स्पृहा आणि सौमित्र गेली सात आठ वर्षे एकमेकांचे परिचित.. त्याहीपुढे जाऊन सांगायचे झाले तर गेली सहा वर्षे दोघेही सिरीयस रिलेशनशिपमध्ये होते. हल्ली ह्या just chill, time pass किंवा move on प्रकारच्या casual relationship असतांना ... स्पृहा आणि सौमित्र मात्र त्यांच्या नात्याबद्दल खूपच गंभीर होते. एका पार्टीत "कॉमन फ्रेंड" च्या माध्यमातून पहिल्यांदा भेटलेले दोघे हळूहळू एकमेकांचे चांगले मित्र झाले नि वर्षभरात एकमेकांच्या प्रेमात पडले.. खरेतर दोघांचे स्वभाव टोकाचे भिन्न..स्पृहा प्रॅक्टिकल, सडेतोड , रॅशनल... थोडीशी फटकळ. तर सौमित्र हळवा, इमोशनल, जरा बुजरा आणि शक्यतो कुणाला न दुखावणारा भिडस्त.... कसं कोण जाणे पण दोघांचं जमलं.उंच, सडपातळ सावळीशी स्पृहा फार सुंदर नसली तरी कमालीची आकर्षक होती.. सौमित्र तुलनेनं गोरापान आणि देखणा.. जरासे सुखवस्तूपणाचे मूठभर मास चढलेला होता... C.A.पूर्ण झाल्यावर जरा जम बसेपर्यंत सौमित्रने वेळ घेतला... आणि लगेच स्पृहाला प्रपोज केलं... डान्स स्पेशल घेऊन M.A. झालेली स्पृहा जरासे वेगळे करियर निवडलेली स्वतंत्र मुलगी होती... सौमित्रने लग्नाचा विषय काढताच तिने वेळ मागून घेतला. तिचे भरतनाट्यमचे कार्यक्रम, देश विदेशातले दौरे ह्यासाठी तिला आवश्यक स्वातंत्र्य गरजेचं होतं.. जरा घाईघाईने सौमित्रने त्यांच्या दोघांच्या घरच्यांची भेट घालून देण्याचं ठरवलं.
स्पृहा तिच्या आईवडिलांची एकुलती एक लाकडाची लेक... एव्हढेच नव्हे तिचे आईवडील सुद्धा एकुलते एक अपत्य.. त्यामुळे मावशी, काका, आत्या असे नातेवाईक नाहीत.. लहानसे कुटुंब.. घरी दोन आज्या आणि हे तिघे.... मॉडर्न विचारांचं टिपिकल उच्च मध्यमवर्गीय घर. सौमित्रच्या घरचे लोक मात्र ह्याच्या अगदीच दुप्पट. सौमित्रला दोन मोठे काका. काका आणि त्याचे वडील अश्या तिघांनी मिळून एका मोठ्या प्लॉटवर तीन मजली बंगला बांधलेला... म्हणायला वेगळे पण दिसायला एकत्र. मोठ्या काका-काकीला मुलबाळ नसल्याने सौमित्रवर त्या दोघांचा विलक्षण जीव...सौमित्रची आई बँकेत नोकरीला असल्याने त्याला मोठ्या काकूनेच सांभाळलं. दुसऱ्या काकालाही दोन मुलीच.. त्याही त्यांच्या सासरी सुखाने नांदत होत्या. सौमित्र त्यांचा लाडका भाऊ. झालंच तर दोन आत्या, शेतीवाडी, येणारा जाणारा ह्यांचा घरात सतत राबता असायचा. घरचे प्रचंड गडगंज.. पण तितकेच कर्मठ रीतीभाती जपणारे. सौमित्रची आई सातारकडची... तिकडे मोठा जमीन जुमला, साखर कारखाना... 80 च्या आसपास वय असणारे आईवडील पण कर्ते सगळीकडे वचक असणारे. सौमित्रला एकूण चार मामा... त्याची आई सगळ्यांत धाकटी आणि तितकीच लाडकी... त्यामुळे सगळ्या बाजूंनी सौमित्र लाडका होता... त्याच्या लग्नाची मोठी स्वप्ने सगळे पाहत होते... त्याचे त्यांनी जमवल्याचे कळताच जरासे नाराज झाले पण "होऊ दे त्याच्या मनासारखं!" म्हणत उत्साहाने तयारीला लागले. पहिल्यांदा पहायला म्हणून आले तर सौमित्रकडचे 30 लोक... स्पृहाची आई बावरून गेली. एकदम एव्हढी माणसं.. बापरे!
