साधेसोपे आयुष्य जगतांना अनेक आगळे अनुभव येतात .... त्यांना फुलपाखरासारखं हातात घट्ट धरून ठेवता येत नाही मुक्तपणे बागडू द्याव लागतं ... मात्र काही जाणीवा शब्दांत बांधून ठेवता येतात ... त्या लेख , कविता , कथा या माध्यमातून व्यक्त करता येतात ... अशाच काही ' तिच्या ' जगण्याच्या परीघातील कुंपणाआड दडलेल्या गोष्टी अन ते कुंपण ओलांडून अवकाशात झेपावणाऱ्या भरारी... माझ्या शब्दांत ... तिच्या आणि तिच्या पाठीशी असणाऱ्या त्याच्याही साठी
फॉलोअर
बुधवार, १६ डिसेंबर, २०२०
नावात काय आहे??
मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०
"पुरुषस्पंदन" कथा ९ :- जवळीक
शनिवार, १२ डिसेंबर, २०२०
पुरुषस्पंदन कथा ८:- एकांडा
बुधवार, २ डिसेंबर, २०२०
"पुरुषस्पंदन" कथा ७:- अगतिक
रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०
"पुरुषस्पंदन" कथा ६ :- अनाहूत
स्पृहा आणि सौमित्र गेली सात आठ वर्षे एकमेकांचे परिचित.. त्याहीपुढे जाऊन सांगायचे झाले तर गेली सहा वर्षे दोघेही सिरीयस रिलेशनशिपमध्ये होते. हल्ली ह्या just chill, time pass किंवा move on प्रकारच्या casual relationship असतांना ... स्पृहा आणि सौमित्र मात्र त्यांच्या नात्याबद्दल खूपच गंभीर होते. एका पार्टीत "कॉमन फ्रेंड" च्या माध्यमातून पहिल्यांदा भेटलेले दोघे हळूहळू एकमेकांचे चांगले मित्र झाले नि वर्षभरात एकमेकांच्या प्रेमात पडले.. खरेतर दोघांचे स्वभाव टोकाचे भिन्न..स्पृहा प्रॅक्टिकल, सडेतोड , रॅशनल... थोडीशी फटकळ. तर सौमित्र हळवा, इमोशनल, जरा बुजरा आणि शक्यतो कुणाला न दुखावणारा भिडस्त.... कसं कोण जाणे पण दोघांचं जमलं.उंच, सडपातळ सावळीशी स्पृहा फार सुंदर नसली तरी कमालीची आकर्षक होती.. सौमित्र तुलनेनं गोरापान आणि देखणा.. जरासे सुखवस्तूपणाचे मूठभर मास चढलेला होता... C.A.पूर्ण झाल्यावर जरा जम बसेपर्यंत सौमित्रने वेळ घेतला... आणि लगेच स्पृहाला प्रपोज केलं... डान्स स्पेशल घेऊन M.A. झालेली स्पृहा जरासे वेगळे करियर निवडलेली स्वतंत्र मुलगी होती... सौमित्रने लग्नाचा विषय काढताच तिने वेळ मागून घेतला. तिचे भरतनाट्यमचे कार्यक्रम, देश विदेशातले दौरे ह्यासाठी तिला आवश्यक स्वातंत्र्य गरजेचं होतं.. जरा घाईघाईने सौमित्रने त्यांच्या दोघांच्या घरच्यांची भेट घालून देण्याचं ठरवलं.
स्पृहा तिच्या आईवडिलांची एकुलती एक लाकडाची लेक... एव्हढेच नव्हे तिचे आईवडील सुद्धा एकुलते एक अपत्य.. त्यामुळे मावशी, काका, आत्या असे नातेवाईक नाहीत.. लहानसे कुटुंब.. घरी दोन आज्या आणि हे तिघे.... मॉडर्न विचारांचं टिपिकल उच्च मध्यमवर्गीय घर. सौमित्रच्या घरचे लोक मात्र ह्याच्या अगदीच दुप्पट. सौमित्रला दोन मोठे काका. काका आणि त्याचे वडील अश्या तिघांनी मिळून एका मोठ्या प्लॉटवर तीन मजली बंगला बांधलेला... म्हणायला वेगळे पण दिसायला एकत्र. मोठ्या काका-काकीला मुलबाळ नसल्याने सौमित्रवर त्या दोघांचा विलक्षण जीव...सौमित्रची आई बँकेत नोकरीला असल्याने त्याला मोठ्या काकूनेच सांभाळलं. दुसऱ्या काकालाही दोन मुलीच.. त्याही त्यांच्या सासरी सुखाने नांदत होत्या. सौमित्र त्यांचा लाडका भाऊ. झालंच तर दोन आत्या, शेतीवाडी, येणारा जाणारा ह्यांचा घरात सतत राबता असायचा. घरचे प्रचंड गडगंज.. पण तितकेच कर्मठ रीतीभाती जपणारे. सौमित्रची आई सातारकडची... तिकडे मोठा जमीन जुमला, साखर कारखाना... 80 च्या आसपास वय असणारे आईवडील पण कर्ते सगळीकडे वचक असणारे. सौमित्रला एकूण चार मामा... त्याची आई सगळ्यांत धाकटी आणि तितकीच लाडकी... त्यामुळे सगळ्या बाजूंनी सौमित्र लाडका होता... त्याच्या लग्नाची मोठी स्वप्ने सगळे पाहत होते... त्याचे त्यांनी जमवल्याचे कळताच जरासे नाराज झाले पण "होऊ दे त्याच्या मनासारखं!" म्हणत उत्साहाने तयारीला लागले. पहिल्यांदा पहायला म्हणून आले तर सौमित्रकडचे 30 लोक... स्पृहाची आई बावरून गेली. एकदम एव्हढी माणसं.. बापरे!
