फॉलोअर

बुधवार, ३० जानेवारी, २०१९

कथा - कालसापेक्ष

कालसापेक्ष 🔗
♾♾♾♾♾♾♾♾
           भय काय असतं? एखादी पडकी हवेली किंवा एकाट वाडा, अंधारी रात्र बहुतेक अमावस्या ...  कुत्र्याचं भेसूर रडणं , वाऱ्याचा हुरहूर लावणारा आवाज .....रक्तरंजित विद्रुप चेहेरे ..... साधारण असच वर्णन असतं ना गूढकथेचं...... मग माझी कथा त्या पालिकडची आहे. नेहमीचे  ढोबळ आडाखे आणि मुरलेल्या भयाच्या कल्पनांपालिकडचे काहीतरी .... मी संध्या राजे ....माझी कथा ऐकायला तुम्हाला थोडंस मागे म्हणजे माझ्या भूतकाळात डोकवावे लागेल.... काळाची मर्यादा लांघून ... तसेही आपण वर्तमानात कुठं जगतो?? आपण मनानी रमतो भूतकाळात किंवा स्वप्नरंजन करीत असतो उद्याचे ... येणाऱ्या भविष्याचे .ह्या साऱ्यात वर्तमानात उरतो तो केवळ देह... मन ??ते कुठं तरी काळाच्या अल्याड-पल्याड भिरभिरत..... घड्याळाच्या लंबकासारखं.
         तर मी संध्या राजे वयानं मध्यम... प्रौढत्वाकडे झुकलेली .. परिस्थितीनं जराशी उच्च मध्यमवर्गीय सुखवस्तू ... सुटी म्हणावीत अशी मोठी दोन मुलं , मोठ्या पदावर काम करणारा आणि त्याच टारगेट ,मीटिंगच्या चक्रात आकंठ बुडालेला नवरा ... कामाची कमी नी वेळेची हमी असणारी मी .
            त्या दिवशी सकाळी चहा करायचा म्हणून ओट्यापाशी उभी होते अगदी सहज खिडकी बाहेर नजर जावी तशी गेली अन तो दिसला . रस्ता  ओलांडून पलीकडच्या खांबाला टेकून उभा असलेला .कपड्यांवरून तरी बऱ्या घराचा वाटला..... निश्चल शांत उभा एकाग्रतेने माझ्याच कडे पाहतोय असा भास क्षणभर झाला अन माझ्या अंगावर रसरसून काटा आला . हा माझ्याकडे पाहतोय? का पाहतोय हा माझ्याकडे?मला आठवत नसणारा कुणी ओळखीचा आहे का?
         तेव्हढ्यात घराची डोअर बेल वाजली ... दूधवाला आला होता. मग त्या भय्याच्या चारा कसा महाग झालाय? वगैरे गप्पा ऐकून मी पुन्हा कामांकडे वळली. मनातून विचार मात्र जात नव्हते रस्त्या पलीकडल्या त्याचे ... मी खिडकीच बंदच करून घेतली ... डबे वगैरे भरले नवऱ्याला मुलांना वाटेला लावलं. नेहमीप्रमाणे नवऱ्याने उशीर होईल असे सांगून निरोप घेतला. आता मी संध्याकाळपर्यंत अगदी निवांत होते. अश्या वेळी मी पेपर अन जोडीला  काहीतरी खायला घेऊन मस्त उन्हात टेरेसवर बसते . आजही तसेच केले .... पुन्हा नजर वळली ती रस्त्याकडे... तो अजूनही तसाच तिथेच उभा होता ... रोखून पाहत माझ्याकडे??
                 तो अगदी निश्चल उभा काहीही हालचाल न करता ... मात्र एव्हढ्या अंतरावरूनही जाणवावे असे तीव्र डोळे एकटक रोखून पाहत ... पापणीही न लवता. कोण आहे हा ? असा काय आहे ? ह्यांनी माझ्यावर पाळत ठेवायला ठेवलाय का कुणी?? गेल्या आठवड्यातील कडाक्याच भांडण आठवलं... अन माझ्याच विचारांचं मला हसू आलं ... यांना राग येऊच शकतो माझा पण संशय नक्कीच नाही ... उलट मलाच संशय येतोय त्यांच्या सेक्रेटरी वरून....कसल्या सुंदर, चटपटीत, हुशार ,असतात या  इंग्रज मुली .हो! मी इंग्रजच म्हणते त्या जेम फर्नांडीस ला ...  पेपरमध्ये लक्ष लागेल का आता ? उठून आत जायला निघाले  तर हा तसाच खांबाला टेकून उभा ... काय प्रकार आहे हा ?
           दार लावून आत गेले अन उगाचच हे आवर ते आवर करू लागले ... कपाट काढलं उपसून आवरायला ... हा रस्त्या पलीकडचा मंदार मोहिते तर नसेल ... कॉलेज च्या गुलाबी दिवसातले ते क्षण आठवले ... मंदार शेजारीच राहायचा . कित्ती आवडायचा तो मला  त्यालाही बहुदा आवडत असावी मी ... हो बहुदाच म्हणावे लागेल . कारण तोही कधी बोलला नाही अन मीही . आता माझ्या लग्नाला 22 वर्षे झाल्यावर कशाला येईल तो ? अन आला तरी असा उभा राहील कशाला ? पुन्हा त्याच्या विचारानं नजर बाहेर अन तो तसाच उभा रोखून पाहत आरपार. आपल्यापासून अंतरावर उभ्या असणाऱ्या काहीही कृती न करणाऱ्या अनोळखी व्यक्तीची भीती वाटू शकते का ?? हो नक्कीच वाटू शकते. मला विचारा ....
                 हा जो कोणी माणूस आहे  माझ्याकडे बघणारा ...याचा चोरी किंवा दरोड्याचा तर विचार नाही ना ???या  विचारानं  संपुर्ण सकाळ बेचैनीत काढल्यावर अखेर दीड वाजता मी बहादूर वर ओरडलेच.. बहादूर हा सोसायटीचा नेपाळी वॉचमन ..." क्यो बहादूर हम तुम्हे क्या मख्खीया मारने के पैसे देते है?" न समजून बहादूर "नाहीं जी हांजी " करू लागला ... मी रस्त्याकडे बोट दाखवून तिथे एक माणूस उभा आहे त्याला हाकलायला सांगितलेे . "भिकारी होंगा मॅडम" म्हणत तो काठी घेऊन  निघाला अन मी घरी परतले. एव्हढ्यात रखमाबाई कामाला आल्या त्या लादी पुसत असतांना माझी नजर पुन्हा बाहेर गेली पाहते तर तो तसाच तिथेच उभा ??? चिडून रखमाबाई ला म्हणाले " बघ बघ काय कोडगा आहे ... सकाळपासून उभा आहे ... या बहादूर ला सांगूनही उपयोग नाही ... केव्हाचा पाहतोय इकडेच ... थांब आता पोलिसांनाच बोलावते ... " माझा रुद्रावतार बघून रखमाबाई उभ्या राहिल्या बाहेर डोकावत म्हणाल्या " कोन ता मानुस ओ बाई?" मी खांबाकडे बोट करून म्हणाली " तो ग तिथे उभा आहे बघ बघ आपल्याकडेच बघतोय " ..... रखमाला चांगलाच घाम फुटला भीतीने थरथरत ती म्हणाली ... " बाई रस्त्याच्या पल्याड कुणिबी न्हाई कुनीच मानुस न्हाई हो!" 😳😳
(क्रमशः....... पुढील भागात उत्तरार्ध)
🔏©यशश्री रहाळकर
           नाशिक
        30/01/19

