एखाद्या व्यक्तीचे नाव हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असतो... मात्र बरेचदा ह्यात विसंगती आढळून येते..... नावांवरून व्यक्तीबद्दल बांधलेले आडाखे चुकू शकतात. म्हणजे असं बघा दुसरेच कुणीतरी तुम्ही बाळ असतांना त्यांना आवडणारे नाव ठेऊन मोकळे झालेले असतात. पुढे ते नाव तुमच्या जन्मदाखल्या पासून डेथ सर्टिफिकेट पर्यंत तुमची साथसोबत करत असते. प्रत्येक नावाची एक चित्रमयता असते... ते नाव घेतलं की त्याच प्रकारची व्यक्ती डोळ्यांसमोर उभी राहते... जसे 'पप्पू' किंवा 'पिंटू' म्हटले की एक हाफ चड्डीतलं बारकं पोरगं डोळ्यांसमोर येतं... तुम्ही ठरवूनही पन्नास वर्षांचा माणूस डोळ्यांपुढे उभाच करू शकत नाही. पण हा पप्पू / पिंटू सुद्धा कधीतरी मोठा होणारच ना! अबोली नावाच्या स्त्रिया दांडपट्ट्यागत जीभ चालवताना दिसतात, तर लहानपणी सायली नाव ठेवलेली व्यक्ती वाढता वाढता वाढे होत.. भलेमोठे फुलकोबीचे फुल बनते. मुक्ता नावाची स्त्री नवऱ्याचा मार खाते, तेजस्विनी च्या चेहऱ्यावर सदाच बारा वाजलेले असू शकतात तर शीतल नावाच्या स्त्रिया भयंकर तापट असू शकतात. थोडक्यात... नावात काय ठेवलंय?? आता "सत्यभामा" हे नाव उच्चारताच डोळ्यापुढे काय चित्र उभं राहतं... एखादी गावाकडची नऊवारीतील हातभार बांगड्या भरलेली म्हातारी... बरोब्बर! त्यात श्रीकृष्ण पत्नी सत्यभामा म्हणजे मत्सराचा, हट्टीपणाचा आदर्शच... त्यामुळे फार काही चांगलं चित्र मनांत उभं राहत नाही. एक लाघवी , गोड हसणाऱ्या चाळीशीच्या आसपास वय असणाऱ्या, अनुभवी मानसोपचार तज्ञ सत्यभामा नावाच्या असू शकतात का? नाही हेच उत्तर मनांत आले ना.... पण डॉ. सत्यभामांचा सगळा आयुष्याचा प्रवासच असा अनपेक्षित घटनांनी भरलेला आहे. एकता कपूरच्या नवीन सिरियलचे स्क्रिप्ट वाटावे अश्या नाट्यपूर्ण घडामोडींनी त्यांचे आयुष्य व्यापून गेलेले आहे. रावराणे कुटुंबात 100 पिढ्यानंतर एका मुलीच्या जन्म झाला... इकडे शेजारच्या खोलीत आजीने राम म्हटले आणि तिकडे बाळाने ट्या s हां s! केले. आजीचाच पुनर्जन्म झालाय मानून आजीचेच नाव "सत्यभामा" बाळाला मिळाले. अभ्यासात अतीशय हुशार असणाऱ्या सत्यभामाला कौटुंबिक प्रेम फारसे मिळालेच नाही... ती आठ वर्षांची असावी आई- बाबांचे कडाक्याचे भांडण झाले... आई रात्रभर रडत होती. दुसऱ्या दिवशी आईचे प्रेतच तिला बघायला मिळाले.... आईने आत्महत्या केली होती. सत्यभामाच्या मनावर खोलवर जखम झाली. .. हे कमी की काय म्हणून आयुष्यभर तिने अश्याच प्रकारे अत्यंत जवळची माणसे गमावली. तिच्या काकूनेही एक दिवस जीव दिल्याचे कळले... तिला मामाकडे ठेवण्यात आले...मामी विमनस्क अवस्थेत असायची... अखेर मामी मनोरुग्ण झाली. शेवटी सत्यभामाची रवानगी होस्टेलवर झाली. सगळे आयुष्य होस्टेलवर काढलेल्या सत्यभामाने डॉक्टर होण्याचे ठरवले.. MBBS नंतर इतर क्षेत्रात स्पेशलायझेशनच्या संधी असूनही मानसिक आजारांवर अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
