फॉलोअर

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

वाटणातील खोबरं


दर महिन्याच्या भिशीला भेटलं ना की काहीतरी भन्नाट मजेशीर खेळ शोधून काढलेला  असतोच... कधी तोंडात चमचा धरून साबुदाणा भरायचा, कधी स्ट्रॉ केसात खोचायच्या , कधी गाढवाला शेपूट काढायचं तर कधी "मी बाई सुंदर मी बाई बंदर" म्हणत खुर्च्यांवर ऊठबस करायची.  कधी हौजी ची हौस तर कधी बेसूर अंताक्षरी... सगळी धम्माल मस्ती. गेल्या महिन्याच्या भिशीत असाच एक खेळ रंगला... स्वतःला एका पदार्थातून व्यक्त करायचं... म्हणजे मी  स्वभावाने अमुक एका पदार्थासारखी आहे असं सांगायचं. कुणी कुणी स्वतःला काय काय समजतात ??☺️ बाई बाई ग! एक गोड पदार्थ सोडला नाही. कुणी स्वतःला चॉकोलेट केक म्हणाले, कुणी बर्फी , कुणी स्वतःला जिलबीची उपमा देत वरून कडक भासत असली तरी आतून कशी मधुर आहे हे सांगितले. गोरीगोमटी उज्वला स्वतःला रसगुल्ला म्हणाली तर श्यामला कशी मागे राहिल ? आपण कसे गुलाबजाम आहोत नुसत्या रंगावर जाऊ नका .. काळजात कसा गोडवा बाळगून आहोत असे रंगवून सांगितले.. फटकळ हेमाने स्वतःला झणझणीत ठेचा संबोधले तर पल्लवीने आपण भातासारखे आहोत असे सांगत सगळ्यांना कसे हवेहवेसे वाटतो ह्याचे रसरशीत वर्णन केले. कुणी स्वतःला पोळी संबोधत सगळ्या ग्रुपचे माझ्यावाचून अडते हे घोटून घोटून सांगितले तर कुणी साजूक तूप होत निर्मळ पणाचे झेंडे मिरविले. सरते शेवटी माझ्या उत्तरासाठी सगळ्यांनी कान टवकारले... मी म्हणाले " मी वाटणातील खोबरं आहे."... क्षणभर अशक्य शांतता पसरली... माझे उत्तर अनपेक्षित होते पण नेमके समजलेही नसावे बहुदा... मला नेमकं काय म्हणायचंय ? हे ऐकण्यात सगळ्यांनाच उत्सुकता होती.

मिरची कोथिंबीर जिरं खोबरं..... गेला बाजार ,खोबरं लसूण आलं असं मिक्सरमध्ये फिरवलंय का कधी??.. ह्या वाटणाची एक गंमत असते. कितीही फिरवा एक द्वाड खोबऱ्याचा तुकडा आहे तस्साच राहतो ... आपण ते वाटण काढायला गेलो की वर मुजोरी करत आपल्याला खुन्नस देत उभा ठाकतो... मला त्या वाटणातील खोबऱ्याचं प्रचंड कौतुक आहे . . मानलं राव! माणसानं अगदी असंच असावं. मी नेमकी कशी आहे ? ह्या प्रश्नाच उत्तर जर पदार्थ असेल तर मी वाटणातील ते खोबरं आहे. मला लोकांची जिरवायला जाम आवडतं... घमेंड, माज, गर्व असणारे  मिरची सारखे लोक, फुकटचे सल्ले देणारे कोथिंबीरीसारखे अनावश्यक लोक, जिऱ्यासारखे तडतड फुटणारे लोक आणि लसणीच्या गुणधर्माचे कुजकट लोक अवतीभवती कितीही असू द्या .. मी आपली ताठ मानेनं उभी असते... अर्थात काही लोक ह्याला निलाजरेपणा किंवा निगरगट्टपणा देखील म्हणतात... म्हणू देत बापडे! "मला त्याचे काय?" मी वाटणातील ते खोबरं आहे ज्यावर कुजकट टोमणे, खवचट टीका, कुत्सित शेरे ह्यांनी कितीही कुटलं तरी "हम जैसे थे।" असणार 👍... हे असं वाटणातील खोबरं असणं फार सोप्पय असं वाटतंय का ? अजिबात नाही हं!... असं व्हायला बरेच धडे गिरवावे लागतात.... अगदी घोटून घोटून.... आणि गंमत म्हणजे ते धडे ज्याचे त्यानेच गिरवायचे असतात... कुणाच्या अनुभवाचा उपयोग शून्य..0 

