फॉलोअर

सोमवार, २५ मे, २०२०

Me Time

                            समिधा आज जरा तणतणतच घरी आली...तिचा दीड वर्षांचा लेक ,  विराज मस्त खेळायच्या मूड मध्ये होता....  मज्जेत हातपाय झाडत तो आऊईssss अश्या हाकाही घालत होता..... मात्र तिचं चित्त काही थाऱ्यावर नव्हतं . खरंतर आज कधी नव्हे तर तिला हाफ डे मिळाला...  आता मस्त रिलॅक्स होऊ , आरामात लोळत पडू आणि सोहमला जमलंच लवकर यायला तर एखादी  मुव्ही आणि नंतर डिनर बाहेर करून मज्जेत वेळ घालवू अशी साधारण योजना तिच्या मनांत रेंगाळत होती. घरी परततांना तिला अचानक आठवलं की विराजचं बेबी फूड, बेबी लोशन , डायपर्स वगैरे संपत आले आहेत ,अशी कालच आईने आठवण करून दिली होती. तिने झटकन गाडी नेहमीच्या स्टोअरकडे वळवली, सामान घेतले आणि आईच्या घराखाली गाडी पार्क केली. विराजला आज तिथेच ठेवून ती लगेचच निघणार होती. आईच्या ह्या घराची बिल्डिंग तशी जुनीच झाली होती... बाबा असतांना घेतलेले हे सेकंड हॅन्ड घर ,त्यामुळे हे होणारच होतं. बिल्डिंगची पार रया गेलेली, त्यात लिफ्ट नाही. तिने अनेकदा आईला आपल्या घरी येण्यासाठी आग्रह धरला होता मात्र आई तिच्या नकारावर ठाम होती. जोवर हातपाय चालताहेत तोवर स्वतंत्र राहायचं ,असं आई वारंवार म्हणायची. हातातल्या सामानाचे ओझे सावरत त्या पायऱ्या चढणे समिधाला अगदी नकोसे वाटत होते.... बाहेरून गप्पांचे आवाज येत होते बहुदा शेजारच्या दंडवते काकू असाव्यात.  त्या नेहमीप्रमाणे त्यांच्या नोकरी करणाऱ्या सुनेच्या कागाळ्या करीत होत्या...  तेव्हढ्यात तिच्या कानावर आईचा आवाज पडला,

 "... तुमचे बरे आहे हो सुनेची मुले म्हणून नाही म्हणता तरी येते. वेळप्रसंगी तक्रार करता येते, रडता येते... माझ्याकडे तर तोही पर्याय नाही. आपलेच दात आपलेच ओठ..." 

आईचे शब्द समिधाच्या कानात गरम तेलासारखे तडतडून गेले, तिरिमिरीत दार लोटून ती आत गेली , तिने विराजला उचललं ... आईला शरमेनं काय बोलावं सुचेना. तरी बिचारी सावरून घेत म्हणाली ,

 "आज लवकर आलीस का समू? थांब! मस्त चहा टाकते ." 

एक अवाक्षरही न बोलता समिधा विराजला घेऊन ताडताड जीना उतरत बाहेर पडली. त्याला घेऊन तिने थेट स्वतःचे घर गाठले.
                          आईला काही अडचण होतेय का पिल्लुला सांभाळायला?? तिने हे स्पष्टपणे मला सांगायला नको होते का? त्या दंडवते काकूंच्या कानाला लागून हे बोलण्याची गरजच काय? एक ना अनेक विचारांची धुसफूस तिच्या मनात सुरू होती. विराजभवती खेळण्यांचा पसारा टाकत ती कामाला लागली... तिने तात्काळ ऑफिसमध्ये Emergency leave साठी apply केलं आणि संबंधितांना धडाधड मेल पोस्ट केले. सुट्टी घेऊन हा प्रश्न कायमचाच सोडवून टाकते असा निश्चय तिने केला.... लगेच दुसऱ्या विंडोत ती बेबी सीटर्सचे पर्याय शोधू लागलीे. एकीकडे वरिष्ठांना घरी राहूनही आपण अर्धा दिवस ऑनलाइन कामे पूर्ण करू, असे आश्वासनही दिले.  कोणतेही काम आपल्यामुळे थांबणार नाही ह्याची ती पूर्ण काळजी घेणारी होती. ती तिच्या कंपनीतली सर्वांत efficient employee होती... हे बिरुद कायम ठेवण्यासाठी ती सतत धडपडत असायची . गेल्या 6 वर्षांत चार प्रमोशन्स तिने याच वृत्ती मुळे मिळवले होते.
समिधा प्रचंड महत्वाकांक्षी होती. लहानपणीपासून अत्यंत कष्टात दिवस काढलेल्या तिने , केवळ मोठं व्हायचं आणि खूप खूप पैसे मिळवायचे एव्हढंच आयुष्याचं ध्येय निश्चित केले होते . सोहम लॅच चे दार उघडून घरी आला... समू अजूनही ऑफिसच्या कपड्यांमध्येच होती तिची पर्स आणि बाकी सामान सोफ्यावर अस्ताव्यस्त पसरलेलं होतं.. ती अजूनही लॅप टॉप वर काम करत होती चेहरा अत्यंत त्रासिक... "वातावरण तापलेलं दिसतंय.." सोहमला अंदाज आला. आतल्या खोलीत पिल्लू खेळण्यांच्या पसाऱ्यात झोपून गेला होता... बहुदा त्याला खेळता खेळता झोप लागली असावी. हळुवार हातांनी त्याला उचलून ठेवायला गेला तर जागा होऊन पिल्लू रडू लागला , भुकेला असावा.. शांतपणे त्याने त्याच्या बॅग मधून बेबी फूड काढून त्याला भरवले , खाताखाता झोपुनही गेला .  आज समूचे काहीतरी बिनसले दिसत होते... त्याने नेहमीप्रमाणे पिल्लुची बॅग चेक केली, त्यात पोळ्या दिसल्या नाहीत. समूची आई बरेचदा पिल्लुसोबत पोळ्या पाठवून द्यायची... म्हणजे झटपट भाजी करून ती दोघे जेवायला बसत. आज पोळ्या नाहीत म्हणजे सासूबाईंची तब्येत बरी नाही की काय? बराच उशीर झाला होता आता ऑनलाइन देखील काही मिळायचे नाही. त्याने खिचडीचा कुकर चढवला, फ्रेश झाला आणि दोघांसाठी कॉफी घेऊन समीधा पुढे करत म्हणाला, 

"काय ग कसलं प्रेझेंटेशन आहे? काही नवीन प्रोजेक्ट का?" 

