फॉलोअर

रविवार, ३१ जानेवारी, २०२१

सायकलच्या प्रेमात 🚲

गेल्या आठवड्यात मी भटकायला म्हणून खास पुण्यात गेले....थोड्याथोडक्या नाही तर तब्बल २१ वर्षांनी हा योग जुळून आला....म्हणजे कार्य-प्रसंगापुरतं जाणं व्हायचं पण त्यात निवांतपणा नसायचा. २००० साली दहावीची परीक्षा झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याकडे मुक्काम ठोकला... तेव्हा दादासोबत यथेच्छ भटकंती केली होती... पुणं अशक्य, अफाट बदललं आहे पण त्या त्या जागी त्या त्या आठवणी अटळ असतात... माणसाला भूतकाळ आवडतो, क्षणभर का होईना त्यात रमायला मिळालं तर... आपल्या पैकी प्रत्येकाला भूतकाळात घेऊन जाणारी एक समान वस्तू असते ती म्हणजे "सायकल"... सायकल म्हटलं की आठवणींचा पेटराच खुला होतो...  बाबांनी पाठी धावत सायकल शिकवली असते ते सारं आठवतं, नव्या सायकलवर बसून मित्रांसमोर भाव खाल्लेला आठवतो, दसऱ्याला केलेली पूजा, नव्या घेरदार स्कर्टच्या सायकलच्या चेनमध्ये अडकून झालेल्या चिंध्या, उतारावरून सुसाट वेगाने जातांना हवेवर तरंगण, डबलसीट जोर मारून दामटण.... काय काय आठवणी डोळ्यांसमोरून नाचून जातात. मला बाबांची सायकल, नंतर खरेदी केलेली माझी ऍटलस एस एल आर सायकल, तिचा रंग रूप आठवलं ... असं हे nostalgic! होणं सायकलचं म्युझियम पाहिल्यावर साहाजिकच नाही का??होय मी नुकतंच सायकलींचं विश्व खुलं करणारं भन्नाट संग्रहालय पाहीलं. 

कर्वे नगर पुणे येथे अश्याच एका सायकल प्रेमी ... श्री विक्रम पेंडसे ह्यांचे "A Museum of Bicycles and more" ह्या नावाचं संग्रहालय पाहिलं आणि मी थक्क झाले. "Cycles .. A Journey into the past" अशी tag line तुमचं स्वागत करतानाच खऱ्या अर्थानं भूतकाळाची सफर घडवते. स्वतःच्या राहत्या घरात हे तीन मजली संग्रहालय उभे केलेले असून त्यात फक्त सायकलच नव्हे तर कित्येक अफाट अफलातून वस्तूंचा संग्रह केलेला आहे. 25 वर्षे सतत ध्यास घेऊन जगभरातून अनेक वस्तू गोळा केलेल्या आहेत.... काहीतर भन्नाट आहेत जसे दुसऱ्या महायुद्धात वापरली जाणारी सायकल , हेल्मेट आणि त्याला attach गन, किंवा folding सायकल, उलटी सायकल (म्हणजे हातानी पॅडल मारून पायांनी दिशा देता येणारी सायकल), रॉयल एनफिल्ड ची सायकल...इथे सुमारे 150 पेक्षा जास्त विंटेज सायकल्सचा संग्रह आहे.त्याच बरोबर सायकल्सचे स्पेअर पार्ट्स जसे सीट्स, गीअर्स, लॅम्पस् ह्यांचाही मोठा संग्रह माहिती सहित पहायला मिळतो. विविध प्रकारच्या ऑइल कॅन, पम्पस् , नेम प्लेट आदींचाही  सुरेख disply आहे.

सायकल्सच्या जोडीला अनेक पुरातन वस्तू जसे टांगा, सायकल रिक्षा, वेगवेगळ्या विंटेज कार ह्यांचाही समावेश येथे आहे. अगदी बाबागाडी, लहान सायकल्स, लहान मुलांचे घोडे, गाड्या ह्या तर 75 वर्षांहून अधिक पुरातन आहेत.अनेक अद्भुत गृहोपयोगी वस्तू  जसे विविध भांडी, डबे , आरसे , तिजोऱ्या, पानांचे डबे, इस्त्री वगैरे अतिशय पुरातन पण उत्तम जतन करून ठेवले आहे. अगदी 1905 चा ग्रामोफोन, विविध टाईप राईटर, शिवण यंत्र, विविध कुलुपे, कीचेन्स... आणि सगळंच खूप  सुरेख मांडून ठेवलं आहे. जुन्या काळात सायकलीचे दुकान असायचे तशी एक प्रतिकृती तयार केली आहे.... आणिक एक गंमत म्हणजे entrance ला एक भलंमोठं कमंडलू चं झाड आहे... कमंडलूची फळे वाळवून पोखरून त्यापासून पूर्वी कमंडलू बनवत असत. खरेच जुन्या काळाची सफर करायची असल्यास....एकूणातच हे सायकल म्युझियम नक्की भेट द्यावी असंच आहे.
👍😊 
(पत्ता ,काही फोटो आणि डिटेल्स फोटोत मिळतील)
✒️ यशश्री रहाळकर

कमंडलूच झाड

गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

एकटीच ती


नव्या नवरीला औक्षण करण्या ती पुढे आली,
अन् एकच गलका.. ही विधवा हिनं आगळीक केली

लोकं शिकली,माणसं बदलली समाज तसाच आहे
तिच्या कर्तृत्वाची रेषा भाळावरील कुंकवात आहे.

ती अशीच एकाकी चौदा वर्षे जगते आहे..
तो अपघातात दगावला,... ती रोज रोज मरते आहे.

शुभ प्रसंगी टाळतात तिला सवयीचे झालेले
लोकांचे टोचून बोलणे अंगवळणी पडलेले

ती सुशिक्षित ,स्वावलंबी तिचेही जग काळे आहे.
अपमान,तिरस्कार अन् एकटेपणानं भरलं आहे.

तिची नवी साडी,दागिने एकटीने सिनेमाला जाणं..
खरंतर खटकतं लोकांना तिचे आत्मविश्वासानी जगणं

अधाशी नजर एखादी देहावरून फिरते जेव्हा
पांढऱ्या कपाळाचं दुःख पुन्हा पुन्हा बोचतं तेव्हा

तिचे सारेच ऋतू कोरडे उजाड ...
गाठीशी बांधलेला चिमूटभर भूतकाळ

दोन पिल्लांना एकटीच ती पंखाखाली झाकते
एकट्याच चोचीने आपलं घरटं ती राखते.

चेहऱ्यावर शांतभाव , खळबळ मनीच्या तळ्यात
अर्ध्या वाटेवर भैरवी लागली केहेरवा कानी तसाच

कधीतरी ती स्वतःला खोलीत  कोंडून घेते
मनातल्या सरी मनसोक्तपणे बरसू देते...

डोळे पुसून बाहेर येते पुन्हा प्रसन्न चेहऱ्याने
अन् मुलांचा बाप होते खंबीर कठोर मनाने
©🔏 यशश्री रहाळकर

(तिचे वैधव्य तिचे पाप नाही... तिचे एकटेपण शाप नाही... नवे संक्रमण करूया प्रत्येक स्त्री चा  ह्या लेबल पलीकडे सन्मान करूया!👍 हळद स्त्री च्या समर्पणाचं तर कुंकू तिच्या त्यागाचं प्रतीक आहेत... स्त्रीत्वाचा सन्मान करूया..💐 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!💐)


मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

कस्तुरी भाग 1, 2 आणि अंतिम


"कस्तुरी" माझ्या जिवलग मैत्रिणीची ... कल्याणीची आत्या... मी तिला लहानपणीपासून पाहत आलीये. माझ्या घरानंतर चार घरं सोडली की कल्याणीचं घर आहे.. माझ्या सारखे तिच्या घरी फक्त आईबाबा नाहीत तर भला मोठा गोतावळा आहे. तिचे आजी आजोबा , आईवडील, दोन काका, 2 काकू , 2 सख्खे भाऊ, आणि दोन काकांचे प्रत्येकी 2 असे 4 चुलत भाऊ ... आणि हो कस्तुरी आत्या अशी एकूण 16 माणसे... कस्तुरी तिच्या बाबांहून देखील मोठ्ठी बहीण पण अजूनही काय दिसते.. आहा! ह्याही वयात ही नुकत्याच कोषातून बाहेर पडलेल्या फुलपाखरागत टवटवीत आहे तर तरुणपणी काय असेल... ??  मला नेहमी वाटायचं.. तिच्या आरस्पानी रूपाचा स्त्री सुलभ हेवा न वाटला तरच नवल... कस्तुरी आत्या; .. नितळ गोरा रंग, मधासारखे डोळे तेही टप्पोरे, धारदार नाक, उंच बांधा , काळेभोर केस.. अशी सगळी रूपाची खाणच घेऊन जन्मली होती. ह्या उलट ती त्या घरातली आहे की नाही हा संभ्रम पडावा एव्हढे बाकीचे घरातले दिसायला अतिसामान्य... त्यातल्या त्यात कल्याणी तेव्हढी तिच्या सारखी वाटायची पण कस्तुरी आत्या काकणभर सरसच होती.

कस्तुरी आत्या म्हणजे एक जिवंत शिल्प होती .. शब्दशः आणि अर्थशः देखील... गेली 40 वर्षे ती एखाद्या पुतळ्यासारखी शून्यात नजर लावून बसलेली असायची. तिची आई अर्थातच कल्याणीची आजी तिला जे सांगेल तेव्हढं आणि तेव्हढंच ती कृतीतून व्यक्त होई.. म्हणजे 

 "कस्तुरी जेवून घे" 

असं आजीने सांगितलं की पानात वाढलेले कस्तुरी जेवायची.. कसलीही चव नाही ...पुन्हा मागणार नाही की काही टाकणार नाही... कधी स्वतःहून भूक लागली म्हणणार नाही दिलं तर खायची.. 

"कस्तुरी स्नान करून घे." म्हटले की ती यांत्रिकपणे स्नान करायची पण कपडे बदलायला नेलेत की नाही ह्याचीही तिला शुद्ध नसे... म्हणून आजी प्रत्येक क्रिया तिला स्टेप बाय स्टेप सांगायच्या...

"कस्तुरी हे कपडे मोरीत खुंटीला लाव, पाणी काढलं आहे स्नान नीट साबण लावून कर मग अंग कोरड कर टॉवेलने आणि हे कपडे घालून ये."

हे असंच वर्षानुवर्षे चाललं होतं. लहानपणी मला गंमतच वाटायची काय हे ?? केव्हढ्या घोड्या बाईला सांगताहेत सगळं.. पण मग तिला कसलासा मानसिक धक्का बसला होता त्यामुळे अशी झाली हे कल्याणीकडून कळलं आणि तिच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली. कस्तुरी आणि कल्याणी आपापल्या पिढीतील एकुलत्या एक लेकी पण नातं मात्र विळ्याभोपळ्याचं. कल्याणी ...कस्तुरी आत्याला का कोण जाणे मुळीच आवडत नसे. आणि कल्याणी उगाच तिचा राग राग करायची हे असं आपलं मला वाटायचं हं! 

कल्याणी कधीही कस्तुरी आत्याबद्दल फार बोलायची नाही, कुणी भोचकपणे विचारले तर विषय टाळून द्यायची. बाकी कस्तुरी आत्या अगदी निरुपद्रवी बिनविषारी होती.तिला फार बाहेर येऊ देत नसत.. सगळ्यांत आतल्या एका खोलीत तिला जवळपास नजरकैदेतच ठेवत.. स्वतःहून जागचे न हलणाऱ्या कस्तुरीसाठी एव्हढा पहारा कश्यासाठी होता कोण जाणे?? एरव्ही आम्ही सगळ्या गल्लीतल्या समवयस्क आठ दहा जणी एकत्र खेळत असायचो.. आम्ही बरेचदा मंदिरात खेळायचो. कधी माझ्याकडे, कधी दुसऱ्या कुणाहीकडे मात्र कल्याणीकडे खेळायची फारशी वेळच ती येऊ देत नसे.. म्हणचे कल्याणीला तिच्या घरी खेळायला नको असावे... कधी आम्ही तिला बोलवायला गेलो तर ती लगेच बाहेर पडे आणि बाहेर कुठेतरी खेळायचे ठरवत असे. कल्याणीची आई,आजी , काकी तश्या प्रेमळ होत्या गेलो की हातावर लाडू, वडी, चकली काहीतरी खाऊ मिळायचाच. तरी कल्याणीला कधी एकदा तिथून बाहेर पडते असे व्हायचे.. ह्याचे कारण कदाचित कस्तुरी आत्या असावी... मला कधीही कस्तुरी आत्याचा राग आला नाही उलट मला ती परिकथेतील शापित अप्सरा वाटायची... बिचारी!

