फॉलोअर

बुधवार, १६ डिसेंबर, २०२०

नावात काय आहे??

       
           "नावात काय आहे?"  हे जगातील सर्वाधिक भाषांमध्ये भाषांतरीत , सर्वाधिक वापरले गेलेले ,सर्वाधिक प्रसिद्ध वाक्यांपैकी एक ...असे वाक्य. शेक्सपिअरच्या रोमिओ-ज्युलिएट नाटकातील ज्युलिएटच्या तोंडी ... "नावात काय आहे? गुलाबाला जरी दुसरे नाव असते तरी त्याचा सुगंध तसाच राहिला असता." .. अश्या आशयाचे वाक्य आहे...  बाई ग ज्युलिएट तुझं गुलाबाचं ठीक आहे ग पण नावात इथं बरंच काही असतं... आता तुमच्याकडे नावांचा तसा तुटवडाच आहे पाचवा हेनरी आणि दहावा फिलिप..😂 आमच्याकडं अस नसते गो बाय!... इथं नुसत्या नावावरून अख्खी कुंडली मांडतात... भूत भविष्य वर्तमान एव्हढंच काय मागचा पुढचा जन्म पण कळतो. ते कुंडलीचं जरा साईडला ठेवलं तरी नुसत्या नावावरून आमच्याकड म्हंजे हिथ भरतवर्षात जात, धर्म, लिंग, प्रांत, भाषा, वय वगैरे वगैरे अशी लै माहिती मिळती. गंमतीचा भाग सोडला तरी प्रत्येक व्यक्तीचं नाव ही त्याच्याबद्दलची माहिती पुरविणारी एक किल्लीच असते.. तुम्ही केवळ नावावरून अनेक ठोकताळे, वेगवेगळे अंदाज बांधू शकता.. आणि ते बऱ्याच अंशी खरे सुद्धा ठरतात.
           प्रत्यक्षात आपलं नाव काही आपण निवडलेलं नसतं ... कुणीतरी धोंड म्हणून ते गळ्यात बांधलेलं असतं जे सर्वसाधारणपणे तुमच्या हयातीत आणि त्यानंतरही तुमच्या अस्तित्वाचा भाग बनतं. आता ह्यात मुलींना लग्नानंतर नाव बदलण्याची संधी असते... काही लोक मोठं झाल्यावर आपलं नाव आपल्या मर्जीने बदलून घेतात...(मध्यंतरी अनेक नकुशी नावाच्या मुलींची नावे सरकारनेच बदलून घेतली).. पण त्यांचा अपवाद सोडला तर लोक आपल्याला आयुष्यभर ज्या नावाने नावे ठेवतात त्या नावाशी आपला संबंधच नसतो. त्यामुळे नावात आणि प्रत्यक्ष व्यक्तीत होणारे साधर्म्य हा केवळ योगायोग समजावा. इथे केतकी नावाची मुलगी काळी ठिक्कर असू शकते आणि श्यामला नावाची गोरी पान... माधुरी नावाची कर्कशा असू शकते आणि अबोली नावाची बडबडी.... मुलांच्या नावांबद्दल तर बोलूच नये कारण पुढे त्यांनी गुण दर्शविले तर नाव सार्थ होतं आणि उधळले तर कृतार्थ.. थोडक्यात काय तर नावाला काही अर्थ वगैरे असतो हे येथील दरबारे आम ला मंजूरच नाही. वानगीदाखल काही नावे सांगते ते ठेवण्यामागे माय-बापाचा हेतू काय असतो कोण जाणे...अमर, मानव आणि कहर म्हणजे "प्रणय" .. मुलींचीही नावे आरक्ता , संप्रेषणा, प्रकल्पा ... देवा रे! नावात काही अर्थच नाही . माझी आई शिक्षिका होती , तिच्या वर्गातील एका मुलीचे नाव चक्क "अमेरीका" होते.. ह्यात काहीच 'मन की बात' नाही 100% सत्य.. आईने हे सांगताच ..मी ती अमेरीका शाळेत जाऊन पाहून आले☺️.. तिच्या भावाचे नाव बहुदा चीन/ जपान असावे असे माझ्या मनातही आले.. प्रत्यक्षात काय होते कोण जाणे. भूगोलाचे शिक्षक असावेत तिचे तात..
           नावात काहीच अर्थ नसू देत हो! पण हे "नाम महात्म्य" भल्याभल्यांची बोबडी वळवते.. आता चार पिढ्यांपासून जरा सुस्थितीतील घरातले सगळे पोमेट जरा परवडायला लागलं की फेअर अँड लव्हली आणत .. घरातल्या लहानथोरांचे ते सरसकट क्रीम असे .. अंघोळ झाल्यावर चेहऱ्यावर हेच क्रीम थापून वर पॉंड्सचा डब्बा उधळला की आपण सुंदर दिसतो असा साक्षात्कार अनेक पिढ्यांनी अनुभवला. घरातल्या खाश्या स्वाऱ्या दाढी केल्यावर हेच लावत पण 2/4 वर्षांपूर्वी अचानकपणे ही फेअर अँड लव्हली "लडकियो वाली क्रीम"  झाली... आणि पुरुष लव्हली असूच शकत नाहीत हा साक्षात्कार झाला.. मग फेअर अँड हँडसम नावाखाली तेच क्रीम विकले जाऊ लागले. पुढे ह्या क्रीमच्या नावातील 'फेअर' शब्द म्हणे रेसिझमचा, वर्णभेदाचा पुरस्कार करत असल्याचा जावई शोध डस्की (उर्फ काळ्याकुट्ट) शेलिब्रिटींनी लावला...  मग त्या क्रीमचे "ग्लो अँड लव्हली" असे बारसे झाले. मला एक कळत नाही "क्यूकीं मेरा रंग मेरी पहचान नहीं" हे वाक्य सुनेची निवड करतांना सासूला आणि बायकोची निवड करतांना लग्नाळू मुलांना का आठवत नसावे?? ह्यालाच म्हणतात "नाव मोठं आणि लक्षण खोटं"... 
           नावावरून आपल्या मनात त्या व्यक्तीची एक प्रतिमा निर्माण होते... बरेचदा ती जुळतेही पण कधीकधी ही नावे सॉल्लिड दगा देतात. सोसायटीत नव्याने रहायला आलेल्या कुटुंबातील नावे नलिनी, निलेश आणि नचिकेत अशी 'न' च्या बाराखडीतील होती. सोसायटीच्या एका  कार्यक्रमात हे लोक जरा उशिराने आले आणि खुर्च्या मिळेना... लहान पोर उभं राहून कंटाळलं असेल म्हणून एका प्रेमळ काकींनी ,"नचिकेत ये राजा! बस माझ्या मांडीवर." असा प्रेमळ आग्रह केला... त्या कुटुंबातील पोर बापाकडे पाहू लागलं... बाप कावराबावरा झाला.. आणि नलिनी रागाने आपल्या ह्या प्रेमळ शेजारणीकडे एक कटाक्ष टाकून निघून गेली... कुटुंबातील नवऱ्याचं नाव नचिकेत आणि पोराचं निलेश होत🙄😂 निलेश काहीसं जुनं नाव तर नचिकेत मॉडर्न... त्यामुळे हा घोटाळा झाला... भर शंभर लोकांत नलिनीच्या नवऱ्याला मांडीवर बसायचा प्रेमळ आग्रह करणाऱ्या काकू पुढे सोसायटीतील ब्रेकिंग न्युजचा भाग झाल्या. माझ्या मिस्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका वर्कर कडे एकदा काही महत्वाच्या निमित्त ते गेले असतानाच प्रसंग.. तो तर घरी नव्हता पण त्याचे वडील होते.. आणि त्यांनी आदराने या बसा वगैरे म्हटले चहा घेता घेता माझ्या मिस्टरांनी लगे हात त्यांच्या चिरंजीवांची तक्रार करून टाकली, "अमोल अतिशय कामचुकार आहे... अमोल कामांची टाळाटाळ करतो" अश्या आशयाचे बरेच काही ते बोलले. दुसऱ्याच दिवशी काही कागदपत्रांवर डिटेल्स भरतांना त्यांनी "अमोल अनिल मोहिते" असे नाव लिहिले.. जे पुढे त्या वर्कर ने चुकले असल्याचे सांगितले म्हणजे तो "अनिल अमोल मोहिते" होता... हे राम! म्हणजे माझे मिस्टर अमोल समोरच बसून त्यानेच दिलेला चहा पीत त्यालाच कामचुकार आळशी वगैरे म्हणून आले होते. साधारण अनिल आणि अमोल ह्यात अमोल मुलगा असावा असेच वाटणे सहाजिक नव्हे का? तो वर्कर देखील हसून म्हणाला , " ..असा गोंधळ बऱ्याच लोकांचा होतो मलाच माझा बाप समजतात" 😂
