फॉलोअर

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

पांजरपोळ



                  देवस्थळी कुटुंब गेली 15 वर्षे आमचे शेजारी... देवस्थळी काका म्हणजे साधा, सरळ, पापभिरू माणूस.. न कोणाच्या अध्यात न मध्यात. झेड. पी.त क्लार्क होते... आपण बरे नि आपले काम बरे अश्या वृत्तीचे..... वरच्या पैशाचे काळे मार्ग त्यांनी त्यांच्यापुरते बंद केले होते. "पैसा एका मर्यादेच्या वर आला की तो सुख आणत नाही तर मनःस्तापाची गाठोडी घेऊन येतो..." असे ते नेहमीच म्हणत. देवस्थळी काकू गृहिणी  .. फारश्या अपेक्षा नसणाऱ्या , नवऱ्याच्या आणि मुलांच्या आनंदात सुख शोधणाऱ्या. त्यांना दोन मुलगेच...मोठा सदानंद आमच्याहून 6 वर्षे मोठा...आम्ही त्याला सदादा म्हणायचो .... मी आणि धाकटा अभिजित वर्गमित्र. सदानंद आणि अभिजित दोघेही अतीशय हुशार, वर्गातल्या पहिल्या तिनातले ... जोडीला मेहनती आणि अभ्यासू. फरक एवढाच होता की अभिजीतच्या महत्वाकांक्षा मोठ्या होत्या, त्याची स्वप्ने सुद्धा मोठी असत. चित्रकलेच्या तासाला आम्ही जेव्हा बाग, कौलारू घरे, डोंगर वगैरे काढायचो तेव्हा त्याने आलिशान बंगला आणि मर्सिडीजचे चित्र काढलेले असायचे. विज्ञानाच्या प्रयोगांसाठी जेव्हा आमचा विषय ओल्या कचऱ्यापासून खत वगैरे असायचा तेव्हा त्याने विमानतळावरचे सिग्नलिंग उभे केले असायचे. 'मी अंतळारवीर झालो तर....' , 'मी राष्ट्रपती झालो तर... ' किंवा 'मी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर झालो तर.... ' अश्या प्रकारचे निबंध हा पठ्ठ्या इतके भारी लिहायचा की त्याला पैकीच्या पैकी गुण मिळत ; बरेचदा सुंदर हस्ताक्षराचे अधिक 2 गुण त्याचेच असायचे. हा नक्कीच मोठेपणी कुणीतरी मोठ्ठा माणूस होणार ह्याची आम्हा सगळ्या मित्रमंडळींना खात्रीच होती. 
                  सदादा हुशार असला तरी शांत होता, हळवा होता..... त्याचे सगळे शिक्षण त्याने गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून पूर्ण केले. भरमसाठ पैसे भरून पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे नाही असा  निर्णय त्याचा त्यानेच घेतला.. मिळेल तो जॉब स्वीकारून Online MBA course ची निवड केली. पुढे 2/3 वर्षांतच उत्तम बढतीसह चांगल्या नावाजलेल्या कंपनीत रुजू झाला. "ह्या सगळ्या स्ट्रगल मध्ये आयुष्याची महत्वाची वर्षे त्याने फुकट घालवली", असे आमचा दोस्त अभि म्हणायचा... अभि म्हणतो म्हणजे बरोबरच असेल .. आम्ही काठावर पास संघटनेचे आजीवन सभासद. आमचा रिझल्ट लागला की अभिचे मार्क पाहून आम्हाला चार शिव्या जास्तच पडायच्या. "जरा शीका काहीतरी त्या पोराकडून..." ह्याच वाक्याने सुरुवात करून साधारण आमचे सगळ्यांचे तीर्थरूप शेलकीच्या शिव्या घालत. अभिला IIT पवई लाच ऍडमिशन हवी होती त्यासाठी त्याने प्रचंड ढोरमेहनत केली. तिथून सुट्टीसाठी घरी आलेला अभि आंतरबाह्य बदलला होता.. त्याने पाहिलेल्या नव्या जगात केवळ पैसा आणि यशाची नशा होती... हो! नशाच म्हणायला हवे कारण त्या मार्गावरही कुठे थांबायचं हे माहितीच नसतं . मला जे जाणवलं अगदी तसच आमच्या इतर मित्रांना सुद्धा जाणवलं होतं. संध्याकाळी कट्टयावर जग्या आणि संज्या सुद्धा मला म्हणाले,

 "विकी यार अभि आता आपला दोस्त नाही राहिला... मोट्टा मानूस झाला बाबा!" ... 

हळूहळू अभिचं आणि आमचं जग दूरावत गेलं... मी मात्र अगदी शेजारीच राहत होतो.. त्यामुळे त्याचा सगळा हाल-हवाल आपसूक कळायचा. सदादाच त्याच वर्षी  लग्न झालं... वहिनी जवळच्या शाळेत शिक्षिका, अतिशय सोज्वळ, लाघवी.... सोसायटीत सगळे जण त्यांचे कौतुकाने नाव घेत. देवस्थळी काका काकूंची ह्या सुनेवर लेकीसारखी माया. सगळे सणवार, रीती भाती, पाहुणे सारं ती हसतमुखाने सांभाळून घ्यायची. सदादाला बच्चूच्या येण्याचे वेध लागले... आता हे चार खणी घर लहान पडू लागलं. त्याने एक प्रशस्त बंगलाच घेतला... बंगला जरा जुनाच होता पण त्याची रंगरंगोटी, डागडुजी करून तो अगदी नव्यासारखा दिसू लागला. त्याच्या घरभरणीच्या कार्यक्रमात अभिची भेट झाली...सहज काहीतरी बोलायचे म्हणून मी म्हणालो,

 "अभि बंगला कसला प्रशस्त आहे... आता तुम्हा सगळ्यांना एकत्र राहतांना अडचण होणार नाही."

 तोडून टाकल्यागत  अभि म्हणाला...

"मी इथे कशाला येतोय... तशी सदादाला दुसऱ्यांच्या जुनाट वस्तू वापरायची सवय आहेच... नवा असता तर वेगळी गोष्ट होती... रिसेलचा आहे .. ठीक आहे."

नेमके वहिनींनी हे ऐकले आणि डोळ्यांतले पाणी कुणाला दिसणार नाही असे पुसूनही टाकले.. माझ्या मात्र तोंडात मारल्यागत झाले... पुढे अभि स्वतःहून काही बोलेपर्यंत मी तोंड उघडत नसे. देवस्थळी कुटुंब आता बंगल्यात शिफ्ट झाले... आता हळूहळू आमचा संपर्क कमी कमी होत गेला. कधीतरी दूध बाजारात काका भेटायचे , कधीतरी सदादा मंडईत भेटायचा ... आवर्जून थांबून आपुलकीने चौकशी होई... पहिल्या लेकाच्या पाठीवर सदादाकडे गोड परी आली होती. तिला पहायला जाण्याच्या निमित्ताने आई निघाली.. मग तिला सोडायला म्हणून आमची वर्णी लागली. सुट्टीसाठी म्हणून अभि आला होता.. अभि अपेक्षेप्रमाणे कॅम्पसमधेच सिलेक्ट झाला होता...  त्याला सुरुवातच ऐंशी हजारने मिळाली होती... आयुष्यात एव्हढे पैसे वर्षभरात एकत्र न पाहिलेल्या आम्हाला कोण कौतुक वाटलं... त्याचं अभिनंदन करायला गेलो तर तो तोंड पाडून बसला होता... लाखाच्या घरात किमान स्टार्ट मिळणार ही खात्री असल्याने तो नाराज झाला होता... पुढे अभि वाढता पगार वाढती पोस्ट ह्यांच्या मागे धावत सुटला... लग्नाला तसा उशीरच झाला... आईवडिलांनी आणलेली स्थळे अभि धडाधड नाकारत सुटला... त्याला किमान 70 हजार पगार कमवणारी मुलगी हवी होती. मी त्याला म्हणालो ही.. 

"तू एव्हढा गडगंज पैसा कमावतोय कश्याला हा हव्यास..??"

"विकी तुला कळणार नाही यार... पुणे बंगलोर अश्या शहरांत उच्चभ्रू वस्तीत रहायचे म्हणजे कितीही पैसा कमीच पडतो."

                      "पैसा हे सुख मिळविण्याचे साधन नसून जीवनाचे साध्य आहे "... ह्या विचारसरणीवर अभिचा प्रवास सुरु झाला होता. वयाच्या पस्तिशीत अखेर अभिला ऐंशी हजार पगार असणारी बायको मिळाली... तिच्या काही अटी होत्या .. त्या अभिने मान्य केल्या, कदाचित वय वाढल्याने कराव्या लागल्या. ती नाशिकला येऊन राहणार नाही, ती तिची नोकरी सोडणार नाही, तिचे स्वातंत्र्य तिची स्वायत्तता.. वगैरे सारीच नाणी तिने वाजवून घेतली. रिसेप्शनला बॉब कट , वन पीस घातलेल्या सुनेची ओळख करून देणे सुद्धा देवस्थळी काका काकूंना लाजिरवाणे झाले.. 

"नवीन सूनबाई हॉटेलात उतरल्या होत्या म्हणे..." 
आमच्या मातोश्रींना एक सखी सांगत होती.

                  पुढे पाच सहा वर्षे अभि आणि वहिनींचे फॉरेनचे दौरे, प्रमोशन, जास्त पगार, नवी नोकरी, अजून जास्त पगार हे चक्रवाढ गतीचं आयुष्य सुरळीत सुरू असावे. एक दिवस गंगेवर देवस्थळी काका भेटले. त्यांनी अभिला मुलगा झाल्याचे सांगितले.. त्यांचे अभिनंदन करत मी अभिचा नंबर मागून घेतला. अभिला अभिनंदनासाठी खास फोन करू म्हणून मी फोन केला... 42 व्या वर्षी अभि बाप झाला होता.. ह्या वयात अर्धा संसार आटपतो इतरांचा.... पण अभिची गोष्टच वेगळी होती.

"अभि .. विकी बोलतोय रे! तुम्हा दोघांचे अभिनंदन.. आईबाबा झालात.. बाळ कसे आहे आणि वहिनींची तब्येत?? "

"थँक्स... आम्ही मूल नको असेच ठरवले होते. You know DINK culture...Double Income No Kid... आम्हाला हे मूल जन्माला घालणं वाढवणं वगैरे साठी वेळ नाही... we both are too busy... आम्हा दोघांचे आईबाबा फारच मागे लागले आणि  लोकांना सुद्धा फार प्रश्न पडायचे .. मग ठरवलं आम्हाला मूल होऊ शकत नाही असा कुणी शिक्का मारायला नको."

मला पुढे बोलायची इच्छाच उरली नाही. काही महिन्यांनी काका जुन्या घरात नवा भाडेकरू टाकण्यासाठी आले... बराच वेळ आईबाबांशी बोलत बसले होते. 

"अभि आणि सूनबाई सध्या पुण्यात आहेत...अभिच्या बायकोने मुलाला जन्म दिला तसे त्या बाळाला आईवडिलांकडे सोडून 2 महिन्यात ती पुण्याला गेली. आता बाळ औरंगाबादला असते... हक्काचा नातू असून पाहता येत नाही, खेळता येत नाही की भेटताही येत नाही... "
काकांनी डोळे टिपले.

"कधीकधी वाटतं नातवाला जाऊन घेऊन यावं पण आता ही सुद्धा थकलीये शिवाय धाकट्या सूनबाईंना ते आवडणार नाही. माय बाप ,आजी आजोबा, काका काकू, दादा ताई सगळी नाती असून पोर पोरक्यासारखं वाढतंय.. काळीज तिळतीळ तुटतं .. पण इलाज नाही."

देवस्थळी काका गेल्यावर आयुष्यात पहिल्यांदा आमच्या तीर्थरूपांनी खांद्यावर हात ठेवत म्हटलं..

"विकी ! तू अभि कडून काहीच शिकला नाहीस हे फार बरे केले बाबा."

                        काळ आपल्या वेगाने पुढे सरकत होता.... सतत ताण, स्पर्धा, धावपळ, हव्यास... काय परीणाम व्हायचा तोच झाला.. ऐन पन्नाशीत अभिला हार्ट अटॅक आला.. तो अटॅक इतका मेजर होता की तातडीने त्याची बायपास करावी लागली. हृदयाने अतिताणाने कामच कमी केले होते... ठिकठिकाणी ब्लॉकेजेस... इथून पुढे जिवंत रहायचे असेल तर लाईफ स्टाईल बदलण्याचे डॉक्टरांनी खडसावताच..... अभिने अर्ली रिटायर्ड प्लान निवडला... पैसा बेसुमार कमवून ठेवला होताच त्याने.. पुढे consultation firm किंवा स्पर्धा परीक्षांचे क्लासेस सुरू करण्याचा त्याचा विचार होता. नोकरी सोडली आणि एक प्रचंड मोठी पोकळी त्याच्या आयुष्यात निर्माण झाली... मानसिक समस्यांनी ग्रस्त होत त्याला मानसोपचारांची गरज भासू लागली. सदादाने त्याला आरामाला नाशिकला ये म्हणून आग्रह केला...त्याचे आई बाबा आता बरेच थकले होते.. कसा कोण जाणे अभि यायला तयार झाला... आयुष्याची किंमत मोजून अभि माणसांत आला होता... आता तो स्वतःहून बरेचदा मला फोन करायचा. मित्र मंडळींच्या जुन्या आठवणी काढून चौकशी करायचा... आम्ही कट्टा मित्रमंडळ रोज सकाळी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला नेमानी जमायचो.. चकाट्या पिटत कुटाळक्या करत चहा पिऊन घरी यायचो... आम्हाला कधी हास्य क्लब वगैरे लागले नाहीत.. तसेच आम्ही मजेत असायचो.
एकदा अभि सुद्धा मॉर्निंग वॉकला आला... आम्ही नेहमीसारखे संज्याची खेचत खिदळत होतो.... काय वाटले कुणास ठाऊक?? अभि माघारी वळला... आम्ही सगळ्यांनी त्याला पाहिला... मी त्याच्या पाठी धावत सुटलो....

"पन्नाशीत किती पळवशील लेका!"

म्हणत त्याच्या पाठीवर थाप मारली... अभि रडत होता... त्याला नेहमीच्या चहाच्या टपरीवर घेऊन गेलो... थोड्या वेळाने तो शांत झाला... 

"आयुष्यात खूप काही गमावलं मित्रा मी..."

मी गप्प राहून त्यालाच बोलू दिलं..
एका गेटकडे बोट दाखवून तो म्हणाला...

"तो मला त्याच्या सोबत मंदिराजवळच्या पांजरपोळात घेऊन गेला... म्हणाला इथे म्हातारी गुरे, रस्त्यावरच्या गायी आणि त्यांची नको असलेली वासरे आणून ठेवतात... त्यांना भरपूर खायला प्यायला , पशु आहार वगैरेही देतात.... उत्तम निगा राखतात त्यांच्या आरोग्याची ... पण एक मात्र त्यांना मिळत नाही जे गोठ्यातल्या जनावरांनाही मिळतं... 'मायेचा स्पर्श'.... पुढे माझा लेक काहीही बोलला नाही. मी काय समजायचं ते समजून गेलो." 

मी मूकपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवला . छोकरा खरंच हुशार होता अगदी बापाच्या एक पाऊल पुढे होता.

"विकी ... मायेचा स्पर्श नसेल तर आपले म्हातारे मायबाप , आपली पोरं सगळ्यांचं जगणं पांजरपोळ होतं रे! फक्त पैसा पुरेसा नसतो... खूप काही लागतं त्या पलीकडचं. "

अभि पुन्हा रडू लागला... त्याच्या सांत्वनाला माझ्याकडे शब्दच नव्हते.

🔏©️ यशश्री रहाळकर


 