"कस्तुरी" नावाच्या ह्या देखण्या ,गूढ कथेतील शापित नायिकेबद्दल अनेक सुरस दंतकथा गावात प्रसिद्ध होत्या. कुणाच्या मते तिला भुताने झपाटले होते तर कुणी म्हणायचे चेटूक, करणी केली. काहींच्या मते एका मांत्रिकाने तिला वश केले तर काही म्हणत तिने नकार दिल्याने एका मुलाने आत्महत्या केली त्याच्या भुताने तिला सतत भीती दाखवून वेड लावले.... मला तरी त्या साऱ्या कथा तद्दन रचलेल्या वाटत होत्या... मुळात कस्तुरीला मानसिक उपचारांची गरज असतांना तिला ते प्रतिष्ठेचा प्रश्न करून दिले गेले नाहीत हे माझे ठाम मत होते.. तसेही वर्षोनुवर्षे समाजात मिसळण्याची संधी न देता , एखाद्या व्यक्तीला.. जवळपास कोंडून ठेवल्यावर निराळे काय होणार.. वेड लागेल नाही तर काय?? कल्याणीला मी उत्सुकतेने कितीदा विचारले पण ती कधीही आपल्या कस्तुरी आत्याबद्दल काहीच सांगायची नाही.. तिला घरात तशीच सक्त ताकीद मिळाली होती हे मात्र ती बोलता बोलता सांगून बसली. मी आणि कल्याणी अगदी खासम खास मैत्रिणी आमची कितीतरी गुपिते एकमेकींना अगदी सहज सांगायचो.. पण हे काहीतरी विचित्र प्रकरण होतं... पौर्णिमा -अमावस्या असली की कस्तुरी आत्याला चक्क खोलीतच बांधून ठेवले जाई ह्या दिवसांत ती बेभान होत असे... आणि दिशाहीन धावत सुटायची.. हे सगळं त्यांच्या घरातील कामवाल्या मावशींनी आईला सांगतांना मी ऐकलं होतं. पुढे आम्ही सगळ्याच मैत्रिणी वयात येण्याच्या टप्प्यावर असतांना आमच्या सगळ्यांच्या आईंनी कल्याणीच्या घरी जायला बंदी केली ..

"नाही म्हणजे नाही !एकदा सांगितलेलं नीट लक्षात ठेव."

कल्याणी माझी खास मैत्रीण म्हणून आई वारंवार माझ्याकडून गिरवून घेऊ लागली की तिच्याकडे मुळीच जायचं नाही.. आम्हाला कुणालाच ह्यामागचं कारण मात्र सांगितले गेले नव्हते.. मी आईला खोदून खोदून विचारले तर..

"लहान आहेस अजून मोठी झाल्यावर कळेल."

असे तात्पुरते उत्तर देऊन गप्प केले होते. कल्याणी मात्र आवर्जून यायची ,भेटायची.. पुढे आमच्या शिक्षणाच्या वाटा बदलल्या मी शहरात गेले पण कल्याणी गावातच राहून काही बाही कोर्सेस करत होती. तिला तशीही फार अभ्यासाची आवड नव्हतीच म्हणा! मात्र माझ्याशी असणारी मैत्री तिने कायम ठेवली होती. मी तिच्याघरी जात नव्हते यामागचं कारण तिला नक्की माहीत असावं... तिने त्याबद्दल कोणतीही अढी मनात बाळगली नव्हती. एके दिवशी मोठ्या आनंदाने आईने मला तिचं लग्न ठरल्याचं सांगितलं... खूप छान तालेवार ठिकाण, राजबिंडा नवरा मिळाला होता तिला..तिचं रूपही तसं आरस्पानी होतंच की कुणीही प्रेमात पडावं. मी गावी जाताच ती स्वतः येऊन मला आमंत्रण देऊन गेली... अगदी चार दिवस आधीपासूनच मदतीला येण्याचेही चार चार वेळा आईला ती  म्हणाली.. ती गेल्यावर आईने स्पष्ट शब्दांत सांगितलं..

"तुझी मैत्रीण आहे मान्य... पण तेव्हढ्यास तेव्हढं जा.. आणि मुख्य म्हणजे दिवसा उजेडी जायचे आणि तिन्ही सांजेपुर्वी परतायचे.."

आजवर मी कधीही आईला ह्याविषयी काहीच विचारले  नव्हते.. आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती..

"आई आतातरी सांग ना ग !आता मी मोठी झाली बघ .. तुझ्या भाषेत ताडमाड वाढलेय.. तिकडे माझ्या रूमवर एकटीच तर राहते ना मी.. मग सांग ना सगळं तिच्या बद्दल ..."

काहीच न कळून आई म्हणाली.. " काय सांगू ?? आणि कुणाबद्दल??"

"कस्तुरी बद्दल"

काही क्षण विचार करून ती उत्तरली...

"आता कुठून सांगू बरं... तरुणपणी त्या कस्तुरी बरोबर काहीतरी अघटित प्रकार घडला आहे... रूपच तसं .. दुर्दैव म्हणायचं! पण अजूनही ते जे काय असेल ते त्यांच्या घरात आज तिच्यासोबत.. अमावस्या पौर्णिमा आली की ते प्रभावी होतं.. मग ती बेभान होते..."

ही "जे काही ते काही" ची भाषा मला काही समजली नाही.. फक्त एव्हढंच कळलं की काहीतरी आहे जे आपल्या आकलना पल्याडचे आहे. आपल्याला काय करायचे त्याचे?? असे नेहमीप्रमाणे म्हणत मी कामाला लागले.  काही दिवसांनी कल्याणीच्या दारात मांडव पडला.. एकुलती एक लेक म्हणजे लग्न अगदी थाटामाटात होणार होते... चुडा भरायच्या दिवशी सकाळीच कल्याणीचा निरोप आला. कित्येक वर्षांनी मी तिच्या घरी गेले होते.. कल्याणी खूप आनंदात होती आणि त्या सुखाचं आगळं तेज तिच्या मनातून चेहऱ्यावर जणू नाचत होतं... हाताला धरून कल्याणी मला तिच्या खोलीत घेऊन गेली मग तिच्या साड्या, दागिने , सासरच्या भेटी सारे उत्साहाने दाखवू लागली. लग्नासाठी म्हणून तिने गडद गुलबक्षी शालू निवडला होता त्यावरील वेलबुट्टी फार नाजूक सुरेख होती... तिने आरशासमोर उभे राहून शालू स्वतः भवती धरत मस्त गिरकी घेतली.. मग माझे दंड गदागदा हलवत म्हणाली..

"हा शालू घेतल्यापासून मला अगदी घाईच झालीये लग्नाची.. कधी एकदा नेसते अस्स झालंय..."

कल्याणी अजूनही तेव्हढीच भाबडी आणि अल्लड होती.
तेव्हढ्यात आम्हाला तिच्या धाकट्या काकींनी बाहेर बोलावलं..

"गप्पा नंतर मारा ग आधी बाहेर या बघू.. मानाच्या सुवासिनींना बांगड्या भरायच्या आहेत.. "

म्हणत खूण करत त्यांनी कल्याणीला त्यांना नमस्कार करण्यास सांगितले. मांडवाच्या मध्यभागी सुरेख चौरंग मांडला होता त्याभवती फुलांची आरास केलेली होती... सगळ्या कल्याणीला चिडवू लागल्या, हास्यविनोदात रममाण झाल्या.. तिला गर्भरेशमी हिरवाकंच चुडा तर हवाच होता. त्याबरोबर लग्नानंतर घालायला तिच्या साड्यांच्या रंगानुसार मॅचिंग बांगड्याही तिने निवडल्या. आता स्त्रिया शकुनाची गाणी म्हणू लागल्या आणि नवरीला चौरंगावर बसवणार इतक्यात आतून कस्तुरी बाहेर आली... नखशिखांत नटलेली.. तिने कल्याणीचा गुलबक्षी शालू आणि सगळे दागिने घातले होते.. चेहऱ्यावर एक वेडगळ हास्य होतं.. ती थेट चौरंगावर जाऊन बसली आणि हात पुढे करत स्वतःला हिरवा चुडा भरण्याविषयी खुणावू लागली... कासारीण आणि इतर स्त्रिया घाबरून मागे सरकल्या. सगळ्या कार्यक्रमाचा रंगच उडाला.. गाण्याऱ्या स्त्रिया एकदम गप्प झाल्या, स्मशान शांतता पसरली. 

"आपण इतके दिवसांची जो शालू नेसायची वाट पाहतोय तो हिने नेसला सुद्धा.. ", हे पाहताच कल्याणीचा पारा चढला.. तिचे डोळे अपमान, दुःख, संताप ह्यांनी भरून वाहू लागले. घरातले सगळे भराभर गोळा झाले... कल्याणीच्या आजीने कस्तुरीला आत चलण्याविषयी विनवले पण बांगडया भरल्याशिवाय ती उठायला तयार नव्हती... शेवटी आजी सावरून घेत म्हणाली..

"बाळा कल्याणी.. तुला माहिती आहे ना ती आजारी असते, आपलीच आहे ना ती.. भरू दे तिला आधी.."

म्हणत कासारणीला बांगड्या भर म्हणून खुणावले.
एव्हाना कल्याणीचा दुःख आणि संतापाचा बांध फुटला होता.. ती रडता रडता.. संतापाने कस्तुरीच्या अंगावर धावून गेली...

"ऊठ ऊठ इथून.. किती वर्षे पाहतेय मी तुझी नाटकं... सतत तुझं कौतुक .. तू बिचारी , तू आजारी ... मी मात्र सतत सगळं समजून घ्यायचं...
ऊठ आधी ...आणि शालू दे माझा .."

दोन मांजरींनी एकमेकांवर धावून जावं तसं घडलं काहीसं..  एरव्ही गप्प असणारी कस्तुरी आत्या ओरडली..

"नाही देणार हे हे माझं आहे.. लग्न आहे माझं उद्या.."

टाळ्या वाजवत ओरडू लागली.. बापरे! हिला बोलता येतं तर... आजींनी पुन्हा सावरून घ्यायचा दुबळा प्रयत्न केला... 

"जाऊ दे !कल्याणी बाळा तू बांगड्या भर मी समजावते तिला..."

कल्याणीच्या अंगाची संतापाने लाहीलाही होत होती... 

"लहानपणीपासून पाहतेय .. हिच्या मुळे एक मैत्रीण नाही मला... सतत लोक तिरस्काराने संशयाने पाहतात... आणि आज ??आज तर माझा शालू माझे सगळे दागिने घातले... असेच सगळे सुखाचे क्षण ओरबाडून घेतले आहेत हिने माझे...."

आजीचाही संयम सुटला..

"कल्याणी! केव्हापासून ऐकतेय मी....ही ही काय म्हणतेयस सारखी.  आत्या आहे ती तुझी."

"ही माझी कुणीही नाही .." म्हणत रडत पाय आपटत कल्याणी तिच्या खोलीत धावत गेली आणि धाडकन तिने दार आतून लावून घेतलं..

कल्याणीची आई ..  एकत्र कुटुंबात दबलेली, शांत राहणारी जबाबदार स्त्री.. पण तिचाही संताप संताप झाला असावा...

"माझ्या लेकीला दूषणे देऊ नका सासूबाई!... तुमची तरुण लेक तुम्हाला सांभाळता आली नाही.. त्याची शिक्षा आम्हाला का??"

काडकन सासूने कल्याणीच्या आईच्या कानाखाली आवाज काढला... आम्ही सगळे दगड होऊन पाहत होतो.. कल्याणीची आई आता गप्प बसणार नव्हती..

