फॉलोअर

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

बहार येईल!


बहार येईल!

खुल्या आभाळाखाली उपाशीच झोपलेली चिमुरडी म्हणाली,
ह्या चांदण्यांच्या ठिणग्या पेटल्या रसरशीत... 
आणि ... चंद्राची टम्म फुगलेली भाकर झाली तर ...
काय बहार येईल!

तिचा नवरा दुर्गा देवीचा निस्सीम भक्त...
शतचण्डिच्या अनुष्ठानाला शेजारी बसल्यावर तिला वाटलं,
ह्या वेळी तरी मुलीला जन्माला येऊ दिलं तर ...
काय बहार येईल!

तिच्या देहावर पांचट शेरेबाजी करणाऱ्या ग्रुपची..
बॉस म्हणून प्रमोट झाल्यावर तिला वाटलं,
ह्यांनी कधीतरी मला माणूस मानलं तर  ...
काय बहार येईल!

संसारासाठी गुडघे झिजेपर्यंत धावपळ केल्यावर
उतारवयात थकून गेलेल्या तिच्या मनात आलं,
आत्ता मला कुणीतरी आयता घोटभर चहा दिला तर ...
काय बहार येईल!

उठसूठ रुसून बसत तोरा मिरवणाऱ्या वरमायकडे पाहून..
मुलीची आई बोलती झाली... 
माझ्या लेकीला ह्यांनीही लेक मानलं तर ...
काय बहार येईल!

पाठच्या बहिणीला छेडणाऱ्या टवाळाला..
यथेच्छ चोपल्यावर तिला वाटलं...
ह्याच्या आईने ह्याला 'स्त्री'चा सन्मान शिकवला तर ...
काय बहार येईल!

जावेच्या डोहाळजेवणाला वांझोटी म्हणून,
तिला अशुभ म्हणत घरातल्या घरात टाळलं
त्यापेक्षा बाळाची यशोदा आई म्हणून बोलावलं तर ...
काय बहार येईल!

वडिलांना न दुखावता गुपचूप आईकडे पैसे देणाऱ्या लेकीला आणि ....
लग्नानंतर वेगळ्या निघालेल्या लेकाला आठवत वडील म्हणाले...
लेकीलाच म्हातारपणाची काठी मानले तर...
काय बहार येईल!

आयुष्यभर कुजकट टोमणे आणि सतत पाणउतारा केलेल्या,
पाय मोडून अंथरुणावर पडल्यावर मनापासून सेवा करणाऱ्या सुनेला पाहून सासू म्हणाली...
वाईट वागूनही ही इतकी चांगली वागतेय हिच्याशी चांगलीच वागले तर ...
काय बहार येईल!

नवरात्रात देवीची मनोभावे पूजा करतांना..
प्रत्यक्षात प्रत्येक स्त्रिला गुलाम म्हणून न चिरडता 
माणूस म्हणून सन्मान दिला तर ...
काय बहार येईल!

यशश्री रहाळकर

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

मी आणि तू

मी आणि तू

मी ...सळसळती पारंबी अन् तू... ध्यानस्थ फकीर

मी... वाऱ्याला कवटाळणारे उन्मुक्त सृजन
तू... वैराग्याला कवटाळणारे विफल चिंतन

तुझा आत्मशोध वगैरे सुरू.. देहापल्याड जाणारा
माझा घुटमळ  वावर फक्त देहात मावणारा

क्षणभर काय टेकलास तू ह्या वडाच्या पारावर..
जीव गुंतून पडला तुझ्या तेजस्वी देहावर.

वाटले तुझी एक जटा होत लुप्त व्हावे... 
तुझ्या ह्या तेजपुंज अस्तित्वात विरून जावे.

पण लगेचच लक्षात आले... तुला कोणत्याच गुंत्यात गुंतायचं नव्हतं
कुणाच्याच सोबतीनं तुला चालायचंच नव्हतं

सर्वस्वाचा त्याग करून कोणता ईश्वर शोधत होतास कुणास ठाऊक??
कदाचित त्याचा नी माझा ईश्वर निराळा असावा.

