फॉलोअर

शुक्रवार, २८ मे, २०२१

भगूर ते अंदमान :- एक अनुभूती


देव्हाऱ्यातल्या देवांना नमस्कार करून 
कुलदेवतेच्या दर्शनाला निघावं....
तसं काहीसं वाटतं... भगूरच्या वाड्याकडून,
अंदमानच्या प्रवासाला निघाल्यावर....

*अनादी अनंताचा* हा प्रवास...
काळाची अनेक आवर्तने ओलांडून 
आत्म्याला अलौकिक तेजाने
दिप्तीमान करणारा असतो.

नुकताच जीर्णोद्धार झालेल्या ...
भगूरच्या वाड्यात नतमस्तक होतांना तुम्ही
*राष्ट्र* नावाची समई काळजात लावूनच निघता 
*स्वतंत्रते भगवतीच्या* सगुण साक्षात्काराच्या ओढीने

स्वातंत्र्यवीरांच्या नावाचं विमानतळ झळाळत असतं...
*दिप्तीतम तेजाचे* हजारो पलिते पाजळत...
डोळ्यांत टचकन पाणी आणि अंगावर काटा उभा राहतो..
हवेतल्या हजारो क्रांतिकारकांच्या देहातीत अस्तित्वाने.

पाचूची हिरवी बेटे , निलमचा निळाशार समुद्र
माडाची झाडे, मखमली वाळूचा समुद्रकिनारा
काही काही नको असतं त्या क्षणी ... कारण
आत्म्याला अनावर ओढ असते *राष्ट्रभक्तीच्या मंदिराची*

सेल्युलर जेलचे दार उघडून आत जाताच
पहिल्या पायरीवर सवयीने तुम्ही नतमस्तक होता
हजारो क्रांतिकारकांच्या संघर्षाच्या अनन्वित छळाच्या कथा
अंतर्बाह्य बदलून टाकतात तुम्हाला माणूस म्हणून

भव्य स्टेडियम मध्ये अंधार होताच सुरू होणारा
लाईट अँड साऊंड शो काळाच्या त्या गर्तेत घेऊन जातो
जिथे एक हळव्या कविमनाच्या क्रांतिकारकाला वधस्तंभासमोरील कोठडी मनाने मारून टाकणारी असते

तरीही  *तुजसाठी मरण ते जनन* म्हणत
स्वातंत्र्यदेवतेची निस्सीम भक्ती करणाऱ्या 
त्या क्रांतीसूर्यापुढे , त्यांच्या निःस्वार्थ त्यागापुढे
भावविभोर होत डोळे पुसता... मनाचा दगड करून...

मंदिरातल्या गाभाऱ्याकडे वाटचाल करत असताना
उभारलेल्या घडीव खांबांवर सहज दिसतात
आपल्याच कुळातली काही नावे क्रांतिकारकांच्या यादीत
आणि स्वतःच्याच DNA चा सार्थ अभिमान वाटतो.

अखेर तो क्षण येतो ज्या भेटीसाठी तुम्ही
*शत जन्म शोधत* वाट बघत तळमळत असता 
*कमला* सनावर आरूढ *शत सूर्य मालिका*
गाभारा उजळत असतात,क्रांतीची रक्तीमा आभा घेऊन

सेल्युलर जेलची ती कोठडी जिथे अखंड
स्वातंत्र्यदेवतेची जिवंत आराधना घडली
जिथे आरंभलेल्या यज्ञात श्वासांच्या समिधा ,
ध्यासांची आवर्तने आणि *जयोस्तुते!* चा जयघोष झाला

प्लॅस्टरचा मुलामा लिंपलेल्या त्या भिंतींवर
अजूनही कुठेतरी स्पर्श असतात *काळ्या पाण्याचे*
देहाबरोबर तुमचा आत्माही नतमस्तक होतो
त्या अद्वितीय , निःस्वार्थ ,निरपेक्ष राष्ट्रप्रेमापुढे

अभावितपणे तुम्ही गाऊ लागता *सागरा प्राण तळमळला*
डोळ्यांतून अखंड वाहणाऱ्या पवित्र जलाचा अभिषेक करत
अंदमानची भेट म्हणजे *अनुभूती* आहे.. शब्दातीत
प्रत्येकाने अनुभवावी आपापल्या नजरेतून

भगूर ते अंदमान हा प्रवास तुम्हाला खूप काही देतो
पुस्तकांपल्याडच्या इतिहासाशी प्रत्यक्ष भेट घडवतो
स्वातंत्र्याची काय किंमत आपण मोजली आहे ? 
ह्याची आत्म्यावर *मोक्ष मुक्तीची रूपे* साकारत

✒️ *यशश्री रहाळकर*

गुरुवार, २० मे, २०२१

ओढ्याकाठचं गूढ

बज्या सावकाराचा एकुलता एक तरणा पोरगा.... मोठ्या भयानक पद्धतीने मेला... ओढ्याच्या शेजारी त्याचं प्रेत झाडीत सापडलं तेव्हा ते चांगलंच फाडून खाल्लं होतं रानटी कुत्र्यांनी... कसंबसं गुंडाळत दहन करायला चौथऱ्यावर ठेवलं... सारा गाव तिथं लोटला होता. सगळ्या गावावर शोककळा पसरली होती.लोकांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. सरपंच आप्पासाहेब... सावकारांच्या खांद्यावर हात ठेऊन धीर देत होते ..

"सावरा स्वतःला... अग्नी संस्कार पूर्ण करा"

सावकार सगळा दुःखाचा भार फेकत त्यांना म्हणाले...

"सरपंच तुमाला पोर ना बाळ! पोटाच्या तरण्या लेकराचा अग्नी देनं काय असते ? त्याच्या तिरडीचं वझं काय असतंया... तुमाला कळायचं न्हाई."

स्वतःच्या दुःखाने होरपळल्यावरही माणसे किती स्वार्थी होतात इतरांना डागण्या देतांना त्यांना काय आनंद मिळतो देव जाणे?? सरपंच डोळ्यांतले पाणी पुसत शांतपणे बाजूला सरकले. चिता रचली गेली आणि अग्निडाग देणार तोच कुठून तरी मरी बाई तिरासारखी धावत आली... तिच्या हातातली थाळी आणि प्याला ती जोरजोराने बडवू लागली.... 

"भूता वढ्याच्या भूता.... तुला समदं कळते बापा! न्यावं झाला ... न्याव झाला भूताच्या दारी..."

म्हणत केस पिंजारलेली मरी बाई भेसूर आवाजात थाळी वाजवू लागली.... जमलेल्या सगळ्या गावच्या अंगावरून सरसरून काटा आला....भेदरून सगळे मागे सरकले..
उन्मादाने मरी बाई प्रत्येकापुढे थाळी वाजवत म्हणून लागली...

"तू बी मरनार , हा बी मरनार... वढ्याच भूत कुनाला सोडणार न्हाई..."

खदाखदा हसत मरीबाई निघून गेली. ... वर्षभरापूर्वी मरीबाई अशी नव्हती आणि पिंपळगावही असे नव्हतेच...

********************************************

पिंपळगाव तसं चांगलंच आडवळणाचं गाव... एका बाजूला निबिड जंगल ....दुसऱ्या बाजूला लांबच लांब डोंगररांगा. थेट संपर्क म्हणावा तर फक्त एकट्या वडगावशी... बोडक्या पठारावरून पल्याड पायवाट दाट झाडीतून जायची ती उतरली की वडगावचा रस्त्या लागायचा...त्यापुढे मोहंगाव मग पानोळा ... पानोळा मोठं तालुक्याचं गाव ..त्याच्या पुढे हाय वे लागायचा...काही सामान आणायचं झालं तर पानोळा गाठावा लागे. तसा पिंपळगावच्या दक्षिण दिशेला एक ओढा होता ... त्याला बारमाही पाणी असायचं पण सहज ओलांडून जाता यायचं... पावसाळ्यात मात्र तिकडे कुणी फिरकायचा नाही पाण्याला फार ओढ होती... शिवाय जवळच डोंगर म्हणून पाऊस धो धो कोसळायचा. हा ओढा ओलांडला आन् चार शेतं पालथी घातली की थेट पानोळ्याचा रस्ता गाठता यायचा. मग पिंपळगावचे तरणे गडी ओढा ओलांडूनच पानोळा गाठत...काय हवं नको समान आणत ,माल विकत आणि संध्याकाळी पुन्हा ओढा ओलांडून माघारी येत. 

पिंपळगावची लोकवस्ती फार नव्हती ... बहुतेक शेतकरी, काही मेंढपाळ, गुराखी, कुंभार ... वगैरे कष्टकरी समाजाची वस्ती उताराच्या खालच्या अंगाला .. त्यांची छोटी बैठी घरे होती. गावाच्या वरच्या बाजूला मजबूत दुमजली घरे होती ... ही वस्ती पाटील, सरपंच , पोलीस पाटील, सावकार वगैरे धनिक लोकांची होती. गाव तसे सधन होते... पीक-पाणी उत्तम येत होते... जमीन सुपीक होती. गाव एकमेकांना धरून , एकोप्याने राहत होते.... शिवाय गावचे सरपंच आप्पासाहेब कोलते मोठं धुरंदर नेतृत्व होतं... एवढ्या आडगावात वीज, टीव्ही  सगळं आणलं ना गड्याने !...फार खटपट्या माणूस.. तालुक्याला सतत चकरा मारायच्या, नव्या प्रकारचे बियाणे , खते , सरकारी सुविधा मिळवायच्या, गावाचा विकास कसा होईल ? ह्या ध्येयाने हा माणूस झपाटलेला असायचा. गावापर्यंत पक्का रस्ता व्हावा म्हणून पार मंत्र्यांना गाठून अर्ज लिही, विनंत्या कर ह्या साऱ्या प्रयत्नात सध्या ते बुडालेले असायचे. पिंपळगावचा विकास , तिथली शांतता आणि गावातील एकोपा ह्या सगळ्यापाठी आप्पासाहेबांचा हात होता.

ओढ्याच्या शेजारी एका जुन्या दगडी वास्तूचा चौथरा होता. गावातील प्रेतांच्या दाहसंस्कारांसाठी त्या चबुतऱ्याचा वापर केला जाई. ओढ्याच्या शेजारी एकुलती एक झोपडी होती... मरीबाईची. मरीबाई ढोर... कान्या ढोराची बायको... कान्या परंपरेने प्रेतांच्या दहनासाठी उत्तरकार्ये करायचा... चिता रचणे त्यासाठी कोरडी लाकडे ठेवणे, प्रेताला शेवटचे तूप लावून तयार करणे, गोवऱ्या रचणे मग अस्थी गोळा करणे त्यातल्या निवडक पुढच्या विधींना देऊन  बाकीच्या सगळ्या राखेसह गोळा करून टोपल्यात घेऊन, पायी चालत जाऊन पुढच्या खोल डोहात टाकून येणे... अशी सगळी कामे त्याच्या वाडवडीलांपासून केल्या जायची. बदल्यात ओढ्याकाठच्या जमिनीचा तुकडा त्याच्या मालकीचा होता. ओढ्याकाठच्या जमिनीत भाज्या उत्तम पिकायच्या... त्यामुळे तसा तो सधन होता. पण त्याचं काम हे असं.. म्हणून तो आणि त्याच कुटुंब ओढ्याकाठी रहायचं. त्याची झोपडी मजबूत होती... शिवाय चार शेळ्या , 2 गाई, काही कोंबड्या असा सगळा गोतावळा होता. तशी गावात फार माणसं नव्हतीच... शठी सामाशी कुणीतरी म्हातारे खपायचे ... बाकी त्याचा भाजीचा मळा आणि गुरं होतीच... भाज्यांना  आठवडी बाजारात तालुक्याला चांगला भाव मिळायचा. कान्या आणि मरीबाईची बरीच लेकरं मेली फक्त एक लेक वाचली सावित्रा... चांगला शहरातला श्रीमंत जावई पाहून कान्यानी तिचं लग्न लावून दिलं पण काय झालं कोण जाणे ?... तिचा नवरा मेला आणि सावित्राला सासरच्यांनी पांढऱ्या पायाची म्हणून परत पाठवले. ह्या धक्क्याने हबकी खाऊन कान्या ढोर जो बसला तो उठलाच नाही. आता त्याची सगळी कामे त्याची बायको मरी करू लागली... मरी निडर होती आणि गावात दुसरी सोयही नव्हती... सारे गाव तिला मरीबाई म्हणायचे... मरी खमकी होती. तिच्या लेकीला सावित्राला तिने धीर दिला ... सावित्राला पुढे लेक झाली... सुंदरा तिचं नाव... आता ह्या तिघी त्या ओढ्याजवळ रहायच्या. ना कसली भीती ना स्मशानाचे भय... 

"ज्यांचा उभा जन्म मसणात गेलाय त्यांना काय त्याचं?"

मरीबाई म्हणायची. सावित्राची लेक सुंदरा तिचा जीव का प्राण होती... ती नावाप्रमाणेच दिसामासी जास्तीच सुंदर दिसू लागली होती... दहा वर्षे जेमतेम गाठले नाही तोच ती पौर्णिमेच्या चंद्रासारखी टपोरी दिसत होती. गोरापान रंग, मोत्यागत शुभ्र दात... हसली की चांदण सांडायचं. काळेभोर टपोरे डोळे आणि वयाच्या मनाने अधिक झपाट्याने वाढलेला उमलता देह....तिला पाहून आता मरीची चिंता वाढू लागली होती... 

"देवा! ह्या चंद्राच्या तुकड्याला माज्या गरीबाच्या झोळीत का रे बाबा टाकलं..."

आता तिच्यासमोर वेगळीच समस्या निर्माण झाली होती.. गावातली तरणी टवाळ पोरं उगाचच तळ्याकाठी चकरा मारायला लागली होती... वयात येण्यापूर्वीच उमललेल्या ह्या कळीचा गंध नको त्या लोकांपर्यंत पसरला होता... सुंदरा बिचारी भाबडी होती... ना नजरा तिला कळत होत्या ना स्वतःच्या देहातले बदल... मनानं पोरचं होती ती... कुणी शहरातून काहीबाही आणत... सुंदराला जवळ बोलवत. एखादा गडी चॉकोलेट देई, कुणी नवं कापड पुढे करी... पण मरीची करडी नजर असायची म्हणून जरब होती. मरी एकदिवस वैतागून म्हणाली...

"ह्या असल्या मानसांपरीस ओढ्याची भूतं बरी!"

