फॉलोअर

गुरुवार, २८ मार्च, २०१९

रंगीत चिमण्या

रंगीत चिमण्या

पिल्लाला शाळेत सोडायला जावे
तर अवचित पाय रेंगाळतात...
लाल निळ्या पिवळ्या सोनेरी
कितीतरी चिमण्या दिसतात.

मण्या -मण्या सारखे भिरभिर
डोळे टपोरे चमकदार...
उडतात घरट्याच्या दूर स्वतंत्र
जणू कित्ती जबाबदार.

निरागस कुतूहल नवीन जगाचं
नकळत लुकलुकतं डोळ्यात...
आईच्या पंखांपेक्षा वेगळं वारं
जणू घेतात भरून श्वासात.

उडणाऱ्या पिल्लाची पहिली भरारी...
पक्षिणीची खरी परीक्षा असते.
आजवर पंखाखाली राखलेल्या
तिच्या सर्वस्वाची परिभाषा असते.

अश्या या रंगीत चिमण्या
दर वर्षी भेटतात
मोठ्ठे पायघोळ झगे
ऐटीत सावरत जातात

कुणाची नवी बॉटल,
कुणाची नवी पिन ,
कुणाच्या दोन वेण्या ,
कुणाची रीबिन...

गोड निरागस चिमण्यांना
उडण्याची घाई
रंगीबेरंगी जग सारे त्यांच्या
डोळ्यांत उमटून जाई.

झोकात बाय करून
त्या बागडत जातात....
दिसेनाश्या होईपर्यंत आयाच
हात हलवीत बसतात.

रंगीत चिमण्या हुशार झाल्यात
आता शाळेत जातांना रडत नाहीत...
क्षणभर वळून सुद्धा न पाहती
सदैव असतात घाईत.

गेटपाशी एखादी आई
डोळे पुसत असते
एका निरोपाची क्षणी
जणू खूप काही शिकते...

रंगीत चिमण्यांच्या निरोपाचे
क्षण टिपते मी नेमाने...
जोडून जोडून मनाची
तयारी करतेय प्रेमाने.

कधीतरी कायमची पाठवणी
करावी लागेल माझ्या चिमणीची..
तेव्हा भूमिका जमवावी लागेल
पिल्ले उडालेल्या पक्षिणीची..
🔏©यशश्री रहाळकर
          नाशिक
      28/03/19

