फॉलोअर

रविवार, २९ डिसेंबर, २०१९

बिचारी त्यागमूर्ती

               परवा सुट्टीच्या निमित्ताने लेकीला खेळायला पार्कमध्ये घेऊन गेले...तिला मोकाट सोडलं की मी वाचायला मोकळी...अश्या वेळी चौफेर नजर जाईल अश्या एखाद्या बाकावर बसून माझे वाचन सुरू होते.ह्या वेळी मला पुस्तकांची मुळीच गरज नसते. मी माणसं वाचते.होय! मला येतात वाचता. त्यांचा साधा वावर ,देहबोली खूप काही सांगून जाते. तर परवा एक काकू दिसल्या.. दोन नातवंडांना खेळायला सोडून त्या उभ्या राहिल्या...त्या हाताने नाकाला ,गालाला, कानाला नि डोक्याला स्पर्श करत होत्या....सतत ह्याच क्रमाने. थोड्या वेळात माझ्या लक्षात आलं त्यांची एकाच लयीत सुरू असणारी ही क्रिया नॉर्मल नाही.बाकी त्या नीट वाटत होत्या... माझं त्यांच्याकडे पाहणं त्यांना कळलं असावं त्यांनी हात मागे बांधून घेतला... मात्र थोड्याच वेळात पुन्हा तेच.हात रिकामा असला की त्यांच्याही नकळतपणे ही क्रिया त्या एकाच क्रमात सातत्याने करीत होत्या. बिचाऱ्या ! मनाचं हे अस्थैर्य गाठेपर्यंत किती मन मारलं असणार त्यांनी?हे बिचारेपण पावलागणिक बघायला मिळेल तुम्हाला.... आपल्या अवतीभवती अश्या अनेक बिचाऱ्या असतात.मन मारून घुसमटून गेलेल्या,आत्मविश्वास हरवलेल्या,सतत उगाच घाबरणाऱ्या....... कुणी लादलेलं असतं हे बिचारेपण?? खरं सांगू... हे तिचं तिनेच ओढवून घेतलेलं असतं.
                       लग्न होऊन नवी नवरी म्हणून ज्या घरात जातो तिथं जुळवून घ्यावंच लागतं हे जरी मान्य असलं तरी स्वतः स्वतःवर अन्याय करेपर्यंत ... हे मात्र मान्य करता येत नाही. स्वतःच्या क्षमता आणि स्वतः ची प्रतिमा तुमची तुम्हीच घडवत असता, मात्र कालांतराने त्याचा त्रास होऊ लागला की त्याचं खापर दुसऱ्या कुणावर तरी फोडायची सवयच सुखावून जाते.. त्यातून उरते ती एक कंटाळवाणी, रडुबाई. आत्म-सन्मानासाठी आसुसलेली ही रडुबाई मग 'त्यागमूर्ती' नावाची सोनेरी शाल पांघरून मिरवू पाहते.त्यातूनच मग येता जाता मुलांना म्हणायचं ,"मी तुमच्यासाठी नोकरी सोडली/ केली नाही" किंवा,"आज तुझं जे करियर झालंय ते माझ्या त्यागामुळे" 😊 जरा विचार करा कशी गंमत आहे!!! तुम्ही नोकरी करायची की सोडायची हा निर्णय तुमचा स्वतःचा असतो, त्या तान्ह्या बाळाला कुठं काय कळतं? आईने कमावलेल्या पैश्याने जर तिची किंमत ठरत असेल तर त्यासारखं दुर्दैव नाही. साधारण 16/17 वर्षांची मुलगी असणारी एक मैत्रीण सतत रडत असते की "माझी लेक मला बावळट समजते तिला माझं काहीच आवडत नाही...." वगैरे वगैरे.. अखेर गाडी त्यागमूर्तीच्या स्टेशनवर येत,"ह्यांनी मला नोकरी सोडायला लावली " वर येते. मुलांनी किंमत द्यावी वाटते ना! पण स्वतः स्वतःला तुम्ही किंमत देताय का? मी देवानी घडविलेली एक awesome कलाकृती आहे हे तुमचं तुम्हाला तरी वाटतंय का? अखंड पडती बाजू घेत, मोलकरणी सारखी प्रत्येक वस्तू धावत जाऊन हातात देणारी, कायम easy available असणारी, स्वतःचं कुठलंही वेळापत्रक नसणारी, रिकामटेकडी, पडल्या तोंडाने वावरणारी अन्यायग्रस्त आई ...आपणच खतपाणी घालून वाढवत असतो. दिवसभराच्या 24 तासांत 2 तास स्वतः साठी खरंतर प्रत्येकीने काढायला हवेच. एक तास शारीरिक आरोग्यासाठी आणि एक तास मानसिक आरोग्यासाठी. आपण माणूस आहोत यंत्र नाही हे जर तुम्हाला स्वतःलाच पटणार नसेल तर इतरांना ते का पटावे??शारीरिक आरोग्यासाठी औषधोपचार तरी घेता येतील पण ढासळलेल्या मनाचं काय?मग सोईस्करपणे  हार्मोन इंबॅलन्स या लेबलखाली झाकून घ्यायचं. 
                 इतक्या इवल्या गोष्टीत बायका निष्कारण मन मारत असतात.. की कीव येते. एक मैत्रीण काही कामानिमित्त सहजच माझ्या घरी आली ..भाजी करत होते तर तिला पोळी भाजी खा म्हणून आग्रह केला...तिची अत्यंत आवडती साधी मेथीची भाजी तिने 20/ 22 वर्षांनी खाल्ली होती.😢 घरांत सासूबाई आणि नवऱ्याला आवडत नसल्याने हिने मेथी आणलीच नाही.आता बोला!स्वतःपुरती भाजी आणून करण्याचं स्वातंत्र्य होतं, पैसा होता... स्वतः साठी कधीतरी एक भाजी जास्तीची करायला काय हरकत आहे? आणिक एकीने हिवाळ्यात पौष्टिक लाडू केले मात्र स्वतः ती ते खातच नव्हती, "तेव्हढेच मुलांना चार दिवस जास्त पुरतील" असे तिचे उत्तर. बाई ग ! तुला एका ऐवजी 2 किलो लाडू करणे आर्थिक शारीरिक सगळ्याच दृष्टीने सहज शक्य आहे ... मग कशाला हा फुकाचा त्याग?? 
हे सारं पुन्हा बोचलं ते ,"आई कुठे काय करते?" या सिरियलच्या निमित्ताने.. या सिरियलच्या प्रोमोजच मला इतके क्लेशकारक वाटले की ह्या अश्या अनेक आई मला आजूबाजूला दिसू लागल्या.... त्याच वेळी या साऱ्याची दुसरी बाजूही मला तेव्हढीच ठळकपणे जाणवली. सिरियलमधली आई घरातील सगळ्यांसाठी बदाम भिजत घालत असते.. मात्र आईला कश्याला हवेत ? म्हणून स्वतःसाठी मात्र नाही. कुणी सांगितलं बाई तुला हे?स्वतःला बिचारी कोण करतंय इथे? "आईला सुट्टी नसते" का ग बाई? तिनेही हक्काने एक दिवस उशीरा उठावे किंवा दुपारी मस्त लोळत पडावे ... घरात खुशाल सांगून टाकावे ,"आता आग लागली तरी 2 तास उठवू नका कुणी मला." .... काय हरकत आहे? आईपण म्हणजे तुमच्यातील जिवंत माणसाला तुरुंगात डांबणे नव्हे. गंमत म्हणजे हा तुरुंग तुमचा तुम्हीच निर्माण करता आणि स्वतःलाच त्यात अडकवून घेता.
                    मी मिळवती (नोकरी करणारी )आणि गृहिणी ह्या दोन्ही आघाड्यांचा अनुभव घेतलेला आहे. नोकरी करणारीचे प्रश्न प्रचंड भिन्न असतात पण म्हणून तिच्यासाठी कुणी फुलांच्या पायघड्या घालत नाही.गृहिणी म्हणजे अगदीच परावलंबी बिचारी करत तिचा उदोउदो करणेही अगदीच चुकीचे आहे.दुरून डोंगर साजरे म्हणतात ना हे तसे आहे.कधी प्राप्त परिस्थिती किंवा अन्य कारणांमुळे जर मनाविरुद्ध गृहिणीपण वाट्याला आले तरीही ते आत्मसन्मानाने निभावणं किंवा बिचारी होत रडत बसणं ... पर्याय आपल्याच हातात आहे.काही 'आई' त्यांची पुढे मंदिरे बांधावी इतक्या महान असतात.... 17 / 18 वर्षांच्या घोड्या मुलांचे कपडे मोरीत नेऊन ठेवणे,आंघोळीचे पाणी साबण काढून तयार ठेवणे, त्यांनी फेकलेले कपडे गोळा करून धुणे, त्यांच्या शाळा/ कॉलेजच्या बॅग भरून देणे, खोली/कपाटे आवरणे, अगदी घाईत ग बबड्या माझा म्हणत जेवू घालणे... ह्या साऱ्यातून आपल्याच मुलाला परावलंबी पांगळ करतोय आपण. आपली फुकटची कामे वेडी माया वाढवते आणि मुले केरपोतेऱ्याची किंमत देतात हे वेगळे... पण उद्या शिक्षणासाठी परगावी किंवा दुसऱ्या देशात गेल्यावर त्याचे काय होईल हा साधा विचार नाही. उद्या त्याच्या बायकोकडून ह्या मूर्ख अपेक्षा तो करेल आणि त्याचा परिणाम त्याचा संसार मोडण्यात होईल.मुलगा असो वा मुलगी उद्या त्याचा मोडलेला संसार सावरण्यापेक्षा आजच नीट सवयी लावा ना त्यांना. आई म्हणून डबा भरुन ठेवणे तुमचे काम ..मान्य पण तो स्कूलबॅगमध्ये त्याचा त्याला भरू द्या. लहानपणी मुलांना मदतीला घेऊन त्यांचे कपाट/ पसारा आवरा... पुढे तो त्यांचा त्यांना आवरायला लावा. त्यांचे उद्याची तयारी आजच रात्री करून ठेवायची सवय लावा. चहा कॉफी बनवणे, सँडविच करणे, नाश्त्याचे बनवणे ह्या अत्यावश्यक गोष्टी त्यांना त्यांच्या यायला हव्या.
               थोडक्यात त्यांच्या मागे पुढे धावत जाण्याने आपली प्रतिमा आई म्हणून उंचावणार नाही हे लक्षात घ्या. माझी एक मैत्रीण संध्याकाळी घड्याळात साडे सात वाजले की बेचैन व्हायला लागते... बरोब्बर 8 वाजता तव्यावरची पोळी ताटात वाढून नवरा आणि मुलाला ती जेवायला वाढते. यात जराही बदल चालत नाही. त्यांच्या घरी करून ठेवलेली पोळी एकही दिवस चालत नाही.तिचा लेक 24 वर्षांचा आहे... म्हणजे गेली 24 वर्षे ही त्रासदायक सवय तिची तिनेच लावली ना! मग आता ते नकोस वाटून उपयोग काय? उद्या ही म्हातारपणी हे पेलवू शकेल का? उगाच सुपर वुमन व्हायला जायचे अन तोंडघशी पडायचे ह्यातला प्रकार.मी तर म्हणते सासूने लावलेल्या अश्या भन्नाट त्रासदायक सवयी देखील टाळाटाळ करून आपण बदलायला हव्यात..शक्य तेव्हा जरूर करा ना पण कधीतरी ऍडजस्ट करणेही शिकवा घरच्यांना. मी गृहिणी म्हणजे मोलकरीण आहे हे कुणालाही गृहीत धरू देऊ नका .. अगदी स्वतःलाही.
                     सिरीयल मधली शिफॉन साड्यांत वावरणारी, जाहिरातीतील  काही सेकंदासाठी आई झालेली उड्या मारणारी किंवा नातेवाईक, मुलांच्या मित्रांची यम्मी मम्मा पाहून तुम्हाला जर न्यूनगंड वाटत असेल तर एक गोष्ट कायम लक्षात घ्या...समजा तुमचे मूल बदलून सुंदर हुशार बाळ मिळेल असं कुणी म्हणाल तर चालेल का? नाही ना! नक्कीच तशीच आपल्या मुलांना मिळालेली आई बदलण्याची गरज काय? आपल्यातल्या क्षमतांवर विश्वास ठेवा. एक आई आपल्या मुलांसाठी जे करू शकते ते जगातील दुसरी कोणतीच व्यक्ती करु शकणार नाही.आपल्या त्या लाडक्या मुलांसाठी एक आनंदी प्रसन्न निरोगी आई देणं हेही आपलं कर्तव्य आहेच.त्याचसाठी स्वतःला वेळ द्या... आणि मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.तुम्हाला मिळणारा वेळ अनेक छंदांसाठी वापरा ते तुम्हाला भरभरून आनंद आणि वेळ पडल्यास पैसा ओळख देखील देतील... छंद जसे बाग फुलवणे, शिवण,बेकरी विणकाम, वाचन, चित्रकला, गायन ,वादन वगैरे अगदी घरबसल्या करता येण्याजोगे आहेत.
              वेळ मिळत नाही ही तक्रार न करता वेळ काढा.काही कामे खरंच इतकी अनावश्यक असतात ती टाळा.रोज कचऱ्याची डस्टबीन घासण्याची गरज आहे का?आवरआवरी च्या नावाखाली किती वेळ घालवायचा?एकासाठी पोहे दुसऱ्यासाठी उपमा नाश्त्याला करणं बंद करायचं रोज एक पदार्थ होईल आज एकाने ऍडजस्ट करा उद्या दुसऱ्यानं... हे ठणकावून सांगा. स्वच्छतेच्या नावाखाली सिलेंडर धुणारी व्यक्ती माहीत आहे मला....मुळात शक्य नाहीत ती कामे मोलाने द्या, अनेक गोष्टी जसे डाळी,पापड लोणचे तयार घ्यायला लागा. आपण कामाला जुंपलेला हमाल नव्हे.. वेळ काढून घराबाहेर पडा चार मैत्रिणीत मिसळा मात्र ते गॉसिप करण्यापुरते नव्हे तर .. सतत काहीतरी नवीन शिका, स्वतः चे वाहन चालवा.. बँकेचे व्यवहार समजून घ्या... स्वतंत्र व्हा. आई कुठे काय करते? म्हणण्यापेक्षा अभिमानाने आई कित्ती काय काय करते हे पटवून द्या.
                      नवरा किंवा मुलांना माझं कौतुक नाही म्हणत बायका रडवेल्या होतात. कशाला कुणी हवंय कौतुक करायला तुम्ही स्वतः स्वतःचं कौतुक करा ना! आवडीच्या रंगांची साडी नेसा आवडीचा पदार्थ करून खा... काय हरकत आहे एक दिवस स्वतःसाठी जगायला.अनेकदा बायकांना स्वतः चा आवडता रंग सांगता येत नाही... हॉटेलमध्ये गेलं की मेन्यू कार्ड नवरा पाहणार .. सांगा एकदिवस मला अमुक खायचं आहे. महिन्यातला एक दिवस हक्काची सुट्टी घ्या पार्सल आणून खा नवरा मुले तर खुश असतातच पण वेड्या बायकाच कटकट करतात... सुट्टी घ्या निवांत दिवस घालावा.दिवाळीचे बजेट 5000₹ समजा सगळ्यांचे कपडे घ्यायचे ठरले तर लेकीला आवडला म्हणून 3000₹ चा ड्रेस घ्यायचा आणि "मला कश्याला साडी" म्हणत रडायचं थांबवा... निरर्थक त्याग करणं तातडीने थांबवा.खड्यात गेली दुनिया .. एका मर्यादेनंतर स्वतः ला शब्दांची जखम करून घेणं बंद करा ...कुणी काहीही म्हणू देत काही फरक पडत नसतो जगण्यात. सर्वांत महत्वाचं म्हणजे आरोग्याबाबत जागरूक रहा फक्त घरच्यांची काळजी अन स्वतः कडे दुर्लक्ष असे होऊ नये... दुखणी अंगावर काढायची बायकांची वाईट सवय असते.थोडेसे टोकाचे विधान वाटेल पण भारतात सगळ्यात स्वस्त काही असेल तर स्त्रिया .. एखादी मेली खंगून तरी दुसरी बायको मिळायला महिनाभरही थांबावे लागत नाही इथे.कुणीही इथे अमर नाही, आपण कधी मरणार हे आपल्यालाही ठाऊक नाही. शेवटच्या दिवसांत माझे जगायचेच राहून गेले हे दुःख कवटाळत जाण्यापेक्षा तृप्त समाधानी मनाने निरोप घेऊया... पण त्यासाठी आधी भरभरून जगून तर घेऊयात.
🔏© यशश्री रहाळकर

बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

नदीकडची आजी

              ही कथा तिची आहे की माझी? खरंतर दोघींचीही नाही... तिचं आयुष्य अथांग पसरलेलं वाळवंट होतं... सुखाची काही तुरळक मुरुद्याने सोडलीत तर... त्यातली मूठभर वाळू जेमतेम माझ्या वाट्याला आली.मात्र ही वाळू दर वेळी चिमूटभर पुरवून पुरवून मी आजवर वापरते आहे. ती माझी काकू आजी असावी... मधे बरेच चुलत चुलत होते... नेमके किती? मला नीटसे माहीत नाहीत. तिनेही कधीच ते जाणवू दिले नाही."नदीकडची आजी" हे अस्मादिकांनी दिलेलं नामाभिधान... माझ्या सुदैवाने मला भरपूर आज्या होत्या... पणजी आजी,आजी, आईची आई वडिलांची आई, काकू आजी, मावशी आजी...या सगळ्यात मी नुसते "आजी" म्हटलं की ऐकणाऱ्याचा गोंधळ व्हायचा... त्यातल्या त्यात ह्या आजीचे घर नदीच्या बाजूला...खरंतर अगदी काही पैनगंगेच्या किनारी नव्हतं... पण तरीही तिच्या नदी घराजवळ म्हणून ती झाली नदीकडची आजी...मी तिला कधीही शरयू आजी म्हटलं नाही...अगदी काल ती गेल्याचं देखील आईला सांगतांना मी म्हणाले,"आई ... नदीकडची आजी गेली"
                   एखादी व्यक्ती ह्या विश्वाच्या पसाऱ्यात कुठेतरी असते... ती तिच्या जगात आपण आपल्या जगात व्यस्त असतो... वर्षांच्या आकड्यात आपल्या भेटी झालेल्या नसतात... ही पिढी स्मार्ट फोन वापरणारी नसल्याने digital touch सुद्धा नसतो...तरी ती व्यक्ती आहे ... कुठेतरी आहे हे आपल्याला पुरेसं असतं.एक दिवस ती प्रिय व्यक्ती exit घेते नी आयुष्याच्या तलम पदराचे दोन रेशीम जणू ओढून घ्यावे तसे आतून आपण ओढले जातो.आठवणींचे कोलाज भवताली फेर धरून नाचू लागतात.ओंजळीत उरलेल्या तेव्हढ्या आठवणी आपल्या असतात हक्काच्या स्वतंत्र... तिच्या माझ्या आठवणींचा पेटारा उघडून तर बसलेय बंद करता येणार नाही कधीच माहीत असतांना.
                      ती मला आठवते तिच मुळी अंगभर सुरकुत्यांची साय लेऊन... विलक्षण खंबीर आणि तेव्हढीच प्रसन्न निर्मळ... आरपार.मी तिला कधीही पराभूत , हरलेलं, वैतागलेलं, संतापलेलं पाहिलंच नाही...तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान शांतता यांचा संगम असणार हास्य कायम असायचं.. हे हास्य जीवनानी तिला सहज दिलं होतं ,असं मुळीच नव्हतं. ही तिची साधना होती, तपश्चर्या होती... आयुष्यभराची.जगण्याच्या अनेक कडव्या परीक्षांतून ती तावूनसुलाखून निघाली होती...मी लहानपणी बरीच रडत राऊ होते .. अनेक लहानमोठ्या गोष्टींत गळे काढायचे..तेव्हा ती कायम सांगायची,"ह्यात तिच्या ! एव्हढंच ना. आपण हसायचं मग कठीण सोप्प होऊन जातं"... तिनेही असंच केलं असावं ... तिच्याकडे गेलं की खरंच सारं सोप्प होऊन जायचं.
                    माझी शाळा तिच्या घराजवळ होती.. त्यामुळे मधल्या सुट्टीत मी डबा घेऊन तिच्या घरी दाखल व्हायची. मग अर्धा तास तिला वक्ता आणि मला श्रोता मिळायचा... ती मला "फुटाणा" म्हणायची..माझ्या अखंड बडबडीचा तिला कंटाळा येत नसे...तिच्याशी काहीही बोलायला,विचारायला कधी भीती संकोच वाटलंच नाही. फार भोचक आगाऊ प्रश्नांना पाठीत धपाटा मिळत असे... अगदी वर्गात काय झालं पासून कोण काय म्हणाली ?मग मी तिची कशी जिरवली वगैरे सारं तिला सांगायचे.कधी ती मला कविता वाचायला सांगे तर कधी इतिहासातले धडे... त्यातही शिवाजी महाराज किंवा टिळकांचे धडे वाच म्हणायची...तिला मवाळ काही नको असायचे अगदी गांधींचे धडेही. या आमच्या खास हक्काच्या अर्ध्या तासात माझ्यासाठी तिने राखून ठेवलेला काहीतरी खाऊ असायचा... कधी मुरमुऱ्याला तिखट मीठ तर कधी घासभर साबुदाणा खिचडी. माझा अत्यंत प्रिय साखरांबा ...ती फोडींचा साखरंबा झक्कास करायची... अजूनही जिभेवर चव राहिलीये एव्हढा झक्कास...
                    नदिकडची आजी ... "आजी मटेरियल" अजिबात नव्हती तर मैत्रीण अधिक होती. त्या वेळी हिट असणार आलिशा चिनॉय चं मेड इन इंडिया हे गाणं तिचं आवडतं गाणं होत... तेव्हाही आणि आजही मला गंमत वाटते... हे गाणं तिला आवडायचं?का कोण जाणे?? ☺हे काय आजीजोगं गाणं आहे?? ...इतर आजींसारखं ,"मुलीच्या जातीने असं करू नये" हे घाशीव वाक्य तिने कधीच ऐकवले नाही.तिच्यासाठी हे करावे आणि ते करू नये ह्याचे नियम पक्के होते आणि ते सगळ्यांना सारखे लागू असायचे... त्यात भेदभाव नव्हता. स्वच्छता,नीटनेटकेपणा कमालीचा होता... कधी तिच्या घरात काडी कचरा पाहिला नाही की पसारा पाहिला नाही... सुरेख एका दिशेने सारवलेलं घर अंगण असायचं... झाडांवर विशेष माया होती तिची ... तिच्या अंगणात पपई होती तिची विशेष लाडकी ... पाणी घालतांना हळुवार हात फिरवायची तिच्या बुंध्यावर ... काय गुपित होतं तिलाच ठाऊक... पण भरपूर पपई यायच्या अतिशय गोड चविष्ट.
                कधीमधी माझ्यासोबत एक दोन मैत्रिणी सुद्धा डबा खायला मी घेऊन जायची तिच्याकडे... तिने कधी कपाळावर आठ्या पाडल्या नाहीत... जो काही घासभर खाऊ असेल तो तिघींना वाटून दिला जाई..आम्हा सगळ्यांशी तिच्या गप्पा होत असत... माझ्या या मैत्रिणींची जात कधीही तिने विचारली नाही... मी तिची होते मग माझ्या मैत्रिणीही तिच्या झाल्या.संपर्कात येईल त्या प्रत्येक माणसाला जीव लावणं तिला खासच जमायचं.माझ्या आईबाबांवर तिची विलक्षण माया होती म्हणूनचं की काय कणभर अधिकच प्रेम ती माझ्यावर करायची. नाते थेट होते की नव्हते माहीत नाही... मात्र मर्मबंध होते... विश्वास बसणार नाही इतके दाट होते.
                  एकदा नावडती भाजी मी डब्यात तशीच ठेवली... फेकायला जाणार एव्हढ्यात ती गंभीरपणे म्हणाली,"अन्न फेकतांना आपण कुणाकुणाचा अपमान करतो माहीत आहे... शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा, त्याच्या बैलांचा, आपल्यासाठी ती भाजी आणता यावी म्हणून कष्ट करणाऱ्या वडिलांचा आणि आपले पोट भरावे म्हणून स्वयंपाक करणाऱ्या आईचा..." मी नुसतीच भाजी पटकन खाऊन टाकली...तिचे शब्द मनावर कोरले गेलेत ते कायमचे... तिला अन्न वाया घालवणे, फेकणे माजोरड्या सारखे नासवणे मुळीच आवडत नव्हते,"अन्नाचा माज करायचा नाही" कायम म्हणायची.तिच्या जवळ पांढऱ्या पोलोच्या गोळ्या असतं... बरेचदा त्या मला मिळायच्या.मात्र त्या ती लपवून ठेवायची.. दर वेळी नवीन डब्यात डबा घालून...
                    देवावर नितांत श्रद्धा होती तिची... ती आठवते ती अखंड देवाचं नाव घेतच.. ती सतत जप करत असायची...त्यात कोणतेही अवडंबर नसायचे..केवळ निखळ नामभक्ती... कण्हेरीच्या फुलांच्या पाकळ्या करून ती देवपूजा करायची... माझ्या अती आगाऊ स्वभावाला साजेसे एकदा तिला विचारलंच,"एव्हढी दारात फुलं आहेत पाकळ्या का ग वाहतेस?" तिला गंमत वाटली हसत हसत म्हणाली, " टोणग्या फुलांनी देव झाकून गेलेले नाही आवडत मला... हात जोडले की दर्शन व्हायला हवे." बालाजी मंदिराच्या मागच्या पायऱ्यावर तिचं घर... आपलं खडतर आयुष्य बालाजीच्या कृपेनेच पार लावल्याचं ती कायम म्हणायची... तिचं आयुष्य कसं होतं हे समजून घ्यायचं तेव्हा माझं वय नव्हतं... पुढे मोठी होतांना हळूहळू कळत गेलं...एखादी कादंबरी व्हावी इतकं सारं तिच्या आयुष्यात होतं... नवरा, तरुण अपत्ये यांची मरणं होती, मुलांची पोटं भरणं रोजचा दिवस ओढणं प्रत्येक दिवस नवा प्रश्न असायचा... मात्र तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता तिने कधीही लोप पाऊ दिली नाही.दुर्दैवाचे दशावतार पाहिले पण ना कधी नशिबाला कोसलं ना कधी विधात्याला...कधीही कुठलीच अपेक्षा तिनं केली नाही ना आजूबाजूच्या माणसांकडून ना नशीबाकडून.
                   तिच्या पंचाहत्तरीला मी तिच्यावर तोडक्या मोडक्या शब्दात केलेली कविता तिनं पुन्हा पुन्हा आठवण करून देत मागून घेतली...तिनं पुढे बऱ्याच जणांना ती खूप कौतुकानं दाखवली.तिची माझी शेवटची म्हणावी अशी भेट साधारण 3 वर्षांपूर्वीची... तिची पणती पाहण्याच्या निमित्ताने तिलाच भेटायला गेले... खरंतर, तेव्हाच ती फार थकली होती... मी तिला मऊसूत साडी घेऊन गेले... तिला मनापासून आनंद झाला...,"आता मी कधी नेसू ही? किंवा कश्याला मला"असं काहीही कटू ती उच्चारली नाही...मोठ्या प्रेमाने तिनी साडी उकलली.. बराच वेळ शांतपणे ती त्यावर हात फिरवत बसली ... वस्तूमागचं प्रेम माया तिला कायम अधिक कळतं होती. आमच्यातली मधली वर्षे जणू गळून पडली पुन्हा मस्त मोकळ्या गप्पा मारल्या तिनं...माझी लेक पाहून तिला माझं बालपण आठवलं... "अगदी तुझीच कॉपी आहे फुटाणा आहे बोलायला "म्हणत मायेनं कवटाळलं... तेव्हाही गात्र थकलेली असूनही मिश्किलपणा कायम होता... मला म्हणाली,"रोज सकाळी डोळे उघडले की वाटतं अरेच्चा! मी आहे अजून?" वयोमानाने थकलेल्या शरीराला कंटाळली होती ती... त्यात लहानमोठ्या पडझडी... हात मोड पाय मोड सुरूच असायचे... तीच सहन करू जाणे तो त्रास.... कधीकधी मृत्यू अनेक वेदनांचा शेवट असतो... या अर्थी ती ह्या विश्वाच्या जंजाळातून सुटली.ती जिवंतपणीच एव्हढी तृप्त समाधानी होती की नक्कीच मोक्षाची वाट तिला लाभली असणार..
                 काल नदीकडची आजी गेल्याचं कळलं ...
अन योगायोगानं 90's हिट्स मध्ये नेमकं मेड इन इंडिया गाणं लागलं..... काल पोलोच्या गोळ्याही आणून ठेवल्या ... अजून खाव्या वाटल्याच नाहीत.
माझं बालपण एक केक मानलं तर नदीकडची आजी चेरी ऑन टॉप होती....तिच्या अनंत आठवणींचा पेटारा खुला झालाय... जमेल तसा आवरतेय...
15/11/2004 रोजी केलेली तिच्यावरची ही कविता
तिलाच स्मरून.......
प्रिय आजी
तुझ्या अंगणातली पपई
आता पूर्वीसारखी बहरत नाही.
कण्हेरीही आता
पूर्वीसारखी फुलत नाही.
अजूनही दिसतेस तू
पायऱ्यांवर बसलेली...
नेहमीसारखं गोडसं
गालातल्या गालात हसलेली.
तुझ्या प्रत्येक आठवणीबरोबर
आठवतो पाठीत बसणारा
खमंग धपाटा..
अजूनही तोच आहे
तुझा कामाचा सपाटा.
माझे तुझ्या सहवासातले
जरी आहेत थोडे क्षण
वेळोवेळी जाणवलय मला
तुझं खंबीर मन.
नदी आटली, गाव सुटलं
तरी तू नदीकडची आजी
आजही धपाटा खायला
आहे मी राजी.
आज तुझ्या पंचाहत्तरीला
काय देऊ शुभेच्छा
आरोग्य, सुख, शांती लाभो
हीच माझी सदिच्छा!
तुझं हास्य फुलत राहो
नावाप्रमाणेच खळाळतं
चेहऱ्यावरचं तेज राहो
ताऱ्याप्रमाणे झळाळतं.
© यशश्री रहाळकर