पुढे डॉ. श्रीकृष्ण विध्वंस ह्यांच्या पत्नी म्हणून डॉ. सत्यभामा विध्वंस झाल्या.... नावातच भांडणे, कुरबुरी, नासधूस असे काहीही असले तरी... त्यांचे काम त्याच्या अगदी विरुद्ध होते. आयुष्यभर होस्टेलला स्वतंत्र जीवन जगणाऱ्या सत्यभामा एकत्र कुटुंबात आल्या... घरांत आजेसासू, सासू, दोन जावा , नणंद अश्या अनेक स्त्रिया होत्या. सासरी माणसांशी जमवून जुळवून घेतांना मन कित्ती मारावे लागते ह्याचा पदोपदी प्रत्यय त्यांना आला. कुटुंबातील एक सदस्य म्हणून पाहण्यापेक्षा एक डॉक्टर च्या दृष्टीने त्या सगळ्यांना अभ्यासू लागल्या... एकीकडे त्यांनी आपली प्रॅक्टिस आणि कॉन्सेल्लिंग सुरू केले. त्यांच्याकडे बहुसंख्य पेशंट महिला येत कदाचित महिला डॉक्टर म्हणून सोयीचे, मोकळे वाटत असावे. पंधरा वर्षांच्या त्यांच्या प्रॅक्टिस मध्ये त्यांनी अनेक केसेस हाताळल्या.. सांसारीक निमित्ताने अनेक स्त्रिया त्यांच्या संपर्कात आल्या. त्या सगळ्यांच्या अभ्यासातून एक गोष्ट प्रभावीपणे त्यांना जाणवली ती म्हणजे विवाहित स्त्रियांच्या बहुतेक समस्या ह्या "न बोलणे" किंवा "घुसमटीत " दडलेल्या आहे. मुळातच सहनशक्ती अंगी असल्याने, उत्तम संसार करणे हा प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने स्त्रिया मोकळेपणाने बोलत नाहीत. खूप छोट्या छोट्या जखमा साठून साठून मनांत एक वादळ तयार होते आणि अखेर त्याचा विस्फोट होतो . डिप्रेशन , विमनस्कपणा, वैफल्यग्रस्त अश्या अनेक समस्यांचे मूळ मुक्त संवादाचा अभाव ह्यातच दडलेले आहे. बरेचदा इतक्या इवल्या गोष्टी असतात की बोलणार कुणाला... मैत्रिणींसमोर प्रतिष्ठेचा पोकळ डोलारा उभा केलेला असतो, नवऱ्याला वेळ नसतो, मुलांचे जगच वेगळे असते... म्हणूनच स्त्रियांनी मनमोकळं बोललं पाहिजे ह्यासाठी काहीतरी प्रयत्न करूयात म्हणून त्यांनी "बोल बिंधास्त!" नावाचा ग्रुप सुरू केला. ह्या ग्रुपवर जॉईन होणाऱ्या प्रत्येक स्त्रीचे नाव, फोटो वगैरे ओळख लपवून प्रत्येकीला एक unique id number दिला जाई... सगळ्यांची माहिती केवळ डॉ. सत्यभामांकडे असायची. ह्या ग्रुप वर वेगवेगळे छोटे मोठे विषय हाताळले जात... मात्र एक नियम होता... माणसे तोडून संसार सोड किंवा आत्महत्येचा पर्याय ह्यातलं काहीही सुचवायचं नाही की स्वीकारायचं नाही... रोज सकाळी एका यशस्वी स्त्रीची, परिस्थितीशी संघर्ष करून जिंकलेल्या स्त्रीची प्रेरणादायक कथा ग्रुप वर पोस्ट केली जाई. सुरुवातीला केवळ कॉन्सेल्लिंगच्या पेशंट पुरता सुरू केलेला ग्रुप हळूहळू अनेक स्त्रियांना सामावून घेत मोठा मोठा होऊ लागला.