मंगळवार, २६ मार्च, २०१९

झुबेदा

झुबेदा
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
                        माझ्या लहानपणी मी प्रचंड श्रीमंत होते..👶.माझ्या अवतीभवती भरपूर माणसे होती, त्या सगळ्यांचे माझ्यावर अतिशय प्रेम होतं आणि त्यांना भरपूर वेळ होता... माझं कौतुक करायला; माझ्या बाळलीलात रमायला😃 सख्खी चुलत मिळून चार घरे त्यात माझे बाबा मोठे ,मी घरातलं माझ्या पिढीतील पाहिलं बाळ.घरात पणजी पासून सगळे ... चुलत हा शब्द उगाच मध्ये लुडबुड करू नये इतका जीव लावणाऱ्या आजी नी आत्या ... सायकलवर फिरवायला एक काका , गोष्टी सांगून जेवू घालायला दुसरा काका ... जरा मोठी झाल्यावर मांजाची फिरकी पकडायला पतंग उडविणाऱ्या तिसऱ्या काकाच्या पाठी मी असायचे...रात्री उतरत्या टिणांवर झोपणे, वाळवण पळवणे, पोपट पकडणे, पतंग उडवणे आणि हुंदडणे .... आनंद ह्या शब्दाशी समानार्थी सारे.
               एक आत्या शिवणकाम शिकत होती .तिची मी पाहीली मॉडेल ..😄 नवीन style चे कपडे शिवून, तयार करून ती मला गावभर फिरवून आणायची. सगळ्यात धाकटी आत्या मला शनिवारी शाळा सुटली की तिच्या घरी मुक्कामी म्हणजे माझ्या काकू आजीकडे नेत असे ... रात्री सुरभी, झी हॉरर शो आम्ही जोडीनी पाहायचो... आठ आणे माझ्या बोरकूट आणि राजमलाईला मिळायचे ... माझा पॉकेट मनी 😆....ही आत्या सिनेमावेडी ... "मैने प्यार किया" तिने एकूण 26 वेळा टॉकीज ला पाहिला त्यात बरेचदा मी असायची मला तिकीट नसे मी फुकट सोबत 😍 ह्या माझ्या शनिवार रविवारच्या मुक्कामात मला ती भेटायची झुबेदा उर्फ झुबी
                झुबेदा ला सगळे झुबीच म्हणत... झुबी माझ्या काकू आजीकडची घरकामाची बाई...बाई या शब्दाच्या आसपास सुद्धा न जाणारं तिचं रपारपा चालणं मला आजही आठवतं. वय आजीहून जरा कमी जास्त ... पण रापलेली असल्यानं अधिक वाटे. काळपट पडलेले चांदीचे दागिने कानात गळ्यात असतं. हातात तसूभरही मागे पुढे करता येणार नाहीत एव्हढ्या काचेच्या बांगड्या... सगळ्यात जुन्या मागे तर नवीन पुढे याप्रमाणे त्या रंगीत असत. घेरदार परकरावर साडी निव्वळ गुंडाळलेली असे...पोपटी वर मोठी निळी भडक फुले ...कसे कुणास ठाऊक ?..लक्षात राहून गेले. पान खाऊन रंगलेलं तोंड... मात्र काम करतांना पान खायचं नाही अशी आजीची सक्त ताकीद असल्यानं ती खात खात येत असावी.
                     झुबी एक रत्नच होती😝 एव्हढी वर्षे आजीकडेच नव्हे तर साऱ्या गल्लीत ती कामांस कशी काय टिकली?? हा एक अजब प्रश्न मला सदैव पडे. ती सगळ्यांच्या चार पिढ्या जाणून होती....आपापल्या सोयीप्रमाणे कुणाला वहिनी /मावशी /काकू म्हणत असे. झुबी आली की घरासमोरील ओट्यावर फतकल मारून बसे मग लोटी भर पाणी घटाघटा पिऊन संपवे नी टोकाच्या हाय पीच मध्ये" मुडदा बशिवला त्याचा"  म्हणत सुरू होई ... एव्हाना चार बायका ओट्यावर जमत ... आता कुणाची पोरगी कुणा चा हात धरून पळून गेली , कुणी बायकोला मारले, कुणाला पाहायला पाहुणे आले होते, कोणाची सून कंटाळून माहेरी निघून गेली ह्याचे अत्यंत सखोल बारकाव्या सह निवेदन सुरू होई. इलेक्शन चे दिवस तर झुबीचा विशेष वर्ग भरे...कोण निवडून येणार कोण पडणार याचे दावे ती करायची. अमुक कार्पोरेटरचा तिने मुडदा बसवला असे कारण त्याने मतांसाठी दारूच्या बाटल्या सोडल्या असत... ... माणूस पिणार मग बायांना बडवणार...त्यापेक्षा पैसे द्यावे तेही बायांना म्हणजे चार दिवस पोरांना चांगलं चुंगल खाऊ घालता येईल असे तिचे मत ...🤗 .ते आटोपले की तिला कामं पडली आहेत ह्याची आठवण येई... मग तोंडाचा पट्टा आवरून ती हातांचा सुरू करे... माझे नाव तिला या जन्मात तरी येणारे नव्हते😄 ती मला बाली म्हणायची मी दिसली की दोन्ही हाताची बोटे मोडून दृष्ट काढायची