भानोशी


                        केशव अगस्ती आज नेहमीप्रमाणे उशीराच उठला..... आता उठवायला सीमा नव्हती, वाजायला आलार्न नव्हता, गोंधळ घालायला आल्हाद नव्हता आणि ... ... आणि तो आता कधीच उठला नाही तरी ह्या जगाला घंटा फरक पडणार नव्हता. कंपनीत गेल्यामुळे ज्या काही चार दोन डोक्यांना तो दिसायचा त्यांनाही आता भेटणार नव्हता...लॉक डाऊन मुळे तो पुरता घरांत अडकून पडला होता. Work from home च्या नावाखाली दुपारी 3 पासून मध्यरात्री पर्यंत बराच वेळ त्याची शिफ्ट चालायची... अश्या रटाळ मीटिंग्जना अंत नसतो. तो आता का जगतोय ? कुणासाठी जगतोय ? ह्या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नव्हती. सीमा घर सोडून गेल्यापासून आयुष्य उदास, केविलवाणे झाले आहे असे त्याला वाटायचे . सीमावर त्याचे किती प्रेम होते ह्या प्रश्न अलाहिदा ....पण बायको दुसऱ्याचा हात धरून पळून गेलीये म्हणून लोक सतत हळहळायचे, सतत कुणीतरी त्याची कीव करायचे... ह्या साऱ्याचा त्याला उबग आला होता. आता आपली जगण्याची इच्छाच उरली नाही असे रोज  सकाळी उठल्यावर त्याला वाटायचे. तशी सीमा अगदीच पळून गेलेली नव्हती तर रीतसर सांगून सवरून निघून गेली होती... गेली दहा वर्षे ती एकतर्फी केशवशी जुळवून घेत होती.... जोवर केशवशी आई होती तोवर तिला एक प्रकारचा आधार वाटत असावा... मात्र आई डिसेंम्बर अखेर गेली आणि सीमाने 12 जानेवारी 2020 ला  शांतपणे ती घरातून निघून जाणार असल्याचे सांगितले.... आणि केशवच्या आयुष्याचे बारा वाजले. ती तिच्या विधुर बॉस अनुराग बोस सोबत लिव्ह इन मध्ये राहणार असल्याचा निर्णयही तिने स्पष्टपणे केशवला सांगितला. त्यामुळे त्याची संमती किंवा घटस्फोट ह्याचीही तिला गरज उरलेली नव्हती. ह्या सगळ्यांत सर्वाधिक वाईट गोष्ट म्हणजे ती त्यांचा आठ वर्षांचा मुलगा आल्हादला आपल्या सोबत घेऊन गेली. अर्थात... केशव त्याला भेटू शकणार होता , त्याला तिची हरकत नव्हती पण आता लॉक डाऊन मध्ये केशवला तेही शक्य होईना. आल्हाद हे त्याच्या नीरस आयुष्यातले एकमेव चैतन्याचे अस्तित्व होते.
                        मध्यरात्री नेहमीप्रमाणे काहीतरी तोंडात टाकून तो आडवा झाला आणि त्याला जुना वाडा बोलावतो आहे असा भास होऊन तो अचानक जागा झाला. तो घाबरून जागा झाला तेव्हा घामाघूम झाला होता.. त्याला चांगलीच धाप लागली होती. तो पाणी प्यायला म्हणून उठला , तोंडावर पाणी मारून तो नीट जागा झाला होता. अजूनही वाडा त्याला बोलावत होता... "केशवा ! केशवा! बाळा ..ये रे किती वाट पाहू" कुजबुजत्या आवाजात त्याला तळमळीने घातलेली साद त्याला अजूनही ऐकू येत होती... हा ... हा भास नक्कीच नव्हता. त्याने आईच्या खोलीकडे धाव घेतली.  आईच्या कपाटाच्या तळाशी एक छोटीशी लाकडी पेटी होती. पूर्वी स्त्रियांच्या दागिन्यांची पेटी असायची तसे काहीसे रुपडे असणारी ही पेटी चंदनाच्या लाकडातील होती... पेटी उचलतात चंदनाचा सुगंध सभोवती दरवळू लागला... पेटीच्या पितळी कडा अंधारात एखाद्या मांजराचे डोळे चमकून जावे तश्या चमकून गेल्या.. त्याने भर्रकन लाईट लावला... उजेडातही तो आवाज त्याला ऐकू येतच होता... त्याने पेटी उघडून आतले सामान घाईने बाहेर काढले. आत काही फोटोग्राफ्स होते. त्याचे आजी आजोबा आणि आजोबांच्या कडेवर त्याचे बाबा, दुसऱ्या फोटोत आई बाबा आणि बाबांच्या कडेवर तो... तिसरा फोटो त्यांच्या वडिलोपार्जित वाड्याचा... बरोबर ! हाच तो वाडा जो त्याला स्वप्नात दिसला होता. फोटोतूनही जणू वाडा रडतोय असा भास त्याला झाला. अचानक त्याला आठवलं त्याची आजी जिवंत होती ती अजूनही असावी त्या वाड्यात... काय बरं वय असेल तिचं 90 च्या वर नक्कीच असेल. त्याच्या अगदी लहानपणी बाबा असतांना बरेचदा तो त्या वाड्यात सुट्टीसाठी जायचा. आजी तेव्हा त्याचे कित्ती लाड करायची... तो मागेल ते हजर करायची त्याच्यासाठी... मग तो लाकडी घोडा असो, मोठ्ठे विमान किंवा सायकल. गाई गुरे, शेती , मोकळी हवा सारे त्याला फार आवडायचे.. तो बारा वर्षांचा होता तेव्हा त्याचे बाबा एका अपघातात गेले... नंतर त्यांच्या जागी आई नोकरीत लागली. तिनेच केशवला लहानाचे मोठे केले पण काय झाले कोण जाणे तिने गावाकडे जाणेच सोडले...आजीचे नावही ती त्याला घेऊ देत नसे. उभे आयुष्य केशवने अंधेरी ईस्टला काढले.. हळूहळू त्याला साऱ्याचा विसर पडला.... आज काय झाले होते कुणास ठाऊक पण त्याचे जुने घर त्याला बोलावत होते... कदाचित आजीचे काही बरे वाईट??.... इतके वर्षांत आजीशी त्याचा काहीही संपर्क नव्हता त्यामुळे ती आहे की नाही हेही त्याला कळत नव्हते. शेवटी त्याने ठरवले आपला वडिलोपार्जितला वाडा शेती वगैरे सारे पाहून तर येऊ . तसेही आता एकटेपण फार खायला उठते आहे बदल हवाच होता. आणि ऑनलाईन काम तो कुठूनही करूच शकला असता. त्याने मनातल्या मनात जायचे निश्चित केले आणि त्याला ऐकू येणारे आवाज बंद झाले. 
                 दुसऱ्या दिवशी त्याने जुजबी सामान, थोडे कोरडे खाणे, लॅपटॉप; टॅब ; मोबाइल चार्जर वगैरे सगळे गॅझेट्स बरोबर घेतले.... ऑनलाइन पोलीस परमिशन काढली... आजी एकटी आहे , त्यामुळे तातडीने गावाकडे जायचे असल्याचे कारण नमूद केले आणि काय आश्चर्य लगेच दोन मिनिटांत त्याला परवानगी मिळाली सुद्धा. लगेच त्याची स्कॉर्पियो काढून तो सर्वेश्वरीला निघाला सुद्धा.... सर्वेश्वरी ह्या नावाचे पिटुकले गाव त्याचे मूळ गाव ...महाराष्ट्र आंध्रप्रदेश च्या बॉर्डरवरचे खेडे. इतके दुर्गम की तिथे थेट जायला बसेस नव्हत्या ... 2 फाट्यांवर वेगवेगळ्या काळीपीवळी बदलून आत जावे लागे... सर्वेश्वर महादेवाचे एक प्राचीन दगडी मंदिर तिथे होते... हे मंदिर सुमारे 1300 वर्षे जुने... अतिप्राचीन, यादवकालीन .कसे कोण जाणे त्याच्या डोळ्यांपुढे ते मंदिरही उभे राहिले. आजी रोज सकाळी मंदिरात जातांना त्याला घेऊन जायची. नाजूक बांधा, चाफेकळी नाक, गोरा रंग , पिंगट तपकिरी डोळे आजी देखणीच होती... अगदी मुलायम सायीसारखा तिचा स्पर्श केशवला अजूनही तसाच्या तसा आठवला. बाबांच्याकडे मात्र यातली एकही रूपाची खूण नव्हती... तशी ती आपल्यालाही मिळाली नाही... फक्त एक सोडून पिंगट तपकिरी डोळे... त्याचे डोळे अगदी आजीसारखे होते. चांगलाच लांबचा रस्ता कापायचा म्हणून जरा लवकरच केशव निघाला खरा पण लॉक डाऊनमध्ये फारशी वाहने रस्त्यावर नसल्याने तो झपाट्याने पुढे निघाला . जवळपास 25 वर्षांनी तो आपल्या मूळ गावी निघाला होता मात्र आश्चर्य हे की त्याला कुठेही रस्ता विचारायला थांबावे लागत नव्हते.. गुगल मॅप कधी नव्हे तर झपाट्याने पळत होते... पुढच्या गावांच्या पाट्या अंधारात दिवे लागल्यागत चमकून जात होत्या... त्याचा गाव त्याचा वाडा त्याला मार्ग दाखवत होता. सर्वेश्वर मंदिराच्या दक्षिणेला मोकळे माळरान ओलांडले की काळाशार भव्य दिंडी दरवाजा लागे ... माणसांना जायला यायला त्यात एक पिटुकले दार होते... मग भलेथोरले अंगण पार केले की दिसायचा चौसोपी वाडा . पडवी ओलांडली की मोठा चौक त्यात  मोठा कोरीव हौद आणि पितळीचे घंगाळ तिथे पाय धुवून आत जायचे... उजव्या बाजूच्या चौसोपीत भली मोठ्ठी बंगळी त्याचा कर्र कर्र असा आवाज घरभर घुमत असायचा... बंगळीच्या पितळी कड्या हत्तींच्या सोंड एकमेकांत अडकवलेल्या अश्या आकृतींच्या होत्या...  त्यावर पांढरी शुभ्र सोनेरी काठाची रेशमी नऊवारी चोपून नेसलेली आजी बसलेली असे. आजीजवळ बहुतेक पानाचे चांदीचे तबक असायचे त्यातला सुरेख नक्षीकाम केलेला चांदीचा अडकित्ता उन्हे पडली की आगळ्या तेजाने लकाकायचा ... त्याच्या टोकांशी घुंगरे अडकवलेली होती... आजी सुपारी कातरायची तेव्हा त्याचा छुन छुन असा आवाज अख्ख्या घरांत ऐकू यायचा.आजी आंध्रकडच्या गावातली असावी... तिचे उजव्या बाजूचे नाक टोचले होते.. त्यात पांढरे शुभ्र मोत्याचे फूल असायचे. तिच्या अंगावर मोजकेच पण वजनदार सोन्याचे दागिने कायम असत... हे सारे जणू डोळ्यांपुढे नाचतेय... का आठवतयं हे सारं?? आणि आजच का आठवतंय?? तेही इतक्या बारीक बारीक बारकाव्यांनीशी. बराच वेळ ड्रायव्हिंग करून आणि आठवणींच्या गर्तेत गुंतून पडल्याने केशवचा मेंदू चांगलाच शिणला होता... रस्त्यावरच्याच एका ढाब्यापाशी तो थांबला. गर्दी नव्हतीच फारशी... सर्वांत आधी त्याने आपल्या ऑफिसला तातडीच्या रजेसाठी मेल केला आणि आपल्या गावी जात असल्याने तिथे पोहोचताच संपर्क करण्याचे आश्वासन दिले. मग मस्त खाटेवर बसून त्याने बटर रोटी, दाल तडका आणि लस्सी चापली.. आपल्याला बऱ्याच वेळची कडाडून भूक लागली आहे हे तेव्हा कुठे त्याला जाणवले. यथेच्छ जेवल्यावर सावलीतल्या खाटेवर त्याने मस्त ताणून दिली.... आणि पुन्हा तेच स्वप्न, "केशवा! केशवा! बाळा ये रे किती वाट पाहू?" ,.... वाडा त्याला बोलावत होता... पुन्हा धडपडत तो जागा झाला. "केशवा!" अशी हाक त्याला आजीच मारायची... पण तो आवाज आजीचा नव्हता... आवाज वाड्यातू येत होता... वाड्याच्या सळया, छप्पर, खांब, पडवी , सोपे सगळे सगळे त्याला  अजीजीने बोलावत होते... काहीतरी तातडीचे आहे... लगेच निघायला हवे... असा विचार करत तो उठला . एक कप चहाने जरा तरतरी आली नि तो मार्गस्थ झाला.
                      रस्ता निर्मनुष्य होता... एखादी वेगवान गाडी किंवा एखादाच ट्रक त्याला ओलांडून जायचे... क्वचित कुठेतरी गुराखी गुरे घेऊन रस्त्याच्या कडांना दिसायचे. गुरे पाहताच त्याला आठवले ...वाड्याच्या मागच्या अंगणात गुरे बांधलेली असायची . आजीकडे गावातली सर्वोत्तम गुरे होती.. काळी कपिला आणि तिचे शुभ्र वासरू तर अतिशय देखणे होते... मागच्या बाजूला गडी माणसांसाठी एक दरवाजा होता... बाकी संपूर्ण वाड्याला दगडाची मजबूत तटबंदी होती. चौकाच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही हातांना मोठमोठ्या खोल्या होत्या.. एकूण दोन मजल्याच्या वाड्यात नेमक्या खोल्या किती असाव्यात बरं?? डाव्या हाताची प्रत्येक खोली एखाद्या मंगल कार्यालयासारखी भली मोठ्ठी लांबच लांब होती त्यात अतिशय सुरेख झुंबरे चमकत असायची... उजव्या बाजूच्या बंगळी मागच्या सगळ्या खोल्या प्रामुख्याने वापरात होत्या... सगळ्यांत टोकाला स्वयंपाकघर ... आपण सुट्टीत गेलो की आईचा बहुतेक वेळ तिथेच जाई... त्याच्या शेजारून एक सुरेख लाकडी जीना गच्चीत जायचा... ही वाड्यातली सगळ्यांत प्रसन्न जागा... उन्हाळ्यात केशव आणि बाबा गच्चीत झोपायचे... आकाश पांघरून चांदण्या न्याहाळत झोपण्यातली गंमतच काही वेगळी होती. जिन्याला लागून पुन्हा एक छोटासा चौक आणि पल्याड न्हाणीघर होतं. ह्या चौकात मोठा पितळी बंब असायचा ... केशव चौकातच भरपूर पाणी घेऊन अंघोळ करायचा. चौकाशेजारी बैठकीची व्यवस्था होती...तिथे शुभ्र पांढऱ्या चादरी गाद्यांवर अंथरून लोड तक्के ठेवलेले असायचे... तिथेच बाबा वाचन करत बसायचे... त्याला सारे आठवले म्हणण्यापेक्षा डोळ्यांपुढे उभेच राहिले. बैठकीच्या खोलीशेजारी देवघर होते तिथे मंद समईचा प्रकाश असायचा... त्यातही सुरेख फुलांची सजावट केलेले देवघर उजळून निघायचे. त्याच्याच शेजारी आजीची खोली होती ...आजीच्या खोलीत कुणीही जायचे नाही... तिला आवडत नसावे... केशव आणि आईबाबा गेले की आजी बाहेरच असायची... मात्र तिच्या खोलीला मोठ्ठे पितळी कुलूप घालून त्याची चावी तिच्या कमरेला लटकत असायची... त्या खोलीत काय होतं... ह्याची उत्सुकता त्या बालवयात कधीही वाटली नाही .. मुळात वाडा एव्हढा मोठा होता की तशी गरजही पडली नाही. वाडा पुन्हा पुन्हा तीव्रतेने त्याला बोलावत होता. ह्या जुन्या वास्तूंत कमालीचे सामर्थ्य असते.. त्याने कुठेतरी वाचलं होतं. हेच सामर्थ्य, हीच आकर्षण शक्ती त्याला तीव्रतेने बोलावू लागली..सोनगाव फाट्यावरून उजवीकडे वळतात त्याला वाडा जणू प्रकाशात उजळला आहे असा भास झाला... उन्हे केव्हाच उतरली होती... संध्याकाळ सरून रात्रीचा काळोख मिट्ट होऊ लागला आणि तो पिंपळस फाट्याला पोहोचला तो रस्ता शोधणार तोच एक माणूस जणूकाही त्याचीच वाट पाहत उभा असावा... 

"सर्वेश्वरी कोणत्या बाजूला आहे भाऊ??" 

"अगस्ती वाड्याचे पाहुणे का ?"

केशव विस्मयाने म्हणाला..
"हो! पण तुम्हाला कसं कळलं??"

"चाला चाला! सांगतो जातांनी " म्हणत गाडीत बसत तो रस्ता दाखवू लागला.... तो अगस्ती वाड्यातील गडी धनाजी होता... आजीने त्याला खास केशवासाठी तिथे उभं केलं होतं..

"पण आजीला कसं कळलं मी येणार आहे ते?"  
केशव स्वतःशीच पुटपुटला. धनाजी केशवला घेऊन वाड्यासमोर आला... लगेच तो भला मोठा दिंडी दरवाजा उघडून त्याला आत घेण्यात आले... गडी माणसे दिमतीला तयार होती.... वाडा अजूनही तसाच मजबूत होता जरासा जुना झाला होता एव्हढेच... चौकात पितळी घंगाळ चमकत होते ... पायावर पाणी घेऊन त्याने पाहिले तर आजी नेहमी सारखी बंगळीवर बसलेली होती. आता वय झाले होते त्यामुळे सुरकुत्यांचे जाळे अंगभर पडले होते... प्रसन्न हसत तिने त्याचे स्वागत केले...

"केशवा! बाळा कसा आहेस?"

होकारार्थी मान डोलावत केशव आजीच्या पाया पडला... गडी माणसांनी सामान आणून आत ठेवले... त्याचे आंघोळीचे ऊन पाणी काढले... मनसोक्त केलेल्या अंघोळीमुळे सगळा प्रवासाचा क्षीण दूर झाला. सवयीने देवघरात जाऊन देवाला नमस्कार करून तो बाहेर आला... गरमागरम जेवण तयार होतेच ... आजीने बाजूला बसत आग्रहाने त्याला खाऊ घातले...त्याच्या मनांत उमटलेले प्रश्न जसेकाही वाचून आजी म्हणाली ,

"बोलू हो केशवा ! सविस्तर बोलू... आधी पोटभर जेवून तर घे."

आई गेल्यावर एव्हढ्या मायेने पहिल्यांदाच कुणीतरी त्याला जेवू घालत होतं. आजी चांगलीच थकली असावी जराजर्जर म्हणतात ना तशी... केशवचे जेवण होताच ... तो बैठकीच्या खोलीत आडवा झाला... कामाच्या बाई ,गडीमाणसे झाकपाक करून आवरून निघून गेली... एव्हाना केशवला गाढ झोप लागली ... आणि पुन्हा तेच स्वप्न... वाडा त्याला बोलावत होता...

"केशवा! केशवा! बाळा ये रे किती वाट पाहू?"

पूर्वीसारखाच धडपडत घामाघूम होत केशव जागा झाला... समोर आजी जणूकाही ह्याच क्षणाची वाट पाहत तिष्ठत थांबली होती.. आजीने भांडभर पाणी पुढे केलं..

"केशवा! तू थकला आहेस बाळा... कळतंय मला . पण माझ्याकडे फार वेळ नाही रे बाळा." 

आजी म्हणाली आणि केशव धडपडत उठून बसला.
तिथून केशव अगस्तीचा वाड्यातल्या रहस्याचा प्रवास सुरु झाला. आजी केशवला आपल्या खोलीचे दार उघडून आत घेऊन गेली.. आतले कपाटाचे दार उघडताच एक छोटासा लाकडी जिना लागला... हा जिना डाव्या बाजूच्या खोल्यांना जोडणारा असावा ... ते सरळ रेषेत चालत टोकाला डावीकडे वळले... एक अडगळीची खोली होती... त्यात बऱ्याच मोडलेल्या वस्तूंचे भंगार पडले होते.. आजी आपल्याला इथे का घेऊन आलीये?? केशवला कळेना.... आजीने एक मोडके लाकडी दार बाजूला केले आणि डोळे दिपवणारा प्रकाश पडला.... तिथे एक भनोशी होती... भिंतीतले गुप्त कपाट जे सहजी कुणालाही दिसले नसते...

"केशवा! केशवा! किती उशीर केला रे किती वाट बघायची बाळा."
भानोशी बोलू लागली...

" हा काय प्रकार आहे आजी ???"

केशव किंचाळला. आजवर अनैसर्गिक शक्तींवर विश्वास नसलेला केशव भीतीने पांढरा पडला होता. आजीने त्याला शांतपणे सांगितले ,

"सगळे सांगते ... नमस्कार कर आणि निघ...!"

पडत्या फळाची आज्ञा घेऊन केशव बाहेर पडला... आजी बोलत होती... 

"तुझा वारस आला आहे... आता लवकरच तुला भरपूर इच्छांचा बळी मिळेल... आता मला मुक्त कर."

पुन्हा त्याच मार्गाने पायऱ्या उतरत दोघे आजीच्या खोलीत आले. केशव आजीच्या पायाशी भेदरलेल्या सशागतबसला. आजीने अतिशय मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला... आजी बोलू लागली.

"केशवा ! तुला भानोशी बोलावत होती.... हे तुझ्या लक्षात आलेच असेल... माझे वडील ह्या वाड्यात नोकर म्हणून आले... आयुष्यभर त्यांनी पाणक्या म्हणून पाणी भरलं इथे...  त्या अडगळीच्या खोलीत त्यांचा संसार होता...ह्या वाड्यात आपल्या लेकीने राणी होत राज्य करावं हे त्यांचं स्वप्न होतं. मात्र ते सहजी शक्यच नव्हतं. आपली लेक ह्या वाड्याची मालकीण व्हावी,  ह्याच इच्छेने त्यांना पुरतं झपाटून टाकलं . आपल्या ह्या इच्छेसाठी त्यांनी जीवाचं रान केलं.. कुठल्याश्या मांत्रिकाकडून इच्छापूर्ती मंत्र शिकून आले....मात्र इच्छा एकट्या येत नाहीत बाळा.. त्या येतात दुसऱ्या इच्छेची जोड घेऊनच..."

आजीला धाप लागली होती..... क्षणभर थांबत पुन्हा आजी भराभर बोलू लागली... 

"वेळ फार थोडा आहे रे माझ्याकडे ! एका इच्छेची पुर्ती व्हायची असेल तर तितक्याच ताकदीच्या दुसऱ्या इच्छेचा बळी द्यावाच लागतो... हेच इच्छापूर्ती मंत्राचे रहस्य आहे. त्याच बळी दिलेल्या इच्छांवर ही भानोशी आपली शक्ती टिकवून ठेवते आहे. ह्याच भानोशीत माझ्या वडिलांनी आपल्या शक्ती साठवून ठेवल्या आणि मी त्या वापरत गेले... तू ह्या भानोशिकडे काहीही माग तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल... मात्र ह्या जगात काहीही फुकट मिळत नाही त्याची किंमत मोजावीच लागते... त्याच्याच ताकदीची , त्याच्याच तीव्रतेची दुसरी इच्छा मारून तिचा बळी द्यायला हवा."

केशव चक्रावून पाहत होता...

"केशवा! वाटतं तेव्हढं सोपं नाही हे पण ह्यातून आपण आपला फायदा करत जायचा... आता असं बघ तुझ्याकडे दहा रुपये आहेत त्यातून तुला साखर घ्यायची आहे किंवा तांदूळ... तू साखरेची निवड केली म्हणजे तांदूळ खरेदीचा बळी गेलाच ना !...
मी ह्या घरची सून व्हावी म्हणून माझ्या बाबांनी स्वतःच्या सर्व सुखांचा बळी दिला. माझी आई, माझी भावंडे सगळे चार दिवसांत गेले.. पुढे बाबांनी सगळी सत्ता माझ्या हाती यावी म्हणून स्वतःला सुद्धा पणाला लावलं... मात्र त्यापूर्वी त्यांच्या शक्ती ह्या भानोशीत प्रवाहित केल्या...."

काय भयंकर आहे हे?? देवा रे! मी नक्की माणसांत आलोय ना?
केशव मनांत म्हणाला. आजी पुढे सांगू लागली.

" ह्या भानोशीने मला जे जे हवे होते ते सगळे पुरवले... फक्त तुम्हाला निवडता यायला हवे... तुझे वडील माझा मुलगा... माझा वारस जन्माला यावा म्हणून दोन मुलींची आई होण्याच्या इच्छेचा मी बळी दिला... तुझ्या बाबांना हे रहस्य माहीत होते मात्र त्यांनी फक्त एकदाच त्याचा वापर केला ... अखेरचा. तुझी आई तेव्हा गंभीर आजारी होती तू लहान होतास ... त्यांनी आपल्या जगण्याच्या इच्छेचा बळी देऊन तिला वाचवण्याची इच्छा पूर्ण केली. मात्र हे सत्य जेव्हा तिला कळलं तेव्हा तिने तुझे इथले संबंध कायमचे तोडून तुला दूर केलं... पण तुला कुठेही ठेवलं तरी तुला येणं भागच होतं... केशवा! तू वारस आहेस इथला...आता इच्छापूर्ती शक्तीला तुझी गरज आहे.. माझे वय झाले तसतशा माझ्या इच्छा कमी कमी होत गेल्या ... मात्र भानोशिला बळी लागतोच इच्छांचा... आता मी जातेय सगळं तुझ्याकडे सोपवून...
मात्र एक लक्षात घे... तू कुठेही गेलास तरी तुझी ह्यातून सुटका नाही... माणसाची इच्छांमधून सुटका नाही... तुझ्या मनातल्या इच्छा भानोशी पूर्ण करेल तिला दुसऱ्या इच्छेचा बळी दे."

आजी थकून गाढ झोपली... दुसऱ्या दिवशी गडी माणसे कामावर आली मात्र आजी काही उठली नाही.. आजी नातवासाठी डोळ्यांत प्राण आणून थांबली होती.... असेच लोक म्हणत होते. आजीचे सगळे क्रियाकर्म रीतसर पार पडले... आता कामाला लागले पाहिजे म्हणत  केशवने लॅपटॉप उघडला... आजीच्या जाण्याचे कळवले असले तरी बरीच कामे त्याच्या नावाने राखून ठेवली होती...

