माझा लेक अभय उर्फ बंटी... नाव अभय असलं तरी मुलखाचा भित्रा ससा....अगदी झुरळापासून मांजरपर्यंत सगळ्यांना घाबरणारा. आम्ही सगळे घरचे, नातेवाईक एव्हढेच काय टीचर आणि त्याचं मित्रमंडळ देखिल त्याला बंटी म्हणूनच ओळखतात.गेल्याच महिन्यात आठ वर्षांचा झाला.... "आता बंटी नको ना म्हणू "... असं सारखं सुरू झालंय."मग काय दामाजी सारखं बंटी साहेब म्हणू का?".. मी विचारलं. दामाजी आमचा पूर्ण वेळ रखवालदार, कम माळी, कम स्वीपर वगैरे....आमच्याच बंगल्यातील खालच्या खोलीत राहतो.. एकटा जीव.
गावापासून जरा दूरच आमचा बंगला ... ... पाथर्डी रस्ता लागला की एक जुनं चर्च... चर्चच्या पाठी चार दोन घरे...आणि त्याच चौकात चार दुकानं... एक अमूल मिल्क पार्लर...एक सलून, एक किराणा मालाच नी एक कसलं तरी ऑफिस.चौकाच्या पुढं काहीही नाही... सगळं माळरान आमचा एकटाच बंगला.खालच्या मजल्यावर बंटीच्या बाबांचा बिझनेसचा पसारा वरती प्रशस्त राहतं घर...घराला माणसांच्या दुप्पट खोल्या.. आम्ही इन मीन साडे तीन माणसं... मी , बंटीचे बाबा, आज्जी आणि बंटी साहेब ... खरंतर बंटी अगदी चार महिन्यांचा असतांना इथे रहायला म्हणून आले तर एव्हढां एकांत भयावह वाटला .हळूहळू माझी झाडाफुलांची आवड जपत सुंदर बाग फुलवली.. प्रशस्त घर, शुद्ध हवा, मोकळं वातावरण, शहराच्या गोंगाटापासून दूर असणारं आमचं घर मला आवडायला लागलं.त्यात बंटीच्या बाबांचीही सोय झाली... त्यांना मस्त गरमागरम जेवण ,नाष्टा सारं देता येई. बंटीच्या शाळेच्या बसचा स्टॉप देखिल चौकातच होता अमूल मिल्क पार्लर जवळ... सगळं कसं सोयीचं होतं.
एक मात्र झालं बंटीला खेळायला सोबत नव्हती कुणाची.. पोर एकटा पडला. खोलीभरून सगळ्या प्रकारची खेळणी होती... त्यात हा एकटाच खेळत बसे... तसा शहाणा होता...कधी कसली तक्रार नसे.दामाजीशी मस्त गट्टी होतीच.. कंटाळा आला की त्याच्यासोबत चक्कर मारून येई...कधी भाजी आणून देई तर कधी वाण सामान.सकाळी 7:15 ला बंटीला मी चौकातल्या स्कूल बसच्या स्टॉपला सोडायला जायचे...त्या स्टॉप वर बंटी एकटाच असायचा.... एव्हाना शिंदे आजोबा अमूलचे दुकान उघडून माल उतरवून घेत असत...दोन जुजबी वाक्य बोलून, ताजं दूध घेऊन मी परत येत असे.साधारण जुलै महिन्यातल्या एका सकाळी त्या स्टॉप वर आणिक 2 व्यक्ती दिसल्या साधारण बंटीच्या वयाचा मुलगा आणि एक आजीबाई.दुपारी 2:15 ला बंटीला घ्यायला स्टॉप वर पोहोचेपर्यंत आजीबाई आलेल्या होत्या.ओळखीचं हसल्या... जुजबी ओळखी झाल्या... एवढ्यात दोघे बसमधून उतरले.दोघे एकाच वर्गांत होते...सुजॉय त्याचं नाव... बंटी साहेब खूपच खुषीत होते.नवा मित्र मिळाला होता... घरी जाईपर्यंत सुजॉय पुराण ऐकायला मिळाले.
