इये नाशिकचीये नगरी
मी जन्मानं नसली तरी मनानं आता नाशिककर. लग्नापूर्वी शिक्षणाचे निमित्ताने दोन आणि लग्नानंतरची आठ अशी उणीपुरी दहा वर्षे मी 'नाशिककर' आधुनिकता आणि प्राचीन परंपरा यांचा हातात हात घालून जेथे प्रवास अहोरात्र चालतो त्या नाशिकशी माझे नाते दृढ केले ते रसनेनं...अहो, जिभेनं. खवय्या (शुद्ध खादाड), रसिक (उघडपणे हावरट) आणि गोडखाऊ; ज्याला शुद्ध नाशिक बोलीत 'गोड्या ' असे म्हणतात, ह्या कॅटेगरी मध्ये समावेश होऊ शकणाऱ्या सर्व मानवजातीसाठी नाशिक म्हणजे 'दि लास्ट डेस्टिनेशन', मक्का ,कैलास ...काय हवं ते म्हणा हो! यापेक्षा अधिक चवीने गोड खाणारे लोक विरळाच.
मुळात मुलांसाठी डाएट,लो कॅलोरी, व्हिटॅमिन्स वगैरे देण्यापुर्वीच्या काळात जन्मलेली माझी पिढी. कानात वारं शिरल्यासारखं भरपूर खेळायचं अन आईने कान धरून जेवायला आणल्यावर मिळेल ते चापून खायचं. आजीनं कितीही लपवून ठेवलेले लाडू आम्ही फार तर अर्धा तासात शोधत असू अन शिरा घरी होणार हे आम्हाला रव्याच्या वासानच कळायचं.थोडक्यात काय तर ,वाढत्या वयाबरोबर माझी ही मधुर आसक्ती भक्तीत रूपांतरित झाली.मला हवापाण्या इतकेच जीवन जगण्यासाठी गोड आवश्यक आहे हा साक्षात्कार मला याच नाशिक नगरीत झाला.माझ्या वजनकाट्याचे ऊर्ध्वगमन पाहून गोड न खाण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरांना मी नुकतेच " त्यापेक्षा मी वजन करणेच सोडेन " असे बजावून आली.नवीन डॉक्टर होत असणाऱ्यांनी याची निश्चित नोंद घ्यावी....डायबेटीस नसणाऱ्या माणसाला गोड खाऊ नकोस हे सांगणं नाशकात ब्रह्महत्येच पातक मानलं जातं. खरा नाशिककर नाशिकात असे न म्हणता "आमच्या नाशकात " असेच म्हणतो. तर माझे आणि नाशकाचे जिभेचे नाते.
खरा नाशिककर विशिष्ठ पदार्थ,विशिष्ठ वेळी,विशिष्ठ प्रमाणात आणि केवळ विशिष्ठ व्यक्तीनेच बनविलेला खातो.अर्थात त्यामागे पुणेकरांसारखी चितळे भक्ती दडलेली नसते तर असते केवळ जिव्हातृप्ती. 'उदरभरणं ' या हेतू व्यतिरिक्त 'रसानापोषणम ' हाही एक प्रमुख हेतू नाशिककर आवर्जून बाळगतात.जिलबी हा पदार्थ केवळ आणि केवळ बुधा हलवाईनेच बनवावा अशी यांची निष्ठा असते.त्याला नाशिककर 'बुध्याची जिलबी' असे म्हणतात. ही जिलबी खाल्यानंतर मनुष्यप्राणी पृथ्वीवरील अन्य कोणतीही जिलबी खाणार नाही इतका संमोहीत होतो. जुन्या नाशकात कुठल्याश्या अरुंद गल्लीत तीन चार पिढ्यांपूर्वीचे हे छोटेसे दुकान. या दुकानात कधीही गेलात तर रांगच लावावी लागते .असे रांगेत उभे राहून आपल्या समोरच कढईतून टाळली जाणारी देखणी जिलबीबाई newspaper रुपी फडक्यात गुंडाळून दिली जाते.ती कागदी खोके किंवा डब्यातून देणे म्हणजे त्यांच्या कर्तृत्वावर जणू संशय घेण्यासारखेच आहे.ही जिलबीबाई घरी दुसरे तिसरे दिवशीही तेव्हढीच ताठयात असते;हे विशेष.थोडक्यात काय तर नाशिककर ऐवजी जिलबीकर म्हणावे एव्हढे हे प्रेम.
