फॉलोअर

मंगळवार, १८ जून, २०१९

ज्याच्यासाठी लुगडं...

                 काल वटपौर्णिमेच्या पूजेला एक जण गाऊन वर आलेली पाहून माझ्या डोळ्यांच्या बाहुल्या उडी मारून बाहेर यायच्या बाकी होत्या ..... तिला वेळ नसल्याने अशी वेळ आली होती☺☺ तर दुसरी एक जण जीन्स वर ओढणी गुंडाळून घेत वर भलं मोठं कुंकू लावून "सेल्फी विथ वड ऑन वटपौर्णिमा " असा दिखाव्याचा वड पूजून वडाला शेंडी लावून गेली... वड मनात म्हणाला असेलही ,"एव्हढी मोठ्ठी शेंडी ! एव्हढी तर पारंबी नाही माझी"... एका जेष्ठ आजीबाईंच्या टोमण्याकडे दुर्लक्ष करत ती म्हणाली,"शेवटी भावना महत्वाची!"माझा नंदीबैल...झाला. काल वडाची आणि वडासारख्या पिकलेल्या माणसांची पोटातून दयाच आली.मागच्या पिढीला पुढच्या पिढीतील एकंदर पेहरावांची स्थित्यंतरे बघावी लागतात हे खरेच! मात्र ही स्थित्यंतरे त्यांच्या विश्वासाची ,भावनांची लक्तरे वेशीवर टांगत असतील तर... .. त्यांनी काय पांघरावे. आजीची गोधडी नकोशी असणारी ही पिढी.
              एकंदर सध्याचा फॅशन ट्रेंड पाहता आपण पुन्हा आदिमानवासारखी पानं गुंडाळून राहू लागलो किंवा  संपूर्ण दिगंबर अवस्थेचा ट्रेंड आला तरी मुळीच नवल वाटणार नाही.मुळात थंडी ऊन वारा पाऊस ह्यांच्यापासून रक्षण व्हावे म्हणून शोधलेल्या पर्यायांचा वापर पुढे लज्जारक्षणार्थ  होऊ लागला ...एकंदर परीधानावर ऋतुमान/ हवामानाचा प्रमुख प्रभाव होता. मानवाच्या प्रगतीच्या विविध टप्प्यांवर पुढे त्यावर धर्म, देश, संस्कृती ,परंपरा, फॅशन वगैरेंचा प्रभाव पडू लागला .. आणि साधी सरळ कपडे घालणे ही क्रिया बहुआयामी होत गेली. कुणी काय घालावं याच स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळालं ... ते अगदी शतशः मान्य आहेच ... स्त्री काय किंवा पुरुष काय वाटेल ते घाला किंवा घालू नका .. असे म्हणायची वेळ आली आहे . कधीकधी तर कपडे घालताहेत हेच उपकार मानावे अशी देखिल टोकाची परिस्थिती येऊन ठेपली आहे. सुजाण माणसांपुढे मुळात कुणी काय घालावं हा प्रश्न नाहीच ... प्रश्न आहे कुठे काय घालावं???
                      साधारण एका वर्षांपूर्वी नाशिक मधील एका मंदिराबाहेर पाटी होती,"स्त्रियांनी गाऊनवर व पुरुषांनी बर्म्युडा घालून मंदिरात प्रवेश करू नये." नाशिक सारख्या परंपरांचा सार्थ पुरस्कार करणाऱ्या ठिकाणी हा नियम करायची वेळ यावी... नवल नाही का! पण गेल्या वर्षभरात ह्या स्वरूपाच्या पाट्या साधारण प्रत्येक मंदिराबाहेर दिसू लागल्या. लोकांचे कुठे काय घालावे हे भान मावळले आहे हे मात्र खरे! आधुनिक पेहराव / सोयीचे कपडे यांचा मी कायम पुरस्कार करतेच ... म्हणूनच नोकरी करणाऱ्या स्त्रिया जेव्हा पंजाबी ड्रेस, कुडते, जीन्स यांवर आत्मविश्वासाने वावरतात तेव्हा मला एक स्त्री म्हणून त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. मात्र स्त्रिया जेव्हा नाईट ड्रेस /गाऊन वर भाजी बाजारात हिंडतात किंवा मुलांना शाळेत आणायला सोडायला जातात ... तेव्हा मनांत अनेक प्रश्नांची गर्दी होते.... यातून काय दाखवितो आपण ,आम्ही कित्ती बिझी आहोत हे ??? की आम्ही कित्ती साध्या सरळ (बावळट ) आहोत हे??
