फॉलोअर

सोमवार, २७ मे, २०१९

अपराजिता

                    आयुष्य एक युद्ध मानलं तर आपण प्रत्येक जण लढतच असतो.कुणी आर्थिक परिस्थितीशी ,कुणी सामाजिक विषमतेशी, कुणी आपल्याच आजूबाजूच्या माणसांशी तर कुणी स्वप्न आणि वास्तव यामधल्या दरीशी... अविरत झगडत असतो.मात्र आज जिची कथा मी मांडणार आहे तिने आयुष्याशीच युद्ध मांडले आहे...प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक श्वासाशी ...आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी.या साऱ्याला भक्कमपणे पराभूत करून ती आनंदानं खंबीर उभी आहे...दर वेळी एखादया अजिंक्य योध्याप्रमाणे....शरीराचे घाव मिरवत हसतमुखाने.माझ्या प्रत्येक कथेनंतर वाचकांचा एक प्रश्न हमखास असतोच,"ही कथा खरी आहे का?" होय आजची कथा खरी आहे अगदी 100% 
                बहुतेक लेकी असतात तशीच ती लाडकी...माहेरी लाडाकोडात वाढलेली. सुयोग्य, श्रीमंत मोठ्या एकत्र कुटुंबात घरच्यांनी रीतसर लग्न करून दिलेले...इथपर्यंत तिची कथा तुम्हा आम्हा सारखीच.मात्र नवऱ्याने अचानक एक दिवस स्वतंत्र नवीन व्यवसाय करण्याचं ठरवलं नी एकत्र कुटुंबातून वेगळा झाला....थोडासा रोष कटूपणा ओढवूनच. नवऱ्यासह वनवासात जाणाऱ्या सीतेची भूमी आपली हे तर काहीच नव्हते त्यापुढे.... सासरच्या मंडळींच्या रागाचं केंद्रस्थान निष्कारण ही बनली. हिनेच आमच्या मुलास तोडलं असा काहीसा समाज करून घेतला.
                        खऱ्या अर्थाने दोघांच्या संघर्षास सुरुवात झाली.राहत्या घरात व्यवसाय सुरू झाला.. त्यात बाळाचं आगमन सुखावून गेलं.वेळप्रसंगी बाळाला शेजारी झोपवून ती नवऱ्याबरोबर कामाला उभी राहिली. मात्र एक दिवस अचानक होत्याचे नव्हते झाले... तिचा बच्चू अवघा काही महिन्यांचा आणि तिची तब्येत प्रचंड ढासळली. तपासणीअंती तिचा हृदयाचा (valve )व्हाल... झडप काम करीत नव्हती. इतक्या कमी वयात संकट कोसळलं... तातडीनं operation करावे लागणार होते.. खर्च होता 3.5 लाख. पहिल्यांदा तर पायाखालाची जमीनच सरकली तिच्या... कारण सगळे saving नवीन व्यवसायात गुंतवलेले अगदी स्त्री धन सुद्धा नवऱ्याच्या हवाली केलेले.... मात्र नवऱ्याने धीर दिला .. "बिचाऱ्याने रात्रीतून पैसा कसा उभा केला कोण जाणे." ती प्रेमानं भारावून सांगते.
                      operation पार पडलं मात्र जगण्याचे युद्ध सुरूच होते...ती शुद्धीवर आलीच नाही...कोमात गेली.एक दोन नाही तर पुरते चार दिवस...डॉक्टरांनी देवावर हवाला ठेवला.चार दिवसांनी ती खडबडून जागी झाली,"माझ्या बाळाच्या रडण्याचा आवाज मला आतून आला... मी अशी जाऊ शकत नाही." ती तिचे अनुभव सांगतांना म्हणाली... रसरसून काटा उभा राहिला अंगावर...😢 देवाने आई घडवताना वेगळाच साचा वापरला असेल नाही!ती शुद्धीवर आली मात्र युद्ध संपलेले नव्हते तिचे शरीर थकले होते.. ती पॅरालाईज झाली होती...उठून बसणेही स्वतः स्वतः चे जमत नव्हते. तिने बाळाला भेटायची इच्छा सर्वप्रथम व्यक्त केली.तिचा बच्चू फक्त सहा महिन्यांचा होता.ज्या बाळासाठी ती परत आली होती त्याला उचलून घेणे उराशी कवटाळणे सुद्धा तिला शक्य होत नव्हते. काचेपलीकडे रडणारे तान्हे बाळ आणि अलिकडे हतबल आई😢
                    पुन्हा तिच्या मनातल्या आत्मसंवेदनेने सांगितले ... ऊठ उभी रहा तुझ्या बाळाला गरज आहे तुझी. आश्चर्यकारकरीत्या आठव्या दिवशी सारे मनाचे बळ एकवटून प्रचंड जिद्दीने ती उभी राहिली. पडत धडपडत व्यायाम करत ध्यास घेत महिनाभरात हळूहळू बरे होत तिच्या जगात ती पूर्वी सारखी परत गेली. आता आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जगायचा तिनं निश्चय केला. बाळ मोठं होत होतं, व्यवसायाचा व्याप वाढला स्थिरता आली.ती driving शिकली, swimming उत्तम करू लागली, व्यायाम आहार विहार सगळे अत्यन्त मनापासून केलं. आयुष्याची किंमत खऱ्या अर्थानं तिला कळली होती... प्रत्येक क्षण बोनस आहे असा ती वसूल करते. या दरम्यान थकलेल्या खचलेल्या पेशंट ना भेटायला जाणे त्यांना धीर देणे त्यांना जगण्यासाठी प्रेरणा देण्याचे कार्य तिने सुरू केले.मुलगा दहावी झाला .. नवरा यशस्वी उद्योजक झाला मोठं मनाजोग घर झालं... कुटुंबातील कडवटपणा विरून आता सगळ्यांची ती लाडकी बनली. 
               मात्र युद्ध नसेल तर वॉरियर कसा??आठ वर्षे मुदत असणाऱ्या (valve) हृदयाच्या झडपेला पंधरा वर्षे तिच्या शरीराने साथ दिली...तिची सकारात्मकता, व्यायाम या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणूया.आता पुन्हा एकदा ऑपेशन ला सामोरे जावे लागणार....मात्र तिला न्यूमोनिया ने ग्रासलं दोन महिने झगडून ती बरी झाली त्यातून....आता तिचे या आठवड्यात operation आहे हृदयाच्या झडपेचे...त्यापूर्वी भेटून गेली.लवकरच भेटायचे आश्वासन हसतमुखाने देऊन..... तिचं operation करतांना डॉक्टरांना अधिक ताण असेल तिच्यापेक्षा इतकी हसतमुख प्रसन्न...😊.तिला विचारले, इतर लोक सतत किती कोसतात देवाला? मलाच का ? why with me? हा प्रश्न तुला पडत नाही का? नेहमीप्रमाणेच हसत मुखाने तिनं उत्तर दिलं,"I am chosen one!" जणू ती सांगतेय मला निवडलंय देवाने ह्या साऱ्या साठी ...माझ्यातल्या क्षमता ओळखून...लढायला जिंकायला.माझी ही अपराजिता पुन्हा एकदा युद्धाला सामोरी जातेय ती नक्कीच जिंकणार !👍 मला विश्वास आहे.                                   operation चे टाके टॅटू सारखे मिरवणाऱ्या, प्री वेडिंग सारखे प्री ऑपेशन फोटो शूट करू का ?विचारणाऱ्या,  खळखळून हसणाऱ्या , आयुष्य मनापासून जगणाऱ्या ह्या अपराजीतेला आभाळ भरून शुभेच्छा!लहान मोठ्या समस्यांमध्ये चिडणाऱ्या, आयुष्यावर वैतागणाऱ्या, पोरांना रागावणाऱ्या आणि रडत कुढत जगणाऱ्या सगळ्यांना यातून नवी प्रेरणा मिळेल अशी आशा करते.
 © यशश्री रहाळकर

