राघवचा पोलीस कोठडीतील आज दुसरा दिवस... आयुष्यात हातात बेड्या पडण्याची वेळ आपल्यावरही कधीतरी येईल... ह्याचा पापभिरू राघवने स्वप्नातही विचार केला नव्हता. बेदम माराने अंगाची रेषन् रेष ठणकत होती... नेमका कोणता अवयव सुजलाय हेही कळेनासं झालं होतं.... डोळा काळानिळा झालेला, पाठ हात-पाय बधिर झालेले... तहानेने कमी आणि भीतीने अधिक शोष पडलेला घसा... ग्लानीतच बिचारा झोपून गेला... दुसऱ्या दिवशी शनिवार म्हणजे अजून दोन दिवस तरी त्याला बेल मिळणार नव्हती. डोळे मिटताच त्याच्या डोळ्यांसमोर आयुष्यात पहिल्यांदा पैठणी नेसून सुरेख नटलेली आई आणि तिच्याच पैठणीला मॅचिंग कुर्ता घालून तयार झालेले बाबा उभे राहिले... काय काय स्वप्न असतील ना त्यांची? सुखी ,समाधानी ... आनंदाने उजळलेले त्यांचे चेहरे आठवले आणि राघव खाडकन जागा झाला... काय वाटत असेल त्यांना? कोणता नरक जिवंतपणी भोगत होते ते... आपणच ..आपणच ह्याला जबाबदार आहोत... क्षणभर त्याच्या डोक्यात आत्महत्येचा विचार थयथयाट करून गेला... पुन्हा दुसऱ्या मनाने त्याला समजावले... आपला खरंच दोष आहे का? सुलक्षणाचं नेमकं काय झालं?? हे कळेपर्यंत मुक्ती नाहीच... त्याशिवाय सुटका शक्यच नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तो रेडा सदृश्य हवालदार कोठडीत आला... त्याने ओढतच राघवला खुर्चीत बसवलं... कुणीतरी ऑफिसर आला असावा.. तो तुलनेने सभ्य होता... राघवला चहा दिला .. शांतपणे त्याच्याकडे पाहत पुन्हा तेच प्रश्न पण मवाळ सुरात विचारू लागला..
"हे बघा साहेब.. जंटलमन दिसता तुमी राव! एव्हढे शिकलेले हुश्शार... तुमचा त्रास आन आमची कटकट कायला वाढवता.. चटाचटा सांगून सोडा की .. काय केलंत त्या पोरीचं?? पोरीचा मॅटर हाय...लै डेंजर! "
राघव पुन्हा तेच सांगू लागला... कारण तेच सत्य होतं...
"सुलक्षणा कुठे गेली माहीत नाही. आम्ही सकाळी उठलो तर ती घरात नव्हती... तिने कसलीच चिठ्ठी, मेसेज, ई-मेल काहीही पाठवलेलं नाही... ती आत्ता कुठे आहे हे मला माहित नाही."
साहेब वैतागला... इतका मार खाऊन सुद्धा ह्याचं उत्तर तेच ... रेडासदृश्य हवालदाराला खूण करून तो बाहेर पडला... हवालदाराने पुन्हा आपली काठी उगारत राघवच्या पार्श्वभागावर बडवणे सुरू केले. मार खातांनाही राघवला बालपणीची आठवण झाली.. त्याच्या आईने कधीही त्याला साधी चापटही मारली नव्हती... त्या मानाने धाकटे बंधुराज कृष्णाने बराच मार खाल्ला होता... कृष्णा तसा उपद्व्यापीच होता... शाळा , कॉलेजमध्ये देखील राघव पुस्तकी कीडा म्हणून ओळखला जात असे.. कुणाशी भांडणे , मारामारी तर दूरची गोष्ट साधे वाद घालणेही त्याला जमत नव्हते... आईवडिलांच्या कष्टाची त्याला पूर्ण जाण होती.. लवकरात लवकर पायावर उभे राहायचे आणि घरात हातभार लावायचा हीच सतत धडपड तो करत असायचा. पॉलिटेक्निक पूर्ण होताच.. त्याने मिळेल ती नोकरी धरली पुढे BE, MBA त्याने नोकरी करत करत पूर्ण केले. नवा 2 BHK फ्लॅट घेतला तेव्हा तर आईवडिलांना आभाळ ठेंगणे झाले... चाळीतल्या भाड्याच्या दोन खणी घरातून थेट हा प्रशस्त फ्लॅट म्हणजे त्यांच्या आयुष्याचे सार्थक होते. आयुष्यभर छोटेसे स्टेशनरी दुकान चालवणारे वडील आणि पडेल ती कष्टाची कामे करणारी आई... ह्यांच्यासाठी त्यांची दोन मुले राघव आणि कृष्णा सर्वस्व होते. हवालदाराची ड्युटी संपली असावी.. त्याने मारणे आवरते घेतले... नवा हवालदार आला तसे त्याने खुणेनेच "काय झालं?" असं विचारलं असता ..