साधीशी साडी नेसून आलेली, फार चमचमीत मेकअप न केलेली... मोकळं बोलणारी स्पृहा सगळ्यांना पाहताक्षणीच आवडली.थोड्या ओळखी वगैरे उरकल्यावर थेट विषयाला हात घालत मोठे मामा म्हणाले,
"हल्ली पोरं आपापसांत जमवतात.. आपण काय आनंदाने स्वीकारायचं... थाटात बार उडवून देऊ काय म्हणता?"
स्पृहाच्या आईला सौमित्र आवडला होता मात्र ह्या इतक्या लोकांमध्ये आपल्या लेकीने जाणं आणि तिचं तिथे निभण म्हणजे अवघड वाटत होतं... त्यांनी आढेवेढे न घेता स्पष्टच आपली बाजू मांडली..
"आमच्याकडे फार माणसे नाहीत एव्हढ्या माणसांमध्ये रहायची, निगुतीने करायची माझ्या लेकीवर वेळच आली नाही... तशी तिला कामे सगळी येतात पण आजवर जबाबदारी कधी पडली नाही."
"आम्ही कश्याला आहोत मग? लेकीसारखं सांभाळून घेऊ.."
सौमित्रची आई प्रेमाने म्हणाली.
स्पृहाने आपले करियर, डान्सचे कार्यक्रम ह्याबद्दल स्पष्टपणे सांगून टाकले...त्यावर मोठ्या काकी अगदी मायेनं म्हणाल्या..
"तुझ्या सासूचं सगळं करीयर लग्नानंतरचे बरं! तिने बँकेच्या परीक्षा दिल्या पुढे पुढे जात राहिली.. आम्ही कुणी कधी आडकाठी केली नाही... तुझं काम म्हणजे तुझी नृत्यसाधना.. जरा वेगळं आहे मान्य पण कुणी अडवणार नाही कधीच तुला..."
"प्रत्येकाला स्वतःची प्रगती करायचा हक्क आहेच की.."
सौमित्रची बाबा म्हणाले.
स्पृहासाठी हेच ठिकाण अगदी योग्य आहे ह्या मतावर स्पृहाचे बाबा आले आणि लग्न ठरले. फार काही अपेक्षाच नव्हत्या कुणाच्या... पण एकंदर सौमित्रचे कुटुंब आणि भरपूर माणसे पाहता मुलीकडच्यांना सोय करणे सोपे नव्हते म्हणून त्यांच्या गावी पारंपारीक पद्धतीने लग्नसोहळा करण्याचे ठरले. खर्चाचा वाटा स्पृहाच्या वडिलांनी स्वेच्छेने द्यावा ..; मात्र सगळ्यांचे मानपान त्यांनी करावे हेही निश्चित झाले. स्पृहा त्यांचीही एकुलती एक लेक त्यामुळे त्यांनी साखरपुडा थाटामाटात आपल्याकडे करायचा प्रस्ताव मांडला... उभयपक्षी तो मान्य झाला आणि तारीख सुद्धा ठरली.
स्पृहाच्या वडिलांनी ग्रँड रॉयल हॉटेल बुक केले ... आपली मोजकी जवळची माणसे त्यांनी आमंत्रित केली. आपल्या एकुलत्या एक लेकीसाठी त्यांनीही काही स्वप्ने पाहिली होती... सौमित्र आणि स्पृहाने अगदी थोडक्यात रिंग सेरेमनी करायचं ठरवलं.... सौमित्रच्या घरच्यांनी देखील साखरपुडा त्यांच्या पद्धतीने होऊ देत म्हणून तयारी दर्शवली.... लग्न विधीवत होणार होतेच. स्पृहाला waterfall बॅकग्राऊंडला हवा होता त्याप्रमाणे स्टेज design झाला.. तिने फिश कट वन पीस ... सियांन रंगांच्या रंगछटा वापरून खास बनवून घेतला... त्यावर मोजके नाजूक डायमंडचे दागिने... तिने अंगठीही निलमची निवडली होती. सौमित्र देखील गडद निळा सूट घालणार होता... आधुनिक प्रथेप्रमाणे दोघांनी एकमेकांना अंगठ्या घालायच्या.. मग त्यांच्यावर फुलांची बरसात आणि खास थीम केक... समुद्र आणि शंख शिंपल्यांचा... सगळी ऑर्डर नक्की झाली... साखरपुड्यासाठी खास मेकअप आर्टिस्ट बोलावून स्पृहा तयार होत होती... एव्हढ्यात सौमित्रच्या आजोळचे सगळे लोक दाखल झाले.. सावळी मुलगी बघून सौमित्रच्या मामींनी नाके मुरडली...सौमित्रची आजी येतांना नातसुनेसाठी महागडी पैठणी आणि चांगले ठसठशीत दागिने घेऊन आली होती... तिने आपल्या लेकीची चांगली खरडपट्टी काढली..