रविवार, १२ मे, २०१९

आई कळत जातांना


आई
कळत जातांना...

मी मोठी होत असतांना
तिच्याशी भांडण पेटायचे....
माझ्या प्रत्येक पावलावर
तिचे लक्ष असायचे...

तिचं काहीच पसंत
त्यावेळी मला नसायचे.....
वाद आणि खटके
येता जाता उडायचे......
.........
पुढे शिक्षणाच्या निमित्ताने
तिच्यापासून दूर गेले
माझं जग विणून
लग्नानंतर त्यातच रमले....

पहिली वहिली चाहूल
बाळाची लागली जेव्हा
दर क्षणाला आई
आठवू लागली तेव्हा...

इवल सुखाचं गाठोडं
हाती तोलून धरतांना....
आई होणं कळलं
उचलून बाळ घेतांना .....

हळुवार बाळाला जपतांना
रात्रभर त्याच्यासह जागतांना...
दुखणी खुपणी काढतांना
आईपणाचं पांघरून घेतांना

खरी खुरी आताश्या
आई कळू लागतांना......
तिचा अवजड पदर
खांद्यावर पेलतांना.....

लेक मोठी होतेय
वाद लागलेत पेटायला...
माझीच लेक आता
कठीण झालीये भेटायला...

अश्या वेळी मिश्कीलपणे
आई लागते हसायला.....
आईपण सोप्पंय का
हवं तेव्हा सुटायला...

तू आता आई
लेक तुझ्या जागेवर...
आई कळत जाते
जागांची अदलाबदल केल्यावर.
© यशश्री रहाळकर
               नाशिक
              12 मे 2019
Happy Mother's Day