बोल बिंधास्त ! म्हणत अनेक स्त्रिया आपापल्या मनातील घुसमटीला मोकळी वाट करून देऊ लागल्या. एकमेकींच्या अनोळखी आधाराने चाचपडत का होईना.. लहान मोठ्या समस्यांवर उपाय शोधू लागल्या ... काही उपाय तर इतके अफलातून होते की डॉ. सत्यभामा सुद्धा थक्क होत. अप्रत्यक्षपणे ..."भारतीय विवाहित स्त्रिया आणि मानसिक आजार" ह्या त्यांच्या शोधनिबंधाला हवा असणारा डेटा त्यांना आपसूक मिळत होता.. शिवाय प्रामाणिक उत्तरे आल्याने डेटा जेन्यूईन होताच.
"बोल बिंधास्त! " ग्रुपवर रोज एक विषय चर्चेला दिला जाई... शनिवारी मुक्त संवाद आणि रविवारी ग्रुप बंद असायचा. इथे नोकरी करणाऱ्या, व्यावसायिक, गृहिणी आणि सगळ्यांचं वयोगटातील स्त्रिया होत्या. सासुशी कसे जमवावे, त्रास देणाऱ्या बॉसला अद्दल घडवा... इथपासून तर किशोरावस्थेतील मुलांची आई असणाऱ्यांनी त्यांची मैत्रीण कसे व्हावे इथपर्यंत सगळ्याच प्रश्नांची चर्चा रंगत असायची. शनिवारच्या मुक्त संवादात अनेक स्त्रिया स्वतःला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या विषय म्हणून यादीत नोंद करत. एका नवीनच लग्न झालेल्या तरुणीने ... "महिनाभर राहणाऱ्या नणंदेला चार दिवसांत कसे पिटाळावे?" असा विषय नोंदवला. सोमवारच्या चर्चेत हाच विषय घेण्यात आला आणि चर्चेला महापूर आला. गोडी गोडित शालजोडीत सुचवलेले उपाय भन्नाट होते... तिच्याकडे महिनाभर राहून यावे, तिच्या सासूला राहायला बोलावून घ्यावे, चार दिवसांनी तिलाच स्वयंपाकाला लावावे इथपासून तर स्पष्टपणे बोलावे, नवऱ्यामार्फत सांगावे इथपर्यंत चर्चा झाल्या. एकीने सुचवलेला उपाय तर भन्नाट होता... नणंद आली की माहेरी निघून जावे .. आणि ती गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी यावे.. सासू जास्तीचे काम करून दमली की पुढच्या वेळी चार दिवसाच्या वर नणंदेला रहा म्हणणार नाही.... कधीकधी चर्चा वाकड्या वळणावर जायचीही ... तेव्हा ती थांबवावी लागेच मात्र झालेले लहानमोठे अपमान, बोचलेले चरे, खुपणारे सोयरे सारं सारं मुक्तपणे व्यक्त होई... कुणाच्या नवऱ्याने चार चौघात बावळट म्हटले असते, कुणाची सासू अखंड माहेरचा उद्धार करत असते, कुणाची सतत देखण्या जावेशी तुलना सुरू असते तर कुणाला शेजारीच असणारे सासर माहेर सांभाळून घेतांना तारेवरची कसरत होत असते. निरनिराळे तुकडे जोडून जोडून बनवलेला कॅलिडोस्कोप म्हणजे स्त्री चे आयुष्य...😢 त्यात खाचा किती आणि इवल्या तळहातावर झेललेल्या काचा किती? डॉ. सत्यभामा प्रामाणिकपणे प्रयत्न करत होत्या... स्त्रियांनी मोकळेपणाने बोललं पाहिजे, बरेचदा समस्या फार लहान असते... पण त्याचं मणामणाचं ओझं काळजावर वाहून धाप लागलेली असते... कुणाशी नुसतं बोलूनही खूप बरं वाटतं. समस्या बोलण्यातून सुटल्याच पाहिजे हा अट्टाहास नसतो मात्र त्या भिरकावून मन मुक्त करता यायला हवं ना! त्यासाठी बोल बिंधास्त! ....
