...तर ही गोष्ट फार जुनी नाही. 2006 किंवा 2007 साल असेल....आमच्याच कॉलेजमध्ये चवीने चघळल्या गेलेला हा किस्सा...आता त्यातले सत्य किती आणि बढाई किती हे मात्र मी सांगू शकत नाही. तेव्हाही मी तो किस्सा ऐकून खळखळून हसले होते, आजही आठवण आली तरी मला भीती वगैरे वाटतच नाही तर गंमत वाटते. लॉ कॉलेजमध्ये शिकत असतानाची वर्षे मोठी धमाल होती. तेव्हा लॉ साठी entrance वगैरे काही नसल्याने अनेक हौशे-नवशे उत्साहाने ऍडमिशन घ्यायचे... पहिल्या वर्षी 300 ते 400 ऍडमिशन्स गळती लागत फायनल पर्यंत कसेबसे 50 पास व्हायचे. लॉ पूर्ण केलेल्यांच्या संख्येपेक्षा मधेच सोडलेले किमान चारपट तरी लोक असतील.... तर अश्या सगळ्या जगात जे विद्यार्थी लॉ साठी ऍडमिशन घ्यायचे त्यांचे 3 मुख्य गट होते.
गट पहिला...'वकिलांची मुले' त्यांना घरचाच व्यवसाय पुढे न्यायला वकिलीचे जुजबी शिक्षण घ्यायचे असायचे... बाकी प्रॅक्टिकल ज्ञान , नवे कायदे, कायद्यांतील बदल वगैरेची माहिती त्यांची उत्तम updated असायची. गट दुसरा... 'राजकारणी लोकांची मुले' ह्या सरपंच, नगरसेवक, आमदार वगैरे लोकांच्या मुलांचे भविष्य 'राजकारण' fix झालेले असायचे फक्त स्टेटस आणि हुंड्याची सोय म्हणून त्यांना डिग्रीचा शिक्का हवा असायचा. गट तिसरा ... 'काहीच न जमलेले' सगळीकडे हातपाय मारून काहीच न जमल्याने लॉ कडे वळलेले, बहुतेक छोट्या गावांमधून आलेले हे चुकलेले वाटसरू भयंकर टेन्शन मध्ये असायचे... एकतर 'लॉचा अभ्यास' हे प्रकरण त्यांना अत्यंत अवघड वाटायचं ... त्यात इंग्लिशची बोंब. ह्या तिसऱ्या गटातील विद्यार्थी बिचारे पाठमान मोडून अभ्यास करायचे... बॉईज हॉस्टेल एकतर त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते दुसरे असे की हॉस्टेल म्हणजे वकील होण्यापूर्वी सगळ्या गुन्ह्यांचे प्रात्यक्षिक देण्याचे एक केंद्रच होते... हॉस्टेलच्या ट्यूब्ज, बल्ब हे फोडण्याची वस्तू होते. खिडक्यांच्या काचा तर दुरुस्त करणे बंद केलेल्या होत्या... इतके वेळा त्याचा चुरा केला गेला. कुणालाही पोत्यात घालून मध्यरात्री बडवले जाई आणि गाढ झोपेत असणाऱ्या एखाद्याला चार जण गादीसह उचलून भर रस्त्यावर ठेऊन द्यायचे.... असे अनेक प्रकार तिथे घडत, सर्वच दृष्टीने हॉस्टेलचे नाव खराबच होते.