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९

सुगरणींचा दरबार

                    स्त्री देह धारण करून जन्मलेल्या तुमच्या आत्म्याचं महापातक काही असेल तर ते म्हणजे स्वयंपाकात रुची नसणे...पुढे गती नसणे ओघानं आलंच. कारण स्वयंपाकाची आवड असल्याशिवाय प्रयोग होत नाहीत, मग जुजबी चालढकल चालते आणि त्यात गती असणं अशक्यप्राय बनतं.त्यातही तुम्ही एखादा नरक स्कीप करून आले असाल तर तुमची सासू सुगरण असते आणि साहजिकच तिचं लेकरू उर्फ पतीपरमेश्वर प्रचंड खवय्या (स्पष्टपणे सांगायचं तर खादाड)असतो.. तुमच्या प्रत्येक पदार्थाला नाके मुरडून मुरडून तो तुमची जिरवतो आणि नवीन काही पदार्थ करण्याचा एकवटलेला राहिला साहिला उत्साह वाहून जातो. बरं... आपण ज्या समाजात राहतो ना तिथं एकवेळ तुम्ही निरक्षर असलं तरी चालतं पण स्वयंपाक मात्र यायला हवाच... खरेतर आज प्रत्येकाला जुजबी स्वयंपाक यायला हवा... घरापासून दूर राहणारे, परदेशी शिकायला गेलेले मुले मुली थोडेफार पदार्थ गरजेपोटी शिकतातच.. मात्र एखाद्या बिचारीला रोजचे वरण, भात, भाजी, पोळी तर निभावता येते पण बाकी स्वयंपाकात फार काही उजेड पडत नाही ...तिचा निभाव लागणे अवघड होते. त्यात ती जर गृहिणी असेल तर तिने बल्लवाचार्य असलेच पाहिजे...अश्या वेळी तिला सुगरणींच्या दरबारात हजेरी द्यावीच लागते. वेळ पडली तर लोटांगणे देखिल घालावी लागतात....
                    सुगरण ह्या शब्दामुळे सगळ्यांत पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतो तो सुगरण पक्षी.. घरटे तर सगळेच पक्षी विणतात मात्र सुगरणींचा खोपा म्हणजे कमाल कौशल्य, नजाकत,नेटकेपणाचा कस. याच दाखल्या वरून एखाद्या निष्णात अन्नपूर्णेला सुगरण म्हणत असावेत..थोडक्यात स्वयंपाक काय कुणीही करतं.. पण स्वयंपाक करतांना कमाल कौशल्य वापरते ती सुगरण...अशी आपली माझी व्याख्या.यात एक गफलत अशी की सुगरण पक्षी घरटे विणतो आणि पक्षीण केवळ हवं ते, योग्य वाटेल ते घरटं निवडते...आपल्या जगात सुगरण तिचं असते.. (काही प्रसिद्ध शेफ असतात पण घरी त्यांच्या बायकाच करतात स्वयंपाक) वेगवेगळ्या पाककृतींवर हुकमी अधिसत्ता गाजवणारी साम्राज्ञी.... मुदपाकखान्यात जाताच तेल तिखट मीठ जिन्नस तिला पाहून चळाचळा कापतात आणि निमूट प्रमाणात पडतात...जिचं कोणतंच पीठ कधी सैल होत नाही आणि जी सातत्याने आपले अगाध ज्ञान तपश्चर्येच्या विविध प्रयोगांनीशी अधिक सिद्ध करत असते... ती खरी सुगरण. जिचा नवरा कधीही आईच्या हातचे अमुक ढमुक असे तुणतुणे वाजवत नाही.. आणि पोरे बाळे आईच्या कौतुकाचे गुणगान गाताना थकत नाही... होय तिचं तर खरीखुरी सुगरण....यात तिच्या सासूने कौतुक (चुकून) केले तर ती मास्टर शेफ असणारच ..... काय सांगता?? असे काहीच घडत नाही तुमच्याकडे...आता नमनाला घडाभर तेल ओतले आहेच तर सांगते... आधी अशी वरील नमूद लक्षणांनी युक्त सुगरण स्त्री शोधावी... नंतर तिच्या दरबारी लीन व्हावे... हीच सुगरण बनण्याची पहिली पायरी आहे आता तुम्ही सुगरण झालाच म्हणून समजा
                      तुमचा जर समज असेल की अशी सुगरण मैत्रीण, बहीण , काकू...वगैरे आशीर्वादाचा हात मस्तकावर ठेवेल आणि तुम्ही सुगरण व्हाल तर ही केवळ अंधश्रद्धा आहे.☺ त्या सुगरणीला डोळ्यांदेखत एखादा पदार्थ करतांना पाहून आपण तस्साच करू शकू हा फाजील आत्मविश्वास शुद्ध वेडगळपणाच आहे... माझी एक सुगरण मावशी... गॅसच्या चारही शेगड्यांवर एकाच वेळी चार फोडण्या टाकते... तिचे चारही पदार्थ अप्रतिम चविष्ट होतातच... कश्यात काही अधिक उणे नाही...अश्यावेळी तिच्या झटपट हालचाली एखाद्या कसलेल्या गायकाच्या गान-मैफिली सारख्या सच्च्या आणि काळजाला भिडणाऱ्या असतात...आहाहा! ... पण नंतर त्यातला एकही पदार्थ काय घालून अन काय प्रमाणात घालून केला हे मात्र मी सांगूच शकत नाही.स्वयंपाक करून येऊ शकतो पण नुसता पाहून मुळीच नाही....त्यात ह्या सुगरणींना तुम्ही पाककृती .. रेसिपी हो! विचारूच नका... त्यांच्या हातांना वस्तू न मोजता प्रमाणात घालायची सवय झालेली असते. एखाद्या मेरीट स्टुडंटने उत्तरे दाखवली तरी आपल्याला ती कॉपी करता येऊ नयेत इतकी अवघड असतात... जसे शीग लावून डाळ घे, गुलाबी रंगावर परतून घे (गुलाबी???), पोटातून ओल्या असतांना वाटून घे, अधमुरं दही घाल... एका बाजूने तळ, जास्त घट्ट नाही अन् जास्त पातळ नाही,साखर घाल उगाच आपली नावाला???? देवा रे! ह्या सगळ्याचा बाप म्हणजे 'पाक'.... ह्या पाकावरूनच पाककला हे नाव यथार्थपणे सिद्ध होते. अर्ध कच्चा अर्ध गोळीबंद पाक करून माझी आजी लाडू मुरत घालायची... काही तासांनी ते वळले जात.. चव अर्थात झक्कास... मात्र त्याच क्षणी मी आयुष्यात पाकातले लाडू  न करण्याची भीेष्मप्रतिज्ञा केली. पाक ह्या शब्दाचा अर्थ पवित्र होत असला तरी तो फसला की जी काय नासधूस होते ते महापातकच होय.
                         एखाद्या सुगरणीला मार्गदर्शनाला बोलावून बाजूला उभे करावे नि आपण शिकावे असा विचार करत असाल तर तोही साफ आपटणार. सुगरण स्त्री नुसती बाजूला बसू शकत नाही. तिचे हात स्वयंपाक घरात लगेच शिवशिवतात... तुम्ही मंद आचेवर रवा भाजत असतांना ती खवा भाजून , नारळ खवून,पाक करून पुढच्या चार पायऱ्या पूर्ण करणार...थोडक्यात पदार्थ 75% तिचं करणार... नंतर स्वतंत्रपणे नारळीपाकाचे लाडू तुम्हाला कसले येताहेत.... मग दर वेळी धरा तिचेच पाय.... वर त्या लाडूला तुमचे वंशज मावशीचे किंवा काकूंचे लाडू असे नाव देणार हे वेगळेच.रेसिपीची पुस्तके देखिल मिळतात अगदी ढिगाने... झटपट नाश्ता 101 डिश, रोजचे पदार्थ 151 पाककृती, आईसक्रीमचे 501 प्रकार,1001 गोड पदार्थ असे चढत्या क्रमाने उपलब्ध पुस्तके घेतल्यावर शेवटी एक जमला तर शप्पथ! ह्या मुद्द्यावर यावे लागते... बाई ग तुझे 999 ठेव तुलाच मला एक तरी नीट जमू दे...... अर्धा इंच आलं , 137gm मैदा ,2.4gm खायचा सोडा... असं कुणी करतं का राव ??त्यात ह्या पुस्तकांतील देखणी चित्रे बघून अवसान ढासळते... आणि कुरुक्षेत्रावर उभ्या अर्जुनासारखे आपण शस्त्रच खाली ठेवतो.
                       यु ट्यूब वरच्या रेसिपी किंवा एखाद्या नकटीचे रेसिपी शो जर तुम्ही फॉलो करत असाल ना तर एक लक्षात घ्या ... तुम्हाला 2 महिन्याच्या किराण्याएव्हढे पदार्थ निव्वळ सजावटीला लागणार आहेत...2 कप काजूची पूड / वाटीभर पिस्त्याचे काप/ दोन वाट्या ताजी साय/ वाट्यांनी तेल तूप अबब! एव्हढं घालूनही पदार्थ तस्साच होत नाही... कारण झटपट भिजवणे,चटपट परतणे,120 ला बेक करणे आणि हलक्या हातानं चिमूटभर सोडा घालणे अश्या क्रिया काही जमत नाहीत...मग तुम्ही निर्लेप चे तवे, कढई...मॉल मधून भरमसाठ किंमतीला आणता. गेला बाजार मातीचे,तांब्याचे,बीडाचे आणि कश्या कश्याचे भांडे आणता. (सध्या स्टीलच्या कढया/ कुकर्सचे कौतुक बोकाळले आहे).एव्हढं करून तयार झालेला पदार्थ खाताच... खाववत नाही अन फेकवत नाही अशी अवस्था होते... नेमकं काय बिघडलं ते मात्र उमजत नाही...मात्र पुन्हा तो पदार्थ करायची हिम्मत खचते... घरात तुमच्याशिवाय कुत्रेही त्याला तोंड लावत नाही..नवरा झापतो ते वेगळं...आणि दर वेळी त्या पदार्थाचे नाव घेऊन तुमचा उद्धार होतो ... जसं एखादा केक... तूप साखरेचं प्रमाण बिघडून बसला थोडक्यात फसला तर घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला चोमडे कन्यारत्न ,"बाबा बेकरीतून विकतच आणा हं केक... आईच्या केकच्या वड्या होतात" ... मग बापलेक टाळी देत हसतात किंवा दर वेळी मॉल मध्ये केकच्या सामानाचे सेक्शन आले रे आले की नवरा काहीतरी अश्लाघ्य दिसल्या सारखा तुम्हाला तिथून खेचू लागतो... चार लोक पाहताहेत याचीही पर्वा न करता.... हात जोडत "आता पुन्हा नको ग बाई" विनवणी करू लागतो. मग सुगरण व्हायचे कसे??उत्तर सोप्पे आहे...सुगरणींचा दरबार जॉईन करून  
                    सुगरणींचा दरबार ... अर्थात विविध सोशल मीडियावर(fb, whats app वगैरे) असणारे पाककृतींचे ग्रुप... यांची नावे साधारण रुचिरा, सुगरण, आईच्या हातची चव, पूर्णान्न वगैरे पठडीतील असतात. पुढे त्याचे व्हेज/ नॉनव्हेज झटका असे मुख्य दोन प्रवाह आहेत. प्रादेशिक वादातून त्यात राजस्थानी चविष्ट पदार्थ, साऊथचे रस्सम, अस्सल महाराष्ट्रीयन, बंगाली स्वीटस, गुजराथी चाट..... असे अनेक उपप्रकार पडतात.जरा देशाच्या सीमा ओलांडायच्या असतील तर कॉन्टिनेन्टल, थाई, इटालियन... वगैरे देखील दरबार आहेत. या दरबारात जगभरातील अनेक विद्यार्थी डोके टेकवितात... अनेक पदार्थांवर हुकूमत असणाऱ्या सुगरणी अहोरात्र लोकांच्या उत्थानासाठी झटत असतात. भिशीचा मेन्यू, पार्टी चा मेन्यू... इथपासून तर चार माणसांना किती वाट्यांचा रस लागेल, दहा माणसांना किती बटाट्याची भाजी लागेल असे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. एखाद्या पदार्थाची कृती तर मिळेल पण तो बिघडल्यास काय करायचे ह्याचे प्रात्यक्षिक देखील मिळणारच.. अनारसे हसले तर काय करायचे अन लाडू वळले जात नाही तर कसे बांधायचे.... उरलेल्या अन्नाचे नवीन पदार्थात बेमालूम रूपांतर ...सारे सारे अगाध ज्ञान येथेच प्राप्त होते. त्याचबरोबर तुम्ही कितीही बेसिक प्रश्न विचारला जसे "पुरी टम्म फुगायला काय करायचे?" तर कुणीही तुमची टिंगल करत नाही.. उलट सुगरण गुरूंना एक प्रकारचा ज्ञान दानाचा अवीट आनंद त्यातून प्राप्त होतो. दुसऱ्या बाजूला तुमच्या घरच्या कुणालाही नाके मुरडू देत पण ग्रुप वर कंमेंट अन लाइक्स ची बरसात तुम्हाला प्रोत्साहन देत असते.हळूहळू तुम्ही पाककलेत पारंगत होत जाता....मुळात स्वयंपाक करणे ही आनंददायी प्रक्रिया असल्याची ज्ञानप्राप्ती तुम्हाला याच दरबारात होते. अधून मधून गुरूंचा जयघोष मात्र करायलाच हवा हं !... त्याशिवाय त्यांना आनंद मिळणार तो कसा?
                          एकदा तुम्ही ह्या दरबाराचे पाईक झालात की काही पथ्ये/ नियम कटाक्षाने पाळावे लागतात. इन्स्टंट हा शब्द कायमचा मनातून काढून टाकणे, स्मार्ट वर्क न करता हार्ड वर्कच करणे, पारंपारिक पदार्थांचा ज्वलंत अभिमान बाळगणे..."पोळ्यांची बाई" म्हणजे शिव शिव ... कसे काय लोक खातात बाईच्या हातच्या पोळ्या.. माझ्या अश्या मऊसूत होतात. .... विकत पदार्थ आणणे महापाप. घरचेच अन्न चवीचे बाहेरचे वाईटात वाईट... "माझ्या मुलांना माझ्याच हातचा पिझ्झा आवडतो बाहेरचा मुळीच नाही" असे सांगणारीच्या मुलांना आपण कालच पिझ्झा हट मध्ये पाहिल्याचे मुळीच बोलायचे नाही. नवऱ्याला पौष्टिकतेच्या नावाखाली उकडलेल्या भाज्या खाऊ घालणाऱ्या सखीचा नवरा कालच शेजारच्या टेबलवर बसून मिसळ आणि जिलब्या चापत होता हे विसरून जायचं. वाटण.. पाट्या वरवंट्याच.. मिक्सरची चव छ्या! वेलची खलबत्त्यात कुटून , जायफळ सहाणेवर उगाळून, नारळ खवून, पीठं घरघंटीची, कुंडीतल्या मिरच्या अन कढीपत्ता ... कितीही तयार मिळालं तरी सगळं कसं घरीच करायचं.... शिवाय अजून एक सिद्धी प्राप्त असायला हवी मुलांना न आवडणाऱ्या भाज्या / फळं बेमालूम त्यांना खायला घालायची.मी कसे कमी तेल वापरते.. मी कशी आरोग्य जपते हेही सांगणे जमले पाहिजे... तूप जरा करपले तर काय करायचे? असा प्रश्न असेल तर खरे उत्तर आहे पुढील वेळी अधिक लक्ष देऊन काळजीपूर्वक करायचे... मात्र हे उत्तर दरबारात चालत नाही त्यात लवंग घाल, विड्याचे पान घाल असे काही बाही सुचवीत राहायचं. साधी इडली किंवा थालपीठ केलं ना तरी फोटो काढायचा नि दरबारी पेश करायचा... अय्यो!भाजणी विकतची आहे किंवा इडलीचे पीठ अप्पाचे आहे हे कश्याला सांगायचे??अश्या प्रकारे दरबारात हजेरी लावली की लोक हळूहळू तुम्हाला सुगरण म्हणून ओळखू लागतात. मग बिंधास्त सांगायचे दोन वाटी रव्याला 2 वाट्या साखर लागतेच ग! चांगलं दीड वाटी तूप घे...... तिच्या घरचं जातंय ना! झाला लाडू तर ठीक नाहीतर बसेल बोंबलत.
© यशश्री रहाळकर

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

नथ

                 सध्या सोशल मीडियावर "साधी राहणी ग बाई माझी" असे ढोल वाजविले जातात.मला कशी दागिने आणि भारीच्या साड्यांची मुळ्ळीच आवड नाही ... असे वारंवार सांगितले जाते.... आणि गंमत म्हणजे ह्या बायकांचे dp /फोटो ह्या विधानाच्या अगदीच विपरीत सत्य उघड करत असतात .मी नाही त्यातली अन् कडी लाव आतली अशातला हा प्रकार..... दागिन्यांची आवड नाही असे असूच शकत नाही... कदाचित घालायची सवड आणि सांभाळायची जोखीम न परवडणारी असू शकेल.अर्थात दागिन्यांचा संबंध कोणत्याही विशिष्ट धातूला अधोरेखित करीत नाही बरं!  हिऱ्यांचे, सोन्याचे किंवा सध्या चर्चेत असणारे प्लॅटिनमचे महागडे दागिने म्हणजेच दागिने असतात का हो?? आमचे जग खऱ्या अर्थानं पिवळं धम्मक केलं ते 2 ग्रॅम, बेनटेक्स वगैरे दागिन्यांनी... पण भारतीय स्त्रियांना सोन्याची चमक भुरळ घालते यात शंकाच नाही.
                      एका थोर विदुषिने फेसबुकवर #नवऱ्याने पाडव्याला मला खरे अनमोल दागिने भेट दिले ... असे म्हणत स्वतःचा पुस्तकांसोबत फोटो टाकला... मी कशी पुस्तकप्रेमी आहे हेच यातून दाखवायचे असावे पुस्तके अनमोल निश्चित आहेत...ते भेट म्हणून देणे यात काहीच गैर नाही मात्र पाडव्याला नवऱ्याने पुस्तके भेट देणे... म्हणजे पाणीपुरीवाल्याकडे पिझ्झा मागण्या सारखं आहे... मला तर कल्पनेत सुद्धा ती महान हस्ती एखाद्या समारंभात गळ्यात हातात पुस्तके बांधून दिसते☺☺ कदाचित काही पुस्तके वाचून तरी तिच्या विचार आणि वर्तनात बदल होईल अशी आशा बिचाऱ्याला वाटली असावी...पुस्तके आणि दागिने ह्यांची तुलना म्हणजे ईश्वराची नश्वराशी तुलनाच आहे... प्रत्येकाची योग्य जागा असते तेथेच ते शोभून दिसते...माझ्यासारख्या संसारी व्यक्तीला नश्वराने भुरळ घातली तर चूक काय त्यात?...मुळातच लोक पुस्तके किती वाचतात? त्याहीपलीकडे त्या पुस्तकात नेमके काय आहे? ह्या अत्यंत महत्वाच्या विषयाची चर्चा होण्यापेक्षा पुस्तकांची आकर्षक ,महागडी प्रदर्शने दिवाणखान्यात मांडून मी कशी उच्च अभिरुची बाळगून आहे.. मराठीचे संवर्धन, संरक्षण जणू माझेच खांदे वाहत आहेत... अशी जाहिरातबाजी हल्ली सोशल मीडियावर प्रकर्षाने होतांना दिसते.....अश्या पोस्ट चुकूनही फॉरवर्ड होणार नाही (थोडक्यात आपापल्या नवऱ्यापर्यंत जाणार नाही )याची आपण प्रत्येकीने दक्षता घ्यायलाच हवी.... त्यात पुस्तके भेट देतांना मागच्या अनेक वादांचा वचपा नवरा काढू शकतो...जरा खर्चाला सैल असणाऱ्या बायकोला ,'पैश्याने पैसा वाढवूया' अश्या सारखे पुस्तक  तर हात राखून खर्च करणाऱ्या बायकोला  'आर्थिक मंदीची गणिते'... असे पुस्तक खऊट नवरे भेट देतील.आर्थिक नियोजनात लक्षच न घालणाऱ्या आळशी बायकोला 'शेअर बाजाराचा अभ्यास' तर स्वयंपाकाची जरा कमी आवड असणाऱ्या बायकोला ...' सहज सोप्या 101 पाककृती' हे पुस्तक भेट म्हणून मिळणार... बरं पुस्तक देऊन गप्प बसेल तो नवरा कसला? थोड्या दिवसांनी वाचलं का पुस्तक ? एव्हढं प्रेमानं भेट दिलेलं म्हणून भुणभुण सुरू होईल... नंतर  घरापासून जगापर्यंतचे आर्थिक धोरण कळल्यावर डोक्याला बाम लावायची वेळ येईल......नको रे बाबा !  त्यापेक्षा  दागिनाच आवडेल मला...अगदी शे पाचशेची नोट सुद्धा चालेल.
                      अनेकदा पुरुष मंडळीचा... सोन्याचे दागिने म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट कशी आहे? त्याच पैश्यांचे fd चे दहा वर्षांनी किती मिळतील आणि shares चे 18% रिटर्न्स कसे मिळतील... हा चर्चेचा अत्यंत आवडता विषय असतो.अश्या वेळी आपण अजिबात डोके खर्च करू नये... नवऱ्यापुढे..."आपण कित्ती हुशार आहात" हा भाव  चेहऱ्यावर आणावा...शक्य झाल्यास इतर मंडळींसमोर "यांचं आर्थिक नियोजन वाह! वाह!" असा एक छोटेखानी कौतुक सोहळा जरूर करावा. मंडळी आपल्या माहेरची माणसं असतील तर कृतज्ञता चेहऱ्यावरून ओसंडून जायला हवी...मंद आचेवर शिजत घातलेल्या भातासारखा हा प्रकार आहे.घाईगडबड करून नुकसान करून घ्यायचं नाही...तर अश्या कौतुकाने खुश झालेला नवरा ,"तुला काय पाडव्याचं गिफ्ट देऊ राणी? "असं गोडीत येत विचारतो...तेव्हा चपखल दागिना मागता यायला हवा... यासाठी तुमचा गृहपाठ आधीच तयार हवा... साधारण सोन्याचा भाव काय आहे? नवऱ्याला बोनस वगैरे किती मिळाला आहे... आणि लग्नाला साधारण किती वर्षे झाली ह्या त्रिसूत्रीच्या गुणाकारातून आपल्याला योग्य उत्तर लाभू शकते. फॅक्टर 1सोन्याचा भाव काढणे फार काही अवघड नसते पण फॅक्टर 2 अर्थातच सहजी कळत नाही ... आपल्याला कितीही वाटत असेल की पाटल्या कराव्यात पण नवऱ्याच्या बजेट मध्ये 2 बांगड्या बसत असतील तर पाटल्यांचा हट्ट धरणे म्हणजे तेलही गेलं तूपही गेलं ... योग्य वेळी योग्य मागणी पदरात पाडून घेणे जमले पाहिजे... हळूहळू लग्नाला जसजशी वर्षे होऊ लागतात तसतसे हे स्कील जमू लागते.. मात्र एक नुकसान होते... घटत्या उपयोगीतेच्या नियमानुसार आपले रुसणे, अबोला, आपटधोपट .. ह्यांचा उपयोग लग्नाला होणाऱ्या वर्षाबरोबर घटत जातो.हळूहळू तर लग्नाला झालेली वर्षे वाढू लागली की आपला अबोला नवऱ्याला गोड वाटू लागतो...म्हणूनच फॅक्टर 3 लग्नाला झालेली वर्षे अत्यंत महत्वाची आहेत.
                        आमचा नवरा नाही बाई असलं काही विचारत... असे वाटत असेल तर गणिताचा नसून भाषेचा अभ्यास करायला हवा आहे. मावस नणंदेच्या लग्नाहून परतल्यावर ,"माझे हात कसे तरीच दिसत होते .. अगदीच सुने" असे तुमच्याच मामी म्हणाल्या याचे ... आवडीचा नाश्ता देतांना रसभरीत वर्णन असावे... ह्या वेळी बेफिकीरीचे भाव असावे...(वाईट वाटलं तरी डोळ्यांतून पाणी काढू नये.. त्याचा उपयोग पुढेे)... भिशीहून परतल्यावर..." दोन बांगड्यांच्या जोडीला अजून दोन करून घे ग.. हात भरून दिसेल " असे मैत्रिणींनी म्हटल्याचे पुन्हा पुन्हा सांगावे... आणि अखेर एखाद्या जावेने किंवा शेजारणीने पाटल्या किंवा बांगडया केलेल्या दाखवल्या की ,"माझी कित्ती दिवसांची इच्छा होती"  म्हणून डोळ्यांच्या कडेला राखलेले पाणी बाहेर काढावे. या संधीचं सोनं करत आपण कसं मन मारून जगतो ...संसाराला प्राधान्य देतो ह्याचे प्रास्ताविक मांडावे.एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा की नवऱ्याचा मेंदू  आपल्यासारखा सरसकट सगळे साठवून ठेवत नाही..त्याच्या दृष्टीने आवश्यक माहितीच तो सांभाळतो. आपलं हे आद्य कर्तव्य आहे की आपल्या दृष्टीने आवश्यक माहितीची आपण वारंवार आठवण देत राहावी.
                           दागिने प्रत्येक स्त्रीचं हक्काचं धन...ज्यावर तिचा संपूर्ण अधिकार असतो... मात्र स्त्री धन म्हणून गौरवण्यात आलेल्या दागिन्यांचे मोल ; प्रत्येक स्त्री साठी पैश्यात नसतंच मुळी... लोकांसाठी अमुक ग्रॅम किंवा तोळे असणारा दागिना तिच्यासाठी आठवणींचा ठेवा असतो...फक्त शरीर जरी तो दागिना धारण करत असेल तरी खरंतर तिचं मन त्यात अडकलेलं असतं.... लग्नातलं मंगळसूत्र, दोघांनी जोडीनं घेतलेल्या साखरपुड्याच्या अंगठ्या... इथपासून आईच्या बांगड्या.. ताईचा तन्मणी, सासूबाईंचा पोहेहार,आजेसासूची नथ... इथपर्यंत ही यादी वाढती असते. दागिने जितके जुने तितके त्याचे महत्व अनन्यसाधारण असते...कारण त्याच्या वजनाइतकेच किंवा काकणभर अधिकच प्रेम, कौतुक, माया,ओढ यांत ओथंबलेले क्षण त्यात गुंतलेले असतात.आजकालच्या use n throw पिढीसाठी कदाचित वेडेपणा असेलही ... मात्र पिढ्यानपिढ्या वापरलेला दागिना आगळ्या झळाळीचा असतो... एका पिढीचा संघर्ष, कसोटीचे क्षण, सुखाच्या अनुभूती आणि आशीर्वाद यांचा तो जिवंत वारसा असतो....हा अनुभव शब्दांत मांडणं कदाचित अनुभवण्याइतकं सोपं नाही.... तरीही प्रयत्न करते
                          लग्नानंतर अनेक वर्षे सणासुदीला चांदीची उपकरणे नी दागिने काढून वापरली जायची नी जबाबदारीने ती आली तशी परत जात. घरातील जेष्ठ म्हणून सासूबाई हे काम जबाबदारीने करत... हळूहळू वर्षे सरली... अन् ही कामे जबाबदार गृहिणी या नात्याने माझ्यावर सोपविली गेली...त्याच वेळी मला "ती" सापडली... मोहक सुरेख देखणी चांदीची डबी...सुरेखशी वेलबुट्टी ची नक्षी....उघडून पाहते तर काय ?....लालबुंद मखमालीवर पहुडलेली अप्रतिम सुरेख ठसठशीत नथ... डबीवर आजेसासूबाईंचे नाव कोरलेलं.'पाहताच ही बाला कलीजा खलास झाला'... आधीच नथ मला प्रचंड प्रिय त्यात ही खरेच अप्सरा... मी प्रेमात पडले अक्षरशः... (होय! बायका दागिन्यांच्या प्रेमात पडतात..नवल नाही त्यात काही)... खरंतर... एकुलती सून म्हणजे ती माझीच होती पण ऑफीशिअली ती माझी नव्हती...लगेच सासूबाईं ना विचारणा केली ... त्या साफ विसरून गेल्या होत्या त्या नथेंबद्दल... ,"अग !माझ्या सासूबाईंची नथ ती...एकतर ती चांगलीच जडजूड आणि तिची दांडी खूपच जाड .. तुम्ही आजकालच्या पोरी कश्याला वापरताय... म्हणून मागे पडली .. त्यात तुझं नाकही टोचलेलं नाही ना!" म्हणजे थोडक्यात दिली असती पण नाक टोचलेलं नाही.. प्रश्न मोठा बिकट होता. मी खरंच नाक कधी टोचलच नव्हतं.. इतक्या वेगवेगळ्या चापाच्या नथ मिळत असतांना कश्याला टोचायचं नाक?? असं सारं माझ्या चांगलंच नाकाला झोंबलं.☺
                        नवऱ्याच्या कडव्या विरोधाला मोडून मी शांतपणे नाक टोचून घेतलं... या वयात टोचलेलं नाक पाहून मैत्रिणींनी हात जोडले... सहनशक्तीची खरंच कमाल होती.पुढे त्यात तार फिरवत राहणे, मग सुजणे, फुगणे सगळे प्रकार एक वर्षभर पुरले.. फक्त नाक टोचून भागणार नव्हतेच. नथेची दांडी चांगलीच मोठी होती.अखेर नाकातून तार काढून लवंग घाल, शोपेची काडी घाल करत ते मोठे केले. एक जाड तारेची रिंग घालून घेतली.. हा सगळ्यात महत्वाचा टप्पा होता.. आणि कठिणही.. अखेर रिंग सेट झाली...आणि दिवाळीच्या दिवशी हिमतीने मी ती नथ घातली... काहीही त्रास न देता ती इतकी चटकन गेली की जणू तिला माझी ओढ, माझी धडपड सारे समजले होते. नथ सुरेख तर होतीच पण त्याहूनही काहीतरी अधिक त्या क्षणी मला मिळालं...कदाचित मी मनानं 100% रहाळकर झाले...इवलासा दागिना, मला अप्राप्य नव्हता पण दोन अडीच वर्षे त्यासाठी मी खूप काही केलं ...ती घातली नि मनात आनंद ,अभिमान, आदर, रुबाब या साऱ्या संमिश्र भावनांचा कल्लोळ झाला..... याचसाठी केला होता अट्टाहास....शब्दशः खरे होते.
                     म्हणूनच मी नेहमीच म्हणते बायकांना कितीही वेड्यात काढा दागिन्यांसाठी... त्यांचं ते वेड पुरुषांना समजण्या पलीकडचं असतं.असं म्हणतात... "दागिना घालतो तो अवयव तो दागिना अधोरेखित करतो, अधिक उठावदार अधिक आकर्षक बनवतो".... मी तर म्हणेन प्रत्येक दागिना तिचं कुटुंबातील गुंतलेपण अधोरेखित करतो.दागिना म्हणजे तिचा सासर माहेरचा सार्थ अभिमान असतो... "दागिने घालून मिरवणे" म्हणण्याची जी पद्धत आहे ती याचसाठी... हा दागिना तिचा अडीअडचणीला हक्काचा आधार असतो.वेळप्रसंगी वाईट वेळेला त्यातून पैसा उभा राहू शकतो... मात्र सतत चेन स्नॅचिंग च्या केसेस, लूट,भूल घालणे वगैरेंमुळे अधिक धोक्याचा, जोखमीचा भाग बनला आहे.पहाटे अंधारात सहा आठ तोळ्यांचे दागिने घालून फिरायला निघणाऱ्या स्त्रियांना तिथेच दंडवत घालावा वाटतो... जिमला  किंवा योगा, एरोबिक्स ला ट्रॅक पॅन्ट टी शर्ट वर पाटल्या बांगड्या घालून येणाऱ्या बायकांमध्ये मला मिनी माऊस दिसते☺..(थोडक्यात कार्टून). "दागिना घालून लाखाला, हात शेअर रिक्षाला" ही नवी म्हण तर मी मराठीला द्यायलाच हवी.. कशाला आयांनो , बायांनो? काळजी घ्या की जरा... दागिन्यांची. काय होतं...आमच्या नवऱ्याला आयतच कोलीत मिळतं ना!अश्या  मंगळसूत्र चोरीच्या बातम्या ते तिखट मीठ लावून वाचून दाखवतात....अश्या वेळी काय करायचं? बरोब्बर! "आजच्या काळात दागिने घेणे मूर्खपणा आहे.. पैसा पाण्यात जातो...त्यापेक्षा शेअर्स उत्तम  एकदा मला शेअर बद्दल अभ्यास करायचा आहे....." वगैरे वगैरे मी बोलत बसते. खरेतर, पाटल्याचं design केव्हाच पाहून ठेवलंय... तुम्हाला तर माहितीच आहे नुसत्या बांगडयानी हात सुनाच दिसतो ...☺
 ©यशश्री रहाळकर                 
    
