फॉलोअर

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

उपरी


मुग्धा आज घरी परतणार होती... तिच्या घरी, तिच्या हक्काच्या घरी... साठे मॅडम तिचा निरोप घेतांना म्हणाल्या..

"मुग्धा... तू आयुष्याचा फार मोठा टप्पा पार केला आहेस. बाळा! 'आपलं जग' म्हणून ज्या जगात तू परत जाते आहेस ना... ते कदाचित तुझ्या आठवणींपेक्षा बदललेलं असू शकेल.... बदलांचा स्वीकार कर."

अधिक्षिका साठे मॅडम तश्या खूप खूप प्रेमळ... निरोपाच्या वेळी दोघींचेही डोळे भरून आले. जणू आई लेकीची सासरी पाठवणी करतेय... 

"स्वतःला कधीही एकटं समजू नकोस .. मी सदैव सोबत आहे तुझ्या."

अश्या चार समजुतीच्या शब्दांसह मुग्धाने हात हलवत त्यांच्या आणि त्यांच्या 'मनांगण' चा निरोप घेतला. थोडीथोडकी नाही तर तब्बल बारा वर्षांनी मुग्धा तिच्या घरी देशमुख निवासमध्ये परत जायला निघाली होती. डोळ्यांसमोर सगळ्या सुखद आठवणी फेर धरून नाचायला लागल्या.... 

जेमतेम 20 वर्षे पूर्ण झाले आणि आईविना वाढवलेल्या मुग्धाचे बाबांनी लग्न लावून दिले...  मोहन देशमुख आणि त्याचा परीवार परिचित होताच... गावातल्या गावात सासर मिळालं... लेक डोळ्यांसमोर राहणार म्हणून बाबा निश्चिन्त झाले. मोहन देशमुख होतकरु होता... त्याने फर्निचरचे दुकान नुकतेच सुरू केले होते. जोडीला घरची शेतीवाडी वगैरे असल्याने तशी आर्थिक परिस्थिती चांगली होती. घरी मोहन आणि त्याचे आईवडील, मोठ्या दोघी बहिणींचे विवाह होऊन त्या आपापल्या संसारात रमलेल्या होत्या. मुग्धा देशमुखांच्या घरी सोन्याच्या पावलांनी गेली... तिच्या आगमनाने मोहनच्या व्यवसायाची भरभराट झाली. शांत, हळवी, बुजरी पण लाघवी मुग्धा घरातल्या सगळ्यांची लाडकी बनली. सासूबाईंची तर तिच्यावर खूप माया... 

"गेल्या जन्मीचं पुण्य असेल आमचं.. म्हणून तू सून म्हणून मिळालीस."

असं त्या नेहमी म्हणायच्या मग हात मस्तकावर फिरवून कडकडा बोटे मोडत तिची दृष्ट काढायच्या... कश्या असतील त्या? थकल्या असतील इतकी वर्षे कामे करून करून... आता त्यांना मुळीच काम करू द्यायचे नाही नुसता आराम करा म्हणायचं.... मुग्धाच्या मनांत आलं. आठवणींचं एक आवर्तन पूर्ण होईपावेतो घर आलंच... घराचं प्रशस्त अंगण, त्यातली शिसमची बंगळी, तुळशी वृंदावन सगळं जसच्या तसं होतं... बारा वर्षे झालीत ह्या सगळ्याला बापरे! पण सगळं तर तसंच आहे ... गुलाबाला कित्ती फुलं आली आहेत ना! जणू स्वागत करताहेत आपलं... मुग्धाच्या मनांत आलं आणि ती स्वतःशीच गोड हसली. घराच्या बैठक खोलीत सासरे येरझारा घालत तिची वाट पाहत होते... त्यांची नजरानजर होताच ते प्रसन्न हसले... पण दडपण होतं का त्यांच्यावर काही?? की उगाच वाटलं आपल्याला?? मुग्धाचे मन नाना कुशंकांनी भरून गेले.

घरातली जुनी कामवाली रखमा भाकर तुकडा घेऊन पुढे आली... तिचे डोळे मुग्धाला पाहून भरून आले. घरात येताच थकलेल्या सासूबाई कश्याबश्या उठत तिच्याजवळ येत मायेने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवून , काठोकाठ भरले डोळे निःशब्द होत पुसू लागल्या. मुग्धा ह्या मायेने गहिवरून गेली... मोहन तिचीच वाट पाहत असल्यासारखे तिष्ठत उभे होते...किती वयस्कर दिसताहेत हे? पोट सुटलंय केस पिकलेत... वय झालं म्हणायचं... तसं आपलंही वय वाढलं होतच ना!... मुग्धाच्या मनात कित्येक दृष्य-अदृष्य बाबींचा कॅलिडोस्कोप उलगडत गेला. मोहन सुरुवातीपासून मितभाषी, अगदी अबोल... मनातलं सांगणं त्याला कधी जमायचं नाही, पण मुग्धावर त्याचे मनापासून प्रेम होते... तिची वाट पाहणारे त्याचे डोळेच तिला सांगत होते... मुग्धासाठी दर वेळी हौसेने भारीच्या साड्या आणणारा, दर दिवाळीला दागिना घेणारा, मधुरा आणि मयंकच्या वेळी हळवा होत तिला जपणारा मोहन. तिला मोहनची अनेकानेक रूपे आठवत गेली... मुलांशी खेळताना त्यांच्या वयाचा होऊन दंगा-मस्ती करणारा बाप, तिला फुलासारखं जपणारा तिचा प्रेमळ नवरा... आणि सगळं सावरून घेणारा घरातला कर्तापुरुष... ह्याच्यावर सुद्धा अन्यायच झाला आपल्याकडून... तिच्या मनातले हे विचार जणू वाचता आले त्याला... आणि तो म्हणाला..

"मुग्धा! आता कसलाच विचार नाही करायचा... मस्त आनंदात रहायचं . सगळं घर बघ बरं एकदा ...काय काय बदल केलेत ते... तुला जे काही बदलायचे असेल ते सांग आपण सगळं तुझ्या मनासारखं बदलून घेऊया."

मुग्धा हसली, पण आत कुठेतरी तिला जाणवत होतं.. हे प्रेम नाही .. मोहनला माझी दया येतेय का? काळजी वाटतेय का? मला तो नेहमीसारखा "ए वेडाबाई!" म्हणाला नाही.. कदाचित.. आता तसं म्हणणं त्याला उचित वाटलं नसेल... विचारांच्या मांजाला बांधत तिच्या देहाचा पतंग घरभर फिरू लागला... ओळखीचे अनोळखीसे कप्पे शोधत. मागच्या अंगणातील सायली पांढरी शुभ्र झाली होती... आहाहा! सुवासात चिंब भिजली ती. मुग्धा मागच्या गोलाकार जिन्याने वर चढू लागली तशी सासूबाईंची हाक कानावर पडली..

"गरमागरम जेवून घ्या. चला सगळे."

ती तशीच उतरून  हातपाय धुवून स्वयंपाकघरात गेली. आता छान प्रशस्त ओटा, डायनींग टेबल , फ्रीज आणि कित्येक अत्याधुनिक गोष्टी तिथे दिमाखात वावरत होत्या. सासूबाईनी पाने आधीच मांडली होती.. तिच्या आवडीचा आम्रखंड, पुरी भाजी, मसालेभात असा बेत होता. रखमा गरम पुऱ्या वाढत होती. मुग्धा चवीने आस्वाद घेत सावकाश जेवत होती. कित्येक वर्षांनी तिला असं मनसोक्त जेवताना बघून मोहनचे डोळे भरून आले असावेत तो हळूच कुणाच्याही नकळत डोळे पुसू लागला. तिला अचानक काहीतरी चुकल्यासारखं वाटलं.. 

"मधुरा , मधुरा कुठेय?"

"ती कॉलेजला गेलीये." सासूबाई म्हणाल्या..

"खूप मोठी झाली असेल ना! मला तर अजूनही इवलीशी दोन वेण्या घालून शाळेत जाणारी मधुरा आठवते."

"आता ताडमाड झालीये माझ्याही पेक्षा उंच... इंजिनिअरिंग सेकंद इयरला आहे. खूप हुशार आहे...बास्केटबॉल प्लेयर आहे.."

मोहन भराभरा माहिती सांगू लागला... मग मधुरा ह्या समान प्रिय धाग्यावर सगळ्या आठवणी एकेक जण सांगू लागले... मुग्धा हृदयाचा कान करून ऐकू लागली. आठ वर्षांची होती मधुरा... सतत आई आई .. सासूबाई तर म्हणायच्या सुद्धा ..

"पदराला बांधून ठेव तुझ्या ह्या पोरीला!"

मुग्धाला खुदकन हसू आलं. जेवण झाली तशी मुग्धा आवरासावर करू लागली .. पण नेमके काय नी  कुठे ठेवावे हे न कळल्याने ती बावरून गेली... सासूबाई सारे उमजून हातानेच धीर देत म्हणाल्या..

"सारे नवीन आहे ना ! हळूहळू होईल हो सवयीचे..."

जेवणानंतरची तिची औषधे हातावर ठेवत मोहन म्हणाला ..

"औषध घेण्यात अजिबात दिरंगाई करायची नाही हं! वेळच्या वेळी सगळ्या गोळ्या घ्यायला सांगितल्या आहेत डॉक्टरांनी."

तिने शहाण्या मुलीसारखी मान डोलावली आणि गोळ्या घेऊन टाकल्या... तिला आराम करायला सांगून मोहन आपल्या शोरूमवर जाण्यासाठी निघाला. त्याच्या व्यवसायाचा व्याप आता खूप वाढला होता... 2 मोठे शोरूम्स आणि 3 शॉप्स ह्यांच्या जोडीला एक छोटा फर्निचरचा कारखानाही त्याने चालवायला घेतला होता. त्याच्याभवती कामांचा व्याप प्रचंड वाढला होता ... की त्याने स्वतःला कामात झोकून दिले होते, गुंतवून टाकले होते...  मुग्धाला उगाच वाटले. गोळ्यांचा अंमल आणि मनसोक्त जेवणाची धुंदी तिच्या डोळ्यांवर चढू लागली तशी तिने बेडरुमची वाट धरली... फार काही बदल झालेले नव्हते.. फक्त  भिंतींचा रंग जरा गडद वाटला तिला आणि पडदे.... पूर्वी ब्राऊन होते बहुदा पानापानाचे प्रिंट ... ती झोपेच्या अधीन झाली.

तिला जाग आली तेव्हा बराच उशीर झाला असावा... दिवेलागण झाली होती... ती बैठक खोलीत येऊन बसली... काहीक्षण आपण नेमके कुठे आहोत? ह्याची संगती तिला जुळवावी लागली. समोरून सॅग घेऊन धावतपळत येणारी एक उंच सडपातळ मुलगी तिला दिसली... तिला पाहताच ती मुलगी थबकली... तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले... आणि ती खिळून तिच्याच जागी स्थिर उभी राहिली..

"ही आपली मधुरा..."

सासूबाई म्हणाल्या तशी भारावल्यासारखी मुग्धा तिला न्याहाळू लागली... हुबेहूब माझ्यासारखी दिसते ही... उंची मात्र मोहनसारखी आहे ... त्याहूनही उंचच असेल ताडमाड... तिला खुदकन हसू आलं. चेहऱ्यावर बेफिकिरी, केसांचा तो रंगीत भारा, ठिकठिकाणी फाटलेली पॅन्ट ...अरे देवा! काय हा अवतार हिचा? तेव्हा ही बडबडी होती मुलखाची आताही बडबडी आहे की ...?? विचारांच्या गर्तेत मुग्धा दोन पावले मधुराच्या दिशेने सरकली... मधुरा मात्र वेगाने मागे मागे सरकत , कोऱ्या चेहऱ्याने धावत मागचा जीना चढून वर तिच्या खोलीत गेली आणि धाडकन दार बंद केलं. हे सगळं इतकं झटपट झालं की मुग्धा भांबावून पाहत राहिली... सासूबाई शांतपणे म्हणाल्या..

"तिलाही वेळ द्यावा लागेल... मुग्धा तू तिच्याही बाजूने विचार कर एकदा... "

मुग्धाने होकारार्थी मान डोलावली... तिने देवघरात जाऊन देवापुढे समयी लावली... देवघर आणि तिचं मन उजळून निघाली... तिला शांत वाटू लागलं... तेव्हढ्यात रखमा चहा घेऊन आली... मुग्धाने मग तिची चौकशी केली, जुन्या आठवणींची उजळणी केली. हळूहळू कामांना लागणार असल्याचेही तिने बोलून दाखवले.

 हा दिवस सरला तसे कित्येक दिवस सारखेच येत आणि संपून जात... मधुरा सोईस्करपणे मुग्धाला टाळत होती.... मुग्धा आली की ती तिथून उठून निघून जाई. मोहनला घरी यायला बहुतेक वेळी उशीरच होई... त्यात औषधे होतीच त्यामुळे मुग्धा तो येण्यापूर्वीच झोपून गेलेली असे. तिलाही कधीतरी वाटायचं मोहनने जवळ घ्यावं पूर्वीसारखं घट्ट मिठीत घ्यावं... देहाची आसक्ती वाटावी असं तिचं वय कुठे उरलं होतं? पण.. स्पर्शाची आणि त्यातल्या मायेची ओढ मात्र तिच्या मनाला सतत लागलेली असायची. झाडाफुलांत बागेत तिचे मन रमायचे, दिवसभर ती झाडांजवळ असायची .. अनेक नवी फुलझाडे तिने लावून घेतली .. त्यांची फुले गोळा करून ती देवांना हार करायची. गजरे सुद्धा करायची , माळायची मात्र नाही.

आठ वर्षांच्या लेकीनंतर तिला भेटलेली लेक 20 वर्षांची पूर्ण होती... स्वतःचे जग असणारी, स्वतःचे स्वतंत्र मत असणारी ,स्वतंत्र अस्तित्व असणारी... तिच्या ह्या जगातून तिने "आई" कित्येक वर्षांपूर्वीच पुसून टाकली होती आणि आता जी बाई समोर उभी होती तिच्याबद्दल केवळ तिरस्कार एव्हढी एकमेव भावना तिच्या मनात उरली होती. मुग्धाला हे सारं कळत होतं, मधुराच्या चेहऱ्यावरचा राग, संताप सारं तिच्यापर्यंत पोहीचत होतं... पण काय करायला हवं होतं तिने ?हेच तिला कळत नव्हतं. तिचे लेकीपर्यंत पोहोचायचे सगळे मार्ग तिच्या लेकीने धाडकन तोंडावर दार आपटून बंद केले होते. मधुरा घरांत असली की तिच्या मागे मागे दिसणार नाही अश्या बेताने मुग्धा फिरत असायची.. आपल्या लेकीला डोळे भरून बघावंस वाटणं ह्यात काय चुकीचं होतं?

एक दिवस मुग्धाला वाटलं... आपण किती क्षणांना गमावलं आहे ह्या मधल्या काळात... फोटो! हो फोटोतून आपल्याला त्यापैकी काही अनुभवता येतील का? तिने रखमाला सगळेच्या सगळे अल्बम आणायला सांगितले... मस्त सगळे आजूबाजूला पसरवत ती त्या पसाऱ्यात हरवून गेली... तिच्या लग्नाचे फोटो... बाबा किती प्रसन्न वाटताहेत. मग सगळे सण डोहाळजेवण मधुराचा जन्म बारसं.. कसली गोड होती ना आपली ही परी! तिच्या तिसऱ्या वर्षी मयंकचा जन्म... त्याच्या बारश्याचे फोटो... टाचणी टचकन रुतत जावी तसा झटक्याने तिने तो अल्बम बाजूला केला.. आता तिला पुढचे फोटो पाहावेसेच वाटे ना!... तो पसारा तसाच सोडून तिने बाजूला अंग टाकून दिले. तिचे डोळे काठोकाठ भरले होते... हुंदका कंठाशी दाटला होता... तिने तो घट्ट दाबून धरला... आणि डोळे गच्च मिटून घेतले... तिला मनांगणच्या साठे मॅडमची आठवण झाली,

"मुग्धा, बाळा गेलेल्या व्यक्तींसाठी तू ज्या तुझ्यापाशी आहेत त्या माणसांवर अन्याय करते आहेस."