नाशिकचे दुसरे गोड वैशिष्ट्य म्हणजे 'खुरचंदवडी' . बेसन,खवा,नारळ वापरून केलेली ही मिठाई फक्त नाशिकमध्येच खावी.ही खुरचंदवडी येथे प्रत्येक गल्लीत मिळते.एका राजस्थानी मिठाई वाल्याला खुरचंदवडी प्रकार माहित नसल्याने त्याला "चाळणीत पाणी घेऊन जीव दे मेल्या!" हे एका अस्सल नाशिककर आजोबांनी ऐकवल्याचेही मी पहिले आहे.गरम सामोसे किंवा तिखट बटाटे वडे खाऊन झाल्यानंतर ही वडी एक प्लेट घेऊन खाण्याचा प्रकारही सर्रास सगळीकडे पाहावयास मिळतो.
गोड दहीवडे हा दहीवड्याशी मुळीच संबंध नसणारा अतिगोड प्रकारात मोडणारा बालुशाही वर्गीय प्रकार केवळ जुन्या नाशकात खायला मिळतो. वजनाकडे लक्ष देणाऱ्या मंडळींनी याकडे साधे पाहूही नये ... नुसते पाहूनही वजन वाढू शकते.जुन्या नाशकात जागोजागी इमरती आणि आटीव दूध असे कॉम्बिनेशन असणाऱ्या गाड्या/ठेले पाहायला मिळतील .अनेक आखाड्यांसाठी नाशिक प्रसिदध आहेच.अजूनही काही आखाडे अस्तित्वात आहेत काही नामशेष झाले पण टिकून आहे ही पहेलवान परंपरा......एक प्लेट इमरती खाऊन त्यावर एक ग्लास दूध मलाई मारके. हा रसिकपणाचा उच्चांक ;कोजागिरी ,गायनसंध्या आणि मध्यरात्री संपणारी नाटके यानंतर गाठायचा असतोच.बायकोला नाटकाला नेताना मोगऱ्याचा गजरा न माळणाऱ्या नवऱ्यापेक्षाही हे आटीव दूध न पाजणारा नवरा अधिक कद्रू ठरतो.
दिवाळीनंतर श्रमपरिहार म्हणून किंवा घरातील कर्ती स्त्री आजारी पडली तर काय ? या प्रश्नाचे उत्तर "खापरावरचे पुराणाचे मांडे" असे ऐकून दचकू नका.येथे भरपूर खान्देशी मंडळी स्थायिक झाल्याने जागोजाग पुराणाचे मांडे येथे सहजी मिळतात.मग घरातील बाबा लोक त्याच्याबरोबर तिखट मसालेदार आमटी बनवून अत्यंत मनोभावे तिन्ही त्रिकाल मांडे खाण्याचा कार्यक्रम रंगतो.एखादा रसिक नवरा जोडीला खिचडी कांदाभजी असे देखील करतो."येथे खापराच्या मांडे शिकवले जातील " असे क्रॅश कोर्से असणाऱ्या पाट्याही तुम्हाला पाहायला मिळाल्यात तर नवल नाही.
खरा नाशिककर हा गूळप्रेमीच.साखरेचे वावडे म्हणजे किती ? कि माझ्यासारख्या वैदर्भीय व्यक्तीने 'साखरेचे पुरण' हा शब्द उच्चारला तरी अंगावर पाल पडावी तसे दचकून दोघीचौघीनी गर्रकन वळून पहिले कि हो! एव्हाना मला कळून चुकलेय कि पुरण,शिरा,अनारसा आदी पदार्थ गूळाचेच करणे हे सुगरणीचे लक्षण आहे.जन्मानं नाशिककर असणारी स्त्री ओळखायची असेल तर पन्ह किंवा सरबत करण्यास सांगावे. मुळची नाशिकची मुलगी तेही गूळाचेच करेल.साखरेचा एकमेव पदार्थ नाशिककर आवडीने खातात तो म्हणजे 'पाकातले श्रीखंड' याच्याशिवाय गुडीपाडव्याची कल्पनाही ते करू शकत नाही.हे झिंगाट श्रीखंड भरपूर खरंतर प्रचंड जायफळ घालून केलेले असते.ते खाल्ल्यानंतर वामकुक्षी अनिवार्यच.