सोमवार, २८ जानेवारी, २०१९

छंद भांडायचा

🙅 छंद भांडायचा  🗣
➖➖➖➖➖➖➖➖
          काही लोक पुथ्वीतलावर अवतार घेतात तेच केवळ भांडायला . ह्या लोकांना इतकी अगाध शक्ती प्राप्त असते की ते न थकता दिसेल त्या प्राण्याशी भांडू शकतात ... अहो खरंच! भांडायला किमान दुसरा पक्ष वगैरे म्हणून माणूसच असावा असे काही नाही ...अशाच एका महाभागांना रात्री भुंकणाऱ्या कुत्र्याशी अन ठेच लागलेल्या दगडाशी भांडतांना याची देही याची डोळा पाहिलंय. ह्या जिवंत चालत्या फिरत्या डेली सोप्स ने प्रचंड करमणूक तर कधी प्रचंड मनस्ताप ही भोगावा लागतो... तुम्हाला भांडायची मुळीच इच्छा नाही हा मुद्दा त्यांच्या करीता अगदीच गौण असतो..😝
              ह्या प्रवर्गातील लोक अत्यंत निष्ठेने आपलं कर्तव्य पार पाडत असतात ... भांडण ही प्रतिक्रिया किंवा एखाद्या घटनेमुळे आलेला उद्वेग नसून तो आमचा जणू मूलभूत हक्कच आहे असेच त्यांना वाटत असावे .🙄लहानपणी शाळेत wh type questions हा पाठ ते  अगदी घोटून घोटून  शिकलेले असतात मुळी.... म्हणूनच कुठे(where) काय (what)कश्याला (why)हे प्रश्न ते स्वतः ला पडूच देत नाहीत.
          या संप्रदायातील लोक सकाळी उठले की एखादा निष्णात योद्धा आपली शस्त्रे परजून ठेवतो तशी जीभ भिन्न व्यायाम प्रकार आणि उष्ण चहाने मजबूत शेक घेऊन तयार करतात ... आणि प्रभातफेरीला निघतात . मग lift ने चुकून वर आलेल्या 😉 पेपर टाकणाऱ्या पोऱ्याशी किंवा दूधवाल्या भय्याशी अगम्य हिंदी मिश्रित इंग्रजीत भांडून त्यांचा वॉर्मअप होतो ....  नवीन उत्साहाने भांडायला सज्ज होत ते कामाला लागतात.  रॉंग साईडने जाणाऱ्या सायकल स्वाराशी किंवा मोठ्या आवाजात गाणी ऐकणाऱ्या एखाद्याशी उगाचच भांडण केले की त्यांचे फिरणे सुफळ संपूर्ण होऊन ते घरी परततात .
          दिवसभरात भांडीवाली बाई , सोसायटीचा वॉचमन ,प्लांबर, इलेक्ट्रीशियन वगैरे मंडळी यांच्या पासून तोंड लपवत फिरत असतात .... कोणी चुकून सापडलेच तर तडाखा बसलाच म्हणून समजावे. घंटागाडी वाल्याशी कचरा टाकताना भांडणे हा तर विशेष करमणुकीचा भाग.
      आपण वगळता इतर सर्व मानव प्रजातीतील मुले ही दंगा करून दुपारची झोप मोडण्यासाठीच जन्माला घातली आहेत.. यावर त्यांचा गाढा विश्वास असतो . यांच्या घराच्या 200 मीटरच्या परिघात चुकून गेलेला बॉल किंवा पतंग कडाक्याच्या भांडणाचे कारण बनतो . भांडण म्हणजे भांडण ... कायमच प्रामाणिकपणाने आपले मूलभूत कौशल्य ते सादर करत असतात ... चुकीला माफी नाही ✖... लहान थोर , वय, हुद्दा , ताकद आणि स्त्री पुरुष भेदांपलीकडे जात समसमान न्यायाने ते भांडत असतात.