पूर्वी माझ्या आयुष्यात विविध भूमिकांत येणाऱ्या माणसांचे 2 सरधोपट गट होते ... गट पहिला... ह्यांच्याशी आपलं जमू शकतं, पटू शकतं , ok गट... आणि दुसरा... नको रे बाबा ! टाईप कटकट नको वाटणारा गट. ह्यामुळे गफलत अशी व्हायची की मी ज्यांना विनाकारण टाळतेय अश्या लोकांची यादी हळूहळू वाढू लागली....ती इतकी विस्तारली की अश्याने मला पृथ्वी सोडून दुसरा ग्रह पाहण्याची वेळ यावी. मग मी ह्या नको रे! गटाचे मस्त वर्गीकरण केले... सहन करता येण्याजोगे आणि अजिबात सहन करता येणार नाहीत असे... आता सहन करता येण्याजोगे जे कुणी लोक आहेत त्यांच्याशी मी डील करायचं ठरवलं... आणि येस..😊 हेच मला स्ट्रॉंग..अधिक स्ट्रॉंग करत जाणारं होतं. ह्या गटात असणाऱ्या लोकांची खरंतर मी ऋणाईत आहे... ही असली माणसं आपल्या सुखी जीवनाचा आरसा असतात. "टोमणे मारणारा माणूस वाईट नसतो मनानं... किंवा फुकटचा सल्ला देणारी माणसं आपल्याला काय नक्की करायचं नाही हे सांगतात..." ह्या आणि अश्या अशक्य ब्रम्हज्ञानाची प्राप्ती मला ह्याच कल्पवृक्षाखाली झाली.😂

आता थेट उदाहरणावर उडी घेत सगळं मस्त स्पष्ट करून , उलगडून सांगते. आपण ज्या समाजात जगतो तिथे बहुतेक लोक स्वतःचा आनंद दुसऱ्याशी तुलना करून शोधतात. एखादी गोष्ट आपल्याकडे आहे आणि दुसऱ्याकडे ती नाही हाच बहुतांश लोकांसाठी आनंद देणारा मार्ग असतो.  कुणीतरी आपल्या समस्या घेऊन गळे काढले की त्यांना ह्या सकल मानव जातीत मीच सुखात असल्याचा कैफ मिळतो... ह्या कैफाची धुंदी हळूहळू चढत जाते आणि माणूस मग केवळ चादरीचे फाटके छिद्र शोधत बसतो. तुम्ही तद्दन गळेकाढू प्रकारातले नसाल, आनंदी मज्जेत असाल तर ह्या तुमच्या सुखाच्या फुग्याला पिन टोचणे आणि वर उडणाऱ्या तुम्हाला धापक्कन जमिनीवर पाडणे हे त्यांचे आद्य कर्तव्य असते... हे लोक "भोत हार्ड" असतात तुम्हाला साक्षात्कार न झालेले अनेक दोषांचे दर्शन ते सहजी तुम्हाला घडवतात . त्यांच्या कुटील कारस्थानांमुळे तुम्हाला घंटा फरक पडत नाही हे एकदा कळलं की मग ते मुकाट बसतात. अशी माणसं जरूर संग्रहात असावी , तुम्ही आतापावेतो दुर्लक्ष केलेल्या अनेक ईश्वरीय देणग्यांचा साक्षात्कार तुम्हाला ह्यांच्याच माध्यमातून होत असतो. 

मी सहासात वर्षे नोकरी केल्यानंतर काहीही न करण्याचा निर्णय घेतला... माझा मीच... आणि मस्त मजेत आयुष्य एन्जॉय करू लागले. एका स्नेह्यांकडे काही कामानिमित्त गेले असताना... "गृहिणींची अवस्था कशी वाईट असते. त्यांना खर्चासाठी पैसे देतांना नवरा कशी कटकट करतो, मुले न कमावत्या आईचा कसे अपमान करतात वगैरे वगैरे" ताईंनी मला चहा पोहे करून संपवेस्तवर तासभर ऐकवले. घरी परतेपर्यंत मी खरंच ह्या मुद्द्याचा सखोल विचार केला... आणि .. आणि खरंच की !... मला जाणवलं माझ्या कुटुंबाकडून मला मिळणारं प्रेम, मिळणारा आदर तसाच होता मी नोकरी करतानाही आणि सोडल्यावरही... बरं! नाथांनी कुठल्याही हातखर्चात कपात केली नव्हती.... कित्ती नशीबवान होते मी ! जे मला एव्हाना कळलं सुद्धा नव्हतं. मी मस्त रात्रीच्या जेवणात खीर केली. एका डब्यात घालून ताईंनाही आवर्जून नेऊन दिली आणि त्यांचे मनापासून आभार देखील मानले...🙏 

आपलं प्रत्येकाचं आयुष्य काहीतरी देणग्या घेऊन येतं आणि जोडीला उणीवा सुद्धा असतातच. फक्त आपण समोर पाहत असल्याने समोरच्याच्या देणग्या पाहून हरखून जातो... स्वतःकडे नेमक्या त्या देणग्या नसल्या तर दुःखी होतो आणि स्वतःतल्या उणिवांना कोसत बसतो... कधीकधी अशक्यप्राय उठाठेवी करतो, उदास होतो, नैराश्याकडे वळतो. एक कायम लक्षात घ्यायला हवं की आपल्या समोर मांडली गेलेली गुडीगुडी बाजू अर्धवट असते...  