"ते लाख म्हणतील ग ! तुला कळत नाही का? असे झगे घालून का साखरपुडा होतो... नव्या सुनेचे पाय धुवावे ओटी भरावी ... हे काय ? आपल्याच धर्माचीच आहे ना पोर?? तिला म्हणा तिचे तिच्या घरी ठेव"
आजीचा सूर चांगलाच चढला ... भराभर सगळे स्वरूप पालटले... चौरंग मांडण्यात आला आणि स्पृहाला साडी नेसून येण्याचे फर्मान निघाले... स्पृहाचा चांगलाच हिरमोड झाला.. तिचा उतरलेला चेहरा पाहून आई म्हणाली..
"बघ ! म्हणून तुला म्हणत होते एव्हढी माणसं म्हणजे प्रत्येकाशी जमवून घ्यावे लागेल... माझं पटतं का काही तुम्हा बाप लेकीला?"
स्पृहा हट्टाने तशीच उदास बसून होती.. शेवटी सौमित्र येऊन गयावया करू लागला...
"थोडा वेळ साडी नेस स्पृहा ... please माझ्यासाठी...💝आजीचे किती दिवस राहिलेत.. तिच्याही मनाने होऊ दे... फक्त थोडा वेळ... नंतर लगेच आपण रिंग सेरेमनी करूयात..."
कशीबशी स्पृहा तयार झाली... विधीवत साखरपुडा झाला... तिला पुन्हा साडी बदलून पैठणी नेसून येण्यास सांगितले... ह्या सगळ्या सगळ्या घडामोडीत बराच उशीर झाला... सगळ्यांना जोडीने नमस्कार मग प्रत्येकासोबत फोटो ह्या वेळात सगळे आमंत्रित जेवून परतले सुद्धा... स्पृहाला तिचा वन पीस घालायला सवडच मिळाली नाही तसेच पैठणीवर दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. रिंग सेरेमनी चा विधीवत वाङ्निश्चय झाला... आजीबाई खुश झाल्या... पण स्पृहा मनांतून चांगलीच दुखावली गेली असणार... हे तिला चांगलेच ओळखणाऱ्या सौमित्रच्या नजरेतून सुटले नाही... एकाही फोटोत तिने साधी smile सुद्धा दिली नाही... केवळ उपचार म्हणून तिने सगळे उरकले. रात्री घरी परतल्यावर त्याने स्पृहाला सविस्तरपणे माफी मागणारा मेसेज केला... तिने त्याच्या शब्दाचा मान राखून साडी नेसली ह्याबद्दल देखील तिचे कौतुक केले... वेळेला ती त्याला आयुष्यभर साथ देईल ही खात्री असल्याने तो स्पृहाच्या अधिकच प्रेमात पडला असल्याचेही त्याने text केले... आता ती काही दिवस तरी रुसून बसणार, ह्याची त्याला खात्रीच होती. सौमित्रने तिला शांत व्हायला थोडा वेळ देण्याचं ठरवलं.
लग्न दोन महिन्यांवर येऊन ठेपलं होत... पुन्हा प्रवासाची दगदग नको म्हणून आजी बाईंनी सौमित्रकडेच तळ ठोकला होता.... शिवाय जातीने सगळ्या बारीकसारीक गोष्टींत लक्ष घालून त्या ती अगदी नीटनेटकी करणार होत्या. लहान मोठ्या गोष्टी लगेच स्टेटस वर अपडेट करणाऱ्या स्पृहाने आठ दिवस झाले तरी सोशल मीडियावर आपल्या एंगेजमेंटचे अपडेट केलेलेच नव्हते.. सौमित्रनेच मग fb वर त्यांचा अंगठ्या घालतांनाचा फोटो शेअर केला आणि स्पृहाला टॅग केलं. थोड्याच वेळात स्पृहाने तो टॅग remove केलेला त्याला दिसला... तो मनातून खूप दुखावला पण स्पृहाची नाराजी त्याला कळत होती. हल्ली तिने त्याचे फोन घेणे सुद्धा कमी केले होते... स्वतःहून फोन करणे तर तिनेच केव्हाच बंद केले होते... जेव्हढ्यास तेव्हढं कामापुरतंच ती बोलायची. सौमित्रने अनेकदा तिला फिरायला जाण्याविषयी किंवा डिनरला जाण्याविषयी विचारले पण ती वेळ नसल्याची सबब पुढे करायची..... दागिन्यांच्या खरेदीच्या वेळी स्पृहाला फोन केला असता ..
"मला काय कळतंय त्यातलं? तुम्हीच आवडीप्रमाणे घ्या."
असे उत्तर तिने दिले. कपडा खरेदीच्या वेळेलाही वेळ नाही ही सबब पुढे केली. दोघांचं काहीतरी नक्कीच बिनसलं आहे हे फक्त सौमित्रच्या मोठ्या काकींच्या लक्षात आलं... बाकी सगळे लग्नाच्या गडबडीत व्यस्त होते. स्पृहाच्या नृत्यसाधना अकॅडमीचा कार्यक्रम एका आंतरराष्ट्रीय महोत्सवात बँगकॉकला ठरला आणि ती त्या धावपळीत व्यस्त झाली... जाण्यापूर्वी भेटीला म्हणून आलेल्या स्पृहाला आजी म्हणाल्या..
"काय नाच गाणं बाकी असेल ते करून घ्या... मग आयुष्यभर आमच्या सौमित्रच्या तालावर नाचायचं आहे."