 "आत्ता एक कडक कॉफी मिळाली तर कित्ती बरं होईल " त्याच्या मनात आले... "त्याच्या सोबत ऑफिस असते तर बन मस्का सुद्धा घेतला असता."

"बन मस्का सोडून देतो पण कॉफी तर हवीच" ... असा विचार मनांत आला नाही तोच स्वयंपाकाच्या बाईने त्याच्यासमोर कॉफी आणून ठेवली... बराच वेळ केशव विचार करत होता... हा निव्वळ योगायोग असेल..
दुसऱ्या दिवशी त्याने भानोशीची परीक्षा पाहण्याचे ठरवले... 

"आत्ता मस्त गरमागरम जेवणाची इच्छा झालीये पण जेवण नाही मिळालं तरी चालेल एक पिझ्झा मिळावा बास!"

केशव अगस्ती मनातल्या मनात हसत होता ... ह्या खेड्यात जिथे बस येत नाही तिथे पिझ्झा कसा येणार?? पण त्याचा अंदाज साफ चुकला.. थोड्याच वेळात धनाजी स्वयंपाकाची बाई आजारी आहे तर आज येणार नसल्याचे बोलला... फाट्यापर्यंत जाऊन काहीतरी खायला आणून देतो म्हणाला... त्याने काय आणू विचारले असता "काहीही आन ." केशव म्हणाला... थोड्या वेळात गडी पिझ्झा घेऊन हजर झाला... त्याचा एक मित्र  लॉकडाऊनमुळे शहरातून गावात परतला होता... त्याने झक्कास पिझ्झा करून विकायला सुरू केले. केशव खुश झाला... हळूहळू त्याला अनेक लहान मोठ्या अनुभवांतून कळून चुकले ... भानोशी खरंच इच्छा पूर्ण करते... कधीकधी त्याला परत जावं वाटायचं तर मन म्हणायचं काय आहे तिथे तरी...इथेच वाड्यात राहण्याची त्याची इच्छा पूर्ण होई.
                   एकदा त्याचा लेक आल्हादचा फोन आला... त्याला घरात बसून बोअर होत होतं... बाबा तुजला भेटावस वाटतं... लेक म्हणाला.... आणि त्याला भेटायची केशवला तीव्र इच्छा झाली. आपला लेक आपल्याला मिळावा सीमा कधीच नाही भेटली तरी चालेल ... अशी इच्छा त्याच्या मनांत आली. दुसऱ्याच दिवशी तालुक्याच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याला फोन करून बोलवण्यात आले काय झाले त्याला कळत नव्हते?? सीमाचा काल खून झाला होता , तिचाच बॉस कम प्रियकर अनुराग ने तो केला असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. आल्हादची कस्टडी त्याच्या वडिलांकडे केशव अगस्ती कडे सोपविण्यात आली होती... त्याच्या प्रवासाच्या परमिशनवरून आणि ऑफिसमधून तो गावी गेला असल्याचे कळले... केशवकडे आल्हादला सोपवण्यात आले... बाबा म्हणत तो केशवच्या गळ्यांत पडला. केशव त्याला घेऊन वाड्यावर परतला....भानोशी आहे ...खरंच आहे ... केशवला खात्री पटली.

🔏©️ यशश्री रहाळकर



 

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

वीस नंबर वाली


                       एखाद्या व्यक्तीचा छळ करायला तुमच्याकडे बेलगाम , निरंकुश सत्ता असावी लागते... त्याचबरोबर तुमच्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नसलेली एक असहाय, परावलंबी व्यक्ती देखील असावी लागते. "अन्याय करणाऱ्या इतकाच तो सहन करणारा देखील तितकाच दोषी असतो"... हे वाक्य केवळ बोलायला वजन देते... प्रत्यक्षात तितके उपयोगी असतेच असे नाही. मुळात अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तीकडे बरेचदा सहन करण्याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नसतो. पूर्वी सुनेला वाट्टेल तसे खडे बोल सुनावणाऱ्या, शिव्याशाप देणाऱ्या, मारहाण करणाऱ्या अगदी चटके देणाऱ्या सुद्धा सासवा होत्या म्हणे. प्रत्येक घरात पाच सहा मुली असायच्या.. परतीची त्यांची वाटच माहेरचे बंद करून टाकत.... त्यात आर्थिक परावलंबित्व. जिथे जिथे हे आर्थिक परावलंबित्व संपले, जिथे जिथे माहेरचा भक्कम आधार आहे ही खात्री पटली त्या त्या समाजात/कुटुंबात हे छळछावण्यांचे प्रकार आवरते घ्यावेच लागले. आता तर मुली कमी असणाऱ्या समाजात येणाऱ्या सुनांचीच हाजी हाजी करत सासवा दिवस काढतांना दिसतात. मात्र ज्या कुटुंबात वडिलोपार्जित व्यवसाय आहेत... जिथे अजूनही सगळ्या कुलुपांच्या चाव्या सासवांकडे असतात तिथे आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही... हिंदी सिरियल्स मधल्या मोठ्ठी बिंदी लावून कटकारस्थान करणाऱ्या सगळ्या सासवा फिक्या पडतील अशी सासू मी प्रत्यक्षात पहिली आहे... तिचीच ही 100 % खरीखुरी कथा.....
                        माझे नवीनच लग्न झाले होते... एका संध्याकाळी मी आणि अहो आई (सासूबाई) मस्त गरमा गरम उपमा खात होतो. एवढ्यात वैभव लक्ष्मीच्या हळदीकुंकाचा निरोप द्यायला "ती" डोकावली. "ती" म्हणजे मूर्तिमंत कारुण्य,पाठ आणि पोट एक झालेले,हातापायांच्या काड्या, गालाची सुद्धा हाडे वर आलेली मूळ टपोऱ्या डोळ्यांच्या भवती काळ्या खोबण्या तयार झालेल्या... बापरे! किती अशक्त आहे ही... अहो आईंनी तिला लगेच घरात घेतलं आणि उपम्याची प्लेट भरून पुढे केली. ती सगळ्या देहाचं मुटकूळ करून झपाट्याने कोपऱ्यात बसली... भेदरल्या सारखी दारातून मागे पुढे पाहत बकाबका उपमा खाऊ लागली... गरम उपम्यानी तिचे तोंड पोळत असावे... पण कित्येक वर्षांची उपाशी असल्यागत ती भराभरा तोंडात कोंबत होती. आईंनी तिला बेसनाचा एक लाडू दिला तिने पुन्हा भेदरल्यागत दाराकडे पाहिले आणि अजून एक मागून घेत पदरात बांधून घेतले . माझ्याकडे पाहत कसनुसं हसत , "या वहिनी उद्या हळदी कुंकाला" म्हणत धडाधडा जिना उतरत वाघ पाठी लागल्यागत दिसेनाशी झाली. अशी काय ही?? 

"कोण हो आई ह्या बाई" मी विचारले...

 आई म्हणाल्या.
"अग ही ना... उज्वला... वीस नंबर वालीची सून" 

ह्या वीस नंबर बद्दल मला खूपच उत्सुकता वाटत होती , मी काही विचारणार इतक्यात बेल वाजली. आईंनी मला खुणेनेच डिश घेऊन आत जाण्यास सांगितले.. मी आत गेले आणि मगच त्यांनी दार उघडलं. बाहेर आलेल्या बाईला अहो आईंनी घरातही ये म्हटलेलं नसावं... ती तारसप्तकात रेकल्यागत बोलत होती... 

" आमची उज्जी आली होती ना?" अंदाज घेत ती बाई म्हणाली.

"हो हिला हळदी कुंकाला सांगून गेली लगेच."

"उज्जी परतली नाही मग मीच म्हटलं पहावं तिला... कुठे बसली ठिय्या मारून"

"नाही आमच्या तर घरातही नाही आली बाहेरूनच गेली."

बाहेरची बाई बराच वेळ कटकट करत होती.... मात्र तशीच दारात ताटकळत ...अहो आईंनी तिला घरात घेऊन पाणीही विचारले नाही. ती गेल्यावर आई हुष्य! करत बसल्या  आणि म्हणाल्या..

"गेली एकदाची जहांबाज म्हातारी.. लगेच आली बघ सुनेच्या पाठी..... महाकजाग दुष्ट बाई."

"कोण होत्या हो ह्या?"

"हीच ती वीस नंबर वाली."

                 आता ह्या वीस नंबर वाली बद्दल उत्सुकता शीगेला पोहोचली होती. आमच्या सोसायटीत सगळ्यांत चांगला, हवेशीर मोठा, बाल्कनी असणारा फ्लॅट वीस नंबर... आमच्या बिल्डिंग मधील दोन विंग आतून जोडलेले होते त्यामुळे एकीकडून सुरू झालेलं नंबरींग दुसरीकडे संपायच... तर असा टोकाचा सगळ्यांत उत्तम फ्लॅट होता पाटील बाईंचा. हिचे त्यात शून्य कर्तृत्व .. नवरा कुठेतरी सरकारी कचेरीत क्लार्क असतांना महिलांना लोनचा इंटरेस्ट रेट कमी म्हणून हिच्या नावे घेतलेला हा फ्लॅट... मात्र बाईला कोण अभिमान त्याचा! स्वतःची ओळख ती ,"मी वीस नंबर वाली" अशीच करून द्यायची, सगळ्यांना ह्या न त्या निमित्ताने घरी बोलावून फ्लॅटचे कौतुक करून घ्यायची... ह्या दुष्टशिरोमणीच्या नशीबात इतका चांगला फ्लॅट आल्याने सगळ्याच मनांत हुळहूळायच्या... मात्र घर सुंदर बनतं ते आतल्या माणसांमुळे ,त्यांच्या परस्पर प्रेमामुळे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानामुळे... हे मात्र ह्या हिटलरला माहीत नसावे. आम्ही सोसायटीतील सगळ्या सुना वीस नंबर वालीला हिटलर म्हणायचो... कारण ही स्वतःच्या सुनेला छळणे हा तिचा मूलभूत अधिकार मानायची आणि असेच प्रत्येक सासूने आपल्या सुनेला छळावे ह्यासाठी सतत प्रयत्नशील असायची. कुणाच्या सुनेच्या अंगावरचे मूठभर मांस तिच्या डोळ्यांत यायचे. अहो आई तर मी शक्यतो तिच्या नजरेत येणार नाही असेच प्रयत्न करायच्या... एकदा ती कसलासा प्रसाद द्यायला आली... जरा उशीराच आवरासावर करून मी अंघोळीला गेले होते.. 
लगेचच तिला मुद्दा मिळाला..

"काय हे ही काय वेळ आहे अंघोळीची? तुम्ही फार गरीब आहात बाई..
 चांगलं धारेवर धरा हिला.. सूना डोक्यावर बसायला वेळ लागत नाही."

अहो आई शांतपणे म्हणाल्या, "दिवसभरात कधीतरी अंघोळ करतेय ना झालं तर मग...."

वीस नंबर वालीची दांडी गुल... मात्र तिने तिचे प्रयत्न सतत सुरू ठेवले. ती गेल्यावर आई म्हणाल्या...

 "स्वतःची सून टिकवता येईना आणि चालली मोठी उपदेश सांगायला."

उज्वला ही तिची तिसरी सून... म्हणजे एकाच मुलाची तिसरी बायको. पहिली सून वर्षभरात माघारी गेली ते परत आलीच नाही. दुसरी तर एका महिन्यात पळाली... उज्वला ही तिचा एकुलता एक लेक उमेशची तिसरी बायको..... ह्या लोकांना देण्याइतक्या पोरी कुणाला जड होतात काय माहीत??  गळ्यांत धोंडा बांधून विहिरीत लोटून का देत नाहीत  कुणास ठाऊक??😢 उज्वला कुठल्याश्या गरीब शेतमजुराची लेक... घरी इतकी गरिबी की आपल्या लेकीला पोटभर अन्न मिळेल ह्या एकाच हेतूने असहाय बापाने तिला तिसरपणी उजवली. कमालीची चिवट होती पोरगी... दहा वर्षे टिकून होती... आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे जिवंत होती. तिचा नवरा तसा बरा असावा... बुद्धीने सामान्य म्हणून कुठल्याश्या कुरिअरच्या ऑफिसमध्ये नोकरी करायचा, सरळमार्गी होता बिचारा... मात्र मातृदेवतेला प्रसन्न ठेवण्याच्या नादात काय काय करायचा कोण जाणे?? त्याला दोन मोठ्या बहिणी होत्या ... चांगल्या सुखवस्तू घरांत पडल्या होत्या  .. त्यांचा फारच लोभ वीस नंबर वालीला... आणि येताजाता लेकाला ब्लॅकमेल करायची की फ्लॅट मुलींच्या नावे करेन... बिचारा उमेश गरिबीने गांजलेला... त्याला कल्पना होती की आपण ऐकलं नाही तर आई आपले शब्द खरे करेल. स्वतःचे घर घेण्याइतकी धमक त्याच्या मनगटांत नव्हती.
                          त्या इवल्या फ्लॅटची सत्ता आणि कचाट्यात अडकलेली बिचारी उज्वला ... छळछावणीला सुरुवात झाली. उज्वलाला आठवड्याचे अनेक उपास करावे लागत... म्हणजे सोमवार, गुरुवार , शुक्रवार , शनिवार, चतुर्थी, एकादशी आणि प्रदोष हे उपास तिला करावे लागत... हे उपास तिच्याच नवऱ्याच्या भल्यासाठी असल्याचे सासू वारंवार बोलून दाखवे. हे उपास म्हणजे उपाशीच राहणे असे... कडकडीत उपास. दिवसभर उज्वला ढोर मेहनत करायची... मात्र हे लग्न तिने ज्या हेतूने केलं ते पोटभर अन्न काही तिच्या नशिबात नव्हते. तिचं लग्न झालं तेव्हा वीस नंबर वाली कुठेतरी विरंगुळ्याला जॉब करायची.... जातांना  कधी सगळेच्या सगळे पडदे भिजवून जायची  तर कधी 5/7 चादरी. कधी 20 किलो निवडणं काढून ठेवी तर कधी डबे घासायला सांगून जायची.... तर कधी किलोने पापड करायचे सांगायची.  सुरुवातीला रिटायर्ड झालेले सासरे घरी होते ... सासरे सुनेला लेक मानत, तिला कामात मदत करत... बरेचदा ती उपाशी आहे हे लक्षात आले तर चुपचाप काहीतरी खायला आणून देत. एकदा वीस नंबर वाली लवकर घरी आली ... पाहते तर काय सासरा सुनेला निवडणं करण्यास मदत करत होता. झाले दुसऱ्याच दिवशी बाई नोकरी सोडून घरी... उज्वलाला जो काही चार तास निवांतपणा मिळत होता तोही संपला. आता छळायला भरपूर वेळ आणि नवनवीन संधी तिला मिळत गेल्या. उज्वलाला जेवणात एकच पोळी मिळायची .. जास्त खाल्ले तर सुस्ती येते आणि काम होत नाही , असे ती म्हणायची. कधीमधी गुपचूप साखर किंवा गूळ तोंडात टाकताना तिने एकदा पाहिले ... मग सगळ्या डब्यांना कड्या कुलपे घालण्यात आली. पुढे सासरे निर्वतले आणि उज्वलाचे हाल वाढत गेले. ती सतत भुकेली असायची ... 😢 भूक माणसाला काहीही करायला लावते ह्याचे प्रत्यंतर ..सासूचा डोळा चुकवून ती सोसायटीत कुणाहीकडे  पटकन खाऊन घ्यायची, कधी मागायची कधी बांधून न्यायची चोरून... मंदिरात , भंडाऱ्यांना चार चार वेळा जाऊन प्रसाद घ्यायची. माझ्या सासूबाईंसारख्या सहृदय स्त्रिया ती दिसली की तिला खाऊ घालत... बिचारीची दया येण्यापलीकडे कुणालाच काही करता येत नसे... एक दोघींनी वीस नंबर वालीला समजवण्याचा निष्फळ प्रयत्न केला... पण कजाग भांडकुदळ बाईने इतका तमाशा घातला की लोक तिचे तोंड पाहणेही टाळू लागले....

 "तुम्हाला तिचा एव्हढा पुळका असेल तर घ्या ठेवून तुमच्याच घरी... तुम्ही घाला खायला "

असे अर्वाच्च ती बोलत असे. तिच्या धाकापायी तिच्या सुनेलाही लोक चोरुनच मदत करायचे न जाणो ही बया आपल्या घरापुढे येऊन तमाशा करायची. 
                    आमची बिल्डिंग जुनीच होती त्यामुळे पिण्याचे पाणी खाली नळावरून भरावे लागत असे. तिथेच ती भेटायची आणि खाजगी आवाजात सासूच्या तक्रारी करायची. एक दिवस ती पार काळी निळी होऊन पाणी भरत होती. अंग चांगलेच सुजले होते. आता मारहाण पण सुरू झाली असावी... तिला खाणाखुणा करून विचारले तर  नेहमी सारखे मागेपुढे पाहून घेत , 

"एरव्ही सासू मारते पण काल नवऱ्याने तुडवले लाथेने " 
ती म्हणाली. उमेश तसा गरीब वाटायचा .. तिनेही कधी त्याची तक्रार आजवर केली नव्हती. वीस नंबर वाली गावाला लग्नकार्याला गेली किंवा लेकींकडे राहायला गेली की दोघे आनंदात रहायचे, तो तिला गाडीवर बसवून फिरायला  नेई, बाहेरच खाऊ घाले ती अगदी खुश असायची त्या वेळी. उमेशचा सगळा पगार खर्चाचे पैसे सोडून सासू काढून घ्यायची... त्यातही त्याने पैसे वाचवून उज्वलासाठी गजरा आणला... झालं म्हातारीची तळपायाची आग मस्तकात गेली. आत्ताच्या आत्ता फ्लॅट बहिणींच्या नावे करते म्हणून भांडू लागली. एव्हाना लग्नाला दहा वर्षे झालेला, दोन पोरांना घेऊन उमेश कुठे जाणार? स्वतःचा तुटपुंजा का असेना पैसा हातात नाही... आईची पाय धरून माफी मागायला लावली. चांडाळींणीने उज्वलाला तुडविण्यास फर्मावले... आणि एका गजऱ्याच्या बदल्यात उज्वलाचे अंग काळे निळे होईपर्यंत मारहाण झाली. उज्वलाला उपाशी ठेवणे, मारहाण करणे किंवा तिचे हाल करणे ह्यात कसून करून चालणार नव्हते... नाहीतर महिनाभर उमेशला बायकोपासून वेगळे झोपावे लागण्याची शिक्षा मिळायची.. त्यात बेघर करण्याचा धाक होताच.

"तसे ते ना खूप चांगले आहेत त्यांचा फार जीव आहे माझ्यावर."

उज्वला आपल्या अंगावरील माराचे वळ झाकत म्हणाली. मी मनातल्या मनांत ह्या भारतीय नारीला साष्टांग दंडवत घातला. का हे असले जिणे सहन करायचे? कशासाठी?
                       उज्वलाला कधीमधी माहेरी जायला मिळे. तिथून आली की ती एकदम टवटवीत आनंदी दिसायची. वीस नंबर वाली लगेच माझ्या सासूबाईना म्हणायची..

"पहा पहा माहेरचे लोक हिला टॉनिक पाजून पाठवतात कशी तुकतुकीत दिसते माहेरून आल्यावर."

ही भवानी गेली की अहो आई कपाळावर हात मारून घेत... आणि म्हणत 

"गरीब असले तरी पोटभर चटणी भाकरी पोरीला खाऊ घालतात... म्हणून तुकतुकीत दिसते पोर... बिंडोक भवानी कधी सुधारणार आहे देवालाच ठाऊक?"

उज्वलाला पहिली मुलगी झाली... स्वतःच्या मुलींवर जीव असलेल्या वीस नंबर वालीने तिला छळ छळ छळले... दुसरा मुलगा झाला त्याला आईपासून तोडून स्वतःच्या ताब्यात घेतले... आता उज्वला आणि तिची लेक अश्या दोन व्यक्ती ह्या जहांबाज बाईच्या आयत्याच तावडीत सापडल्या. तिची  लेक हुशार होती... आईवर माया होती.. त्यामुळे ती आईला घासातला घास काढून द्यायची . नातू मात्र आजीच्या तालमीत दुसरा हिटलर म्हणून घडत गेला... आईवर व्हॉच ठेवण्याचे काम लहानपणीपासून करून तो आजीला खुष ठेवू लागला. ह्या साऱ्यांत वर्षे सरली आम्ही ते घर सोडून नवीन जागेत रहायला गेलो त्यालाही सहा सात वर्षे झाली.
कधीमधी घराचे काही काम किंवा भाडेकरी बदलले तर जुन्या घरी जाणे व्हायचे.
                            एकदा उज्वला भेटली ... चेहऱ्यावर टवटवी आलेली, प्रसन्न , छानशी साडी नेसून मंदिरात निघाली होती. मला आग्रहाने घरी घेऊन गेली... घराची जुनेपणाने ऱया गेली होती, भिंतींचे पोपडे उडालेले होते... तशीच सारी मिजास उडालेली वीस नंबर वाली अंथरुणात गलितगात्र होऊन खिळलेली होती. तिच्या जागी दुसरी कुणीही व्यक्ती असती तर मला वाईटच वाटले असते मात्र ह्या बाईला बघून मला खूपच आनंद झाला. इथले हिशोब इथेच फेडावे लागतात म्हणतात ते हेच. बाहेर पडल्यावर उज्वला म्हणाली... 