"तुमच्या ह्या ह्या पोरीपाई आम्ही सगळ्यांनी खूप भोगलं आहे... आमच्यापर्यंत होतं तोवर सगळं ठीक होतं.. मात्र आता माझ्या लेकीच्या सुखाला डसतेय ही नागीण... मी ऐकणार नाही.. सांगून ठेवतेय... हिच्या तमाशा मुळे जर माझ्या लेकीचं लग्न मोडलं तर मी जीव घेईन तरी नाहीतर देईन तरी..."

कल्याणीच्या दोन्ही काकू अक्षरशः थरथरत उभ्या होत्या..
कुणीतरी जेष्ठ स्त्री ने सगळ्यांना उलट पावली परतण्याची खूण केली.. आम्ही आपापल्या घरी परतलो... भरल्या मांडवात नवरीला शकुनाचा चुडा भरलाच नव्हता.. हे काय भलतंच??? सगळीकडे एकाच चर्चा सुरू होती... लग्न 2 दिवसांवर येऊन ठेपलं होतं.... आता काय होणार.??.. लोक म्हणत होते ह्या घरांत वरात आलेली साहत नाही ... कुणास ठाऊक काय होणार होतं??
क्रमशः
✒️ यशश्री रहाळकर
*****************************************

कस्तुरी भाग २

बांगड्या भरायच्या वेळी कल्याणीच्या लग्नाच्या मांडवात जो काही तमाशा झाला होता तोच विषय गावातील ब्रेकिंग न्यूज होता... प्रत्येक ओसरी आणि ओट्यावर ह्याचीच चर्चा रंगली होती. गावातील सगळ्या सासवा आणि सूना कडाडून वाद घालत होत्या  .. तमाम सासू वर्गाच्या मते कल्याणीच्या आईचे आणि तिचे चुकलेच होते..

"जरा सांभाळून घेता येत नाही तुम्हा आजकालच्या मुलींना... केव्हढा ग बाई तो तमाशा... एव्हढा राग नवरीला शोभत नाही अगदी... उद्या सासरी कुणा कुणाशी पटणार नाही हिचं.." 

एक सासू तावातावाने म्हणाली. दुसरी तिचीच री ओढत..

" माय तशी लेक... कल्याणीच्या आईचा काय हा अगोचरपणा... एकतर बिचाऱ्या कस्तुरीच्या आईने आयुष्यभर किती भोगलयं.."

सून पार्टी हिरीरीने पुढे येत म्हणाली..

"बिचारी तर कल्याणीची आई आहे हो ! किती वर्षे सोसलं सगळं निमूटपणे.. आपल्या लेकीवर आलं तसं बोलली काय चुकलं सांगा बरं..."
दुसरी कुणाची तरी नवीन लग्न झालेली सून लगेच करवादली..

" कल्याणीचं तरी काय चुकलं हो! ही अशी वेडसर बाई.. आयुष्यभर केलीच ना सहन.. लग्नाची स्वप्ने असतात प्रत्येकाची... किती सोसायचं तिनं आणि का म्हणून??"

मला ह्या सासू-सून आखाड्यात अजिबात रस नव्हता... कुणाचं काय चुकलं ह्याची निरर्थक चर्चा करून काय साध्य होणार होतं... ह्या वादातील खरी मेख तर भलतीच होती..
कल्याणीच्या घरच्या कामवाल्या मावशी BBC झालेल्या होत्या.. प्रत्येकीकडे त्यांना चहा /पानसुपारीला बसवून काय झालं ते जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच होती.. शेवटी समाज समाज म्हणजे तरी काय हो.. कुणाच्या तरी दुःखावर टपून बसलेली गिधाडं..😢 

तर कामवाल्या बाईंकडील माहिती नुसार ...कल्याणीची आई आणि कस्तुरीची आई ह्यांच्यातल्या वादाचं मूळ होतं कस्तुरी.. कस्तुरीचं आजारपण खरं खरं सांगून कल्याणीचं लग्न करावं .. आपण काहीही लपवून ठेऊ नये सगळे स्पष्ट असावं... असे मत आजीबाईंचे उर्फ कस्तुरीच्या आईचे होते... त्यापाठी त्यांचे नातीवरील प्रेम हे कारण होतेच... कल्याणी काही परकी नव्हती त्यांची सख्खी लाडकी नातंच तर होती... उद्या सासरच्या मंडळींना कळले आणि त्यांनी कल्याणीला परत पाठवले तर जन्माचे नुकसान होईल तिचे... अशी आजीची दूरदृष्टी सांगत होती. शिवाय लग्न पार पडेपर्यंत कस्तुरीला लपवणार तरी कुठे ?? हाही प्रश्न होताच.

कल्याणीच्या आईची बाजूही योग्य होती... त्यांनी सुरुवातीला खरे सांगून लग्न जमवण्याचा प्रयत्न केला पण हे आत्याच्या वेडाचं ऐकलं की कुणी होकार देईना.. मग त्यांनी परस्पर आपल्या बहिणीकडे कल्याणीचा दाखवण्याचा कार्यक्रम करून सुपारी फोडून टाकली.. आता सासूने तेव्हढं लग्न होईतो कस्तुरीला सांभाळावं एव्हढीचं कल्याणीच्या आईची अपेक्षा होती. ...पण लग्नाची चर्चा सुरू झाली आणि कस्तुरी जशी काही पेटूनच उठली.

 ह्या सगळ्यांत कल्याणीच्या बाबांची आणि आजोबांची अवस्था भयंकर अवघड झाली होती.. दोन्ही मुली आणि त्यांच्या आई एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या.. बळी कुणाचाही गेला तरी नुकसान त्यांचंच होतं. कल्याणीच्या आईने स्पष्ट शब्दांत सांगितलं की...
 
 " जोवर माझ्या लेकीची पाठवणी होत नाही तोवर मला घरात कस्तुरी नकोय .. माझ्या पोरीवर मला तिची सावलीही नकोय... आणि  हे मी शेवटचं बजावते आहे नाहीतर मी जीव देईन."
 
शेवटी घरातल्या पुरुष मंडळींनी निर्णय घेतला की बाजूच्याच गावात राहणाऱ्या नातेवाईकांकडे कस्तुरीला घेऊन आजीने रहायला जावे,  लग्न लागले, सगळे नीट पार पडले की परत  यावे. दरम्यान कुणी विचारलं आजीबद्दल तर तब्येत बरी नसल्याचे सांगावे. आता कल्याणीचं लग्न निर्विघ्न पार पडेल अशी आशा सगळ्यांना वाटू लागली...  पण गोष्टी एव्हढ्या सोप्या नसाव्या... अचानक संध्याकाळी कोलाहल झाला... कल्याणीला अम्ब्युलन्स मध्ये घालून मोठ्या हॉस्पिटलला हलवण्याची धावपळ सुरू होती... घरातील कुणालाच कसली शुद्ध नव्हती.. कल्याणीची आई छाती पिटुन रडत होती.. पुरुष मंडळी धावाधाव करत होते... आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे गडगडाटी खदाखदा हसत कस्तुरी उभी होती एका पायावर एका कोपऱ्यात भिंतीला टेकून .. तिच्या अंगावर साडी नव्हती नुसता परकर आणि ब्लाउज... आधीच ते वेडसर भाव त्यात हे असलं काहीतरी... आम्ही मनातून चरकलोच...  कस्तुरी आवेगानं माझ्या दिशेने येत बोट नाचवत म्हणाली...

"ए ए.. तूच तू! तुझ्या मैत्रिणीचं लग्न मोडलं.." 

पुन्हा गडगडाटी क्रूर हास्य... 

"रडायचं नाही तुला ?? आं आं! मोडलं रे मोडलं ..."

 म्हणत कस्तुरी टाळ्या वाजवू लागली. 
अरे देवा! म्हणजे ही वेडी नाहीये तर... बापरे! हिला कल्याणी माहितीये, तिचं लग्न कळतंय , ते मोडलंय हेही उमजतंय आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे ही.. ही.. मला ओळखते... तिची मैत्रीण म्हणून .. भयंकर भयंकर आहे हे ! ही कस्तुरी वेडसर नक्कीच नाही. माझ्या चेहऱ्याकडे ती एकटक पाहत होती...जणू काही तिला चेहरा वाचता येतो ... सर्रकन काटाच आला अंगावर.. पुन्हा ती म्हणाली ..

"नाई नाई वेडी नाय मी... ती ती मला ...मला म्हणाली तुझी मैत्रीण , दिडशहाणी कुठली.. शालू.. शालू दे म्हणाली..  तिचा शालू.. तिचा नव्हता तो .. तो तो माझा होता... माझा होता."

ह्यावेळी तिचा आवाज भेसूर कर्कश होता... भांड्यावर ओरखडा उमटावा तस्सा.. दात ओठ खात ओरडत असणाऱ्या कस्तुरीचे डोळे लालबुंद झाले होते...  ती माझ्याकडे आणि मी तिच्याकडे एकटक पाहत होती तेव्हढ्यात अचानक वीज चमकावी तशी मी भानावर आले आईने माझ्या हाताला झटकन ओढत मला घरी नेलं... नखशिखांत गोमूत्र शिंपडलं,  अंघोळ घातली, देवापुढे दिवा लावला आणि काही मंत्र जप जाप्य केले... जेवेपर्यंत मी आणि तिने चकार शब्द काढला नाही तोंडातून नंतर मात्र मी कल्याणीची चौकशी केली ... तेव्हा आईने स्पष्टपणे मला मी ह्या प्रकरणात लक्ष घालू नये असे सुनावले..

"कळलं ना आज तुला.. मी का नाही म्हणत होते तुला ते... तिन्हीसांजेला जाऊ नकोस हजारदा सांगितले तुला... पण तुझा आगाऊपणा , भोचकपणा काही कमी होत नाही..."

"आई अग.. कल्याणी मैत्रीण आहे माझी .. कशी आहे ती?? काय झालं होतं? एव्हढं तरी सांग ना.."

आई बाबांकडे वळत म्हणाली.. 
"उद्या सकाळच्या पहिल्या गाडीने हिला रवाना करा... आता मी सांगेपर्यंत गावी यायचं नाही.. नाही म्हणजे नाही."

बाबांनी मला डोळ्यांनीच शांत राहण्याची खूण केली. जेवणानंतर शतपावली करतांना बाबा सांगू लागले... शेजारधर्म म्हणून ते हॉस्पिटलमध्ये जाऊन आले होते... काही मदत हवी असल्यास सांगा असेही सांगून आले

 " ..मात्र हे आईला कळू देऊ नकोस ती काळजी करत बसेल.."
बाबा म्हणाले तसं मला कित्ती बरं वाटलं म्हणून सांगू? मी कल्याणी साठी काहीच केलं नाही ही टोचणी माझं मन खात होती .. तिला नेमकं झालं काय हे जाणून घेण्याची उत्सुकता देखील होतीच.. कल्याणीने हातांच्या शिरा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे वरपांगी तरी दिसत होते... जखम खोलवर झाल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. देवाला तिला बरं कर म्हणून हात जोडून मी निद्रेच्या आधीन झाले... दुसऱ्या दिवशी चहाच्या वेळी मी आईला कल्याणीच्या घरी फिरकणार सुद्धा नाही असं वाचन दिलं आणि माझा मुक्काम वाढवून घेतला.. दुपारची कामे उरकल्यावर बायकांच्या बैठकीत कस्तुरी शिवाय दुसरा विषय असणे शक्यच नव्हते... त्याच वेळी त्यांच्या घरची कामवाली बाई घाबरी घुबरी होत आली..

लोटीभर पाणी आणि घोटभर चहा प्यायल्यावर ती बोलू लागली..

"आता का सांगू माय?? ती यडी मुक्यावानी गरीब गाय जनू बसून राह्ये सारा दिस बसून राह्ये... पण तुम्हांले सांगतो.. आता दोन दिस झालं.. चुरचुरू चुरचुरू बोलतीया... इश इश ओकते मेली नागीन...! "

तिच्याचकडून समजलं.. कल्याणीने तिचा शालू आणि दागिने मागितले तर कस्तुरी देणार नाही म्हणाली.. दोघींचे वाद, भांडणे पेटली... कस्तुरीच्या आईने तिला खूप समजावले देऊन टाक तिचे दागिने शालू... शेवटी रागारागाने सगळे दागिने काढून कस्तुरीने ते विहिरीत नेऊन फेकले.. त्यानंतर शालू सोडून त्याच्या कल्याणीसमोर चिंध्या चिंध्या केल्या....

