एखाद्या व्यक्तीचा छळ करायला तुमच्याकडे बेलगाम , निरंकुश सत्ता असावी लागते... त्याचबरोबर तुमच्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नसलेली एक असहाय, परावलंबी व्यक्ती देखील असावी लागते. "अन्याय करणाऱ्या इतकाच तो सहन करणारा देखील तितकाच दोषी असतो"... हे वाक्य केवळ बोलायला वजन देते... प्रत्यक्षात तितके उपयोगी असतेच असे नाही. मुळात अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तीकडे बरेचदा सहन करण्याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नसतो. पूर्वी सुनेला वाट्टेल तसे खडे बोल सुनावणाऱ्या, शिव्याशाप देणाऱ्या, मारहाण करणाऱ्या अगदी चटके देणाऱ्या सुद्धा सासवा होत्या म्हणे. प्रत्येक घरात पाच सहा मुली असायच्या.. परतीची त्यांची वाटच माहेरचे बंद करून टाकत.... त्यात आर्थिक परावलंबित्व. जिथे जिथे हे आर्थिक परावलंबित्व संपले, जिथे जिथे माहेरचा भक्कम आधार आहे ही खात्री पटली त्या त्या समाजात/कुटुंबात हे छळछावण्यांचे प्रकार आवरते घ्यावेच लागले. आता तर मुली कमी असणाऱ्या समाजात येणाऱ्या सुनांचीच हाजी हाजी करत सासवा दिवस काढतांना दिसतात. मात्र ज्या कुटुंबात वडिलोपार्जित व्यवसाय आहेत... जिथे अजूनही सगळ्या कुलुपांच्या चाव्या सासवांकडे असतात तिथे आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही... हिंदी सिरियल्स मधल्या मोठ्ठी बिंदी लावून कटकारस्थान करणाऱ्या सगळ्या सासवा फिक्या पडतील अशी सासू मी प्रत्यक्षात पहिली आहे... तिचीच ही 100 % खरीखुरी कथा.....
माझे नवीनच लग्न झाले होते... एका संध्याकाळी मी आणि अहो आई (सासूबाई) मस्त गरमा गरम उपमा खात होतो. एवढ्यात वैभव लक्ष्मीच्या हळदीकुंकाचा निरोप द्यायला "ती" डोकावली. "ती" म्हणजे मूर्तिमंत कारुण्य,पाठ आणि पोट एक झालेले,हातापायांच्या काड्या, गालाची सुद्धा हाडे वर आलेली मूळ टपोऱ्या डोळ्यांच्या भवती काळ्या खोबण्या तयार झालेल्या... बापरे! किती अशक्त आहे ही... अहो आईंनी तिला लगेच घरात घेतलं आणि उपम्याची प्लेट भरून पुढे केली. ती सगळ्या देहाचं मुटकूळ करून झपाट्याने कोपऱ्यात बसली... भेदरल्या सारखी दारातून मागे पुढे पाहत बकाबका उपमा खाऊ लागली... गरम उपम्यानी तिचे तोंड पोळत असावे... पण कित्येक वर्षांची उपाशी असल्यागत ती भराभरा तोंडात कोंबत होती. आईंनी तिला बेसनाचा एक लाडू दिला तिने पुन्हा भेदरल्यागत दाराकडे पाहिले आणि अजून एक मागून घेत पदरात बांधून घेतले . माझ्याकडे पाहत कसनुसं हसत , "या वहिनी उद्या हळदी कुंकाला" म्हणत धडाधडा जिना उतरत वाघ पाठी लागल्यागत दिसेनाशी झाली. अशी काय ही??
"कोण हो आई ह्या बाई" मी विचारले...
आई म्हणाल्या.
"अग ही ना... उज्वला... वीस नंबर वालीची सून"
ह्या वीस नंबर बद्दल मला खूपच उत्सुकता वाटत होती , मी काही विचारणार इतक्यात बेल वाजली. आईंनी मला खुणेनेच डिश घेऊन आत जाण्यास सांगितले.. मी आत गेले आणि मगच त्यांनी दार उघडलं. बाहेर आलेल्या बाईला अहो आईंनी घरातही ये म्हटलेलं नसावं... ती तारसप्तकात रेकल्यागत बोलत होती...
