"कस्तुरी" माझ्या जिवलग मैत्रिणीची ... कल्याणीची आत्या... मी तिला लहानपणीपासून पाहत आलीये. माझ्या घरानंतर चार घरं सोडली की कल्याणीचं घर आहे.. माझ्या सारखे तिच्या घरी फक्त आईबाबा नाहीत तर भला मोठा गोतावळा आहे. तिचे आजी आजोबा , आईवडील, दोन काका, 2 काकू , 2 सख्खे भाऊ, आणि दोन काकांचे प्रत्येकी 2 असे 4 चुलत भाऊ ... आणि हो कस्तुरी आत्या अशी एकूण 16 माणसे... कस्तुरी तिच्या बाबांहून देखील मोठ्ठी बहीण पण अजूनही काय दिसते.. आहा! ह्याही वयात ही नुकत्याच कोषातून बाहेर पडलेल्या फुलपाखरागत टवटवीत आहे तर तरुणपणी काय असेल... ?? मला नेहमी वाटायचं.. तिच्या आरस्पानी रूपाचा स्त्री सुलभ हेवा न वाटला तरच नवल... कस्तुरी आत्या; .. नितळ गोरा रंग, मधासारखे डोळे तेही टप्पोरे, धारदार नाक, उंच बांधा , काळेभोर केस.. अशी सगळी रूपाची खाणच घेऊन जन्मली होती. ह्या उलट ती त्या घरातली आहे की नाही हा संभ्रम पडावा एव्हढे बाकीचे घरातले दिसायला अतिसामान्य... त्यातल्या त्यात कल्याणी तेव्हढी तिच्या सारखी वाटायची पण कस्तुरी आत्या काकणभर सरसच होती.
कस्तुरी आत्या म्हणजे एक जिवंत शिल्प होती .. शब्दशः आणि अर्थशः देखील... गेली 40 वर्षे ती एखाद्या पुतळ्यासारखी शून्यात नजर लावून बसलेली असायची. तिची आई अर्थातच कल्याणीची आजी तिला जे सांगेल तेव्हढं आणि तेव्हढंच ती कृतीतून व्यक्त होई.. म्हणजे
"कस्तुरी जेवून घे"
असं आजीने सांगितलं की पानात वाढलेले कस्तुरी जेवायची.. कसलीही चव नाही ...पुन्हा मागणार नाही की काही टाकणार नाही... कधी स्वतःहून भूक लागली म्हणणार नाही दिलं तर खायची..
"कस्तुरी स्नान करून घे." म्हटले की ती यांत्रिकपणे स्नान करायची पण कपडे बदलायला नेलेत की नाही ह्याचीही तिला शुद्ध नसे... म्हणून आजी प्रत्येक क्रिया तिला स्टेप बाय स्टेप सांगायच्या...
"कस्तुरी हे कपडे मोरीत खुंटीला लाव, पाणी काढलं आहे स्नान नीट साबण लावून कर मग अंग कोरड कर टॉवेलने आणि हे कपडे घालून ये."
हे असंच वर्षानुवर्षे चाललं होतं. लहानपणी मला गंमतच वाटायची काय हे ?? केव्हढ्या घोड्या बाईला सांगताहेत सगळं.. पण मग तिला कसलासा मानसिक धक्का बसला होता त्यामुळे अशी झाली हे कल्याणीकडून कळलं आणि तिच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली. कस्तुरी आणि कल्याणी आपापल्या पिढीतील एकुलत्या एक लेकी पण नातं मात्र विळ्याभोपळ्याचं. कल्याणी ...कस्तुरी आत्याला का कोण जाणे मुळीच आवडत नसे. आणि कल्याणी उगाच तिचा राग राग करायची हे असं आपलं मला वाटायचं हं!
कल्याणी कधीही कस्तुरी आत्याबद्दल फार बोलायची नाही, कुणी भोचकपणे विचारले तर विषय टाळून द्यायची. बाकी कस्तुरी आत्या अगदी निरुपद्रवी बिनविषारी होती.तिला फार बाहेर येऊ देत नसत.. सगळ्यांत आतल्या एका खोलीत तिला जवळपास नजरकैदेतच ठेवत.. स्वतःहून जागचे न हलणाऱ्या कस्तुरीसाठी एव्हढा पहारा कश्यासाठी होता कोण जाणे?? एरव्ही आम्ही सगळ्या गल्लीतल्या समवयस्क आठ दहा जणी एकत्र खेळत असायचो.. आम्ही बरेचदा मंदिरात खेळायचो. कधी माझ्याकडे, कधी दुसऱ्या कुणाहीकडे मात्र कल्याणीकडे खेळायची फारशी वेळच ती येऊ देत नसे.. म्हणचे कल्याणीला तिच्या घरी खेळायला नको असावे... कधी आम्ही तिला बोलवायला गेलो तर ती लगेच बाहेर पडे आणि बाहेर कुठेतरी खेळायचे ठरवत असे. कल्याणीची आई,आजी , काकी तश्या प्रेमळ होत्या गेलो की हातावर लाडू, वडी, चकली काहीतरी खाऊ मिळायचाच. तरी कल्याणीला कधी एकदा तिथून बाहेर पडते असे व्हायचे.. ह्याचे कारण कदाचित कस्तुरी आत्या असावी... मला कधीही कस्तुरी आत्याचा राग आला नाही उलट मला ती परिकथेतील शापित अप्सरा वाटायची... बिचारी!
"कस्तुरी" नावाच्या ह्या देखण्या ,गूढ कथेतील शापित नायिकेबद्दल अनेक सुरस दंतकथा गावात प्रसिद्ध होत्या. कुणाच्या मते तिला भुताने झपाटले होते तर कुणी म्हणायचे चेटूक, करणी केली. काहींच्या मते एका मांत्रिकाने तिला वश केले तर काही म्हणत तिने नकार दिल्याने एका मुलाने आत्महत्या केली त्याच्या भुताने तिला सतत भीती दाखवून वेड लावले.... मला तरी त्या साऱ्या कथा तद्दन रचलेल्या वाटत होत्या... मुळात कस्तुरीला मानसिक उपचारांची गरज असतांना तिला ते प्रतिष्ठेचा प्रश्न करून दिले गेले नाहीत हे माझे ठाम मत होते.. तसेही वर्षोनुवर्षे समाजात मिसळण्याची संधी न देता , एखाद्या व्यक्तीला.. जवळपास कोंडून ठेवल्यावर निराळे काय होणार.. वेड लागेल नाही तर काय?? कल्याणीला मी उत्सुकतेने कितीदा विचारले पण ती कधीही आपल्या कस्तुरी आत्याबद्दल काहीच सांगायची नाही.. तिला घरात तशीच सक्त ताकीद मिळाली होती हे मात्र ती बोलता बोलता सांगून बसली. मी आणि कल्याणी अगदी खासम खास मैत्रिणी आमची कितीतरी गुपिते एकमेकींना अगदी सहज सांगायचो.. पण हे काहीतरी विचित्र प्रकरण होतं... पौर्णिमा -अमावस्या असली की कस्तुरी आत्याला चक्क खोलीतच बांधून ठेवले जाई ह्या दिवसांत ती बेभान होत असे... आणि दिशाहीन धावत सुटायची.. हे सगळं त्यांच्या घरातील कामवाल्या मावशींनी आईला सांगतांना मी ऐकलं होतं. पुढे आम्ही सगळ्याच मैत्रिणी वयात येण्याच्या टप्प्यावर असतांना आमच्या सगळ्यांच्या आईंनी कल्याणीच्या घरी जायला बंदी केली ..