                     झुबी हाताळ होती ...आजी म्हणायची "ती चोरटी नव्हती " 😂 हा मला एक मोठ्ठा विनोद वाटायचा.ती हाताला लागेल ते पळवायची... डबे , डब्यांची झाकणे, चमचे,वाट्या, भांडे घासायची राखुंडी काहीही चालत असे. ती साबणाच्या चिपा सुद्धा पळवे ... एव्हढेच काय कपड्यांचा साबण ती परकर नी साडीच्या मध्ये भरपूर घासून घेई .🙆 एकदा तर तिने धान्याच्या कणगीत लपवलेला लाडूचा डबाच पळवला... आजीने तिच्या पाठी जाऊन तिच्याच घरी मिळवला सुद्धा....तर अश्या या तिच्या वैशिष्ठ्य पूर्ण गुणधर्मामुळे आमची ड्युटी तिच्यावर लावण्यात येई. ती काम करत असली की मोरीच्या दारात पाट मांडून आमची स्वारी विराजमान असे...☺मला गणपती बाप्पा झाल्याचा फील येई.तासभर तिच्या कामाच्या वेळेत ; अखिल ब्रह्मांडाचे ज्ञान तिच्याकडून मला आपसूक प्राप्त होत असे.
               "दुनिया मोठी वंगाळ " अशी पंचलाईन घेऊन हे बोधामृत सुरू होई...कधीकधी आजी तिला टोके "झुबे केव्हढी पोर आहे ती काय सांगत बसली आहेस काही कळतंय का तिला?"त्यावर झुबीचे उत्तर ठरलेलं " दुनिया मोठी वंगाळ हाये बाली  ...जेव्हढ्या लौकर कळन तेव्हढं बरं " तिने कोणती दुनिया पाहिली होती कोण जाणे?😢 एकदा झुबी नवऱ्याला पार बडवून रागातच भांडे घासीत होती... मला म्हणाली " बाले चार दिवस नवरा मारेल तर मार खायाचा पाचव्या दिवसी पूजा करायची त्याची .. " हातातले धुपाटने तिनी दात ओठ खात उगारले.. सहा सात वर्षांची असेन मी .. तेव्हाच ठरवलं होतं आपलं लग्न झालं की असच करायचं ..चार दिवस मारलं तर मारू देणार मी आणि पाचव्या दिवशी ....🙅 अर्थात तो दिवस पुढे आयुष्यात आला नाही. पण त्यावेळी नवऱ्याला मारणारी बाई म्हणून झुबी मला जाम सॉलिड वाटायची.
                   झुबीचे अत्यंत वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ती काहीही विकून देत असे... बंद पडलेला रेडिओ , बिघडलेला टेप रेकॉर्डर, दांडी तुटलेले चमचे, चिरलेले डबे, मोडलेली बाज काहीही चांगला भाव देऊन विकून देत असे.. आता हे ती कुणाला विके कुणास ठाऊक. एकदा तर घड्याळाला बॉल लागून त्याचे काटे निखळले... तेही घड्याळ तिने विकून दिले. माझ्या बालसुलभ मनाला प्रश्न पडला " काटे नसलेले घड्याळ काय कामाचे?" झुबी म्हणाली... आपल्याला नको असलेली वस्तू कुणाला तरी उपयोगी असते फेकू नये विकून टाकावी....झुबी मोठ्या अभिमानाने सांगायची,"मी काहीही विकून देईन मुडदा द्या तोही विकून देईन." अर्थात मुडदे कुठून कसे आणायचे? हा प्रश्न मला पडला??? मी धावत काकू आजी कडे गेले आणि एका श्वासात सांगून टाकलं ," आजी तुझ्याकडे काही तोडके मोडके मुडदे आहेत का ? झुबी विकणार आहे?" सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली .😆😆
            एकदा झुबी आली नी भूक लागल्याचे म्हणाली दोन दिवस तिने खाल्लं नव्हतं . आजीनी लगेच काय असेल ते पोळी भाकरी लोणचं तिला दिलं... आजी तशी मायाळू घासातला घास देणारी होती... मी झुबीला विचारलं " उपाशी कशी राहतेस ग तू?" झुबी हसत हसत म्हणाली," आई होशील तेव्हा समदं कळल ." ... पुढं आई झाल्यावर कधी उपाशी राहण्याची वेळ माझ्या सुदैवानं आली नाही पण वाक्याचा अर्थ मात्र तेव्हा खरा कळला. आता झुबी आहे की नाही ??माहीत नाही ... त्या काळात बायकांना तिची भूक समजत होती, तिचा चोरीचा हेतू नाही हेही समजत होतं. दुसरी बाई मिळणार नव्हती असं नव्हतं पण तिची पोरं बाळ ती पोसतेय ह्याची जाणीव ठेवण्या इतकं मोठं मन काकू आजीजवळ आणि चार बायकांकडे होतं. झुबेदा माझ्या आयुष्यातला सहृदयतेचा धडा आहे... एका स्त्री नं जात ,धर्म, आर्थिक परिस्थिती यांपालिकडे जात दुसऱ्या स्त्री ला समजून घेण्याची सहृदयता.... कदाचित झुबी म्हणायची ते खरं असावं , आई झालं की सारं जमत असावं ... शरीराबरोबर मनानीही  आई होता यायला हवं , नाही का !👍
©🔏 यशश्री रहाळकर
           नाशिक
         25/03/19