"तुझं लग्न होणारच नाहीये मोडणार आहे.. मी सांगते मोडणार आहे"

म्हणत कस्तुरी टाळ्या वाजवत नाचू लागली... हे दृश्य इतकं भयावह होतं की सांगतांनाही कामवाल्या बाई लटालटा कापत होत्या... नेमका त्याचं वेळी कल्याणीच्या सासरच्या कुणाचातरी फोन आला... सगळ्या वऱ्हाडाची गाडी दरीत कोसळली होती .. कोण जिवंत आहे कोण मेलं हेही फोन करणाऱ्याला सांगता येणं त्या वेळी शक्य नव्हतं.. कल्याणीच्या काकांनी तिकडे धाव घेतली आणि इकडे कल्याणीने हाताच्या शिरा कापून घेतल्या. कल्याणी मृत्यूशी झुंज देत होती... अभावितपणे कुणीतरी बोलून बसलं

"त्यात आज नेमकी पौर्णिमा..."

सगळ्यांच्या डोळ्यांपुढे प्रश्नचिन्ह उभं राहिलं. एक बऱ्याच वयस्कर आजी कमळाबाई म्हणाल्या.. 

"पौर्णिमेला कस्तुरीला फार त्रास देतो तो...लहानपणी असे नव्हते हो काही  . मी जन्मापासून पाहिलं आहे फार गोड, लाघवी पोर होती कस्तुरी... आणि रूप तर एखाद्या अप्सरेला लाजवेल असं पण हे असं झालं आणि सगळं बिनसलं..."

माझी उत्सुकता 101% पर्यंत वाढली आणि मी बायकांमध्ये अचानक उडी घेत म्हणाली...

"काय झालं? हे असं म्हणजे नक्की काय झालं?? हे ते जे काही होतं ते नेमकं काय होतं?? एकदा नीट सांगून तरी टाका ना ! ..."

आईने रागाने डोळे मोठे केले त्याकडे मी साफ दुर्लक्ष केलं आणि पुन्हा म्हणाले..

"आजी तुम्ही लहानपणीपासून ओळखता ना तिला... मग नेमकं काय घडलं असं की ती वेडी झाली? मला ही तुमची जे ते ची भाषा कळत नाही.."

माझ्या भोचकपणा बद्दल काय करावे ह्या विचारात असतांना कमाळाआजी आईला खुणेनेच शांत रहायला सांगून म्हणाली..

"पोरं मोठी झाली की त्यांची उत्सुकताही मोठी होते... तिलाही कळायला हवं काय घडलं होतं.. काय काय घडू शकतं ते ही सांगायलाच हवं..... मी सांगेन हो बाळ सगळं सांगेन तुला ... पण आज नको .. आज पौर्णिमा आहे.. आजचा दिवस आणि विशेषतः आजची रात्र कशी जाणार कुणास ठाऊक ?? पांडुरंगा रक्षण कर त्या अश्राप पोरीचं..." म्हणत आजीनं हात जोडले.

दुसऱ्या दिवसाची सकाळ वाईट बातमी घेऊनच आली. कल्याणी आम्हाला कायमची सोडून गेली होती... तिचा देह पोस्टमार्टेम साठी पाठविला असता तिच्या देहावर शारीरिक अत्याचाराच्या खूणा आढळल्या होत्या .. अगदी बलात्कार म्हणता येणार नाही पण अनैसर्गिक काहीतरी घडले असावे...अनेक लहान मोठे घाव , ओरबडल्याच्या पाशवी खुणा  तिच्या देहावर आढळल्या.. आणि विसंगती म्हणजे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले तेव्हा ह्या खुणा नव्हत्याच असं ड्युटी डॉक्टरांचं म्हणणं होतं... असं कसं असेल??

"शेवटी ज्याची भीती होती तेच झालं..."
कमळाआजी म्हणाल्या..

क्रमशः
✒️ यशश्री रहाळकर
********************************************

कस्तुरी :- अंतिम भाग

 कल्याणीच्या मृत्यूची बातमी ऐकली आणि मी मनातून हादरले... कालच कोरा शालू घेऊन फुपाखरा सारखी फिरणारी कल्याणी, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद , डोळ्यांतील चमक.. सगळं सगळं जणू कुणीतरी शोषून घेतलं असावं..मला रडावंस वाटलं नाही .. का कुणास ठाऊक ?? मात्र मला सणसणून ताप भरला .. तीन दिवस ताप चढत उतरत असावा.. मी पुरती ग्लानीत होते. चौथे दिवशी जरा भानावर आले पण तोवर आई काळजीने अर्धी झाली होती.. उठून बसण्याइतकी सुद्धा ताकद उरली नव्हती... आई डोळ्यांना पदर लावून रडत असे. सतत जप, अंगारा ,दृष्ट असे सुरू होते. खरं सांगायचं तर मला बसलेला धक्का आणि कोंडलेलं दुःख ह्यांनी तब्येत बिघडली असावी. आठ दिवसांनी अंगात थोडं बळ आलं आणि मी उठून बसू लागले..  आजूबाजूच्या काकू कंपनीने भेटायला येऊन माझा ताबाच घेतला... प्रत्येकाला कल्याणीच्या गूढ मृत्यूची उत्सुकता होती.. तिने मला काहीतरी खास गुपित सांगितलं असावं असे त्यांना वाटून गेले... प्रत्यक्षात कल्याणीने कधीही मला काहीच सांगितले नव्हते. शेवटी त्यांना दटावत कमळा आजी पुढे आल्या आणि म्हणाल्या..
 
"पोर घाबरून गेली आहे ... दिसत नाहीये का तुम्हाला??? बंद करा ह्या चौकश्या... घरी स्वयंपाकपाणी नाही वाटतं?"

आजींच्या एका आवाजात सगळ्या पटापट आपापल्या घराकडे निघाल्या. माझा बांध फुटला आणि मी आजींच्या मांडीवर डोकं ठेऊन मनसोक्त रडून घेतलं... त्या शांतपणे माझ्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या. मी कल्याणीविषयी काही बोलणार तेव्हढ्यात आजींनी बोटाने  गप्प राहण्याची खूण केली... 

"सध्या डोक्याला ताण देऊ नकोस... आराम कर."

म्हणत त्या निघाल्या देखील. त्यांची पाठ वळतात आई हळहळत म्हणाली..

"ह्यांची लेक केतकी जिवंत असती तर तुझ्या वयाची नातवंडे नक्कीच असती त्यांना..."

कमळा आजींना लेक होती?? मला तर त्या एकट्याच राहतात हेच माहीत होते ... गेली कित्येक वर्षे देवळाजवळच्या त्यांच्या दोन खणी घरांत मी दुसरं माणूस आलेलं पाहिलं नव्हतं. तेव्हढ्यात पुन्हा मोहोल्ल्यात एकच गोंधळ झाला... लोकांचा कोलाहल, तसेच ऍब्युलन्सचे आवाज, आरडाओरडा... बापरे! कल्याणीच्या घराकडूनच आवाज येतोय... आता काय नवीन केलं कस्तुरीने??? उठून पाहण्याची मानसिक ताकद नसावी बहुदा .. मी जागीच बसून बाहेर बघू लागले. 
कल्याणीच्या आईने स्वतःला पेटवून घेतले होते... घरातील वाद, भांडणे कल्याणी गेल्यावर विकोपाला गेली होती. शेवटी कल्याणीची आई सुद्धा गेली... कठीण झाले होते सगळे... भयंकर आहे हे सारे! ह्याचा शेवट तर दिसत होता पण उगम मात्र कळत नव्हता... दोन दिवस कसेबसे मी ढकलले आणि तिसऱ्या दिवशी मंदिरात जाऊन कमळा आजींच्या पुढ्यात बसले.. शुक्रवार म्हणजे आजी मंदिरात नक्कीच असतात संध्याकाळी. आजी सहेतुक हसल्या... एव्हाना मंदिरातल्या सगळ्या समया उजळल्या होत्या... त्या घनगंभीर पण गूढ प्रकाशात आजी मला म्हणाल्या...

"तुझे सगळे प्रश्न मला माहित आहेत आणि कदाचित त्यांची उत्तरेही माझ्याकडे आहेत... तू जेव्हढी बेचैन झाली आहेस ना त्याच्या शतपट एकेकाळी मी सुद्धा झाले होते....
सांगते आजवर काळजातल्या बंद कुपीत राखलेले सारे सांगते."

कमळा आजी दम लागून 2 मिनिटे शांत बसल्या... मग देवीकडे प्रार्थना केली आणि माझा हात धरून म्हणाल्या... 

"चल! तुझ्या घरी."

घरी जाताच मला आतल्या खोलीत चालण्याची खूण करत त्यांनी आईलाही बोलावून घेतले आणि दार पक्के बंद केले.
त्या जे काही सांगत होत्या ते इतके अजब आणि दाहक होते की.. काळजाचा थरकाप उडाला..

"कस्तुरी ही काही खरी समस्या नाही , ती वेडी नाही ना आजारी आहे...ती तर केवळ माध्यम आहे.. एका अचाट, अघोरी शक्तीचं... खरी कथा सुरू झाली ती त्या आधीच्या पिढीत.. कस्तुरीचे आजोबा काशीनाथपंत मोठे जमीनदार होते... जेव्हढे श्रीमंत तेव्हढे अधिक लोभी... त्यांना गुप्त धनाचा योग आहे असे भविष्य सांगितलेले असल्याने त्यांनी सतत गुप्त धनाचा ध्यास घेतला होता. खरंतर चार पिढ्या बसून खातील एव्हढी जमीनजुमला होता पण काय फायदा?? मोह, लोभ ह्याने बरबटून गेले होते...  ह्या गुप्त धनाच्या प्राप्तीसाठी अनेक गूढ मंत्रतंत्रांचा नाद त्यांनी धरला होता. त्यातच एकदा त्यांची गाठ कुठल्याश्या वेताळ नामक मांत्रिकाशी पडली. मांत्रिक स्मशानात राही... खरेच अनेक अघोर शक्ती त्याला वश होत्या.त्याने कसलासा विधी करायला सांगितला आणि काशीनाथ पंतांनी तो करायचा ठरवले... विधी काहीतरी गूढ असावा एव्हढेच काय ते त्या वेळी कळले."

आजींना धाप लागली... आम्ही पाण्याचे भांडे पुढे केले.

 "थोडा वेळ आराम करा ..थांबा"

असे काहीतरी आई म्हणाली.. पण त्यांनी खुणेनेच गप्प बसण्याची खूण केली... भरल्या डोळ्यांनी त्या पुढील कथाभाग सांगू लागल्या.
 
"माझे यजमान त्यांचे हिशोब, वहीखाते सांभाळणारे मुनीम , कारकून नोकर म्हण हवे तर... आम्ही त्यांचे आश्रित, उपकाराखाली दबलेलो होतो. ते सांगतील ते करणे ह्याशिवाय पर्याय नव्हताच. माझी लेक केतकी आणि कस्तुरी सवंगडी होत्या ... आपापला आर्थिक स्तर विसरून दोघी आनंदाने खेळात रमायच्या, भांडायच्या आणि पुन्हा एक व्हायच्या... माझी लेक केतकी कस्तुरीहून तीनेक वर्षे मोठी असावी...."

लेकीच्या आठवणीने कमळा आजींच्या चेहऱ्यावर सुखद भाव दिसले.. पण क्षणभरच! लगेच भयाने त्याची जागा घेतली असावी.

"केतकी माझी लेक 14 व्या वर्षी वयात आली आणि पौर्णिमेच्या चंद्रासम मोहक दिसू लागली... एके दिवशी मालकांनी म्हणजेच काशीनाथ पंतांनी केतकी आणि तिच्या वडिलांना बोलावून घेतलं... त्यांना त्या दिवशी देवीची कसलीशी पूजा करायची होती त्यासाठी पूजेला कोरी सवाष्णच हवी .. म्हणून केतकीलाही बोलावून घेतलं. कस्तुरी तोपर्यंत वयात आली नव्हती ... कोरी सवाष्ण म्हणजे वयात आलेली मुलगी पण अजून विवाह न झालेली..."