            नावं आपल्या बरोबर आपला सर्वसाधारण कालखंड दर्शवितात.. जसे सचिन म्हटले की 90 च्या दशकात जन्मलेला एखादा मुलगा डोळ्यांपुढे येतो.. गंगा , सिंधू ही नावे माझ्या आजीच्या पिढीतली तर साधना हे नाव सत्तरच्या दशकातील.. पुढे पूनम 80 ते 85 दरम्यान जन्म झालेल्या.. असा ढोबळ अंदाज बांधता येतो. मात्र श्रीराम आणि कृष्णा ही नावे सर्व पिढ्यांत आजोबा ते नातू प्रवास करताहेत.. फक्त आजोबा कृष्णराव असतील तर नातवाच्या पिढीत क्रिश होईल.एकेका बॅचला एकेक नावे गाजतात.. त्या नावाची वर्गात इतकी मुले असतात की त्यांचे अख्खे नावच वर्गशिक्षिकेला घ्यावे लागते... अशीच एक पिढी स्मिता आणि प्रशांत ह्या नावांनी गाजविली. माझ्या बॅचला सहा शीतल होत्या.. आणि शाळेतून कॉलेज, ग्रॅज्युएशन आणि पुढे प्रत्येक कॉलेजमध्ये शीतल नावाची मुलगी माझी मैत्रीण होती.. त्यामुळे बोलतांना शीतल जोशी भेटली किंवा शीतल पाटील म्हणाली .. असे सांगावे लागते... ह्या शीतल वरून आता माझ्या वयाचा अंदाज सहज बांधता येईल 😜. माझ्या यजमानांचे अनेक मित्र अभिजित नावाचे आहेत.. आणि लेकीच्या वर्गात 6 अनन्या आहेत. 'मानस-मानसी' सारखंच सद्या 'आद्य-आद्या' ही जोडनावं धुमाकूळ घालत आहेत. किरण, मृणाल, कोमल, सुहास ही नावे मात्र उभयलिंगी.. त्यामुळे तो आणि ती दोघांची असू शकतात.. मात्र आमच्या वर्गात जेव्हा स्नेहल नावाचा मुलगा आला तेव्हा त्या बिचाऱ्याची आम्ही चिडवून चिडवून पुरेवाट केली. काही नावे इतकी वापरली जातात की शंभर लोकांत खडा फेकून मारला तरी त्याच नावाच्या व्यक्तीला लागावा... मनीषा हे त्यात सर्वोच्च स्थानी असलेलं नाव.. सुभाष, संदीप, सोनाली त्या खालोखाल आढळतात. आमच्या एका फॅमिली फ्रेंडच्या घरी नवरा बायको दोघांचेही सख्खे भाऊ मंदार, चुलत मावस भाऊ आणि बहिणींचे नवरे पकडून अगदी जवळच्या नात्यात एकूण डझनभर मंदार.. संवाद साधतांना कोणत्या मंदार बद्दल बोलताहेत हे दोघांना कसं कळतं कोण जाणे?
            नावांचा उगम अनेकविध भाषांमधून आणि विशेषतः विशेषणांमधून होतो.. उदाहरणार्थ शालिनी, मुग्धा, विनय, आदर्श. काही नावे कृती दर्शक असतात.. जसे आरती,प्रसाद. मराठीत मूळ मराठी नावांव्यतिरिक्त हिंदी आणि संस्कृत मधील नावांची देखणी सरमिसळ आढळते... खुशी, मुस्कान, मोहित.. ही हिंदी नावे तर सौरभ, क्षिप्रा, चारुहास, वेधस वगैरे संस्कृत .. उर्दू भाषेतील काही नावे अतिशय सुरेख अर्थपूर्ण आहेत जसे झरीना .. झऱ्यासारखी खळखळून हसणारी...मात्र ती धर्मसूचक वाटल्याने मराठीत तितकीशी रुळली नाहीत. मूळ बंगाली नावे अत्यंत अर्थपूर्ण असतात.. आणि तितकीच सुमधुर देखील. निवेदिता, अनुराग , अनुप्रीता ही बंगाली नावे मराठीत बेमालूम मिसळली. काही नावे जातील तिथं आपल्या बरोबर प्रांत सुद्धा घेऊन येतात... हितेशभाई आणि कोकीलाबेन गुजराथी तर रबडी, जिलबी , लड्डूमल अशी  खाण्याच्या पदार्थांची नावे बिहारी.. साऊथ इंडियात नावांचा तुटवडा असावा कृष्णमूर्ती ,नारायण स्वामी आणि लक्ष्मणा, मूरुगना पलीकडे वेगळी नावे दिसत नाहीत... अर्थात त्यांच्या भल्यामोठ्या नावामध्ये त्यांचं नाव (first nane)नेमकं कोणतं ??हा प्रश्न मला नेहमीच पडतो. सध्या शौर्य, धैर्य, रुद्र, आद्य, ओवी ही पिटुकली नावे ठेवण्याची पद्धत आहे ... देवांच्या नावांचाही ट्रेंड इन आहे पण त्यात रुळलेली नावे न ठेवता अगदी विष्णू किंवा गणपतीची सहस्त्र नामावली धुंडाळून क्लिष्ट , कुणाला फारशी माहिती नसलेली नावे नव्याने शोधून ठेवली जातात.. ह्याच गटातले आर्चीस हे विष्णूचे तर स्वरणीम हे गणपतीचे नाव. ट्रीशा, तीतीक्षा, पर्युक्ता कुठून आले कोण जाणे??
            नाव कसे असावे तर अर्थपूर्ण आणि ऐकल्यावर कानाला गोड वाटणारेही. .. इतकेही कठीण नाव असू नये की वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत आपल्या लेकराला ते नीट सांगताच येऊ नये. त्याचबरोबर पुढे चालून त्या पोराला लाज वाटेल असेही काही नाव ठेऊ नये .. पूर्वी नवसाने झालेल्या मुलांची नावे भिक्या, कचरू, उकंडा ठेवत असत.. किती वाईट आहे हे? मुलीचे नाव नकोशी, आसवा, पाचवी,  किती क्लेशकारक आहेत. कुंडली/ पत्रिकेतील जन्माक्षरावरून नाव ठेऊ नये ते वेगळे असावे.. अर्थात काही अक्षरे नाव ठेवण्यागत नसतात.. खो, षो,डो, पो .. काय नाव ठेवणार..☺️ मात्र ते नाव वेगळे असावे असे मानले जाते. माय-बापाच्या नावाची तोडफोड करून काहीतरी निरर्थक नावे ठेवू नयेत.. जसे शशांक आणि उर्वीची लेक शर्वी ... काहीच गरज नाही ह्याची.. तुमचे अपत्य दोघांचे आहेच.. दोघांचेही नाव ते लावणार आहे.. पुढे "रोशन " वगैरेही जमल्यास करणारच आहे.. मग त्याचे नाव तरी त्याचे त्याचे स्वतंत्र असू द्या ना! तसेच नाव ऐकल्यावर प्राणी किंवा पक्षी समोर येईल अशीही नावे ठेऊ नयेत.. असे माझे मत जसे पोपटराव, मैनावती, टायगर, वगैरे. ल्युसी, मोती, मौंटी म्हटले की मुलगा असेल की कुत्रा हे कन्फ्यूजन निर्माण होतं. काही लोक एकदम सहा सात नावे ठेवतात शेवटी त्यातले एक शाळेत घालतात. .. मग जन्मदाखल्यावर एक आणि शाळेच्या टी.सी. वर भलतेच आणि घरात हाक मारतात तिसऱ्याच नावाने हा घोळ होतो. सध्या कागदपत्रांच्या वैधतेची आवश्यकता लक्षात घेता एकच नाव पुरेसे आहे तेही जन्माआधीच ठरवून ठेवावे जेणेकरून birth certificate पासून तेच सगळीकडे कायम राहते... मग भलेही तुम्ही तुमच्या लाडक्याला झिंगुर, मुंगूर काहीही म्हणा घरी. इंटरनेटच्या कृपेमुळे हल्ली ढिगाने नावे अर्थासहित सहज उपलब्ध आहेत... तरीही लोक अमुक अक्षराचे नाव हवे म्हणून मला शोधून दे अशी विनंती करतात ... त्यांना नवीन आणि छान नाव हवेच असते..मी आपली प्रामाणिकपणे पाच सहा नावे, अर्थ वगैरे  काढून पाठवते.. आणि शेवटी भलतेच पांचट नाव त्यांनी ठेवलेले असते.. अश्या वेळी मी माझ्या मुर्खपणावर फक्त चरफडत बसते. "नाव ठेवणे" ही क्रिया "नावे ठेवण्याकडे" वळणार नाही एव्हढी काळजी घ्यायलाच हवी.
            थोडक्यात काय तर... "नावात काय आहे?" असे म्हणत शेक्सपिअरच्या नावाने खापर फोडण्यापेक्षा.. ठेवतानाच नाव नीट ठेवावे.. बाकी पुढे आयुष्यभर नावे ठेवायला लोक असतातच. 
तर अशी ही... 