"लॉक डाऊन नंतर इतकी घरकामांची सवय झालीये ना,  की मी कामवाली बंदच केली. झटपट तासाभरात लादी, पोछा आणि भांडी होतात शिवाय हाती काम ... काय स्वच्छ आरश्यासारखी चमकतात भांडी."

असं रंगवून सांगणाऱ्या तिच्या शिक्षक नवऱ्याचा पगार लॉक डाऊन मध्ये निम्म्यावर आलेला असतो आणि ती कशीबशी संसार रेटत असते.. हे सत्य मात्र कधीही कुणी मांडत नसतं. मग तिच्या चमचमत्या भांड्यांना भुलून आणिक एक दोघी कामवाली बंद करतात... पैकी एकीला पाण्यात अखंड काम करून न्यूमोनिया होतो आणि दुसरीला स्लीप डिस्कचा त्रास इतका उमळतो की उठता बसता धड येत नाही. "काय भुललासी वरलिया रंगा" म्हणतात ना ते हेच..👍 15 किलोमीटर सायकल चालवणारे, दोन तास जॉगिंग करणारे कितीही आदर्शवत वाटत असले तरी त्यांनी हे रात्रीतून केलेलं नसतं . दोन तीन वर्षांपूर्वी शून्यापासून सुरुवात करत आज हा टप्पा गाठलेला असतो... बहुतेक स्त्रिया फक्त 15 किलोमीटर लक्षात घेतात आणि गुडघे मोडून घरी बसतात. तुलना आणि अनुकरण प्रियता तुमच्या सुखाला/ आनंदाला काडी लावल्याशिवाय आणि पुढे तुमचं चांगलं नुकसान केल्याशिवाय थांबत नाहीत. तुम्ही कितीही आणि कसेही बदल केलेत तरी लोक तुमच्यातलं वाईट शोधणार आणि तेव्हढंच अधोरेखित करणार, हे कायम लक्षात घ्या. आज तुम्ही जाड आहात हे ते सांगणार, मग तुम्ही डाएट करकरून खपताड झालात की गालांची हाडं किती वाईट दिसताहेत, हे सांगणार,... नंतर डोळ्यांखालची काळी वर्तुळं दाखवणार, नंतर तुम्ही कश्या प्रेझेंटेबल नाही हे दाखवणार, ह्या सगळ्या गदारोळात स्वतःला तुम्ही पूर्ण लक्ष देता आहात हे लक्षात आल्यावर तुमच्या मुलांचे कमी पडलेले मार्क्स दाखवणार... तुमचे मुलांकडे किती दुर्लक्ष होतंय हे दाखवणार.... ही लिस्ट न संपणारी आहे.सरतेशेवटी काही वर्षांपूर्वी तुम्ही कित्ती आनंदी,हसतमुख, गोड होतात हे चार जणांजवळ गळे काढून रडणार😢....तुमचं आयुष्य म्हणजे एस टी आहे का ? कुणीही यावं आणि बसची दिशा ठरवावी??? म्हणूनच वाटणातलं खोबरं व्हायचं..👍😊 कुणी कित्तीही प्रयत्न केले तरी आपण बदलायचं नाही , तोपर्यंत.. जोपर्यंत स्वतःला काही बदल करावेसे वाटत नाहीत.

न मागता फुकटचे सल्ले देणारे काही मूर्ख लोक आजूबाजूला असतात ... ते सतत तुमच्या समोर सोशल मीडियावरील अर्धवट ज्ञान पाजळत सल्ले देत असतात.

"सकाळी उठून दालचिनीचे पाणी उकळून पी"

"रात्री पुदिना आणि कोथिंबिरीची एक जुडी वाटून पाण्यात उकळ , निम्मे आटवून ते पाणी पी."

"जिरे मिरे ओवा पावडर घे..." 

हे आणि असले कित्येक सल्ले शांतपणे कानाआड करता यायलाच हवेत. आपण काय कुणाच्या प्रयोगशाळेतील उंदीर आहोत का?? फार झाले तर तिथल्या तिथे झापताही आलंच पाहिजे. तुम्ही तुमच्या नवऱ्याशी कसं वागावं? सासूशी कसं जमवून घ्यावं? हे जगातील कुणीच तुम्हाला सांगूच शकत नसतं... अश्या खाजगी विषयांत उगाच कुणी नाक खुपसलं तर त्याच्या नाकाचा शेंडाच उडवून टाका...😂 👃 अर्थात,  एकदाच गप्प करून कायमचा बंदोबस्त करून टाका. स्वतःची स्पेस जपता यायला हवी आणि स्वतःचा आत्मसन्मान सुद्धा 👍कुणीही यावं आणि काहीही म्हणावं एव्हढं स्वस्त स्वतःला का करायचं?? 

