आई कळत जातांना...
मी मोठी होत असतांना
तिच्याशी भांडण पेटायचे....
माझ्या प्रत्येक पावलावर
तिचे लक्ष असायचे...
तिचं काहीच पसंत
त्यावेळी मला नसायचे.....
वाद आणि खटके
येता जाता उडायचे......
.........
पुढे शिक्षणाच्या निमित्ताने
तिच्यापासून दूर गेले
माझं जग विणून
लग्नानंतर त्यातच रमले....
पहिली वहिली चाहूल
बाळाची लागली जेव्हा
दर क्षणाला आई
आठवू लागली तेव्हा...
इवल सुखाचं गाठोडं
हाती तोलून धरतांना....
आई होणं कळलं
उचलून बाळ घेतांना .....
हळुवार बाळाला जपतांना
रात्रभर त्याच्यासह जागतांना...
दुखणी खुपणी काढतांना
आईपणाचं पांघरून घेतांना
खरी खुरी आताश्या
आई कळू लागतांना......
तिचा अवजड पदर
खांद्यावर पेलतांना.....
लेक मोठी होतेय
वाद लागलेत पेटायला...
माझीच लेक आता
कठीण झालीये भेटायला...
अश्या वेळी मिश्कीलपणे
आई लागते हसायला.....
आईपण सोप्पंय का
हवं तेव्हा सुटायला...
तू आता आई
लेक तुझ्या जागेवर...
आई कळत जाते
जागांची अदलाबदल केल्यावर.
© यशश्री रहाळकर
नाशिक
12 मे 2019
Happy Mother's Day

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!