"नाही म्हणजे नाही !एकदा सांगितलेलं नीट लक्षात ठेव."
कल्याणी माझी खास मैत्रीण म्हणून आई वारंवार माझ्याकडून गिरवून घेऊ लागली की तिच्याकडे मुळीच जायचं नाही.. आम्हाला कुणालाच ह्यामागचं कारण मात्र सांगितले गेले नव्हते.. मी आईला खोदून खोदून विचारले तर..
"लहान आहेस अजून मोठी झाल्यावर कळेल."
असे तात्पुरते उत्तर देऊन गप्प केले होते. कल्याणी मात्र आवर्जून यायची ,भेटायची.. पुढे आमच्या शिक्षणाच्या वाटा बदलल्या मी शहरात गेले पण कल्याणी गावातच राहून काही बाही कोर्सेस करत होती. तिला तशीही फार अभ्यासाची आवड नव्हतीच म्हणा! मात्र माझ्याशी असणारी मैत्री तिने कायम ठेवली होती. मी तिच्याघरी जात नव्हते यामागचं कारण तिला नक्की माहीत असावं... तिने त्याबद्दल कोणतीही अढी मनात बाळगली नव्हती. एके दिवशी मोठ्या आनंदाने आईने मला तिचं लग्न ठरल्याचं सांगितलं... खूप छान तालेवार ठिकाण, राजबिंडा नवरा मिळाला होता तिला..तिचं रूपही तसं आरस्पानी होतंच की कुणीही प्रेमात पडावं. मी गावी जाताच ती स्वतः येऊन मला आमंत्रण देऊन गेली... अगदी चार दिवस आधीपासूनच मदतीला येण्याचेही चार चार वेळा आईला ती म्हणाली.. ती गेल्यावर आईने स्पष्ट शब्दांत सांगितलं..
"तुझी मैत्रीण आहे मान्य... पण तेव्हढ्यास तेव्हढं जा.. आणि मुख्य म्हणजे दिवसा उजेडी जायचे आणि तिन्ही सांजेपुर्वी परतायचे.."
आजवर मी कधीही आईला ह्याविषयी काहीच विचारले नव्हते.. आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती..
"आई आतातरी सांग ना ग !आता मी मोठी झाली बघ .. तुझ्या भाषेत ताडमाड वाढलेय.. तिकडे माझ्या रूमवर एकटीच तर राहते ना मी.. मग सांग ना सगळं तिच्या बद्दल ..."
काहीच न कळून आई म्हणाली.. " काय सांगू ?? आणि कुणाबद्दल??"
"कस्तुरी बद्दल"
काही क्षण विचार करून ती उत्तरली...
"आता कुठून सांगू बरं... तरुणपणी त्या कस्तुरी बरोबर काहीतरी अघटित प्रकार घडला आहे... रूपच तसं .. दुर्दैव म्हणायचं! पण अजूनही ते जे काय असेल ते त्यांच्या घरात आज तिच्यासोबत.. अमावस्या पौर्णिमा आली की ते प्रभावी होतं.. मग ती बेभान होते..."
ही "जे काही ते काही" ची भाषा मला काही समजली नाही.. फक्त एव्हढंच कळलं की काहीतरी आहे जे आपल्या आकलना पल्याडचे आहे. आपल्याला काय करायचे त्याचे?? असे नेहमीप्रमाणे म्हणत मी कामाला लागले. काही दिवसांनी कल्याणीच्या दारात मांडव पडला.. एकुलती एक लेक म्हणजे लग्न अगदी थाटामाटात होणार होते... चुडा भरायच्या दिवशी सकाळीच कल्याणीचा निरोप आला. कित्येक वर्षांनी मी तिच्या घरी गेले होते.. कल्याणी खूप आनंदात होती आणि त्या सुखाचं आगळं तेज तिच्या मनातून चेहऱ्यावर जणू नाचत होतं... हाताला धरून कल्याणी मला तिच्या खोलीत घेऊन गेली मग तिच्या साड्या, दागिने , सासरच्या भेटी सारे उत्साहाने दाखवू लागली. लग्नासाठी म्हणून तिने गडद गुलबक्षी शालू निवडला होता त्यावरील वेलबुट्टी फार नाजूक सुरेख होती... तिने आरशासमोर उभे राहून शालू स्वतः भवती धरत मस्त गिरकी घेतली.. मग माझे दंड गदागदा हलवत म्हणाली..
"हा शालू घेतल्यापासून मला अगदी घाईच झालीये लग्नाची.. कधी एकदा नेसते अस्स झालंय..."
कल्याणी अजूनही तेव्हढीच भाबडी आणि अल्लड होती.
तेव्हढ्यात आम्हाला तिच्या धाकट्या काकींनी बाहेर बोलावलं..
"गप्पा नंतर मारा ग आधी बाहेर या बघू.. मानाच्या सुवासिनींना बांगड्या भरायच्या आहेत.. "
म्हणत खूण करत त्यांनी कल्याणीला त्यांना नमस्कार करण्यास सांगितले. मांडवाच्या मध्यभागी सुरेख चौरंग मांडला होता त्याभवती फुलांची आरास केलेली होती... सगळ्या कल्याणीला चिडवू लागल्या, हास्यविनोदात रममाण झाल्या.. तिला गर्भरेशमी हिरवाकंच चुडा तर हवाच होता. त्याबरोबर लग्नानंतर घालायला तिच्या साड्यांच्या रंगानुसार मॅचिंग बांगड्याही तिने निवडल्या. आता स्त्रिया शकुनाची गाणी म्हणू लागल्या आणि नवरीला चौरंगावर बसवणार इतक्यात आतून कस्तुरी बाहेर आली... नखशिखांत नटलेली.. तिने कल्याणीचा गुलबक्षी शालू आणि सगळे दागिने घातले होते.. चेहऱ्यावर एक वेडगळ हास्य होतं.. ती थेट चौरंगावर जाऊन बसली आणि हात पुढे करत स्वतःला हिरवा चुडा भरण्याविषयी खुणावू लागली... कासारीण आणि इतर स्त्रिया घाबरून मागे सरकल्या. सगळ्या कार्यक्रमाचा रंगच उडाला.. गाण्याऱ्या स्त्रिया एकदम गप्प झाल्या, स्मशान शांतता पसरली.
