फॉलोअर

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

ओली बाळंतीण

                 काही वाचकांची मला भारीच गंमत वाटते... आवर्जून गूढ कथा किंवा भय कथा वाचतात आणि , "अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी कथा आहे." अशी कमेंट करतात. भय किंवा गूढ ह्या भावनेची निर्मितीचं अज्ञानातून होत असते. ज्या प्रश्नांची सामान्यपणे उकल होत नाही, ज्यांची उत्तरे मिळत नाहीत त्याचेच तर गूढ वाटते ना! अमानवीय शक्तींचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले लोक फारच थोडे असतात... बाकीचे त्यांच्यावर पूर्ण डोळे झाकून विश्वास ठेवणारे लोक ... बहुतेक कथा ऐकीव असतात... त्यामुळे लेखकाला वेठीला धरून, "ही सत्यकथा आहे का?" असे विचारणेही गंमतीशीर नाही का! तरीही भयकथा सुरस वाटतात...👍😊 कारण ह्या गूढाचं एक सुप्त आकर्षण असतं.... वातावरण भारून टाकणारं... लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत पाहुणे राहुणे सगळे बच्चेकंपनी गच्चीवर झोपायला जायचो... तेव्हा भयकथा किंवा भुताच्या गोष्टी ऐकण्यातली गंमत ज्यांनी अनुभवलीये त्यांनाच ही मोहिनी भरून टाकेल. एक उत्तम स्टोरी टेलर फक्त हवाच... लहानपणी असा कुणीतरी असतोच ...👍 आम्ही भावंडे जमलो की एक काका अश्या कथा अगदी रंगवून रंगवून सांगायचा... त्यात अमावस्या असेल तर विचारूच नका... नारळाच्या झावळ्यांच्या सावल्या, वाऱ्याचा आवाज, गुलमोहराची सळसळ करत येणारी शेंग आणि ... आणि निरव शांतता. तर्क कुतर्क काढत बुद्धीच्या दगडावर तासले की भयाची धार बोथट होते. म्हणूनच सांगणारा खरचंं सांगतोय ... हा विश्वास हवा. मग काय तहानेनं घश्याला कोरड पडली तरी पाणी प्यायला जायची हिंमत होत नाही..... असेच एकदा जमलो असू तेव्हा ऐकलेली एक कथा "ओल्या बाळंतिणीची" काकानी कथा सांगायला सुरूवात केली..

"सगळ्या भुतांत पॉवरफुल भूत कोणतं सांगा बरं??? "

असाच प्रश्न विचारून कोणत्याही कथेची सुरुवात होई... आता भूतचं ते त्यात काय सगळी सारखीच ... असं वाटत असेल तर तुम्ही साफ चुकलात... हडळ, खवीस, मुंज्या, झोटिंग असे अनेक प्रकार त्यात आहेत ...

"सगळ्यांत डेंजर असते ती म्हणजे ओली बाळंतीण... एकदा अश्शी मानगूट धरते की  आरारा!...सोडतच नाही.... माणूस मग ...(आकाशाच्या दिशेने बोट म्हणजे गेलाच समजा..असा अर्थ घ्यायचा) "

असं म्हणत काका आमच्यातल्या कुणाचीतरी मानगूट आवळून धरे... आणि भीतीची सर्र लहर अंगावरून जायची. घड्याळाची टिकटिक, बुटांचे आवाज, कर्र ss र करणारं दार अश्या आवाजाने भीतीने थरकाप उडायचा. जुनं पडीक घर, खचलेला वाडा , अंधारी रात्र, कोसळता पाऊस अश्या रंगभूमीची कल्पना चितारून भयकथेला सुरुवात व्हायची.                        
                   सत्तरच्या दशकातली गोष्ट आहे, तशी जुनीच म्हणायचीे पण अगदी कालपरवा घडली असे वाटावे इतकी ताजी...  मी अकोल्याला शिकायला म्हणून साने वाड्यात राहत होतो. साने वाडा म्हणजे कसाबसा जुन्या फळकुटांवर भिंतींनी तग धरून उभा असलेला अगदी जुनाट वाडा... घरातील कर्ती व्यक्ती म्हणजे माई साने. पतीच्या निधनानंतर त्यांचा चरितार्थ कसाबसा त्या ओढीत होत्या. राहत्या 2 खोल्या स्वतःकडे ठेऊन बाकीच्या सगळ्या  खोल्यांत भाडेकरी ठेवले होते.. माझ्यासारखी शिकणारी आणिक 2 मुले आणि 2 नोकरी करणारे गृहस्थ असे एकूण पाच जणांचे डबे सुद्धा त्याच देत. पदरात आठ मुलांना सोडून घरातला कर्ता पुरुष सोपानराव दोन वर्षांपूर्वीच निर्वतले होते... त्यामुळे परिस्थिती अत्यंत हलाखीची म्हणावी अशीच होती. त्यांच्या मोठ्या दोघी लेकी अगदी बरोबरीच्या जया ताई आणि नभा ताई... सव्वा वर्षाच्या फरकाने लहान मोठ्या ... त्या काळच्या सोयीस्कर पद्धतीप्रमाणे मॅट्रिक होताच नर्सिंगला गेल्या... आपल्या आईचा संसार सावरायचा , पाठचे 3 भाऊ त्यांचे शिक्षण करायचे, 3 धाकट्या बहिणींची लग्ने करायची अशी स्वप्ने पाहत शिकत होत्या. दोघी अतिशय समजूतदार... नर्सिंग होताच दोघी नोकरीत लागल्या. जया ताईला यवतमाळ मिळाले तर नभा ताईला नागपूरचे मेडिकल कॉलेजचे हॉस्पिटल. दोघी हुशार मेहनती... मी साने वाड्यात राहायला गेलो तेव्हा त्या दोघींना नोकरीला लागूनही काही वर्षे झाली होती. सुट्टीत दोघी यायच्या अधून मधून... भावंडांना  खाऊ आईला कापडचोपड , वाणसामान घेऊन येत.                       
                  जया ताई  यवतमाळला मामाच्या घरी राहत असे म्हणून तिची बचत अधिकची होई... नभा ताई तिच्यामानाने क्वचित घरी येई... यायची ती मोठ्ठी सुट्टी घेऊनच.. नभा ताई म्हणजे बडबडी, प्रसन्न व्यक्तिमत्व , सगळ्यांची चौकशी करणार, गप्पा मारणार. मात्र ह्या वेळी काय झाले होते कोण जाणे?? ती आली तिच् निर्माल्य होऊन... सुकलेल्या निष्प्राण फुलासारखी. वाड्याच्या पायरीवर कुठेतरी शून्यात नजर लावून तासन तास एकटीच बसलेली असायची. तिला आवाज दिलाच कुणी तर अश्या काही नजरेने पहायची की जणू पेटते निखारे... भावंडे तर तिला फटकूनच असायची...  एरव्ही सगळ्यांशी लहान होऊन खेळणारी नभा ताई .. चिडचिडी झाली होती... कुणी काही विचारले तर वस्सकन अंगावर ओरडायची... तिचं काहीतरी बिनसलं होतं नक्कीच! आम्हा त्रयस्थ व्यक्तींच्या हे लक्षात आले तर माई साने तर तिच्या आईच .. त्यांच्या लगेचच सारे लक्षात आले असावे...  आईपणा आणि गरिबी दोन्ही माणसाला लाचार अगतिक करतात हेच खरे... कसले कसले जप, उपास, शांतीपूजा त्या करू लागल्या. नभा लेक तर होतीच पण आर्थिक आधारही होती. मात्र ह्या सगळ्यांकडे थोडा काळ त्यांचे दुर्लक्ष झाले असावे कारणदेखील तसेच होते.
              एक दिवस जया ताई आणि मामा सुद्धा घरी आले.. एका गरजू होतकरू मुलाशी ते जया ताईचे लग्न ठरवू इच्छित होते.. लग्नानंतरही माहेरी आर्थिक मदत करायच्या अटीवर तो तयार झाला... साने वाड्यात आनंद पसरला .. 30शी गाठलेली जया ताई सुद्धा सुखावून गेली होती.. आणि माईंच्या तर आनंदाला पारावार नव्हता... आपल्या लेकीसाठी जे स्वप्न सुद्धा पहायची भीती त्यांना वाटत होती ते प्रत्यक्षात आले होते... ह्या साऱ्यात नभाताईच्या मानसिक आजाराकडे काहीसे दुर्लक्ष होणे हेही साहजिकच होते.एके रात्री मोठमोठ्याने भांडणांचे आवाज येऊ लागले..नभा ताई कर्कश्य सुरात ओरडत होती..

