कथेचा नायक 'मी' कमलनयन करमरकर ..... तसे प्रत्यक्ष जीवनात मी कायम सहकलाकाराच्याच भूमिकेत वावरतो. नायक म्हणावेत असे कोणतेच "दोष" माझ्यात नसल्याने मी "बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर" या भूमिकेत चपखल बसतो. मी अगदी साधा सरळ माझ्या नावासारखाच काना मात्रा विरहित व्यक्ती.... गेल्या पंधरा वर्षांच्या वैवाहिक जीवनाच्या अनुभवावरून पत्नीला कायमच होकार देण्याचे उत्तम कौशल्य आत्मसात केलेला नवरा नामक बिचारा प्राणी. उत्तम सरकारी नोकरी असतांना पैसे खाण्याचे कसब आत्मसात होऊ न शकलेला, झालेच तर गेलाबाजार सट्टा, पत्ते यांचेच काय रविवारच्या दारुचेही रीतिरिवाज न पाळू शकणारा आणि बायकोच्या दृष्टीने व्यवहारशून्य... कुणालाही सहज गंडवता येणारा बकरा!! एव्हढे वर्णन पुरेय, नाही का? तसे नाही म्हणायला कष्ट करून , स्वतःच्या मेहनतीवर , विविध स्पर्धा परीक्षा देत 'महिला व बालकल्याण विभागात' मी ऑफिसर म्हणून कार्यरत आहे . उत्तम पगार ( बायको त्याला दिडक्या म्हणते हा भाग वेगळा) , 3 BHK चा फ्लॅट, दोन्ही मुलींना महागड्या इंग्रजी शाळेत शिकवणारा मी कुटुंबवत्सल माणूस... परंतु कुटुंबवत्सल माणूस हिरो असतो तो हॉलिवूड मूव्हीत ; आपल्या बॉलिवूड मूव्हीत मुलींची छेड न काढणारा (जमलंच नाही राव आयुष्यात!), शिट्टी वाजवता न येणारा आणि घोड्यावर, गाडीवर, बिल्डिंगवर उद्या मारत धावाधाव, मारामारी न करणारा 'मी' कुणाला हिरो वाटतच नाही..... अर्थात , "आयुष्य प्रत्येकाला हिरो बनण्याची एकतरी संधी देतेच.", मलाही तशी संधी मिळाली... 'ती' भेटली.
कथेतली 'ती' कधी बायको असते का? काय राव!... हं, हं! पण कुठल्यातरी सुशींच्या(सुहास शिरवळकर) कादंबरी सारखी 'ती' उंची मद्याचे चषक वगैरे झळकवत काही मला भेटली नाही बरं! तसेही माझ्यात X फॅक्टर नाहीच असे माझ्या सुविद्य पत्नीचे मत. तर माझी पत्नी रामेश्वरी... आपल्या पिताश्रींचे अत्यंत प्रिय तृतीय कन्यारत्न. तिच्या दोन्ही जेष्ठ भगिनी विश्वेश्वरी आणि सोमेश्वरी यांचे 'सर्वगुणसंपन्न ' पती मात्र तो X फॅक्टर ठामपणे बाळगून आहेत. आपल्यावर नशीबाने फार मोठा अन्याय केला असल्याचे तिचे मत गेल्या पंधरा वर्षांत अधिकाधिक दृढ होत गेले. तिच्या दोन्ही बहिणींना प्रत्येकी 2 मुलगेच पण आम्हाला मात्र तुळजा आणि तुळसा ह्या दोन गोंडस मुलीचं... यालाही मीच जबाबदार आहे असे तिचे मत.( बायको BSc बायोलॉजी आहे, वेगळे सांगायलाच नको) तर थोडक्यात काय "पुरुष" म्हणून भारतीय संस्कृतीत मान्यता मिळू शकेल असे किमान शिवीगाळ करणे, वेळप्रसंगी बायकोवर हात उगारने, घरात शिरताच घरांतील स्त्री पात्रे भीतीने थरथर कापणे वगैरे... गेलाबाजार हाताखालच्या स्टेनो सेक्रेटरीशी अफेअर असले काहीही मला कधीच जमले नाही. माझे महिला व बालकल्याण खाते असल्याने ऑफिसमध्ये बहुसंख्य बायकाच काम करतात . घरीही महिला राज आहे. आईवडील लहानपणी वारल्याने जिने मला लहानाचे मोठे केले ती बयो आत्या, पत्नी रामेश्वरी, 14 व 12 वर्षांच्या कन्या तुळजा व तुळसा अश्या सगळ्या महिला वर्गाबरोबरच मी सदैव असतो. नाही म्हणायला वर्षातले दोनेकशे दिवस माझे सासरे आमच्याकडे रहायला येतात. लग्नाच्या वेळी त्यांनी,"रामेश्वरी माझी मुलगी नसून मुलगा आहे" असे जे विधान केले होते त्याचा अर्थ मला नंतर अनुभवांती कळल
लाच म्हणा!
'आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी' या लहानपणी स्कॉलरशीप च्या अभ्यासात शिकलेल्या म्हणीचा प्रत्यक्ष प्रत्यय माझी पत्नी रामेश्वरी मला सातत्याने देत असते. तसे तिचे माझ्यावर प्रेम नाही असे नाही. बयो आत्या, माझ्या लेकी, नातेवाईक , पाहुणे साऱ्यांचे ती सुगृहिणी समान करते. पण तिच्या पुत्ररत्न प्राप्तीच्या इच्छेला मी साथ न दिल्याने तिचे मी आयुष्याचे नुकसान केल्याची तिची धारणा आहे. झालेच तर.... तिला माझे नाव मुळीच आवडत नाही. 'कमलनयन' हे काय नाव आहे?आपण ते बदलूयात असा तिचाच काय माझ्या लेकींचाही आग्रह. माझ्या आईवडिलांचे नाव नयना आणि कमलाकर होते... त्यांचेच जोडून बनलेले 'कमलनयन' हे नाव बदलायला मी तयार नाही. तुळजाने तर आपल्या नावाचे 'तुळजा KN'असे केरळी रुपडे करून टाकले. तर ह्या दोन मुद्द्यांशिवाय आमच्यात काहीही मतभेद नाहीत. ..... म्हणजे तिचे सारेच मी मान्य करतो. माझ्या आयुष्यातील ती firewall आहे Virus शिरुच देत नाही. आता मला चटकन कुणाचीही दया येते म्हणून तिने माझ्याजवळचे सगळे कार्डस काढून घेतले (मागे मित्राच्या आईचे दवाखान्याचे बील मी भरले होते.) सतत ऑफिससमोरच्या टपरीवरचा चहा पिऊन मला ऍसिडिटी होऊ नये म्हणून सुट्टे पैसेही ठेवणे तिने बंद केले. पूर्वी मी गाडीचा टँक फुल करून घेत असे परंतु नंतर कुणीतरी अत्यंत महत्वाच्या कामासाठी माझी बाईक नेऊन पेट्रोल संपवत असे..... तेव्हापासून ती दर दिवसाचे अंतर मोजून लागणारे पेट्रोलचे पैसे ₹ 50 मला रोज देते. तेही पेट्रोल मी ऑफिस सुटल्यावर भरावे हा तिचा धोरणी आग्रह . यात गडबड झाल्यास बरेचदा गाडी ढकलत नेण्याची नौबत माझ्यावर येते.
