फॉलोअर

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

आई .... " तिची " 👩‍👧आणि "त्याची"👩‍👦


आई ....

" तिची " 👩‍👧आणि "त्याची"👩‍👦
💖💙💖💙💖💙💖💙
            हम दो हमारे दो आणि पुढेतर एकच ... या काळातील आई ही एकतर तिची आई असते किंवा त्याची आई असते . (फारच थोड्या नशीबवान स्त्रियांना एक मुलगा एक मुलगी असते. )मूळात समानतेच्या ??? ह्या काळात ती काय नी तो काय सारखेच ... अस वाटणे साहाजिक आहे... पण मी बोलतेय ते प्रवृत्ती बद्दल.... मूल जन्मणे ही जरी संपूर्ण नैसर्गिक आणि शारीरीक प्रक्रिया असली तरी आई जन्मणे ही भावनिक आणि सतत अविरत घडणारी प्रक्रिया आहे. अगदी ८० वर्षांच्या आईला " काय सासूसून पहातेस ग !" म्हणत संस्कार चॅनल लावून देणारे ... तिचे नुकतेच रीटायर्ड झालेले साठीतील पिल्लूही नवेच आईपण शिकवत असते...
            तिची आई आणि त्याची आई ... वेगवेगळी घडत असते.. तिच्या आईपणाचा प्रवास निश्चितच वेगवेगळा असतोच. अर्थात म्हणून मुलीची आई होणे फार कठीण दिव्य ग बाई .... म्हणणाऱ्या आई लोकांची मला गम्मत वाटते. चेहऱ्यावर कायम मराठी सिनेमातील गरीब आईचे भाव आणि सतत पड खाण्याची भूमिका .... नीटनेटके पणाचा अभाव अम्मळ गबाळा अवतार .... असणारी आई मुलीची आई या भूमिकेत सतत वावरत असते . या उलट चेहऱ्यावर रूबाब गुर्मी आणि मी म्हणजे कोण मला असेच लागते म्हणत ठासून बोलणारी जराही नरमाईची भूमिका न घेणारी मुलाची आई या role मध्ये फिट्ट बसते.
           माझ्या या अशिष्ट विधानावर तडकून एकदोघीनी "असे काही नाही बरं ! मुलगा मुलगी सारखेच आहेत😡" असे विधान केले ... गम्मत म्हणजे हे विधान करणाऱ्या सगळ्या मुलांच्याच आई असतात. मुली वाचवा स्रीभ्रूण हत्या थांबवण्याचे आवाहन करणाऱ्या आणि एकतरी मुलगी वगैरे छाप कविता forward करणाऱ्या मुलांच्याच आई असतात . 😆
             मुलाची आई तशी एककेंद्री आणि सत्ताधारी कायमच असते. ती आई म्हणून तशीच घडते... तिचे कपाट कधीही कुणी उचकले नसते की तिच्या आवडीच्या साड्यांचे गॅदरिंगला गरारे झालेले नसतात.. तिचे लिपस्टीक मनमानी उगाळले नसतात ... आणि " मोठी झाल्यावर हा मोत्यांचा सेट माझा बरका! " असे उद्गार तिने कधी ऐकलेलेच नसतात.आज शिरा करून पाहते म्हणून तिच्या स्वयंपाकघरात कुणी धुमाकूळ घातलेला नसतो किंवा "तू भयंकर old fashion आहेस ग ! "यावर नवऱ्यासगट सर्वांचे एकमत झालेले नसते.मुलगा वयात येताना येणाऱ्या समस्या पुरूष या नात्याने अर्थातच पित्याकडे सोपवल्या जातात आणि  मुलाची आई "अभी तो मै जवान हूँl " चा नारा सहजी आळवू शकते.
          मुलग्यांची उपजत protective माया आणि नवऱ्याची लाडकी बिरूदे मिरवत  ती स्वकेंद्री आई म्हणून घडत जाते.यातच आपल्या पुरातन परंपरा व्यवस्थित buttering चे काम चोख बजावतात. मुलाची आई वरचढ ठरविणाऱ्या अनेक रीती तिला अधिक सुखावत जातात.... मुलाच्या मौंजीच्या पायघड्या असोत वा लग्नात होणारी उस्तवार तिचे आईपण अधिक हुकमी टोकदार बनवत जातात.
         एक मात्र मान्य करावेच लागते की ही त्याची आई अधिक खंबीर ,स्वतःला जपणारी ... मुलाची मैत्रीण होणारी पण त्याच्यावर बारीक लक्ष ठेवणारी आई असते . टोकाच्या विषम परीस्थितीत या आई उत्तम लढवय्या असतात वेळप्रसंगी संपूर्ण संसार त्या एकहाती पेलतात. स्वतःकडे पुरेसे लक्ष त्या देत असल्याने सतत update रहातात आणि पश्चातापाची वेळ सहसा येउच देत नाहीत.