                  रविवारच्या बाजारात एक आई मुलीची जोडगोळी भाजी खरेदी करीत होती... मुलगी साधारण 14/15 ची तिचा मिनी स्कर्ट वारंवार ती खाली खेचत होती ... पाहणारे  खेडूत भाजीवाले आणि घालणारी दोघांचीही गैरसोय ... का घालायचे असे कपडे ?? अनेकदा पार्क मध्ये मुलांना खेळायला म्हणून आणलेलं असतांना त्यांचे हात पाय करकचून अवघडून टाकणारे मॉडर्न कपडे घातलेले दिसतात... त्या चिमण्यांना धावता येत नाही की खेळता येत नाही ... कश्याला हा सोस.. ऑफ शोल्डरच ओझं त्या इवल्या खांद्यांवर का? पार्टीत घाला की हवे ते पण  खेळतांना तर मूल म्हणून जगू द्या. कुठे काय घालायचे हे भान खरेतर आधी पालकांना यायला हवे... मी पालक म्हणतेय फक्त आई नाही... पॅरेंट-टिचर मिटिंग ना बर्म्युडा च्या निम्मी शॉर्ट घालून आलेले थोर पप्पा मी पाहिले आहेत ... बिचारी पोराची टिचर मोंन्टेसरी कोर्स नुकतीच पास केलेली पोर  ... मुलांना काय वळण लावणार जिथं बापाला वळण नाही.
                     या शॉर्टस नावाच्या राक्षसानी तर धुमाकूळ घातला आहे ... या वीतभर छोट्या कपड्याची किंमत जवळपास भारीच्या पाच सहा साड्यांइतकी असते..☺ हा प्रकार खरेतर स्पोर्ट्स क्लोथ या कॅटेगरी मधला ... खेळाडूंना खेळ सोयीचे व्हावेत म्हणून कापून अर्धा केलेला... समुद्रकिनारा, खेळांचे मैदान ,ट्रेकिंग अश्या ठिकाणी हा पोशाखाचा प्रकार योग्य पण सर्रास दररोज शाळा / कॉलेज आणि क्लासला घालून माणूस....  फारतर पहिलवान दिसू शकतो ... पाश्चात्य देशातील निमुळत्या शरीरयष्टीला साजेसे असणारे हे कपडे भारतीय व्यक्तींनी घातले तर खरेतर अत्यंत बेंगरुळ ध्यान दिसू शकतो ह्याची जाणीव ह्या कॉपी कॅट्स ना बहुदा नसतेच.... अनेकांचे पाय ह्या shorts मध्ये साक्षात गजगामिनी स्वरूप प्रकट करत असतात. तरीही माझा अजिबात आक्षेप नाही बरे! घाला काय घालायचे ते .. पण लग्नकार्यात अश्या अर्धउघड्या करवल्या पहिल्या की कितीही ठरवलं तरी प्रतिक्रिया तडक बाहेर पडतेच.
                     सध्या जास्तीत जास्त उघडा तितका महाग असं समीकरण कपड्यांच्या बाबतीत पाहायला मिळतं.सध्या जीन्स पेक्षा त्या फाटक्या ripped jeans दुप्पट हो!...ऑफ शोल्डर( ढगळ झाल्याने खांद्यावरून घरंगळणारा) , कोल्ड शोल्डर  (इंजेक्शन बाह्या) एव्हढंच काय शोल्डरच नको (tube top)... घाला माऊली ... बिचारे मंदिरातले देव काही म्हणणार नाही . शिवाय भाव महत्वाचा हे टूमण आहेच ; पण प्रसंगाची तर लाज बाळगा ..मंगळागौरीला हल्ली मुली असे कपडे घालतात की साक्षात मंगळागौर उठून चौरंगा वरचे झाकलेले वस्त्र मुलीवर पांघरेल अशी भीती वाटू लागते. डोहाळे जेवणालाही हल्ली मुली सर्रास फ्रॉक घालतात... खास हजारो रुपये देऊन बोलविलेला ग्रुप गाणी गात असतो ... "शालू हिरवा चोळी हिरवी हाती भरला हिरवा चुडा ???" डोहाळे जेवण आपल्या षोडश संस्कारातील महत्वाचा संस्कार... बेबी शॉवर करायचा असेल त्यांनी खुशाल वाट्टेल ते घालून फोटो काढावेत ... ना आलेल्या जेष्टांची चाड ना देहाची भीड. असाच प्रकार मी मौंजीत देखिल पाहिला ... बटू इवलासा आठ वर्षांचा , त्याचे बाबा सोवळ्यात मात्र माय माउलीने designer वन पीस घातलेला... त्यावर शोभतं नाही म्हणून गळ्यात मंगळसूत्र नाही आणि कपाळाला टिकलीही नाही .