मग हे गावातून आलेले मुलं आजूबाजूच्या परीसरात एखादी स्वस्त खोली पाहत आणि एकत्र चार सहा जण राहत. कॉलेजपासून अगदी जवळच्या भागात अनेक खोल्या भाड्याने मिळत... असेच चार मित्र खोली शोधत होते... हॉस्टेलवर पुरेसा मार खाऊन , उपाशी राहून आणि पहिल्या सेमिस्टरचे प्रत्येकी 3 backlock बसल्यावर ते खोलीसाठी अत्यंत उतावळे झाले होते. त्यांची नावे सोयीसाठी आपण दिनेश, समीर, अजय आणि प्रदीप मानुयात... (खरी नावे नकोत! आता वकील झालेले ते माझ्यावर दावा ठोकायचे.) तर वर्षाच्या अधेमधे त्यांना रिकामी खोली काही मिळेना. आसपासचा सगळा परीसर त्यांनी पिंजून काढला. शेवटी एका ठिकाणी एक खोली गेली काही वर्षे रिकामी असल्याचे कळले आणि त्यांनी खोली पहायला जायचे ठरवले. खोली वरच्या मजल्यावर होती... वर जायला बाहेरून वळसा घालत जाणारा लोखंडी जीना होता.टॉयलेट बाथरून attached, समोर आणि मागे मोठी गच्ची, भरपूर जागा, खेळती हवा , छान सूर्यप्रकाश... शिवाय खोलीत फॅन होता आणि 2 ट्यूब्ज.... तळमजल्यावर ऑफिस होतं कसल्याश्या पतसंस्थेचं ... सकाळी 10 ते 4 ते सुरू असायचं बाकी वेळ पूर्ण शांतता... आजूबाजूच्या जागेतही ऑफिसेस होती... त्यामुळे संध्याकाळ नंतर काहीही गोंधळ नसायचा. अभ्यासाच्या दृष्टीने एकदम अनुकूल.. ह्या जागेचं भाडं काही आपल्याला परवडणार नाही असा विचार करत समीर म्हणाला..
"जागा एकदम आवडली आम्हाला , कॉलेज दहा मिनिटांवर त्यामुळे सोयीची आहे... पण भाडं किती घेणार??"
"आता काय सांगू तुम्हाला... प्रत्येकी 100 फक्त सहा महिन्यांची ऍडव्हान्स द्यावे लागेल." घरमालक म्हणाले.
ते जरा घाईतच दिसत होते . संध्याकाळ होऊ लागली तसेतसे त्यांनी भराभर जीना उतरून जायला सुरूवात केली आणि
" मला जरा गडबड आहे. तुम्ही उद्या या सकाळी आणि काय ते नक्की सांगा"
म्हणत घरमालक निघूनही गेले. चौघेजण आपापल्या जवळचे पैसे मोजत तयार झाले... सहा तर नाही पण चार महिन्यांचा advance ते देऊ शकत होते ... इतकी स्वस्त रूम मिळणार तरी कुठे? शिवाय रूम त्यांना फारच आवडली होती. रात्री मेसमध्ये प्रदीप आणि अजयने काही मित्रांजवळ उस्मानपुऱ्यातील त्या रूमचा विषय काढला आणि चार-पाच सिनियर मुले भयचकित नजरेने त्यांच्याकडे पाहू लागले.त्यांच्या गावाकडचा एक सिनियर त्यांना स्पष्ट शब्दांत म्हणाला...
"गड्यांनो! त्या खोलीचा नाद सोडून द्या. तिच्याबद्दल काहीबाही ऐकून आहोत आम्ही"
थोडक्यात काय.. तर ती खोली झपाटलेली असल्याने अनेक वर्षे पडून आहे. त्याबद्दलच्या अनेक कथा, वदंतांची पोतडी बांधून चौघेही रात्री चर्चेला बसले. खरेतर चर्चेत फारसा अर्थ नव्हता, दुसरी रूम मिळत नव्हती आणि ही रूम आवडली होती...
समीर म्हणाला,
"माझा काही ह्या असल्या फालतू गोष्टींवर विश्वास नाही . मला वाटते रूम पक्की करावी."
"मलाही हेच वाटतंय. कश्याला कुणाचं ऐकायचं?"
अजय त्याची री ओढत म्हणाला..प्रदीपनेही मान डोलावली...
"आता नापास होऊन गावी परतलो तर आपले बाप आपले बुजगावणे शेतात उभे करतील, त्यापेक्षा भूत काय वाईट आहे... त्यालाही रुममेट करून घेऊ..." दिनेश म्हणाला ..