"हं! म्हणजे व्हर्जिन ब्युटी..."
मी नकळत बोलून गेले... आजींची एकदम तंद्री भंग झाली... त्यांनी क्षणभर थांबत पुन्हा सुसंगती जुळवत सांगायला सुरुवात केली... 

"केतकी आणि तिचे बाबा पूजेला म्हणून जे गेले ते दुसऱ्या दिवशीच परतले... केतकीच्या बाबांनी पूजा झाली आता तो विषय नको म्हणून त्यावर बोलणे टाळले मात्र त्या दिवसा पासून माझी लेक उदास, मलूल गप्प गप्प राहू लागली... कस्तुरी तिच्याकडे आली तरी ती बोलेना.. दगड झाली नुस्ती...😢 आणि मग पंधरा दिवसांनी पौर्णिमेला तो प्रकार घडला... केतकी बेभान झाली... सैरावैरा पळत सुटली, कपड्यांचेही भान तिला नव्हते... दुसऱ्या दिवशी ती एका पिंपळाच्या झाडाखाली बेशुद्धावस्थेत सापडली... पुन्हा पंधरा दिवसांनी तोच प्रकार... मग मात्र केतकीचे बाबा संतापले.. त्यांनी काशीनाथ पंतांशी कडाक्याचे वाद घातले मला म्हणाले आपण गाव सोडून जातोय कुठेही राहू पण इथे नको..."

"ह्या सगळ्या काळांत दर पौर्णिमा अमावस्येला काशीनाथ पंतांना सोन्याच्या मोहरा भरलेली थैली मिळत असे ... कशी ?? कुठून ?? ठाऊक आहे..? त्या वेताळ मांत्रिकाच्या तंत्रमंत्रातून... यज्ञास बळी बोकडाचा या न्यायाने माझ्या अश्राप लेकीचा बळी ह्यांनी दिला होता... केतकी आणि तिच्या वडिलांना बोलावून घेतलं तो दिवस होता शनी अमावस्या... त्या रात्री कोणत्याही देवीची नव्हे तर पिंपळावरच्या मुंजाची पूजा बांधली होती... आणि त्या मुंजाला हवा असणारा अस्पर्श तारुण्याचा नैवेद्य होती माझी कोवळी पोर केतकी..."

कमळा आजी ढसाढसा रडू लागल्या... बापरे! हे असलं काही असतं का जगात?? थोडा वेळ स्वतःला देऊन त्या शांत झाल्या... 

"केतकीच्या वडिलांना अगदी व्यवस्थित बाजूला घेऊन त्यांच्या नजरेआड हे कसे उरकले कुणास ठाऊक ? की मोहिनी घातली होती त्यांनी?? पण माझी लेक केतकी त्या मुंजाने पुर्णपणे झपाटून टाकली... अगदी जिवंत दगड आणि अमावस्या पौर्णिमेला बेभान... मालकांनी ह्यांना झाल्या प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी पैसे देऊ केले आणि मी त्यांची वाट्टेल तशी निर्भत्सना केली... बाप नसून दलाल आहात तुम्ही ...ह्या शब्दांतही सुनावले. पोरीची अशी अवस्था पाहून त्यांचं काळीज तुटत असावं.. पण गरीबापुढे फार पर्याय नसतात ग ! आम्ही गाव सोडायचा निर्णय घेतला शेवटचा निरोप घेऊन निघावे म्हणून हे मळ्यात गेले आणि संध्याकाळी अचानक  ह्यांचा मृतदेह झाडाला लटकला होता... त्यांनी पैश्यांची अफरातफर केली ती पकडली गेल्याने जीव दिला असा आरोप मालकांनी केला...मात्र मला पक्के ठाऊक होते .. आम्हाला वाऱ्यावर सोडून हे जीव देणार नाहीत खूनच होता तो.."

अरे देवा! किती क्रूर दुष्ट माणसे असतात ह्या जगात... आम्हा मायलेकींचे डोळे नकळत पाझरू लागले... काय काय सहन केलंय ह्या माउलीने...

"मी निराधार विधवा त्यात अशी वेडी पोर पदरी... कुठे जाऊ??? मालकांच्या पत्नी सहृदयी होत्या.. त्यांनी मला घरकामाला ठेऊन घेतलं.. रहायला एक खोली, अंग झाकायला वस्त्रे दिली... केतकी ते दोन दिवस सोडले तर अगदी मुकी गरीब गाय असायची , दगडी मूर्तीगत शून्यात पाहत बसायची... काशिनाथ पंतांचे ऐश्वर्य, नावलौकिक वाढत गेला आणि त्यांची कस्तुरीही... वयाने वाढली.. ती जरा उशीराच वयात आली... अप्सरेला लाजवेल असे सौंदर्य... बापाला पोर इंद्राला देऊ की चंद्राला असे वाटू लागले... मात्र विवाह योग येईना.. किंवा तो मुंजा तो येऊ देत नव्हता.. माझ्या केतकीच्या देहात वावरणाऱ्या मुंजाला कस्तुरीची भुरळ पडली होती... कस्तुरीला पाहुणे पहायला आले की अपघात होत, दोन मुले तर मेलीच.. त्यामुळे ही मुलगी नकोच असे जो तो म्हणू लागला... कस्तुरी आपल्या लग्नाची स्वप्ने पाहत होती.. इतर मुलींसारखं तिला फार वाटायचं हिरवा चुडा, शालू दागिने घालून थाटामाटात लग्न करावे... पण बापाच्या पापाची फळं तिला भोगायची होती."

"एका संध्याकाळी कस्तुरी केतकीकडे एकटक पाहत होती.. जणू केतकी तिचा चेहरा वाचत असावी... काहीतरी बोलणे झाले असावे दोघींचे... दुसऱ्या दिवशी पौर्णिमा होती... पहाटे केतकीने तळहाताच्या शिरा कापून घेतल्या आहेत एव्हढेच मला कळले.. तिला जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या दवाखान्यात भरती केलं... पण दुसऱ्या दिवशी माझी पोर केतकी ह्या जगात नव्हती... तिच्याही प्रेतावर आम्हाला अश्याच पाशवी अत्याचारांच्या खुणा दिसल्या होत्या.. ओरबाडलेला, रक्तबंबाळ झालेला माझ्या कोवळ्या पोरीचा देह अंतिम सोपस्कार करून मार्गाला लावला. .. मालकांचे घर कायमचे सोडले... देवळाजवळ दोने खोल्या पुजारी दादांनी दिल्या बदल्यात मी तिथे काम करू लागले."

त्यांना हे सारं सांगणं सुद्धा किती जड जातंय ... सुकलेल्या जखमांच्या खपल्या निघाल्या असाव्या...दुःख भाळाळून वाहू लागलं.....

"चारच दिवसांत मालकांकडे बोलावणं झालं... पाहते तो काय कस्तुरी दगड बनली होती... सगळे तेच प्रकार... जे जे माझ्या लेकीने भोगले ते ते आता कस्तुरी भोगणार होती... क्रूर वाटेल तुम्हाला कदाचित पण मला आनंद झाला ह्या जन्माची पापं ह्याच जन्मात फेडावी लागतात... कस्तुरीच्या आईने पदर पसरला .. त्यांना वाटत होते माझ्या केतकीने झपाटलंय कस्तुरीला... पण मग मी चार जाणत्या बायकांना गोळा करून हा सगळा प्रकार नेमका काय काय होता तो उघड केला... अगदी मुंजाच्या पूजेला माझ्या लेकीला नेण्यापासून ते तिच्या वडिलांच्या आणि तिच्या अनैसर्गिक मृत्युपर्यंतचा... दुसऱ्याचं दुःख हलकं असत म्हणतात.. काशिनाथ पंतांनी खूप प्रयत्न केले असावेत पण त्या मुंजाने त्यांच्या कस्तुरीला सोडले नसावे..."

"नियती कशी असते पहा! कस्तुरी म्हणजे काशीनाथपंतांच्या अभिमानाची खाण होती .. ढासळली क्षणांत संपली... मग तिचेही पौर्णिमा अमावस्येचे पेटून बेभान होणे आणि एरव्ही दगड होत बसणे सुरू झाले... थोडीथोडकी नव्हे तर चाळीस वर्षे हे अव्याहत सुरू होते...
मग मग ....कल्याणी वयात आली असावी आणि मुंजाला नवीन चटक हवी असावी कदाचित... मात्र कल्याणीच्या हे सगळे परिचयाचे असल्याने तिने विरोध केला आणि एका रात्रीत तिचा बळी गेला असावा... जेव्हा कस्तुरी "माझे लग्न आहे मला बांगड्या भरा " वगैरे म्हणत होती तेव्हा ती कस्तुरीचं होती.. तिचं लग्न व्हावं ही आस  ती व्यक्त करत होती.... मध्यंतरी तिच्यातील मुंजा नवीन देह शोधत असावा.."

कस्तुरीने माझा हात धरणे एकटक पाहणे... मला अचानक आठवले आणि आईने ओढत आणले नसते तर काय झाले असते ?? ह्या कल्पनेनेच माझा थरकाप उडाला. कमळा आजी चांगल्याच विचारात पडल्या होत्या... त्यांच्या मते कल्याणी आणि त्यांची लेक केतकी ह्यांच्यात मृत्यूत समानता होती .. ही मुंजा नामक अतृप्त शक्ती देह भोगून बाहेर पडतांना त्याच्या पार चिंध्या करत असावी... कल्याणी आणि केतकीच्याही मृतदेहांवर अमानवी अत्याचारांच्या खुणा होत्याच... पण मग कस्तुरीच्या बाबतीत हे विसंगत कसे?? कल्याणीचा देह सोडून ती शक्ती गेली तरी कुठे?? कमळा आजी आम्हाला म्हणाल्या...

"काहीतरी आहे  जे विसंगत आहे... बाकी मालिका समान असेल तर कस्तुरीच्या बाबतीत भिन्नता कशी असेल ??"

"पुन्हा त्या वेताळाकडून काही जारण मारणं करून घेतले असेल म्हाताऱ्याने... गुप्तधनासारखं "
आई संतापाने म्हणाली.

कमळा आजी क्षणभर शून्यात नजर लावून बसल्या आणि अचानक गणित जुळावं तसं म्हणाल्या...

"मला वाटतं ... होय ! होय! तेच कारण असावं... कस्तुरीला कायमचं सोडलंच नाही त्याने ... तो माध्यमं शोधतोय अधिक तरुण अधिक उमदे पण बहुदा मिळत नसावे.अजूनही तो तिच्यात रेंगाळत असावा..."

हे सगळं समजून घेणं समजशक्ती पल्याडचे होते... डोके आणि मन दोन्ही बधीर झाले.. मध्यंतरी बरेच दिवस गेले असावेत... मी माझ्या शिक्षणासाठी शहरात निघून गेले... एके दिवशी आईचा फोन आला ..

"कस्तुरीने आत्महत्या केली हातच्या नसा कापून ... अगदी तशीच... देहावर अघोरी खुणा होत्या."

चला.. म्हणजे अखेर कस्तुरी सुटली म्हणायचे .. कल्याणीच्या धाकट्या काकाला त्याच दरम्यान  तिसरी मुलगी झाली होती... गोरीपान, मधाच्या रंगाचे डोळे , दाट काळेभोर केस... पण जन्मांधळी असावी लोक म्हणायचे. तिची बुबुळे स्थिर होती , देहातही काहीच हालचाल नसावी जिवंत असूनही पुतळा वाटावी अशी... मात्र महिन्यातले ते दोन दिवस ती रडून हातपाय झाडून घर डोक्यावर घेत असे.
पापाचे ओझे कित्येक पिढ्यांना वहावे लागते नाही ??? .. 

✒️ यशश्री रहाळकर

****************समाप्त*****************









 

सोमवार, ४ जानेवारी, २०२१

पर्स


पर्स

पर्सची बाह्य किंमत काहीही असू देत,
त्यावर फारसं काही वेगळं नसतं
रंग ,रूप, आकार ह्यांपलिकडे...
प्रत्येक पर्सचं एक वय असतं..💝

पैसा खूप काही देतो, चॉकलेट्स, बाहुली...
हे जेव्हा इवल्याश्या पर्सला कळू लागतं.. 
तेव्हा खेळण्यातले खोटे पैसे, रुमाल खाऊ 
ठेवते, बागडते पर्स ,जाईल तिकडे.