त्याही दिवशी माझा अंदाज चुकलंच, मी गाडी ढकलू लागलो. माझे घर ते ऑफिस ह्या दरम्यान एकच पेट्रोलपंप... त्यात पाव
साचे थेंबही पडायला सुरुवात झाली. "काय वैताग आहे!" असं म्हणत असतांना माझ्याजवळ एक गाडी थांबली. काच खाली सरकवत आतील मॅडमने मला मंजुळ स्वरात ,"लिफ्ट देऊ का पेट्रोलपंप पर्यंत?" म्हणून विचारले. माझा दोन मिनिटे स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. मी गाडी रस्त्याच्या कडेला लॉक करून एक बाटली घेऊन तिच्या गाडीत बसलो. या लेखककवी मंडळींना पाऊस इतका सुंदर का वाटतो?? हे मला त्या दिवशी कळलं. मात्र ती शिफॉन साडीत केस मोकळे पुसत वगैरे नव्हती... मस्त बॉबकट आणि जीन्स टी शर्ट ह्या ड्रेसमध्ये , फार सुंदर नाही म्हणता येणार पण नेटकी आणि लाघवी होती. माझे ओले केस पुसायला तिने तिचा नॅपकिन दिला. तिच्या थर्मासमधील कॉफी पुढे करत मस्त मोकळ्या गप्पा ती मारू लागली. "ती" .... मोहिनी... मंजुळ घंटी सारखा किणकिणारा तिचा तो आवाज ... आहाहा! तिचा नवरा दुबईला असतो आणि मुलगा पाचगणीला होस्टेलला. तिला 12 वर्षांचा मुलगा आहे या माहितीवर मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या ऑफिसच्याच परीसरात ती कुठल्याश्या जीमला जात असे. तिही नेहमी याच पेट्रोलपंपावर पेट्रोल भरायला येत असे.
साचे थेंबही पडायला सुरुवात झाली. "काय वैताग आहे!" असं म्हणत असतांना माझ्याजवळ एक गाडी थांबली. काच खाली सरकवत आतील मॅडमने मला मंजुळ स्वरात ,"लिफ्ट देऊ का पेट्रोलपंप पर्यंत?" म्हणून विचारले. माझा दोन मिनिटे स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. मी गाडी रस्त्याच्या कडेला लॉक करून एक बाटली घेऊन तिच्या गाडीत बसलो. या लेखककवी मंडळींना पाऊस इतका सुंदर का वाटतो?? हे मला त्या दिवशी कळलं. मात्र ती शिफॉन साडीत केस मोकळे पुसत वगैरे नव्हती... मस्त बॉबकट आणि जीन्स टी शर्ट ह्या ड्रेसमध्ये , फार सुंदर नाही म्हणता येणार पण नेटकी आणि लाघवी होती. माझे ओले केस पुसायला तिने तिचा नॅपकिन दिला. तिच्या थर्मासमधील कॉफी पुढे करत मस्त मोकळ्या गप्पा ती मारू लागली. "ती" .... मोहिनी... मंजुळ घंटी सारखा किणकिणारा तिचा तो आवाज ... आहाहा! तिचा नवरा दुबईला असतो आणि मुलगा पाचगणीला होस्टेलला. तिला 12 वर्षांचा मुलगा आहे या माहितीवर मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या ऑफिसच्याच परीसरात ती कुठल्याश्या जीमला जात असे. तिही नेहमी याच पेट्रोलपंपावर पेट्रोल भरायला येत असे.
एव्हढ्यात पेट्रोलपंप आला. माझं सुखस्वप्न इथेच भंगलं असं मानून, तिला "थँक्स!" म्हणून मी उतरलो. बाटलीत 30₹ चे पेट्रोल भरून घेत मी शेअर रिक्षाची वाट पाहू लागलो. तेव्हढ्यात U टर्न मारून मोहिनी पुन्हा माझ्यासमोर... कारचे दार उघडत, "आता कसे जाल एवढ्या लांब?" म्हणत मला पुन्हा माझ्या बाईकच्या दिशेने घेऊन निघाली. पुन्हा गप्पा रंगल्या. माझं कमलनयन हे नाव ऐकताच तिने आनंदाने उसळीच मारली. कमल हसन तिचा आवडता हिरो... तिचा पहिला क्रश(हे काय प्रकरण असतं बुवा?) मी कमल हसन सारखाच दिसतो याचा शोध मला त्या दिवशी मोहिनीकडून लागला. बयो आत्या, पत्नी, मुली यांची माहिती पुरवताच तिला भलताच आनंद झाला. असा कुटुंबवत्सल सगळ्यांची काळजी वगैरे घेणारा माणूस... तिला अप्रुपच वाटलं. "आजकाल मुले आईवडिलांना सांभाळत नाहीत. कमल!.... तुम्ही मात्र आत्यालाही सांभाळता, Such a jem of person you are 💝." ती म्हणाली. माझा एकेरी उल्लेख "कमल" मला सुखावून गेला . "पुन्हा कधीतरी असेच भेटूच ना! पेट्रोलपंपावर..." म्हणत तिने निरोप घेतला.