तसे सगळे टाळ्या देत हसले... दुसऱ्याच दिवशी 4 महिन्यांचे पैसे भरून त्यांनी रूम ताब्यात घेतली. घरमालक लगेच तयार झाले 4 तर 4 पण मधेच खोली सोडली तरी पैसे परत करणार नाही ह्या अटीवर... घरमालक चलाख होता. ही पोरं काही फार काळ टिकणार नाहीत अशी त्याला खात्रीच होती. मुलांचे म्हणून जे काही जुजबी सामान होते गादी, पुस्तके वगैरे घेऊन ते रूमवर रहायला गेले सुद्धा. आता गावी जाऊ तेव्हा चार भांडीकुंडी घेऊन येऊ आणि इथेच चहा, जेवण वगैरे बनऊ असेही त्यांनी ठरवले.रूम प्रशस्त हवेशीर होती. त्यामुळे मस्त शांत झोप लागली.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच अंगावरचे पांघरुण ओढून कुणीतरी त्यांना जागे केले... समीरनेच हा खोडसाळपणा केला आहे असे वाटून बाकीच्यांनी प्रतिक्रियाच दिली नाही. समीरचा असल्या अंधश्रद्धांवर विश्वास नव्हता आणि बाकीच्यांना घाबरवणं हा त्याचा आवडता कार्यक्रम होता. आठ-दहा दिवस होऊन गेले पण त्या रूमवर तसा काहीही त्रास झालेला नव्हता.. अधून मधून फक्त काहीतरी विचित्र आहे एव्हढेच जाणवत होते. सकाळी भल्या पहाटे जाग यायची , जणू कुणीतरी उठवते आहे, रात्री सतत डोक्यात अभ्यासाचेच विचार.. त्या खोलीत सतत अभ्यास करावा वाटतो ,दुसरं काहीही सुचतच नाही... ह्यावर मात्र सगळ्यांचे एकमत झाले होते. ह्या सेमिस्टरचे 6 विषय आणि मागचे 3/4 ह्या सगळ्यांचे एकूणात दडपण आले म्हणूनही अभ्यास करावासा वाटत असेल, असा निष्कर्ष सोईस्कर काढून ते मोकळे झाले.
एके रात्री चौघे अभ्यास करत बसले होते, काही केल्या लक्ष लागेना... प्रदीप चुळबुळत उठला ... जरा कोपऱ्यापर्यंत चालून येऊ म्हणाला... सगळे पुस्तके ठेऊन उठले... पण दारच उघडेना जणू कुणीतरी बाहेरून कडी लावली असावी... दिनेश चांगलाच घाबरला . चौघे ताकद लावत असूनही दार उघडेना...
समीर शेवटी म्हणाला..
"घाबरता काय असे ... कित्येक दिवस बंद होती रूम.. जाम झाली असेल कडी दाराची.. उद्या आवाज देऊ खालच्या ऑफिसमध्ये आणि मग उघडू... झोपा आता."
गंमत म्हणजे सकाळी उठून पाहतात तो दार उघडेच होते...हळूहळू खोलीतल्या घटनांमध्ये वाढ झाली... प्रत्येकाला काहीतरी वेगळे विचित्र अनुभव येऊ लागले... कुणाला भिंतीतून मोठमोठ्याने घोकून पाठ केल्याचा आवाज येई, कुणाला झोपले की कुणीतरी हलवून जागे करते आहे असा भास होई, कुणाला बाथरूममध्ये जास्त वेळ घालवला की बाहेरून दारावर थापा ऐकू येत... एक ना अनेक अनुभव येऊनही ते गप्प होते. ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे एकतर तिथे अभ्यास उत्तम होत होता... अभ्यास मनापासून केला की काहीही त्रास होत नसे आणि दुसरे असे की आता पैसे नसल्याने दुसरा कोणताच पर्याय नव्हता. त्यांच्या सुरस आणि चमत्कारीक कहाण्या अख्ख्या कॉलेजचे पुरेपूर मनोरंजन करत होत्या. ह्या साऱ्यात परीक्षा संपली... आपण पास नक्की होऊ हा आत्मविश्वास चौघांनाही वाटू लागला.