तशी भानावर येत मुग्धा उठून बसली. बाबा गेले होते,मयंक केव्हाच गेलेला होता... हे सत्य स्वीकारायला  बारा वर्षे लागली मुग्धाला. मधुराच्या पाठीवर मयंकचा जन्म झाला आणि ती स्वतःला कमालीची भाग्यवान समजू लागली. तिची दोन गोजिरवाणी पिल्लं आणि घर , नवरा हेच तिचं जग... ह्या गोकुळाव्यतिरिक्त काय हवं होतं तिला तरी? मधुरापेक्षा मुलगा म्हणून तिची काकणभर अधिक माया मयंकवर  होती... मयंक गोरापान लाडोबा ..कुरळ्या केसांचा.. मयंक आणि बाबांचे मस्त मेतकूट जमायचे ते त्याला गोष्टी सांगत , गाणी म्हणून दाखवत.. दिवसभर त्याचं आबा आबा सुरू असायचं . 

मयंक पाच वर्षांचा होता, भयंकर खट्याळ, खोडकर आणि चपळ... त्या दिवशी त्याला हाताला धरून ती कुठेतरी निघाली होती ... "कुठे बरं! बहुतेक भाजी आणायला..." मुग्धा स्वतःलाच म्हणाली. पलीकडच्या कोपऱ्यावर बाबा येतांना दिसले तसा मुग्धाच्या हाताला झटका मारून मयंक , "आ ss बा!" म्हणत धावत सुटला... दुसऱ्या बाजूने बाबा सुद्धा त्याच्या दिशेला झेपावले... "अरे अरे हळू...." म्हणेपर्यंत ... वेगवान ट्रॅक ... तिची प्रचंड मोठी आरोळी... रक्ताचं थारोळ... आठवणीनेही तिने डोळे गच्च मिटून घेतले... "आई गं! " अजूनही कालपरवा घडला असावा इतका तो प्रसंग तिच्या डोळ्यांपुढे उभा राहिला. तिच्या पोटचा गोळा आणि जन्मदाता बाप चिरडून ट्रक पुढे गेला.. सगळं संपलं होतं .मयंकच्या मेंदूचा चेंदामेंदा झालेला ... ज्या पायांवर तिने डोके टेकवून आजवर आशीर्वाद घेतले ते बाबांचे पाय धडावेगळे झालेले.... बाबा आणि मयंक जागीच गतप्राण झाले होते... मुग्धा कोसळून पडली ते चार दिवस शुद्धीवर आलीच नाही... प्रसंग इतका भयंकर होता की पाहणारे कित्येक रात्री झोपूच शकले नाहीत. मुग्धा तर हळवी, कोमल मनाची ...तिचं सगळं जग क्षणार्धात उलट-पालट झालं. 

पुढे तिचं शून्यात बसून राहणं, कधी बाबा म्हणून धावत सुटणं तर कधी मयंकचे भास होण... नसलेल्या मयंकला जेऊ घालणं, आंघोळ घालणं... सगळं सगळं मोहन आणि घरच्या मंडळींनी तिची अवस्था समजून घेत लक्षात घेतलं... पण एक दिवस कहर झाला. मुग्धाने मयंकच्या वाढदिवसाची तयारी सुरू केली... सगळ्या ओळखीच्या लोकांना आमंत्रणे देऊ लागली, घर सजवू लागली... मोहनने आता मयंक आपल्यात नाहीये ही आठवण करून देण्याचा प्रयत्न केला ; पण हे सत्य स्वीकारायला मुग्धा तयार नव्हती. ती भयंकर आक्रमक झाली हातात येईल ते फेकायला तिने सुरुवात केली... घरातले सगळेच घाबरून गेले. दिवसेंदिवस हे सारं वाढत गेलं... शेवटी नाईलाजाने तिची रवानगी "मनांगण"ला करण्यात आली. तिथल्या प्रेमळ अधिक्षिका, डॉक्टर, वेगवेगळ्या उपचार पद्धतीने सकारात्मक बदल होण्यास हळूहळू सुरुवात झाली आणि तब्बल बारा वर्षांनी मुग्धा पुन्हा घरी परतली. ह्या साऱ्या काळात मोहन तिला महिन्यातून एकदा कधी दोनदा भेटायला येऊन जाई... ती कधीतरी बरी होईल आणि सगळं पूर्वीसारखं नॉर्मल होईल ह्या आशेवर तो देखिल दिवस ढकलत होता..

"ही आशा फार वेडी असते ... जसजसा काळ पुढे जात राहतो तसतशी वय वाढल्या म्हातारीगत दुबळी व्हायला लागते."

बारा वर्षे फार मोठा काळ होता आयुष्याचा... जगणे कुणासाठी थांबत नाही. सगळ्यांनी हळूहळू मुग्धाचं त्यांच्यासोबत नसणं स्वीकारलं होतं... त्यांचे प्रश्न त्यांच्या पातळीवर सोडवले होते... आणि जगायचा एक पॅटर्न सेट झाल्यावर मुग्धा पुन्हा परतली होती. तिचं परत येणं नक्की सुखावह होतं का?? तिचा तिलाच प्रश्न पडे... काय असतं ना माणूस गेला की सुटतो पण तो अश्या असून नसल्या अवस्थेत जिवंत आहे म्हणजे असून उपयोग नाही आणि नसून खोळंबा. प्रत्येकाच्या नजरेत तिला प्रश्नचिन्ह दिसायचे... आपण कायमचं गेलो असतो तर आज कदाचित मोहनचे दुसरे लग्न झाले असते त्याचा संसार , त्याचं आयुष्य मार्गी लागलं असतं... सासुबाईंचे काळजीने खोल खोल गेलेले काजळी धरलेले डोळे पाहिले की तिला फार अपराधी वाटायचं. 'पुन्हा ही पहिल्या सारखी तर वागणार नाही ना!' हा सासऱ्यांच्या डोळ्यांतील तणाव तिला अस्वस्थ करायचा... आणि मधुरा .. ती तर तिच्या वाऱ्यालाही उभी राहत नसे. शेजारपाजारचे, ओळखीचे , नात्यातील लोक हळूच डोकावून जात... दुरूनच तिचा अंदाज घेत... कधीकधी तर ते एखाद्या प्राणिसंग्रहालयात दुर्मिळ प्राण्याला बघावे त्या कुतुहलपूर्ण नजरेने तिच्याकडे पाहत. 

एक दिवस मुग्धा कुठलीही जुनी कादंबरी वाचत बसली आणि तिचा वाचता वाचता डोळा लागला.. झोप गाढ म्हणावी अशी काही नव्हती... बैठक खोलीत मधुरा तावातावाने बोलत होती.... तिने सावध होत ऐकण्याचा प्रयत्न केला. मधुराला तिच्या काही मित्रमैत्रिणींना पार्टी द्यायची होती आणि त्यावरूनच आजी नातीचे वाद सुरू असावेत. मुग्धा उत्साहाने पुढे होत म्हणाली...

"आई काय करायचे आहे सांगा ना ! मी करेन सगळे पदार्थ , मधुराला आवडतील तसे पदार्थ करूयात"

दोघी एकदम गप्प बसल्या... आजीने मधुराला "नाही नको" अशी खूण केली... ती नेहमीप्रमाणे पाय आपटत तिच्या खोलीकडे निघाली... आज मुग्धाही चिवटपणे तिच्या मागे निघाली आणि थेट तिच्याशीच बोलली..

"मधुरा, काय झालंय? एकदा बोल तरी माझ्याशी."

तिरसटल्यागत मधुरा म्हणाली....

"आजी ... ह्या बाईंना स्पष्ट कल्पना दे... मला बोलायचं नाहीये ह्यांच्याशी.... "

"मधुरा! काय हे वागणं?"

आजीने दरडावलं... मुग्धा शांतपणे मधुराकडे पाहत एकेक शब्द जोडत म्हणाली...

"मधुरा... तू स्पष्ट सांगितलं नाहीस तर कसं कळेल मला? मला कळतोय तुझा त्रागा... तुला मला स्वीकारणं अवघड झालंय... मी काय करू तू सांग??"

बांध फुटल्यागत मधुरा बोलत सुटली.... शब्दांचे मोठमोठे लोट मुग्धाच्या अंगावर कोसळत गेले...

"उद्या माझ्या वाढदिवसाची पार्टी द्यायचिये मला... अचानक सगळ्यांना घरीच पार्टी हविये..कारण तुम्हाला माहिती असेलच ना!... शक्य झालं तर प्लीज... दोन तास त्यांच्या समोर येऊ नका. ह्या बाई कोण ? इतकी वर्षे कुठे होत्या? ह्या प्रश्नांची अवघड उत्तरे मला द्यायला लाऊ नका."
 
"मधुरा! कुणाशी बोलतेस तू ह्याचं भान ठेव..."

घरांत प्रवेश करणाऱ्या मोहनने मधुराला झापलं...मुग्धाने हातानेच शांत राहण्यास सांगितले.

"मी अश्या बाईशी बोलतेय जिच्या लेखी मी कुणीच नव्हते... तिचा लाडका लेक गेला त्यामुळे ती भान हरपून वेडीपिशी झाली पण त्या वेळी आपल्याला एक आठ वर्षांची मुलगी आहे , तिलाही आपली गरज आहे हे भानच जिला उरलं नाही... आणि आता ह्या सगळ्याची सवय झाल्यावर ही हिच्या सोयीने पुन्हा परत आलीये..."

"मधुरा बेटा नाईलाज होता ग माझा .. मी आई आहे तुझी ... तू तरी समजून घे ना!"

मुग्धा हताशपणे गयावया करत म्हणाली... तिचे डोळे केव्हाच ओसंडून वाहत होते.

"आई ही ही आई??.. माझी पाळी आली पहिल्यांदा तेव्हा कुठे होती ही आई? माझ्या दहावीच्या , बारावीच्या परीक्षेला कुठे होती ही आई... मला फणफणून ताप आला की रात्री उशाशी होती का ही बाई?? माझी वर्गातल्या टवाळ मुलानी छेड काढली तेव्हा कुठे होती ही?? सांगा सांगा ना..."

"मधुरा! लहान नाहीयेस तू ... ती आजारी होती . तिच्यावर उपचार सुरू होते..."

मोहन म्हणाला... त्यावर वरच्या पट्टीचा आवाज चढवत मधुरा म्हणाली...

"मान्य आहे मान्य आहे मला... ती बिचारी आहे! पण आता ती परत आलीये ना ...मग तिने माझ्या आयुष्यात येऊ नये..मला माझं आयुष्य जगू द्या... "आई कुठे आहे तुझी?" ह्या एकाच प्रश्नाचं आयुष्यभर उत्तर देऊन कंटाळा आलाय मला..."

सगळे अविश्वासाने गपगार झाले होते... मधुरा दाणादाण पाय आपटत निघाली ... थोड्या वेळाने परत फिरत मोहनला म्हणाली..

" मलाही फार त्रास द्यायचा नाहीये तुम्हाला... उपनगरचा आपला फ्लॅट पुढच्या महिन्यात रिकामा होईल पप्पा! भाडेकरूंनी जागा खाली केली की मी स्वतंत्रपणे राहीन तिथे... आणि हो! ह्या बाईंना सांगा सतत CCTV सारख्या मला पाहत जाऊ नका... त्रास होतो मला त्याचा..."

मधुराच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मुग्धा पाहत राहिली... आपल्याच मालकीच्या घरात ,आपल्याच हक्काच्या माणसांत किती उपरे असतो आपण? नाती, घर, आपली माणसं ... सगळा मोहमायेचा पसाराच नाही का? बारा वर्षे मानसिक दुखण्याशी संघर्ष करून , बरी होऊन घरी परतलेल्या मुग्धाला घरांत जागा मिळाली होती पण माणसांच्या मनात मात्र तिला तसूभर देखिल जागा नव्हती... तिथे ती उपरीच होती.

✒️ यशश्री रहाळकर









मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

सवाष्ण


गोदाक्का चाळीशीच्या घरातील.... गोरीपान, ठेंगणी, गोल चेहऱ्याची ... एक पाय किंचित खुरडत चालणारी. नाशिकच्या सोमवार पेठेतील जुनाट ढासळत जाणाऱ्या अखंख्य वाड्यांपैकी एक .. गायधनी वाड्यात माडीवरल्या खोलीत राहते.... तशी ती तिथेच गेली कित्येक वर्षे राहत असावी. खरंतर ती गायधनी नाही ती सौ. गोदावरी गंगाधरराव जोशी. तिचं सासर सातारकर जोशी हे एक बड प्रस्थ...पण..? हा पण मोठा जीवघेणा असतो. कधीकधी हा "पण" इतका मोठा विराम असतो की अवघं आयुष्य निघून जातं त्यातच.गोदाक्कांचे तिच्या वयाच्या अठराव्या वर्षी आईवडिलांना लग्न लावून दिले.एव्हढे श्रीमंत जोशी पण लेक आणि नारळ घेतला ना फक्त.... आणि लग्नाच्या बरोब्बर तिसऱ्या दिवशी गोदाक्का माहेरी परतली... परतली ते कायमची.

गोदाक्कांना त्या काळानुसार पाच -सहा भावंडे होती पण...त्यापैकी जगल्या त्या एकट्या गोदाक्का. अहो! गोदावरी म्हणून त्यांना आजवर कुणीही हाक घातली नाही , सगळा गाव त्यांना गोदाक्का म्हणूनच ओळखतो. वयोमानाने त्यांची आई गेली. लोक म्हणतात...

"गोदाक्कात जीव अडकला होता हो! किती दिवस धोसरा लाऊन होती म्हातारी... प्राण सुटतच नव्हते."
खरं खोटं देवास ठाऊक! पुढे काही वर्षांत वडीलही गेले पण जाण्यापुर्वी गायधनी वाड्यातील राहती खोली आणि दोन बिऱ्हाडकरूंचे भाडे गोदाक्कांना मिळेल असी सोय लाऊन गेले. गोदाक्कांचे दोन चुलत भाऊ आणि त्यांचे कुटुंब त्याच गायधनी वाड्यात राहते. दोघांचे पौरोहित्य उत्तम चालते... तश्या त्यांच्या बायका पोरेही सालस.. गोदाक्कांना सणावाराला जेऊ घालतात,प्रेमाने विचारपूस करतात, दुखणं खुपण काढतात... पण!

"पण हे सारे वाड्यातल्या जागेसाठीच.."

असं गोदाक्का ठासून सांगतात..

"शेवटी चुलत ते चुलतच. .. त्यात नाळेची माया नाही."..... इति गोदाक्का.

तर अशी ही गोदाक्का .. सकाळी आन्हिक उरकून दोन तीन मंदिरे पालथी घालून घरी यायची मग जेवण आणि वामकुक्षी झाली की पुन्हा मंदिर दौरा. मायेचं प्रेमानी विचारपूस करणारं कुणी माणूस नाही... तसं नाही म्हणायला एक जिवलग मैत्रीण सुधा पाठक मागच्याच आळीत रहायची. सुधा आणि गोदा अगदी जिवाभावाच्या बालमैत्रिणी शिवाय दोघीही माघारी आलेल्या.... समदुःखी. सुधाचा नवरा अनेक वर्षांपूर्वी परागंदा झालेला डोक्यावर छप्पर, पदरात दोन मुले अन् पाठीवर कर्जाचा पसारा टाकून... सुधा चार घरी स्वयंपाक करून भावाच्या आधाराने मुले वाढवत होती. दोघी मैत्रिणी दोनेक दिवसांआड सवडीने भेटत असतं...  अर्थातच सुधाच्या. गोदाक्कांना तर सवडच सवड होती. मग अश्या भेटीत दोघी मैत्रिणींचे हितगुज चाले.