                    या बाबतीत मला साऊथ इंडियन लोकांचं प्रचंड कौतुक वाटतं. शिक्षणाचं प्रमाण सर्वाधिक, मोठमोठ्या पोस्टवर तरीही त्यांच्या पूजा पहा किंवा मंदिरात जाऊन पहा ... सात्त्विकता ! शुभ्र पांढऱ्या साड्या पुरुषांचाही पारंपारीक पेहराव ... त्याचा त्यांना अत्यंत अभिमान असतो. तसेच पंजाबी लोक देखिल खूप मॉडर्न असतात .. सगळ्या मुली अगदी मस्त लेटेस्ट कपडे घालतात पण मंदिर किंवा अन्य प्रार्थना स्थळांना डोक्यावर पदर डोळ्यात आदर! आम्ही मात्र ते सारं सोडून कसं देता येईल, स्वातंत्र्याच्या डरकाळ्या फोडून धुडकावून कसं लावता येईल हाच विचार करीत असतो.
                     अनेकदा तरुण मुली अमुक एक हिरॉईन आदर्श मानून तिने सिनेमात घातलेले कपडे follow करीत असते. त्या मुलींच्या आया कंटाळून जातात समजावून ... ह्या अश्या वेड्या फॅन्स नी सामान्य आयुष्यात ती नटी किती साधे कपडे घालते हे जरूर पाहिले पाहिजे... एअरपोर्ट वर, जिमला जातांना किंवा इतर वैयक्तिक प्रसंगात पहावं.शूटींग पुरत्याा घालण्यात येणाऱ्या चिंध्यासाठी त्यांच्याकडे बॉडी गार्ड, सेक्युरिटी, बाऊन्सर्स चा ताफा असतो हे मुळीच विसरू नये.शेवटी कपड्यांचे मूळ उत्पत्तीस्थान काय आहे तर... कपडे अंग झाकण्यासाठी आहेत ते अधोरेखित करण्यासाठी नव्हे.... या निमित्ताने विदर्भात अत्यंत प्रसिद्ध म्हण आठवते.. .. ज्याच्यासाठी लुगडं ...बाई तेच माझं xxx माहिती असेलच !
©यशश्री रहाळकर

मंगळवार, ४ जून, २०१९

प्रेषिअस स्टोन भाग 2

पूर्वार्ध:-
https://kattayashashri.blogspot.com/2019/06/blog-post.html?m=1
बॅचलर्स पॅरडाईज या क्लब मध्ये रणजीत वाघमारे रिटायर्ड cbi ऑफिसर मालपाणी मर्डर केस बद्दल सांगत होते. मृत आभा मालपाणी चा मृत्यू आणि त्या भवतीचे गूढ कायम होते.आता पुढे......
                 
                     रणजीत वाघमारे साहेब कथा रंगत जात असतांना मध्येच थांबले...आपलं ड्रिंक संपवून सगळ्या श्वास रोखून थांबलेल्या म्हाताऱ्यांकडे पाहत म्हणाले...,"अनेकांकडे हेतू होताच आभाला मारण्याचा...कोण असेल बरं खुनी??" सारे म्हातारे सराईतपणे उद्गारले ,"खुनाचे हत्यार तर सापडू दे!" मोठ्याने गडगडाटी हसत रणजीत साहेब पुढील कथेकडे वळले. आपल्या नेहमीच्या खड्या आवाजात त्यांनी प्रश्न केला, "मंडळी! खुनाचे हत्यार नाहीच मिळाले किंवा नसेलच तर हेतूंवर लक्ष केंद्रित करावेच लागते."...पुढे मूळ कथेकडे पुन्हा वळत त्यांनी कथानकास सुरुवात केली...,"खरंतर साधी सरळ वाटावी अशीच ही घटनांची मालिका आहे तरी संदेहाला जागा मिळालीच.मालपणींकडचा जुना नोकर म्हणाला त्याप्रमाणे अश्याच स्वरूपाचे मृत्यू मालपणींच्या घरात पूर्वी घडले होते....एकाच घरात एकाच प्रकारचे परंतु नैसर्गिक वाटावेत असे मृत्यू होणं ...खरंतर शक्यच नाही.आता या साऱ्यात काही साम्यस्थळे आहेत का ???याचा आणि एकूणातच संपूर्ण केसचा आम्ही शून्यापासून अभ्यास करू लागलो....आता सवाल एक नव्हे 3 खुनांचा होता.