गुरुवार, १४ मार्च, २०१९

अनुत्तरीत

अनुत्तरीत???
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
                 काही प्रश्न अचानकपणे आयुष्यात धूमकेतू सारखे प्रकट होतात . तुमच्या आयुष्यात उलथापालथ करतात पण असे का झाले ?? हा प्रश्न तुम्ही काळाला न विचारलेलाच उत्तम असतो. काळाकडून उत्तर मिळतेच असेही नाही आणि मग सुरू होतो अनुत्तरीत प्रश्नांचा अखंड छळवाद..... पूर्वीच्या काळी एक बरं होतं काही नको ते घडलं की माणूस नशीबाला दोष देत बसे नी मोकळा होई . आता मात्र माणूस कार्यकारण भाव जाणून प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊ लागला. खरं सांगायचं तर काही प्रश्न सोडवायचेच नसतात.. ते तसेच अनुत्तरीत ठेवायचे असतात.
               ही कथा आहे माझ्या मुलाची ... माझा एकुलता एक लेक अविनाशची ; त्याहीपेक्षा ही कथा आहे आभाची . अगदी नेमक्या शब्दात मांडायचे तर ही कथा आहे त्या दोघांमधील अनुत्तरीत प्रश्नाची ... कधीही उत्तर न मिळणारा इवला प्रश्न... का???
              माझा लेक अविनाश वय वर्षे 47 नॅशनलाईज बँकेत उच्चपदस्थ अधिकारी ... कोणतंही व्यसन नाही अगदी कामाचं देखील नाही. आपले नियमित काम झाले की पावले घरी वळणारा कुटुंबवत्सल, सरळमार्गी , सरधोपट माणूस. वयाच्या 25 शीत M.Com.आणि ICWA झाला बँकांच्या परीक्षा देत वर्षभरात बँकेत लागला सुद्धा. त्याला साधे सरळ शांत आयुष्य हवे होते . वर्षभरात त्याच्यासाठी आभाला पसंत केलं खरंतर arrange marriage पण प्रेमविवाह वाटावा असा दृष्ट लागण्यासारखा जोडा. आभाला मनापासून संसार करायचा होता नोकरी व्यवसाय वगैरे नाही... अविनाश खुष झाला असावा यावर. मी आयुष्यभर पोस्टात नोकरी केलेली त्यामुळे आता गरज नसतांना सुनेने ती ओढाताण करावी असे मलाही वाटत नव्हते.अविनाशचे बाबा कोर्टातून रिटायर्ड झालेले .तसे छोटासा बंगला गाडी दागदागिने सारे जोडून ठेवले होते ते अविनाशसाठीच...
                 21 वर्षांच्या त्यांच्या संसारात आभाने तक्रारीला जागाच दिली नाही कधी.. गौराई वाटावी असे रूप सात्विक सौंदर्य...स्वभावानं लाघवी, हुन्नरी सतत नवनवीन कला कौशल्य शिकण्याची अतिशय आवड होती तिला. आभाचे माहेर गावातलच.. आईवडील दोघे शिक्षक होते त्यामुळे शिस्तीत वाढली . एक मोठा भाऊ वहिनी सारे प्रेमानी राहणारे सगळं कसं आखीव रेखीव सुरेख जीवन . त्यांच्या लग्नानंतर वर्षभरात अंबरीश चा माझ्या नातवाचा जन्म मग त्याला वाढवण सारा सोन्याचा काळ .. अंबरीश मुळात हुशार आणि मेहनती अगदी अविनाश सारखा .. गेल्याच वर्षी बारावी झाला 96 % नी  IIT पवई ला रुळला सुद्धा वर्षभरात .. सुट्टीला तेव्हढा येई .आता उणीव काढू म्हणून ठरवलं तरी सुईच्या टोकावर मावणार एव्हढेही काही त्रासाचे वावगे नाही .