 समू एकदम भानावर येत म्हणाली,
 "सोहम तू कधी आलास? सॉरी , माझे लक्षच नव्हते, मी जरा कामातअडकले होते." 

बोलता बोलता समीधाने झटकन डोळे पुसले.

 "Oh My God! समू तू रडतेयस चक्क?? "

सोहमसाठी हा चांगलाच मोठा धक्का होता... आपली हट्टी, पोलादासारखी मजबूत बायको रडू शकते हेच त्याच्यासाठी नवीन होतं.  स्वतःला सोहमच्या मिठीत झोकून देत समू ढसाढसा रडू लागली. सोहमनी तिला वेळ दिला, मोकळेपणाने रडू दिलं... जरा वेळाने सावरत मूळच्या कडव्या रुपात परतून येत ती ठामपणे म्हणाली, 

"मी विराजची दुसरी काहीतरी सोय पाहतेय. " 

 "दुसरी म्हणजे? आई ठीक आहेत ना ?" सोहमने चमकून विचारले.

 "हो ,तिच्याच तर सोयीसाठी पाहतेय.  एखादे पाळणाघर किंवा बेबी सिटिंग." 

आता समूला काहीही सांगून उपयोग नाही हे एव्हाना सोहमला अनुभवातून कळलं होतं. उद्या जरा शांत झाल्यावर तिच्याशी बोलू असे ठरवून तो कामाला लागला.
                    समीधाच्या स्वभावातला कडवटपणा ही तिच्या अनुभवांची चव होती. समीधाचे बालपण तसे खडतर गेले होते. ती 9 वर्षांची असतांना वडील आजारी पडले... पुढे ते अनेक वर्षे अंथरुणाला खिळून होते... ती 15 वर्षांची असतांना ते वारले... खरंतर सुटलेच म्हणायचे. होते नव्हते सारे साठवलेले पैसे, आईचे दागिने त्यांच्या आजारपणात संपले. आईचे हाल ,आर्थिक ओढाताण तिला सहन व्हायची नाही. आई जेमतेम बारावी झालेली लगेच लग्न आणि समीधाचा जन्म ... पुढे नवऱ्याची सेवा आणि ढोर मेहनत नशिबात होती. जोवर समूचे आजोबा जिवंत होते तोवर त्यांच्या पेन्शन मध्ये भागायचे... किमान पोट भरायचे. पुढे त्यांच्या पश्चात  माय लेकीला दोन वेळचे जेवण मिळणे अवघड होऊ लागले. शिवणकाम, पापड लोणचे असे काही बाही कामे आई करायची पुढे तर पोळ्याही करू लागली, डबे करू लागली. आपल्या भावाला तिने समूचे शिक्षण चांगले व्हावे म्हणून मदत मागितली... मामाने समूला आपल्या घरी नेले; पण मामीच्या डोळ्यांत तिच्या मनाविरुद्ध घरात आलेले हे समिधा नावाचे ओझे सलू लागले. तिच्याकडून गुरासारखी कामे करून घे, सतत अपमान कर, वाट्टेल ते बोल असे प्रकार तिने सुरू केले. एकदा ती समूला आश्रित म्हणाली, त्याच क्षणी सतरा वर्षांची समू बॅग भरून घरी परतली. तिने ठामपणे आईला सांगितले , "मी तुला भार होणार नाही." बिचारी आई लेकराला पोटाशी धरून रडली आपण आपल्या अर्ध्या भाकरीतली चतकोर तिला देऊ मात्र आता कुठे पाठवायचे नाही हे ठरवले. समू मेहनती होती... टायपिंग शिकली. मिळेल ते काम कर, ट्युशन्स घे करत शिक्षण पूर्ण करीत राहिली. कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केले पुढे नोकरी करत पोस्ट ग्रॅज्युवेशन, अनेक लँग्वेज चा अभ्यास,अनेक अत्याधुनिक कोर्सेस करत ती स्वतःला घडवत गेली . प्रतिथयश कंपनीत मनाजोगी नोकरी मिळल्यावरही ती स्वस्थ बसली नाही. उलट पुढे जाण्याची तिची ओढ अधिक तीव्र झाली. ह्या साऱ्या दरम्यान आईवरचे तिचे प्रेम अधिकाधिक वाढत गेले. नोकरी मिळताच तिने सर्वांत आधी आईची सगळी कष्टाची कामे बंद केली. तिने आई आणि तिचं एक सुरेख जग नव्याने गुंफलं . आईला फिरायला ने, हॉटेलला जेवायला ने ,तिच्या आवडीच्या साड्या घे असे सारे सुख जे कधीही तिच्या आईने अनुभवले नव्हते ते सारे तिने आईसाठी मिळवले . हळूहळू समूचे वय वाढू लागले, तिने लग्न करावे म्हणून आई तिच्या मागे लागली. एककल्ली हट्टी समू तयार होत नव्हती. तिला आपले हेच आयुष्य छान आहे असे वाटत होते. आपल्या माघारी समिधाचे कसे? ह्या काळजीने आई पोखरून निघू लागली. अश्यात आईच्या भजनी मंडळाच्या ओळखीतूनच सोहमचे ठिकाण आले. सोहमला आईवडील नव्हते तोही कष्टाने मोठा झालेला, शांत समाधानी, मनमिळावू सोहम... आईला आणि पुढे समिधालाही आवडला. आईचा कायम सांभाळ करेन ह्या अटीवर समू लग्नाला तयार झाली. पुढे समिधाचे प्रमोशन्स आणि पिल्लुचा ...विराजचा जन्म , मोठे 3 बेडरूमचे घर ,गाडी सारे झपाट्याने झाले. मूळची महत्वाकांक्षी समिधा पुढे पुढे जात राहिली, पिल्लुची तिला काळजी नव्हतीच, तो आईजवळ अगदी मज्जेत असायचा.... अगदी सव्वा महिन्याच्या बाळंतपणानंतर ती जॉईन झाली तेव्हापासून आईच त्याचे सारे करत होती... जणू तिलाच बाळ झाले होते.
                     रात्री बरीच उशीरा झोपलेली समिधा सकाळी उशिराच उठली... तिचा एकंदरीत ताण पाहता सोहमनेही आपल्या ऑफिसला उशिरा येईन, असे कळवून टाकले. कॉफी घेत दोघे निवांतपणे बसले असतांना समिधाने घडला प्रकार सोहमच्या कानावर घातला.