स्पृहा काहीही उलट न बोलता... शांतपणे घरी परतली. खरेतर लग्न अगदी तोंडावर आले असतांना.. हा कार्यक्रम तिने टाळावा असे सौमित्रच्या घरच्या मंडळींचे मत होते.. पण तिने परवानगी मागितली कुठे होती?ती थायलंडला रवाना झाली आणि नंतर तिने सौमित्रशी असणारा उरला सुरला संपर्कही तोडून टाकला... तो वेड्यापीश्यागत सैरभैर झाला... तो सतत तिला कॉल करायचा आणि ती शांतपणे त्याचा कॉल कट करायची... व्हाट्स अँप वर त्याने मेसेजेसचा रतीब घातला पण तिने उत्तर दिलेच नाही. एके दिवशी सकाळी तिने त्याचा नंबर ब्लॉक केला आणि त्याचा बांध फुटला.. आपल्या काकींच्या मांडीवर डोके ठेवून एखाद्या लहान मुलाप्रमाणे तो रडू लागला.. काकीने त्याला समजावले .. की त्या बोलतील स्पृहाशी ,समजावतील तिला...
"काय रे तुम्ही ही हल्लीची मुले !"
म्हणत त्यांनीही कॉल करण्याचा प्रयत्न केला पण स्पृहाने उत्तर दिले नाही.. फक्त एक मेसेज पाठविला
"परत आल्यावर सविस्तर बोलूया!"
सहा दिवसांसाठी गेलेली स्पृहा परतली नाही उलट तिथूनच ती बालीला फिरायला निघून गेली. हेही सौमित्रला त्यांच्या एका कॉमन फ्रेंड कडून कळले... ती बालीला गेल्याचे आणि तिथे एन्जॉय करत असतांनाचे ढीगभर फोटोज् तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हा काय प्रकार आहे? हे त्याला कळेना.. कारण लग्नानंतर आठ दिवसांनी दोघांनी बालीला हनिमूनला जाण्याचा प्लॅन केला होता त्यानुसार सगळे बुकिंग वगैरे करूनही झाले होते. स्पृहाला समुद्र खूप आवडायचा म्हणून त्या दोघांनी मिळून हे ठिकाण नक्की केलं होतं.स्पृहा आपल्याला टाळतेय का? सौमित्रला काही सुचनासं झालं... सगळीकडे वाटलेल्या लग्नपत्रिका, तिच्यासोबत पाहिलेली आयुष्याची स्वप्ने, तिच्या आवडी , दोघांच्या गप्पा सारं सारं त्याला खूप हवंहवंसं वाटत होतं... स्पृहाच्या मनात काय आहे हे तिनं घडाघडा बोलून टाकावं , आपण माफी मागू हवं तर आणि सगळं सुरळीत व्हावं एव्हढंच त्याला वाटत होतं. पाच सहा दिवसांनी स्पृहा परत आली.. हेही त्याला कळवण्याचे कष्ट तिने घेतले नाही... लग्न आठ दिवसांवर आलं.. व्याही भोजनाचं आमंत्रण करायला मोठे काका-काकी निघाले...
"आज काय ते स्पष्टच बोलतो.."
असे मनाशी ठरवून सौमित्र देखील त्यांच्याबरोबर निघाला.
स्पृहाच्या घरी अगदी शांतता होती आठ दिवसांवर लग्न आले असल्याची, लग्नघरातील धावपळ गडबड काहीच दिसत नव्हते... स्पृहा अगदी शांतपणे बाहेर येत टोकाच्या कोरड्या आवाजात म्हणाली..
"मला नाही वाटत हे लग्न करून मी सुखी होईन... "
तिने पैठणी, दागिने आणि साखरपुड्याची अंगठी परत केली.. काका मटकन खालीच बसले...
स्पृहाच्या बाबांकडे पाहत म्हणाले ...
"अहो काय समजायचं काय आम्ही? आठ दिवसांवर लग्न आलंय.. सगळीकडे पत्रिका वाटल्या गेल्या आहेत..."
त्यांना शांत राहण्याची खूण करत काकी समजावण्याचा सुरात म्हणाल्या..
" स्पृहा बेटा! अशी घाईने निर्णय घेऊ नकोस. सौमित्रच खूप प्रेम आहे तुझ्यावर.. त्या दिवशी तुला जबरदस्तीनं ही पैठणी नेसावी लागली... आमचं चुकलं .. हवं तर मी माफी मागते... आपण बोलूया शांततेनं..."
तटकतोड पणानं स्पृहा म्हणाली...
"प्रेम माझंही होतच ना! पण म्हणून मी त्याच्यावर काहीही लादलं नाही. त्या दिवशी सौमित्रने माझी बाजू घ्यायला हवी होती.. प्रश्न पैठणी किंवा वन पीस हा नव्हताच प्रश्न होता साथ देण्याचा..."
सगळे मूग गिळून गप्प बसले होते.. एखाद्या तोफेतून आगीचे लोळ बाहेर पडावेत तशी स्पृहा बोलत सुटली..
"आजीचे म्हणाल ना तर मलाही दोन्ही आजी आहेत .. आणि मी त्यांचं मन जपते योग्य वेळी.. पण म्हणून माझ्या जोडीदाराने ते जपत का बसावे?? त्या दिवशी आजीचे मन मोडायला नको म्हणून सौमित्रने मला ऍडजेस्टमेंट करायला सांगितली.. उद्या अजून कुणासाठी , पर्वा अजून कुणासाठी... मला हे शक्य नाही..