त्याच वडाच्या पारावर.... फकीर मस्तकावरचे सारे केस अर्पण करून चालता झाला.
वाऱ्यावर उडणाऱ्या त्या जटांमध्ये पारंबी अजून गुंतून पडली आहे.

मी सृजनाची पारंबी ... मला मुक्त होता येत नाही.
तू विरागी फकीर ... तुला बांधता येत नाही.
यशश्री रहाळकर

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०

इह जन्मनी ... जन्मांतरेच!

स्मशान ही अशी जागा असते जिथं तुमच्या कोण जवळचा आहे ,कोण दूर आहे ... आणि कोण पाठीशी उभा आहे हे प्रकर्षाने जाणवते. माणसा- माणसांतील अंतरे मोजण्याचे कोणतेही परिमाण उपलब्ध नसले तरी स्मशानाची फुटपट्टी तुम्हाला माणसांची, नातेवाईकांची आणि सो कॉल्ड आप्तेष्टांची खरीखुरी ओळख पटवून देत असते. बाबांना जाऊन पंधरा दिवस झाले... ह्या पंधरा दिवसांनी मला माणसांचे खरेखुरे चेहरे दाखवले.... आपले आपले म्हणत ज्यांच्यासाठी जीवाचं रान करतो ते खरंच आपले असतात का? जाणारा व्यक्ती तर केव्हाच काळाच्या पल्याड गेलेला असतो... मागे राहतं त्याचं शरीर.  डेड बॉडी ... आपल्या भवतालच्या असंख्य पसाऱ्यातली एक निर्जीव वस्तू... अशी वस्तू जी अत्यंत पेरिशेबल आहे... योग्य समारोप न केल्यास अनेक रोगराईचे मूळ होऊ शकते ... मात्र हा तो देह असतो जो काही क्षणांपूर्वी आपला जिव्हाळ्याचा कुणीतरी असतो.... म्हणूनच हा अंतिम निरोप जितका आवश्यक तितकाच अवघड, नकोसा असतो.... बाबांचा मृत्यू अत्यंत सहज ,नैसर्गिक असला तरी लोकांना हजारो प्रश्न पडलेले होते... सांत्वनाचे म्हणून येणारे फोन अनेक सुरांत बोलायचे... काही मृतदेहाची कोरोना तपासणी करून घ्यायला सांगत होते तर काही आम्हाला किती दुःख झाले हे पटवून द्यायच्या प्रयत्नात होते..... काहींनी काहीही विधी करूच नका असा सल्ला दिला तर काहींना आम्हाला बोलावून संकटात पाडू नका असे सांगायचे होते. त्यांची भीती, त्यांना वाटणारी काळजी, त्यांना झालेले दुःख.... ह्या साऱ्या पसाऱ्यात आमचे दुःख मुकाट्याने एका कोपऱ्यात हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवून बसले होते. कोरोनाच्या ह्या जीवघेण्या पार्श्वभूमीवर कुणी भेटीला यावे अशी अजिबात अपेक्षा नव्हती... सगळ्यांसमोर आरोग्याच्या अनेक विवंचना आहेत , तसे येणे सगळ्यांच्या दृष्टीने धोक्याचे आहे.... सारे सारे अगदी सहज मान्य करण्याजोगे आम्ही सारेच सूज्ञ आहोत... मग ही गोष्ट लोकांना कंठशोष करून पटवून का द्यावी लागत होती?? कोण जाणे. बहुतेक फोन आमची खूपच इच्छा असूनही येऊ शकत नाही हे convince करणारे होते. It's OK!  तुमच्याजागी मी असते तरी आलेच नसते.... ह्यात काही चुकीचे नाही. 

पंधरा दिवसांनी नाशकातली एका दूरच्या नातेवाईक बाईंचा फोन आला... आता दूरच्या म्हणूयात... सुरुवातीला नमनाला घडाभर तेल घालत .. आमच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी कसे येणे टाळले ... त्यांना त्यांच्या जीवाची चिंता नाही पण माझ्या घरी वृद्ध लोक आहेत त्यांची काळजी म्हणून त्या कश्या आल्या नाहीत वगैरे साद्यंत सांगितल्यावर हळूच तिकडचे कुणी आले होते का? कोण कोण होते? वगैरे चौकशी CID style सुरू झाली. "कुणीच आले नव्हते म्हणजे तेच योग्य आहे नाही का!" असे उत्तर मिळताच ..