एकट्या जीवाला कितीसे लागणार हो! गोदाक्का जमेल तशी सुधाला मदत करायची. कधी लेकरांना खाऊ दे , कधी शाळेची फी भर.. तर कधी एखादे पुस्तक वही घेऊन दे. तशी गोदाक्का निर्मळ मनाची कुणाच्या अध्यात न मध्यात... आपले वाट्याला आले तसे जीवन जगायची. कधी उणा शब्द नाही, नाराजीचा सूर नाही की कधी भांडणतंटा नाही. तिचं निष्पाप निर्मळ मन चेहऱ्यावर प्रतिबिंबित व्हायची. तिची आयुष्याबद्दल फक्त एकच तक्रार होती..तुम्ही म्हणाल मुलबाळ किंवा संसार वगैरे पण नाही, नाही! तर तिची खंत वेगळीच होती. गोदाक्का नेहमी सुधाजवळ आपली खंत व्यक्त करताना म्हणायची ..

"गो सुधे!मला मेलीला कुणी मानाने जेऊ घालत नाही गो! मलाही वाटते छान साडी ल्यावी, हातभर बांगड्या नी कपाळाला ठसठशीत कुंकू लाऊन सवाष्ण म्हणून कुणीतरी आदराने बोलवावे जेवायला. वेणी द्यावी, विडा द्यावा , नमस्कार करावा..... रोज पांडुरंगाला हात जोडून एव्हढंच मागणं मागते हो!.... रोज काळ्यारामाला हेच सांगते...पण त्याला मायेचा पाझर काही फुटत नाही."

असं म्हणून गोदाक्का ठसठसा रडू लागे... सुधाचं मन भरून येई पण काय करेल बिचारी... तिची रोजची हातातोंडाची गाठ जेमतेम पडायची....

"माहेरवाशीण आली तर सारे घर हसे अन् माघारी आली तर तिला कोण पुसे?"

सुधा सुस्कारा सोडत म्हणायची. तसं नाही म्हणायला सुधानी थोडे प्रयत्न केले.गोदाच्या मोठ्या भावजयिनी जेव्हा सोळा सोमवारांचं उद्यापन केलं तेव्हा हळूच सुधानी खाजगीत तिला सुचवलं की गोदक्कांस एक सवाष्ण म्हणून बसव तर ती म्हणते कशी...

"अहो घरचं माणूस असं कसं चालेल सवाष्ण म्हणून उद्यापनाला..."

सुधानी त्यातही जोर लावत म्हटलं..

"तिला सोळाजणींत नको धरुस फारतर..पण कर ग तिचं सवाष्णी सारखं... फार खंत आहे तिची.... बिचारी सुखावेल जरा."

धाकटी भावजय फणकाऱ्याने म्हणाली,

"पोर न बाळ, नवऱ्यानी आल्या पावली परत पाठवली, ही हो कसली सवाष्ण? कुंकू लावलं मोठ्ठ नी चार काळे मणी गळ्यात बांधले की का होते कुणी सवाष्ण??"

नेमकं दारात उभ्या असणाऱ्या गोदक्कांनी हे ऐकलं... काळजावर अगदी खोल घाव झाला पण सांगताहेत कुणाला? सुधाच्या कुशीत शिरून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली ... झालं... आयुष्य चालत राहिलं.

अन् अखेर तो दिवस आला... गोदक्कांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस उजाडला... काळ्यारामाने त्यांचे गाऱ्हाणे ऐकले होते. झालं असं... सुधा कासलीवाल कुटुंबाकडे स्वयंपाकास जायची. त्या घरातील आजींचे निधन झाले. आजी 90 वर्षांच्या पण आजोबा 98 वर्षांचे ठणठणीत... थोडक्यात आजी अहेवपणी सवाष्ण गेल्या... वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर साधारणपणे 35 वर्षांतून एकदाच येणाऱ्या पर्वकाळात त्या गेल्या... त्यामुळे त्यांची सीट डायरेक्ट स्वर्गात पक्की झाली. इकडे कासलीवाल शेठजींकडे आधीच लक्ष्मीची वाहती गंगा.. त्यात कर्मकांडांना ऊत आला.कासलीवालांच्या पाचही सुना आपणही अहेवपणी सवाष्णच मरणार अशी स्वप्ने पाहत जो जो जे जे  सांगेल ते ते करू लागल्या.तेराव्याच्या दिवशी 13 सवाष्णींपैकी एक काही मिळेना.. पुणतांबेकर गुरुजींच्या नेहमीच्यापैकी एक सवाष्ण येऊ शकत नव्हती.मग काय स्वयंपाकिण बाई सुधाकडे त्यांनी आपली अडचण सांगितली... अन् सुधाने गोदाक्कांना निरोप दिला.

कुणी गेलेल्याच्या नावाची तसे तर तसे... म्हणत गोदाक्का मनापासून तयार झाली. पेटीतून आईचं ठेवणीतलं हिरवं नऊवार नेसून छान नेहमीपेक्षा थोडं मोठं कुंकू रेखत बरोब्बर बाराच्या ठोक्याला ती कासलीवाल शेठजींकडे हजर झाली. मूळची गोरीपान अन् चेहऱ्यावर समाधान असणारी ही सवाष्ण कासलीवालांना त्यांच्या गत आईची आठवण व्हावी इतकी आवडली..मग तिचे पाय धुवून तिला पंचपक्वान्नांचे जेवण देऊन उंची साडी चोळीने ओटी  भरण्यात आली. गजरा, विडा असं सगळं यथासांग झालं.आपल्या 101₹ दक्षिणेतील 21₹ पुणतांबेकर गुरुजींना देत यापुढेही असेच येण्याचे आश्वासन देत काळ्या रामाचा रस्ता धरला. तिला आज राम खरंच पावला होता.नेहमीच्या पांडे मिठाईतून पाव किलो पेढे नेत तिने मनापासून रामाचे आभार मानले आणि घरी परतली.

घरात भाऊ भावजयींनी रौद्ररूप धारण केलेले होते.भावांच्या मते गोदक्कांनी घराण्याला कलंक लावला होता.

"आम्ही काय तुला खायला कमी करतो का?"

थोरल्याने दरडावले..

"आपले गोत्र उच्च असून अश्या मर्तिक कर्मांना अन्न घेणे आपल्याला निषिद्ध आहे........"

असा बराच उपदेश त्याने केला. जोडीला वहिनींनी देखिल यथेच्छ तोंडसुख घेत असं कुणाच्या नावाने जेवायला जाणे कसे वाईट असते, आमच्या मुलाबाळांना पितृदोष लागेल वगैरे ऐकवले. गोदाक्कांनी शांतपणे आणि खंबीरपणे सांगितले...

"एकतर मी गायधनी नाही तर जोशी आहे त्यामुळे तुम्हाला पितृदोष लागणे शक्य नाही. दुसरे असे की गळ्यांत काळे मणी आणि कपाळावर कुंकू लावून का कुणी सवाष्ण होते? तुम्हीच नाही का म्हणत? मग तोही प्रश्नच मिटला.. तुम्ही मला सवाष्ण मानतच नाही मग घाबरताय कश्याला?"

गोदाक्का जीना चढू लागली. 

"खीर कढी खायचा सोस .. हावरट मेल्या!"

हे भावजयीचे शब्द मनातच गिळत गोदाक्काने आपले घर गाठले.

आता त्या पुणतांबेकर गुरुजींच्या ग्रुप मध्ये सामील झाल्या. नाशिकची गोदावरी नदी दक्षिण गंगा मृत्योपरांत कर्मासाठीचे तीर्थक्षेत्र... रोजच कुणीतरी सवाष्ण मरणार अन् त्यांना गरज लागणार सवाष्णींची... जी मृतात्म्याच्या नावाने जेवायला येणार. खरंतर हा एक प्रचलित गैरसमज आहे की मृतात्मा झोंबेल, पितृदोष लागेल... त्यामुळे पुत्रवती चांगल्या घरच्या स्त्रिया ह्या कामाला तयार नसत... पण अगदी गरजू स्त्रिया तयार होत.गोदाक्का पोटार्थी नसली तरी गरजू होतीच ना!... तिची गरज मायेची, आदराची, सन्मानाची होती आणि तिची ही गरज तिने आपल्या कुंकाभवती बांधून घेतली होती. असे कित्येक महिने, वर्षे चालले. गोदाक्का आता खुष होती... समाधानी होती.तिच्या मूळच्या रुपाला झळाळी चढली होती. ती आता आनंदाने हातभर चुडा भरून घेई. पैसे साठवून तिने नवीन नऊवारी घेतल्या. त्या पुणतांबेकर गुरुजींच्या ग्रुपमध्ये तिला नवीन मैत्रिणी मिळाल्या... डबापार्टी, भजने , भिशी होऊ लागल्या. सोबत मुख्य काम सुरूच होते... 'सवाष्ण जाणे'.... त्यातील काही भाग मोबदला म्हणून ती गुरुजींना देत असे.

...असे गोदाक्कांचे दिवस आनंदात जात होते अन् तो काळा दिवस उगवला.एका प्रेताची ओळख पटवायला म्हणून पोलीस गोदाक्कांच्या घरी आले. आदल्या रात्री झालेल्या भीषण अपघातात गंगाधरराव जोशींचा मृत्यू झाला होता. गोदाक्का आणि भाऊ जाऊन ओळख पटवून आले... इतक्या वर्षानंतरची नवऱ्याची भेट झाली ती ही अशी. मध्यंतरी कित्येक वर्षे संपर्क नसणारा त्यांचा नवरा राजकारणातील बडी आसामी बनला होता. मोठमोठे नेतेमंडळी, मीडियावाले ह्यांना ऊत आला. जो तो गोदाक्कांच्या भेटीस येऊ लागला. श्रध्दांजलीची भाषणे, पेपरला फोटो, गोदाक्कांचे सांत्वन करणारे फोटो , मदतीचे आव्हान वगैरेंचे फोटो सगळ्या पेपरला साद्यांत छापून आले.

दोन दिवसांच्या धामधुमीनंतर सुधा गोदाक्कांना निवांतपणे भेटण्यास आली. पांढऱ्या कपाळाची गोदाक्का सुधाच्या पदरात शिरून ढसाढसा रडू लागली. सुधानी समजुतीने चार शब्द बोलायचे म्हणून म्हटले..

"कश्याला रडतेस बयो? त्याने कधी तुला बायको मानले नाही. गेलीस तशीच परत आलीस. अंगावरची हळदही तशीच होती.. का ग टाहो फोडतेस त्याच्यासाठी??"

रडण्याचा भर ओसरू न देता गोदाक्का म्हणाली..

"तिकडे सातारला मरायचं ना ग त्याने... इथे येऊन जाहिरात करून माझं कुंकू पुसून गेला ग! आता मला सवाष्ण म्हणून नाही ग जाता येणार... तिकडेच परस्पर खपला असता तर इकडे कुणाला काही कळलं सुद्धा नसतं... आता मला कुणी सवाष्ण म्हणून नाही ना बोलावणार?? कुणी ओटी नाही भरणार... सांग ना सुधे!"

गोदाला उमाळा दाटून आला... आणि सुधाचे डोळे झरू लागले.

तिथून उठणाऱ्या भावजयींनी एकमेकींकडे पाहून डोक्यावर परिणाम झाल्याची खूण केली. जीना उतरणाऱ्या भावजयींचा संवाद गोदाक्का आणि सुधाला विषण्ण करून गेला. एक भावजय म्हणत होती..

"काय ग बाई ते हापापलेपण? कढीवडे आणि खिरीची नुसती चटक लागलीये जिभेला..."

दुसरी चुकचुकत म्हणाली ..

"नाहीतर काय! नवरा गेल्याचं मुळी दुःखच नाहीये या बयेला.. खिरपुरीचे कसे ह्याचीच चिंता..."

त्यांचे ते टाळी देत हसणे सुधाला आतापर्यंत पोखरत गेलं... ती भरल्या डोळ्यांनी गोदाक्कांकडे पाहत होती... गोठल्या डोळ्यांची भावविहिन गोदाक्का आता जो कधी नवरा नव्हताच अश्या नवऱ्याची विधवा होती... आणि तिचे सांत्वन करणारी सुधा ,परागंदा झालेल्या ... सोबत नसलेल्या नवऱ्याची सवाष्ण......
✒️ यशश्री रहाळकर








सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

चेकमेट


चेकमेट-१

बुद्धिबळाच्या खेळातील सगळ्यांत महत्वाची सोंगटी कुठली? खुद्द राजा... की वझीर? राजाला डाव जिंकायचा असेल तर वझीर हवाच... सगळ्यांत शक्तिमान सोंगटी... आडवा, उभा, तिरपा कितीही घर चालणारा, समोर येईल त्याला उडवत जाणारा वझीर.  पण ह्या सगळ्यांत राजाचे महत्व नाकारताही येत नाही कारण तो ठार झाला की खेळच संपला. प्रत्यक्षात आयुष्याच्या पटावर राजा आणि वझीराच फारसं पटत नसावं ... कारण प्रत्येक वझीराला राजाचा मुगुट आणि सत्ता हवीहवीशी वाटत असते... आणि राजाला सुद्धा हे पक्क ठाऊक असतं की शत्रुसैन्या इतकंच त्याला त्याच्याच वझीरापासून भय आहे.

"The Vazir.... By B. Raghunath"

साडे नऊ बाय सातच्या भव्य कॅनव्हासवर साकारलेला बुद्धिबळाचा पट... त्यावर अटीतटीच्या शह-काटशहांत पांढऱ्या राजाला तीनही बाजूंनी काळ्या सैन्याने घेरले आहे... बरंच काही करू शकणारा पण तटस्थ राहणारा पांढरा वझीर... त्याची आपल्याच राजाच्या मुगुटावर खिळलेली लाल रक्तरंजित नजर.... बी. रघुनाथांचं नवं कोरं पेंटिंग! जसं गॅलरीत झळकलं तसं चर्चेचा विषय बनलं.आंतराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रसमीक्षकांनी त्यावर मथळे रचले... "मानवी भावनांना साकारणारे बी. रघुनाथ इतिहास घडवणार की बदलवणार!" ... अशी वर्णने वृत्तपत्रातून झळकू लागली. अखेर ,इटलीच्या एका विख्यात बुद्धिबळ विश्वविजेत्याने आपल्या नवीन घराच्या सजावटीसाठी हे चित्र काही कोटी रुपयांना विकत घेतले.... अर्थात हा सगळा घटनाक्रम आणि त्याचीच पुनरावृत्ती बी. रघुनाथ ह्यांच्या अनेक चित्रांच्या बाबतीत झाली होती. बी. रघुनाथ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार होते... लोक म्हणत त्यांच्या बोटात जादू आहे... एखाद्या आरश्यासारखे ते माणसाचं मन वाचतात. मानवी मनातील भावनांचे चढउतार, घालमेल रघुनाथ आपल्या चित्रांमधून अगदी हुबेहूब मांडायचे. खरंतर.. निसर्ग, माणूस, प्राणी ह्या दृष्य आकृत्या रेखाटण्यापासून त्यांच्याही चित्रकलेची सुरुवात झाली होती... दृष्य आकृतिबंधांना एक बाह्यरेखा, द्विमिती /त्रिमिती असते .. मात्र मानवी मन त्याला कुठलीच मिती नसते ना! त्याला चित्रांत बांधणे हे खरं आव्हान.....बी. रघुनाथ त्यातच पुढे रमत गेले... आज वयाची 56 वर्षे गाठूनही ते फक्त ह्या मनाच्या रंगात रंगले होते. 