                        3 व्यक्तींच्या मृत्यूतील दुवे जोडत जाऊनच या घटनांची उकल होणार हे निश्चित करून आम्ही इतिहास उकरून काढायला सुरुवात केली.
*पहिला मृत्यू झाला तो सोमेशची आई, धनेश मालपणींची पहिली पत्नी सुवर्णाचा... वय 34 मृत्यू झोपेत परिस्थिती समान,
*दुसरा मृत्यू आशिषची आई रत्नमाला चा ... धनेश मालपणींची द्वितीय पत्नी वय 34मृत्यू झोपेत परिस्थिती समान,
*तिसरा मृत्यू आभा आशिष ची पत्नी धनेश मालपणींची सून वय 34 मृत्यू झोपेत परिस्थिती समान.....
सुवर्णा, रत्नमाला आणि आभा  मृत्यूचा प्रकार एकच , मृत्यूसमयी वय समान 34 वर्षे ... ह्याखेरीज तिघी मालपाणी घरातील कर्त्या स्त्रिया , आपल्या वडिलांचे एकुलते एक अपत्य ??? ह्या मुद्द्याला मी उडालो ...अजून एक दुवा या तिघींमध्ये समान होता त्यावर नंतर बोलूच म्हणत रणजीत साहेबांनी क्षणभर विश्रांती घेतली...तोपर्यंत तरुण म्हातारे आपापसांत चर्चा करून तो समान दुवा शोधू लागले....रणजीत साहेबांनी विचारले ,"सापडलं का उत्तर??"त्यांच्या तालमीत तयार पठ्ठे एकसुरात उत्तरले,"धनेश मालपाणी" बरोब्बर! म्हणत रणजीत सर पुन्हा कथेकडे लक्ष वेधून घेत म्हणाले...या धनेश मालपणींची सारी माहिती आम्ही अत्यंत गुप्तपणे मिळविली.
                   धनेश मालपाणी हरहुन्नरी हुशार परंतु अनाथ गरजू मुलगा...गावाकडचा म्हणून विश्वासाने सुवर्णाच्या (प्रथम पत्नी) वडिलांनी सराफी पेढीवर नोकर म्हणून ठेवला पुढे त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या एकुलत्या एक लेकीशी लग्न झाले.त्याने पाच सहा वर्षात व्यवसायाची भरभराट केली सासऱ्याने सुखाने डोळे मिटले...आता व्यवसाय वृद्धी साठी रत्नांचा अभ्यास धनेश नी सुरू केला दरम्यान त्यांना सोमेश हा मुलगा झाला.यावेळी त्याची भेट रत्नांचे प्रसिद्ध व्यापारी रत्नमालाचे वडील यांच्याशी झाली...प्रथम पत्नी सुवर्णा चा आकस्मिक मृत्यू झाला आणि धनेश मालपाणी रत्नमालाशी विवाहबद्ध झाले. या दाम्पत्याला आशिष नावाचा मुलगा झाला..... पुढे काही वर्षांत रत्नमालाचा आकस्मिक मृत्यू झाला.आणि आता अगदी त्याच प्रकाराने धनेश मालपणींची सून आभाचा मृत्यू झाला...फरक एव्हढाच होता की आभा त्यावेळी गर्भवती होती.... आणि नातवाच्या आगमनासाठी धनेश मालपाणी खूष होते....केवळ या मृत व्यक्तींच्या माहेरच्या प्रॉपर्टीसाठी त्यांचा खून का व्हावा?? ही प्रॉपर्टी तर अखेर मालपणींचीच होणार होती.
