गेल्या आठवड्यात मी भटकायला म्हणून खास पुण्यात गेले....थोड्याथोडक्या नाही तर तब्बल २१ वर्षांनी हा योग जुळून आला....म्हणजे कार्य-प्रसंगापुरतं जाणं व्हायचं पण त्यात निवांतपणा नसायचा. २००० साली दहावीची परीक्षा झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याकडे मुक्काम ठोकला... तेव्हा दादासोबत यथेच्छ भटकंती केली होती... पुणं अशक्य, अफाट बदललं आहे पण त्या त्या जागी त्या त्या आठवणी अटळ असतात... माणसाला भूतकाळ आवडतो, क्षणभर का होईना त्यात रमायला मिळालं तर... आपल्या पैकी प्रत्येकाला भूतकाळात घेऊन जाणारी एक समान वस्तू असते ती म्हणजे "सायकल"... सायकल म्हटलं की आठवणींचा पेटराच खुला होतो... बाबांनी पाठी धावत सायकल शिकवली असते ते सारं आठवतं, नव्या सायकलवर बसून मित्रांसमोर भाव खाल्लेला आठवतो, दसऱ्याला केलेली पूजा, नव्या घेरदार स्कर्टच्या सायकलच्या चेनमध्ये अडकून झालेल्या चिंध्या, उतारावरून सुसाट वेगाने जातांना हवेवर तरंगण, डबलसीट जोर मारून दामटण.... काय काय आठवणी डोळ्यांसमोरून नाचून जातात. मला बाबांची सायकल, नंतर खरेदी केलेली माझी ऍटलस एस एल आर सायकल, तिचा रंग रूप आठवलं ... असं हे nostalgic! होणं सायकलचं म्युझियम पाहिल्यावर साहाजिकच नाही का??होय मी नुकतंच सायकलींचं विश्व खुलं करणारं भन्नाट संग्रहालय पाहीलं.
कर्वे नगर पुणे येथे अश्याच एका सायकल प्रेमी ... श्री विक्रम पेंडसे ह्यांचे "A Museum of Bicycles and more" ह्या नावाचं संग्रहालय पाहिलं आणि मी थक्क झाले. "Cycles .. A Journey into the past" अशी tag line तुमचं स्वागत करतानाच खऱ्या अर्थानं भूतकाळाची सफर घडवते. स्वतःच्या राहत्या घरात हे तीन मजली संग्रहालय उभे केलेले असून त्यात फक्त सायकलच नव्हे तर कित्येक अफाट अफलातून वस्तूंचा संग्रह केलेला आहे. 25 वर्षे सतत ध्यास घेऊन जगभरातून अनेक वस्तू गोळा केलेल्या आहेत.... काहीतर भन्नाट आहेत जसे दुसऱ्या महायुद्धात वापरली जाणारी सायकल , हेल्मेट आणि त्याला attach गन, किंवा folding सायकल, उलटी सायकल (म्हणजे हातानी पॅडल मारून पायांनी दिशा देता येणारी सायकल), रॉयल एनफिल्ड ची सायकल...इथे सुमारे 150 पेक्षा जास्त विंटेज सायकल्सचा संग्रह आहे.त्याच बरोबर सायकल्सचे स्पेअर पार्ट्स जसे सीट्स, गीअर्स, लॅम्पस् ह्यांचाही मोठा संग्रह माहिती सहित पहायला मिळतो. विविध प्रकारच्या ऑइल कॅन, पम्पस् , नेम प्लेट आदींचाही सुरेख disply आहे.
सायकल्सच्या जोडीला अनेक पुरातन वस्तू जसे टांगा, सायकल रिक्षा, वेगवेगळ्या विंटेज कार ह्यांचाही समावेश येथे आहे. अगदी बाबागाडी, लहान सायकल्स, लहान मुलांचे घोडे, गाड्या ह्या तर 75 वर्षांहून अधिक पुरातन आहेत.अनेक अद्भुत गृहोपयोगी वस्तू जसे विविध भांडी, डबे , आरसे , तिजोऱ्या, पानांचे डबे, इस्त्री वगैरे अतिशय पुरातन पण उत्तम जतन करून ठेवले आहे. अगदी 1905 चा ग्रामोफोन, विविध टाईप राईटर, शिवण यंत्र, विविध कुलुपे, कीचेन्स... आणि सगळंच खूप सुरेख मांडून ठेवलं आहे. जुन्या काळात सायकलीचे दुकान असायचे तशी एक प्रतिकृती तयार केली आहे.... आणिक एक गंमत म्हणजे entrance ला एक भलंमोठं कमंडलू चं झाड आहे... कमंडलूची फळे वाळवून पोखरून त्यापासून पूर्वी कमंडलू बनवत असत. खरेच जुन्या काळाची सफर करायची असल्यास....एकूणातच हे सायकल म्युझियम नक्की भेट द्यावी असंच आहे.
👍😊
(पत्ता ,काही फोटो आणि डिटेल्स फोटोत मिळतील)
✒️ यशश्री रहाळकर
कमंडलूच झाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!