फॉलोअर

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

लिफ्ट

       
                          अनघा दातार आज जरा झटपट कामांचा उरका पाडत होती...को-ऑपरेटिव्ह बँक असली तरी स्टाफ कमी त्यामुळे कामाचा ताण जरा जास्तच होता. शक्य तेव्हढी कामे बाजूला सारत दुपारी 2 पर्यंत निघण्याची परवानगी तिने सकाळीच घेतली होती. रिटायर्ड व्हायला चार महिने बाकी असतांना तिला तसे फारसे कुणी अडवणारही नव्हते... त्यातही विशेष सांगायचे तर आजवर अत्यंत शांतपणे, सातत्याने कष्ट घेऊन काम करणारी म्हणून सगळ्यांच्या मनात आदर होता . नुकतेच बँकेने तिला 2 वर्षांचे एक्स्टेंशन घेऊन नवीन ब्रँच मधील कामे सुरळीत करून घ्या अशी विनंतीही केली होती . अर्थात त्या बाबतीतला निर्णय घेणे अजून तिने राखून ठेवले होते.. तब्येतीची काही तक्रार नव्हती पण काम तरी किती करायचे? आणि कमवून ठेवायचे कुणासाठी ?? हे प्रश्न तिला सतावत होते . खरंतर रिटायर्ड झाल्यावर नेमकं काय करायचं हेही तिचे पुरते ठरले नव्हतेच. गेल्या वर्षी पर्यंत सासूबाईंची सोबत होती ती देखील सुटली, त्यांचे वय झालेच होते ..... थकल्या होत्या पण अनघाचा आधार गेला.
                  20 वर्षांची जेमतेम असेल अनघा... बी कॉम फायनलला असतांनाच पहिले स्थळ सांगून आले.. अन् अनघा सुदामेची सौ. अनघा मोहन दातार झाली. मोहन दातार सिव्हिल इंजिनियर होते. पहिले वर्ष सणवार, कोडकौतुकात गेले... सासूबाई अतिशय हौशी होत्या. प्रत्येक लहान सहान बाब त्या आवर्जून लक्षात ठेवून करायच्या... सासरे थोडे कडक स्वभावाचे होते पण अनघाला फार माया होती त्यांची. सुखाचे ओसंडून वाहणारे माप द्विगुणित होण्याचा क्षण आला आणि होत्याचं नव्हतं झालं . त्या दिवशी अनघा मनापासून तयार होऊन त्यांची वाट पाहत होती... तिला आई होणार असल्याची गोड बातमी सर्वांत आधी मोहननाच द्यायची होती. पण.... मोहन दातारांचा साईट वरील एका विचित्र अपघातात मृत्यू झाला.... घरी आले ते त्यांचे प्रेतच. ह्या धक्क्याने तिचे अबॉरशन झाले आणि सारेच आयुष्य जणू एका न संपणाऱ्या, कोणताच थांबा नसणाऱ्या प्रवासाच्या गर्तेत अडकले. पुढे तिच्या सासऱ्यांनी तिला पदव्युत्तर शिक्षण घेण्यास , वेगवेगळे कोर्सेस करण्यास प्रोत्साहित केले. एकुलता एक लेक गेल्याच दुःख सुनेकडे पाहून बाजूला ठेवलं. अनघाला बँकेत नोकरी लागली आणि सासरे स्वतः तिच्या पुनर्विवाहासाठी स्थळे शोधू लागले. आपल्यासाठी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सासऱ्यांत तिला वडील दिसले... कधीही पांढऱ्या पायाची किंवा अपशकुनी म्हणून जिने शब्दाने आपल्याला दुखावले नाही त्या सासूबाईंत तिला माऊली दिसली. तिने आपल्या पतींच्या फोटोवर हात ठेवत सासू-सासऱ्यांच्या देखत शपथ घेतली... आता मरणार ती अनघा दातार म्हणूनच... दुसरा विवाह तिला कल्पनेतही मान्य नव्हता.  तिच्या वाट्याला जे काही चतकोर संसाराचं सुख आले होते...त्यातच ती समाधानी होती. एकच तळमळ, एकच तीव्र इच्छा तिच्या हृदयात सतत सलत असायची... 

