फॉलोअर

रविवार, २६ जानेवारी, २०२०

एकटी

           ही एका 'ती' ची कथा आहे... आहे तिला नाव आहे ना! पण ते फार नगण्य आहे. महत्वाचे आहे ती एक स्त्री आहे आणि एकटी आहे ..... तशी ती रेखीव म्हणावी अशी चार चौघीत उठून दिसणारी गोरीपान, वय असेल चाळीशीच्या आत बाहेर.. पण ह्या साऱ्या तपशीलांनी खरंतर काहीच फरक पडत नाही... असले काय किंवा नसले काय... महत्वाचे आहे ते 'ती एकटी' आहे...तर कथेच्या संदर्भात तिला 'ती' म्हणूयात. तिला मी गेले कित्येक वर्षे ओळखते... पाहते म्हणा ना! कारण आमचा फारसा परीचय नाही.. केवळ तोंडओळख ...ती बरोब्बर माझ्या समोरच्या बिल्डिंग मधील अगदी समोरच्याच फ्लॅट मध्ये राहते. तिच्या बद्दल काहीबाही कळायचे ते माझ्या भोचक शेजारणी कडून.
               माझ्या शेजारणीला मी 'आज तक... सबसे तेज' असं नाव दिलंय. आठ पंधरा दिवसांनी लोकांच्या बातम्या गोळा करून पोट दुखू लागलं की त्या साऱ्या बातम्या चवीने सांगायला शेजारीण माझ्या घरी चहाला येते. मग कुणाकुणाचे लफडे, भांडण वगैरे खाजगी गोष्टी तिखट मीठ लावून सांगत बसते . कुणाची मुलगी कुणाबरोबर पळून गेली , कुणाचे नवऱ्याबरोबर भांडण झाले , कुणाची सासू कशी त्रास देते वगैरे वगैरे... मला कितीही नकोसे कटकटीचे वाटले ,मनःस्ताप झाला तरी ऐकावेच लागते...शेवटी शेजाऱ्यांशी संबंध निभवावे लागतात ना! आता एव्हढे अंतर्गत तपशील तिला कुठून मिळतात कोण जाणे?? त्याहूनही ते सगळ्यांना सांगून काय मिळते?? हा प्रश्न तर सतत माझ्या मनात उभा असतो. आता मला जिच्याविषयी सांगायचे आहे... तिची अत्यंत खाजगी माहिती कशी कळली मला तर ही अशीच....☺ माझ्या शेजारणीकडून.
                 'ती' माझ्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहायची त्यामुळे गॅलरीत कधीतरी नजरानजर होई ओळखीच्या स्मितहास्याची देवघेव होई.'ती' दोन मुलांची आई गृहिणी असावी ... ,विरंगुळ्याला बॅग्स शिवायची . घरच्या घरी जमेल तश्या विकायची. तुमच्या माझ्यासारखा साधा संसार. नवरा मुलं ह्यात रमलेली... एक दिवस अचानक तिच्या नवऱ्याची नोकरी गेल्याचं कळलं, ती कामाला लागली. बरंच काही शिवायची फॉल पिको करायची नी अजून काय काय करायची. तिचा नवरा कुठल्याश्या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचं कानावर आलं. त्याच्या औषधपाण्याला होता नव्हता पैसा संपला, दागिनेही मोडले तिने. बायका बिच्चारी म्हणून हळहळ व्यक्त करायच्या... समाज काय वेगळं करतो म्हणा. ज्याच त्यालाच निभवावं लागतं ना! नवऱ्याची मानसिक आणि घराची आर्थिक परिस्थिती सारख्याच वेगाने खालावू लागली. नवरा बरेचदा गोंधळ घालायचा, आरडाओरडा , तमाशा करत अंगावर धावून जायचा ...मुलांना तिने आईकडे ठेवले; पण सोसायटीने आक्षेप घेतला... ह्या वेड्याला हॉस्पिटलमध्ये ठेवा हट्ट धरला... तिला आर्थिक दृष्ट्या ते अशक्य होतं...मग तिला नाईलाजाने नवऱ्याला घरात अक्षरशः बांधून ठेवावे लागे. कुणाकुणाच्या हातापाया पडून कशीबशी त्याला घरातच ठेवण्याची परवानगी मिळवली. शक्य ते सारे उपचारही सुरू ठेवले. ज्या माणसावर जोडीदार म्हणून नितांत प्रेम केलेलं असतं त्याला असं अमानुष होताना पाहणं आणि त्यातही जनावरासारखं बांधून ठेवणं किती भयंकर आहे ...😢 कशी कोण जाणे ह्याही परिस्थितीत तिने दोन चार वर्षे ढकलली... नवऱ्याने एकदा वेडाच्या भरात केलेल्या मारहाणीत कानावर फटका बसला... बहिरेपणा आला, कान उरला तो शोभेचाच.
                       तिचं दुर्दैव म्हणावे की सुदैव कोण जाणे पण कसल्याश्या व्हायरल इन्फेक्शनने नवरा वारला . अगदीच घरासमोरचा प्रसंग... आम्ही चार सहा जणी मिळून भेटीला गेलो. तिची प्रत्यक्षात सुटकाच झाली होती मात्र ती टाहो फोडून रडत होती. तिचे ते तसे रडणे आतपर्यंत काळीज कापत गेलं . आपल्या समाजात कदाचित कसाही असला तरी कुंकाला धनी हवाच असावा.... आणि नवऱ्यावर तिचे मनापासून प्रेम असावे. परत येतांना बायकांचे जळजळीत शब्द होते, " कित्ती नाटकं ग बाई! खोटं खोटं रडता बरं येतं ग हिला . बरंय की गेला तो वेडा हिची सुटकाच झाली . आनंद होत असेल मनातून.." एकमेकींना टाळ्या देत दोघी हसल्या . माणसांतला लांडगा आता तिचे लचके तोडायला सिद्ध झाला होता .... माणूस प्राणीच आहे ह्याची खात्री पटते अश्या वेळी. अचानकपणे एकुणात स्त्री वर्गाला तिचा तिरस्कार वाटू लागला... दया आणि सहानुभूती तर केव्हाच संपलीे होतीे. या उलट तिच्या संपर्कात येणाऱ्या सरसकट पुरुषांना अचानक मदतीचे उमाळे येत होते. पुरुषमंडळी साठी "ती"  बिचारी होती, निराधार होती आणि एकटी होती . त्यामुळे ती असाहाय आणि लाचार असणारच ह्याची जणू खात्रीच होती. ह्या कुणाचाही शिक्का नसणाऱ्या स्त्री ला अंकित करण्यासाठी जणू चढाओढच लागली होती.