" ताई लग्न नकोस करू तो जाळून टाकेल तुला ... आग.. आग होईल तुझी ... तुझं बाळ तुला देणार नाही....लग्न नको करू ! लग्न नको करू!"

हा आवाज इतका भयावह होता की वाड्यातीलच काय शेजारी सुद्धा गोळा झाले.  बहिणीचे लग्न झाले तर सगळा भार आपल्यावर येईल म्हणून ही मत्सरापोटी बहिणीला लग्न करू नकोस म्हणतेय , असा शेरा मारून लोक मोकळे झाले. दिवसेंदिवस तिची प्रकृती अधिकाधिक खालावत गेली... खाण्यापिण्यातून चित्त उडाले... एखाद्या प्राणहीन यंत्रासारखे तिचे शरीर शून्यात भकासपणे पाहत बसले असायचे. तिची झोप पूर्ण उडाली होती... तिच्या साठी माईंनी कुठल्याश्या मांत्रिकाकडून काहीतरी पूजाही करवून घेतल्याचे कानावर आले होते.... मांत्रिकाच्या मते तिला ओल्या बाळंतिणीने झपाटले होते..😢                           प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच होती. नभा ताईला गेल्या महिनाभर जळलेल्या लोकांच्या वॉर्डवर ड्युटी लावलेली होती ... तिथल्या बहुतांश पेशंट ह्या विवाहीत स्त्रिया .. कुणीतरी पेटवून दिलेल्या किंवा परिस्थितीच्या काचाने जाळून घेतलेल्या... नभा ताईसारख्या हळव्या मनाच्या युवतीवर त्यांच्या वेदना, त्यांचं तळमळण ह्यानं खोलवर आघात झाले असावेत. नर्सिंग खरेच खूप महान कार्य आहे... अश्या अर्धमेल्या देहांना मायेनं सांभाळणं आणि त्यातही आपलं मन जपून ठेवणं किती अवघड! नभा ताईला तेच नेमकं जमलं नसावं.... अमानवीय शक्तींवर विश्वास ठेवणारे म्हणत झपाटले आहे तर तर्कशुद्ध बोलणारे म्हणत हे मानसिक आजारपण आहे... काय होते कोण जाणे पण घटनांची संगत काही लागत नव्हती.
                   हिवाळ्यातली मध्यरात्र होती...कडाक्याची थंडी वाजत होती . किर्रर्र किर्रर्र रातकिडे कर्कश्य ओरडत होते... काजळागत काळोख पडलेला.. नक्कीच अमावस्या होती.. परीक्षा तोंडावर आल्याने आम्ही सगळेच अभ्यास करत बसलो होतो. माझी खोली वरच्या मजल्यावर... बाथरूम खालच्या मजल्यावर सगळ्या भाडेकरूंना कॉमन. तसा मी भित्रा अजिबात नाही हं! नेहमीसारखा दार उघडून जीना उतरू लागलो... पाहतो तर काय? नभा ताई खालच्या पायरीवर बसलेली... ओलेती असावी... अनपेक्षितपणे ती तिथे दिसल्यामुळे मी दचकलोच... तिने मान गर्रकन वळवली आणि माझ्याकडे पाहू लागली... त्या अंधारात एखाद्या रानटी प्राण्यासारखे तिचे डोळे लकाकत होते... माझी भयाने वाचाच बसली मी खिळून होतो तिथेच गारठलो... तिने त्याच कर्कश्य आवाजात मला विचारले..

"कुठे निघाला? बोल..."

मी गप्प उभा भीतीने बोबडी वळलेली त्यात थंडीने दात वाजत होते... मी ततपप करत काहीतरी बोलणार एव्हढ्यात माझा रुममेट सुभाष बाहेर आला... त्याच्याही चेहऱ्यावर आश्चर्य असावे...त्याला पाहताच नभा ताई ओरडली...

"कुठेय माझं बाळ? सांग सांग?"

आता मात्र आम्ही घाबरून मदतीसाठी ओरडू लागलो.... सगळे गोळा झाले... माई खजील झाल्या होत्या पण इलाज नसावा... गुरूंचे तीर्थ शिंपडताच नभा ताई एकदम मोठमोठ्याने रडत गयावया करू लागली...

"त्याला सांग माझं बाळ दे... मी निघून जाईल त्रास देणार नाही तुला... मला माझं बाळ दे.. एकदा पहायचं आहे मला .. माझं बाळ..."

म्हणत तिने टाहो फोडला आणि ती बेशुद्ध झाली. तिच्या भावंडांनी तिला उचलून घरात नेले... शप्पथ सांगतो! त्या रात्री नंतर बाथरूमला जायचीही भीती वाटू लागली होती... आम्ही एकमेकांना उठवून सोबतच जात असू... बिचाऱ्या माई सुद्धा घराच्या दाराला कुलूप घालून झोपत... नभा ताईला झोपेच्या गोळ्या देत असाव्यात, तिला बाहेर पडू देत नसत.. पुढचे काही दिवस शांततेत गेले... मात्र आम्ही बाहेर दुसरी खोली शोधू लागलो... असे महिन्याच्या अधेमधे कमी पैसे द्यावे लागतील अशी खोली तरी कशी मिळणार?                 
             आठ दहा दिवस कसेबसे बरे गेले... शेजारच्या खोलीत नोकरी करणारे दोन गृहस्थ, माझे मित्र आणि मी ... आम्ही रात्रीच्या जेवणानंतर बरेचदा पाय मोकळे करायला म्हणून रात्रीचे बाहेर पडायचो... मंदिरापर्यंत चालत जाऊन थोड्या वेळ तिथेच बसायचो... साडे दहाच्या सुमारास शेजारती असायची ... अगदी प्रसन्न शांत वाटायचे... मग जरा दुसऱ्या लांबच्या रस्त्याने घरी परतायचो... हिवाळ्यामुळे हे बाहेर पडणं थोडं कमी झालं होतं ... त्या दिवशी जरा कमी थंडी म्हणून आम्ही सगळे निघालो... मंदिरात कसलेसे कीर्तन होते... आम्ही रंगून गेलो, काळवेळेचं भान काही राहिलं नाही... परततांना बराच उशीर झाला होता... मोकाट कुत्रे अखंड भुंकत होते... आमच्या अंगावर येऊ नये म्हणून रस्त्याने दोन मजबूत काड्या घेऊन निघालो... गप्पा मारत मारत आम्ही नेहमीच्या रस्त्याने जात होतो...रस्त्याने आम्ही आणि कुत्रे ह्यांव्यतिरिक्त चिटपाखरूही नव्हते...अचानक सगळे कुत्रे एका सुरात रडायला लागले... ते रडणं इतकं भयाण होतं की काहीतरी अघटीत घडणार असे वाटू लागले. सुभाष माझ्या मनाची अवस्था जाणून म्हणाला...