"दैेवानं आपली आणि आपल्या पतींची भेट होऊ द्यायला हवी होती ... त्यांना ती गोड बातमी दिल्यावर काय वाटतं ? ते कसे व्यक्त होतात तेही पाहण्याचे आपल्या नशिबात नव्हते."

ही तीव्र इच्छा अनघाच्या मनातून काही केल्या जात नव्हती. दिवस सरले, वर्षे लोटली पण एव्हढा एकच क्षण आपल्याला काहीही करून मिळायलाच हवा होता, असे सतत तिचे अंतर्मन तिला सांगे . बाकी आपण अत्यंत कमनशिबी आहोत ह्यावर तिचा ठाम विश्वास होता.
                      सासऱ्यांची तिने अखेर पर्यंत मोठ्या मायेने सेवा केली... सासूबाई तर बरीच वर्षे होत्या... त्यांचा तिला मोठाच आधार वाटायचा. तिच्या डोंगराएव्हढ्या एकाकी आयुष्यातली हिरवळ म्हणजे सर्वेश. सर्वेश तिच्या भावाचा मुलगा तो सहा महिन्यांचा असेल नसेल त्याची आई बाळंतरोगात मृत्युमुखी पडली. 'माय मरो मावशी जगो !' असेच काही नाही 'माय मरो नि आत्या जगो!' अशी नवीन म्हण पडावी असे अनघाने सर्वेशला सांभाळले. भावाच्या दुसऱ्या संसारात अडथळा नको म्हणून सर्वेशला तिने आपल्या घरी नेले ते कायमचेच. बारावी पर्यंत तो शिक्षणाच्या निमित्ताने तिच्याच घरी राहत होता नंतर मात्र उच्च शिक्षणासाठी जो पुण्याला रवाना झाला तो तिकडेच रमला. त्याचे आणि अनघाचे एकमेकांशिवाय पान हलत नसे.. सुट्टीत तो तरी येई किंवा ती तरी थेट पुणं गाठायची. त्याने आपल्याच वर्गमैत्रिणीशी स्पृहाशी लग्न केलं... तरीही ह्या नात्यात फार काही बदल झाला नाही. स्पृहा सर्वेशपेक्षाही काकणभर अधिकच लाघवी होती. रोज सकाळी अनघाला सर्वेशशी बोलल्याशिवाय करमत नसे.. सकाळी पहिला फोन ती सर्वेशला करत करतच चहा घ्यायची. सर्वेश तिला "कायमचेच ये ना आत्तू! " ,म्हणून बोलवत होता... गेल्या वर्षी पर्यंत सासूबाई होत्या . त्यांना कसे सोडून जाणार ह्या वयात. आता रिटायर्डमेंटला जेमतेम चार महिने बाकी होते .. आणि सर्वेशलाच औरंगाबादला बदली मिळाली... तो  बँकेच्या नवीन ब्रँचचा मॅनेजर म्हणून रुजू झाला. अनघाचा आनंद ओसंडून वाहत होता... पुन्हा एकदा जणू आयुष्यच परतले होते तिच्याकडे.  सर्वेश आणि स्पृहाने सामान घेऊन आपल्याच घरी यावे असे तिला वाटत होते मात्र सर्वेशच्या मते, 

" राहण्याची सोय बँक करतेय तर घ्या करून... सामान तर ठेऊन घेऊ पुढे आहेच आत्तुचे घर "