" आमची उज्जी आली होती ना?" अंदाज घेत ती बाई म्हणाली.
"हो हिला हळदी कुंकाला सांगून गेली लगेच."
"उज्जी परतली नाही मग मीच म्हटलं पहावं तिला... कुठे बसली ठिय्या मारून"
"नाही आमच्या तर घरातही नाही आली बाहेरूनच गेली."
बाहेरची बाई बराच वेळ कटकट करत होती.... मात्र तशीच दारात ताटकळत ...अहो आईंनी तिला घरात घेऊन पाणीही विचारले नाही. ती गेल्यावर आई हुष्य! करत बसल्या आणि म्हणाल्या..
"गेली एकदाची जहांबाज म्हातारी.. लगेच आली बघ सुनेच्या पाठी..... महाकजाग दुष्ट बाई."
"कोण होत्या हो ह्या?"
"हीच ती वीस नंबर वाली."
आता ह्या वीस नंबर वाली बद्दल उत्सुकता शीगेला पोहोचली होती. आमच्या सोसायटीत सगळ्यांत चांगला, हवेशीर मोठा, बाल्कनी असणारा फ्लॅट वीस नंबर... आमच्या बिल्डिंग मधील दोन विंग आतून जोडलेले होते त्यामुळे एकीकडून सुरू झालेलं नंबरींग दुसरीकडे संपायच... तर असा टोकाचा सगळ्यांत उत्तम फ्लॅट होता पाटील बाईंचा. हिचे त्यात शून्य कर्तृत्व .. नवरा कुठेतरी सरकारी कचेरीत क्लार्क असतांना महिलांना लोनचा इंटरेस्ट रेट कमी म्हणून हिच्या नावे घेतलेला हा फ्लॅट... मात्र बाईला कोण अभिमान त्याचा! स्वतःची ओळख ती ,"मी वीस नंबर वाली" अशीच करून द्यायची, सगळ्यांना ह्या न त्या निमित्ताने घरी बोलावून फ्लॅटचे कौतुक करून घ्यायची... ह्या दुष्टशिरोमणीच्या नशीबात इतका चांगला फ्लॅट आल्याने सगळ्याच मनांत हुळहूळायच्या... मात्र घर सुंदर बनतं ते आतल्या माणसांमुळे ,त्यांच्या परस्पर प्रेमामुळे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानामुळे... हे मात्र ह्या हिटलरला माहीत नसावे. आम्ही सोसायटीतील सगळ्या सुना वीस नंबर वालीला हिटलर म्हणायचो... कारण ही स्वतःच्या सुनेला छळणे हा तिचा मूलभूत अधिकार मानायची आणि असेच प्रत्येक सासूने आपल्या सुनेला छळावे ह्यासाठी सतत प्रयत्नशील असायची. कुणाच्या सुनेच्या अंगावरचे मूठभर मांस तिच्या डोळ्यांत यायचे. अहो आई तर मी शक्यतो तिच्या नजरेत येणार नाही असेच प्रयत्न करायच्या... एकदा ती कसलासा प्रसाद द्यायला आली... जरा उशीराच आवरासावर करून मी अंघोळीला गेले होते..
लगेचच तिला मुद्दा मिळाला..
"काय हे ही काय वेळ आहे अंघोळीची? तुम्ही फार गरीब आहात बाई..
चांगलं धारेवर धरा हिला.. सूना डोक्यावर बसायला वेळ लागत नाही."
अहो आई शांतपणे म्हणाल्या, "दिवसभरात कधीतरी अंघोळ करतेय ना झालं तर मग...."
वीस नंबर वालीची दांडी गुल... मात्र तिने तिचे प्रयत्न सतत सुरू ठेवले. ती गेल्यावर आई म्हणाल्या...
"स्वतःची सून टिकवता येईना आणि चालली मोठी उपदेश सांगायला."