 "शेजारी पाजारी तरी जमले होते का?की....(एक दीर्घ पॉज) " 
 
असा अत्यंत खोचक प्रश्न त्यांनी विचारला.. पूर्वीची मी असते ना तर त्या बाईंची दातखीळ बसेपर्यंत ऐकवले असते... पण मी म्हटले ना आता मला राग येत नाही... कीव वाटते... पुढचे 15 मिन मी शांतपणे त्यांच्या सगळ्या खोचक प्रश्नांची उत्तरे दिली.  पंधरा दिवसांनंतर माझ्या बाबांच्या अंत्यविधीला किती माणसे होती हे विचारून काय मिळणार होते ? की महानगरपालिकेच्या गाडीने उचलून नेले असे त्यांना विचारायचे असावे..... त्यांच्या आणि माझ्या सुदैवाने माझे खांदे समर्थ होते आणि जोडीला माझे पती आम्ही दोघे पुरेसे होतो... बाबा असतांना अगदी वेळ आली तेव्हा मी एकटीने त्यांना उचलून सगळे काही केले होते.... आता तर ते नश्वर देहात उरले होते... त्यांना गाडीत/ ऑटोमध्ये बसवतांना त्यांचे डोके धडकू नये म्हणून मी कायम डोक्यावर हात ठेवायचे, हळुवारपणे प्रेमाने आधार देत त्यांना न्यायचे... आता त्यांनाही आधार नको होता आणि माझ्याच डोक्यावरचा हात त्यांनी केव्हाच काढून घेतला होता. 

बाबांनी आयुष्यभर मला माणसं जोडायला सांगितले.. ते स्वतः खूप लोकांना धरून होते ...मी मात्र एकलकोंडी आणि फार कुणाशी जमवून न घेणारी... त्यांच्या सुदैवाने आणि माझ्या पूर्वपुण्याईने मला कधीही मदतीची गरज लागली आणि अर्ध्या रात्री दार वाजवले ना तरी धावून येणारे शेजारी लाभले... ते असतांना त्यांना हॉस्पिटलाईझ करतांना अनेकदा चार जणांना आवाज द्यावा लागला आणि तेही काळ वेळ न पाहता धावून आले... त्यांच्या पश्चातही माझे शेजारी, माझ्या मैत्रिणी, ह्यांचे मित्र खंबीरपणे पाठीशी उभे होते. शेजारच्या काकू शेवटपर्यंत आईसोबत बसलेल्या होत्या... माझी 90 कुटुंबांची सोसायटी... सगळे भेटीला आले शेवटपर्यंत थांबले , नंतरही पुन्हा येऊन भेटून गेले. तीन दिवस चहा, नाश्ता ,जेवण अगदी वेळेवर गरमागरम आणून दिलं... माझ्या घरातील वयस्कर लोकांची जराही आबाळ होऊ दिली नाही. काळवेळ पाहून दोघी मैत्रिणींनी आपल्या नवऱ्याला सुट्ट्या काढायला  सांगितले... आमचे जुन्या घरचे शेजारी काका सावलीसारखे अखंड ह्यांच्यासोबत होते... अगदी पहिल्या दिवसापासून ते 14व्या पर्यन्त. माझ्या पाठीवर हात ठेवायला माझ्या मैत्रिणी धावून आल्या... त्यातल्या दोघी जणींकडे तर गेल्या महिन्यांत सासू आणि वडील गेले तरी मी भेटायला जाऊ शकले नव्हते.... ते त्यांनी मनात अढी करून ठेवलेले नव्हते. त्यातल्या दोघींबद्दल तर दीर्घकाळ ...माझ्या मनांत गैरसमजाचे हजारो विषारी नाग मी पाळून ठेवले होते... "ताउम्र तेरी मुहोब्बत की गुलामी कुबूल है।" असं एका शायराने म्हटले होते ते पटले नव्हे अनुभवले. काय संबंध होता ह्या सगळ्या लोकांचा माझ्या बाबांशी??  माझ्याशी तरी कोणतं नातं होतं?? कोरोनाची भीती त्यांनाही होतीच की, त्यांचीही लहान मुलेबाळे होती, त्यांच्याही घरी वयस्कर लोक होते... पण कदाचित ह्या भीतीपेक्षा माझ्यावरील त्यांचे प्रेम काकणभर अधिक होतं. मी गळ्यात पडून रडले तेव्हा किंवा माझ्या पाठीवर धीराचा हात फिरवताना त्यांना कोरोनाची आठवण झाली नाही तर आपल्या आधाराची हिला गरज आहे एव्हढेच त्यांनी समजून घेतलं. मैत्री हे जगातलं सगळ्यांत पवित्र नातं आहे कारण ते कोणत्याही समस्या घेऊन येत नाही उलट चटकन समस्या सोडवतात, शंका /प्रश्न उपस्थित करत नाही, मान-अपमानाची तलवार परजून घावही घालत नाहीत.