बँकेकडे तारण म्हणून पडलेले,  लोन फेडू न शकलेल्यांचे फ्लॅट बँक कर्मचाऱ्यांना देतात... ती जुनाट घरे पाहूनच तरुण लोक पळून जात. अश्याच एका अतिशय जुनाट चार मजली बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर सर्वेशला फ्लॅट मिळाला. स्पृहाला तिची नोकरी सोडावी लागणार होती त्यामुळे अजून काही दिवस नोटीस पिरियडला बाकी असल्याने तिला ते भरून देणे भागच होते. सगळे सामान आणि सर्वेश पुढे निघून आले... स्पृहा काही दिवस आपल्या आईकडे राहणार होती.. आईला तरी स्पृहा शिवाय कोण होते म्हणा!  थोडी समजून घालून आईलाही आपण औरंगाबादलाच न्यावे असे तिला वाटायचे.
                  सर्वेश येणार म्हटल्यावर अनघाच्या अंगात आगळाच उत्साह संचारला. पहाटे उठून सर्वेशच्या आवडीचा मसाले भात, सुरळीच्या वड्या , बासुंदी , पुरीचा बेत करून तिने डबा भरून घेतला. दुपारी हाफ डे निघून ती सर्वेशच्या घराकडे निघाली... थोडी त्याला मदत करू सामान लावण्यात .. हेही मनांत होतेच. बँकेतून थेट रिक्षा करूनच ती निघाली.. सातारा तांडा हे नाव तेव्हढं तिनं ऐकलं होतं... हा भाग  बराच लांब असणार हे नक्कीच होतं. वाटेत थांबून तिने थोडं चहा साखर , दूध, डाळ तांदूळ असं जुजबी सामान घेतलं. अचानक आभाळ भरून आलं आणि भर दिवसा चांगलाच काळोख पडला. कसे बसे चार जणांना विचारत रिक्षा पुढे जात होती... शेवटी त्या भागात पोहोचले ... अगदी शेवटचे टोक गाठले तिथेच ही "केतन निकेतन " नावाची बिल्डिंग होती. तिला हुष्य झालं! सामान काढून घेत रिक्षेवाल्याला पैसे देऊन ती फाटकाकडे वळली... आधीच काळवंडलेला उजेड त्यात त्या बिल्डिंगचा विटका हिरवा रंग... फाटक गंजलेलं... तशी ती एकाकी म्हणावी अशीच इमारत... पुढे फार वस्ती नाही आणि  अलीकडे दोन बिल्डिंग जमीनदोस्त करून नवीन उभारण्याचे काम सुरू होते. फाटक उघडून आत पाऊल टाकलं आणि अचानक एक विचित्र ओढ तिला त्या जागेबद्दल वाटू लागली. तीव्र सुप्त आकर्षण होतं त्या जागेत... एक अनोखा सुगंध तिच्या भवती दरवळू लागला... खोल श्वास भरून घेत ती स्वतःशीच पुटपुटली, 

"निशिगंध... आहा! मोहनना फार आवडायचा." 