"आजारी पडल्यावर एकाही लेकीने ढुंकून पाहिले नाही वहिनी....फ्लॅट तुम्हाला देते म्हणून फोन केले तर लेकी स्पष्ट म्हणाल्या तुझे काही नको आम्हाला... तू कुणाला सुखाने जगू देत नाही तुझे तू पहा.. आमच्याकडून अपेक्षा करू नकोस.."

अशीच जिरायला पाहिजे होती .. बरंच झालं... 

"आता चार दिवस सासूचे संपले उज्वला ..
आता तुझी सत्ता... चांगली ठेच म्हातारीची जन्मभराची अद्दल घडण तिला. जेवायला देऊ नको, स्वच्छ करू नकोस पडू दे लोळागोळा..."

उज्वला खळखळून हसत म्हणाली,

"सुरुवातीला माझ्याही मनांत अगदी असेच आले... पण खरं सांगू एकाने दात विचकवले की दुसऱ्याने धावून जायला आणि दात विचकवायला आपण म्हणजे माकड नाही ना!  माणूस म्हणून आपल्यात अन् माकडांत फरक हाच आहे ... माणूस माफ करू शकतो. त्यांना अद्दल घडवायला आपण कुठे देव आहोत? तो पाहतोय ना "

म्हणत तिने हात जोडले. पुढे म्हणाली..

"मी मायेने नाही करू शकत त्यांचं... इतकं विसरता नाही येत सगळं... पण माणुसकी म्हणून करते...आता फक्त मूकपणे टीपं गाळत असतात.. स्वतःची लाज वाटत असावी."

ह्या बाईच्या सहनशक्तीपुढे, तिच्या चिवट जिद्दीपुढे आणि तिच्या अनोख्या आयुष्याच्या तत्वज्ञानापुढे मी पुन्हा एकदा नतमस्तक झाले. भारतीय स्त्रियांना देवानं वेगळ्याच मुशीतून घडवलं असावं... तिचे माकडाचे उदाहरण मात्र मी मनांत कायमचे कोरून ठेवले आहे...

"एकाने दात विचकवले म्हणून दात ओठ खात धावून जायला आपण माकड नाही.  माणूस माफ करू शकतो... म्हणूनच तो माकडापेक्षा वेगळा आहे."

🔏©️ यशश्री रहाळकर

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

शेफ नवरोबा

                      एखाद्या नवीन लग्न झालेल्या मुलीला विचारावे, "काय करतात तुझे मिस्टर? " तिने लाजत मंगळसूत्राशी चाळा करत उत्तर द्यावे ,... "ते ना शेफ आहेत." .... असा माझा एक कल्पनेतला संवाद सुरू असतो मात्र प्रत्यक्षात कुणी अशी अजून तरी भेटली नाही.... "शेफ" हा प्रत्येक स्त्रीच्या अत्यंत जिव्हाळ्याचा पण तितकाच under rated profession. गेल्या चार पाच वर्षांत अनेक जवळचे नातेवाईक, मैत्रिणी ह्यांची मुले केटरिंग कॉलेजला जॉईन झालीये काही नुकतीच पास आऊट झालीये... एकुणात लवकरच माझ्या कल्पनेतला संवाद प्रत्यक्षात येणार अशी आशा वाटू लागलीये. लहानपणीपासून एखाद्या पेशाबद्दल अत्यंत सुप्त आकर्षण वाटत असते.. म्हणजे आपल्यासाठी नव्हे तर आपल्या जोडीदारासाठी एखादा विशिष्ट पेशा आपण स्वप्नात रंगवत असतो ... 
पैकी अगदी लहानपणीपासून मला स्वतःला दोनच कामे भन्नाट वाटायची ... 
                  एक म्हणजे साड्यांच्या दुकानात अविचल गांभीर्याने साड्यांचे ढीग दाखवणारे पुरुष....आहाहा! काय ते समर्पण..... झोकून देऊन काम करणे काय असते ते त्या शंभर साड्यांच्या ढिगावर उभे राहून 101 व्या साडीचा पदर स्वतःच्या अंगावर पसरवून , "नक्षी पहा ताई एकदम लेटेस्ट.. अमुक सिरियलमध्ये हीच साडी होती अगदी." म्हणणाऱ्या व्यक्तीकडून शिकावे.  दुकानात आलेली बाई रिकाम्या हाती जाताच कामा नये... एकच साडी घ्यायला आलेली स्त्री चार कशी नेईल.... ह्याचा प्रयत्न म्हणजे टार्गेटच्या तिप्पट काम. त्यातही एखाद्या सुमार दिसणाऱ्या स्त्रिला भडक गुलाबी रंगाची साडी घ्यायला लावतांना, "तुम्ही म्हणजे माधुरीलाही फिके पाडाल ." म्हणणे म्हणजे कस्टमर डिलाईट. आपल्या सारख्या सामान्य माणसांना साधारणपणे एलिमेंटरीच्या परीक्षेत जे रंग आणि छटा शिकवल्या जातात त्या पल्याड कित्ती रंग आहेत ही ज्ञानप्राप्ती केवळ  दहा मिनिटे साड्यांच्या दुकानात होऊ शकते... पारवा, गेरवा, चिंतामणी, कोको , वाइन, पिच ... ह्या रंगांचे नीट ज्ञान ह्या व्यक्तीला असते. ऑफ व्हाईट ते बदामी ह्यात पांढऱ्या रंगांच्या 12 शेड्स असतात , हे फक्त आणि फक्त त्यालाच पक्के ठाऊक असते. दहा पंधरा हजार साड्यांच्या दुकानातून बरोब्बर निळ्या रंगाला केशरी काठ असणारी साडी 2 मिन हजर करणे... बाबो! केव्हढी ही स्मरणशक्ती... नतमस्तक ...🙏अक्षरशः नतमस्तक. लग्न होताच प्रत्येकीला कळणारे दाहक वास्तव दुर्दैवाने प्रत्यक्षात मी सुद्धा अनुभवले... साडी खरेदी ह्या प्रकारात नवरा नामक प्राण्याला काडीचाही रस नसतो, निळा आणि जांभळाच काय  ...पिवळा आणि हिरवा रंग सुद्धा त्याच्या दृष्टीने फार काही वेगळा नसतो, तुम्ही अगदीच पाठीशी लागलात तर वाढदिवस /लग्नाचे वाढदिवस वगैरे ला तो साडी आणतो पण दर वर्षी एकाच रंगांची किंवा एकाच प्रकारची साडी आणल्याचे पाहून तुम्ही कपाळावर हात मारून घेता. माझ्या एका मैत्रिणीच्या नवऱ्याने तर अगदी 100% सारखी साडी सतत दोन वर्षे आणली... ती नाराजीने म्हणाली  " नवऱ्याने प्रेमाने आणली म्हणून देऊन पण टाकता येत नाही." आता ती बिचारी दोन सारख्या साड्या नेसते. ...   सदरहू साडी खरेदी आणि नवरा ह्यांचा संबंध न आलेलाच उत्तम.
                      मला दुसरे भन्नाट वाटणारे काम म्हणजे  बल्लावाचार्य... अर्थात  पुरुष स्वयंपाकी. माझ्या लहानपणी जेव्हा घरातले पुरुष कितीही तहान लागली तरीही हाताने भांडभर पाणीही घेत नसत, काम करणाऱ्या बाईला हात धुवून ,पुसून लोटी भांड भरून द्यावं लगे, मग हे पुरुषोत्तम घटाघटा पाणी पीत... त्या काळात हातात झारा कढई घेऊन येणाऱ्या आचाऱ्याचे मला मनापासून कौतुक वाटायचे. आमच्या भागात त्यांना आचारी म्हणत पण आजोळी नागपूरला महाराज म्हणण्याची पद्धत होती. नागपूरात अगदी पूर्वापार सगळे नातेवाईक एकत्र एकाकडेच ह्या महाराज कडून फराळ तयार करून घेतात. हल्ली हे लोण सगळ्या गावांत अगदी अपार्टमेंट मध्येही दिसून येतं. एकच महाराज बोलविले की शेव, चिवडा, लाडू, शंकरपाळे वगैरे गनीम शरण आलेच म्हणून समजा. पदार्थ बिघडून वाया जायचा ताप नको शिवाय कष्ट शून्य... मात्र त्याच्या मागे पुढे तासनतास लक्ष देत गप्पा मारत बसायला बायकांकडे वेळ आणि पेशन्स कित्ती असतो..😳😱. मात्र कला आहे बॉस! आदर करावा अशी कला आहे. ती पिवळी आणि केशरी रंगांच्या बरोब्बर मध्ये असणारी सुबक एकसारखी बुंदी आहाहा! पिवळी धम्मक वेटोळी शेव... रंगोत्सव नुसता. बुंदी पाकात मुरली की दोन्ही हातांनी भराभर अगदी एकसारखे लाडू वळून लांबून थेट परातीत फेकणारे कलाकार पाहिले की थक्क व्हायला होतं. आमच्या विदर्भात साधारण सामूहिक जेवणावळींना , भंडाऱ्यांना आचारी बोलावल्या जात असे... ह्या लोकांचा पोशाख काहीही असू देत पण एक गुलाबी गमछा मात्र खांद्यावर असायचाच... सगळ्यांचा गुलाबीच असायचा... काय कोडं होतं कुणास ठाऊक?
               यजमानाचा काळजीने, टेन्शनने जीव गेला तरी चालेल इतक्या उशीरा येणे ,ही ह्या आचारी लोकांची आणिक एक खासियत. नंतर कपभर चहा पिऊन ह्यांच्या अंगात पवनसुत हनुमान प्रकट होऊन ते विद्युतवेगाने काम करायचे ... तासाभरात हजारो लोकांचे जेवण तयार असायचे. विदर्भातील ठराविक मेन्यू म्हणजे मसाले भात, बटाटे-वांग्याची किंवा काशीफळाची रस्सेदार भाजी, साधा भात ,फोडणीचं गोड आंबट वरण, पोळ्या आणि बुंदी किंवा शिरा...
उन्हाळ्याच्या दिवसांत जिलबी मठ्ठा असायचा. मोठमोठ्या ड्रममध्ये बर्फाच्या लाद्या टाकून तयार केलेला मठ्ठा म्हणजे कहरी उन्हातले स्वर्गसुख. हे सगळे पदार्थ करण्यात हे आचारी निष्णात होते... त्याच्याच जोडीला एक भन्नाट पदार्थ उन्हाळ्यातील खासियत म्हणजे कैरीची लुंजी ... चटकदार आहा! ह्या पदार्थाची चव माहीत नसलेल्याचे आयुष्य वाया गेले, म्हणावे इतका जबराट पदार्थ. लहानपणी ह्या आचारी काकांना जिलब्या तळताना बघणं ह्या माझा अत्यंत आवडता कार्यक्रम... मोठ्या, पसरट कढईत तापलेल्या तेलात एकसारख्या सुरेख जिलब्या सोडत जाणे हे अत्यंत अवघड काम आहे,   "ये तो आर्ट है..इझी नही ये आर्ट "
एकदाच जिलबी करण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर जिलबी घरी करण्याचा पदार्थच नव्हे.... जिलबी विकतच आणून खावी ह्या ठाम मतावर मी आले.... नाशिककरांच्या धर्मानुसार सांगायचे झाल्यास केवळ बुधा हलवाईचीच जिलबी आणून खावे... असे ठरवून टाकले. मात्र हे आचारी अत्यंत कौशल्याने एकसारखी जिलबी करायचे... रामशरण नावाचे वयस्कर आचारी आमच्याकडे हनुमान जन्माच्या भंडाऱ्यासाठी येत ...हे काका बरोब्बर साडेतीन वेटोळ्यांचीच जिलबी करत असत... प्रत्येक जिलबी म्हणजे झेरॉक्स ...👍
                  साधारण आठ वर्षांची असेन मी ... जगातली सगळ्यांत सुखी बायको असेल ती आचाऱ्याचीच... असे मला तीव्रतेने वाटायचे. मुळात स्वयंपाक हा स्त्री जीवनाचा नाईलाज अशीच विचारधारा, त्यात उत्साहाचा अभाव, त्यात झोप प्रिय , त्यात घरी आजी , आई, काकू ,आत्या वगैरे बऱ्याच स्त्रिया ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वयंपाकी नवरा मिळावा असे फार वाटायचे. एकदा ह्या रामशरण आचाऱ्यांचीच बायको आमच्या आजीकडे आली... कुणाचीही भिड न बाळगता त्यांना चारचौघात मी म्हणाले... "मज्जा आहे ना तुमची तुम्हाला तर स्वयंपाक करावाच लागत नसेल." मूळ हिंदी भाषिक असलेल्या त्यांना माझ्या वाक्याचा अर्थ कळला आणि सगळ्या बायकांत एकच खसखस पिकली. मला जवळ घेऊन त्या म्हणाल्या, "मुन्नी राजाकी पत्नी को भी अपणे घर की रसोई देखनी होवे है।" ... त्याच क्षणी मला ज्ञानप्राप्ती झाली.. की तुम्ही कुणीही असा किंवा तुमचा नवरा कुणीही असू द्या... स्वयंपाक चुकणार नाहीच. साधारण  97/ 98 सालात ...ह्या क्षेत्राला खरे ग्लॅमर मिळवून दिले ते शेफ संजीव कपूरने...  रेसिपीचा पहिला वहिला शो तुफान लोकप्रिय झाला... खाना खजाना किंवा तत्सम काहीतरी नाव असावे..पण आम्ही नाक लावून पहायचो. त्यात वापरलेले पदार्थ, केलेल्या कृती (प्रोसेस) आणि तयार झालेली डिश ह्यांची आणि आमची काडीमात्र ओळख नव्हती...  तरीही घरोघरी बायका हा शो पाहत , काही तर डायरी घेऊन रेसिपी उतरवून ठेवत. त्यातले नेमके किती पदार्थ प्रत्यक्षात केले जात ...हा एक वादाचा मुद्दा आहे. मला तर दाट संशय होता की कधी नव्हे तर एक पुरुष स्वयंपाक करतोय हे पाहणेच तेव्हा आनंददायक वाटत असावे. शिवाय ह्या शेफ लोकांचे प्रेझेंटेशन इतके अफलातून असायचे की पदार्थ उमजले नाहीत तरी डोळे तृप्त होत. जिलेटीन, कमलककडी, कलौंजी अशा सीमापार पदार्थांची ओळख झाली ती ह्याच रेसिपी शोज् मधून. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर भारतात मास्टर शेफ सुरू केलं आणि त्याचे थोडे थोडके नाही तरआठ सिझन यशस्वी झाले... माझ्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमांपैकी हा एक... ह्या स्पर्धेचे परीक्षक असणारे अनेक नामवंत शेफ घराघरात पोहोचले... शेफ कुणाल, शेफ रणवीर ब्रार ह्यांच्या रेसिपीचे कार्यक्रम म्हणजे रेसिपीच्या जोडीला नेत्रसुख. एखाद्या हिरोला लाजवेल असा फिटनेस, कॅमेरासमोर आत्मविश्वासाने केलेला वावर... तमाम स्त्री वर्गाचे मन जिंकून गेला. ह्या सगळ्यांत ग्लॅमर आणि प्रसिद्धी सर्वांधिक लाभलेले शेफ विकास खन्ना ... म्हणजे पुरणपोळीवर साजूक तूप. आता शेफ होणे अधिक चॅलेंजिंग झाले आहे... ते आता एक मल्टी टास्किंग स्कील मानले जाते. शेफ म्हणून नवनवीन पदार्थांचे आविष्करण तर करायचेच पण जोडीला वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींच्या चवींचे पदार्थ करायचे... त्याचसोबत पारंपारीक पदार्थ , त्याच्या पद्धती देखील अभ्यासून खाद्यसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न देखील करायचे. यासाठी अनेक दुर्गम भागांत, देश विदेशात सतत प्रवास करत तेथील पदार्थ आत्मसात करायचे... केव्हढं विस्तारलेलं क्षितिज आहे. त्याचबरोबर रेसिपींची पुस्तके लिहायची, टी व्ही , प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया, वृत्तपत्रे ह्यांतून सतत झळकत प्रसिद्धी देखील अनुभवायला मिळू लागली. इतर सगळ्याच पेशांप्रमाणे मेहनत संघर्ष ह्यात आहेच पण तो कुणाला चुकलाय?
                   माझ्या लहानपणीपासून केलेल्या हरतालिकेचे फळ म्हणून की काय ..स्वयंपाकाची अतिशय आवड असणारा नवरा मला लाभला. माझा नवरा व्यवसायाने शेफ नसला तरी अत्यंत चविष्ट स्वयंपाक करतो... स्वयंपाक म्हणण्यापेक्षा विविध चवींचे, वेगवेगळ्या कुझिन्स मधले भन्नाट पदार्थ तो आवडीने करून पाहत असतो... आणि कमाल म्हणजे प्रत्येक पदार्थ , "वा जी वा!" बनतो. You tube वरून माहिती शोधून, सगळे पदार्थ मांडून एकाग्रपणे जेव्हा तो कुकिंग करत असतो तेव्हा तेव्हा आमचं अरेंज मॅरेज आहे हे विसरून मी त्याच्या नव्याने प्रेमात पडत जाते💝🎊 गंमत म्हणजे कित्येक पदार्थांच्या नावांचे उच्चार मला प्रयत्नपूर्वक शिकावे लागतात. सरड्याची धाव कुंपणापर्यंत तशी माझी गाडी जेमतेम महाराष्ट्रीयन चार गरजेचे पदार्थ करण्यापर्यंत जाऊ शकते. त्या पलीकडे अगदी राजमा करायचा म्हटलं तरी टेन्शन येतंच मला. आजकाल घरोघरी कुटुंबातील हे बेस्ट हाफ स्वयंपाकाचे रणांगण गाजविताना दिसतात... खरं सांगायचं तर ह्या स्थित्यंतराचा परिपक्व माणूस म्हणून खूप अभिमान वाटतो. विशेषतः मुलगी नसलेल्या घरात, मुले चटपटीतपणे आईच्या हाताखाली पाने घेणे, वाढणे अशी कामे करतात... अनेकदा सवाष्ण म्हणून जेवायला गेले की त्यांचे नवरे सुद्धा अतिशय नीटस पणे पान वाढतात. घराघरांत आई आता.... "माझ्या मुलाला स्वयंपाक करायची, नवीन पदार्थ करायची आवड आहे" हे लाज न वाटू देता उलट अभिमानाने सांगतात. ह्या लॉक डाऊन मध्ये अनेकींच्या भाचे, पुतणे ह्यांनी सुरू केलेले रेसिपीज् चे चॅनल subscribe करायची विनंती करण्यात आली आणि त्या मुलांच्या चॅनल ला उत्तम प्रतिसाद मिळतोय हेही तितकेच महत्वाचे आहे. "सुगरण" हा शब्द आता लिंगभेदापलीकडे वापरला जायला हवा, इतका हा बदल सुखावह आहे.
                 स्त्रियांची कामे आणि पुरुषांची कामे अशी तीव्र लक्ष्मणरेषा असणाऱ्या एका पिढीचे आपण साक्षीदार आहोत. हळूहळू स्त्रिया घराबाहेर पडल्या, बरोबरीने कामाला लागल्या... कुठलेही कामाचे क्षेत्र त्यांनी सोडलेले नाही अगदी मुली बसच्या कंडक्टर, अग्निशामक दलात, सैन्यात ... कितीही जिकीरीच्या कामात झोकून देऊन काम करू लागल्या. आता दुसऱ्याही हाताला ही रेषा पुसट होत गेली...पुरुष देखील स्त्रियांची म्हणून असणारी खास कामे जसे मुलांना सांभाळणे, कपडे मशीनला लावणे अशी कामे लीलया करू लागले... मात्र अजूनही स्वयंपाकघर हे क्षेत्र स्त्रियांचेच मानले जाते. नव्या पिढीच्या मुलांना मात्र मुलींच्या बरोबरीने स्वयंपाक यायला हवा याबद्दल आईच आग्रही असल्याचे चित्र हल्ली दिसते. एकप्रकारे ते योग्य देखील आहे... शिक्षणाच्या /नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रांतात कधी वेगळ्या देशात राहायची वेळ आली तर अश्या मुलांचे हाल होत नाहीत... चांगले जेवण करता आल्याने ते निरोगी देखील राहतात. जपान सारख्या देशांत भारतीय जेवण मिळण्याची प्रचंड मारामार असते तिथे हीच मुले तग धरू शकतात. कधीतरी आपल्या नवऱ्याने सकाळचा चहा तरी करावा अश्या अपेक्षेत असणाऱ्या स्त्रियांची मुले जेव्हा त्यांच्या वाढदिवसाला स्वतः केक बनवून surprize देतात ... तेव्हाचा त्यांचा आनंद अवर्णनीय असतो. शेफ नवरोबा आपल्या नशिबात नव्हताच मुळी म्हणून खट्टू होऊ नका... आपल्या लेकींच्या, सुनांच्या नशीबात शेफ नवरोबा नक्कीच असेल अशी तरतूद तर आपण नक्कीच करू शकतो.👍😊