'वाळवंटात चुकलेल्याला मृगजळ मोहवते." म्हणतात ना! माझंही तसच झालं. कित्येक दिवस मोहिनीचा तो मंजुळ आवाज माझ्या कानात घंटेसारखा किणकिणाट करायचा. आता मी दोन वेळेला पेट्रोलपंपावर जाऊ लागलो. जाताना 20₹ आणि येतांना 30₹ याप्रमाणे नेमाने पेट्रोल भरू लागलो. मन मात्र तिला शोधायचे, भेटेल ती नक्कीच पेट्रोलपंपावर... मन सांगत दिलासा द्यायचे आणि ती दिसलीच. ऑफिसहून घरी परततांना पेट्रोल भरण्यासाठी थांबलो. आज घरी जातांना वाणसामान घेऊन जायचे म्हणून रामेश्वरीने 2000₹ आणि यादी दिली होती. "ती" हो हो! मोहिनीच ती ... तिचे पंपावरील पोराशी जबरदस्त वाद सुरू होते. तिने कारमध्ये पेट्रोल भरून घेतले पण कार्ड swipe करतांना एकही चालेना, सगळे कार्डस ब्लॉक होते. मी तातडीने उडी घेत ₹ 2000 ची नोट त्याला देत वाद मिटवला. (बापरे! 2000₹ चे पेट्रोल एव्हढे तर मी महिन्याला पण टाकत नाही) तिने माझे अगदी मनापासून आभार मानले, "Oh Dear ! कमल आज तू होतास म्हणून... मी तुझी ही हेल्प कध्धी कध्धीच विसरणार नाही. " माझे सगळे पैसे व्याजासकट अर्थातच बरीस्ता मध्ये कॉफी प्यायला नेऊन, ट्रीट देऊन ती देणारच होती. ती तिच्या मार्गाला गेल्यावर आता घरी काय सांगू या विवंचनेत मी घरचा रस्ता धरला.
घरी जाताच मी ₹2000 हरवल्याचे सांगताच रामेश्वरी कडाडली ,"असे कसे हो वेंधळे तुम्ही? साधं एक काम करता येत नाही... दोन हजार हरवले खुश्शाल सांगताय.. आता महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ कसा लावू ते सांगा??" खरंतर मेळ लावावा अशी काही परिस्थिती नव्हती पण मी मुकाट्याने खाली मान घालून चोरासारखा उभा होतो. त्यातच तुळसाने खडा टाकला...,"मम्मा मी मागे 100₹ लॉस्ट केले तेव्हा तू मला कशी पनीशमेन्ट दिलेली. आता बोल बोल?" (कार्टी अगदी आईवर गेलीये) त्या दिवशी खिचडी खावी लागली. दुसऱ्या दिवशीही डबा मिळाला नाहीच. एक दिवस ऑफिसमधून परततांना "ती" दिसली.. म्हणजे तिची गाडी दिसली... एव्हाना तिची गाडी माझ्या ओळखीची झाली होती. बरीस्ता मधील कॉफीचे प्रॉमिस आठवून मी भयंकर उत्तेजित झालो. खिडकीच्या काचेवर टकटक करत मी म्हणालो, " मोहिनी ,हाय! आज बरी भेटलीस. चल आज तुझ्याकडून त्या दिवशीचे 2000 ₹ वसूल करतो." म्हणत मी हसत असतांना दार उघडले गेले... जबरदस्त एक ठोसा माझ्या तोंडावर बसला. सहा फूटी काळाकभिन्न राक्षस त्यातून बाहेर पडला. शेजारच्या सीटवर बसलेल्या मोहिनीकडे रागाने डोळे गरागरा फिरवत तो म्हणाला, " हाच ना तो?? काय ग?? याच्याच बरोबर फिरतेस ना??" चेहऱ्यावर जराही ओळखीचे भाव न दाखवता निर्विकार चेहऱ्याने मोहिनी म्हणाली, "ओ हनी! हा कोण ??? मी तर ह्याला पहिल्यांदाच पाहतेय. " तो काळा गेंडा माझ्याकडे वळून मला अक्षरशः धोपटून काढू लागला. त्याचा मार खात खात जमेल तसे मी त्याला तिने लिफ्ट दिली, मग मी ₹2000 दिले वगैरे सारे खरे सांगू लागलो. साक्षीला पंपावरचा पोऱ्या बोलवा असेही विनवले. माझ्या दुर्दैवाने नेमका त्या दिवशीचा पोऱ्या सुट्टीवर गेलेला होता. मोहिनीने तर हातच वर केले,"तुझी हेल्प मी कध्धी विसरणार नाही." असं काहीच दिवसांपूर्वीच तर ती म्हणाली होती. खोटं सांगून बायकांना छेडतो म्हणून मला लोकांनी घेतले. मोहिनी गाडीतून पसार झाली. फुकट मज्जा म्हणून जमावाने आपापले व्यक्तिगत राग आठवून मला यथेच्छ झोडपून काढले. हात पाय प्रचंड सुजले. सगळे अंग ओळखू न येण्याइतपत काळे निळे झाले होते.