गुरुवार, ९ मे, २०१९

पंचार्पण

पंचार्पण
                               माझा लंगोटीयार म्हणावा असा बालमित्र म्हणजे सुकृत साने.. नावाप्रमाणे काहीतरी पूर्वजन्मीच पुण्य लेवून आलेला असावा. उतारवयात झालेला साने दाम्पत्याचा हा एकुलता एक लेक... दिसायला सुमार बुद्धीने त्याहून ...मात्र नशीब त्याच्यावर कृपादृष्टी राखून होते. वडिलोपार्जित मिळालेल्या गडगंज संपत्तीचा माज त्याला कधी चढलाच नाही.... म्हणूनच माझ्या सारख्या चाकरमान्याशी तो अखंड मैत्री टिकवून होता. मंगलकार्यालये आणि केटरींग या जोडव्यवसायात तो उत्तम मुरला होता...साधे राहणीमान, हाताखालच्या माणसांवर माया आणि कष्टाची तयारी यामुळे त्याचा उत्तम जम बसला होता. अनेक गरजू लोकांना कामाला ठेवून घेतले होते त्यानं... काही तर पूर्णवेळ त्याच्याच घरी आश्रयाला होते. मोठे जुन्या पद्धतीचे चौसोपी घर नोकर चाकर राबता होता...परंतु सुकृतचा विवाह योग काही जुळून येईना... एकतर व्यावसायिकाला मुली कुणी देईना,त्यात शिक्षण कमी भरीस भर पत्रिकेत कसलासा मृत्यूयोग .. अगदी गरीबाची पोर करतो म्हणाले तरी देईना.. नाममात्र घटस्फोटीत सुद्धा चालेल या विचारावर यायला त्याला पस्तिशी गाठावी लागली. आईनं डोळे मिटले ते कायमचेच... तिच्या पाठी चारच महिन्यात वडीलही निर्वतले.... सूनमुख पाहण्याचा योग नव्हताच त्यांचा.आता काही आपले या जन्मात लग्न जमणे नाही असा विचार करून सुकृतने स्वतः ला कामात झोकून दिले.
                                मात्र या बेट्याचे नशीब चांगले म्हणायचे... तळ-कोकणातल्या कुठल्याश्या वाडीवरील एक चुलत मावशीने एक स्थळ सुचवलं...  मुलगी पाहायला म्हणून गेलेला सुकृत बायकोला जोडीनं घेऊनच परतला."कौवेकी चोंच में मोती! " ,ही म्हण त्याच्यासाठी असावी इतका दोघांत फरक होता. नवी नवरी गंगा अत्यंत गरीब ,खायची भ्रांत असणाऱ्या घरातील .. तिच्या एक दूरच्या काकूंकडे आश्रित म्हणून वाढली. ...मात्र अप्सरा म्हणावी एव्हढी देखणी.. दुधाळ गोरा रंग अन मोहक तपकिरी डोळे..जुजबी लिहिता वाचता येणारी ...कामाला मात्र अजिबात न घाबरणारी ....मुळात ढोर मेहनतीची सवय असणारी होती.सुकृत काळाच, बेताची उंची, नाक डोळे जागेवर म्हणावे इतपत... तो भुलला नसता तर नवल.गंगा चटकन सानेंच्या घरात मिसळली.. कामांत चटपटीत सगळ्या घरातील कामाची सूत्रे हळूहळू ती सांभाळू लागली. गंगा अगदीच मितभाषी होती.. तिच्या एकंदर देहबोलीत कमालीचे आकर्षण आणि ओढ होती....ही मोहिनी सुकृतवर सुद्धा पडली होतीच.मुळात तो संसार सुखासाठी आसुसलेला होताच आता त्याला ते मनसोक्त लाभत होतं.
                         गंगा हळूहळू तेजस्वी दिसू लागली.. तिची फिकुटलेली कांती रसरशीत वाटू लागली. अंगावर सुखवस्तूपणाच मूठभर मांस चढल असावं.सुकृत खुश दिसत होता .. संसारी माणसाची स्थिरता नी तृप्ती त्याच्या चेहऱ्यावर जाणवू लागली... गंगावर साड्या दागिने गिफ्ट सगळ्याच पाऊस होत होता.. घरी कामाला नोकर माणसे..."आता थोडा वेळ काढा व्यवसायातून .. आणि जरा फिरून या बायकोसोबत" या माझ्या विधानावर त्यानं लगेच अंमलबजावणी केली.मनाली ,शिमला दोघे फिरून आले.चला सुकृतची गाडी मार्गाला लागली म्हणायची मी मित्र म्हणून आश्वस्थ झालो.
                        या सगळया गोंधळात माझी सोलापूरला बदली झाली.. सरकारी नोकर आदेशाचे गुलाम.. सामानाची बांधाबांध करतांना सुकृत भेटायला आला... आतून जरा मोडून पडलाय असं उगाच वाटून गेलं मला...माझ्याशी बोलतांना जरा हरवल्यागत वाटत होता."काय रे! वाहिनीशी भांडण झाले की काय?"मी विचारले. त्यावर मानेन नकार दर्शवत गंगा माहेरी गेल्याचं त्यानी सांगितलं.... बोलता बोलता तो म्हणाला,"लग्नात तिची एकमेव अट हीच होती की त्यांच्या कोणत्यातरी देवीच्या पूजेला माहेरी जाऊ द्यायचे." मी सहजतेनं त्याला चिडवत म्हणालो,"तुला आठवण येतेय बायकोची..सांग न लेका!जा मग तिला आणायला" गंभीर होत सुकृत पुटपुटला,"ते एव्हढं सोपं नाही.सांगेन कधीतरी सविस्तर " विषय अर्धवट सोडून तो निघून गेला.