लवकरच सुजॉय आणि बंटी जिवलग मित्र बनले. सुजॉय घोष ...देशपांडे आजींच्या मुलीचा मुलगा.बंगाली बाबूशी तिने केलेला विवाह 2 वर्षांत मोडला.. दोघांनी आपापले दुसरे संसार मांडले... सुजॉयची अडचण दोघांनाही नको होती... सुजॉयची रवानगी मग आजीआजोबांकडे झाली.अधून मधून दोघेही येऊन भरपूर पैसे, सुजॉयला गिफ्ट्स वगैरे देऊन जात...कळत्या वयापासून सुजॉय आजीकडेच वाढला.सुजॉय विलक्षण बुद्धिमान आणि समजूतदार होता...कसलीही तक्रार ,हट्ट आपण करताच कामा नये हे ; न सांगताच त्याला उमजले होते..वर्गांत कायम अव्वल तर असायचाच पण सगळ्या स्पर्धांत देखिल हिरीरीने भाग घेई... चुणचुणीत, लाघवी होता.
थोडक्यात काय तर आमच्या बंटीच्या अगदी विरुद्ध ... मितभाषी, बुजरा , एकलकोंडा बंटी तर बडबडा,हसतमुख,सगळ्यांशी मैत्री करणारा सुजॉय. तरीही दोघांची घट्ट मैत्री झालीच.. दिवसभर दोघे एकमेकांसोबत असायचे..शाळेत एकाच बाकावर बसायचे. उरलेला वेळ हा त्याच्या नाहीतर ; तो ह्याच्या घरी पडीक असायचा.त्याच्या सोबत बंटी देखील खुलू लागला... बंटीकडून वेगवेगळ्या स्पर्धांची तयारी सुजॉय करून घेई.. बंटीला कठीण वाटणाऱ्या गणिताचाही अभ्यास तोच करून घेत असे.त्यांच्या योगाने दोन वर्षांत त्यांच्या आज्यांचीही मस्त मैत्री झाली.. देशपांडे आजी आणि बंटीच्या आजी चौकात भेटून रिक्षा करत मग कधी कोणत्या देवळात जात तर कधी कीर्तन, भजन अश्या कार्यक्रमांना जोडीने जात. या दोघांच्या हाताने डब्यातून खाऊ आवर्जून पाठविला जाई.. एव्हाना सुजॉय आणि बंटीच्या आवडीनिवडी दोन्ही घरांत कळल्या होत्या. बंटीला देशपांडे आजींच्या हातचं झणझणीत आवडे तर सुजॉयला माझ्या हातचं गोडधोड.सुजॉय मला "बंटीची आई" म्हणायचा. एकदा त्याला म्हटले देखिल, " सुजॉय ; मला काकू किंवा मावशी म्हण ना!.. हे बंटीची आई फार परकं वाटतं".सुजॉय चटकन म्हणाला, "आई बरं वाटतं!" नकळतपणे भरून आलेले डोळे पुसत खेळायला पळाला.