साधीशी साडी नेसून आलेली, फार चमचमीत मेकअप न केलेली... मोकळं बोलणारी स्पृहा सगळ्यांना पाहताक्षणीच आवडली.थोड्या ओळखी वगैरे उरकल्यावर थेट विषयाला हात घालत मोठे मामा म्हणाले,
"हल्ली पोरं आपापसांत जमवतात.. आपण काय आनंदाने स्वीकारायचं... थाटात बार उडवून देऊ काय म्हणता?"
स्पृहाच्या आईला सौमित्र आवडला होता मात्र ह्या इतक्या लोकांमध्ये आपल्या लेकीने जाणं आणि तिचं तिथे निभण म्हणजे अवघड वाटत होतं... त्यांनी आढेवेढे न घेता स्पष्टच आपली बाजू मांडली..
"आमच्याकडे फार माणसे नाहीत एव्हढ्या माणसांमध्ये रहायची, निगुतीने करायची माझ्या लेकीवर वेळच आली नाही... तशी तिला कामे सगळी येतात पण आजवर जबाबदारी कधी पडली नाही."
"आम्ही कश्याला आहोत मग? लेकीसारखं सांभाळून घेऊ.."
सौमित्रची आई प्रेमाने म्हणाली.
स्पृहाने आपले करियर, डान्सचे कार्यक्रम ह्याबद्दल स्पष्टपणे सांगून टाकले...त्यावर मोठ्या काकी अगदी मायेनं म्हणाल्या..
"तुझ्या सासूचं सगळं करीयर लग्नानंतरचे बरं! तिने बँकेच्या परीक्षा दिल्या पुढे पुढे जात राहिली.. आम्ही कुणी कधी आडकाठी केली नाही... तुझं काम म्हणजे तुझी नृत्यसाधना.. जरा वेगळं आहे मान्य पण कुणी अडवणार नाही कधीच तुला..."
"प्रत्येकाला स्वतःची प्रगती करायचा हक्क आहेच की.."
सौमित्रची बाबा म्हणाले.
स्पृहासाठी हेच ठिकाण अगदी योग्य आहे ह्या मतावर स्पृहाचे बाबा आले आणि लग्न ठरले. फार काही अपेक्षाच नव्हत्या कुणाच्या... पण एकंदर सौमित्रचे कुटुंब आणि भरपूर माणसे पाहता मुलीकडच्यांना सोय करणे सोपे नव्हते म्हणून त्यांच्या गावी पारंपारीक पद्धतीने लग्नसोहळा करण्याचे ठरले. खर्चाचा वाटा स्पृहाच्या वडिलांनी स्वेच्छेने द्यावा ..; मात्र सगळ्यांचे मानपान त्यांनी करावे हेही निश्चित झाले. स्पृहा त्यांचीही एकुलती एक लेक त्यामुळे त्यांनी साखरपुडा थाटामाटात आपल्याकडे करायचा प्रस्ताव मांडला... उभयपक्षी तो मान्य झाला आणि तारीख सुद्धा ठरली.