मी पूर्वीच त्याला सांगितलं होतं .. अगदी स्पष्टपणे."
एव्हाना सौमित्रचे डोके भणाणू लागले होते... आवाज वाढवत तार सप्तकात तो ओरडला..
"इतके दिवस तुला हेच समजवून सांगायचं प्रयत्न करतोय ना! पण तुला बोलायचं नाहीच आहे... तुझी इतके वेळा मी माफी मागितली... तू म्हणशील ती शिक्षा मला मान्य आहे त्यासाठी..."
"माझ्याशी आवाज चढवून बोलायचं नाही सौमित्र ! मी तुझी बायको झालेली नाही... आणि खरं सांगायचं तर मला व्हायचंही नाही... तुझ्याशिवाय मी कशी जगू शकेन ? असा मूर्ख प्रश्न मला पडला होता.. तोच सोडवायला मी मस्त एकटी फिरून आले... तुझा फोन नको, मेसेज नको आणि आठवणही नको...
And see... मी खूप मज्जेत ...आनंदात आहे."
काका-काकींनी तिच्या आईबाबांशी बोलून ह्यावर तोडगा काढायचा प्रयत्न केला... त्यांनी स्पृहाला समजावून सांगावे असेही त्यांनी सुचवले... तास दोन तासांच्या चर्चेनंतर स्पृहा ठामपणे म्हणाली..
"मला नाही वाटत आता काही बोलायचं उरलं आहे.. माझ्याकडून हे लग्न मोडलं..."
आणि ती तरातरा आतल्या खोलीत निघून गेली.नाईलाजाने काका-काकी आणि सौमित्र जायला निघाले.. स्पृहाच्या आईने ,"पैठणी दागिने आणि अंगठी वगैरे नीट पाहून घ्या नंतर वाद नको " असे सुचवले.काकीने जड मनाने ते उचलले.. सगळे घरी आले.. नेमकं काय झालं कुणाला कळेना.. पैठणी आजीसमोर भिरकावत सौमित्र म्हणाला..
"झालं तुम्हा सगळ्यांच समाधान... माझं लग्न मोडलं आहे... पैठणी नेसवताहेत.. नेसवा अजून नेसवा ..."
म्हणत वाट्टेल तसं बडबडत तो त्याच्या खोलीत निघून गेला.पुन्हा घरी तोच विषय सगळे संतापले होते.. मामा तर म्हणालेही .....
"त्या पोरीला काय सोनं लागलंय का तिच्याहून सरस मुलगी मिळेल सौमित्रला.."
सौमित्रची काकी मात्र मनातून हादरली होती... सौमित्र ह्या मुलीत खूपच गुंतला असल्याचं तिला पुरतं माहीत होतं.. सकाळपर्यंत सौमित्रने खोलीचे दार उघडले नाही... सगळ्यांचीच मनःस्थिती बरी नव्हतीच.. शेवटी जेवायच्या वेळेला बोलवायला म्हणून गेलेल्या काकी घाबरत म्हणाल्या..
"तो दार उघडत नाहीये.. दार तोडा मला वेगळीच भीती वाटतेय..."
त्यांची भीती खरी होती.. दार तोडल्यावर सौमित्र अर्धमेल्या अवस्थेत सापडला.. खोलीभर त्याने त्याचे आणि स्पृहाचे फोटो पसरून ठेवले होते... स्पृहाशिवाय जगणेच मान्य नसल्याचेही त्याने चिठ्ठीत नमूद केले होते.. झोपेच्या गोळ्यांची अख्खी बाटली रिचवल्याने त्याचा मेंदू बधिर झाला होता.. हॉस्पिटलच्या ICU मध्ये त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न डॉक्टर करत होते...तोंडात मारल्यागत आजी देवापुढे हात जोडून बसली होती...नेमकं कुणाचं चुकलं होतं माहीत नाही? पण अनाहूतपणे आलेल्या ह्या वादळाने सारं घर उध्वस्त झालं होतं.
✒️ यशश्री रहाळकर
शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०
"पुरुषस्पंदन" कथा ५ :- विदीर्ण
गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०
"पुरुषस्पंदन" कथा ४ :- काटेरी फुलांच्या वाटा
"पुरुषस्पंदन" कथा३ :- आकर्षण
"सोळावं वरीस धोक्याचं ग!" ही प्रसिद्ध मराठी लावणी षोडश वर्षातल्या निसरड्या वाटांवर सहज भाष्य करते. नुकत्याच तारुण्यात प्रवेश केलेल्या नवतरुणीला हे वेडं वय मोहात पाडतं .. भलतीच चूक नकळत घडू शकते... म्हणूनच हे वर्ष धोक्याचं सूचक. हेच गाणं एखाद्याच्या लग्नाला सोळा वर्षे होऊन गेली आहेत तर लागू होऊ शकेल काय?? आता तुम्ही म्हणाल पुरुष जात्याचं अनेक स्त्रियांमध्ये रस घेणारा असतो... त्यात प्रौढ वयात एखादीचे आकर्षण वाटले तर नवल ते काय? मात्र ह्या कथेत हेच तर अचंबित करणारं वेगळेपण आहे... लग्नाच्या सोळा वर्षांनी स्वतःचा सुखी संसार लाथाडून निघून गेलेल्या एका मध्यमवयीन स्त्रीची ही कथा. वयस्कर माणसे बोलताना, "कलियुगाचा महिमा बाबा! काय दाखवेल सांगता यायचं नाही." असं सतत म्हणतात .. त्याचा अश्या प्रसंगी प्रत्यय आल्याविना राहत नाही.