                       एखादे कोडे सोडवत अखेरपर्यंत जावे अन शेवटचे कोडे सुटता सुटत नाही असे काहीसे झाले होते.मालपाणी आणि मेहता म्हणजे दोन धनाढ्य हत्तीची टक्कर...चर्चेला उत आला होता ,आमच्यावरील दबाव कमालीचा वाढला...बिग शॉट धनेशजींची थेट चौकशी करता येत नव्हती... सारं साचलेल्या डबक्यासारखं झालं होतं...आम्ही आपले वेड्यागत पुन्हा पुन्हा त्या डबक्याभवती फेऱ्या मारत होतो...पण एक... एकच अखेरची कडी या साऱ्यांना जोडणारी, काही केल्या सापडत नव्हती.आता थोडं सावधपणाने पावले टाकीत आम्ही केस बंद करतोय असे सांगत निरोपाची बोलणी सुरू केली.काही अखेरच्या नोंदींसाठी मालपाणींच्या घरात गेलो असता...40 वर्षे जुन्या नोकराकडून मी काही जुने फोटोग्राफ्स मिळविले...आणि कमाल झाली ...मला जे नेमकं हवं होतं ते सापडलं... आभा मृत्यूपूर्वी मेहातांच्या घरी गेली होती त्यामुळे तिकडेच धाव घेत ती वस्तू मी ताब्यात घेतली. त्या वस्तूचा रीतसर तपास केल्यानंतर तीच वस्तू खुनाचे हत्यार म्हणून सिद्ध झाली... धनेश मालपणींवर रीतसर गुन्हा दाखल झाला.
               एव्हढी उत्सुकता ताणून देत रणजीत साहेबांनी सावकाशपणे चविचावीनं आपलं ड्रिंक घेण्यास सुरुवात केली.... तरुण म्हातारे उतावीळ झाले आणि एकच गोंधळ उडाला...नेमकं हत्यार होतं तरी काय???,"सांगतो सांगतो!" म्हणत सगळ्यांना शांत करत रणजीत साहेब म्हणाले...ते हत्यार होतं एक सुरेख रुबी चा नेकलेस...सगळ्यांचे तोंड वीतभर वासले होते. पुन्हा एकदा आपलं गडगडाटी हास्य भिरकावत रणजीत साहेब सविस्तरपणे सांगू लागले...धनेश मालपाणी अत्यंत हुशार माणूस आणि हुशार माणसे असतात तसाच महत्वाकांक्षी.सुवर्णाशी लग्न करून तिची सोन्याची पेढी धनेशने मिळविली. पुढे रत्नांचा अभ्यास करतांना रत्नमाला चे वडील आणि त्यांचा लाखोंचा व्यवसाय आपला होऊ शकतो हे त्यांनी ताडले. रुबीचा अप्रतिम सुंदर नेकलेस बनवून त्यांनी तो सुवर्णाला भेट दिला ...कौतुकाने घातलेल्या त्याच नेकलेस ने चार पाच दिवसांत तिचा मृत्यू झाला...कारण त्या नेकलेस मध्ये काही खडे हे मूळ रुबी नसून त्याचे उपरत्न  Realgar रेल्गर होते...हे सौम्य विषारी असते त्याचे बारीक कटिंग इतके सफाईने केले होते की ते घालणाऱ्याला किंचित टोचावे...सामान्य माणूस हा भेद ओळखुच शकत नाही . रत्नांचा जाणकारच तो जाणतो...सुवर्णाचा मृत्यू नैसर्गिक मानला गेला..दबला.
                      पुढे रत्नमालाशी विवाह लाखोंचा व्यवसाय करोडोंत केला धनेशनी... परंतु रत्नमाला हुशार देखणी आणि सारी सूत्रे स्वतः च्या ताब्यात ठेवणारी होती...म्हणजे धनेशला संपत्ती मिळूनही अधिकार मिळत नव्हते...यावेळी पुन्हा एकदा त्याच सुरेख रुबीच्या नेकलेसचा फास आपसूक आवळला गेला...शिवाय तो हार चलाखीने गायब केल्याने सारेच प्रश्न मिटले. सुवर्णाचे काही जुने फोटो पाहत असतांना मला हा हार तिच्या गळ्यात असल्याचे दिसले. 37 वर्षांपूर्वी चा हा फोटो...बघा सारं सांगून गेला.हाच नेकलेस आभाच्या गळ्यात मृत्यूपूर्वी च्या काही पार्टी मध्ये घातलेला दिसला.धनेश मालपाणी दुबईला गेले असतांना काही सामान शोधतांना जुन्या पेटीत तो आभाला सापडला...अप्रतिम सुरेख होता तो... ती पार्टीत घालून गेली आणि प्रचंड कौतुक झालं तिचं.. मग पुढे काही function तिने तोच घातला...विष सौम्य हळूहळू भिनत गेलं हृदय बंद पडलं. नेमकं मृत्यूच्या पूर्वी संध्याकाळी आपल्या आईवडिलांकडे गेली असता तिनं तो आपल्या खोलीत काढून ठेवला म्हणून तो आमच्यपर्यंत पोहोचला...त्याच रीतसर परीक्षण करून घेताच सारं स्पष्ट झालं.