"आपण इतके दिवसांची जो शालू नेसायची वाट पाहतोय तो हिने नेसला सुद्धा.. ", हे पाहताच कल्याणीचा पारा चढला.. तिचे डोळे अपमान, दुःख, संताप ह्यांनी भरून वाहू लागले. घरातले सगळे भराभर गोळा झाले... कल्याणीच्या आजीने कस्तुरीला आत चलण्याविषयी विनवले पण बांगडया भरल्याशिवाय ती उठायला तयार नव्हती... शेवटी आजी सावरून घेत म्हणाली..
"बाळा कल्याणी.. तुला माहिती आहे ना ती आजारी असते, आपलीच आहे ना ती.. भरू दे तिला आधी.."
म्हणत कासारणीला बांगड्या भर म्हणून खुणावले.
एव्हाना कल्याणीचा दुःख आणि संतापाचा बांध फुटला होता.. ती रडता रडता.. संतापाने कस्तुरीच्या अंगावर धावून गेली...
"ऊठ ऊठ इथून.. किती वर्षे पाहतेय मी तुझी नाटकं... सतत तुझं कौतुक .. तू बिचारी , तू आजारी ... मी मात्र सतत सगळं समजून घ्यायचं...
ऊठ आधी ...आणि शालू दे माझा .."
दोन मांजरींनी एकमेकांवर धावून जावं तसं घडलं काहीसं.. एरव्ही गप्प असणारी कस्तुरी आत्या ओरडली..
"नाही देणार हे हे माझं आहे.. लग्न आहे माझं उद्या.."
टाळ्या वाजवत ओरडू लागली.. बापरे! हिला बोलता येतं तर... आजींनी पुन्हा सावरून घ्यायचा दुबळा प्रयत्न केला...
"जाऊ दे !कल्याणी बाळा तू बांगड्या भर मी समजावते तिला..."
कल्याणीच्या अंगाची संतापाने लाहीलाही होत होती...
"लहानपणीपासून पाहतेय .. हिच्या मुळे एक मैत्रीण नाही मला... सतत लोक तिरस्काराने संशयाने पाहतात... आणि आज ??आज तर माझा शालू माझे सगळे दागिने घातले... असेच सगळे सुखाचे क्षण ओरबाडून घेतले आहेत हिने माझे...."
आजीचाही संयम सुटला..
"कल्याणी! केव्हापासून ऐकतेय मी....ही ही काय म्हणतेयस सारखी. आत्या आहे ती तुझी."
"ही माझी कुणीही नाही .." म्हणत रडत पाय आपटत कल्याणी तिच्या खोलीत धावत गेली आणि धाडकन तिने दार आतून लावून घेतलं..
कल्याणीची आई .. एकत्र कुटुंबात दबलेली, शांत राहणारी जबाबदार स्त्री.. पण तिचाही संताप संताप झाला असावा...
"माझ्या लेकीला दूषणे देऊ नका सासूबाई!... तुमची तरुण लेक तुम्हाला सांभाळता आली नाही.. त्याची शिक्षा आम्हाला का??"
काडकन सासूने कल्याणीच्या आईच्या कानाखाली आवाज काढला... आम्ही सगळे दगड होऊन पाहत होतो.. कल्याणीची आई आता गप्प बसणार नव्हती..
"तुमच्या ह्या ह्या पोरीपाई आम्ही सगळ्यांनी खूप भोगलं आहे... आमच्यापर्यंत होतं तोवर सगळं ठीक होतं.. मात्र आता माझ्या लेकीच्या सुखाला डसतेय ही नागीण... मी ऐकणार नाही.. सांगून ठेवतेय... हिच्या तमाशा मुळे जर माझ्या लेकीचं लग्न मोडलं तर मी जीव घेईन तरी नाहीतर देईन तरी..."
कल्याणीच्या दोन्ही काकू अक्षरशः थरथरत उभ्या होत्या..
कुणीतरी जेष्ठ स्त्री ने सगळ्यांना उलट पावली परतण्याची खूण केली.. आम्ही आपापल्या घरी परतलो... भरल्या मांडवात नवरीला शकुनाचा चुडा भरलाच नव्हता.. हे काय भलतंच??? सगळीकडे एकाच चर्चा सुरू होती... लग्न 2 दिवसांवर येऊन ठेपलं होतं.... आता काय होणार.??.. लोक म्हणत होते ह्या घरांत वरात आलेली साहत नाही ... कुणास ठाऊक काय होणार होतं??
क्रमशः
✒️ यशश्री रहाळकर
*****************************************
कस्तुरी भाग २
बांगड्या भरायच्या वेळी कल्याणीच्या लग्नाच्या मांडवात जो काही तमाशा झाला होता तोच विषय गावातील ब्रेकिंग न्यूज होता... प्रत्येक ओसरी आणि ओट्यावर ह्याचीच चर्चा रंगली होती. गावातील सगळ्या सासवा आणि सूना कडाडून वाद घालत होत्या .. तमाम सासू वर्गाच्या मते कल्याणीच्या आईचे आणि तिचे चुकलेच होते..
"जरा सांभाळून घेता येत नाही तुम्हा आजकालच्या मुलींना... केव्हढा ग बाई तो तमाशा... एव्हढा राग नवरीला शोभत नाही अगदी... उद्या सासरी कुणा कुणाशी पटणार नाही हिचं.."
एक सासू तावातावाने म्हणाली. दुसरी तिचीच री ओढत..
" माय तशी लेक... कल्याणीच्या आईचा काय हा अगोचरपणा... एकतर बिचाऱ्या कस्तुरीच्या आईने आयुष्यभर किती भोगलयं.."
सून पार्टी हिरीरीने पुढे येत म्हणाली..
"बिचारी तर कल्याणीची आई आहे हो ! किती वर्षे सोसलं सगळं निमूटपणे.. आपल्या लेकीवर आलं तसं बोलली काय चुकलं सांगा बरं..."
दुसरी कुणाची तरी नवीन लग्न झालेली सून लगेच करवादली..
" कल्याणीचं तरी काय चुकलं हो! ही अशी वेडसर बाई.. आयुष्यभर केलीच ना सहन.. लग्नाची स्वप्ने असतात प्रत्येकाची... किती सोसायचं तिनं आणि का म्हणून??"