खरं सांगते... ह्या जगातली सगळ्यांत महागडी गोष्ट आहे रडायला खांदा मिळणे.... कितीही किंमत मोजली तरी हा खांदा कुठेही विकत मिळत नाही. तो तुमचा तुम्हालाच कमवावा लागतो.... बाबा जाता जाता आयुष्यभर पुरणारी शिदोरी देऊन गेलेत. आयुष्यात माणसं जोडणे खूप महत्वाचे आहे.. वेळेला कोण /कधी/ कुठून..... आपल्यासाठी नक्कीच धावून येतो. बाबांच्या शेवटच्या निरोपाला त्यांच्या कुलगोत्राचे म्हणावे असे कुणीही नव्हते... म्हणजे आई दुसऱ्या गोत्रातून आलेली आणि मी दुसऱ्यात गोत्रात गेलेली... मात्र आमचे शेजारी, माझ्या मैत्रिणी, ह्यांचे मित्र , ऑफिसमधील कलीग ह्या सगळ्यांचे ह्याच जन्मीचे नाहीत तर जन्म-जन्मांतरीचे काहीतरी नाते निश्चित असणार ह्याची मला खात्री आहे. नातं म्हणजे मान-अपमान ,इगो ,मोठेपणा नाही तर आपलेपणा आणि निखळ प्रेम. 

बाबांचे सगळे दिवस मी विधिवत केले मी स्वतः घाटावर जाऊन रोज प्रत्येक विधीचा आणि मंत्रांचा अर्थ गुरुजींकडून समजावून घेतला... अगदी मंत्राग्नि म्हणजे काय, विवाह वेदिवरील अग्नी आमंत्रित करून त्याचे विच्छेदन केले जाते ...तो अर्धाच अग्नी त्यांच्या मालकीचा असतो... मही श्राद्ध नावाची फार सुरेख कल्पना आहे... ज्या धरणीने आजवर गत व्यक्तीच्या देहाचे भरणपोषण केले तिचे आभार मानले जातात. सपिंडी श्राद्ध म्हणजे वरील तीन पिढ्यांमधील पितरांमध्ये गत व्यक्तीला समाविष्ट केले जाते... ह्या वेळी प्रेत योनीतून पितृस्थान प्राप्त होते. तेराव्याचे श्राद्ध, चौदाव्याचा होम मंत्रोच्चारण ह्या साऱ्यांमुळे घरावर आलेले दुःखाचे सावट मोकळे होण्यास मदत होते. ह्याविधी निरर्थक नाहीत तर ह्या विधींमध्ये दुःख पिऊन टाकण्याची ताकद आहे... हे सारे विधी देह नश्वर आहे पण आत्मा अविनाशी आहे हेच सांगत असतात. आत्मा कुणी पाहिलाय...? पण आठवणी आहेत ना!  गेली तीन वर्षे सोडली तर बाबांच्या शेकडो आठवणी आमच्यापाशी आहेत.