 "इवल्या मुद्द्याचा गहजब केलाय तू समू ... आई थकू शकते, कंटाळू शकते हे तुला मान्यच नाहीये का?"

"अगदी मान्य आहे मला.. पण ते तिने ते थेट आणि स्पष्टपणे मला सांगायला हवे ना! "

समू चांगलीच दुखावली गेली होती... एव्हढ्यात आईंचा फोन आला... त्यांनी अनेकदा समूला केला असावा पण तिने बोलणे टाळले. समू संतापली की बोलतच नाही हे आई आणि सोहमला माहीत होते. आईंनी अखेर सोहमला कॉल केला. त्याही रडत असाव्या... अगदी अजिजीने गयावया करत त्या म्हणाल्या,

" तुम्ही तरी समजावून सांगा तिला. काल रात्रभर डोळ्याला डोळा नाही माझा. चुकलंच माझं! बोलण्याच्या ओघात बोलून बसले . सकाळपासून पिल्लू नाही तर लक्षच लागत नाहीये. "

सोहमने फोन स्पीकरवर ठेवला होता. समू तडकून म्हणाली...

"बोलण्याच्या ओघात ?? तेच मनांत होतं तिच्या. मी कधीही तिला म्हटलं नव्हतं की विराजला सांभाळ.. ना कधी काहीही अपेक्षा केली होती तिच्याकडून . ती जे काही करतेय ते तिच्या स्वेच्छेने... म्हणजे असं मला तरी वाटत होतं आजवर."

सोहमने शांतपणे फोन बंद केला ... तयार झाला. एव्हाना पिल्लू उठला होता. समू पिल्लुचे आवरण्यात व्यस्त झाली. गाडीची चावी घेऊन निघालेल्या सोहमला "कुठे?" अशी हातानेच खूण करत तिने विचारले... त्यावर 

"काहीतरी नाश्त्याला घेऊन येतो . "

असे म्हणून सोहम बाहेर पडला. त्याने थेट समूच्या आईचे घर गाठले... रस्त्यात जातांना थांबून त्यांच्या आवडीचे खमण घ्यायला तो विसरला नाही. गाडी पार्क करत होता एव्हढ्यात दंडवते काकूंची भेट झाली. कालच्या प्रकाराने त्याही बिचाऱ्या खजील झाल्या होत्या . समूला आणि तिच्या आईला त्या अनेक वर्षांपासून ओळखत होत्या... अनेक वर्षे शेजारी राहिल्याने घरोबा होता. त्या सोहमला म्हणाल्या,

"जावई बापू ! बरं झालं तुम्ही आलात. कालपासून समूची आई सारखी रडतेय... काहीही खाल्लं नाही की चहाही घेतला नाही. माझंच मेलीच तोंडच फाटकं ! मी कुठून विषय काढला नि कुठे गेला."

"असू द्या हो काकू. चालायचंच हे, आई मुलगी म्हटलं की वाद आलेच ."

सोहम समंजसपणा राखत म्हणाला नी जीना चढू लागला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत दंडवते काकू उडगारल्या..

"किती नशीबवान आहे समूची आई... सोन्यासारखा जावई मिळालाय. .... प्रेमळ, समजूतदार."

अचानक जावई आलेला बघून समूच्या आईला काय करू काय नको असं झालं, बावरून गेल्या त्या. त्यांचे रडून रडून डोळे सुजून गेले होते. झोपही झाली नसावी . नेहमीच्या गोडव्याने सोहम म्हणाला...

"सासुरवाडीला चहा घ्यावा म्हणून आलो."

"हो हो! करते ना . या या बसा सोहमराव."

"काय हे आई? कितीदा तुम्हाला म्हणालो मी सोहम म्हणा नुसतं! आणि मी नाही तुम्ही बसा... चहा मी करणार आहे."

"अहो ! नाही नाही असं कसं? करते मी "

"बसा हो आई! रोज तुमच्या लेकीला करून देतो हा गडी ... आज तुम्हाला."

दोघांनाही मनमोकळं हसू आलं . बोलता बोलता सोहमने डिश भरल्या ,चहा टाकला आणि सासूपुढे करत म्हणाला,

"घ्या ! तुमच्याशीच बोलायला आलोय. आधी पोटोबा मग होतीलच गप्पा."

सोहम सतरा वर्षांचा असतांना त्याची आई हे जग सोडून गेली... बाबांनी सारे घर एकहाती सावरले त्याला जाच नको म्हणून दुसरे लग्नही केले नाही. पुढे काही वर्षांनी तेही गेले... सोहम पोरका झाला... खरे सुखाचे दिवस पहायला आई नाही ही खंत सतत वाटायची त्याला. समूच्या आईच्या ठिकाणी त्याला त्याची आईच दिसायची. सासू आणि जावई ह्या नात्याचा संकोच सारून बरेचदा तो त्यांना म्हणायचा

"मला तुमचा मुलगाच माना आई."

समू जितकी टोकाची हट्टी, आक्रस्ताळी तितका सोहम शांत, लाघवी आणि समजूतदार होता. खाणं झाल्यावर अगदी सहज स्वरात त्याने विचारले..

"आई, पिल्लू फार त्रास देतो का हल्ली? थकवा येतोय का तुम्हाला ? "

"नाही नाही तसं नाही..." 
अनपेक्षितपणे गांगरून त्या म्हणाल्या.