अशीच चर्चा सुरू असतांना एके दिवशी समूहातील 26 नं ने फणकाऱ्याने प्रतिक्रिया दिली... "मी आहे म्हणून संसार करतेय दुसरी कुणी असती तर केव्हाच निघून गेली असती."... या सगळ्याच स्त्रियांच्या अत्यंत आवडत्या विधानाला अनेकींनी अंगठे दाखवत like केले. समूहात प्रत्येकीची ओळख म्हणजे तिचा unique id... ह्या विधानाला आलेल्या प्रतिसादामुळे डॉ. सत्यभामांनी दुसऱ्याच दिवशी समूहात चर्चेला विषय दिला .... "मी आहे म्हणून...." नवविवाहितेपासून तर पासष्टीच्या आजींपर्यंत प्रत्येक जण ह्या विषयावर तुटूनच पडले.
11नं वालीने सर्वांत प्रथम प्रतिक्रिया नोंदवली...
"मुलखाचा चिकट नवरा आहे माझा. पंधरा वर्षांत स्वतःहून एक गिफ्ट आणलं नाही मला. माझे सगळे खर्च माझे मीच करते... हा आपला पैसा दाबून ठेवतो... त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला मी गिफ्ट देते छानसं ते घेतांनाही आधी किंमत पाहतो... बोलत काही नाही घेतांना काही वाटत नाही का? मी आहे म्हणून इतकी वर्षे टिकून आहे... ह्या माणसा सोबत"
43 नं वाली धावून येत म्हणाली
"तर काय... माझीही हीच कथा नवरा काहीही असावा पण कंजूष नसावा बाई...सुचत नाही ह्या नावाखाली हे नवरे लोक सुटून जातात..."
19 नं कडाक्याचा विरोध नोंदवत म्हणाली
"भाग्य आहे नवरा पैसे राखून तरी आहे... माझा तर इतका उधळेपणा करतो की म्हातारपणी पोरांपुढे हात पसरावे लागतील बहुदा... काही म्हणून काही नियोजन नाही.. आवडली वस्तू की केली खरेदी... मी आहे म्हणून नियोजन करते पैशाचे दुसरी कुणी असती ना तर रस्त्यावर आले असते सगळे..."
9 नं वाली जरा पोळलेली असावी..
"रस्त्यावर सुद्धा आलो ग बाई! ह्या माणसाला शेअर्स चा नाद... नाद म्हणून किती घालवावे बाई बाई... राहतं घर विकून रस्त्यावर आलो... मग मीच कंबर कसली... आणि मिळेल ती काम करून पुन्हा संसार उभा केला... आत्ता रुपया सुद्धा देत नाही मी ह्यांना ... मी म्हणून पोरांच्या पोटाला अन्न पडत आहे..."
61 नं वाल्या बाई जरा संतापीच होत्या.
"मेल्या त्या शेअर्सनी तर वाटोळं केलं माझ्या संसाराचं... अखंड माझा नवरा फोन आणि कम्प्युटरवर चिकटलेला असतो... सतत हा शेअर पडला तो वर आला... एव्हढीच चिंता . बायको पोरं जिवंत आहेत की मेली ह्याच्याशी घेणं देणं नाही. मी आहे म्हणून सगळं सांभाळून घेतेय..."
37नं आणि 4 नं सुद्धा ह्याच त्रासातून जात असाव्यात... त्यांनीही लगेच अंगठे दाखवून like केलं. 12 नं वाली त्यावर म्हणाली...