                        

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१९

बंटी.. चल खेळू भाग 2

पूर्वार्ध:-
https://kattayashashri.blogspot.com/2019/10/blog-post_31.html?m=1
                       समोरच्या समईचा प्रकाश रेणुका मातेच्या मुखावर उजळून गेला.. जणू मला विचारू लागला काय करू शकतेस तू आपल्या लेकरासाठी?? स्वतःला आई म्हणवतेस ना... एका दृढ निश्चयानिशी मी देवीपुढे हात जोडले....देवाला हात जोडून वळत नाही तोच घरातला कोलाहल कानी पडला. बंटीचे बाबा आणि आजी यांचे भांडण विकोपाला गेले होते.दोघांनाही बंटीची काळजी होतीच पण आपापल्या मुद्द्यावर दोघे ठाम होते... आजींच्या मते... सुजॉयने बंटीला झपाटले होते... त्याला बाहेरची बाधा झाली होती... तर बंटीच्या बाबांसाठी ह्या साऱ्या अंधश्रद्धा होत्या, थोतांड होते.त्यांच्या मते बंटीचा मानसिक तोल ढळला होता...त्याला उपचारांची गरज होती. मी दोघांनाही शांत करत म्हणाले,"आपण सारेच आपापल्या परीने प्रयत्न करूया... सुजॉयला बंटीपासून वेगळं करायचं आहे .. हे नक्की. मी ते करणारच..." तेव्हढ्यात आतून खदाखदा हसत बंटी बाहेर आला...,
" बंटीची आई.. कशाला हवाय तुम्हाला हा असला बावळट, बिंडोक, ऍव्हरेज मुलगा... भित्रा कुठला! नेहमी त्याला सांगायचा ना! बघ त्या सुजॉयकडे .. शिक त्याच्याकडून काहीतरी.... तुम्हाला माझ्यासारख्या स्मार्ट, क्लास मध्ये फर्स्ट येणारा.. हुशार मुलगाच हवा होता ना!... तसाही तो  बंटी तुमचं प्रेम डीझर्व करतच नाही.सुजॉय हक्कदार आहे सगळ्याचा... सगळ्यांचे लाड, लक्ष, आईचे प्रेम ... सारे सुजॉयचे आहे..." पुन्हा त्याचं ते अंगावर काटा आणणारं विकल हास्य... आम्ही सारे जागीच गोठून गेलो होतो.क्षणात बंटीचा आवाज बदलला... ढसाढसा रडत बंटी माझ्या गळ्यात पडला... " आई सांग ना सुजॉयला... जा आता . सोडून दे मला... मला नकोय तो ... नकोय माझ्या आत... मला म्हणाला... माझ्या विश कॉम्प्लिट नाहीत.. मला हेल्प कर त्या पूर्ण करायला... आई हेल्प करणं चांगलं असतं ना! तूच सांग? मी हेल्प केली आता तो जाणार नाही म्हणतो... मलाच बाहेर जायला सांगतोय...आई मला नाही जायचं तुला सोडून..." मोठी किंकाळी मारून बंटी बेशुद्ध पडला. डॉक्टरांना बोलावून उपचार सुरू झाले.. बंटी खंगला होता... मानसिक ताणाने ताप आला होता... सुजॉय माझ्या बंटीपेक्षा प्रभावी होत होता..माझं पिल्लू दुबळ होतं.. पण त्याची आई दुबळी नक्कीच नव्हती.
                खाली उतरताच मी एक मोठ्ठा धोंडा उचलला आणि त्या काळ्या सायकलवर घातला.. दामाजी पहातच राहिला...मी पुन्हा पुन्हा त्वेषाने धोंडा उचलत होती नि सायकलवर पुन्हा पुन्हा घालत होती... अखेर सायकलचे तुकडे तुकडे झाले तशी बंटीला शुद्ध आली... त्याने डोळे उघडले... बंटीच्या बाबांनी वरूनच आवाज देऊन मला बोलावले...माझ्या हातानी दोन घोट पाणी पाजतांना मी बंटीला म्हणाले...,"बंटी राजा.. मला तू खूप खूप आवडतोस... का? माहितीये.. कारण तू सगळ्यांना मदत करतोस... अरे! अभ्यास करून कुणीही फर्स्ट येईल पण .. असा स्वभाव मात्र कुणाकडे नसतो बरं!" सारं कळून बंटी फिकट हसला.. पुन्हा डोळे मिटून घेतले.दामाजीला परिस्थितीच गांभीर्य कदाचित न सांगताच कळलं असावं...तेव्हढ्या वेळात त्याने ते सायकलचे तुकडे गोळा करून कुठल्याश्या भट्टीत स्वाहा! केले .
                  सुजॉयला जाऊन आज 28 दिवस पूर्ण झाले होते. सकाळी बंटी उठला तोच गरम शिऱ्याची मागणी करत ... त्याला खूप भूक लागली होती...मी कांद्याचे खमंग थालीपीठ त्याच्यापुढे ठेवत म्हटले..."माझ्या बंटीला गोड मुळीच आवडत नाही." संतापाने प्लेट उधळून देत बंटी म्हणाला, "बंटीची आई.. मला शिरा हवाय..मला शिरा आवडतो." मी शांतपणे म्हणाले,"मी बंटीची आई आहे ... मला माहितीये त्याला शिरा मुळीच आवडत नाही." ...बंटी तोंड फिरवून बसला.. मी मायेनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.. नी एकेक घास स्वतः त्याला भरवू लागले," बंटी.. तू लहान असतांना मी अशीच तुला एकेक घास भरवायचे... तू घरभर फिरायचा नी मी तुझ्या मागे मागे ताट घेऊन..."त्याचं बालपण आठवेल तसं तसं त्याच्याच पुढे मी मांडू लागले...बंटी शांत झाला होता.. माझ्या बोलण्यात रमला होता.त्याच्या बाबांनी आम्हाला पाहिलं नी लहानपणच्या त्याच्या फोटोंचा अल्बम समोर ठेवला.. एकेक फोटो दाखवून आम्ही त्याचे किस्से त्याला सांगत होतो... आणि काही गमतीशीर प्रसंगांची उजळणी करीत होतो....एका फोटोत वर्षाच्या बंटीने सगळ्या अंगाला आईसक्रीम फासून घेतलं होतं... तो फोटो पाहून मी हसत हसत बंटीला म्हणाले,"बंटी हे सारे क्षण म्हणजे आमचा अनमोल ठेवा आहेत.. तू कित्तीही मोठा झालास ना तरी आम्हाला तुझे हेच दिवस आठवणार..."बंटी गोळ्या घेऊन शांत झोपला.
                  त्या आईस्क्रीम च्या फोटोमुळे मला अमूल पार्लरची आणि शिंदे आजोबांची आठवण झाली... खरेच या धामधुमीत त्यांना भेटायला जायचा विसरच पडला होता ... मी यांना तडक गाडी काढायला सांगितली ... दुकानातील मुलाकडून शिंदे आजोबांच्या घराचा पत्ता घेऊन आम्ही निघालो... एव्हाना त्यांना हॉस्पिटलमधून  डिस्चार्ज मिळाला होता. आजोबा पार खंगले होते... त्या अपघाताचा विषय निघताच त्यांच्या पत्नीने हात जोडले...,"आत्ता कुठं जरा सावरले आहेत आता पुन्हा तो विषय नको" म्हणून गयावया करू लागल्या...मी त्यांचे पाय धरले...अक्षरशः पदर पसरला... माझ्या बंटीला जे काय झाले ते सारे सांगू लागली..आतल्या खोलीत पडल्या पडल्या बहुदा शिंदे आजोबा सारे ऐकत असावेत... हळूहळू चालत ते बाहेर आले...बायकोला हातानेच थांबण्याची खूण करत.. बोलू लागले... बहुदा बोलतांनाही त्यांना खूप कष्ट पडत असावेत... " पोरी माझ्या मुलीच्या वयाची तू..कित्येक वर्षे रोज सकाळी भेटतो तुला...त्या मुलाचा अपघात काय नाव म्हणालीस???"..."सुजॉय".मी मध्येच घाईने उत्तरले...जरा दम खात शिंदे आजोबा म्हणाले,"हो.. तोच.. तोही यायचा सकाळी शाळेच्या बस करता...त्या दिवशी..  मी दुकानात कुणी नाही म्हणून बाहेर उगाच फेऱ्या मारत होतो... एव्हढ्यात एक मोठ्ठ ट्रेलरचं धूड धडधड आवाज करत जाऊ लागलं... माझ्या दुकानापुढे स्पीड ब्रेकर आहे ना!... तेव्हढ्यात मागून येणारं हे पोरगं .. कसं कोण जाणे सायकल डिव्हाईडरवर आढळून ट्रेलरमध्ये ओढलं गेलं... अरे अरे! म्हणेपर्यंत ड्रायव्हर पळाला... दहा बारा वर्षाचा इवला जीव... कवटी फुटून मेंदू बाहेर आला होता"......
             आजोबांना धाप लागली ते पाणी पिण्यासाठी थांबले... माझ्या डोळ्यासमोर जणू अख्खा प्रसंग उभा राहिला... भयाची एक शिरशिरी उभी राहिली.पुन्हा विषयाकडे वळत आजोबा म्हणाले," त्याही अवस्थेत पोरगं उठून बसलं ... एक आचका दिला नी देह सोडला.. हे सारं एकट्या मी पाहिलं होतं... त्याचा काळ आला होता हेच खरं! गर्दी जमली.. पोलीस आले.. सारे सोपस्कार झाले..मन उतरलं हे सारं पाहून.. दुकान वाढवून  संध्याकाळी घरी निघालो तो हा त्या स्पीड ब्रेकरवर बसलेला....तसाच कवटी फुटून मेंदू बाहेर आलेल्या अवस्थेत... माझ्याकडे पाहून ओळखीचं हसला.. इवलासा जीव तो काय इच्छा असतील त्याच्या?जग कितीसे पाहिलं असेल त्यानं?... मी फार विचार केल्याने असेल भास झाला... असं वाटून मी सोडून दिलं... ... दुसऱ्याही दिवशी दुकान वाढवून जरा लवकरच घरी निघालो... पुन्हा तोच प्रकार...तिसऱ्या दिवशी तसेच घडले... आता मात्र तो उठून माझ्याजवळ आला... मला मदत करा माझ्या विश पूर्ण केल्या की मी सुटेन म्हणाला...माझ्यावर कुणी विश्वास ठेवे ना .... मी दुकानात जाणेच बंद केले...पण त्या दिवसापासून शांत झोप नाही मला... डोळे मिटले की तोच मुलगा येतो नि पुन्हा पुन्हा गयावया करतो... डोकं फुटलेलं.. मेंदू लोम्बतोय .. अंग रक्तानं माखलंय... कपाळावरन रक्ताची धार ओघळतेय...." हे सांगताना शिंदे आजोबांचे डोळे भीतीने मोठमोठे होत गेले..."पुरे पुरे ! नाही ऐकवत "म्हणत मी कानावर हात ठेवले.
                        शिंदे आजोबांचा निरोप घेतांना एव्हढीच उकल झाली होती की सुजॉयची इच्छा अपूर्ण राहिली होती... काय असेल? हे मात्र समजू शकले नाही. त्यांच्या घरातून बाहेर पडतांना बंटीच्या बाबांनी प्रांजळपणे कबूली दिली, "हे असं काही असू शकत ह्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये.बापरे! भयंकर आहे हे." मी आपल्याच तंद्रीत होती...काय असेल बरं मनात ह्याच्या?? त्याच्या घरी शोधायला हवे..तडक आम्ही देशपांडे आजींचे घर गाठले...त्या बऱ्याच सावरल्या होत्या.. सगळी हकीगत थोडक्यात त्यांना ऐकवली...बंटी सुजॉयचे माध्यम होता... त्याच्या अपूर्ण इच्छेविषयी मात्र त्यांना सांगता आले नाही.तेव्हढ्यात त्यांना त्यांच्या मुलीचा म्हणजे सुजॉयच्या आईचा फोन आला.. तिचीे flight एअरपोर्ट ला लॅन्ड झाली होती....देशपांडे आजी वेदनेने पिळवटून म्हणाल्या, "काय दुर्दैव विलास पहा! सुजॉयच्या आईच्या नशीबात त्याची भेट तर नव्हतीच पण अखेरचे दर्शनही नव्हते. आता येतेय ती उद्या महिना होईल सुजॉयला जाऊन." ही स्वतः च्या करियर मध्ये व्यस्त असणारी...अत्यंत यशस्वी व्यावसायिक... आणि तितकीच अयशस्वी आई देखिल माझ्या मनात आलं. झटकन लाईट लागावा तशी सारी समीकरण मनात स्पष्ट झाली. सुजॉयने जाण्यापूर्वी आमचा निरोप घेतला होता... बंटीची छबी डोळ्यात किंवा मनात असावी.नंतर शिंदे आजोबांनी अखेरचा आचका देतांना त्याला पाहिलं असावं... म्हणून याच दोघांना तो दिसू शकतोय. जाण्यापूर्वी त्यानं बंटीशी आल्यावर भरपूर खेळायचं, सायकलवर भटकायचं ठरवलं होतं... ते तर झालंय की पूर्ण अजून काय ? अजून काय असेल बरं? मी डोळे बंद करून आठवू लागले, "बंटीची आई बंटीची आई!"त्याचे शब्द माझ्या कानात घुमत होते.. मला उत्तर मिळालं... आई.. आईचं प्रेम ,माया... तो इवला जीव आईच्या आठवणीनं व्याकुळ झाला असावा. आता ग्रहण सुटले होते.
                       आज सुजॉयला जाऊन महिना झाला होता... बरोबर 11:30 ला मी देशपांडे आजींकडे पोहोचले... सुजॉयच्या आईला थोडी कल्पना आधीच आजींनी दिली होती.. बाकी फार खोलात न शिरता...त्यांना मी तुमची भेट सुजॉयशी घालून देते म्हणून सोबत घेऊन निघाले. त्या अविश्वासाने पाहत होत्या मात्र आपल्या आईच्या शब्दाखातर तयार झाल्या... आम्ही अमूल मिल्क पार्लरच्या जवळच्या स्पीड ब्रेकर जवळ थांबलो... तिकडून दामाजी आणि हे बंटीला जवळजवळ उचलून घेऊन आले... त्याच्या अंगात एक पाऊल टाकण्याची ताकद नव्हती. बरोबर 12 वाजून 2 मिन झाली ....याच वेळी ,याच जागी महिन्यांपूर्वी सुजॉयचा अपघात झाला होता... अंगात ताकद नसणारा बंटी सुजॉयच्या आईला पाहत धावत सुटला... मम्मा म्हणत त्यांच्या गळ्यात पडून हमसून रडू लागला.."मम्मा कधी आलीस तू युरोपहुन?" त्याचा आवाज ऐकताच सुजॉयच्या आईचा जीव हळहळला पोराचा आवाज आईने ओळखला.. त्याला मायेनं पोटाशी धरलं..."मी खूप बॅड मम्मा आहे सुजो... तुझ्यासारख्या गोड बाळाला मला सांभाळता नाही आलं.. माफ कर मला.But I love you my boy... miss you forever... please forgive me.. sorry sorry.. oh God... " म्हणत सुजॉयच्या आईने हंबरडा फोडला
...पुढं मायलेकरांचा राहिलेला संवाद माझ्या कानापर्यंत पोहोचतच नव्हता.. पोहोचले ते प्रेम निरतिशय माया.. ममता... बंटीच्या कपाळाच प्रेमानं चुंबन घेत सुजॉयच्या आई म्हणाल्या, "I am proud of you my boy.. मला खूप खूप अभिमान वाटतोय तुझा...कायम वाटेल..." त्याच क्षणी सुजॉयच्या आत्म्याला मुक्ती मिळाली. सुजॉयचा आत्मा आईच्या भेटीसाठीच नव्हे तर तिच्या तोंडून .. लेकरा तुझा अभिमान वाटतो. हे शब्द ऐकण्यासाठी आसुसला होता...पुढे सारं मळभ सरलं.. माझ्या बंटीला बरं व्हायला 2 महिने लागले . त्याचं एक शैक्षणिक वर्ष देखिल वाया गेलं... मात्र आईपणाचा मोठा पाठ मी सुजॉयकडून शिकले... मुलांचा हक्क आहे आईच्या दोन कौतुकाच्या शब्दांवर... प्रत्येक मूल आगळं आहे.. प्रत्येक जण काहीतरी विशेष घेऊन जन्माला आलंय.. कधीही इतरांसारखं होण्याचे दाखले त्याला देऊ नका.. आयुष्याचं एव्हढं मोठं युद्ध लढून जिंकणाऱ्या माझ्या बंटीचा मला खूप खूप अभिमान आहे... Proud of you my boy!
© यशश्री रहाळकर