भर दुपारी निशिगंध दरवळेलं कसा?? असा प्रश्न तिला पडला नाही . तिला तृप्त व्हायचं होतं आणि कुणालातरी तृप्त करून मोकळं करायचं होतं. भारल्या सारखी ती झपाझप पावलं टाकत चालू लागली. आपण इथं का आलोय? ह्यांचाही तिला विसर पडला. समोरच तिला लिफ्ट दिसली... जुनाट... अगदी  जखमेवरच्या खपली सारख्या काळपट रंगांची... ही लिफ्ट सुरू आहे की नाही? सर्वेशला फोन तरी करावा असला कोणताच विचार न करता ती झटकन आत शिरली... भयावह काळोख... अचानक सगळे दिवे सुरू व्हायचे आणि झटक्यात बंद पडायचे. लिफ्ट मध्ये बटणे नव्हतीच की काय? मात्र लिफ्ट सुरू झाली. तिने कोणतेही बटन न दाबता ती वरच्या दिशेला जाऊ लागली. कदाचित वरून कुणीतरी कॉल केली असावी... भारल्या सारखे वातावरण होते तिथले... किती काळ किती युगानुयुगे लोटली जणू तिथे... ती निश्चल भारावल्यागत स्तब्ध झाली होती. एका बाजूला असणाऱ्या आरशात तिला तो क्षण दिसला त्यासाठी ती कायम तळमळत होती. तिने तिचे पती मोहन ह्यांना आपण आई होणार असल्याचं सांगितलं... त्यांच्या चेहऱ्यावरील सुखद धक्का , त्यांनी अत्यावेगाने मारलेली मिठी सारे तिने प्रत्यक्ष अनुभवले... तिला घट्ट जवळ घेत, आता काळजी घे सांगत ......सारे अंधुक झाले. तो क्षण संपला .. मात्र अलौकिक शांती , तृप्तता अनघाला देऊन गेला.. चौथ्या मजल्यावर लिफ्ट थांबली... आणि अचानक तिला उमजले आपल्याच मनाचे खेळ सारे... एखादी कॅसेट घासल्यागत  मन एका त्या क्षणात अडकले असावे.  
            7 नं च्या फ्लॅटची  बेल तिने वाजवली आणि सर्वेश आत्तूला पाहून जाम खुश झाला... सामान तर येऊन पडले होते पण काय नि कसे आवरावे हेच त्याला उमजत नव्हते . भूक सुद्धा जाम लागली होती. पसाऱ्यात थोडी जागा करून मस्त आवडीचे आत्तूच्या हातचे चविष्ट जेवण तो मनापासून जेवू लागला... अनघा त्याला म्हणाली ,

"आधी तो induction सुरू करते बाबा!मस्त कडक चहा घेते मी , डोकं जाम झालंय... काय हे तुझं घर... अरे कुठच्या कुठे? रिक्षा वाल्याने 300₹ घेतले ... मॅनेजर साहेब द्या आता ते मला" 

म्हणताच दोघेही हसू लागले. सर्वेश चवीने जेवू लागला मधेच स्पृहाला फोन करून कसा मस्त जेवतोय एकटा म्हणत तिला चिडवू लागला. अनघाला खरंतर खूप थकवा आला होता ... चहाचा कप घेऊन ती बसली आणि आजूबाजूला पडलेल्या असंख्य खोक्यांकडे पाहत म्हणाली... 

"इतकी जुनी बिल्डिंग आहे पण बरं झालं लिफ्ट आहे. केव्हढं सामान आहे हे. नाहीतर वर कसं आणलं असतं कोण जाणे."

फोन संपताच सर्वेश म्हणाला, 
"मी स्पृहाला म्हणालो कमी कर सामान , विकून टाक पण  तुम्हा बायकांचा चिंधीतही जीव अडकलेला असतो."

अनघा खळखळून हसत सुटली.. सर्वेश खोटा रागाचा आव आणत म्हणाला

" हं हं ! आत्तू हसू नकोस तू ! हे एव्हढं अजस्त्र समान चार हमाल लागले उचलून वर आणयला. ह्या जुन्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट नसणार हा अंदाज आधीच बांधला असता ना तर चौथ्या मजल्याला नाहीच म्हटलं असतं मी."

अनघाच्या हातातून कप पडला..

"काहीही काय सर्वेश? लिफ्ट तर आहे ना! मी आत्ता लिफ्टनेच तर वर आली."

"काहीही काय आत्तू? तुला माझी खेचायची असेल पण सॉरी! वेडा आहे का मी तीन हजार मोजायला .. नुसते सामान उचलून आणायला मोजलेत."

अनघा आपल्या मतावर ठाम होती..
"सर्वेश मी गंमत करत नाहीये मी लिफ्ट नेच वर आलीये."

"आत्तू , ह्या बिल्डिंगच्या लिफ्टच नाहीये. जागा करून ठेवलीये पुढे लावू म्हणून पण त्यात लिफ्ट नाही."