 सकाळी उठून चहा करणारे बाबा... बाबा अप्रतिम चहा करायचे त्यांच्या सारखा चहा फक्त त्यांच्या एका मामेबहिणीला करता येतो बाकी कुणालाच नाही ..... भरपूर दुधाळ आणि तरीही कडक. बाबा स्वयंपाकसुद्धा उत्तम करायचे, आईची बदली झाली असल्याने ,मी कणिक भिजवणे,पोळ्या करणे आईकडून नव्हे तर बाबांकडून शिकले ... बाबा आयुष्यभर स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे , शुभ्र परीट घडीचे. त्यांचं वाचन अफाट होतं... सर्वंकष होतं... मला वाचनाचं व्यसन आहे ते त्यांच्यामुळेच. "वाचनाचं व्यसन " हा त्यांचाच शब्द ... हातात घेतलेलं पुस्तक मी संपवल्याशिवाय खाली टेकवत नाही...  बाबा म्हणायचे, "हिचं बेवड्या सारखं आहे बाटली संपेपर्यंत हलणार नाही☺️" कित्येकदा मी रात्रभर पुस्तक वाचायचे तर दोन वेळा उठून कॉफीचा कप त्यांनी माझ्याजवळ ठेवलेला असे. ते सार्वजनिक वाचनालयाचे कार्य सामाजिक कार्याच्या भावनेतून करत, मग ताजी पुस्तके म्हणजे माझी दिवाळी असे.  लोकसत्ताची शनिवारची पुरवणी चतुरंग मला जाम आवडायची, ते व्यवस्थित सगळ्या पुरवणीचा गठ्ठा बांधून ठेवत... मी सुट्टीत घरी आले की तो घेऊन बसायचे. बाबा माझे खूप चांगले मित्र होते... त्यांच्याशी कोणत्याही विषयावर बोलताना भीती वगैरे कधी वाटलीच नाही.  मला कधीच कोणती गोष्ट मागावी लागली नाही किंवा हट्ट तर करावाच लागला नाही... आधीच ती वस्तू बाबांनी आणलेली असे, मला एखाद्या राजकन्येसारखं वाढवलं त्यांनी.... अगदी आत्ता आत्ता पर्यंत कपड्यांच्या दुकानात नेऊन  "काय घ्यायचं ते घे ग ! बापाची पेन्शन वाढलीये..." असं म्हणणारे बाबा जसेच्या तसे आठवतात मला. माझ्या जन्माच्या वेळी आईच्या काकूंनी त्यांना आधी मुलगा झाल्याचे सांगितले मग थोड्या वेळाने मुलगी झाली असे कसे सांगू असे त्यांना वाटून त्या भीत भीतीच बाबांकडे आल्या तर बाबा खळखळून हसत म्हणाले, "त्यात काय झाले? मुलगा काय नि मुलगी काय.. काही फरक पडत नाही मला... बाळ आणि आई ठीक आहे ना!"  बाबा आयुष्यभर आपल्या शब्दावर ठाम राहिले... मी मुलगी आहे म्हणून वाढवतांना त्यांनी काहीच फरक केला नाही. मी दहा वर्षांनी असेन...  मी वगळता आजूबाजूच्या सगळ्यांना भावंडे होती मी त्यांना विचारले ,"मला का बहीण किंवा भाऊ नाही हो? " 
 
  बाबा म्हणाले, "तू देवाचा प्रसाद आहेस. प्रसाद एकदाच घेतात सारखा सारखा हात पुढे करून मागायचा नसतो." 
  
तेव्हा कितपत कळलं होतं कोण जाणे ?...पण बाबांकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे होती.. ते चिडून कधी अंगावर ओरडले नाही. एक दिवस मी मुकेशची त्यांच्या आवडीची सगळी गाणी ऐकत बसले ..  मी इतकेदा आजवर ती ऐकली होती की मला ती मधल्या म्युझिक सहीत तोंडपाठ झाली आहेत...खूप गोष्टींची उजळणी करायची आहे पण ती करण्यापूर्वी ह्या तीन वर्षांना कुठेतरी भिरकावून गाडून टाकायचे आहे... म्हणून हा लेखप्रपंच.  आपला आनंद जर शब्दांमधून व्यक्त होऊ शकत असेल तर दुःख सुद्धा शब्दांत मावत असणार... मनांत बोचणारे सारे क्षण धुवून टाकतं मन स्वच्छ केलंय मी ... बाबा नीळ देऊन शुभ्र कपडे चमकवायचे तसं. आता त्यांच्या सगळ्या हव्याहव्याश्या आठवणींची आवर्तने सहज करता येतील.