मला ह्या सासू-सून आखाड्यात अजिबात रस नव्हता... कुणाचं काय चुकलं ह्याची निरर्थक चर्चा करून काय साध्य होणार होतं... ह्या वादातील खरी मेख तर भलतीच होती..
कल्याणीच्या घरच्या कामवाल्या मावशी BBC झालेल्या होत्या.. प्रत्येकीकडे त्यांना चहा /पानसुपारीला बसवून काय झालं ते जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच होती.. शेवटी समाज समाज म्हणजे तरी काय हो.. कुणाच्या तरी दुःखावर टपून बसलेली गिधाडं..😢
तर कामवाल्या बाईंकडील माहिती नुसार ...कल्याणीची आई आणि कस्तुरीची आई ह्यांच्यातल्या वादाचं मूळ होतं कस्तुरी.. कस्तुरीचं आजारपण खरं खरं सांगून कल्याणीचं लग्न करावं .. आपण काहीही लपवून ठेऊ नये सगळे स्पष्ट असावं... असे मत आजीबाईंचे उर्फ कस्तुरीच्या आईचे होते... त्यापाठी त्यांचे नातीवरील प्रेम हे कारण होतेच... कल्याणी काही परकी नव्हती त्यांची सख्खी लाडकी नातंच तर होती... उद्या सासरच्या मंडळींना कळले आणि त्यांनी कल्याणीला परत पाठवले तर जन्माचे नुकसान होईल तिचे... अशी आजीची दूरदृष्टी सांगत होती. शिवाय लग्न पार पडेपर्यंत कस्तुरीला लपवणार तरी कुठे ?? हाही प्रश्न होताच.
कल्याणीच्या आईची बाजूही योग्य होती... त्यांनी सुरुवातीला खरे सांगून लग्न जमवण्याचा प्रयत्न केला पण हे आत्याच्या वेडाचं ऐकलं की कुणी होकार देईना.. मग त्यांनी परस्पर आपल्या बहिणीकडे कल्याणीचा दाखवण्याचा कार्यक्रम करून सुपारी फोडून टाकली.. आता सासूने तेव्हढं लग्न होईतो कस्तुरीला सांभाळावं एव्हढीचं कल्याणीच्या आईची अपेक्षा होती. ...पण लग्नाची चर्चा सुरू झाली आणि कस्तुरी जशी काही पेटूनच उठली.
ह्या सगळ्यांत कल्याणीच्या बाबांची आणि आजोबांची अवस्था भयंकर अवघड झाली होती.. दोन्ही मुली आणि त्यांच्या आई एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या.. बळी कुणाचाही गेला तरी नुकसान त्यांचंच होतं. कल्याणीच्या आईने स्पष्ट शब्दांत सांगितलं की...
" जोवर माझ्या लेकीची पाठवणी होत नाही तोवर मला घरात कस्तुरी नकोय .. माझ्या पोरीवर मला तिची सावलीही नकोय... आणि हे मी शेवटचं बजावते आहे नाहीतर मी जीव देईन."
शेवटी घरातल्या पुरुष मंडळींनी निर्णय घेतला की बाजूच्याच गावात राहणाऱ्या नातेवाईकांकडे कस्तुरीला घेऊन आजीने रहायला जावे, लग्न लागले, सगळे नीट पार पडले की परत यावे. दरम्यान कुणी विचारलं आजीबद्दल तर तब्येत बरी नसल्याचे सांगावे. आता कल्याणीचं लग्न निर्विघ्न पार पडेल अशी आशा सगळ्यांना वाटू लागली... पण गोष्टी एव्हढ्या सोप्या नसाव्या... अचानक संध्याकाळी कोलाहल झाला... कल्याणीला अम्ब्युलन्स मध्ये घालून मोठ्या हॉस्पिटलला हलवण्याची धावपळ सुरू होती... घरातील कुणालाच कसली शुद्ध नव्हती.. कल्याणीची आई छाती पिटुन रडत होती.. पुरुष मंडळी धावाधाव करत होते... आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे गडगडाटी खदाखदा हसत कस्तुरी उभी होती एका पायावर एका कोपऱ्यात भिंतीला टेकून .. तिच्या अंगावर साडी नव्हती नुसता परकर आणि ब्लाउज... आधीच ते वेडसर भाव त्यात हे असलं काहीतरी... आम्ही मनातून चरकलोच... कस्तुरी आवेगानं माझ्या दिशेने येत बोट नाचवत म्हणाली...
"ए ए.. तूच तू! तुझ्या मैत्रिणीचं लग्न मोडलं.."
पुन्हा गडगडाटी क्रूर हास्य...
"रडायचं नाही तुला ?? आं आं! मोडलं रे मोडलं ..."
म्हणत कस्तुरी टाळ्या वाजवू लागली.
अरे देवा! म्हणजे ही वेडी नाहीये तर... बापरे! हिला कल्याणी माहितीये, तिचं लग्न कळतंय , ते मोडलंय हेही उमजतंय आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे ही.. ही.. मला ओळखते... तिची मैत्रीण म्हणून .. भयंकर भयंकर आहे हे ! ही कस्तुरी वेडसर नक्कीच नाही. माझ्या चेहऱ्याकडे ती एकटक पाहत होती...जणू काही तिला चेहरा वाचता येतो ... सर्रकन काटाच आला अंगावर.. पुन्हा ती म्हणाली ..
"नाई नाई वेडी नाय मी... ती ती मला ...मला म्हणाली तुझी मैत्रीण , दिडशहाणी कुठली.. शालू.. शालू दे म्हणाली.. तिचा शालू.. तिचा नव्हता तो .. तो तो माझा होता... माझा होता."
ह्यावेळी तिचा आवाज भेसूर कर्कश होता... भांड्यावर ओरखडा उमटावा तस्सा.. दात ओठ खात ओरडत असणाऱ्या कस्तुरीचे डोळे लालबुंद झाले होते... ती माझ्याकडे आणि मी तिच्याकडे एकटक पाहत होती तेव्हढ्यात अचानक वीज चमकावी तशी मी भानावर आले आईने माझ्या हाताला झटकन ओढत मला घरी नेलं... नखशिखांत गोमूत्र शिंपडलं, अंघोळ घातली, देवापुढे दिवा लावला आणि काही मंत्र जप जाप्य केले... जेवेपर्यंत मी आणि तिने चकार शब्द काढला नाही तोंडातून नंतर मात्र मी कल्याणीची चौकशी केली ... तेव्हा आईने स्पष्टपणे मला मी ह्या प्रकरणात लक्ष घालू नये असे सुनावले..
"कळलं ना आज तुला.. मी का नाही म्हणत होते तुला ते... तिन्हीसांजेला जाऊ नकोस हजारदा सांगितले तुला... पण तुझा आगाऊपणा , भोचकपणा काही कमी होत नाही..."