स्पृहाच्या वडिलांनी ग्रँड रॉयल हॉटेल बुक केले ... आपली मोजकी जवळची माणसे त्यांनी आमंत्रित केली. आपल्या एकुलत्या एक लेकीसाठी त्यांनीही काही स्वप्ने पाहिली होती... सौमित्र आणि स्पृहाने अगदी थोडक्यात रिंग सेरेमनी करायचं ठरवलं.... सौमित्रच्या घरच्यांनी देखील साखरपुडा त्यांच्या पद्धतीने होऊ देत म्हणून तयारी दर्शवली.... लग्न विधीवत होणार होतेच. स्पृहाला waterfall बॅकग्राऊंडला हवा होता त्याप्रमाणे स्टेज design झाला.. तिने फिश कट वन पीस ... सियांन रंगांच्या रंगछटा वापरून खास बनवून घेतला... त्यावर मोजके नाजूक डायमंडचे दागिने... तिने अंगठीही निलमची निवडली होती. सौमित्र देखील गडद निळा सूट घालणार होता... आधुनिक प्रथेप्रमाणे दोघांनी एकमेकांना अंगठ्या घालायच्या.. मग त्यांच्यावर फुलांची बरसात आणि खास थीम केक... समुद्र आणि शंख शिंपल्यांचा... सगळी ऑर्डर नक्की झाली... साखरपुड्यासाठी खास मेकअप आर्टिस्ट बोलावून स्पृहा तयार होत होती... एव्हढ्यात सौमित्रच्या आजोळचे सगळे लोक दाखल झाले.. सावळी मुलगी बघून सौमित्रच्या मामींनी नाके मुरडली...सौमित्रची आजी येतांना नातसुनेसाठी महागडी पैठणी आणि चांगले ठसठशीत दागिने घेऊन आली होती... तिने आपल्या लेकीची चांगली खरडपट्टी काढली..
"ते लाख म्हणतील ग ! तुला कळत नाही का? असे झगे घालून का साखरपुडा होतो... नव्या सुनेचे पाय धुवावे ओटी भरावी ... हे काय ? आपल्याच धर्माचीच आहे ना पोर?? तिला म्हणा तिचे तिच्या घरी ठेव"
आजीचा सूर चांगलाच चढला ... भराभर सगळे स्वरूप पालटले... चौरंग मांडण्यात आला आणि स्पृहाला साडी नेसून येण्याचे फर्मान निघाले... स्पृहाचा चांगलाच हिरमोड झाला.. तिचा उतरलेला चेहरा पाहून आई म्हणाली..
"बघ ! म्हणून तुला म्हणत होते एव्हढी माणसं म्हणजे प्रत्येकाशी जमवून घ्यावे लागेल... माझं पटतं का काही तुम्हा बाप लेकीला?"
स्पृहा हट्टाने तशीच उदास बसून होती.. शेवटी सौमित्र येऊन गयावया करू लागला...
"थोडा वेळ साडी नेस स्पृहा ... please माझ्यासाठी...💝आजीचे किती दिवस राहिलेत.. तिच्याही मनाने होऊ दे... फक्त थोडा वेळ... नंतर लगेच आपण रिंग सेरेमनी करूयात..."
कशीबशी स्पृहा तयार झाली... विधीवत साखरपुडा झाला... तिला पुन्हा साडी बदलून पैठणी नेसून येण्यास सांगितले... ह्या सगळ्या सगळ्या घडामोडीत बराच उशीर झाला... सगळ्यांना जोडीने नमस्कार मग प्रत्येकासोबत फोटो ह्या वेळात सगळे आमंत्रित जेवून परतले सुद्धा... स्पृहाला तिचा वन पीस घालायला सवडच मिळाली नाही तसेच पैठणीवर दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. रिंग सेरेमनी चा विधीवत वाङ्निश्चय झाला... आजीबाई खुश झाल्या... पण स्पृहा मनांतून चांगलीच दुखावली गेली असणार... हे तिला चांगलेच ओळखणाऱ्या सौमित्रच्या नजरेतून सुटले नाही... एकाही फोटोत तिने साधी smile सुद्धा दिली नाही... केवळ उपचार म्हणून तिने सगळे उरकले. रात्री घरी परतल्यावर त्याने स्पृहाला सविस्तरपणे माफी मागणारा मेसेज केला... तिने त्याच्या शब्दाचा मान राखून साडी नेसली ह्याबद्दल देखील तिचे कौतुक केले... वेळेला ती त्याला आयुष्यभर साथ देईल ही खात्री असल्याने तो स्पृहाच्या अधिकच प्रेमात पडला असल्याचेही त्याने text केले... आता ती काही दिवस तरी रुसून बसणार, ह्याची त्याला खात्रीच होती. सौमित्रने तिला शांत व्हायला थोडा वेळ देण्याचं ठरवलं.