                    खरं सांगायचं तर आभाचा मृत्यू हा एक अपघात होता पण जाता जाता ती जुन्या गाडल्या गेलेल्या आपल्या सासवांच्या खुनाची उकल करून गेली. ज्या इस्टेटीच्या वारसाची धनेश मालपाणी आभाच्या मुलाच्या रूपाने वाट पाहत होते तो देखिल यात बळी गेला....या जन्मीची पापे याच जन्मी फेडावी लागतात....,"खरंय!" म्हणत रणजीत साहेबांचा जयघोष करीत सगळ्यांनी चषक उंचावले.
समाप्त★★★★★★★★★★
©यशश्री रहाळकर

रविवार, २ जून, २०१९

प्रेषिअस स्टोन

                  'बॅचलर्स पॅराडाईज क्लब' नावाप्रमाणेच उच्चभ्रू रिटायर्ड तरीही एकाकी म्हाताऱ्या पण मनानं तरुण स्वच्छंदी लोकांचा क्लब ... याचे बहुतांश मेंबर अविवाहित होते.शिवाय विधुर ,घटस्फोटीत वगैरे सिंगल्स येथे दिवसरात्र पडीक असत.कॅरम, रमी, चेस सतत मांडलेले असे.....क्लबच्या मालकाने खाण्यासोबत पिण्याचीही सर्व प्रकारची उत्तम व्यवस्था केलेली होती.....त्यामुळे अनेक उच्चपदस्थ रिटायर्ड म्हाताऱ्यांची येथे वर्दळ असे.
                            या सगळ्यांची अत्यंत आवडती व्यक्ती म्हणजे रणजीत वाघमारे.......रणजीत साहेब सी.बी.आय.मध्ये आयुष्य काढलेले आणि अत्यंत नावलौकिक प्राप्त केलेले प्रामाणिक अधिकारी... ह्या चटोर म्हाताऱ्यांच्या क्लबला दर शनीवारी संध्याकाळी ते जरा बदल म्हणून भेट देत. रणजीत साहेब अजूनही नियमित व्यायाम वगैरे करून चपळाई राखून होते.. त्यामुळेच त्यांच्या वयाची दहा वर्षे वजा होत फारतर पन्नाशीचे ते वाटत.. उमदं व्यक्तिमत्व प्रसन्न चेहरा आणि प्रसंग रंगवून सांगण्याची हातोटी ... क्लबला सगळे त्यांची वाटच पाहत. एकदा ते आले की सगळे त्यांच्याभवती कोंडाळ करीत नी एखादी त्यांनी सोडविलेली केस सांगण्याचा आग्रह करीत. रणजीत साहेबही एखादी कथा सांगावी तसे काही गुन्ह्यांच्या कथा सांगत ... सगळे रंगून जात.त्यांच्या गुन्ह्याच्या उकलीपूर्वी "कोण बरं असावा गुन्हेगार?"असं कोडं ते विचारीत.. मग तेथील म्हातारी डोकी लावत बसत... चषक उंचावले जात. टाळ्या नी हश्यात सारेच बुडून जात.
                      अश्याच एका शनीवारी सगळ्यांना रणजीत साहेबांच्या भेटीचे वेध लागले होते... नेहमीप्रमाणे पाच वाजता ते आले नी सगळ्यांनी जोशात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं... welcome drink चा एक राऊंड झाला नी सगळे उत्सुकतेने कथेची वाट बघू लागले.रणजीत साहेब गंभीरपणे सांगू लागले,"कधीकधी गुन्ह्याची उकल करणे दुरापास्त होऊन जाते..विशेषतः खुनाची ... कोणताही खून सिद्ध करायला दोन गोष्टींची गरज असते...." त्यांचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत सारे म्हातारे एकसुरात उत्तरले,"हेतू आणि हत्यार"...रणजीत साहेब खुश होत म्हणाले,"बरोब्बर! जमलं राव तुम्हाला."पुन्हा मूळ कथेकडे वळत म्हणाले,"आज मी सांगणाराय त्या खुनाच्या केस मध्ये ना गुन्हेगाराचा उद्देश कळत होता ना गुन्ह्याचे हत्यार.माझ्या आयुष्यातील अत्यंत किचकट केसेस पैकी एक म्हणजे मालपाणी मर्डर केस."