दुसऱ्या बाजूला स्वतःचे क्षुल्लक प्रश्न जगजाहीर करून रडत बसू नका... कधीकाळी नवऱ्याने नोकरी सोडायला लावली म्हणून वर्षोनुवर्षे रडत बसणारी महान स्त्री मी पाहिली आहे... त्यामुळेच ती स्मार्ट झाली नाही असे तिला उगाच वाटते... ह्या घटनेला 19 वर्षे उलटून गेले अजूनही ती नित्यनेमाने नोकरी sss म्हणत गळे काढते. बायकांचा आवडता छंद म्हणजे सतत आपल्या अपयशाचे खापर घरातल्या कुणावरी तरी फोडत रहायचं... नोकरी केली नाही कारण नवऱ्याला चालत नव्हतं, चार लोकांत मिसळत नाही कारण सासूबाईंना आवडत नव्हतं, पुढे शिकू शकले नाही कारण मुलांचे जन्म ... ह्या आणि अश्या कित्येक गोष्टींत घरच्यांना जबाबदार धरणं बंद करा. त्या क्षणी तो निर्णय तुम्ही स्विकारला ह्याचाच अर्थ तो तुमचा झाला. मी....आईच्या मैत्रिणीच्या आईला वयाच्या 76 व्या वर्षी  PhD करतांना पाहिलंय, interview घेणारेही नतमस्तक झाले आजींपुढे... माझ्या एका आत्याने मुलासोबत मॅट्रिकचा फॉर्म भरला आज ती ग्रॅज्युवेट आहे, 50 व्या वर्षी स्वतःचा उद्योग सुरू करून दहा बायकांना रोजगार देऊन तो यशस्वी करणाऱ्या ताई मी पाहिल्या आहेत, तान्ही बाळे घेऊन कॉम्पिटीटीव्ह एक्झाम देणाऱ्या कित्येक जणी मी नेहमी पाहते, बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या गर्भवती स्त्रियांचं मला जाम कौतुक वाटतं... रडणं आणि लढणं ह्यापैकी कशाची निवड करणं जास्त महत्वाचं आहे हे जिचं तिचं ठरवते.

मला कुजकटपणे बरेचदा विचारणा होते..
"अग! तू लिहितेसपण, नवीन पदार्थ सुद्धा करून बघतेस आणि रांगोळ्यासुद्धा काढतेस... कसा काय बाई वेळ मिळतो??"

ह्यात कौतुक नसून टोमणा आहे हे लक्षात आलं की मी अगदी गोड आवाजात नम्रपणे सांगते...

"मलाही दिवसाचे 24 तासच मिळतात ग! कित्ती वाईट ना ?? I know...! माझ्यासारख्या सतत काहींना काही करणारीला खरंतर देवाने दोन तास जास्त द्यायला हवेत नाही का??  तसं काही झालंच तर तू दुपारभर झोपा काढतेस किंवा फालतू सिरियल्स/ डेली सोप पहातेस तो वेळ मला देशील का ग?"
Savage answer! Clean bold... पुन्हा ती आगाऊ बया माझ्या नादाला लागत नाही.

माझ्या लेकिसोबत नर्सरीपासून असणाऱ्या मुलांच्या आईंचा एक छान ग्रुप झाला आहे. जवळजवळ सात आठ वर्षे आम्ही एकमेकींना ओळखतो... पैकी काही जणींना 2 मुले आहेत... सतत प्रत्येक विषयावर मला , "तुझं बरं आहे बाई एकच आहे. आम्हाला दोघांचा खर्च, दोघांना शाळेत न्या आणा, दोघांचा अभ्यास , दोघांची परीक्षा... " वगैरे दोनाचे पुराण ऐकवायच्या... माझ्याकडून मी दुर्लक्ष करून पाहिले पण मग हे थांबेचना ! मी अगदी छान थट्टेच्या सुरात म्हणाले ,

"तू तर अशी ऐकवतेस जसं काही माझंच पोर तुझ्या ओटीत टाकलंय... तुझंच बाळ आहे तुलाच बघायला लागणार. दुसरं मूल जन्माला घालतांना त्यालाही शाळेत टाकावे लागणार ह्याचा विचारच केला नव्हता की काय??"

सगळ्यांनी दात काढल्यावर ती जरा वरमली आणि म्हणाली...

"मला नकोच होतं ग दुसरं... सासूबाई म्हणाल्या म्हणून... तुझं बरं आहे बाई तुझ्या सासूबाई काही म्हणत नाही."

हे फार झालं हं ! आता माझ्या सासुवर घसरल्याने मी गप्प बसलेच नाही...

"तुझं अकाउंट कोणत्या बँकेत आहे ग ?"

"XYZ... का ग??"

"सासूला विचारून काढलंस?? त्यात किती fd करू विचारतेस का सासूला?? मुलांना कोणत्या शाळेत घालायचं  कुणी ठरवलं?? आज भाजी काय करू? सिनेमाला जाऊ का? हे सगळं तुझ्या सासूबाईच ठरवतात वाटतं." 

मैत्रीण गप्प ! एक भयाण शांतता आणि मी वाटणातील निगरगट्ट खोबरं खुन्नस देत उभी...😆 मैत्रीण गार. सासू हा माझा अतिसंवेदनशील विषय समजून पुन्हा कुणीही माझ्या सासूच्या वाट्याला गेली नाही. 