सणावाराला गोड पदार्थ म्हणून रबडी बनवणे येथे कमीपणाचे मानले जाते.येथे चौकाचौकात कुल्फीच्या दुकानात रबडी वाटी विकत मिळते.येताजाताना कधीही प्रयोजन नसताना ती खाल्ली जाते.अगदी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असणाऱ्या patient साठी बसून असणारे लोकही पाय मोकळे करण्यासाठी निघाले की रबडी वाटी खाऊन येतात.कॉलेज चे जुने मित्र भेटले की 'सलीम की चाय',मामा मुंगी स्टॉप चे किंवा पंचवटी हॉटेल वकीलवाडीचे पान,उपवासाला फक्त आणि फक्त सायंताराचा वडा किंवा बटाटा कचोरी,भेळ म्हणजे फक्त शौकीनची अशी व्याख्या म्हणजे नाशिककर .
आषाढी कार्तिकी आणि शिवरात्रीला येथे मिळणार अद्भुत प्रकार म्हणजे'उपवास जिलबी'.खवा आणि बटाटा या दोन प्रकारात मोडणाऱ्या या जिलबीसाठी नाशिककर लांबच लांब रांगा लावतात.एकदा ही तोंडात विरघळली की तुमचा उपास सुफळ संपूर्ण.रांगेत सकाळी लवकर उभे राहून आपल्या लहानग्यांसाठी ही उपवास जिलबी मिळवून वाहून आणणारा पिता ,श्री कृष्णाला टोपलीत घालून नेणारा वासुदेव वाटावा जणूकाही.तेच पितृप्रेम तीच माया.उपवास जिलबी न नेणाऱ्या गृहस्थाच्या खिचडीत तिखटमीठ रागाने अंमळ जास्तच पडते हे निश्चित.
नाशिकमध्ये नव्याने दाखल झालेल्या व्यक्तीला 'Dairy Don 'नामक ठिकाणी घेऊन जाण्याचा येथील कालातीत प्रघात आहे.यांच्या विविध शाखांमध्ये सॉफ्टी आणि Thick Shakes नवागतांना आवर्जून खाऊ घातले जातात.Softy अफाट भन्नाट.पण Thick Shakes पिताना किंवा खाताना म्हणा हवे तर विचारच करावा. हे shakes खरंच Thick असतात त्यात सुका मेवा भरपूर प्रत्यक्षात वापरलेला असल्याने ते पिणे एऱ्यागैऱ्याचे काम नोहे.बासरीवजा स्ट्रा मधून खेचून हे Thick Shakes पिणे हे गाल आणि छाती दुखावणारे निश्चित ठरू शकते.पिण्यापेक्षा हे Shakes खाल्लेले उत्तम.
नाशिककरांच्या गोडभक्तीचा मेरुमणी म्हणजे ''गोडी शेव" हि खास जुन्या नाशकातून दहा किंवा वीस रुपयांची पुडीत आणली जाते.खरा नाशिककर अत्यंत भक्तिभावाने आणि स्नेहार्द्र दृष्टीने प्रथम त्याकडे कटाक्ष टाकतो,नंतर प्रसादाचा तुकडा खावा इतपत मनोभावे आणि अगदी एव्हढ्याच प्रमाणात हि भडक लालरंगी शेव खातो.हि शेव भल्याभल्या गोड्याना अक्षरशः झोपवते......या पुढे काहीही नाही.जगाचा आदी अंत परमेश्वर जणू प्रत्येक कणात वसलेला आहे हे आध्यात्मिक चिंतनच ती शिकवत असते.याहून अधिक गोड पदार्थ पृथ्वीवर अस्तित्वात नाही, अखिल ब्रह्माण्डात भरलेला गोडवाच जणू एका शेवेच्या तुकड्यात उतरलेला असल्याचा साक्षात्कार तुम्हाला होतो.क्वचित गोड खाणाऱ्यांनी हि खाण्याची Risk घेऊच नये,अशी काही मिठ्ठी बसते तोंडाला की कारल्याचा रस पिणे गरजेचे वाटावे.