दिवाळीच्या आधीची कामांची लगबग आवरा-सावर सुरू होती. देशपांडे आज्जी नेहमीप्रमाणे गप्पा मारायला म्हणून आल्या...सुजॉयनी गियरची सायकल घेण्याचा हट्ट धरलाय म्हणाल्या.मला नवलच वाटले कारण सुजॉय हट्ट करणारा मुलगा नव्हताच.सायकल महागडी तर होतीच पण आमच्या चौकातल्या रस्त्यावर अवजड वाहनांची सतत वर्दळ असे.. म्हणून देखिल त्यांचा ह्या सायकल प्रकरणाला विरोध होता.. रात्री आमच्याही घरी बंटीने गियरची सायकल हवीच असा हट्ट धरला.वर्गातल्या कुठल्यातरी मुलाची stylish सायकल पाहून तश्शीच घ्यायचा या दोघांचाही विचार होता.... मी देखिल या सायकल घेण्याला कडाडून विरोधच केला. त्यात भर म्हणजे ह्या दिवाळीला मी भावाकडे जायचे ठरविले होते.. भावाने नवे घर घेतले आणि आईची एकसष्ठी .. दोन्ही एकत्रच सारे मिळून करायचे ठरले. झाले बंटीने आकाशपाताळ एक केले...."मी सुजॉयला सोडून मुळीच येणार नाही.त्यालाही घेऊन जाऊ. मला तिथे करमत नाही.मी नाही येत..." पर्यंत सारे करून झाले. माझ्या दोन्ही भावांना दोन मुलीचं.. त्यांच्याशी काय खेळणार... कसेबसे चार दिवसांसाठी त्याला तयार केले.सुजॉयला कसे नेणार? शेवटी लोकांचं पोर ते. आम्ही गाडीत सामान ठेवले.. अन निघणार तेव्हढ्यात सुजॉय आला.. स्वारी नव्या कोऱ्या गियरच्या सायकलवर स्वार.. त्याच्या पप्पांनी घेऊन दिल्याचे म्हणाला. बंटी खुश झाला.. आल्यावर खूप खेळायचे ,काय काय करायचे, कुठे कुठे सायकलवर भटकायचं.. सारं planning करून दोघांनी निरोप घेतला. पुढचे चार दिवस कसे गेले कळलं देखिल नाही.. दिवाळी, नवीन घराची वास्तुशांत आणि आईचा वाढदिवस...मनभर आनंद भरून घेत आम्ही परतलो.
घरात पाऊल की दारात पाऊल... बंटी सुजॉयकडे निघाला...नवीन सायकलची उत्सुकता होतीच. दाराशीच त्याला दामाजीने अडवलं.. काय सांगितलं कोण जाणे.. बंटी हातपाय आपटत ओरडतच वर आला, " नाही हे खोटं आहे. सांग ना दामाजीला.. सुजॉय असं कधीच करणार नाही. मला केलेलं प्रॉमिस तो कधीच मोडणार नाही" म्हणत बंटी ओक्साबोक्शी रडू लागला....अखेर आपल्या खोलीत जात त्याने धाडकन दार लावलं. दामाजीने बंटीला सुजॉय त्याच्या पप्पांकडे कलकत्त्याला कायमचा निघून गेल्याचं सांगितलं होतं.देशपांडे आज्जींना फोन करून विचारू म्हणून बंटीच्या आजी वळणार तोच दामाजीने मोठ्ठी धक्कादायक बातमी सांगितली... आम्ही निघालो त्याच वेळी सायकलवर घरी परतणारा सुजॉय .. एका ट्रेलरच्या मागच्या चाकात येऊन जागीच गतप्राण झाला होता." मोठं वंगाळ झालं बाई! हे रस्ताभर लोक जमले व्हते.. कवटी फोडून पोराचा मेंदू बाहेर आला होता पार चेंदामेंदा झाला व्हता .. पोरगं पार एका फटक्यात जागीच गेलतं...कुठे नेन्या आणन्या पल्याड...लई वंगाळ!" डोळ्यांत पाणी आणून दामाजीने वर्णन केले. आम्ही सासू सुना जागेवरच हबकून बसलो..... बंटीला दामाजीने सांगितले तेच बरे म्हणायचे. आम्ही दोघी देशपांडे आजींना भेटून आलो.. देशपांडे आजींची भीती खरी झाली होती.... त्यांचा विलाप ऐकवत नव्हता अगदी... कशी अन कोणत्या शब्दात समजूत घालू कळेनासं झालं होतं... जड पावलांनी परतत होतो अंगणात सुजॉयची सायकल लावलेली होती... एव्हढ्या मोठ्या अपघातात सायकल जश्यास तशी होती... बहुदा दगडावर आपटून सुजॉय ट्रेलरच्या चाकात फेकला गेला होता.. सायकल मात्र बाजूला पडली... ती काळीकुळकुळीत सायकल एखाद्या चांडाळा सारखी माझ्याकडे पाहून जणू हसत होती.