©️🔏 यशश्री रहाळकर

लिफ्ट

       
                          अनघा दातार आज जरा झटपट कामांचा उरका पाडत होती...को-ऑपरेटिव्ह बँक असली तरी स्टाफ कमी त्यामुळे कामाचा ताण जरा जास्तच होता. शक्य तेव्हढी कामे बाजूला सारत दुपारी 2 पर्यंत निघण्याची परवानगी तिने सकाळीच घेतली होती. रिटायर्ड व्हायला चार महिने बाकी असतांना तिला तसे फारसे कुणी अडवणारही नव्हते... त्यातही विशेष सांगायचे तर आजवर अत्यंत शांतपणे, सातत्याने कष्ट घेऊन काम करणारी म्हणून सगळ्यांच्या मनात आदर होता . नुकतेच बँकेने तिला 2 वर्षांचे एक्स्टेंशन घेऊन नवीन ब्रँच मधील कामे सुरळीत करून घ्या अशी विनंतीही केली होती . अर्थात त्या बाबतीतला निर्णय घेणे अजून तिने राखून ठेवले होते.. तब्येतीची काही तक्रार नव्हती पण काम तरी किती करायचे? आणि कमवून ठेवायचे कुणासाठी ?? हे प्रश्न तिला सतावत होते . खरंतर रिटायर्ड झाल्यावर नेमकं काय करायचं हेही तिचे पुरते ठरले नव्हतेच. गेल्या वर्षी पर्यंत सासूबाईंची सोबत होती ती देखील सुटली, त्यांचे वय झालेच होते ..... थकल्या होत्या पण अनघाचा आधार गेला.
                  20 वर्षांची जेमतेम असेल अनघा... बी कॉम फायनलला असतांनाच पहिले स्थळ सांगून आले.. अन् अनघा सुदामेची सौ. अनघा मोहन दातार झाली. मोहन दातार सिव्हिल इंजिनियर होते. पहिले वर्ष सणवार, कोडकौतुकात गेले... सासूबाई अतिशय हौशी होत्या. प्रत्येक लहान सहान बाब त्या आवर्जून लक्षात ठेवून करायच्या... सासरे थोडे कडक स्वभावाचे होते पण अनघाला फार माया होती त्यांची. सुखाचे ओसंडून वाहणारे माप द्विगुणित होण्याचा क्षण आला आणि होत्याचं नव्हतं झालं . त्या दिवशी अनघा मनापासून तयार होऊन त्यांची वाट पाहत होती... तिला आई होणार असल्याची गोड बातमी सर्वांत आधी मोहननाच द्यायची होती. पण.... मोहन दातारांचा साईट वरील एका विचित्र अपघातात मृत्यू झाला.... घरी आले ते त्यांचे प्रेतच. ह्या धक्क्याने तिचे अबॉरशन झाले आणि सारेच आयुष्य जणू एका न संपणाऱ्या, कोणताच थांबा नसणाऱ्या प्रवासाच्या गर्तेत अडकले. पुढे तिच्या सासऱ्यांनी तिला पदव्युत्तर शिक्षण घेण्यास , वेगवेगळे कोर्सेस करण्यास प्रोत्साहित केले. एकुलता एक लेक गेल्याच दुःख सुनेकडे पाहून बाजूला ठेवलं. अनघाला बँकेत नोकरी लागली आणि सासरे स्वतः तिच्या पुनर्विवाहासाठी स्थळे शोधू लागले. आपल्यासाठी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सासऱ्यांत तिला वडील दिसले... कधीही पांढऱ्या पायाची किंवा अपशकुनी म्हणून जिने शब्दाने आपल्याला दुखावले नाही त्या सासूबाईंत तिला माऊली दिसली. तिने आपल्या पतींच्या फोटोवर हात ठेवत सासू-सासऱ्यांच्या देखत शपथ घेतली... आता मरणार ती अनघा दातार म्हणूनच... दुसरा विवाह तिला कल्पनेतही मान्य नव्हता.  तिच्या वाट्याला जे काही चतकोर संसाराचं सुख आले होते...त्यातच ती समाधानी होती. एकच तळमळ, एकच तीव्र इच्छा तिच्या हृदयात सतत सलत असायची... 

"दैेवानं आपली आणि आपल्या पतींची भेट होऊ द्यायला हवी होती ... त्यांना ती गोड बातमी दिल्यावर काय वाटतं ? ते कसे व्यक्त होतात तेही पाहण्याचे आपल्या नशिबात नव्हते."

ही तीव्र इच्छा अनघाच्या मनातून काही केल्या जात नव्हती. दिवस सरले, वर्षे लोटली पण एव्हढा एकच क्षण आपल्याला काहीही करून मिळायलाच हवा होता, असे सतत तिचे अंतर्मन तिला सांगे . बाकी आपण अत्यंत कमनशिबी आहोत ह्यावर तिचा ठाम विश्वास होता.
                      सासऱ्यांची तिने अखेर पर्यंत मोठ्या मायेने सेवा केली... सासूबाई तर बरीच वर्षे होत्या... त्यांचा तिला मोठाच आधार वाटायचा. तिच्या डोंगराएव्हढ्या एकाकी आयुष्यातली हिरवळ म्हणजे सर्वेश. सर्वेश तिच्या भावाचा मुलगा तो सहा महिन्यांचा असेल नसेल त्याची आई बाळंतरोगात मृत्युमुखी पडली. 'माय मरो मावशी जगो !' असेच काही नाही 'माय मरो नि आत्या जगो!' अशी नवीन म्हण पडावी असे अनघाने सर्वेशला सांभाळले. भावाच्या दुसऱ्या संसारात अडथळा नको म्हणून सर्वेशला तिने आपल्या घरी नेले ते कायमचेच. बारावी पर्यंत तो शिक्षणाच्या निमित्ताने तिच्याच घरी राहत होता नंतर मात्र उच्च शिक्षणासाठी जो पुण्याला रवाना झाला तो तिकडेच रमला. त्याचे आणि अनघाचे एकमेकांशिवाय पान हलत नसे.. सुट्टीत तो तरी येई किंवा ती तरी थेट पुणं गाठायची. त्याने आपल्याच वर्गमैत्रिणीशी स्पृहाशी लग्न केलं... तरीही ह्या नात्यात फार काही बदल झाला नाही. स्पृहा सर्वेशपेक्षाही काकणभर अधिकच लाघवी होती. रोज सकाळी अनघाला सर्वेशशी बोलल्याशिवाय करमत नसे.. सकाळी पहिला फोन ती सर्वेशला करत करतच चहा घ्यायची. सर्वेश तिला "कायमचेच ये ना आत्तू! " ,म्हणून बोलवत होता... गेल्या वर्षी पर्यंत सासूबाई होत्या . त्यांना कसे सोडून जाणार ह्या वयात. आता रिटायर्डमेंटला जेमतेम चार महिने बाकी होते .. आणि सर्वेशलाच औरंगाबादला बदली मिळाली... तो  बँकेच्या नवीन ब्रँचचा मॅनेजर म्हणून रुजू झाला. अनघाचा आनंद ओसंडून वाहत होता... पुन्हा एकदा जणू आयुष्यच परतले होते तिच्याकडे.  सर्वेश आणि स्पृहाने सामान घेऊन आपल्याच घरी यावे असे तिला वाटत होते मात्र सर्वेशच्या मते, 

" राहण्याची सोय बँक करतेय तर घ्या करून... सामान तर ठेऊन घेऊ पुढे आहेच आत्तुचे घर "

बँकेकडे तारण म्हणून पडलेले,  लोन फेडू न शकलेल्यांचे फ्लॅट बँक कर्मचाऱ्यांना देतात... ती जुनाट घरे पाहूनच तरुण लोक पळून जात. अश्याच एका अतिशय जुनाट चार मजली बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर सर्वेशला फ्लॅट मिळाला. स्पृहाला तिची नोकरी सोडावी लागणार होती त्यामुळे अजून काही दिवस नोटीस पिरियडला बाकी असल्याने तिला ते भरून देणे भागच होते. सगळे सामान आणि सर्वेश पुढे निघून आले... स्पृहा काही दिवस आपल्या आईकडे राहणार होती.. आईला तरी स्पृहा शिवाय कोण होते म्हणा!  थोडी समजून घालून आईलाही आपण औरंगाबादलाच न्यावे असे तिला वाटायचे.
                  सर्वेश येणार म्हटल्यावर अनघाच्या अंगात आगळाच उत्साह संचारला. पहाटे उठून सर्वेशच्या आवडीचा मसाले भात, सुरळीच्या वड्या , बासुंदी , पुरीचा बेत करून तिने डबा भरून घेतला. दुपारी हाफ डे निघून ती सर्वेशच्या घराकडे निघाली... थोडी त्याला मदत करू सामान लावण्यात .. हेही मनांत होतेच. बँकेतून थेट रिक्षा करूनच ती निघाली.. सातारा तांडा हे नाव तेव्हढं तिनं ऐकलं होतं... हा भाग  बराच लांब असणार हे नक्कीच होतं. वाटेत थांबून तिने थोडं चहा साखर , दूध, डाळ तांदूळ असं जुजबी सामान घेतलं. अचानक आभाळ भरून आलं आणि भर दिवसा चांगलाच काळोख पडला. कसे बसे चार जणांना विचारत रिक्षा पुढे जात होती... शेवटी त्या भागात पोहोचले ... अगदी शेवटचे टोक गाठले तिथेच ही "केतन निकेतन " नावाची बिल्डिंग होती. तिला हुष्य झालं! सामान काढून घेत रिक्षेवाल्याला पैसे देऊन ती फाटकाकडे वळली... आधीच काळवंडलेला उजेड त्यात त्या बिल्डिंगचा विटका हिरवा रंग... फाटक गंजलेलं... तशी ती एकाकी म्हणावी अशीच इमारत... पुढे फार वस्ती नाही आणि  अलीकडे दोन बिल्डिंग जमीनदोस्त करून नवीन उभारण्याचे काम सुरू होते. फाटक उघडून आत पाऊल टाकलं आणि अचानक एक विचित्र ओढ तिला त्या जागेबद्दल वाटू लागली. तीव्र सुप्त आकर्षण होतं त्या जागेत... एक अनोखा सुगंध तिच्या भवती दरवळू लागला... खोल श्वास भरून घेत ती स्वतःशीच पुटपुटली, 

"निशिगंध... आहा! मोहनना फार आवडायचा." 

भर दुपारी निशिगंध दरवळेलं कसा?? असा प्रश्न तिला पडला नाही . तिला तृप्त व्हायचं होतं आणि कुणालातरी तृप्त करून मोकळं करायचं होतं. भारल्या सारखी ती झपाझप पावलं टाकत चालू लागली. आपण इथं का आलोय? ह्यांचाही तिला विसर पडला. समोरच तिला लिफ्ट दिसली... जुनाट... अगदी  जखमेवरच्या खपली सारख्या काळपट रंगांची... ही लिफ्ट सुरू आहे की नाही? सर्वेशला फोन तरी करावा असला कोणताच विचार न करता ती झटकन आत शिरली... भयावह काळोख... अचानक सगळे दिवे सुरू व्हायचे आणि झटक्यात बंद पडायचे. लिफ्ट मध्ये बटणे नव्हतीच की काय? मात्र लिफ्ट सुरू झाली. तिने कोणतेही बटन न दाबता ती वरच्या दिशेला जाऊ लागली. कदाचित वरून कुणीतरी कॉल केली असावी... भारल्या सारखे वातावरण होते तिथले... किती काळ किती युगानुयुगे लोटली जणू तिथे... ती निश्चल भारावल्यागत स्तब्ध झाली होती. एका बाजूला असणाऱ्या आरशात तिला तो क्षण दिसला त्यासाठी ती कायम तळमळत होती. तिने तिचे पती मोहन ह्यांना आपण आई होणार असल्याचं सांगितलं... त्यांच्या चेहऱ्यावरील सुखद धक्का , त्यांनी अत्यावेगाने मारलेली मिठी सारे तिने प्रत्यक्ष अनुभवले... तिला घट्ट जवळ घेत, आता काळजी घे सांगत ......सारे अंधुक झाले. तो क्षण संपला .. मात्र अलौकिक शांती , तृप्तता अनघाला देऊन गेला.. चौथ्या मजल्यावर लिफ्ट थांबली... आणि अचानक तिला उमजले आपल्याच मनाचे खेळ सारे... एखादी कॅसेट घासल्यागत  मन एका त्या क्षणात अडकले असावे.  
            7 नं च्या फ्लॅटची  बेल तिने वाजवली आणि सर्वेश आत्तूला पाहून जाम खुश झाला... सामान तर येऊन पडले होते पण काय नि कसे आवरावे हेच त्याला उमजत नव्हते . भूक सुद्धा जाम लागली होती. पसाऱ्यात थोडी जागा करून मस्त आवडीचे आत्तूच्या हातचे चविष्ट जेवण तो मनापासून जेवू लागला... अनघा त्याला म्हणाली ,

"आधी तो induction सुरू करते बाबा!मस्त कडक चहा घेते मी , डोकं जाम झालंय... काय हे तुझं घर... अरे कुठच्या कुठे? रिक्षा वाल्याने 300₹ घेतले ... मॅनेजर साहेब द्या आता ते मला" 

म्हणताच दोघेही हसू लागले. सर्वेश चवीने जेवू लागला मधेच स्पृहाला फोन करून कसा मस्त जेवतोय एकटा म्हणत तिला चिडवू लागला. अनघाला खरंतर खूप थकवा आला होता ... चहाचा कप घेऊन ती बसली आणि आजूबाजूला पडलेल्या असंख्य खोक्यांकडे पाहत म्हणाली... 

"इतकी जुनी बिल्डिंग आहे पण बरं झालं लिफ्ट आहे. केव्हढं सामान आहे हे. नाहीतर वर कसं आणलं असतं कोण जाणे."

फोन संपताच सर्वेश म्हणाला, 
"मी स्पृहाला म्हणालो कमी कर सामान , विकून टाक पण  तुम्हा बायकांचा चिंधीतही जीव अडकलेला असतो."

अनघा खळखळून हसत सुटली.. सर्वेश खोटा रागाचा आव आणत म्हणाला

" हं हं ! आत्तू हसू नकोस तू ! हे एव्हढं अजस्त्र समान चार हमाल लागले उचलून वर आणयला. ह्या जुन्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट नसणार हा अंदाज आधीच बांधला असता ना तर चौथ्या मजल्याला नाहीच म्हटलं असतं मी."

अनघाच्या हातातून कप पडला..

"काहीही काय सर्वेश? लिफ्ट तर आहे ना! मी आत्ता लिफ्टनेच तर वर आली."

"काहीही काय आत्तू? तुला माझी खेचायची असेल पण सॉरी! वेडा आहे का मी तीन हजार मोजायला .. नुसते सामान उचलून आणायला मोजलेत."

अनघा आपल्या मतावर ठाम होती..
"सर्वेश मी गंमत करत नाहीये मी लिफ्ट नेच वर आलीये."

"आत्तू , ह्या बिल्डिंगच्या लिफ्टच नाहीये. जागा करून ठेवलीये पुढे लावू म्हणून पण त्यात लिफ्ट नाही."

दोघांचे कडाक्याचे वाद पेटले... शेवटी सर्वेश हमरीतुमरीवर येत म्हणाला..

"चल, चल दाखव कुठेय लिफ्ट?"

अनघा तरातरा पायात चपला घालून बाहेर आली , 
"चल ही इथेच ... अरे! कुठे गेली. सर्वेश माझ्यावर विश्वास ठेवा इथे लिफ्ट होती मी लिफ्टनेच वर आले."

"आत्तू तुला बरं वाटत नाहीये का? आराम कर बरं जरा वेळ.. केव्हढी घामाघूम झालीयेस."

सर्वेशने सांगितल्या प्रमाणे लिफ्टची फक्त जागा होती त्यात लिफ्ट नव्हतीच.. अतिशय जुनी जाळी जळमटे लोंबत होती फक्त... लिफ्ट नव्हतीच. अनघाचा स्वतः वरचा ताबा सुटला , ती जोरजोरात ओरडू लागली.

"इथे लिफ्ट होती इथे लिफ्ट होती मी स्वतः त्यात आले."
अनघा बेशुद्ध पडली... तिचा आवाज ऐकून बिल्डिंगचे लोक गोळा झाले...शेजारचे सदावर्ते काका शांतपणे सर्वेशला म्हणाले... 

"त्या लिफ्टने आल्या का?"

सर्वेशला काही कळेनासे झाले... अँब्युलन्स बोलावली. अनघाला अचानक बी पी शूट झालं म्हणून ऍडमिट करून घेण्यात आलं. सर्वेशने ताबडतोब स्पृहाला "आत्तू आजारी पडली असून ऍडमिट केले" ...असल्याचे कळवले... "बापरे! दगदगीने बी पी शूट झालं " म्हणत ती सुद्धा हळहळू लागली. अनघा अजूनही ग्लानीतच होती डॉक्टरांनी सर्वेशला आता घरी जा व उद्या या असे सांगितले. काही emergency आली तर फोन सुरू ठेवा,  बोलावून घेऊ हेही बजावले. अतिशय थकून घरी परततोच तर दारात शेजारचे सदावर्ते काका त्याचीच वाट पाहत होते. सदावर्ते काका ह्या बिल्डिंग मधील सगळ्यांत सिनियर व्यक्ती बिल्डिंग बनली तेव्हापासून ते इथेच राहायला होते. खरंतर आजच सामान घेऊन आलेल्या सर्वेशची कुणाशीच ओळख नव्हती ... पण काका त्याचीच वाट पाहत होते. ते सांगू लागले..

"हे बघा सर्वेश... ह्या बिल्डिंगचे काम सुरू होते तेव्हाची गोष्ट.. तेव्हा लिफ्ट हा प्रकार औरंगाबादेत अगदी नवीन होता. आम्ही सगळ्यांनी पुढच्या दृष्टीने विचार करून अधिकचे पैसे भरले लिफ्ट साठी... मात्र बिल्डर काही मनावर घेईना. हा बोगदा करून ठेवला पण लिफ्टचा पिंजरा काही आणून बसवत नव्हता. आम्ही खूप चिडलो, भांडणे केली, त्याला शिव्याशाप दिले अखेर त्याने लिफ्ट चे काम सुरू केले. कुठून कोण जाणे त्याने एक भंगार लिफ्ट आणून बसवली.. बसली बसली म्हणेपर्यंत लिफ्ट कोसळली आणि काम करणारी दोन डोकी चिरडून गेली तर आतले दोघे शॉक लागून गेले."

सदावर्ते काका जरा वेळ थांबले.. सर्वेशने पाणी पुढे केलं..घोटभर पाणी पिऊन काका सांगू लागले ....

"त्या प्रसंगानंतर  बऱ्याचदा लोकांना ती लिफ्ट दिसायची... विशेषतः नविन लोकांना .. मग अनेक लोक घाबरून घर विकून गेले. माझा मात्र ह्या साऱ्यावर मुळीच विश्वास नव्हता .. मला घर इकडची शांतता फार आवडायची . एकदा आमच्याकडे घरकामाला  नव्याने लावलेली बाई लीला अशीच ओरडत बेशुद्ध पडली. ती सुद्धा कशी कोण जाणे पण लिफ्टने वर आली होती. नंतर पुन्हा लीला ह्या बाजूला फिरकलीच नाही. .. मीच आपली उत्सुकता म्हणून गेलो तर तिच्या मुलाचा अॅक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला असूनही तो तिला त्या लिफ्ट मध्ये भेटल्याचे तिने रडत रडत मला सांगितले."

जाता जाता सदावर्ते काकांनी विचारले..
"तुमच्या त्या आत्याबाईंचे कुणी आप्तेष्ट ऍक्सिडेंटने गेले होते का ?"

सर्वेशच्या पायाखालची जमीन सरकली... आत्तूने नक्की काय अनुभवलं असेल ह्याची कल्पना त्याला आली... कदाचित कदाचित ही लिफ्ट त्या दुरावलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असावा... सकाळी हॉस्पिटलमधून फोन आला... आत्तूची तब्येत स्टेबल होती.. तडक तिला भेटायला म्हणून तो निघाला. दुपारपर्यंत तिच्यातच जवळ बसून तो खुणेनेच काही काळजी करू नकोस मी आहे असा बजावत राहिला. दुपारी जर फ्रेश व्हायला म्हणून घरी आला... त्याची आंघोळ होईपर्यंत दाराची बेल घणाणू लागली.. दारात स्पृहा उभी होती. आत्तूची तब्येत बरी नसल्याचे कळताच तिचा जीव लागेना.. emegency notice पुढे करत तिने औरंगाबाद गाठले... तिच्याकडे बरंच सामान होतं.. प्रवासाने घामाघूम झाली होती. आत्तू स्टेबल असल्याचे सांगत सर्वेशने चहा टाकला... चहा घेत स्पृहा म्हणाली...