           हे क्षेत्र बहुतांश स्त्री प्रधान असले तरी पुरुष मुळीच मागे नाहीत ... गंगा यमुना सिंधू बाई यांच्या सारखेच तात्या नाना अण्णा असतातच ...😄 नोकरीतून किंवा संसारातून निवृत्त होणे हे या क्षेत्रातील Ph.D. मानायला हवे..... भरपूर रिकामपणा आणि वेळ यांचा दुहेरी संगम .... आहाहा! किती भांडू मी भांडू कुणाला?? अशी अवस्था झाली नाही तर नवल
           नातेवाईकांतील काही मंडळी प्रत्येक लग्नात रुसलेली असतातच ... त्याशिवाय आपल्याकडे लग्न समारंभ साजरे होणे केवळ अशक्य 😠पण सातत्याने प्रत्येक लग्नात रुसणारे  म्हणजे याच गटातील लोक . हे लोक वरपक्षांकडील असतील तर विचारूच नका... पायघड्या पासूनच भांडणाचे चौघडे वाजू लागतात . वधुकडील मंडळी कामांत मग्न असतील तर ते आचाऱ्याशी (आजकाल केटरर्स ) भांडतात ... कढीची वाटी हाती घेऊन "ही काय कढी आहे का ? " असे बाळबोध पंच टाकून 1..2...3 start
          "मै तो रस्ते से जा राहा था..." .......पण पुढे कशाला तर भांडायला 😡  .....रस्ता हे ठिकाण रणांगण असावे इतक्या संधी त्यांना तेथे सहज प्राप्त होतात ... जितका ट्रॅफिक अधिक तेव्हढे मोठे भांडण .. कधीकधी तर आपली गाडी मुद्दाम आडवी घालून यथेच्छ xxx सुरु. सुज्ञास अधिक काय सांगावे .... ऐकणाऱ्या ने शिव शिव म्हणावे असल्या इरसाल शिव्या....
         "भांडकुदळ " ह्या शब्दातील कुदळ ⛏ अत्यंत सुचक आहे...जमीन खोदून भांडणास मुद्दा काढणे हा अर्थ अभिप्रेत असावा. ह्या शब्दात ज्यांचे पूर्वी वर्णन होत असे ...अश्या लहानपणी एक काकू  शेजारी होत्या. त्या 'भांडकी बेबी' ह्या नावाने ओळखल्या जात ... आज त्या दोन नातवंडांची आजी असल्या तरी ह्याच नावाने ओळखल्या जातात.🤭
         हे सारं आज तीव्रतेनं आठवायचं कारण असं की सोशल मीडियावर असे महाभाग जागोजागी भेटू लागले ... भरल्या वांग्याना 🍆आम्ही भरीतच म्हणतो या विषयावर एक व्यक्ती एका खाना खजाना ग्रुप वर 4 दिवस अहोरात्र भांडली ... ग्रुप वरचे मेंबर्स होते 2 लाख ... क्या बात है ना ? घरीच बसून जगाच्या कानाकोपऱ्यात बसलेल्या कित्येक लोकांशी भांडणाची विस्तृत संधीचे नवे अवकाश प्राप्त झाले आहे ...🤗
           खरंतर, झगडा किंवा भांडण परिस्थितीशी असेल तर त्यात प्रचंड positive energy सामावलेली आहे. हे कौशल्य पणाला लावून लोक आयुष्यात अक्षरशः कुठल्या कुठे जातात. अश्या लोकांपुढे आपण नतमस्तक झाल्याविना राहत नाही .
          मात्र भांडण हा छंद म्हणून असणाऱ्या व्यक्ती कुटुंबात, शेजारी ग्रुप मध्ये असतील तर ??? तुम्ही या गटांतील निश्चितच नसाल ... तर प्रश्न पडतो ,काय करायचे?? अश्या लोकांचे काहीही करायचे नाही . तुम्ही माफी मागण्याचा मोठेपणा दाखविला तरीही ते भांडणारच. तुम्ही काही केले नाही.. दुर्लक्ष केले तरीही ते भांडणारच 👊🏻 तेव्हा हे वत्सा ! या ज्ञान प्राप्तीनंतर त्यांना मनोरंजन म्हणून enjoy करावे हाच श्रेयस मार्ग 😇
©🔏यशश्री रहाळकर
           नाशिक
        28/01/19

शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

आरश्यातल्या तिच्यासाठी

🎭आरश्यातल्या तिच्यासाठी
🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲
          मुली जसजश्या मोठ्या होतात तसतसे त्यांचे घरातील एका वस्तूवर विलक्षण प्रेम जडते .. ती वस्तू म्हणजे आरसा. येता जाता दिसेल त्या आरशात त्या डोकावू लागतात अगदी कपाटाचे , dressing table चे , बेसिनवरचे किंवा गाडीचे side mirrors देखिल सोडत नाहीत . कधीतरी छान मनाजोग तयार झाल्यावर आरशात बघून स्वतःशीच गोड हसतात .
          ही आरश्यातली ती हळुहळू विरत जाते काळाच्या ओघात ... कधी अभ्यास नोकरी स्पर्धा या रगाड्यात गुंतून जाते तर कधी असते तिथंच पण तिला द्यायला वेळच नसतो . नवीन लग्न झालं की  पहिली फारकत होते आराश्यातल्या तिच्याशी... अखंडपणे आपण बायका (हो लग्न झालं की बायकाच तर होतो सगळ्या कुठं करीना असतात 😝) नवरोबाला काय आवडेल ह्याचाच विचार करू लागतो . त्याला लाल रंग आवडतो , त्याला मी साडीतच आवडते, त्याला नाही स्लीव्हलेस आवडत , त्याला मोकळे केसच आवडतात वगैरे वगैरे न संपणारी पांघरूण घालून आपण झाकून टाकतो आराश्यातल्या तिला .
           कधीकधी परंपरांच्या पदराआड झाकून टाकतो तिला .. आमच्या सासरी अशीच पद्धत आहे अन असेच वागावे लागते ... साडीच नेसतो बरं आणि ड्रेस तर चालतच नाही. ही यादी न संपणारी असते. इतक्या लहान सहान बाबी प्रतिष्ठेचा मुद्दा बनतात की काय सांगू?? माझे अगदी खोटे 10/ 20 रुपयांचे कानातले पाहिले की माझी एक मैत्रीण हळहळते तिच्या घरात म्हणे खोटं घातलेलं मुळीच चालत नाही... त्यांच्या कोणत्या प्रतिष्ठेला यामुळे तडे जातात तेच जाणो ?
            पुढे या मुलीची बाई अन बाईची आई होते .. मुलांपाठी पळताना आरश्यात पहायचाही विसर पडतो... त्यांची दुखणी खुपणी रात्री त्यासाठी जागरणे , मग शाळा , क्लासेस , डबे सगळ्या व्यापात ती आकंठ बुडून जाते . लेकुरवाळ्या आईला वेणी फणीलाही वेळ मिळेनासा होतो... आरशात पहायचे ते दात घासताना तेही तिथे आरसा असेल तरच ... कपाळाची टिकलीही आरश्यात न पाहता लावण्याची आताश्या तिला सवय झालेली असते.
          मुले मोठी होतात आपापल्या मार्गांना लागतात.. नवरा आपल्याभवतीच्या व्यापात, कोषात मग्न ... ज्यांची अखंड सेवा केली आणि ज्यांच्या नियमांवर आजवर जगली ते जेष्ठ देवाघरी प्रिय झालेले असतात. आता हिला भरपूर वेळ मिळतो... आरश्यात पाहते ... दिसते एक भकास , खिन्न , दुःखी ,😢 आत्मविश्वास हरवलेली, चिडचिड करणारी वैतागणारी ती. धक्काच बसतो तिला.
             गेली कित्येक वर्षे आरश्यातल्या तिच्याशी ना संवाद साधला असतो ना पाहिलं असतं..... कधीकाळी गोड हसणारी ती आता हसायचं विसरलेली असते जणूकाही. कोण असते हो आराश्यातली ती?? आठवतेय तुम्हाला?
        जाडी- बारीक, गोरी-काळी, उंच- बुटकी ... ही सगळी ती रूपं जी इतरांच्या डोळ्यांनी पाहिली आहेत . मात्र आरश्यातली ती खूप खूप सुंदर असते ... परमेश्वराची एकमेव अद्वितीय कलाकृती. अशी ती जिला स्वतः ची मते आहेत , आवडीनिवडी आहेत .जी स्वतः साठी नटतेय मनापासून... जी स्वतः वर खुश आहे आनंदी आहे ... शेवटी गोडस हसू तिच्याकडे आहे स्वतः लाच देण्यासाठी.
          जी व्यक्ती स्वतः वर प्रेम करत नाही ती इतरांवर कसं बरं करणार? आराश्यातल्या तिला रोज एकदा वेळ काढून भेटायलाच पाहिजे .. अगदी प्रत्येकीने ... तिच्यासाठी काही क्षण राखून ठेवायला हवेत ना ! कधीतरी तिच्याच आवडीची भाजी करा (नवऱ्याला आवडत नसेल तर त्याला वेगळी ) कधीतरी तिच्या आवडीच्या रंगाची साडी नेसा, गजरा माळा, लिपस्टिक लावा काय हवं ते करा तिच्या आवडीचं.... दिवसाचे 24 तास 12 महिने कुटुंबासाठी राबणाऱ्या तिला आनंदी राहायचं असेल तर आराश्यातल्या तिला भेटलच पाहिजे...👍
🔏©यशश्री रहाळकर
       नाशिक
      25/01/19