"हा स्मार्ट फोन म्हणजे सवत आहे अगदी. सकाळी डोळे उघडल्यापासून मध्यरात्री डोळे मिटेपर्यंत हा माणूस मोबाइललाच चिकटलेला ... कधीकधी वाटतं फोडून टाकावा बत्ता घालून... मी आहे म्हणून रेटतेय.."
ह्या बत्त्याच्या आयडिया वर अक्षरशः likes, love आणि टाळ्यांचा पाऊस पडला.
33नं वाली फणकाऱ्याने म्हणाली...
"माझ्या जाऊबाईंना भावजी कित्ती मदत करतात स्वयंपाकात... कधीकधी तर सरप्राईज म्हणून सगळा स्वयंपाकच करून ठेवतात. मेलं आमच्या नशिबात कपभर चहा नाही कधी...."
29नं री ओढत म्हणाली..
"आमचे हे तर स्वतःचे कपडे सुद्धा आवरत नाहीत. आंघोळ केली की ओला टॉवेल गादीवर फेकून देतो... इतका राग येतो ना.. असं वाटतं फेकून द्यावा तो टॉवेल सरळ डस्टबीन मध्ये..."
ही सार्वत्रिक समस्या असावी बहुदा... ह्यावर इमोजींचा पाऊस पडला.
50 नं वाली रागावून म्हणाली..
"एक काम करत नाही घरातलं...जसा काही सगळा संसार माझा एकटीचा आहे. भाजी आणा, किराणा भरा, आलेगेले पहा...एखादी दुसरी असती ना तर कंटाळून निघूनच गेली असती."
38नं शब्द उचलत म्हणाली..
"तर काय घरातलं तर फारच पण हा वाट्टेल तेव्हा मित्रमंडळ, नातेवाईक बोलावून ठेवणार मग कितीही थकलेलं असा .. चमचमीत स्वयंपाक करायलाच लागतो..."
पुढं भराभर प्रतिक्रिया पडू लागल्या...
"माझा नवरा भयंकर कर्मठ... त्याला देवपूजेची आवड तासनतास करत बसतो... तू कर ना रे पण माझ्याकडून का अपेक्षा... गावाकडे जाऊन सगळे कुळाचाराचे देव घेऊन आला... आता सुट्ट्या काढते आणि सोवळ्यात स्वयंपाक करत बसते..."
"माझ्या तर नवऱ्याला मी नोकरी केलेलीच नकोय... का तर हा बिझनेस करणार..तो घरी आला की त्याला गरम गरम तव्यावरचीच पोळी लागते... काहीतरी नाटकं... दुसरी कुणी शिकलेली असती तर सोडूनच गेली असती."
"मी शिकलेली नाही म्हणून माझ्या नवऱ्याला लाज वाटते माझी... कुठेही सोबत घेऊन जात नाही...😢एकीचे दुःख भळभळले..."
"बराय ग नेत नाही तेच... नवऱ्याच्या ऑफिसच्या पार्टीत शोभेच्या बाहुलीसारखं फिरून फिरून कंटाळा आलाय मला... तयार व्हा तेही हा म्हणेल तसंच, खोटं खोटं हसा आणि नुसतं सॉफ्ट ड्रिंक घेत फिरत रहा..."
"हो ग! कधीकधी इतकी भूक लागते ना... पण काय करायचं तिथं जेवणाचे टेबल भरभरून असतात पण आपण म्हणे काहीच खायचं नाही....कधीकधी तर भेळेच्या गाडीशेजारून जातांना मस्त पोटभर भेळ खावीशी वाटते पण ह्याला आवडत नाही म्हणून..... इतकं लहान लहान गोष्टीत मन मारून दुसरी एखादी राहिलीच नसती एव्हढी वर्षे... "
कित्येकींच्या कित्येक व्यथा भळभळू लागल्या..... कित्येक कथा पुढे येऊ लागल्या... एकुणात भारतात प्रत्येक स्त्री मन मारूनच जगतोय की काय ? असे वाटावे अशी ही चर्चा वळणे घेऊ लागली. तेव्हढ्यात
75 नं च्या आजी सविस्तर प्रतिक्रिया देत पुढे आल्या... ह्या आजी वयस्कर होत्या... अनुभवी आणि शांत स्वभावाचा होत्या, हे डॉ. सत्यभामांना माहीत होते.
