फॉलोअर

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

पुरुषस्पंदन कथा ८:- एकांडा

तुम्ही कदाचित "एकांडा शिलेदार" हा शब्द ऐतिहासिक पुस्तकांत वाचला असेल.. तशीच ही कथा एका एकाकी पडलेल्या.. एकटाच जगण्याचा संघर्ष करणाऱ्या "विश्वा"ची... विश्वेश्वर आता विश्वा म्हणून हाक घालावी अश्या वयाचा उरला नव्हता...गेल्याच श्रावणात त्याच्या देहानी 69 वर्षे पूर्ण केली होती.... तरी सगळे गाव त्याला विश्वा म्हणायचे . पिकल्या केसांनी "ए विश्वा" ऐवजी "अहो विश्वाभाऊ" झाले होते इतकंच.त्याच्या वयासारखाच त्याचा वाडाही आता बरीच पडझड सहन करत उभा होता.. तसे होते नव्हते भाडेकरू केव्हाच सोडून गेले होते...पण विश्वा कुठे जाणार? त्याला ह्या वाड्याशिवाय दुसरे जगच नव्हते..
जन्माला आल्यापासून ह्याच वाड्याचं पांघरूण करून त्याला ऊब मिळाली होती.. घरात पहिला वहिला मुलगा म्हणून जन्म झाल्यावरचे पेढे आणि तेव्हढेच काय ते मधुर क्षण त्याच्या आणि ह्या वाड्याच्या नशीबात असावे. सगळ्यांचे करून सवरून उतारवयात अखेर तो एकटाच उरला होता आणि वाडाही अनेक कुटुंबे मार्गाला लावून पडझडीच्या काळात एकटाच बाकी होता... मात्र दोघेही अजूनही तितकेच ताठ उभे होते..... एकमेकांची सोबत करत.

विश्वा घरातला पहिलाच मुलगा.. त्याच्या पाठीवरची सहा भावंडे गेली .. धाकट्या 3 बहिणी मात्र जगल्या. उत्तम मार्कांनी मॅट्रिक झाल्याझाल्याच विश्वाला लगेच वडिलांनी पोस्टात चिकटवला.... आपल्या अवघ्या संसाराचा भार विश्वावर सोपवून त्यांनी कायमचे डोळे मिटले. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे घरातील मोठी भावंडे वडिलांची संपत्तीचं नव्हे तर वडिलांचे कर्ज आणि त्यांनी जन्माला घातलेला पोरवडा गपगुमान सांभाळायचे. पोसता येत नव्हते तर जन्माला कश्याला घातले ? असले प्रश्न त्यांनी कधी विचारलेच नाहीत.. नव्हे त्यांना ते कधी पडलेच नसावेत. वडील गेले आणि वर्षभरात आईचे डोळेही गेले .. आता घर आणि प्रपंच सगळाच भार विश्वावर होता. पहाटे उठून स्वयंपाकपाणी एखाद्या गृहिणीसारखं आवरून तो बहिणींना डबे वगैरे देऊन शाळेत सोडायचा आणि पोस्टात जायचा. बदलीच्या धाकाने त्याने प्रमोशनही स्वीकारले नव्हते.. आई जमेल तसे स्वतःचे आवरायची , आणि बसल्या बसल्या जमतील ती कामे करायची... पाच सहा एकर जमीन होती तिचाही हातभार लागे. विश्वा 21 वर्षांचा झाला आणि सगळ्यांनी त्याला आता घर नीट सावरायला लग्न करण्याचा सल्ला दिला. आई ही अशी अंधळी त्यात 3 पोरी ... उद्या विश्वाची बायको त्याला घेऊन वेगळी झाली, त्याला संसाराची चटक लागली , पुढे त्याची मुलेबाळे झाल्यावर त्याने जबाबदारी झटकली तर ..तर... आईला भीती वाटू लागली. शेवटी 'स्वार्थ' ही आत्यंतिक प्रबळ भावना आहे त्यापुढे मातृत्व वगैरे फोलच म्हणायचे.