🌹।।नाम महात्म्य सांगणारी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ।।🌹.. 

नावे ठेवण्याची मनस्वी आवड असणारी... नाव ठेवणे ह्या क्रियेत विलक्षण रुची असणारी आणि नुसत्या नावावरून नावांचे पहाड उभारणारी..  "नाम है मेरा यशश्री और प्यार से लोग मुझे यश कहते है!"😂
✒️   यशश्री रहाळकर        
            

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

"पुरुषस्पंदन" कथा ९ :- जवळीक


गोष्ट तशी जुनीच म्हणायची... साधारण 25 वर्षे झाली असावीत. आमचं गाव लहान, जुन्या वळणाचं आणि लोकवस्ती कमी... त्यातही लोकांना भरपूर रिकामा वेळ त्यामुळे सगळ्यांचं सगळं जगजाहीर व्हायचं... कुठे खुट्ट झालं तरी त्याचे पडसाद गावभर उमटत. गेल्या काही दिवसांत गावाबाहेर पडणाऱ्या एकुलत्या एक रस्त्यावर टवाळ पोरांची आणि आंबट शौकीन म्हाताऱ्यांची गर्दी अचानकपणे वाढलेली दिसली... सगळ्यांना फिरायला जाण्याचे एकदम वेड लागले कसे?? तेही संध्याकाळी?? जेष्ठ स्त्रियांनी ह्यात लक्ष घातले तेव्हा वेगळीच बाब समोर आली. एक तरुण जोडपं त्याच दिशेला फिरायला जातं , त्यांची सलगी आक्षेपार्ह असते.. अंधार पडू लागतो तसतशी त्यांची जवळीक वाढत जाते.... असले काहीबाही कळू लागले. तो काळ म्हणजे ह्या असल्या विषयांवर कुजबुजत बोलण्याचा होता.. हल्ली सारखे कानाकोपऱ्यात मिठ्या मारून बसलेले कपल तेव्हा नव्हतेच आणि त्यातही एका क्लीकवर  दिसणारे 'हवे ते' पहायला मिळणेही दुर्मिळच असावे... म्हणून तिकडे गर्दी उसळली होती.कुणाचे तरी कुणाशी लफडे असावे असा अंदाज बांधत, काही जबाबदार लोकांनी ह्यात लक्ष घातले आणि एकदा त्यांना धरलेच... मात्र ते नवरा-बायको निघाले. पर्स बाईचा मुलगा दिन्या आणि सून शालिनी.... घोर कलियुग म्हणत लोक परत फिरले.

पर्स बाईंचे खरे नाव काय होते .. आठवत नाही. सारा गाव त्यांना पर्स बाईच म्हणायचा... पर्स बाई अखंड स्वतःजवळ एक पर्स घेऊन फिरत , ती त्या छातीशी घट्ट धरून ठेवत. त्या पर्समध्ये त्यांचे सगळे दागिने आणि बरीच रोकड घेऊन फिरतात अशी वदंता होती. खरे खोटे देवास ठाऊक! मात्र त्या 24×7 ती पर्स उराशी घट्ट धरून असत... त्यांची भिरभिर नजर मला आजही तशीच्या तशी आठवते. चंचल , अस्थिर नजर, सतत भेदरलेल्या, सतत इकडे तिकडे पाहत चाहूल घेणाऱ्या पर्स बाई पाहिल्या की गंमत वाटे. पाहताक्षणीच त्यांच्या मनातील घालमेल आणि विचारांचे वादळ सहज दिसायचं.. त्या आमच्या झेड पीच्या 6 नं शाळेत शिक्षिका होत्या. बहुदा नवरा गेल्यावर त्या जागी लागल्या असाव्या. त्यांना मुळीच शिकवता येत नसे त्यात ती पर्स .. एक ध्यानच दिसायचं... त्या म्हणजे आमचा चेष्टेचा विषय. आई म्हणायची... " त्यांना हसू नका,बिचारीने फार सोसलंय." पर्स बाईंना त्यांच्या सासूने फारच छळले होते. त्यांचे यजमान ऐन तारुण्यात , एका अपघातात निर्वतले ह्यामुळे त्यांना जबर मानसिक धक्का बसला होता.  दोन मुले ..दिनेश साडे आठ वर्षांचा तर धाकटा रुपेश सात वर्षांचा... दोघांत अगदी वर्ष -दीड वर्षाचे अंतर. नवऱ्याच्या जागी नोकरी करणाऱ्या तरुण विधवा सुनेवर सासूने सतत संशय घेतला... आणि घराची छळछावणी केली. एकदा कधीतरी घरात चोरी झाली आणि लहानसा दागिना गेला,  त्याचेही खापर सासूने पर्स बाईंवर फोडले.. म्हणून पर्स बाई सतत पर्स घेऊन कवटाळून फिरायच्या.... तो काळ असा होता की माणसे सहृदयी होती.. कळपात एखादे लंगडे वासरू खपून जाई... समवयस्क स्त्रियांनी त्यांना होत्या तश्या आपल्यात सामावून घेतलं. पुढे सासू सासरे निर्वतले.

मोठा दिन्या अगदी मातृभक्त होता.. आपल्या आईने खूप सोसले ह्याची गरजेहून अधिकच जाणीव त्याला असावी.. आईला तो देवाच्या ठिकाणी मानायचा आणि तिचे वाक्य त्याच्यासाठी प्रमाण असे. त्याने गावातच बुक स्टोअर टाकले तो मार्गाला लागताच त्याचे लग्न झाले... शालिनी गोरी पण चारचौघींसारखी सामान्य.. त्यात तिला जाडाजुडा चष्मा.. पण चहा पोह्यांना दोघेही एकमेकांना आवडले ... मुख्य म्हणजे ती पर्स बाईंना आवडली. तिचे MA सुरू होते, वडील एस टीत कंडक्टर होते, आई नव्हतीच. वागून बोलून शालिनी चांगली होती ... सगळ्या जेष्ठ स्त्रियांची तिच्या बाबतीतली मते चांगली होती, ती वळणदार आहे असे साऱ्यांना वाटत असतांना...त्या नवरा बायकोची खुलेआम आक्षेपार्ह जवळीक सगळ्यांनाच खटकली.  

