गोष्ट तशी जुनीच म्हणायची... साधारण 25 वर्षे झाली असावीत. आमचं गाव लहान, जुन्या वळणाचं आणि लोकवस्ती कमी... त्यातही लोकांना भरपूर रिकामा वेळ त्यामुळे सगळ्यांचं सगळं जगजाहीर व्हायचं... कुठे खुट्ट झालं तरी त्याचे पडसाद गावभर उमटत. गेल्या काही दिवसांत गावाबाहेर पडणाऱ्या एकुलत्या एक रस्त्यावर टवाळ पोरांची आणि आंबट शौकीन म्हाताऱ्यांची गर्दी अचानकपणे वाढलेली दिसली... सगळ्यांना फिरायला जाण्याचे एकदम वेड लागले कसे?? तेही संध्याकाळी?? जेष्ठ स्त्रियांनी ह्यात लक्ष घातले तेव्हा वेगळीच बाब समोर आली. एक तरुण जोडपं त्याच दिशेला फिरायला जातं , त्यांची सलगी आक्षेपार्ह असते.. अंधार पडू लागतो तसतशी त्यांची जवळीक वाढत जाते.... असले काहीबाही कळू लागले. तो काळ म्हणजे ह्या असल्या विषयांवर कुजबुजत बोलण्याचा होता.. हल्ली सारखे कानाकोपऱ्यात मिठ्या मारून बसलेले कपल तेव्हा नव्हतेच आणि त्यातही एका क्लीकवर दिसणारे 'हवे ते' पहायला मिळणेही दुर्मिळच असावे... म्हणून तिकडे गर्दी उसळली होती.कुणाचे तरी कुणाशी लफडे असावे असा अंदाज बांधत, काही जबाबदार लोकांनी ह्यात लक्ष घातले आणि एकदा त्यांना धरलेच... मात्र ते नवरा-बायको निघाले. पर्स बाईचा मुलगा दिन्या आणि सून शालिनी.... घोर कलियुग म्हणत लोक परत फिरले.
पर्स बाईंचे खरे नाव काय होते .. आठवत नाही. सारा गाव त्यांना पर्स बाईच म्हणायचा... पर्स बाई अखंड स्वतःजवळ एक पर्स घेऊन फिरत , ती त्या छातीशी घट्ट धरून ठेवत. त्या पर्समध्ये त्यांचे सगळे दागिने आणि बरीच रोकड घेऊन फिरतात अशी वदंता होती. खरे खोटे देवास ठाऊक! मात्र त्या 24×7 ती पर्स उराशी घट्ट धरून असत... त्यांची भिरभिर नजर मला आजही तशीच्या तशी आठवते. चंचल , अस्थिर नजर, सतत भेदरलेल्या, सतत इकडे तिकडे पाहत चाहूल घेणाऱ्या पर्स बाई पाहिल्या की गंमत वाटे. पाहताक्षणीच त्यांच्या मनातील घालमेल आणि विचारांचे वादळ सहज दिसायचं.. त्या आमच्या झेड पीच्या 6 नं शाळेत शिक्षिका होत्या. बहुदा नवरा गेल्यावर त्या जागी लागल्या असाव्या. त्यांना मुळीच शिकवता येत नसे त्यात ती पर्स .. एक ध्यानच दिसायचं... त्या म्हणजे आमचा चेष्टेचा विषय. आई म्हणायची... " त्यांना हसू नका,बिचारीने फार सोसलंय." पर्स बाईंना त्यांच्या सासूने फारच छळले होते. त्यांचे यजमान ऐन तारुण्यात , एका अपघातात निर्वतले ह्यामुळे त्यांना जबर मानसिक धक्का बसला होता. दोन मुले ..दिनेश साडे आठ वर्षांचा तर धाकटा रुपेश सात वर्षांचा... दोघांत अगदी वर्ष -दीड वर्षाचे अंतर. नवऱ्याच्या जागी नोकरी करणाऱ्या तरुण विधवा सुनेवर सासूने सतत संशय घेतला... आणि घराची छळछावणी केली. एकदा कधीतरी घरात चोरी झाली आणि लहानसा दागिना गेला, त्याचेही खापर सासूने पर्स बाईंवर फोडले.. म्हणून पर्स बाई सतत पर्स घेऊन कवटाळून फिरायच्या.... तो काळ असा होता की माणसे सहृदयी होती.. कळपात एखादे लंगडे वासरू खपून जाई... समवयस्क स्त्रियांनी त्यांना होत्या तश्या आपल्यात सामावून घेतलं. पुढे सासू सासरे निर्वतले.