एकदिवस कहरच झाला.... काही माजोरडी श्रीमंत पोरं पानोळ्याहून चिक्कार दारू ढोसून आली आणि त्यांनी सुंदराला उचलून नेण्याचा प्रयत्न केला... मरी आणि सावित्रा घरी होत्या म्हणून बरं! बेदम ठोकलं पोरांना... त्या रात्री मरी सरपंच आप्पासाहेब कोलतेंच्या वाड्याला गेली... तिने आपल्याला मदत मिळावी म्हणून पदर पसरला. आप्पासाहेबांनी त्या टवाळांच्या घरी जाऊन चांगलं धमकावलं... पुन्हा असं काही करणार नाही अशी ग्वाही गावातल्या लोकांकडून चावडीवर घेऊनच मरी बाई घरी परतली.

काही दिवस ह्या सगळ्याच्या धाकाने शांततेत गेले... आता मरीच्या सुंदराच्या वाट्याला कुणी जायचं नाही. एक दिवस मात्र काळोख घेऊनच उगवला.... आठवडी बाजाराला न्यायला बऱ्याच भाज्या तयार होत्या... झपाझप पावलं टाकीत ओढा ओलांडून मरीबाई पल्याड गेली... चार शेतं तिने काही मिनिटांत पालथे घातले. भल्या पहाटे निघून सकाळीच तिने पानोळ्याचा बाजार गाठला. तिच्या भाज्या ताज्या रसरशीत असायच्या... दोन तासांत पार टोपली रिकामी झाली... ह्या वेळी चिक्कार भाव येता झाला... मरीच्या आयुष्यात स्वतःचं होतंच काय. तिनं आपल्या लेकीला सावित्राला छानसा खण घेतला... तिच्या मनात आलं...

" बिचारी पोर माजी! तरुनपनीच नवरा गेला काही हौसमौज जाली न्हाई.तरी कद्दी काय मांगीतलं न्हाई का हट धरला न्हाई "

"सुंदरानं बजावलं होता येताना जिलेबी आन म्हून..."

त्या पिल्लावर मरीचा खूपच जीव होता तिच्यासाठी जिलबी आणि शेव बांधून घेत ... मरी परतेच्या वाटेला निघाली तोच सोसाट्याचा वारा सुटला... अचानक काळे ढगांचे राक्षस नाचू लागले... विजांच्या थाळ्या कडकडा वाजू लागल्या आणि मुसळधार पावसाला सुरवात झाली... हा अवकाळी पाऊस घात करून गेला... कसाबसा एका टपरीत आसरा मिळाला तिला... आता ओढा ओलांडणे तर शक्यच नव्हते. तिने गाड्यांची चौकशी केली... टपरीचा पोऱ्या भला माणूस होता... तिला म्हणाला...

"म्हातारे ह्या वादळ वाऱ्यात कुठेतरी अडकशील? मुश्किल व्हील घरच्यासनी... त्यापरीस रात हिथ काढ ... पाऊस पहाटे थांबला की नींग..."

मरीला पटले त्याचे... त्याने तिला चहा आणि पावाचा तुकडा दिला आणि थकली भागली मरीबाई क्षणात झोपून गेली... सकाळी पाऊस थांबला होता सगळं शांत झालं होतं... पोऱ्याचे आभार मानत ती निघाली... ओढ्याला खूप पाणी असणार तो ओलांडणे अशक्य होते... मग मजल दरमजल करत मोहंगाव, वडगाव करत... पिंपळगावचा रस्ता तुडवत मरीबाई घरी पोहोचली... सूर्य माथ्यावर आला तरी गुरं दाव्यालाच होती... त्यांना ना चारा ना पाणी... क्षिणलेल्या तिने हातपाय स्वच्छ धुतले अंगणात बसकण मारत आवाज दिला...

"सावित्रा ए पोरी वाईच घोटभर चा टाक वं!सुंदरा... इ पिल्ला..."

आतून काहीच प्रतिसाद आला नाही तशी तिने आत धाव घेतली खोपटात कुणीच नव्हतं... 

"आता कुटं गेल्या असतील माय.. ह्या येळेला..."

मरी बाई जरा घाबरलीच... आणि आजूबाजूला धावत लेक आणि नातीला शोधू लागली....दोघींचा कुठेच पत्ता नव्हता... अखेर तिने गावात धाव घेतली दिसेल त्याला विचारत सुटली...

" माजी सावित्रा पायली का? माजी सुंदरी आलती का?"

शेवटी तिने सरपंचांकडे मदतीला म्हणून धाव घेतली... सरपंच आप्पासाहेब काही लोकांना बरोबर घेऊन  चहू बाजूंनी शोधायला निघाले... "पोर सुखरूप सापडायला हवी" त्यांचं मन देवाचा धावा करत होतं. ह्या सगळ्यांत संध्याकाळ झाली... मरीबाई आता घायकुतीला आली होती... एव्हढ्यात कुणीतरी ओढ्याच्या पल्याड झुडपात काहीतरी अभद्र दिसल्याचे सांगितले... सगळ्यांनी तिकडे धाव घेतली... मरीची लेक सावित्राचा देह काट्यांच्या झाडीत अडकला होता... देहावर बोटभर वस्त्र नव्हते... आणि जागोजागी ओरबाडल्याच्या खुणा होत्या...  पाहताच दगड मनाच्या पुरुषमंडळींनी सुद्धा तोंड फिरवले... म्हातारी मरीबाई गपगार झाली ...ती गोठून गेली होती. काय हा अमानुषपणा.... बघणाऱ्याचे काळीज कापत होते. कुणीतरी आणून कपडा टाकला आणि देह गुंडाळून चौथऱ्यावर टेकवला... एव्हढ्यात ओढ्यात एक प्रेत तरंगत असल्याचे कुणीतरी सांगितले....  सुंदरा! सुंदराच होती ती... तिचा देह देखील विवस्त्र होता ... तिच्या गोऱ्यापान देहावर जागोजागी हिरव्या निळ्या खुणा दिसत होत्या... तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार झाले असावेत... आता मात्र मरीबाईने मूठ तोंडावर नेली आणि ठो ठो बोंब मारली.... तिला पुरतं वेड लागलं होतं.... गावातल्या लोकांकडे पाहून ती शिमगा करू लागली....

"कुनाचं भलं व्हनार न्हाई मेल्यांनो !... मी होऊ द्याची न्हाई. . काय बिघडवलं होतं माह्या लेकरांनी ... एकेकाला पाहून घेईल...वढ्याचं भूतं येईल न्यावं दिलं"

म्हातारीचं पार मानसिक स्वास्थ्य बिघडलं होतं... गावप्रमुख म्हणून सरपंच्यांनी अग्नी दिला. त्या बिचाऱ्यांच्या केसेस कोण नोंदवणार आणि तालुक्याला त्यासाठी कोण जाणार?? गावातल्या पंचांनी असा निष्कर्ष काढला की गावाबाहेरच्या काही लोकांचे किंवा लुटारूंचे हे काम असावे, नंतर ते ओढ्यापलिकडे पळून गेले असावेत . शेवटी गरीबाचं मरण स्वस्त असतं हेच खरं...हळूहळू तो विषय मागे पडला... मरीची अवस्था फारच वाईट होती... केसांच्या जटा, अंगावर मूठभर मांस नाही, हाडांचा सापळा झालेली मरी भयंकर दिसायची. आता कुणी गेलंच तर शेजारच्या वडगावातून माणसं येत आणि क्रियाकर्म होत... मरी आणि तिच्या कुटुंबाची गरज गावाच्या दृष्टीने संपली होती. 

बरोब्बर सहा महिन्यांनी... एका शनी अमावस्येला मरी ओढ्याच्या काठावर बसून काहीतरी करत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले... पहिले तिच्या ह्या वेडेपणाकडे। ओढा ओलांडून येणाऱ्या गावकऱ्यांनी दुर्लक्ष केलं पण नंतर तिची कसलीशी पूजा चालू असल्याचे पाहून गंमत म्हणून बघत बसले.... मरीने ओढ्याच्या भूताचे आवाहन केले... आणि जाळ पेटवला... त्यात काय घातले कुणास ठाऊक?? पण त्याचा करपट वास उभा आसमंत भरून राहिला.मग मरीने एक काळा बोकड आणून त्याचा बळी दिला ... रात्र चढत जाऊ लागली तशी तिने आपले कपडे उतरवले आता विवस्त्र हाडांच्या देहावर तिने त्या बोकडाचं रक्त फासलं... आणि हातातली थाळी वाजवत भयाण बोंब मारली.... तिचा हा अघोरी प्रकार पाहून सगळे प्रेक्षक जीव मुठीत धरून आपापल्या घराच्या दिशेने पळत सुटले...

क्रमशः......
✒️ यशश्री रहाळकर
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

ओढ्याकाठचं गूढ 2

"मरीबाईने ओढ्याचे भूत जागे केले" ... लोक म्हणून लागले. आता मरीबाई दिवसरात्र ओढ्याच्या काठावर रहायची ... ऊन वारा पाऊस सगळं सगळं तिचा कृश सुरकुतलेला देह मुकाट पचवत होता. ती बरेचदा लोकांना कुणाशी तरी बोलत बसलेली दिसायची... पण समोर कुणीच नसायचं... काही लोक म्हणायचे ,"मरीच्या डोक्यावर परिणाम झालाय.. वेड लागलंय तिला..." काय खरं होतं कोण जाणे?? पण सावित्रा आणि सुंदराच्या अश्या अघोरी मृत्यूनंतर ती माणसांतून उठली होती. साहजिकच होतं ना ते! त्या दोघींवर ज्या कुणी अत्याचार केले होते तो नक्की सैतानाच्या काळजाचा असणार ह्यात शंकाच नव्हती. सावकाराचा लेक बज्याच्या मृत्यूनंतर लोक ओढ्याकडून जायला भिऊ लागले..... दुसरे असेही कारण होतेच की गावातल्या बहुतेक तरण्या बाप्याचा सुंदरा नावाच्या फुपाखरावर डोळा होता... प्रत्येकाने कधी ना कधी तिला भुलवायचा प्रयत्न केला होताच. न जाणो  ओढ्याचं भूत मानगूट धरायचं.... लोकांनी ओढ्याची वाट आता फक्त दिवसा उजेडी वापरायला सुरुवात केली... तिन्हीसांजेला देखील तिकडून कुणी यायचे नाही... पावसाळा सुरू झाला आणि ओढ्याची वाट तशी निर्मनुष्य झाली.

एका संध्याकाळी पाटलांचा किशा ओढ्याकाठाकडून पळत , बोंब मारत गावात शिरला... पळून पळून त्याच्या तोंडाला फेस आला होता. मरण जवळून पाहिल्यागत तो भेदरला होता.  काट्याकुपाट्यातून धावून त्याचे हात पाय रक्तबंबाळ झाले होते...घामाने त्याचे कपडे ओले चिंब झाले होते, भीतीने त्याची बोबडी वळली होती ... ओढ्याच्या दिशेने बोट करून तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतानाच त्याचे हात पाय वाकडे झाले आणि तो फेफरं येऊन कोसळला. चार लोक  त्याला उचलून घरी घेऊन गेले... तो बोट दाखवत होता त्या दिशेला  काही लोक काठ्या आणि कोयते घेऊन निघाले....गावात लाईट असले तरी ओढ्याकाठची वाट आणि झाडी अंधारात बुडलेली असायची... तिथे रात्री कोण कश्याला जातोय मरायला?? 
रात्र काळीभोर होती. कसाबसा कंदिलाचा प्रकाश वाट दाखवत होता... रातकिडे किर्रर्र  ओरडत होते... नुकताच दुपारी पाऊस पडून गेलेला होता आणि सगळीकडे चिखल झाला होता... त्यातून वाट काढत जाणाऱ्या लोकांच्या पायताणांचे रपाsकs  रपाsकs असे आवाज येत होते... अचानक रानटी कुत्री कुठून तरी उडी घेत ओढ्यापल्याडच्या दाट झाडीत दिसेनाशी झाली.... किती कुत्री होती कुणास ठाऊक? पण शोधणारे लोक भयाने चार पावले मागे सरकली आणि थबकून अंदाज घेऊ लागली. ऊ ssss मं ऊ ssssss घुर्र घुर्र ...  रानटी कुत्र्यांचा आवाज दूरवरून ऐकू आला तशी मंडळी पुढे सरकली... त्यानंतर त्यांनी करवंदाच्या जाळीत जे पाहिलं... ते पाहून सगळ्यांना धडकी  भरली... सगळे डोळे चोळत पुन्हा पुन्हा खात्री करत होते... पाहतोय हे खरं आहे की भास??? अचानक त्यांच्यातला एक गडी भीतीने पांढरा पडला , नेमका कंदील त्याच्या हातात होता तो तसाच टाकून बो बो बो बोsss अशी तोंडावर मूठ आपटत त्यानी मागच्या मागे  गावाकडे धूम ठोकली.त्याने तसाच सोडलेला कंदील खळकन फुटला आणि पुन्हा एकदा किर्रर्र अंधार झाला.... 

आता उरलेल्या चार -सहा डोक्यांना काही दिसेना ... जेमतेम हाताभर अंतरावर असलेल्या करवंदाच्या जाळीत लहानु मरून पडला होता... त्याच्या देहाचा चेंदामेंदा झाला होता... रानटी कुत्र्यांनी त्याच्या देहाचे इतके लचके तोडले होते की... त्याचे प्रेत पाहूनही शिसारी यावी. आता त्या भयाण अंधारात सगळेच वाट फुटेल तिकडे पळत सुटले काही ठेचकाळले काही घसरून चिखलात पडले ... एकच गलका झाला... एव्हढ्यात हातात कंदील धरून कुणीतरी त्या दिशेला येतांना दिसले आणि सगळ्यांच्या जीवात जीव आला.... तो मिणमिणता प्रकाश जसा जवळ येऊ लागला तसं त्यांच्या लक्षात आलं... ही कंदील धरलेली व्यक्ती म्हणजे मरीबाई आहे. त्या काळ्याभोर रात्री तिचा तो केस पिंजारलेला अवतार अधिकच धडकी भरवणारा होता.... मरीने सगळ्यांकडे सहेतुक पाहिले कंदील त्यांच्या ताब्यात दिला आणि ती उलट पावली ओढ्याच्या दिशेने चालू लागली... दहा पावलं जात नाही तोच तिने हातातली थाळी जोरजोरात बडवले आणि कर्कश्य आवाजात ओरडली...

"वढ्याच्या भुता न्यावं केलास रे ! तू बी मरनार हा बी मरनार..."