रुपाली नाव 100% शोभून दिसेल इतकी देखणी. रंग केतकी मधाच्या रंगाचे डोळे, इवलीशी नाजूक चण आणि सोनेरी लांब केस... देवानी भरपूर वेळ घेऊन घडवले असावे असं आरस्पानी रूप. मात्र हे माप पदरात घेता घेता आर्थिक बाजूचे गणित नशीबाने हुकलेले. वडील जेमतेम कमवत त्यातही कंपनी बंद पडली आणि नोकरी गेली. चार घरी पोळ्या करून आईने तिला वाढवलं. ग्रॅज्युवेट होताच मिळेल ती नोकरी धरली... पाठ मान मोडून खर्डेघाशी करावी लागे.. सगळीकडे रूपाची जादू चालत नाही. ... पण कधीतरी नशीब भरभरून कृपा करतं. तिची आई पोळ्या करायला जायची त्यांचीच मैत्रीण रूपाच्या लग्नासाठी विचारपूस करू लागली. जहागिरदारांच्या गडगंज श्रीमंत एकुलत्या एक मुलासाठी त्यांनी रुपालीला मागणी घातली. पैश्याला मुळीच कमी नव्हती, मुलगा श्रीकांत जहागीरदार गोरापान देखणा होता.. आपला वडिलोपार्जितील केटरिंग, मंगल कार्यालय वगैरे व्यवसायांचा व्याप तो उत्तम सांभाळत होता. तीन मजली प्रशस्त घरात फार माणसेही नाहीत.. फक्त आई आणि तो. बहीणींची योग्य वयात सुस्थळी रवानगी झाली होती. नाही म्हणायला एक उणीव होती.. श्रीकांत जेमतेम मॅट्रिक पास होता ... त्याचे वडील गेल्यानंतर व्यवसायाचा व्याप सांभाळून शिक्षण पूर्ण करणे त्याला जमलेच नव्हते.. एव्हढ्या एकाच कारणामुळे ...अनेक उपवर मुलींनी नन्नाचा पाढा वाचला होता. शिवाय व्यवसायाचा व्याप असल्याने घरी राहून सगळे नीट सांभाळणारी मुलगी त्याला हवी होती. रुपालीच्या घरच्या मंडळींपुढे त्याने स्पष्ट शब्दांत आपले मत मांडले. लग्नाचा खर्च तो स्वतः करणार होता शिवाय मुलीच्या आईवडिलांचा आधार देईन हेही त्याने खात्रीपूर्वक सांगितले.... रुपालीच्या मनात काय होते कोण जाणे? मात्र प्राप्त परिस्थिती पाहता तिने होकार दिला.
मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला.... रुपालीची "सौ. राजश्री श्रीकांत जहागीरदार" झाली. आपण दिलेल्या शब्दाला जागून श्रीकांतने तिसऱ्या मजल्यावरील दोन खोल्यांचे घर रुपालीच्या आईवडिलांना सन्मानाने दिले... जशी आपली आई तसेच पत्नीचेही आईवडील आपलेच हे सूत्र श्रीकांतने मनापासून जपलं... त्यांच्या अडल्या नडल्या वेळी मदत केली, वडिलांना ओळखीने काम मिळवून दिले. रुपाली आता खऱ्या अर्थाने "राजश्री" झाली होती... भारीच्या साड्या, दागदागिने ह्यांची बरसात तिच्यावर होत होती. सासू नणंदा ह्यांची तर ती प्रचंड लाडकी होती.तिच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक होई अगदी रांगोळी काढण्यापासून ते स्वयंपाकपर्यंत. त्रयस्थाने पाहता क्षणी दृष्ट लागावी असा सुखाचा संसार सुरू होता. वर्षभरात पहिली लेक "ऐश्वर्या" जन्मली... सहा वर्षांनी तिच्या पाठीवर दुसरीही लेकचं.. "सौंदर्या" जन्मली. खरंतर श्रीकांत जरासा उदासच झाला होता... त्याला त्याची संपत्ती आणि व्यवसायाला मुलगा वारस हवा होता.. पण ह्यात लेकीचा काय दोष? त्याने मोठ्या थाटामाटात तिचं बारसं केलं... दोन्ही लेकी शहरातल्या टॉपच्या शाळेत शिक्षण घेत होत्या... आई वडिलांच्या सौंदर्याचा वारसा घेऊन जन्मलेल्या दोघी लेकी काकणभर अधिकच देखण्या होत्या. मोठी ऐश्वर्या वयात आली असल्याने अधिकच सुरेख नक्षत्रासारखी दिसत होती. दोघी लेकींवर श्रीकांतचे खूप प्रेम होते... आपल्या ह्या देखण्या, हुशार लेकी पाहिल्या की त्याचं बापाचं हृदय गलबलून जाई...
