फॉलोअर

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

"पुरुषस्पंदन" कथा३ :- आकर्षण

"सोळावं वरीस धोक्याचं ग!" ही प्रसिद्ध मराठी लावणी षोडश वर्षातल्या निसरड्या वाटांवर सहज भाष्य करते. नुकत्याच तारुण्यात प्रवेश केलेल्या नवतरुणीला हे वेडं वय मोहात पाडतं .. भलतीच चूक नकळत घडू शकते... म्हणूनच हे वर्ष धोक्याचं सूचक. हेच गाणं एखाद्याच्या लग्नाला सोळा वर्षे होऊन गेली आहेत तर लागू होऊ शकेल काय?? आता तुम्ही म्हणाल पुरुष जात्याचं अनेक स्त्रियांमध्ये रस घेणारा असतो... त्यात प्रौढ वयात एखादीचे आकर्षण वाटले तर नवल ते काय? मात्र ह्या कथेत हेच तर अचंबित करणारं वेगळेपण आहे... लग्नाच्या सोळा वर्षांनी स्वतःचा सुखी संसार लाथाडून निघून गेलेल्या एका मध्यमवयीन स्त्रीची ही कथा. वयस्कर माणसे बोलताना, "कलियुगाचा महिमा बाबा! काय दाखवेल सांगता यायचं नाही." असं सतत म्हणतात .. त्याचा अश्या प्रसंगी प्रत्यय आल्याविना राहत नाही.


रुपाली नाव 100% शोभून दिसेल इतकी देखणी. रंग केतकी मधाच्या रंगाचे डोळे, इवलीशी नाजूक चण आणि सोनेरी लांब केस... देवानी भरपूर वेळ घेऊन घडवले असावे असं आरस्पानी रूप. मात्र हे माप पदरात घेता घेता आर्थिक बाजूचे गणित नशीबाने हुकलेले. वडील जेमतेम कमवत त्यातही कंपनी बंद पडली आणि नोकरी गेली. चार घरी पोळ्या करून आईने तिला वाढवलं. ग्रॅज्युवेट होताच मिळेल ती नोकरी धरली... पाठ मान मोडून खर्डेघाशी करावी लागे.. सगळीकडे रूपाची जादू चालत नाही. ... पण कधीतरी नशीब भरभरून कृपा करतं. तिची आई पोळ्या करायला जायची त्यांचीच मैत्रीण रूपाच्या लग्नासाठी विचारपूस करू लागली. जहागिरदारांच्या गडगंज श्रीमंत एकुलत्या एक मुलासाठी त्यांनी रुपालीला मागणी घातली. पैश्याला मुळीच कमी नव्हती, मुलगा श्रीकांत जहागीरदार गोरापान देखणा होता.. आपला वडिलोपार्जितील केटरिंग, मंगल कार्यालय वगैरे व्यवसायांचा व्याप तो उत्तम सांभाळत होता. तीन मजली प्रशस्त घरात फार माणसेही नाहीत.. फक्त आई आणि तो. बहीणींची योग्य वयात सुस्थळी रवानगी झाली होती. नाही म्हणायला एक उणीव होती.. श्रीकांत जेमतेम मॅट्रिक पास होता ... त्याचे वडील गेल्यानंतर व्यवसायाचा व्याप सांभाळून शिक्षण पूर्ण करणे त्याला जमलेच नव्हते.. एव्हढ्या एकाच कारणामुळे ...अनेक उपवर मुलींनी नन्नाचा पाढा वाचला होता. शिवाय व्यवसायाचा व्याप असल्याने घरी राहून सगळे नीट सांभाळणारी मुलगी त्याला हवी होती. रुपालीच्या घरच्या मंडळींपुढे त्याने स्पष्ट शब्दांत आपले  मत मांडले. लग्नाचा खर्च तो स्वतः करणार होता शिवाय मुलीच्या आईवडिलांचा आधार देईन हेही त्याने खात्रीपूर्वक सांगितले.... रुपालीच्या मनात काय होते कोण जाणे? मात्र प्राप्त परिस्थिती पाहता तिने होकार दिला.


मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला.... रुपालीची "सौ. राजश्री श्रीकांत जहागीरदार"  झाली. आपण दिलेल्या शब्दाला जागून श्रीकांतने तिसऱ्या मजल्यावरील दोन खोल्यांचे घर रुपालीच्या आईवडिलांना सन्मानाने दिले... जशी आपली आई तसेच पत्नीचेही आईवडील आपलेच हे सूत्र श्रीकांतने मनापासून जपलं... त्यांच्या अडल्या नडल्या वेळी मदत केली, वडिलांना ओळखीने काम मिळवून दिले. रुपाली आता खऱ्या अर्थाने "राजश्री" झाली होती... भारीच्या साड्या, दागदागिने ह्यांची बरसात तिच्यावर होत होती. सासू नणंदा ह्यांची तर ती प्रचंड लाडकी होती.तिच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक होई अगदी रांगोळी काढण्यापासून ते स्वयंपाकपर्यंत. त्रयस्थाने पाहता क्षणी दृष्ट लागावी असा सुखाचा संसार सुरू होता. वर्षभरात पहिली लेक "ऐश्वर्या" जन्मली... सहा वर्षांनी तिच्या पाठीवर दुसरीही लेकचं.. "सौंदर्या" जन्मली. खरंतर श्रीकांत जरासा उदासच झाला होता... त्याला त्याची संपत्ती आणि व्यवसायाला मुलगा वारस हवा होता.. पण ह्यात लेकीचा काय दोष? त्याने मोठ्या थाटामाटात तिचं बारसं केलं... दोन्ही लेकी शहरातल्या टॉपच्या शाळेत शिक्षण घेत होत्या...  आई वडिलांच्या सौंदर्याचा वारसा घेऊन जन्मलेल्या दोघी लेकी काकणभर अधिकच देखण्या होत्या. मोठी ऐश्वर्या वयात आली असल्याने अधिकच सुरेख नक्षत्रासारखी दिसत होती. दोघी लेकींवर श्रीकांतचे खूप प्रेम होते... आपल्या ह्या देखण्या, हुशार लेकी पाहिल्या की त्याचं बापाचं हृदय गलबलून जाई...


"आपल्या बाबतीत झालं तसं लेकीच्या बाबतीत होता कामा नये, त्यांना हवे ते शिक्षण हवी तेव्हढी वर्षे घेऊ देत  .. त्यानंतरच मी त्यांचं एखाद्या राजकुमाराशी लग्न लावून देईन"


श्रीकांत स्वतःलाच पटवून द्यायचा... शेवटी लेक कितीही म्हटली तरी परक्याचं धन. घरी प्रत्येकाची वेगळी स्वतंत्र कार...लेकींनाही शाळेत क्लासला सोडायला स्वतंत्र कार आणि ड्रायव्हर. सुखात सुखात म्हणता म्हणता सोळा वर्षे संसार झाला... आणि काय झालं कोण जाणे?? एकंदर श्रीकांतचे ग्रहच फिरले.... म्हणायचे.


राजश्री विनाकारण तणतणत असायची, मुलींशी नीट बोलायची नाही,  सतत काहींना काही कुरबुरी काढून भांडत बसायची.. कधी श्रीकांतशी तर कधी त्याच्या बिचाऱ्या म्हाताऱ्या आईशी.... घरातलं वातावरण पार ढवळून निघालं होतं. एकतर श्रीकांतवरचा कामाचा वाढलेला व्याप त्याच्याकडून आवरता आवरता दिवस संपून जायचा त्यात राजश्रीची सतत फणफण असायची.अनेकदा त्याला वाटायचं आपण हिला वेळ देत नाही म्हणून असेल किंवा तिच्याही काही गरजा असतील , इच्छा असतील ज्यांकडे आपलं दुर्लक्ष झालं असेल. त्याने अनेकदा स्पष्टपणे राजश्रीशी बोलण्याचा प्रयत्न केला... तिला नेमकं काय झालंय हेही ती सांगेना. एकदिवस अश्याच क्षुल्लक विषयावर भांडण उकरून काढले आणि ते इतके वाढले की राजश्री बॅग भरून घराबाहेर पडली... जातांना .."डोकं शांत झाल्यावर परत येईन", असे सासूला सांगून गेली. तिच्या आईने ती पुण्याच्या मावशीकडे गेल्याच सांगितलं... चार सहा दिवसांनी काहीच जणू घडलंच नाही असा आव आणत राजश्री परत आली. पुन्हा रोजचा दिनक्रम सुरळीत सुरू झाला.हळूहळू ह्याच प्रकाराची वारंवार पुनरावृत्ती होऊ लागली. कधी दोन तीन महिन्यांनी तर पुढे पुढे दर महिन्याला राजश्री पुण्याला जाई.. चार आठ दिवसांत परत येई. तिची मावशी तिथे रहायची.. मावशीच्या दोन लेकीही पुण्यातच होत्या... त्यामुळे राजश्री तिथं रमत असावी असा समज सगळ्यांनी सोईस्करपणे करून घेतला.