मरी खदाखदा हसत धावत सुटली. मंडळी थकली भागली कशीबशी गावात पोहोचली... सावकाराच्या बज्या नंतर दुसरा बळी लहानु देशमुखाचा पडला होता. रात्री त्या प्रेताला उचलून आणायला कुणीच तयार नव्हतं... सकाळी जरा उजाडल्यावर गोण्या जोडून झोळी करून कसंबसं प्रेत चौथऱ्यावर ठेवलं.... देशमुख कुटुंब विलाप करू लागले....मात्र सावकारासारखे हे लोक गप्प बसणारे नव्हते. देशमुखांचे एकूण चार पोरं त्यातला हा धाकटा... ह्या असल्या भूताच्या कहाण्यांवर त्यांचा विश्वास बसला नाही. देशमुखांच्या मते , काही रानटी प्राणी माणसाच्या रक्ताला चटावले आहेत त्यांचा बंदोबस्त करायला हवा... गाव पंचायतीत ठराव पास झाला... फॉरेस्ट डिपार्टमेंट (वन खात्यात) तक्रार नोंदविण्यात आली... फॉरेस्टची दोन हत्यारबंद आणि चार माणसे अशी गाडी तैनात झाली... दहा दिवस त्या गाडीने सगळा परिसर पिंजून काढला पण जंगली कुत्रीच काय कोणत्याच प्राण्याचा मागमूस कुठेच नव्हता... विशेष म्हणजे ज्यांचा आवाज त्या दिवशी लोकांनी ओढ्याजवळ ऐकला, ज्यांना पहिल्याचा भास लोकांना झाला ते जंगली कुत्रे नव्हते ना त्यांच्या पावलांचे ठसे होते. दुरदूरपर्यंत जंगल दऱ्या डोंगर पालथे घातले तरी कुठेच काही आढळले नाही. अखेर तसा अहवाल सोपवून फॉरेस्टची गाडी  जिल्ह्याला परत फिरली.

त्या रात्री लहानु देशमुखाच्या सोबतीला पाटलाचा पोरगा किशा सुद्धा होता. मात्र त्या दिवसानंतर किशाचं काहीतरी बिनसलं होतं. तो दिवस रात्र आढयाकडे नजर लावून बसलेला असे. खाण्या- पिण्यातून, मौज-मजेतून त्याचे चित्त केव्हाच उडाले होते. दिवस अन् दिवस तो अंथरुणातून उठायचा सुद्धा नाही... अगदी बळजबरी उठवला तरच कसाबसा चार घास खायचा... लोक म्हणत होते त्याला ओढ्याच्या भुताने झपाटलं. देशमुखांच्या पोरांनी त्याच्याकडून माहिती घ्यायचा प्रयत्न केला पण त्या रात्रीची आठवण जरी काढली तरी तो हातपाय वाकडे करायचा आणि त्याला फेफरे येई. हळूहळू तो स्वतःशीच बोलू लागला... जसजशी अवस जवळ येऊ लागली तसतसं त्याचं नियंत्रण हरवलं तो जोरजोरात बरळू लागला

"वढ्याच भूत आलं.. मला नोको मारू बाबा! पाया पडतो तुज्या...  वढ्याच्या भुता म्या दोषी हाय ....व्हय म्या गुना केलता ..  पन मले सोड पुन्यादा न्हाई.. न्हाई करनार .. सोड ! सोड! माले"

....... किशा किंचाळू लागला की आक्रमक होई त्याला बांधून ठेवावं लागे... अखेर अवसच्या मध्यरात्री त्याने त्याच्याच घरांत गळफास लावून घेतला ... तिसरा बळी गेला होता. पहिला सावकाराचा बज्या, दुसरा देशमुखाचा लहानु आणि तिसरा पाटलाचा किशा... लागोपाठ 3 अवस.  त्याच्या मयतीला मरीबाई आली तशी सगळ्यांना धडकी भरली पण मरीने थाळी वाजवली नाही की आरडाओरडा केला नाही... ती  लांबूनच एकटक जळणाऱ्या चितेकडे पाहत होती.... जसजशा लाल रसरशीत ज्वाळा पेटू लागल्या तसतसा तिचा चेहरा काळवंडून गेला... म्हातारी तरातरा उठून गावाच्या दिशेने चालू लागली.... कुणीतरी टोकलं..

"अय s वय येडे कुटं निंघाली तरातरा... "

मरीबाई वळली... आणि विचारणाऱ्याला धस्स झालं. तिच्या डोळ्यांत चितेच्या ज्वाळा पेटल्या होत्या जणू...तिचे पिंजारलेले केस वाऱ्यावर उडू लागले आणि मरी किंचाळली...

"निवेद... निवेद लागतो वढ्याच्या भुताला. आज शिकार चुकली त्याची..."

चितेकडे पाहत म्हातारी गरागरा डोळे फिरवत होती... गावात जाऊन तशीच ती तरातरा ओढ्यावर गेली... काळं कोंबडं असावं... त्याची मानगूट पिरगळली जाऊन ते केकाटत होतं... सगळे लोक भयाने थरथरत हा तमाशा लांबूनच पाहत होते... अखेर कोंबड्याचा आवाज बंद झाला.... म्हातारीने जाळ पेटवला.... आणि ती भेसूरपणे  थाळी वाजवत आगीभवती नाचू लागली...

"वढ्याच्या भुता... न्यावं कर!  न्यावं कर!..."
म्हणून हाकारू लागली.

क्रमशः-.....
✒️ यशश्री रहाळकर
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

ओढ्याकाठचं गूढ 3

पाटलाच्या किश्याची जेमतेम तेरवी झाली असेल नसेल... देशमुख मंडळी पाटलांच्या घरी आले. देशमुखांच्या पोरांच्या डोक्यावर आपल्या धाकट्या भावाचा लहानुच्या मृत्यूचा बदला घ्यायचा विचार पक्का होता. सावकार सुद्धा ह्या बैठकीत होते .. पाटलांची 2 मोठी पोरं देशमुखांची तीन... तावातावाने बोलत होती.

"म्या काय म्हंतो... आपुन गप का बसायचं?? "

"काय कराचं मंग आता?"

"वढ्याचं भूत बलीवते का? त्याच वढ्यात बुडवू तिले"

"तरंगत यायची बुढी आन् भूत व्हायची"

"भूत बीत काय नसतं रं गडयांनो..."

"पन गावात तर समदे म्हनतात तिने भूत बलवलं"

"त्यापरीस तिने चेटूक केल्याचा दावा करू आन् दगडानं चेचून मारू त्या चेटकीनीला..."

"व्हय व्हय!"

"व्हय हां"

ह्या गरमागर्मीचा आणि गोंधळाचा आवाज माजघरात निजलेल्या पाटलांच्या कानावर पडला... तसे ते तरातरा बाहेर आले आणि संतापून म्हणाले

"आरे ए! खूळ लागलं काय तुमास्नी?? गपा sss एकदम गपा..... काय हे सावकार ह्या बावळ्यांच्या नादी तुमी बी लागलात आं ?"

ओसरीत एकदम शांतता पसरली... दरडावून पाटलांनी विचारले

"काय रे वावरात काम न्हाईत का?  आं... चला कामाला लागा आपापल्या... जी काई रग हाय ना वरी आल्याली ती घाम गाळून जिरवा... जावा .. जावा . निंगा."

सगळे खाली माना घालून जाऊ लागले... सावकारही उठले आणि थकल्या पावली निघाले तसे पाटलांनी त्यांना दरडावले...

"सावकार! तरून पोराहीच्या डोसक्यात काही बाही भरवू नका.... तुमचा ल्योक गेला... माहाबी गेलाय... पन तुमाले कुनी न्हाई दुसरं आगापिच्छा... मला माह्ये दोन पोरं राखायचे हायेत...ईनंती करतो म्या..."

म्हणत डोळे पुसत पाटलांनी सावकारापुढे हात जोडले.सगळे मार्गस्थ झाले तसे पाटील ओसरीत चकरा मारू लागले... मनातून तेही भयंकर अस्वस्थ होते. सावकार हे सगळं होऊन गप्प बसणार नव्हते... दुसऱ्या दिवशी त्यांनी देशमुखांकडे बैठक लावली... पाटलांच्या पोरांना तिथेच बोलावून घेतलं... स्वतः देशमुख सूड घ्यायला उत्सुक होते... खरंतर तिथे बाह्या सरसावून बसलेल्या सगळ्यांना सूड घ्यायचा होता पण सूड घेणार कुणाचा?? न दिसणाऱ्या ओढ्याच्या भुताचा की अर्ध्या गवऱ्या मसणात गेलेल्या मरीबाईचा.... सावकार कळवळून म्हणाले...

"देशमुख सायेब... तुम्हाला देवानं चार लेकरं देली.एक गेला... दुख हायेच पन तुमी तीन पोरांकडं पाहून दिवस काडू शकता... म्या काय करू... माजा एकुलता एक पोर नेला वढ्यान... झोप लागत न्हाई ... रातच्याला डोळे मिटले की पोरगं दिसतं वड्याकाठी आरडत असतं जिवाच्या आकांतानं... काय करू सांगा?"

सावकार कोसळून ढसाढसा रडू लागले.... देशमुखांची पोरे चवताळून म्हणाली..

"आण्णा! काईतरी केलं पायजे... आपली पोरं मारली जाताहेत.. आपुन मुकाट बसायचं का? "

"आपुन बी जीव घिऊ ..आपुन काय बांगड्या भरल्या न्हाई..."

देशमुख ऐकत होते त्यांना सगळं मान्य होतं पण प्रश्न असा होता की मारायचं कुणाला? अंगावरील हाडांच्या सापळ्यावर कातडं उरलेल्या म्हातारीला मारणं खूपच सोपं होतं... पण तिला मारून सूडाची आग विझणार नव्हती.... शिवाय थेट खुनाची अलामत घ्या कश्याला ??पाटलाच्या धोरणी लेकानं सुचवलं...

"आपण तिला बहिष्कृत करू गावातून..."

नकारार्थी माना डोलावल्या सगळ्यांनी..

"त्यानं काय बी हुनार न्हाई ती तशी बी वढ्याकाटच्या जंगल झाडीत रायते.."

"तिला चांडाळीन ठरवू आन् गावले ठेचू द्या तिला दगुड हाणून..."

पाटलाचा लेक बोलला तसे सगळ्यांना स्फुरण चढले...

"व्हय व्हय!"

"हां हां! व्हय व्हय"

सगळ्यांनी एकसुरात होकार भरला.. देशमुखाचा लेक म्हणाला..

"आण्णा! कैच मुश्किल न्हाई हे... पंच मंडळी तुमीच तर हात! तुमी पाटील आन् सावकार झाले ना तीन पंच... ठराव मांडा चावडीवर..."

सगळ्यांना जोश चढला... देशमुखांनी मान डोलवली. दुसऱ्या दिवशी चावडीवर गाव सभा बोलवण्यात आली.. सारा गाव गोळा झाला... ज्यानी त्यानी आपापल्या पदानुसार , वजनानुसार जागा पकडली. सावकार आणि देशमुख आधीच येऊन बसले होते... पाटील आणि खोत येऊन टेकले.. सरपंच आप्पासाहेब कोलते येऊन बसले आणि सभा सुरू झाली. सरपंच आप्पासाहेब... देशमुखांकडे पाहून म्हणाले...

"सभा बोलवण्याचा हेतू आणि कारण सांगावं आपण."

देशमुख उभे राहिले, घसा खाकरून त्यांनी बोलायला सुरुवात केली..

"गावकऱ्यांनो... राम राम! गेले काही दिवस लै वंगाळ गोष्टी आपल्या गावामंदी घडून राईल्या हैत...  ही अशी तरनी पोरं वढ्याकाठी कुत्र्याच्या मौतीन मेली..."

देशमुखांनी आवंढा गिळला... पाटलांनी रागाने सावकारांकडे पाहिले ... हा विषय वाढवू नका असे स्पष्ट शब्दात सांगूनही त्यांनी ऐकले नव्हते. देशमुख पुढे म्हणाले..

"हे समदं वंगाळ वढ्याच्या मरीबाईन केलं हाय. .... म्हंजे तिनं करनी कवटाळा करूनश्यान हे केलं हाये! ती चांडाळीन हाये... असा ठराव आमी मांडत हावोत.."

हा तमाशा पाहून पाटलांनी डोक्याला हात मारून घेतला... नेमकं जे नको तेच पुढे उभं ठाकलं होतं. देशमुख आपल्या जागेवर बसले तसे सावकार  बोलायला उभे राहिले... 

"माजा पाठिंबा हाये...!"

त्यांनी मोठ्या आवाजात केलेली गर्जना ऐकून देशमुख आणि पाटील पोरांनी एकच गलका केला आणि मोठ्याने घोषणाबाजी सुरू केली... सगळ्यांना हाताने शांत बसण्याची खूण करत सरपंच उभे राहिले...

"ठराव मांडला हाय चवडीपुढं... न्याय व्हयीलच.. पन त्यासाठी दुसरी बाजू बी ऐकायला लागीन.."

सरपंचांचा शब्द पुरा होत नाही तोच पाटील पुत्र किंचाळले..

"आना रे धरून त्या थेरडीला... उचलून मोळी बांधून आना..."

सरपंचांचा चेहरा संतापाने लाल झाला . त्यांनी सहेतुक पाटलांकडे पाहिले... पाटील शरमेने खाली मान घालून बसले होते... सरपंचांनी वाघासारखी डरकाळी फोडली...

"उचलून आना... धरून आना ... आरारा! काय ही भाषा??  पाटील! .. आवरा तुमच्या पोरासनी... तरुण  रगत लैच उतू जायला लागलंय जनू..."

सगळा गाव भेदरल्या कोकरागत चिडीचूप झाला.पाटील नाही ,नाही ह्या अर्थानं खाली घातलेली मान हलवत बसले.
सरपंच पुढे नरमाईने बोलू लागले...

" आरं बाबांनो... तुमच्या आजीच्या वयाची हाय मरीबाई. तिचं काम हलकं समजू नका... तुमच्या माज्या समद्यांच्या पितरास वाटला लावलं हाये तिच्या कुळवंशानी... तुमच्या माज्या आज्या पंज्याची राख सावडली हाये.."

सगळ्या गावकऱ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या... बाया बापड्यांनी डोळ्याला पदर लावला. सरपंच तांब्या भांड्यातलं पाणी घटाघटा प्यायले.... आणि मवाळ शब्दात ग्रामसेवकाला म्हणाले..

"दिना s जा बाबा!... म्हातारीला सांग चावडीवर बलवलं हाये म्हून."

दिना सुसाट निघाला तो थेट म्हातारीच्या दारात उभा राहिला ... पण म्हातारी खोपटात असायची कुठे? त्याने तिला  आजूबाजूला शोधलं  तशी ती ओढ्याच्या काठावर शून्यात नजर लावून बसलेली दिसली. दिना भीतभितच तिच्यापाशी गेला आणि म्हणाला..

"मरीआय चाल ! तुले चावडीवर बलावलं हाये."