"कलेसारखे दुसरे व्यसन नाही"

सर बर्नाड म्हणायचे ... किती खरं होतं त्यांचं!  तिन्हीसांजेला शांतपणे कोऱ्या कॅनव्हास समोर बसलेल्या रघुनाथांना सर बर्नाड आठवले आणि डोळ्यांत साठलेल्या पाण्याने काळाची कित्येक वर्षे जणू वाहून गेली. वयाची चंदेरी बट मागे सारत ते 48 वर्षे मागे त्यांच्या बालपणात पोहोचले. बालपण म्हणजे सुखाचा , मजेचा काळ असं कोणत्या गाढवाने लिहिलंय कुणास ठाऊक? त्यांच्यासाठी बालपण म्हणजे भूक होती, उपासमार होती. दार्जिलिंगच्या कडाक्याची थंडीत रस्त्यावर कुणीतरी मरायला म्हणून फेकलेल्या आणि त्यातूनही कुणीतरी जिवंत ठेवलेल्या दहा पाच भिकारी पोरांमधील एक रघ्या... पोटासाठी भीक मागता मागता कधीतरी रस्त्यावर पडलेल्या कोळश्याने काहीतरी खरडलं... लोकांनी चार पैसे जास्तच दिले. रघ्या खुश झाला... आता तो चित्र रेखाटून भीक मागत असे... तो म्हणायचा.. 

"मी भिकारी नाही सायेब! कलाकार हाये."

एकदा त्याने असेच रस्त्यावर काढलेले चित्र पाहत एक गोरा साहेब बराच वेळ उभा होता. आता गोरा साहेब खुश होऊन मोठं इनाम देणार किंवा पोटभर जेवायला देणार अशी स्वप्ने पाहत रघ्या वाट बघत बसला. हा गोरा साहेब म्हणजे सर बर्नाड.....दार्जिलिंगच्या डाक बंगल्यात सुट्टी घालवायला आला होता. त्याने रघ्याला डाक बंगल्यावर बोलावून घेतलं... आणि एक मोठा बॉक्स त्याच्या ताब्यात दिला.... रघ्याने आशेने उघडून पाहिला... धत् तेरे की! त्यात रंग होते... आणि छोटे झाडू गत काहीतरी खराटे ... मोठमोठाले पांढरे धोप कागद गुंडाळून ठेवले होते.

"हे विकून एक टाईमचं जेवण पन सुटणार न्हाई."

गोऱ्या साहेबाला रघ्याची भाषा कळली आणि तो खळखळून हसत सुटला... साहेब दयाळू होता... त्याने रघ्याच्या चित्रात काय पाहिलं होतं कोण जाणे? त्याने नोकराला खूण केली तसे त्याने रघ्याला पोटभर जेवायला दिले. मग गोऱ्या साहेबाने रघ्याला आपली चित्रे दाखवली... 
ती रंगांची जादू बघून रघ्या भारावून गेला... आपल्या आजूबाजूच्या निसर्गात एव्हढे रंग आहेत आपल्याला आजवर दिसलेच नाहीत... मुक्या मनाने रघ्या परतला.. तहान, भूक विसरून डोंगर दऱ्या पालथ्या घालत सुटला... दोन दिवसांनी मलूल झालेला रघ्या डाक बंगल्यावर हजर झाला.... त्याला मिळालेले सगळे पेपर वापरून त्याने चित्र रेखाटले होते. चित्रकलेचे कोणतेही ज्ञान, कोणतेही प्रशिक्षण नसताना त्याने रेखाटलेली चित्रे बघून गोरा साहेब अविश्वासाने पाहत राहिला... काही कला जन्मजात देणग्या असतीलही... सर बर्नाड ह्यांनी त्याला आपला असिस्टंट म्हणून ठेऊन घेतले.... आता रघ्याचे जग 360° बदलणार होते. स्टँडवर हवा तो कॅनव्हास लावणे,गरजेनुसार ब्रश (कुंचले) देणे, रंग खलून शेड्स करून देणे, रंगांचा पसारा नीट आवरून ठेवणे ही कामे तो मन लावून करू लागला. बदल्यात त्याला पोटभर जेवण , चांगले कपडे आणि रहायला चांगली जागाही मिळाली. तासन तास तो सर बर्नाडना चित्रे काढतांना तन्मयतेने बघत बसायचा. 

एका मध्यरात्री सर बर्नाड ह्यांना अचानक जाग आली... सहज सिगारचा एक झुरका मारायला म्हणून ते उठले असता त्यांनी रघ्याला चित्र काढताना पाहिलं... मध्यरात्री मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात रघ्या तन्मयतेने चित्र रेखाटत होता... चित्र होते ,'चित्र काढणाऱ्या सर बर्नाड ह्यांचे'... त्यांची ब्रश धरण्याची स्टाईल, उभे राहण्याची ढब, चेऱ्यावरची रेषन् रेष इतकी हुबेहूब रेखाटली होती की सर बर्नाड भारावून गेले. त्यांनी अद्भुत कला असणाऱ्या रघ्याच्या हाताचे आदराने चुंबन घेतले. आपला खरा वारसा पुढे चालवणारा कुणीतरी पाठवल्याबद्दल त्यांनी प्रभुचे आभार मानले. तिथून पुढे रघ्याचा रघुनाथ झाला... त्याचे रीतसर शैक्षणिक पालकत्व सर बर्नाड ह्यांनी स्वीकारलं आणि मिशनरीच्या शाळेतून त्याचं शिक्षणही सुरूही झालं. सर बर्नाड ह्यांच्यामुळेच आज आपण आहोत ही आठवण ठेवत रघुनाथांनी आपल्या नावामागे बी. अर्थात बर्नाड हा प्रिफिक्स जोडला आणि कायम सन्मानाने मिरवला सुद्धा..... इथूनच "बी. रघुनाथ"चा चित्रप्रवास सुरू झाला...

क्रमशः .......

✒️ यशश्री रहाळकर
*****************************************

चेकमेट-२

मिशनरीच्या शाळेत शैक्षणिक प्रवास सुरू असतांना रघ्याची प्रत्यक्ष भटकंती सर बर्नाड ह्यांच्या सोबतीने सुरूच होती. ते जातील त्या गावाला जायचे तिथल्याच शाळेत शिकायचे आणि चित्रे ,रंग ह्यात रमायचे, जमतील तशी सर बर्नाड ह्यांची कामे मन लावून करायची , असे रघ्याचे आयुष्य पुढे पुढे सरकत होते. सर बर्नाड त्याला खूप चांगली वागणूक देत होते.... उत्तम कपडे, व्यवस्थित पोटभर खाणेपिणे, शाळेतील नीटनेटकेपणाची शिकवण , चारचौघात वागण्याबोलण्याचे मॅनर्स ह्यामुळे रघ्या आता एक चांगल्या घरचा मुलगा वाटू लागला.त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज झळकू लागले. 

अभ्यासात सुमार असणारा रघ्या वर्षीचे वर्षी जेमतेम पास होई पण तरीही तो शाळेतील एक प्रसिद्ध विद्यार्थी होता. गोऱ्या साहेबांचा मानसपुत्र म्हणून सगळे त्याला आदर देत... त्याच्या हातात खरेच जादू होती... एकदा शाळा सजवतांना त्याने शाळेतील बाह्य दगडी भिंतीवर चित्रे काढण्याची संकल्पना मांडली.त्याला परवानगी मिळाली आणि सगळ्याच्या सगळ्या भिंती भारतातील ऐतिहासिक वारश्यांच्या चित्रांनी सजून गेल्या... शाळेला भेट देणारा प्रत्येक जण ही चित्रे पाहून स्तिमित होई... सर बर्नाडांना शाळेचे मुख्याध्यापक फादर पीटर ह्यांनी खास आमंत्रित केले... आणि रघ्याची चित्रे दाखवित ते म्हणाले...

"सर बर्नाड, आपण हिरा शोधून काढलाय. हा तुमचा बॉय तुमचं नाव जगभर रोशन करणार."

सर बर्नाड हा तसा एककल्ली माणूस... काही प्रेमप्रकरणे आणि दोन विवाहांच्या अपयशानंतर त्यांनी एकटेच आपले उर्वरीत आयुष्य व्यतिथ करायचे ठरवले होते. त्यांना रघ्या भेटला तेव्हा वयाची चाळीशी त्यांनी पार केलेली होती.  गोऱ्यांना शोभेलसा पण सततच्या भटकंतीमुळे रापलेला त्यांचा गोरा वर्ण, निळेशार भेदक डोळे आणि केसांनी डोक्याचा पूर्णपणे निरोप घेतल्याने पडलेले टक्कल ... अशी त्यांची मूर्ती होती... मूर्ती म्हणावी इतकी बेताची उंची पण वागण्या-बोलण्यात खानदानी रुबाब होता. सरकारी नोकरीत ते बऱ्यापैकी पैसे राखून होते.... आणि जगायचं कारण त्यांना त्यांच्या चित्रकलेने उपलब्ध करून दिलं होतं. त्यांचा चित्रकार म्हणून उत्तम नावलौकिक होता,शिवाय अनेक कलादालने, चित्रकला विद्यालये येथे त्यांची ओळख होती. चित्रकलेच्या क्षेत्रातील नावाजलेल्या मातब्बर मंडळींमध्ये त्यांची ऊठबस होती. ह्या सगळ्याचा अप्रत्यक्षपणे रघ्याला फायदाच झाला होता... त्याचे चित्रकार म्हणून पडणारे एकेक पाऊल जणू नियतीने फुलांच्या पायघड्या घालून सजवले होते.

सर बर्नाड प्रामुख्याने निसर्ग चित्रे रेखाटत... त्यामुळे ते सतत फिरतीवर असत. नवीन प्रदेश पाहणे त्यांना आवडायचे आणि त्यांच्या जोडीला रघ्या... म्हणजे गाड्या सोबत नळ्याची वरात होई. ह्या भटकंती दरम्यान विविध प्रांत, तेथील कला,संस्कृती, लोकजीवन ह्यांचे रघ्याने उत्तम निरीक्षण केले होते. रघ्या मुळातच शांत स्वभावाचा आणि जुजबी बोलणारा होता. त्याच्या काळ्या-सावळ्या रंगाच्या अगदी विरुद्ध शुभ्र दात आणि टपोरे बोलके डोळे ह्यामुळे तो पाहता क्षणी मोहक वाटायचा. शिवाय स्वभावातील मार्दव आणि बोलण्यातील लाघवीपणा.. ह्यामुळे भेटणाऱ्या प्रत्येकाला त्याच्याविषयी आत्मीयता वाटायची. आपली पायरी तो ओळखून होता. सर बर्नाड ह्यांच्याशी तो हातभर अंतर राखून वागायचा. त्यांच्या मदतीसाठी सतत तत्पर असायचा... कधीही कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केलाच नाही त्याने... त्याला रंग हवे होते आणि कॅनव्हास, सर बर्नाडांकडे ते कधीच मागायची वेळ येत नव्हती. सर बर्नाड परदेशातून उत्तमोत्तम रंग , ब्रश आणि चित्रकलेच्या इतर वस्तू मागवत... त्या पूर्वी फक्त त्यांच्या मालकीच्या होत्या आता त्या सगळ्यांवर रघ्याचा सुद्धा हक्क त्यांनी मान्य केला होता. ते चित्रे काढीत तेव्हा तासनतास रघ्या शांतपणे निरीक्षण करत असायचा. त्याच्यासाठी सर बर्नाड म्हणजे रंगांची तबकडी होते... त्याच्या काळ्या पांढऱ्या आयुष्यात मायेचे रंग भरणारे देवदूत.

सर बर्नाड आणि रघ्याचं नातं जगावेगळं होतं. काही नाती रक्ताची असतात, काही मैत्रीची, काही स्वार्थाची तर काही गरजेची... मात्र ह्या साऱ्यांच्या पलिकडे रघ्या आणि सर बर्नाड ह्यांचं चित्रांचं नात होतं. आयुष्याच्या कॅनव्हासवर रंगांच्या फटकाऱ्यांनी ते अधिकाधिक सुरेख  गुंफलं जात होतं. चित्रांच्या दुनियेतील एखादा नवा प्रयोग असू देत किंवा एखादं मनाला भुरळ घालणारं पेंटिंग... सर बर्नाड रघ्याशी तासनतास बोलत असत. रघ्या भक्तिभावाने त्यांचे शब्द जीवाचा कान करून मनाच्या कप्प्यात साठवून घेत असे. इतकी वर्षे भारतात राहून सर बर्नाड येथल्या विविध भाषा शिकले होते... आणि त्यांची भाषांची अगम्य सरमिसळ सवयीने रघ्याला बरोब्बर कळत होती. ते रघ्याला , "माय बॉय! "अशीच हाक घालीत.

"माय बॉय ! तुका कलर्सचे स्वभाव कल्ले की झाला...."

सर बर्नाड असे मजेशीर बोलत असत. शंभर टक्के विषय असायचा रंग आणि पेंटिंग्ज... सर बर्नाड चित्रकला जगत होते... आणि चित्रांवर त्यांचे अफाट अशक्य प्रेम होते. 

"रंगांचे स्वतःचे स्वभाव असतात... काही रंग हट्टी असतात... ते एकदा चित्रात आले की स्वतःची जागा व्यापून घेतात.. काही केल्या त्यांचं महत्व कमी करता येत नाही, हलवता येत नाही की बदलता येत नाही... त्यांचा वापर जपून करायचा तर काही अगदी सरळ साधे असतात... आपण बस म्हटलं की बसतात मुकाट्याने..."

गडद बैंगणी हा हट्टी रंग आणि लेमन हा साधा सरळ बापुडा रंग हाताळताना आयुष्यभर रघ्याला सर बर्नाड आठवायचे.

सभोवताली पसरलेल्या निसर्गाला कॅनव्हासवर बंदिस्त कसं करायचं? ह्याच लाईव्ह प्रशिक्षण त्याला सर बर्नाडांकडून प्राप्त झाले होते. सर बर्नाड हे रघ्याचे खरीखुरे चालते बोलते कलाविद्यालय होते... तरीही रघ्याने चित्रकलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायलाच हवे ,असा सर बर्नाडांचा आग्रह असल्याने शालेय शिक्षणानंतर रीतसर मुंबईला जे. जे. स्कूल्स ऑफ आर्ट्स मध्ये डिग्री घेण्यासाठी रघ्याला पाठविण्यात आले. इथे रघ्याचा "रघुनाथ" झाला... त्याच्या नैसर्गिक कलेच्या देणगीला खऱ्या अर्थाने चित्रमयता लाभली ती इथेच.. सुट्टी मिळताच रघुनाथला ...सर बर्नाड ह्यांच्या भेटीची ओढ लागत असे. त्यांची भेट झाली की आपली सगळी चित्रे त्यांना दाखवायची, ज्या नवीन गोष्टी तो शिकतोय त्या सगळ्या त्यांना सांगायची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नसे.  त्यांची भेट झाली की दोन पिढीच्या चित्रकारांच्या गप्पा रंगत.

यथावकाश रघुनाथची मास्टर्स पूर्ण झाली... त्याला चित्रकार म्हणून मोठ्या प्लॅटफॉर्मवर खूप जबरदस्त लाँच करायचं, असं सर बर्नाड ह्यांच्या मनात गेली काही वर्षे रेंगाळत होतं. आपल्या "बॉय"ने ह्या त्या गॅलरीच्या ओनरचे पाय चाटत, हजार बाराशे रुपड्यांना चित्र विकावे हे काही त्यांच्या पचनी पडणार नव्हते... आपला बॉय चित्रजगतावर अधिराज्य गाजवणार ह्याची त्यांना खात्रीच होती.त्यामुळे त्याचं आगमन दिमाखदार पद्धतीने व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं... आणि नियतीलाही ते मान्य झालं...  'अखिल भारतीय कला आविष्करण महोत्सव' ... ह्या विख्यात प्रदर्शनातील चित्रांच्या गॅलरीत रघुनाथचे चित्र प्रदर्शित व्हावे ह्यासाठी सर बर्नाड ह्यांनी आपल्या सगळ्या ओळखी, सगळे वशिले वापरले... आणि रघुनाथला संधी मिळालीच.