                  ह्या साऱ्या आखीव चौकटीवर एक वादळ येऊन धडकले .. साधारण 15 दिवसांपूर्वी दुपारी जरा पडते म्हणून त्यांच्या खोलीत आभा जी झोपायला म्हणून गेली ती अविनाश सायंकाळी आला तरी उठली नाही ... ती उठत का नाही ? म्हणून पाहिले तर गेली होती कायमची ... पोस्ट मार्टेम मध्ये तिने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले....... 43 व्या वर्षी सुखाचा संसार सारे मानाजोगे घडत असताना आभाने आत्महत्या का करावी ?? साऱ्यांनाच कोडे पडले होते.आडून आडून सारे तेच विचारीत पण ज्या प्रश्नाचे उत्तर मलाही ठाऊक नाही ते मी कसे देणार??
                   सारे हळूहळू ओढून आयुष्य मूळ पदावर आणत होते ... मात्र अविनाशचे आयुष्य जणू त्याच क्षणात कोंडले गेले होते...तो पुढेही जाऊ शकत नव्हता आणि मागेही फिरू शकत नव्हता.ह्या का ? चे उत्तर त्याला हवेच होते झपाटून टाकले होते जणूकाही  त्याला ह्या का ?ने.  आभा अचानक अर्ध्या वाटेवर सोडून गेली होती हे दुःख तर आयुष्यभराचे होते पण त्याहीपेक्षा ती कोणतीही चिठ्ठी न लिहिता कुणा जवळही  काहीही व्यक्त न होता गेली हे शल्य आतून पोखरून टाकणारं होतं.13 दिवस कसेबसे येणाऱ्या जाणाऱ्या च्या भेटीत आणि विधीत त्याने घालविले .. लगेच रात्री त्याने घरातील प्रत्येक चिठ्ठी चपाटी अगदी कागद न कागद तपासायला घेतला .
            आभाने कुठेच काहीच लिहिलेले नव्हते .. मग तिचे मेल शोधणं त्याचस password .. crack करवून घेणं सारं पार पडलं त्यावरही कुठेही काहीही दुखरे बोचणारे आढळले नाही.दोन दिवसांपूर्वी महिनाभराचे वाणसामान आणि अगदी आदल्याच दिवशी आठवडा भराची भाजी भरून ठेवली होती तिने... गेल्या महिन्यात वाढदिवसाला नवीन हिऱ्याच्या बांगड्या केल्या होत्या... मी खोदून खोदून अविनाशलाच विचारले तर काहीही भांडणे वाद काहीच घडले नव्हते त्यांच्यात. अविनाश वेडापिसा झाला .. आभाच्या प्रत्येक मैत्रिणीला तो भेटला .. प्रत्येकीला एकच प्रश्न आभा काही बोलली का ? पण आभा अगदी नॉर्मल होती असे प्रत्येकीने सांगितले ती असे काही करेल ह्याची कुणालाच कल्पना नव्हती. आभाच्या आईवडीलांचीही उलट तपासणी त्यानं घेतली... त्या बिचार्यांनी आधीच लेक गमवली होतीच पण का? केलं तिनं ह्याच उत्तर त्यांच्याकडेही नव्हतं.आनंदात सुखात असणारी आपली लेक आत्महत्या का करेल?? हा प्रश्न त्यांनाही पडला होताच. अविनाश अगदी दूधवाला भाजीवाला पेपर टाकणारा पोऱ्या प्रत्येकाला भेटला...तिच्या आयुष्यातील क्षणभराचा हिस्सा असणाऱ्या सुद्धा प्रत्येकाला ... प्रश्न एकच ती काही सूचक बोलली होती का?