बंटीला हळूहळू सुजॉयचे जाणे स्वीकारावेच लागले... मात्र तो आपल्या जगात नाहीच हे सत्य मानायला त्याचं मन तयारच नव्हतं. बंटीच्या मनावर खोल आघात झाला होता... त्याचं घुमेपण दिवसेंदिवस वाढत चाललं होतं.त्याचं आमच्याशी अवाक्षरही न बोलणं ...माझी काळजी वाढवत नेणारं होतं.या दुःखातून सावरायला त्यालाही वेळ देणं गरजेचं होतंच... मी काहीतरी निमित्ताने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत राहिले... सुट्ट्या संपून शाळा उघडली ... आता सगळे रुळावर येईल असे वाटू लागले... नेहमीप्रमाणे बंटीला बस स्टॉपवर सोडायला गेले तर अमूल पार्लर बंद...आज बराच उशीर झालाय शिंदे आजोबांना... असा विचार करून घराकडे वळणार एव्हढ्यात एका मुलानी दुकान उघडलं...मी त्याच्याकडे शिंदे आजोबांची चौकशी केली... तेव्हा कळलं त्यांची तब्येत गेले काही दिवस गंभीर आहे. 'तो' अपघात त्यांच्याच दुकानासमोर झाला होता... सुजॉयला अखेरचं त्यांनीच पाहिलं... त्यांच्या तब्येतीची चौकशी करून मी घरी परतले.
साधारण चार दिवस बंटी शाळेत जाई परत येई.. उरलेला वेळ आढयाकडे पाहत बसे...एकदा सकाळी 12 च्या सुमारास बंटीच्या शाळेतून तातडीने मला बोलवले असल्याचा फोन आला अन् काळजाचा ठोकाच चुकला..धावतपळत आम्ही शाळा गाठली. बंटीने एका मुलाला बेदम मारले होते...हातापाया पडून माफी मागून प्रकरण निवळले.तरीही महिनाभरासाठी बंटीला शाळेतून काढून टाकले होते.झाल्या प्रकारावर बंटी बोलायला तयार नव्हता.त्याच्या वर्गशिक्षिका आम्हाला बाहेर भेटून ...बंटीला मानसोपचारांची गरज असल्याचे म्हणाल्या... तो हल्ली विचित्र वागतो ,प्रश्नांची उत्तरे देत नाही, एकटाच स्वतःशीच बोलत बसतो... आजही एक मुलगा सुजॉयच्या जागेवर बसला आणि वाद सुरू झाले ... त्याला सांभाळायला सांगून त्यांनी निरोप घेतला.