"बाई बाई! नाव शालिनी आणि गुण पहा!" 

बायकांची दबल्या आवाजात खुसुखुसू चालत असे. कोणत्या तरी भोचक भवानीने अखेर पर्स बाईंच्या कानावर घडला प्रकार घातला असावा... दिन्या आणि शालिनीचं ते 'तसलं' फिरणं बंद झालं... पुढे काय झालं कुणास ठाऊक? सारखे खटके उडू लागले.. पर्स बाई जरा विक्षिप्त असाव्यात पण सुनेला छळतील ह्यावर कुणाचाच विश्वास नव्हता.. एकदा कसलीशी शिक्षा म्हणून भर मे महिन्यातील दुपारभर त्यांनी शालिनीला उन्हात उभे केले.. संध्याकाळी ती अखेर घेरी येऊन पडली... शेवटी तिचे बाबा आले.. कडाक्याचे भांडण झाले आणि ते शालिनीला घेऊन गेले...त्यांनी दिन्याला आपल्या गावी चलण्याविषयी विचारले.. सगळ्यांची सहानुभूती पर्स बाईंच्या बाजूनेच होती. अखेर वर्षभर वाट पाहून दिन्याच्या सासऱ्यांनी घटस्फोटासाठी प्रयत्न सुरू केले.... दिन्याचा जीव शालिनीत अडकला होता पण आई म्हणाली, "नको ही असली पोर." आणि दिन्याने मुकाट्याने घटस्फोट दिला.

धाकटा रुपेश हुशारच म्हणायचा.. त्याने दुसऱ्या गावात नोकरी शोधली, तिकडे जरा जम बसताच स्वतःचे स्वतः लग्न जमवून मोकळा झाला... पर्स बाईंना हे मुळीच आवडले नसावे पण रुपेश न बोलून शहाणा होता. दिन्याच्या आयुष्याचा खेळ झालेला त्याने पाहिला होता.... पहिल्या लग्नानंतर लगेच घटस्फोट झाल्यामुळे दिन्याचे दुसरे लग्न काही जमेना... त्याहीपेक्षा येणाऱ्या प्रत्येक मुलीला पर्स बाई काहीतरी उणे काढून नाकारत गेल्या. चार पाच वर्षांत दिन्याने लग्नाचा नाद सोडला तो कायमचाच.. आई किंवा संसार ह्यात एकाचीच निवड करता येईल हे त्याला नेमके कळले असावे... त्याने आईची निवड केली.... त्याची आई जी होती जशी होती त्याच्यासाठी सर्वस्व होती.

 "दिन्याने बाईंच्या कलाने घेत आयुष्याची माती करून घेतली."
लोक म्हणायचे. 

सहा-सात वर्षांचा काळ उलटून गेला असावा... अचानक एके दिवशी एका गावातल्याच लग्नात शालिनी दिसली... तिच्या चुलत दिराचे वऱ्हाड होते. त्याच गावात कशी येऊ? हा खेद ना खंत नव्हती चेहऱ्यावर... सुरेखच दिसत होती आराश्या! दोन मुलांची आई झाल्याने जरा सैलावलेली पण चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज आणि तृप्तता. जुन्या ओळखीच्या बायकांशी अदबीने आणि मोकळेपणाने बोलली. घटस्फोटानंतर तिने BEd केले आणि शिक्षिकेची नोकरी लागली.. त्याच शाळेतील एका सरांशी तिने लग्न केले... ती खूप खूप सुखात असल्याचेही म्हणाली. त्या लग्नानंतर आधीच करपलेला दिन्या नंतर तोंडात मारून  घेतल्यागत खालमानेने चालायचा... आपण खूप काही गमावल्याचा पश्चाताप त्याच्या डोळ्यांतून दिसायचा. काही दिवसांतच शालिनीशी खास गट्टी असणाऱ्या काकूंनी,  शालिनीने सांगितलेली.... दिन्याच्या लग्नाची खरीखुरी भानगड समोर आणली. पुढे बायकांच्या नेटवर्क मधून ती कथा खुलेआम पसरली.

दिनेश आणि शालिनीचे लग्न झाले तसे पर्स बाईंनी त्यांना एकांतच मिळणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतली. त्यांच्या खोलीत झोपणे, रात्ररात्र रडणे, दिन्याला जीव देण्याच्या धमक्या देणे असे अनेक प्रकार विक्षिप्त बाईंनी केले. दोघेच परगावी फिरायला म्हणून निघाले तर छातीत दुखण्याचे कारण काढून जाऊ दिले नाही. एकदा काही कामानिमित्त बाहेर गेलेल्या पर्स बाई जरा लवकरच परतल्या... नवीनच लग्न झालेल्या दिन्या आणि शालिनीची जवळीक त्यांना इतकी खटकली की त्यांनी तिला दिवसभर भर उन्हात उभं केलं... दोघे फिरायला जात पण हेतू मात्र चोरट्या स्पर्शाचा असावा.. तेही गावातल्या लोकांनी बंद पाडलं... अखेर सहनशक्तीचा कडेलोट झाल्यावर शालिनीने वडिलांना बोलावलं ..पर्स बाई शालिनीच्या वडिलांना म्हणाल्या,

"माझा धाकटा मुलगा अगदी बरोबरीचा आहे. हे दोघे एकत्र आले तर त्याच्या मनावर वाईट परिणाम होईल.."

शालिनीचे वडील तावातावाने म्हणाले, 

"एव्हढे होते तर दोघांचे लग्न एकत्रच करायचे.. "

शब्दाने शब्द वाढत गेला... कडाक्याचे भांडण झाले आणि ते शालिनीला घेऊन गेले... त्यांनी दिन्यालाही  सोबत चलण्याविषयी विचारले पण त्याने नकार दिला. 
प्रत्यक्षात अगदी तारुण्यात वैधव्य आलेल्या , अनेक वर्षे छळ सहन केलेल्या पर्स बाईंना मानसिक उपचारांची गरज असावी.. मुलाचे कारण पुढे करत पण प्रत्यक्षात त्यांनाच भिंतीआड दोघांनी जवळीक साधली असावी, अशी शंका सुद्धा नकोशी होती. अजब विकृतीचा प्रकार होता...
 ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात घडल्या असल्या तरी कल्पनेतसुद्धा विचार करवत नाही...