एका गॅरेजमध्ये गाडी सर्व्हिसिंग साठी सोडून मी घरी परतलो. रस्त्यात माझा जबरदस्त अपघात झाल्याची लोणकढी थाप सहज पचली. रामेश्वरी आयुष्यात पहिल्यांदाच इतकी हळवी झाली. घरी डॉक्टर वगैरे बोलवून माझी यथेच्छ सेवासुश्रुषा चालवली. बयो आत्याने मीठ मोहरीने दृष्ट काढली . मी जगून वाचून परत आलोय अगदी असे साऱ्यांनाच झाले.मला दहा पंधरा दिवस सक्तीची विश्रांती होती. लेकी मायेने विचारपूस करीत. धाकटी लेक तुळसा तर रडूच लागली, पप्पांना 2000₹ साठी पनीशमेन्ट दिल्याचे तिला वाईट वाटू लागले. ... दुःखातही मी आनंदात होतो. सगळ्यांची काळजी प्रेम फार दिवसांनी माझ्या दुर्लक्षित जिवाच्या वाट्याला आले होते. मनातल्या मनात मी मोहिनीचे आभारच मानले. मला भेटायला म्हणून आलेले सासरेबुवा त्रास नको म्हणून परत गेले .(ओहो! पहिल्यांदाच घडलं) बायकोच्या मोठ्या बहिणींनी तिची चांगलीच खरडपट्टी काढली. रामेश्वरीने ₹2000 साठी मला जो काही मनःस्ताप दिला त्या टेन्शननेच माझा अपघात झाल्याचे निष्पन्न त्यांनी काढले. "दोन हजार रुपड्यांसाठी लाखमोलाचा नवरा मी गमावला असता ग !" म्हणत रामेश्वरी ढसाढसा रडू लागली. मी किती सद्गुणी आहे ह्याचा पाढाच त्या तिच्यापुढे वाचू लागल्या. खरेच! तुमच्यातले गुण केवळ बायकोची बहिणच ओळखू शकते. असे अत्यंत आनंदात आठ दहा दिवस घालविल्यानंतर सुट्टी संपायच्या आदल्या दिवशी रामेश्वरी म्हणाली ,"अहो! तुम्हाला बरे वाटत असेल तर सोनाराकडून माझे मंगळसूत्र दुरुस्त करून आणूया. तुमचा अपघात झाल्यापासून फारच वाईट साईट येते मनात." मी आनंदाने तयार झालो.
