फॉलोअर

बुधवार, ८ मे, २०१९

फक्त दिडशे रुपये

फक्त दिडशे रुपये
                         सकाळी सकाळी बाबांचा फोन आला अन रिमाचं मस्तक भणभणू लागलं....सुपारीचं सगळं उत्पन्न रत्नाकर दादानी पुन्हा एकदा कुठल्याश्या नवीन धंद्यात अक्षरशः पाण्यात घातलं होतं. आईच्या औषधांसाठी लागणाऱ्या पैश्यांसाठी बाबांनी पुन्हा एकदा हात पसरले होते....."मी काय झाड लावलंय ना पैश्याचं तोडल्या चार नोटा नी पाठवल्या" चरफडत ती स्वतःशीच बोलू लागली.रीमा बहुतांश कोकणातल्या माणसांप्रमाणेच पोटापाण्याच्या विवंचनेत मुंबईकर झालेली.कोकणातल्या रेवदांड्याच्या गोपाळ जोश्यांची राहतं घर,1 वाडी नी काही आंब्याची झाडं एव्हढीच काय ती पुंजी. मोठा मुलगा रत्नाकर 10 वी काहीकेल्या पासच झाला नाही मात्र लेक रीमा हुशार नी मेहनती... त्यात मुलींना शिक्षण मोफत ... शिकत गेली. एकीकडे छोट्या मोठ्या कामांतून हातभार लावत... BCA झाली. एका मुंबईतील मैत्रिणीच्या ओळखीनं कॅम्प्युटरची कामं करू लागली...मुळात कामांत चटपटीत त्यामुळे सहजी सगळं शिकत गेली त्याच कंपनीत कामास लागली.
                          रिमाची आई रेवती जोशी कष्टीक बाई सतत कामात असे.काहींना काही पदार्थ कर वीक,थोरामोठ्यांकडे पडेल ते काम कर.. असे सुरू असे. एक दिवस त्या पडल्या अन अंथरूण धरले ते कायमचे...आता रिमाच घराचा काय तो आधार होती. रत्नाकर 32 वर्षांचा झाला होता पण अजूनही हा व्यवसाय करून पाहा मग दुसरा मग तिसरा करत... नियमितपणे पैसे उडवीत होता. रीमा मुंबईला चार मैत्रिणींसोबत एका भाड्याच्या खोलीत राहायची, मान मोडेपर्यंत काम करून मिळणारे पैसे साठवून घरी पाठवायची. तिचेही वय आता 29 वर्षे पण वडील तिच्या लग्नाचा विचारही करत नव्हते.स्वार्थाची झापडं बांधली डोळ्यांना की प्रेम आणि कर्तव्य सोईस्करपणे विसरता येतं.कुठल्यातरी आत्यंतिक निकडीसाठी वडील कायम हात पसरीत.. मग रिमाला पैसे द्यावेच लागत.. पगार बरा असूनही हाती शून्य असायचे.
                         डब्याचे पैसे तिने कालच देऊन टाकले होते.रूमचे तिच्या वाटचे भाडे बाजूला ठेवत 2000 रु जेमतेम होते ते घेऊन ती पोस्टात मनीऑर्डर करायला निघाली. तेव्हढ्यात तिची रूममेट संस्कृती तिला नवीन ड्रेस दाखवत तिनं आज सुट्टी काढल्याचं म्हणाली... आज संपूर्ण दिवस संस्कृती तिच्या भावी पतीबरोबर काढणार होती.रिमाच्या मनाला खोलवर बोचलं... सुंदर जर्द निळा ड्रेस .. खूप दिवसांपासून तिच्या मनात होते ह्या रंगाचा ड्रेस घ्यायचा... खरंतर आपल्या गोऱ्यापान रंगाला नी निळ्या डोळ्यांना काय शोभून दिसेल ना! तिच्या मनात आलं क्षणभर पैसे पाठवूच नये घरी... पण आईचा चेहरा डोळ्यापुढे आला अन तिनं पोस्टाची वाट धरली.मानिऑर्डर करून ऑफिसला पोचेपर्यंत उशीर झाला .. लेटमार्क लाऊन वर त्या नकट्या दिडशहाण्या रिसेप्शनिस्ट चे चार कुजकट शब्द ऐकून ती कामाला लागली.आजचा दिवस तिचा नव्हताच...कामामध्ये अनेक चुका झाल्या.. प्रेझेंटेशन चे ppt नीट सुरू होईना तिचे बॉस तिला वाट्टेल तसं बोलले ....गेले काही दिवस ती ज्या प्रोजेक्ट चा भाग होऊ इच्छित होती तिथे दुसऱ्याच जरा मॉडर्न राहणीमानाच्या मुलीची वर्णी लागली.... प्रोजेक्ट हेड नी तिला स्पष्ट शब्दांत जागा दाखवून देत सांगितलं...," look miss रीमा . ह्या प्रोजेक्टचे बरेच work दुबईला जाऊन करावे लागेल... कंपनी जाणे येणे राहणे खर्च करेल... but you know.. तुम्हाला परवडणार नाही even for cloths n all" त्याचा निर्देश तिच्या विटक्या धुवट ड्रेस कडे होता.शरमेनं खाली मान घालून ती आपल्या जागेवर येऊन बसली... आज रिमाचा संताप संताप झाला होता पदोपदी अपमान .. त्यात डबा उघडून पाहते तर कारल्याची भाजी ... तिने तोंड वाकडे करून डबा बंद केला.तेव्हढ्यात तिला आठवलं काल डबेवाल्या सावंत बाईंकडून 150 रु बाकीचे घ्यायचे आहेत जाता जाता तेही घेऊ आणि चांगल झापू तिला हिशोबात गफलत केली म्हणून .