"काही नाही रे! थंडी वाजली की रडतात कुत्तरडे."

              आम्ही वाड्याजवळच पोहोचलो... आठ दहा पावलांवर वाडा होता...अचानक तीरासारखी धावत कुठून तरी नभा ताई आली आणि एका काळ्या कुत्र्याच्या डोक्यात भला मोठ्ठा दगड घातला... कुई कुई करत ते कुत्रं निष्प्राण झालं..... हे दृश्य खरंय की भास होतोय म्हणून आम्ही सगळे परस्परांकडे पाहू लागलो.... सगळी कुत्रीसुद्धा क्षणभर ते दृश्य पाहून दचकली आणि शेपूट घालून उलट्या पावली पळत सुटली... अचानक नभा ताई खदाखदा बीभत्स हसू लागली...

"कुत्तरड्या! मला मारणार तू .. मीच तुला ठेचून टाकते xx च्या .... xx xx."

अत्यंत अर्वाच्च शिव्या ती देऊ लागली... आतून सगळे धावत बाहेर आले ... सुदैवाने जया ताई घरी होती ... तिने झोपेचे इंजेक्शन दिले आणि तिला घरात नेले... आम्ही भेदरल्या मांजरागत आपापल्या खोल्यांत जाऊन मुकाट झोपलो .. मात्र आता तातडीने खोली सोडायची असे आम्ही सगळ्यांनी ठरवले... दुसऱ्या दिवशी आम्ही तिघे कॉलेज बुडवून आणि नोकरी करणारे दोघे सुट्टी काढून नवीन जागेचा शोध घेत भटकलो... सुदैवाने मंदिराजवळचे एक घर रिकामे होते... जरा महाग पडणार पण इलाज नव्हता.. आम्ही पाच जणांनी मिळून ते दोन खणी घर घेतलं... थोडे थोडे पैसे काढून ऍडव्हान्स देखील देऊन आलो.. घर साफसूफ करायला घरमालकाने दोन दिवस मागून घेतले..... ते दोन दिवस जीव मुठीत धरूनच काढावे लागणार होते. दुसऱ्या दिवशीच सकाळी आम्ही माईंना घर खाली करणार असल्याचे सांगितले... सगळेच सोडणार म्हटल्यावर त्यांना काय कळायला हवे होते ते कळलेच... डोळ्याला पदर लावत त्या म्हणाल्या..

"फार सज्जन आहात रे मुलांनो तुम्ही सारे! माझ्या घरी पोरी असून कधी वाकड्या नजरेने पाहिलं नाही आदराने वागवलं"

वाईट वाटलं पण आमचा इलाज नव्हता. त्यातल्या त्यात मदत म्हणून आम्ही डबा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले... त्यांचा मोठा मुलगा भाऊ आमच्या खोलीवर डबा आणून देणार होता... माऊलीने आमचे पाय धरले..

"फार उपकार झाले पोरांनो!.."

म्हणत त्या रडू लागल्या. त्यांच्या सांत्वनाला आमचे शब्द तोकडे होते.रात्र झाली की आमच्या अंगावर करताच यायचा... त्या वाड्यातली ती आमची अखेरची रात्र होती... भीतीने म्हणा किंवा अनाहूत जाणिवेने म्हणा आम्ही जागेच होतो. पुन्हा तोच कर्कश्य भयाण आवाज आला आणि काळजाचा ठोकाच चुकला... मध्यरात्रीचे दोन वाजले असावे... कडाक्याच्या थंडीत नभा ताई भराभर अंगावर पाण्याचे हंडेच्या हंडे ओतून घेत किंचाळत होती...माई अगतिकपणे रडत होत्या आणि लोक नेहमीप्रमाणे तमाशा पहायला गोळा झाले होते..

"आग ... आग होतेय माझी... पेटवलं पेटवलं त्यांनी मला... माझं बाळ कुठे आहे... आग होतेय आग..."

इतकी वर्षे लोटली अजूनही ते दृश्य डोळ्यांपुढे जसेच्या तसे उभे राहते... अचानकपणे आपल्या आईकडे वळत नभा ताई म्हणू लागली..

"बांगड्या भरा , बांगड्या भरा मला... हिरव्या गार... मेल्यानी पेटवलं ग पेटवलं ... आग होतेय आग..."

सगळे फक्त बघत उभे होते काय करणार?? ड्रमभर पाणी अंगावर ओतून घेतल्याने थकून ती बेशुद्ध पडली आणि हा तमाशा संपला. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही नवीन जागेत पटापट शिफ्ट झालो... त्यांचा मुलगा भाऊ सकाळ संध्याकाळ डबा आणून देई...  माईंच्या हाताला उत्तम चव होती... आम्ही त्यांचे घर सोडले तरी माऊली नेहमीसारखा चांगला डबा देत होती... एके रविवारी दुपार झाली तरी डबा काही आलाच नाही... वाट पाहून आम्ही कोपऱ्यावर खानावळीत जेवून आलो.
               येतांना काय झाले तो अंदाज घेण्यासाठी साने वाड्यात डोकावलो .... तिथे अकल्पित वाढून ठेकले होते.. दारात नभा ताईचे प्रेत होते ... अर्धवट कसेबसे गुंडाळलेले असावे... रात्री तिने स्टोव्ह उपडा करून जाळून घेतले होते.... माई आणि भावंडे धाय मोकलून रडत होती.. शेजारच्या काकू माहिती पुरवत म्हणाल्या..

"ओली बाळंतीण झोंबली होती बाबांनो! सहजासहजी सोडणार थोडीच होती... काल जाळून घेतलं तशी थोडा प्राण बाकी असतांना ...."मला बांगड्या भरा हिरवा चुडा  ... माझं बाळ " अशीच ओरडत ओरडत प्राण गेला... दुर्दैवी पोर."

                  मला राहून राहून एक कोडं पडलं होतं... ज्या कुठल्या ओल्या बाळंतिणीची नर्स म्हणून नभा ताईने सेवा केली ती हिला खरंच झोंबली असेल??? की संसाराची इच्छा अपूर्ण राहिली त्याने झपाटलं असेल??? खरंच ओली बाळंतीण होती की मनातल्या अनेक ओल्या इच्छांचा वारंवार बळी देऊन आलेलं मानसिक असंतुलन होतं... ते देवालाच ठाऊक! माणसाच्या मनाचा डोह खोल खोल असतो... त्याचा थांग लागत नाही.

यशश्री रहाळकर                   




शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

आयनवमी


 
" मेल्यांनो! कुठे फेडाल ही पापं.... इतकीे वर्षे बाई आठवत नव्हती ह्यांना, जिवंत असतांना नाही आणि गेल्यावर तर ....काय केलं ... पाहिलं हो जगानी ! आता ती झपाटतेय म्हणताहेत... आता पान लावायला , श्राद्ध घालायला सुचतंय का?"