ह्या सगळ्यांत कुणाची चूक होती?? दिन्याने पत्नीची साथ दिली नाही आईची बाजू घेतली... ही चूक नव्हती ? .. पर्स बाईनी चार जवळच्या व्यक्तींजवळ आपली अडचण मांडली नाही हेही चुकलेच नाही का?
पण मी तर म्हणेन सगळ्यांत मोठी चूक होती आपल्या परंपरेच्या पगड्याची... आई - वडील ह्यांना देव मानत असतांना आपण त्यांचं मनुष्य म्हणून असणारं अस्तित्व नाकारत असतो. ते चुकू शकतात, तेही आजारी असू शकतात हे मान्यच नसतं. त्यांची दुखणी विशेषतः मानसिक दुखणी झाकून ठेवणे हीच दिन्याची सगळ्यांत मोठी चूक होती... बिचारा दिन्या! मातृभक्त असल्याची केव्हढी मोठी किंमत मोजली त्याने... अजूनही तो एकाकी आणि निरर्थक आयुष्य रोज ढकलतो आहे..😢 

✒️ यशश्री रहाळकर



शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

पुरुषस्पंदन कथा ८:- एकांडा

तुम्ही कदाचित "एकांडा शिलेदार" हा शब्द ऐतिहासिक पुस्तकांत वाचला असेल.. तशीच ही कथा एका एकाकी पडलेल्या.. एकटाच जगण्याचा संघर्ष करणाऱ्या "विश्वा"ची... विश्वेश्वर आता विश्वा म्हणून हाक घालावी अश्या वयाचा उरला नव्हता...गेल्याच श्रावणात त्याच्या देहानी 69 वर्षे पूर्ण केली होती.... तरी सगळे गाव त्याला विश्वा म्हणायचे . पिकल्या केसांनी "ए विश्वा" ऐवजी "अहो विश्वाभाऊ" झाले होते इतकंच.त्याच्या वयासारखाच त्याचा वाडाही आता बरीच पडझड सहन करत उभा होता.. तसे होते नव्हते भाडेकरू केव्हाच सोडून गेले होते...पण विश्वा कुठे जाणार? त्याला ह्या वाड्याशिवाय दुसरे जगच नव्हते..
जन्माला आल्यापासून ह्याच वाड्याचं पांघरूण करून त्याला ऊब मिळाली होती.. घरात पहिला वहिला मुलगा म्हणून जन्म झाल्यावरचे पेढे आणि तेव्हढेच काय ते मधुर क्षण त्याच्या आणि ह्या वाड्याच्या नशीबात असावे. सगळ्यांचे करून सवरून उतारवयात अखेर तो एकटाच उरला होता आणि वाडाही अनेक कुटुंबे मार्गाला लावून पडझडीच्या काळात एकटाच बाकी होता... मात्र दोघेही अजूनही तितकेच ताठ उभे होते..... एकमेकांची सोबत करत.

विश्वा घरातला पहिलाच मुलगा.. त्याच्या पाठीवरची सहा भावंडे गेली .. धाकट्या 3 बहिणी मात्र जगल्या. उत्तम मार्कांनी मॅट्रिक झाल्याझाल्याच विश्वाला लगेच वडिलांनी पोस्टात चिकटवला.... आपल्या अवघ्या संसाराचा भार विश्वावर सोपवून त्यांनी कायमचे डोळे मिटले. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे घरातील मोठी भावंडे वडिलांची संपत्तीचं नव्हे तर वडिलांचे कर्ज आणि त्यांनी जन्माला घातलेला पोरवडा गपगुमान सांभाळायचे. पोसता येत नव्हते तर जन्माला कश्याला घातले ? असले प्रश्न त्यांनी कधी विचारलेच नाहीत.. नव्हे त्यांना ते कधी पडलेच नसावेत. वडील गेले आणि वर्षभरात आईचे डोळेही गेले .. आता घर आणि प्रपंच सगळाच भार विश्वावर होता. पहाटे उठून स्वयंपाकपाणी एखाद्या गृहिणीसारखं आवरून तो बहिणींना डबे वगैरे देऊन शाळेत सोडायचा आणि पोस्टात जायचा. बदलीच्या धाकाने त्याने प्रमोशनही स्वीकारले नव्हते.. आई जमेल तसे स्वतःचे आवरायची , आणि बसल्या बसल्या जमतील ती कामे करायची... पाच सहा एकर जमीन होती तिचाही हातभार लागे. विश्वा 21 वर्षांचा झाला आणि सगळ्यांनी त्याला आता घर नीट सावरायला लग्न करण्याचा सल्ला दिला. आई ही अशी अंधळी त्यात 3 पोरी ... उद्या विश्वाची बायको त्याला घेऊन वेगळी झाली, त्याला संसाराची चटक लागली , पुढे त्याची मुलेबाळे झाल्यावर त्याने जबाबदारी झटकली तर ..तर... आईला भीती वाटू लागली. शेवटी 'स्वार्थ' ही आत्यंतिक प्रबळ भावना आहे त्यापुढे मातृत्व वगैरे फोलच म्हणायचे.

तारुण्य असतं, जोम असतो आणि प्रत्येकाला महान व्हायचं असतं... मग काय भीष्म जन्म घेतात ते ह्यातूनच. त्याग माणसाला महान करतो मात्र त्याच वेळी एकटा सुद्धा करत जातो. विश्वाने बहिणींचे संसार मार्गी लागेपर्यंत लग्न न करण्याचा निश्चय केला आणि आईचा जीव भांड्यात पडला. आंधळ्या आईला विश्वाने थोडीथोडकी नाही तर 42 वर्षे प्रेमानं एकहाती सांभाळलं... आपण विश्वावर अन्याय केल्याची खंत सोबत घेऊनच माउलीने 'राम' म्हटले. विश्वाने अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने आपली नोकरी पूर्ण केली. गावात त्याचे नाव लोक आदराने घेत. दरम्यानच्या काळात तिघी बहिणींचे विवाह त्याने सुयोग्य स्थळी मोठ्या थाटामाटात लावून दिले... होती नव्हती ती पुंजी म्हणजे शेतजमीन ,एकेका बहिणीच्या लग्नात विकावी लागली. सर्वांत धाकटीचे लग्न होता होता त्याचे केस पिकू लागले आणि आता ह्या वयात लग्न करून काय करायचे असा विचार करून त्याने "एकटा जीव सदाशिव" राहण्याचे निश्चित केले. बहिणींची त्याच्यावर माया होती..वर्षे सरली तसे त्यांचे संसार बहरले तरी त्यांनी भावाकडे दुर्लक्ष केलं नाही... तिघीही आलटून पालटून येत विश्वाला काय हवं नको पाहत असत, कोरडा खाऊ आणून ठेवत, गोडाधोडाच भावाला करून घालत आणि आपापल्या घरी जातं.... विश्वाच्या तरी फार अपेक्षा कुठे होत्या आयुष्याकडून...... तिघी बहिणींचे एक वाक्य समान असायचे...

"दादाने खूप खूप केलं आमच्यासाठी... आम्ही अगदी कातड्याचे जोडे करून घातले ना तरी त्याचे कर्ज फेडू शकणार नाही."

बहिणींच्या ह्या प्रेमाने विश्वा भारावून जाई .. त्याचे डोळे भरून येत... आपल्या आयुष्याचं कृतकृत्य झाल्याची भावना त्याला सुखावून जाई. त्याचं सुफळ संपूर्ण झालेलं उर्वरीत आयुष्य तो नेमस्तपणाने जगत होता. भल्या मोठ्या वाड्यातील मोजक्या 2 खोल्या आणि ओसरी ताब्यात ठेवून त्याने बाकीच्या खोल्यांत बिर्हाडे ठेवली होती... त्यांचे येणे जाणे , मुले बाळे ह्यांनी वाड्यात सतत चैतन्य असायचे.  गेली कित्येक वर्षे ज्या साचेबद्ध पद्धतीने तो जगत होता तोच क्रम त्याने रिटायर्ड झाल्यावरही कायम ठेवला. सकाळी उठून झाडलोट करायची, आन्हिक उरकून अंगणातल्या झाडांची भरपूर फुले तोडून  मनसोक्त देवपूजा करायची. एव्हाना दुधाचा रतीब येई मग चहा आणि थोडासा नाश्ता करून गावदेवीच्या मंदिराची वाट धरायचा. आपल्या आयुष्याची नौका गावदेवीच्या कृपेनेच पार लागली असा विश्वास त्याला होता. तिथेच दोनेक तास मजेत घालवून तो घरी परतायचा मग स्वतःपुरता स्वयंपाक करून जेवायचा... एकट्या जीवाला लागणार तरी किती? मग वामकुक्षी आणि संध्याकाळी फेरफटका...असेच निवांत आयुष्य जात होते. 