                    "ती" पूर्वीपासून एका दुकानात तिच्या पर्सेस विकायला ठेवत असे ... आणि काही साड्या फॉल पिकोला आणत असे... त्या दुकानदाराने संधी साधून पाहिली. हिने स्पष्ट शब्दांत नकार देताच त्याचा so called पुरुषी अहंकार दुखावला गेला आणि तेथून पुढे व्यवहार बंद केला. दुकानदाराची बायको ..."ती" वेड्याची बायको कसे इतरांचे नवरे फासतेय हे रंगवून सांगू लागली... माझ्या आज तक शेजारणीेने हा किस्सा मोठा मसाला घालून सोसायटीतील स्त्रियांना सांगितला. एकूणात असं चित्र रेखाटलं की 'ती' आम्हा सर्वांचे गरीब बिचारे नवरे पळवून नेणार असावी.... त्यामुळे तिला घरातच काय सोसायटीतही येऊ देऊ नये. पुढे तिने आपल्या पर्स, बॅग ऑनलाइन विकायला सुरुवात केली . काही बिझनेस ग्रुप जॉईन केले... तिथेही अश्याच प्रकारचा अनुभव ... ग्रुप मधील तिच्या नं वर अत्यंत अश्लील मेसेज काही पुरुष मंडळी मुद्दाम पाठवत. तिने नं बदलला.. ग्रुप सोडला . हेही सारे सांगतांना माझी आज तक म्हणत होती..," ठिणगी पडल्याशिवाय का आग लागणार? हिचे राहणे वागणे चुकीचे आहे... " आजूबाजूच्या रिकामटेकड्या म्हाताऱ्यांचे डोळे एव्हाना CCTV झालेले... तिच्याकडे कोण येतं जातं? तिने कोणते कपडे घातले? तिने लिपस्टिक लावणं किती वाईट दिसतं?तिने हिरवी साडी नेसली तिने गजरा माळला हाही विषय आता चर्चेचा झाला.सतीप्रथा बंद होऊन युगे लोटली तरीही लोकांना अजूनही हेच सारे हवे आहे... कदाचित वेगळ्या सोयीस्कर अर्थाने. एखादीच्या दुर्दैवाने जोडीदार सोडून गेलाय तर तिने जगायचं नाही का? तिच्या आयुष्याचं काय करायचं? आयुष्यावर भरभरून प्रेम करण्याचा अधिकार आहे ना तिला माणूस म्हणून... मात्र समाज तिला वेश्येच्या रांगेत नेऊन बसवतो.😢 पुढे ह्या साऱ्या त्रासाने शिणून तिने तिचे घरच विकून टाकले आणि ती आईवडिलांकडे गेली इतकेच काय ते समजले... यांवरही "कुणाचा हात धरून पळून गेली" अश्या वावड्या लोकांनी उठवल्या. नंतर कित्येक वर्षे तिची माझी भेट झाली नाही ... काही निमित्त नव्हतेच.
                     'रेप कल्चर' ह्या शब्दाची भर माझ्या माहितीत एका रिऍलिटी शो मधून पडली. कल्चर =संस्कृती सारख्या सुरेख शब्दाची सांगड 'रेप' ह्या गंभीर गुन्ह्यासोबत का बांधली गेलीये ह्याचा मागोवा घेतांना कळत गेलं... ही ती संस्कृती आहे जिथे स्त्रियांवर होणारे अत्याचार सामान्य स्वीकार्य आहे... ह्या संस्कृतीत एखादीवर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा झाला तर त्यात व्हिक्टीमला सहानुभूती मिळत नाही तर तिचा पेहराव, तिची घरी येण्याची वेळ, स्थान यांना गृहीत धरून टीका केली जाते . एखादी असाहाय एकटी स्त्री जिथे उपलब्ध आहे असेच मानले जाते, तिला शारीरिक लगट करून वा अन्य मार्गांनी धाक दाखविला जातो....उलटपक्षी हा अन्याय करणाऱ्याच्या आयुष्यात मात्र तसूभर फरक पडत नाही...... अशी संस्कृती दुर्दैवानी प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला.ह्या साऱ्यात "तिचा" दोष काय होता?? तर तिला जगायचं होतं स्वतः च्या तत्त्वांवर..माणूस म्हणून. जवळपास सात वर्षांनी, अचानक परवा एका समारंभात "ती" दिसली... प्रमुख अतिथी यशस्वी उद्योजिका म्हणून तिचा सन्मान होत होता. शंभर गरजू महिलांना तिने रोजगार उपलब्ध करून दिला होता. तिचे उत्पादन देशातच नाही तर विदेशातही पोहोचले होते.मला मनापासून आनंद झाला.. प्रत्यक्ष भेटून मी तिचं अभिनंदन केलं... तिने लगेच ओळखलं एव्हढेच नव्हे तर भेटीचं आमंत्रणही दिलं तिच्या घरी येण्याचं.... दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणे माझी शेजारीण आलीच.. मला तिच्यापासून सावध राहण्याविषयी बरेच सल्ले देऊन गेली.एव्हढ्या कार्यक्रमात तिची पाठ उघडी टाकणारे ब्लाऊज आणि हिरवी साडी मॅचिंग आणि चेहऱ्यावरचा ग्लो ... सारे शेजारणीने लगेच टिपले होते. तिचे कोणत्यातरी उद्योजकाशी लफडे असून त्याचमुळे ती यशस्वी झाल्याचे ती चवीने चघळू लागली. मला "रेप कल्चर" गूगल पेक्षाही भारीच सोपे करून समजावून सांगितले ... ह्याबद्दल शेजारणीला चहा तर द्यायलाच हवा...म्हणून मी चहा करायला उठले.
©🔏 यशश्री रहाळकर