मोठा दिन्या अगदी मातृभक्त होता.. आपल्या आईने खूप सोसले ह्याची गरजेहून अधिकच जाणीव त्याला असावी.. आईला तो देवाच्या ठिकाणी मानायचा आणि तिचे वाक्य त्याच्यासाठी प्रमाण असे. त्याने गावातच बुक स्टोअर टाकले तो मार्गाला लागताच त्याचे लग्न झाले... शालिनी गोरी पण चारचौघींसारखी सामान्य.. त्यात तिला जाडाजुडा चष्मा.. पण चहा पोह्यांना दोघेही एकमेकांना आवडले ... मुख्य म्हणजे ती पर्स बाईंना आवडली. तिचे MA सुरू होते, वडील एस टीत कंडक्टर होते, आई नव्हतीच. वागून बोलून शालिनी चांगली होती ... सगळ्या जेष्ठ स्त्रियांची तिच्या बाबतीतली मते चांगली होती, ती वळणदार आहे असे साऱ्यांना वाटत असतांना...त्या नवरा बायकोची खुलेआम आक्षेपार्ह जवळीक सगळ्यांनाच खटकली.
"बाई बाई! नाव शालिनी आणि गुण पहा!"
बायकांची दबल्या आवाजात खुसुखुसू चालत असे. कोणत्या तरी भोचक भवानीने अखेर पर्स बाईंच्या कानावर घडला प्रकार घातला असावा... दिन्या आणि शालिनीचं ते 'तसलं' फिरणं बंद झालं... पुढे काय झालं कुणास ठाऊक? सारखे खटके उडू लागले.. पर्स बाई जरा विक्षिप्त असाव्यात पण सुनेला छळतील ह्यावर कुणाचाच विश्वास नव्हता.. एकदा कसलीशी शिक्षा म्हणून भर मे महिन्यातील दुपारभर त्यांनी शालिनीला उन्हात उभे केले.. संध्याकाळी ती अखेर घेरी येऊन पडली... शेवटी तिचे बाबा आले.. कडाक्याचे भांडण झाले आणि ते शालिनीला घेऊन गेले...त्यांनी दिन्याला आपल्या गावी चलण्याविषयी विचारले.. सगळ्यांची सहानुभूती पर्स बाईंच्या बाजूनेच होती. अखेर वर्षभर वाट पाहून दिन्याच्या सासऱ्यांनी घटस्फोटासाठी प्रयत्न सुरू केले.... दिन्याचा जीव शालिनीत अडकला होता पण आई म्हणाली, "नको ही असली पोर." आणि दिन्याने मुकाट्याने घटस्फोट दिला.
धाकटा रुपेश हुशारच म्हणायचा.. त्याने दुसऱ्या गावात नोकरी शोधली, तिकडे जरा जम बसताच स्वतःचे स्वतः लग्न जमवून मोकळा झाला... पर्स बाईंना हे मुळीच आवडले नसावे पण रुपेश न बोलून शहाणा होता. दिन्याच्या आयुष्याचा खेळ झालेला त्याने पाहिला होता.... पहिल्या लग्नानंतर लगेच घटस्फोट झाल्यामुळे दिन्याचे दुसरे लग्न काही जमेना... त्याहीपेक्षा येणाऱ्या प्रत्येक मुलीला पर्स बाई काहीतरी उणे काढून नाकारत गेल्या. चार पाच वर्षांत दिन्याने लग्नाचा नाद सोडला तो कायमचाच.. आई किंवा संसार ह्यात एकाचीच निवड करता येईल हे त्याला नेमके कळले असावे... त्याने आईची निवड केली.... त्याची आई जी होती जशी होती त्याच्यासाठी सर्वस्व होती.
"दिन्याने बाईंच्या कलाने घेत आयुष्याची माती करून घेतली."
लोक म्हणायचे.