                          दिवसभराच्या साऱ्या अपमानाचे नी संतापाचे विषारी नाग घेऊन ती सावंत बाईंच्या त्या मोडक्या पायऱ्या चढली.तिच्याच रोजच्या वाटेवरील जुनाट चाळीतील एका खोलीत त्या राहत.. सावंत बाई नी त्यांचा अर्धवट मुलगा गोपी. बिचाऱ्या कष्टीक होत्या, प्रामाणिक होत्या आणि म्हणूनच गरीबही. दोघंच मायलेक .. गोपीचे वडील तो लहान असतांना वारले होते.गोपी अर्धवट असला तरी आईने सांगितलेली सारी कामे करीत असे.सावंत बाईंच्या हाताला चव होती...शिवाय भाव देखिल इतरांपेक्षा कमीच.रात्रीच्या डब्यांची तयारी सुरू होती.. गोपी डबे पुसत होता... रीमा त्यांच्या खोलीत गेली तिच मुळी तारस्वरात ओरडत ... कालचा हिशेब दाखवत 150 रु मागू परत लागली....."हे असे लुबाडू धंदे बंद करा सावंत बाई.. माझे 150 रु परत करा. गरजू बिचारी बाई म्हणून तुमच्याकडे डबा लावला तर तुम्ही हे असले धंदे करता." पापभिरू सावंत बाई भीतीनं थरथरू लागल्या... मध्येच गोपी म्हणाला," बाई ओ बाई कालच दिले परत तुम्हाला.. एक शंभर एक पन्नास." रीमा कडाडली," ए बावळ्या ! तू गप्प बस. तुम्ही बोला सावंत बाई .. शोभतं का हे तुम्हाला.. दुसऱ्यांचे पैसे खाणं." रिमाचं तोंड सुटलं होतं ती अद्वातद्वा बोलू लागली... चाळकरी मौज पाहायला गोळा झाले. रात्रीचे डबे नेणारे गिऱ्हाईक येऊ लागले... मोठा तमाशा झाला. सावंत बाई अपमानानं खाली मान घालून उभ्या होत्या...त्यांचा गोपी मात्र ठामपणे काल 150 रु परत केल्याचे आणि याच पर्स मध्ये ठेवल्याचे सांगत होता... रीमानं तिथंच पर्स उपडी केली एक एक वस्तू दाखवून कुठेय पैसे दाखव म्हणून कहर केला... सावंत बाई तिचे पाय धरून माफी मागू लागल्या ... आपल्या जवळचे 150 रु देत माफ करा म्हणून गयावया करू लागल्या.ते पैसे त्यांच्याच तोंडावर फेकून मारत रीमा चालती झाली... रूमवर येऊन तिने अंग पलंगावर टाकून दिले...  मोठा मासा छोट्या माश्याला खातो.... हा  जंगलचा न्याय ....तिला शांत वाटू लागलं.उपाशीपोटी डोळा कधी लागला ते कळलंच नाही.