म्हातारी गंभीर होती... पण पार वाळून गेली होती.. काठीच्या आधाराने कशीबशी उठायचा प्रयत्न करू लागली... दिनाचे डोळे भरून आले... त्याने हाताला धरून तिला उठवलं... म्हातारी दोन मिनिट खोपटापाशी थांबली आत गेली आणि लुगडं चापून नेसून, केस नीट बांधून दोन्ही खांद्यावर पदर घेऊन बाहेर आली... हळूहळू काठी टेकत दिनाच्या आधाराने चावडीच्या दिशेने चालू लागली.एव्हाना चावडीवर चांगलाच गोंधळ माजला होता... सगळे एकमेकांच्या कानाला लागून खुसफुसत होते. पाटलांनी कोपऱ्यात घेऊन सावकाराला दबक्या आवाजात दाटला...

"नग नग जीव तोडून सांगितलं... पन तुमची अक्कल कुटं श्यान खायला गेलती कुनास ठाऊक?? आता उरल्या सुरल्या इज्जतीचे चारचौगात वाभाडे काडा.."

सावकार अविश्वसनीय भाव चेहऱ्यावर आणत पहात होते. पाटलांचा मुद्दाच त्यांना कळला नसावा. एव्हढ्यात खालच्या आळीतला धनगराचा सोपान उठून उभा राहिला... ह्या लोकांना मरीबाई आणि कुटुंबाविषयी माया होती. बरेचदा त्यांच्या शेळ्या मेंढ्या मरीच्या जीवावर सोपवून दोन कामे ते करून घेत. सोपान हात जोडून म्हणाला..

"चावडीला दंडवत! पंच मंडळी... आमी गरीब मानसं आमी काय बोलनार?? तरीबी यक मनातलं मांडितो गाववाला म्हनून... मरी म्हातारी कुनाचं वाईट करनार न्हाई... मी काय तिला चांडाळीन मानत न्हाई... "

"व्हय व्हय!" च्या सुरात अचानक वाढ झाली. कुंभाराचा नामा उठून म्हणाला..

"चावडीला दंडवत! माज्या लेकराची बाधा उतरवली मरीबाईनं... आमच्यापैकी कित्येकांची लेकरं तिच्या मुळे जिती हायेत... मरी कुनाला मारनार न्हाई.."

बायाबापड्या एका सुरात मरीबाईला पाठिंबा देऊ लागल्या. एकच गलका झाला. देशमुख आणि सावकारांच्या तोंडात मारल्यागत झालं. गावातले सगळ्यांत वयोवृद्ध रामजीबुवा थरथरत उठले आणि म्हणाले...

"दंडवत जी!  मरीच्या आधी तिच्या धन्याच्या ..कान्याच्या दोन पिढ्या मी पायल्या हाये... असला वंगाळ परकार कंदी कुनी केला न्हाई.. आता येडी झालीये बिचारी... कुनीबी व्हयील जी... तिच्या आयुक्षाची माती जाली... लै वंगाळ जालं.. "

च्याक् च्याक् ! सगळे चुचकारले... सुस्कारे, उमाळे ह्यांनी वातावरण भरून गेलं. एव्हढ्यात मरी तिथे पोहोचली... चालून चालून धाप लागली होती तिला... तिने लांबून चावडीला लवून दंडवत घातला... आपली जागा ओळखून गावातील लोकांपासून लांबच्या दगडावर टेकली... कुणीतरी पाणी पुढे केलं... घटघटा तांब्याभर पाणी ती प्यायली. आता चावडीच्या कामकाजास सुरुवात झाली.
सरपंच उठून उभे राहिले त्यांनी बोलायला सुरुवात केली...

"तर मरीबाई पंचमंडळींनी तुझ्यावर आरोप केला हाय की तू चांडाळीन हायेस... आणि काळी शक्ती वापरून त्याहीची पोरं... सावकाराचा बज्या, देशमुखाचा लहानु आणि  पाटलाचा किशा... ह्यांना तू ठार मारलं हाये... ह्यावर तुज काय म्हननं हाये... तुला तुजी बाजू मांडन्याचा पूर्न अधिकार आहे... "

घायकुतीला येऊन देशमुखांचा पोरगा ओरडला...

"ती येडी हाये तिला काय इचारता...?"

सरपंच रागाने डोळे मोठे करत म्हणाले... 
"चावडीच्या कामात अडथळा आननाऱ्याला हितुन पूडं शिक्षा केल्या जाऊ शकते... चावडीचा आदर न्हाई तर बलावली  कश्याला?"

बिळातल्या उंदरागत पोरगा शांत बसला...
सरपंच मरीकडे वळून म्हणाले ...

"हां! मरीबाई तुमी बोला..."

मरी काठी टेकत धीरगंभीरपणे उभी राहिली... पूर्ण ताकद एकवटून ती बोलू लागली..

"मायबाप चावडीला दंडवत!" रितीनुसार मरी हात जोडून  कमरेतून वाकली... आवाजात नम्रपणा आणत ती म्हणाली..

"एक इनंती हाये जी...म्या कुनाचा जीव घेतला असन अस ह्यांना वाटत आशिन तर आदी मी तो का घेतला अशिन ते सपष्ट करावं ..."

सगळा गाव तिचा तो अवतार , आवाजातला आत्मविश्वास पाहून गपगार झाला.. ती पुढे म्हणाली...

"म्हंजे मला असं सांगा मंडळी म्या काहून करीन असं काही वंगाळ... कुनी उगा कुनाचा जीव घेईन का? न्हाई ना . मंग मायबापहो ! तुमाले असं का वाटलं म्या  जीव घेतला..."

"बराबर आहे बराबर आहे " ह्या आवाजांनी जोर धरला.देशमुख उठून उभे राहिले आणि म्हणाले..

"तू वढ्याची भुतं पूजतेस, त्यांना बलावते , बळी देतीस..."

"होय बापा! माजा देव हाये तो.मी मसनात जलम घेतला मसनात रायते... वड्याची भुतं आमची देव हायेती.. पूर्वापार पूजतो आमी त्यासनी... म्हनून तर आजवर वढ्यात पडून कुनी वाहून गेल न्हाई.. वढ्याला पूजतो म्हनून जीव घेतो असं नस्ते लेकरा...!"

म्हातारी सगळ्यांना कोळून प्यायली होती... ती खरंच वेडी होती की नव्हती कोण जाणे? इतके व्यवस्थित उत्तरं देत होती की सगळे लोक तिलाच पाठिंबा देऊ लागले.. सावकार एकदम आक्रमक होत होत्याचं नव्हतं बोलून बसले...

"तुज्या सुंदराला आमच्या पोरांनी नाशिवलं असं तुले वाटत अशीन...."

चावडीवर भयाण शांतता पसरली... म्हातारी  मरी चेहऱ्यावर वेडगळ हसू आणत म्हणाली...

"मला असं वाटत अशिन असं तुमास्नी का वाटत हाये?? म्हंजी चावडीने तर निवडा केलता की बाहेर गावची मानसं, कुनीतरी लुटारू असतील माझ्या लेकरांना मारणारी मानसं... मंग त्याच मानसांनी तुमच्या पोरासनी कशावरुन नशीन बाबा मारलं?"

आता लोक बसल्या जागेवरून ओरडू लागली...

"बराबर हाये! धरा त्यासनी लुटारू हायेती धरा!धरा!"

सरपंच उठून उभे राहिले... आणि एकच शांतता पसरली...

"पंचमंडळी... आरोप करणाऱ्याकडे काही पुरावा हाये का?"

नकारार्थी माना डोलावल्या गेल्या... शेवटी पंचांचे मत मागितले गेले...कुणाकुणाला हा आरोप मान्य आहे अशी विचारणा झाली.. पंचमंडळींपैकी फक्त सावकार आणि देशमुखांनी पाठिंबा दिला... 3 विरुद्ध दोन असा हा आरोप फेटाळून लावण्यात आला... मरीबाई हात जोडून उभी राहिली आणि तिने पुन्हा एकदा बोलण्याची परवानगी मागितली.... पाटीलाचं तोंड काळ ठिक्कर पडलं होतं..

" मायबाय चावडी...गावकऱ्यांनो, मी वढ्याच्या बाजूला रायते आता वय जालं रातची झोप बी येत न्हाई... बशेल असते आपली वढ्याकाठी...  काही महिने लोटले आशिन... आठ -धा  लोक हुते तांडेवाले ... लाठ्या कोयते, इळे घेऊन आलते....त्यांची पोर आपल्या गावातून कुनीतरी उचलली हुती म्हने..."

अचानक गावातली कुजबुज वाढली... सरपंचांनी लोकांना आश्वस्त केलं... मोहंगावला तांडे उतरले आहेत...तिथे जाऊन त्यांना गाठून आपली आठ दहा लोक ह्या प्रकरणाची नीट चौकशी करतील आणि खरंच जर तसा काही प्रकार असेल तर दोषींना नक्कीच कडक शिक्षा होईल. चावडी बरखास्त झाली... म्हातारी विजयी हास्य फेकत आपली काठी टेकत ओढ्याच्या दिशेने निघाली.

क्रमशः .......
✒️ यशश्री रहाळकर
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

ओढ्याकाठचं गूढ ..... अखेर

चावडीवरच्या सगळ्या गोंधळानंतर  अनेक प्रश्नांना वाचा फुटली. आजवर दबल्या आवाजात बोलणारा कष्टकरी.. खालच्या आळीतला वर्ग आता उघडपणे बोलू लागला. प्रत्येक चौकात, प्रत्येक पारावरच्या बैठकीत हाच विषय पानासारखा चघळला जाऊ लागला. खरेतर गावातील काही सधन दांडगट मुलांचा त्रास बायाबापड्या गेले कित्येक दिवस खालमानेने झेलत होत्याच... तो संताप आता खुलेपणाने व्यक्त होऊ लागला. इकडे पाटील रात्रभर अस्वस्थ होते... पिंजऱ्यात अडकलेल्या वाघागत अंगणातल्या अंगणात ते गरागरा फेऱ्या मारू लागले. त्यांची दोन्ही पोरे नजर झुकवून त्यांच्यासमोर उभी होती.

"बापाला तिरडीवर नेल्याशिवाय तुमच्या मनाला काही गोड लागनार न्हाई...  नै का?"

एव्हाना पोरांच्या झुकलेल्या नजरांबरोबर मानाही खाली गेल्या....त्यांच्या अंगावर संतापाने धावून जात पाटील किंचाळले..

"ह्या भानगडीत पडू नका ... बजावलं व्हतं तुमास्नी... ऐकाया येत न्हाई का कुळबुडव्यांनो! ...आदी त्या किश्यानी समदा इस्कोट केला... त्यो मेला तरी नाचतोय उरावर.... ते काई न्हाई आता माहा जीव घ्या ... मारून टाका एकदाच म्हंजी म्या तरी सुटन ..."

पोरांना आपले काय चुकले ते अजूनही उमजत नव्हते. तेव्हढ्यात तिथे सावकार आले आणि पाटलांना समजावू लागले...

"आरारा! तरण्या पोरांवर असा हात उचलू नका पाटील... सबुरीने घ्यावा..."

आता सगळ्या रागाला सावकारांच्या दिशेने वळवत पाटील म्हणाले...

"हां! सावकार ... तुमी तर एक शबुद बोलू नका... तुमास्नी ईनंती केल्ती तरी बी तुमी नेमकं त्येचं केलं.... आता समदं हाताबाईर गेल्यावर.... बोलायले काईच नै उरलं..."

पाटलांच्या सुरातला हताशपणा त्यांना लपवता आला नाही... मानसिक ताणामुळे थकून त्यांनी बसकण मारली..

"काय केलत तुमी हे??"

म्हणत पाटलांनी डोळे पुसले.. खाजगी आवाजात आजूबाजूचा कानोसा घेत ते बोलू लागले..

" सावकार !आपली लेकरं फार सगुनाचे पुतळे व्हते असं वाटते का तुमास्नी?? देशमुखांच्या शेतातल्या वाड्यावर काय रासलीला चालायची ... माहीत नव्हतं का??"

सावकार काहीतरी भयंकर ऐकल्याप्रमाणे डोळे फाडून ऐकू लागले...

"गेलेल्या मानसा बद्दल वंगाळ बोलू नई म्हनतात पर काय करू सांगा! तुमाले गप रावा सांगून कळतच नव्हतं... त्यात भर चावडीवर मूर्खागत बरळल्यात... "आमच्या पोरांनी नाशिवल असं वाटत अशिन" ...

सावकार अविश्वासाने म्हणाले...

"न्हाई न्हाई ! माजा बज्या असं वंगाळ काम करनार न्हाई"

"काय सावकार! बारा गावचं पानी प्यालाइत तुमी.... साऱ्या गावाला माहीत हाये आन् तुमास्नी माहीत न्हाई तुमच्या कुळदीपका बद्दल..... माझ्या म्होरं ही नाटकं बंद करा..."

पाटलांची पोरं आणि सावकार तिनताड उडाले... बापरे! हे असं होतं तर ... ज्या बिचाऱ्यांचे बळी गेले असे आपण मानत होतो ते स्वतः शिकारी होते. पाटील आता ताबा सुटल्यागत भडाभडा बोलून गेले...

"मरी म्हातारी एकली व्हती तिने फार काय परकरन लावून धरलं नाही... आदीच गावकुसा बाह्येर ची त्यात तिच्या आधारालं कुनी नव्हतं...पोलीस ठेसनाची वारी वाचली आपली...."

सावकार अविश्वास बसल्यागत पुन्हा पुन्हा विचारू लागले...

"न्हाई न्हाई! हे कुनी सांगतलं पाटील... खरं सांगा... किश्यानी ?? किश्यानी सांगतलं जान्या अगुदर... शुदीत व्हता त्यो..."

सावकारांनी प्रचंड धक्का बसून बसकण मारली. पाटील त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन थकल्या स्वरात म्हणाले...

"दोन वरीस मांगल्ली गोठ हाये! मला गाठून वडगावच्या धनगरांनी दम देलता ... आपल्या कारट्यांनी त्यांच्या पोरीसनी छेडलं म्हनून ... सरपंचांनी मध्यस्थी करून निभावून नेलं कसं बस... ती पोरगी पुड गायब झाली... देशमुखांनी लाखभर रुपये मोजले म्हनतात ... खरं खोटं देवाला माहीत..."

"आरं माज्या कर्मा !"

म्हणत सावकार डोकं बडवून घेऊ लागले. त्यांना आपला एकुलता एक लेक कायमच गुणाचा वाटत होता... त्याला वारेमाप पैसा देतांना तो काय करतो ह्याकडे त्यांचे लक्षच नसायचे. पाटील पुन्हा एकदा कानोसा घेत बोलू लागले...