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

गोरी गोरी पान

              आज मकर संक्रात,आज काळ्या रंगाचं अनन्यसाधारण महत्व असतं. इतर वेळी अशुभ म्हणून तिरस्कार वाट्याला आलेल्या काळ्या रंगांच्या जादूचा हा दिवस. खरंतर काळी वस्त्रे उष्णता साठवून ठेवणारी असल्याने ह्या थंडीतल्या सणाला त्यांचा मान असावा.
पहिल्या वर्षी सुनेला आवर्जून काळी साडी घेतली जाते... त्या काळ्या साडीवर हलव्याचे दागिने अगदी उठून दिसतात.. मंगळसूत्राचे मणीही काळेच... तरीही काळा रंग अशुभ का कोण जाणे? आजकाल आवडीप्रमाणे सगळ्या शुभकार्यात सरसकट काळे कपडे घालतात...त्यांचं ते काळेपण जणू प्रगतीने पुसून टाकलंय.मात्र मनातून हा काळेपणाचा थर काही केल्या पुसला जात नाही... आम्ही गोरी गोरी पान फुलासारखी छान म्हणतच मोठे झालो...अनेकविध कथांमधून सातत्याने "गोरी=सुंदर" हेच समीकरण रुजत गेलं ,वाढत गेलं.प्रत्येकाची सौंदर्याची स्वतःची अशी एक व्याख्या असते... जरूर असावी पण त्यात सगळेच्या सगळे गुण जेव्हा एकट्या गोरेपणाच्या वाट्याला दिले जातात तेव्हा मात्र नवल वाटतं.
                भारतासारख्या प्रामुख्याने उष्ण प्रदेशात लख्ख गोरा रंग विरळाच.. अपवाद उत्तरेकडील काही राज्ये. आता जे कमी तेच किंमती ह्या तत्वानुसार गोरा रंग मानाचा तुरा ल्याला. मग सुरू झाली सौंदर्याची बाजारपेठ... तुम्ही 5 मिन tv पहिला तर 2 तरी व्हाईटनिंग क्रीम किंवा गोरं बनविणाऱ्या कॉस्मेटिक च्या जाहिराती दिसणारच.गंमत अशी की ह्याच्या मॉडेल मुळातच गोऱ्या पान. आता फेअर अँड लव्हली ची यामी गौतमी पहा गोरी पान. मग ही का advt करतेय? 
आता तर पुरुषांना सुद्धा वेगळ्या गोरं बनविणाऱ्या क्रीम उपलब्ध झाल्या आहेत. थोडक्यात गेल्या पिढीला जो गोरेपणा केवळ मुलींना आवश्यक वाटत होता आता मुलांचीही जीवनावश्यक बाब बनला आहे.हे फॅड फक्त भारतात नाही तर जगभर आहे बरका! थायलंड सारखा देश जिथला एकही माणूस मला काळा दिसलाच नाही तिथेही स्नेल व्हाटनिंग क्रीमच्या जाहिरातींचे बंबार्डिंग पार एअरपोर्ट पासून सुरू होते... कारण येणारे बहुसंख्य भारतीय पर्यटक ह्या गोऱ्या रंगासाठी त्यांच्या महागड्या क्रीम घेणार ह्याची खात्री असावी.
                 विज्ञानाची दिवसेंदिवस प्रगती होतेय की अधोगती हा प्रश्न पडावा एव्हढी ही समस्या बिकट करून ठेवली आहे. साधं सोपं आहे ...त्वचेखाली असणार मेलानीन हे प्राकृतिक रंगद्रव्य आपल्या त्वचेला रंग प्राप्त करून देतं. बहुतेक सगळ्याच सजीवांमध्ये हे रंगद्रव्य असतातच. हे मेलानीन/ melanin आपल्या त्वचेबरोबरच डोळे आणि केसांनाही रंग प्राप्त करून देते. आता हे मेलं... जरा जास्त झालं की रंग काळा कमी झालं की गोरा. मेलानीन कमी असेल तर डोळ्यांचा रंग देखील निळा किंवा फारच कमी असेल तर हिरवा होतो. याचं प्रमाण प्रामुख्याने आपली गुणसूत्रे ठरवीत असतात.मात्र हे रंगद्रव्य म्हणजे निसर्गाची प्राण्यांना दिलेली सुरेख भेट आहे.. हा मेलानीन नावाचा काळा जादूगार सूर्याच्या अतिनील किरणांमधील (अल्ट्रा व्हॉयलेट रेज मधील) घातक घटकांपासून कोशिकांचे रक्षण करतो... त्यामुळे सुरकुत्या पडण्यापासून तर त्वचेच्या कर्करोगापर्यंत अनेक त्वचेशी निगडित समस्यांपासून बचाव होतो. कमी ऊन असणाऱ्या थंड हवेच्या प्रदेशांत जन्माला येणाऱ्या मानवी प्रजातीत मुळातच ह्याचे प्रमाण निसर्ग कमीच ठेवतो त्यामुळे त्यांची त्वचा नैसर्गिक पणे गोरी उजळ असते.थोडक्यात आपण ज्याला शत्रू समजतो तो काळा रंग निसर्गाचे संरक्षक कवच आहे. हळूहळू जवळ येणाऱ्या जगाने भूगोलाच्या मर्यादा ओलांडल्या आता लोक जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात जाऊन स्थायिक होऊ लागले... हळूहळू रंगांची सुरेख सरमिसळ बनत जाते आहे.आपण मात्र अजूनही आपल्या 'गोरी गोरी पान' वर ठाम आहोत.
               '100 तल्या 90 गर्भवती स्त्रिया बाळ गोरं व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात' ... एका मासिकात हा सर्व्हे वाचला आणि खूपच हास्यास्पद वाटला. आई होतांना बाळ संपूर्ण निरोगी असणं, त्याच्या सगळ्या शक्तींचा योग्य विकास होणं ही सगळ्यांत गरजेची बाब आहे. मात्र प्रत्येक आईला आपला अभिमन्यू फक्त गोरा हवा... चक्रव्यूव्हाचं काय पुढे पाहता येईल.निसर्गानं आपल्याला सुरेख सावळा रंग दिला आहे... ना काळाकुट्ट ना पेल पांढरा.. सुवर्णमध्य साधला आहे. आपण मात्र ह्या गोरं व्हायच्या वेडापायी काय काय करतो? भलभलते क्रीम आणि कॉस्मेटिक्स चा भडीमार, वेगवेगळ्या ट्रीटमेंट आणि काय काय...
वास्तव हे आहे की त्वचेचा रंग खोलवर दडला आहे तो बदलता येत नाही तात्पुरता रंगवता येत असेलही... पण मूळ रंग त्याचा रंग दाखवणारच. त्यापेक्षा त्वचा चमकदार निरोगी करण्यावर अधिक लक्ष द्यायला हवे.
"रंग माझा वेगळा" नावाची एक अत्यंत अतिशयोक्ती पूर्ण सिरीयल सध्या सुरू आहे. त्यात बळेच काळी केलेली नायिका अगदीच बिचारी आहे.. खलनायिका काळ्या माणसांचा राग राग करते... आजच्या काळातही ह्या असल्या फालतू विषयांवर मनोरंजन होऊ शकतं??? कमाल आहे.मुळात नैसर्गिक त्वचेचा रंग ही काही माणसाची ओळख नव्हे.. पण आमच्याकडे तर देवीदेवतांची वर्णनेही रंगापासूनच सुरू होतात... तिथे मानवाची काय कथा.
              ह्या साऱ्या सामाजिक प्रभावामुळे बरेचदा एखादी रंगाने काळी व्यक्ती घुसमटून जाते. वर्गात शाळेच्या गदरिंगमध्ये तिला मागे उभे करणे, कॉलेज च्या नाटकात मुख्य भूमिका न देणे इथपासून तर लग्न नावाच्या बाजारात धोंड म्हणून वावरणे इथपर्यंत त्रास दिला जातो कधी ठरवून तर कधी बेमालूम. त्यात घरांत एखादे मूल गोरे असले आणि दुसरे काळे तर घरातूनच त्याच्या आनंदाला सुरुंग लागतो.. ,"ह्या रंगाचा ड्रेस नको घालू तुला शोभणार नाही" हे साधे स्टेटमेंट जिव्हारी लागणारे असू शकते.निसर्गाने दिलेले सारेच आपण आताश्या बदलायला निघालो आहोत.. नाकाची सर्जरी करून सुंदर करा, गालांची करा हनुवटीची धार लावा...
हे सगळं करून तुमचं स्वतः च बाकी ते काय राहतं. आपले dna समर्थ वारसा आहे आपला... ते काही दोष वाहून आणत असतील तर प्रचंड कौशल्येही वाहून आणतातच आपल्या पर्यंत...👍आजवर निसर्गाला दिलेलं आव्हान माणसासाठी घातकच ठरलं आहे.मुळात आपण आपल्या समोरच्या व्यक्तीला 'माणूस' मानत असू तर त्याच्या कोणत्याही नैसर्गिक माणूसपणाचा अडथळा वाटणार नाहीच. कित्येक आफ्रिकन विश्वासुंदरिंनी हे प्रत्यक्षात सिद्ध केलंय... कित्येक अशी क्षेत्रे आहेत जिथे सौंदर्य ही असेट आहे... ते प्रत्येक क्षेत्र रंगापलीकडे जाऊन विचार करणारे आहे.मोठमोठ्या रंगबदलू कंपन्या आपल्याला व्यवस्थित चुना लावत आहेत... तो बंद करणे आपल्याच हाती आहे.बहुतेक मोटीवेशनल सेमिनार्स मध्ये सांगितली जाणारी काळ्या फुग्याची गोष्ट सदैव स्मरणात राखली पाहिजे... फुगा वर जातो तो त्याच्या रंगामुळे नव्हे तर आतल्या हवेमुळे... रंगांच्या आतल्या माणसांत दडलेल्या गुणांमुळे...👍
           मकर संक्रात म्हणजे संक्रमण ... ते केवळ सूर्याचे नसावे तर विचारांचेही संक्रमण व्हायला हवे... ह्या संक्रातीला गोरी गोरी पान चे परीघ मोडून "सावळे सुंदर रूप मनोहर" कडे वाटचाल करूया.