                        मध्यरात्री कधीतरी तिला जाग आली तिच भीतीनं... घसा कोरडा पडला होता अंग घामाघूम झालेलं.. तिला स्वप्नातही गोपी दिसत होता .... म्हणत होता," मी पैसे दिले  ..हो हो दिलेे ...दीडशे रुपये एक शंभर एक पन्नास...तुम्ही या याच बॅगेत ठेवले." घड्याळ पाहते तर दिड वाजले होते.ती पाणी प्यायला उठली .. प्रचंड थकाव्यानं अंग जड झालेलं.. घोटभर पाणी प्यायली पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता.. एखादे बिस्कीट असेल तर तोंडात टाकू म्हणून ती पर्स शोधू लागली. एव्हढ्यात एक डायरी पर्स मधून पडली .. त्याच्यासह अंधारात अजूनही एकदोन वस्तू पडल्या नी आवाजाने दचकून सगळ्याच जाग्या झाल्या.. एकीन लाईट लावला... तिनं माफी मागत डायरी उचलली.. तर काय ?? त्यात एक शंभर अन एक पन्नासची नोट असे दीडशे रुपये होते. गोपी सांगत होता ते खरं होतं त्यांनी खरेच पैसे दिले होते...गडबडीत घेतल्याने ती बहुदा विसरून गेली होती.तिला खूप खजील झालं त्या गरीब बाईला नाहक बोल लावले आपण ..स्वतःचीच रीमाला लाज वाटू लागली. उद्याच सकाळी जाते नी त्यांची माफी मागते.... तिनं मनाशीच ठरवलं.
                   दुसऱ्या दिवशी जरा लवकरच आवरून ती सावंत बाईंकडे निघाली.त्या गोपीसाठी काहीतरी खाऊ न्यावा ... पैसे डायरीत मिळाल्याचे सांगून सावंत बाईंची मनापासून माफी मागावी..अश्या विचारांत चाळीशी पोहोचली तर काय? ही गर्दी गोळा झालेली... पोलिसांची गाडी उभी. जमिनीवर दोन प्रेते दिसत होती.... बापरे!😢 सावंत काकू आणि गोपी... रात्रीतून काय झालं अचानक. तिनं गर्दीतील एकाला खुणेने काय झालं असं विचारलं ..... त्याने चाळकरी धर्मानी माहिती पुरविली ," काल रात्री दीड च्या सुमारास सावंत बाई आणि त्यांच्या मुलानं आत्महत्या केली.. बाईंनी विष घातलं लेकाला नी स्वतः गळफास लावून घेतला." रिमाच्या पायाखालची जमीन सरकू लागली... गर्दीतून ...... काल कुणीतरी बाई ने पैश्यांवरून भांडण केल्याचे बोललेले ऐकले नी रीमाने तिथून पळ काढला. आता नसती पोलिसांच्या चौकशीची ब्याद तिला परवडणारी नव्हती.धापा टाकत ती कशीबशी ऑफिसला पोहोचली..खाली मान घालून काम करतांना देखिल डोक्यातून विचार जायीचना... आपल्या मुर्खपणामुळे दोन प्रमाणिक जीव हकनाक गेले... ही टोचणी तिच्या मनाला झोंबू लागली. अंगात ताप भरला नी चेहरा लाल दिसू लागला... तिचा एकंदर अवतार पाहून वरिष्ठांनी तिला बळेच अर्धा दिवस रजा घेऊन घरी पाठवले.
                        परत जातांना तिला टॅक्सी करावीच लागली .. चालणं शक्य नव्हतं त्यात ताप वाढत होता.. टॅक्सीचे मीटर 170 रु सांगत होते.टॅक्सी वाल्याला तिनं 100 रु च्या 3 नोटा पुढं केल्या .. त्यानं स्वतः हुन 150 रु परत केले.. एक 100 आणि एक 50ची नोट ती चपापली... "गोपी मला माफ कर!" मनातल्या मनात म्हणत रूममध्ये गेली. तिची रूम मेट संस्कृती नेहमीप्रमाणे नटून कुठेतरी जायला निघाली होती .. रिमाची अवस्था पाहून तिनं चटकन तिला 4 बिस्किटे दिली नी तापाची गोळी देऊन झोपवले.तापामुळे ती अखंड बडबड करीत होती.. माफ करा माफ करा म्हणून ओरडत होती. रात्री उशीरा जाग आली तेव्हा तिच्या सगळ्या रूममेट बाजूला बसल्या होत्या सगळ्यांचे चेहरे तिच्या काळजीने सुकले होते. ती धाय मोकलून रडू लागली घडला प्रकार त्यांना सविस्तरपणे सांगून तिला हलके वाटू लागले .. मैत्रिणींनी तिची समजूत घातली घडल्या प्रकारात तिचा दोष नाही हे पटवून देऊ लागल्या कोण कुठली ती बाई.. वैतागली असेल आयुष्याला नको विचार करू... अशी समजूत घालून तिला जेवू घातले.