"आई अग.. कल्याणी मैत्रीण आहे माझी .. कशी आहे ती?? काय झालं होतं? एव्हढं तरी सांग ना.."
आई बाबांकडे वळत म्हणाली..
"उद्या सकाळच्या पहिल्या गाडीने हिला रवाना करा... आता मी सांगेपर्यंत गावी यायचं नाही.. नाही म्हणजे नाही."
बाबांनी मला डोळ्यांनीच शांत राहण्याची खूण केली. जेवणानंतर शतपावली करतांना बाबा सांगू लागले... शेजारधर्म म्हणून ते हॉस्पिटलमध्ये जाऊन आले होते... काही मदत हवी असल्यास सांगा असेही सांगून आले
" ..मात्र हे आईला कळू देऊ नकोस ती काळजी करत बसेल.."
बाबा म्हणाले तसं मला कित्ती बरं वाटलं म्हणून सांगू? मी कल्याणी साठी काहीच केलं नाही ही टोचणी माझं मन खात होती .. तिला नेमकं झालं काय हे जाणून घेण्याची उत्सुकता देखील होतीच.. कल्याणीने हातांच्या शिरा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे वरपांगी तरी दिसत होते... जखम खोलवर झाल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. देवाला तिला बरं कर म्हणून हात जोडून मी निद्रेच्या आधीन झाले... दुसऱ्या दिवशी चहाच्या वेळी मी आईला कल्याणीच्या घरी फिरकणार सुद्धा नाही असं वाचन दिलं आणि माझा मुक्काम वाढवून घेतला.. दुपारची कामे उरकल्यावर बायकांच्या बैठकीत कस्तुरी शिवाय दुसरा विषय असणे शक्यच नव्हते... त्याच वेळी त्यांच्या घरची कामवाली बाई घाबरी घुबरी होत आली..
लोटीभर पाणी आणि घोटभर चहा प्यायल्यावर ती बोलू लागली..
"आता का सांगू माय?? ती यडी मुक्यावानी गरीब गाय जनू बसून राह्ये सारा दिस बसून राह्ये... पण तुम्हांले सांगतो.. आता दोन दिस झालं.. चुरचुरू चुरचुरू बोलतीया... इश इश ओकते मेली नागीन...! "
तिच्याचकडून समजलं.. कल्याणीने तिचा शालू आणि दागिने मागितले तर कस्तुरी देणार नाही म्हणाली.. दोघींचे वाद, भांडणे पेटली... कस्तुरीच्या आईने तिला खूप समजावले देऊन टाक तिचे दागिने शालू... शेवटी रागारागाने सगळे दागिने काढून कस्तुरीने ते विहिरीत नेऊन फेकले.. त्यानंतर शालू सोडून त्याच्या कल्याणीसमोर चिंध्या चिंध्या केल्या....
"तुझं लग्न होणारच नाहीये मोडणार आहे.. मी सांगते मोडणार आहे"
म्हणत कस्तुरी टाळ्या वाजवत नाचू लागली... हे दृश्य इतकं भयावह होतं की सांगतांनाही कामवाल्या बाई लटालटा कापत होत्या... नेमका त्याचं वेळी कल्याणीच्या सासरच्या कुणाचातरी फोन आला... सगळ्या वऱ्हाडाची गाडी दरीत कोसळली होती .. कोण जिवंत आहे कोण मेलं हेही फोन करणाऱ्याला सांगता येणं त्या वेळी शक्य नव्हतं.. कल्याणीच्या काकांनी तिकडे धाव घेतली आणि इकडे कल्याणीने हाताच्या शिरा कापून घेतल्या. कल्याणी मृत्यूशी झुंज देत होती... अभावितपणे कुणीतरी बोलून बसलं
"त्यात आज नेमकी पौर्णिमा..."
सगळ्यांच्या डोळ्यांपुढे प्रश्नचिन्ह उभं राहिलं. एक बऱ्याच वयस्कर आजी कमळाबाई म्हणाल्या..
"पौर्णिमेला कस्तुरीला फार त्रास देतो तो...लहानपणी असे नव्हते हो काही . मी जन्मापासून पाहिलं आहे फार गोड, लाघवी पोर होती कस्तुरी... आणि रूप तर एखाद्या अप्सरेला लाजवेल असं पण हे असं झालं आणि सगळं बिनसलं..."
माझी उत्सुकता 101% पर्यंत वाढली आणि मी बायकांमध्ये अचानक उडी घेत म्हणाली...
"काय झालं? हे असं म्हणजे नक्की काय झालं?? हे ते जे काही होतं ते नेमकं काय होतं?? एकदा नीट सांगून तरी टाका ना ! ..."
आईने रागाने डोळे मोठे केले त्याकडे मी साफ दुर्लक्ष केलं आणि पुन्हा म्हणाले..
"आजी तुम्ही लहानपणीपासून ओळखता ना तिला... मग नेमकं काय घडलं असं की ती वेडी झाली? मला ही तुमची जे ते ची भाषा कळत नाही.."
माझ्या भोचकपणा बद्दल काय करावे ह्या विचारात असतांना कमाळाआजी आईला खुणेनेच शांत रहायला सांगून म्हणाली..
"पोरं मोठी झाली की त्यांची उत्सुकताही मोठी होते... तिलाही कळायला हवं काय घडलं होतं.. काय काय घडू शकतं ते ही सांगायलाच हवं..... मी सांगेन हो बाळ सगळं सांगेन तुला ... पण आज नको .. आज पौर्णिमा आहे.. आजचा दिवस आणि विशेषतः आजची रात्र कशी जाणार कुणास ठाऊक ?? पांडुरंगा रक्षण कर त्या अश्राप पोरीचं..." म्हणत आजीनं हात जोडले.
दुसऱ्या दिवसाची सकाळ वाईट बातमी घेऊनच आली. कल्याणी आम्हाला कायमची सोडून गेली होती... तिचा देह पोस्टमार्टेम साठी पाठविला असता तिच्या देहावर शारीरिक अत्याचाराच्या खूणा आढळल्या होत्या .. अगदी बलात्कार म्हणता येणार नाही पण अनैसर्गिक काहीतरी घडले असावे...अनेक लहान मोठे घाव , ओरबडल्याच्या पाशवी खुणा तिच्या देहावर आढळल्या.. आणि विसंगती म्हणजे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले तेव्हा ह्या खुणा नव्हत्याच असं ड्युटी डॉक्टरांचं म्हणणं होतं... असं कसं असेल??
"शेवटी ज्याची भीती होती तेच झालं..."
कमळाआजी म्हणाल्या..
