती रडत होती. तिला कुशीत घेऊन स्नेहलही रडत होती. दुसऱ्या दिवशी एक किन्नरांची टोळी त्यांच्या दारात उभी होती, "ती आमच्यापैकी आहे तिला आमच्या सोबत पाठवा." अशी गळ ते घालू लागले. त्यांचे ते बीभत्स हावभाव आणि टाळ्या बघून स्नेहल भीतीने पांढरी पडली, दुसऱ्या दिवशी तिला सणसणून ताप भरला. सोळा वर्षांचा कोवळा जीव सहन तरी किती करणार? 


           दोन चार दिवस होत नाही तोच एक सो कोल्ड सोशल वर्कर टी व्ही रिपोर्टर आणि कॅमेरा घेऊनच हजर झाले... त्यांना स्नेहलची मुलाखत घ्यायची होती... तिला तिचे जेंडर लिंगभाव निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, ती हवे तर पुरुष होणे स्वीकारू शकते तश्या प्रकारच्या लिंग बदल शस्त्रक्रियेला त्यांची NGO मदत करेल असे काहीबाही ती बरळत होती.


            सीमाने काडकन तिच्या मुस्काटात ठेऊन दिली, आजवर रोखून धरलेल्या सगळ्या हतबलतेचे, निराशेचे रागात रूपांतर झाले होते. स्नेहलला पोटाशी धरत प्रचंड संतापाने ती किंचाळली..


"काय हवंय तुम्हाला ? काय हवंय काय? आता तिचे प्रदर्शन टी व्ही वर मांडायचे आहे का? घ्या काढा फोटो. अरे तुमच्यापेक्षा गुरं बरे रे! एखादे लंगडे वासरू सहज सांभाळून घेतात आणि तुम्ही नावालाच माणसे ... गिधाडे आहात गिधाडे... किती टोचाल ?  किती चोची माराल? नशिबाने आधीच  पाचर मारलेल्या ह्या जीवाला.. कुणी म्हणत प्रयोगाला द्या, कुणी म्हणत मुलाखत द्या... अरे माणूस तरी समजता का तुम्ही तिला??"


सीमाला धाप लागली होती पण ती थांबली नाही ,

"काय फरक पडतोय ती स्त्री आहे की पुरुष की आणखी कुणी.. ? त्या आधी माणूस आहे ना ती.. पिल्लू आहे माझं ते.. हात जोडते मी जगू द्या तिला ..आम्हाला एकटं सोडा."


सीमा धाय मोकलून रडू लागली.


किती अजब असतो ना आपण माणसे... 

आपलं 'तो' किंवा 'ती' कुणीतरी असण्यापेक्षा "माणूस"  असणं आपल्यासाठी इतकं बिनमहत्वाचं का असतं ?

✒️ यशश्री रहाळकर