                      दुसऱ्या दिवशी संस्कृती तिला स्वतः बरोबर खरेदीला बाहेर घेऊन गेली ..तेव्हढाच तिला बदल मिळावा हा हेतू... दोघी चपलांच्या खरेदीला गेल्या बराच वेळ घालऊन एक सुरेख सँडल संस्कृतीला आवडली.. तिने पैसे दिले आणि तेव्हढ्यात तिला फोन आला.उरलेले पैसे परत घे म्हणून तिनी रीमाला खूण केली. दुकानदारानं 150 रुपये तिच्या हातावर टेकवले.. एक शंभर एक पन्नास .. तेच वेडगळ हसू चेहऱ्यावर तिला त्याच्यात गोपीच दिसू लागला. झटका बसल्यागत तिनं हात मागे ओढला. त्या दिवसभर त्या जिथं जिथं म्हणून जात होत्या त्या सगळ्याच ठिकाणी रीमाला 150 रुपये परत मिळत होते... एक शंभर एक पन्नास. खर्च तिने केला तरी आणि न करताही.. हे काय होतंय? रीमा भांबावली. हॉटेल मध्ये, खरेदीला, सिनेमाच्या तिकीटांवर किंवा टॅक्सीत सगळीकडे तिला एक शंभर नी एक पन्नास मिळत होते...भांबावून गेलेल्या अवस्थेत घरी परतलेल्या रिमाची गावाकडील मैत्रीण तिची वाट बघत होती... कधीतरी हातउसने म्हणून घेतलेले पैसे परत करायला म्हणून ती आली होती. तिने पैसे रीमा नको नको म्हणत असतांना तिच्या हाती दिले.. अन कुणाला काही कळायच्या आत रीमा किंचाळून बेशुद्ध पडली. मैत्रिणीनं तिला दिडशे रुपये.. एक शंभर एक पन्नास ची नोट दिली होती. तिला कळेना आपलं काय चुकलं.
                    रीमाची तब्येत झपाट्यान ढासळू लागली तिला होणाऱ्या भासांच्या जाळ्यात ती अधिकाधिक अडकत गेली. एरवी शांत असणारी रीमा पैसे पाहताच बेशुद्ध पडे... मैत्रिणी काय करतील बिचाऱ्या ?? तिच्या वडिलांना बोलावून घेतलं. तिचे वडील गोपाळ जोशी खचून गेले... तिला घेऊन रेवदांड्याला परतले. दिवसचे दिवस रीमा उध्वस्त बेटाप्रमाणे शून्यात नजर लावून बसे... जगणार कशावर ? आईनं थोडा धीर बांधत चार घरचे डबे सुरू केले.आई आजारांनं खंगलेली मात्र रीमाच्या पाठी उभं राहणं भाग होतं माऊलीला. रीमा जमेल ती कामे करीत असे नाहीतर वेड्यागत बसून राही.एक दिवस रीमाला आई डबे भरत असतांना..... आपल्या आईच्या ठिकाणी सावंत बाई दिसू लागल्या ती त्यांचे पाय धरून रडू लागली.. माफी मागू लागली.आईनं तिला शांत केलं पाणी दिलं... रीमा गोपीला शोधू लागली... त्याचीही माफी मागायला हवी. दिडशे रुपये दिले होते म्हणत धावत सुटली..... मागच्या दाराशी असणाऱ्या विहिरीत तिनं वाकून पाहिलं तिला गोपी दिसला... तिच्या स्वतः च्या प्रतिबिंबाऐवजी... तिच्याकडे पाहून खदाखदा हसत होता.. "मी पैसे दिले होते दिडशे रुपये... एक शंभर एक पन्नास" गोपी म्हणाला.रीमा आता पुरती वेडी झाली होती कपड्यांचीही शुद्ध तिला राहिना.. अखंड दिडशे रुपये एव्हढाच तिच्याकडे विषय होता .. ओरडायची, किंचाळायची, धावत सुटायची. तिला बांधून ठेवावं लागे. तिची आई रेवतीबाई जोशी समजून चुकली आता काहीही होणे नाही... हातात पैसा नाही उपचारास. एका रात्री त्यांनी रीमाला मनसोक्त शिकरण खाऊ घातलं. सकाळी घरापुढं दोन प्रेतं होती... अन्नातून विष घातलेल्या रीमाचं अन फाशी घेतलेल्या तिच्या आईचं. बावळ्या गोपीचा आत्मा मुक्त झाला की नाही कोण जाणे?? पोस्ट मार्टेमच्या वेळी रीमाच्या आवळलेल्या मुठीत दिडशे रुपये होते एक शंभर एक पन्नास.....
- यशश्री रहाळकर

३ टिप्पण्या:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!