"आपल्या बाबतीत झालं तसं लेकीच्या बाबतीत होता कामा नये, त्यांना हवे ते शिक्षण हवी तेव्हढी वर्षे घेऊ देत .. त्यानंतरच मी त्यांचं एखाद्या राजकुमाराशी लग्न लावून देईन"
श्रीकांत स्वतःलाच पटवून द्यायचा... शेवटी लेक कितीही म्हटली तरी परक्याचं धन. घरी प्रत्येकाची वेगळी स्वतंत्र कार...लेकींनाही शाळेत क्लासला सोडायला स्वतंत्र कार आणि ड्रायव्हर. सुखात सुखात म्हणता म्हणता सोळा वर्षे संसार झाला... आणि काय झालं कोण जाणे?? एकंदर श्रीकांतचे ग्रहच फिरले.... म्हणायचे.
राजश्री विनाकारण तणतणत असायची, मुलींशी नीट बोलायची नाही, सतत काहींना काही कुरबुरी काढून भांडत बसायची.. कधी श्रीकांतशी तर कधी त्याच्या बिचाऱ्या म्हाताऱ्या आईशी.... घरातलं वातावरण पार ढवळून निघालं होतं. एकतर श्रीकांतवरचा कामाचा वाढलेला व्याप त्याच्याकडून आवरता आवरता दिवस संपून जायचा त्यात राजश्रीची सतत फणफण असायची.अनेकदा त्याला वाटायचं आपण हिला वेळ देत नाही म्हणून असेल किंवा तिच्याही काही गरजा असतील , इच्छा असतील ज्यांकडे आपलं दुर्लक्ष झालं असेल. त्याने अनेकदा स्पष्टपणे राजश्रीशी बोलण्याचा प्रयत्न केला... तिला नेमकं काय झालंय हेही ती सांगेना. एकदिवस अश्याच क्षुल्लक विषयावर भांडण उकरून काढले आणि ते इतके वाढले की राजश्री बॅग भरून घराबाहेर पडली... जातांना .."डोकं शांत झाल्यावर परत येईन", असे सासूला सांगून गेली. तिच्या आईने ती पुण्याच्या मावशीकडे गेल्याच सांगितलं... चार सहा दिवसांनी काहीच जणू घडलंच नाही असा आव आणत राजश्री परत आली. पुन्हा रोजचा दिनक्रम सुरळीत सुरू झाला.हळूहळू ह्याच प्रकाराची वारंवार पुनरावृत्ती होऊ लागली. कधी दोन तीन महिन्यांनी तर पुढे पुढे दर महिन्याला राजश्री पुण्याला जाई.. चार आठ दिवसांत परत येई. तिची मावशी तिथे रहायची.. मावशीच्या दोन लेकीही पुण्यातच होत्या... त्यामुळे राजश्री तिथं रमत असावी असा समज सगळ्यांनी सोईस्करपणे करून घेतला.
"तिथून आल्यावर ती शांत खुश असते ना ! झालं तर मग..."
असे आईला सांगून श्रीकांत आपल्या व्यापात लागला.मात्र श्रीकांतच्या आईच्या नजरेतून राजश्री मधील सूक्ष्म बदल सुटले नाहीत. तिने आपल्या बारीक अनुभवी नजरेने राजश्रीवर लक्ष द्यायला सुरुवात केली. एखाद्या नवथर तरुणीप्रमाणे ती हल्ली तासन तास फोनवर गप्पा मारत असते... "कुणाचा फोन ?" विचारले तर "मैत्रिणीचा" ...असे मोघम उत्तर देते. काहीतरी नक्कीच आहे ... त्यांचा संशय बळावत गेला. आपला संशय त्यांनी वरच्या मजल्यावर राहणाऱ्या चुलत जावेजवळ बोलून दाखवला. ह्या जाउबाई आणि त्यांचे कुटुंब कोकणातून आश्रयाला आलेले... दोन्ही मुले कष्टीक होती त्यांना श्रीकांतच्या वडिलांनी बरीच मदत केली होती. त्या दोघांची लग्ने सुद्धा त्यांनीच लावून दिली होती ... दोघांना चांगली कर्ती मुले होती .. मोठ्याचा मुलगा हैद्राबादला बँकेत लागला ,दुसरा बारावीला होता... तर धाकट्याचा मुलगा इंजिनिअर होऊन पुण्यात कंपनीत कामाला होता.. श्रीकांतच्या आईचे विचार जाऊबाईंना मुळीच पटले नाही .. त्यांच्या दृष्टीने राजश्री अगदी सोज्वळ स्त्री आणि आदर्श सून होती...
"माझ्या दोन्ही नातवंडांच्या लग्नाचं पाहतेय.. अगदी तुमच्या राजश्री सारख्याच नातसुना मिळायला हव्या हो!"
जाऊबाईंनी मांडलेल्या विचाराने श्रीकांतच्या आईचे मन थोडे स्थिर झाले. नेमका पुढच्याच महिन्यात एका नात्यातल्या लग्न समारंभात पुण्याला जाण्याचा योग आला... ह्या वेळी त्या मिठाई, भेटवस्तू वगैरे घेऊन आवर्जून राजश्रीच्या मावशीकडे भेटीला गेल्या. सहज बोलता बोलता विषय काढला असता,
"राजश्रीची गेल्या कित्येक वर्षांत भेटच नाही .."
असे मावशी बोलून गेल्या. श्रीकांतच्या आईचा अंदाज खरा ठरला.. घरी आल्यावर सगळा प्रकार त्यांनी श्रीकांतच्या कानावर घातला... राजश्रीला जाब विचारणार तर चोराच्या उलट्या बोंबा.. आक्रस्ताळेपणाने तिने भांडण सुरू केले..