लग्न दोन महिन्यांवर येऊन ठेपलं होत... पुन्हा प्रवासाची दगदग नको म्हणून आजी बाईंनी सौमित्रकडेच तळ ठोकला होता.... शिवाय जातीने सगळ्या बारीकसारीक गोष्टींत लक्ष घालून त्या ती अगदी नीटनेटकी करणार होत्या. लहान मोठ्या गोष्टी लगेच स्टेटस वर अपडेट करणाऱ्या स्पृहाने आठ दिवस झाले तरी सोशल मीडियावर आपल्या एंगेजमेंटचे अपडेट केलेलेच नव्हते.. सौमित्रनेच मग fb वर त्यांचा अंगठ्या घालतांनाचा फोटो शेअर केला आणि स्पृहाला टॅग केलं. थोड्याच वेळात स्पृहाने तो टॅग remove केलेला त्याला दिसला... तो मनातून खूप दुखावला पण स्पृहाची नाराजी त्याला कळत होती. हल्ली तिने त्याचे फोन घेणे सुद्धा कमी केले होते... स्वतःहून फोन करणे तर तिनेच केव्हाच बंद केले होते... जेव्हढ्यास तेव्हढं कामापुरतंच ती बोलायची. सौमित्रने अनेकदा तिला फिरायला जाण्याविषयी किंवा डिनरला जाण्याविषयी विचारले पण ती वेळ नसल्याची सबब पुढे करायची..... दागिन्यांच्या खरेदीच्या वेळी स्पृहाला फोन केला असता ..
"मला काय कळतंय त्यातलं? तुम्हीच आवडीप्रमाणे घ्या."
असे उत्तर तिने दिले. कपडा खरेदीच्या वेळेलाही वेळ नाही ही सबब पुढे केली. दोघांचं काहीतरी नक्कीच बिनसलं आहे हे फक्त सौमित्रच्या मोठ्या काकींच्या लक्षात आलं... बाकी सगळे लग्नाच्या गडबडीत व्यस्त होते. स्पृहाच्या नृत्यसाधना अकॅडमीचा कार्यक्रम एका आंतरराष्ट्रीय महोत्सवात बँगकॉकला ठरला आणि ती त्या धावपळीत व्यस्त झाली... जाण्यापूर्वी भेटीला म्हणून आलेल्या स्पृहाला आजी म्हणाल्या..
"काय नाच गाणं बाकी असेल ते करून घ्या... मग आयुष्यभर आमच्या सौमित्रच्या तालावर नाचायचं आहे."
स्पृहा काहीही उलट न बोलता... शांतपणे घरी परतली. खरेतर लग्न अगदी तोंडावर आले असतांना.. हा कार्यक्रम तिने टाळावा असे सौमित्रच्या घरच्या मंडळींचे मत होते.. पण तिने परवानगी मागितली कुठे होती?ती थायलंडला रवाना झाली आणि नंतर तिने सौमित्रशी असणारा उरला सुरला संपर्कही तोडून टाकला... तो वेड्यापीश्यागत सैरभैर झाला... तो सतत तिला कॉल करायचा आणि ती शांतपणे त्याचा कॉल कट करायची... व्हाट्स अँप वर त्याने मेसेजेसचा रतीब घातला पण तिने उत्तर दिलेच नाही. एके दिवशी सकाळी तिने त्याचा नंबर ब्लॉक केला आणि त्याचा बांध फुटला.. आपल्या काकींच्या मांडीवर डोके ठेवून एखाद्या लहान मुलाप्रमाणे तो रडू लागला.. काकीने त्याला समजावले .. की त्या बोलतील स्पृहाशी ,समजावतील तिला...
"काय रे तुम्ही ही हल्लीची मुले !"
म्हणत त्यांनीही कॉल करण्याचा प्रयत्न केला पण स्पृहाने उत्तर दिले नाही.. फक्त एक मेसेज पाठविला
"परत आल्यावर सविस्तर बोलूया!"