"तिथून आल्यावर ती शांत खुश असते ना ! झालं तर मग..."


असे आईला सांगून श्रीकांत आपल्या व्यापात लागला.मात्र श्रीकांतच्या आईच्या नजरेतून राजश्री मधील सूक्ष्म बदल सुटले नाहीत. तिने आपल्या बारीक अनुभवी नजरेने राजश्रीवर लक्ष द्यायला सुरुवात केली. एखाद्या नवथर तरुणीप्रमाणे ती हल्ली तासन तास फोनवर गप्पा मारत असते... "कुणाचा फोन ?" विचारले तर "मैत्रिणीचा" ...असे मोघम उत्तर देते. काहीतरी नक्कीच आहे ... त्यांचा संशय बळावत गेला. आपला संशय त्यांनी वरच्या मजल्यावर राहणाऱ्या चुलत जावेजवळ बोलून दाखवला. ह्या जाउबाई आणि त्यांचे कुटुंब कोकणातून आश्रयाला आलेले... दोन्ही मुले कष्टीक होती त्यांना श्रीकांतच्या वडिलांनी बरीच मदत केली होती. त्या दोघांची लग्ने सुद्धा त्यांनीच लावून दिली होती ... दोघांना चांगली कर्ती मुले होती .. मोठ्याचा मुलगा हैद्राबादला बँकेत लागला ,दुसरा बारावीला होता... तर धाकट्याचा मुलगा इंजिनिअर होऊन पुण्यात कंपनीत कामाला होता.. श्रीकांतच्या आईचे विचार जाऊबाईंना मुळीच पटले नाही .. त्यांच्या दृष्टीने राजश्री अगदी सोज्वळ स्त्री आणि आदर्श सून होती...


"माझ्या दोन्ही नातवंडांच्या लग्नाचं पाहतेय.. अगदी तुमच्या राजश्री सारख्याच नातसुना मिळायला हव्या हो!"


जाऊबाईंनी मांडलेल्या विचाराने श्रीकांतच्या आईचे मन थोडे स्थिर झाले. नेमका पुढच्याच महिन्यात एका नात्यातल्या लग्न समारंभात पुण्याला जाण्याचा योग आला... ह्या वेळी त्या मिठाई, भेटवस्तू वगैरे घेऊन आवर्जून राजश्रीच्या मावशीकडे भेटीला गेल्या. सहज बोलता बोलता विषय काढला असता,


"राजश्रीची गेल्या कित्येक वर्षांत भेटच नाही .."


असे मावशी बोलून गेल्या. श्रीकांतच्या आईचा अंदाज खरा ठरला.. घरी आल्यावर सगळा प्रकार त्यांनी श्रीकांतच्या कानावर घातला... राजश्रीला जाब विचारणार तर चोराच्या उलट्या बोंबा.. आक्रस्ताळेपणाने तिने भांडण सुरू केले..


"जाते मी माझ्या मैत्रिणीकडे .. काय चुकलं त्यात.. तुमच्याकडे तर माझ्यासाठी वेळच नसतो मी माझी एन्जॉय करतेय त्याचाही तुमच्या आईला त्रास होतोय.. माझं सुख डोळ्यात खुपतयं..."