रामप्रहरी आजीच्या तोंडाचा अखंड पट्टा सुरू होता. मी खुणेनेच काय झालं असं विचारलं त्यावर आईने देशमुखांनी आयनवमीच्या प्रसादाला बोलावले असल्याचे सांगितले. आजीचा सात्विक संताप लाव्ह्यासारखा आवेगाने कोसळत होता. तिला आवरण्यात अर्थ नाही हे जाणून आम्ही सगळे आपापल्या कामाला लागलो. जावे तर लागणारच होते..... नानासाहेबांच्या उपकाराच्या ओझ्याखाली आमच्या 3 पिढ्या दबून घुसमटून गेल्या होत्या. घरातील कर्त्या पुरुषांनी नोकरी धंद्याचे कारण पुढे करत आजी ,आई आणि काकी ह्या स्त्री मंडळाला जायला सांगितले. कुणालाही खरेतर तिथं जायचंच नव्हतं... पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार... आई आणि आजी बरोबर आमची स्वारी निघाली.... देशमुखांचा पेठेत भला मोठ्ठा महालच होता .. म्हणजे 3 मजली 20 खोल्यांचे प्रशस्त घर ... मी त्याला महाल म्हणायची. आज तीन की चार वर्षांनी आम्ही तिथे जाणार होतो.
                     पेठेतले नानासाहेब देशमुख म्हणजे मोठं प्रस्थ 2/3 वाणसामानाची दुकाने, शेती,  बिछायत, केटरिंग, मंगल कार्यालय आणि असे कित्येक मला माहित नसलेले यशस्वी व्यवसाय त्यांच्या कुटुंबाचे नावे जमा होते. घरी गडगंज संपत्तीचा ओघ, माणसांचा राबता आणि श्रीमंतीच्या प्रदर्शनाचा सोस ... तसे सगळे कुटुंब आत्मीयतेने प्रेमाने वागणारे... कुणाचा अपमान करायचे नाहीत. नानासाहेब तर सढळ हातानी प्रत्येक अडल्या नडल्याला साह्य करत. माझे आजोबा निर्वतल्यावर तीन पोरे पदरी घेऊन निराधार झालेल्या माझ्या आजीला त्यांनी त्या काळात मोठी मदत केली होती. बाबा आणि काकाच्या शिक्षणाचा खर्च , आत्याच्या लग्नाचा बराच भार त्यांनी उचलला होता. अर्थात माझ्या स्वाभिमानी आजीने जमेल तसे ते परत केलेच पण तरीही संकटात सहाय्य करतो तो मोठाच नाही का! हे देशमुख कुटुंब आमचे खरेतर जवळचे नातेवाईक... नानासाहेब देशमुखांची प्रथम पत्नी बाई आजी म्हणजे माझ्या आजीची सख्खी बहीण. पण मला आठवते तशी ही बाई आजी एका पुतळ्यागत शून्यात नजर लावून बसलेली असायची. तिचे वयाच्या 14 व्या वर्षी नानासाहेबांशी लग्न झाले  वर्षभरात एक लेक झाली नि कुठल्याश्या आजाराने म्हणा, बाळंतरोगाने म्हणा किंवा आघाताने म्हणा ती दगड झाली. पुढ्यात ठेवलेले अन्न खायची तेही दिले तर "बाई अंघोळ करा" म्हटले की अंघोळ उरकायची पण सगळ्यात असूनही नसल्यागत परकी , एकटी, विमनस्क. तिची अवस्था पाहता नानासाहेबांनी दुसरे लग्न केले... लेकीलाही गरज होती आणि घरालाही... त्यात नानासाहेब म्हणजे कर्तबगार माणूस , पदरी गडी माणसे, आले गेले सगळे पहायला हवे म्हणून गृहिणी सुद्धा हवीच होती. गोदाक्का त्यांच्या द्वितीय पत्नी .. त्या सुद्धा आमच्या आजीची मावस बहिणच होत्या. त्यांना 4 मुले 3 मुली झाल्या परिवार वाढला... सगळे एकमेकांना धरून होते... मात्र सगळ्यांना बाई आजीची लाज वाटे .. तिला पुढे येऊ देत नसत, कुठल्याही कार्यक्रमात ती शून्यात नजर लावून अडगळीच्या खोलीत बसून असायची... तिच्या लेकीचं कन्यादान सुद्धा गोदाक्कांनी केलं... "पोटची पोर निरोप घेतांनाही बाईच्या डोळ्यांत पाणी नव्हतं" आजी सांगायची. 
                     देशमुखांच्या घराचा भला मोठा हॉल ओलांडून मागील अंगणात जाऊन आम्ही हातपाय धुतले. भल्यामोठ्या स्वयंपाकघरात सोवळ्यात पक्षाचा स्वयंपाक सुरू होता... खीर, वडे , कढी... ह्यांचे वास घरभर दरवळत होते. मधल्या खोलीत... तर्पण विधी सुरू होते... तिथून डावीकडे घरातल्या स्त्रियांची कुजबुज ऐकू येत होती. आम्ही तिकडे जायला वळलो... बाळंतिणीची खोली ओलांडली आणि अडगळीची खोली लागली .. क्षणभर आजी थबकली... आतल्या भकास वस्तूंमध्ये तिला बाई बसलेली दिसत असावी ... आजीने हात जोडले. त्या अडगळीच्या खोलीत फार कुणी जात नसावे... ज्या अस्तित्वाची जिवंतपणी कुणी दखल घेतली नाही त्या अस्तित्वाला अचानक मृत्यूपश्चात महत्व प्राप्त झाले होते.  आम्ही महिला वर्गाकडे वळलो... शांतपणे मिळेल तेव्हढ्या जागेत बसून घेतलं. गोदाक्का आजीच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागली.... कधीकाळी दागदागिने घालून , उंची साड्या नेसून मिरवणाऱ्या खळखळून हसणाऱ्या लेकी सुनांच्या पांढऱ्या फटक कपाळाकडे पाहून चर्रर्र झाले... मी आणि आई एकदमच एकमेकींकडे पाहिलं... गेल्या काही वर्षांत देशमुखांची बरीच वाताहत झाली होती. बाई गेल्यावर महिनाभरात नानासाहेब अचानक एके रात्री गेले... मध्यरात्री भीतीने पांढरा फटक पडलेला त्यांचा मृतदेह सकाळी मागच्या दाराशी पडलेला सापडला... तेच दार जिथून बाई आजीला कधीकाळी शेवटचे नेण्यात आले होते. आमची आजी आतडी पिळवटून सांगत राहिली पण कुणी तिचं काहीही ऐकलं नाही... 

" भरल्या कपाळाने गेली रे बाई... हळदी कुंकाचे सडे घाला, मळवट भरा हिरवा चुडा कोरी साडी नेसवून निरोप द्या....."

तेव्हा तिचं बोलणं कुणी मनावर घेतलं नाही... बाई आजी असून नसल्यासारखीच होती. ती नकोशी झाली असावी... तिच्या वेडेपणाचा कधी कुणाला त्रास झाला नव्हता... मात्र तिच्या प्रेतावर देशमुखांनी अन्यायच केला... मागच्या अंगणात जिन्याखाली एक दार होते... गडी माणसे नोकर चाकर वगैरेंना येण्याजाण्यासाठी... एव्हढ्या मोठ्या वाड्याची मालकीण ... आयुष्यात कधीही तिने कुणाला काही मागितले नाही... तिला शेवटचे नेले ते त्या मागच्या दाराने... घरातले नकोसे समान बाहेर काढून घ्यावे तसा फार कुणाला न कळवता तिचा अंत्यविधी उरकला... दिवसवाऱ्यांना अन्नदान, संस्थांना देणगी देऊन मोकळे झाले देशमुख... काय तर म्हणे तिला सख्खा मुलगा कुठे होता? एकुलती एक लेक तिच्या सासरी सुखात होती... 

"घर तर होते ना रे तिचे... घरातल्या मुक्या गाईलाही कुणी असे नेत नाही रे! काय पाप होतं तिचं तिने जन्मभर शिक्षा भोगली... पण आता तरी सद्गती मिळू द्या तिला...." 