                      पुढे  चार वर्षे माझी नी त्याची भेट नाही की संपर्क नाही. चार वर्षांनी फिरून गावात बदली मिळाली.. सुकृतकडे जाऊ म्हटले तर कळलं सुकृत तुरुंगात आहे.बाप रे! काय घोळ घातला याने.. म्हणून मी तुरुंगात त्याला भेटायला गेलो. भेटीसाठी परवानगी मागतांना हवालदाराने सांगितले ते ऐकून माझी काही क्षण दातखीळ बसली. सुकृतने गंगाचा त्याच्या पत्नीचा शांत डोक्याने खून केला होता. हा गुन्हा त्यानं स्वतः कबुल केला होता.. गेले तीन महिने त्याने सुटकेसाठी कोणतेच प्रयत्न केले नव्हते.. तो चांगली वर्तवणून ठेऊन अत्यंत शांतपणे आपली शिक्षा भोगत होता... हे सारं काही माझ्या समजशक्ती पलीकडलं होतं.सुकृत माशीही कधी मारेल यावर माझा विश्वास नव्हता .. माणूस मारणे त्यातही पत्नी जिच्यावर त्याचे निरतिशय प्रेम होते, ...तिला मारणे तर त्या पापभिरु माणसाला शक्यच नव्हते.भेटताक्षणीच मी सुकृतवर प्रश्नांचा भडीमार केला.सुकृतने मला एकच प्रश्न विचारला ,"गंगा कोण होती?" मी न उमजून पाहत होतो.. , "महाभारतातील भीष्मांची माता.. मुलगा जन्माला की नदीत सोडून देणारी...माझीही गंगा तशीच होती मी माझ्या पोराला मात्र वाचवू शकलो नाही." सुकृत बांध फुटून रडू लागला.
                        थोड्या वेळानं शांत झाल्यावर घटनांची संगती लावत सुकृत सांगू लागला..लग्नासाठी गंगाला पाहायला गेलो तेव्हा तिची एकमेव अट होती.. आमच्या देवीच्या पूजेला वर्षातून एकदा येऊ द्यायचे.. देवीची पूजा ना ! मी लगेच मान्य केलं. गंगा खूपच कमी एखादाच शब्द बोलत असे .. ती खुष होती मात्र ते शब्दांतून व्यक्त करणे तिला गरजेचे वाटत नव्हते.असेल एखादी व्यक्ती मितभाषी म्हणून मी दुर्लक्ष केलं.संसार मात्र ती भरभरून प्रेमानं करायची... मला तेव्हढं पुरेसं होतं. आम्ही मनालीहून परतलो त्याच्या नंतर दुसऱ्याच महिन्यात ती पूजेला म्हणून माहेरी गेली.. आठ दिवसांत परत आली.मला जरा ती फिकुटलेली वाटली , त्यावर तिनं उपसाने अशक्तपणा आल्याचे सांगितले.त्यानंतर सात महिन्यांनी ती पुन्हा पूजेला म्हणून माहेरी गेली.. माझा लग्न सराईचा काळ.. गडबडीचा त्यात तिचं जाणं मला मुळीच मान्य नव्हत. पूजा होईल की पुढे मागे.. मात्र वाद न घालता ती निघून गेलीच.या वेळी ती अक्षरशः पांढरी पडली होती.
                              आमच्या लग्नाला दोन वर्षे होत आले होते त्यात माझे वय अधिक .. म्हणून मी तिच्या मागे आता मूल होऊ देऊयात आपण असा लकडा लावला... तिला खरेच दिवस राहिले.. तिला कुठे ठेऊ नी कुठे नको असे झाले.. मला दिवस रात्र तिच्यासारख्या गोऱ्यापान बाळाचे स्वप्न पडू लागले... पाचवा महिना लागलेली गर्भाच्या तेजाने न्हाहलेली गंगा इतकी सुरेख दिसत होती की काय सांगू? 'सुमेध 'आम्ही मुलाचं नावही ठरवलं..... या सगळया दुधात मीठाचा खडा पडलाच... तिची ती पूजा आली. मी घर डोक्यावर घेतलं तिने मुळीच जाता कामा नये म्हणून मी अबोला धरला.. मात्र एके सकाळी उशाशी दोन ओळींची चिठ्ठी लिहून ती गेलीच." माझे जाणे अत्यावश्यक आहे.. पूजा पूर्ण करायला हवी. गंगा" एव्हढीच चिठ्ठी.... चार दिवस काही खबरबात नाही म्हणून मी जायला निघालो तर गंगा परत आली होती रिकाम्या ओटीनं.. तिथे पाय घसरून पडली नी बाळ गेलं असा कांगावा तिनं केला. मी तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत होतो.. बाळ गेल्याचं दुःख वेदना दिसल्याच नाहीत मला.
                       पुढील वर्षी याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली या वेळी तिला सातवा महिना लागला होता नी तिला पूजेकरीता जायचे होते... आता मात्र मी कडाडून विरोध केला.. ह्या वेळी तू जाताच कामा नये हे बजावून सांगितलं. गंगानेही फार वाद घातले नाही... एका रात्री ती मागच्या सारखीच गायब झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गाडी काढून तिच्या त्या  so called माहेरी म्हणजे काकूंच्या वाडीत गेलो...कसलीही पूजेची तयारी दिसत नव्हती. माझं मस्तक तापलं मी तात्काळ तिला माझ्या सोबत परत चलण्यास सांगितले. काकूंनी समजूत घालून आजची रात्र राहा उद्या जेवून जा असा आग्रह केला. मी जेवणार नसल्याचं सांगून वरच्या खोलीत झोपायला गेलो...काकूंनी मला गरम दूध पाठवलं.... छानच चव होती.... मात्र पहिल्या घोटातच मला कसला तरी वेगळाच वास जाणवला.. मी ते न्हाणीघरात ओतून दिलं.. नी झोपायचं नाटक केलं. काकू आणि गंगा दोघींनी दोन तीनदा मी दूध संपविल्याची आणि  झोपल्याची खात्री करून घेतली.