"गेल्या साली तमाश्यातल्या दोन पोरी गायब झालत्या... मंग त्या तांडेवाल्यांच्या सुदीक दोन पोरी गायब झाल्या.... सरपंच ह्या परकरणावर करडी नजर ठिवून व्हते.... मंग मरी म्हातारीची पोर आन् नात... मले त वाटलं... परकरण अंगावर शेकणार पन बाहेर गावचे लुटारू म्हणून सर्वांना पटवून देतांना तोंडाला फेस आला... पन निस्तरलं बाबो!"

सगळे थोबाड झोडल्यागत चिडीचूप होते.

"तांडेवाले भयंकर संतापले हायेत!... ह्या परकरणात आपल्या दिवट्यांची नावं आली तर घरदारं जळतील आपले... पद जाईल छी थू ! होईन... ते येगळ....ह्या थोरल्याचं औंदा लगीन काडायचं हुतं... हे परकरन बाहीर पडलं तर पंचक्रोशीत कुनी पोरगी देनार हाये का?? रहा मेल्या रंडवा तू?"

म्हणत पाटलांनी पुन्हा दोन्ही पोरांना शिव्यांची लाखोली वाहत बडवण सुरू केलं.

पाटलांपेक्षाही जास्तच दुसरे कुणी भयंकर तणावाखाली होते ते म्हणजे देशमुख... गेली कित्येक वर्षे देशमुख सरपंच पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी म्हणून प्रयत्न करत होते... ते आता अशक्यच होणार असे त्यांना वाटू लागले. उरली सुरली आहे ती पत टिकवायलाच पाहिजे पण त्यासाठी काय करावं ? ते त्यांना सुचत नव्हतं. गावापासून दूर शेतात देशमुखांचा भला थोरला वाडा होता... देशमुखांना चार पोरं.. तरुण पोरं म्हणजे मजा मस्ती हवीच ... त्यासाठी ह्या वाड्याची खास सोय करून ठेवली होती..त्या वाड्यात नाचगाण्याचे कार्यक्रम होत.. कधीमधी तसल्या रंगीत बायकाही आणल्या जायच्या... त्यांना सगळं माहीत होतच आणि आक्षेप घ्यायचं तर काहीच कारण नव्हतं... तरुण सळसळत रक्त जोडीला वारेमाप पैसा हे सगळं असणारच. ह्या सगळ्यांत एक भानगड झाली एक धनगराची पोर त्यांच्या लहानुनी उचलून आणली ... पोर कवळी असावी.काही दिवस वाड्यावर ठेवली तिला ...पण एक दिवस पोर मेली. लहानु आणि त्याच्या दोस्तांनी कुठंतरी माळरानात गाडून टाकली तिला... " धनगरानी पोलीस केस केली ती दाबायला पैसे मोजले नसते तर... आज ही वेळ आली नसती."... देशमुखांच्या मनात विचार आला. लहानु आणि त्याच्या दोस्तांना पुढे कवळ्या पोरी उचलायचा नादच जडला... गायब केलेल्या पोरींना मारून टाकण्यात त्यांना वेगळा आनंद मिळू लागला... शिवाय विषय बंद व्हायचा आणि पुरावा राहत नसे... तश्यात मरीबाईच्या नातीला सुंदराला ह्यांनी उचलली कसं कोण जाणे पण सावित्राच्या सगळं लक्षात आलं आणि ती वाड्यावर आली... लहानु आन् त्याच्या चवताळलेल्या दोस्तांनी... मग सावित्रालाही सोडलं नाही... मात्र मरी म्हातारी परत आली आणि सारा गाव सावित्राला, सुंदराला शोधू लागला... त्यात त्यांची विल्हेवाट लावायची राहून गेली असावी ... देशमुख विचारांच्या गर्तेत स्वतःला म्हणाले...

"ते परकरण पाटलांनी निस्तरलं कसं बसं... मरीला कुनाचा आधार नव्हता बाहेर गावच्या लुटारूवर ढकलून देलं ...पन आता अवघड हाये! सरपंच गप बसनार न्हाई."

सरपंच खरेच वेगाने हालचाली करू लागले... खालच्या आळीतल्या आठ लोकांना हाताशी धरून त्यांनी दुसऱ्याच दिवशी मोहंगावच्या तांडेवाल्यांची भेट घेतली... पाठोपाठ एकेक कडी उलगडली जाऊ लागली.वडगावच्या धनगराची पोरगी गायब होती... ती पुढे सापडली नाही... पोरी गायब होत होत्या पण कुणाचा तरी हात धरून पळून गेल्या असाव्या असे मानून ... .बहुतेक लोक आपली इज्जत वाचवायला तक्रारच नोंदवत नव्हते .आठ लोकांची चमू आणि सरपंच आप्पासाहेब कोलते ह्यांनी अख्खी पंचक्रोशी पिंजून काढली... बारा ते सोळा वयोगटातल्या एकूण दहा पोरी गायब होत्या.... सगळ्यांनी नीट नाव, गायब झाल्याची तारीख नोंदून माहिती घेण्यात आली त्याचा एक अहवाल तयार करून त्यांनी तो पानोळ्याच्या पोलिश स्टेशनला देऊन रीतसर तक्रार दाखल केली. सरपंच आप्पासाहेबांचे परिसरात मोठे वजन होते... लगेच पोलीस तपासास गती मिळाली. संशयाची सुई पुन्हा पुन्हा पिंपळगावाकडे वळत होती...

सरपंचांनी चावडीवर सभा बोलावली... गुन्ह्याचे भयावह स्वरूप विषद केले.. दुसऱ्या दिवशी दहा बारा पोलिसांची तुकडी गावात दाखल होईल त्यांना सर्वांनी सहकार्य करावे असेही आवाहन केले, आपल्याला असेल ती माहिती द्यावी हेही सांगितले. ह्या नीच कृत्यात ज्या ज्या कुणाचे हात अडकलेले असतील त्यांची गय केली जाणार नाही हेही सांगायला ते विसरले नाही. हे ऐकल्यावर खोताचा लेक व्यंकट मनातून जाम घाबरला... लहानु देशमुखाचे प्रेत पाहिल्यावर हातातील कंदील फेकून बोंब मारत धावत सुटलेला हाच तो गडी व्यंकट खोत. उद्या पोलीस सगळ्यांत पहिले आपल्या मुसक्या बांधणार अशी त्याला आता खात्रीच वाटायला लागली. सावकाराचा बज्या, देशमुखाचा लहानु ,पाटलाचा किशा आणि खोताचा व्यंकट ही चांडाळ चौकडी गावात कुप्रसिद्ध होती... आणि त्या तिघांच्या सगळ्या काळ्या कारनाम्यांचा साथीदार आणि एकमेव जिवंत साक्षीदार होता व्यंकट.

सांज ढळताच व्यंकटने अंधाराचा फायदा घेऊन पळ काढायचा आणि मामाच्या गावाला जायचं पक्क केलं...ओढ्याकाठच्या पांदीतून तो जीव खाऊन पळत सुटला... त्याच्या पाठीमागून रपाक रपाक! चिखल तुडवत येणाऱ्या पावलांचा आवाज वाढू लागला... मध्येच कुत्र्यांच्या भेसूर ऊ sss चा आवाज त्यात मिसळला... चहू बाजूंनी काळाठीक्कर अंधार होता रातकिडे किर्रर्र करत होते... अचानक घोंगडी  पांघरलेल्या कुणीतरी त्याची वाट अडवली... व्यंकटची बोबडी वळली तो जागेवरच थरथरत उभा राहिला...

"मरन्यापूर्वी सुंदराची माफी माग...कबूल कर तुजा गुना"

ओढ्याचं भूत किंचाळलं... तसं व्यंकट भराभरा सगळे सांगू लागला....सुंदरावर केलेले पाशवी अत्याचार, मग तिला वाचवायला आलेल्या सावित्रावर केलेले अत्याचार... सुंदरा आणि सावित्राचा खून, त्यांना देशमुखांच्या वाड्याजवळच्या जमिनीत गाडणार होतो पण गाव शोधू लागल्याने वेळच मिळाला नाही म्हणून झाडीत फेकून आलो.... असे सगळे व्यंकट भडाभडा बोलू लागला.... कुत्र्यांचा गुरगुर आवाज जसजसा जवळ येऊ लागला तसतसा तो थरथरत माफी मागत गुडघ्यावर बसला...

"न्हाई तुज्या पापाला माफी न्हाई..."

भला मोठा सोटा त्याचे मस्तक फोडून गेला रक्ताची चिरकांडी उडाली आणि लगेच वाट पाहत टपून बसलेल्या दोन कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले.... ओढ्याच्या काठावर मरी म्हातारी थाळी वाजवत होती आणि जाळ करून मोठमोठ्याने ओरडत होती...

"वढ्याच्या भूता न्याव कर!"

दुसऱ्या दिवशी व्यंकट खोताचे प्रेत ओढ्याजवळच्या झाडीत सापडले... ती अमावस्येची रात्र होती.... लोक म्हणू लागले ओढ्याच्या भुताने न्याय केला... तिथून पुढे मरी म्हातारी शांत झाली... पुढे पोलिसांचे पथक गावात आले त्यांनी सोबत आणलेल्या कुत्र्यांनी वासावरून देशमुखांचे शेतातले घर गाठले ... जमिनी खोदून त्या दहा कोवळ्या पोरींची प्रेते बाहेर काढली गेली त्या बिचाऱ्यांवर अनन्वित अत्याचार झाले होते... पाहणाऱ्याच्या हृदयाचा थरकाप उडवणारे ते दृष्य होते. देशमुखांच्या मालकीच्या जागेत हा प्रकार घडला असल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याच रात्री सरपंच आप्पासाहेब कोलते आपल्या शेतावरच्या घरी गेले.त्यांनी आपल्या दोन इमानी कुत्र्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवला आणि त्यांना मटन खाऊ घातले ... त्यातल्या विषाने कुत्री मरून पडताच गड्यांना त्यांना गाडून टाकण्याचे आदेश दिले. चालत चालत ओढ्याच्या काठावर येऊन बसले... ओढ्याच्या पलीकडच्या बाजूस मरी म्हातारी शांत बसली होती...  चांदणे पडले होते आणि त्यामुळे रात्र उजळून निघाली होती. ओढ्याच्या पल्याडचे विस्तीर्ण शेत सरपंच आप्पासाहेबांचे आहे ह्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. सगळ्यांच्या ओढ्याच्या बाजूची मरी आणि तिची झोपडीच लक्षात होती. ह्या चांडाळ चौकडीचे दोन अंदाज साफ चुकले होते... पहिला मरी म्हातारी एकटी काहीच करू शकत नाही... आणि दुसरा सरपंच आप्पासाहेब निपुत्रिक होते... अरे! अख्या गावावर जो बापाच्या मायेने प्रेम करतो तो माणूस निपुत्रिक कसा म्हणू शकाल.... उधळलेल्या सांडाला वठणीवर आणायला बापालाही सोटा हातात घ्यावाच लागतो आप्पासाहेबांनी सुद्धा घेतला.... ओढ्याकाठचा हा रस्ता म्हणजे ह्या मस्तवाल पोरांच्या घाणेरड्या कृत्यांचा राजमार्ग होता... पहिल्यांदा पोरांना घाबरवून त्यांच्याकडून सत्य वदवून घ्यायचे एव्हढाच डाव मरीबाई आणि सरपंचांनी आखला होता... पण कबुली जबाब देतांना सावकाराच्या बज्याने जी हीन कृत्ये वर्णन केली त्यानंतर त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही हे सरपंच आप्पासाहेबांनी पक्के केले....आणि ओढ्याच्या भूताचे भय निर्माण करून त्यांना साथ दिली ती मरी म्हातारीने... त्यांचा सूड आज पूर्ण झाला.

पिंपळगावचा सरपंचांनी कायापालट केला... पक्के रस्ते झाले, रस्त्यावर दिवे लागले... ओढ्यावरून पलीकडचा रस्ता मोठ्ठा पूल बांधून जोडण्यात आला... ह्या पुलासाठी मरी म्हातारीने आपली जमीन दिली... पुलाचे नामकरण "सावित्रा-सुंदरा पूल" म्हणून करण्यात आले. आता गावात बस येऊ लागली, गाड्या पुलावरून सहज पलीकडे जाऊ लागल्या... मात्र अजूनही ओढ्याच्या भूताचे भय कायम आहे तिन्हीसांजेनंतर अमावस्येला तिकडून कुणीही जात येत नाही.

समाप्त🙏

✒️ यशश्री रहाळकर


बुधवार, १९ मे, २०२१

अदृष्य भिंती


डॉ. अनुप्रिता आज सकाळच्या नाश्त्यापासूनच खूप disturb झालेल्या असाव्यात.. रोज सकाळी न्युजपेपर चाळत चहा, नाश्ता करायची सवय त्यांनी गेली 20 वर्षे जोपासली होती .. एकतर नंतर त्यांना उसंत मिळत नसे आणि पेपरही हाती लागत नसे. आज त्यांनी पेपर उघडला आणि स्वप्नालीच्या आत्महत्येची बातमी दिसली आणि मन विदीर्ण झाले... मात्र त्यांना नवल वगैरे मुळीच वाटले नाही. उलट हे कधीतरी होणे अपेक्षितच होते नाही का? 

डॉ. अनुप्रिता  होमिओपॅथिक डॉक्टर होत्या, मानसिक आजारांवर उपचार हा त्यांचा विशेष अभ्यासविषय असून गेली वीसेक वर्षे अनेकांना त्यांच्या औषधाने उत्तम गुण आला होता. त्या एक उत्तम कॉन्सिलर नक्कीच होत्या त्यामुळे सतत पेशन्ट्सची गर्दी असायची... शिवाय अनेक दुखण्यांच्या मुळाशी मानसिक ताणतणाव असतात विशेषतः जुनाट दुखणी, त्वचेच्या समस्या, ऍलर्जी ह्यावरही त्यांची उत्तम पकड होती. डॉक्टर अनुप्रिता सहृदयी, प्रसन्न, हसतमुख व्यक्तिमत्व... पेशन्ट्सना त्यांच्याविषयी लगेच आपलेपणा निर्माण व्हायचा. स्वतःला पेशन्टमध्ये गुंतू द्यायचे नाही... असे कितीही ठरवले तरी शेवटी त्या देखील एक माणूसच.... कधी कधी एखाद्या पेशन्ट बद्दल जिव्हाळा वाटायचाच. स्वप्नाली त्यातलीच एक होती.