"मी ईश्वराची एक awesome निर्मिती आहे" हे किती जणींना मान्य आहे.  आपल्या सारखं कुणी दुसरं नाहीच... किती छान गोष्ट आहे ही..  आणि आपण मात्र सतत दुसऱ्या सारखं होण्याचा मूर्ख प्रयत्न करत रहायचं , ह्यासारखं दुर्दैव दुसरं नाही. मी आहे तशी मला आवडते हे ज्या क्षणी वाटेल तो खरा माणूस म्हणून जगण्याचा पहिला दिवस असेल. "चिकन सूप फॉर विमेन्स सोल" नावाच्या पुस्तकात एका अनामिक लेखकाची लघुकथा फार पूर्वी वाचली होती. एक सर्वसामान्य म्हणावे अशी मुलगी स्वतःला कायम धिक्कारत असते, मी सुंदर नाही, चवळीची शेंग नाही,  हुशार नाही, मित्र नाही, कुणी प्रपोज करत नाही अशी तिची नकाराची बरीच कारणे असतात. चारचौघींसारखी लग्न होऊन संसार करायला लागते... पुढे मातृत्वाची चाहूल लागते... ज्या क्षणी ती ..तिची इवलीशी लेक तिच्या ओंजळीत घेते त्या क्षणी तिला साक्षात्कार होतो आपलं शरीर किती सुरेख आहे, इतक्या छान गोंडस, निरोगी बाळाला ते जन्म देऊ शकलं, ह्याहून देखणं जगात दुसरं काय असेल? "My daughter teaches me many things. First and foremost important is Love yourself."... हे वाक्य मी आजही हृदयावर कोरून ठेवले आहे. प्रत्येकीने स्वतःवर सर्वात आधी प्रेम केलं पाहिजे, स्वतःच्या गुणदोषांसकट स्वतःला स्वीकारले पाहिजे.... कुणी सौम्यागोम्या उपटसुम्भ तुम्हाला बदलेल इतकं तकलादू असूच नये.👍 म्हणूनच मी "वाटणातील खोबरं " आहे... आणि मला त्याचा कमालीचा अभिमान आहे.😊 .. टीका, टोमणे, फुकटचे सल्ले ह्यांचे मी नेहमीच स्वागत करते...🙏😂 तुम्हाला चिडवणाऱ्या, रडवणाऱ्या समोर हसत-हसत ताठ मानेने उभे राहून तर पहा...त्याचा वैताग, त्रागा बघण्यात काय गंमत असते म्हणून सांगू
😆😍
✒️ यशश्री रहाळकर




बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१

सा.भा.रा.चे काय??


आमचं तसं अगदी कांदे-पोह्यांचं लग्न.. गुलाबी म्हणावेत असे फार काही दिवस अनुभवायला मिळाले नाही. मात्र लग्न ठरल्यापासून ते होईपर्यंत मधले काही दिवस खासम खास होते... आम्ही नेहमी ज्या रेस्टॉरंटला भेटायचो आणि ज्या कोपऱ्यातल्या टेबलवर बसायचो त्याच ठिकाणी काल नाथांनी मला नेलं..( 'नाथ' ही माझी आमच्या अहोंसाठी खास प्रेमाची हाक) व्हॅलेन्टाईन डे होता... Love is in the air... वगैरे म्हणतात ना तसलं फार भारी वाटत होतं. वेटरला फिल्टर कॉफीची ऑर्डर देऊन कटवला आणि आम्ही जुन्या आठवणींत रमून जाणार एव्हढ्यात .....
....
...
धs डांम! धुडू sमं!

बाजूच्याच टेबलवरील कुटुंबातील, अजून उत्क्रांतपूर्व अवस्थेत असणाऱ्या मर्कटसदृश्य मानव पिल्लाने धाडकन खुर्ची पाडली होती ... मग काय.....

फटाक ! ताsड ताsड! भ्या ssss

मातोश्रींनी श्रीमुखात दोन लगावल्या नंतर कारट्याने मोठ्यांदा भोकाड पसरलं...पुढे अर्धा तास ते जोडपं चाईल्ड सायकॉलॉजी आणि मुलांना कसे प्रेमाने वाढवायला हवे ह्या विषयावर कडाडून भांडत होतं.... म्हणजे अर्धा तास आम्ही कसेबसे तिथं होतो पुढे कदाचित भांडण अधिक रंगले असेलही. आम्ही मात्र सगळ्या सुंदर मूडचा फालुदा घेऊन मुकाट घरी परतलो...😢 असा किंवा ह्या सारखा अनुभव थोड्याफार फरकाने आपल्यातल्या प्रत्येकाला आला असणार. सार्वजनिक ठिकाणी त्यातही विशेषतः हॉटेलमध्ये लोक तीर्थरूपांनी वारश्यात दिलेले साम्राज्य असल्या सारखे का वागतात? हा प्रश्न हल्ली मला नेहमीच पडतो.