"हंगर गेम बाय बी. रघुनाथ"

रघुनाथचे खऱ्या अर्थाने पहिले चित्र प्रदर्शनात झळकले. 'रस्त्याच्या कडेने जाणारा श्रीमंताचा जाडा बदगुल कुत्रा, त्याच्या तोंडातून पडलेल्या पावाच्या तुकड्यासाठी भांडणाऱ्या... पोट खपाटी गेलेल्या उपाशी मरतुकड्या पोरांकडे विस्मयाने पाहतो आहे...' पाच बाय साडेनऊ अश्या मापाच्या लँडस्केप कॅनव्हासवर साकारलेलं चित्र सगळ्यांचं लक्ष वेधूनन घेत होतं. खरेतर ,रघुनाथने सर्वमान्य अश्या सगळ्याच नियमांना फाट्यावर बसवून हे चित्र रेखाटलं होतं. चौकोनी कॅनव्हासची निवड न करता लँडस्केप , पांढऱ्या बॅकग्राऊंडचा वापर टाळून गडद करड्या रंगाच्या कॅनव्हासचा वापर... अश्या अनेक बाबी समीक्षकांना बुचकळ्यात टाकणाऱ्या होत्या. तरीही चित्राचे सौंदर्य आणि त्यामागील आर्थिक विषमतेचे भीषण वास्तव परीक्षकांना नाकारता आले नाही...

ह्या चित्राला सन्मानाचे सुवर्णकमळ जाहीर झाले आणि सर बर्नाड आनंदाने नाचू लागले. हे असंच होणार ह्याची त्यांना खात्री होतीच ... त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. विजेत्यांच्या मुलाखतींमध्ये रघुनाथने आत्मविश्वासाने दिलेली उत्तरे केवळ कमाल होती. त्याच्या चित्रातले बारीक सारीक बारकावे किती सकारण आहेत हे त्याने समर्पक शब्दांत मांडले... जसे कुत्र्याच्या गळ्यातील सोन्याची चेन, रंगांची व विषयाची निवड वगैरे बाबींवर त्याचे मत समीक्षकांनी उचलून धरले. प्रत्यक्ष पुरस्काराच्या वेळी मात्र त्याने हा पुरस्कार सर बर्नाड ह्यांना अर्पण केला... आणि त्यांची छाती अभिमानाने फुलून गेली. आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी रघुनाथला "माय बॉय" नाही तर "माय सन!" अशी हाक मारत कडकडून मिठी मारली. सर बर्नाडांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू ह्या आनंदाच्या क्षणी थांबायला तयार नव्हते.

रघुनाथचे पहिलेच चित्र विक्रमी किंमतीत लाखभर रुपयांना विकले गेले... आणि "चित्रजगतातील नवे वादळ!" असे मथळे त्याच्याबद्दल छापून आले.

क्रमशः......

✒️ यशश्री रहाळकर
*****************************************

चेकमेट भाग-३

आता ,सर बर्नाड ह्यांच्या सोबत रघुनाथलाही सन्माननीय अतिथी म्हणून चित्र जगतातील मोठमोठ्या पार्टीत आमंत्रित केले जाई. चित्रांतील दर्दी लोक, कलादालनांचे  मालक मुख्यत्वे अश्या व्यावसायिक पार्टीचे आयोजक असत. विविध चित्रप्रदर्शने, कलादालने ते जोडीने पिंजून काढत... नवे चित्रांचे विषय , नव्या रंगछटा ह्यांवर बाप लेकाचे वाद होत.... तोपर्यंत केवळ कागदोपत्री पालकत्व स्वीकारलेले सर बर्नाड आता खऱ्या अर्थाने मनापासून रघुनाथला आपला वारस मानू लागले होते. सर बर्नाडांच्या सोबतीने केलेली भटकंती वाया जाणार नव्हती... रघुनाथची पहिली चित्र साखळी त्याचेच प्रतिबिंब घेऊन चित्रित झाली...

"माऊंटन स्पीक्स बाय बी. रघुनाथ"

जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शित झालेली 41 चित्रे हातोहात गेली , चिक्कार पैसा आणि अमाप प्रसिद्धी देऊनच. रघुनाथने कातळाचं काळीज कोरून काढलं होतं... अजिंठा, वेरूळ, खजुराहो आणि अश्याच कित्येक लेण्या डोंगरांच्या कुशीत विसावल्या होत्या... इतिहासाची सोनेरी पाने फडकवत... त्याच साऱ्या ह्या चित्रप्रदर्शनीत चितारण्यात आल्या होत्या.मस्टर्ड रंगांच्या उभ्या कॅनव्हासवर..गडद जांभळा, काळा, काळपट हिरवा, कथ्था... आणि जोडीला चमकदार सोनेरी ... रंगांची निवड तंतोतंत प्राचीन लेण्यांतील शिल्पांसारखी...जणू साक्षात त्या मूर्तीच जिवंत झाल्या असाव्यात. त्यांपैकी "निद्रिस्त देवता" हे अंतिम चित्र सर्वाधिक किंमतीला विकले गेले. त्याला शेवटचे डोळे भरून पाहत सर बर्नाड म्हणाले..

"माय सन, एक क्वेश्चन आलाय आहे मनामधे.... ऑल अदर्स एक्सेप्ट धिस... हॅज गोल्डन कलर?? व्हाय यू अव्हाईड डिव्हाईन गोल्डन ग्लिटरी इफेक्ट हिअर??"

"मी वाटच बघत होतो तुमच्या ह्या प्रश्नाची?? किती उशीर केलात..."
म्हणत रघुनाथ हसायला लागला.

"ओके ! ओके! नाऊ ऍन्सर please...सर!"
म्हणत सर बर्नाड नाटकी ढंगात आदराने झुकले..

त्यांना ओढून चित्राकडे नेत रघुनाथ म्हणाला....

" हे बघा....हे चित्रच वेगळं आहे. फक्त ह्याच चित्रासाठी स्काय ब्लू कॅनव्हास वापरलाय तोही लँडस्केप... ब्लू कलर सिग्निफाईज ड्रीम्स, पीस ऑफ माईंड , सोलफुलनेस..... झोपेत गोड हसणारा किती निर्व्याज निर्मळ आहे तो बघा... त्याला ह्या चमकदार जादूची गरजच नाही ना!"

त्याचे उत्तर ऐकून नकळत सर बर्नाडांचे डोळे भरून आले... पुन्हा एकदा त्याचे हात हातात घेऊन आदराने त्यांनी आपले ओठ त्यावर टेकवले. पुढे कित्येक चित्रे पैसा आणि प्रसिद्धी देऊन गेले पण खऱ्या अर्थाने रघुनाथ घराघरात पोहोचले ते त्यांच्या एका चित्रमालिकेमुळे.

"ज्वेल्स ऑफ इंडिया बाय बी रघुनाथ"

भारतातले पारंपारीक दागिने आणि रत्नांची चित्रे चक्क एका दागिने घडवणाऱ्या प्रतिथयश कंपनीने कॉपी राईट सह विकत घेतली आणि आपल्या दागिन्यांच्या डब्यावर प्रिंटही केली... आता रघुनाथांची चित्रे घराघरात पोहोचली. रघ्या पासून सुरू झालेला त्याचा प्रवास.... ए रघुनाथ आणि आता अहो रघुनाथ... सर रघुनाथ पर्यंत झाला. 

उद्योगपती मित्तलांच्या पार्टीत सर बर्नाड आणि सर रघुनाथ विशेष आमंत्रित होते. प्रचंड धनाढ्य ,गडगंज पैश्याचा माज असणाऱ्या ह्या काहीश्या उद्दाम लोकांनी भरलेल्या पार्टीत एक जण कुत्सितपणे म्हणाला..

"आता काय नाव झालेय तुमचे... मग ब्रशचे उभे आडवे स्ट्रोक्स मारले तरी लोक लाखो रुपये देतील आणि अर्थ लावत बसतील..."

सर बर्नाड ह्या अपमानाने जरासे चिडले पण रघुनाथ कमालीच्या शांतपणे उद्गारले...

"मी माणसाचे मन चितारतो साहेब! त्याला कुठलीच मिती कुठलाच आकार नसतो... ज्याचं मन जसं तसंच आणि तेव्हढंच चित्र कळतं त्याला."

सगळीकडे हश्या पिकला... जिव्हारी अपमान झालेले ते गृहस्थ होते उद्योगपती मुखर्जी... कोट्याधीश माणूस पण कला, क्रीडा ह्यांच्याबद्दल एकप्रकारचा तुच्छ भाव बाळगून होते. प्रतिष्ठित लोकांच्या पार्टीत त्यांना उलट उत्तर देणारा , अपमान करणारा हा कोण ? रागाने लाल होत भर पार्टीत ते गरजले...

"ए तू कोण समजतोस स्वतःला? कोण कुठला रस्त्यावर फेकलेला तू... ह्या पार्टीत यायची तरी लायकी आहे का तुझी??"

आपला संयम आणि शांतता तसूभरही ढळू न देता त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून स्थिरपणे रघुनाथ उभा होता.

"काय म्हणत होतास तू?.. मन चितारतोस तू... बरं! आता ह्या पार्टीतील प्रत्येकाचे मन चितारून दाखव मला आणि हो माणूस नाही चितारायचा... मनाला मिती नसते ना.... आठ दिवसांचा वेळ घे... आणि नाही जमले तर ही फालतू चित्रे काढणे बंद कर आणि कारकुनी कर माझ्या ऑफिसमध्ये."

मुखर्जींनी चॅलेंज केलं होतं... पार्टीचा नूरच बदलून गेला... होस्ट मित्तलांना फारच वाईट वाटू लागले... कुठला विषय कुठे गेला... पण सर रघुनाथ तितक्याच गंभीरपणे आपला संताप आवरत म्हणाले...

"परवा ... बरोब्बर ह्याच वेळी ह्याच ठिकाणी मी चित्र देईन तुमच्या सगळ्या अटींत बसणारे... नाहीतर ह्या माझ्या बापाचं नाव बर्नाड लावणार नाही ..."

संतापात पावले टाकीत रघुनाथ निघून गेले... स्वतःला त्यांनी एका खोलीत कोंडून घेतलं... पाण्याचा थेंब नाही की अन्नाचा कण नाही ... बरोबर ठरल्या वेळी सगळे निमंत्रित उत्सुकतेपोटी मित्तलांकडे जमले. रघुनाथला चॅलेंज करणारे  मुखर्जी येऊन बसले...आणि त्याच क्षणी चार लोकांनी उचलून एक भव्य कॅनव्हास उभा केला त्यावरचा पडदा दूर करण्यात आला... चित्र पाहून सगळे आश्चर्याने "ओहो !वॉव!!" असे चित्कारले... त्यापाठी विजयी मुद्रेने सर रघुनाथ आणि सर बर्नाड प्रवेश करते झाले... मुखर्जींची मान लाजेने खाली गेली...

"द टी-पार्टी बाय बी रघुनाथ"

पार्टीचे चित्र तर होते पण माणसे नसून त्यात होते फक्त चहाचे कप ... काही कप सोन्याचे,  काही सुंदर नाजूक, काही डोक्यावर टोपी घातलेले, काहिंना ऐटबाज मिशी तर काही नाजूक स्त्रियांसारखे.... सगळे कपच कप... रघुनाथांचे निरीक्षण एव्हढे गहन होते की प्रत्येक व्यक्ती स्वतःला एका कपाच्या जागी पाहू शकत होती. त्या कपांना सुरेख चेहरे सुद्धा चितारले होते... आणि त्यातून कमाल सुंदर भावभावना झळकत होत्या.एक गुलाबी कप आपल्याच सौंदर्याच्या तोऱ्यात होता तर एक टाय घातलेला कप आपल्या सोबतचा कप सोडून दुसऱ्याच कपकडे चोरटा दृष्टिक्षेप टाकत होता. प्रत्येक कप आपल्या तोऱ्यात मानाच्या जागी बसला होता... एक कप ज्याला सोन्याचा वर्ख होता तो रागाने लाल झाला होता... तो कप म्हणजे उद्योगपती मुखर्जी कुणीही सांगेल! त्याच्या समोर जमिनीवर खाली एक चिरा पडलेला मळकट कप होता ... तो कप होता रघुनाथ आणि एका निळ्याशार प्रेमळ कपाने आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवलेला होता... तो निळा कप होता सर बर्नाड... प्रत्येकाचं मन प्रतिबिंबित करणारं हे एक अद्वितीय भलेमोठे चित्र होते...

आपली खाली झुकवलेली नजर कायम राखत उद्योगपती मुखर्जी म्हणाले,

"सर रघुनाथ आज मी आपल्या कलेपुढे पराभूत झालो... मला माफ करा! शक्य असेल तर हे चित्र मला विकत द्या... आपण सांगाल ती किंमत मला मान्य आहे."

सर रघुनाथ आपले काळेभोर डोळे रोखत शांतपणे उद्गारले...

"हे माझ्याकडून आपल्याला भेट म्हणून घ्या... "

सर बर्नाडचा हात धरत रघुनाथ जायला निघाले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या दिवशी रात्री ड्रिंक्स घेत सर बर्नाड म्हणाले,

"माय सन ! तुझ्यातला खरा चित्रकार आज सापडला मला.... माणसाचं मन ... तू सहज वाचू शकतोस आणि तितकेच सहज चितारुही शकतोस..."

देशातच नव्हे तर विदेशातही अनेक प्रदर्शनांतून रघुनाथांनी आपल्या चित्रांची यशस्वी मोहर उमटवली. अतिशय तृप्त मनाने एका रात्री सर बर्नाडांनी इहलोकाचा प्रवास संपवला. त्यांचे सगळे क्रियाकर्म वारस म्हणून रघुनाथांच्या हातून झाले.... आणि  जमीन, घरे, पैसा वगैरे देखील मिळाले . रघुनाथांनी सगळ्या ठेवी गरजू मुलांच्या शिक्षणासाठी डोनेट केल्या... काही ट्रस्ट केले. राहती घरे आणि जागा मात्र अतिशय सुंदर होती, ती त्यांनी काही बदल करून तशीच ठेवली .. तिथे त्यांना जागोजागी सर बर्नाडांच्या आठवणी येत असत. सर बर्नाड गेल्यावर रघुनाथांचे आयुष्य एकाकी भकास झाले... त्यांच्या आयुष्यात कुणी स्त्री आलीच नाही असे म्हणता येणार नाही. पण कुणाशी नाते जोडावे अशीही कुणी वाटली नाही... रजनी मिश्रा म्हणून एक फॅन, पत्रकार त्यांच्या सोबत बराच काळ होती पण पुढे काय झाले कुणास ठाऊक? दोघे वेगळे झाले. अखेर काय तर रघुनाथ एकटे राहिले.

क्रमशः.......
✒️ यशश्री रहाळकर
*****************************************

चेकमेट भाग-४

सर बर्नाडांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली विशाल पोकळी भरून येणे शक्य नव्हते.... तसे रघुनाथ आयुष्य एकाकीपणे जगत होते पण ते एकटे नव्हते... त्यांची कला, त्यांची चित्रे सोबतीला होतीच. चित्रकला त्यांचे पहिले प्रेम होते ते त्यांनी हृदयापासून जपले. बेताची उंची, काळ्याकडे झुकलेला सावळा रंग आणि गहिरे काळेभोर डोळे... तसे रूपाने चारचौघांसारखे असणारे रघुनाथ ... अतिशय हळवे, भावनिक,उमदे होते.त्यांची प्रसिद्धी, अमाप पैसा अनेक रुपवतींना भुरळ घालत होता... असे सगळे असले तरी त्यांची राहणी मात्र अगदी साधी होती... त्यांना चित्रांशिवाय कसलंच व्यसन नव्हतं. तश्या अनेक स्त्रिया त्यांच्या आयुष्यात आल्या आणि गेल्या... विशेषतः तरुणपणी कित्येक मुली त्यांच्यासाठी वेड्या होत्या...... काही स्त्रिया एका रात्रीपुरत्या, तर काही काही दिवस ,काही महिने अश्या राहून वेगळ्या होत.... रघुनाथ चित्रांवर इतके प्रेम करत की कधीकधी एखादा विषय सुचलं की भर प्रणयात सखीला सोडून कॅनव्हासपुढे उभे राहत... मग ती रुपगर्वीता हा आपला अपमान समजून नाराज होत दूर होई... त्यांची कलासक्ती समजून घेणे आणि सहन करणे सोपे नव्हते. 