मंगळवार, २२ जानेवारी, २०१९

भुक्कडगिरी

दिव्य मराठी मधुरीमा पुरवणीत प्रकाशित झालेला हा माझा लेख ...  अनेकांना आवडला.. ओळखीच्या आणि अनोळखी लोकांनीही email आणि अगदी call करूनही प्रतिक्रिया व्यक्त केल्या... आज रीतसर blog ला पोस्ट करतेय😊👍

🤑  भुक्कडगिरी            ##################
                 नाशिकला आल्यावर " भुक्कड "  या शब्दाची माझ्या शब्दकोशांत भर पडली. भुक्कड म्हणजे भुकेलेला नव्हे तर ज्याच पोट भरलय तरीही  दुसऱ्याच्या ताटातील पोळीवर ज्याची नजर आहे असा कद्रू मनाचा माणूस. या मागे प्रामुख्याने " मिळतयं तर का सोडा??? " ही वृत्ती असणारे असे भुक्कडगिरीतील बादशाह आपल्याला जागोजागी भेटतात...
          याबाबतीत अग्रक्रमाने राजकारणी लोकांवर आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर टीका होत असली तरी देखिल आपल्यातील बहुतांश लोकांमध्ये ही प्रवृत्ती रूजली ,फळली ,फुलली एव्हढेच काय सवयीचा भाग बनलीये. वानगीदाखल द्यायचे झाल्यास हॉटेलमधील जेवणानंतर बिलासह पुढे केलेली शोप किंवा मुखवास लोक टिशू पेपर मध्ये भरभरून घेतांना मी अनेकदा पाहिलय... मला सांगा हॉटेलचे हजार पंधराशे बिल भरू शकणाऱ्या व्यक्तीला 20/30 रुपयांचे मुखवास मारावेसे का वाटावे?? यावर आमच्या बिलात ठेवले म्हणजे संपूर्ण आमचेच अशी साळसूद धारणा करण्याचे कारण नाही ह्न! एक सांगा टूथ पिक , टिशू पेपर , फुलदाणीतील फुले ह्या काही मारायच्या ( ढापायच्या ) गोष्टी आहेत का राव???  गरजेनुसार वापराव्या पण सगळ्या कोंबून खिशात ... का सोडा?? 🤨
         भारतात railway च्या टॉयलेट मधील टमरेल चेन ने बांधलेले असते या विषयावर अनेक जोक्स येतात...... पण AC कोच मधील ब्लॅंकेट्स सुद्धा बॅगेत घालून नेणारे लोकही आहेतच की ...... AC चे तिकीट परवडणाऱ्याला काय एक ब्लॅंकेट विकत घेणे कठीण असावे का ? पण माझ ते माझ , तुझ तेही माझच आणि सरकारी ते माझ्या पिताश्रींच .... 😠 असे आपले धोरण.
           " नाव मोठ्ठे लक्षण खोट्टे " असा अनुभव विमान प्रवास सातत्याने करणाऱ्या काही व्यक्ती सिद्ध करतात... घरी आलेल्या प्रत्येक बालकांस ते विमान प्रवासात हवाहवाई केलेली अर्थातच मूठी भरभरून उचललेली चॉकलेट्स देतात. ही चॉकलेट कॅन्डी बरेचदा विमानात कॉंप्लिमेंटरी म्हणून दिलेली असतात.... आम्हाला थोड्या अधिक मिळू देत म्हणून ते डल्लाच मारतात. रिफ्रेशमेंट चे फूड , बिसलरी बॉटल्स   विमानातच भरपूर घेणे ... खाणेपिणे शक्य नसल्यास बॅगेत भरून घेणे  आणि वर केव्हढे पैसे घेतात ना उडवायचे  ?? असेही म्हणणे....  यावर एका काकूंना मी हसत हसत म्हणाले .. " हे लोक ढगात उडवायचे नाही तर पुन्हा सुखरूप जमिनीवर उतरवायचे एव्हढे पैसे घेतात . " 🤭
           सातत्याने वेगवेगळ्या टूर्स करणाऱ्या एका मैत्रीणीकडे वेगवेगळ्या हॉटेल्सचे लोगो असणारे टॉवेल नॅपकिन्स  असायचे... मी बावळट प्रश्न केला ... " कुठे ग मिळतात हे ? " तिने निलाजरेपणाने सांगितले " ज्या हॉटेल मध्ये राहते आणते तिथूनच.. सगळे थ्री स्टार हॉटेल्स ... काही कुणी चेक करत नाही आणि केलेच कधी तर sorry by mistake म्हणायचे... झालं " मी चाट ... " करतेस काय पण एव्हढ्या टॉवेल्स चे ??? " मी जवळजवळ किंचाळले . ती आश्चर्याने म्हणाली... " चांगले असतील तर वापरते नाहीतर पोछाला देते बाईला... केव्हढे पैसे भरतो आपण या हॉटेल्सचे . "  मी मनोमन हात जोडले.