                        साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वीची ही केस...मालपाणी कुटुंबातील धाकट्या सुनेला एका सकाळी नोकर नेहमीप्रमाणे बेड टी द्यायला गेला तर ती उठलीच नाही.... पुढे सगळे सोपस्कार पार पाडत .....ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. झोपेतच हृदय बंद पडून नैसर्गिक मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले ह्या साऱ्याला सासरच्या मंडळींचा जोरकस पाठिंबा असला तरी सूनबाईंच्या आईवडीलांनी मुलीचा खून झाला तसेच सासरच्यांची संशयास्पद वागणूक नमूद करीत गुन्हा दाखल केला. मालपाणी हे हिरे आणि मौल्यवान रत्ने ह्यांच्या उद्योगातील अत्यंत प्रसिद्ध कुटुंब, मोठे राजकीय लागेबांधे म्हणूनच ही केस अधिक संवेदनक्षम मानली गेली. त्यात मृत सूनबाईंचे वडील मेहता बिल्डर हेही मोठे प्रस्थ... मग काय मीडियाला ऊत आला. पेपरमध्ये वाट्टेल ते छापून येऊ लागलं... अखेरीस ती केस अधिक तपासासाठी सी. बी. आय.कडे सोपविण्यात आली.. पर्यायानं माझ्याकडे आली. तपासाची चक्रे फिरू लागली....
                         मृत आभा राजेश मालपाणी ,वय 34, कुठलाही गंभीर आजार नाही,तब्येत उत्तम 4 महिन्यांची गर्भवती...??? पोस्ट मॉर्टेम मध्ये ठोस काहीही हाती आलं नाही.. मृत्यू रात्री 2 वाजता हृदय बंद पडून झाला होता... कुठल्यातरी गोष्टीची सौम्य ऍलर्जी असावी.... मात्र कोठेही विषबाधा/वळाचे/माराचे डाग नव्हते.पोटात किंवा मेंदूत विष आढळले नाही. मृत्यू नैसर्गिक असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.कागदोपत्री माहिती आणि फोटोंचा नीट अभ्यास करून मी मृत आभाचे आईवडील मेहता बिल्डर ह्यांची भेट घेतली.सर्वसाधारणपणे एकुलती एक लेक गेल्यानं जी काही अवस्था होते आईवडिलांची इथे तशीच होती. मेहता पती पत्नी पार कोलमडून गेले होते.त्यांच्याशी संवाद साधतांना काही गोष्टी मी नमूद केल्या... मृत आभा विवाहाच्या 13 वर्षांनंतर गर्भवती होत्या, त्या ही बातमी समजताच खूप खुश होत्या.त्या त्यांचे सासरे धनेश मालपाणी यांची लाडकी सून होत्या.धनेश मालपाणी यांना त्यांच्या जोतिष्याने आभाला मुलगा अर्थात घराण्याचा वारस होईल ... असे सांगितले होते. ...त्यामुळे दोन्ही कुटुंबाचा आनंद गगनात मावत नव्हता.
              या सगळ्यातून एक महत्वाची गोष्ट मी नमूद गेली की ..इतके वर्षांनी गर्भवती असल्याने आनंदात असणारी स्त्री आत्महत्या करूच शकत नाही. त्यामुळे हा पर्याय संपला.मी मेहता पतीपत्नीचा निरोपघेण्यापूर्वी त्यांना कुणावर संशय आहे का ?असे जुजबी विचारले...एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर त्यांचा संशय नव्हता मात्र त्यांची लेक मृत्यूपूर्वीच्या संध्याकाळी दोघांना भेटून, गप्पा मारून आनंदात गेली होती.....तिचा असा अचानक मृत्यू संशय निर्माण करणारा होता.तेथून निघतांना मिसेस मेहता निरोपाचे बोलल्या,"आभाच्या जावेचा राग होता तिच्यावर...जावेला 3 पोरीचं ...त्यात आमची आभा सुंदर ,हुशार ,सासऱ्यांची लाडली..."