तारुण्य असतं, जोम असतो आणि प्रत्येकाला महान व्हायचं असतं... मग काय भीष्म जन्म घेतात ते ह्यातूनच. त्याग माणसाला महान करतो मात्र त्याच वेळी एकटा सुद्धा करत जातो. विश्वाने बहिणींचे संसार मार्गी लागेपर्यंत लग्न न करण्याचा निश्चय केला आणि आईचा जीव भांड्यात पडला. आंधळ्या आईला विश्वाने थोडीथोडकी नाही तर 42 वर्षे प्रेमानं एकहाती सांभाळलं... आपण विश्वावर अन्याय केल्याची खंत सोबत घेऊनच माउलीने 'राम' म्हटले. विश्वाने अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने आपली नोकरी पूर्ण केली. गावात त्याचे नाव लोक आदराने घेत. दरम्यानच्या काळात तिघी बहिणींचे विवाह त्याने सुयोग्य स्थळी मोठ्या थाटामाटात लावून दिले... होती नव्हती ती पुंजी म्हणजे शेतजमीन ,एकेका बहिणीच्या लग्नात विकावी लागली. सर्वांत धाकटीचे लग्न होता होता त्याचे केस पिकू लागले आणि आता ह्या वयात लग्न करून काय करायचे असा विचार करून त्याने "एकटा जीव सदाशिव" राहण्याचे निश्चित केले. बहिणींची त्याच्यावर माया होती..वर्षे सरली तसे त्यांचे संसार बहरले तरी त्यांनी भावाकडे दुर्लक्ष केलं नाही... तिघीही आलटून पालटून येत विश्वाला काय हवं नको पाहत असत, कोरडा खाऊ आणून ठेवत, गोडाधोडाच भावाला करून घालत आणि आपापल्या घरी जातं.... विश्वाच्या तरी फार अपेक्षा कुठे होत्या आयुष्याकडून...... तिघी बहिणींचे एक वाक्य समान असायचे...

"दादाने खूप खूप केलं आमच्यासाठी... आम्ही अगदी कातड्याचे जोडे करून घातले ना तरी त्याचे कर्ज फेडू शकणार नाही."

बहिणींच्या ह्या प्रेमाने विश्वा भारावून जाई .. त्याचे डोळे भरून येत... आपल्या आयुष्याचं कृतकृत्य झाल्याची भावना त्याला सुखावून जाई. त्याचं सुफळ संपूर्ण झालेलं उर्वरीत आयुष्य तो नेमस्तपणाने जगत होता. भल्या मोठ्या वाड्यातील मोजक्या 2 खोल्या आणि ओसरी ताब्यात ठेवून त्याने बाकीच्या खोल्यांत बिर्हाडे ठेवली होती... त्यांचे येणे जाणे , मुले बाळे ह्यांनी वाड्यात सतत चैतन्य असायचे.  गेली कित्येक वर्षे ज्या साचेबद्ध पद्धतीने तो जगत होता तोच क्रम त्याने रिटायर्ड झाल्यावरही कायम ठेवला. सकाळी उठून झाडलोट करायची, आन्हिक उरकून अंगणातल्या झाडांची भरपूर फुले तोडून  मनसोक्त देवपूजा करायची. एव्हाना दुधाचा रतीब येई मग चहा आणि थोडासा नाश्ता करून गावदेवीच्या मंदिराची वाट धरायचा. आपल्या आयुष्याची नौका गावदेवीच्या कृपेनेच पार लागली असा विश्वास त्याला होता. तिथेच दोनेक तास मजेत घालवून तो घरी परतायचा मग स्वतःपुरता स्वयंपाक करून जेवायचा... एकट्या जीवाला लागणार तरी किती? मग वामकुक्षी आणि संध्याकाळी फेरफटका...असेच निवांत आयुष्य जात होते. 

एके दिवशी नेहमीप्रमाणे मंदिरात गेल्यावर मंदिराचे विश्वस्त गावदेवीच्या उत्सवासंबंधी चर्चा करत होते. विश्वा आपसूकच त्यात सामील झाला. हल्ली परगावहून येणारे भक्तमंडळी बरेच वाढले होते... बरेचदा ज्यांचे कुणी नातेवाईक नसत अश्या लोकांचे खूपच हाल होत... हॉटेलवाले मनाला येईल ती किंमत आकारत शिवाय स्वच्छता, सोयीसुविधा ह्यांचा अभाव असे. त्यामुळे मंदिराने पुढाकार घेऊन भक्तनिवास बांधायचे ठरले... बांधकामाला आवश्यक निधी आणि देणग्या उभारणे मंदिराला सहज शक्य होते मात्र प्रश्न होता जागेचा... पन्नास खोल्यांचे भक्तनिवास बांधायचे तर बरीच मोठी जागा हवी शिवाय जागा विकत घेतो म्हटले तर बांधकाम करणार कश्याने? हा प्रश्न होताच. एखाद्या धनिकाने स्वेच्छेने जागा मंदिराला दान दिल्यास हा प्रश्न सहज सुटणार होता. अशी जागा मिळाल्यास ह्याच उत्सवात भक्तनिवासाची घोषणा करून टाकू.. अशी सगळी चर्चा रंगली होती. 