बाबा! तुमच्या स्मरणाशिवाय एकही आनंदाचा क्षण येणार नाही ह्याची खात्री आहेच ; पण त्या प्रत्येक क्षणी येणारे तुमचे स्मरण अनेक आनंदाच्या क्षणांचा आठव करून देणारे असेल , अशी ग्वाही माझं मन मला देतंय. सदैव प्रसन्न असणारे, मनमोकळ्या गप्पा मारणारे, खळखळून हसणारे, यारों के यार .... बाबा तुम्ही चिरकाल स्मरणात आनंदाचा गाभा बनून राहाल... विनम्र अभिवादन!
🔏©️यशश्री रहाळकर

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

इह जन्मनी ... भाग २


बाबांच्या पिंडाला लगेच काकस्पर्ष झाला.. तो तसा लगेच होणार ह्याची मला खात्री होती...  कारण त्यांच्या कोणत्याही इच्छा बाकी राहिल्या नव्हत्याच... कुणाचीही काळजी करण्याच्या केव्हाच पलीकडे ते पोहोचले होते. आयुष्याच्या हिशोबातली त्यांची नफा तोट्याची गणितं वेगळी असावीत... ते अतिशय शांत, संयत वृत्तीचे आणि जे मिळाले त्यात समाधान मानणारे होते.  कशासाठी हटून बसणे त्यांच्या स्वभावात नव्हतेच .. ते अखेर तरी कसे होईल. मुळात कुणाची अडवणूक करणे हे त्यांच्यासाठी अशक्य होते... कदाचित म्हणूनच त्यांच्या दुखण्यातून सुटका व्हावी यासाठी ते सतत धडपडत होते... त्यामागे त्यांचे आमच्यावरील आत्यंतिक प्रेम हेच कारण ! आपल्या आजारपणामुळे सगळ्यांची आयुष्ये वेठीला धरल्या गेली आहेत... असा एक दुखरा कोपरा त्यांनी आपल्या हृदयात निर्माण करून ठेवला होता... त्या कोपऱ्यात रोज रोज.... अखंड ते निराशेची पणती तेवत ठेवायचे. 

बाबांनी आयुष्यभर संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसावर प्रेम केलं, सगळ्यांना जीव लावला.. त्यांनी अक्षरशः माणसं प्रेमाने बांधून ठेवली.  कुणालाही मदत करतांना ते मागेपुढे पाहत नसत... त्यांचा मित्रपरिवार मोठा होता... आणि मैत्री कित्येक दशकांची. अगदी माझ्या जन्माआधी कधीतरी चिखलीला असतांना त्यांचे सहकारी मित्र अजूनही संपर्कात आहेत... विशेष म्हणजे ते आजारी पडल्यावरच्या काळात अत्यंत आपलेपणाने त्यांचे मित्रमंडळ येऊन भेटून गेले होते... जो तो आपापल्या सोयीप्रमाणे आला पण एक समान दुवा म्हणजे... त्यांना भेटायला म्हणून येणारे सगळे मित्र मस्त ऐसपैस बसायचे गप्पा मारायचे ,जेऊन जायचे तिथे कुणी डॉक्टर आहे, मोठ्या पदावरून निवृत्त झालाय की कुणी व्यावसायिक ह्याने फरक पडत नव्हता. ते खास बाबांसाठी म्हणून इतक्या लांब यायचे... दिवस सोबत काढत, जुन्या आठवणींना उजाळा देऊन परतायचे.  अश्या वेळी गाल खोल खोल शिरून खप्पाड झालेला बाबांचा चेहरा आगळ्या तेजाने उजळून निघायचा. ह्या तीन वर्षांत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहिला तो तेव्हाच. 