एके दिवशी नेहमीप्रमाणे मंदिरात गेल्यावर मंदिराचे विश्वस्त गावदेवीच्या उत्सवासंबंधी चर्चा करत होते. विश्वा आपसूकच त्यात सामील झाला. हल्ली परगावहून येणारे भक्तमंडळी बरेच वाढले होते... बरेचदा ज्यांचे कुणी नातेवाईक नसत अश्या लोकांचे खूपच हाल होत... हॉटेलवाले मनाला येईल ती किंमत आकारत शिवाय स्वच्छता, सोयीसुविधा ह्यांचा अभाव असे. त्यामुळे मंदिराने पुढाकार घेऊन भक्तनिवास बांधायचे ठरले... बांधकामाला आवश्यक निधी आणि देणग्या उभारणे मंदिराला सहज शक्य होते मात्र प्रश्न होता जागेचा... पन्नास खोल्यांचे भक्तनिवास बांधायचे तर बरीच मोठी जागा हवी शिवाय जागा विकत घेतो म्हटले तर बांधकाम करणार कश्याने? हा प्रश्न होताच. एखाद्या धनिकाने स्वेच्छेने जागा मंदिराला दान दिल्यास हा प्रश्न सहज सुटणार होता. अशी जागा मिळाल्यास ह्याच उत्सवात भक्तनिवासाची घोषणा करून टाकू.. अशी सगळी चर्चा रंगली होती. 

विश्वा नेहमीच्या सवयीने दर्शन घेऊन आला पण आज त्याच्या मनात खळबळ माजली होती... घरी येऊन त्याने आपले साठवलेले पैसे pf वगैरेचा हिशोब केला ... बरीच मोठी रक्कम होती. आता आपलं काय राहिलंय ? त्याचे मन म्हणाले .. भक्तनिवासाला आईच्या नावे देणगी देण्याचं त्याने निश्चित केल... त्याचा दिवस आनंदात गेला. आजवर त्याने स्वतःच्या आनंदासाठी एक रुपयाही खर्च केलेला नव्हता. दिवसभर तो भक्तनिवसाचाच विचार करत होता... अचानक देवपूजा करतांना त्याला वाटलं आपण हा आपला वाडाच भक्तनिवासासाठी दान दिला तर... स्वतःच्या कल्पनेवर तो खूप खुश झाला. दुसऱ्याच दिवशी तो मंदिराच्या विश्वस्तांना भेटला.. त्याने आपली इच्छा आणि अडचण दोन्ही व्यक्त केले... विश्वा आपली वाड्याची संपूर्ण जमीन भक्तनिवासाला दान करणार होता मात्र तो जिवंत असेपर्यंत दोन खोल्यांची त्याची मालकी अबाधित राहणार होती... कुणाचाच ह्यावर आक्षेप असण्याचे कारणच नव्हते.. लगेच गावदेवीच्या उत्सवात मंत्रीमहोदयांच्या हस्ते थाटात भूमिपूजन झाले... आयुष्यात पहिल्यांदाच विश्वाचा जंगी सत्कार झाला. सगळ्या पेपरमध्ये दानवीर म्हणून बातम्या झळकल्या.. भाडेकरूंना जागा सोडण्याविषयी नोटीस देण्यात आल्या.

चारच दिवसांत सगळ्यांत धाकटी बहीण हजर झाली.. तिच्या मते ह्या व्यवहारात वरवर दान दिल्याचे नाटक करण्यात येत असून बदल्यात विश्वाला रग्गड रक्कम मिळणार होती... तिची समजूत काढता काढता विश्वाची पुरेवाट झाली.  तिने जातांना स्पष्टच केले तिला घरातील तिचा वाटा हवा होता बाकीच्यांचे त्यांनी बघावे. मोठ्या दोघी तिच्यापेक्षा जरा नरम होत्या पण तिने वाटणीचा विषय काढताच त्यांनीही आपापला हिस्सा मागितला... आजवर देवदूत म्हणून मिळविलेल्या विश्वाच्या प्रतिमेस मोठा तडा गेला... हा धक्का त्याला खोलवर घायाळ करून गेला. घर वडिलांच्या नावे होतं.. आणि प्रत्येकाचा त्यात वाटा होता... विश्वाचा त्याग , त्याने आयुष्यभर केलेले कष्ट ह्या सगळ्याशी कायद्याला घेणे देणे नव्हते. मग सुरू झाला संघर्ष त्यागाचा स्वार्थाशी.. बहिणींचा भावाशी. बहिणींनी घराच्या व्यवहारावर स्टे ऑर्डर आणली.. आपणही ह्या घराचे वारसदार असून विश्वाला ते दान देण्याचा हक्कच नाही , असे त्यात नमूद होते. गावात विश्वाची छी थु झाली.. लोक त्याची टिंगल करू लागले..

" हे पहा ! हे दानशूर कर्ण.. चालले दान करायला."

"अहो ! अंथरूण पाहून पाय पसरावे .. आपण कोणते शेठ आहोत का मारवाडी?"

"पण मी म्हणतो आपलं नाही ते दान करायचं कशाला?"

"बहिणींचा वाटा असतो हे काय माहीत नव्हते याला.."

असे कित्येक कुजकट तीर तो रोज पचवायचा. त्याचा बहिणींच्या शब्दांवरचा विश्वास नडला खरेतर! कातड्याचे जोडे करणाऱ्या बहिणी वेळ आली की सहज आपल्यासाठी सही करतील हा फाजील विश्वास त्याचा घात करून गेला. अखेर त्याने कोर्टात बहिणींविरुद्ध केस टाकली.. शेतीतील वाटणी , त्यांची लग्ने , इतर खर्च.. सगळेच काढावे लागले..व्यवहारातील आकडे समोर येताच प्रेम संपून गेले. आजवर त्याचं कौतुक करणाऱ्या बहिणी तळतळाट शिव्याशाप देऊ लागल्या... विश्वा वाड्यात आता एकटाच राहतो .. गेल्या पावसात वाड्याची बरीच पडझड झाली आहे, तो नेमाने कोर्टात जातो... कोर्टात रोज नवी तारीख पडते.... असे हे वर्षानुवर्षे सुरू आहे. दरम्यान गावांत टोलेजंग भक्तनिवास उभा राहिला आहे.. हल्ली विश्वा कोर्टाव्यतिरिक्त फारसा बाहेर पडत नाही...लोक म्हणतात ह्याचे आता काय राहिले आहे? पण विश्वा मानत नाही , तो थकत नाही त्याची एकट्याची लढाई सुरू आहे.. ..  ह्यातच एक दिवस त्याचा शेवट होणे अटळ आहे. कधीकधी स्वार्थी माणसे सुखोपभोग घेऊन मस्तमौला आयुष्य जगतात आणि त्याग करणारा महान नव्हे तर मूर्ख ठरतो!😢 दुर्दैव दुसरं काय?
✒️ यशश्री रहाळकर




बुधवार, २ डिसेंबर, २०२०

"पुरुषस्पंदन" कथा ७:- अगतिक


प्रशांतचा मध्यरात्री 2 वाजता फोन आला... अर्धवट झोपेतच मी तो उचलला..

"मामा! मामा .. please असशील तसा ताबडतोब निघून ये.मला तुझ्या मदतीची गरज आहे..."

मी बसल्या जागीच उडालो काय झालंय काय नेमकं? मध्यरात्री प्रशांतचा फोन आला की भास झालाय.. ह्या विचारात सावरून बसलो तर "ही" सुद्धा जागीच होती..

"अहो! एव्हढ्या रात्री एकटे नका जाऊ मी सुद्धा येते."
ही म्हणाली आणि हे खरं असल्याची खात्री पटली.. आम्ही तडक गाडी काढून प्रशांतच्या सोसायटीत शिरलो.. वॉचमनच्या हजार प्रश्नांना पार करत.. 8व्या मजल्यावर पोहोचलो... पाहतो तर प्रशांत अपराध्यासारखा बाहेर उभा...... तेही शॉर्टस आणि बनियन वर... ....