"मी खरंतर तुला कॉल करून खालीच बोलावणार होते केव्हढं सामान झालं माझं नाही म्हणता म्हणता ... पण लिफ्ट दिसली मग थेटचवर आले."

सर्वेश आ वासून पाहत होता.... अचानक भानावर येत तो म्हणाला..
"स्पृहा तुझे बाबा ऍकसिडेंटमध्ये गेले होते का ग?" 

"हो ! मी आठ वर्षांची असेन ..आल्यावर तुला surprize देतो म्हणाले होते पण भेट नाही झाली... आणि गंमत सांगू आत्ता मला लिफ्ट मध्ये तेच भेटले जणूकाही.. हातात मोठ्ठा गिफ्ट बॉक्स होता... गंमतच आहे.. काय काय कल्पना करतो ना आपण."

"स्पृहा आपण निघतोय इथून  ... yes ! आत्ता। आपण... आपण ... आत्तूकडे जातोय राहायला."

"अरे! जरा धीर धर आत्तुंना discharge तर मिळू दे... काय झालंय काय तुला? " त्याच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग पाहून स्पृहाने विचारलं...

"स्पृहा! शांतपणे ऐक. मन घट्ट कर... ह्या बिल्डिंगला लिफ्ट नाहीये...."

"काहीतरीच काय? मी लिफ्टनेच वर आले आत्ता. हे बघ ...." म्हणत  पुढे गेलेली स्पृहा जागेवरच थबकली...
आणि भान हरपून किंचाळू लागली..

"इथे लिफ्ट होती. मी खरं सांगतेय विश्वास ठेवा माझ्यावर .. मी लिफ्टनेच वर आले...."

🔏©️ यशश्री रहाळकर






      

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

आडनाव बंधू

           
   लग्न होऊन सासरी आले अन एक बाब लक्षात आली की माझ्या आडनावाच्या अनेक प्रसिद्ध व्यक्ती नाशकात राहतात. त्यांच्याशी थेट असे माझे कोणतेही नाते नसले तरी नाव सांगितले की लोक विचारतातच ... " कारंज्या जवळचे रहाळकर कोण ?" माझा नकार. "मग सोडा वॉटर वाले कोण?" माझी पुन्हा नकारघंटा. "मग सायकलवाले, CA, संस्थाध्यक्ष...??" माझे यांच्याशी खरेच नाते नाही. मग मात्र उत्साहाने विचारणारा चेहरा पाडून..." म्हणजे तुम्ही आडनाव बंधू म्हणायचे" असे खिन्नतेने म्हणायचा आणि मी कोणत्यातरी एलीयन प्रमाणे अवकाशातून टपकली असावी...असे मानून "मग कोणत्या गावचे म्हणायचे तुम्ही?" असा त्रासिक प्रश्न. आता ह्याची इतकी सवय झालीये की मी ओळख करून देताच पहिल्याच प्रश्नाला "आम्ही इथले नाही... सगळे आडनाव बंधू " असे स्पष्ट सांगून टाकते."खरंतर या साऱ्या प्रसिद्ध व्यक्तींना भेटायची तीव्र इच्छा मनात अजूनही तशीच आहे. एकच आडनाव घेऊन जगणारे, एकाच गावात राहणारे ,एकाच कुलगोत्राचे अनेक जण अपरिचित असतात...असे लोक आडनाव बंधू. कुठल्यातरी जुन्या नातेसंबंधांच्या पोकळ बंधनाने ते कदाचित बांधले असू शकतील मात्र.... त्या नात्यांची बांधणी कमकुवत झालेली असते... गाठीभेटी नसल्याने  विरळ झालेली असते. मात्र आता घरोघरी तुम्हाला असे आडनाव बंधू सहज सापडतील.
                 गंमत आहे ना! एकाच घरात एकाच कुटुंबातील आडनाव बंधू... होय !कारण त्यांच्यातील परस्पर संबंध आडनाव बंधू प्रमाणेच दुराव्याचे आणि विरळ होत चाललेले असतात. सध्या घरोघरी एकाच कुटुंबातील माणसे दिसत नाहीत तर असे हे "आडनाव बंधू " पहायला मिळतात. घराघरांचे घरपण स्पेस च्या नावाखाली संपल्यातच जमा आहे आणि उरलीयेत ती ह्या आडनाव बंधूंची हॉस्टेल्स... माफ करा ... माझं विधान तुम्हाला टोकाचं तीव्र कदाचित वाटलं देखील असू शकेल पण सत्य कटू असतं हेही तितकंच खरं! परवाच एका जरा दुरच्याच नात्यातल्या घरी कामानिमित्त जाण्याचा योग आला. हल्ली लॉकडाऊनमध्ये कुणाच्या घराची बेल वाजवली तरी लोक बाहेर दरोडेखोर तर नाही अश्या नजरेने दार किलकिले करून पाहतात.... साधे दार वाजले तरी दचकायला होते म्हणूनच  आधी घरातील गृहिणीला कॉल करूनच मी गेले... मात्र दार घरातल्या दुसऱ्या व्यक्तीने उघडले आणि भूत पुढे उभे राहिल्यागत प्रतिक्रिया झेलावीच लागली... मला जेमतेम घरात घेऊन ती व्यक्ती तत्काळ दिसेनाशी झाली... बरं! आतील स्त्री ला आवाज देऊन सांगितलेच नव्हते.. मी आपली वेड्यागत निलाजरेपणाने बसून होते.. शेवटी आवाज दिले तर ,"अगगोबाई! तू कधी आलीस ? म्हणत बाईसाहेब प्रकटल्या... नात्यातलीच माणसे.. जुजबी चौकशीने सुरुवात केली. ...

"दादा काय म्हणतोय ? झाली का डिग्री? कुठे असतो हल्ली?"

"असतो नाशकातच... पण नेमका कुठे असतो ते नेमकं सांगता यायचं नाही . अधून मधून येतो घरी बाकी मित्रांच्या खोलीवर ... परतलाय गेल्याच महिन्यात पुण्याहून .. नोकरी करणार की काही बिझनेस त्याचे त्यालाच माहीत."

माझा आश्चर्याने चेहरा बदलला असावा ... त्या लगेच म्हणाल्या..

"मी फार पडत नाही त्यात. हल्ली मुलांना प्रश्न विचारलेले आवडत नाही."

मी माझ्या मूळ मुद्द्याकडे वळले... काम होताच बाईसाहेबांनी आमच्या भिशीच्या ग्रुप वर चर्चा सुरू केली. तो आमचा सामायिक ग्रुप त्यातल्या प्रत्येकीचे आतले बाहेरचे सगळे काही बाईंना इत्यंभूत माहीत होते.. त्यातली काही रसभरीत वर्णने ऐकवायलाही त्या उत्सुक असाव्यात... "बैस ग जरा." म्हणत त्या कॉफी करायला गेल्या तेव्हढ्यात त्यांचेकडे कुणीतरी अशील आले ... पतीदेव वकील होते. दाराबाहेरच्या माणसाचा आणि ह्यांचा संवाद साधारण असा..

"वकील साहेब कधी येतील? फार जरुरी काम आहे."

"माहीत नाही."

"कुठे ऑफिसात गाठ पडेल का? किती वाजेपर्यंत असतात ऑफिसला."

"मला नेमकं सांगता येणार नाही."

ती व्यक्ती चिवटपणे म्हणाली..
"मोबाइल नं द्या ना त्यांचा... विचारून घेतो."

"मोबाइल नं मला माहित नाही.... ऋषी ए ऋषी! पप्पांचा नंबर सांग रे!"

त्या वेळी तो ऋषीरूपी, केस आणि दाढी उभ्या जन्मात न कापलेला साक्षात ऋषी वरून पाय आपटत प्रकट झाला...

"मम्मी कितीदा सांगितलं तुला एका ठिकाणी लिहून ठेव पप्पांचा नं! ..."
हा दुर्वास ऋषी कागद पेन शोधून नंबर खरडू लागला... बाहेरचा बिचारा माणूस हा शाप देतो की काय म्हणून थरथरत उभा होता.

ऋषीनी त्या माणसावर कागदाचा चिटोरा भिरकावला... तोंडावर दार आपटले आणि दाणादाण पाय आपटत..

"पप्पांना सांग एकदा मोठी पाटी ठोकून घ्या स्वतःची घरावर...वैताग आहे राव! ह्यांच्या भिकारड्या वकिलीने कोण कोण येऊन डोकं खातं."

                 ऋषी आले तसेच अदृश्य झाले. ज्या वकिलीच्या भरवश्यावर उभा जन्म तुकडे गिळलेत  आणि त्याहीपलीकडे जे ह्या अवतारकार्याला कारण झाले त्या मातृ पितृ देवतेचा जराही आदर करण्याचे संस्कार ह्या ऋषींवर झालेले दिसत नसावे. मी तर त्याच्या दृष्टीने अदृश्य असावी, कश्या आहात वहिनी? असा साधा प्रश्न विचारणे किंवा गेला बाजार तोंडदेखलं ओळखीचं स्मित सुद्धा झळकवणे त्याला जमले नाही. आपल्या पतीराजांचा नंबर देखील पाठ नसलेल्या त्या गृहस्वामीनीला कुणाच्या मुलीचे कुणासोबत लफडे सुरू आहे.... कुणाचा मुलगा बारावीला कोणत्या दोन विषयांत नापास झाला..... कुणाचे सासूशी अजिबात पटत नाही ह्या साऱ्यांचे अत्यंत सखोल ज्ञान होते. आपला नवरा किती वाजेपर्यंत त्याच्या ऑफिसमध्ये थांबतो, सध्या तो कुठे आहे हेही माहीत नसलेल्या बाईंना भिषितील कुणाच्या नवऱ्याचे कामवालीशी लफडे आहे, कुणाचा नवरा तिला घटस्फोट देणार आहे ह्याची मात्र व्यवस्थित माहिती होती. ह्या सगळ्यांत डोक्याला हात लावून मी घरी परतले. ह्यांसारख्या विचित्र कुटुंबाला काय म्हणणार तुम्ही?? कुणाचे कुणाशी घेणेदेणे नाही, कुणाला कुणाची पर्वा नाही कुणाला एकमेकांचा आदर नाही... कोणते बंध उरलेत ह्या नात्यांत?? उरले केवळ कोरडे रक्ताचे नाते.
                    घरातल्या खोल्यांची संख्या जसजशी वाढू लागली तसतसे माणसा माणसांतले अंतरही वाढू लागले. घरात एकत्र जेवणे बंद झाली, एकत्र येऊन गप्पा मारणे बंद झाले, एकत्र येत आनंदाने सणवार साजरे करणेही संपले. सगळ्यांना स्वतःची स्पेस हवी होती. घरातल्या खोल्यांच्या गुहा झाल्या.. जो तो आपापल्या गुहेत स्वतःला कोंडून घेऊ लागला... प्रत्येक जण सोशल मीडियाच्या जगात रमू लागला.. पण प्रत्यक्ष आजूबाजूला जी जिवंत माणसे वावरत आहेत त्यांचे काहीच घेणे देणे नाही. ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो घरी येणार, वाटेल तेव्हा जेवणार,  कधीतरी मध्यरात्री झोपणार... तरुण मुले-मुली कुठे आहेत? ह्याची आईला काळजी नसते... ती तिच्या किटी पार्टी आणि क्लबमध्ये मश्गुल... वडील तर घरातील त्रयस्थ उपरा मनुष्य. अश्या आपापल्या जगांत स्पेस शोधणारी, पण भरल्या घरांत एकटी ,एकाकी पडलेली कित्येक माणसे हल्ली भेटू लागली आहेत. एकट्या माणसाचे सुख कित्ती तोकडे असते आणि दुःख मात्र डोंगराएव्हढे... आपलं आपणच सहन करायचं. कुणाशी काही वाटायचं तर ह्या पिढीला जणू ठाऊकच नाही. माझ्या किंवा माझ्या पिढीतल्या सगळ्यांनाच आठवत असेल घरी फ्रीज येणं , टीव्ही घेणं हा सुद्धा सोहळा असायचा. शेजारी पेढे वाटून साजरा होतसे आनंद... वाढदिवसाला नवा ड्रेस घरभर दाखवत सगळ्यांना नमस्कार करत फिरतांना नजर न लागो म्हणून आजी कडकडा बोटे मोडायची. "माझी नात तर आज राजकुमारी दिसतेय" म्हणत आजोबा कौतुक करायचे... सगळ्यांचे प्रेम , सगळ्यांचे कौतुक .. आनंद वाढता वाढता वाढायचा. आजकाल आनंद सुद्धा वाटत नाहीत ... कमनशिबी लोक! दुःखाचा ,संकटाचा प्रसंग आलाच तर पाठीवरून हात फिरवायला ,धीर द्यायला हात असायचे. उठसूट घे झोपेच्या गोळ्या अन् दे जीव अशी भावना सुद्धा होत नसे. एकत्र जेवण म्हणजे एकमेकांची चौकशी असायची, काय नव्हते त्यात? वडिलांचे मुलांवर लक्ष, शिस्त, आईची पाठराखण, भक्कम आधार, नैतिक धाक... आणि आपल्यावरील आईवडिलांचे निरतिशय प्रेम.... हे सारे सारे होते त्या रात्रीच्या एकत्र जेवणात. थोडी भाजी कमी असली तर चटणी, लोणच्याशी सुद्धा जेवता येते हे नकळत शिकवले जायचे. नाही अपेक्षेप्रमाणे टक्के पडले, नाही होकार दिला आवडत्या मुलीने तरीही आयुष्य संपत नसते... दुसरे पर्याय असतात... ही मोलाची शिकवण आमच्या पिढीला त्या एकत्र जेवणानी दिली.
                  आजकाल एकाच घरात राहूनही खातांना एकमेकांना माणूस म्हणून विचारत सुद्धा नाहीत. माकडागत मिळेल ते ,आवडेल ते ओरबाडायचे... अन्न ग्रहणाचे संस्कार तर फारच दूरची गोष्ट. एका मैत्रिणीच्या दोन लेकी अगदी पाठोपाठच्या.. पहिली क्लासहून घरी आली तिला भूक लागली तशी तिने तिच्यासाठी मॅगी करून घेतली. संपूर्ण एका बाऊल मध्ये काढून ती एकटीच खाऊ लागली. तिची बहीण विडिओ गेम खेळत होती... अर्ध्या तासाने ती उठली तिनेही तिची तिची मॅगी करून खाल्ली... कुणीही कुणाला खातेस का ? किंवा तुला हवे का ? असे विचारले नाही.. आश्चर्याने माझी बुबुळे फक्त बाहेर पडायची बाकी होती. त्यांची आई म्हणाली, 

"दोघी स्वतंत्र असाव्या असाच मी प्रयत्न करते. कुणाचे कुणावाचून अडायला नको."

देवा रे! हे असं गिधाड खाणं आम्हाला जन्मात कधी जमलं नाही.. आम्ही सगळे सख्खे चुलत गोतावळा एकत्र जमायचो ,असेल ते आनंदाने वाटून खायचो. मी आणि माझा दादा तर पातळ भाजीतले दाणे सुद्धा उधार घ्यायचो एकमेकांना.. आणि पुढच्या वेळी लक्षात ठेवून परत घ्यायचो..😂😂 सगळ्या माहेरवाशिणी जमल्या की कच्चा चिवडा व्हायचा नाहीतर मोठ्या परातीत भेळ केली जाई... आहाहा! काय स्वर्गीय चव होती त्याची. बरेचदा मी धाकट्या आत्याच्या ताटात लोणचं पोळी जेवायला बसायची...  आम्ही अगदी तुपाची बेरी सुद्धा वाटून घ्यायचो आणि आयुष्यभर कुणाचं कुणावाचून काही अडलं नाही. एक मात्र नक्की झालं..आजही पुरणपोळी खाताना धाकट्या काकाची आठवण काढून खाते, पाऊस पडला की "कांदा भजी करा रे कुणी" म्हणत स्वतः कांदा चिरणारा मधला काका हटकून आठवतो, फणस दिसला की काकूंना आवडते भाजी .. मनात येतेच. कढी गोळे केले की दादा आठवतो.... लोणचं म्हटलं की आजी, चहा म्हटलं की बाबा. पदार्थांसोबत माणसे जणू मनात घोळवून ठेवलीये . सगळ्यांच्या आठवणीने दोन घास जास्त जातात आणि सारेच पदार्थ अधिकच चविष्ट होतात. 
                 एका अतिशय सुखवस्तू अभ्यासू प्राध्यापिका, लेखिकेच्या घरात तिने स्वयंपाकघरात एक बोर्ड लावलेला मी पहिला. नेमकी सवयीने मी कप ठेवायला म्हणून आत गेले अन् मला दिसलाच. हा बोर्ड स्वयंपाक करणाऱ्या बाईंसाठी होता. घरात सहा माणसे आजी आजोबा, प्राध्यापिका बाई, त्यांचे यजमान आणि 20 आणि 22 वर्षे वयाची दोन मुले. प्रत्येकाने उठल्यावर आपण सकाळी आणि रात्री घरी जेवायला आहोत का ? ह्यानुसार आपल्या नावासमोर टिक करायची.. असल्यास किती पोळ्या तो आकडाही लिहायचा. त्याप्रमाणे स्वयंपाकाच्या बाई मोजून पोळ्या वगैरे करणार.

"मला अन्न वाया गेलेले अज्जिबात आवडत नाही"...

 मॅडम म्हणाल्या. मला कीव वाटली ...त्या घरातला संवाद किती संपला होता. कुणालाच कुणाशी बोलायचे ,काही विचारायचे नसावे.  साधे जेवणार की नाही हे सुद्धा सांगायला नको आणि कुठे जेवणार हे विचारायला नको...असेच आम्ही उभयता रिटायर्ड झालेल्या एका काकांकडे गेलो . काकू चहाचे तीनच कप घेऊन आल्या..

"काकू चहा बंद केलाय की काय तुम्ही?" 

मी चोंबडेपणानें विचारले. काकू शांतपणे बसल्या आणि चहा घेत म्हणाल्या....

"ह्यांना चहा त्यांच्याच हातचा आवडतो."

काका उठून आपला चहा करून घेऊन आले. हे दोघेच घरी , चहा मात्र रोज आपापला करून घेतात.. कुणालाच कुणाच्या हातचा आवडत नाही. आपल्या जोडीदाराच्या हातचा वेगळ्या चवीचा चहा सुद्धा कसला भन्नाट असतो, अगदी बिघडलेला सुद्धा👍 कधी आपल्याला हवा तसा करावा तर कधी दुसऱ्याला आवडतो तसा पिऊन पहावा.. त्यातही भलतीच गोडी असते. मात्र हल्ली व्यक्तिस्वातंत्र्याच्या संकल्पनांचा इतका अतिरेक झाला आहे की कुणीही काहीही ऍडजस्ट करायलाच तयार नसते. बरं! आम्ही कसे अजिबात 0.5 % सुद्धा बदल सहन करत नाही..  ह्याचा कोण अभिमान असतो लोकांना. एखादी व्यक्ती ऍडजस्ट करतेय म्हणजे ती घोर अन्याय सहन करतेय असं चित्र मांडलं जातं.  खरंतर माणूस म्हणून जगणं इतकं अवघड आहे का? आपली कुटुंबसंस्था खरंच इतकी वळ उमटावी एव्हढी काचतेय का?
                   आयुष्यातील पाच वर्षे मी होस्टेलमध्ये काढली आणि जीवनाचं सर्वात मोठ्ठ तत्वज्ञान ह्या काळात मला मिळालं... , "माणसाला येईल त्या परिस्थितीत जगता आलंच पाहिजे. परिस्थिती बदलणे हातात नसते, आपल्या आजूबाजूची माणसे सुद्धा पर्यायांत उपलब्ध नसतात... ती स्वीकारता आली पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही येणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेता तेव्हा तेव्हा मिळणाऱ्या कणभर सुखाचा आनंद मणभर असतो." जसे घरापासून दूर गेलं की घराची किंमत कळते...  तसे कुटुंबसंस्था नामशेष झाली की त्याची किंमत कळणार आहे बहुदा आपल्याला. हल्लीच्या पिढीवर सतत टीका होते की मुले वाट्टेल त्याचा / तिचा हात धरून पळून जातात, लग्न झालं तरी काही दिवसांत भांडून तंटून वेगळे होतात, कुणी कुणाला विचारत नाही, आईवडिलांचं लक्ष घालणं म्हणजे आयुष्यातली ढवळाढवळ... हे सारं सारं व्हायला काही अंशी आपणच जबाबदार नाही का? एकाला त्रास झाला, दुःख झालं, तर त्याच्या वेदना दुसऱ्या आडनाव बंधूला होत नाही. फार तर क्षणभर हळहळ व्यक्त करून तो सोडून देईल..; पण एकाच कुटुंबातील माणसांना एकमेकांच्या दुःखांच्या धारा चिरत असतात.. ती धग सगळ्यांना चटका लावत असते. जो धडा हॉलिवूडच्या लोकांना मिळालाय तो आपण अजून गिरवायचा बाकी आहे.. बघा बहुतेक हॉलिवूड मूव्हीत शेवटी सगळीं मारधाड करून झाली की हिरो म्हणतो, ... "सगळ्यांचं एक कुटुंब असतं, .. आणि कुटुंब सर्वाधिक महत्वाचं ." AT last everyone has a Family which is most most important...