कॉलेजला जाऊ लागली की 
पर्स लिपस्टिकस् ,कॉम्पॅक्ट, परफ्यूम.. 
आणि काय काय मिरवते...
दडवून ठेवते एखादा गुलाब 
आणि लपवून ठेवते एखादं प्रेमपत्र ..

पर्स नोकरदार असेल तर कामांच्या नोंदी..
आर्थिक स्वातंत्र्याची ATM कार्डस् असतात
पर्स गृहिणी असेल तर सुट्टे पैसे आणि
वाणसामानाच्या याद्या नि पावत्या असतात
जबाबदारीच्या घराच्या किल्ल्या मात्र 
दोन्हीकडे सारख्याच असतात..

लेकुरवाळ्या पर्समध्ये मातृत्वाचं भंडार असतं 
बाळाचे कपडे, डायपर, फूड, पाणी..
एक अख्ख दुकान असतं.
उतारवयात औषधे, डॉक्टरचे संपर्क ,प्रिस्क्रिप्शन
घेऊन फिरते थकलेली जीर्ण पट्ट्यांची पर्स.

पैसा, सौंदर्य, काळजी, मातृत्व, आरोग्य..
सारं सारं स्वतःमधील इतरांना वाटून देत ,
आता पर्स पुरती रिकामी झालेली असते
अखेरच्या दिवसांत पर्सला कळून चुकतं
सगळ्यांत मौल्यवान ठेवा असणाऱ्या
स्वतःला सांभाळायचं.. राहूनच गेलेलं असतं 😢😢

✒️©️ यशश्री रहाळकर




रविवार, ३ जानेवारी, २०२१

"पुरुषस्पंदन" कथा १० :- साजूक तुपातला


MRA :- Mens Right Associatio विषयी आपल्याला माहीत आहे का? भारतासारख्या पुरुषप्रधान देशात ह्या सारख्या पुरुषांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांची गरज तीव्रतेने जाणवू लागली आहे.... बहुतेक सगळे कायदे स्त्रियांच्या संरक्षणासाठी निर्माण झाले असले तरी त्याचा गैरवापर करण्याचे प्रमाण देखील दुर्लक्ष करण्याजोगे नक्कीच नाही.अन्यायग्रस्त बिचारी स्त्री आणि अन्याय कर्ता  क्रूरकर्मा पुरुष असेच गृहीतक आजवर मांडले गेलंय... पण बरेचदा ह्या उलट असू शकतं.. शक्यता कमी असली तरी अजिबात नाही असंही म्हणता येत नाही. एखादा निरपराध सरळमार्गी पुरुष देखील फसवला जाऊ शकतो, त्याच्यावरही लैंगिक अत्याचार होतात, त्यालाही खोट्या केसेस टाकून निष्कारण छळले जाते... होय! सतत बेगडी पुरुषत्वाचं चिलखत घालून अपेक्षांच्या ओझ्याखाली वावरणारा तो दुबळा, भित्रा  असू शकतो...  मात्र हे समाजमनाच्या पातळीवर मान्य होणारे नसते.

आता मी मांडत असलेली कथा लिहिणं माझ्यासाठी खूपच अवघड होतं... कारण ही कथा एका अत्यंत जवळच्या व्यक्तीची असल्यानं थोडीशी भावनिक गुंतवणूक होतीच... "विप्लव"... माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीचा.. वरदाचा धाकटा भाऊ. आमची नर्सरीपासूनची दाट मैत्री.. एकमेकींकडे जाणं येणं.. त्यामुळे मी विप्लवला अगदी एक वर्षांचा असल्यापासून चांगला ओळखते. एका रविवारी विप्लवने माझं बरचसं लेखन वाचलं आणि मला कॉल केला.. माझं लेखन खूप आवडल्याचं त्यानं नमूद केलं मात्र त्याच वेळी माझं लेखन केवळ एकच बाजू अधोरेखित करतंय "स्त्रियांची" ... "पुरुषांवर स्त्रियांकडून अन्याय होतो का? " त्यानं थेट प्रश्न विचारला... आणि खऱ्या अर्थानं "पुरुषस्पंदन" चा जन्म झाला. आज त्याचीच कथा ह्या सदरात मांडतांना दुःख, राग, वेदना, त्रागा  नेमकं काय काय होतंय माहीत नाही. गेली आठ वर्षे विप्लव कोर्टाच्या फेऱ्या मारतो आहे त्याही कुठल्याश्या आडवळणाच्या गावातल्या... त्याच्यावर अनेक केसेस नोंदवल्या गेल्या आहेत... तो आणि त्याच्या घरातले सगळेच वेठीला धरले आहेत... अगदी वरदाला देखील दोनेक महिन्यांतून एकदा जावेच लागते... आणि हे सारे अश्या लग्नासाठी जे आठ महिनेही टिकले नाही😢

विप्लव घरातला एकुलता एक पुरुष.. वडील तो 5 वर्षांचा असतांनाच गेले . वडिलांच्या जागी आई नोकरीत लागली आणि तिने दोघांना लहानाचे मोठे केले. घरी 76 वर्षांची आजी आणि आत्या.... वरदाचे लग्न होऊन ती तिच्या सासरी रुळलेली तिचं घरही अगदी हाकेच्या अंतरावर. विप्लवची आत्या लग्नानंतर माघारी आली ती कायमचीच... तिचा नवरा तिचा करत असलेला छळ, मारहाण अगदी बालपणीच विप्लवनी अनुभवलेली... एकूणच सगळ्या महिला मंडळात वाढलेला असल्याने तो कमालीचा प्रेमळ आणि मायाळू... अगदी मुंगीही न मारणारा इतका हळवा. काहीही संकट आलीत तरी घरातील वातावरण प्रसन्न असायचं कायम .👍 प्रत्येक जण उद्योगी आई ,आत्या नोकरी करायच्या ..आजी देखील हास्यक्लब, मंडळे ह्यात गुंतवून घ्यायची... 4 बेडरूमचा मोठ्ठा फ्लॅट .... घरी लादी-पोछा, भांडी, कपडे अगदी पोळ्यांनाही बाई लावलेली. विप्लव हुशार ,मेहनती तर होताच..  IT इंजिनियर झाला आणि चांगल्या कंपनीत उत्तम पॅकेज घेऊन नोकरीतही लागला... 3 वर्षांत उत्तम रुळला .. हल्लीच्या ट्रेंड प्रमाणे कंपनी बदलत अधिक पगाराच्या अधिक वरच्या पोस्ट मिळवता झाला. मात्र तो करत असलेलं काम, तिथलं वातावरण आणि त्याचा स्वभाव ह्यांची सांगड जुळेना. सरळमार्गी , पापभिरू , ड्रिंक्स न घेणारा, पार्ट्यांना न जाणारा आणि मुख्य म्हणजे काम प्रामाणिकपणे करणारा विप्लव ... सगळ्यांच्या चेष्टेचा विषय होता... त्याला सगळे "साजूक तुपातला" असे चिडवत... विप्लवला ह्यानी फार फरक पडत नव्हता... मात्र त्याचं सरळमार्गी असणं त्याचा घात करून गेलं.

विप्लवचा स्वभाव पाहता एखादी मुलगी गटवणं त्याला जमणार नाही हे लक्षात घेऊन वेळीच घरच्यांनी मुली बघायला सुरुवात केली... पण पाच वर्षे झाली लग्न काही जमेना... एकदा काकू (वरदा विप्लवची आई) मला एका कार्यक्रमात भेटल्या..

"काकू लाडू कधी देताय?? "

त्यांनी मला कोपऱ्यात घेत म्हटलं..

"तूच बघ ग ओळखीतली एखादी, योगच नाही येत आहे ह्याचा"

"त्याला एखादी आवडली असेल तर चालवून घ्या तुम्ही..आजकाल चालतं"

मी जरा अंदाज घेत म्हणाले.

"तसं असतं तर फार बरं झालं असतं बाई.."😢
काकूंचे डोळे भरून आले .. मुलाच्या लग्नासाठी हवालदिल झालेली पहिलीच आई मी पाहिली होती... धबधबा कोसळावा तश्या त्या आपले अनुभव सांगत सुटल्या. विप्लवचे शिक्षण आणि क्षेत्र पाहता IT मधील मुली, उच्चशिक्षित मुली त्याला सांगून येत तर काही ठिकाणी हे स्वतः approach झाले... काही मुली विवाह मंडळात तर काही लग्न जुळवणाऱ्या ऑनलाईन sites वर देखील पाहिल्या.....अक्षरशः शेकड्याने पहिल्या... सगळीकडे अत्यंत विचित्र अनुभव आले. बहुतेक मुलींना आई, आजी, आत्या .. हे जंजाळ नको होते. वेगळं घर घेऊन रहाण्याच्या अटीवर त्या तयार होत्या... काहींची तर त्याला घरजावई करून घेण्याची मानसिकता होती... विप्लवला अर्थातच हे मान्य होणार नव्हते. त्याहीपलीकडे काही मुलींना तो टिपिकल IT कल्चर मधला असणे अपेक्षित होते.. पब, पार्टी  हा त्या जीवनावश्यक भाग मानत असाव्यात. काहींनी तर स्पष्टपणे सिगरेट ओढते, रविवारी ड्रिंक्स घेते हेही सांगितले... काकूंच्या चेहऱ्यावर भयंकर काहीतरी अनुभवल्याचे भाव होते... त्यावर मी म्हणालेही..

"आधीच सांगताहेत हे उत्तम नंतर वाद नको."

प्रत्यक्षात साध्या सरळ विप्लवची एका  सहचराची , जोडीदाराची अपेक्षा चुकीची नव्हती. संसाराची आवड असणारी घरात रमणारी, त्याच्या घरच्यांसकट त्याच्यावर प्रेम करणारी बायको... मात्र साधेपणा हल्ली out dated झालाय... कसे काय कोण जाणे पण विप्लवचे लग्न जुळले... त्याच्या reception चे आमंत्रण द्यायला आलेली वरदा जरा नाराज वाटली... विप्लवने पत्नी म्हणून खूपच सामान्य मुलगी निवडल्याची बोच तिच्या शब्दांत जाणवली... 

"शेवटी काय तो आनंदात असणे महत्वाचे ना!" ... 

....हेही तिला मान्य होतेच तरीही कुठेतरी आनंदावर विरजण पडले असावे. रिसेप्शनला गेलेल्या मला चटकन वरदाची नेमकी बोच जाणवली.. मुलगी उंच धिप्पाड, दिसायला सामान्य होती... जेमतेम ग्रॅज्युएट.. सरपंच किंवा तत्सम गावातील पुढाऱ्याची कन्या... एकंदर गावठी कारभार वरदाला नक्कीच आवडला नसणार... पण विप्लवने तिच्यात काय पाहिले कोण जाणे?? त्यांच्या गुरूंच्या परिवारातील म्हणून हे स्थळ आले आणि घरगुती वळणाची पोर म्हणून होकार दिला.

लग्नाला जेमतेम महिना होत नाही तोच काहीबाही कुरबुरी कानावर येऊ लागल्या.  विप्लवची पत्नी सोनाली अत्यंत तापट आहे, भांडकुदळ आहे .. उठसुठ माहेरी निघून जाते ... एक ना अनेक गोष्टी अनेकांकडून कानावर येत होत्या. वरदाने स्वतःहून काही सांगेपर्यंत ह्या प्रकरणाबद्दल अवाक्षर काढायचे नाही असे मी ठरवले. एक दिवस अचानक वरदाचा फोन आला.. तिला बोलणं सुचत नव्हतं... ती रडतेय एव्हढंच काय ते कळत होतं... तिने मला ताबडतोब निरामय हॉस्पिटलमध्ये यायला सांगितले तशी मी तिकडे धाव घेतली... पाहते तो काय?? विप्लव ऍडमिट होता त्याचं अंग काळं-निळं पडलं होतं... त्याला बेदम मारहाण झालेली असावी... वरदा काहीही सांगण्याच्या मनःस्थितीत नव्हती... विप्लववर प्राथमिक उपचार करून पेनकिलर वगैरे देऊन घरी घेऊन आलो... ह्या सगळ्यांत त्याची बायको सोनाली कुठेच दिसेना... घरी पोहोचताच काकू ...