बाबांच्या उजव्या बाजूकडील मेंदूला रक्तपुरवठा अत्यल्प होता... हळूहळू घटत जाऊन तो 40% इतका कमी झाला. मात्र डावीकडील स्मृती आणि भाषेची केंद्रे उत्तम शाबूत असल्याने ते बोलू शकत होते ... स्मरण देखील अगदी उत्तम होते .ते शेवटपर्यंत व्यवस्थित बोलत होते मात्र बरेचदा दोन वाक्यांमधील कोरिलेशन संपले होते... एकूणच उजव्या बाजूकडील अनेक कंट्रोलिंग युनिट उध्वस्त झाल्याने हात उचला म्हटले की पाय उचलला जाणे, कुशीवर वळता न येणे, मान उचलण्यास वेळ लागणे ... दोन महिने त्यांना अन्न चावता येणे सुद्धा जमत नव्हते तेव्हा नळीने अन्न द्यावे लागे.... मात्र सुदैवाने हळूहळू तोंड हलवून घास चावणे त्यांना जमू लागले... असे बरेच गुंतागुंतीचे प्रकार झाले होते...त्यातली सगळ्यांत गंभीर बाब म्हणजे नैसर्गिक युरिन पास होण्याचे सिग्नल्स बंद होणे... बाबांची ह्यामुळे अक्षरशः फरपट झाली. 4 प्रकारच्या तज्ञांना दाखवल्या नंतर आणि ढीगभर टेस्ट केल्यानंतर  त्यांच्या किडनी उत्तम आहेत, प्रोस्टेट ची समस्या नाही तर सिग्नलिंग बंद झाले आहे .. हे कदाचित कधीच सुरू होणार नाही ह्या निकषावर आम्ही आलो... शेवटचे दीड वर्ष ते इंटर्नल कॅथेटर वर होते. जिवंतपणी नरकयातना भोगणे काय असते हे याची डोळा पाहिले आहे... प्रचंड तगमग , जीवघेणी तळमळ .... बाबा गेले आणि वेदनेची परिक्रमा संपली. बाबांसारख्या सहृदय माणसाच्या, आयुष्यात कधीही स्वार्थीपणा न केलेल्या, दुसऱ्याबद्दल वाईट विचार सुद्धा मनात न आणलेल्या व्यक्तीच्या वाट्याला एव्हढे भोग.... पांडुरंगा! माझ्या तर पापांच्या राशीच आहेत.

ते सातत्याने सुटकेचे विचार बोलून दाखवायचे... आमच्यासाठी हे नवे नसले तरी ज्या कुणाला फोन केला ती व्यक्ती घाबरून जात असे... नाईलाजाने त्यांचा फोन आम्ही काढून बंद करून ठेवला. ह्यातही आम्ही त्यांना कुणाशी बोलू देत नाही असा सोईस्कर अर्थ अनेकांनी घेतला... मला हल्ली माणसांचा राग येत नाही त्यांची कीव वाटते... बाबांच्या आजारपणातील हिमनगाचं टोकही माहीत नसलेल्यांनी मला कितीही बोधामृत पाजले तरी काय फरक पडतोय? जाणारा माणूस निघून जातो आणि त्याच धारेवर लोकांचे मान अपमान, इगो तासले जातात हे मला नवीन नाही. बाबा गेले आणि आभाळच फाटलं... आता लहान मोठ्या इवल्या भोकांची पर्वा मी करत नाही. बाबांना मेहकरला जायची ओढ सुरुवातीच्या काळात होती , बऱ्याच लोकांनी त्यांना मेहकरला आणल्यावर बरे वाटेल असे सुचवले. त्याप्रमाणे आम्ही त्यांना नेलेही पण ते घर वर-खाली असल्याने त्यांना वावरणे अवघड वाटू लागले आणि दोनच दिवसांत "मला नाशिकच्या घरी न्या" असा हट्ट त्यांनी धरला. एप्रिल महिन्यापर्यंत बाबा घरात चांगले चालायचे... मात्र नंतर त्यांची स्थिती खालावत गेली.