"गेंड्याच्या कातडीचा निब्बार गडी हाय.. कालपासून बडवतोय.. पन उत्तर काही देत नाही..."
"काय रं बाबा! चांगल्या घरचा दिसतोय... बोल की पटापटा.."
नवीन हवालदार म्हणाला..
दोघेही नकारार्थी मान डोलवत कोठडी बाहेर पडत तंबाखू मळू लागले.. अकरा वाजताच्या सुमारास राघवचे वडील डबा घेऊन आले ... पोलिसांच्या हातापाया पडून ..
"माझा पोरगा गरीब आहे साहेब.. सोडा त्याला आम्ही काही केलं नाही... त्याला जेवण तरी देऊ द्या म्हणून गयावया करू लागले..."
त्यांना शिव्यांची लाखोली मिळत होती... इकडे राघवच्या हृदयाचे पाणी पाणी झालं... सोमवारी खटपटी करून कृष्णाने बेलवर राघवला घरी आणलं... तेव्हा तो जेमतेम जिवंत होता.. तडक डॉक्टर गाठत उपचार सुरू झाले..
कृष्णा भयंकर संतापला होता...
"ही काय पद्धत आहे चौकशीची जिवानी जायचा एखादा.."
पंधरा दिवसांनी थोडा बरा होताच... राघवला कोर्ट गाठावं लागलं... रोज सकाळी पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी द्यावी लागे.. त्याला शहराबाहेर पडण्यास मनाई होती. राघवची नोकरी गेली.. स्वप्नांचे घरकुल अखेर विकावे लागले... सारे होत्याचे नव्हते झाले... राघव ह्या साऱ्यात स्वतःला जबाबदार मानत होता तर त्याचे आईवडील आपलीच निवड चुकली म्हणत स्वतःला दोषी मानत होते.. हसत्या खेळत्या घरकुलात सगळे एकमेकांपासून डोळे चोरत होते.. प्रत्येक जण सुलक्षणाचा विषय काढायचे टाळत होते..मूळ समस्येपासून पळत होते... एकच व्यक्ती खंबीर तटस्थ मनाने ह्या साऱ्यात उभी राहिली.. ती म्हणजे राघवचा धाकटा भाऊ कृष्णा.. कृष्णाचे आपल्या दादावर विलक्षण प्रेम होते.. साधी माशी सुद्धा आयुष्यात मारली नाही तो आपला दादा ह्या प्रकरणात दोषी असूच शकत नाही ... आता हे प्रकरण उकरून काढण्याशिवाय पर्याय नाही हेही त्याने पक्के केले. घरात सगळ्यांना एकत्र बोलावून तो ठामपणे म्हणाला..
"दादा.. किती दिवस आपण हे असं जगायचं आहे?? ... आपला काहीही दोष नसतांना... आपण का भोगायचं??"
"नशीब फिरलं आपलं .." म्हणत आईने पदर डोळ्यांना लावला.
"किती दिवस असं नशिबावर हवाला देऊन बसायचं??"
"हात दगडाखाली आहेत आपले... शांत राहा"
गरीब बिचारे बाबा काळजीपोटी कळवळून म्हणाले.
"मी ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे.. काय व्हायचे ते होऊ देत!.. तसंही आता याहून वाईट काय होणार म्हणा..."
कृष्णा तणतणत घराबाहेर पडला... कृष्णाची धडपड, त्याचं प्रेम आणि आत्मविश्वास ह्याने सगळेच भारावून गेले. राघव कृष्णाची वाट पाहत दारातच बसला होता.. तो येताच त्याने कडकडून आपल्या भावाला मिठी मारली.. आणि काळवेळ, वय,पुरुषी अहंकार सारे बाजूला ठेवत तो दोन महिन्यांनी पहिल्यांदा ढसाढसा रडू लागला... त्याला मोकळं.. शांत होऊ देत.. कृष्णाने त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाला..