क्रमशः
✒️ यशश्री रहाळकर
********************************************
कस्तुरी :- अंतिम भाग
कल्याणीच्या मृत्यूची बातमी ऐकली आणि मी मनातून हादरले... कालच कोरा शालू घेऊन फुपाखरा सारखी फिरणारी कल्याणी, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद , डोळ्यांतील चमक.. सगळं सगळं जणू कुणीतरी शोषून घेतलं असावं..मला रडावंस वाटलं नाही .. का कुणास ठाऊक ?? मात्र मला सणसणून ताप भरला .. तीन दिवस ताप चढत उतरत असावा.. मी पुरती ग्लानीत होते. चौथे दिवशी जरा भानावर आले पण तोवर आई काळजीने अर्धी झाली होती.. उठून बसण्याइतकी सुद्धा ताकद उरली नव्हती... आई डोळ्यांना पदर लावून रडत असे. सतत जप, अंगारा ,दृष्ट असे सुरू होते. खरं सांगायचं तर मला बसलेला धक्का आणि कोंडलेलं दुःख ह्यांनी तब्येत बिघडली असावी. आठ दिवसांनी अंगात थोडं बळ आलं आणि मी उठून बसू लागले.. आजूबाजूच्या काकू कंपनीने भेटायला येऊन माझा ताबाच घेतला... प्रत्येकाला कल्याणीच्या गूढ मृत्यूची उत्सुकता होती.. तिने मला काहीतरी खास गुपित सांगितलं असावं असे त्यांना वाटून गेले... प्रत्यक्षात कल्याणीने कधीही मला काहीच सांगितले नव्हते. शेवटी त्यांना दटावत कमळा आजी पुढे आल्या आणि म्हणाल्या..
"पोर घाबरून गेली आहे ... दिसत नाहीये का तुम्हाला??? बंद करा ह्या चौकश्या... घरी स्वयंपाकपाणी नाही वाटतं?"
आजींच्या एका आवाजात सगळ्या पटापट आपापल्या घराकडे निघाल्या. माझा बांध फुटला आणि मी आजींच्या मांडीवर डोकं ठेऊन मनसोक्त रडून घेतलं... त्या शांतपणे माझ्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या. मी कल्याणीविषयी काही बोलणार तेव्हढ्यात आजींनी बोटाने गप्प राहण्याची खूण केली...
"सध्या डोक्याला ताण देऊ नकोस... आराम कर."
म्हणत त्या निघाल्या देखील. त्यांची पाठ वळतात आई हळहळत म्हणाली..
"ह्यांची लेक केतकी जिवंत असती तर तुझ्या वयाची नातवंडे नक्कीच असती त्यांना..."
कमळा आजींना लेक होती?? मला तर त्या एकट्याच राहतात हेच माहीत होते ... गेली कित्येक वर्षे देवळाजवळच्या त्यांच्या दोन खणी घरांत मी दुसरं माणूस आलेलं पाहिलं नव्हतं. तेव्हढ्यात पुन्हा मोहोल्ल्यात एकच गोंधळ झाला... लोकांचा कोलाहल, तसेच ऍब्युलन्सचे आवाज, आरडाओरडा... बापरे! कल्याणीच्या घराकडूनच आवाज येतोय... आता काय नवीन केलं कस्तुरीने??? उठून पाहण्याची मानसिक ताकद नसावी बहुदा .. मी जागीच बसून बाहेर बघू लागले.
कल्याणीच्या आईने स्वतःला पेटवून घेतले होते... घरातील वाद, भांडणे कल्याणी गेल्यावर विकोपाला गेली होती. शेवटी कल्याणीची आई सुद्धा गेली... कठीण झाले होते सगळे... भयंकर आहे हे सारे! ह्याचा शेवट तर दिसत होता पण उगम मात्र कळत नव्हता... दोन दिवस कसेबसे मी ढकलले आणि तिसऱ्या दिवशी मंदिरात जाऊन कमळा आजींच्या पुढ्यात बसले.. शुक्रवार म्हणजे आजी मंदिरात नक्कीच असतात संध्याकाळी. आजी सहेतुक हसल्या... एव्हाना मंदिरातल्या सगळ्या समया उजळल्या होत्या... त्या घनगंभीर पण गूढ प्रकाशात आजी मला म्हणाल्या...
"तुझे सगळे प्रश्न मला माहित आहेत आणि कदाचित त्यांची उत्तरेही माझ्याकडे आहेत... तू जेव्हढी बेचैन झाली आहेस ना त्याच्या शतपट एकेकाळी मी सुद्धा झाले होते....
सांगते आजवर काळजातल्या बंद कुपीत राखलेले सारे सांगते."
कमळा आजी दम लागून 2 मिनिटे शांत बसल्या... मग देवीकडे प्रार्थना केली आणि माझा हात धरून म्हणाल्या...
"चल! तुझ्या घरी."
घरी जाताच मला आतल्या खोलीत चालण्याची खूण करत त्यांनी आईलाही बोलावून घेतले आणि दार पक्के बंद केले.
त्या जे काही सांगत होत्या ते इतके अजब आणि दाहक होते की.. काळजाचा थरकाप उडाला..
"कस्तुरी ही काही खरी समस्या नाही , ती वेडी नाही ना आजारी आहे...ती तर केवळ माध्यम आहे.. एका अचाट, अघोरी शक्तीचं... खरी कथा सुरू झाली ती त्या आधीच्या पिढीत.. कस्तुरीचे आजोबा काशीनाथपंत मोठे जमीनदार होते... जेव्हढे श्रीमंत तेव्हढे अधिक लोभी... त्यांना गुप्त धनाचा योग आहे असे भविष्य सांगितलेले असल्याने त्यांनी सतत गुप्त धनाचा ध्यास घेतला होता. खरंतर चार पिढ्या बसून खातील एव्हढी जमीनजुमला होता पण काय फायदा?? मोह, लोभ ह्याने बरबटून गेले होते... ह्या गुप्त धनाच्या प्राप्तीसाठी अनेक गूढ मंत्रतंत्रांचा नाद त्यांनी धरला होता. त्यातच एकदा त्यांची गाठ कुठल्याश्या वेताळ नामक मांत्रिकाशी पडली. मांत्रिक स्मशानात राही... खरेच अनेक अघोर शक्ती त्याला वश होत्या.त्याने कसलासा विधी करायला सांगितला आणि काशीनाथ पंतांनी तो करायचा ठरवले... विधी काहीतरी गूढ असावा एव्हढेच काय ते त्या वेळी कळले."
आजींना धाप लागली... आम्ही पाण्याचे भांडे पुढे केले.
"थोडा वेळ आराम करा ..थांबा"
असे काहीतरी आई म्हणाली.. पण त्यांनी खुणेनेच गप्प बसण्याची खूण केली... भरल्या डोळ्यांनी त्या पुढील कथाभाग सांगू लागल्या.