दोघांचे कडाक्याचे वाद पेटले... शेवटी सर्वेश हमरीतुमरीवर येत म्हणाला..

"चल, चल दाखव कुठेय लिफ्ट?"

अनघा तरातरा पायात चपला घालून बाहेर आली , 
"चल ही इथेच ... अरे! कुठे गेली. सर्वेश माझ्यावर विश्वास ठेवा इथे लिफ्ट होती मी लिफ्टनेच वर आले."

"आत्तू तुला बरं वाटत नाहीये का? आराम कर बरं जरा वेळ.. केव्हढी घामाघूम झालीयेस."

सर्वेशने सांगितल्या प्रमाणे लिफ्टची फक्त जागा होती त्यात लिफ्ट नव्हतीच.. अतिशय जुनी जाळी जळमटे लोंबत होती फक्त... लिफ्ट नव्हतीच. अनघाचा स्वतः वरचा ताबा सुटला , ती जोरजोरात ओरडू लागली.

"इथे लिफ्ट होती इथे लिफ्ट होती मी स्वतः त्यात आले."
अनघा बेशुद्ध पडली... तिचा आवाज ऐकून बिल्डिंगचे लोक गोळा झाले...शेजारचे सदावर्ते काका शांतपणे सर्वेशला म्हणाले... 

"त्या लिफ्टने आल्या का?"

सर्वेशला काही कळेनासे झाले... अँब्युलन्स बोलावली. अनघाला अचानक बी पी शूट झालं म्हणून ऍडमिट करून घेण्यात आलं. सर्वेशने ताबडतोब स्पृहाला "आत्तू आजारी पडली असून ऍडमिट केले" ...असल्याचे कळवले... "बापरे! दगदगीने बी पी शूट झालं " म्हणत ती सुद्धा हळहळू लागली. अनघा अजूनही ग्लानीतच होती डॉक्टरांनी सर्वेशला आता घरी जा व उद्या या असे सांगितले. काही emergency आली तर फोन सुरू ठेवा,  बोलावून घेऊ हेही बजावले. अतिशय थकून घरी परततोच तर दारात शेजारचे सदावर्ते काका त्याचीच वाट पाहत होते. सदावर्ते काका ह्या बिल्डिंग मधील सगळ्यांत सिनियर व्यक्ती बिल्डिंग बनली तेव्हापासून ते इथेच राहायला होते. खरंतर आजच सामान घेऊन आलेल्या सर्वेशची कुणाशीच ओळख नव्हती ... पण काका त्याचीच वाट पाहत होते. ते सांगू लागले..

"हे बघा सर्वेश... ह्या बिल्डिंगचे काम सुरू होते तेव्हाची गोष्ट.. तेव्हा लिफ्ट हा प्रकार औरंगाबादेत अगदी नवीन होता. आम्ही सगळ्यांनी पुढच्या दृष्टीने विचार करून अधिकचे पैसे भरले लिफ्ट साठी... मात्र बिल्डर काही मनावर घेईना. हा बोगदा करून ठेवला पण लिफ्टचा पिंजरा काही आणून बसवत नव्हता. आम्ही खूप चिडलो, भांडणे केली, त्याला शिव्याशाप दिले अखेर त्याने लिफ्ट चे काम सुरू केले. कुठून कोण जाणे त्याने एक भंगार लिफ्ट आणून बसवली.. बसली बसली म्हणेपर्यंत लिफ्ट कोसळली आणि काम करणारी दोन डोकी चिरडून गेली तर आतले दोघे शॉक लागून गेले."

सदावर्ते काका जरा वेळ थांबले.. सर्वेशने पाणी पुढे केलं..घोटभर पाणी पिऊन काका सांगू लागले ....