"मी आहे ना दादा! हे बघ आपला काहीच दोष नाहीये.. मात्र नेमकं काय झालं ह्याचा शोध घ्यायला हवा."
कृष्णा कागद पेन काढून बसला एकेका घटनेची संगती लावायला त्याने नोंद घेणे सुरू केले.. साधारण सहा महिन्यांपूर्वी सुलक्षणाच्या वडिलांनी रीतसर येऊन राघव आणि सुलक्षणाच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला होता. त्यांना कुठल्याश्या मॅट्रीमनी साइटवर राघवचे प्रोफाईल मिळाले होते. ते बँकेत मॅनेजर..त्यांची आर्थिक स्थिती राघवच्या कुटुंबापेक्षा खूपच उजवी होती. सुलक्षणा त्यांची एकुलती एक लेक.दोघांच्या पत्रिका जुळल्या.. विशेष म्हणजे जातच नव्हे तर पोटजातही एकच असल्याने सुलक्षणाचे वडील खूप खुश होते.. ते अत्यंत कर्मठ म्हणावे असेच होते.पाहण्याचा कार्यक्रम झाला... आणि दोघांनीही पसंती दिली. राघवला सतत सुलक्षणाला कुठेतरी पाहिलं आहे असं वाटत होतं. ह्यावर सुलक्षणाने लाजून "पूर्वजन्मी असेल" असे उत्तर दिले.. अत्यंत साधी राहणी , दागिन्यांची , मेकअपची फारशी आवड नाही.. अशी घरगुती वळणाची सुलक्षणा राघवच्या घरी सगळ्यांनाच पसंत पडली. लगेचच महिनाभरात सुलक्षणाच्या वडिलांच्या घरी मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला. आपली एकच लेक असल्याने लग्नाचा खर्च सुद्धा आपणच करणार असे ते म्हणाले.. त्यानंतर तीन महिन्यांनी लग्न होतं.. ह्या दरम्यान अनेकदा राघव आणि सुलक्षणा भेटत होते, फिरायला जात होते.
भवताली सगळे फोटो मांडत नीट निरीक्षण करत अचानक कृष्णाने विचारलं..
"तुमच्या ह्या भेटी दरम्यान तुला काही खटकलं का दादा? म्हणजे काहीही अगदी लहानशी गोष्ट असू शकेल बघ आठवून.."
राघव म्हणाला..
"तसं काही खास नाही पण मी तिला पूर्वी कुठेतरी पाहिलंय हे असं सतत मला वाटायचं.. आणि आणि तिचं वागणं खूप दडपण असताना असतं ना तसं असायचं बरेचदा!"
"लग्नात तर किती खुश दिसत होती... अज्जिबात काही वाटलं नाही " आई म्हणाली.
"लग्नानंतर तुमचे काही वाद??" कृष्णाने विचारताच.. दोघांनी नकारार्थी मान डोलावली.
"लग्नानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याकडे गोंधळ होता.. नंतर आम्ही त्यांच्या कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो.. तिच्या माहेरी सुद्धा पूजा होती आपण सगळेच गेलो होतो की... ह्या सगळ्यात ती आनंदाने सामील झाली.. जराही शंका आली नाही.... की दुसऱ्या दिवशी सकाळी सुलक्षणा घरात नसेल."
"तिला काही झालं तर नसेल की जीव दिला असेल की कुणी पळवून नेलं असेल... माझ्या तर डोक्याचा भुगा झालाय.." म्हणत राघव डोकं धरून बसला.
"त्यानंतर चार दिवसांनी तुम्ही दोघे उटीला जाणार होता .. बरोबर.. म्हणजे जे काही झालंय ते ह्या चार दिवसांत..."
अचानकपणे उभा राहत राघवचे दोन्ही खांदे हलवत कृष्णा म्हणाला...
"ह्या चार दिवसांत ... रात्री काय झालं दादा? मला माहिती आहे हे खूप खाजगी आहे पण हे विचारण्याशिवाय पर्याय नाही."
थोडं संकोचत राघव म्हणाला..
"तिने तिचे पिरियड्स असल्याचे सांगितले.. मग काय काहीच नाही! तशी ती खूपच लाजाळू होती.. लग्नाआधीच्या आमच्या भेटीतही ती अंतर राखूनच वागायची. मला वाटले उटीला गेल्यावर जरा मोकळी होईल."