सहा-सात वर्षांचा काळ उलटून गेला असावा... अचानक एके दिवशी एका गावातल्याच लग्नात शालिनी दिसली... तिच्या चुलत दिराचे वऱ्हाड होते. त्याच गावात कशी येऊ? हा खेद ना खंत नव्हती चेहऱ्यावर... सुरेखच दिसत होती आराश्या! दोन मुलांची आई झाल्याने जरा सैलावलेली पण चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज आणि तृप्तता. जुन्या ओळखीच्या बायकांशी अदबीने आणि मोकळेपणाने बोलली. घटस्फोटानंतर तिने BEd केले आणि शिक्षिकेची नोकरी लागली.. त्याच शाळेतील एका सरांशी तिने लग्न केले... ती खूप खूप सुखात असल्याचेही म्हणाली. त्या लग्नानंतर आधीच करपलेला दिन्या नंतर तोंडात मारून घेतल्यागत खालमानेने चालायचा... आपण खूप काही गमावल्याचा पश्चाताप त्याच्या डोळ्यांतून दिसायचा. काही दिवसांतच शालिनीशी खास गट्टी असणाऱ्या काकूंनी, शालिनीने सांगितलेली.... दिन्याच्या लग्नाची खरीखुरी भानगड समोर आणली. पुढे बायकांच्या नेटवर्क मधून ती कथा खुलेआम पसरली.
दिनेश आणि शालिनीचे लग्न झाले तसे पर्स बाईंनी त्यांना एकांतच मिळणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतली. त्यांच्या खोलीत झोपणे, रात्ररात्र रडणे, दिन्याला जीव देण्याच्या धमक्या देणे असे अनेक प्रकार विक्षिप्त बाईंनी केले. दोघेच परगावी फिरायला म्हणून निघाले तर छातीत दुखण्याचे कारण काढून जाऊ दिले नाही. एकदा काही कामानिमित्त बाहेर गेलेल्या पर्स बाई जरा लवकरच परतल्या... नवीनच लग्न झालेल्या दिन्या आणि शालिनीची जवळीक त्यांना इतकी खटकली की त्यांनी तिला दिवसभर भर उन्हात उभं केलं... दोघे फिरायला जात पण हेतू मात्र चोरट्या स्पर्शाचा असावा.. तेही गावातल्या लोकांनी बंद पाडलं... अखेर सहनशक्तीचा कडेलोट झाल्यावर शालिनीने वडिलांना बोलावलं ..पर्स बाई शालिनीच्या वडिलांना म्हणाल्या,
"माझा धाकटा मुलगा अगदी बरोबरीचा आहे. हे दोघे एकत्र आले तर त्याच्या मनावर वाईट परिणाम होईल.."
शालिनीचे वडील तावातावाने म्हणाले,
"एव्हढे होते तर दोघांचे लग्न एकत्रच करायचे.. "
शब्दाने शब्द वाढत गेला... कडाक्याचे भांडण झाले आणि ते शालिनीला घेऊन गेले... त्यांनी दिन्यालाही सोबत चलण्याविषयी विचारले पण त्याने नकार दिला.
प्रत्यक्षात अगदी तारुण्यात वैधव्य आलेल्या , अनेक वर्षे छळ सहन केलेल्या पर्स बाईंना मानसिक उपचारांची गरज असावी.. मुलाचे कारण पुढे करत पण प्रत्यक्षात त्यांनाच भिंतीआड दोघांनी जवळीक साधली असावी, अशी शंका सुद्धा नकोशी होती. अजब विकृतीचा प्रकार होता...
ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात घडल्या असल्या तरी कल्पनेतसुद्धा विचार करवत नाही...
ह्या सगळ्यांत कुणाची चूक होती?? दिन्याने पत्नीची साथ दिली नाही आईची बाजू घेतली... ही चूक नव्हती ? .. पर्स बाईनी चार जवळच्या व्यक्तींजवळ आपली अडचण मांडली नाही हेही चुकलेच नाही का?
पण मी तर म्हणेन सगळ्यांत मोठी चूक होती आपल्या परंपरेच्या पगड्याची... आई - वडील ह्यांना देव मानत असतांना आपण त्यांचं मनुष्य म्हणून असणारं अस्तित्व नाकारत असतो. ते चुकू शकतात, तेही आजारी असू शकतात हे मान्यच नसतं. त्यांची दुखणी विशेषतः मानसिक दुखणी झाकून ठेवणे हीच दिन्याची सगळ्यांत मोठी चूक होती... बिचारा दिन्या! मातृभक्त असल्याची केव्हढी मोठी किंमत मोजली त्याने... अजूनही तो एकाकी आणि निरर्थक आयुष्य रोज ढकलतो आहे..😢
✒️ यशश्री रहाळकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!