                        मध्यरात्रीच्या सुमारास एका विचित्र वाद्याचे पडघम घुं घुं करत माडातून येऊ लागले... पूर्ण चंद्र डोक्यावर होता मध्यरात्रीच्या बारा वाजले असावे... माडाच्या सावल्या शीरवीरहीत कबंधा प्रमाण फेर धरून नाचू लागल्या. कसलासा लाल तांबूस होम होता त्यात आहुती घालून कुणीतरी भयावह उग्र उच्चारण करीत होते.मी खिडकीच्या फटीतून डोकावून पाहिलं ... बस .. जे दृश्य होतं ते बीभत्स होतं काही स्त्री पुरुष नैसर्गिक दिगंबर अवस्थेत अंगावर बोटभर चिंधीही न घालता.. लाल पट्टे फासून निघाले होते त्यांच्या डोळ्यांत जाळ होता... कसल्यातरी काळ्या कभिन्न दगडाच्या दिशेने येऊन ते स्थिर झाले नी डोलू लागले.मी तोंडावर ओकारी येऊ नये म्हणून हात दाबून धरला... गर्दीला कापत एक स्त्री पुढं आली.. संपूर्ण नग्न रक्तानं माखलेली तिच्या हाती अर्धमेल भ्रूण होतं.. त्याला तिनं आगीत अर्पण केलं अचानक चित्कार करत बेभानपणे ते लोक आरोळ्या ठोकू लागले... ती स्त्री पाठमोरी वळली नी मी बेशुद्ध पडलो... गंगा?? माझी गंगाच होती ती. दुसऱ्या सकाळी गंगाला  रात्री मेलेलं बाळ झाल्याचं मला रडून रडून सांगण्यात आलं.  काळ घडलं ते स्वप्न नव्हतं तर.... त्याच क्षणी माझ्या मनात आलं विचारावं खडसावून हा काय प्रकार होता .. पण मी इथं मी सुरक्षित नाही ह्याची जाणीव झाली मला.. हे सैतानी लोक तुकडे करून गाडून टाकायलाही कमी करणार नाहीत. काही माहीत नसल्याचं सोंग करून, मी उदासपणे घरी निघालो. गंगाला जरा आराम करून पाठवा सांगितलं. त्याना जराही संशय येऊ दिला नाही.
                        काही दिवसांनी नेहमी प्रमाणे गंगा परत आली काही झालेच नाही अश्या थाटात वावरू लागली.एकदिवस मी तिला शांतपणे विचारलं, हे सगळं का कश्यासाठी? का माझ्या निरपराध बाळाचा बळी घेतलास चांडाळणी?? नको होतो मी माझं मूल तर जा जा निघून .... पैसे हवेत का तुला ? किती देऊ बोल? तिचे डोळे लालबुंद होत गेले,तिनं विचारलं " म्हणजे त्या दिवशी तुम्ही दूध घेतलं नाही झोपायचं नाटक केलं?" तिच्या झिंज्या धरून मी खडसावलं," नाटकं तर तू करतेस, नीच , हलकट.. काय प्रकार आहे हा?" गंगा शांतपणे म्हणाली," आता कळलं ना तुम्हाला? सगळं सांगतेच आता... ,अघोरी शक्तींची उपासना करतो आम्ही... मी काकुकडून दीक्षा घेतलीये... महापूजा करतो आम्ही.. पंचार्पण... पहिल्या, तिसऱ्या , पाचव्या, सातव्या आणि नवव्या महिन्यातील भ्रूण अघोरी शक्तीना हवे असतात...  स्वतःचे अंश अर्पण करणाऱ्या साधकांना प्रचंड शक्ती प्राप्त होते.... सारं जग त्यांच्या इच्छेन बदलता येतं...हे भ्रूण प्रचंड जीवनेच्छेने भारलेले असतात.. त्यांनी अघोरी शक्ती प्रबळ होतात." मी संतापातिरेकानं काडकन तिच्या मुस्काटीत लागावल्या. 4 पोरं खाल्ली हडळीनं माझी.. "चल निघ घराबाहेर" मी तिला हाताला धरून बाहेर काढू लागलो.. ती चवताळून अंगावर धावून आली.."अजून एक पोर हवंय मला तुझ्याकडून .. मूर्ख माणसा.. अन्यथा केव्हाच तुझ्या नरडीचा घोट घेतला असता. मला ते दे मग तू मोकळा नी मी मोकळी" ती खदाखदा विकृत हसू लागली. मी बाजूलाच पडलेल्या उशीला तिच्या तोंडावर दाबून धरले.. हळूहळू तिची हालचाल बंद झाली.
                         सुकृत एव्हढे बोलून शांत झाला... काय बोलू ह्यावर कसा धीर देऊ त्याला? त्यानं उचललेलं पाऊल योग्य होतं की नव्हतं माहीत नाही पण पंचार्पण होण्यापासून त्यानं त्याच्या परीनं थांबवलं होतं . जड उध्वस्त मनानं मी घराची एकेक पायरी चढत होतो... काही योगायोगांवर विश्वास ठेवावाच लागणार होता......गुप्तधन मिळविण्यासाठी एका मांत्रिकाने मला पंचार्पण विधी करण्याचे आश्वासन दिले होते.
- यशश्री रहाळकर