त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात रजनी मिश्रा ही एक पत्रकार त्यांची मैत्रीण झाली... ती बरीच वर्षे त्यांच्यासोबत होती....रजनी ...एक निर्भीड पत्रकार, उंच धिप्पाड, गोरीपान आणि निळ्या डोळ्यांची परी... ती रघुनाथांच्या चित्रांनी वेडावली. तिने लग्न न करताच रघुनाथांसोबत संसार थाटला... ह्या वल्ली ,लहरी चित्रकाराच्या मुडी स्वभावाची तिला पुरेपूर कल्पना होती... ती स्वतंत्र विचारांची आधुनिक मुलगी होती तिलाही तिच्या कामासाठी स्पेस हवीच होती... रघुनाथांची चित्रे आणि पुढे त्यांच्याही ती प्रेमात आकंठ बुडत गेली... रघुनाथ तन्मयतेने चित्र काढत असतांना ती तासन तास त्यांना एकटक पाहत राही... सर बर्नाडांप्रमाणेच ती देखील रघुनाथांचे हात हातात घेऊन त्याचं चुंबन घेत म्हणायची..

"तुझ्या हातात जादू आहे माय लव्ह!"

रघुनाथांनाही ती मनापासून आवडायची... तिच्या प्रेमात दिवस रात्र बुडून जाणं, तिच्याबरोबर मनसोक्त गप्पा  आणि तिचं एकूणात बिनधास्त असणं सुखावणारं होतच पण त्याहूनही तिचा स्त्री म्हणून ओढ लावणारा स्पर्श अधिक मोहक होता... पण एके रात्री सारंच संपलं...रघुनाथांना तिचंच चित्र काढायचा मोह झाला... तिचे निळेशार अनुरक्त डोळे, प्रणयातूर नजर आणि गालावरची आसक्त लालिमा त्यांनी इतकं विलक्षण चितारली की क्षणभर रजनी पहातच राहिली... काही वेळ ती स्वतःतच मिटून गेली... दुसऱ्या दिवशी ती बॅग आणि ते चित्र सोबत घेऊन रघुनाथांचा निरोप घेत म्हणाली..

"तू विलक्षण चित्रकार आहेस पण तितकाच दुबळा प्रियकर.. तुझ्यातला चित्रकार जिंकला रघु पण माझ्या प्रेमाला पुरतं पराभूत करून..."

"रजनी, माझं नेमकं काय चुकलंय ? प्लिज , थांब ना ! मी तुझं चित्र काढायला नको होतं ,सॉरी! "
रघुनाथ अजिजीने म्हणाले.

क्षणभर घुटमळत रजनी म्हणाली...
"रघु, तुला कसं सांगू रे मी? तू माझ्या देहाचं चित्र काढलं असतं, अगदी माझ्या नग्न देहाचं... तरीसुद्धा माझी हरकत नव्हती... पण तू... तू तर माझं मन चितारलंस रे! आपल्यात माझी म्हणून जी स्पेस होती ना तिथे पोहोचलास तू... संपले रे मी... माझं वेगळं म्हणून अस्तित्वच उरलं नाहीये आता. आपण दोघे कसे सोबत राहणार सांग... इतकी तुला मी कळल्यावर..."

डोळे तसेच खळखळते ठेऊन रजनीने निरोप घेतला. कित्येक वर्षे झाली या घटनेला, पुन्हा कधीही गाठभेट झाली नाही. त्यानंतर रघुनाथ स्त्रियांशी फटकूनच राहू लागले... काहीसे तुसडे झाले... रजनी त्यांच्या आयुष्यातले खरेखुरे प्रेम आणि अखेरची स्त्री होती. 

56 वर्षे वयाचे रघुनाथ फारसे बदलले नव्हते, वयाच्या छटा दाखवणाऱ्या काही रुपेरी बटा तेव्हढ्या होत्या. बाकी तसेच साधे कपडे, साधं जेवण... त्यांना छानछोकीची, उच्चभ्रू जगण्याची आवड नव्हती. हाती आलेला 20% पैसा ते अनेक लोकांना मदत करून खर्च करत तरी बाकी बराच फक्त पडून असे... त्यावर पैश्याला पैसे ह्या न्यायाने रक्कम साठत जात होती... रघुनाथांच्या अन्न, वस्त्र , निवारा ह्या जीवनावश्यक गरजांव्यतिरिक्त मुख्यत्वे दोनच गरजा होत्या ... रंग आणि शांतता.ह्याच शांततेसाठी त्यांच्या अवाढव्य अश्या सहाही बंगल्यांमध्ये एक मध्यवर्ती भला मोठा खास हॉल बनवलेला होता ... पूर्णतः नॉईज फ्री बनावटीचा असून ज्याला केवळ एकच दार असायचे जे रघुनाथांच्या बेडरूममध्ये उघडायचे... बाकी नुसत्या भिंती, एकही खिडकी नाही...ही खोली म्हणजे एक गुहाच होती. इथे रघुनाथांची चित्रसाधना विनाव्यत्यय पार पडायची. तिथे वेगवेगळे कॅनव्हास ,रंग, ब्रश ह्यांचा पसारा पडलेला असायचा. त्या खोलीत बाहेरच्या कुणालाही प्रवेश नव्हता.

ह्या खोलीला महादू "चित्रमहाल" म्हणायचा... महादू आता पार थकलेला म्हातारा नोकर होता. हा रघुनाथांचा सगळ्यांत विश्वासार्ह माणूस. सर बर्नाडांनीच त्याला कामाला ठेवला होते. रघूला त्यांनी कायम मायेने सांभाळले होते... सवयीने अजूनही 56 वर्षांच्या वयस्कर रघुनाथला तो "रघु बाबा " अशीच हाक घालायचा. रघुनाथांचे जेवण, कपडे आवरणे वगैरे कामे तो प्रेमाने करायचा... तसे महादूला स्वतःचे असे फार कुणी नव्हते... फक्त एक मुलगी.. जिचे फार वर्षांपूर्वी लग्न होऊन तिच्या घरी सुखी होती. महादूच सगळं जगच रघुनाथ होते... रघुनाथांच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी महादू घ्यायचा. एकदा चित्र सुरू केले की रघुनाथ दिवस अन् दिवस न खाता पिता काम करत... मग महादू अन्न पाणी वगैरे घेऊन चित्रमहालाबाहेर तयार राही अगदी जागता पहाराच देत असे... रघुनाथ बाहेर आले रे आले की त्यांना स्वतः खायला घालायचा ,पाणी पाजायचा मगच तो शांत झोपी जाई.महादूला चित्रातलं काहीही कळत नव्हतं पण आपला "रघुबाबा" मोठ्ठा माणूस आहे एव्हढंच नक्की कळत होतं त्याला.

रघुनाथांकडे सतत येणाऱ्या अफाट संपत्तीचा नीट हिशोब ठेवणे, टॅक्स भरणे,इन्व्हेस्टमेंट करणे आणि बाकी आर्थिक जबाबदारी स्वामी नावाच्या CA वर होती. हा स्वामी पैश्यासोबत आपलं इमान राखून होता... रघुनाथांकडे त्याच्या कामाचा त्याला बाकीच्या जगापेक्षा तिप्पट मोबदला मिळत असे... त्याने शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत पूर्ण केले पण पुढे त्याचे करियर मार्गी लागले ते रघुनाथांमुळेच... नुकतेच त्याने एक मोठे स्वतंत्र ऑफिस उघडले होते... दोन मुले, बायको, म्हातारे आईवडील असा त्याचा परीवार होता... सतत येणाऱ्या पैश्यांच्या ओघामुळे अधिक पैश्याची चटकच त्याला लागली होती... काही प्रमाणात रघुनाथांकडे तो हातही साफ करत असे.. अर्थात रघुनाथांना ह्याची कल्पना होती पण ते चालवून घेत "संसारी माणूस आहे पैसा हवाच वाटणार..." असे त्यांना वाटे. तसा स्वामी निरुपद्रवी होता.

ह्या दोघांव्यतिरिक्त , रघुनाथांच्या आयुष्यातील जवळची तिसरी व्यक्ती म्हणजे प्रत्युषा शर्मा ... रघुनाथांची सेक्रेटरी, स्वीय सचिव , मार्केटिंग मॅनेजर, सल्लागार ऑल इन वन. खऱ्या अर्थाने बाह्य जगाशी रघुनाथांना जोडणारा दुवा प्रत्युषा होती.रूपाने अतिशय सामान्य स्त्री ,वय 35 पार, अविवाहित ... पण अफाट महत्वाकांक्षी. गेली 15 वर्षे ती रघुनाथांकडे काम करत होती. ... खरेतर रघुनाथांच्या उमेदीच्या काळात एक अत्यंत गरजू इसम दीनदयाळ शर्मा एके दिवशी "काहीतरी काम द्या!" म्हणून मदत मागत आले... त्यांना लिखापढी आणि इतर कामांना मुनीमजी म्हणून ठेवलं... ही प्रत्युषा त्यांचीच मुलगी. वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर तिच्या पाठीच्या दोन बहिणी ,2 भाऊ, आई एव्हढ्या पोरक्या लोकांचा डोलारा तिने सांभाळला. जेमतेम ग्रॅज्युएट झाली होती ती ;पण  मोठेपणाची जबाबदारी घेत ती कामाला लागली. पुढे दोन्ही बहिणींचे उत्तम स्थळे बघून लग्न लावून दिले, भाऊ इंजिनियर , डॉक्टर होत होते...  हा सगळा खर्च तिच्या कष्टाच्या कमाईतून होत होता. ह्या सगळ्यांत "तिचे लग्न" हा विषय ह्या सगळ्यांत शक्यच नव्हता.... आईसुद्धा स्वतःचा स्वार्थ पाहत होती... अजून दोघा मुलांचे शिक्षण पूर्ण झाले नव्हते... घरच्यांसाठी प्रत्युषा पैसे कमावणारे यंत्र बनली होती.

रघुनाथांचे करियर एका वेगळ्या उंच शिखरापर्यंत पोहोचवण्यात प्रत्युषाचाही मोलाचा वाटा होता. गेली पंधरा वर्षे अखंड ती रघुनाथांच्या चित्रांना अधिकाधिक किंमत कशी येईल ? ह्यावर मेहनत घेत होती. अनेक मीडियाच्या माध्यमातून त्यांची प्रसिद्धी करणे, कलादालनांशी संपर्क, समीक्षकांना वेळ पडल्यास मॅनेज करणे... सां डांम दंड भेद ... सारे काही वापरून ती मार्केटिंग करायची...अनेक स्पर्धा, पुरस्कार, मानसन्मान रघुनाथांना तिच्या सगळ्या प्रयत्नांमुळे मिळाले होते. रघुनाथांची चित्रे तर प्रभावी होतीच पण हल्ली नुसते गुण असून उपयोग नाही ते प्रेझेन्ट करता यायला हवेत ना!... रघुनाथांचे सगळे नियोजन तिच्याकडे असायचे... कुठे त्यांच्या हस्ते आर्ट गॅलरीचे उद्घाटन, कुठे नवचित्रकारांना मार्गदर्श , कुठे चीफ गेस्ट म्हणून बक्षिस वितरण... असे ती सतत रघुनाथांना लाईम लाईटमध्ये ठेवत असे. ह्या साऱ्याचा बक्कळ मोबदला रघुनाथांनी दिलेला होताच तिला... तिचे संपूर्ण घर जवळपास रघुनाथांच्या पैश्यांवर चालायचे... एखाद्या आश्रितासारखे! रघुनाथांनी  तीन बेडरूमचा एक आलिशान फ्लॅटसुद्धा ह्या कुटुंबाला भेट दिला होता. 

वाढत्या वयाबरोबर रघुनाथांना प्रसिद्धी नकोशी झाली होती मुळात त्यांची वृत्ती समाधानी! त्यामुळे आता केवळ निर्मळ आनंदासाठी चित्रे काढावी असे त्यांना वाटे. प्रत्युषाला मात्र हे पटत नव्हते... रघुनाथांनी लोकांशी बोलावं, कार्यक्रमात वर्णी लावावी म्हणून ती प्रयत्न करत असे आणि नेमके रघुनाथ नकार देत. रघुनाथांचे घरी बसणे तिला परवडणारे नव्हते... बाहेरची कामे बंद झाली तर तिचीही गरज उरणार नाही , मग नोकरी जायची ही भीती तिला वाटायची. म्हणूनच की काय। .आताश्या! रघुनाथ आणि प्रत्युषाचे वारंवार खटके उडू लागले होते.

क्रमशः
✒️ यशश्री रहाळकर
***************************************

चेकमेट भाग-५

आजही रघुनाथांचा कॅनव्हास कोराच होता....

हल्ली असं सारखं व्हायचं. गेल्या चार महिन्यांत त्यांनी एकही चित्र पूर्ण केलं नव्हतं ,नव्हे हातीच घेतलं नव्हतं.... त्यांना काहीही सुचतच नव्हतं... असे ब्लॉक्स येतात म्हणे मोठ्ठ्या कलाकारांना.. पण त्यामुळे त्यांच्या मनःस्थितीवर आताश्या परीणाम होऊ लागला होता... खाणे, पिणे, झोपणे कशातच त्यांना रस वाटेनासा झाला होता. दिवसचे दिवस ते कोरा कॅनव्हास मांडून विचार करत बसलेले असायचे... बहुतेक वेळा जुन्या आठवणींमध्ये रमायचे... तसे रघुनाथ फारच नीरस कंटाळवाणं आयुष्य जगले. एकाकी, एकसुरी ... अगदी सर बर्नाड सारखेच आयुष्य मात्र तरीही रंगीत... चित्रांच्या, रंगांच्या  दुनियेतलं एक जिवंत आभासी जग ... जिथे ते सुखी होते ... त्यांच्या स्वतःपुरते पण; त्यापल्याडच्या जगाचे काय? त्या पल्याडचे खरेखुरे जग रघुनाथांना नकोसे झालेले होते. कुणाला भेटणे नको, त्या स्वाक्षऱ्या देणे नको, कसली उद्घाटने नकोत नी कसली प्रदर्शने नकोत... एखाद्या सुरवंटासारखे स्वतःभवती कोष विणून झोपून जायचे आणि उठायचे ते नव्या, जोमदार रंगीबेरंगी पंखांसहीत... बास! नवा विषय सुचला त्यांना

"ककून... न्यू होप!"

अकरा बाय साडे तेराच्या भव्य मॅट फिनिश कॅनव्हासची निवड करून त्यांनी जमिनीशी समांतर स्टॅण्डवर नीट मांडणी केली..... आणि स्वतःला शब्दशः त्यावर झोकून दिले. गर्भाशयाचा कोष, त्यात नाळेचा कोष गुरगूटून झोपलेला माणूस बाहेर पडू इच्छितोय... त्याचा कोष थोडासा उकलला आहे आणि त्यातून डोकावताहेत रंगीत पंख... चित्रातील मूळ साचा रेखाटन पूर्ण झाले...आणि रघुनाथ रंगांच्या निवडीसाठी उभे राहिले.आपल्या चित्रातील गूढता अधिक अधोरेखित करण्यासाठी त्यांनी निळा, काळा, जांभळा आणि करडा रंग हाती घेतला.... ह्या रंगांची उधळण करत त्यांनी  गर्भाशयातील पोकळी सुरेख चितारली... आता नाळसदृष्य कोषाच्या रंगांची निवड करताना ते जरासे गोंधळात पडले...आणि आपल्या रंगांच्या पसाऱ्यात हरवून गेले.