घरी पोचतो न पोचतो तोच बंटी "आलो आलो रे!" म्हणत धावत सुटला. कसंबसं दामाजीने पकडून त्याला घरी आणलं. बंटी आपल्याच तंद्रीत बडबडत होता... "सुजॉय आलाय तो बघ कंपाऊंड जवळ उभाय... ते बघ! तो आवाज देतोय बंटी चल खेळू... बंटी चल खेळू..." बंटीच्या बाबांनी त्याला दोन सणसणीत लगावल्या... तसा तो गळा काढून रडू लागला... त्याला फरपटत आजोबांच्या फोटोपुढे उभे करत बंटीचे बाबा म्हणाले, " हे बघ! हे तुझे आबा. देवाघरी गेले आहेत पुन्हा कधीही परत न येण्यासाठी... तसाच तुझा सुजॉय कायमचा देवाघरी गेलाय... काय म्हणतोय मी?? कळतंय का तुला??" बंटीच्या आजीने या दोघात उडी घेत बंटीला पोटाशी धरलं, त्याची दृष्ट काढली, स्वामींचा अंगारा लावला तसा बंटी शांत होत गेला.या सगळ्यात मी थिजून उभी होते. पुढे मानसोपचार तज्ञ, कौंसेलिंग वगैरे सोपस्कार पार पडले. त्यांच्या मते बंटीला डिप्रेशन आले होते.बंटीला औषध द्यायला म्हणून त्याच्या खोलीत गेले तर हा आढयाकडे नजर लावून बसलेला...दहा वर्षांचं चिमण पिल्लू माझं.. काय होऊन बसलं होतं? खोल गेलेले डोळे,त्याखाली काळी वर्तुळं, खाण्यापिण्यात चित्त नाही त्यामुळे खंगून पार वाळलेला बंटी.. मला पोटातून भडभडून आलं. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असतांना त्यानी अचानक माझा हात घट्ट धरून ठेवला . माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, " आई... मी खरं बोलतोय तुझी शप्पत.... मला सुजॉय दिसतो. तो मला खालून आवाज देतो.. बंटी चल खेळू...असा. खर आहे" म्हणत रडू लागला....त्याला जवळ घेत मी त्याच्याशी बोलत राहिले... त्याच्या मनात साचलेलं सारं निवळायला हवंच होतं. थोडक्यात काय तर बंटीला सुजॉय सगळीकडे दिसत नसे फक्त खेळायला बोलवायला येई... हे सारे त्याच्या मनाचे खेळ आहेत या खेळात त्याला जिंकलेच पाहिजे वगैरे मी त्याला सांगू लागली. त्याला ते कितपत कळलं कोण जाणे? औषधांच्या गुंगीने बंटीला गाढ झोप लागली .
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळे उठलो तर बंटी घरात नव्हताच..... बरं! कुणाला सांगूनही गेला नव्हता.सगळे शोधायला निघाले.. तेव्हढ्यात देशपांडे आजींचा फोन आला.. बंटी त्यांच्या घरी गेला होता... पाहते तर काय???? बंटी सुजॉयची सायकल चालवत आला ... खुशीत दिसत होता.. पण बंटीला तर सायकल चालवताच येत नव्हती. सायकल स्टँडवर लावून बंटी घरी आला... कसलं तरी गाणं गुणगुणत...म्हणाला "खायला द्या पटकन काहीतरी खूप भूक लागलीये" बंटीचा आवाज नव्हताच तो.... की मलाही भास होताहेत. "काय करू तूच सांग... तिखट मिठाच्या पुऱ्या करू तुझ्या आवडीच्या की पोहे करू?आणि काय रे सायकल कधी शिकलास तू?"मी विचारले. "सुजॉयला येते ना सायकल" बंटी म्हणाला... मी पहातच राहिले... हात पाय धुतांना... बंटी बोलू लागला... आवाज पुन्हा बदललेला... सायकलवर कसं मस्त वाटतं... पक्षांसारखं उडतोय असं वाटतं... आता खूप अभ्यास राहिलाय अभ्यासाला बसतो... असं काही काही बडबडत राहिला.... खोलीत जाताजाता.. "मस्त गोड शिरा करा ना बंटीची आई! " असं म्हणाला... मी जागीच कोसळले... "बंटीची आई " म्हणाला होता मला तो..... पुन्हा मानसोपचार तज्ञ गाठले... आता त्यांच्या सेशनला रोज बंटीला न्यावे लागे... त्यांच्या मते बंटीला split personality disorder दुहेरी व्यक्तिमत्व असं काहीतरी अगम्य झालं होतं... तो स्वतः ला कधीकधी सुजॉय समजायचा.