"थोडा वयाचा फायदा घेते बरका! मुलींनो... तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया मी वाचतेय. प्रत्येकीला मन मारून जगावे लागते... हे अगदी खरे आहे. पण खरं सांगू का ?? कुणाशीही लग्न केले ना तरी फार काही फरक पडणार नसतो... असे ना तसे कुठल्यातरी बाबतीत जुळवून घ्यावेच लागते. माझी नात हुशार नोकरी करणारी लग्नानंतर एक महिन्यात माघारी आली... तिलाही मी हेच समजवून सांगितले... आपल्याला दिसते ना ती फक्त अर्धीच बाजू ... आपण जमवून घेतो तसेच दुसऱ्या बाजूची व्यक्ती मग ती कुणीही असो नवरा, मुले ,सासू सगळे त्यांच्या बाजूनेही जमवून घेतच असतात...."
75नं चे वाचून सगळ्या गंभीर आणि शांत झाल्या. त्याच पुढे म्हणाल्या...
" भारतीय स्त्रिया संसारात फार फार जुळवून घेतात .. अगदी खरंय ! मान्य ! पण मी आहे म्हणून संसार टिकलाय हे काही खरं नाही बायांनो... गेल्या वर्षी मी पडले घरातल्या घरात... कंबरेचे हाड मोडले. आता झोपून नाहीतर बसून राहते फक्त ... सगळं जागीच.. आयुष्यभर चिडचिड करणारा माझा नवरा विनातक्रार माझी सगळी मदत करतो. पाणी सुद्धा हाताने न घेणारा माझं ताट वाढून आणतो...देवाला हातही न जोडणारा माणूस बसल्या जागी मला पोथी आणून देतो कधी वाचून दाखवतो... हा भारीतला फोन सुद्धा त्यांनीच आणून दिला... चार जणांशी गप्पा मारल्या की बरं वाटेलं म्हणून... एकदा मी म्हणाले तुम्हाला फार करावं लागतं माझं, मी गेली तर सुटाल तुम्ही. तर पहाडासारखा माणूस ढसाढसा रडला... तू गेलीस तर मी कसा जगू एकटा म्हणून... आता बोला..."
सगळ्या निःशब्द झाल्या होत्या..
"मुलींनो संसार टिकतो तो दोघांमुळे.... थोडे थोडे दोघेही जुळवून घेत असतातच... बाकी मी आहे म्हणून संसार टिकलाय हे वाक्य जोरदार आहे... प्रत्येकीला म्हणावे वाटले तर नवल नाही..."
खळखळून हसणाऱ्या इमोजींचा ग्रुप वर पाऊस पडला.
सगळ्यांना नेमकेपणाने कळून चुकलं होतं...
मी आहे म्हणून संसार करतेय... दुसरी कुणी असती तर... तर तिनेही हेच केलं असतं 😂😂.... कारण मुळात आपल्याला संसार टिकवायचे आहेत , जुळवून घ्यायचे आहे. इवल्या कुरबुरींवरून संसार मोडणाऱ्यांना हजारो कारणे मिळत असतीलही पण भारतात लग्न टिकवायला .. लग्न टिकवायची मनापासून इच्छा एव्हढेही पुरेसे असते.... ते किती योग्य किती अयोग्य कुणास ठाऊक?? बाकी भारतीय स्त्री आहे म्हणून लग्नसंस्था टिकून आहे बाकी दुसरी कोणी तर केव्हाच पळून गेली असती 😂😂
🔏©️ यशश्री रहाळकर
Khupch chan lekh🤩
उत्तर द्याहटवानेहमीप्रमाणे मस्तच ग यशश्री
उत्तर द्याहटवाखूप छान, मी पण यातील हं, ,,, मी आहे म्हणून ����
उत्तर द्याहटवा