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

बंटी.. चल खेळू

                     माझा लेक अभय उर्फ बंटी... नाव अभय असलं तरी  मुलखाचा भित्रा ससा....अगदी झुरळापासून मांजरपर्यंत सगळ्यांना घाबरणारा. आम्ही सगळे घरचे, नातेवाईक एव्हढेच काय टीचर आणि त्याचं मित्रमंडळ देखिल त्याला बंटी म्हणूनच ओळखतात.गेल्याच महिन्यात आठ वर्षांचा झाला.... "आता बंटी नको ना म्हणू "... असं सारखं सुरू झालंय."मग काय दामाजी सारखं बंटी साहेब म्हणू का?".. मी विचारलं. दामाजी आमचा पूर्ण वेळ रखवालदार, कम माळी, कम स्वीपर वगैरे....आमच्याच बंगल्यातील खालच्या खोलीत राहतो.. एकटा जीव.
                     गावापासून जरा दूरच आमचा बंगला ... ... पाथर्डी रस्ता लागला की एक जुनं चर्च... चर्चच्या पाठी चार दोन घरे...आणि त्याच चौकात चार दुकानं... एक अमूल मिल्क पार्लर...एक सलून, एक किराणा मालाच नी एक कसलं तरी ऑफिस.चौकाच्या पुढं काहीही नाही... सगळं माळरान आमचा एकटाच बंगला.खालच्या मजल्यावर बंटीच्या बाबांचा बिझनेसचा पसारा वरती प्रशस्त राहतं घर...घराला माणसांच्या दुप्पट खोल्या.. आम्ही इन मीन साडे तीन माणसं... मी , बंटीचे बाबा, आज्जी आणि बंटी साहेब ...  खरंतर बंटी अगदी चार महिन्यांचा असतांना इथे रहायला म्हणून आले तर एव्हढां एकांत भयावह वाटला .हळूहळू माझी झाडाफुलांची आवड जपत सुंदर बाग फुलवली.. प्रशस्त घर, शुद्ध हवा, मोकळं वातावरण, शहराच्या गोंगाटापासून दूर असणारं आमचं घर मला आवडायला लागलं.त्यात बंटीच्या बाबांचीही सोय झाली... त्यांना मस्त गरमागरम जेवण ,नाष्टा सारं देता येई. बंटीच्या शाळेच्या बसचा स्टॉप देखिल चौकातच होता अमूल मिल्क पार्लर जवळ... सगळं कसं सोयीचं होतं.
                  एक मात्र झालं बंटीला खेळायला सोबत नव्हती कुणाची.. पोर एकटा पडला. खोलीभरून सगळ्या प्रकारची खेळणी होती... त्यात हा एकटाच खेळत बसे... तसा शहाणा होता...कधी कसली तक्रार नसे.दामाजीशी मस्त गट्टी होतीच.. कंटाळा आला की त्याच्यासोबत चक्कर मारून येई...कधी भाजी आणून देई तर कधी वाण सामान.सकाळी 7:15 ला बंटीला मी चौकातल्या स्कूल बसच्या स्टॉपला सोडायला जायचे...त्या स्टॉप वर बंटी एकटाच असायचा.... एव्हाना शिंदे आजोबा अमूलचे दुकान उघडून माल उतरवून घेत असत...दोन जुजबी वाक्य बोलून, ताजं दूध घेऊन मी परत येत असे.साधारण जुलै महिन्यातल्या एका सकाळी त्या स्टॉप वर आणिक 2 व्यक्ती दिसल्या साधारण बंटीच्या वयाचा मुलगा आणि एक आजीबाई.दुपारी 2:15 ला बंटीला घ्यायला स्टॉप वर पोहोचेपर्यंत आजीबाई आलेल्या होत्या.ओळखीचं हसल्या... जुजबी ओळखी झाल्या... एवढ्यात दोघे बसमधून  उतरले.दोघे एकाच वर्गांत होते...सुजॉय त्याचं नाव... बंटी साहेब खूपच खुषीत होते.नवा मित्र मिळाला होता... घरी जाईपर्यंत सुजॉय पुराण ऐकायला मिळाले.
                     लवकरच सुजॉय आणि बंटी जिवलग मित्र बनले. सुजॉय घोष ...देशपांडे आजींच्या मुलीचा मुलगा.बंगाली बाबूशी तिने केलेला विवाह 2 वर्षांत मोडला.. दोघांनी आपापले दुसरे संसार मांडले... सुजॉयची अडचण दोघांनाही नको होती... सुजॉयची रवानगी मग आजीआजोबांकडे झाली.अधून मधून दोघेही येऊन भरपूर पैसे, सुजॉयला गिफ्ट्स वगैरे देऊन जात...कळत्या वयापासून सुजॉय आजीकडेच वाढला.सुजॉय विलक्षण बुद्धिमान आणि समजूतदार होता...कसलीही तक्रार ,हट्ट आपण करताच कामा नये हे ; न सांगताच त्याला उमजले होते..वर्गांत कायम अव्वल तर असायचाच पण सगळ्या स्पर्धांत देखिल हिरीरीने भाग घेई... चुणचुणीत, लाघवी होता.
                थोडक्यात काय तर आमच्या बंटीच्या अगदी विरुद्ध ... मितभाषी, बुजरा , एकलकोंडा बंटी तर बडबडा,हसतमुख,सगळ्यांशी मैत्री करणारा सुजॉय. तरीही दोघांची घट्ट मैत्री झालीच.. दिवसभर दोघे एकमेकांसोबत असायचे..शाळेत एकाच बाकावर बसायचे. उरलेला वेळ हा त्याच्या नाहीतर ; तो ह्याच्या घरी पडीक असायचा.त्याच्या सोबत बंटी देखील खुलू लागला... बंटीकडून वेगवेगळ्या स्पर्धांची तयारी सुजॉय करून घेई.. बंटीला कठीण वाटणाऱ्या गणिताचाही अभ्यास तोच करून घेत असे.त्यांच्या योगाने दोन वर्षांत त्यांच्या आज्यांचीही मस्त मैत्री झाली.. देशपांडे आजी आणि बंटीच्या आजी चौकात भेटून रिक्षा करत मग कधी कोणत्या देवळात जात तर कधी कीर्तन, भजन अश्या कार्यक्रमांना जोडीने जात. या दोघांच्या हाताने डब्यातून खाऊ आवर्जून पाठविला जाई.. एव्हाना सुजॉय आणि बंटीच्या आवडीनिवडी दोन्ही घरांत कळल्या होत्या. बंटीला देशपांडे आजींच्या हातचं झणझणीत आवडे तर सुजॉयला माझ्या हातचं गोडधोड.सुजॉय मला "बंटीची आई" म्हणायचा. एकदा त्याला म्हटले देखिल, " सुजॉय ; मला काकू किंवा मावशी म्हण ना!.. हे बंटीची आई फार परकं वाटतं".सुजॉय चटकन म्हणाला, "आई बरं वाटतं!" नकळतपणे भरून आलेले डोळे पुसत खेळायला पळाला.
                    दिवाळीच्या आधीची कामांची लगबग आवरा-सावर सुरू होती. देशपांडे आज्जी नेहमीप्रमाणे गप्पा मारायला म्हणून आल्या...सुजॉयनी गियरची सायकल घेण्याचा हट्ट धरलाय म्हणाल्या.मला नवलच वाटले कारण सुजॉय हट्ट करणारा मुलगा नव्हताच.सायकल महागडी तर होतीच पण आमच्या चौकातल्या रस्त्यावर अवजड वाहनांची सतत वर्दळ असे.. म्हणून देखिल त्यांचा ह्या सायकल प्रकरणाला विरोध होता.. रात्री आमच्याही घरी बंटीने गियरची सायकल हवीच असा हट्ट धरला.वर्गातल्या कुठल्यातरी मुलाची stylish सायकल पाहून तश्शीच घ्यायचा या दोघांचाही विचार होता.... मी देखिल या सायकल घेण्याला कडाडून विरोधच केला. त्यात भर म्हणजे ह्या दिवाळीला मी भावाकडे जायचे ठरविले होते.. भावाने नवे घर घेतले आणि आईची एकसष्ठी .. दोन्ही एकत्रच सारे मिळून करायचे ठरले. झाले बंटीने आकाशपाताळ एक केले...."मी सुजॉयला सोडून मुळीच येणार नाही.त्यालाही घेऊन जाऊ. मला तिथे करमत नाही.मी नाही येत..." पर्यंत सारे करून झाले. माझ्या दोन्ही भावांना दोन मुलीचं.. त्यांच्याशी काय खेळणार... कसेबसे चार दिवसांसाठी त्याला तयार केले.सुजॉयला कसे नेणार? शेवटी लोकांचं पोर ते. आम्ही गाडीत सामान ठेवले.. अन निघणार तेव्हढ्यात सुजॉय आला.. स्वारी नव्या कोऱ्या गियरच्या सायकलवर स्वार.. त्याच्या पप्पांनी घेऊन दिल्याचे म्हणाला. बंटी खुश झाला.. आल्यावर खूप खेळायचे ,काय काय करायचे, कुठे कुठे सायकलवर भटकायचं.. सारं planning करून दोघांनी निरोप घेतला. पुढचे चार दिवस कसे गेले कळलं देखिल नाही.. दिवाळी, नवीन घराची वास्तुशांत आणि आईचा वाढदिवस...मनभर आनंद भरून घेत आम्ही परतलो.
                     घरात पाऊल की दारात पाऊल... बंटी सुजॉयकडे निघाला...नवीन सायकलची उत्सुकता होतीच. दाराशीच त्याला दामाजीने अडवलं.. काय सांगितलं कोण जाणे.. बंटी हातपाय आपटत ओरडतच वर आला, " नाही हे खोटं आहे. सांग ना दामाजीला.. सुजॉय असं कधीच करणार नाही. मला केलेलं प्रॉमिस तो कधीच मोडणार नाही" म्हणत बंटी ओक्साबोक्शी रडू लागला....अखेर आपल्या खोलीत जात त्याने धाडकन दार लावलं. दामाजीने बंटीला सुजॉय त्याच्या पप्पांकडे कलकत्त्याला कायमचा निघून गेल्याचं सांगितलं होतं.देशपांडे आज्जींना फोन करून विचारू म्हणून बंटीच्या आजी वळणार तोच दामाजीने मोठ्ठी धक्कादायक बातमी सांगितली... आम्ही निघालो त्याच वेळी सायकलवर घरी परतणारा सुजॉय .. एका ट्रेलरच्या मागच्या चाकात येऊन जागीच गतप्राण झाला होता." मोठं वंगाळ झालं बाई! हे रस्ताभर लोक जमले व्हते.. कवटी फोडून पोराचा मेंदू बाहेर आला होता पार चेंदामेंदा झाला व्हता .. पोरगं पार एका फटक्यात जागीच गेलतं...कुठे नेन्या आणन्या पल्याड...लई वंगाळ!" डोळ्यांत पाणी आणून दामाजीने वर्णन केले. आम्ही सासू सुना जागेवरच हबकून बसलो..... बंटीला दामाजीने सांगितले तेच बरे म्हणायचे. आम्ही दोघी देशपांडे आजींना भेटून आलो.. देशपांडे आजींची भीती खरी झाली होती.... त्यांचा विलाप ऐकवत नव्हता अगदी... कशी अन कोणत्या शब्दात समजूत घालू कळेनासं झालं होतं... जड पावलांनी परतत होतो अंगणात सुजॉयची सायकल लावलेली होती... एव्हढ्या मोठ्या अपघातात सायकल जश्यास तशी होती... बहुदा दगडावर आपटून सुजॉय ट्रेलरच्या चाकात फेकला गेला होता.. सायकल मात्र बाजूला पडली... ती काळीकुळकुळीत सायकल एखाद्या चांडाळा सारखी माझ्याकडे पाहून जणू हसत होती.
                      बंटीला हळूहळू सुजॉयचे जाणे स्वीकारावेच लागले... मात्र तो आपल्या जगात नाहीच हे सत्य मानायला त्याचं मन तयारच नव्हतं. बंटीच्या मनावर खोल आघात झाला होता... त्याचं घुमेपण दिवसेंदिवस वाढत चाललं होतं.त्याचं आमच्याशी अवाक्षरही न बोलणं ...माझी काळजी वाढवत नेणारं होतं.या दुःखातून सावरायला त्यालाही वेळ देणं गरजेचं होतंच... मी काहीतरी निमित्ताने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत राहिले... सुट्ट्या संपून शाळा उघडली ... आता सगळे रुळावर येईल असे वाटू लागले... नेहमीप्रमाणे बंटीला बस स्टॉपवर सोडायला गेले तर अमूल पार्लर बंद...आज बराच उशीर झालाय शिंदे आजोबांना... असा विचार करून घराकडे वळणार एव्हढ्यात एका मुलानी दुकान उघडलं...मी त्याच्याकडे शिंदे आजोबांची चौकशी केली... तेव्हा कळलं त्यांची तब्येत गेले काही दिवस गंभीर आहे. 'तो' अपघात त्यांच्याच दुकानासमोर झाला होता... सुजॉयला अखेरचं त्यांनीच पाहिलं... त्यांच्या तब्येतीची चौकशी करून मी घरी परतले.    
                साधारण चार दिवस बंटी शाळेत जाई परत येई.. उरलेला वेळ आढयाकडे पाहत बसे...एकदा सकाळी 12 च्या सुमारास बंटीच्या शाळेतून तातडीने मला बोलवले असल्याचा फोन आला अन् काळजाचा ठोकाच चुकला..धावतपळत आम्ही शाळा गाठली. बंटीने एका मुलाला बेदम मारले होते...हातापाया पडून माफी मागून प्रकरण निवळले.तरीही महिनाभरासाठी बंटीला शाळेतून काढून टाकले होते.झाल्या प्रकारावर बंटी बोलायला तयार नव्हता.त्याच्या वर्गशिक्षिका आम्हाला बाहेर भेटून ...बंटीला मानसोपचारांची गरज असल्याचे म्हणाल्या... तो हल्ली विचित्र वागतो ,प्रश्नांची उत्तरे देत नाही, एकटाच स्वतःशीच बोलत बसतो... आजही एक मुलगा सुजॉयच्या जागेवर बसला आणि वाद सुरू झाले ... त्याला सांभाळायला सांगून त्यांनी निरोप घेतला.
                  घरी पोचतो न पोचतो तोच बंटी "आलो आलो रे!" म्हणत धावत सुटला. कसंबसं दामाजीने पकडून त्याला घरी आणलं. बंटी आपल्याच तंद्रीत बडबडत होता... "सुजॉय आलाय तो बघ कंपाऊंड जवळ उभाय... ते बघ! तो आवाज देतोय बंटी चल खेळू... बंटी चल खेळू..." बंटीच्या बाबांनी त्याला दोन सणसणीत लगावल्या... तसा तो गळा काढून रडू लागला... त्याला फरपटत आजोबांच्या फोटोपुढे उभे करत बंटीचे बाबा म्हणाले, " हे बघ! हे तुझे आबा. देवाघरी गेले आहेत पुन्हा कधीही परत न येण्यासाठी... तसाच तुझा सुजॉय कायमचा देवाघरी गेलाय... काय म्हणतोय मी?? कळतंय का तुला??" बंटीच्या आजीने या दोघात उडी घेत बंटीला पोटाशी धरलं, त्याची दृष्ट काढली, स्वामींचा अंगारा लावला तसा बंटी शांत होत गेला.या सगळ्यात मी थिजून उभी होते. पुढे  मानसोपचार तज्ञ, कौंसेलिंग वगैरे सोपस्कार पार पडले. त्यांच्या मते बंटीला डिप्रेशन आले होते.बंटीला औषध द्यायला म्हणून त्याच्या खोलीत गेले तर हा आढयाकडे नजर लावून बसलेला...दहा वर्षांचं चिमण पिल्लू माझं.. काय होऊन बसलं होतं? खोल गेलेले डोळे,त्याखाली  काळी वर्तुळं, खाण्यापिण्यात चित्त नाही त्यामुळे खंगून पार वाळलेला बंटी.. मला पोटातून भडभडून आलं. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असतांना त्यानी अचानक माझा हात घट्ट धरून ठेवला . माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, " आई... मी खरं बोलतोय तुझी शप्पत.... मला सुजॉय दिसतो. तो मला खालून आवाज देतो.. बंटी चल खेळू...असा. खर आहे" म्हणत रडू लागला....त्याला जवळ घेत मी त्याच्याशी बोलत राहिले... त्याच्या मनात साचलेलं सारं निवळायला हवंच होतं. थोडक्यात काय तर बंटीला सुजॉय सगळीकडे दिसत नसे फक्त खेळायला बोलवायला येई... हे सारे त्याच्या मनाचे खेळ आहेत या खेळात त्याला जिंकलेच पाहिजे वगैरे मी त्याला सांगू लागली. त्याला ते कितपत कळलं कोण जाणे? औषधांच्या गुंगीने बंटीला गाढ झोप लागली .
                  दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळे उठलो तर बंटी घरात नव्हताच..... बरं! कुणाला सांगूनही गेला नव्हता.सगळे शोधायला निघाले.. तेव्हढ्यात देशपांडे आजींचा फोन आला.. बंटी त्यांच्या घरी गेला होता... पाहते तर काय???? बंटी सुजॉयची सायकल चालवत आला ... खुशीत दिसत होता.. पण बंटीला तर सायकल चालवताच येत नव्हती. सायकल स्टँडवर लावून बंटी घरी आला... कसलं तरी गाणं गुणगुणत...म्हणाला  "खायला द्या पटकन काहीतरी खूप भूक लागलीये" बंटीचा आवाज नव्हताच तो.... की मलाही भास होताहेत. "काय करू तूच सांग... तिखट मिठाच्या पुऱ्या करू तुझ्या आवडीच्या की पोहे करू?आणि काय रे सायकल कधी शिकलास तू?"मी विचारले. "सुजॉयला येते ना सायकल" बंटी म्हणाला... मी पहातच राहिले... हात पाय धुतांना... बंटी बोलू लागला... आवाज पुन्हा बदललेला... सायकलवर कसं मस्त वाटतं... पक्षांसारखं उडतोय असं वाटतं... आता खूप अभ्यास राहिलाय अभ्यासाला बसतो... असं काही काही बडबडत राहिला.... खोलीत जाताजाता.. "मस्त गोड शिरा करा ना बंटीची आई! " असं म्हणाला... मी जागीच कोसळले... "बंटीची आई "  म्हणाला होता मला तो..... पुन्हा मानसोपचार तज्ञ गाठले... आता त्यांच्या सेशनला रोज बंटीला न्यावे लागे... त्यांच्या मते बंटीला split personality disorder  दुहेरी व्यक्तिमत्व असं काहीतरी अगम्य झालं होतं... तो स्वतः ला कधीकधी सुजॉय समजायचा.
                  सुजॉयला जाऊन जवळपास 25 दिवस होऊन गेले होते...मात्र  हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकाधिक जटील होत चाललं होतं... कधी तो बंटी असे तर कधी सुजॉय... कधी शांत असे तर कधी आक्रमक होत जाई... कधी दोनदा आंघोळ करायचा तर कधी नुकतेच घातलेले कपडे बदलायचा... कधी तिखट करायला सांगायचा नी दुसऱ्या मिनटांत गोडाचा हट्ट धरायचा... सकाळ दुपार संध्याकाळ सायकलवर फेऱ्या मात्र मारायचा ... त्या झाल्या की मज्जेत असायचा...मात्र सगळ्यांत भयावह वाटायचं जेव्हा बंटी आमच्याच घराच्या खाली उभा राहून हाका घालायचा, "बंटी चल खेळू... बंटी चल खेळू" तेव्हा तो सुजॉय असायचा... बंटीच्या आजी त्याला स्वामींचा अंगारा लावायच्या ... आपापल्या परीने जप उपास तापास करायला लागल्या..एकदा त्या देशपांडे आजींना घेऊनच आल्या... बंटी धावत येऊन आजी म्हणत त्यांना बिलगला... क्षणभर त्यांनाही सुजॉय भेटल्याचाच भास झाला... बंटीच्या आजीने घडलेले सारे ईत्तंबूत वर्णन केले... हे काय आक्रीत आणिक? त्यांनाही कळेनासं झालं. मात्र त्यांनी त्याही परिस्थितीत एक प्रयत्न म्हणून बंटीला जवळ बोलावले... जणू सुजॉयला समजून सांगत असाव्या तश्या मायेनं जवळ घेत म्हणाल्या... " बाळा! फार सोसलस रे इवल्या आयुष्यात... माय बापाची भांडण, त्यात तुझा तिरस्कार.. तुला त्यांनी टाकून देणं...मी strong boy आहे म्हणायचास ना तू..." काय आश्चर्य बंटी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागला....तश्या प्रेमानं पाठीवर हात फिरवत म्हणाल्या... " शहाणा राजा माझा! मला माहित आहे , बंटी खूप आवडायचा ना तुला... पण त्याच काय होतंय कळतंय का तुझ्यामुळे?मुक्त कर त्याला" तसा एकदम संतापाने किंचाळत स्वतः च्या खोलीत पळत जात बंटी म्हणाला... "मी नाही जाणार.. मला खूप खेळायचंय बंटी सोबत... मला आवडतं इथे राहायला.. बंटीच्या आई  किती प्रेमळ आहेत.. किती माया करतात माझ्यावर... आवडतं मला ते मी नाही जाणार." त्याचा रुद्रावतार आम्हाला नवा नव्हता... पण देशपांडे आजी भीतीने थरथरू लागल्या.... माझ्या प्रेमामुळेच तर माझ्या लेकराची ही अवस्था झाली नव्हती ना ??... माझ्या कानात शब्द घुमत होते..."बंटीच्या आई प्रेमळ ... किती प्रेमळ" माझ्यातली आई हरली होती.. देवापुढे पदर पसरून मी रडू लागले... काय चुकलं असेल त्याची शिक्षा मला दे माझ्या पिल्लाला सोडव म्हणत... माझ्यातली हतबल आई रडू लागली....समोरच्या समईच्या प्रकाश रेणुका मातेच्या मुखावर उजळून गेला.. जणू मला विचारू लागला काय करू शकतेस तू आपल्या लेकरासाठी?? स्वतःला आई म्हणवतेस ना... एका दृढ निश्चयानिशी मी देवीपुढे हात जोडले.......क्रमशः....
(बंटीचं पुढे काय झालं?? वाचा भाग 2 मध्ये)
© यशश्री रहाळकर
                           