           तिची आई बरेचदा आतून कोलमडलेली , तूटलेली, आत्मविश्वास खचलेली असते. याचेही कारण तिचा आईपणाचा प्रवास हेच असते.आजकाल लेकीच्या जन्माचा स्वीकार होत असला तरी सगळीकडे स्वागत होतेच असे नाही . एकप्रकारचा ताण वा दडपण घेउनच तिचे आईपण सुरु होते. त्यातच तिला  जे मिळाले नाही ते लेकिला देण्याचा ती सातत्याने प्रयत्न करू लागते. मग ते स्वातंत्र्य असो वा शिक्षण .. मनाजोगे कपडे घालणे असो वा मित्रमंडळ.... आणि गम्मत म्हणजे हे सारे आपल्या लाडकीला देतांना ती कमालीची भित्रट बनते.... कारण स्त्री देहाच्या नैसर्गिक न्यायाने ती मुलीची सतत सौरक्षणकर्ती ह्या भूमिकेत वावरत असते. मुलीची आई लेकीची  मैत्रीण या नात्यात सहजी शिरू शकत नाही नव्हे तिची protective भूमिका तिला ते करूच देत नाही.
       मुलगी वयात येतांना निर्माण होणारे सगळे प्रश्न तिच्यापाशी येउन ठेपतात आणि तिला अधिक हळवे करतात. ह्या काळातील मुलींचे mood swings , त्यांचा उगाचच होणारा विरोध , बापलोकांची लेकिची पाठराखण यात ती अधिक काळजीवाहू सरकार बनत जाते. आपण काळजी न केल्यास या घराचे काही खरे नाही असेही तिला वाटत राहते. स्वतः कडे आपल्या छंदांकडे लक्ष देण्यापेक्षा लेकीवर लक्ष ठेवणे ती अधिक तत्परतेने करू लागते .अश्या या मायाळू कनवाळू आईचा ग्राफ लेकीच्या लग्नानंतर तिच्या बाळंतपणापर्यंत सतत वाढत जाणारा असतो. सातत्याने ती आपली 'Mother India' ची भूमिका बजावत असते.
       कथा कविता कादंबऱ्या मधूनही याच मातृरूपाचा उदो उदो होतांना दिसतो. त्यागमूर्ती वात्सल्यरूपिणी आई साहित्यकृतीतून कितीही थोर वर्णिली असली तरी बरेचदा दुर्लक्षित असते... मनानी हळवी झालेली असते.
         " आईपणाला जात नाही आईपणाला देह नाही.... आईचे आईपण तिच्या हृदयी पाझरे!!!" असे म्हणतात ते खोटे निश्चित नाही. आई तिची असो वा त्याची ... ती प्रवृत्ती आहे. अपत्यजन्म याला कारण नव्हे तर तिची पुढील आईपणाची जडणघडण तिला आंतर्बाह्य बदलून टाकते ... हे मात्र खरे.
       या दोहोंचा सुवर्णमध्य साधता आला तर किती बरे होइल नाही.... म्हणजे जेव्हा माझी मुलगी तिचे करीयर जोडीदार निवडेल तेव्हा मी मुलाची आई व्हायच ... मस्त तिची मैत्रीण होउन तिचा प्रत्येक आनंद साजरा करायचा.किंवा  माझ्याघरी सून येइल तेव्हा मुलीची आई बनत एक स्त्री म्हणून तिला सारे द्यायचे ... ती सुखे कदाचित जी मलाही मिळाली नाहीत..... जमेल का सहजी असे तुम्हाला ???
....©🔏यशश्री रहाळकर
( आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत. धन्यवाद! )

८ टिप्पण्या:

  1. Lekh kharach eye opener aahe,वाचताना जाणवले खरंच अशीच बनत चाललीये मी,दोन मुलींची आई!! So need to change .....take some मुलाच्या आईच्या qualities !!!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you ! आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! दर एक दिवसानंतर वाचा छानसे असेच काहीतरी...सकस तरीही भन्नाट

      हटवा
  2. खूप छान लेख! अगदी पटला! मुलींच्या आईची मनोवस्था अशीच असते.
    जयश्री सोनवणे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! दर एक दिवसानंतर वाचा छानसे असेच काहीतरी... thank you

      हटवा
  3. फारच छान लेख ! आई ही आईच असते.......
    सीमा वाणी

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you !
      आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! दर एक दिवसानंतर वाचा छानसे असेच काहीतरी...भन्नाट

      हटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!