माझी आजी देशमुखांशी भांडली.... तिच्या बहिणीसाठी... बाई आजीसाठी... आमची आर्थिक परिस्थिती, त्यांचे उपकार, आमचं नातं कसला कसलाही मुलाहिजा न बाळगता.... कुणीही तिचे ऐकले नाही. एखाद्या निराधात शवासारखे बाई आजीला मागच्या दाराने नेऊन जाळून टाकले... कुणाच्याही डोळ्यांत दोन अश्रू नव्हते उलट बारी सुटली असेच सारे म्हणत होते... तिची सख्खी लेक तेव्हढी रडली... मात्र ना तिला 13 दिवस ठेऊन घेतलं ना दुखवटा काढला ना रडकी बोळवण केली... दोन आश्रमांत पावत्या फाडल्या आणि देशमुखांचं बाई प्रती कर्तव्य संपलं. आजी अद्वातद्वा बोलून देशमुखांच्या घरातून बाहेर पडली आणि संबंधांमध्ये कायमची कटुता निर्माण झाली..... घरी येऊन आजी धाय मोकलून रडली...

"मागच्या दाराने नेताय सवाष्णीला आता  त्या घरातल्या सगळ्याच माघारतील... सगळ्याच माघारतील..."

आजीच्या त्या जाणिवेचा , त्या शब्दांचा नेमका अर्थ काळाने उलगडून दाखवायला सुरुवात केली. बाई आजी नंतर महिन्याभरात नानासाहेबांचा विचित्र परिस्थितीत अपमृत्यू झाला... त्यानंतर काही महिन्यांतच धाकटा लेक बाळू काका ऍक्सिडेंटमध्ये जागीच ठार झाला. व्यवसायाची पकड सैल झाली... आश्रित म्हणून आलेल्या चुलत्यांनी दुकान आणि घराचा वरचा मजला बळकावला... कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या.... दोन जावई अचानक दगावले.... लक्ष्मीला उतरती कळा लागली... आता बरेचदा बाई कुणाकुणाला दिसू लागली... बाईचा आत्मा असण्यापेक्षा तिच्यावर केलेल्या अन्यायाची भीती अधिक वाटत असावी. एका गड्याला विहिरीजवळचे झाड कापताना विहिरीत बाई आजी दिसली... त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडून गेला... पुढे हे प्रकरण दाबायला देशमुखांना मोठी किंमत मोजावी लागली... पोलीस, त्या गड्याच्या घरचे, डॉक्टर कुणाकुणाची तोंडे बंद करावी लागली... थोरल्या लेकाला काय झाले कोण जाणे त्याने त्याच अडगळीच्या खोलीत फास लावून घेतला. एका लेकाचा दुर्धर आजाराने मृत्यू झाला तर एकाचे तर त्याहून दुर्दैव.... त्याची बायको मित्राचा हात धरून संसार टाकून पळून गेली... होती नव्हती सगळी इज्जत उधळल्या गेली.... घरभर पांढऱ्या कपाळाच्या दुःखाने पिळवटून निघालेल्या लेकी सुनांची आक्रोश भरून राहिले....  बाईच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून कोणातरी जोतिष्याने आय नवमी करण्याचा सल्ला दिला ... आयनवमी किंवा अविधवा नवमीला पितृपक्षातील सवाष्ण स्त्रीच्या पितृकार्याचा दिवस... खरेतर पतिनिधनानंतर आयनवमी करण्यात अर्थच नसतो मात्र... बाई आजीचे कोणतेच कार्य सुवासींनीचा मान सन्मान लाभून झाले नव्हते म्हणून तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी हा विधी सुचवण्यात आला असावा... 11 वर्षांचा गोदाक्कांचा नातू तर्पण करत होता... गुरुजी त्याला म्हणायला सांगत होते...

"आमच्या चुकांना पोटात घे आमच्या चुकांची शिक्षा आम्हाला मिळाली माफ कर... शांत हो !"

त्या मंत्रांच्या अनाहूत नादाने घर भारलं गेलं होतं..... बाई आजीच्या नावाने एक गरजू स्त्री सवाष्ण म्हणून बसली होती.... तिला हिरव्या बांगड्या साडी चोळी, सोन्याचे मणीमंगळसूत्र, देऊन ओटी भरली.... कपाळी कुंकू लावताच ती साधारण बाई तेजस्वी दिसू लागली.... तिचे हावभाव फरक जाणवण्या इतपत बदलले... डोळ्यात बाई आजीची झाक... काही वेळ ती तशीच शून्यात बघत राहिली... अचानक ती सारे सामान बाजूला सारत उठली आणि माझ्या आजीजवळ येऊन तिला कडकडून गळामिठी मारली... सगळे अवाक होऊन पाहत राहिले... कोण कुठली ही बाई ना ओळख ना पाळख थेट गळ्यात काय पडतेय..... देशमुखांकडची एकुलती एक सवाष्ण असणाऱ्या बाई आजीच्या लेकीला  माझी आजी शांतपणे म्हणाली...

"वसू मळवट भर आईचे...."

थरथरत वसू आत्याने त्या बाईचा मळवट भरला. आजी पुढे तिचा हात धरून तिला अडगळीच्या खोलीत घेऊन गेली.... तिच्या पाठीवर मायेनं हात फिरवत तिला म्हणाली...

"बाई पुढल्या दाराने जा हो!  आता मनात काही ठेऊ नको." 

बाईने मान डोलावली... समोरच्या दारात हळदी कुंकाचे सडे घातले ... त्यावरून चालत चालत ती बाई घराबाहेर पडली... क्षणभर थांबून मागे वळून पाहिले आणि लख्खकन काहीतरी निघून जावे तशी ती  सवाष्ण म्हणून बोलावलेली स्त्री घेरी येऊन कोसळली... झाल्या प्रकाराने जेवणाची इच्छाच संपलेली होती... शास्त्राला प्रसाद घेऊन आम्ही घरी परतलो....माझ्या मनांत प्रश्नांचे भांडार होते...

वयाच्या बावीसाव्या वर्षी ऐन तारुण्यात वैधव्य आलेल्या... आणि नवऱ्याच्या माघारी मुले मोठी करणाऱ्या माझ्या आजीला मी निलाजरेपणाने विचारले...

"खरंच का ग सवाष्ण जाण इतकं भाग्याचं असतं... इतकी शक्ती असते का सवाष्ण बाईत?? "

माझ्या प्रश्नावर किंवा स्वतःच्या दुर्दैवावर जरासा विचार करत आजी म्हणाली...

"नवरा किंवा बायको पैकी एक आधी एक नंतर कुणीतरी जाणारच.... त्यात भाग्य दुर्भाग्य असं काही नसतं ग.... पण एक सांगते तुला ...आयुष्यभर लक्षात ठेव... प्रत्येक जीवाला आदराने सन्मानाने वागावं. वेडा असू दे, मुका असू दे किंवा कुणीही... त्याच्या हक्काचं त्याला मिळायलाच हवं.... "

मला कितपत समजलं असं वाटून आजी पुढे म्हणाली..

" आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाचे कर्जदार असतो... कुणाचं क्षणांचं कर्ज असतं, कुणाचं धनाचं, कुणाचं कष्टाचं, कुणाचं कर्तव्याचं.... आज मी माझ्या कर्तव्याच्या कर्जातून मुक्त झाले... बाई असशील तिथे सुखी रहा ग! " 

म्हणत आजीने पदराने डोळे पुसले.

🔏©️ यशश्री रहाळकर





मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

मी आहे म्हणून....