"हे बघा! आपण मोकळेपणाने बोलूयात का ह्या विषयावर? बोलून प्रश्न सुटतात न बोलून मनांत अढी बसते ."

समूच्या आईच्या डोळ्यांना धारा लागल्या... "खरंच किती नशीबवान आहोत आपण किती समजूतदार जावई मिळाला." त्या मनाशीच म्हणाल्या. अतिशय संयतपणे त्यांनी आपली बाजू मांडली. त्यांना कधीतरी समवयस्क बायकांत भजनाला जावे वाटे... पहाटे त्या ज्या हास्यक्लबला जायच्या तिथली डबा पार्टी, छोटीशी पिकनिक कुठेतरी जायची अधून मधून तिथे त्यांना जावे वाटे... जवळच एक गाण्याचा क्लास सुरू झाला होता ,अनेक वर्षांपासून त्यांना गाणे शिकायचे होतेे. मात्र अनेक वर्षे घरांत काचल्या गेल्या होत्या त्या.... आता (विराजला )पिल्लुला सांभाळण्यासाठी त्या पुन्हा बांधल्या गेल्या होत्या. त्यांना विराजचा अडथळा, अडचण वाटत नव्हती उलट त्याच्याशिवाय त्यांनाच करमत नव्हते. विराजला सांभाळणे हा त्यांच्यासाठी आनंदाचा ठेवा होता..... मात्र आता त्याला पाय फुटल्याने तो घरभर धावायचा आणि त्याच्या मागे फिरून त्यांची दमछाक व्हायची . ऑफिसमधून थकून येणाऱ्या लेकीसाठी पोळ्या करून देणं असो किंवा तिच्या आवडीचे पदार्थ डब्यात भरून देणं असो हा सारा त्यांच्या आनंदाचा भाग होता. अगदी खरं सांगायचं तर त्यांना दिवासभरातला थोडासा वेळ फक्त स्वतः हवा होता, quality time.... त्यांचा कामाला नकार नव्हता, ना जबाबदाऱ्यांना नकार होता... आपण हे सारे समिधाला सांगितले आणि ती दुखावली तर पिल्लुला आपल्याकडे येऊच देणार नाही ही भीती त्यांना सतावत होती. सारे उमजून मान डोलावत सोहम म्हणाला...

"आज आराम करा आजीबाई! उद्या तुमचा नातू तुमच्या सुपूर्त करतो. आणि आठवड्यातले दोन दिवस तुम्हाला सुट्टी... त्यात मात्र बदल होणार नाही . एक दिवस रविवार कारण त्या दिवशी समूला सुट्टी असते... दुसरा दिवस तुम्ही सांगाल तो ... मी सुट्टीचा ऍडजस्ट करीन.  हे मान्य करणार असाल तरच उद्या नातू येणार . चालेल ?"

समूच्या आईने समाधानाने मान डोलावली.

"आणि खूप दिवसांत ते नारळी पाकाचे लाडू केले नाहीत तुम्ही. आता जावई म्हणून हक्कानेच सांगतो करायला ."

म्हणत हसत हसत सोहमने निरोप घेतला. घरी पोहोयला चांगलाच उशीर झाला होता, जेवायची वेळ झाली होती... समू वैतागली होती एकतर पिल्लूला आजीच हवी होती आणि समूला सगळ्याची सवयच नव्हती. सोहमने समूच्या आवडीचे जेवण ऑर्डर केलं आणि पिल्लूला मस्त खेळवू लागला. लॅप टॉप उघडून समूने काही नोंदी घेतल्या आणि म्हणाली,

"जेवण झाल्यावर आपण लगेच निघू. हे चार पाच पाळणाघर आणि बेबी सिटिंग सर्व्हिसेस मी शॉर्ट लिस्ट केल्या आहेत. आपल्या दोघांच्या ऑफिसच्या वाटेवरच आहेत म्हणजे पिल्लुला आणणे सोडणे सहज शक्य होईल...मला त्याच्या बाबतीत कुठलीही तडजोड, ऍडजेस्टमेंट नकोय . आपण सगळे नीट चेक करून घेऊया . "

सोहमनी समूचे दोन्ही खांदे धरले आणि तिच्या डोळ्यांत डोळे घालून विचारले...

"तुला खात्री आहे ह्या बेबी सीटर्स तुझ्या आईपेक्षा जास्त प्रेमाने विराजला सांभाळतील ?? "

समू निःशब्द होती... तिला ह्याची खात्री नक्कीच होती की तिच्या आईइतके मायेने कदाचित ती स्वतः सुद्धा विराजचं करू शकणार नव्हती. तोच विचारांचा धागा अलगद तिच्या नजरेतून टिपून घेत सोहम आश्वासकपणे तिच्या हातांना हातात घेऊन म्हणाला...

"समू ...मी काय सांगतोय ते नीट, शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी आत्ताच आईंना भेटून आलो. "

"तू का गेलास तिथे? मुळात तू का पडतोयस ह्या साऱ्यात?"
समिधा तोडून बोलली...

"कारण त्या माझ्याही आई आहेत आणि विराज माझाही पिल्लू आहे."

सोहमच्या आवाजातील जरबेने समू वरमली. पुन्हा आपले बोलणे मूळ पदावर आणत सोहम म्हणाला..

" तू फार मोठा गैरसमज करून घेतला आहेस. आईंना पिल्लुचा त्रास वगैरे होत नाहीये. खरंतर पिल्लू हा एकमेव आधार आहे त्यांच्या जगण्याचा. त्यांच्या आनंदाचा ठेवा आहे तो. मात्र तू कधी त्यांच्या बाजूने विचार केलाय का?  त्यांना थोडासा me time हवाय फक्त..."

"काय me time ?? म्हणजे काय ? "

"स्वतःचा थोडासा स्वतंत्र वेळ.. जो प्रत्येक व्यक्तीला हवाहवासा वाटतो . जो वेळ केवळ स्वतःसाठी राखून ठेवलेला असतो.  स्वतःच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यावर, कर्तव्ये निभावल्यावर काही इवले क्षण हवे असतात ना प्रत्येकाला. हा वेळ म्हणजे me time."