"घात झाला ग ... चांडाळणीने माती केली माझ्या लेकराची" म्हणत  टाहो फोडला... काय झाले असेल ह्याचा मला नेमका अंदाज बांधता येत नव्हता.

थोड्या वेळाने एकेक घटना उलगडली आणि माझा ऐकतोय त्यावरचा विश्वास बसणे अवघड झाले... हे खरंय हे खरंय... मी माझ्या मनाला पटवून देत होती.

सोनालीच्या आयुष्याकडून निराळ्या अपेक्षा होत्या, तश्याच तिच्या जोडीदाराकडूनही असणाऱ्या अपेक्षा धडकी भरवणाऱ्या होत्या.... लग्नानंतरचे काही गुलाबी दिवस संपताच .. विप्लवला कामात झोकून द्यावेच लागले तो जबाबदारीच्या पोस्टवर होता... पण हे सगळे समजून घेण्याइतकी बौद्धिक पात्रता तिची नव्हतीच. तिने शहरातल्या मुळाशी लग्न केले होते कारण सोनालीला  हिंडणे, फिरणे ,हॉटेलिंग , खरेदी ह्याचेच वेड होते... ते होईना तसतसे तिचे रंग बदलले.. आपला नवरा काहीच कामाचा नसल्याचे ती वारंवार बोलून दाखवू लागली.. तो सतत काम करतो कारण तो वैवाहिक सुख देण्यास पात्र नाही इतके घाणेरडे आरोप होऊ लागले.. सतत भांडायचे, माहेरी निघून जायचे, मग ह्यांनी समजूत काढून परत आणायचे हा क्रम अखंड सुरू होता. सोनालीचा तापटपणा भयंकर होता ती संतापली की हाताला येईल ती वस्तू फेकून मारायची... ती ज्या माणसांमध्ये वावरली, ज्या वातावरणात वाढली तिथे सर्रासपणे बायकोला मारणे, शिवीगाळ करणे, एखाद्या गुलमागत तिच्यावर हुकूमत चालवणे हे नित्याचे होते.  यातले काहीच विप्लव करत नसल्याने तो खऱ्या अर्थाने पुरुषच नाही अशी तिची धारणा होती. तिच्या वडिलांकडे ह्याविषयी तक्रार केली असता त्यांनी जावयाला सल्ला दिला ....

"जावाई बापू! बायाची जातच हरामखोर अस्तीया.. त्याहिले गोड भाषा कळत नाही  . मधून मधून चार लाथा घालीत जावा... आरडली का कानाखाली जाळ काडा.. मंग बगा कशी सुतासारखी सरळ हुते.."

धन्य तो बाप..त्याचीच लेक ती वेगळं काय वागणार... बेडरूममध्ये एकांतात सोनालीच्या मनाजोगी साथ मिळाली नाही की ती विप्लवला मारत असे...🙄 बापरे! भयंकर आहे हे... एखादी चापट एखादा गुद्दा बिचारा मुकाट्याने सहन करायचा.. कारण तिला मारणं त्याला जमणार नव्हतं आणि बाहेर कुणाला सांगणार तर लाजिरवाण.. लोक म्हणतील पुरुषांसारखा पुरुष बायकोचा मार खातो.. अगदी घरातल्या आई आजीलाही हे माहीत नव्हतं... मात्र त्या दिवशी तिने सगळ्या मर्यादा ओलांडल्या .. आई, आजी आणि आत्या वरदाकडे दोन दिवस मुद्दाम ह्यांना एकांत मिळावा म्हणून रहायला गेल्या.. तर सोनालीने रागाच्या भरात विप्लवला अक्षरशः अर्धमेला होईपर्यंत मारलं... तिच्या कौर्या पुढे त्याचा विरोध कुचकामी ठरला... पहाटे ती बॅग भरून माहेरी निघून गेली.. विप्लवने वरदाला बोलावून घेतलं..😢
ह्या सगळ्याची तात्काळ पोलीसांकडे तक्रार नोंदवा असा सल्ला मी देऊनही त्यांना तो मान्य झाला नाही.. अशी तक्रार नोंदवून आपलीच बदनामी होणार.. शिवाय विषय वाढवायला नको असेही वाटत असावे.

चारच दिवसांत सोनालीच्या गावावरून पोलीस आले आणि विप्लव आणि सगळ्या कुटुंबियांना अगदी म्हातारी आजी आणि वरदा सुद्धा...पकडून नेण्यात आले... कौटुंबिक हिंसाचार, हुंड्यासाठी छळ, मानसिक त्रास असे कित्येक आरोप त्यांच्यावर लावलेले असावे... वरदा, आजी , आत्या कश्याबश्या सुटल्या बेलवर पण विप्लव आणि काकूंना मात्र बरेच दिवस बेल मिळाली नाही.. त्या गावात त्यांचे अक्षरशः हाल हाल झाले... त्यानी नोकरी हातापाया पडून वाचवली पण पद गेलं..डीमोशन झालं. सगळीकडे छी थू झाली. लोक ह्यांच्याकडे सुनेला छळणारे राक्षस म्हणून पाहू लागले.. बिचाऱ्या वयस्कर आजीचे हाल काय सांगू?? त्यांचा हास्यक्लब, मंडळे बंद झाली.. ह्या साऱ्याला थोडीथोडकी नाहीत तर आठ वर्षे झाली... सोनालीने टाकलेल्या अनेक केसेससाठी त्याला सतत तिच्या तालुक्याच्या गावी जावे लागते.. अधून मधून आई, आजी, आत्या आणि वरदाला देखील जावेच लागायचे त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले होते.  एकदाचे काय ते पैसे देऊन मिटवून का टाकत नाहीस सगळं.. हा विचार मनात येतोच.. 
विप्लवने तेही प्रयत्न केले ... पण सोनालीला पैसे नकोच आहेत.. तिच्याकडे त्याच्या कित्येक पट जास्त पैसा आहे... तिला त्याच्याशी संसार करायचा आहे .. तेही तिच्या शर्तींवर...जे आता विप्लवला मुळीच मान्य नाही... त्याला फक्त घटस्फोट हवा आहे ह्या नकोश्या नात्यातून, ह्या क्रूर आठवणींतून....त्याच्यावर दबाब आणण्यासाठी ,तो मानसिक छळ करतो इथपासून ते तो पुरुष नाही इथपर्यंत सगळी कारणे तिने पुढे केली आहेत .. मात्र ती घटस्फोट द्यायला तयार नाही... लग्न नावाच्या व्यवस्थेची केव्हढी क्रूर थट्टा आहे ही.. लग्नानंतर जेवढे महिनेही ते एकत्र राहिले नाहीत तितकी वर्षे घटस्फोट घेण्यात वाया गेली आहेत.. हा प्रश्न आता सोनालीच्या इगो चा आहे .. ती मागे हटणार नाही.. आणि विप्लवसह घरच्या सगळ्यांची किती काळ फरपट होणार आहे कुणास ठाऊक?

लोक म्हणतात.. "हा बुळ्या साजूक तुपातला आहे. भेंडीची भाजीआहे नुसता ह्याच्यात काही दमच नाही.. चांगलं तुडवून काढायचं बायकोला .. हा पुरुष नसेलच..."
काय असतं हे "so called पौरुषत्व"???  लग्नाच्या बायकोला शिव्या देऊन, मारहाण करूनच बहुदा ते सिद्ध होत असावे... मुलाने साधे सरळ, हळवे, स्वभावाने गरीब जरूर असावे पण मारहाण सहन करण्याइतपत साजूक तुपातले नक्कीच असू नये.

✒️ यशश्री रहाळकर

शुक्रवार, १ जानेवारी, २०२१

केक आणि बरंच काही....🎂


काल new year party साठी ... ओह ओ! 
हल्ली "New Year Bash!🎊" असं असतं नाही का? ? तर त्या निमित्ताने घरांत 10/12 पदार्थ तयार असतांनाही माझी लेक हुप्प होती कारण केक नव्हता.... माझीच लेक ती.. वडिलांचा समंजसपणा कणभरही न घेता माझ्यातला हट्टीपणा अधिक प्रगत अवस्थेत तिच्यात आला असणार नक्कीच!☺️ मन अचानक उडी मारून माझ्या बालपणात गेलं... माझ्या लहानपणी आमच्या गावात बेकरी नव्हतीच... हो हो! मी काही दुर्गम भागातली नाही किंवा "आमच्या वेळी" म्हणावं इतकी म्हातारी सुद्धा नाही.. पण खरंच! नव्हती हो बेकरी. जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे बुलढाण्याला किंवा अकोल्याला काही कामानिमित्त बाबा गेले की माझ्यासाठी ब्रेड यायचा... "राशा ब्रेड" अजूनही आठवतो मला 🙄... मी आठ /नऊ वर्षांची असेन तेव्हा एका मुस्लीम व्यक्तीने बेकरी सुरू करून घरोघर ब्रेड, टोस्ट आणि खारी विकायला सुरुवात केली. सकाळी बरोब्बर साडे सहाला त्याचा एक पोऱ्या (म्हणजे फार लहान किंवा मोठा नसलेला एक पोरगेलासा... ) सायकलची घंटी वाजवत जायचा... पण आजीबाईंना त्याच्याकडून काही घेतलेलं चालत नसे. कधीतरी आजी गावाला गेली किंवा अगदी मेहेरबान झाली तरच एखाद्या रविवारी खारी किंवा टोस्टची खरेदी होई... आहाहा! काय वर्णू तो सोहळा... पहाटे लवकर उठून सगळं आवरून बसायचं.. कारण उठायला किंवा तोंड धुवायला जराही उशीर झाला तर खारी संपलेली असायची.. घरात इतकी माणसं होती की हाजीर सो वझीर ..👍 सकाळी सहालाच आवरून गेट बाहेर आम्ही घिरट्या घालत बसायचो.. तो बेकरीवाला पोऱ्या लांबून दिसला की कोण आनंद होई. मात्र केक हा प्रकार तोपर्यंत ठाऊकच नव्हता. 

माझ्या सारख्या खेड्यातल्या येड्यांच कॅलिफोर्निया म्हणजे नागपूर... माझं आजोळ . तिथे गेलं की आवर्जून हॉटेलमध्ये जाऊन मसाला डोसा खाण्याचा कार्यक्रम होई. क्रीमची बिस्किटं मी तिथेच पहिल्यांदा चाखली.. ते दोन बिस्किटांच्या मधील क्रीम ..त्यात जॅम..🤤🤤 तेव्हा तेव्हढंच मिळायचं "जिमजॅम"... आजही मी क्रीमचं बिस्कीट खातांना डोळे मिटून घेत त्याची चव घेते.. माझी अशी ब्रम्हानंदी टाळी लागली की माझी लेक हसत सुटते... तिला किंवा तिच्या पिढीतल्या कुणालाच ही गंमत कळणे शक्यच नाही. पदार्थांची वाट पाहणं काय असतं आणि त्यानंतर तो पदार्थ मिळाल्याचा अवर्णनीय आनंद ह्या पिढीच्या वाट्यालाच आलेला नाही. ....तर साधारण दहा वर्षांची असेन तेव्हा पहिल्यांदा केक पहायला 😍आणि एकच तुकडा खायला मिळाला🎂🍰एका अतिश्रीमंत वाढदिवस सोहळ्याला आमची वर्णी लागली आणि "केक" नावाचा पदार्थ कळला... पुढे अधून मधून आवर्जून मला आवडतो म्हणून केक आणला जाऊ लागला.. तेव्हा तो एक लांबट विटे एव्हढाच असायचा.... आणि "व्हेज केक" असली काही भानगड अस्तित्वात आलीच नव्हती. 😂 त्याच दरम्यानच्या काळात दूरदर्शन वरील सिनेमा/सिरीयल मधील वाढदिवसांचे केक पाहून वाढदिवसाला केक हवाच असा आग्रह बालगोपाल धरू लागले. आमच्या गावातील काही हुशार मिठाई वाल्यांनी ह्यावर नामी युक्ती काढली ... मिल्क केक नामक कलाकंद किंवा पक्क्या पेढ्याच्या थरावर चक्क आयसिंग करून केक म्हणून विकला जाई.🤣🤣 हा असा पेढेगाठी केक आणून कित्येक पोरांना येड्यात काढायची कामं घरोघरी होत असत. त्या सिनेमातल्या घोड्या, वयस्कर ,चाळीशीच्या वाटणाऱ्या हिरॉईनचे अठरावे वाढदिवस ,त्याची पार्टी आणि हिरोचं दुःखी गाणं पाहत आयुष्याची अनेक वर्षे वाया गेली... पण तो भलामोठा 3 मजली केक कापतांना मात्र मी डोळ्यांत प्राण गोळा करून बघायची..🎂😯असं माझं केकवरील प्रेम हळूहळू वाढत गेलं.. आणि एकदिवस मोठ्ठी हिम्मत गोळा करून मला वाढदिवसाला केक कापायचा असल्याचे मी सांगितले.... माझ्या घरी जणूकाही मी पोपटात प्राण असलेल्याचा पोपट मागितला असावा असा गहजब झाला. माझ्या कर्मठ घरांत मी आता निर्लज्जपणे केक मागतेय, उद्या सामिष भोज मागेन आणि परवा एखाद्या मार्टिन गायकवाड चा हात धरून पळून जाईन असे गृहीतक मांडले गेले🙄🤦🤦 पुढे केकचा "क" सुद्धा मी काढला नाही.