सहा दिवसांसाठी गेलेली स्पृहा परतली नाही उलट तिथूनच ती बालीला फिरायला निघून गेली. हेही सौमित्रला त्यांच्या एका कॉमन फ्रेंड कडून कळले... ती बालीला गेल्याचे आणि तिथे एन्जॉय करत असतांनाचे ढीगभर फोटोज् तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हा काय प्रकार आहे? हे त्याला कळेना.. कारण लग्नानंतर आठ दिवसांनी दोघांनी बालीला हनिमूनला जाण्याचा प्लॅन केला होता त्यानुसार सगळे बुकिंग वगैरे करूनही झाले होते. स्पृहाला समुद्र खूप आवडायचा म्हणून त्या दोघांनी मिळून हे ठिकाण नक्की केलं होतं.स्पृहा आपल्याला टाळतेय का? सौमित्रला काही सुचनासं झालं... सगळीकडे वाटलेल्या लग्नपत्रिका, तिच्यासोबत पाहिलेली आयुष्याची स्वप्ने, तिच्या आवडी , दोघांच्या गप्पा सारं सारं त्याला खूप हवंहवंसं वाटत होतं... स्पृहाच्या मनात काय आहे हे तिनं घडाघडा बोलून टाकावं , आपण माफी मागू हवं तर आणि सगळं सुरळीत व्हावं एव्हढंच त्याला वाटत होतं. पाच सहा दिवसांनी स्पृहा परत आली.. हेही त्याला कळवण्याचे कष्ट तिने घेतले नाही... लग्न आठ दिवसांवर आलं.. व्याही भोजनाचं आमंत्रण करायला मोठे काका-काकी निघाले...
"आज काय ते स्पष्टच बोलतो.."
असे मनाशी ठरवून सौमित्र देखील त्यांच्याबरोबर निघाला.
स्पृहाच्या घरी अगदी शांतता होती आठ दिवसांवर लग्न आले असल्याची, लग्नघरातील धावपळ गडबड काहीच दिसत नव्हते... स्पृहा अगदी शांतपणे बाहेर येत टोकाच्या कोरड्या आवाजात म्हणाली..
"मला नाही वाटत हे लग्न करून मी सुखी होईन... "
तिने पैठणी, दागिने आणि साखरपुड्याची अंगठी परत केली.. काका मटकन खालीच बसले...
स्पृहाच्या बाबांकडे पाहत म्हणाले ...
"अहो काय समजायचं काय आम्ही? आठ दिवसांवर लग्न आलंय.. सगळीकडे पत्रिका वाटल्या गेल्या आहेत..."
त्यांना शांत राहण्याची खूण करत काकी समजावण्याचा सुरात म्हणाल्या..
" स्पृहा बेटा! अशी घाईने निर्णय घेऊ नकोस. सौमित्रच खूप प्रेम आहे तुझ्यावर.. त्या दिवशी तुला जबरदस्तीनं ही पैठणी नेसावी लागली... आमचं चुकलं .. हवं तर मी माफी मागते... आपण बोलूया शांततेनं..."
तटकतोड पणानं स्पृहा म्हणाली...
"प्रेम माझंही होतच ना! पण म्हणून मी त्याच्यावर काहीही लादलं नाही. त्या दिवशी सौमित्रने माझी बाजू घ्यायला हवी होती.. प्रश्न पैठणी किंवा वन पीस हा नव्हताच प्रश्न होता साथ देण्याचा..."
सगळे मूग गिळून गप्प बसले होते.. एखाद्या तोफेतून आगीचे लोळ बाहेर पडावेत तशी स्पृहा बोलत सुटली..
"आजीचे म्हणाल ना तर मलाही दोन्ही आजी आहेत .. आणि मी त्यांचं मन जपते योग्य वेळी.. पण म्हणून माझ्या जोडीदाराने ते जपत का बसावे?? त्या दिवशी आजीचे मन मोडायला नको म्हणून सौमित्रने मला ऍडजेस्टमेंट करायला सांगितली.. उद्या अजून कुणासाठी , पर्वा अजून कुणासाठी... मला हे शक्य नाही..