बुधवार, ८ मे, २०१९

फक्त दिडशे रुपये

फक्त दिडशे रुपये
                         सकाळी सकाळी बाबांचा फोन आला अन रिमाचं मस्तक भणभणू लागलं....सुपारीचं सगळं उत्पन्न रत्नाकर दादानी पुन्हा एकदा कुठल्याश्या नवीन धंद्यात अक्षरशः पाण्यात घातलं होतं. आईच्या औषधांसाठी लागणाऱ्या पैश्यांसाठी बाबांनी पुन्हा एकदा हात पसरले होते....."मी काय झाड लावलंय ना पैश्याचं तोडल्या चार नोटा नी पाठवल्या" चरफडत ती स्वतःशीच बोलू लागली.रीमा बहुतांश कोकणातल्या माणसांप्रमाणेच पोटापाण्याच्या विवंचनेत मुंबईकर झालेली.कोकणातल्या रेवदांड्याच्या गोपाळ जोश्यांची राहतं घर,1 वाडी नी काही आंब्याची झाडं एव्हढीच काय ती पुंजी. मोठा मुलगा रत्नाकर 10 वी काहीकेल्या पासच झाला नाही मात्र लेक रीमा हुशार नी मेहनती... त्यात मुलींना शिक्षण मोफत ... शिकत गेली. एकीकडे छोट्या मोठ्या कामांतून हातभार लावत... BCA झाली. एका मुंबईतील मैत्रिणीच्या ओळखीनं कॅम्प्युटरची कामं करू लागली...मुळात कामांत चटपटीत त्यामुळे सहजी सगळं शिकत गेली त्याच कंपनीत कामास लागली.
                          रिमाची आई रेवती जोशी कष्टीक बाई सतत कामात असे.काहींना काही पदार्थ कर वीक,थोरामोठ्यांकडे पडेल ते काम कर.. असे सुरू असे. एक दिवस त्या पडल्या अन अंथरूण धरले ते कायमचे...आता रिमाच घराचा काय तो आधार होती. रत्नाकर 32 वर्षांचा झाला होता पण अजूनही हा व्यवसाय करून पाहा मग दुसरा मग तिसरा करत... नियमितपणे पैसे उडवीत होता. रीमा मुंबईला चार मैत्रिणींसोबत एका भाड्याच्या खोलीत राहायची, मान मोडेपर्यंत काम करून मिळणारे पैसे साठवून घरी पाठवायची. तिचेही वय आता 29 वर्षे पण वडील तिच्या लग्नाचा विचारही करत नव्हते.स्वार्थाची झापडं बांधली डोळ्यांना की प्रेम आणि कर्तव्य सोईस्करपणे विसरता येतं.कुठल्यातरी आत्यंतिक निकडीसाठी वडील कायम हात पसरीत.. मग रिमाला पैसे द्यावेच लागत.. पगार बरा असूनही हाती शून्य असायचे.
                         डब्याचे पैसे तिने कालच देऊन टाकले होते.रूमचे तिच्या वाटचे भाडे बाजूला ठेवत 2000 रु जेमतेम होते ते घेऊन ती पोस्टात मनीऑर्डर करायला निघाली. तेव्हढ्यात तिची रूममेट संस्कृती तिला नवीन ड्रेस दाखवत तिनं आज सुट्टी काढल्याचं म्हणाली... आज संपूर्ण दिवस संस्कृती तिच्या भावी पतीबरोबर काढणार होती.रिमाच्या मनाला खोलवर बोचलं... सुंदर जर्द निळा ड्रेस .. खूप दिवसांपासून तिच्या मनात होते ह्या रंगाचा ड्रेस घ्यायचा... खरंतर आपल्या गोऱ्यापान रंगाला नी निळ्या डोळ्यांना काय शोभून दिसेल ना! तिच्या मनात आलं क्षणभर पैसे पाठवूच नये घरी... पण आईचा चेहरा डोळ्यापुढे आला अन तिनं पोस्टाची वाट धरली.मानिऑर्डर करून ऑफिसला पोचेपर्यंत उशीर झाला .. लेटमार्क लाऊन वर त्या नकट्या दिडशहाण्या रिसेप्शनिस्ट चे चार कुजकट शब्द ऐकून ती कामाला लागली.आजचा दिवस तिचा नव्हताच...कामामध्ये अनेक चुका झाल्या.. प्रेझेंटेशन चे ppt नीट सुरू होईना तिचे बॉस तिला वाट्टेल तसं बोलले ....गेले काही दिवस ती ज्या प्रोजेक्ट चा भाग होऊ इच्छित होती तिथे दुसऱ्याच जरा मॉडर्न राहणीमानाच्या मुलीची वर्णी लागली.... प्रोजेक्ट हेड नी तिला स्पष्ट शब्दांत जागा दाखवून देत सांगितलं...," look miss रीमा . ह्या प्रोजेक्टचे बरेच work दुबईला जाऊन करावे लागेल... कंपनी जाणे येणे राहणे खर्च करेल... but you know.. तुम्हाला परवडणार नाही even for cloths n all" त्याचा निर्देश तिच्या विटक्या धुवट ड्रेस कडे होता.शरमेनं खाली मान घालून ती आपल्या जागेवर येऊन बसली... आज रिमाचा संताप संताप झाला होता पदोपदी अपमान .. त्यात डबा उघडून पाहते तर कारल्याची भाजी ... तिने तोंड वाकडे करून डबा बंद केला.तेव्हढ्यात तिला आठवलं काल डबेवाल्या सावंत बाईंकडून 150 रु बाकीचे घ्यायचे आहेत जाता जाता तेही घेऊ आणि चांगल झापू तिला हिशोबात गफलत केली म्हणून .