©️🔏 यशश्री रहाळकर




गौराई, सोन्याच्या पावलांनी ये!


                   नांदुरा तालुक्यातलं शेंबा तसं इवलसं आणि बरच आडवळणाच गाव. तेथील जोशी कुटुंब "शेंबेकर जोशी " ह्याच नावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. गोपाळ शास्त्री जोशी मोठे विद्वान ज्योतिषी... उभी हयात त्यांनी पौरोहित्य करून अत्यंत कर्मठपणाने सगळ्या शास्त्र नियमांचं पालन करत घालवली....त्यांना चार पुत्र आणि दोन कन्या. मोठे नाना जोशी गावातल्याच शाळेत शिक्षक म्हणून लागले... त्यांचे सारे आयुष्य त्या इवल्या गावातच गेले. थोडाफार शेतीवाडीचा पसारा , गावातलं जुन्या धाटणीचं घर, जोडीला पौरोहित्य आणि ज्योतिष्य..... ह्या साऱ्या व्यापात ते कायम गुंतलेले असायचे. सोवळे ओवळे व्रतानुष्ठान , सणवार ह्यांचे त्यांनी गोपाळ शास्त्रींइतकेच कर्मठपणाने पालन केले. नानांच्या अर्धांगिनी माई म्हणजे मूर्तिमंत ममता... धाकटे दिर, नणंदा, जावा, पुतणे, भाचे त्यांची लेकरं सगळ्यांना धरून चालणाऱ्या... आल्यागेल्याचे अगत्याने करणाऱ्या, सगळ्या सणवारांचे , कुळधर्माचे  नीट निगुतीने पालन करणाऱ्या ....स्वभावाने अत्यंत तापट असणाऱ्या आपल्या सासऱ्यांचे सारे त्यांनी तोंडात खडीसाखर ठेऊन केले. गोपाळ शास्त्रींना आपल्या ह्या सुनेचा अतिशय अभिमान होता. अगदी शेवटी मुखात पाणीही माईंच्याच हाताने घेतले त्यांनी. हृदयात प्रेमाचा अथांग सागर असणाऱ्या माईंची कूस रिकामीच होती... एक दोनदा पदरात अर्धवट माप टाकलं देवानं...ते फळलं मात्र नाही पण त्यांची कशाबद्दलच कधीच तक्रार नव्हती. नाना आणि माई कायम समाधानी असायचे... देवानं जे दिलं ते आपल्यासाठी सर्वोत्तम असणार ह्याची त्यांना खात्रीच होती. त्या जोडप्याच्या चेहऱ्यावर असीम समाधानाचं तेज सतत विलसत असायचं... शक्य होईल तशी प्रत्येकाला मदत करायची आणि कुणाकडूनच काहीच अपेक्षा ठेवायची नाही , हे त्यांचं तत्त्व. पाठच्या भावंडांनाही नाना सढळ हाताने मदत करायचे... "ठेवून तरी काय करायचं आहे ?" असं ते नेहमी माईंना म्हणत. 
                      त्यांच्या घरात मूल नसूनही घर कधीही रिकामं नव्हतं.. पिढ्यानपिढ्या पुजले गेलेले तेजस्वी देव त्यांच्यापाशी होते .. आणि खरं सांगायचं तर एखादं घर व्यापून उरतील एवढ्या संख्येत होते. ह्या देवांच्या पूजा अर्चनेतच तर  त्यांचे दिवसाचे कित्येक तास अगदी आनंदाने जात असत... त्या जुन्या घरातील शिसवी देव्हारा अर्धी खोली व्यापेल एव्हढा मोठ्ठा होता. सुरेख नटलेला कुलस्वामिनी आई रेणुकेचा तांदळा... नवरात्रात अगदी झगमगून जाई... त्यापुढे भजने गाताना माई तल्लीन होत . पितळी घडीव हत्तीच्या अंबारीत आरूढ झालेली चतुर्भुज महालक्ष्मीची कोरीव चांदीची मूर्ती ....मार्गशीर्षातले गुरुवार डोळे ठरत नसत तिच्यावर... तळहातात मावणार नाही एव्हढा लंगडा बाळकृष्ण ... हा मोठ्ठ गोड होता... गोकुळाष्टमीला त्याला झुल्यात झुळवून कृष्णजन्माचा सोहळा त्या करत आणि जणू आपलं मातृत्व उचंबळून आल्याचे त्यांना जाणवायचे... त्याच्याच शेजारी वैराग्याची मूर्ती श्रीदत्तप्रभू गाईसह विराजमान होते. चांदीच्या कोंदणात शाळीग्राम होता... बालाजी, विठोबा रखुमाई,  शिवपिंडी आणि नाग , खंडोबाचा टाक ... सारे सारे चांदीचे, अगदी घंटा आणि शंखाची बैठक सुद्धा चांदीचे. देवघरात मध्यभागी ठाण मांडून बसलेली मोठी चांदीची सिद्धीविनायकाची मूर्ती जरा कोपिष्ट वाटायची... पण शेजारीच असणारे गौरींचे मुखवटे जणू त्याला "शांत रहा" सांगत असाव्या. ह्या गौरींवर त्यांचे विशेष प्रेम होते. गौरीचे चांदीचे दुधाळ चेहरे पाहिले की त्या तृप्त होत... त्यांच्याकडे हे मुखवटे रोजच्या पूजेत असायचे. एव्हढे सगळे चांदीचे देव गोपाळ शास्त्रींनी आणि त्याहीपुर्वी त्यांच्या पूर्वजांनी कसे सांभाळले कोण जाणे?? लुटपाट, परकीय आक्रमणे ह्यातून ते शाबूत राहिले.गोपाळ शास्त्रींनी तर उपवास काढून सुद्धा दिवस काढले पण देव सांभाळले. सकाळपासून देवाच्या पूजेची फुले काढ, हार कर, रांगोळ्या काढ, गंध उगाळून दे, नैवेद्याला कर ह्या सगळ्यात माईंचा वेळ छान जाई. पुढे नाना जीव लावून पूजा करत.. ते डोळे भरून पाहणे त्यांना फार आवडायचे.गौरी-गणपतीला सारे कुटुंब एकत्र जमायचे...एव्हाना त्यांच्या दिरांना सुना, जावई सुद्धा आले होते, नातवंडे झाली होती. तीन पिढ्या एकत्र येत सारे सणवार करायच्या. नानांची ईश्वर सेवा फळाला आली... गुरुचरित्राचे पारायण करता करता त्यांना देवाज्ञा लाभली. वय वर्षे 82 .. योग्य वेळी सोनं झालं त्यांचं. आयुष्यभर औषधाची गोळी नाही की दवाखान्याची वाट धरावी लागली नाही.
                    सगळे जमले, भावंडांचं खरोखरीच प्रेम होतं थोरल्या भावावर.... तिसऱ्या दिवशी सावडणे पार पडले आणि कुटुंबातील पुरुष मंडळींची चर्चा, वाटाघाटी सुरू झाल्या...हल्ली सगळ्यांना व्यवहार उरकण्याची घाई झालेली असते. माई नानांपेक्षा दहा वर्षांनी लहान असल्या तरी त्यांचेही वय सत्तरी ओलांडलेले.. आता त्यांना हा व्याप झेपायचा नाही... म्हणून सगळे विकून निर्गत लावून जाण्याचे ठरले. माईंना आपल्याकडे नेण्याची सगळ्यांची तयारी होती, तसा माईंचा कुणालाही त्रास नव्हताच. आलटून पालटून त्या राहतील सगळ्यांकडे असा परस्पर निर्णय देखील घेतला. थोरल्या पुतण्यानी शेतीची चालू बाजारभावाने किंमत काढून आणली, धाकट्या दिराने घरासाठी ग्राहक आणले सुद्धा. सध्या दिवसवारे आटोपले की माईंना डोंबिवलीचे दिर घेऊन जाणार होते, आवश्यक जुजबी सामान बांधण्यास सुरुवात करायचे सूतोवाच त्यांनी केले. घरातले सामान  गरज आणि जागेनुसार भराभर वाटून घेतल्या जाऊ लागले.  ह्या सगळ्यात माईंना काय वाटत होतं ह्याचा विचार कुणीच करत नव्हते. माईंची नणंद बयो आत्या अखेर ओरडली..

"मेल्यांनो ! रडू तरी द्या तिला पोटभर का मोळी बांधून नेताय तिचीही."

ऑफिसर पुतण्या टेचात म्हणाला..
" बयो आत्या.. हे सगळं आम्हालाच निस्तरायच आहे. तू काय चार दिवसांनी तुझ्या घरी निघून जाशील. पुन्हा पुन्हा सुट्ट्या खर्चून इथे येणं कुणाला जमणार आहे?"

त्याचीच री ओढत दुसरा पुतण्या म्हणाला..
"एखाद्याने येऊन भागणार नाही सगळे असतांना काय तो सोक्षमोक्ष लावून टाका."

सगळ्यांत धाकटी बेबी आत्या सगळ्यांना दटावत म्हणाली..

"कुंकू काय पुसले ..तिचे मालक झालात तुम्ही? तिला विचारलं का कुणी ..काय करायचं आहे? येते आहेस का आमच्याकडे ?"
पांढऱ्या कपाळाची वेदना तिने अनुभवली होती.

मॉडर्न पुतणसून टोमणा मारत म्हणाली...

"मुली म्हणून तुमचाही वाटा पडेलच की ह्यात सगळ्यांचा फायदा होतोय तर कश्याला खोडा घालताय."

"आम्हाला काही नको."
दोघी आत्या एकाच वेळी म्हणाल्या. बयो आत्या शांतपणे म्हणाली....

" आयुष्यभर चोळीबांगडी पुरवली भावाने आता तो गेल्यावर त्याच्या घराचे वासे मोजून काय करायचं...?"

बयो आत्या आणि बेबी आत्या तश्या परिस्थितीने अगदी बेताच्या,  बयो आत्याचा नवरा एका मंदिरात पुजारी,मुलगाही फार शिकला नाही त्याचे जोडीला दुकान,घरी सून 2 नातवंडे.धाकट्या मुलीचे लग्न व्हायचे होते. बेबी आत्याला फार तरुणपणी वैधव्य आले होते ..तिला दोन मुली एक मुलगा . थोडी शेती आणि एक छोटे दुकान ,परिस्थिती अगदी हातातोंडाशी गाठ. मात्र जे आपलं नाही त्याचा हव्यास न धरण्या इतक्या त्या स्वाभिमानी नानांच्या बहिणी होत्या. माई मेलेल्या मनाने उठल्या सगळ्या पुरुषांदेखत येऊन बसत म्हणाल्या..

"तुमचे सगळे मला मान्य आहे. म्हणाल त्या कागदांवर सह्या देते फक्त देवांचं काय ठरवलं आहे?"

माईंचा प्रश्न न कळल्या सारखे सगळ्यांचे चेहरे प्रश्नार्थक झाले. माई आपला मुद्दा स्पष्ट करत म्हणाल्या..

"माझेही आता वय झाले आहे. ह्यांच्या पश्चात किती जगेन माहीत नाही.. मात्र हे सगळे देव्हाऱ्यातले देव तुम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. इतके वर्षे आम्ही दोघांनी मनोभावे पार पाडली. हे सारे शेंबेकर जोशींचे वंशपरंपरागत देव... आता तुम्ही सांभाळायचे."

सगळ्यांचे उतरलेले चेहरे न्याहाळून त्यांनी पुन्हा एकदा जोरकसपणे आपला मुद्दा मांडला...

"सगळे एकट्याने न्यायला हवे असे काही नाही हो!  सोयीप्रमाणे दोन दोन वाटून घ्या. कुळधर्माचा ताणही येणार नाही ."
       
                     बैठकीत एकदम स्मशानशांतता पसरली... वडिलोपार्जित मिळणारा पैसा, जमीन, वस्तू सगळ्यांना हवे होते पण कुळाचाराचे देव मात्र नकोसे झाले होते.प्रत्येकाने आपापली कारणे पुढे केली. नानानंतरचे डोंबिवलीचे दिर म्हणाले,

"वहिनी मला एकच लेक.. ती लग्न करून तिच्या घरी नांदतेय.  माझं घर  मुंबईतलं.. हे एव्हढंस टीचभर ..कसं व्हायचं? बरं ! नानांनंतर मी मोठा म्हणजे आज ना उद्या माझा नं लागायचा.. देव नेऊन काय करू सांगा? पुढे कोण करणार त्यांचे?"

धाकटा दिर तोऱ्यात म्हणाला..
"तुम्हाला तर माहितीच आहे माझा अनी.. जपानला गेलाय. वर्षभरात तो सेटल झाला की आम्हीही कायमचे तिकडेच जायचे म्हणतोय. जपानला देवांचं काही व्हायचं नाही.. अहो साधा आपला किराणा तिथं सोईनं मिळत नाही."

मधल्या दिरांना दोन मुलगे .. एक औरंगाबादला , मोठा ऑफिसर दुसरा बंगलोरला दोघांचाही मोठी घरं... माई मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहू लागल्या..एकदम चर्चेत उडी घेत जाऊच म्हणाली 

"माझ्याकडून आशाच करू नका माई. गुडघे झिजले माझे operation करायचे आहे पुढच्या महिन्यात त्यात माझ्या घरचे सगळे वातावरण मॉडर्न ... आमच्या हाय फाय कल्चरमध्ये काही हे सूट होणार नाही. चार दिवस इथे येऊन करणं वेगळं आणि देव नेणं वेगळं."

निराश होऊन माई म्हणाल्या... 
"काय करूयात मग .. मला झेपेल तेव्हढं दिवस..."

त्यांचं वाक्य तोडत मॉडर्न पुतणसून उद्गारली..
"आता तुमच्या नियमांप्रमाणे हळद कुंकू तरी चालणार आहे का देवाला लावायला?? कश्याला नसता व्याप वाढवताय ह्या वयात... चांगली अस्सल जुनी चांदी आहे विकून टाका .. पैसे नानांच्या नावे एखाद्या संस्थेला देऊन मोकळे व्हा."

आयुष्यभर प्राणप्रिय असलेल्या ह्या देवांचा इतका भार
 होईल असं कधीही माईंना वाटलं नव्हतं. आज त्या खऱ्या अर्थानं एकट्या पडल्या होत्या. हात जोडून देवापुढे बसत त्या अखंड अश्रू ढाळत होत्या. नानांच्या पश्चात कुणाचाही स्पर्श न लाभलेले देव निस्तेज दिसत होते ... माईंना पोटच्या पोरांप्रमाणे त्या देवांना घट्ट कवटाळून रडावसं वाटत होतं पण सुतक असल्याने तेही शक्य नव्हतं. गौरींचे मुखवटे ह्या साऱ्यात तितकेच दुधाळ स्निग्ध आहेत असा भास त्यांना झाला.. त्यांच्याही नकळत त्यांनी हात जोडले....

"आई गौराई आता तूच काहीतरी मार्ग काढ... ह्या घराण्याची निष्ठा , नानांनी आयुष्यभर केलेली निरपेक्ष सेवा सारे तुझ्या पायाशी वाहतेय."

बयो आत्या आणि बेबी आत्या हा सारा तमाशा शांतपणे पचवत होत्या... त्यांनी आपल्या घरी फोन केले काय विचारलं कुणास ठाऊक? मात्र दोघींचं कशावर तरी एकमत झालं... ह्या जोश्यांच्या माहेरवाशिणी जेष्ठा कनिष्ठा होत माईंच्या हाकेला धावून आल्या.. दुसऱ्याच दिवशी बैठकीच्या खोलीत त्यांनी कुळाचाराचे सगळे देव दोघी मिळून वाटून घेणार असल्याचे सांगितले. ... आणि ह्या प्रकरणावर पडदा पडला. आतल्या खोलीत माई गौराईने लाज राखली म्हणत नतमस्तक होत होत्या. बयो आत्यामाईला म्हणाली..
"मुली झालो म्हणून काय ग झालं.. जोश्यांच्याच लेकी आहोत ना! तसेही ह्या वर्षी गौरी बसवायचे मनात होतेच.. सुनाही हौशी आहेत आमच्या.. "

बेबी आत्या माईंच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली,
"मनात होतेच फार हो ! पण एक शब्द घरीही विचारून घेतला आपापल्या. सगळे आनंदाने तयार झाले.आम्ही दोघी जवळच्याच गावी सहज जाऊ एकमेकींकडे मदतीला... तेव्हढीच भेट होईल. नवरात्र माझ्याकडे बरं माई."

"आणि तुझ्याशिवाय काही उमजायचे नाही आम्हाला. तू तर हवीच. गौरीला औक्षण तूच करायचे दर वर्षी सारखे.."
बयो आत्या प्रेमाने म्हणाली... आणि माई आपल्या ह्या जेष्ठा कनिष्ठांच्या गळ्यात पडून गदगदून रडू लागल्या.
ज्यांना जे जे हवं होतं ते ते बाजूला काढण्यात आलं.. आता नानांच तेरावं झालं की निघायचं... घर आणि जमिनीचे व्यवहार .. लगेच होणार नव्हते पण प्राथमिक चर्चा होऊन पुढे करायचे ठरले.... नानांचे एक स्नेही दंडे वकील तेराव्याला घरी अचानकपणे आले... नानांचे मृत्युपत्र त्यांच्याकडे ठेवलेले असून त्याचे सगळ्यांसमक्ष वाचन 13व्या दिवशी व्हावे अशी त्यांची इच्छा असल्याचे म्हणाले. जणू काही नानांना मृत्यू दिसला असावा.. सगळे भवताली गोळा झाले..
दंडे वकिलांनी मृत्युपत्र इन्व्हलप मधून बाहेर काढलं आणि वाचन सुरू केलं.आश्चर्याची गोष्ट अशी की त्यात त्यांचे नसून त्यांचे वडील गोपाळ शास्त्रींचे मृत्युपत्र होते... सगळे चाट पडले. ह्याबद्दल कुणालाच कल्पना नसावी.

"माझे राहते घर आणि माझ्या नावे असणारी शेतजमीन ही माझी म्हणजे श्री गोपाळ शास्त्री जोशी ह्यांची आपकमाई आहे... ह्यातले वारसा हक्काने काहीही मला मिळालेले नाही तर मी कष्टाने ते प्राप्त केले आहे ... त्यामुळे मी पूर्ण शुद्धीत त्याचा माझे मृत्यूपश्चात विनियोग करू इच्छितो...मला वारसा हक्काने मिळालेलीे पिढीजात संपत्ती म्हणजे आमचे घराण्याचे देव... त्यांचे कुळधर्म आणि पूजन करेल तोच माझा वारसदार असणार आहे... माझ्या अपत्यांपैकी जो ही जबाबदारी पेलेलं त्याच्या किंवा त्यांचे नावे मी माझी संपूर्ण इस्टेट करीत आहे. आपले अवघे आयुष्य ह्या घरासाठी वेचणारी माझी लक्ष्मीरूपिणी सून आपले संपूर्ण आयुष्य ह्या घरात काढण्याची हक्कदार आहे ती हयात असेपर्यंत हे घर विकण्याचा कुणालाही अधिकार नाहीेे"

सगळ्यांची तोंडे पाहण्याजोगी झाली होती... नानांच्या वडिलांनी आपल्या हयातीतच हे मृत्यूपत्र बनवले असून नानांना त्याची माहिती होती पण त्या हक्कांचा वापर करण्याची वेळ परमेश्वराने त्यांच्यावर आणली नाही. वकिलाने कायदेशीर दृष्ट्या मृत्युपत्राची सत्यता वगैरे बाबींवर जोर दिला... सगळे रिकाम्या हाती परतणार होते. जोश्यांच्या देवांनी चांगलाच दणका दाखवला होता. बयो आत्या आणि बेबी आत्याकडे मात्र गौराई सोन्याच्या पावलांनी आल्या होत्या.