"आईला असा स्वतंत्र वेळ हवाय ?? असं तुला वाटतंय... मला तर कधी जाणवलं नाही."

"असच होतं समू... आपण काही व्यक्ती आणि काही नाती इतकी गृहीत धरतो की त्या अपेक्षांचे काच आवळले जाऊ लागतात... मग प्रेमाची जागा त्रागा , वैताग , चिडचिड घेत जाते. "

समू शांतपणे ऐकत होती....

" आईंना गाण्याचा क्लास करावासा वाटतो, भजनी मंडळात जावंसं वाटतं.. समवयस्क मैत्रिणींबरोबर कधीतरी पिकनिकला जावंसं वाटतं... ह्यात चुकीचं ते काय , सांग बरं?? त्यांची कर्तव्ये करायला त्या तयार आहेत पण आपली कर्तव्ये ...? आपण पार पडतोय का?"

"हे सगळं आईने सांगितलं तुला ? मला कधी नाही बोलली ती..." समिधा डोळे मोठे करत म्हणाली

"Please समू ! आता ह्याचा इशू करणार का तू? आधी आई दंडवते काकूंजवळ बोलल्या म्हणून रागवलीस... पण त्या एकट्या आहेत ,त्यांना सोबतीला त्या काकूच असतात . त्यांच्याजवळ त्या बोलणार इतकी साधी सोपी गोष्ट आहे."

दोघेही काही क्षण शांत राहिले.... सोहम पुढे म्हणाला.

"आजीच्या प्रेमाला सर नाही ...कितीही पैसे मोजलेस तरी जी निश्चिन्तता पिल्लुला आईंजवळ ठेवण्यात आहे ती कुठेही नाही. मात्र हे देखील विसरू नकोस की पिल्लू त्यांची नसून आपली जबाबदारी आहे... त्यांना तोडू नकोस आणि भारही होऊ देऊ नकोस."

समिधाच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्नांचे जाळे होते. सोहम पुढे म्हणाला...

"तुझा रविवारचा सुट्टीचा दिवस आणि माझा आठवड्यातील एक दिवस त्या सांगतील तो .. माझा विकली ऑफ flexible आहे... तो मी घेईन आणि आपण दोघे मिळून त्यांना दोन दिवस पूर्ण सुट्टी द्यायची ... हा वेळ म्हणजे त्यांचा me time..."

त्याच्या ह्या कल्पनेवर समिधा भलतीच खुश झाली... तिच्या मनावरचे सगळे दडपण क्षणांत दूर झाले. तेव्हढ्यात जेवणाचे मागवलेले पार्सल सुद्धा आले... पिल्लू घाईघाईने धावत येत पार्सल उघडू लागला... गरम असेल म्हणून अरे अरे ! करत दोघेही धावले. 
पिल्लुला उचलून घेत समू म्हणाली...

"हा दिवसभर असा धावत असेल तर आईची चांगलीच दमछाक होत असणार.. आता वरकामाला एखादी मुलगी शोधली पाहिजे आईच्या मदतीला . जेवली की नाही कोण जाणे आज. गोळी असते बी पी ची... विचारते तिला.." 
म्हणत समिधाने फोन लावला. सोहम पिल्लुला जवळ घेत म्हणाला...

"भांडण संपलं... आता उद्या ? "

"आ sss जी . आ sss जी ." पिल्लू म्हणाला.