                          दिवसभराच्या साऱ्या अपमानाचे नी संतापाचे विषारी नाग घेऊन ती सावंत बाईंच्या त्या मोडक्या पायऱ्या चढली.तिच्याच रोजच्या वाटेवरील जुनाट चाळीतील एका खोलीत त्या राहत.. सावंत बाई नी त्यांचा अर्धवट मुलगा गोपी. बिचाऱ्या कष्टीक होत्या, प्रामाणिक होत्या आणि म्हणूनच गरीबही. दोघंच मायलेक .. गोपीचे वडील तो लहान असतांना वारले होते.गोपी अर्धवट असला तरी आईने सांगितलेली सारी कामे करीत असे.सावंत बाईंच्या हाताला चव होती...शिवाय भाव देखिल इतरांपेक्षा कमीच.रात्रीच्या डब्यांची तयारी सुरू होती.. गोपी डबे पुसत होता... रीमा त्यांच्या खोलीत गेली तिच मुळी तारस्वरात ओरडत ... कालचा हिशेब दाखवत 150 रु मागू परत लागली....."हे असे लुबाडू धंदे बंद करा सावंत बाई.. माझे 150 रु परत करा. गरजू बिचारी बाई म्हणून तुमच्याकडे डबा लावला तर तुम्ही हे असले धंदे करता." पापभिरू सावंत बाई भीतीनं थरथरू लागल्या... मध्येच गोपी म्हणाला," बाई ओ बाई कालच दिले परत तुम्हाला.. एक शंभर एक पन्नास." रीमा कडाडली," ए बावळ्या ! तू गप्प बस. तुम्ही बोला सावंत बाई .. शोभतं का हे तुम्हाला.. दुसऱ्यांचे पैसे खाणं." रिमाचं तोंड सुटलं होतं ती अद्वातद्वा बोलू लागली... चाळकरी मौज पाहायला गोळा झाले. रात्रीचे डबे नेणारे गिऱ्हाईक येऊ लागले... मोठा तमाशा झाला. सावंत बाई अपमानानं खाली मान घालून उभ्या होत्या...त्यांचा गोपी मात्र ठामपणे काल 150 रु परत केल्याचे आणि याच पर्स मध्ये ठेवल्याचे सांगत होता... रीमानं तिथंच पर्स उपडी केली एक एक वस्तू दाखवून कुठेय पैसे दाखव म्हणून कहर केला... सावंत बाई तिचे पाय धरून माफी मागू लागल्या ... आपल्या जवळचे 150 रु देत माफ करा म्हणून गयावया करू लागल्या.ते पैसे त्यांच्याच तोंडावर फेकून मारत रीमा चालती झाली... रूमवर येऊन तिने अंग पलंगावर टाकून दिले...  मोठा मासा छोट्या माश्याला खातो.... हा  जंगलचा न्याय ....तिला शांत वाटू लागलं.उपाशीपोटी डोळा कधी लागला ते कळलंच नाही.
                        मध्यरात्री कधीतरी तिला जाग आली तिच भीतीनं... घसा कोरडा पडला होता अंग घामाघूम झालेलं.. तिला स्वप्नातही गोपी दिसत होता .... म्हणत होता," मी पैसे दिले  ..हो हो दिलेे ...दीडशे रुपये एक शंभर एक पन्नास...तुम्ही या याच बॅगेत ठेवले." घड्याळ पाहते तर दिड वाजले होते.ती पाणी प्यायला उठली .. प्रचंड थकाव्यानं अंग जड झालेलं.. घोटभर पाणी प्यायली पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता.. एखादे बिस्कीट असेल तर तोंडात टाकू म्हणून ती पर्स शोधू लागली. एव्हढ्यात एक डायरी पर्स मधून पडली .. त्याच्यासह अंधारात अजूनही एकदोन वस्तू पडल्या नी आवाजाने दचकून सगळ्याच जाग्या झाल्या.. एकीन लाईट लावला... तिनं माफी मागत डायरी उचलली.. तर काय ?? त्यात एक शंभर अन एक पन्नासची नोट असे दीडशे रुपये होते. गोपी सांगत होता ते खरं होतं त्यांनी खरेच पैसे दिले होते...गडबडीत घेतल्याने ती बहुदा विसरून गेली होती.तिला खूप खजील झालं त्या गरीब बाईला नाहक बोल लावले आपण ..स्वतःचीच रीमाला लाज वाटू लागली. उद्याच सकाळी जाते नी त्यांची माफी मागते.... तिनं मनाशीच ठरवलं.
                   दुसऱ्या दिवशी जरा लवकरच आवरून ती सावंत बाईंकडे निघाली.त्या गोपीसाठी काहीतरी खाऊ न्यावा ... पैसे डायरीत मिळाल्याचे सांगून सावंत बाईंची मनापासून माफी मागावी..अश्या विचारांत चाळीशी पोहोचली तर काय? ही गर्दी गोळा झालेली... पोलिसांची गाडी उभी. जमिनीवर दोन प्रेते दिसत होती.... बापरे!😢 सावंत काकू आणि गोपी... रात्रीतून काय झालं अचानक. तिनं गर्दीतील एकाला खुणेने काय झालं असं विचारलं ..... त्याने चाळकरी धर्मानी माहिती पुरविली ," काल रात्री दीड च्या सुमारास सावंत बाई आणि त्यांच्या मुलानं आत्महत्या केली.. बाईंनी विष घातलं लेकाला नी स्वतः गळफास लावून घेतला." रिमाच्या पायाखालची जमीन सरकू लागली... गर्दीतून ...... काल कुणीतरी बाई ने पैश्यांवरून भांडण केल्याचे बोललेले ऐकले नी रीमाने तिथून पळ काढला. आता नसती पोलिसांच्या चौकशीची ब्याद तिला परवडणारी नव्हती.धापा टाकत ती कशीबशी ऑफिसला पोहोचली..खाली मान घालून काम करतांना देखिल डोक्यातून विचार जायीचना... आपल्या मुर्खपणामुळे दोन प्रमाणिक जीव हकनाक गेले... ही टोचणी तिच्या मनाला झोंबू लागली. अंगात ताप भरला नी चेहरा लाल दिसू लागला... तिचा एकंदर अवतार पाहून वरिष्ठांनी तिला बळेच अर्धा दिवस रजा घेऊन घरी पाठवले.