"माझे यजमान त्यांचे हिशोब, वहीखाते सांभाळणारे मुनीम , कारकून नोकर म्हण हवे तर... आम्ही त्यांचे आश्रित, उपकाराखाली दबलेलो होतो. ते सांगतील ते करणे ह्याशिवाय पर्याय नव्हताच. माझी लेक केतकी आणि कस्तुरी सवंगडी होत्या ... आपापला आर्थिक स्तर विसरून दोघी आनंदाने खेळात रमायच्या, भांडायच्या आणि पुन्हा एक व्हायच्या... माझी लेक केतकी कस्तुरीहून तीनेक वर्षे मोठी असावी...."
लेकीच्या आठवणीने कमळा आजींच्या चेहऱ्यावर सुखद भाव दिसले.. पण क्षणभरच! लगेच भयाने त्याची जागा घेतली असावी.
"केतकी माझी लेक 14 व्या वर्षी वयात आली आणि पौर्णिमेच्या चंद्रासम मोहक दिसू लागली... एके दिवशी मालकांनी म्हणजेच काशीनाथ पंतांनी केतकी आणि तिच्या वडिलांना बोलावून घेतलं... त्यांना त्या दिवशी देवीची कसलीशी पूजा करायची होती त्यासाठी पूजेला कोरी सवाष्णच हवी .. म्हणून केतकीलाही बोलावून घेतलं. कस्तुरी तोपर्यंत वयात आली नव्हती ... कोरी सवाष्ण म्हणजे वयात आलेली मुलगी पण अजून विवाह न झालेली..."
"हं! म्हणजे व्हर्जिन ब्युटी..."
मी नकळत बोलून गेले... आजींची एकदम तंद्री भंग झाली... त्यांनी क्षणभर थांबत पुन्हा सुसंगती जुळवत सांगायला सुरुवात केली...
"केतकी आणि तिचे बाबा पूजेला म्हणून जे गेले ते दुसऱ्या दिवशीच परतले... केतकीच्या बाबांनी पूजा झाली आता तो विषय नको म्हणून त्यावर बोलणे टाळले मात्र त्या दिवसा पासून माझी लेक उदास, मलूल गप्प गप्प राहू लागली... कस्तुरी तिच्याकडे आली तरी ती बोलेना.. दगड झाली नुस्ती...😢 आणि मग पंधरा दिवसांनी पौर्णिमेला तो प्रकार घडला... केतकी बेभान झाली... सैरावैरा पळत सुटली, कपड्यांचेही भान तिला नव्हते... दुसऱ्या दिवशी ती एका पिंपळाच्या झाडाखाली बेशुद्धावस्थेत सापडली... पुन्हा पंधरा दिवसांनी तोच प्रकार... मग मात्र केतकीचे बाबा संतापले.. त्यांनी काशीनाथ पंतांशी कडाक्याचे वाद घातले मला म्हणाले आपण गाव सोडून जातोय कुठेही राहू पण इथे नको..."
"ह्या सगळ्या काळांत दर पौर्णिमा अमावस्येला काशीनाथ पंतांना सोन्याच्या मोहरा भरलेली थैली मिळत असे ... कशी ?? कुठून ?? ठाऊक आहे..? त्या वेताळ मांत्रिकाच्या तंत्रमंत्रातून... यज्ञास बळी बोकडाचा या न्यायाने माझ्या अश्राप लेकीचा बळी ह्यांनी दिला होता... केतकी आणि तिच्या वडिलांना बोलावून घेतलं तो दिवस होता शनी अमावस्या... त्या रात्री कोणत्याही देवीची नव्हे तर पिंपळावरच्या मुंजाची पूजा बांधली होती... आणि त्या मुंजाला हवा असणारा अस्पर्श तारुण्याचा नैवेद्य होती माझी कोवळी पोर केतकी..."
कमळा आजी ढसाढसा रडू लागल्या... बापरे! हे असलं काही असतं का जगात?? थोडा वेळ स्वतःला देऊन त्या शांत झाल्या...
"केतकीच्या वडिलांना अगदी व्यवस्थित बाजूला घेऊन त्यांच्या नजरेआड हे कसे उरकले कुणास ठाऊक ? की मोहिनी घातली होती त्यांनी?? पण माझी लेक केतकी त्या मुंजाने पुर्णपणे झपाटून टाकली... अगदी जिवंत दगड आणि अमावस्या पौर्णिमेला बेभान... मालकांनी ह्यांना झाल्या प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी पैसे देऊ केले आणि मी त्यांची वाट्टेल तशी निर्भत्सना केली... बाप नसून दलाल आहात तुम्ही ...ह्या शब्दांतही सुनावले. पोरीची अशी अवस्था पाहून त्यांचं काळीज तुटत असावं.. पण गरीबापुढे फार पर्याय नसतात ग ! आम्ही गाव सोडायचा निर्णय घेतला शेवटचा निरोप घेऊन निघावे म्हणून हे मळ्यात गेले आणि संध्याकाळी अचानक ह्यांचा मृतदेह झाडाला लटकला होता... त्यांनी पैश्यांची अफरातफर केली ती पकडली गेल्याने जीव दिला असा आरोप मालकांनी केला...मात्र मला पक्के ठाऊक होते .. आम्हाला वाऱ्यावर सोडून हे जीव देणार नाहीत खूनच होता तो.."
अरे देवा! किती क्रूर दुष्ट माणसे असतात ह्या जगात... आम्हा मायलेकींचे डोळे नकळत पाझरू लागले... काय काय सहन केलंय ह्या माउलीने...
"मी निराधार विधवा त्यात अशी वेडी पोर पदरी... कुठे जाऊ??? मालकांच्या पत्नी सहृदयी होत्या.. त्यांनी मला घरकामाला ठेऊन घेतलं.. रहायला एक खोली, अंग झाकायला वस्त्रे दिली... केतकी ते दोन दिवस सोडले तर अगदी मुकी गरीब गाय असायची , दगडी मूर्तीगत शून्यात पाहत बसायची... काशिनाथ पंतांचे ऐश्वर्य, नावलौकिक वाढत गेला आणि त्यांची कस्तुरीही... वयाने वाढली.. ती जरा उशीराच वयात आली... अप्सरेला लाजवेल असे सौंदर्य... बापाला पोर इंद्राला देऊ की चंद्राला असे वाटू लागले... मात्र विवाह योग येईना.. किंवा तो मुंजा तो येऊ देत नव्हता.. माझ्या केतकीच्या देहात वावरणाऱ्या मुंजाला कस्तुरीची भुरळ पडली होती... कस्तुरीला पाहुणे पहायला आले की अपघात होत, दोन मुले तर मेलीच.. त्यामुळे ही मुलगी नकोच असे जो तो म्हणू लागला... कस्तुरी आपल्या लग्नाची स्वप्ने पाहत होती.. इतर मुलींसारखं तिला फार वाटायचं हिरवा चुडा, शालू दागिने घालून थाटामाटात लग्न करावे... पण बापाच्या पापाची फळं तिला भोगायची होती."