■◆◆■ मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! ■◆◆■

©🔏 यशश्री रहाळकर

सोमवार, १३ जानेवारी, २०२०

संसारसुख

                        विभावरी, वेदांती आणि वेदिका तिघी बहिणींपैकी वेदिका माझी वर्गमैत्रीण, बालमैत्रीण किंवा अगदी जीवाच्या आतली पक्की मैत्रीण म्हणा हवं तर..
माझं आणि तिचं घर समोरासमोर, माझी आई आणि तिची आई एकाच शाळेत शिक्षिका , माझा आणि तिचा वाढदिवस एकाच महिन्यात, आम्ही दोघी घरातले शेंडेफळ... एव्हढे सगळे साम्य असल्यामुळे... स्वभावाने टोकाच्या विरुद्ध असलेल्या आम्ही जिवलग मैत्रिणी सहज झालो.एकतर मी तिच्याकडे किंवा ती माझ्याकडे पडीक असायचीे. त्यात मी फार कमी बोलणारी, फार भोचक प्रश्न कधी न पडणारी... म्हणून मी वेदिका उर्फ वेदू च्या दृष्टीने सोयीची होते.आमच्या घरात आहेत तसे बाबा तिच्या घरी का नाही? आम्हा सगळ्यांसोबत दादा-दादी तिच्याकडे मात्र नाना-नानी असे का? वर्गातल्या इतर मुली करायच्या असल्या पंचायती मी केल्या नाहीत कधीच... वेदू धीट ,स्पष्टवक्ती मी मवाळ नि बुजरी... आम्ही मोठ्या होऊ लागलो तसतसे एकमेकींना आपापली सारीच गुपिते सांगू लागलो. विभावरी ताई दहा वर्षांनी आणि वेदांती ताई आठ वर्षांनी मोठी... तश्या बऱ्याच मोठ्या होत्या... विभावरी ताई मोठ्ठी बहीण असावी तशी शांत... फार सोसलं असावं तिनं ,असं वाटावं इतकी गरीब. वेदांती ताई जराशी हट्टी पण सगळ्यात कळस माझी वेदू... भांडकुदळ, आपलं तेच खरं करणारी...आली अंगावर अन घेतलं शिंगावर अशी.तिच्या ताईला बघून शिट्टी मारणाऱ्या मुलाला तिनं एकदा जाम बडवलं... तेव्हापासून सगळे तिला फटकून असायचे.
                ह्या त्रयमूर्तीची आई विद्या मावशी अर्थात आमच्या देव बाई. देव बाई म्हणजे मूर्तिमंत प्रेम मात्र ते विद्यार्थ्यांसाठी.... इतर वेळी तिची करारी नजर आणि खांद्यावरचा पदर कधी ढळला नाही. देव खरंतर त्यांच्या वडिलांचे आडनाव...त्यांना जवळपास अक्खा गाव ओळखायचा...त्यांनी मुख्याध्यापक म्हणून जवळजवळ  20 वर्षे काम पाहिलेले, अनेक मुलांना त्यांनी घडवलं.. अनेकांना शब्द टाकून नोकरी व्यवसायास लावलं. गावातल्या एकुलत्या एक शाळेतले ते मोठे सर म्हणून सगळेच त्यांना मान देत. त्यांची मुलगी म्हणून विद्या मावशीला सगळे देव बाईच म्हणत.तशी ती अगदीच अलिप्त असे...जुजबी बोलायची. बायकी म्हणाव्यात अश्या हळदीकुंकू ,बारसे वगैरे कार्यक्रमात कधीच नसायची. कुंकू आणि मंगळसूत्र मात्र असायचे. तिचा विषय संसारी बायकांमध्ये हमखास निघायचा.. मग बायका तिच्या 'नालायक' नवऱ्याला शिव्या देऊन बोटे मोडत... गाढवाला गूळ पचला नाही म्हणत. विद्या मावशी बद्दल सगळ्यांनाच माया होती. ती भाषेची शिक्षिका आणि मी भाषेत बरी... मग मी काहीबाही लिहिले की तिला नेऊन दाखवी... ती तपासून देई चुका सांगे. तिच्याकडे हमखास खाऊ मिळायचा. ती सुगरण होती... सतत नवीन पदार्थ करून पहायची. काहीतरी विणकाम भरतकाम करत बसायची. फुलझाडेही भरपूर लावली होती घराभवती ... गजरे करून आम्हा मुलींना देई पण स्वतः मात्र कधीच माळायची नाही.
                     आम्ही आठवीत होतो तेव्हाची गोष्ट... वेदू पाय आपटत आमच्या घरी आली. रागाने बेभान झाली होती... एका पानावर तिने स्वतःच पूर्ण नाव लिहिलं ' वेदिका इंद्रजित वेलणकर' आणि त्या कागदाचे बारीक चिटोरे केले. संतापाने धगधगती वेदू अंगार ओकत होती," ह्या माणसाचं नाव सुद्धा नकोय मला... तू पहाच मी.. मी नावच बदलून घेईन." अपमान तिरस्काराने दुखावली होती वेदू... वेदांती ताई आणि तिचा काहीतरी फुसकट वाद झाला अन् "वेदीका तुझा जन्म झालाच नसता तर बरं झालं असतं. तू आली नी बाबांनी घर सोडलं... तू पनवती आहेस"असं जहरी ताई बोलली होती. त्या रात्रभर वेदू घरी परतली नाही, माझ्याजवळ रडत बसली.नंतर घरी गेली ते मन मोडलेलीच .. विद्या मावशीने ताईला तिची माफी मागायला लावली पण वेदू ऐकणारी नव्हतीच. स्वतः च्या अठराव्या वाढदिवसाला तिने स्वतः चे नाव बदलून 'वेदिका विद्या देव ' असे करून घेतले.तिच्या मनातला वडीलांबद्दलचा संताप दिवसागणिक वाढत गेला. तिच्या ताईंसारखी करियरची वाट तिने मोठ्या देव सरांच्या सल्ल्याने निवडली नाही... तिचे निर्णय ती बेफिकीर पणे घेऊन मोकळी व्हायची. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घेतली हे तिने घरी फक्त घोषित केले... मोठे सर खूप चिडले...एकतर हे मुलीनं निवडावं असं क्षेत्र नव्हतं आणि त्यातही त्यांचे मत वेदूने विचारलंच नव्हतं...सर संतापात बोलून गेले, "विद्या... बघ बघ तुझ्या बेलगाम पोरीकडे... बापाचं रक्त रंग दाखवतंय" झालं वेदूची दुखरी नस दबली पण गप्प बसेल ती वेदू नाहीच,आजोबांच्या समोर हातवारे करत वेदू गरजली,"तेच मान्य नव्हतं ना पण त्या नीच माणसाला.. ," आजोबांनी सटकन वेदूच्या थोबाडीत लगावली.तिथून पुढे वेदू कुटुंबापासून अधिकाधिक तुटत गेली. मला म्हणाली, " रक्तच काय त्या नीच माणसाचे dna वेगळे करता आले असते ना तर तेही मी केले असते." वेदू औरंगाबादला राहून शिकू लागली... ती पार्ट टाइम जॉब करायची जमेल तसे फी, पुस्तके वगैरे साठी लागलेले मावशीचे पैसे परत करायची... विद्या मावशीला ते मुळीच आवडत नव्हते... पण वेदू ऐकणार नाही म्हणून एक अकाउंट उघडून त्यात ती बिचारी ते जमा करायची. अगदी दसरा दिवाळी पुरती वेदू घरी येई... माझ्या मात्र ती अखंड संपर्कात होती. दोन्ही ताईंची योग्य वयात सुस्थळी लग्ने झाली... आजोबांच्याच पुढाकाराने झाली... वेदूने आपल्याच एका कलीगशी लग्न केलं... तो बंगाली बाबू असूनही देव सरांना आवडला. ते तासनतास गप्पा मारत बसत.कुणाच्याही लग्नात त्यांचे बाबा इंद्रजित वेलणकर आलेच नाहीत... लग्नातच काय ते कधीच परत फिरकलेच नाहीत.