सुजॉयला जाऊन जवळपास 25 दिवस होऊन गेले होते...मात्र हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकाधिक जटील होत चाललं होतं... कधी तो बंटी असे तर कधी सुजॉय... कधी शांत असे तर कधी आक्रमक होत जाई... कधी दोनदा आंघोळ करायचा तर कधी नुकतेच घातलेले कपडे बदलायचा... कधी तिखट करायला सांगायचा नी दुसऱ्या मिनटांत गोडाचा हट्ट धरायचा... सकाळ दुपार संध्याकाळ सायकलवर फेऱ्या मात्र मारायचा ... त्या झाल्या की मज्जेत असायचा...मात्र सगळ्यांत भयावह वाटायचं जेव्हा बंटी आमच्याच घराच्या खाली उभा राहून हाका घालायचा, "बंटी चल खेळू... बंटी चल खेळू" तेव्हा तो सुजॉय असायचा... बंटीच्या आजी त्याला स्वामींचा अंगारा लावायच्या ... आपापल्या परीने जप उपास तापास करायला लागल्या..एकदा त्या देशपांडे आजींना घेऊनच आल्या... बंटी धावत येऊन आजी म्हणत त्यांना बिलगला... क्षणभर त्यांनाही सुजॉय भेटल्याचाच भास झाला... बंटीच्या आजीने घडलेले सारे ईत्तंबूत वर्णन केले... हे काय आक्रीत आणिक? त्यांनाही कळेनासं झालं. मात्र त्यांनी त्याही परिस्थितीत एक प्रयत्न म्हणून बंटीला जवळ बोलावले... जणू सुजॉयला समजून सांगत असाव्या तश्या मायेनं जवळ घेत म्हणाल्या... " बाळा! फार सोसलस रे इवल्या आयुष्यात... माय बापाची भांडण, त्यात तुझा तिरस्कार.. तुला त्यांनी टाकून देणं...मी strong boy आहे म्हणायचास ना तू..." काय आश्चर्य बंटी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागला....तश्या प्रेमानं पाठीवर हात फिरवत म्हणाल्या... " शहाणा राजा माझा! मला माहित आहे , बंटी खूप आवडायचा ना तुला... पण त्याच काय होतंय कळतंय का तुझ्यामुळे?मुक्त कर त्याला" तसा एकदम संतापाने किंचाळत स्वतः च्या खोलीत पळत जात बंटी म्हणाला... "मी नाही जाणार.. मला खूप खेळायचंय बंटी सोबत... मला आवडतं इथे राहायला.. बंटीच्या आई किती प्रेमळ आहेत.. किती माया करतात माझ्यावर... आवडतं मला ते मी नाही जाणार." त्याचा रुद्रावतार आम्हाला नवा नव्हता... पण देशपांडे आजी भीतीने थरथरू लागल्या.... माझ्या प्रेमामुळेच तर माझ्या लेकराची ही अवस्था झाली नव्हती ना ??... माझ्या कानात शब्द घुमत होते..."बंटीच्या आई प्रेमळ ... किती प्रेमळ" माझ्यातली आई हरली होती.. देवापुढे पदर पसरून मी रडू लागले... काय चुकलं असेल त्याची शिक्षा मला दे माझ्या पिल्लाला सोडव म्हणत... माझ्यातली हतबल आई रडू लागली....समोरच्या समईच्या प्रकाश रेणुका मातेच्या मुखावर उजळून गेला.. जणू मला विचारू लागला काय करू शकतेस तू आपल्या लेकरासाठी?? स्वतःला आई म्हणवतेस ना... एका दृढ निश्चयानिशी मी देवीपुढे हात जोडले.......क्रमशः....

(बंटीचं पुढे काय झालं?? वाचा भाग 2 मध्ये)
© यशश्री रहाळकर

Very touching ,eager to read next post
उत्तर द्याहटवालवकर सांग ग बाई.. बंटीच पुढे काय झालं!! उत्सुकता ताणून धरू नकोस जास्त.. एकतर मुलं म्हंटली की आपण आधीच खूप हळव्या होतो..
उत्तर द्याहटवा👍👌
उत्तर द्याहटवाVery touching
खूप सुरेख आणि मर्म स्पर्शी आहे.split personality disorder. अजून पुढे काय झाले त्याची उत्सुकता आहे
उत्तर द्याहटवा