"एका संध्याकाळी कस्तुरी केतकीकडे एकटक पाहत होती.. जणू केतकी तिचा चेहरा वाचत असावी... काहीतरी बोलणे झाले असावे दोघींचे... दुसऱ्या दिवशी पौर्णिमा होती... पहाटे केतकीने तळहाताच्या शिरा कापून घेतल्या आहेत एव्हढेच मला कळले.. तिला जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या दवाखान्यात भरती केलं... पण दुसऱ्या दिवशी माझी पोर केतकी ह्या जगात नव्हती... तिच्याही प्रेतावर आम्हाला अश्याच पाशवी अत्याचारांच्या खुणा दिसल्या होत्या.. ओरबाडलेला, रक्तबंबाळ झालेला माझ्या कोवळ्या पोरीचा देह अंतिम सोपस्कार करून मार्गाला लावला. .. मालकांचे घर कायमचे सोडले... देवळाजवळ दोने खोल्या पुजारी दादांनी दिल्या बदल्यात मी तिथे काम करू लागले."
त्यांना हे सारं सांगणं सुद्धा किती जड जातंय ... सुकलेल्या जखमांच्या खपल्या निघाल्या असाव्या...दुःख भाळाळून वाहू लागलं.....
"चारच दिवसांत मालकांकडे बोलावणं झालं... पाहते तो काय कस्तुरी दगड बनली होती... सगळे तेच प्रकार... जे जे माझ्या लेकीने भोगले ते ते आता कस्तुरी भोगणार होती... क्रूर वाटेल तुम्हाला कदाचित पण मला आनंद झाला ह्या जन्माची पापं ह्याच जन्मात फेडावी लागतात... कस्तुरीच्या आईने पदर पसरला .. त्यांना वाटत होते माझ्या केतकीने झपाटलंय कस्तुरीला... पण मग मी चार जाणत्या बायकांना गोळा करून हा सगळा प्रकार नेमका काय काय होता तो उघड केला... अगदी मुंजाच्या पूजेला माझ्या लेकीला नेण्यापासून ते तिच्या वडिलांच्या आणि तिच्या अनैसर्गिक मृत्युपर्यंतचा... दुसऱ्याचं दुःख हलकं असत म्हणतात.. काशिनाथ पंतांनी खूप प्रयत्न केले असावेत पण त्या मुंजाने त्यांच्या कस्तुरीला सोडले नसावे..."
"नियती कशी असते पहा! कस्तुरी म्हणजे काशीनाथपंतांच्या अभिमानाची खाण होती .. ढासळली क्षणांत संपली... मग तिचेही पौर्णिमा अमावस्येचे पेटून बेभान होणे आणि एरव्ही दगड होत बसणे सुरू झाले... थोडीथोडकी नव्हे तर चाळीस वर्षे हे अव्याहत सुरू होते...
मग मग ....कल्याणी वयात आली असावी आणि मुंजाला नवीन चटक हवी असावी कदाचित... मात्र कल्याणीच्या हे सगळे परिचयाचे असल्याने तिने विरोध केला आणि एका रात्रीत तिचा बळी गेला असावा... जेव्हा कस्तुरी "माझे लग्न आहे मला बांगड्या भरा " वगैरे म्हणत होती तेव्हा ती कस्तुरीचं होती.. तिचं लग्न व्हावं ही आस ती व्यक्त करत होती.... मध्यंतरी तिच्यातील मुंजा नवीन देह शोधत असावा.."
कस्तुरीने माझा हात धरणे एकटक पाहणे... मला अचानक आठवले आणि आईने ओढत आणले नसते तर काय झाले असते ?? ह्या कल्पनेनेच माझा थरकाप उडाला. कमळा आजी चांगल्याच विचारात पडल्या होत्या... त्यांच्या मते कल्याणी आणि त्यांची लेक केतकी ह्यांच्यात मृत्यूत समानता होती .. ही मुंजा नामक अतृप्त शक्ती देह भोगून बाहेर पडतांना त्याच्या पार चिंध्या करत असावी... कल्याणी आणि केतकीच्याही मृतदेहांवर अमानवी अत्याचारांच्या खुणा होत्याच... पण मग कस्तुरीच्या बाबतीत हे विसंगत कसे?? कल्याणीचा देह सोडून ती शक्ती गेली तरी कुठे?? कमळा आजी आम्हाला म्हणाल्या...
"काहीतरी आहे जे विसंगत आहे... बाकी मालिका समान असेल तर कस्तुरीच्या बाबतीत भिन्नता कशी असेल ??"
"पुन्हा त्या वेताळाकडून काही जारण मारणं करून घेतले असेल म्हाताऱ्याने... गुप्तधनासारखं "
आई संतापाने म्हणाली.
कमळा आजी क्षणभर शून्यात नजर लावून बसल्या आणि अचानक गणित जुळावं तसं म्हणाल्या...
"मला वाटतं ... होय ! होय! तेच कारण असावं... कस्तुरीला कायमचं सोडलंच नाही त्याने ... तो माध्यमं शोधतोय अधिक तरुण अधिक उमदे पण बहुदा मिळत नसावे.अजूनही तो तिच्यात रेंगाळत असावा..."
हे सगळं समजून घेणं समजशक्ती पल्याडचे होते... डोके आणि मन दोन्ही बधीर झाले.. मध्यंतरी बरेच दिवस गेले असावेत... मी माझ्या शिक्षणासाठी शहरात निघून गेले... एके दिवशी आईचा फोन आला ..
"कस्तुरीने आत्महत्या केली हातच्या नसा कापून ... अगदी तशीच... देहावर अघोरी खुणा होत्या."
चला.. म्हणजे अखेर कस्तुरी सुटली म्हणायचे .. कल्याणीच्या धाकट्या काकाला त्याच दरम्यान तिसरी मुलगी झाली होती... गोरीपान, मधाच्या रंगाचे डोळे , दाट काळेभोर केस... पण जन्मांधळी असावी लोक म्हणायचे. तिची बुबुळे स्थिर होती , देहातही काहीच हालचाल नसावी जिवंत असूनही पुतळा वाटावी अशी... मात्र महिन्यातले ते दोन दिवस ती रडून हातपाय झाडून घर डोक्यावर घेत असे.
पापाचे ओझे कित्येक पिढ्यांना वहावे लागते नाही ??? ..
✒️ यशश्री रहाळकर
****************समाप्त*****************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!