🔏©️ यशश्री रहाळकर


सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

अपूर्ण

                     डॉ. शर्मिष्ठा नाडकर्णी सोनगावच्या जिल्हा रुग्णालयात स्त्री रोग आणि प्रसूती तज्ञ म्हणून रुजू झाल्या.  हा तसा अतिदुर्गम म्हणावा असा भाग ... आजूबाजूच्या शहरांशी फारसा संपर्क नसलेला काही खेड्यांचा, तालुक्यांचा हा पुंजका. व्यापाराच्या दृष्टीनेच शहराशी संबंध ,बाकी शेतीवाडीत मग्न लोक. गेले काही वर्षांत आरोग्य सेवांच्या अभावाने येथे गर्भवती महिला आणि प्रसूती दरम्यानच्या मृत्यूचे प्रमाण विलक्षण वाढले आणि शासनाला जाग आली... मग येथेच जिल्हा रुग्णालयाची स्वतंत्र इमारत उभारून मोठ्या सोयीसुविधा निर्माण केल्या मात्र ह्या आडगावात पूर्णवेळ महिला डॉक्टर मिळणार तरी कोण? डॉ. शर्मिष्ठा का कुणास ठाऊक येथे येण्यास तयार झाल्या. त्यांना शेजारचे बैठे घर, कामाला पूर्ण वेळ नोकर, माळी , गाडी ड्रायव्हर अश्या अनेक सुविधांसह मोठे आर्थिक पॅकेज देण्यात आले. आर्थिक पॅकेजचा मोह पडावा अश्यांपैकी डॉक्टर शर्मिष्ठा नव्हत्याच..... खरंतर त्यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये त्या अक्षरशः खोऱ्याने पैसा ओढत होत्या... मात्र त्यांच्या आयुष्यात एक क्षण असाही आला की हे सारे सोडून लांब कुठेतरी निघून जावेसे त्यांना वाटले आणि त्यांनी सोनगावची वाट निवडली. गव्हाळ वर्ण, काळेभोर टपोरे डोळे,सात्विक तरीही प्रचंड आत्मविश्वासाने उजळलेला चेहरा आणि लहानशी इवली चण.. त्यांच्या चेहऱ्यावर मूर्तिमंत मातृत्व होतं. साध्या सुती फिकट साड्या नेसणाऱ्या , वय चाळीशीच्या आत -बाहेर... त्यांच्या साधेपणाकडे पाहून त्या प्रतिथयश स्त्री रोग तज्ञ असतील असा विश्वासच बसत नसे.
                        सोनगावच्या रुग्णालयाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा मंत्री महोदयांच्या हस्ते पार पडला, त्याचा फार मोठा गाजावाजा मीडियाने केला. फॉलिक ऍसिड, लोह किंवा तत्सम गर्भवतींना गरजेच्या असणाऱ्या गोळ्यांचा मोफत वाटपही सुरू करण्यात आला. रुग्णालयात 10 कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करण्यात आली. यातले बहुतेक सगळेच शहरात राहून अप डाऊन करणारे दोघेच स्थानिक म्हणावे असे, पैकी एक शिपाई देवधर... सगळे ह्याला "देवा" म्हणायचे . आणि दुसऱ्या नर्स साठे बाई. नर्स चंद्रकला साठे बाई चांगल्या अनुभवी होत्या आधी बरीच वर्षे वेगवेगळ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांनी काम केले होते... आता सोनगाव हे त्यांचे मूळ गाव म्हणून त्यांनी बदली मागून घेतली होती. साठे बाईंची गावात सगळीकडे ओळख होती. डॉक्टर शर्मिष्ठाना स्वयंपाकाची बाई पाहून दे, घर लावून दे, झाडांची रोपे माळी बुवांना आणून दे अशी सगळी कामे झटपट करून नर्स साठे बाईंनी "डॉक्टरीण बाईंना" मोठीच मदत केली होती. डॉक्टर शर्मिष्ठाला ह्या "डॉक्टरीण बाई" संबोधनाची मोठी गंमत वाटे.... सारा गावच त्यांना तसेच संबोधायचा. गावातली माणसे चांगली होती... त्यांना आदराची वागणूक मिळायची.... वेळप्रसंगी स्वतःहून मदत करायची. दोन चार दिवसांत घर, हॉस्पिटल सगळं नीट सुरळीत झालं... मात्र असे असूनही फारसे पेशंट हॉस्पिटलकडे फिरकत नव्हते. एकाट दुकट काही त्रास होणाऱ्या वयस्कर स्त्रिया येत मात्र गर्भवती स्त्रिया अजिबात फिरकत नसत. डॉक्टर शर्मिष्ठा हा काय प्रकार असावा? म्हणून काळजीत पडल्या. त्यांनी नर्स साठेंकडे ह्या बाबतीत विचारणा केली असता त्यांनी मोठी खरी मेख सांगितली.. मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोक भराभर पोट फाडतात अर्थात सीझेरियन करतात ...असा त्या अडाणी गावकऱ्यांचा समज होता. डॉक्टर शर्मीष्ठांनी कपाळाला हात लावला..... ह्या वेडेपणावर हसावं की रडावं हेच त्यांना कळेना.  त्यांच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये सुद्धा त्यांनी अगदीच रेअर केस मध्ये, अत्यावश्यक झाले तेव्हाच सिझेरियनचा निर्णय घेतला होता. 
                      एक दिवस अचानक हे सारेच चित्र बदलले.  एक आजीबाई आपल्या सुनेला घेऊन आल्या ... आजीबाई चांगल्याच खमक्या असाव्या.सून नाजूक अर्धमेली... तिलाच पोर म्हणावे अश्या वयाची... बाळ आडवे आल्याने पुरती अडली होती. दोघींच्याही अंगावर भरपूर दागिने होते मात्र पोर फिकुटलेली पांढरी निस्तेज ...वय फार तर 20 असेल आणि हे तिचे तिसरे बाळंतपण होते. आजीबाई काहीही करायला तयार होत्या कारण दोन नातींच्या पाठीवर आता नातू जन्माला येणार असल्याचे भाकीत कुणीतरी केलेले होते.आजीबाई हात जोडून म्हणाल्या..

"डाक्टरीन बाई ..काय बी करा पोरगा वाचला पाहिजे "

त्या बिचाऱ्या पोरीच्या डोळ्यांत दोनच टप्पोरे अश्रू डॉ. शर्मीष्ठांनी पाहिले... नर्स साठे बाई तयारीला लागल्या ... बाळ बाळंतिणीची सुखरूप सुटका झाली पुढे त्या तालेवार घराण्याच्या पुत्रजन्माचा जल्लोष झाला.... आणि हॉस्पिटलचे ग्रह बदलले...आता डॉक्टरीण बाईंच्या हाताला गुण असल्याचे लोक बोलू लागले आणि एकुणात उपचाराला येणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत वाढ झाली.काही दिवसांनी ती पोर आपल्या आईला घेऊन डॉ. शर्मीष्ठांना भेटायला आली. आईनं त्यांच्या पायावर डोकं ठेवलं... 

"माझी पोर तुमच्यामुळं वाचली बाई तुम्ही देवमानूस आहात"

डॉ. शर्मीष्ठांना हे नवीन होतं... त्यांनी मायेने त्या मायलेकींची चौकशी केली... "लेक खूप नाजूक आहे तब्येतीने ....तिची काळजी घ्या" असेही बजावले. बाळाचीही चौकशी केली ...

"पोरगं झालं सुटले बाई एकदाची." ती म्हणाली.
ऐन विशीतच बरंच काही सहन केलेलं दिसतंय हिने... मुलीची आईच मग पुढे म्हणाली.....

"हिच्या धन्याची पहिली बायकू माजी भाच्ची ... पहिल्याच बाळतपणात गेली... पोरगी झाली व्हती... कुनी फिकिरच केली न्हाई ... माय मेल्यावर होती तरी आठ दिवस."

बापरे! काय भयंकर आहे हे.... नुकतीच जन्मलेली पोर आई गेल्यावर उपाशी मेली... शहरातच अख्ख आयुष्य काढलेल्या डॉ शर्मीष्ठांसाठी हा मोठ्ठा धक्का होता. शहरात क्रूर माणसे नव्हती असे नाही पण ह्या थराची क्रूरता त्यांनी ऐकली , पहिली नव्हतीच. बाई पुढे बोलू लागल्या..

"बरी गेली ... सुटली बिचारी ह्या नरकातून. पुडं तिच्या जागी माही मोठी ल्येक देल्ली... पण तिले 2 वर्सात काय पोर बाळ झालं न्हाई मंग ही धाकटी देल्ली. हिला 2 पोरीं झाल्या... आता ह्या खेपला ल्योक झाला नस्ता तं त्याहिनी हिच्या बी उरावर सवत आनली असती."

मायलेकी पुन्हा पुन्हा आभार मानून परतल्या. डॉ.शर्मीष्ठांना अचानक खूप खूप थकवा जाणवू लागला... कुणीतरी जणू हातापायातले त्राणचं काढून घेतले असावे... नर्स साठे बाई त्यांचा उतरलेला चेहरा पाहून सारेच समजून गेल्या असाव्या. पुढच्या एक दोन तपासणीसाठी आलेल्या पेशंटना दुसऱ्या दिवशीची वेळ  देऊन त्यांनी डॉक्टरीण बाईंना आराम करायला जायला सांगितले. डॉ. शर्मिष्ठा घरी जाऊन आडव्या झाल्या... शारीरिक ताणापलीकडे मानसिक ताणाने त्या प्रचंड खचल्या असाव्या. संध्याकाळी  जरा उशिराच नर्स साठे बाई त्यांच्यासाठी कॉफी आणि बिस्किटे घेऊन गेल्या. नर्स चंद्रकला साठे बाई मोकळ्या होत्या स्वभावाने... त्यांच्याशी बोलून बरं वाटायचं... खरंतर मोकळं वाटायचं डॉ शर्मीष्ठांना. साठे बाई आयुष्याचं तत्वज्ञान कोळून प्यायल्या होत्या... त्यांचा नवरा परागंदा झालेला असल्याचे शिपाई देवा एकदा म्हणाला. त्यांनी सहज एक दिवस साठे बाईंकडे कुटुंबाची चौकशी केली. हसत हसत साठेबाई म्हणाल्या... 

"कुटुंब म्हणावं असं काही न्हाई ... दहावीला होती बाप मेला म्हणून आईनी घाईघाईत लग्न उरकून टाकलं .. एक पोरगी पदरात घेऊन वर्षभरात परतली... नवरा जो गायब झाला तो सहा महिने उगवलाच नव्हता. जातांना अनेकांकडून पैसे उचलले होते.. खूप देणी करून गायब झाला... घरातले सामानसुमान ,भांडीकुंडी विकून देणी फेडली सगळी आणि आईकडे आली. तिनेच कुणाकुणाच्या हातपाया पडून नर्सिंग ला घातले... दोन वर्षे माझी पोरही सांभाळली. मी नोकरीत लागले हळूहळू आम्ही तिघी मायलेकी मज्जेत जगू लागलो.."

"चला बरं झालं.. एकमेकींच्या आधाराने जगता आहात. आता पोरीला शिकवा चांगलं, मोठी करा."

विषण्ण हसत चंद्रकला बाई सांगू लागल्या...

"इतकं सोपं असतं आयुष्य तर किती बरं झालं असतं. पाच सहा वर्षांनी नवरा परतला. चारचौघींसारखा माझा संसार सुरू व्हावा , अशी वेडी आशा आईला वाटून गेली.  नवरा नाही म्हणजे मी अपूर्ण... अश्या अर्धवट आयुष्याला काय अर्थ? असं सगळं समजावून पुन्हा संसार सुरू झाला... नवऱ्याला फुकटच अन्न आणि बायको दोन्ही मिळत होते. खरं सांगते... त्याला आयुष्यभर पोसायची तयारी होती माझी. त्याच्या विडीकाडीला पैसे द्यायची ...महिन्यातून एकदा दारूलाही द्यायची. वाटलं संसाराचं पूर्णत्व ह्यातच आहे.. नवरा , कुटुंब , मुलं बाळं.... दुसऱ्यांदा दिवस गेले . नवऱ्याला मूल हवं होतं... सहावा महिना चालू होता ... नवरा पुन्हा गायब. गेल्या वेळ सारखं प्रचंड कर्ज काढून ठेवलेलं होतं... दुसरी पोरगी आणि अवाढव्य देणी दोन्ही माझ्या पदरात घालून हा माणूस पळून गेला होता."

आवंढा गिळून वाहणाऱ्या अश्रूंना माघारी लोटत चंद्रकला बाई आपली कर्मकहाणी सांगू लागल्या..
"इतके घाणेरडे माणसं येऊन उभे राहायचे दारात ... खूप वाईट बोलायचे मला, माझ्या लेकींना विकून टाकण्याच्या धमक्या द्यायचे... त्यांचे कर्ज फेडणे शक्यच नव्हते मला... शेवटी पोलिसांकडे तक्रार केली...ह्या साऱ्यात काळजीने खंगून आई गेली.... 3 वर्षे देणी फेडत होते मी ...कसे काढले आम्ही ते दिवस आमचे आम्हाला माहीत."

इतका वेळ डोळ्यांत अडवलेले पाणी बाहेर पडलेच...
"थोड्या थोडक्या नाही दहा वर्षांनंतर नवरा परत आला. नातेवाईक, शेजारी सगळीकडे जाऊन रडून आला माझे पाय धरले... पुन्हा पुरुषाशिवाय बाईचा जन्म अपूर्ण, पोरींना बाप हवाच अशी आळवणी जो तो करू लागला. मात्र ह्या वेळी मी त्याला घरात घेतले नाही माझ्या मुलींना अश्या बापाची आणि मला अश्या भेकड पुरुषाची मुळीच गरज नव्हती. त्यापेक्षा मला माझं अपूर्णत्व मान्य आहे... ह्या समाजात कितीही काहीही केलं ना तरी बाई अपूर्णच असते... कधी सासरी नांदली नाही म्हणून , कधी पोर झालं नाही म्हणून , कधी मुलगाच झाला नाही म्हणून तर कधी नवरा टिकवता आला नाही म्हणून .... शेवटी बाई म्हटली की अपूर्णच.... असू देत अपूर्ण! ह्या लोकांना कधी कळणार आहे कोण जाणे?... बाई म्हणजे नवऱ्याची गुलाम आणि मुलं जन्माला घालणारं यंत्र नाही.... ह्या असल्या अपूर्णतेच्या व्याख्या ज्या कुणी गाढवांनी मांडल्या असतील त्यांची तर xxx xxx " 

कडाकडा बोटे मोडीत अस्सल इरसाल शिव्यांची बाराखडी उच्चारली..... सोज्वळ सात्विक डॉ. शर्मीष्ठांना त्या शिव्या आणि तो संताप मनातून आवडलाच.. ... साठे बाईंना टाळी देत त्या हसत सुटल्या. तेव्हढ्यात देवा शिपाई काय चाललंय म्हणत डोकावला...

" हे बघा आले पूर्णपुरुष.. नरदेहधारी नारायण..."

 साठे बाईंनी वरकडी केली... आणि दोघी खळखळून हसू लागल्या. आज खूप दिवसांनी डॉ. शर्मिष्ठा मनापासून हसल्या होत्या. गेले काही महिने इतका ताण त्यांनी वाहिला होता की जगणं जणू काही त्या विसरूनच गेल्या असाव्या. गेले चार महिने अपूर्ण... अपूर्ण! हा शब्द त्यांच्या आयुष्यात थैमान घालत होता... इतकं सोपं साधं तत्वज्ञान आपल्याला का कळले नाही?
                   डॉ. योगेश नाडकर्णी आणि डॉ शर्मिष्ठा ह्यांचा प्रेमविवाह... आता यशस्वी म्हणता येणार नाही.. पण तेव्हा त्यांच्या मित्रमंडळात चांगलाच चर्चिल्या गेलेला. डॉ. योगेश बालरोगतज्ज्ञ... दोघांच्या लग्नाला 21 वर्षे झालेली... हॉस्पिटलचा अवाढव्य पसारा आणि अखंड कामात स्वतःला झोकून दिलेलं. पाहिली काही वर्षे बाळाची वाट पाहूनही दिवस न गेल्याने डॉ शर्मीष्ठांनी सगळ्या टेस्ट करवून घेतले... त्यांच्या  गर्भाशयातील काही दोषांमुळे त्या कधीही आई होऊ शकणार नव्हत्या. एक स्त्री म्हणून कोसळलेल्या शर्मिष्ठाला डॉ. योगेश अगदी सहज म्हणाले होते..

"नाही तर नाही. काय गरज आहे आपल्याला . आपले हे हॉस्पिटल म्हणजे एक मुलंच आहे . आपल्याला ते वाढवायचे ... विसरून जा हे सगळे आपण दोघे आहोत ना एकमेकांना."

काय अभिमान वाटला होता डॉ .शर्मीष्ठांना आपल्या निवडीचा. आपल्यातला एव्हढा मोठा दोष किती सहज स्वीकारला ह्याने... मनावर उपकारांचं ओझं घेऊनच त्या वावरल्या होत्या. आता सारे सुरळीत झाले आहे असे वाटत असतांनाच एक दिवस होत्याचं नव्हतं झालं.

               त्यांच्या एका वॉर्ड बॉयच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी आधार म्हणून घेण्यात आलेली त्याची विधवा पत्नी डॉ योगेश ह्यांच्या बाळाची आई होणार होती. अश्या गरजू बाईशी आपल्या नवऱ्याने ठेवलेले संबंध हा प्रचंड मोठा धक्का होता तिच्यासाठी मात्र त्याहून मोठा धक्का तर अजून बाकी होता. डॉ. योगेशना स्वतःचा वारस म्हणून मिळणारे हे मूल हवे होते पण त्यासाठी त्या बाळाच्या आईशी लग्न करण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यांना समाजात मिरवायला पत्नी आणि मुलाला वाढवायला दायी म्हणून डॉ शर्मिष्ठा हव्या होत्या.  जन्मानंतर त्या बाळाला रीतसर दत्तक घेण्याचा त्यांचा विचार होता.... त्यांच्या दृष्टीने हा साधा सरळ व्यवहार होता ह्यात सगळ्यांचं भलंच होणार होतं. नवरा नसलेल्या आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या त्या गरीब बाईला त्यांनी पूर्णत्व मिळवून दिलं होतं तर मूल जन्माला न घालू शकणाऱ्या आपल्या बायकोच्या पदरात आपलं मूल घालून तिला ते पूर्णत्व प्राप्त करून देणार होते . 

" तुझ्यासारख्या मूल जन्माला न घालू शकणाऱ्या स्त्रिला हे नीतिमत्तेचे दाखले देणे शोभत नाही शर्मिष्ठा... तुझं अपूर्णत्व मी बिनबोभाट झाकून नेलंय आता त्याची परतफेड कर."
किळस वाटावी असे त्याचे शब्द ऐकून शर्मिष्ठाने घर सोडले... आईकडे गेली खरी पण बहीण, भाऊ, भावजय आणि एव्हढेच नव्हे तर आई सुद्धा परिस्थितीचा स्वीकार करायला सांगू लागली...

"कुठल्यातरी अनाथाश्रमातून दत्तक घेतलं असतं की मूल .. तसंच समज. शर्मिष्ठा दोष तुझ्यात आहे तू स्त्री म्हणून अपूर्ण आहेस.. तू त्यांना त्यांचं मूल दिलं असतंस तर हा प्रश्नच उद्भवला नसता." 

आईचे शब्द डोक्यात घणाचे घाव बसवावेत तसे बसत होते .. त्यातच सोनगावच्या ह्या रुग्णालयातली संधी मिळाली आणि डॉ. शर्मीष्ठांनी त्या साऱ्या पासून दूर येथे येऊन राहणे पसंत केले. मात्र आज त्या मनानी खूप खूप स्थिर झाल्या होत्या. साधारण दोन चार दिवसांआड जाब विचारायला यायचा तसा डॉ.योगेशचा फोन रात्री आलाच....

"शर्मिष्ठा.. काय ठरवलं आहेस तू? माझ्याकडे फार वेळ नाही. ही तुझी समाजसेवेची नाटकं करून झाली असतील, डोकं जागेवर आलं असेल तर परत ये. मला माझ्या बाळाचा जन्म तुझ्याच हातून सुखरूप व्हायला हवाय."

एकेक शब्द जुळवत ठामपणे डॉ. शर्मिष्ठा म्हणाल्या,

"माझे अपूर्णत्व मला मान्य आहे,नव्हे केव्हाच मी ते स्वीकारले सुद्धा आहे. मात्र ते पूर्ण करायला तुझ्यासारख्या भेकड पुरुषाची गरज पडावी इतकी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही. एका गरीब ,  बिचाऱ्या असहाय स्त्रीचा गैरफायदा घेऊन जन्माला येणाऱ्या तुझ्या त्या अनौरस बाळाची आई होऊन कोणतेही पूर्णत्व मला प्राप्त करायचे नाही. दोन दिवसांत माझे वकील डिव्होर्सची नोटीस देतील तुला... मला काहीही घाई नाही. गमावण्यासारखं आता माझ्याकडे तरी काहीही उरलं नाही... हॉस्पिटल माझंही आहे त्यावरचा हक्क मी सोडणार नाही... तुला काय करायचं ते करून घे. आता सारखा फोन करून त्रास देऊ नकोस."
म्हणत डॉ. शर्मीष्ठांनी रिसिव्हर आपटला. आज खूप दिवसांनी त्या शांत झोपल्या.
🔏©️ यशश्री रहाळकर