दोनेक आठवडे नेहमीच्या सगळ्या रुटीनमध्ये गेले... एखादा माणूस गेला की त्याला विसरणे तसे सोपे असते. फारसा बदल न करणारा रोजचा दिवस होता.. दुपारी पेशन्टस् ची गर्दी उसळली होती... डॉ. अनुप्रिता नेहमीच्या गोडव्याने पेशन्टची चौकशी करत होत्या... त्यांना मानसिक समस्येच्या मुळांशी पोहोचण्यासाठी बराच वेळ पेशन्टला द्यावा लागे... बहुतेक पेशन्ट नेहमीचे जुनेच .. फॉलो अपसाठी आलेले होते. नयना जामखेडकर आल्या आणि स्वप्नालीची आठवण मनाला टोचून गेली. नयना जामखेडकर त्यांची खूप जुनी पेशन्ट ... पायावर उमटलेल्या एलर्जीसाठी म्हणून डॉ. अनुप्रितांकडे आली आणि नंतर इतका विश्वास बसला त्यांच्यावर की कोणत्याही लहान मोठ्या दुखण्यासाठी ती डॉक्टरांकडेच येऊ लागली... स्वप्नाली तिची शेजारीण आणि दूरच्या नात्यातली भाची किंवा पुतणी असावी. स्वप्नालीला डॉ. अनुप्रितांकडे नयना जामखेडकरच तर घेऊन आली होती.आता स्वप्नालीचा विषय निघणे अटळ होते... नेहमीची औषधे त्या तयार करून देत असतांना नयनाने विषय काढलाच...

"मॅम , स्वप्नालीच कळलं असेलच तुम्हाला... फार वाईट झालं..."

डॉ.अनुप्रिताने होकारार्थी मान डोलावली...

नयनाने डोळ्यांना पदर लावला..
"काय वेडेपणा केला ह्या पोरीने!... सगळं कित्ती छान होत.. राणीसारखं राज्य होतं... सासूला काय कौतुक होतं... तुम्हाला सांगते थकत नव्हती बाई! सारख स्वप्नाली स्वप्नाली जप करायची...इतक गोड पिल्लू होतं. नवऱ्याचं तर इतकं प्रेम होतं ... काय सांगू तुम्हाला..."

नयनाच्या खांद्यावर हात ठेवून डॉ.अनुप्रिता शांत बसल्या.. आणि तिला बोलू दिलं

"एक बोटभर चिठ्ठी नाही की कुणाला काही सांगणं सवरणं नाही .. सकाळी उठलो तर हिने फाशी लावून घेतलेली.... तरी किती म्हणून नशीबवान आहे ही... नवऱ्याने वचन दिलं दुसरं लग्न करणार नाही.. तेव्हा कावळा शिवला पिंडाला."

समोर केलेलं पाणी घटघटा पिऊन संपवल्यावर..

"कपडे म्हणू नका, दागिने म्हणू नका... नवरा काही कमी करत नव्हता. पण हल्ली काय झालं होतं कोण जाणे...? तुमच्याशी काही बोलली होती का? काय प्रॉब्लेम होता? "

डॉ. अनुप्रिता शांतपणे म्हणाल्या...
"सहा महिने झाले... तिने यायचे बंद केले होते. आणि तिच्या ट्रीटमेंट बद्दल तर मी काही बोलू शकत नाही आमचे इथिक्स त्याला परवानगी देत नाहीत."

दिवसभराचे सगळे काम पूर्ण करून , खूप थकलेल्या असूनही त्यांना झोप अज्जिबात येत नव्हती... सतत डोळ्यांपुढे स्वप्नालीचा चेहरा तरळत होता... "आपण वाचवू शकलो असतो का हिला ??आपले प्रयत्न कमी पडले का??"त्यांनी स्वतःला विचारलं... मग त्यांचंच दुसरं मन त्यांना म्हणालं... "काय करणार होतीस तू ?? ह्यापेक्षा जास्त काही करता येणार होतं का तुला?" त्यांचं मन भूतकाळात शिरलं...

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट असेल...  एका दुपारी नयना जामखेडकरांनी नवीन पेशन्टसाठी नंबर लावला... 32/33 वर्षांची त्यांची शेजारीण स्वप्नाली... ही मुलगी तरुण होती पण तारुण्याचं कोणतंही लक्षण नसलेली... डोळ्यांखाली काळी वर्तुळे... देह जरासा अस्ताव्यस्त झालेला... बोलण्यात उत्साह संपलेला ... मासिक पाळीच्या तक्रारी घेऊन ती डॉ.अनुप्रितांकडे आली होती.तिला बोलतं करण्याचे सगळे प्रयत्न फसले होते... अखेर त्यांनी काही हार्मोन्सच्या टेस्ट्स आणि सोनोग्राफी करून घ्यायला सांगितली... ते रिपोर्ट्स घेऊन पाच सहा दिवसांनी बोलावलं. वरवर पाहता समस्या दिसत नसली तरी नक्कीच खोलवर काहीतरी दडले होते... एक गोष्ट मात्र निश्चितपणे त्यांनी टिपून ठेवली ती म्हणजे स्वप्नाली डिप्रेशनने ग्रासलेली होती... आणि ही नक्कीच धोक्याची घंटा होती.  नंतर एक आठवड्याने स्वप्नाली आली  .. आली म्हणण्यापेक्षा नयना तिला बळजबरी घेऊनच आली... नजर शून्यात हरवलेली, निस्तेज स्वप्नाली... तिचे रिपोर्ट्स पाहिले आणि धक्काच बसला... बत्तीस वय आणि मेनोपॉज ची लक्षणे होती.... हार्मोन्सने अक्षरशः बंड केले होते... बाकी pcod वगैरे बहुदा नसावे. डॉ. अनुप्रिता आता गंभीरपणे तिची हिस्ट्री टिपून घेऊ लागल्या... नयनाला त्यांनी बाहेर बसायला सांगितले... त्या प्रश्न विचारत होत्या आणि स्वप्नाली तेव्हढं उत्तरच फक्त देत होती एक शब्दही अधिक उणा नाही.

कुठल्याश्या खेडेगावात तिचं माहेर होतं घरची परिस्थिती बरी म्हणावी अशी वडील पोस्टमन होते... घरी आई,वडील आणि बराच धाकटा भाऊ .... स्वप्नाली ग्रॅज्युवेट झाली आणि त्याच वर्षी वडील गेले. वडिलांनी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केली होती..... वडिलांचे असे जाणे आघात करणारे नक्कीच होते.घाईगडबडीतच तिचे लग्न गडगंज ठिकाणी मागणी घातली म्हणून लाऊन देण्यात आले... तिच्या परवानगीचा प्रश्नच नव्हता. तसे लोक खूपच चांगले होते... तिचे लाड कोडकौतुक मनात येईल ती खरेदी..." एका गरीबाच्या मुलीला अजून काय हवं असतं" स्वप्नालीचे हे उत्तर डॉ अनुप्रितानी विशेष नोंद करून घेतले. भावाच्या शिक्षणाचा सगळा खर्च सासरच्यांनी उचलला. भाऊ इंजिनियर होत होता... आईलाही गरजेनुसार मदत केली जात होतीच. मुलगा झाल्यावर तर तिला कुठे ठेऊ कुठे नको असं झालं सगळ्यांना... तिचं खूप कौतुक होतं, आवश्यक स्वातंत्र्य होतं, फार ताण असण्याचं कारण तर नव्हतं.... पण ताण नक्कीच होता. माणसे खरेच खूप चांगली असावीत... असा एकूण अंदाज त्यांनी बांधला.स्वप्नालीच्या आईची मासिक पाळी 48 वर्षांपर्यंत नीट नैसर्गिक होती... मग अशी अनुवंशिकता असताना स्वप्नालीला असा त्रास होण्याची शक्यता कमीच होती... तिच्यावर नेमका ताण कसला आहे हे मात्र ती बोलू इच्छित नव्हती.

बरोब्बर महिन्याभराने तिच्या सोबत तिच्या सासूबाई सुद्धा होत्या... स्वप्नालीने हाताच्या नसा कापून जीव द्यायचा प्रयत्न केला होता. सासूबाईंच्या स्वरात काळजी होती... पण स्वप्नाली काहीही बोलायला तयार नव्हती ..तिचं एकच उत्तर कायम होतं... "मला जगावं वाटत नाही" पुढच्या वर्षभरात तिने अजून दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा तिच्या फॉलो अप ला नवराही सोबत आला होता... अक्षरशः ढसाढसा रडू लागला... "स्वप्नाली तुमचं ऐकते.. तिला समजावून सांगा. मी तिच्यासाठी वाट्टेल ते करू शकतो ...." वगैरे त्याचं खरंच बायकोवर प्रेम असावं.. त्याच्या बोलण्यातून तिच्यासाठी काळजी, प्रेम सारं डोकावत होतं. आलटून पालटून बरीच औषधे देऊन झाली होती पण तिच्या नेमक्या व्यथेचं मूळ सापडत नव्हतं... त्यामुळे म्हणावा तसा फरक पडत नव्हता. तिच्याशी गप्पा मारून तिला योगाच्या क्लासला घालून काही पंचकर्म वगैरे उपचारांची जोड देऊन.. तोळाभर जेमतेम फरक पडायचा दहा पंधरा दिवस बरे गेले की स्वप्नाली पुन्हा शून्यात नजर लावून बसायची. स्वप्नालीला काय हवं होतं कोण जाणे??

साधारण दीड वर्षे ह्याचप्रकारे गेले तिची तब्येत कधी बरी असायची तर कधी नसायची.... म्हणजे शारीरिक दुखणे नसले तरी ती बरच नाही म्हणून तासन तास झोपून असायची. एक दिवस स्वप्नाली भर दुपारी त्यांच्या क्लिनिकमध्ये आली. कुठलीही अपॉइंटमेंट नव्हती ना फॉलो अप... तिची मनःस्थिती विचित्र असावी... डायरेक्ट केबिनमध्ये शिरत "तातडीने बोलायचे आहे पाच मिनिटे द्या" म्हणून ती विनऊ लागली.  ज्या पेशन्टतला आत घेतले होते त्यांचे काम पूर्ण करून त्यांनी स्वप्नालीला आत बोलावले... आता स्वप्नाली पुरती कोसळली होती... ती मोकळेपणाने रडू लागली... तिला मोकळं व्हायला पुरेसा वेळ देऊन त्यांनी पाण्याचा ग्लास पुढे केला आणि अर्धा तास कुणालाच पाठवू नको म्हणून रिसेप्शनला निरोप दिला.
स्वप्नाली मनात खूप काही साठवून होती... ते एकदम बांध फुटल्यागत बाहेर पडलं.

"एका सभ्य स्त्री ला शरीर सुखाची गरज वाटणं पाप आहे का मॅम?? सांगा ना!"

"नाही ! अन्न पाण्यासारखीच ती एक जीवनावश्यक बाब आहे." 
डॉ अनुप्रिता शांतपणे उद्गारल्या. तिच्या एका प्रश्नातच समस्या त्यांच्या नेमकेपणाने लक्षात आली होती... गेले कित्येक दिवस ह्या मुद्द्याकडे दुर्लक्षच झाले होते त्यांचे... 

"माझ्या घरी सगळं किती छान आहे मी किती सुखात आहे सगळे म्हणतात... कुणाला काही बोलून दाखवता येत नाही... तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे... बरं! माहेरी इतके उपकाराचे ओझे आहे की तिकडे परतही जाता येत नाही... काय करू मी?? मला जगावं वाटत नाही "

मानसोपचारांची गरज स्वप्नाली पेक्षा जास्त तिच्या नवऱ्याला होती. त्याच्या मते, शरीर सुखाची मूल जन्माला घालण्यापलीकडे काहीही गरज नव्हती. लग्नानंतर लगेचच वर्षभरात त्यांना मुलगा झाला होता... आता ती गरज त्याच्या दृष्टीने संपली होती. स्वप्नालीची शारीरिक गरज सामान्य होती मात्र ती काहीतरी भयंकर आहे , ऍबनॉर्मल आहे असं सतत तिच्या मनावर तो बिंबवत होता. स्वप्नालीने स्वतःला घरकामात, मुलामध्ये ,वेगवेगळ्या पोथ्यांमध्ये आणि धार्मिक कार्यात गुंतवून घेतले तरी तिच्या मूळ उर्मी शांत होत नव्हत्या. पुरुषांच्या बाबतीत असे काही झाले  असते तर त्याच्याकडे कदाचित अनेक पर्याय उपलब्ध असते परंतु एका मुलाच्या आईने, एका सभ्य संसारी स्त्रीने त्यातही परपुरुषाचा विचारही जी पाप मानते अश्या स्त्री ने काय करायचे ?? डॉ. अनुप्रितांकडे ही खरंतर तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. 

स्वप्नालीच्या आईने तर सोईस्करपणे आपले हात उचलले होते .त्यांच्या मते, 

"काही पुरुष बायकांचा किती छळ करतात शरीर सुखाच्या नावाखाली... तुझा नवरा तो तर करत नाही ना?? हवं ते विकत घेऊन देतो हौस मौज करतो आणखी काय पाहिजे...." 

ह्या "आणखी काय" मध्ये शरीरसुख येत असतं हे कुणाच्याच गावी नव्हतं. स्वप्नाली हा नाजूक विषय कुणाकडे काढून मन मोकळं करू शकत नव्हती... अवघड जागेचं दुखणं झालं होतं ते .... अर्थात जीव देणं हा ह्यावरचा पर्याय मुळीच नाही हे त्यांनी तिला समजावून सांगितलं आणि पुढच्या वेळी "नवऱ्याला घेऊन ये" असंही बजावलं. स्वप्नालीच्या आनंदी जीवनासाठी तिच्या नवऱ्याला आता तिच्या कौन्सिलिंगचा भाग व्हायला हवे.... हे त्यांनी तिच्या नवऱ्याला उत्तम पद्धतीने पटवून दिलं. आता तोही तिच्या सोबत येऊ लागला... हळूहळू त्यांनी स्वप्नालीसोबत नवऱ्याने वेळ घालवणं कसं आवश्यक आहे? सोबत फिरायला जा, बाहेर गावी जा वगैरे पटवून दिले... स्वप्नाल्लीलाही आता त्यांच्या बद्दल विश्वास वाटू लागला होता... एक दिवस डॉ अनुप्रितांनी थेट मुद्द्याला हात घातला.. त्या स्वप्नालीच्या नवऱ्याला म्हणाल्या..

"तुमच्या बायकोला डिप्रेशनने ग्रासले आहे.. त्याचे मूळ कारण संसारीक सुखाचा अभाव हे आहे... खरेतर तिच्यापेक्षा जास्त तुम्हाला उपचारांची गरज आहे...मी माझ्या एका जेन्ट्स कलीग चा नंबर देते ... मला वाटतं तुम्ही पुरुष डॉक्टरांशी ह्या विषयावर अधिक मोकळेपणाने बोलू शकाल."