एव्हढ्यात दार उघडून प्रत्युषा आत आली... आणि संधीप्रकाशाने कोपरान कोपरा उजळून गेला... नाराजीने रघुनाथांच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. त्यांचा एकंदर अवतार पाहून प्रत्युषाला जरासे टेन्शनच आले. संध्याकाळचे सहा वाजले होते आणि बरोब्बर साडे-सातला रघुनाथांच्या हस्ते रंगायतन चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होते. ह्या अश्या गोष्टी रघुनाथांच्या स्मरणात अजिबात राहत नसत.... एखाद्या चित्राच्या विचारात ते बुडले की त्यांना बाहेरच्या जगात आणणे अवघड होऊन जायचे .महादूने सांगितल्याप्रमाणे रघुनाथ काल संध्याकाळ पासून 'चित्रमहालात' होते त्यांनी काहीही खाल्लं-प्यायलं नव्हतं.आता आत जाणं, बोलणं रघुनाथांना नक्कीच आवडणार नव्हतं, ह्याची खात्री असूनही प्रत्युषा आत गेलीच.

रघुनाथ कडव्या आवाजात गरजले..
"इथे का आलीस तू? मला डिस्टर्ब केलेलं चालत नाहीही नव्याने सांगायला हवंय का तुला?"

 रघुनाथांच्या नाराजीकडे कानाडोळा करत त्यांना म्हणाली,
"सर! आपल्याला उद्घाटनाला जायलाच हवं. मुख्यमंत्री स्वतः हजर राहणार आहेत... अतिशय प्रतिष्ठित दिग्गजांच्या ह्या कार्यक्रमात आपण चीफ गेस्ट आहात... "

तिचं बोलणं मधेच तोडत रघुनाथ आपला संताप आवरत म्हणाले...
"मी येणार नाहीये... मला चित्र अर्धवट टाकून जायला आवडत नाही... तू निघू शकतेस.."

त्यांनी पुन्हा एकदा रंगांच्या पॅलेट कडे मोहरा वळवला.. भडक लाल की काळपट लाल निवडावा  चित्रातल्या नाळेच्या कोषासाठी?? अश्या विचारात ते बुडून गेले.
चिवट जिद्दीने प्रत्युषा म्हणाली...

"सर ,असं करून कसं चालेल? आपल्याला मोठ्या लोकांना दुखावून चालणार नाही...आपल्या चित्रांची खरी किंमत तेच करू शकतात..."

तिच्या शब्दांमुळे संतापाचा बांध फुटून रघुनाथ ताडकन उभे राहिले... हातातली लाल रंगाची बॉटल फेकून दिली .. जमिनीवर काचांचा चुरा आणि लालच लाल रंग पसरला. आवाजाची पट्टी राखत रघुनाथ म्हणाले..
"काय वाटतं तुला माझ्या चित्रांची किंमत पैश्यांमध्ये होते?? काय कळतं त्यांना माझ्या चित्रांमधलं?? .."

प्रत्युषा निरुत्तर झाली.. खाली मान घालून चुपचाप उभी राहिली...

"तुला तरी काही कळतं का चित्रांमधलं?? काय प्रत्युषा, तुला विचारतोय मी??.. चित्र विकणारा विक्रेता आहेस तू.."

रघुनाथांच्या आवाजाची पट्टी प्रचंड वाढली होती.प्रत्युषाच्या डोळ्यांना धारा लागल्या... रघुनाथांचे स्वतःवरील नियंत्रण पुरते सुटले होते आता ते अद्वातद्वा बोलू लागले... चित्र अपूर्ण राहिल्याचा सगळा संताप तिच्यावर निघाला... डोळे पुसतच ती बाहेर आली.

आता तिच्यापुढे मोठ्ठा प्रश्न आ वासून उभा होता.. रंगायतनच्या आयोजकांना काय उत्तर द्यायचे?? त्यांचे तर सतत कॉल येत होते... ह्या कार्यक्रमाच्या उद्धाटनाला रघुनाथांना नेणे तिच्यासाठी खूपच गरजेचे होते... अनेक मोठ्या लोकांशी ओळख करून घेण्याची सुवर्णसंधी तिला इथेच मिळणार होती... खरेतर आता दुसरे कुणीतरी असेच गडगंज शोधून त्याला असिस्ट करायला हवे, असा तिचा इरादा होता.. रघुनाथांची विरक्ती आणि त्यांचे वय पाहता आता दुसरा पर्याय शोधायलाच हवा ह्याची जाणीव तिला झाली होती. दुसरे असेही होते की ह्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला रघुनाथांना न्यायच्या मोबदल्यात तिला एक किंमती लॅपटॉप भेट म्हणून मिळाला होता. तो नाकारणे काही केल्या तिला शक्य होईना. तोही परत करावा लागणार...आता नकार तरी कसा कळवणार? अखेर रघुनाथांची तब्येत जरा बरी नाही त्यामुळे ते येऊ शकत नसल्याचं तिने कळवलं... तिचा चांगलाच हिरमोड झाला होता.

इकडे रघुनाथांनी चित्र तसंच अर्धवट सोडलं आणि ते पिंजऱ्यातल्या वाघाप्रमाणे फेऱ्या मारू लागले. महादू ज्युसचा ग्लास पुढे करत म्हणाला,

"रघु बाबा... बदल हवा असतो थोडा मनाला ... थोडं फिरून याव... मोठे साहेब होते तेव्हा किती गावं पालथी घातली आपण. बरं वाटल बगा !"

रघुनाथांना हा विचार अगदीच पटला... खरंच सर बर्नाड होते तोवर किती भटकंती करायचो आपण... त्यामुळेच त्यांची कला प्रवाही होती... आता आपलं साचलेलं डबकं झालंय... कुठेतरी जायलाच हवं?? पण कुठे? ह्या प्रश्नाचं उत्तर देत त्यांचं मन म्हणालं ,"दार्जिलिंग"... जिथे रस्त्यावर भटक्या कुत्र्यागत आयुष्य ते जगत होते , तिथेच सर बर्नाड त्यांना भेटले आणि चमत्कार झाला त्यांचं आयुष्यच आमूलाग्र बदलून गेलं.ते लगेच तयारीला लागले स्वामीला त्यांनी प्लेनचे बुकिंग करायला सांगितले आणि प्रत्युषाला सगळी अरेंजमेंट करायचा मेसेज केला... तिची इच्छा असेल तर ती सुद्धा येऊ शकते असेही त्यांनी कळवले... महादू मात्र घरीच राहिला, एव्हढा प्रवास ह्या वयात तसाही त्याला झेपणार नव्हताच. 

चार-पाच दिवसांतच जुजबी सामान घेऊन रघुनाथ दार्जिलिंगला रवाना झाले. त्यांच्या बरोबर उगाचच फुकटचा दौरा पदरात पाडून घ्यायला स्वामी आणि त्याच्या बायकोला घेऊन निघाला. प्रत्युषा देखिल तयार झाली मात्र त्यामागे तिचा वेगळा हेतू होता. आता रघुनाथांचा चांगला मूड पाहून नव्या बिझनेससाठी त्यांच्याकडून घसघशीत आर्थिक मदत मिळवायची , जरा व्यवसायाचा जम बसला की त्यांची नोकरी सोडून द्यायची... हा तिचा हेतू होता. रघुनाथांशी तिकडे निवांतपणे बोलण्याची संधी तिला हवी होती... पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं . तिच्या आयुष्याला नवीन वळण लागणार होतं, ते वळण दार्जिलिंगच्या वाटेवर उभं होतं.

क्रमशः
✒️यशश्री रहाळकर
*****************************************

चेकमेट भाग-६

दार्जिलिंगला पोहोचल्यावर रघुनाथांनी तिथल्या मातीला लवून नमस्कार केला...  सामान हॉटेलमधल्या त्यांच्या प्रशस्त सूट मध्ये भिरकावत, फ्रेश होऊन ते सर्वांत आधी डाकबंगल्याच्या दिशेने निघाले... डाक बंगला आता जीर्ण झाला होता... तिथे कुणीही राहत नसावे इतकी पडझड झालेली होती. तिथे पोहोचताच सर बर्नाडांच्या आठवणींचे तळे त्यांच्या डोळ्यात साठले , त्यांचा तो आवाज कानात घुमू लागला..

"माय बॉय तुझ्या हातात जादू आहे जादू!"

त्या पडक्या डाक बंगल्याभवती त्यांनी भक्तिभावाने फेरी घातली... सगळ्या सुवर्ण क्षणांची डोळ्यांपुढे उजळणी करत ते सावकाश पावले टाकीत परतीच्या वाटेला लागले.

इकडे हॉटेलमध्ये बराच वेळ त्यांची वाट पाहून कंटाळलेले स्वामी, त्याची पत्नी आणि प्रत्युषा अखेर फिरायला निघाले... लोकल माहितीचा कुणीतरी असावा म्हणून त्यांनी हॉटेलच्या मॅनेजरला गाईड द्यायला सांगितले. थोड्याच वेळात गाईड हॉटेलच्या पॅसेजमध्ये हजर झाला सुद्धा... नाव "नायक" वय 45 आसपास असावे... त्याला पाहताच स्वामी आणि प्रत्युषाचे डोळेच बाहेर यायचे बाकी होते.... नायक हुबेहूब रघुनाथांची कार्बन कॉपी होता. दोन व्यक्तींमध्ये इतके साम्य असू शकते ? ह्याचे त्यांना नवल वाटत होते. नायक रघुनाथांपेक्षा जरासा वयाने तरुण होता इतकाच काय तो फरक बाकी सगळे जसेच्या तसे. त्याच्या बरोबर चहाचे मळे पालथे घालत असतांना दोन ठळक गोष्टी प्रत्युषाच्या चाणाक्ष नजरेतून सुटल्या नाहीत.. पहिली हा नायक चांगलाच बडबड्या होता. कुणाच्याही नकला तो उत्तम करायचा.... दुसरी आणि सगळ्यांत महत्वाची गोष्ट अशी की नायक गरजू होता, गरीब होता. नायक म्हणजे आपल्या आयुष्यात परमेश्वराने पाठवलेली सुवर्णसंधी आहे , असा विचार करत प्रत्युषाने देवाचे आभारच मानले. नायकला पाहताच एक भन्नाट कल्पना तिच्या डोक्यात नाचू लागली... त्यासाठी रघुनाथांना कसे पटवायचे ह्याचा विचार ती करू लागली... फक्त पैश्याशी नाते राखून असणाऱ्या स्वामीला तिची ही योजना फार आवडली आणि त्यानेही तिची साथ द्यायचं ठरवलं.

दुसऱ्या दिवशी तिने नायकला आपल्या रूमवर बोलावून घेतलं... त्याच्यासाठी  तिच्याकडे भक्कम मोबदल्याचे काम असल्याचे ती म्हणाली... तिने त्याची कौटुंबिक माहितीही गोळा केली होती... कोणताच लहानमोठा व्यवसाय नायक धड करू शकला नव्हता, त्याच बुड स्थिर नव्हतं ...सतत चंचलपणा. कधी रोजी मिळे कधी नाही बायको कंटाळून त्याला सोडून गेली होती बाकी सगेसोयरे कुणीच नव्हते. नायकला तमाम गरीब लोकांप्रमाणे छानछोकीची प्रचंड आवड होती. प्रत्युषाच्या खोलीत तिच्या समोर बसल्यावर तो आसपास न्याहाळू लागला... त्यांचा एकंदर भपका बघता आपल्याला भरपूर पैसा नक्की मिळणार ही आशाही वाटू लागली. 

प्रत्युषा त्याच्यासमोर बसली आणि त्याच्याकडून नेमक्या काय काय कामाच्या अपेक्षा आहेत हे समजावून सांगू लागली. तिच्या वागण्या बोलण्यात नेहमीचा मोकळेपणा होता पण समोर बसलेला माणूस रघुनाथ नसून नायक होता... त्याची नजर तिच्या देहावर रेंगाळू लागली.. हे लक्षात येताच प्रत्युषा चांगलीच गोंधळून गेली. "आता बाकीचे उद्या बोलू".. म्हणत तिने त्याला जाण्यास सांगितले.
नायक गेल्यावर प्रत्युषाने आपल्या रुमचे दार लॉक केले आणि आरश्यापुढे आपल्या देहावरचे कपडे दूर सारले... नायकची नजर आयुष्यात पहिल्यांदाच तिला स्त्री म्हणून देहभर सुखद जाणीव देऊन गेली होती. रूपाने सामान्य असो, जबाबदारीने पिचलेली असो.. प्रत्युषा स्त्री देह धारण केलेली एक व्यक्ती होती तिलाही भावना होत्या... गेली पंधरा वर्षे ती देहाच्या नैसर्गिक गरजेला दूर लोटत होती. कित्येक रात्री तिने तळमळून काढल्या होत्या... आज नायकची पुरुषी नजर तिला वेगळाच आनंद देऊन गेली होती.

पुढच्या दोनच दिवसांत तिने नायकशी चार पाच भेटी घेतल्या... आणि अखेर त्याला रघुनाथांपुढे उभा केला. निसर्गाचं हे चमत्कारीक साधर्म्य पाहून रघुनाथ सुद्धा चकीत झाले... प्रत्युषाने नायक कसा गरीब गरजू आहे, पोरका आहे रस्त्यावर कसा एकाकी राहतो, अर्धपोटी झोपतो वगैरे कहाणी उत्तम रंगवली. नायकला आपण मदतनीस म्हणून सोबत न्यायचा विचार तिने बोलून दाखवला. आता महादू वृद्ध झाला आहे त्यालाही मदतीची गरज असल्याचे ती म्हणाली. हा नायक अगदी चटपटीत माणूस आहे सगळी कामे कशी नीट करतो वगैरे गुणगान तिने सुरू ठेवले. ह्या साऱ्यात स्वामीनेही साथ दिलीच... स्वामीचे हरवलेले व्हॅलेट नायकनी कसे शोधून परत केले, रुपयाही न घेता हे त्याने झक्कास रंगवले. आता आठ दिवसांच्या दोघांच्या मेहनतीतून ..."नायक हा एक अतिशय प्रामाणिक, गर्जी, मेहनती व्यक्ती आहे"... अशी प्रतिमा रघुनाथांच्या मनात निर्माण झाली. प्रत्युषा यशस्वी झाली... नायकला मदतनीस म्हणून सोबत घेण्याला रघुनाथांनी परवानगी दिली.

नायक म्हणजे आपला हुकमाचा एक्का आहे असे मानून प्रत्युषाने त्याला बरोबर घेतला. त्याला "रघुनाथ" बनवण्याच्या तयारीला ती लागली. त्याला उत्तम बोलता यावे ह्यासाठी भाषेवर काम केलं, त्याचे मॅनरिझम , त्याची वागण्या बोलण्याची ढब सगळे त्याला रघुनाथांसारखे करायला शिकवू लागली.त्याची केशरचना, कपडे सगळे तिने रघुनाथांसारखे केले, त्याला चित्रांविषयी जुजबी टिप्पणी करता येईल इतके ज्ञान दिले. ... बरोब्बर तीनच महिन्यांत तिने रघुनाथांपुढे दुसरा डमी रघुनाथ उर्फ नायक उभा केला. नायकने इतकी सराईतपणे रघुनाथांची देहबोली उचलली होती की ते स्वतः सुद्धा थक्क झाले... आता प्रत्युषाने स्पष्टपणे आपला हेतू मांडला... 

"सर आपला आनंद चित्र काढण्यात आहे ... आपल्याला जनसंपर्क नको वाटतो...परंतु बाहेरच्या लोकांना आपल्या हस्ते उद्घाटन, बक्षीस समारंभ वगैरे करण्यात अधिक रस आहे... मग त्या ठिकाणी तुमच्या जागी ह्या तुमच्या डमीने हजेरी लावली तर त्यात तुमचाच फायदा आहे... म्हणजे तुमची प्रसिद्धी, तुमचे नाव कायम राहील आणि चित्रे काढताना व्यत्ययही येणार नाही..."

रघुनाथ विचारात पडलेले पाहून ती पुढे म्हणाली...
"सर आपल्याकडे येणाऱ्या पैश्याच्या ओघातून कितीतरी गरजू व्यक्तींचे आयुष्य आपण घडवू शकता... अगदी मोठ्या सर साहेबांसारखं..."