घरांतली आणि मनातली जागा अगदीच गरजेपुरती जेमतेम असल्याने हॉटेल किंवा रेस्टॉरंट/ कॅफे वगैरे हल्ली समाज जीवनाचे महत्वाचे केंद्र बनले आहे.... कुणीच हल्ली कुणाच्या घरी जात नाही ... बाहेरच कुठेतरी भेटू , असा अलिखित नियमच झालाय जणू काही. आता ह्या बाहेरच भेटण्यामागे लोकांचे वेगवेगळे हेतू असतात. सहज गंमत म्हणून मी आजवर हॉटेलमध्ये भेटणाऱ्या नमुन्यांची गटनिहाय विभागणी करून टाकली.

★आधी बसू मग ...★
खाण्यापेक्षा पिण्यात जीव अडकलेले हे झिंगाट जीव गियर पडेपर्यंत निरुपद्रवी असतात... एकदा त्यांचा मेंदू तल्लख झाला की मात्र ते बॉस, बायको, तिचा मित्र किंवा प्रेमभंग झाला असल्यास एक्स बद्दल अर्वाच्य शिवीगाळ करू लागतात... कधी कधी फुकटात करमणूक देखील होते पण बहुतेक वेळा आजूबाजूच्या सगळ्यांना मनःस्तापच होतो. ह्या गटात फक्त पुरुषांचं वर्चस्व आहे असा गोड गैरसमज मात्र करून घेऊ नका हं! बायका सुद्धा खंबे सहज रिचवून अनेक व्हरायटीच्या शिव्या देतात.

★फेकू नंबर 1★
तुमच्या शेजारच्या टेबलवर जर ह्या प्रकारचे अर्धवट, बिनडोक आणि दिडशहाणे असे त्रिगुणात्मक ट्रिपल शेजवान राईस सारखे लोक आले तर घरी जाऊन बाम लावून झोपावे लागणार हे निश्चित.. इन्शुरन्स एजंट किंवा मल्टी लेव्हल मार्केटिंगवाले असल्यास क्वचित प्रसंगी पेनकिलर सुद्धा लागू शकते.... हे लोक जे काही ज्ञान पाजळत असतात ते अखिल ब्रह्मांडासाठी गरजेचं असल्यागत मोठमोठ्याने ढणाणा सांगत असतात... रेस्टॉरंट मधील प्रत्येक व्यक्ती जणूकाही ह्यांचा भविष्यातील "बकरा" असते ...  हळूहळू त्यांचा आवेश इतका वाढतो की तुम्हाला;  'कानांना झाकण का नाही दिलेस बाबा ?'  असा प्रश्न देवाला विचारावा वाटतो.

★खादाड खाऊ★
रेस्टॉरंटमध्ये जाण्याच्या मुख्य उद्देश आयती खादाडी हाच आहे हे अगदीच मान्य पण काही लोक अश्या काही पद्धतीने खातात जणू दुष्काळातून उठून आले असावे... शेजारीच बसलेल्या कुणाला तरी आपल्या मचमचा आवाजाने, लडबडून खाण्याने किंवा बकाबका कोंबण्याने किळस वाटू शकते हे त्यांच्या गावीच नसतं. 

★सेलिब्रेशन★
वाढदिवस/ लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करण्याचे रेस्टॉरंट हे हक्काचे ठिकाण आहे.... मात्र काही लोकांचा जोश पाहून हा जगातील पहिलाच वाढदिवस असावा असे वाटते... लग्नाचा वाढदिवस असेल तरी एव्हढा आरडाओरडा , फटाके , टाळ्या नि गोंधळ असतो जेव्हढा प्रत्यक्ष लग्नातही नसेल बहुदा. कुणीतरी काही वर्षे लग्न टिकवले ह्यात आनंद असतो की आसुरी समाधान ?? 🤔😂 त्यांचं त्यांना ठाऊक... थाट तर असा असतो की अख्ख्या हॉटेलचे बिल हेच भरणार आहेत... मग ते केक तोंडाला फासण सुरू झालं की ह्यांच्या तीर्थरूपांनी वेळीच ह्यांच्या तोंडात ठेवून दिली असती तर.. असा क्रूर विचार माझ्या मनात येतो.