                    एखाद्या व्यक्तीचे नाव हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असतो... मात्र बरेचदा ह्यात विसंगती आढळून येते..... नावांवरून व्यक्तीबद्दल बांधलेले आडाखे चुकू शकतात. म्हणजे असं बघा दुसरेच कुणीतरी तुम्ही बाळ असतांना त्यांना आवडणारे नाव ठेऊन मोकळे झालेले असतात. पुढे ते नाव तुमच्या जन्मदाखल्या पासून डेथ सर्टिफिकेट पर्यंत तुमची साथसोबत करत असते. प्रत्येक नावाची एक चित्रमयता असते... ते नाव घेतलं की त्याच प्रकारची व्यक्ती डोळ्यांसमोर उभी राहते... जसे 'पप्पू'  किंवा 'पिंटू' म्हटले की एक हाफ चड्डीतलं बारकं पोरगं डोळ्यांसमोर येतं... तुम्ही ठरवूनही पन्नास वर्षांचा माणूस डोळ्यांपुढे उभाच करू शकत नाही. पण हा पप्पू / पिंटू सुद्धा कधीतरी मोठा होणारच ना! अबोली नावाच्या स्त्रिया दांडपट्ट्यागत जीभ चालवताना दिसतात, तर लहानपणी सायली नाव ठेवलेली व्यक्ती वाढता वाढता वाढे होत.. भलेमोठे फुलकोबीचे फुल बनते. मुक्ता नावाची स्त्री नवऱ्याचा मार खाते, तेजस्विनी च्या चेहऱ्यावर सदाच बारा वाजलेले असू शकतात तर शीतल नावाच्या स्त्रिया भयंकर तापट असू शकतात. थोडक्यात... नावात काय ठेवलंय?? आता "सत्यभामा" हे नाव उच्चारताच डोळ्यापुढे काय चित्र उभं राहतं... एखादी गावाकडची नऊवारीतील हातभार बांगड्या भरलेली म्हातारी... बरोब्बर! त्यात श्रीकृष्ण पत्नी सत्यभामा म्हणजे मत्सराचा, हट्टीपणाचा आदर्शच... त्यामुळे फार काही चांगलं चित्र मनांत उभं राहत नाही. एक लाघवी , गोड हसणाऱ्या चाळीशीच्या आसपास वय असणाऱ्या, अनुभवी मानसोपचार तज्ञ सत्यभामा नावाच्या असू शकतात का? नाही हेच उत्तर मनांत आले ना.... पण डॉ. सत्यभामांचा सगळा आयुष्याचा प्रवासच असा अनपेक्षित घटनांनी भरलेला आहे. एकता कपूरच्या नवीन सिरियलचे स्क्रिप्ट वाटावे अश्या नाट्यपूर्ण घडामोडींनी त्यांचे आयुष्य व्यापून गेलेले आहे. रावराणे कुटुंबात 100 पिढ्यानंतर एका मुलीच्या जन्म झाला... इकडे शेजारच्या खोलीत आजीने राम म्हटले आणि तिकडे बाळाने ट्या s हां s! केले. आजीचाच पुनर्जन्म झालाय मानून आजीचेच नाव "सत्यभामा" बाळाला मिळाले. अभ्यासात अतीशय हुशार असणाऱ्या सत्यभामाला कौटुंबिक प्रेम फारसे मिळालेच नाही... ती आठ वर्षांची असावी आई- बाबांचे कडाक्याचे भांडण झाले... आई रात्रभर रडत होती. दुसऱ्या दिवशी आईचे प्रेतच तिला बघायला मिळाले.... आईने आत्महत्या केली होती. सत्यभामाच्या मनावर खोलवर जखम झाली. .. हे कमी की काय म्हणून आयुष्यभर तिने अश्याच प्रकारे अत्यंत जवळची माणसे गमावली. तिच्या काकूनेही एक दिवस जीव दिल्याचे कळले... तिला मामाकडे ठेवण्यात आले...मामी विमनस्क अवस्थेत असायची... अखेर मामी मनोरुग्ण झाली. शेवटी सत्यभामाची रवानगी होस्टेलवर झाली. सगळे आयुष्य होस्टेलवर काढलेल्या सत्यभामाने डॉक्टर होण्याचे ठरवले.. MBBS नंतर इतर क्षेत्रात स्पेशलायझेशनच्या संधी असूनही मानसिक आजारांवर अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. 
                         पुढे डॉ. श्रीकृष्ण विध्वंस ह्यांच्या पत्नी म्हणून डॉ. सत्यभामा विध्वंस झाल्या.... नावातच भांडणे, कुरबुरी, नासधूस असे काहीही असले तरी... त्यांचे काम त्याच्या अगदी विरुद्ध होते. आयुष्यभर होस्टेलला स्वतंत्र जीवन जगणाऱ्या सत्यभामा एकत्र कुटुंबात आल्या... घरांत आजेसासू, सासू, दोन जावा , नणंद अश्या अनेक स्त्रिया होत्या. सासरी माणसांशी जमवून जुळवून घेतांना मन कित्ती मारावे लागते ह्याचा पदोपदी प्रत्यय त्यांना आला.  कुटुंबातील एक सदस्य म्हणून पाहण्यापेक्षा एक डॉक्टर च्या दृष्टीने त्या सगळ्यांना अभ्यासू लागल्या...  एकीकडे त्यांनी आपली प्रॅक्टिस आणि कॉन्सेल्लिंग सुरू केले. त्यांच्याकडे बहुसंख्य पेशंट महिला येत कदाचित महिला डॉक्टर म्हणून सोयीचे, मोकळे वाटत असावे. पंधरा वर्षांच्या त्यांच्या प्रॅक्टिस मध्ये त्यांनी अनेक केसेस हाताळल्या.. सांसारीक निमित्ताने अनेक स्त्रिया त्यांच्या संपर्कात आल्या. त्या सगळ्यांच्या अभ्यासातून एक गोष्ट प्रभावीपणे त्यांना जाणवली ती म्हणजे विवाहित स्त्रियांच्या बहुतेक समस्या ह्या "न बोलणे" किंवा "घुसमटीत " दडलेल्या आहे. मुळातच सहनशक्ती अंगी असल्याने, उत्तम संसार करणे हा प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने स्त्रिया मोकळेपणाने बोलत नाहीत. खूप छोट्या छोट्या जखमा साठून साठून मनांत एक वादळ तयार होते आणि अखेर त्याचा विस्फोट होतो . डिप्रेशन ,  विमनस्कपणा, वैफल्यग्रस्त अश्या अनेक समस्यांचे मूळ मुक्त संवादाचा अभाव ह्यातच दडलेले आहे. बरेचदा इतक्या इवल्या गोष्टी असतात की बोलणार कुणाला... मैत्रिणींसमोर प्रतिष्ठेचा पोकळ डोलारा उभा केलेला असतो, नवऱ्याला वेळ नसतो, मुलांचे जगच वेगळे असते... म्हणूनच स्त्रियांनी मनमोकळं बोललं पाहिजे ह्यासाठी काहीतरी प्रयत्न करूयात म्हणून त्यांनी "बोल बिंधास्त!" नावाचा ग्रुप सुरू केला. ह्या ग्रुपवर जॉईन होणाऱ्या प्रत्येक स्त्रीचे नाव, फोटो वगैरे ओळख लपवून प्रत्येकीला एक unique id number दिला जाई... सगळ्यांची माहिती केवळ डॉ. सत्यभामांकडे असायची. ह्या ग्रुप वर वेगवेगळे छोटे मोठे विषय हाताळले जात... मात्र एक नियम होता... माणसे तोडून संसार सोड किंवा आत्महत्येचा पर्याय ह्यातलं काहीही सुचवायचं नाही की स्वीकारायचं नाही... रोज सकाळी एका यशस्वी स्त्रीची, परिस्थितीशी संघर्ष करून जिंकलेल्या स्त्रीची प्रेरणादायक कथा ग्रुप वर पोस्ट केली जाई. सुरुवातीला केवळ कॉन्सेल्लिंगच्या पेशंट पुरता सुरू केलेला ग्रुप हळूहळू अनेक स्त्रियांना सामावून घेत मोठा मोठा होऊ लागला.
बोल बिंधास्त !  म्हणत अनेक स्त्रिया आपापल्या मनातील घुसमटीला मोकळी वाट करून देऊ लागल्या. एकमेकींच्या अनोळखी आधाराने चाचपडत का होईना.. लहान मोठ्या समस्यांवर उपाय शोधू लागल्या ... काही उपाय तर इतके अफलातून होते की डॉ. सत्यभामा सुद्धा थक्क होत. अप्रत्यक्षपणे ..."भारतीय विवाहित स्त्रिया आणि मानसिक आजार" ह्या त्यांच्या शोधनिबंधाला हवा असणारा डेटा त्यांना आपसूक मिळत होता.. शिवाय प्रामाणिक उत्तरे आल्याने डेटा जेन्यूईन होताच.
                      "बोल बिंधास्त! " ग्रुपवर रोज एक विषय चर्चेला दिला जाई... शनिवारी मुक्त संवाद आणि रविवारी ग्रुप बंद असायचा. इथे नोकरी करणाऱ्या, व्यावसायिक, गृहिणी आणि सगळ्यांचं वयोगटातील स्त्रिया होत्या. सासुशी कसे जमवावे, त्रास देणाऱ्या बॉसला अद्दल घडवा... इथपासून तर किशोरावस्थेतील मुलांची आई असणाऱ्यांनी त्यांची मैत्रीण कसे व्हावे इथपर्यंत सगळ्याच प्रश्नांची चर्चा रंगत असायची. शनिवारच्या मुक्त संवादात अनेक स्त्रिया स्वतःला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या विषय म्हणून यादीत नोंद करत. एका नवीनच लग्न झालेल्या तरुणीने ... "महिनाभर राहणाऱ्या नणंदेला चार दिवसांत कसे पिटाळावे?" असा विषय नोंदवला. सोमवारच्या चर्चेत हाच विषय घेण्यात आला आणि चर्चेला महापूर आला. गोडी गोडित शालजोडीत सुचवलेले उपाय भन्नाट होते... तिच्याकडे महिनाभर राहून यावे, तिच्या सासूला राहायला बोलावून घ्यावे, चार दिवसांनी तिलाच स्वयंपाकाला लावावे इथपासून तर स्पष्टपणे बोलावे, नवऱ्यामार्फत सांगावे इथपर्यंत चर्चा झाल्या. एकीने सुचवलेला उपाय तर भन्नाट होता... नणंद आली की माहेरी निघून जावे .. आणि ती गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी यावे.. सासू जास्तीचे काम करून दमली की पुढच्या वेळी चार दिवसाच्या वर नणंदेला रहा म्हणणार नाही.... कधीकधी चर्चा वाकड्या वळणावर जायचीही ... तेव्हा ती थांबवावी लागेच मात्र झालेले लहानमोठे अपमान, बोचलेले चरे, खुपणारे सोयरे सारं सारं मुक्तपणे व्यक्त होई... कुणाच्या नवऱ्याने चार चौघात बावळट म्हटले असते, कुणाची सासू अखंड माहेरचा उद्धार करत असते, कुणाची सतत देखण्या जावेशी तुलना सुरू असते तर कुणाला  शेजारीच असणारे सासर माहेर सांभाळून घेतांना तारेवरची कसरत होत असते. निरनिराळे तुकडे जोडून जोडून बनवलेला कॅलिडोस्कोप म्हणजे स्त्री चे आयुष्य...😢 त्यात खाचा किती आणि इवल्या तळहातावर झेललेल्या काचा किती? डॉ. सत्यभामा प्रामाणिकपणे प्रयत्न करत होत्या... स्त्रियांनी मोकळेपणाने बोललं पाहिजे, बरेचदा समस्या फार लहान असते... पण त्याचं मणामणाचं ओझं काळजावर वाहून धाप लागलेली असते... कुणाशी नुसतं बोलूनही खूप बरं वाटतं. समस्या बोलण्यातून सुटल्याच पाहिजे हा अट्टाहास नसतो मात्र त्या भिरकावून मन मुक्त करता यायला हवं ना! त्यासाठी बोल बिंधास्त! ....
                     अशीच चर्चा सुरू असतांना एके दिवशी समूहातील 26 नं ने फणकाऱ्याने प्रतिक्रिया दिली... "मी आहे म्हणून संसार करतेय दुसरी कुणी असती तर केव्हाच निघून गेली असती."... या सगळ्याच स्त्रियांच्या अत्यंत आवडत्या विधानाला अनेकींनी अंगठे दाखवत like केले. समूहात प्रत्येकीची ओळख म्हणजे तिचा unique id... ह्या विधानाला आलेल्या प्रतिसादामुळे डॉ. सत्यभामांनी दुसऱ्याच दिवशी समूहात चर्चेला विषय दिला .... "मी आहे म्हणून...." नवविवाहितेपासून तर पासष्टीच्या आजींपर्यंत प्रत्येक जण ह्या विषयावर तुटूनच पडले. 