प्रशांत माझा एकुलता एक भाचा.. लहान गावात शेतकरी कुटुंबात दोन बहिणींच्या पाठीवर जन्माला आलेला.. माझ्या ताईचा हा लेक .. अतिशय हुशार ,मेहनती. स्कॉलरशिप मिळवून शिक्षण घेतलेला ... अर्धवेळ नोकरी करून इंजिनिअरिंग पूर्ण केलेला प्रशांत चांगल्या नोकरीत लागला.. आता पुण्याला रहायचे म्हणजे घर हवेच..मग आम्ही दोघे मामा-भाचे त्याच्यासाठी घर शोधत फिरू लागलो.. सगळं आयुष्य सरूनही मी अजून स्वतःचं घर घेऊ शकलो नव्हतो. शेवटी होम लोन आणि ताईचे चार दागिने ह्यांची जुळवाजुळव करत हा फ्लॅट प्रशांतने घेतला... 2BHK असला तरी स्वतःचा होता त्याचा आनंद निराळाच होता. आता आम्ही प्रशांतसाठी सुयोग्य मुलगी शोधू लागलो... तसेही स्वतःचे स्वतः जुळविणाऱ्यांतला आमचा प्रशांत नव्हताच. ताईचे म्हणणे पडले.. 

"तुमच्या पुण्याची पोरगी नको बाबा...आपल्या गावाकडची बघ. शिकलेली बघ, तुला पटेल तशी कर पण इकडची नको..... प्रशांत! आमच्या काही अपेक्षा नाही तुझ्याकडून... आम्ही आमचे तिकडेच राहू पण कधीमधी येता येईल चार दिवस अशी मुलगी बघ. सणवार निगुतीने करणारी , माणसं सांभाळून घेणारी असू दे म्हणजे झालं. "

योग जुळून आले की सगळं जुळून येतंच.. म्हणतात ना! अगदी तस्स झालं. ताईच्याच गावचे ठिकाण चालून आले ... वडील शिक्षक, तिघी बहिणी त्यातली मुक्ता धाकटी. तिच्या मानसी आणि माधवी ह्या दोघी बहिणींचे लग्न होऊन वर्षे लोटली होती.. देशपांडे दाम्पत्याचे वय पाहता..मुक्ता त्यांना अगदी उतारवायात झाली असावी. मुक्ता सुद्धा इंजिनिअर आणि कंपनीत चांगल्या नोकरीत होती.पत्रिका 32 गुणी जुळली... साधेपणाने साखरपुडा झाला... तिच्या साखरपुड्यात फक्त दोघी बहिणी कुटुंबाविना एकट्याच आल्या हे जरा खटकलं.. बहिणी मुक्ताच्या मानाने सुमारच होत्या, जेमतेम बारावी शिकलेल्या , शेजारच्याच खेड्यात लग्न करून गेलेल्या त्यामुळे मुक्ता अधिकच उठून दिसत होती.  बोलायला मोकळी आणि आत्मविश्वासाने बोलणारी मुक्ता सगळ्यांनाच प्रभावित करून गेली.

साखरपुड्याला उपस्थित एक शेजारी मला बाजूला घेत खाजगीत म्हणाले,

"ही मुलगी भाच्यासाठी करतांना विचार कर बाबा! सर भला माणूस आहेत..पण आई म्हणजे आग रामेश्वरी आहे पोरगी बंब सोमेश्वरी नको निघायला."

लहानसं गाव , हळूहळू काहीबाही कानावर येऊ लागलं.. विशेषतः मुक्ताच्या आईविषयी लोक वाईट बोलत.. म्हणजे बाई कजाग आहे, कुणाशी पटत नाही, नवऱ्याचा अगदी बैल केलाय वगैरे वगैरे .. मनांत प्रश्न निर्माण झाले की काय करावे आता? प्रशांतच्या मनात मुक्ता भरली असावी, सर्वार्थाने दोघे एकमेकांना अनुरूप होते... प्रशांत म्हणाला..

"मामा! मुलीच्या आईशी काय करायचं आहे .. मुलीबद्दल तर काही वाईट ऐकलं नाही ना?? झालं तर मग.."

मग आम्ही ह्या चर्चेला विराम दिला. ताई आणि मी दोघेच भावंड, आईबाबांच्या नंतर आम्हीच एकमेकांना होतो... त्यामुळे आम्ही चांगले पंधरा दिवस आधी लग्नाच्या तयारीला गावी गेलो. योगायोगाने शेजारच्याच गावात शिक्षक असणारा माझा मित्र बसमध्ये भेटला आणि प्रवासभर आमच्या गप्पा सुरु झाल्या. प्रशांतच्या लग्नाविषयी त्याला सांगितलं आणि आग्रहाचे आमंत्रणही देऊन टाकलं... देशपांडे सरांची मुलगी आहे हे कळताच त्याचा चेहरा खर्रर्रकन उतरला.. थोडा वेळ स्वतःशीच विचार करत तो शब्दांची जुळवाजुळव करू लागला...

"नीट चौकशी केली आहे ना तुम्ही? म्हणजे आता बोलू का नको तुझ्याजवळ.."

मीच त्याला काय ते स्पष्ट सांगण्याची विनंती केली...
" माझ्याच घरमालकांची सून म्हणजे देशपांडे सरांची मोठी लेक मानसी... आईचा प्रचंड पगडा होता मुलीवर.. सर तर थरथर कापायचे बाईला... बाई जमदग्नीचा अवतार. पहिल्यांदा माहेरहून आली तर मानसीच डोकं बिथरलं होतं... प्रकरण खूप चिघळलं.. अगदी टाकून देण्यापर्यंत वेळ आली..मग मध्यस्थाने लक्ष घालून मिटवलं.. दुसरीही लेक चार वर्षे माहेरीच होती .. तेही मॅटर नुकतंच मिटवलं सरांनी... दोन्ही जावई एव्हढेच काय सासरचे कुणीच देशपांडेंकडे जात येत नाही.. अतिशय भयंकर बाई आहे..."

माझ्या पायाखालची जमीनच सरकली... वर तो म्हणाला..

"तुझा भाचा तो माझाही भाचा .. म्हणून काळजीपोटी सांगितले बाबा.. मात्र माझं नाव मध्ये घालू नकोस ..ती बाई आमच्याकडे तमाशा करायची... गल्लीत सगळ्यांशी भांडली आहे म्हणे ती..."

मी उदास मनानेच घरी परतलो.. ताई आणि भावजींना सगळी परिस्थिती समजावून सांगितली... "हे लग्न मोडावे" असे स्पष्ट मत सुद्धा मांडले.. आता काही दिवसांवर लग्न आले असतांना प्रशांत ते मोडायला तयार नव्हता.. शिवाय सांगोवांगी गोष्टी कितपत खऱ्या असतात?? लग्न मोडायला ठोस कारणही नव्हतं... अखेर लग्न झालं... प्रशांत आणि मुक्ता आनंदात होते..मुक्ता गावी आली की चांगली वागायची ...दोघांचं बरं चाललं होतं.. हे बघून माझ्या जीवनात जीव आला.

पुण्यालाही आमचे एकमेकांकडे येणे जाणे होतेच... मुक्ताच्या स्त्री स्वातंत्र्याच्या कल्पना जरा गडद होत्या .. म्हणजे पुण्याच्या घरी दोघांची कामे अगदी वाराप्रमाणे वाटून घेतलेली होती.. बाकीच्यांना ह्याचे नवल वाटत असेल पण दोघे नोकरीत म्हटले की हे ओघाने आलेच.. तशी प्रशांतला सगळ्या कामांची सवय होतीच. सहा सात महिने आनंदात गेले... स्त्रियांना होम लोनचा एक टक्का कमी व्याजदर लागतो म्हणून प्रशांतने मुक्ताचेही नाव घरावर जोडून घेतले... पहिले वर्ष सणवार , गावी जाणे येणे, फिरणे ह्यात सहज निघून गेलं. लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करायला प्रशांतने उटीचे बुकिंग केलं... आणि निघण्याच्या आदल्या दिवशीच सासू सासरे घरात हजर... मुक्ताच्या आईचा पाय मुरगळला असे क्षुल्लक निमित्त पुढे करून ते आले होते..प्रशांतने , 

"त्यांना राहू दे आपण ठरल्याप्रमाणे चार दिवस  फिरून येऊ असे सुचवले."