                  चार दिवसांत माझा लेक 10 वर्षांनी म्हातारा झाला होता...एकदा तर मनाचा संपूर्ण तोल ढळून तो मलाच अद्वातद्वा बोलू लागला... "तुला कसे माहीत नाही? तूच दिवसभर होतीस ना घरी सांग सांग मला का केलं तिने?" लहान पोरासारखा कुशीत शिरून रडू लागला.  क्षणभरात शांत होत गंभीरपणे म्हणाला " आई मला ह्या का? च उत्तर हवंच आहे... नाहीतर मी जगूच शकणार नाही" आणि ताडकन निघून गेला.
                   सकाळी उठून पाहते तर बराच कागदांचा पसारा मांडून अविनाश बसलेला...कसल्या तरी आकृत्या नी कसले तरी अगम्य लेखन ... अंबरीश त्याच्याजवळ बसत म्हणाला " बाबा हे थांबावं आता... ऑफिस ला जायचे का? मी सोडू तुला" ... भावरहित मेलेल्या नजरेने अविनाश म्हणाला ," मी जाणार नाही..  सुट्टी घेतलीये... जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत " अविश्वासानं मी आणि अंबरीश पहात होतो .. याच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे हे जाणवत होतच... अंबरीश चा हात धरून अविनाश त्याला म्हणाला " आभा तुझ्याशी बोलली होती का रे काही.. म्हणजे काही अडचण आहे त्रास आहे दुःख आहे असे काहीतरी सांगितले असेलच ना ! रोज फोन करायची ना तुला ... सांग रे सांग ." अंबरीश कडे कुठून उत्तर असणार .. तो नाही नाही ह्या अर्थाने मान डोलवत रडू लागला .
                पुढच्या दोन दिवसांत अविनाशला जणू झपाटून टाकलं होतं आभानी ... साऱ्या शक्यतांच्या चौकटी मांडून आभाच्या आत्महत्येचे कारण कुठेतरी बसतंय का ? एव्हढाच एक विचार तो करू लागला. दिवसेंदिवस त्याची तब्येत आणि मानसिक स्वास्थ झपाट्याने खालावू लागलं.
                 तिला आर्थिक प्रश्न नव्हते.. खर्चाला कोणतीही बंधने नव्हती तशी ती खर्चिक नव्हतीच म्हणा! स्वातंत्र्य म्हणाल तर तेही मनसोक्त अनुभवलं होतं तिनं ..किटी, भिशी वेगवेगळे ग्रुप्स होतेच ना! जबाबदारी देखील नव्हत्याच म्हणावे लागेल लेक मोठा झाला होता आता त्याचीही काळजी नव्हती.चाळीशी नंतर दर वर्षी एकदा संपूर्ण चेक अप करून घ्यायचा हा आमचा अलिखित नियम ... मागच्याच आठवड्यात त्याचेच रिपोर्ट घ्यायला आम्ही दोघीही गेलो होतो डॉक्टर म्हणालेही ... सासू सुना एकदम फिट आहात...तिला तब्येतीची गाऱ्हाणी नव्हती.वयाची 44 वर्षे झालेली हे वय आता कुठल्या भुलव्याला भुळणारं नसत... आभा सात्विक होती वृत्तीनही... नको नको!! असला घाणेरडा विचारही तिच्याविषयी करणे शक्य नाही.हसतमुख मोकळी होती स्वभावाने .. मोकळं बोलायची आमच्या मस्त मैत्रिणी सारख्या गप्पा रंगायच्या ... पण कधी काही बोलली का ती?? खरंच मला काहीच आठवत नव्हते.