             आमच्या विभागातील एक कॉर्पोरेटर  स्त्री मंडळ  चालवितात. आपल्या कडून महिलांना अधिकाधिक दर्जेदार कार्यक्रम त्या देतात ... पण या बौद्धिक मेजवानी पेक्षा बऱ्याच महिलांना अधिक रस असतो तो खाऊ खाण्यात ... या कार्यक्रमासाठी अगदी वडापाव असू देत किंवा भजी... चांगल्या घरच्या , अंगावर पाचसहा तोळे सोने अन भरजरी साड्या मिरवणाऱ्या , बंगल्यात राहणाऱ्या बायका तूटून पडतात ... ढकलाढकली करतात .... चहा ओढाओढीत एकमेकींवर सांडवितात. ज्यांची मुले फॉरेनला खोऱ्याने पैसा ओढतात खरतरं डॉलर ओढतात म्हणूया त्याही बरेचदा यात असतात . 4/5 प्लेट भजी खाऊन 2 प्लेट पर्स मध्ये कोंबणाऱ्याही  आहेत. त्याहून नवल म्हणजे बऱ्याच जणी वार्षिक नोंदणी करीत नाहीत मात्र ती अश्या प्रकारे वसूल करतात ... हे सगळे का ... कशासाठी ???
           या सगळ्या भुक्कडगिरीच्या पदोपदी येणाऱ्या अनुभवातून एक मात्र अत्यंत खेदानं नमूद करतेय ... की दिवसेंदिवस सामाजिक बांधिलकी , आपला देश आपले लोक ही भावनाच आटत चाललीये कुठेतरी..... जो दुसऱ्यासाठी जगला तो देव ...
जो स्वतःपुरतेच जगला तो मानव पण जो दुसऱ्याचे ओरबाडून जगला तो मात्र राक्षस सैतान.😈
कुठेतरी थांबा .... " माझं नाही ते माझं नाहीच ! " म्हणायला शिका. खूप मोठ सामाजिक कार्य , मोठाल्या देणग्या देणे म्हणजेच फक्त  सामाजिक कार्य नव्हे तर थोडसं आत्मभान आणि जरासा जवाबदार  नागरीक या नात्याने केलेला विचारही खूप काही देउन जाईल ... निश्चितच .👍🏻
🔏©यशश्री रहाळकर
( हा लेख कोणतीही काटछाट न करता मूळ लेखकाचे नावासह forward करण्यास माझी हरकत नाही.)

रविवार, २० जानेवारी, २०१९

DP मागची ती

      आज पुन्हा एक कविता घेऊन आलीये... थोडीशी धाडसाने लिहिलीये... आभासी जगात तरी आपण स्त्रीला .. देहापालिकडे अस्तित्व आहे हे मानतो का ? अनेक 'तिला' आलेल्या संमिश्र अनुभवांचं, भावनांचं चित्रण यात आहे.

🤗 DP मागची ती 👁‍🗨
〰〰〰〰〰〰〰
DP मध्ये कसली सुंदर दिसतेस तू ... त्याची comment वाचली
अन त्याच्या या मूर्खपणा वर ती dp आडून हसली

मुळात dp वर दिसतेय तिच की आणिक कुणी रंग रूप जुनी नवी कशी बरं भासली??
Block करून त्याला ती न संपणाऱ्या कामांत अन  रोजच्या दिनचर्येत फसली ......

कुठलासा ग्रुप तिनं दर्जेदार अभिरुची साठी केला जॉईन...
Messenger वर वेगळ्याच द्वयर्थी अभिरुची.... .. तिनं block केलं...
कुठलासा पाककृतींचा ग्रुप ... अन झालं का j1 विचारणाऱ्या काळजीवाहूना तिनं  फटकारल

महिला राखीव ग्रुप ला बाईच्या नावाआड दडलेल्या 'त्याचं' तिला नवल वाटलं
काय बरं हेतू असेल या बायकांत पुरुष लांबोड्याचा?
अमुक कोणाची सासू छळते अन कुणाचा तरी नवरा मारतो ...
बाईची दुखणी, तिचं दुःख तिच्या वेदना वाचून काय बरं मिळतं ह्यांना??