©️🔏 यशश्री रहाळकर

बुधवार, १३ मे, २०२०

मूर्खांच्या नंदनवनात

                     वैश्विक महामारीच्या थैमानात ....लॉक डाऊन सुरू झाल्यापासून मी माझ्याच पुरता मनातल्या मनांत निश्चय केला होता की ह्या विषयावर संयम बाळगायचा. विषय खोल आहे, गंभीर आहे आपण गप्प बसायचं... मात्र मी कितीही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून शहाण्या मुलासारखी कोपऱ्यात शांत बसले तरी... लोक येऊन माझ्यातल्या उनाड, उचापती करणाऱ्या, दंगेखोर मुलाला चिथावणी देऊन जागे करतात. मग काय उचलली लेखणी अन् लागली खरडायला!.... ओहोहो! ☺ नवीन म्हणीचा जन्म झाला . असो! तर सांगायचा हेतू एव्हढाच की मी लिहिणार नव्हतेच लोकांनी अक्षरशः भाग पाडलं. घरात बसून  'Be safe be at home ' असे स्टेटस ठेवण्याचे अहोभाग्य आमच्या पूर्वजांनी आम्हाला लाभू दिले नाही .. मी काही warrior नव्हे बरं! वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट , त्यांच्या आषाढी कार्तिकी पैकी एक ही वारी...👍 चालायचेच . ह्या खांद्यावर येऊन बसलेल्या वेताळामुळे हॉस्पिटल गाठणे अनिवार्य होते... तिथेच माझ्या डोक्याला पर्यायाने लेखणीला रिकाम्या वेळात भरपूर खाद्य मिळाले. इथे तिन्ही त्रिकाळ मला समर्थांची आठवण होत राहिली.... दासबोधातली मुर्खांची लक्षणे जिवंत आजूबाजूला फिरताना बघून रामदास स्वामी त्रिकालदर्शी असावेत , ह्यावर माझा ठाम विश्वास बसला. मी हा जो काही लेखन प्रपंच करतेय तो कुणाचीही टिंगल करण्याच्या उद्देशाने नव्हे तर आपापले आत्मपरीक्षण करावे ह्या हेतूने... 👍 अनावधाने कुणी दुखावल्यास आधीच क्षमा मागते.... झालंय काय लोक सध्या बेजार झालेले आहेत... आधीच लॉक डाऊन, कोरोनाची भीती, आर्थिक ताण... आणि त्यात दारूच्या दुकानात ही एव्हढी रांग... देवा रे !  ताण घालवावा तरी कसा? त्यात दिवसभर बायको दिसणार हे ही adjust करायचे.... तर थोडक्यात सगळाच्या सगळा राग ह्या गरीबावर निघायचा.🙅 .... म्हणून माफी मागून सुरुवात करते.
                          भारतात सध्या सगळ्याच प्रकारच्या  मूर्ख शिरोमणींना अक्षरशः चरायला मोकळे रान मिळाले आहे. भरपूर रिकामा वेळ... आणि भरपूर रिकामटेकडे वाचक ... ह्यामुळे जुळून आलेल्या दुग्ध शर्करा योगामुळे काय वाट्टेल ते पोस्ट करायचे, हा प्रकार फारच बोकाळला आहे. जे काही आले ते धपाधप फॉरवर्ड करत जाण्यामुळे अफवा आणि चर्चांचा महापूर आला. ह्यात सर्वाधिक अवॉर्ड विनिंग अफवा म्हणजे ,"उपग्रहाद्वारे भारतावर कोरोना नाशकाची फवारणी" .... ही पोस्ट अनेक उच्च शिक्षित व्यक्तींनी आपले आद्य कर्तव्य असल्यागत फॉरवर्ड केली... मला त्या दिवशी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याची लाज वाटली . हसावे की रडावे हेही कळत नव्हते... खरंच कॉमन सेन्स हा एव्हढा अन-कॉमन असतो ??? त्या खालोखाल हास्यास्पद विडिओ म्हणजे एक रेडा सदृश्य माणूस कुठल्याश्या हॉस्पिटलचा डीन म्हणून  बरेच काही बोधमृत पाजायचा. गंमत म्हणजे दर वेळी त्याचे आणि हॉस्पिटलचे नाव बदललेले असायचे... तो कुठल्याच दृष्टीने डॉक्टरच काय कंपाउंडर देखील वाटत नव्हता. ही देखील पोस्ट इतके वेळा आली की मला डोळे मिटले तरी हाच प्राणी भुतासारखा दिसायचा. जिल्हाधिकारी/ आयुक्त/ कमिशनर ह्या लोकांच्या नावाने आदेश सूचना व्हाट्स अँप वर फेसबुकवर पहिल्या की माझे डोके सुन्न व्हायचे. साधीशी गोष्ट आहे मंडळी ,ह्या लोकांच्या अध्यादेशांना कायद्याचे स्वरूप प्राप्त असते.....त्यामुळे कुठलाही आदेश एका रीतसर मार्गाने सही शिक्क्याने जाहीर होतो. सध्या जिल्ह्यातील सगळी जबाबदारी ह्यांच्यावर आहे... हे सारे लोक प्रचंड काम करताहेत.. इतकं की आपण अख्ख्या वर्षभरात करत नाही. त्यांना सोशल मीडियावर घालवायला फावला वेळ नाही. त्यांच्या नावावर पोस्ट लिहिणाऱ्या आणि मग फॉरवर्ड करणाऱ्या लोकांना प्रत्येकी चार शिव्या मी घरातूनच देते... दोन लाथा घालण्याची देखील तीव्र इच्छा असते मात्र ती सध्या तरी पूर्ण होऊ शकत नाही. 
                       "पुस्तक दिसले की वाचायचे आणि माणूस दिसला की बोलायचे" हे माझे तत्व.  त्यामुळे icu बाहेरही मी निवांत गप्पा ठोकत बसते . एकतर तिथे लोकांना बोलायचे असतेच... कित्येकदा रडायचेही असते...😢👍 सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळत माझ्या चौकश्या सुरू व्हायच्या ..... मग कोसळलेल्या आभाळागत माणसे बरसू लागत . गेले काही दिवस साधारण 45 ते 50 वयोगटातल्या अनेक स्त्रिया ओ पी डी ला येत होत्या... दिसत तर ठणठणीत होत्या . .... आणि प्रत्येकीच्या हातात ecg . बहुतेकांशी बोलतांना जाणवले की ह्या स्त्रिया केवळ धडधडते म्हणून येत आहेत. गेले 10 दिवस मी हा प्रकार पाहते आहे. एक काकू बोलता बोलता म्हणाल्या , सतत कोरोनाच्या बातम्या वाचून सोशल मीडियावरील पोस्ट पाहून धडधडते . तर मेख अशी आहे... "एक बाधित स्त्री फिरताना आढळली." ... अश्या आशयाच्या बातम्या फिरतात तेव्हा ह्या बायका घाबरून जातात.  