"जाते मी माझ्या मैत्रिणीकडे .. काय चुकलं त्यात.. तुमच्याकडे तर माझ्यासाठी वेळच नसतो मी माझी एन्जॉय करतेय त्याचाही तुमच्या आईला त्रास होतोय.. माझं सुख डोळ्यात खुपतयं..."
शब्दाने शब्द वाढत गेला आणि मोठा तमाशा झाला दोन्ही लेकी भेदरलेल्या कोकरागत बघत होत्या. पुढे दोन महिने राजश्रीला पुण्याला जाण्याचे धारिष्ट्य झाले नाही... दिवाळी आली... सगळे घर पाहुणे नातेवाईक ह्यांनी भरून गेले... सुट्टीच्या निमित्ताने वरच्या चुलत घरचे दोघे नातूही आले होते... आता त्यांच्यासाठी मुली बघायला सुरुवात करायची होती. सगळ्या चुलत पुतण्यांचे, नणंदेच्या मुलांचे राजश्रीशी भलतेच मेतकूट होते. सुट्टीत त्यांच्यासोबत पत्ते खेळणे, कॅरम खेळणे ह्यात ती रमून जाई... वरचा चुलत पुतण्या स्वप्नीलशी तिचे अधिकच गहिरे नाते होते... तसा त्यात आक्षेप वाटावा असेही काही नव्हते. स्वप्नील तिच्याहून दहा वर्षे लहान होता ... शिवाय काकू पुतण्याचं नातं म्हणजे आईमुलागतच तर असतं.दिवाळी आनंदात पार पडली... एक दिवस स्वप्नील आपली काकू राजश्रीला केक बनवायला शिकवत होता... त्याला निरनिराळ्या रेसिपीज उत्तम येत असत... ह्या वेळी श्रीकांतच्या आईला त्या दोघांची जवळीक आणि लगट आक्षेपार्ह वाटली... आता तिने अधिकच तीव्रतेने डोळ्यांत तेल घालून राजश्रीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली..आणि एक दिवस होत्याचं नव्हतं झालं.
तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या राजश्रीच्या आईच्या घराची डुप्लिकेट किल्ली तिच्याकडेच असायची... दोघेही कामाला बाहेर पडल्यावर... राजश्री तिथे गेली आणि थोड्या वेळाने स्वप्नीलही गेला ... श्रीकांतच्या आईने दाराला गुपचूप बाहेरून कडी घालत ... सगळं घर गोळा केलं... कडी उघडून दोघांना राजरोस रंगेहात पकडलं. दोन वर्षांपूर्वी पुण्याला एका नात्यातल्या लग्नाच्या निमित्ताने स्वप्नीलच्या फ्लॅटवर उतरलेल्या राजश्री आणि स्वप्नीलच्या नात्याने सगळ्या सीमा पार केल्या होत्या... राजश्री सतत पुण्याला जाऊन स्वप्नीललाच भेटत होती. राजश्री आणि श्रीकांतच्या लग्नाच्या वेळी 14/15 वर्षांचा असणारा स्वप्नील ...राजश्रीला पाहता क्षणीच वेडा झाला होता... कसेही करून हिला मिळवायचीच हा ध्यास त्याने घेतला होता... सतत तिच्या रूपाची स्तुती करत तिच्याभवती पिंगा घालत त्याने आपला हेतू उघडपणे व्यक्त केला होता.. मात्र ह्या साऱ्यात नवल हेच की राजश्रीचा पाय का घसरावा? ह्या वेळी तिला आपल्या वयात आलेल्या मुलीचा, संसाराचा, तिच्या आणि स्वप्नीलच्या नात्याचा विसर पडला होता.
इतके सगळे महाभारत घडूनही श्रीकांतने आपल्या मुलींच्या भविष्याचा विचार करता राजश्री समोर ... झालं गेलं विसरून नव्याने सुरुवात करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र म्हणतात ना .. "कामातूराणां भयं न लज्जा।" गळ्यातील मंगळसूत्र श्रीकांतवर भिरकावत , भरल्या घरातून , सुखाचे माप लाथाडून राजश्री स्वप्नीलचा हात धरून चालती झाली.. पुढे अनेक वर्षे डिव्होर्स केस आणि कोर्टाच्या हेलपाट्यांत गेली... मुलींना विचारले असता त्यांनी वडिलांकडे राहण्याचे ठरवले... आयुष्यभरासाठी त्या दोन अश्राप लेकींवर ,"पळून गेलेल्या आईच्या मुली" हा कधीही पुसता न येणारा ठप्पा बसला. आपल्या कष्टाने व्यवसायात भरभराट करणारा श्रीकांत जगाला तोंड दाखवायच्या लायकीचा उरला नाही... आपल्या लेकींसाठी राजकुमाराची स्वप्ने पाहणारा बाप आता किमान सभ्य ठिकाणी आपल्या मुलींना पदरात घेतील का ? ह्या विवंचनेत असतो.
काय दोष होता त्याचा?? तो जाईल तिथं कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे लोकांच्या टिंगल टवाळीचा विषय झाला...
"अरे हाच तो! ह्याचीच बायको पुतण्याचा हात धरून पळून गेली."
✒️ यशश्री रहाळकर