सर बर्नडांचे नाव घेतल्याने आणि तिचा हेतूही तसा प्रांजळ वाटल्याने रघुनाथ ह्या पर्यायाला तयार झाले. त्यात त्यांचाच फायदा होता... त्यांची बाह्य प्रतिमा म्हणून आता नायक जाणार होता. पहिलाच कार्यक्रम नवोदय कलादालन उद्घाटनाचा... नायक तिथे प्रत्युषा सोबत गेला... त्याचा वावर इतका सहज होता की सगळे त्याला रघुनाथच मानत होते, कुणाला संशयसुद्धा आला नाही. मिशन बाह्य रघुनाथ यशस्वी झाले ... आणि प्रत्युषाचा प्लॅन शंभर टक्के यशस्वी झाला. आता प्रत्युषाने अनेक आमंत्रणे स्वीकारण्यास सुरुवात केली... सहासात महिन्यांत हळूहळू नायक ह्या सगळ्या वातावरणाला सरावला.. चित्रांवर बिनधास्त प्रतिक्रिया देऊ लागला, जुजबी भाषणे ठोकू लागला.... चित्रदालनात रघुनाथ त्यांच्या चित्रांमध्ये व्यस्त होते... बाह्य जगाशी त्यांना घेणे देणेच नव्हते.... एकदा "चाहत्यांना स्वाक्षरी हवी असते" हे कारण सांगू  स्वामीकडून नायकने रघुनाथांची स्वाक्षरी मिळवली आणि चार दिवस ती घोटून घोटून उत्तम जुळणारी  सरावाने साध्य केली.

प्रत्युषा आपल्या डावात यशस्वी झाली होती... नवीन रघुनाथला हाताशी धरून तिने चित्रांचे मार्केटिंग धडाक्यात सुरू केले.आता रघुनाथांकडे पूर्वीपेक्षा चार पट अधिक पैसा जमा होऊ लागला. ह्यातून सगळ्यांचेच भले होत होते... शिवाय कुणालाही संशय येण्याचा प्रश्नच नव्हता कारण रघुनाथ पूर्वीपासून अलिप्तपणे जगत होते... ते आणि त्यांची चित्रे हेच त्यांचे जग होते... महादू वगळता त्यांना फार कुणी ओळखणारेही नव्हते. नायकची सर्वतोपरी चांदी झाली होती... त्याला रहायला स्वतंत्र आलिशान घर होते, भरपूर पैसा, गाडी जे जे हवं ते ते मिळत होतं... आणि जोडीला प्रत्युषाची कंपनी.... ह्या मधल्या काळात प्रत्युषा आणि नायकचे संबंध देहाच्या पातळीवर उतरले होते... तशी प्रत्युषाची ती गरज होतीच आणि नायकने ते बरोब्बर ओळखले होते. दिवसाचा बहुतांश वेळा प्रत्युषा नायक सोबत घालवायची.. बऱ्याच रात्री ती नायकच्या फ्लॅटवर साजऱ्या करायची... वाढत्या पैश्याची बंडले फेकून तिने घरच्यांची तोंडे बंद केली होती.... इतके वर्षांत तिला न मिळालेले स्त्रीसुख आता ती भरभरून उपभोगत होती... तसेही पस्तिशी उलटलेल्या तिच्यासारख्या बाईला कोण राजकुमार मिळणार होता??

पटावर मांडलेला हा डाव आपणच जिंकलो ह्या भ्रमात प्रत्युषा होती. ती स्वतःला बुद्धिबळातील राजा समजत होती... आपण रघुनाथ, नायक, स्वामी ही सगळी प्यादी कशी मस्त चालवतो आहे, वापरून घेतो आहे.. असेच तिला वाटत होते... प्रत्यक्षात ती होती एक प्यादं ज्याचा कुणीही कधीही बळी देऊ शकणार होतं... नायकला आता राजा व्हायची स्वप्ने पडू लागली होती... आता त्याला ह्या वापरून झालेल्या प्यादीत रस नव्हता त्याला आता वझीर हवा होता... रघुनाथ नावाच्या राजाला कायमचे पराभूत...चेकमेट करण्यासाठी.

क्रमशः
✒️यशश्री रहाळकर
*******************************************

चेकमेट अंतिम भाग-७

रघुनाथ नावाच्या पांढऱ्या राजाला मात देण्यासाठी पटावर उतरलेला काळा राजा होता नायक...  नायक प्रचंड हुशार होता आणि तेव्हढाच पाताळयंत्री सुद्धा... हे शहरातले मोठे लोक आपल्याला नेताहेत म्हणजे तसंच काहीतरी भानगडीचं काम असणार हे त्याने पुरेपूर ताडलं होतं. रघुनाथांची देहबोली त्याने अतिशय प्रामाणिक प्रयत्न करून आत्मसात केली होती... ह्या कालावधीत त्याच्या लक्षात आले होते की रघुनाथ म्हणून तो दिवसाचा काही वेळच का संपूर्ण आयुष्यच जगू शकतो! रघुनाथांनी इतकं कमावलं होतं की तो ह्या आयुष्यात उधळून संपवू शकणार नाही... त्याला आता हा लपंडाव नको होता त्याला पूर्णपणे रघुनाथ व्हायचं होतं... आणि राजरोस मालकी हक्काने सगळी सुखे उपभोगायची होती. मात्र त्यासाठी त्याला खऱ्या रघुनाथांना कायमचे गायब करावे लागणार होते... ह्या कामात असणाऱ्या अडथळ्यांनाही तो वाटेतून सहज दूर करणार होता... त्याच्या डोक्यात कुटील कारस्थान शिजत होते आणि बिचाऱ्या रघुनाथांना ह्याची गंधवार्ताही नव्हती... ते आपल्याच कलासाधनेत मग्न होते.

एखाद्या राजाला शह द्यायचा असेल तर आपला स्वतःचा भक्कम वझीर हवाच पण तो नसेल तर त्याच राजाच्या वझीराला फितूर केले पाहिजे... नायकला ठाऊक होते. रघुनाथांचा वझीर स्वामी अतिशय लोभी होता... त्याचे तोंड उघडते पैश्याने आणि बंद होते पैश्यासाठीच... एका रात्री त्याने स्वामीला आपला प्लॅन ऐकवला ... बदल्यात रघुनाथांची प्रॉपर्टी आपली झाली की 25% त्याचा मोबदला देण्याचे कबूल केले. हे पंचवीस टक्के म्हणजे काही शे कोटी रक्कम होती एव्हढी रक्कम स्वामीला ह्या जन्मात कमवता येणार नव्हती... तो ह्या प्रकरणात काहीच करणार नाही फक्त बघ्याची भूमिका घेईल असे ठरले... त्याने कुणाला काही सांगायचे नाही,घडतेय ते घडू द्यायचे हे नायकसाठी पुरेसे होते.

प्रत्युषा .. नायकची वापर करून झालेली प्यादी होती... त्याने चलाखीने तिचे आणि त्याचे अनेक खाजगी क्षण चित्रित करून ठेवले होते... त्याच्या योजनेत तिने अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास तो तिला सरळ ब्लॅकमेल करणार होता... तिच्या दोन बहिणींच्या सासरी, दोघा तरुण भावांच्या मोबाईलवर हे फोटो जातील अशी व्यवस्था तो करणार होता... तिच्या नकळत अनेक महत्वाचे नंबर्स त्याने तिच्याच मोबाईलमधून टिपून घेतले होते. प्रत्युषाचा प्लॅन खरंतर खूपच थेट होता... त्यात कोणतेही किल्मिश नव्हते... खाल्ल्या मिठाला ती जागली होती... फक्त सामाजिक जीवनात रघुनाथांचा हा डमी वापरून होणारी आर्थिक भरभराट तिला मोहात पाडून गेली.... हीच तिची सर्वांत मोठी चूक ठरली... तिच्या ह्या पटावरच्या डावामागे नायकचे खरे डावपेच तिला खूप उशीरा कळले...मात्र आता मागे वळता येणार नव्हते, ती चहुबाजूंनी घेरली गेली होती... एक पाऊल पुढे आणि आपण पटाबाहेर फेकले जाणार ह्याची तिला पूर्ण खात्री झाली. आता निश्चलपणे आपल्याच राजाचा दारुण पराभव पाहणं तिच्या नशिबात उरलं होतं... तिच्या पित्याच्या मृत्यूनंतर तिला आधार देणारे, मदत करणारे दयाळू रघुनाथ... पण त्यांच्यासाठी ती काहीही करू शकत नव्हती... तिचा डाव स्वतःवर उलटला होता.

नायकच्या रक्तरंजित वाटेवरचा तिसरा अडथळा होता महादू... हा माणूस कमालीचा इमानी होता त्यामुळे त्याला कायमचे संपवण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.. म्हातारा थकला होता... त्याचा जीव घ्यायला फार ताकद लागणार नव्हती. एका पहाटे महादू बंगल्याच्या बागेत मृतावस्थेत सापडला... चक्कर येऊन तो बागेत पडला असावा नेमका दगडावर डोकं आपटून प्राण गेला असा अंदाज तपासात व्यक्त झाला... रघुनाथ अगदी लहान मुलासारखे टाहो फोडून रडले. स्वामी आणि प्रत्युषा काय समजायचे ते नेमकेपणाने समजले... आपण गप्प बसलो नाही तर उद्या ह्या जागी आपण असू हे त्यांना कळून चुकले. आता अंतिम खेळाची वेळ जवळ येऊन ठेपली होती बस ! एकच चाल ... शह आणि मात...

नायकने ठरवले आजचा दिवस रघुनाथांचा अखेरचा दिवस... आज रात्रीच त्यांचा निकाल लावायचा , कायमचा. एकदा त्यांचा जीव घेतला की त्यांना त्यांच्याच चित्रमहालात खड्डा करून गाडून टाकायचं... मग आपण राजरोसपणे रघुनाथ म्हणून वावरायचं... सगळी संपत्ती आपली, ऐष करायची. 

आज नायकला एका अत्यंत महत्वाच्या पुरस्कार सोहळ्याला जायचे होते... रघुनाथांना "चित्रजगत" पुरस्कार मिळणार होता... रोख रक्कम एक लाख आणि सुवर्णमूर्ती असे  पुरस्काराचे स्वरूप होते... इतका मोठा सत्कार समारंभ...नायकला मोह आवरता आला नाही. तो प्रत्युषा आणि स्वामी दोघांनाही सोबत घेऊन "रघुनाथ" बनून बाहेर पडला... 

"आज तुम्हा दोघांना मस्त पार्टी देतो... आज मी खूप खुश आहे... आता उद्यापासून मला कुणापुढे पैश्यांसाठी हात पसरावे लागणार नाही..."
नायक म्हणाला.

रघुनाथांच्या नावाची घोषणा झाली ,सगळे सभागृह टाळ्यांचा कडकडाटाने दुमदुमून गेले... नायक थाटात हात जोडत स्टेजवर जाऊ लागला... क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं... पोलिसांचा ताफा तिरासारखा आत शिरला आणि तोतया रघुनाथ उर्फ नायक , प्रत्युषा आणि स्वामीला अटक करण्यात आली. पाठोपाठ धीरगंभीर पावले टाकीत रघुनाथ सभागृहात दाखल झाले.... आपले पारितोषिक स्वतः स्वीकारत त्यांनी बोलायला सुरुवात केली...

"नमस्कार रसिकहो! हे आत्ता काय झालं ह्याची कल्पना आली असेलच आपल्याला... माझ्यासारखाच दिसणारा कुणीतरी सगळ्यांना फसवत होता...कलाकाराच्या कलेवर प्रेम करा... त्याच्या ह्या नश्वर देहावर नाही... एखादा कलाकार आपलं आयुष्य पणाला लाऊन कलेची साधना करत असतो .. त्याला भेटण्यापेक्षा त्याच्या निर्मितीला.. त्याच्या कलेला भेटा... हेच खरे प्रेम , हीच खरी पावती." 

टाळ्यांचा कडकडाट झाला... सगळे लोक उभे राहिले. रघुनाथ एकटेच गर्दीतून वाट काढत जाऊ लागले... त्यांच्या समोर रजनी उभी होती... जरा वयाच्या खुणा सोडल्या तर तशीच्या तशी निळ्या डोळ्यांची परी. ते तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाले..

"आता इतके वर्षांत तुझ्या स्पेस मध्ये मला माहित नसलेलं बरंच काही असेल... माझ्याही स्पेसमध्ये आहे बरं!... आणि प्रॉमिस मी तुझं चित्र काढणार नाही... मग काय विचार आहे?"

रजनीने नेहमीसारखेच खळखळून हसत रघुनाथांचा हात हातात घेतला... आणि दोघे घराच्या दिशेने निघाले.

इकडे पोलीस कोठडीत नायक विचार करत होता ... आपला इतका फुल प्रूफ प्लॅन नेमका कुठे चुकला... आपल्या सगळ्या चालींची तो पुन्हा पुन्हा उजळणी करत होता...पण त्याला आपणच चेकमेट कसे झालो ते काही उमजेना. नायक पटावरचा निष्णात खेळाडू असेलही पण तो बुद्धिबळातील एक महत्वाची खेळी विसरला होता.. "कॅसलिंग"...  अटीतटीच्या क्षणी राजा आणि हत्ती आपापली जागा बदलून घेतात... राजाचा अत्यंत प्रिय प्रामाणिक हत्ती मारला जातो पण राजा चेकमेट होण्यापासून बचावतो... रघुनाथांचा तो प्रामाणिक हत्ती महादू होता... त्याने मृत्यूपूर्वी स्वामी आणि नायकचे बोलणे रघुनाथांना सांगितले होते... आणि आपल्या राजासाठी तो मरायला सज्ज झाला होता... रघुनाथांच्या यशामागे अजून एक व्यक्ती होती ती म्हणजे पत्रकार रजनी मिश्रा... त्यांचे प्रेम. एका कलादालनातील चित्राप्रदर्शनात भेटलेल्या रघुनाथच्या डोळ्यांत तिला ओळखीचे भाव दिसले नाहीत... हा डमी रघुनाथ उर्फ नायक तिला मुळी ओळखतच नव्हता
...  हा माणूस कुणीतरी वेगळा असावा असा संशय तिला आला मग तिने त्याच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. त्याच्या विविध कार्यक्रमांना, भाषणांना ती आवर्जून उपस्थित राहू लागली... त्यातून हा मनुष्य रघुनाथ नाहीच ह्याची तिला खात्री पटली... मग पोलिसांची मदत घेत तिने हा सगळा कट अतिशय नाट्यपूर्ण पद्धतीने उघडकीस आणला.

रघुनाथांचे चित्र उत्सव कलाप्रदर्शनीत मुख्य आकर्षणाचे केंद्र बनले होते... पुन्हा एकदा बुद्धिबळ ह्याच प्लॅटफॉर्मची निवड त्यांनी केलेली दिसत होती. साडे सत्तावीस बाय साडे पंचवीस ... भव्य कॅनव्हासवर बुद्धिबळाचा अटीतटीचा खेळ रंगात आला होता ... काळा राजा चुरशीने लढत होता... पांढऱ्या राजाकडे वझीर हत्ती आणि एक प्याद आणि एकच घोडा उरला होता... वझीराची विखारी स्थिर नजर ... त्याने युद्धात बघ्याची भूमिका घेतली होती... एक प्याद चहुबाजूंनी घेरलेले होते... हतबल होते... आता पांढऱ्या  राजाला चेकमेट मिळणार एव्हढ्यात हत्तीने कॅसीलिंग केलं हत्ती राजाच्या जागी ठार झाला. पांढरा राजा कोपऱ्यात सरकला आणि संधी साधून  पांढऱ्या घोड्याने काळा राजा उडवला...कोपऱ्यात दुःखी झालेला पांढरा राजा.. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हत्ती आणि पांढऱ्या घोड्याचा हल्ला... हे सगळं चित्रात इतकं सुरेख रेखाटलं होतं की पाहणारा थक्क होऊन जायचा... चित्राखाली दिमाखदार अक्षरांत झळकत होतं

"चेकमेट बाय बी. रघुनाथ"

समाप्त......
✒️ यशश्री रहाळकर