मुळात अशी बाधित व्यक्ती पाहून ओळखू यायला ती काय पिशाच्च आहे का ? हातात कँडल पांढरी साडी... आणि जर खरेच अशी व्यक्ती आढळली आहे तर यंत्रणेकडे रिपोर्ट करावा... सोशल मीडियावर अश्या फुटकळ अफवा माजवून काय होणार? सुजाण म्हणवणारे नागरीकही घाबरून जातात... आपण ह्यामुळे डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेवरचा ताण निष्कारण वाढवत आहोत. गेले काही दिवस मी नर्स, डॉक्टर, वॉर्डबॉय आणि अम्ब्युलन्स वाले ह्यांची जी काही धावपळ ह्याची देही ह्याची डोळा अनुभवली आहे त्याला साष्टांग प्रणिपात... आपण खरेच आवश्यकता नसेल तर हॉस्पिटलमध्ये जाणे टाळायलाच हवे. उगाच ही test करून पाहू अन् ह्या डॉक्टर ला भेटून बरं वाटतं हे वयस्कर लोकांनी थांबवले पाहिजे. एक पासष्टीचे काका रोज आपल्या पत्नी आणि आईला घेऊन येत होते .. साधारणपणे प्रत्येकी 20 /22 हजार खर्चून सासू-सूनेने ढीगभर टेस्ट करून घेतल्या ... त्या करताहेत तर मी का मागे राहू? इथेही स्पर्धा.🙅काका एक दिवस वैतागून म्हणाले, " दोघींच्याही डोक्यावर परिणाम झालाय,...रोज काहीतरी नवीन ... दोघींनी जीव नकोसा केलाय. " आजींना तर म्हणे त्या डॉक्टरांना भेटूनच बरे वाटते ... कठीण आहे. अश्या परिस्थितीत डॉक्टरांवर टीका करणाऱ्या पोस्ट viral होतात तेव्हा खूप वाईट वाटतं. 
                           कोरोना रुग्णांच्या आहारतालिका, भीमसेनी कपूर जाळा, लिंबू खा, सुंठाच्या गोळ्या खा... ह्यांसारख्या पोस्ट फॉरवर्ड करतांना सत्यता पडताळून पहिली जातेय का ? हा प्रश्न स्वतःलाच विचारायला हवा... अनेकदा वैद्यकीय व्यवसायाशी निगडित व्यक्ती सांगतातही की हे असं सरसकट सगळ्यांना सहन होतेच असे नाही... वेगवेगळ्या प्रकृती प्रमाणे आहार असावा... मात्र ह्या फॉरवर्ड च्या शर्यतीत आपलेच घोडे प्रत्येकाला दामटायचे असते . सायबर क्राईम अंतर्गत मध्यंतरी अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली... काही दिवस ग्रुप लॉक झाले पुन्हा जैसे थे.... कोरोना सारख्या गंभीर विषयावर माहिती प्रसारित करण्याचे अनेक शासकीय /वैद्यकीय जबाबदार लोक असतांना आपण आपली अक्कल का पाजळावी ?? मुळात सोशल मीडियाचा वापर घबराट निर्माण करण्याकरीता , दिशाभूल करण्या करीता का करतोय आपण? आज महाभारतातला कर्माचा सिद्धांत खरा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे... प्रत्येकानं आपापलं कर्म प्रामाणिकपणे करायचं. त्यातही वातावरणातली negativity पाहता आपण सद्विचारांचा एखादा दीपक लावू शकलो तरी पुरे... सध्या प्रत्येक जण एकटा पडलाय... भीती आहे, उद्या काय होईल? टेन्शन आहे. मला काही झालं तर मुलांचं कसं? हा ताण आहे.... माणसांची भीती वाटतेय एकमेकांना... आणि गरज आहे ती देखील माणसांचीच👍.... माझ्या मैत्रिणींचे नुसते फोन येऊन गेले तरी इतकं बरं वाटलं की काय सांगू !सोशल मीडियाचा वापर सध्या आपण एकमेकांशी कनेक्ट रहायला केला पाहिजे... भावनिक आधार, आनंद, कौतुक , प्रेम ... कित्येक सुरेख भावना आहेत ज्या पॉझिटीव्हीटी ची ऊब निर्माण करतात .आपण जे काही पोस्ट करतोय किंवा फॉरवर्ड करतोय त्याला आपण जबाबदार आहोत ह्याचे भान प्रत्येक सोशल मीडियाचा वापर करणाऱ्याकडे असलेच पाहिजे... नाहीतर सोशल मीडियाच्या बाबतीत आपण नुसतेच साक्षर झालो सुशिक्षित झालोच नाही असे म्हणायची वेळ येईल.
                       पूर्वी आपण वेळ मिळाला की करू म्हणून अनेक प्लॅन्स करून ठेवलेले होते... ते सगळे आपण नक्कीच प्रत्यक्षात आणू शकतो. जुन्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणे... नातेवाईकांशी फोन करून बोलणे, जुन्या आठवणींना उजाळा देणे... किती सुंदर आहे ना! त्यातही कोरोनाची आकडेवारी ह्या विषयावर बोलायचे टाळा. त्रास होत असेल /ताण येत असेल तर news सतत पाहू नका. गाणी गा, चित्र काढा , नाच करा, मुलांसोबत मस्त खेळ खेळा, अभ्यास करा.... घरातच मस्त फोटोशूट करा, वेगवेगळे पदार्थ करून पहा. आता ह्या दोन गोष्टींवर काही मंडळींचा तीव्र आक्षेप आहे..☺ मध्यंतरी साडी चॅलेंज, बेस्ट मॉम  आणि कपल चॅलेंजनी धुमाकूळ घातला होता... मला नाही पटले मी नाही भाग घेतला... इतके सोपे आहे ते!👍 ज्याला पटेल त्याला त्याच्या पद्धतीने आनंद घेऊ देत ना! टीका करणे फार सोपे आहे... पुढे त्यावरही कुणीतरी सायबर डिपार्टमेंट च्या नावाखाली पिल्लू सोडलं की ह्या फोटोंचा गैरवापर होऊ  शकतो ... अखेर घाबरून हे चॅलेंज प्रकरण बंद झालं. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आनंदी राहू पाहतोय... राहू द्या. सगळ्यांनी परिस्थिती बिकट आहे म्हणून गंभीर दुःखी तणावातच असायला हवे का?  लॉक डाऊनच्या सुरुवातीच्या काळात अनेक गृहिणींची जणू वेगवेगळ्या रेसिपी करण्याची चढाओढ लागली...ह्या जणू घोर पातक करताहेत अशी टीका केली गेली. उपलब्ध साहित्यातून वेगळा पदार्थ करून पाहणे म्हणजे उधळमाधळ नाही ना ! जरा गृहिणींच्या बाजूनेही विचार करा की... घरांत लहान मुले अक्षरशः अडकली आहेत त्यांना शांत , खुश ठेवण्यासाठी केव्हढा आटापिटा करावा लागतोय. ह्या सगळ्या काळात गृहिणींची जी काही सत्वपरिक्षा सुरू आहे त्याला नमन करायला हवे. काही वर्क फ्रॉम होम करणाऱ्या स्त्रिया तर याहून खडतर कार्य करीत आहेत... काम आणि घरकाम दोन्ही करणे खरेच अवघड आहे. पार्लर वर किंवा नटण्यावर टीका करतांना आपण दुसऱ्या बाजूला कौटुंबिक हिंसाचारात कमालीची वाढ झाल्याचे नमूद केले आहे का ? ज्यांच्याकडे अगदी लहान बाळ किंवा वृद्ध माणसे, आजारी व्यक्ती आहेत त्यांची काळजी तणाव आपण समजून घेत आहोत का?? प्रत्येकाने हा विचार केलाच पाहिजे.
                             गेल्या काही दिवसांत मी अनेक स्त्रियांच्या प्रेरणादायी कार्याविषयी जाणून घेतले... त्यातूनच कदाचित खूप प्रेरणा खूप आशावाद निर्माण झालाय.... दिसायला इवले पण अफाट कार्य...👍😊