11नं वालीने सर्वांत प्रथम प्रतिक्रिया नोंदवली...
"मुलखाचा चिकट नवरा आहे माझा. पंधरा वर्षांत स्वतःहून एक गिफ्ट आणलं नाही मला. माझे सगळे खर्च माझे मीच करते... हा आपला पैसा दाबून ठेवतो... त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला मी गिफ्ट देते छानसं ते घेतांनाही आधी किंमत पाहतो... बोलत काही नाही घेतांना काही वाटत नाही का? मी आहे म्हणून इतकी वर्षे टिकून आहे... ह्या माणसा सोबत"

43 नं वाली धावून येत म्हणाली 
"तर काय... माझीही हीच कथा नवरा काहीही असावा पण कंजूष नसावा बाई...सुचत नाही ह्या नावाखाली हे नवरे लोक सुटून जातात..."

19 नं कडाक्याचा विरोध नोंदवत म्हणाली
"भाग्य आहे नवरा पैसे राखून तरी आहे... माझा तर इतका उधळेपणा करतो की म्हातारपणी पोरांपुढे हात पसरावे लागतील बहुदा... काही म्हणून काही नियोजन नाही.. आवडली वस्तू की केली खरेदी... मी आहे म्हणून नियोजन करते पैशाचे दुसरी कुणी असती ना तर रस्त्यावर आले असते सगळे..."

9 नं वाली जरा पोळलेली असावी..
"रस्त्यावर सुद्धा आलो ग बाई! ह्या माणसाला शेअर्स चा नाद... नाद म्हणून किती घालवावे बाई बाई... राहतं घर विकून रस्त्यावर आलो... मग मीच कंबर कसली... आणि मिळेल ती काम करून पुन्हा संसार उभा केला... आत्ता रुपया सुद्धा देत नाही मी ह्यांना ... मी म्हणून पोरांच्या पोटाला अन्न पडत आहे..."

61 नं वाल्या बाई जरा संतापीच होत्या.
"मेल्या त्या शेअर्सनी तर वाटोळं केलं माझ्या संसाराचं... अखंड माझा नवरा फोन आणि कम्प्युटरवर चिकटलेला असतो... सतत हा शेअर पडला तो वर आला... एव्हढीच चिंता . बायको पोरं जिवंत आहेत की मेली ह्याच्याशी घेणं देणं नाही. मी आहे म्हणून सगळं सांभाळून घेतेय..."