उज्वला ही तिची तिसरी सून... म्हणजे एकाच मुलाची तिसरी बायको. पहिली सून वर्षभरात माघारी गेली ते परत आलीच नाही. दुसरी तर एका महिन्यात पळाली... उज्वला ही तिचा एकुलता एक लेक उमेशची तिसरी बायको..... ह्या लोकांना देण्याइतक्या पोरी कुणाला जड होतात काय माहीत?? गळ्यांत धोंडा बांधून विहिरीत लोटून का देत नाहीत कुणास ठाऊक??😢 उज्वला कुठल्याश्या गरीब शेतमजुराची लेक... घरी इतकी गरिबी की आपल्या लेकीला पोटभर अन्न मिळेल ह्या एकाच हेतूने असहाय बापाने तिला तिसरपणी उजवली. कमालीची चिवट होती पोरगी... दहा वर्षे टिकून होती... आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे जिवंत होती. तिचा नवरा तसा बरा असावा... बुद्धीने सामान्य म्हणून कुठल्याश्या कुरिअरच्या ऑफिसमध्ये नोकरी करायचा, सरळमार्गी होता बिचारा... मात्र मातृदेवतेला प्रसन्न ठेवण्याच्या नादात काय काय करायचा कोण जाणे?? त्याला दोन मोठ्या बहिणी होत्या ... चांगल्या सुखवस्तू घरांत पडल्या होत्या .. त्यांचा फारच लोभ वीस नंबर वालीला... आणि येताजाता लेकाला ब्लॅकमेल करायची की फ्लॅट मुलींच्या नावे करेन... बिचारा उमेश गरिबीने गांजलेला... त्याला कल्पना होती की आपण ऐकलं नाही तर आई आपले शब्द खरे करेल. स्वतःचे घर घेण्याइतकी धमक त्याच्या मनगटांत नव्हती.
त्या इवल्या फ्लॅटची सत्ता आणि कचाट्यात अडकलेली बिचारी उज्वला ... छळछावणीला सुरुवात झाली. उज्वलाला आठवड्याचे अनेक उपास करावे लागत... म्हणजे सोमवार, गुरुवार , शुक्रवार , शनिवार, चतुर्थी, एकादशी आणि प्रदोष हे उपास तिला करावे लागत... हे उपास तिच्याच नवऱ्याच्या भल्यासाठी असल्याचे सासू वारंवार बोलून दाखवे. हे उपास म्हणजे उपाशीच राहणे असे... कडकडीत उपास. दिवसभर उज्वला ढोर मेहनत करायची... मात्र हे लग्न तिने ज्या हेतूने केलं ते पोटभर अन्न काही तिच्या नशिबात नव्हते. तिचं लग्न झालं तेव्हा वीस नंबर वाली कुठेतरी विरंगुळ्याला जॉब करायची.... जातांना कधी सगळेच्या सगळे पडदे भिजवून जायची तर कधी 5/7 चादरी. कधी 20 किलो निवडणं काढून ठेवी तर कधी डबे घासायला सांगून जायची.... तर कधी किलोने पापड करायचे सांगायची. सुरुवातीला रिटायर्ड झालेले सासरे घरी होते ... सासरे सुनेला लेक मानत, तिला कामात मदत करत... बरेचदा ती उपाशी आहे हे लक्षात आले तर चुपचाप काहीतरी खायला आणून देत. एकदा वीस नंबर वाली लवकर घरी आली ... पाहते तर काय सासरा सुनेला निवडणं करण्यास मदत करत होता. झाले दुसऱ्याच दिवशी बाई नोकरी सोडून घरी... उज्वलाला जो काही चार तास निवांतपणा मिळत होता तोही संपला. आता छळायला भरपूर वेळ आणि नवनवीन संधी तिला मिळत गेल्या. उज्वलाला जेवणात एकच पोळी मिळायची .. जास्त खाल्ले तर सुस्ती येते आणि काम होत नाही , असे ती म्हणायची. कधीमधी गुपचूप साखर किंवा गूळ तोंडात टाकताना तिने एकदा पाहिले ... मग सगळ्या डब्यांना कड्या कुलपे घालण्यात आली. पुढे सासरे निर्वतले आणि उज्वलाचे हाल वाढत गेले. ती सतत भुकेली असायची ... 😢 भूक माणसाला काहीही करायला लावते ह्याचे प्रत्यंतर ..सासूचा डोळा चुकवून ती सोसायटीत कुणाहीकडे पटकन खाऊन घ्यायची, कधी मागायची कधी बांधून न्यायची चोरून... मंदिरात , भंडाऱ्यांना चार चार वेळा जाऊन प्रसाद घ्यायची. माझ्या सासूबाईंसारख्या सहृदय स्त्रिया ती दिसली की तिला खाऊ घालत... बिचारीची दया येण्यापलीकडे कुणालाच काही करता येत नसे... एक दोघींनी वीस नंबर वालीला समजवण्याचा निष्फळ प्रयत्न केला... पण कजाग भांडकुदळ बाईने इतका तमाशा घातला की लोक तिचे तोंड पाहणेही टाळू लागले....