आतापर्यंत बायकोसाठी वाट्टेल ते करू शकणाऱ्या स्वप्नालीच्या नवऱ्याचा सूर बदलला... त्याचा सो कॉल्ड मेल इगो हर्ट झाला असावा. भयंकर संतापाने हाताची मूठ टेबलवर आपटत तो किंचाळू लागला...

"काय वाटलं तुम्हाला?? तुम्ही काय वाट्टेल ते बरळाल आणि मी ऐकून घेईन... माझी बायको आजारी आहे, वेड लागलंय तिला... ती काहीतरी बोलते आणि तुम्ही त्यातून असा निष्कर्ष काढता की मी पुरुष नाही... तुमच्या माहितीसाठी सांगतो... आम्हाला एक सुदृढ हुशार मुलगा आहे... तसं असतं काही तर मूल झालं असतं का मला??"

डॉ. अनुप्रितांचे उत्तर ऐकायला तो थांबला सुद्धा नाही... बायकोला तिथेच सोडून तरातरा निघून गेला. स्वप्नाली भीतीने थरथरत त्याच्या मागे धावत सुटली. हीच स्वप्नालीची शेवटची भेट नंतर ती कधीही डॉ. अनुप्रितांकडे आली नाही.... आली ती बातमी... तिने आत्महत्या केल्याची.... डॉ अनुप्रितानी चष्मा बाजूला ठेऊन डोळे कोरडे केले. त्यांच्या मनात आलं..." प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अश्या अदृष्य भिंती असाव्या बहुदा....बाहेरून पाहणाऱ्याला सुख, आनंद चकाचक दाखविणाऱ्या... आणि आतून कोसळून पडलेल्या मनाने दुःख, ताण एकट्याने पचवणाऱ्या .." त्या पुन्हा पुन्हा विचार करू लागल्या... "आपण कुठे कमी पडलो? वाचवू शकलो असतो का आपण स्वप्नालीला??"

✒️ यशश्री रहाळकर

रविवार, १६ मे, २०२१

मि. सेकन्ड हॅन्ड



"काय कठीण आहे हा प्राणी?? आज त्याला कामासाठी म्हणून बोलावलं ऑफिसमध्ये तर मला म्हणतो ...मला वाटलं तुम्ही कारच विकायला काढली आहे... विकायची असेल तर मला सांगा बरं! "

आमची जेमतेम वर्ष झालेली कार पार्क करत... माझ्या नवऱ्यानं , घरी येताच  हा किस्सा ऐकवला आणि मी अक्षरशः कोपरापासून हात जोडले... द्विज दुसाने माझ्या नवऱ्याचा त्याला नकोसा असणारा , पण स्वतःला त्याच्या जवळचा मानणारा मित्र... हा प्राणी असाच आहे. तो भेटला किंवा साधा चार वाक्य बोलला तरी नको नको व्हायला होतं... तसा नॉर्मल आणि सभ्य म्हणावा असाच आहे पण का कोण जाणे ?? हा मनुष्य कुणालाच आवडत नाही. उंच शिडशिडीत काडीसारखा, रापलेला काळा रंग ... साधारण आदिमानव उत्क्रांत होता होता राहिला असे वाटावे असे पसरट तोंड, त्यावर सतत एक गबाळं हास्य आणि चेहऱ्यावरचे नुकतेच थोबाड झोडल्याचे भाव....मला वाटतं एव्हढं वर्णन पुरेसे आहे ..तुम्ही अगदी भर 100 माणसांत हा प्राणी चटकन ओळखाल..👍 तसा हा अगदीच बिनविषारी सरळमार्गी प्राणी पण तो भेटला की पुन्हा भेटूच नये असं वाटतं🙅 ... हा अनुभव थोड्याफार फरकाने प्रत्येकालाच येतो. 

असे असले तरीही आम्ही त्याला तोडून मात्र टाकत नाही... अडगळीच्या सामानासारखा पडू देतो संग्रहाला....कारण हा माणूस आमचं चालतं बोलतं जिवंत OLX आहे. माझ्या लेकीच्या pram पासून ते ह्यांच्या bike पर्यंत, writing desk पासून ते mixer पर्यंत सगळे काही हाच माणूस चक्क सेकंड हॅन्ड विकत घेत असतो. त्याचमुळे मी त्याला "मिस्टर सेकंड हॅन्ड" असे नाव दिले आहे. सगळ्या नव्या कोऱ्या करकरीत वस्तूंची ह्याला ऍलर्जी असावी बहुदा.... विकत घेताना प्रत्येक वस्तू हा सेकन्ड हँडच घेतो.... त्यातही माझ्या नवऱ्यासारख्या प्रामाणिक लोकांच्या वस्तू त्याला भलत्याच लाभतात म्हणे...☺️ आता ह्यामागे त्याची काही अंधश्रद्धा वगैरे नाही बरं... ही आपली त्याची प्रॉफिट पॉलिसी असावी... म्हणजे वस्तू तुटायच्या , खराब व्हायच्या आत त्याला देणारे लोक त्याच्या फायद्याचे असतील ना ! हे आपलं माझं मत. पण ह्या जगात असाही प्राणी मनुष्यरूपात अस्तित्वात आहे ह्यावर मि. सेकन्ड हॅन्ड ला भेटेपर्यंत माझा विश्वासच बसला नसता. हा माणूस वल्ली आहे ... पु. लं च्या काळात असता तर "व्यक्ती आणि वल्लीमध्ये" ह्याची जागा पक्की होती.

आमच्या घराच्या वास्तुपुजनाला माझी ह्यांच्याशी थेट प्रत्यक्ष भेट झाली.... आजवर नवऱ्याकडून बरंच काही ऐकलं होतंच... त्याने बारीक नजरेने कोपरा न कोपरा न्याहाळून घेतला. आम्ही घरांत आमच्या सोयीनुसार केलेले बदल त्याने टिपून घेतले ... एकंदर घर पाहून तो खुश झाला आणि उत्साहाने म्हणाला ...

"तुम्ही हे घर विकायला काढाल तेव्हा मला पहिले विचारा... मला एकदम सोयीचं आहे तुमचं घर... मुख्य म्हणजे मला हव्या त्या सोई  करून घेतल्या आहेत तुम्ही..."

माझ्या नवऱ्याने माझ्याकडे पाहत मान डोलावली... माझा मात्र संतापाने तिळपापड झाला... माझ्या नव्या कोऱ्या घराच्या वास्तुपुजनाला घर विकायच्या अभद्र गोष्टी करत होता... 

"हा माणूस पुन्हा घरी येता कामा नये."

मी नवऱ्याला बजावलं. नवरा मात्र कितीतरी वेळ हसत होता... पुढे पुढे त्याच्या ह्या चमत्कारीक बोलण्याची सवय झाली मला... आणि काही वाटेनासं झालं. 

"मला नवीन वस्तू लाभतच नाही , कुणीतरी वापरली की मगच ती मला मिळते... त्या वस्तू सोबत त्या व्यक्तीची एनर्जी असते... ती मिळाली की माझे काम नक्की भारी होते... मला कसलीच अडचण येत नाही "

असे काही बाही तत्त्वज्ञान तो पाजळत असायचा. त्याबद्दल त्याच्याशी वाद घालण्यात काहीही अर्थच नसायचा... म्हणजे त्याला जे जग दिसत होतं ते आपल्याला दिसतच नव्हतं...

"हे बघा .. तुम्ही नवीन नवीन सतत म्हणत असता पण खरंच नवीन असते का वस्तू...?"

"म्हणजे?? नवीन वस्तू नवीनच असते...👍"

"एखादी वस्तू तयार होऊन तुमच्यापर्यंत पोहोचते तोवर अनेकांनी हाताळलेली असते . आता हा टीव्ही  पहा ... हा सुरू करून पाहिलाय ना आधी कुणीतरी म्हणजे काही अंशी वापर झालाय...हाही सेकन्ड हँडच ना! मग नवा ह्या नावाखाली किती भरमसाठ पैसे मोजताय तुम्ही??"

मी निरुत्तर गपगार ... त्याच्या ह्या मुद्द्यावर वाद घालणे मी तिथून पुढे बंदच केले. 

लग्नानंतर बरीच वर्षे कंपनीच्या कॉर्टरमध्ये काढल्यावर कंटाळलेली त्याची बायको आम्हा दोघांना म्हणाली... 

"ह्यांना घर घेण्याविषयी सांगा ना समजावून. ते तुमचं फार ऐकतात... त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे... " वगैरे वगैरे..

अतिउत्साहाने आम्ही लगेच त्याला नवं घर घेण्याविषयी समजवायला जाण्याचा आगाऊपणा केलाच... 180 अंशात मान गरागरा फिरवत तो ठामपणे म्हणाला... 

"सेकंड हॅन्ड घर कधीही घ्यायला मी तयार आहे .. पण आमच्या साडुंच नवीन घर पहिल्यापासून हिला नवेच घर घ्यायचे आहे..."

चहाचा ट्रे पुढे करत त्याची बायको म्हणाली ...
"काय हरकत आहे नवे घर घ्यायला...मी नाही तसल्या जुन्या घरात रहायची..."

मग आमच्याकडे वळून आवाजात शक्य तितकी भीती आणत म्हणाली...
"गेल्या आठवड्यात ह्यांनी पसंत केलेल्या घरी कुणीतरी जीव दिलाय... मला नको तसलं घर..."

कमालीच्या कोरेपणाने मि सेकन्ड हॅन्ड म्हणाला...

"अर्ध्याच किंमतीत मिळतंय बाजारभावाच्या.... शिवाय तुझ्या दृष्टीने नवे घर घेतले तरी तिथे ह्या आधी कुणीतरी मेले असणारच ना!"

आम्ही आपले काय बोलावे हे न कळून गप्प बसलो...

"मला सांगा... आपली लोकसंख्या पाहता अशी एक तसूभरही जागा नसेल इथे.... जिथे कुणी मेलं नाही..."

त्याच्या ह्या विनोदावर तो एकटाच हसला... आम्ही मात्र हतबुद्ध झालो...थोडक्यात काय ? तर अर्धा तास घालवून फुकटचे चहा पोहे झोडून आम्ही परत आलो... ह्या माणसाला समजावण्यात अर्थ नाही ह्या निष्कर्षापर्यंत अखेर आम्ही पोहोचलो. द्विज उर्फ मि सेकन्ड हॅन्ड हा एक विक्षिप्त माणूस आहे, असे सगळेच आम्हाला सांगायचे. खरं सांगायचं तर अगदीच तसं नसलं तरी त्याचे जगण्याचे तत्वज्ञान असामान्य होते... हे मात्र खरे!

आम्ही नवीन पिटुकले पोर्टेबल स्पीकर्स घेतल्यावर... जुने भले थोरले डब्बा स्पीकर्स विकत घ्यायला मि सेकन्ड हॅन्ड आनंदाने तयार झाला. ते स्पीकर्स न्यायला म्हणून आलेला तो निवांत वेळ काढूनच आला असावा...मला म्हणाला ..

"वहिनी तुम्ही लिहिता म्हणे काहीबाही... मी काही वाचत नाही ही म्हणाली.... माझीही गोष्ट लिहा ना!"

मी नेहमीप्रमाणे अवाक.... तर मौन संमती मानून त्याने आपल्या कथेचे घोडे दामटले... इच्छा असो वा नसो... सुगृहिणीच्या नात्याने मी आपली त्याची बडबड ऐकू लागले..सातारजवळच्या कुठल्याश्या खेड्यात त्याचा जन्म झाला... आई वडिलांचा मुलगा नंबर 2... थोरला भाऊ "प्रथम" तापाचं निमित्त होऊन दुसऱ्याच वर्षी वारला... मग ह्याला आई दुःखातिरेकाने "प्रथम" म्हणू लागले... पुढे तेच नाव शाळेतही घातले... 8 वर्षांचा असताना बाबा आणि मग आई दोघेही वारले... थोरल्या काका काकूंनी मायेने वाढवला... त्यांचा मुलगा ...प्रथम पेक्षा दोन वर्षांनी मोठा. त्यामुळे त्याचे वापरलेले पुस्तकं, कपडे, खेळणे सगळे आपसूक प्रथमला मिळत गेले... 

"मी नववीत असतांना सुगीचे दिवस होते... काकाने नवीन पुस्तके घेतली आणि मी नापास झालो... तेव्हाच मला कळून चुकलं जुनं ते सोनं... "

"भाऊजी ! हा निव्वळ योगायोग आहे हो ... असे काही नसते."
मी आपले माझे म्हणणे रेटले... एव्हाना मलाही त्याच्या कथेबद्दल उत्सुकता वाटू लागली होती..

"नाही नाही! हे माझं विधिलिखित आहे. माझं नाव दुसऱ्याचं, माझ्यावर खूप प्रेम करणारे मायबाप दुसऱ्याचे...आणि बायको सुद्धा..."

आता मात्र मी चाट पडले... 🙄 पण इतकी खाजगी गोष्ट उघड कशी विचारू... म्हणून मी त्याचं शांतपणे ऐकू लागले. तो अप्रिय मुद्दा तसाच सोडून तो सांगू लागला...

"मोठा झालो तसं कागदोपत्री मी माझं नावच बदलून टाकलं... "द्विज"... अर्थ तुम्हाला माहीत असेलच... दोन वेळा जन्मतो तो पक्षी... आधी अंडे म्हणून जन्म घेतो मग पिल्लू होऊन दुसरा जन्म... मी असाच आहे .. दुसऱ्यांदा जन्मलेलो..."

आता मी सरसावून बसली... ह्या क्षुद्र वाटणाऱ्या प्राण्याकडे काहीतरी वेगळं नक्कीच आहे.

"भावकीतली पोरगी बघून लग्न ठरवलं काकीने... पण ऐन मांडवातून पोरगी पळून गेली... वाईट वाटलं पण खरं सांगू माझ्या नशिबात कोऱ्याचा शाप आहे..."

पुढे बऱ्याच उशिरा त्याने नाममात्र घटस्फोटित मुलीशी लग्न केले... ही त्याची बायको ...त्याच्या मनाजोगी, भरपूर माया करणारी वगैरे आहे.खरंच खूप गुणी मुलगी बायको म्हणून लाभलीये त्याला... त्याच्याशी जुळवून घेतेय म्हणजे भलीच म्हणायला हवी. त्याचे अख्खे घर कुणीतरी वापरलेल्या सेकन्ड हॅन्ड वस्तूंनी व्यापले आहे... मात्र त्याची त्याला ना खंत ना खेद... नवे परवडत नाही म्हणून जुन्या वापरलेल्या वस्तू घेणारे अनेक जण असतील पण मि सेकन्ड हॅन्ड सहज शक्य असूनही नव्याचा तिटकारा करतो. 