37नं आणि 4 नं सुद्धा ह्याच त्रासातून जात असाव्यात... त्यांनीही लगेच अंगठे दाखवून like केलं. 12 नं वाली त्यावर म्हणाली...
"हा स्मार्ट फोन म्हणजे सवत आहे अगदी. सकाळी डोळे उघडल्यापासून मध्यरात्री डोळे मिटेपर्यंत हा माणूस मोबाइललाच चिकटलेला ... कधीकधी वाटतं फोडून टाकावा बत्ता घालून... मी आहे म्हणून रेटतेय.."
ह्या बत्त्याच्या आयडिया वर अक्षरशः likes, love आणि टाळ्यांचा पाऊस पडला.

33नं वाली फणकाऱ्याने म्हणाली...
"माझ्या जाऊबाईंना भावजी कित्ती मदत करतात स्वयंपाकात... कधीकधी तर सरप्राईज म्हणून सगळा स्वयंपाकच करून ठेवतात. मेलं आमच्या नशिबात कपभर चहा नाही कधी...."

29नं री ओढत म्हणाली..
"आमचे हे तर स्वतःचे कपडे सुद्धा आवरत नाहीत. आंघोळ केली की ओला टॉवेल गादीवर फेकून देतो... इतका राग येतो ना.. असं वाटतं फेकून द्यावा तो टॉवेल सरळ डस्टबीन मध्ये..."
ही सार्वत्रिक समस्या असावी बहुदा... ह्यावर इमोजींचा पाऊस पडला.

50 नं वाली रागावून म्हणाली..
"एक काम करत नाही घरातलं...जसा काही सगळा संसार माझा एकटीचा आहे. भाजी आणा, किराणा भरा, आलेगेले पहा...एखादी दुसरी असती ना तर कंटाळून निघूनच गेली असती."

38नं शब्द उचलत म्हणाली..
"तर काय घरातलं तर फारच पण हा वाट्टेल तेव्हा मित्रमंडळ, नातेवाईक बोलावून ठेवणार मग कितीही थकलेलं असा .. चमचमीत स्वयंपाक करायलाच लागतो..."

पुढं भराभर प्रतिक्रिया पडू लागल्या...
"माझा नवरा भयंकर कर्मठ... त्याला देवपूजेची आवड तासनतास करत बसतो... तू कर ना रे पण माझ्याकडून का अपेक्षा... गावाकडे जाऊन सगळे कुळाचाराचे देव घेऊन आला... आता सुट्ट्या काढते आणि सोवळ्यात स्वयंपाक करत बसते..."

"माझ्या तर नवऱ्याला मी नोकरी केलेलीच नकोय... का तर हा बिझनेस करणार..तो घरी आला की त्याला गरम गरम तव्यावरचीच पोळी लागते... काहीतरी नाटकं... दुसरी कुणी शिकलेली असती तर सोडूनच गेली असती."

"मी शिकलेली नाही म्हणून माझ्या नवऱ्याला लाज वाटते माझी... कुठेही सोबत घेऊन जात नाही...😢एकीचे दुःख भळभळले..."

"बराय ग नेत नाही तेच... नवऱ्याच्या ऑफिसच्या पार्टीत शोभेच्या बाहुलीसारखं फिरून फिरून कंटाळा आलाय मला... तयार व्हा तेही हा म्हणेल तसंच, खोटं खोटं हसा आणि नुसतं सॉफ्ट ड्रिंक घेत फिरत रहा..."

"हो ग! कधीकधी इतकी भूक लागते ना... पण काय करायचं तिथं जेवणाचे टेबल भरभरून असतात पण आपण म्हणे काहीच खायचं नाही....कधीकधी तर भेळेच्या गाडीशेजारून जातांना मस्त पोटभर भेळ खावीशी वाटते पण ह्याला आवडत नाही म्हणून..... इतकं लहान लहान गोष्टीत मन मारून दुसरी एखादी राहिलीच नसती एव्हढी वर्षे... "

कित्येकींच्या कित्येक व्यथा भळभळू लागल्या..... कित्येक कथा पुढे येऊ लागल्या... एकुणात भारतात प्रत्येक स्त्री मन मारूनच जगतोय की काय ? असे वाटावे अशी ही चर्चा वळणे घेऊ लागली. तेव्हढ्यात
75 नं च्या आजी सविस्तर प्रतिक्रिया देत पुढे आल्या... ह्या आजी वयस्कर होत्या... अनुभवी आणि शांत स्वभावाचा होत्या, हे डॉ. सत्यभामांना माहीत होते.

"थोडा वयाचा फायदा घेते बरका! मुलींनो... तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया मी वाचतेय. प्रत्येकीला मन मारून जगावे लागते... हे अगदी खरे आहे. पण खरं सांगू का ?? कुणाशीही लग्न केले ना तरी फार काही फरक पडणार नसतो... असे ना तसे कुठल्यातरी बाबतीत जुळवून घ्यावेच लागते. माझी नात हुशार नोकरी करणारी लग्नानंतर एक महिन्यात माघारी आली... तिलाही मी हेच समजवून सांगितले... आपल्याला दिसते ना ती फक्त अर्धीच बाजू ... आपण जमवून घेतो तसेच दुसऱ्या बाजूची व्यक्ती मग ती कुणीही असो नवरा, मुले ,सासू सगळे त्यांच्या बाजूनेही जमवून घेतच असतात...."

75नं चे वाचून सगळ्या गंभीर आणि शांत झाल्या. त्याच पुढे म्हणाल्या...
" भारतीय स्त्रिया संसारात फार फार जुळवून घेतात .. अगदी खरंय ! मान्य !  पण मी आहे म्हणून संसार टिकलाय हे काही खरं नाही बायांनो... गेल्या वर्षी मी पडले घरातल्या घरात... कंबरेचे हाड मोडले. आता झोपून नाहीतर बसून राहते फक्त ... सगळं जागीच.. आयुष्यभर चिडचिड करणारा माझा नवरा विनातक्रार माझी सगळी मदत करतो. पाणी सुद्धा हाताने न घेणारा माझं ताट वाढून आणतो...देवाला हातही न जोडणारा माणूस बसल्या जागी मला पोथी आणून देतो कधी वाचून दाखवतो... हा भारीतला फोन सुद्धा त्यांनीच आणून दिला... चार जणांशी गप्पा मारल्या की बरं वाटेलं म्हणून... एकदा मी म्हणाले तुम्हाला फार करावं लागतं माझं, मी गेली तर सुटाल तुम्ही. तर पहाडासारखा माणूस ढसाढसा रडला... तू गेलीस तर मी कसा जगू एकटा म्हणून... आता बोला..."

सगळ्या निःशब्द झाल्या होत्या..
"मुलींनो संसार टिकतो तो दोघांमुळे.... थोडे थोडे दोघेही जुळवून घेत असतातच... बाकी मी आहे म्हणून संसार टिकलाय हे वाक्य जोरदार आहे... प्रत्येकीला म्हणावे वाटले तर नवल नाही..."
खळखळून हसणाऱ्या इमोजींचा ग्रुप वर पाऊस पडला.

सगळ्यांना नेमकेपणाने कळून चुकलं होतं...
मी आहे म्हणून संसार करतेय... दुसरी कुणी असती तर... तर तिनेही हेच केलं असतं 😂😂.... कारण मुळात आपल्याला संसार टिकवायचे आहेत , जुळवून घ्यायचे आहे. इवल्या कुरबुरींवरून संसार मोडणाऱ्यांना हजारो कारणे मिळत असतीलही पण भारतात लग्न टिकवायला .. लग्न टिकवायची मनापासून इच्छा एव्हढेही पुरेसे असते.... ते किती योग्य किती अयोग्य कुणास ठाऊक?? बाकी भारतीय स्त्री आहे म्हणून लग्नसंस्था टिकून आहे बाकी दुसरी कोणी तर केव्हाच पळून गेली असती 😂😂

🔏©️ यशश्री रहाळकर