"तुम्हाला तिचा एव्हढा पुळका असेल तर घ्या ठेवून तुमच्याच घरी... तुम्ही घाला खायला "
असे अर्वाच्च ती बोलत असे. तिच्या धाकापायी तिच्या सुनेलाही लोक चोरुनच मदत करायचे न जाणो ही बया आपल्या घरापुढे येऊन तमाशा करायची.
आमची बिल्डिंग जुनीच होती त्यामुळे पिण्याचे पाणी खाली नळावरून भरावे लागत असे. तिथेच ती भेटायची आणि खाजगी आवाजात सासूच्या तक्रारी करायची. एक दिवस ती पार काळी निळी होऊन पाणी भरत होती. अंग चांगलेच सुजले होते. आता मारहाण पण सुरू झाली असावी... तिला खाणाखुणा करून विचारले तर नेहमी सारखे मागेपुढे पाहून घेत ,
"एरव्ही सासू मारते पण काल नवऱ्याने तुडवले लाथेने "
ती म्हणाली. उमेश तसा गरीब वाटायचा .. तिनेही कधी त्याची तक्रार आजवर केली नव्हती. वीस नंबर वाली गावाला लग्नकार्याला गेली किंवा लेकींकडे राहायला गेली की दोघे आनंदात रहायचे, तो तिला गाडीवर बसवून फिरायला नेई, बाहेरच खाऊ घाले ती अगदी खुश असायची त्या वेळी. उमेशचा सगळा पगार खर्चाचे पैसे सोडून सासू काढून घ्यायची... त्यातही त्याने पैसे वाचवून उज्वलासाठी गजरा आणला... झालं म्हातारीची तळपायाची आग मस्तकात गेली. आत्ताच्या आत्ता फ्लॅट बहिणींच्या नावे करते म्हणून भांडू लागली. एव्हाना लग्नाला दहा वर्षे झालेला, दोन पोरांना घेऊन उमेश कुठे जाणार? स्वतःचा तुटपुंजा का असेना पैसा हातात नाही... आईची पाय धरून माफी मागायला लावली. चांडाळींणीने उज्वलाला तुडविण्यास फर्मावले... आणि एका गजऱ्याच्या बदल्यात उज्वलाचे अंग काळे निळे होईपर्यंत मारहाण झाली. उज्वलाला उपाशी ठेवणे, मारहाण करणे किंवा तिचे हाल करणे ह्यात कसून करून चालणार नव्हते... नाहीतर महिनाभर उमेशला बायकोपासून वेगळे झोपावे लागण्याची शिक्षा मिळायची.. त्यात बेघर करण्याचा धाक होताच.
"तसे ते ना खूप चांगले आहेत त्यांचा फार जीव आहे माझ्यावर."
उज्वला आपल्या अंगावरील माराचे वळ झाकत म्हणाली. मी मनातल्या मनांत ह्या भारतीय नारीला साष्टांग दंडवत घातला. का हे असले जिणे सहन करायचे? कशासाठी?
उज्वलाला कधीमधी माहेरी जायला मिळे. तिथून आली की ती एकदम टवटवीत आनंदी दिसायची. वीस नंबर वाली लगेच माझ्या सासूबाईना म्हणायची..
"पहा पहा माहेरचे लोक हिला टॉनिक पाजून पाठवतात कशी तुकतुकीत दिसते माहेरून आल्यावर."
ही भवानी गेली की अहो आई कपाळावर हात मारून घेत... आणि म्हणत
"गरीब असले तरी पोटभर चटणी भाकरी पोरीला खाऊ घालतात... म्हणून तुकतुकीत दिसते पोर... बिंडोक भवानी कधी सुधारणार आहे देवालाच ठाऊक?"