लग्नानंतर पाचव्याच दिवशी सकाळी नववधू सासरहून गायब होते.. तिचा कुठेच ठावठिकाणा लागत नाही.. ती परत येत नाही, कोणताच संपर्क करत नाही.. फोन सुद्धा घरीच ठेऊन जाते... मोठे अजब होते सगळे... सगळीकडे शोध घेऊन, सगळ्या नातेवाईकांना कळवून झाले पण सुलक्षणा काही सापडली नाही. तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली... त्यात हुंड्याची मागणी, शारीरिक मानसिक छळ असे काय काय जोडले.. त्यांना त्यांची लेक परत हवी होती आणि ती नेमकी कुठे आहे हे राघवच्या घरच्यांना माहीत नव्हते. मोठाच गंभीर प्रश्न होता.
अचानक वडिलांना काहीतरी आठवले...
"सुलक्षणा गेली त्या दिवशी काय गाढ झोप लागली होती... काळझोपच म्हणायचे.. एरव्ही माझी झोप तशी सावध असते..."
कृष्णाच्या डोक्यात लख्खकन वीज चमकली..आदल्या दिवशी रात्री खीर करून सुलक्षणाने आग्रहाने सगळ्यांना खाऊ घातली होती..तिने स्वतः मात्र खीर आवडत नाही, सांगून खाणे टाळले. कृष्णा आणि राघवला खात्रीच पटली... काहीतरी गडबड नक्कीच आहे.... आठवडाभर जंग जंग पछाडत तिचा भूतकाळ त्यांनी उकरून काढला. राघवला एका सकाळी सुलक्षणाला आपल्याच ऑफिसच्या शेजारच्या एका ब्रँच मध्ये पाहिल्याचं खात्रीने आठवलं... मग तिथूनही शोध सुरू झाला.. त्यांच्या साऱ्या खटपटीला यश आलं... मात्र हाती लागलेलं सत्य भयंकर कल्पनातीत होतं.
सुलक्षणा गोव्याला मिसेस सॅली जोनाथन फ्लोरेन्स ह्या नावाने राहत होती. जोनाथन हा तिचा प्रियकर सहा वर्षांपासून त्यांचे अफेअर सुरू होते.. मात्र लग्नाचा विषय काढताच.. सुलक्षणाचे वडील तडकून उठले त्यांनी तिला जातीतच लग्न करण्याची अट घातली .. नाहीतर जीव देण्याची धमकीही दिली... त्याच वेळी मॅट्रीमनी साईटवर तिला राघवचे प्रोफाईल दिसले.. हा माणूस तिच्याच ऑफिसच्या शेजारी काम करायचा.. तिने महिनाभर त्याचे निरीक्षण केले... साधा सरळ आणि सहज वेड्यात काढता येईल असा राघव आपला बकरा आहे हे तिने निश्चित केलं. वडिलांना मुद्दाम ह्या स्थळाची लिंक पाठवली.. आणि पुढचा सगळा जमाव जुळून आणला... त्यांच्या लग्नाचा विषय काढण्यापूर्वीच तिने जोनाथनशी कोर्ट मॅरेज केलेले होते. हे सारे दडवून साळसूदपणे घरातल्या मंडळींना खिरीतून झोपेचे औषध देऊन तिने घरातून पोबारा केला. राघव सारखा नेभळट मुलगा आपला शोध घेऊच शकणार नाही असेच तिला वाटत होते... तिचा बाण वर्मी लागला.. लग्नानंतर पाचव्या दिवशी घरातून गायब झाल्याचे खापर वडिलांनी राघववर फोडले आणि त्याच्या मागे ते हात धुवून लागले... ह्या साऱ्यात आपल्या लेकीचा काही दोष असेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नाही.
राघव सगळ्याच बाजूंनी उध्वस्त झाला.. त्याचं झालेलं लग्न कायदेशीर नव्हतंच.. तरीही बीजवर झाल्याचा डाग लागला... शिवाय बायको पळून गेली, केस झाली , मानहानी, मनःस्ताप, पोलिसांकडून मारहाण, नोकरी मिळाली पण पत गेली... हे सारं सारं त्याला भोगाव लागलं. ह्यात त्याचा दोष काय होता?? नशीब म्हणायचं आणि सोडून द्यायचं. आयुष्यातील काही वाटा प्रथमदर्शनी फुलांच्या दिसत असल्या तरी ती फुले काट्यांची असू शकतात.
✒️ यशश्री रहाळकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!