रात्री उशीरा online असलेल्या कुणातरी ' तिला ' गृहीत धरलं जातं
नोकरी घर संसार सांभाळून विरंगुळ्याला fb उघडणाऱ्या तिला अपशब्दान बोललं जातं...

सकाळी सकाळी म्हाताऱ्यांचा त्रास ... शुभ प्रभात अन लोचट पणान बेजार व्हायला होतं
सकाळी काम नाही म्हणजे ही एकटी ... रात्री ऑनलाइन म्हणजे easy available.... समजलं जातं

नाक्यानाक्यावरचे उनाड पुरुष आता ऑनलाइन ही भेटतात...
सोशल मीडियावरील dp आडही  हे स्त्रीच शोधत असतात ......

DP मागे देह नसतो केवळ ...असतं एक संपूर्ण व्यक्तिमत्व ...
भल्याबुऱ्याची जाण असणार, स्वतः मतं असणार एक जिवंत अस्तित्व

काय सांगू, आभासी जगातही वासनेंन बरबटलेल्या नजरांचा धाक आहे
DP आडच्या ' तिलाही ' स्त्रीत्वाचा शाप आहे .
🔏© यशश्री रहाळकर
         नाशिक
      20/01/19

शुक्रवार, १८ जानेवारी, २०१९

सेलमधील कैदी

📱 सेलमधील कैदी 🔲
🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗
         मोबाईल नवीन आले तेव्हा त्याला ' मोबाईल ' असेच म्हणत आता मात्र सेल म्हणायची फॅशन आहे. सेल म्हटले की मला उगाचच तुरुंग आठवतो ... छोट्याश्या अंधार कोठडीत डांबले गेल्याचा फील येतो ... तळहातावर मावणाऱ्या या इवल्या जादूगाराने अशी काही जादू केलीये की आपण खरेच डांबले गेलोय या सेल नावाच्या अदृष्य कोठडीत ... आणि मोहिनी अशी की आपण तुरुंगात आहोत हे आपल्याला मुळी जाणवतच नाहीये... 😱
        मोबाईलचे दुष्परीणाम वगैरे विषयांवर मी मुळीच बोलत नाहीये ... कारण त्याची निकड आणि उपयोगिता दोन्ही मला जाणवले ,अनुभवास आले आहेत. आजच्या काळात मोबाईल असणे विशेषतः स्मार्टफोन असणे  खरंच गरज आहे  ...की फॅशन आहे ...की जीवनावश्यक बाब आहे ....की व्यसन ह्याचा मात्र विचार करायला हवाय .
       अनेक कौटुंबिक सोहळ्यात , गेट टूगेदर मध्ये आजकाल तीव्रतेनं हे मला जाणवतं ... आपण नक्की कशा करीता एकत्र येतो भेटायला , गप्पा मारायला की फोटो काढायला ?? एकमेकांना खूप दिवसांनी भेटल्यावरचा आनंद गळामिठी टाळ्या देऊन हसणं गेलय तरी कुठे ?🧐 बहुतांश वेळा स्वतःला फोटोच्या चौकटीत अडकवायच्या अट्टहासात आपण काय गमावतोय ते कळतच नाहीये मुळी...
         सगळे एकत्र जमल्यानंतर त्या सुखद क्षणांची आठवण म्हणून काही फोटो असणे यासारखे सुखाचे निधान नाही ... मात्र त्याचा अतिरेक नक्कीच टाळता आला पाहिजे . सध्या असे चित्र आहे की कुणाला भेटणं नकोसं वाटावं... इतके फोटो का कश्यासाठी? आभासी जगातल्या चार दोन ओळखीच्या आणि काही हजार अनोळखी लोकांचे likes मिळावेत म्हणून ??आजकाल चार लोक मुळी भेटतात तेच फोटो काढायला असेच वाटते.... मित्र मैत्रिणींचे ग्रुप, किटी पार्टी, समारंभ असो किंवा अगदी बाहेर dinner चा प्लान सगळेच्या सगळे सगळा वेळ फक्त फोटोज आणि सेल्फीत मग्न असतात. रिलॅक्स व्हायचे नाही ,कुटुंबाला quality time द्यायचा नाही तर  मग आपण बाहेर जेवायला का जातो ? 🤭
       लग्न समारंभात तर या वेडाचा उच्चांक गाठलेला असतो ...आधीच नवरा नवरी भवती दोन्ही कडाचे 2  फोटोग्राफर विडिओ शूटिंग करणारी 4 डोकी लाइट वगैरे 2 माणसे या गराड्यात आपण नेमक्या अक्षदा फक्त त्या दिशेनं फेकत असतो ... कुणाचं लग्न लावतोय ते दिसतच नाही. त्यातही सगळीकडे मोबाईल चा लखलखाट आणि क्लीक- क्लिकाट ... (नवीन शब्द वाह😉) अगदी पाठवणीला वडिलांच्या गळ्यात  पुन्हा फोटोसाठी पडणे,  मंगळसूत्र पुन्हा काढून घालणे , असले अगोचर चाळे केवळ त्या स्टेटस अन dp साठी 🤔