"आपल्याला नवी वाटणारी वस्तू नवी नसतेच मग ह्या खोटेपणासाठी किती पैसे मोजायचे?? राजरोस जुनी वस्तू घ्या पैसे वाचवा, बचतीतून अजून काहीतरी घ्या..."

हे असले अजब विचार असूनही मी खरंच त्या दिवशी प्रभावित झालेच... स्वतःच्या मनाशी हिशोब करू लागले... माझ्या घरातल्या किती वस्तू खऱ्याखुऱ्या उपयोगात येतात?? कित्येक वस्तू तर मी फॅशन बदलली म्हणून नव्या घेत जाते... कित्येक वस्तू technology बदलली upgrade झाली की घेते.... मग जुन्या पण चांगल्या चालू अवस्थेतील वस्तूंचे काय??? त्या जर फेकल्या गेल्या तर.... बापरे! किती कचरा करतेय मी. ...पण त्याच वस्तूंचा जर कुणी उत्तम वापर करत असेल तर एका परीने त्या माणसाला स्वच्छता दूत म्हणायला हवे. आता मला पूर्वीसारखा मि सेकन्ड हँडचा राग येत नाही.... आताश्या नवल सुद्धा वाटत नाही....मला माणसे उमजली की त्यांची पात्रे माझ्या कथेत झालीच म्हणून समजा...😂😂

बऱ्याच उशिरा लग्न केल्याने वय अंमळ वाढलेल्या द्विजला मुलगी बऱ्याच उशिरा आणि काही वर्षे ट्रीटमेंट घेऊन झाली... पोर मोठ्ठी गोड...तिच्या पहिल्या वाढदिवसाला आम्ही गेलो होतो... तेव्हा हा पठ्ठ्या बायकोकडे पाहून म्हणाला...

"ह्या वर्षी पोर झालं तर ठीक नाहीतर दत्तक घेऊ आश्रमातून ... असं हिला म्हणालोच होतो. .... तेही सेकन्ड हॅन्ड.... "

त्याच्या ह्या जोकवर नेहमीप्रमाणे ..तो एकटाच दिलखुलास हसत होता... आणि त्याच्या नव्या कोऱ्या पिल्लाकडे मायेने पाहत होता. 

✒️ यशश्री रहाळकर




शनिवार, १५ मे, २०२१

देव..... ज्याचा त्याचा


माझ्या एका जवळच्या मित्राचे लग्न जेमतेम सहा महिन्यांत मोडायच्या बेतात आले होते. हल्ली असे सर्रास होते... अगदी महिना दोन महिन्यांतही लग्न मोडतात ...त्यामुळे ह्यात काही नवल नव्हतेच. नवल वाटण्याजोगे होते ते लग्न मोडण्याचे कारण .... "देव!" ... आहे ना गंमत... दोघांच्याही देवाबद्दलच्या संकल्पना पराकोटीच्या भिन्न होत्या, शिवाय माझीच संकल्पना कशी योग्य आहे हे पटवून देण्याचा अट्टाहास होताच. माझा मित्र टोकाचा कर्मठ तर पत्नी कर्मावर श्रद्धा ठेवून असणारी.... त्यानी स्वतःपुरती त्याची श्रद्धा पाळावी , देवाच्या पूजा , मंदिरात जाणे , व्रतवैकल्ये , उपास ..आरती सगळे करावे पण तिला गृहीत धरू नये ... असे तिला वाटले तर चुकले कुठे?? उलट मित्राचे म्हणणे असे होते की हिने माझ्यासोबत फार नाही पण किमान मंदिरात यावे, पुजेला बसावे.... बाकी मीही तिच्याकडून फार अपेक्षा नाही करत....🤷  एकाच धर्माच्या एकाच जातीच्या नव्हे तर अगदी पोटशाखाही समान असणाऱ्या लोकांची ही गत व्हावी???😯🤔 मला नवल वाटतंय ते ह्याचं👍 खरंतर जोडप्यांतच काय पण जगभरातला हा वादाचा मुद्दा .... आपापली निर्गुणाच्या उपासनेची पद्धत भिन्न असू शकते हे कुणी समजून घ्यायलाच तयार नाही... भांडणे "देव" ह्या संकल्पनेमुळे होत नसून ती ही संकल्पना लादण्यातून होत असतात... आपण सहज का स्वीकारू शकत नाही की दुसऱ्या माणसाची देव ही संकल्पना निराळी असू शकते?? अर्थात वादाच्या क्षणी कुणालाच ते पटत नाही हा भाग आणिक वेगळा.

"देव" ही किती खोल दडलेली, अगदी स्वतःची अशी वैयक्तिक भावना आहे.... मोठं होत जातांना ती आपसूक घडत जाते.. कधी बिघडते अन् नव्याने बनत जाते. कधी आयुष्याला पार उलटेपालटे करून टाकणारी घटना घडते आणि एखादा नवा "देव" भेटतो.... कुणाला हा देव एखाद्या विशिष्ट मूर्तीत भेटतो... कुणाच्या समईने उजळलेल्या देवघरात दिसतो तर कुणाला विशिष्ट मंदिरात. कुणाला आईत दिसतो तर कुणाला गाईत.... कुणा नास्तिकाला तो कर्मामध्ये दिसतो तर कुणाला एखाद्या गरजूला मदत करून.... कुणाला एखाद्या स्वामी किंवा गुरुमध्ये देव दिसतो तर कुणाला एखाद्या ग्रंथात...... एक मात्र नक्की "जितुकी मानस तितुकी नावे" प्रत्येकाच्या जडणघडणीत देवही घडत जातो. मग माझा देव श्रेष्ठ तुझा नाही हा अट्टाहास का?? देव असा लादता येत नाही. नव्हे तो लादूनही लादला जात नाही... होते फक्त कृती....निरर्थक उपचार. भीती दाखवून किंवा आमिषे दाखवून धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला असा देव बदलता येत असेल का हो??? मला नेहमी प्रश्न पडतो. स्वेच्छेने एखादी सज्ञान व्यक्ती जेव्हा काही तत्वांनीं प्रभावित होऊन धर्मांतर करते तेव्हा कदाचित देव बदलणे शक्य असेलही .... पण अन्यथा "देव" असा सहजी बदलता येत नाही  म्हणूनच तो तसा लादताही  येत नाही.

काही लहान-मोठ्या सामाजिक उपक्रमांत सहभागी होतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.... काही परिचित गडगंज श्रीमंत होते, पैसेच काय डॉलरही घरी धबधब्यागत येत असताना अश्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांत द्यायला 10₹ सुद्धा त्यांच्याकडे नव्हते.... ह्या उलट काही लोकांवर स्वतःच्या एका भाकरीतली चतकोर सहज देण्याचे संस्कार होते. त्यामुळे "पैसा आहे म्हणून देताहेत " हा सगळ्यांत चुकीचा समज आहे.... दातृत्वातील देव ज्यांना भेटला आहे तेच केवळ अश्या वेळी मदत करतात हा माझा अनुभव आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचे, एखाद्या गरजूला मदत करण्याचे आणि त्या कार्यात देव पाहण्याचे . .प्रत्येकाला जमत नाही. मंदिरात मोठमोठ्या देणग्या देऊन , स्वतःच्याच घरातल्या देवांना सोन्या-चांदीने मढवून भेटणारा " देव " त्यांना अधिक आपला वाटतो... त्यामुळे सुरुवातीच्या काळात वाटणारे नवल हल्ली मला वाटत नाही... ज्याचा त्याचा देव निराळा.... हे एकदा समजलं की माणसांची गंमत वाटते. 
काही लोकांचा पैसा हाच देव असतो... वाट्टेल ते करून भरपूर पैसा मिळवायचा एव्हढीचं त्यांची भक्तीची व्याख्या असते मात्र त्या पैश्याचा उपभोग न घेतल्याने आणि अजून तरी मेल्यावर सोबत न्यायची सोय नसल्याने त्यांचा हा "देव" तिजोरी, लॉकर आणि कुठे कुठे गाडून अक्षरशः कुजतो. लक्ष्मी आणि अलक्ष्मी ही दोन रूपे श्रीसूक्तात यथार्थ वर्णिली आहेत... वाम मार्गाने येणारी अलक्ष्मी सुख, समाधान, मनःशांती देऊ शकत नाही. 

फार पूर्वी चांदोबा नावाचं बालमासिक होतं... त्यात वाचलेली एक कथा अजूनही जशीन तश्शी आठवते. एक गरीब गरजू इसम देवळात देवीचे दागिने चोरी करायला जातो.... देवीच्या दागिन्यांना हात लावताच अचानक त्याचं मन त्याला खाऊ लागतं, हात थरथरतात... तो चोरी न करताच निघून जातो. त्याच गावातील एक कुणी श्रीमंत माणूस संधी मिळताच सोन्याचे दागिने स्वतःकडे लपवून देवीला खोटे दागिने चढवतो.... जिथे मनात पाप, वाईट विचार येत नाहीत ती जागा देव! चोरासाठी मंदिरात देव आहे अन् धनिकासाठी तो तिथं नव्हताच.... आहे ना गंमत! ही साधीशी गोष्ट माणसं ऐकतात पण समजून मात्र घेत नाहीत. दुसऱ्याचा देव बदलवण्याच्या नादात भांडत राहतात. सध्या 'सोशल मीडिया' नावाचं मुक्तपीठ आहे... वाट्टेल ते लिहायला आणि नंतर कडाडून भांडायला. आता वटपौर्णिमा आली की ....वडाचे झाड लावा... इथपासून ते वडाला पुजणाऱ्या किती बावळट इथपर्यंत चर्चा होतात. ज्यांना तुकोबारायांप्रमाणे "वृक्षवल्ली आम्हा सोयरे" वाटतात, त्यांना निसर्ग हा देव वाटतो. मात्र ज्यांना परंपरांचे पालन करून देव मिळतो असा विश्वास आहे त्यांना हे कसे पटणार?? आणि का पटावे? एखादी स्त्री मनोभावे वडाचे पूजन करते... तिचा देव त्यात आहे... तिचा देव उपासात आहे... त्या वडाभवती प्रदक्षिणा मारून तिला जो आनंद मिळतोय त्या बदल्यात तिला दुसरे काही कसे चालणार?? ह्या विचार धारेत बदल होत आहेत ते होत राहणारच... पण म्हणून हे लादण चूक आहे... मुळात कोणतीही क्रिया बळजबरी केली तर उरकली जाते ... भक्ती तर फार उच्च तन्मय अवस्था आहे. शिवरात्र आली ... दुधाच्या अभिषेकावर टीका , दिवाळी आली दिव्यातील तेलावर टीका... त्याऐवजी गरिबांना द्यावे असे म्हणणे ...त्यांना पटणार नसते कारण त्यांचा देव वेगळा आहे. कुणी मंदिरात जातंय, कुणी पंचोपचार पूजन करतंय, कुणी कडक सोवळं पाळतंय... ह्याचं मला मुळीच कौतुक वाटत नाही... तसाच मला त्यावर टीका करण्याचाही मुळीच अधिकार नाही... ज्याचा त्याचा देव, ज्याची त्याची पूजनाची रीत , ज्याच्या त्याच्या पद्धती... ह्यात वेगळेपणा आहे म्हणून माणूस वेगळा होत नाही.... हे तत्वज्ञान माणसांना कधी कळेल कुणास ठाऊक?

गावातील अनेक वर्षांचे घरोब्याचे संबंध असणाऱ्या काकू मुलीचं लग्न ठरल्याचे पेढे घेऊन आल्या... त्यांना झालेला आनंद मनातून चेहराभर नाचत होता. काकू पहिलं वाक्य काय म्हणाल्या असतील... " इतकं छान ठिकाण आहे  दोनच देव आहेत घरात बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा.. अगदी आधुनिक आहेत लोक."  माझ्या डोळ्यांसमोर  त्यांच्या घरातील भले मोठे देवघर आणि त्यातले डझनांनी टाक आले, जवळपास प्रत्येक नवरात्र, पौर्णिमा, नवमी त्यांच्याकडे कुलधर्म असायचा. वर्षोनुवर्षे हे देव सांभाळता सांभाळता ही माऊली क्षीणून गेली असावी... त्यांचे पती म्हणजे नाना भलतेच कर्मठ, घरातले थोरले, सगळे देव गावीच... नाना असेपर्यंत मन मारून त्यांनो सगळे केले... नानांनंतर देव कुणी नेईना... मग काकूंनी सरळ देवळात नेऊन ठेवले. पूर्वीच्या काळी येणारी सून मुकाट्याने घरातील देव व तत्सम रुढींचे पालन करायची. अगदी माझ्या एक पिढी आधीपर्यंत स्त्रिया नोकरी करून ओढाताण करत रेटायच्या सारे. आता मात्र सगळं पूर्वीसारखं असणार नाहीये. मुळात घरी सून म्हणून येणारी मुलगी तिचे विचार ठामपणे घडवून येणार... सासरची देवाची संकल्पना तिला पटली तर ठीक नाहीतर धुडकावून लावणार.... त्यात वेगळ्या जातीची, वेगळ्या धर्माची अगदी वेगळ्या देशात वाढलेली मुलगी सून झालीच तर संपलेच... म्हणूनच ज्याचा त्याचा देव प्रत्येकानं आपल्या पुरता सांभाळावा. घरात येणाऱ्या मुलीला समजावून पहावा पटले तर ती नक्कीच करेल पण नाहीच पटले तर.... ही मानसिकता असायला हवी. शेवटी एकदा देव ज्याचा त्याचा वेगळा आहे हे कळलं ना की सारं सोपं होतं जातं...👍

तिन्हीसांजेला समईच्या प्रकाशात लख्ख उजळून निघालेले पितळी देव पाहिले की मनापासून हात जोडले जातात... शुभं करोति! आपसूक बाहेर पडते... मनातली भीती, ताण, काळजी संपून शांत वाटतं... वर्षोनुवर्षे आजीला, आईला असे देवापुढे प्रसन्न बसलेले पाहून माझ्या मनात मला हाच देव दिसतो.... माझ्या मुलीच्या मनातही तो तसाच राहील कदाचित...☺️ आपल्या मुलांचा देव आपण नक्कीच घडवू शकतो... चोरी करू नये, खोटं बोलू नये हे कृतीतून पटवून देत, घरातल्या वृद्धांचे मायेने करून सेवेतील देव , गरजूला मदतीचा हात देत दानातील देव,...झाडांची , पशुपक्ष्यांची काळजी घेत, प्रदूषण टाळत निसर्ग देवतेचं पूजन करण्याचं आपसूक कळेल त्यांना👍 

✒️यशश्री रहाळकर