आमच्या तीर्थरूपांना कँडल फुंकर मारून विझवणे आणि केक कापणे हे धार्मिक अधःपतन वाटत असे. ... सगळ्यांत महत्वाचे म्हणजे त्या वेळी वडिलांना "अहो बाबा!" म्हटले जाई आणि घरी त्यांचा धाक असे, त्यांचा शब्द प्रमाण मानला जाई. हल्ली सारखा "ए डॅडू " किंवा "पप्पूडी" वगैरे काही झाला नसल्याने बिनबोभाट विरोध न करता ऐकण्याची सवयच होती... सगळ्याच मुलांना ती असे...🤔🙄 हे असं काही बोललं की माझी लेक "अविश्वसनीय! अद्भुत!" म्हणत पाहत राहते .. आणि थोड्या वेळात माझ्याकडे एलियन असल्यागत पाहत निघून जाते.🤷🤦 असो तर मुद्दा हा आहे की वाढदिवसाला केक असावा अशी मनातून इच्छा असूनही मागायची हिम्मत नव्हती. दिवार मधल्या शशी कपूर सारखेच माझ्याकडे काहीही नसले तरी "मेरे पास माँ है।" ...हे मात्र होते. माझ्यावरील प्रेमापोटी माऊलीने पैसे कुणास ठाऊक कसे वाचवून इलेक्ट्रिक ओव्हन घेतला. एका नॉन महाराष्ट्रीयन मैत्रिणीकडून केक शिकून आली... गुपचूप 3 अंडी आणून केक केला... तुम्हाला सांगते "अजि म्या ब्रम्ह पाहिले" असे भाव डोळ्यांत साठवून मी ओरडत सुटले तसा ममताळू माऊलीचा सटकन धपाटा बसला...😢🤐  "गप्प बसून गिळा.. गावाला दवंडी पिटवून सांगू नका."  तो धाकच एव्हढा जबरदस्त होता की अजूनही मी केक गप्प बसूनच खाते😂😂... तुम्हाला सांगते काय केक असायचा तो... आहाहा! घरी व्हेज केक असे सांगितले असले तरी त्यातील चोरून घातलेल्या अंड्यांचा खमंग खरपूस वास घरभर दरवळून जायचा. त्यावेळी चांगले मिक्सर ब्लेंडर्स वगैरे नव्हते . एकच अर्धमेला 'सुमित'चा मिक्सर होता तो दाण्याचे कूट करतानाची धापा टाकायचा. आई बिचारी तास तासभर ते केकचं बॅटर हाताने फेटत बसायची..😢 भरीस भर लोडशेडिंग होतं... एकदा गेले की अकरा बारा तास लाईट जायचे... मध्यंतरी लॉक डाऊन मधील विरंगुळ्यात मी लेकीला लाईट गेल्यावर आम्ही कसे धम्माल करायचो हे सांगितले... 🙄😕 त्यावर ती म्हणाली, "oh mom!Nope!  am not  your reader" थोडक्यात मी रचून गोष्टी फेकते आहे असे तिचे मत... बहुदा अष्मयुगातून direct आपली आई आली असावी असे तिला वाटले. असो! ह्या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीतून मार्ग काढत माझी आई awesome यम्मी केक बनवत असे.. बहुतेक वेळा ड्राय फ्रुट चा थर देऊन किंवा टुटी फ्रुटीचा थर... फ्लेवर एकच व्हॅनिला. खरा केक अंड्याचाच👍😊 बाकी सगळं झूठ आहे व्हेज केक वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत...... हे म्हणजे कोथींबीर वडीतून कोथिंबीर काढून घेण्यासारखं आहे.☺️

पुढे (नाईलाजाने) मोठं झाल्यावर केकचा नाद सोडावाच लागला... मग मला माझं स्वयंपाकघर मिळाल्यावर मी केक करू लागलेही पण ती मज्जा काही आलीच नाही. हल्ली सोहळ्यांचे इव्हेंट झाले आणि केकने आपल्या प्रत्येक इव्हेंटवर हुकूमत गाजवायची ठरवली आहे... वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस ह्या खेरीज छोट्या मोठ्या गेट टू गेदरला सुद्धा केक कापण्याचं प्रस्थ वाढलं आहे. नुकतेच मी एका धर्मरक्षणाचे आणि संस्कृती संवर्धनाचे पोकळ ढोल सतत वाजविणाऱ्या  मैत्रिणीच्या घरच्या साखरपुड्याच्या फोटोत दोघांना केक कापतांना पाहिले....फाटक्या तोंडाच्या मला गप्प बसवत नाही अशा वेळी!🤦 मी थेट विचारलंच तिला ... त्यावर तिने लेकीचा साखरपुडा केला नसून रिंग सेरेमनी केल्याचे मला कौतुकाने सांगितले...असेल बाई ! 👍 मी खेड्यातली येडी.🤐 कुणी रिटायर्ड होतंय केक कापा, लग्न करताय केक कापा,न्यू इयर,  डोहाळेजेवण, बारश्याचा सुद्धा केक, दुकान ओपनिंग केक कापून😟😖 कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा!☺️☺️ बाकी वेळी मी शांत बसून इव्हेंट बघत असते पण डोहाळेजेवण सॉरी सॉरी हं!👍 बेबी शॉवरला मला प्रचंड टेन्शन येते. अहो! तो अर्धा केक आतून गुलाबी आणि अर्धा निळा असतो... त्या डोहाळतुलीने एक त्रिकोणी तुकडा कापायचा असतो.. तो बाहेर काढून सगळ्यांना दाखवतात गुलाबी असेल तर बेबी गर्ल... निळा असेल तर बेबी बॉय... अहो जॉइन्टचा पार्ट निघाला तर.. 🤔 ह्या प्रकाराचे इतके दडपण असते की मीच जीव मुठीत धरून बसलेली असते .. मुलगा /मुलगी काहीही चालेल देवा! जॉइन्टचा भाग काढू नको! एकतर आपल्याकडे ह्या असल्या अंदाजांना अवास्तव महत्व देतात... उगाच टेन्शननी एखादी म्हातारी "राम" म्हणायची..😑😐 आमच्या डोहाळे जेवणाला एक बरं होतं.. कसल्या तरी अगम्य खिरी असायच्या काय उघडलंय हे कळणारी आजीच पाहून...ओळखून घोषित करायची.. कारण तिनेच केलेले असल्याने ते गव्हल्या, मालत्या, फणोले, नखोले काय असेल ते तिलाच कळायचं.... फार फार तर पेढा आणि बर्फी असायची नो झंझट!👍 आता मात्र सगळी गोळाबेरीज एका केकमध्ये होते... सेलिब्रेशन केक शिवाय होऊच शकत नाही एव्हढी वेळ येऊन ठेपली आहे.

केक हेच पहिलं प्रेम असणाऱ्या माझ्यासाठी हे "सेलिब्रेशन केक" खाणे म्हणजे जबर शिक्षाच असते. ह्या पदार्थाला केक म्हणावे असे त्यात काहीही नसते. चाराण्याच्या कोंबडीला रुपड्याचा मसाला.. तशी गत. किलो किलोने आयसिंग असणाऱ्या ह्या केक मध्ये मूळ केकच अदृश्य होतो... जरी थोडासा मिळाला तरी तो अत्यंत बेचव थुकरट असतो..😖 त्यात व्हेज केक , वेगन केक आणि डाएट केक ही म्हणजे शुद्ध थट्टाच. उपासाचा केक पाहून तर ,"मला प्रभूने मुक्ती द्यावी .बस! हे पाहिले हे या जन्मासाठी पुरे आहे" अशीच प्रार्थना मी केली. भरीस भर जिलबी केक, गुलाबजाम केक आणि रसमलाई केक... देवा !😝 "परभु! इ तो रांग नंबर लगा है। " केक असा असावा की ह्या इतर कसल्याही कुबड्या लागूच नये. काहीतरी भन्नाट करायचे म्हणून पुरणपोळी फ्लेवर केक😩 हे म्हणजे अती झालंय. "पेस्ट्री शेफ" नावाची नवी जमात भारतात निर्माण होऊ लागली आहे..त्यांच्या creativity पुढे खरंच थक्क व्हायला होतंच👍.. थीम केक अलौकिक सुंदर असतात... पैठणी केक, पर्स /हँडबॅग केक, दागिन्यांचे केक पाहूनच डोळे तृप्त होतात.. 😌. पण creativity च्या लेबलखाली काहीही कराल का! चपला/ सँडल चे केक... खा खेटरं !😒 त्याहीपुढे जाऊन कमोड आणि खाजगी अवयवांचे केक ... शी ! कसली ही विकृती ???😡 हल्ली हनिमूनला सुद्धा केक कापतात म्हणे आणि हा केक खास पॉर्न कंटेंटचा असतो... अल्कोहॉलिक पदार्थ वापरून केलेला हा केक प्रचंड महागडा असून खास बनवला जातो.... ह्याला मोठी मागणी असल्याचेही मला काही खास केक बनवण्याऱ्यांनी सांगितले आणि मी उडालेच..🙄

 कदाचित... कदाचित बाबा आणि त्यांच्या पिढीचे बरोबर होते... केक आपल्या अधःपतनाचा आरंभ तर नाही ना?😢 मला प्रश्न पडलाय.... प्रत्येक पदार्थ आपली स्वतःची संस्कृती घेऊन येतो का?? दहीभात शांत तृप्त करणारा, पोहे मस्त पोटभरीचा गप्पा मारत खाण्याचा पदार्थ... इडली आली आणि आपण उभ्या आडव्याने घाई घाईत चटणी इडली गिळायला शिकलो. पिझ्झा आला आणि तो पचायला आपण कोक प्यायला लागलो, तसा केक व्यक्तिस्वातंत्र्याची अफाट वादळे घेऊन येणार आहे... रिंग सेरेमनीत मोठ्यांचा सहभाग नाही ते कपाळावरचं कुंकावर चिकटवलेलं नाण नाही की लक्ष्मी म्हणून पूजन नाही. बेबी शॉवर मध्ये मोठ्यांचे बाळाला आशीर्वाद नाहीत... आणि वाढदिवसाच्या केक मध्ये औक्षणाचं मांगल्य नाही. केक कापू नये अश्या बुरसटलेल्या विचारांची मी मुळीच नाही पण खरंच! प्रत्येक वेळी आपल्या रूढी प्रथा नाकारून  महत्व देण्याइतपत त्या पदार्थात काहीही नाही. आपलं ना सांस्कृतिक बर्गर झालंय .. नव्या जुन्या पावांच्या मध्ये आपण दबलो जातोय... कदाचित हेच प्रत्येक पिढीचं होत असावं... मात्र जे अयोग्य आहे ते डोळसपणे ओळखून ते वेळीच धुडकावून लावण्याचं बळ आपल्या आधीच्या पिढीत होतं.. कडक सॅल्युट.. त्या सगळ्या कडक आईवडिलांना ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना घडवलं. तेव्हढी ताकद कदाचित आजच्या आईवडिलांमध्ये नाही...नव्या प्रवाहाच्या रेट्यात आपली मुळे सोडू नका.. नाहीतर वाहावत जाणे अटळ आहे.
 
 ©️✒️ यशश्री रहाळकर