मात्र मुक्ताने स्पष्टपणे नकार दिला...

"माझ्या आईच्या जागी तुमची आई असती तर..."

"तरीही मी हेच म्हटलं असतं..." प्रशांत उत्तरला शब्दाला शब्द वाढत गेला आणि कडाक्याचे भांडण झाले...

उटीचे बुकिंग रिफंड होणार नव्हते.. पैसे वाया जाऊ नये म्हणून प्रशांतने ते मला आणून दिले... मधल्या मध्ये आम्हीच दोघे उटी फिरून आलो... एव्हाना चार दिवसांत भांडण आणि अबोल्याने रौद्र रूप धारण केले होते... मी कसेबसे दोघांची समजूत घालून आलो... कुरबुरींना सुरुवात झालीच. मुक्ताची आई काय शिकवायची कोण जाणे पण मुक्ता सतत रुसून तरी बसायची किंवा भांडत तरी असायची .. दोन महिने झाले तरी सासू सासरे गावी परत जायचं नाव घेईनात तेव्हा प्रशांतने विषय काढला असता..

"मुक्ता आमची मुलगी नसून मुलगाच आहे.. आम्ही तिच्या शिक्षणासाठी एव्हढा खर्च केला... " 

वगैरे मुक्ताच्या आईने बोलून दाखवले.. चार महिन्यांनी तर त्यांनी गावाकडच घरच विकायला काढलं.. प्रशांतच्या घरात शांतीपूजा न झाल्यानेच असे होते आहे असे आमच्या ताईसाहेबांना वाटल्याने तिने पूजेचा घाट घातला... सगळे पाहुणे जमले.. आतापावेतो मुक्ताचे डोके फिरून गेलेले होते... एक बेडरूम तिच्या आईवडिलांनी बळकावून ठेवली होती .. सासूबाई मुळीच तिथून हलत नसतं.. आमची बिचारी ताई स्वतःच्या लेकाच्या घरात किचनमध्ये झोपायची.. सकाळी घाईघाईने आंघोळ उरकून पूजेला बसायला निघालेल्या प्रशांतने...  त्याच्यापाठी आंघोळीला जाणाऱ्या मुक्ताला आपले बनियन अंडरवेअर पिळून टाकण्यास सांगितले.. मुक्ताने सगळ्यांच्या देखत डस्टबिन मध्ये ते पेटवून दिले..
आणि पहिला झटका बसला... आम्ही सगळेच अवाक झालो.. मुक्ता टोकाच्या शांतपणे म्हणाली..

"पूजा तुझ्या आईला करायची आहे प्रशांत, कपडेही तुझेच होते...यापुढे मला अशी अपमानास्पद वागणूक दिली तर उद्या कपड्यांच्या जागी मी स्वतःला पेटवून घेईन... तुम्हा सगळ्यांना आयुष्यभरासाठी तुरुंगात सडवत ठेवण्याची व्यवस्था करून..."

तिचा एकेक शब्द आम्हाला हादरवून सोडत होता...आपल्या मुळे लेकाच्या संसारात अडचण नको म्हणून ताई आणि कुटुंबीय लगेच गावी परतले... दिवसेंदिवस प्रशांत आणि मुक्ताच्या नात्यामधील ताण वाढत गेले... एक दिवस खंगलेला, दाढी अस्ताव्यस्त वाढलेला प्रशांत माझ्याकडे येऊन रडू लागला..

"मुक्ता अंगाला हात लावू देत नाही. सतत भांडते, सतत जीव देण्याची धमकी देते...मुक्ता रोज उशीखाली सुराच घेऊन झोपते..."

बिचारा प्रशांत हल्ली हॉलमध्ये झोपायचा..मी शेवटी देशपांडे सरांशी ह्या विषयावर सविस्तरपणे चर्चा केली.. आणि त्यांनी गावी परत जावे अशी विनंती केली... माणूस सगळे जाणून होता.. इतके वर्ष मुलींकडे पाहून त्यांनी त्या भांडकुदळ बाईशी जुळवून घेतले होते.. त्यांनी गावी परत जायचे घरी डिक्लेअर केलं आणि मुक्ता आणि तिच्या आईने रौद्ररूप धारण केलं... पोलीस स्टेशनला जाऊन मुक्ताचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याची तक्रार त्या नोंदवून आल्या.. प्रशांतला चौकशीला पोलीस स्टेशनला बोलवून चांगलाच दम देण्यात आला... कसंबसं मी त्याला सोडवून आणलं.. घरी येताच विकृत हसत मुक्ता म्हणाली..

"काय मामा! झाला का पोलिसांचा पाहुणचार .. पुन्हा माझ्या वडिलांना दम देऊन गावी जायला सांगितले तर तुमच्या भाच्याला आयुष्यातून उठवेन .."

आम्ही दुसऱ्याच दिवशी तडक वकील गाठला... मानसिक छळाचे कारण पुढे करत... मुक्ताला डिव्होर्सची नोटीस पाठवली... असे भेदरून दडपणाखाली प्रशांतने कसे जगावे ? आणि किती दिवस? नोटीस मिळताच... मुक्ताने शांतपणे सांगितले..

"प्रशांत तुझ्यासारख्या बुळ्या बरोबर मला संसार करण्यात काडीचाही रस नाही.. तू घर सोडून जा मी लगेच सह्या देते... मग तू मोकळा मी सुद्धा मोकळी.."

ज्या घराचे हप्ते प्रशांत भरत होता त्यासाठी ताईने दागिने मोडले ते घर प्रशांतने का सोडायचं.. आम्ही उलट तिलाच घर खाली करण्याची नोटीस दिली.. त्या रात्रीही भांडण वाढत गेले आणि तिने अंगावर रॉकेल ओतून घेतले.. 

"लावू का काडी?? लावू.. लावू ? ..." 

म्हणत प्रशांतला घराबाहेर काढलं. .. नेसत्या कपड्यानिशी...त्या मध्यरात्री प्रशांतला मी माझ्या घरी घेऊन गेलो ... आता आम्ही त्याचे घर त्याला मिळावे म्हणून प्रयत्न करत आहोत... मुक्ताने डिव्होर्स द्यायला नकार दिला आहे.. तिच्या मते प्रशांतने घरी येऊन रहावे... तिला भाऊ नसल्याने वृद्ध आईवडील तिची जबाबदारी आहेत आणि ह्याची तिने लग्नापूर्वीच कल्पना दिली असल्याचेही तिने कोर्टाला सांगितले... कोर्टाने प्रशांतला त्याच्या घरी जाण्याचा हक्क दिला पण प्रशांत मुक्ताच्या मानसिक छळाला आणि जीव देण्याच्या धमक्यांना अतिशय घाबरून गेला आहे... त्याला मुक्ता आणि तिच्या आईवडिलांनी घर रिकामे करून द्यायला हवे आहे....  मात्र हे डिव्होर्स होईपर्यंत शक्य नाही त्यात मुक्ताचेही नाव घरावर लागले असल्याने ती हक्क सोडत नाही तोवर घर तिचेही आहेच...
असा हा सगळा गुंता होऊन बसला आहे....
कोणत्या चुकीची शिक्षा भोगतोय प्रशांत?? साधं सरळ असल्याची की बायकोचं नाव घराला जोडल्याची...??? की
चौकशीत अनेकांनी विरोध करूनही लग्न केलं त्याची...??

✒️ यशश्री रहाळकर