आता दोन दिवसांनी घरी जायचे, मग येताना कोण काय सामान आणणार ही चर्चा सुरू झाली... भाजी ,पोळ्या, चहा ,भांडी घासणे आणि स्वच्छता ही कामे त्यांनी वाटून घेतली. सगळे मजा मस्तीच्या मूडमध्ये होते. स्कॉलरशिपचे पैसेही मिळाले होते मग काय "तिर्थप्राशन" करायचे ठरले... मेसमधून जेवून परततांना चकणा, सोडा वगैरे सगळी तयारी करूनच ते आले. दिनेशला फार दिवसांपासून सिगारेट ओढून बघायची होती.... "धुराची वलये काढली की कसे हिरो झाल्यासारखे वाटते" असे त्याला वाटायचे. रूमवर गाणी गात धिंगाणा घालत , शिट्ट्या मारत परतलेल्या सगळ्यांची मैफिल बसली. ग्लास भरले गेले चिअर्स म्हणत कडक व्हायवा घेतलेल्या शिक्षकांना शिव्यांची लाखोली वाहून झाली. दिनेशने आपली "बरसों की तमन्ना" पूर्ण करायला माचीसची काडी ओढली आणि काय आश्चर्य कुणीतरी ती फुंकर मारून विझवली... असे एक नाही दोन नाही तर तब्बल चार वेळा झाले.. हा प्रकार सगळ्यांनी पाहिला.सगळ्यांचे भीतीने पांढरे पडलेले चेहरे बघून हसत हसत समीर म्हणाला..
"काय लेका! तू काही हिरो नाही आण मी पेटवतो"
लगेच सिगारेट पेटवून विजयी मुद्रेने दिनेशकडे दिली आणि सटकन त्याच्या थोबाडीत बसली... ही थप्पड इतकी जोरात होती की तो भेलकांडत मागेच पडला... आणि मग सुरू झाला खेळ त्यांच्या न दिसणाऱ्या पाचव्या रुममेटचा.... आता खोलीतील सगळे लाईट्स बंद सुरू, झपझप करत अखेर बंद झाले... सगळ्या खिडक्या जोरजोरात आपटू लागल्या, घाबरगुंडी उडून सगळे दाराकडे धावत सुटले पण दार नेहमीप्रमाणे बंद झालेले... भिंतींमधून जोरजोरात घोकून पाठ केल्याचे आवाज येऊ लागले, कॅलेंडर फडफडत होते... आज अमावस्या त्यांना कळून चुकले. बाहेर मिट्ट काळोख होता. समीर सहित सगळे भीतीने थरथर कापू लागले. कुणी भीमरूपी कुणी रामनाम जप आठवेल तसा सुरू केला... त्या गदारोळात समीरला काहीतरी सुचले त्याने झटपट पाचवा ग्लास भरला आणि हात जोडत म्हणाला...
"भूत मित्रा तू आमचा रुममेट आहेस ..तुला न देता घ्यायला नको होती."
अचानक सगळे शांत झाले... ग्लास रिकामा झाला. सगळ्यांच्या जीवात जीव आला. सगळे थकून जमिनीवर आडवे झाले... छताला गरगर फिरणाऱ्या फॅनवर त्यांचा पाचवा रुममेट बसला होता.
दुसऱ्या दिवशी ते सगळे कसे गावाकडे पळाले, मग कसे चार दिवस तापले ... एक ना अनेक अफवांचं पीक आलं. त्या खोलीत पूर्वी एका मुलाने त्याच पंख्याला लटकून जीव दिला होता असेही कळले. सुट्ट्या संपवून परतल्यावर अर्थातच त्यांनी दिवसाउजेडी रूम सोडली.मात्र हा किस्सा त्यांना भलतीच प्रसिद्धी देणारा होता ... पुढची दोन वर्षे त्या चौघांना सारे कॉलेज "भुताचे रुममेट्स" म्हणून ओळखू लागले.
✒️ यशश्री रहाळकर