                              तपासाच्या सुया आभाच्या जावेकडे वळवून आम्ही मालपणींच्या घरी गेलो. आभाचा मृत्यू झाला त्या रात्री तिचे सासरे धनेश मालपाणी परदेशात होते...त्यापूर्वी महिनाभर आधीच ते दुबईला कामानिमित्त गेले होते...चार पाचच दिवस आधी नवऱ्याला म्हणजे आशिष मालपाणी ला मुंबईला जावं लागलं...कामानिमित्तच .हा योगायोग जुळून आला होता की घडवून आणला होता?? घरातील सगळ्यांचे जबाब नोंदवून घेतले ...मालपाणी कुटुंबीय आभाचा मृत्यू नैसर्गिकच होता असे एकमताने म्हणत होते.आभाची जाऊ अगदीच गबाळी,अडाणी आणि अखंड घरकामांत बुडालेली अर्थात आभाच्या अगदी विरुद्ध होती...त्यात ती गरीब घरची.आभा मात्र उच्छभ्रू घरातील पार्टी, क्लब असे सर्व छंद जोपासणारी,सुरेख,नीटनेटकी... त्यातही दागिन्यांची आणि matching ची प्रचंड आवड असणारी होती. "आभाचे घरातील नोकर माणसांशी सुद्धा पटत नव्हते...शिष्ट ,हट्टी आणि पार बिघडलेली होती तीे"...जाऊबाई रागाने बोटे मोडीत सांगू लागल्या. गंमत म्हणजे आभाचे पती आशिष आणि दिर सोमेश यांच्यातही कमालीची तफावत होती...अर्थात दोन भावंडे सारखी असतात असे काही नसले तरी दोघांची खाण वेगळीच होती...एकंदर वागणूक,रूप आत्मविश्वास, या सगळ्यात आभाचा पती आशिष सरसच होता . त्यामुळे व्यवसायाची मुख्य जबाबदारी त्याच्यावर सोपविली होती.
                             आम्ही तपास थांबवावा म्हणून मालपणींकडून दडपण आणले जात होते तर गुन्हेगार तात्काळ पकडलाच गेला पाहिजे म्हणून मेहता इरेस पेटले होते. मृत आभा मृत्यूपूर्वी 3/4 दिवस कुठे गेली काय केले याचा एक रिपोर्ट आम्ही बनविला...त्यात अनेक किटी पार्टी ,क्लब वगैरे होते.सगळीकडे अनेकांची भेट घेऊन आभाचे काही फोटोग्राफ्स मिळवले...काही लोकांचे जबाब नोंदवले ..आभा मृत्यूपूर्वीच्या दिवसांत खुश होती असेच निष्पन्न झाले.जे काही घडले होते ते घरातच...मग आम्ही नोकर मंडळींना परस्पर बाहेर भेटून तपास वेगवान केला.सोमेश आणि आशिष हे सावत्र भाऊ असून त्यांचे अजिबात पटत नव्हते.गावाला जाण्यापूर्वी आशिषचे पत्नीशी कडाक्याचे भांडण झाले होते.आभाच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी सासरे धनेश मालपाणी परत येणार होते.... त्याप्रमाणे ते आलेही.सर्वांत अखेरीस घरातील जुन्या नोकराने डोळे पुसत आपले मालक किती सद्गुणी दयाळू आहेत पण दुर्दैवी आहेत...नशिबात सुख नाही असे विधान केले.हा नोकर गेली 40 वर्षे धनेश मालपाणी ह्यांच्याकडे कामाला होता..."शेठजींच्या दोन्ही पत्नी अशाच एका रात्री झोपेत गेल्या...शापित आहे घर शांत करायला हवी." नोकराने सांगितले.....आम्ही उडालोच.
                           रणजीत वाघमारे साहेब कथा रंगत जात असतांना मध्येच थांबले...आपलं ड्रिंक संपवून सगळ्या श्वास रोखून थांबलेल्या म्हाताऱ्यांकडे पाहत म्हणाले...,"अनेकांकडे हेतू होताच आभाला मारण्याचा...कोण असेल बरं खुनी??" सारे म्हातारे सराईतपणे उद्गारले ,"खुनाचे हत्यार तर सापडू दे!" मोठ्याने गडगडाटी हसत रणजीत साहेब पुढील कथेकडे वळले.
क्रमशः......(खुनी कोण???पुढील भागांत)
© यशश्री रहाळकर