★ माझ्या मैत्रिणीची आई वय वर्षे 70 , पती आजारी सुनेचे दुसरे बाळंतपण एकहाती केले... तिचा पहिला बच्चू सांभाळून कुणाच्याही मदतीशिवाय... तेही कोरोनाचा कहर असणाऱ्या इंदोरमध्ये .. कधीही न पाहिलेल्या त्या माऊलीला मी शतशः प्रणाम केले.

★एक शिवणकाम करणारी ताई आपल्या मशीनचा वापर करून फावल्या वेळेत काही करता येईल का ? अश्या विचारानी प्रेरीत झाली. घरातल्या जुन्या कॉटनच्या साड्या, जुन्या बेडशीट स्वच्छ निर्जंतुक करून तिने सुरेख मास्क शिवले... सोसायटी च्या बाहेर एक बॉक्समध्ये  ठेवून  दिले... भाजीवाले, फळवाले , भिकारी , मजूर अनेकांनी ते घेतले... 10 मास्क पासून सुरुवात केलेल्या तिने आज 40 ते 50 मास्क दरदिवशी बनवायला सुरुवात केली... कापड तिला एका सेवाभावी संस्थेने पुरवले. आज use n throw मास्क घेतला तरी 16 ते 20 रु किंमत आहे. किती ही निस्वार्थ सेवा!

★अनेक मैत्रीणींनी आपापल्या घरकाम करणाऱ्या बाईंना पूर्ण पगार देऊन रजा दिलीये. काहींनी तर 3 ते सहा महिन्यांचे पैसेही देऊन टाकले. कित्येकींनी किराणा भरून दिला, डाळी साळी, तेल ,गहू दिलेत... ह्या गोष्टी कुणी जाहीरपणे मांडत नाहीत पण आपल्या मुलांसारखेच तिच्याही मुलांचे पोट भरले पाहिजे... ही भावना किती लोभस आहे.

★काही स्त्रिया तर भन्नाट आहेत... सेवाभावी संस्थेअंतर्गत अन्नपदार्थ आणि औषधांची पाकिटे गरजूंना प्रत्यक्ष नेऊन देतात. त्यासाठी महानगरपालिकेची परवानगी काढून गाडीला स्टिकर लावून जागोजागी वस्त्यांमध्ये फिरून असे कार्य करतात.काही पोलिसांनाही चहा नाश्ता देतात.

★एक केटरिंगचा उद्योग करणारी मैत्रीण घरबसल्या काही करता येईल का असा विचार करू लागली. तिच्याकडे तांदूळ होते.. रोज 50 पाकिटे इडली चटणीची ती बनवून देऊ लागली. एका सेवाभावी संस्थेची गाडी येऊन तिने सोडलेल्या बादलीतून ही पाकिटे घेऊन जायची. त्या बिल्डिंगच्या अनेकींना ह्यातून प्रेरणा मिळाली . त्याही जमतील तशी पाकिटे देऊ लागल्या... आता सकाळी बिल्डिंगला बादल्याच बादल्या लटकलेल्या असतात... 800 ते 1000 पाकिटे इडल्या ती संस्था घेऊन जाते. 👍 थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ते ह्यालाच.

★अनेक भजनी मंडळे, भिशी ग्रुप मिळून प्रत्त्येकी 10 पोळ्या आणि भाजी असेही पार्सल एकेक दिवस पुरवले हेही मी पाहिले. तेव्हा खरंतर खूप आनंद झाला... आपण रामाच्या सेतूतील इवली खार झालो तरी चालेल , पण कुणा गरजूला जमेल तशी मदत करत राहायची.
परप्रांतीयांचे लाखोंनी लोक रोज नाशिक ओलांडत आहेत तेव्हा इथे आम्हाला अन्न पाणी मिळाले म्हणून कृतज्ञता व्यक्त करताहेत ते अश्याच अनेक सेवाभावी संस्थांच्या पुढाकारामुळे👍 आणि सामाजिक भान जपणाऱ्या अनेकांमुळे.

★औरंगाबादच्या एका मैत्रीणीच्या शेजारी राहणाऱ्या नर्सला कोरोना वार्डची ड्युटी लागली. नर्स ताई हॉस्पिटलमध्येच रहायला.. तिची दोन मुले सांभाळायला आजी होती. मात्र पोरं आईची आठवण काढून सारखी रडायची. दोघींच्या फ्लॅट मध्ये बाल्कनीची जाळी होती... मैत्रीण आपल्या पोरांसोबत बाल्कनीतच राहू लागली. खाऊ केला की त्यांना द्यायचा. सगळ्यांचा ऑनलाइन अभ्यास करून घ्यायचा.. पोरही गाण्याच्या भेंड्या खेळत, गप्पा मारत. रात्री बाल्कनीतच गोष्ट सांगायची . नर्स ताईंची लेकरे झोपली की आजी उचलून पलंगावर ठेवायची... मुले रमली. सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळूनही इच्छा असेल तर नक्कीच मदत करता येते ह्याचाच हा अनोखा धडा.

                               ह्या सगळ्या उदाहरणांमुळे माझा पूर्वीच एका तत्त्वावर विश्वास होतो तो अधिक दृढ झाला... ते तत्व म्हणजे ... " हे जग सुरळीत सुरू आहे कारण अनेक चांगली माणसे ह्या जगात आहेत." ही चांगली माणसे कुणी  वॉरियर नसतील पण माणुसकी, सहृदयता ह्यांचे मजबूत खांब आहेत.... उद्याच्या सुरेख आयुष्याची आशा आहेत. आपण कुणीही अमर नाही, प्रत्येक जण कधीना कधी जाणार आहोत. कधी आणि कोणत्या कारणानी हे माहीत नाही. आपल्या हातात त्या क्षणापर्यंतचे सुरेख आयुष्य आहे...ते आनंदाने भरभरून जगुया...👍 हृदयात माणुसकीचा दीप अखंड तेवत ठेवूया.😊

यशश्री रहाळकर