                         प्रत्येकाचं आयुष्य आपापल्या गतीने सरकत होतं. देव सर ,नंतर वर्षभरात त्यांच्या पत्नी निर्वतल्या... वेदूची मोठी ताई मुंबई दुसरी पुण्यात होती... आमचेही आयुष्य मार्गी लागले... एकमेकांशी फोनवर ऑनलाइन आम्ही सतत संपर्कात असायचो.माझ्या पतीदेवांची बदली औरंगाबाद ला झाली आणि मी पहिला फोन केला तो वेदुला... लगेच तिने रेंटने फ्लॅट पाहून दिला... तिच्या घराजवळचा. माझ्या दोन्ही मुलांच्या ऍडमिशन तिच्या मुलाच्या शाळेत करून घेतल्या.... दोन दिवस सुट्टी टाकून माझं घर मस्त लावून सुद्धा दिलं.... मी साधी ग्रॅज्युवेट गृहिणी पण वेदू कंपनीत मोठ्या पोस्ट वर... ही दरी आमच्या मैत्रीच्या आड आली नाही... वेदूने येऊ दिली नाही. जेव्हढ्या हक्काने गाडी काढून खरेदीला न्यायची तेव्हढ्याच हक्काने जेवायला येतेय अमुक पदार्थ कर म्हणूनही सांगायची. तिची आई विद्या मावशी आपल्या तिन्ही लेकींकडे आलटून पालटून जायची... कुणाला भार नको म्हणून पैसेही द्यायची. खरेतर तिन्ही लेकींचे तिच्यावर खूप प्रेम होते.अधून मधून सेवाभावी संस्थेतही सेवा द्यायला जायची.वेदूकडे असली की बराच वेळ माझ्याकडे यायची... मग भाजी निवडत काहीतरी विणत आमच्या गप्पा रंगायच्या. वेदू गंमतीने म्हणायची सुद्धा ,"आता तू माझी मैत्रीण कमी अन आईची जास्त झाली आहेस." खरंतर सगळं असून मावशी बरेचदा एकटी पडलीये असं वाटायचं. एकदा सहज बोलून गेली .. ,"मला ना मस्त मनापासून संसार करायचा होता तुझ्यासारखा..मात्र नशिबात नव्हता . नोकरी काय नाईलाजानं केली ग!" हळूहळू मावशीचं येणं कमी होत गेलं हल्ली ती बराच वेळ सेवा सदन ला असते असं कळलं..... आणि आणि एक दिवस त्सुनामी घेऊन आला.मावशीनं घर घेतलं होतं स्वतःच आणि त्यात तिने नवा संसार मांडला होता.... जुन्याच नवऱ्यासोबत इंद्रजित वेलणकर सोबत नवा संसार.... हे सारं तिनं स्वतः मला फोन करून सांगितलं... मी थंडगार झाले. "माझं घर पहायला ये",म्हणून आग्रहाने बोलावलं सुद्धा.
                     वेदूने तिच्या दोन्ही ताईंची तातडीची बैठक बोलावली... त्या माणसासोबत राहणार असेल तर आई मला मेली हेही सांगितले. तिघी बहिणींचा चांगलाच पारा चढला होता. विशेषतः एरव्ही शांत असणारी विभावरी ताई भयंकर संतापली होती. या साऱ्या कौटुंबिक वादात खरंतर मी त्रयस्थ पण सारेच माहीत असल्याने कदाचित  प्रत्येकाला मी जवळची वाटत असावी.इंद्रजित वेलणकर हा माणूस बाप आणि नवरा म्हणून नीच होता.... प्रचंड संशयी, संतापी. विद्या मावशी सारख्या सात्विक सोज्वळ बायकोला तो मारहाण करायचा.. प्रसंगी बांधून ठेवायचा. वेदूच्या वेळी दिवस गेल्यावर तर हे मूल माझे नाहीच म्हणून मोकळा झाला...एका संध्याकाळी मावशीला  इतकं मारलं की तिचे वडील देव सर कशीबशी तिला जिवंत घेऊन आले. पुढे इंद्रजित वेलणकर कधीही परतला नाही ना त्यांचा कधी घटस्फोट झाला. त्यांनी कुणाशीतरी लग्न केलं मुलगा आहे असे मोघम त्रयस्थाकडून कळले होते. सेवा सदन मध्ये तो विद्या मावशीला भेटला असावा... त्याची सेवा करता करता काय झालं काय ठरलं त्या दोघांनाच माहीत पण त्यांनी पुन्हा संसार सुरू केला. वेदू आणि ताईंनाच काय जगातल्या कोणत्याच मुलांना हा विचित्र संसार पटणारा नव्हता. विभावरी ताई तर म्हणालीही, "पुन्हा मारहाण करून, हातपाय मोडून परत पाठवले नाही म्हणजे मिळवलं. राक्षस आहे तो ..." बरं अजूनही ते दोघ कायदेशीर पतीपत्नीच ... त्यामुळे तीही वाट बंद झालेली. अखेर मी जाऊन भेटून परिस्थितीचा अंदाज घ्यावा असे ठरले.
                        मावशीला फोन करून मी येणार असल्याचे सांगितले... तिचा आनंद शब्दांतून ओसंडून वाहत होता... गारखेडा परिसरातल्या तिच्या घराचा पत्ता तिनं दिला. सोबतीला बळ म्हणून यजमानांना बरोबर घेतलं...मी खरंतर भीती भीतच तिच्या घरी जाणार होते आजवर इंद्रजित वेलणकर बद्दल इतकं वाईट ऐकून होते की सगळ्या व्हीलनच्या जागी मी त्यांनाच पाहत असे.सुरेख प्रशस्त 3 bhk फ्लॅट होता ... दारावर सौ विद्या आणि इंद्रजित वेलणकर अश्या नावाची सुरेख पाटी... दारापुढे सुरेख रांगोळी. बेल वाजवतात मावशीनं दार उघडलं मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला... तिनं सुरेख निळी जरीची साडी नेसलेली, हातभर बांगड्या, मोजकेच पण चार दागिने आणि चंदेरी केसांवर सुरेख मोगऱ्याचा गजरा... ती प्रसन्न होती नेहमीसारखी गप्पा मारू लागली... इंद्रजित माणूसही वाटला तेव्हढा वाईट नव्हता... माझ्या यजमानांच्या अन त्यांच्या मस्त गप्पा रंगल्या. एखाद्या नवीन लग्न झालेल्या मुलीसारखं मावशीनं मला हाताला धरून घरभर फिरवलं. हे घर तिचं होतं तिच्या मनातलं तिनी नटवलेलं... तिने चार दुकान फिरून घेतलेले अबोलीे पडदे,नवीन designs भरलेल्या चादरी, देवघर ,टेरेस वर लावलेली फुलझाडं ,पुस्तकांचा कपाट वाचायची आरामखुर्ची आणि काय काय... हे सारं दाखवताना तिचा आनंद चेहऱ्यावरनं ओसंडून वाहत होता. अगदी सहज ती बोलून गेली,"आईचं घर तिचं होतं ग .. तो माझा संसार नव्हताच कधी" तिने जेवायचीच तयारी करून ठेवलेली...नवीन डिनर सेट मांडतांना हंसाच्या design चा डिनर सेट किती शोधला वगैरे गप्पा झाल्या. झक्कास खव्याची पोळी, कोथिंबीर वडी, कढी खिचडीचा बेत होता... हाताला तर चव होतीच तिच्या... लोणची चटण्या आवर्जून वाढल्या तिनं... त्याच्याही बरण्या देखण्या... भरभरून बोलत होती. इंद्रजित वेलणकर सुद्धा तिच्या नीटनेटकेपणा चं स्वयंपाकाचं भरभरून कौतुक करत होते.खरं सांगू, तिला जुन्या डागण्यांचे जाब विचारून दुखवावं वाटलंच नाही. निघतांना माझी ओटी भरली... गुपित सांगितल्या सारखं हलक्या आवाजात म्हणाली, "मुलींना म्हणा मला समजून घ्या... आई म्हणून नाही तर बाई म्हणून."
             घरी परततांना माझ्या मनात आलं तिचा निर्णय जगाच्या दृष्टीने चूक असेल, कदाचित व्यवहाराच्याही दृष्टीने बेजबाबदार असेल.... आता तिचा नवरा म्हातारपणी फुकटात सेवा करून घेतोय असेही वाटेल कदाचित....... तिच्या मुलींना विशेषतः वेदूला पटणार नाहीच... पण तरीही योग्य आहे. परतल्यावर मी वेदुला भेटले ... तिच्याच पद्धतीने स्पष्ट शब्दात तिला सांगितलं, " विद्या मावशी मजेत आहे. खरं सांगायचं तर सुखात आहे. इतके वर्षांत तिला जे हवं होतं ते तिला आता मिळतंय... तुमची सारी कर्तव्ये तिनं योग्य प्रकारे निभावली आहेत . तिच्या निर्णयाचा सन्मान करा...." वेदू नेहमीप्रमाणे तार सप्तकात ओरडली... ,"हवं ते मिळालं म्हणे! लाथा हव्या होत्या हिला त्या माणसाच्या... म्हातारचळ लागलाय का हिला? संसार करायचाय म्हणे?? काय कमी होतं ग हिला सांग ना!" मी तितक्याच शांतपणे उद्गारली," वेदू! प्रत्येकाच्या आनंदाची परिमाणं वेगळी असतात. त्यांना मनापासून संसार करायचाय ग! मागचं सगळं विसरून... मावशीचा आनंद आहे त्यात... शेवटी संसारसुख म्हणजे तरी काय ग! स्वतःचं इवल घर त्यात स्वतःचे स्वप्न भरून रंगवलेलं, नटवलेलं घरकुल... एकदा भेट तू मावशीला ,सुखात आहे ती... एक स्त्री म्हणून जमल्यास समजून घे तिला." माझं कर्तव्य मी पार पाडलं... वेदू कधीही जाणार नाही हे माहीत असून.प्रत्येक स्त्रीच्या हृदयाच्या कप्प्यात तिनं चितारलेलं संसाराचं चित्र असतं... ते अधिक उण वाट्याला येतं पण त्यातही ती समाधान मानते .एखादी क्वचित अशीही असते जिला उतारवयात संसारसुख अवचित लाभत...आनंदी राहण्यावर प्रत्येकाचा हक्क आहे ना!👍
🔏© *यशश्री रहाळकर*
                  