                  सकाळी सोबतच जेवलो आम्ही .. कुणाला खरं वाटेल .. तासभर गप्पा मारून जरा पडते म्हणून वर गेलेली व्यक्ती मूठभर झोपेच्या गोळ्या खाऊन झोपेल.. झोपेल ती कायमचीच....छे! मी काही विसरतेय का? महत्वाचं खूप महत्त्वाचं.....असा विचार करत बसले तर अविनाशला कसे सावरणार? मलाच वेड लागायचे.....माझ्याही नकळत मी तेच करत होते जे अविनाश करत होता.पुन्हा पुन्हा मी सुटलेले प्रसंग आठवू लागली तुटलेले दुवे जोडू लागली.पण व्यर्थ काहीच सापडले नाही.
                     ह्या साऱ्यात अविनाशचे बाबा स्थिर अविचल होते.... काहीतरी ह्यांना नक्कीच माहीत आहे आणि ते लपवता हेत असे राहून राहून मला वाटू लागले. त्यांनी ज्या गांभीर्याने सारं पार पाडलं होतं ते खरंतर खूप धैर्याची परीक्षा पाहणारं होतं वयाच्या सत्तरीत .. सून गेलीये,मुलगा कोसळून पडलाय, नातू बावरून गेलाय तरीही ते कोसळले नाहीत साऱ्या घराला त्यांनी एकहाती सावरलं ... काही तरी माहिती असेलच ह्यांना? तसे ते अलिप्त नी मितभाषी .. आभाशी गरजेपुरते बोलायचे कधीतरी पण पोटच्या लेकीसारखं प्रेम होतं तिच्यावर... क्वचित कधी माझे नी आभाचे वाद झालेच तर हे तिच्याच बाजूने बोलत. चौकोनाचे चारही कोन पडताळून पाहत होते मी कुठे फट राहिली... जिथून आभाला निसटावेसे वाटले?
                 अविनाश पाठोपाठ मी देखील रुतत चालले होते त्या का ? मध्ये ....खरंतर येणारा प्रत्येकजण जाणार असतोच कुणीतरी क्रम चुकवून आधी जाते... हे जाणे चटका लावणारे असतेच पण जेव्हा त्या व्यक्तीला आपल्या भवती विणलेल्या सुंदर आयुष्याचा मोह होत नाही ... अत्यंत शांतपणे आत्महत्येस प्रवृत्त होते तेव्हा काय कोसळत असेल कुटुंबावर?? त्याचे कारण मिळाले तर माणूस कोसू शकतो स्वतः ला नाही का ?? पण कारणच नसेल तर... कुणाला कोसायचं??
                  डॉ सुधान्शु घोष 12 नं वॉर्ड मधल्या पेशंटची डायरी वाचत होते...... तेव्हढ्यात ड्युटी वरचा वॉर्ड बॉय चहा घेऊन आला. "सर आज कुणाला मारलं पेशंट नी " डॉ सुधान्शु गंभीरपणे म्हणाले, " स्वतःला ....??" गेली 4 वर्षे आभा अविनाश देशपांडे वॉर्ड नं 12 ची पेशंट ... कधीतरी क्वचित आक्रमक होणारी वरकरणी नॉर्मल वाटायची. बहुतेकवेळा काहीतरी लिहीत असायची ... सगळ्या कथांत आभा असायची आणि सगळ्याच कथांत तिने आत्महत्या च केलेली असे. वॉर्ड बॉय ने न राहाऊन डॉक्टरांना विचारले.." सगळं सुख मिळतं ह्यांना कमी नाही काहीच..  तरीही जीवन नकोसं का व्हावं ?का केली असेल आत्महत्या ह्या बाईच्या नवऱ्यानं ..? " डॉक्टर शांतपणे म्हणाले,"काही प्रश्न सोडवायचे नसतात बाब रे! तसेच अनुत्तरीत ठेवायचे असतात."
🔏©यशश्री रहाळकर
           नाशिक
         14/03/19