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

अनादी निर्गुण प्रकटली भवानी

"अनादी निर्गुण प्रकटली भवानी"
           
            नवरात्र किंवा दसऱ्या नंतरच्या काळात घराघरात अचानकपणे भवानी माता प्रकट झालीए ही अनुभूती प्रत्येकाला येतेच . अस्वच्छता नामक राक्षसांचा पराजय व्हावा म्हणून ही माता सिद्धहस्ता झाडू, जळमटांचा दांडी फडा , फडके आदी आयुधांनी सज्ज होऊन स्टूल/ घोडी (उंच स्टूल  )/ फोल्डींग शिडी यांवर स्वार होत " दिवाळीची स्वच्छता " या रणांगणात उडी घेते. या रणांगणात कुटुंबवत्सल पुरूष देवतांना लढताना पाहण्याचा योग अम्मळ दुर्मिळच म्हणावा लागेल. स्त्रियांनी वर्चस्व प्रस्थापित केलेल्या या क्षेत्रात स्त्रिया हिरीरीने प्राण कंठाशी वगैरे आणत लढत असतात.
           त्यातही भांडेवालीला सर्वात आधी गाठणे , जमल्यास तिला किंवा तिच्या ओळखीच्या कुणाला मदतीला धरणे ,शिताफीने घरातील प्रत्येक डबा आणि भांडे बाई कडून लख्ख घासून घेणे, अगदी कचऱ्याची टोपली देखिल घासावी ह्या साऱ्यासाठी तल्लख मेंदू लागतो राव ! एरागबाळ्याचे हे काम नोहे.हे सारे कौशल्य तिच्या संसाराची किती वर्षे झाली यांवर अवलंबून असत.
          माझ्या पेक्षा संसाराचा रथ काही वर्षे अधिक ओढलेल्या एका सखी जवळ मी सहज बोलून बसले " अग ! वर्षभर तर आपण घर स्वच्छच ठेवतो ना ! मग दिवाळीची वेगळी ती काय स्वच्छता असते ??"  मला उभ्या उभ्या कच्चीच खाऊ की गिळू अश्या नजरेने बघत ती उच्चारली .." तुझ्यासारख्या xxx मुळे स्त्रियांच्या कष्टाचे कौतुक होत नाही. तुम्ही रोज पुस्तक चिवडताच ना ?? मग दिवाळी अंक काय वेगळा वाचता ?? विचारतो आम्ही कधी ??"  तिचा तो रुद्रावतार स्मरून मी पुन्हा दिवाळीची स्वच्छता यांसारख्या नाजूक विषयावर बोलणे टाळतेच न जाणो एखादे आयुध माझ्या पाठी बसायचे.  
           खरेतर पुर्वी केवळ सणासुदीला घर आवरणे ,स्वच्छ करणे, मातीच्या भिंती लिंपणे शक्य असायचे घरात माणसांचा गोतावळा अधिक असे , वावर अधिक असे म्हणून ही कामे षठी साहामाशी होत असावीत. शिवाय दैनंदिन कामांचा व्याप स्त्रियांभवती एव्हढा होता की त्यांना वेळही नसे. काळ बदलला,  जीवनपद्धती बदलल्या, काळ काम वेगाची सारीच गणिते बदलली.
            आता सर्रास घरोघरी रोजचा झाडू पोछा , pest control , महिन्यातून एकदा जाळी काढणे, (जमल्यास तेही pest control च्या मार्फत) असे सारे नित्याचेच आहे ... आता flats किंवा bunglow ला पोटमाळेही नसतात ... बरं ... आमची पिढी अनेक वस्तू मोठ्या भावंडांच्या वापरायची ... गेला बाजार मावस चुलत मामे भावंडाचे पाळणे , पांगुळगाडे,  सायकली आम्ही वापरत असल्याने पुढे कामी येतील म्हणून त्या हक्काने माळ्यावर वर्षोंन वर्षे असायच्या ... आता मुळात use n throw चा जमाना ... काही म्हणून काही second hand चालतच नाही ... मग आवरतात काय बरे ??
            बरे ! कपडे आवरणे म्हणावे तर तो काही दिवाळीच्या स्वच्छतेचा भाग नाही ... तसेही ते इतके उदंड असतात की हनुमंताची शेपूटही गुंडाळण्यास तोकडी पडावी ... विखूरलेल्या वस्तू आवरता येतात पण गरजेहून अधिक वस्तू करणार काय ?? साड्यांनी ओसंडणारे कपाट पाहिले की त्याचे दार लावणे हाच योग्य आणि एकमात्र उपाय असतो
          दिवाळीची एव्हढी स्वच्छता कशासाठी ??याचे उत्तर देतांना लग्नाला ५० वर्षे झालेल्या माझ्या जेष्ठ आजी कम मैत्रीणीने विचारले.... " तू कधी अहोंकडून पाय चेपून घेतलेस का ग ? " माझे वासलेले तोंड पाहून पुढे विचारले " गेला बाजार हात ..." " नाही " ..." अरेरे! तुम्ही खरडा कागद फक्त !आग लागो तुमच्या त्या शिक्षणाला !!!!!xxx "
एखादा बिचारा या दिवसांत सकाळी मिसळीचे पार्सल किंवा संध्याकाळी पावभाजी नेत असेल तर समजावे ... आज इसकी खैर नही l बापुडवाणे नवरे office मधून आल्यावर घरात पाऊल ठेऊ की नको या नववधूच्या पोज मध्ये खोळंबलेत किंवा मुळची धटिंगण पोरे मांजरीच्या पिल्लागत म्याऊ करत एका कोपऱ्यात बसलीअसतील तर समजावे ... आज वो कयामत का दिन है l  .. जेव्हा गृहस्वामिनीने चंडीका होत घराचे रणांगण करून टाकले आहे.
           फळीवरील एकूण एक डबा मोरीत घासण्यासाठी शहीद झालाय , त्यातील जिन्नस एखाद्या परातीत अथवा ताटात मुंड्या पिरगळून फेकून दिलेले आहेत , घरातील सर्व काचा , पंखे एव्हढेच नव्हे तर भिंतीनाही यथेच्छ आरक्त स्नान घातले आहे ... माळ्यावरील प्रत्येक वस्तू फरपटत  खाली आणत तिच्यावर पोछाचा रट्टा हाणला आहे सगळ्या घराचे रणांगण करत या रणरागिणी भांडेवालीची वाट पाहत .. महिषासुरमर्दिनीच्या आवेषात फेऱ्या घालत आहेत कोणत्याही पुरूषोत्तमाला धडकी भरावी असे दृष्य....
अश्या वेळी समंजस जाणते नवरे चहा काय पाणीही मागत नाहीत .
          स्वच्छता असलीच पाहीजे नक्कीच पण ते दैनंदिन काम असले तर .... बघा ह्म्म ... अघोर अचाट कामे का ?? कशासाठी?? केवळ दिवाळी आहे म्हणून की इतर करतात म्हणून.....???  आजकाल घरात एखादीच कर्ती स्त्री असते तिच्यावर सगळे घर अवलंबून असते ... अश्यात आपण धडपडलो किंवा आजारी पडलो तर सण होइल का साजरा. स्वच्छता करा पण दमाने सोईने आणि मुख्य म्हणजे आपापल्या शक्ती नुसार . माळ्यावर अनेक वर्षे पडून असणारे पण न लागणारे भांडे विकून टाका नाहीतर देउन टाका , अनावश्यक कपडे ??मोह टाळा. अजूनही लागेल कधीतरी म्हणून जपून ठेवलेले वातींचे स्टो , पेट्रोमॅक्स चे कंदील ,बंद पडलेल्या बॅटरी दिव्यांच्या माळा सत्कारणी लावा
          घरकाम करणारी बाई मनुष्य आहे हे विसरू नका. वस्तूंची जागा बदलणे किंवा पुसून माळ्यावर फेकणे म्हणजे घर आवरणे का ?? हे स्वतःला विचारा एकदा...
थोडासा वेळ मनातील ताणतणावाची जळमटे  काढायलाही द्या ना !
सण आनंदासाठी असतो तर थोडा आनंद स्वतःच्या वाट्यालाही येऊ देत की ...    
              नवऱ्याच्या हातात हात गुंफून त्याच्या आवडीची साडी घे , दोघ मिळून मुलांना कपडे घ्या , तू रांगोळी काढतांना त्यान कौतुकाने बघाव ,तो आकाशदिवा लावतोय तर तू बघावस ... या साऱ्या क्षणांसाठी ताजीतवानी हो ! मनापासून सजून नटून तयार हो स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या दिवाळी साठी...
" दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा!"
© यशश्री रहाळकर
          नाशिक
( हा लेख माझा आहे माझ्या नावासकटच forward करावा धन्यवाद! )