बुधवार, ८ जानेवारी, २०२०

टोचणी

                 डॉ. वीणा वडगांवकर नेहमीच्या वेळेला बरोब्बर साडे नऊ ला त्यांच्या 'सुकृत' मॅटरनिटी होम ला हजर झाल्या. कॉफीच्या घोटांबरोबर सहज पेपर चाळत असतांना त्यांना सत्यभामा पाटील ह्यांच्या मृत्यूची श्रद्धांजली स्वरूपातील बातमी दिसली.काही क्षण हातापायांची ताकद एकदम गेलीये असं वाटून त्या स्तब्ध झाल्या. त्यांच्याकडे काम करणारी कुणीतरी मावशी सत्यभामा बाईंच्याच गावची होती... लगेच त्यांनी तिला बोलावून घेतले आणि विचारपूस केली.सत्यभामा पाटील बाईंनी शेतातल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे तिने सांगितले.आता ह्या उतारवयात, मुलांनातवंडांनी भरल्या घरात त्यांना काय दुःख असावे हे काही कुणाला उमजले नव्हते."आदल्याच सांजला त्या आपल्या हिथ आलत्या ना ओ बाई!" म्हणत मावशींनी आठवण करून दिली. डॉ. वीणा काहीसे सावरत म्हणाल्या, " त्या मुलीच्या तब्येतीबद्दल विचारायला आल्या होत्या... बरं जा तू कामाला आता" म्हणत त्यांनी मावशीला कामाला पिटाळले. डॉ. वीणाला भयंकर अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी ताबडतोब ड्रायव्हर ला गाडी काढायला सांगितले. त्यांची भाची डॉ स्नेहाने त्यांना लगेच तपासले, बीपी बरेच लो झाले होते. गोळी पुढे करत ती म्हणाली, "आत्या आता जरा आराम कर. फार दगदग करतेस, झेपत नाही तुला ." डॉ.वीणांनी वयाचीे साठी केव्हाच पार केली होती.थोडाथोडका नाही तर 37 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. डॉ. स्नेहा, त्यांच्या चुलत भावाची मुलगी... गेली 12 वर्षे त्यांचे हॉस्पिटल उत्तम सांभाळत होती.तरीही एखाद्या क्लिष्ट केससाठी त्या हॉस्पिटलला येत. त्यांचे आपल्या कामावर अतीशय प्रेम होते... त्यांच्या हाताला गुण असल्याने पंचक्रोशीतील लोक श्रद्धेने त्यांच्याकडे येत.वयपरत्वे हे आता त्यांना झेपेनासे झाले होते हे मात्र खरे.
                       त्या घरी पोहोचेपर्यंत स्नेहाने फोन करून तब्येत बिघडल्याचे ,डॉ. वीणांचे पती व्यंकटेश रावांच्या कानावर घातलेच होते. बँकेतून मोठ्या अधिकारपदावरून रिटायर्ड झालेले व्यंकटेशराव आपले निवृत्त जीवन शांतपणे आनंदाने जगत होते. त्या दोघांची एकुलती एक लेक पिहू सॉफ्टवेअर इंजिनियर असून अमेरिकेत लग्न करून सेटल झाली होती. तिच्या मनासारखा जॉब, मनासारखा जोडीदार आणि एक बच्चू यात तिला रमलेलं पाहिलं नी व्यंकटेश राव सुखावले. वीणा ही धडपड का करते?हॉस्पिटल चा व्याप सोडून तिने आता आराम करावा ,असे त्यांनाही वाटायचे. मात्र दर वेळी काहीतरी क्लिष्ट ,अडलेली पेशंट आली की डॉ. वीणा धावून जात.नंतर त्या ताणाने त्यांची स्वतःची तब्येत बिघडायची नि व्यंकटेश राव सेवा करायचे.. हे नेहमीचेच झाले होते.आता मात्र त्यांनी वीणाला चांगलेच धारेवर धरले, तिचा फोन काढून घेत सक्तीची विश्रांती घेण्याचे फर्मावले.नेहमी प्रसन्न असणाऱ्या डॉ. वीणा मलूल दिसत होत्या..अंगात किंचित कणकण देखील होती. घासभर भात खाऊन गोळी घेऊन त्या निजल्या. दुपारच्या चहाचे विचारावे म्हणून व्यंकटेश राव डोकावले तर ताप फारच वाढला होता . डॉ. वीणा डोक्यात ताप गेल्याने बडबडत होत्या,"आई मी नाही मारले त्याला ! सुकृत मी का मारेन तुला.. आई तू मला सोडून जाऊ नकोस ! सुकृत सोड आईला, आई माझीयेे ..सोड सोड!" वीणाची ही बडबड ऐकून व्यंकटेश राव चांगलेच घाबरून गेले...त्यांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये फोन केला... क्षणाधार्थ डॉक्टर ,नर्सेस, वॉर्डबॉय सारा ताफा घरात हजर झाला. त्यांच्या बेडरूमचे मिनी हॉस्पिटलमध्ये रूपांतर झाले.
                   डॉ.स्नेहा व्यंकटेश रावांशी बोलतांना म्हणाल्या,"आत्यानी काहीतरी ताण घेतलेला दिसतोय. मी उद्या आमच्या सायकायट्रीस्ट डॉ. जोशींना पाठवते... शरीरापेक्षा मनाचेच दुखणे अधिक वाटतेय मला...आता झोपेचे औषध दिलंय." रात्रभर दोन नर्सेस होत्या.सकाळी साधारण 10 वाजता डॉ. जोशी आले.त्यांचे तासाभराचे सेशन झाल्यावर ते व्यंकटेश रावांना म्हणाले ,"फारच ताण आलाय त्यांच्यावर ह्या वयात एव्हढा ताण योग्य नाही. बहुदा काही जुन्या जखमा पुन्हा दुखावल्या गेल्या आहेत.. Don't Worry! शोधू आपण. हळूहळू वाटेल बरं!" व्यंकटेश राव डॉक्टरांच्या बोलण्याने अधिकच काळजीत पडले.वीणाला नाश्ता घेऊन गेल्यावर त्यांनी विषय काढायचा प्रयत्न केला पण वीणा काहीच बोलायला तयार नव्हती. वीणाला तो विषय नकोसा होता.. जणू काही त्यापासून पळ काढत होती आणि मागून येऊन तोच विषय मानगुटीवर बसला होता. लेकीचा फोन आल्यावर त्या लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडल्या... "मला इथे राहायचं नाही घेऊन चल" म्हणाल्या.. मात्र आत्ता आजारपणाने हे शक्य नव्हते. एव्हढा लांबचा प्रवास झेपणार कसा? कशीबशी त्यांची समजूत घालून नर्सने त्यांना झोपवलं.व्यंकटेश राव मात्र मुळातून हादरले.. फारशी हळवी वगैरे नसणारी आपली खंबीर बायको अशी हरलेली, व्याकुळ त्यांनी कधी पहिलीच नव्हती. घरी तर सगळे सुरळीत होते... हॉस्पिटलमध्ये नेमकं काय झालं असावं? ह्याचा ते अंदाज बांधू लागले. हॉस्पिटलमध्ये फोन करून त्यांनी काही रेकॉर्डस् मागितले. गेल्या आठवड्यात डॉ. वीणा ह्यांनी हाताळलेल्या केसेस त्यांनी वाचल्या.
                आठच दिवसांपूर्वी त्यांच्या हॉस्पिटला emegency म्हणून दाखल झालेली एका केसने त्यांचे लक्ष वेधून घेतले. पिंपळस गावची एक बाळंतीण विचित्र अवस्थेत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली होती... तिच्या बाळाचे अवाढव्य डोके अडकले होते... तातडीने डॉ. वीणाला बोलावून बाळ बाळंतीण वेगळे करण्यात आले... मूल अनै