विश्वा नेहमीच्या सवयीने दर्शन घेऊन आला पण आज त्याच्या मनात खळबळ माजली होती... घरी येऊन त्याने आपले साठवलेले पैसे pf वगैरेचा हिशोब केला ... बरीच मोठी रक्कम होती. आता आपलं काय राहिलंय ? त्याचे मन म्हणाले .. भक्तनिवासाला आईच्या नावे देणगी देण्याचं त्याने निश्चित केल... त्याचा दिवस आनंदात गेला. आजवर त्याने स्वतःच्या आनंदासाठी एक रुपयाही खर्च केलेला नव्हता. दिवसभर तो भक्तनिवसाचाच विचार करत होता... अचानक देवपूजा करतांना त्याला वाटलं आपण हा आपला वाडाच भक्तनिवासासाठी दान दिला तर... स्वतःच्या कल्पनेवर तो खूप खुश झाला. दुसऱ्याच दिवशी तो मंदिराच्या विश्वस्तांना भेटला.. त्याने आपली इच्छा आणि अडचण दोन्ही व्यक्त केले... विश्वा आपली वाड्याची संपूर्ण जमीन भक्तनिवासाला दान करणार होता मात्र तो जिवंत असेपर्यंत दोन खोल्यांची त्याची मालकी अबाधित राहणार होती... कुणाचाच ह्यावर आक्षेप असण्याचे कारणच नव्हते.. लगेच गावदेवीच्या उत्सवात मंत्रीमहोदयांच्या हस्ते थाटात भूमिपूजन झाले... आयुष्यात पहिल्यांदाच विश्वाचा जंगी सत्कार झाला. सगळ्या पेपरमध्ये दानवीर म्हणून बातम्या झळकल्या.. भाडेकरूंना जागा सोडण्याविषयी नोटीस देण्यात आल्या.

चारच दिवसांत सगळ्यांत धाकटी बहीण हजर झाली.. तिच्या मते ह्या व्यवहारात वरवर दान दिल्याचे नाटक करण्यात येत असून बदल्यात विश्वाला रग्गड रक्कम मिळणार होती... तिची समजूत काढता काढता विश्वाची पुरेवाट झाली.  तिने जातांना स्पष्टच केले तिला घरातील तिचा वाटा हवा होता बाकीच्यांचे त्यांनी बघावे. मोठ्या दोघी तिच्यापेक्षा जरा नरम होत्या पण तिने वाटणीचा विषय काढताच त्यांनीही आपापला हिस्सा मागितला... आजवर देवदूत म्हणून मिळविलेल्या विश्वाच्या प्रतिमेस मोठा तडा गेला... हा धक्का त्याला खोलवर घायाळ करून गेला. घर वडिलांच्या नावे होतं.. आणि प्रत्येकाचा त्यात वाटा होता... विश्वाचा त्याग , त्याने आयुष्यभर केलेले कष्ट ह्या सगळ्याशी कायद्याला घेणे देणे नव्हते. मग सुरू झाला संघर्ष त्यागाचा स्वार्थाशी.. बहिणींचा भावाशी. बहिणींनी घराच्या व्यवहारावर स्टे ऑर्डर आणली.. आपणही ह्या घराचे वारसदार असून विश्वाला ते दान देण्याचा हक्कच नाही , असे त्यात नमूद होते. गावात विश्वाची छी थु झाली.. लोक त्याची टिंगल करू लागले..

" हे पहा ! हे दानशूर कर्ण.. चालले दान करायला."

"अहो ! अंथरूण पाहून पाय पसरावे .. आपण कोणते शेठ आहोत का मारवाडी?"

"पण मी म्हणतो आपलं नाही ते दान करायचं कशाला?"

"बहिणींचा वाटा असतो हे काय माहीत नव्हते याला.."

असे कित्येक कुजकट तीर तो रोज पचवायचा. त्याचा बहिणींच्या शब्दांवरचा विश्वास नडला खरेतर! कातड्याचे जोडे करणाऱ्या बहिणी वेळ आली की सहज आपल्यासाठी सही करतील हा फाजील विश्वास त्याचा घात करून गेला. अखेर त्याने कोर्टात बहिणींविरुद्ध केस टाकली.. शेतीतील वाटणी , त्यांची लग्ने , इतर खर्च.. सगळेच काढावे लागले..व्यवहारातील आकडे समोर येताच प्रेम संपून गेले. आजवर त्याचं कौतुक करणाऱ्या बहिणी तळतळाट शिव्याशाप देऊ लागल्या... विश्वा वाड्यात आता एकटाच राहतो .. गेल्या पावसात वाड्याची बरीच पडझड झाली आहे, तो नेमाने कोर्टात जातो... कोर्टात रोज नवी तारीख पडते.... असे हे वर्षानुवर्षे सुरू आहे. दरम्यान गावांत टोलेजंग भक्तनिवास उभा राहिला आहे.. हल्ली विश्वा कोर्टाव्यतिरिक्त फारसा बाहेर पडत नाही...लोक म्हणतात ह्याचे आता काय राहिले आहे? पण विश्वा मानत नाही , तो थकत नाही त्याची एकट्याची लढाई सुरू आहे.. ..  ह्यातच एक दिवस त्याचा शेवट होणे अटळ आहे. कधीकधी स्वार्थी माणसे सुखोपभोग घेऊन मस्तमौला आयुष्य जगतात आणि त्याग करणारा महान नव्हे तर मूर्ख ठरतो!😢 दुर्दैव दुसरं काय?
✒️ यशश्री रहाळकर




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!