           निसर्गरम्य स्थळांना फोटोतून पाहणाऱ्याची कीव येते .. अरे आठवणी च्या नावाखाली किती फोटो.. आधी आठवणी तर गोळा करा . आकाशात उडणारे पक्षी, आकाशातले इंद्रधनुष्य, पाण्याचे थेंब हे प्रत्यक्ष बघण्यात जो आंनद आहे तो फोटोतून मिळेल कसा .. आणि हेच सगळं बघायचंय तर डोंगर दऱ्या पालथ्या घालण्यापेक्षा घरीच डिस्कवरी नाहीतर नॅशनल जिओग्राफी बघा ... (प्रोफेशनल फोटोग्राफर सोडून इतर) लोकांनी भाराभर काढलेले फोटो बरेचशे व्यर्थ डिलीट करण्याचे काम वाढते... दर कार्यक्रमानंतर मोबाइलला क्लीन करावाच लागतो ... निष्कारण व्याप कोण पाहत ते फोटो ?जे क्षण मोबाईल च्या कॅमेरात कोंडतोय आपण ते जगून तर घ्या ना !
           पूर्वीच्या स्त्रिया जसे मंगळसूत्र आमरण कवटाळून असायच्या तसे  हे स्मार्ट फोन हाताशी उश्या पायथ्याशी असतात ... अगदी तासभर किंवा अर्धा तास सेल बाजूला ठेवायला लागला बघायला मिळाला नाही की बेचैन होणारे लोक बहुसंख्य झाले आहेत .
       सेल आता सेल न राहता जेल झाला आहे . सकाळी योगासने, meditation क्लासला गेल्यावर भणाणणारे फोन किंवा मॉर्निंग वॉक ला मोठमोठ्याने फोनवर बोलणारे लोक पाहिले की संताप होतो . ऐन रंगलेल्या गप्पात उठून फोन घेणारे , नाटकात व्यत्यय आणणारे फोन, सिनेमा पाहत मोबाईल वर चॅट करणारे पाहिले की मी चाट पडते. इतकं अशक्य आहे तासभरासाठी बाजुला ठेवणं या फोनला ?
        माझ्या नणंद बाईंचे यजमान स्वतः ची मोठी कंपनी कामाचा व्याप सांभाळत पुण्यासारख्या ठिकाणी राहूनही साधा call करता येईल असाच फोन अजूनही वापरतात ...smart phone ची त्यांना आवश्यकच नाही असे त्यांचे मत. मुळात फोनचा उपयोग दोन व्यक्ती संपर्कात राहण्यासाठी .... जवळच्या व्यक्तीना दूर करत असेल तर अडथळाच नव्हे का तो  ?
      सेलला पुर्णतः नाकारणं कदाचित अडचणीचे आहे पण काही पथ्य निश्चित आपण पाळूच शकतो.... जसे
#  सार्वजनिक सामूहिक कार्यक्रमात मग तो गाण्याचा असो नाटक सिनेमा असो वा भाषण ..इतरही मनोरंजनाचे हक्कदार आहेत ... आपला फोनचा वापर दुसऱ्यांना त्रासदायक वाटेल असा नसावा. मुळात शक्य तेव्हढा तो बंद ठेवण शक्य व्हायला हवे.
# निसर्गात रमताना नैसर्गिक सौंदर्याचा संपूर्ण आस्वाद घ्या ... फोटो वाटेल तेव्हढे मिळतात गुगलच्या कृपेने.
# योग , meditation, morning walk ला स्वतः ला वेळ द्या .. मन आणि मेंदूला शांत करा.
# कुटुंबासोबत वेळ घालवताय तर फोन बंदच करा .. मुलांशी खेळतांना त्यांना वेळ द्या. इकडे मुलगा खेळतोय आणि तुम्ही फोनमध्ये डोकं घातलंय.. त्याचा तो खेळण्याचा आनंद पुन्हा पाहता येणार नाही. त्याचं बालपण पुन्हा येणारे का?
# मित्र मैत्रिणी जमणार असतील, कीटी पार्टी get togetherला पाहिले पंधरा मिनिटं किंवा फार तर अर्धा तास फोटोसेशन्स ना द्या नंतर ते फोन एका डब्यात जमा करून  घरी जातांनाच प्रत्येकाच्या ताब्यात द्या.
      आपण माणसांना भेटतोय चालत्या बोलत्या जिवंत माणसाला ... फोटोंच्या फ्रेममध्ये अडकून पडलेल्या , मोबाईल नामक कोठडीत गुदमरत घुसमटून गेलेल्या कैद्याला नव्हे. सेल चा सेलफोन एव्हढाच अर्थ असू देत तुरुंगाची कोठडी नकोच.
🔏यशश्री रहाळकर
      नाशिक