★किटी.. आणि कटकटी★
तुमचं नशीब अगदीच वाईट असेल तर रेस्टॉरंटमध्ये तुमच्या शेजारी किटीचा ग्रुप येऊन धडकतो... ह्या ग्रुप मध्ये स्वतःला षोडशा समजणाऱ्या चाळीशी ते पन्नाशीच्या काकवा असतात.  उगाचच मॉडर्न कपड्यात स्वतःचा न बसणारा देह कोंबून त्या जे फतकल मारतात ते चार तास उठत नाहीत. ह्या ग्रुपचे ध्वनी प्रदूषण एव्हढे असते की तिथून बाहेर पडल्यावरही तुमचे कान कित्येक तास वाजत असतात. ह्या ग्रुप मध्ये सगळे वक्ता असून कुणीच श्रोता नसते.. शिवाय प्रत्येक जण वेगवेगळे विषय हाताळत असते... त्यात वाद , कटकटी, न आलेलीची चुगली ह्या सगळ्या मसाल्याची खमंग भर पडते.
त्यात जर तुम्ही प्युअर व्हेज रेस्टॉरंटला असाल आणि "घुंघट का चाँद" टाईप बायकांचा ग्रुप असेल तर शांतता भलतीच महाग होऊन जाते. (तसा समझने वालोंको इशारा काफी है।... घरात अनेक बंधने असणाऱ्या घुंघट वगैरे तत्सम रूढी पाळणाऱ्या, फारसे स्वातंत्र्य अनुभवायला न मिळणाऱ्या) .. तर अश्या भगिनी अगम्य भाषेत, तारसप्तकात अक्षरशः किंचाळत असतात.. बरं तर बरं ... तुम्हाला त्यातले एक अक्षरही कळत नाही फक्त "पच पच"😆🤦

★कोपऱ्यातले राघू मैना★
रेस्टॉरंटमध्ये तुमच्या शेजारी समजा मस्त गुलाबी गुलछबू जोडपं बसलेलं असेल तर मज्जा येते... लग्न ठरलेलं, प्रेमिकांच, नवीन लग्न झालेलं, किंवा तत्सम जोडपं शक्यतो कोपराच गाठत... त्यांचा फार काही त्रास वगैरे होत नाही पण तुमच्या सोबत एखादे लहान मूल असेल तर मात्र गंमत येते... कितीही तिकडे पहायचं नाही असं बजावलं तरी ते आगाऊ कार्ट मोठ्ठ्याने , "आई ते बघ!👀 अव्वा!" करत किंचाळतच🙄... नेमका टेबलखाली पडलेला चमचा उचलायला टेबलखाली शिरतो आणि मग दोन दिवस नको त्या प्रश्नांना तुम्हाला सामोरे जावं लागतं. तुमच्या सोबत वयस्कर व्यक्ती असतील तर तुम्ही अख्ख्या वाया गेलेल्या, निलाजऱ्या तरुणाईचे प्रतिनिधी असल्यागत तुम्हाला वाट्टेल ते ऐकून घ्यावं लागतं.

★हम साथ साथ है।★
पंचवीस तीस लोकांचा फॅमिली ग्रुप बरेचदा हॉटेलमध्ये धडकल्यावर तुम्हाला बाजारात जेवायला बसल्याचा फील येतो... आधी हे लोक टेबलच्या जोडाजोडी करतात त्याचा प्रचंड आवाज वैताग आणणारा असतो.... मग ऑर्डर काय द्यायची ह्यावर वाद घालतात... मग सगळे तायाजी, जिजाजी, फुफाजी वगैरे उशिरा येणारे प्राणी उगवतात मग त्यांना जागा , मग खुर्च्यांचे आवाज देवा रे! कहर करतात. बरं उपस्थित 25 माणसे कमी की काय म्हणून अनुपस्थित एखाद्याला विडिओ कॉल लावला जातो मग प्रत्येकाच्या तोंडापुढे फोन नाचवत miss you पाय लागू वगैरे होतं... कधीकधी तर एव्हढं प्रेम ओसंडून वाहत असतं की डेलीसोपमध्ये प्रत्यक्ष शिरलोय असं वाटू लागतं.

★बा अदब बा मुलाहिजा★
काही लोक राजे महाराजांचे वंशज असल्यागत एन्ट्रीलाच घमासान सुरू करतात. सगळे वेटर हे त्यांचे खाजगी गुलाम आहेत असे मानून इतका घसाफोड करतात की एखादा गरीब वेटर चळचळा कापू लागतो... ह्यांना ताबडतोब ऑर्डर हवी असते, ते मीठ सुद्धा वेटरलाच वाढायला लावतात... शिवाय हे असंतुष्ट आत्मे अखंड सगळ्या पदार्थांना नावेच ठेवत असतात... ह्या हॉटेलपेक्षा दुसरे हॉटेलचं किती ग्रेट आहे हे सतत ऐकवत असतात... आजूबाजूच्या लोकांवर किती मूर्ख, गरीब आहेत अशी दयेची दृष्टी फेकत राहतात.... शिवाय कुणीच कसं काही बोलत नाही ... "मी बोलतो, भांडतो बाकीच्यांमध्ये दमच न्हाई" असेही सांगत असतात. शेवटी बिलावरून मनसोक्त भांडले की त्यांचे पोट भरत असावे.