उज्वलाला पहिली मुलगी झाली... स्वतःच्या मुलींवर जीव असलेल्या वीस नंबर वालीने तिला छळ छळ छळले... दुसरा मुलगा झाला त्याला आईपासून तोडून स्वतःच्या ताब्यात घेतले... आता उज्वला आणि तिची लेक अश्या दोन व्यक्ती ह्या जहांबाज बाईच्या आयत्याच तावडीत सापडल्या. तिची लेक हुशार होती... आईवर माया होती.. त्यामुळे ती आईला घासातला घास काढून द्यायची . नातू मात्र आजीच्या तालमीत दुसरा हिटलर म्हणून घडत गेला... आईवर व्हॉच ठेवण्याचे काम लहानपणीपासून करून तो आजीला खुष ठेवू लागला. ह्या साऱ्यांत वर्षे सरली आम्ही ते घर सोडून नवीन जागेत रहायला गेलो त्यालाही सहा सात वर्षे झाली.
कधीमधी घराचे काही काम किंवा भाडेकरी बदलले तर जुन्या घरी जाणे व्हायचे.
एकदा उज्वला भेटली ... चेहऱ्यावर टवटवी आलेली, प्रसन्न , छानशी साडी नेसून मंदिरात निघाली होती. मला आग्रहाने घरी घेऊन गेली... घराची जुनेपणाने ऱया गेली होती, भिंतींचे पोपडे उडालेले होते... तशीच सारी मिजास उडालेली वीस नंबर वाली अंथरुणात गलितगात्र होऊन खिळलेली होती. तिच्या जागी दुसरी कुणीही व्यक्ती असती तर मला वाईटच वाटले असते मात्र ह्या बाईला बघून मला खूपच आनंद झाला. इथले हिशोब इथेच फेडावे लागतात म्हणतात ते हेच. बाहेर पडल्यावर उज्वला म्हणाली...
"आजारी पडल्यावर एकाही लेकीने ढुंकून पाहिले नाही वहिनी....फ्लॅट तुम्हाला देते म्हणून फोन केले तर लेकी स्पष्ट म्हणाल्या तुझे काही नको आम्हाला... तू कुणाला सुखाने जगू देत नाही तुझे तू पहा.. आमच्याकडून अपेक्षा करू नकोस.."
अशीच जिरायला पाहिजे होती .. बरंच झालं...
"आता चार दिवस सासूचे संपले उज्वला ..
आता तुझी सत्ता... चांगली ठेच म्हातारीची जन्मभराची अद्दल घडण तिला. जेवायला देऊ नको, स्वच्छ करू नकोस पडू दे लोळागोळा..."
उज्वला खळखळून हसत म्हणाली,
"सुरुवातीला माझ्याही मनांत अगदी असेच आले... पण खरं सांगू एकाने दात विचकवले की दुसऱ्याने धावून जायला आणि दात विचकवायला आपण म्हणजे माकड नाही ना! माणूस म्हणून आपल्यात अन् माकडांत फरक हाच आहे ... माणूस माफ करू शकतो. त्यांना अद्दल घडवायला आपण कुठे देव आहोत? तो पाहतोय ना "
म्हणत तिने हात जोडले. पुढे म्हणाली..
"मी मायेने नाही करू शकत त्यांचं... इतकं विसरता नाही येत सगळं... पण माणुसकी म्हणून करते...आता फक्त मूकपणे टीपं गाळत असतात.. स्वतःची लाज वाटत असावी."
ह्या बाईच्या सहनशक्तीपुढे, तिच्या चिवट जिद्दीपुढे आणि तिच्या अनोख्या आयुष्याच्या तत्वज्ञानापुढे मी पुन्हा एकदा नतमस्तक झाले. भारतीय स्त्रियांना देवानं वेगळ्याच मुशीतून घडवलं असावं... तिचे माकडाचे उदाहरण मात्र मी मनांत कायमचे कोरून ठेवले आहे...
"एकाने दात विचकवले म्हणून दात ओठ खात धावून जायला आपण माकड नाही. माणूस माफ करू शकतो... म्हणूनच तो माकडापेक्षा वेगळा आहे."
🔏©️ यशश्री रहाळकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!