शुक्रवार, ८ मार्च, २०१९

त्याचा महिला दिन

त्याचा महिला दिन

घरात तो बिचारा एकटाच पुरुष
त्यात आज महिला दिन...
आई पत्नी लेक साऱ्यांचे कौतुक..
तो एकटा साऱ्यांपुढे लीन.

बायकोच्या डब्याला सुट्टी दिली
लेकीला पिझ्झा केला ऑर्डर...
आईसाठी फक्कड कॉफी केली
जरा घरात केली आवरासावर.

आज दिवसभर सगळ्यांना आराम....
उत्साहाने त्याने केले घोषित
महिला दिन साजरा करायचे ..
जोशात त्याने केलं निश्चित .

भेटी आणल्या केक कापला..
जमेल ते ते केले..
बायकोचा फुलला चेहरा..
अन आईचे डोळे भरून आले.

बायकांना नेमकं हवय काय?
त्याला नेमकं आता कळलंय...
तिच्या असण्याची इवली दखल
सुखावतेय हे त्याला उमजलय...

आई, पत्नी ,लेक साऱ्याच नात्यांना ...
आनंद वाटायचं त्यानं जुळवलंय.
एक दिवस 'तिला' ही हक्काचं
कौतुक द्यायचं त्याने ठरवलंय.

वर्षभर आदरानं वागवा हेच खरं..
असू नये कौतुक एक दिवसाच ....
व्यक्त व्हा दखल घ्या तिची मनापासून....
साधा निमित्त महिला दिनाचं.
🔏यशश्री रहाळकर
           नाशिक
      8 मार्च 2019

गुरुवार, ७ मार्च, २०१९

तू समई आहेस ....

उद्याच्या महिला दिनाच्या औचित्याने...कविता पोस्ट करतेय  .
🙏खरेतर महिला दिन हा आपल्या सगळ्यांचाच.... कारण आई ,पत्नी ,लेक या नात्याने प्रत्येकाचे आयुष्य घडविण्याचं ;अधिक सुंदर करण्याचं कार्य एक स्त्री च करत असते 🙏

तू समई आहेस
••••••••••••••••••••••••••••••••••
देवघरात तेवणाऱ्या समईकडे पाहिलंस कधी ?
अविरत जळणारी, मंगलमय प्रकाश देणारी समई .

घराच्या लहानश्या कोपऱ्याला देवघराचं पावित्र्य आणते ती समई.
ती समई तू आहेस......
तू स्त्री आहेस

तुझ्यापुढे जोडलेल्या हातांना देवाला वेगळं पहावच लागत नाही......
तू मातृत्व आहेस.

कापसाच्या वातीसम तू कुटुंबासाठी तर कधी समाजासाठी जळत असतेस....
तू दातृत्व आहेस.

पितळी घडीव वळणाची ,संस्काररूपी समई ;
तापलेलं तेलही तू लीलया पेलतेस....
तू धातृत्व आहेस

तू अग्नीला सुद्धा शीतल मर्यादित स्वरूपात बांधून ठेवतेस...
तू ऋजुत्व आहेस

समई, वात, तेल आणि अग्नी म्हणजे फक्त तू नाहीस.
तू आहेस त्यातून निर्माण होणारा प्रकाश ...
तू कर्तृत्व आहेस

अनेकविध क्षेत्रांत गाजविलेल्या तुझ्या कर्तृत्वाला शतशः प्रणाम.
तुझ्या धैर्याला ,धडाडीला आणि धीरोदात्ततेला मानाचा मुजरा.
💐8 मार्च जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💐
🔏यशश्री रहाळकर
     नाशिक