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

डाळिंबी पैठणी

                 आज सासूबाईंचा दहावा दिवस ... प्रदीर्घ काळ सोबत राहून माणसं खरी उमगतात का? फोटोला हार घालतांना वसुधाच्या मनात आलं. गेली 42 वर्षे दिवस रात्र सावली सारख्या सोबत राहिलेल्या सासूबाई ...एक विचित्र पोकळी करून गेल्या....दुखणं नाही की आजारपण नाही वय 84 च्या घरात पण कष्टीक शरीर,नावाला औषध नाही .नेहमीच्या दिनचर्येप्रमाणे सकाळी मंदिरात जाऊन आल्या... थोडा मऊ भात खाऊन झोपल्या ते कायमच्याच.. तश्या त्या दिवशी त्या अतिशय प्रसन्न होत्या देवाला मनापासून हात जोडत काय म्हणाल्या कोण जाणे? करड्या शिस्तीच्या, टोकाच्या तापट... छळ म्हणावा असं नसलं तरी बराच कठीण काळ वसुधाने निभावून नेला होता.... कदाचित म्हणूनच सासूबाई गेल्यानं तिच्या डोळ्यात पाणी आलेच नव्हते. स्थितप्रज्ञागत भेटीला येणाऱ्या प्रत्येकाशी ती बोलत होती.
                        वसुधाचे वडील , वडील काय असतात ?हे कळण्यापूर्वीच वारले .. चौदाव्या वर्षी आई देखिल आजारपणाचे निमित्त होऊन गेली... जबाबदारी म्हणून अंगावर पडलेल्या ह्या पोरक्या वसुधाला मामाने जरा होतकरू मुलगा पाहून उजवायचे ठरवले. वसंतराव जोशींचे ठिकाण कळले..  मुलगा वसुपेक्षा 10 वर्षांनी मोठा , वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्याच जागी पोस्टात लागलेला , घरची बेताची परिस्थिती, पाठच्या दोन बहिणी आणि भावाची जबाबदारी.... असे असतांना मामाने वसुला उजवले. 17 वर्षांच्या वसुधाचा दोन खणी घरात संसार सुरू झाला... घरादारावर सासूबाईंचा प्रचंड वचक होता... सगळी मुलं त्यांच्या धाकात होती. प्रत्येक पैचा हिशोब त्या ठेवीत. अतिशय कष्टानं त्या जमेल ते काम करत हातभार लावीत.वाती वळत, लोणची मसाले करीत, वाळवण करीत. वसुधा देखिल साड्यांना फॉल पिको करू लागली .. हळूहळू शिवण शिकली. दिवस ढकलले गेले... दोन्ही नणंदांची सुस्थळी लग्ने झाली. दिर बंगलोरला नोकरीला लागला.. त्याचे लग्न ,घर संसार सारे नीट जमून आले. एकीकडे वसुधाच्या झोळीत मात्र निराशाच होती.लग्नानंतर तीन वेळा आपले बाळ तिला पोटातच गमवावे लागले ... अखेर लग्नानंतर 11 वर्षांनी वरदचा जन्म झाला... "सासूबाईंनी किती कडक उपास तापास केले होते त्याच्या वेळी.." वसुधाच्या मनात आठवणींची उजळणी सुरू होती.
                       एव्हढ्यात दारात कुरियरवाला आला... सौ. वसुधा वसंतराव जोशींचे कुरियर म्हणत भला मोठा बॉक्स देऊन निघून गेला... आता काय असावे हे?? सारे भवती गोळा झाले. बॉक्समध्ये अतिशय सुरेख डाळिंबी रंगाची पैठणी होती... जाऊ ,नणंदा नावे ठेवू लागल्या... हे का दिवस ? सुतकात कुणी पैठणी घेतं होय? सारं वसुधाच्या समजशक्ती पलीकडे होतं... तिनी काहीच मागवलं नव्हतं... आताच काय गेले 42 वर्षे तिने स्वतः साठी हट्टाने काहीच घेतलं नव्हतं. जे मिळेल जसं मिळेल त्यात ती खुश असायची.. तिच्या फार अपेक्षा नव्हत्याच कधी.. त्यात एव्हढी महागडी साडी कशाला मागवणार? वसंतराव सावरून घेत म्हणाले,"वरदने मागवली असेल हो ऑनलाइन! surprize का काय ते!"  त्यांचा लेक वरद हुशार मेहनती होता ... बँकेच्या परीक्षा देत अधिकारी झाला... त्याचेही लग्न या वर्षी करायचे होतेच. "नातसुनेचे तोंड सासूबाईंना पाहता तरी यायला हवे होते",वसुधाच्या मनात येऊन गेलं.वरद घरी येताच साऱ्यांची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली... खरंतर त्यालाही ह्या पैठणी विषयी काहीही माहीत नव्हते.हे प्रकरण कमी की काय म्हणून दुसऱ्या दिवशी साठे ज्वेलर्स चा माणूस सोन्याची नथ देऊन गेला... त्याही पावतीवर वसुधाचेच नाव... झाले नणंदानी गळे काढले,"आमच्या आईच्या मरणावर टपली होती. तेरा दिवस तर थांबायचे रितीला.. डोळ्यात टिपूस नाही हो हिच्या..."वगैरे वगैरे. वसुधाला तर काहीच कळत नव्हते... आपण काहीही न मागता हे कुणी आणि का मागवले होते??दुसऱ्या दिवशी मोतीवाल्या पेठ्यांकडून मोत्याचा तन्मणी आला अन घरातील लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला. कधी नव्हे ते वसंतरावही त्राग्याने म्हणाले,"उद्या आईच्या तेराव्याला काय मागवलंस वसुधा ? तारुण्यात कधी काहीही घेतलं नाहीस आता म्हातारचळ लागलाय का? दोन तीन वर्षांत साठची होशील तू!" बिचाऱ्या वसुधाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता.
                       तेराव्याला सासूबाईंचे दूरचे एक बंधू देशपांडे वकील अचानक आले. सारे विधी वगैरे संपल्यावर त्यांनी एक लिफाफा काढून वसंतरावांच्या हाती सोपवला... त्याचे सर्वांदेखत वाचन व्हावे अशी अखेरची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. त्या लिफाफ्यात एक पत्र होतं... थरथरत्या हातांनी लिहिलेलं ... होय सासूबाईंचेच अक्षर! सारे कुटुंबीय गोळा झाले..वसंतराव पत्र मोठ्याने वाचू लागले.... "प्रिय वसुधा... तुला कधी सांगितलं नाही पण माझ्या घरात माप ओलांडून आलीस त्या दिवसापासून मला तू मनापासून आवडली होती.तुझे सात्विक वागणे, निरपेक्षपणा ..सर्वांना सामावून घेणे यांमुळे तू अधिकाधिक लाडकी होत गेलीस... मात्र प्रांजळपणे कबूल करते...आई म्हणून माझा स्वार्थ आड येत राहिला. कौतुकानं तू बिघडशील, कुठंतरी तू हाताबाहेर होशील आणि वसंताला वेगळी चूल मांडायला लावशील ... मग माझ्या पोरांचं काय होणार?? हा कोता विचार करत मी तुझ्याशी वाईट वागत होते...तुमचे नवलाईचे दिवस सुद्धा मी साजरे करू दिले नाही... तुझी कुठलीच हौसमौज वसंताला करू दिली नाही... तशी तू तृप्त समाधानी होतीस म्हणा... कधीच काही मागितलं नाही.....वसंता तुझीही अपराधी आहे रे बाबा! बायकोला गजरा आणला म्हणून केव्हढं बोलले तुला... आज शरम वाटते हो माझीच मला......" वसंतरावांचा गळा भरून आला. बहिणीने पाठीवरून हात फिरवला.. वसुधा शांतपणे कोपऱ्यात बसून ऐकत होती.
                  पुढे ओल्या स्वरात ते पुढं वाचू लागले... "वसू ....माझ्या लेकी सासरी सुखात आहेत धाकटाही उत्तम आहे... सारे सुखात आहेत.. फक्त तुझी कोणतीच हौसमौज मी करू शकले नाही ही टोचणी अनेक वर्षे सलते आहे.... अनेक वर्षांपूर्वी , एकदा तुझ्याकडे फॉल पिकोला आलेली पैठणी लावून आरश्यात न्याहाळताना मी तुला पकडले... वाट्टेल तशी बोलले... तू गप्प राहून सारे सहन केले... तुझ्या वयाला साजेसेच तू वागत होतीस ... माफ कर पोरी! तू भलते हट्ट धरलेस तर ते परवडणारे नव्हते ग आम्हाला! पांडुरंगाकडे रडले त्या दिवशी मी ...त्याला सांगितलं एकदा अशी पैठणी तिला विकत घेऊन देऊ शकेन एव्हढे बळ दे! दिवसेंदिवस हे स्वप्न मला व्यापून टाकू लागले... मी तुला पैठणी घेणारच असे मनाशी निश्चित केले.हाती येणारे थोडे थोडे पैसे मी पोस्टात जमा करू लागली... गुपचूप बरका!अगदी दोन, पाच किंवा दहा रुपये सुद्धा. पैसे तर साठले पण डाळींबी रंग हवा तसा मिळेना... शेजारच्या गोगटे बाईंसोबत सारी साड्यांची दुकाने पालथी घातली. शेवटी येवल्याच्या विणकराशी संपर्क साधून हवी तश्शी बनवुनच घेतली.... डाळिंबी रंग अन मोराचे बुट्टे ...सुरेख दिसेल हो तुला! येईल एक दोन दिवसांत घरपोच... आणि अग !अगदी भारीतली पैठणी घेतली तरी पैसे बरेच उरले... मग माझ्या तरुणपणी डोळ्यांत भरला होता तसा डाळिंबी खड्यांचा सुरेख तन्मणी करायला दिला...मला म्हातारीला नव्हे ग तुलाच. सोन्याची नथ करायला दिलीये साठे सोनारा कडे ...ती मात्र नातसुनेला हो! वरदच्या लग्नाचे पाहताच आहात ... त्याच्या बायकोला गृह प्रवेशाचे वेळी द्या . आजेसासूने दिलीये सांगा तिला.
                       माझ्या दोघी लेकी आणि धाकट्या सूनबाईंच्या नाकावर राग आल्याचं दिसतंय हो मला स्पष्ट....आम्हाला कसे काही दिले नाही? पण खरं सांगू माझे अन वसू चे नाते वेगळेच होते....पोटची लेक नव्हती इतकेच.. माझ्या चारही अपत्यांपेक्षा कणभर अधिकच प्रेम मी वसूवर केले. वरदच्या लग्नात तुला या पैठणीत मिरवितांना पाहणे माझ्या नशीबात नाही .. आठवडा झाला पांडुरंग बोलावतो आहे... आता परतीच्या वाटेकडे डोळे लागले आहेत. ... वसू लवकरच तू माझ्या..म्हणजे  सासूच्या भूमिकेत शिरणार आहेस..वसू तू चांगली प्रेमळ सासू होशील हो!मात्र योग्य वेळी सुनेचे मनापासून कौतुक कर... माझ्यासारखी पत्रातून प्रेम व्यक्त करायची वेळ येऊ देऊ नकोस...सगळ्यांनाच खूप आशीर्वाद." पत्र पुरं होईतो सारे गंभीर झाले होते... तेरा दिवसांत पहिल्यांदाच वसुधाला सासूबाईंच्या जाण्याने झालेल्या पोकळीचा नेमका अर्थ उलगडला.अनेक क्षणांची बहुपदरी साखळी तिच्या डोळ्यांसमोर नाचू लागली...मायेचे क्षण, सावरून घेतल्याचे क्षण , एकमेकींना धीर दिला ते क्षण ......कपाटातून काढून डाळिंबी पैठणीवर मायेनं हात फिरवत ती धाय मोकलून रडू लागली...
©यशश्री रहाळकर

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

कळप

कळप
                    जर... आपल्यापुढे तीन समूह असतील ....1.शेकड्याने रानगाईंचा कळप आहे, 2. बारा पंधरा हत्तींचा कळप आहे आणि 3.आठ/दहा स्त्रियांचा समूह आहे..... यापैकी सगळ्यात deadly, सर्वांत भयंकर किंवा अत्यंत निर्घृण समूह कोणता?? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नं 3 चा समूह. होय ! मी स्वतः एक स्त्री असून माझं उत्तर अभ्यासपूर्वक आणि जबाबदार विधान आहे.या तिन्ही समूहांपैकी आठ दहा स्त्रियांचा समूह हा एकमेव असा समूह आहे जो स्वतःच्याच समूहातील सदस्यांना चिरडून पुढे जात असतो.रानगाईंचा कळप पहा... लहान पिल्ले, कमजोर ,लंगड्या गाई मध्यभागी असतात... सगळे मजबूत शिलेदार चहुकडून समूहाचे रक्षण करत असतात. हत्तींचा कळप तर आपल्या एकजुटीसाठी ओळखला जातो... बहुतेक समूहात बहिणी हत्तीणी असतात... साऱ्याच पिल्लांना त्या साऱ्या आपले मानतात.मात्र याउलट कोणत्याही प्रयोजनासाठी एकत्र आलेला ,कोणत्याही वयाच्या ,काही मोजक्या स्त्रियांचा अगदी तात्पुरता समूह सुद्धा 'संघ' किंवा 'कळपाची' कोणतीच लक्षणे बाळगून नसतो. या समूहात सातत्याने वर्चस्वाचे डावपेच सुरू असतात, एखादीला लक्ष करून तिला गुदमरून टाकण्याचे अखंड प्रयत्न असतात... एका उद्देशाने एकत्र आलेल्या स्त्रियांचा समूह त्या व्यतिरीक्त अनेक गुंतागुंतीच्या मोड तोडीत मग्न असतो.सगळ्यांनी हातात हात घेऊन समूहाचा विकास करू ही सांघिक भावना तर नसतेच पण असतो एक अट्टाहास कुणालातरी नामोहरम करण्याचा, तगमग असते कुणाला तरी नेस्तनाबूत करण्याची...त्याही पलिकडे , कुणाला तरी नीच दाखवून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची....वर्चस्वाची घनघोर लढाई.
                      मला माहिती आहे ... या क्षणी तुम्हा सगळ्यांना निश्चित वाटत असणार,"आमचा अमुक भिशी ग्रुप/किटी ग्रुप किंवा भजनी मंडळ असं मुळीच नाही.आम्ही कित्ती प्रेमळ मैत्रिणी आहोत." अशी खात्री असेल ना तर काही मुद्दे नक्कीच तुमच्या ग्रुप मध्ये पडताळून पहा हं! ★ अनुपस्थित असणाऱ्या मेंबर बद्दल काहीच बोलले जात नाही. ★एखादीला माहीत असणारे दुसरीचे काही सिक्रेट्स किंवा हळव्या बाबी ग्रुप ला सांगण्याचे काम चोख होत नाही.★ग्रुप चा जर कुणी लीडर असेलच तर तो बाकीच्या मंडळींशी खाजगी संवाद साधून इतरांबद्दल माहिती घेत नाही.★लिडरच्या अनुपस्थितीत केलेल्या साध्याशा विधानाचा विपर्यास करून किंवा रंग बदलून ग्रुप लीडर पुढे मांडले जातच नाही.★थेट स्पष्ट चर्चेने गैरसमज झालेच तर सोडविण्याचे कार्य केले जाते........ या वरील पाचही प्रश्नांची उत्तरे जर खात्रीशीर "होय" अशी असतील तर खरेच आपला ग्रुप आदर्श आहे 5स्टार प्रामाणिकपणे सांगायचं तर या साऱ्यांचीच उत्तरे कधीही पॉझिटीव्ह असणे शक्य नाही.कारण ग्रुपला स्वतःचा एक चेहरा असतो... एक व्यक्तिमत्त्व असतं, एक विचारधारा असते.ती ग्रुप मधील एखाद्या व्यक्तीच्या अगदी भिन्न असू शकते. ज्याप्रमाणे मोहरी, हळद,तिखट ,मीठ, मसाला, गुळाचा खडा सारे एकत्र येत फोडणी दिल्यास बनणारा पदार्थ निराळा असतो.. त्यात ह्या साऱ्यांची चव असते मात्र पदार्थाचे रुपडे वेगळे असते... तसेच काहीसे प्रत्येक ग्रुपचे असते.
                     'मनुष्य हा समाजशील प्राणी आहे', हा पाठ आपण शालेय जीवनात गिरविलेला असतो. त्यामुळे विविध समूह हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. विशेषतः स्त्रिया वेगवेगळ्या समूहात सक्रिय असतात... बरेचदा विरंगुळा म्हणून , आनंदासाठी तर कधी एखादे विशिष्ट कार्य (सामाजिक/सांस्कृतिक/आर्थिक वगैरे)करण्याच्या हेतूने बहुसंख्य स्त्रिया वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये सहभागी होतात. घराबाहेर पडतांना समविचारी समवयस्क मैत्रिणी असणे सोयीचे असते.या साऱ्याच समूहात प्रचंड मोठी energy शक्ती दडली आहे, असे मला कायम जाणवते.ह्या एकत्रित शक्तीच्या जोरावर अनेक अफाट अशक्य कामे सहजी होऊ शकतात.सगळ्यांत महत्वाचे म्हणजे एकमेकींना आधार देणं, मदतीचा हात देणं सहजी शक्य असतं.मात्र प्रत्यक्षात स्त्रियांचे हे समूह वादविवाद, भांडणे आणि राजकारणी डावपेचांनी  काठोकाठ भरलेल्या घागरीच असतात. एकदा तुम्ही ही घागर उचलली की डोईवरून उतरवणे फार अवघड काम होऊन बसते.खरंतर उंबरठा ओलांडणारी प्रत्येक स्त्री मोठा संघर्ष करूनच बाहेर पडलेली असते... कुणाच्या घरी कडक नियमांचा जाच असतो, कुणावर वृद्धांची जबाबदारी असते, कुणाला नवऱ्याचे विक्षिप्त वागणे झेलावे लागते तर कुणाला आर्थिक प्रश्न, मुलांचे प्रश्न असतात, नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांवर तर त्याहून निराळा ताणही असतो.ह्या साऱ्याचे भान आपण एक स्त्री म्हणून समूहात वागताना राखतो का? हा प्रश्न प्रत्येकीनं स्वतः ला विचारायला हवा. 'ही अशीच आहे नी ती तश्शीच आहे "असे म्हणून बोटे मोडतांना आपण तिच्या शूजमध्ये पाय घालून किती खिळे टोचतात हे पाहतो का? शिक्का मारणं कदाचित सोप्पय! अवघड आहे दुसऱ्या स्त्री ला समजून घेणं.
                        नुकताच एका ग्रुप चा अत्यंत कडवट अनुभव मी घेतला.. गेली पाच वर्षे सोबत चालणारा आणि कार्यक्रम करणारा हा ग्रुप... अचानक काहीही न सांगता मला वगळण्यात आलं... बरं गंमत अशी की ग्रुप मधील प्रत्येक व्यक्ती माझ्याशी अगदी "तुझ्या गळा माझ्या गळा" पद्धतीने वागणारी... अश्यावेळी प्रत्येकीला माझ्याशी असणारे वैयक्तिक गोड संबंध जपायचे होते मग वाईटपणा घेणार कोण? एका मैत्रिणीला तर मनातून हे इतकं बोचतय की चोरासारखी ती नजर चोरत असते☺ मी त्यांची अडचण समजून घेतली कोणताही आकांतांडव न करता... एखाद्या समूहात एखादी व्यक्ती श्रेष्ठ वरचढ ठरू लागली की त्या ग्रुप ला तुम्ही नकोसे होता. प्रत्येक समूहाचा चेहरा असतो असे मी म्हणते ते याचसाठी. हा अनुभव थोड्या फार फरकानं प्रत्येकीला आलाच असणार.एखादा ग्रुप मनातून तुमचं श्रेष्ठत्व मान्य करू लागला की समजावं हकालपट्टी निश्चित आहे. कोणत्याच समूहाला स्वयंपूर्ण शक्तिशाली लोक नकोच असतात... दुबळ्या, रडणाऱ्या, sort of बिचाऱ्या बायकाच का कुणास ठाऊक समूहांना हव्या असतात.
                     स्त्रियांचे समूह खरेतर जादूगार ठरू शकतात... एखादीला डिप्रेशन मधून बाहेर काढणारे, एखादीला आत्मविश्वास देणारे, एखादीच्या दुखऱ्या मनावर फुंकर घालणारे. चालती बोलती जिवंत शाळा ठरू शकतात... आयुष्याचे ज्ञान देणारे, खूप काही शिकवणारे...कधी एखादी कला तर कधी एखादा पदार्थ ... त्याहीपलिकडे जाऊन प्रती माहेर होऊ शकतात... अगदी एकमेकींच्या गळ्यात पडून मनमोकळं रडणारे, एकमेकांचे कौतुक करणारे , माया करणारे, मदतीला धावणारे अन धीर देणारे. प्रत्यक्षात मात्र स्त्रियांचे समूह आखाडे असतात... अश्या खेळाचे ज्याला नियमच नाहीत... आहे केवळ वार .. जमेल तसे आणि जमतील तेव्हढे समोरच्याला मारत राहायचे.. कधी कृतीतून, कधी शब्दांतून... एव्हढं कठीण आहे का हो स्त्री म्हणून जन्माला आल्यावर दुसऱ्या स्त्रीला समजून घेणं??? 'स्त्री म्हणजे निसर्गातील सृजनाचा साक्षात्कार आहे'... मग हा साक्षात्कार इतका कोता कसा जो दुसऱ्या सृजनाला सामावू तर शकतच नाही पण साधं समजूनही घेऊ शकत नाही.
                     नवरात्रीच्या निमित्ताने आपण नवदुर्गांचे पूजन करतो. प्रत्येक देवीरूप एका विशिष्ट शक्तीच्या उपासनेसाठी पूजिले जाते... लक्ष्मी माता संपत्तीदायिनी, सरस्वती माता विद्यादायिनी, रेणुकामाता मातृस्वरूपीणी, अन्नपूर्णा माता अन्नधान्य समृद्धी साठी , कालिका, दुर्गा,तुळजाभवानी माता आपल्या पराक्रम ,शौर्य आणि अतुलनीय धैर्यासाठी पूजिल्या जातात.यातील प्रत्येक स्वरूप दुसऱ्या पेक्षा निराळे आहे... सारीच रूपे श्रेष्ठ सारीच तितकीच तेजस्वी....विविध व्रतवैकल्ये ,उपासतापास , दानधर्म या निमित्ताने आपण करीत असतो... पण हे सारे तोपर्यंत अर्थहीन आहे जोवर आपण हे स्त्री शक्तीचे तत्व समजून घेऊ शकत नाही की "प्रत्येक स्त्री दुसरी पेक्षा निराळी आहे" तिच्या ठायी असणाऱ्या शक्तींचा आदर आणि योग्य सन्मान आपण करायलाच हवा. हे एकमेकींना समजून घेणं जमायला लागलं ना तर आयुष्यातले अर्धेअधिक प्रश्नच मिटतील. देवी महात्म्यातील एका कथेनुसार सरस्वती मातेचा अपमान शुम्ब निशुम्ब दैत्य करतात... तिला युद्धाचे आव्हान देऊन मोठ्या फौजेनिशी चालून येतात... त्या वेळी या युद्धात प्रत्येक देवी आपापली आयुधे घेऊन चालून येतात... मोठा रोमहर्षक कथाभाग आहे. आपण त्याची पारायणे करतो, पाठ करतो पण त्यातून शिकतो काय?? नवरात्र म्हणजे नऊ रंगाचे परीधान... प्रत्येक रंग निराळा ... प्रत्येकाचं आपापल्या जागी अढळ स्थान. हे सारे प्रत्यक्षात जेव्हा आपण मान्य करू आणि त्यानुसार आचरण करू तेव्हाच खऱ्या अर्थानं नवरात्र आपल्याला उमजले असे म्हणता येईल नाही का??
              या नवरात्रीच्या निमित्ताने किमान 9 अगदी जवळच्या स्त्रियांना मी समजून घेईन असा निश्चय करूया...
1. जिच्याशी आपले सदाच वाद होतात ती आई
2. ज्यांचे काहीच पटत नाही त्या सासूबाई
3. अधूनमधून दांड्या मारणारी पण विश्वासू कामवाली बाई
4. सतत काहीतरी विकत घेण्याचा हट्ट करणारी लेक
5.लाडकी बहीण किंवा बहिणीसारखी जाऊ /नणंद
6.कधीमध्येच डोकावणारी पण गरजेला धावून येणारी शेजारीण
7. अनेक वर्षांची जिवलग मैत्रीण
8. जुजबी ओळखीची मैत्रीण
9. अनेक फॉर्मल निमित्ताने आयुष्यात येणारी स्त्री
या साऱ्यांना आपण समजून घेत गेलो तर ईर्षा, असूया,चढाओढ, भांडणे... ह्या राक्षसांचा वध करणे फारसे कठीण नाही.या दसऱ्याला लुटुया एकतेचं, आदर आणि प्रेमाचं सोनं...                 
©यशश्री रहाळकर