ह्या आणि ह्या सारख्या अनेक अतरंगी लोकांना तुम्ही रेस्टॉरंट /हॉटेल्समध्ये पाहिले असेल... ह्या लोकांना सा. भा. रा.ची ... अर्थात सामाजिक भान राखण्याचे धडे गिरवण्याची खूप खूप गरज असते. आपल्या शेजारील टेबलवर बसलेला माणूस दुःखी, वैतागलेला असू शकतो... किमान माणुसकी म्हणून शांततेवर त्याचाही अधिकार आहे ना! काही दिवसांपूर्वी ही गोष्ट मला अधिक तीव्रतेने जाणवली .... माझ्या शेजारच्या टेबलवर बसलेल्या कुटुंबातील बहीण-भाऊ .."वडिलांना आधी थोडं खायला घालूया काहीतरी मगच सांगू आईचं व्हेंटिलेटर आज काढणार असल्याचं " बोलणं मी ऐकलं आणि माझ्या काळजात चर्र झालं. त्या कधीही न पाहिलेल्या बाबांबद्दल माझ्या मनात अपार दुःख दाटून आले. किती दिवस बिचार्यांची पत्नी व्हेंटिलेटरवर होती कुणास ठाऊक? त्यामुळे रेस्टॉरंट मध्ये आपल्या शेजारच्या माणसाला/कुटुंबाला आपला त्रास होणार नाही ह्याची काळजी घेणं ही आपली सुजाण नागरिक म्हणून जबाबदारी आहे ही खूणगाठ मी मनाशी बांधून ठेवली. 

काही पथ्ये प्रत्येकाने कटाक्षाने पाळायलाच हवीत... बोलतांना ओरडा, गलका करू नये, प्रेमी युगुलांनी आजूबाजूचे भान राखावे, अगदी तान्ह्या बाळांना हॉटेलमध्ये नेऊच नये... नवीन चेहरे ,आवाज यांनी ते बिचारे घाबरून जातात... थोड्या मोठ्या मुलांना नीट शिस्त लावावी त्यांना उधळलेल्या बैलांसारखे लोकांच्या अंगावर सोडू नये, काटेचमचे ही फेकायची वस्तू नाही हे नीट घरीच सांगावे, मुलांना चारचौघात तरी मारू नये...😝 बायकांच्या ग्रुप ने एका वेळी एकच बोलणार हा नियम लावून घ्यावा. थोडक्यात...आपली मजा कुणाची सजा होऊ नये... एव्हढी काळजी घ्यावीच. सार्वजनिक ठिकाणी सामाजिक भान राखणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे... त्यामुळे त्याची आपण दुसऱ्या व्यक्तीकडून अपेक्षा करतो मात्र सुरुवात स्वतःपासून होऊ द्यावी... बाकी मज्जा मस्ती करायलाच हवी.... पण सा.भा. रा. सहित.👍😊
✒️यशश्री रहाळकर

बुधवार, १० फेब्रुवारी, २०२१

माझा व्हॅलेन्टाईन



"तो".....माझ्या सगळ्या इच्छांसमोर गुडघे टेकतो

 मला एखादी साडी मनापासून आवडलीये
 हे त्याला ...नुसत्या डोळ्यांतून कळतं.

 बाकी गिफ्ट्स वगैरे काही देत नाही
 लाल गुलाब तर चुकून सुद्धा आणत नाही पण...
 मोगऱ्याचा गजरा गुपचूप ठेवतो पूजेच्या फुलांच्या पुडीत...

 बाईकवर त्याच्यापाठी बसले की 
 बिलगून बसलेलं मुळीच आवडत नाही त्याला...
 एव्हढंच काय..खांद्यावर हातसुद्धा ठेवलेला चालत नाही
 मात्र मी आजारी पडले तर ....हाताने तूप भात भरवतो

 चारचौघात हातभर अंतर राखून वागतो पण;
 कठीण प्रसंगात उभा असतो पाठीशी ...न सांगता

 ते "तसलं" रोमँटिक वगैरे होणं जमत नाही त्याला
 सतत कागदांवर आकडेमोड करत असतो..
 कधी तरी डोळ्यांत प्राण आणून सांगतो
"माझ्या नंतरही तुला काही कमी पडायला नको"

माझी इवली स्वप्ने "तो" ...बांधून ठेवतो मनाच्या तळाशी
उतरवून ठेवतो डायरीत ....त्याच्या बकेट लिस्ट मध्ये.

माझ्या वेदना, माझं नेमकं दुःख मांडत नाही मी कधी
ते कळतं ..आपोआप त्याला  ,मग...
टिपकागदासारखं टिपून घेतो "तो".

आंतरराष्ट्रीय राजकारणापासून ते अर्थसंकल्पांपर्यंतच्या
आमच्या गप्पांत "love you" वगैरे नसतं कधीच..

मला ठाऊक आहे ,त्याचं माझ्यावरचं नितांत प्रेम..
मला ते ऐकावं लागत नाही आणि
त्यालाही ते व्यक्त करावं लागतं नाही...

खरंखुरं हृदय देणाऱ्यांना ...काचेचं तकलादू हार्ट
विकत घ्यायला लागत नाही.
कधीकधी वाटतं...
बरं झालं!... "तो" माझा व्हॅलेन्टाईन
माझा नवरा रोमँटिक नाही..

✒️ यशश्री रहाळकर