अबनॉर्मल वाटावे असे वाढले होते... पण दोघेही वाचले.त्या बाळाच्या मज्जारज्जू चा संपर्क देहाशी जवळपास नव्हताच...जन्मतः मूल मतिमंदच नाही तर लोळगोळा अपंग झालेले होते. फाईल बंद करून डोळे मिटताच व्यंकटेश रावांना डॉ वीणाची जखम ओली करणारा दुवा सापडला... 'सुकृत' .त्यांनी ताबडतोब अनेकांना फोन केले... आणि ह्या मतिमंद बाळाचे सगळे डिटेल्स गोळा केले. आता संपूर्ण तयारीनिशी ते वीणाच्या रूम मध्ये शिरले..नर्स ला बाहेर बसायला सांगून दार लावून घेतले. आपला स्वर सहज राखत वीणाला ते म्हणाले, "बरं वाटतंय का आता?" वीणा ने मान डोलावताच पुढे म्हणाले," तुला कसला ताण आलाय माहीत आहे मला. एकदाचं बोलून टाक .बरं वाटेलं बघ. असं ओझं घेऊन जगणार आहेस का? काय झालं त्या मतिमंद मुलांचं? तुला सुकृत आठवला का?" शिवलेले ओठ विलग करत वीणा रडू लागली,"सांगते मी. सांगावेच लागेल आता ही टोचणी मला सहन होत नाही. बरोबर होत्या सत्यभामा बाई.. कुणालातरी सांगितल्या शिवाय सुखाने मरताही येणार नाही." वीणाची निरवानीरवीची भाषा सहन न होऊन व्यंकटेश राव मायेनं तिच्या पाठीवर हात फिरवू लागले.
                     वीणा कित्येक वर्षांतले मनातले साचलेले बोलू लागली....व्यंकटेश राव स्थितप्रज्ञपणे ऐकत होते."माझ्या पाठीवर चार वर्षांनी सुकृतचा जन्म झाला.. सगळ्यांची भावंडे त्यांच्यासोबत खेळत.. मात्र माझा अर्धवट भाऊ घेऊन सतत आई बसलेली असते एव्हढंच कळायचं मला. राग राग येई त्याचा.हळूहळू मोठी होत गेले नि हा राग वाढत गेला... आईच लक्ष नसलं की सुकृतला चिमटे काढ,चापट्या मार असं करायचे. त्यातून एक विकृत आनंद मिळायचा मला. आईने संपूर्णपणे सुकृतला वाहून घेतलं... याच वेळी तिने मलाही जन्म दिलाय हे पार विसरली ती. पाच वर्षांनी बाबा ऑफिसमधील एका विधवा बाईंशी दुसरे लग्न करून वेगळे झाले.कदाचित आई फक्त सुकृतची आई उरली होती .. तिच्यातली बाईही संपली असावी. राहतं घर बाबांनी आम्हाला दिलं खर्चायाचे पैसे ,माझ्या शिक्षणाचे पैसे कश्यात कमी नव्हती...मी हुशार होते अभ्यासात, बाबांची खूप लाडकी होते. मात्र बाबा मला दुरावले ते याच सुकृतमुळे.. माझ्या वाढत्या वयाबरोबर माझा त्याच्यावरचा राग वाढत गेला.कित्येकदा त्याचा जीव घ्यावासा वाटे..." दात ओठ घट्ट आवळून बोलतांना किंचित धाप लागून वीणा थांबली. घोटभर पाणी नी दोन दीर्घ श्वास घेऊन पुन्हा बोलू लागली." हा असला मतिमंद भाऊ म्हणून मैत्रिणी नव्हत्याच फारश्या मी घुमीच होत गेले. दहावी झाल्यावर होस्टेलला राहून शिकण्याचा निर्णय घेतला... सुटका झाली माझी.गुणवत्तेवर पुढे पुढे जात राहिले. माझ्या छोट्याश्या पहिल्याच क्लिनिकच्या उद्घाटनाला  आई सुकृतचे नाव पाहून सुखावली. भावाची आठवण ठेवली म्हणाली. मात्र तटकतोडपणे तिला मी सांगितलं... पुन्हा एकही सुकृत जन्माला येता कामा नये ,ह्याची कायम आठवण रहावी म्हणून सुकृतचे नाव दिलेय.... बिचारी आई ढसाढसा रडली. पुढे 32 वर्षांचा झाल्यावर सुकृत गेला... खरंतर बरंच वाटलं मला... कल्पनेत कित्येकदा मारलं होतं मी त्याला. मात्र आई पोटातून विव्हळ झाली.. का ?ते कळले नाही. पुढे आपल्या घरी ती आली ते जबाबदारी म्हणूनच... मी तोडुनच वागले कायम... माझ्या लेकीत आपल्या पिहूत ती मला शोधायची . शेवटपर्यंत इथेच होती... मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन काही बाही शिकवायची.... वय झालं ,शांतपणे झोपेत गेली."
                  "मी माझा शब्द पाळला व्यंकटेश..माझ्या हॉस्पिटलमध्ये  एकही सुकृत जन्मता कामा नये... माझ्या प्रत्येक पेशंटला मी अनेक तपासण्या करायला लावायचे ,सदोष गर्भ काढुन टाकायला सांगायचे.आता विज्ञान खूप पुढे गेलंय.. खूप तपासण्या आहेत गर्भातच बाळाचा iq सुद्धा कळतो, मेंदूची,हाडांची ,ह्रदयाची वाढदेखील  कळते. अगदी गर्भ असतांनाच बाळाच्या शस्त्रक्रिया देखील होतात... मात्र आपले मूर्ख लोक यांना सगळ्या तपासण्या केवळ गर्भाचे लिंग निश्चित करणाऱ्या हव्या असतात... स्त्रीचे भ्रूण काढून टाकायला लाखो रुपये खर्च करतील ... पण आवश्यक तपासण्या मात्र टाळतील... बिंडोक बावळट लोक. गेल्या आठवड्यात पिंपळसच्या देशमुखांची सून emergency केस म्हणून दाखल झाली होती. बाळाचे डोके मोठे असल्याने फसलं होतं... इतर डॉक्टरांनी केस घेण्यास नकारच दिला असावा... बाई मरणाच्या दारात होती.