पेट्रोल भरायला म्हणून त्याच पेट्रोलपंपावर गाडी उभी केली अन् हाय रे दुर्दैवा! काळजाचा ठोकाच चुकला. मोहिनी माझ्याच दिशेने येत होती. मनातल्या मनात मी मारुती रायाचा धावा करत भीमरूपी महारुद्रा ... म्हणू लागलो. जवळ येताच मोहिनीने माझी अगदी डोळ्यांत पाणी आणून क्षमा मागितली. मी शक्यतोवर दुसरीकडे पहात टाळण्याचा प्रयत्न करू लागलो. मोहिनी व्याकुळपणे म्हणू लागली, "ओह कमल .. dear!! Very very sorry..... तुला माझ्यामुळे खूप मार खावा लागला ना त्या दिवशी ...अरे पण गाडीत माझा नवरा होता , फार फार संशयी आहे तो. त्याच्या समोर तुझ्या भेटीचे बोलले असते ना तर त्याने तुझा खूनच केला असता. तुला मार खातांना बघून फार फार वाईट वाटले रे ; पण तुझा जीव महत्वाचा ना!" मी मागे वळून पाहिले, रामेश्वरीने डोळे आग ओकत होते. माझी सेवा करतांना तिला पार्लरला जाऊन केस रंगवणे जमले नव्हतेच... तिच्याकडे पाहून मोहिनी म्हणाली, "बयो आत्या ना आपण !भेटून फार आनंद झाला. काय उत्तम संस्कार दिलेत तुम्ही भाच्याला." आता पेट्रोलपंप पटेल की काय म्हणून मी भीमरूपी स्कीप करून महामृत्युंजयाचा जप चालू केला. माझ्या हातात दोन हजाराच्या दोन चार नोटा अक्षरशः कोंबत,... "असू दे रे कमल ! फार त्रास दिला मी तुला. मात्र बरीस्ताची ट्रीट पक्की हं! " म्हणत तिने निरोप घेतला. आता पेट्रोलपंप दुभंगून सीता माईसम मी गडप होणार असे मला वाटू लागले. " घरीच घ्या गाडी." , कठोर शब्दांत रामेश्वरी कडाडली. " पण मंगळसूत्र ..." ,मी क्षीण स्वरात उच्चारलो. "आता गरज वाटत नाही त्याची" रामेश्वरी पुन्हा कडाडली. मुकाट्याने घरी येताच रामेश्वरी डोक्याला बाम लावून पट्टी बांधून झोपली. स्मशानशांतता....?????? काय करावे काही सुचेना.
मी भराभर घरातली सारी कामे करून टाकली. रामेश्वरीची आवडती मसाला भेंडी, कढी, गरमागरम फुलके करून तिला ताट वाढून नेले. एक अवाक्षरही न बोलता ती जेवली . ही शांतता किती घातक असते हे संसारी माणसास वेगळे सांगायला नको. दुसरा दिवस दुपारपर्यंत बाम आणि पट्टी बांधून अबोला अस्त्र चालूच ठेवण्याचा होता. मी मुकाट्याने घरातली कामे करू लागलो. संध्याकाळी रामेश्वरीने एका माणसाला माझ्या बाईकची चावी दिली. विचारायची , बोलायची सोयच नव्हती. संध्याकाळी साडे सात ... आठ च्या सुमारास तुळजा आणि तुळसा आईशी कडाडून भांडत होत्या.. रामेश्वरीने त्यांना स्कूल बस लावून दिली होती. त्यांना ते मुळीच मान्य नव्हते. मी गप्प बसणेच योग्य मानले. बयो आत्याने काहीतरी विचारले, "त्यावर रामेश्वरी कडाडली, " त्यांच्याच भविष्यासाठी करतेय ना सारे! त्यांचा विचार आता मलाच करायला पाहिजे. ती बेडरूममध्ये आल्यावर मी म्याऊ होत विचारले, "म्हणशील तर मी सोडतो मुलींना शाळेत??" वज्रमूठ आपटीत रामेश्वरी किंचाळली, "कश्याला??? पेट्रोलपंपावर जायला ?? तुमची बाईकच विकून टाकलीय मी OLX वर. उद्यापासून मीच तुम्हाला ऑफिसला सोडणार आणि आणणार स्कुटीवर.... आणि हो ! पेट्रोल मी भरीन तुम्ही तिकडे येण्याची गरज नाही." त्या दिवशी पेट्रोलपंपावर गेलो होतो तिच शेवटची वेळ.... नंतर कधीही फिरकलो नाही.
©️🔏 यशश्री रहाळकर
