फॉलोअर

सोमवार, ७ जानेवारी, २०१९

कविता - इवलुशी बाहुली

    आज त्या नात्यावरील कविता आपणापुढे मांडतेय...जे जगातील सर्वांत सुंदर नाते आहे ... आईपणाचे नाते. प्रत्यक्षात आई होणं ही काही क्षणांची प्रक्रिया असली तरी आईपणाचा प्रवास अखंड आहे . आपण मुलांना घडवतो असे आपल्याला उगाचच वाटते उलट कित्येक प्रसंगातून मुलेच आपल्याला आई म्हणून घडवत असतात.कवितेत नमूद प्रसंग नावाप्रमाणेच इवलासा आहे ... माझी पाच वर्षांची लेक मला सोडून पहिल्यांदा एकटीच आजोळी राहायला गेली ... ते दहा दिवस माझ्या त्यापूर्वीच्या पाच वर्षांच्या आणि नंतरच्या कित्येक वर्षांच्या आईपणाच्या तपश्चर्येचा पायाच आहेत ....

इवलुशी बाहुली 😊

माझी इवलुशी बाहुली
आज आजोळी निघाली
नवे आईपण मला
तिच शिकवून गेली .....

म्हणे निघतांना मला आता कर ग आराम
माझ्यामुळे तुला फार पडते  हो काम
आता घर तुझे नेटके पसारा मुळी नाही
माझी भुणभुण नाही कसे शांत वाटे बाई
तुझी सारी ती पुस्तके टाक वाचून एकदा
माझ्या साठी तुझ्याकडे वेळ उरेल केव्हढा

मजा माझ्याच सारखी आता तुही करणार
तुलाही कधीतरी माझा आठव येणार
जरी आली आठवण रडायाचे मुळी नाही
वेडे बाळ असॊ किती शहाणी असते ती आई

नको करूस काळजी मी ग राहिन मजेत
जरा आठवण येईल तुझी अवचित
रमविन अश्या वेळी माझ्या मनाला खेळात.....
मी ग रडलेले तुला मुळी नाहीना चालत

चार दिवस संपता अश्शी येईन धावत
माझे इवलेसे जग तुझ्या भवती परत....
काय सांगू तुला पिल्ला ...तुझ्याविण एक क्षण
गोठून गेलेला श्वासाचा आहे पणं

जग म्हणते कठीण फार प्रसव वेदना
बाळ जन्मते एकदा आई जन्मते कितींदा
पिल्ल्या भल्यासाठीच तुझ्या रे जरी सारे मी करते
तू तर भलीच नेहमी ,मीच थोडी सुधारते.
___यशश्री रहाळकर
      नाशिक

(प्रत्येक आईला कमीअधिक फरकाने या अनुभवातून जावेच लागते ... आपल्या अश्या अनुभवांचे प्रतिक्रियेतून स्वागत आहे . धन्यवाद! )

११ टिप्पण्या:

  1. आई ची माया ना कळली कोणाला,देव ही भिकारी आहे ग तिच्याबिना.
    शब्दात ना व्यक्त होते कधी कुठलीच किमया, तिची ओंजळ तिची प्रेम आणि माया...
    सुंदर ती किती तिची छाया, स्वतः खाते चटके तरी कधी ना अंतर देते मला न कमी होते तिची माझ्यावरी प्रेमळ माया....
    खूप सुंदर लेख लिहिला आहे यश ताई....

    उत्तर द्याहटवा
  2. आई आन तिची लेक शब्दात न मांडता येणार कोड ती विन न तुटणार

    उत्तर द्याहटवा
  3. माझी लेक एकच दिवस आत्या कडे राहिली तीन वर्षाची असताना.असेच वाटले. खूप छान शब्दात मांडल्या आहेत भावना.

    उत्तर द्याहटवा
  4. अतिशय हेलावून गेले ग वाचून,खरंय अगदी सुरेख रेखाटला आहे तो आई नि मुलीचा गहिवर ,प्रेम ,हक्क,हट्ट सगळंच

    उत्तर द्याहटवा
  5. हुंदका देणारी ऊर भरून यावा अशी खुप छान.

    उत्तर द्याहटवा
  6. मनापासून आभार! आपल्या इतक्या छान प्रतिक्रियान्मुळेच लिहिण्याची प्रेरणा मिळते

    उत्तर द्याहटवा
  7. मनापासून आभार! आपल्या इतक्या छान प्रतिक्रियान्मुळेच लिहिण्याची प्रेरणा मिळते

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!