तिची आई सत्यभामा बाई पाटील ने पदर पसरला पोरीला वाचवा म्हणून टाहो फोडला... मीही लेकीची आई म्हणून आपल्या पिहुची शपथ घातली अखेर प्रयत्न करते म्हणून आम्ही कामाला लागलो... आई आणि बाळ दोघेही वाचले... बाळ विचित्र abnormal होतंच... मला सुकृत आठवला...😢 ह्या देशमुख बाईला पहिली मुलगी साधारण 10 वर्षांची होती... नंतर चार पाच वेळा मुलीचा गर्भ कुठेतरी पाडून आली होती... यावेळी मुलगाच होणार हे कळलंच असावं... कुठल्याश्या रानटी दवाखान्यात गर्भजल परीक्षा करतांना बाळाच्या मज्जारज्जूला धक्का बसला होता... मूल पाहताच काय ते कळावे असेच होते... दुसऱ्या दिवशी सासू आणि नवरा जे पाहून गेले ते फिरकलेच नाहीत.मात्र बाळ गुटगुटीत होते... हे बाळ मतिमंद तर आहेच पण साधे उभेही राहणार नाही ह्याची कल्पना सत्यभामा बाईंना बोलावून मी स्पष्टपणे दिली.सुश्रुतच्या सगळ्या नकोश्या आठवणी पुन्हा यायच्या नि मन विव्हळ व्हायचे... त्या बाईच्या 10 वर्षांच्या मुलीच्या जागी मी स्वतःलाच पहायचे.....चौथ्या दिवशी सकाळी ते बाळ अचानकपणे मृत झाल्याचे आढळले.बरेच झाले अजून एक वीणा वाचली.. एका बाईचा संसार वाचला बरं वाटलं मला.. त्या बाळाची आई मात्र अखंड रडत होती.
                  चार दिवसांनी एका संध्याकाळी सत्यभामा पाटील बाई आल्या... मी योगायोगाने तिथेच असावी... बाळ गेलेल्या लेकीचे दूध थांबत नव्हते म्हणून गोळ्या घ्यायला आल्या होत्या. थोडं बोलू का? म्हणून बसल्या... त्यांनी जे सांगितलं ते भयंकर होतं. त्या रात्री त्यांनीच गळा दाबून आपल्या मतिमंद नातवाचा जीव घेतला होता.. हेच माझ्या आजीने का नाही केलं? तेव्हाही हाच विकृत विचार चमकून गेला मनांत. मी समजुतीच्या सुरात झालं गेलं विसरून जायला सांगितलं.. मुलीचं फार वय नाही होतील तिला मुलं ,असाही धीर दिला. सत्यभामा बाई आपल्या हातून हेतुपुरस्सर घडलेल्या या गुन्ह्यामुळे कोसळल्या होत्या,"डाकट्रीन बाई आठ पोरं नि 12 नातवंड हायेती मला... आजवर जीव जलमाला घालन ठाऊक हुंत.... आज.. आज जीव घेतला.. कर्मा माझ्या कर्मा... देवाच्या दारी कशी जाऊ म्या??"म्हणत त्या रडू लागल्या. काही वेळाने शांत झाल्यावर माझे आभार मानले.. मन हलकं झाल्याचं म्हणाल्या. मनाची टोचणी कुणाला सांगितली नाही तर सुखाने मरताही येणार नाही म्हणाल्या. दुसऱ्याच दिवशी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली." डॉ वीणा रडत होत्या अखंड रडत होत्या... आपले मन शांत करीत व्यंकटेश रावांचा हात हाती घेत त्या म्हणाल्या," बरोबर होते व्यंकट त्यांचे... ....मी ... मी अनुभवलंय. म्हणूनच सगळं सांगायचं ठरवलं मी खरं खरं! गेले कित्येक दिवस सत्यभामा बाई त्यांचा तो नातू आणि त्याची ती हमसून रडणारी आई मला दिसत राहते... मी काय करू?? मी काय करू?आता ही टोचणी नाही सहन होत .. मला माहित होतं त्या बाळाचा मृत्यू अनैसर्गिक आहे.. बाळ गेल्याचे death  certificate देण्यापूर्वी सहज तपासावे म्हणून गुंडाळलेले दुपटे सोडून पाहिले तर मानेवर चार बोटे होती... गुन्हा झाला हे माहीत असून मी लपवून ठेवले...मी सुद्धा एकप्रकारे त्यात सामील झाले... त्या रात्रीपासून शांत झोप नाही... कश्यात लक्ष लागत नाही... असं वाटतं मी सुकृतला मारलंय आणि आई माझ्याकडे जळजळीत डोळ्यांनी पाहातेय." .... दीर्घ श्वास घेऊन व्यंकटेश रावांनी वीणाला शांत व्हायला सांगितले... त्यांच्या कुशीत एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्या शांतपणे झोपल्या. सकाळी नर्सने बीपी घ्यावे म्हणून पाहिले तर डॉ. वीणा गेल्या होत्या... कायमच्या. व्यंकटेश रावांच्या कानात त्यांचे शब्द घोंगावत होते.." मनाला टोचणी लागली तर सुखाने मरताही येत नाही." 
🔏© यशश्री रहाळकर