शब्दाने शब्द वाढत गेला आणि मोठा तमाशा झाला दोन्ही लेकी भेदरलेल्या कोकरागत बघत होत्या. पुढे दोन महिने राजश्रीला पुण्याला जाण्याचे धारिष्ट्य झाले नाही... दिवाळी आली... सगळे घर पाहुणे नातेवाईक ह्यांनी भरून गेले... सुट्टीच्या निमित्ताने वरच्या चुलत घरचे दोघे नातूही आले होते... आता त्यांच्यासाठी मुली बघायला सुरुवात करायची होती. सगळ्या चुलत पुतण्यांचे, नणंदेच्या मुलांचे राजश्रीशी भलतेच मेतकूट होते. सुट्टीत त्यांच्यासोबत पत्ते खेळणे, कॅरम खेळणे ह्यात ती रमून जाई... वरचा चुलत पुतण्या स्वप्नीलशी तिचे अधिकच गहिरे नाते होते... तसा त्यात आक्षेप वाटावा असेही काही नव्हते. स्वप्नील तिच्याहून दहा वर्षे लहान होता ... शिवाय काकू पुतण्याचं नातं म्हणजे आईमुलागतच तर असतं.दिवाळी आनंदात पार पडली... एक दिवस स्वप्नील आपली काकू राजश्रीला केक बनवायला शिकवत होता... त्याला निरनिराळ्या रेसिपीज उत्तम येत असत... ह्या वेळी श्रीकांतच्या आईला त्या दोघांची जवळीक आणि लगट आक्षेपार्ह वाटली... आता तिने अधिकच तीव्रतेने डोळ्यांत तेल घालून राजश्रीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली..आणि एक दिवस होत्याचं नव्हतं झालं.


तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या राजश्रीच्या आईच्या घराची डुप्लिकेट किल्ली तिच्याकडेच असायची... दोघेही कामाला बाहेर पडल्यावर... राजश्री तिथे गेली आणि थोड्या वेळाने स्वप्नीलही गेला ... श्रीकांतच्या आईने दाराला गुपचूप बाहेरून कडी घालत ... सगळं घर गोळा केलं... कडी उघडून दोघांना राजरोस रंगेहात पकडलं. दोन वर्षांपूर्वी पुण्याला एका नात्यातल्या लग्नाच्या निमित्ताने स्वप्नीलच्या फ्लॅटवर उतरलेल्या राजश्री आणि स्वप्नीलच्या नात्याने सगळ्या सीमा पार केल्या होत्या... राजश्री सतत पुण्याला जाऊन स्वप्नीललाच भेटत होती. राजश्री आणि श्रीकांतच्या लग्नाच्या वेळी 14/15 वर्षांचा असणारा स्वप्नील  ...राजश्रीला पाहता क्षणीच वेडा झाला होता... कसेही करून हिला मिळवायचीच हा ध्यास त्याने घेतला होता... सतत तिच्या रूपाची स्तुती करत तिच्याभवती पिंगा घालत त्याने आपला हेतू उघडपणे व्यक्त केला होता.. मात्र ह्या साऱ्यात नवल हेच की राजश्रीचा पाय का घसरावा? ह्या वेळी तिला आपल्या वयात आलेल्या मुलीचा, संसाराचा, तिच्या आणि स्वप्नीलच्या नात्याचा विसर पडला होता.


इतके सगळे महाभारत घडूनही श्रीकांतने आपल्या मुलींच्या भविष्याचा विचार करता राजश्री समोर ... झालं गेलं विसरून नव्याने सुरुवात करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र म्हणतात ना .. "कामातूराणां भयं न लज्जा।" गळ्यातील मंगळसूत्र श्रीकांतवर भिरकावत , भरल्या घरातून , सुखाचे माप लाथाडून राजश्री स्वप्नीलचा हात धरून चालती झाली.. पुढे अनेक वर्षे डिव्होर्स केस आणि कोर्टाच्या हेलपाट्यांत गेली... मुलींना विचारले असता त्यांनी वडिलांकडे राहण्याचे ठरवले... आयुष्यभरासाठी त्या दोन अश्राप लेकींवर ,"पळून गेलेल्या आईच्या मुली" हा  कधीही पुसता न येणारा ठप्पा बसला. आपल्या कष्टाने व्यवसायात भरभराट करणारा श्रीकांत जगाला तोंड दाखवायच्या लायकीचा उरला नाही... आपल्या लेकींसाठी राजकुमाराची स्वप्ने पाहणारा बाप आता किमान सभ्य ठिकाणी आपल्या मुलींना पदरात घेतील का ? ह्या  विवंचनेत असतो.


काय दोष होता त्याचा?? तो जाईल तिथं कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे लोकांच्या टिंगल टवाळीचा विषय झाला...


"अरे हाच तो! ह्याचीच बायको पुतण्याचा हात धरून पळून गेली."


✒️ यशश्री रहाळकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!