                        परत जातांना तिला टॅक्सी करावीच लागली .. चालणं शक्य नव्हतं त्यात ताप वाढत होता.. टॅक्सीचे मीटर 170 रु सांगत होते.टॅक्सी वाल्याला तिनं 100 रु च्या 3 नोटा पुढं केल्या .. त्यानं स्वतः हुन 150 रु परत केले.. एक 100 आणि एक 50ची नोट ती चपापली... "गोपी मला माफ कर!" मनातल्या मनात म्हणत रूममध्ये गेली. तिची रूम मेट संस्कृती नेहमीप्रमाणे नटून कुठेतरी जायला निघाली होती .. रिमाची अवस्था पाहून तिनं चटकन तिला 4 बिस्किटे दिली नी तापाची गोळी देऊन झोपवले.तापामुळे ती अखंड बडबड करीत होती.. माफ करा माफ करा म्हणून ओरडत होती. रात्री उशीरा जाग आली तेव्हा तिच्या सगळ्या रूममेट बाजूला बसल्या होत्या सगळ्यांचे चेहरे तिच्या काळजीने सुकले होते. ती धाय मोकलून रडू लागली घडला प्रकार त्यांना सविस्तरपणे सांगून तिला हलके वाटू लागले .. मैत्रिणींनी तिची समजूत घातली घडल्या प्रकारात तिचा दोष नाही हे पटवून देऊ लागल्या कोण कुठली ती बाई.. वैतागली असेल आयुष्याला नको विचार करू... अशी समजूत घालून तिला जेवू घातले.
                      दुसऱ्या दिवशी संस्कृती तिला स्वतः बरोबर खरेदीला बाहेर घेऊन गेली ..तेव्हढाच तिला बदल मिळावा हा हेतू... दोघी चपलांच्या खरेदीला गेल्या बराच वेळ घालऊन एक सुरेख सँडल संस्कृतीला आवडली.. तिने पैसे दिले आणि तेव्हढ्यात तिला फोन आला.उरलेले पैसे परत घे म्हणून तिनी रीमाला खूण केली. दुकानदारानं 150 रुपये तिच्या हातावर टेकवले.. एक शंभर एक पन्नास .. तेच वेडगळ हसू चेहऱ्यावर तिला त्याच्यात गोपीच दिसू लागला. झटका बसल्यागत तिनं हात मागे ओढला. त्या दिवसभर त्या जिथं जिथं म्हणून जात होत्या त्या सगळ्याच ठिकाणी रीमाला 150 रुपये परत मिळत होते... एक शंभर एक पन्नास. खर्च तिने केला तरी आणि न करताही.. हे काय होतंय? रीमा भांबावली. हॉटेल मध्ये, खरेदीला, सिनेमाच्या तिकीटांवर किंवा टॅक्सीत सगळीकडे तिला एक शंभर नी एक पन्नास मिळत होते...भांबावून गेलेल्या अवस्थेत घरी परतलेल्या रिमाची गावाकडील मैत्रीण तिची वाट बघत होती... कधीतरी हातउसने म्हणून घेतलेले पैसे परत करायला म्हणून ती आली होती. तिने पैसे रीमा नको नको म्हणत असतांना तिच्या हाती दिले.. अन कुणाला काही कळायच्या आत रीमा किंचाळून बेशुद्ध पडली. मैत्रिणीनं तिला दिडशे रुपये.. एक शंभर एक पन्नास ची नोट दिली होती. तिला कळेना आपलं काय चुकलं.
                    रीमाची तब्येत झपाट्यान ढासळू लागली तिला होणाऱ्या भासांच्या जाळ्यात ती अधिकाधिक अडकत गेली. एरवी शांत असणारी रीमा पैसे पाहताच बेशुद्ध पडे... मैत्रिणी काय करतील बिचाऱ्या ?? तिच्या वडिलांना बोलावून घेतलं. तिचे वडील गोपाळ जोशी खचून गेले... तिला घेऊन रेवदांड्याला परतले. दिवसचे दिवस रीमा उध्वस्त बेटाप्रमाणे शून्यात नजर लावून बसे... जगणार कशावर ? आईनं थोडा धीर बांधत चार घरचे डबे सुरू केले.आई आजारांनं खंगलेली मात्र रीमाच्या पाठी उभं राहणं भाग होतं माऊलीला. रीमा जमेल ती कामे करीत असे नाहीतर वेड्यागत बसून राही.एक दिवस रीमाला आई डबे भरत असतांना..... आपल्या आईच्या ठिकाणी सावंत बाई दिसू लागल्या ती त्यांचे पाय धरून रडू लागली.. माफी मागू लागली.आईनं तिला शांत केलं पाणी दिलं... रीमा गोपीला शोधू लागली... त्याचीही माफी मागायला हवी. दिडशे रुपये दिले होते म्हणत धावत सुटली..... मागच्या दाराशी असणाऱ्या विहिरीत तिनं वाकून पाहिलं तिला गोपी दिसला... तिच्या स्वतः च्या प्रतिबिंबाऐवजी... तिच्याकडे पाहून खदाखदा हसत होता.. "मी पैसे दिले होते दिडशे रुपये... एक शंभर एक पन्नास" गोपी म्हणाला.रीमा आता पुरती वेडी झाली होती कपड्यांचीही शुद्ध तिला राहिना.. अखंड दिडशे रुपये एव्हढाच तिच्याकडे विषय होता .. ओरडायची, किंचाळायची, धावत सुटायची. तिला बांधून ठेवावं लागे. तिची आई रेवतीबाई जोशी समजून चुकली आता काहीही होणे नाही... हातात पैसा नाही उपचारास. एका रात्री त्यांनी रीमाला मनसोक्त शिकरण खाऊ घातलं. सकाळी घरापुढं दोन प्रेतं होती... अन्नातून विष घातलेल्या रीमाचं अन फाशी घेतलेल्या तिच्या आईचं. बावळ्या गोपीचा आत्मा मुक्त झाला की नाही कोण जाणे?? पोस्ट मार्टेमच्या वेळी रीमाच्या आवळलेल्या मुठीत दिडशे रुपये होते एक शंभर एक पन्नास.....
- यशश्री रहाळकर