नाशिकर खरा खवय्या.येथे कोणताही फूड फेस्टिवल ठेवा खच्चून गर्दी.भजी महोत्सव असो वा आनंद मेळा फूड स्टॉल मस्त फुललेले.अगदी सारस्वत मेजवानी पासून तांबड्या पांढऱ्या पर्यंत सगळे जीव लावून खाणारे नाशिककर.पण म्हणतात ना पाहिलं प्रेम विसरता येत नाही. नाशिककरांचा पाहिलं प्रेम म्हणजे 'मिसळ'."दोन महिने झाले हो मिसळ खाऊन..."असं जर स्टेटमेंट कुणी केलं तर लोक लगेच "आजीआजोबा बरे आहेत ना?"अशी चौकशी करतात.थोडक्यात घरी कुणीतरी गेलं तर नाही ना....कारण महिन्यात किमान एक रविवार खरा नाशिककर मिसळ खाणारच.येथेही गोडाची आवड जपत कॉम्प्लिमेंटरी म्हणून अनेक ठिकाणी लोक जिलबी देतात,मिसळीच्या बरोबरीनं.मिसळ तर महत्वाची पण गोडाविना कशी खायची? नाशिककरांना देवेन्द्राने अमृत पाजलं तरी "जोडीला जिलबी द्या की राव"म्हणणारे हे लोक.देवेंद्र देवांचा देव हो......गैरसमज नसावा.बाकी नाशिकला मिळतात ती गोड आश्वासनं.असो,तर मिसळी बरोबर 'भगोबा जिलबी" नामक बहारदार अप्सरा मिळते.हीच रंग रूप आफ्रिकन ब्युटी सारखं असलं तरी पठ्ठी बाजी मारते.भगोबा नामक मिठाईवाले किंवा आचाऱ्याने काही शेदीडशे वर्षांपूर्वी शोध लावलेली हि गुळाच्या पाकातील जिलबी .मिसळीच्या झणझणीत रश्याबरोबर हि जिलबी आवश्यक.
अशा या गोड प्रिय नाशिककरांची जीभही गोडच; खाण्यासाठी आणि बोलण्यासाठी सुध्दा."भामट्या,रताळ्या ,फिन्दड्या ...."यासारख्या अगम्य शिव्याही ते गोडीनेच देतात."माझी हाड घाल चुलीत."हे वाक्य नाशिकचा बाप पोराला रागावून म्हणतोय की प्रेमाने हे कळणारही नाही.रंगपंचमीच्या रहाड असो वा वीर नाचवणे,गणपतीची मिरवणूक असो वा पहाट पाडवा.....नाशिककर आनंदाने जाणार,उत्साहाने सामील होणार.आपलं वेगळेपण जपणार पण पुणेकरांसारखं त्याचंच कौतुक व्हावं हि अपेक्षा नाही.नेहमी मायेचा वर्षाव करणारी गोदामाई अचानक संतापून पोटात घेते तेव्हा 'नाशिककर पुन्हा लढण्यास सज्ज" म्हणून राजधानी करांसारखं त्यांचं कौतुकही होत नाही.दोन अंश पर्यंत घसरणाऱ्या हाडे गोठविणाऱ्या थंडीतही ते आपला गोडवा अखंड टिकवून ठेवतात,कोणतीही तक्रार न करता.जणू सांगताहेत जगाला...........
"कडू घोट गिळता गिळता आयुष्य मी नव्याने शिकलो.. जिभेवर अन मनावर रेंगाळणारा गोडवा अखंड होत जगलो."
- यशश्री रहाळकर
नाशिककर