मी पूर्वीच त्याला सांगितलं होतं .. अगदी स्पष्टपणे."
एव्हाना सौमित्रचे डोके भणाणू लागले होते... आवाज वाढवत तार सप्तकात तो ओरडला..
"इतके दिवस तुला हेच समजवून सांगायचं प्रयत्न करतोय ना! पण तुला बोलायचं नाहीच आहे... तुझी इतके वेळा मी माफी मागितली... तू म्हणशील ती शिक्षा मला मान्य आहे त्यासाठी..."
"माझ्याशी आवाज चढवून बोलायचं नाही सौमित्र ! मी तुझी बायको झालेली नाही... आणि खरं सांगायचं तर मला व्हायचंही नाही... तुझ्याशिवाय मी कशी जगू शकेन ? असा मूर्ख प्रश्न मला पडला होता.. तोच सोडवायला मी मस्त एकटी फिरून आले... तुझा फोन नको, मेसेज नको आणि आठवणही नको...
And see... मी खूप मज्जेत ...आनंदात आहे."
काका-काकींनी तिच्या आईबाबांशी बोलून ह्यावर तोडगा काढायचा प्रयत्न केला... त्यांनी स्पृहाला समजावून सांगावे असेही त्यांनी सुचवले... तास दोन तासांच्या चर्चेनंतर स्पृहा ठामपणे म्हणाली..
"मला नाही वाटत आता काही बोलायचं उरलं आहे.. माझ्याकडून हे लग्न मोडलं..."
आणि ती तरातरा आतल्या खोलीत निघून गेली.नाईलाजाने काका-काकी आणि सौमित्र जायला निघाले.. स्पृहाच्या आईने ,"पैठणी दागिने आणि अंगठी वगैरे नीट पाहून घ्या नंतर वाद नको " असे सुचवले.काकीने जड मनाने ते उचलले.. सगळे घरी आले.. नेमकं काय झालं कुणाला कळेना.. पैठणी आजीसमोर भिरकावत सौमित्र म्हणाला..
"झालं तुम्हा सगळ्यांच समाधान... माझं लग्न मोडलं आहे... पैठणी नेसवताहेत.. नेसवा अजून नेसवा ..."
म्हणत वाट्टेल तसं बडबडत तो त्याच्या खोलीत निघून गेला.पुन्हा घरी तोच विषय सगळे संतापले होते.. मामा तर म्हणालेही .....
"त्या पोरीला काय सोनं लागलंय का तिच्याहून सरस मुलगी मिळेल सौमित्रला.."
सौमित्रची काकी मात्र मनातून हादरली होती... सौमित्र ह्या मुलीत खूपच गुंतला असल्याचं तिला पुरतं माहीत होतं.. सकाळपर्यंत सौमित्रने खोलीचे दार उघडले नाही... सगळ्यांचीच मनःस्थिती बरी नव्हतीच.. शेवटी जेवायच्या वेळेला बोलवायला म्हणून गेलेल्या काकी घाबरत म्हणाल्या..
"तो दार उघडत नाहीये.. दार तोडा मला वेगळीच भीती वाटतेय..."
त्यांची भीती खरी होती.. दार तोडल्यावर सौमित्र अर्धमेल्या अवस्थेत सापडला.. खोलीभर त्याने त्याचे आणि स्पृहाचे फोटो पसरून ठेवले होते... स्पृहाशिवाय जगणेच मान्य नसल्याचेही त्याने चिठ्ठीत नमूद केले होते.. झोपेच्या गोळ्यांची अख्खी बाटली रिचवल्याने त्याचा मेंदू बधिर झाला होता.. हॉस्पिटलच्या ICU मध्ये त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न डॉक्टर करत होते...तोंडात मारल्यागत आजी देवापुढे हात जोडून बसली होती...नेमकं कुणाचं चुकलं होतं माहीत नाही? पण अनाहूतपणे आलेल्या ह्या वादळाने सारं घर उध्वस्त झालं होतं.
✒️ यशश्री रहाळकर