"त्या प्रसंगानंतर  बऱ्याचदा लोकांना ती लिफ्ट दिसायची... विशेषतः नविन लोकांना .. मग अनेक लोक घाबरून घर विकून गेले. माझा मात्र ह्या साऱ्यावर मुळीच विश्वास नव्हता .. मला घर इकडची शांतता फार आवडायची . एकदा आमच्याकडे घरकामाला  नव्याने लावलेली बाई लीला अशीच ओरडत बेशुद्ध पडली. ती सुद्धा कशी कोण जाणे पण लिफ्टने वर आली होती. नंतर पुन्हा लीला ह्या बाजूला फिरकलीच नाही. .. मीच आपली उत्सुकता म्हणून गेलो तर तिच्या मुलाचा अॅक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला असूनही तो तिला त्या लिफ्ट मध्ये भेटल्याचे तिने रडत रडत मला सांगितले."

जाता जाता सदावर्ते काकांनी विचारले..
"तुमच्या त्या आत्याबाईंचे कुणी आप्तेष्ट ऍक्सिडेंटने गेले होते का ?"

सर्वेशच्या पायाखालची जमीन सरकली... आत्तूने नक्की काय अनुभवलं असेल ह्याची कल्पना त्याला आली... कदाचित कदाचित ही लिफ्ट त्या दुरावलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असावा... सकाळी हॉस्पिटलमधून फोन आला... आत्तूची तब्येत स्टेबल होती.. तडक तिला भेटायला म्हणून तो निघाला. दुपारपर्यंत तिच्यातच जवळ बसून तो खुणेनेच काही काळजी करू नकोस मी आहे असा बजावत राहिला. दुपारी जर फ्रेश व्हायला म्हणून घरी आला... त्याची आंघोळ होईपर्यंत दाराची बेल घणाणू लागली.. दारात स्पृहा उभी होती. आत्तूची तब्येत बरी नसल्याचे कळताच तिचा जीव लागेना.. emegency notice पुढे करत तिने औरंगाबाद गाठले... तिच्याकडे बरंच सामान होतं.. प्रवासाने घामाघूम झाली होती. आत्तू स्टेबल असल्याचे सांगत सर्वेशने चहा टाकला... चहा घेत स्पृहा म्हणाली...

"मी खरंतर तुला कॉल करून खालीच बोलावणार होते केव्हढं सामान झालं माझं नाही म्हणता म्हणता ... पण लिफ्ट दिसली मग थेटचवर आले."

सर्वेश आ वासून पाहत होता.... अचानक भानावर येत तो म्हणाला..
"स्पृहा तुझे बाबा ऍकसिडेंटमध्ये गेले होते का ग?" 

"हो ! मी आठ वर्षांची असेन ..आल्यावर तुला surprize देतो म्हणाले होते पण भेट नाही झाली... आणि गंमत सांगू आत्ता मला लिफ्ट मध्ये तेच भेटले जणूकाही.. हातात मोठ्ठा गिफ्ट बॉक्स होता... गंमतच आहे.. काय काय कल्पना करतो ना आपण."

"स्पृहा आपण निघतोय इथून  ... yes ! आत्ता। आपण... आपण ... आत्तूकडे जातोय राहायला."

"अरे! जरा धीर धर आत्तुंना discharge तर मिळू दे... काय झालंय काय तुला? " त्याच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग पाहून स्पृहाने विचारलं...

"स्पृहा! शांतपणे ऐक. मन घट्ट कर... ह्या बिल्डिंगला लिफ्ट नाहीये...."

"काहीतरीच काय? मी लिफ्टनेच वर आले आत्ता. हे बघ ...." म्हणत  पुढे गेलेली स्पृहा जागेवरच थबकली...
आणि भान हरपून किंचाळू लागली..

"इथे लिफ्ट होती. मी खरं सांगतेय विश्वास ठेवा माझ्यावर .. मी लिफ्टनेच वर आले...."

🔏©️ यशश्री रहाळकर






      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!