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

उपास

                तुम्ही कधी स्वतःचा OLSM स्कोर चेक केलाय का हो ? माझा 12 तासांचा साडे सहा हजार होता.एका दिवसाचा ,अर्ध्या दिवसाचा, गेला बाजार एका तासाचा सुद्धा काढता येईल..... अत्यंत महत्वाचा झालाय हल्ली ...Off Line Social Media Score. कुठला रेकॉर्ड, कॅश बॅक, गिफ्ट वगैरे साठी नाही हो!  आत्मपरीक्षणासाठी.... तुम्ही सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह राहता ह्याचा हा पुरावा. अगदी सोप्प आहे ... काही तास तुमचा मोबाईल इंटरनेट किंवा डेटा कनेक्शन ऑफ करून ठेवायचा... हाताला सहजी लागणार नाही असा हं! .... वाटतं तितकं सोपं नाही हे... बेवडा बाटलीकडे धाव घेतो तसे हात शिवशिवतात... सतत मोबाईल सॉरी सेल म्हणायचे आता☺ एखाद्या अवयवासारखा देहासोबत वागवत असतो आपण... फार जड जातं हे स्वानुभवाचे बोल.मी हा प्रयोग करायचं ठरवलं ... एक दिवस झाले ऑफलाईन सकाळी 6 ते संध्याकाळी 6... संध्याकाळी6 ला शार्प नेट ऑन केले ... साडेसहा हजार मेसेज होते इनबॉक्स ला...  त्यातले थेट मला जास्तीत जास्त  20 मेसेज होते... त्यातही माझ्या कामाचे फार तर 5/6 बाकी सगळे ग्रुप चॅट... निरर्थक /फॉरवरडेड ....याचा अर्थ काय होतो??माहितीये ... माझा दिवसाचा कितीतरी वेळ मी निरर्थक मेसेज वाचण्यात घालविणारी रिकामटेकडी आहे.
                  ह्या व्हर्चुअल जगाची मोहिनीच इतकी तीव्र आहे की एकदा चक्रव्यूहात अडकलो की अभिमन्यू व्हायचाच... यातून बाहेर पडायचा मार्ग आपल्याला कुठे सांगितलाय?? माझ्या 7 वर्षांच्या लेकीचे आणि तिच्या काही मैत्रिणींचे भातुकली खेळतांना कडाक्याचे भांडण झाले... कुणालाही खेळात आई व्हायचे नव्हते.सगळ्याच मुलींना लहान मूल व्हायचे होते... मोठं मजेशीर भांडण ... आम्ही लहानपणी खेळतांना आई होण्यासाठी भांडायचो... त्यांना समजवायला गेले तर सगळ्या एकासुरांत म्हणाल्या," आई झाले की खूप वेळ सेलफोन घेऊन एकाच जागी बसावे लागते ना! उड्या मारता येत नाही" सणसणीत चपराक ..... आवाजा शिवाय. मोबाईलचा अतिवापर कसा वाईट? असे मुलांना कोरड्या उपदेशाचे धडे देतांना मात्र आपण 24 तास ऑनलाइन असण्यासाठी धडपडत असतो.
                      दिवसरात्र आपण सगळ्यांच्या "touch" मध्ये राहण्यासाठी धडपडत असतो.... पण हे सगळे कोण आहेत ह्याचा लेखाजोखा मांडायला हवाच. न पाहिलेले ,कधीही न भेटलेले हजारो आभासी मित्र , कित्येक वर्षांपूर्वी शाळेत सोबत होतो पण त्यानंतर कधीच न भेटलेले... जगाच्या नकाशावर असणाऱ्या कुठल्यातरी देशात राहणारे वर्गमित्र, पाय खेचणारे नातेवाईक आणि तुमच्या सुखावर उगाचच जळणारे शेजारी....... प्रत्येकाची यादी साधारणपणे अशीच असणार. या व्यतिरीक्त वेगवेगळ्या प्रयोजनांचे ग्रुप... जसे ऑफिस/बिझनेस चा ग्रुप, कॉलनी ग्रुप किंवा मुलांच्या शाळा विविध क्लासेसचे ग्रुप, ढिगभर भिशीचे नी मंडळांचे ग्रुप.......ही यादी दररोज मारुतीच्या शेपटी सारखी वाढणारी असते. मध्यंतरी ऑनलाइन साड्या नी दागिने विकणाऱ्यांनी आपापल्या ग्रुप मध्ये ऍड करत माझ्यावर साड्या नी दागिन्यांचा पाऊस पाडला... शेवटी माझे स्वीस बँकेत खाते नाही असे सांगून मी माघार घेतली. यातल्या खरंच कितीजणांच्या touch मध्ये राहणे गरजेचे आहे...?? या ग्रुप वरील चॅट क्लिअर करणे हे टॉयलेट ला जाण्याइतके नेमाने करावे लागणारे कार्य... अन्यथा खूप काही साठून साठून मोबाईल मान टाकतो. काही ग्रुप असे सतत फ्लश करावे लागताहेत का? ह्याचा विचार करा की....
                 ह्या व्हर्चुअल टच साठी मी प्रत्यक्षातले कित्येक टच अक्षरशः गमावते आहे हे मला ऑफलाईन झाल्यावर उमजलं.मैत्रिणीशी टाळी देत केलेल्या गप्पा, घरातल्या वृद्धांचा मायेचा स्पर्श असू दे किंवा लेकीशी मस्ती करतांना मारलेली गळामिठी... हे सारेच स्पर्श अनमोल आहेत... उद्या ते कदाचित माझ्या वाट्याला येणार नाहीत....आणि त्याहून महत्वाचं ते खरेखुरे आहेत.पार्कमध्ये मुलांना खेळायला सोडून मोबाईलमध्ये डोकं घालणाऱ्या पालकांची कीव कराविशी वाटते... घसरगुंडी किंवा झुल्यावर दंगा करणारी ही पिल्लं.. चार दोन वर्षांनी मोठी झाली एकदा की हे दृश्य दिसणार नाहीये..पर्यटनाला जा लोक ऑनलाइन, काही जण तर लॅपटॉप उघडून लगेच ऑनलाइन....accident झाला लोक ऑनलाइन ... पाठव फोटो, पाठव विडिओ.... काय हे??     
                    आजकाल एक गंमतीशीर बाब सर्रास गार्डन मध्ये पाहायला मिळते....पूर्वी झाडाझुडपा आड असणारे प्रेमी युगुल हल्ली सगळा वेळ केवळ सेल्फी काढण्यात आणि ते अपलोड करण्यात अक्षरशः वाया घालवतांना दिसतात. ह्या अनलिमिटेड नेटपॅक चा वापर भविष्यात लोकसंख्या नियंत्रणाचे साधन म्हणून होईल ,कदाचित.☺ दिवसाला पाच ते दर तासाला एक याप्रमाणें dp  बदलणारी माणसे सुद्धा आहेत... एव्हढे फोटो सतत आपण झळकवत असतो जेव्हढे एखाद्या वॉन्टेड डॉनचे... फोटो काय असावे याला सुमार नाहीच.. पण लावा बाबांनो हवे तेव्हढे असे म्हणावे तर अखंड वेडेवाकडे फोटो काढण्यासाठी धडपड सुरू असते...कुणासाठी कशासाठी करतो हे? व्हर्चुअल Likes साठी ...प्रत्यक्षात गल्लीतल्या काळ्या कुत्र्याला तू न का आवडे... fb वर 1लाख like. त्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या चार प्रत्यक्षातल्या जिवंत लोकांना आपण आवडायला हवे हे कुणालाच वाटत नाही.
                     सोशल मीडियाच्या बाबतीत आपण साक्षर झालोय पण सुशिक्षीत नाही हे खेदाने मान्य करावेच लागेल.... ज्या प्रयोजनासाठी ग्रुप ची निर्मिती केली आहे त्याच साठी त्याचा वापर व्हायला हवा.मात्र शुभ प्रभात आणि शुभ रात्री चे मेसेज इतके असतात... की कंटाळा येऊ लागतो. त्यातही काही लोकांना सुविचार पाठवायचे व्यसन असते... हे सुविचार कम good thoughts कम quotes वाचून असे वाटू लागते की या जगातील सर्वांत नीच, वाया गेलेला , उडानटप्पू  मनुष्य म्हणजे 'मी' च.... काही लोक गुरुदेवांचे/बाबा लोकांचे संप्रदाय follow करीत असतात... जरूर करा ना राव तुम्ही ! पण आमच्यावर ते गुरुवचन वाचण्याची सक्ती कशाला? तुमच्या बाबा/महाराजांचे मार्केटिंग कुठेतरी वेगळ्या पद्धतीने करा रे!
                चतुर्थी ला मोदकांचा फोटो पाठव, सोमवारी बेलाचा, एकादशीला तुळशीचा ... यातून आपण नेमकं काय साध्य करतो.... हाच तो touch का त्यासाठी दिवसाचे अनेक तास आपण वाया घालवत असतो.एखाद्या ग्रुप वर पाठविल्या गेलेल्या मेसेजची दखलही न घेता आहेरात मिळालेल्या साड्यांसारखे लोक धपाधप इकडून उचलून तिकडे मेसेज फेकत असतात.कधीकधी एक मेसेज इतका वेळ वारंवार एकाच ग्रुप वर येतो की गणितातील 'अनंत' ही संकल्पना आताच गवसली मला. एका receipe च्या ग्रुप वर टिप्स येत असत... त्यातली एक म्हणजे पोळ्या करण्या आधी लाटणं फ्रीज मध्ये ठेवा... कणिक चिकटत नाही ... (खरंतर हा शुद्ध मूर्खपणा आहे कोणत्याच पोळ्या नीट येणाऱ्या व्यक्तीची कणिक कधीच लाटण्याला चिटकत नाही.) ही पोस्ट त्या ग्रुप वर इतक्यांदा आली की अखेर ऍडमीननी "लाटण्याची पोस्ट पुन्हा टाकली तर डोक्यात लाटणे घालीन " अशी स्पष्ट धमकीवजा सूचना दिली.
             मुले किंवा विस्मरण झालेले वृद्ध हरवले आहे ह्या स्वरूपाच्या पोस्ट तर मूर्खपणाचा कळस गाठतात.अरे कुठून हरवला आहे, किती तारखेला हे न पाहताच आला की कर फॉरवर्ड....तरी सध्या ते देवाचे मेसेज कमी झालेत "अमुक इतके ग्रुप ना फॉरवर्ड करा नाहीतर वाईट होईल" type चे मेसेज कोण तयार करतं त्याचा जाहीर सत्कार करायला हवा.अमुक विद्यार्थ्यांचे कागदपत्र सापडले आहेत हे आवाहन सुद्धा मूर्ख शिरोमणींचेच ... त्या कागदपत्रांवर पत्ता असतो की राव .. किमान शाळा/कॉलेजचे नाव असतेच... करा ना संपर्क तिथेच थेट सतर्कतेचा इशारा देत वाट्टेल त्या बायकांचे फोटो चोर म्हणून किंवा मुले पळविणारी टोळी म्हणून फॉरवर्ड करतांना आपण हा विचार करतो का की यात तथ्य आहे की नाही? अनेक प्रसिद्ध जिवंत व्यक्तींना या व्हर्चुअल जगात मारून श्रद्धांजली वाहणारे महाभागही कमी नाहीत. आपण जबाबदार नागरीक किंवा विचारी माणूस म्हणून सोशल मीडियाचा वापर करतो का? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवाच  ...अनेक ग्रुप मध्ये जातीवाचक एकेरी उल्लेख करून एकमेकांना हिणवण्याचेही प्रकार घडतात... कशाला हे सारे... काय मिळतं ह्यातून ?दिवसभर वाद ,कागाळ्या, रडारड आणि दिवसाअखेर मनःस्ताप हाच का तो आपल्याला अपेक्षित touch??
                   अनेकदा लोक निनावी पोस्ट फॉरवर्ड करतात ...हे खरेतर खूप चुकीचे आहे. निलाजऱ्यांच्या ह्या जगात ..करा काय करायचं ते... या मुद्द्यावर मी आलेय हल्ली... पण आपण फॉरवर्ड करत असलेल्या पोस्ट चा अर्थ आपण त्या विचारांशी सहमत आहोत ते आपल्याला पटलेले आहेत असाच थेट होतो... ह्याचा विचार करतोय का आपण?? धर की फेक मेसेज असा व्हर्चुअल कचरा आपण वाढवत आहोत केवळ... थांबा हो कुठेतरी?? अनावश्यक पोस्ट फॉरवर्ड करणे टाळा किमान फॉरवर्ड करण्यापूर्वी पोस्ट नीट वाचा त्यात काय म्हटलंय ते पहा... ज्या ग्रुप ला फॉरवर्ड करतोय त्या ग्रुप च्या विषयाशी सुसंगत आहे का ती?? उगाच व्यायामाच्या ग्रुप वर receipe पोस्ट कशाला करायची? त्या ग्रुप शी सुसंगत असेल आधी तिथे कुणी पाठवली नसेल तर पाठवा की पण सोशल मीडिया हल्ली मॅरेथॉन झाले आहे . कोणता मेसेज मी आधी फॉरवर्ड करून मिल्खा होणारेय का?☺ मध्यंतरी एका ग्रुप वरील कुणालातरी माझा वाढदिवस असल्याचा भास झाला अन माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला...शुभेच्छा देणे खूप सुरेख गोष्ट आहे ... गंमत वाटली... मात्र एकीची आई गेल्याची बातमी आणि RIP/श्रध्दांजलीचे शेकडो मेसेज .. आता त्या बिचारीची आई पाच सहा वर्षांपूर्वीच वारली होती म्हणून ठीक .. पण चुकीच्या वेळी चुकीचे मेसेज ह्या प्रकारे करणे म्हणजे मेंढ्या आहोत आपण ... घातली मान खाली की निघालो खड्डयात पडायला.
                   कोणतीही गोष्ट अती झाली की माती होणारच... मग उपाय काय ...अनेक गोष्टी गुंतल्यात ह्या जंजाळात . कदाचित आता पाऊल मागे घेऊन सोशल मीडिया संपूर्ण बंद करणे शक्य होणार नाहीये. अजीर्ण झालं कधी तर काय करतो आपण  " उपास" .. जेवणखाण कायमचं सोडून देता येत नाही ना! असाच सोशल मीडियाचा उपास करायची वेळ आली आहे.दिवसाचे काही तास, आठवड्यातील एक दिवस किंवा अगदी महिन्यातला एक दिवस ... करून तर पहा नेट बंद 👍सकाळी योगासने किंवा इतर व्यायामास जातांना फोन नेणे टाळा... आपल्या घरचं तासाभरात काही अडत नाही . तशी त्यांना आणि स्वतः ला सवयच लावा ... हा एक तास पूर्णपणे स्वतः च्या आरोग्याला द्या. मुलांशी खेळतांना त्यांनाच वेळ द्या...हातात आभासी जग नकोच... जोडीदाराबरोबर हातात हात घालून फिरायला जातांना फोन नेण्याचं टाळा... एकमेकांना द्यायचा साराच वेळ status आणि dp च्या फोटोसाठी वाया घालवू नका. मैत्रिणींच्या get-together ला मज्जा मस्ती धम्माल करा... सोशल मीडियावर आपण वाया घालवत असलेला वेळ सत्कारणी लावा. माझे एक काका अतीशय सहृदयी,हुशार आणि रसिक माणूस...रिटायर्ड झाल्यावर ते अतिशय सुरेख आयुष्य जगतात... फिरायला जातात,भरपूर पुस्तके वाचतात, आवडत्या कवितांचे अनुवाद करतात, आवडती गाणी गातात बासरी वाजवतात... मात्र कटाक्षाने ते सोमवारचा सोशल मीडियाचा उपास करतात. सोमवारी ते ऑफलाईन असतातच... हा वेळ त्यांना खूप काही देणारा निश्चित आहे. मी देखिल दिवसातले काही तास माझी प्रिय पुस्तके घेऊन वाचायला सोशल मीडियाला तात्पुरता आराम देईन म्हणतेय...वेळ आलीये स्वतःशी संवाद साधायची.... त्यासाठी सोशल मीडियाचा उपास करायलाच हवा. या नवरात्रीच्या निमित्ताने मन आणि कुटुंब प्रसन्न करणारे हे व्रत नक्कीच करून पहा 👍
© यशश्री रहाळकर