बरेचदा सोडियम कमी झाल्याने किंवा युरिन सॅच्युरेट झाल्याने ...त्यांना भास होत असत ... पुढे पुढे त्याचे प्रमाण इतके वाढले की ते 70 ते 80 आता दशकात कुठेतरी जगायचे... आई आणि मी त्यानंतरच्या आयुष्यात आलेलो... त्यामुळे आम्हीच शेवटी हद्दपार झालो 😢 ते बरेचदा त्यांच्या आईशी म्हणजे माईशी गप्पा मारत बसलेले असायचे. जिला जाऊन पाच वर्षे जास्त झाली ती माई त्यांच्या पलंगाशी बसलेली असायची, "ही काय माई इथे बसलीये..." एका विशिष्ट जागेकडे बोट करून ते म्हणायचे. अतीव वेदनांच्या प्रवासात आईची आठवण येणं साहजिकच होतं... त्यातही त्यांनी आयुष्यात सर्वाधिक प्रेम कुणावर केलं असेल तर माईवर. "काय म्हणतेय माई?" असा प्रश्न विचारला की ते भरभरून बोलायचे वाटायचे खरेच माई येऊन गेली असावी....

"माई म्हणाली.. अनारसे तळू लागतो का? अधिक महिना आलाय प्रभा येईल.. तिला वाण द्यायचं आहे. मी तिला म्हणालो तिचे वेगळे काढ आणि लपवून ठेव... नाहीतर उरणार नाहीत."

प्रभा त्यांची पाठची बहीण ... माई खालोखाल जीव असणारी ही दुसरी व्यक्ती... तिचे सतत नाव असायचे. मात्र तेही भूतकाळात कुठेतरी... "प्रभा अभ्यास करतेय चहा करून देतो "...म्हणून धडपडत उठायचे. "प्रभा उन्हाळ्यात आली की मी आंबे आणतो." ..  किंवा माईला सांगत असायचे, " प्रभाला साडी आधीच घेऊन ठेऊ नको ती आली की मी दुकानात नेईन तिला.." काय गंमत असते ना माणसाच्या मनाची... वर्तमान नकोसा झाल्यावर भूतकाळाचे हवे ते पान उघडून बसायचे. दुनिया इकडची तिकडे झाली तरी प्रभा आत्या भेटून जाणार आणि माझ्या पाठीवर हात ठेवून मला म्हणणार ,"माझाही बाप होता ग तो..." ह्याची मला सूर्यप्रकाशाईतकी खात्री होती. तिचे आणि माझे दुःख फार वेगळे नाहीच...

बाबांना बरेचदा मोठी आई म्हणजे त्यांची आजी सुद्धा भेटायची... ती कधीच काही बोलत नसे फक्त प्रेमाने डोक्यावर हात फिरवून जाई. पुढे पुढे त्यांना अन्न पाणी काहीच नको असायचे त्याही वासनेतून ते सुटले होते.. आम्ही दिले तर दिले तेव्हढे ते खायचे पाणी सुद्धा स्वतःहून मागणे त्यांनी बंद केले होते. कसलीही चव किंवा अमुक पदार्थ हवा म्हणूनही ते मागत नसायचे. खाता का विचारले की ठाम नकार द्यायचे... मग आम्ही कुणाकुणाची नावे घेऊन खाऊ घालायचो.. " माई गरम पोळ्या करतेय तुम्हाला वाढायला सांगितले.." असे म्हटलं की लगेच पोळी खायचे किंवा काकूनी उकडपेंडी पाठवलीये, मावशी आलीये तिने सांजा केलाय म्हटले की आनंदाने खायचे... त्यांची काकू , त्यांची मावशी ही त्यांची अत्यंत आवडती मंडळी.. अधून मधून मावशी आली.. मावशी येणार असे ते बोलायचे..

"काकूचा माझ्यावर फार जीव आहे" असे त्यांनी कित्येकदा मला सांगितले असेल...
ते गेले त्याच्या दोनच दिवस आधी लाडू केले होते तो त्यांनी आनंदाने खाल्ला..
कसा झालाय विचारल्यावर हाताचा मोर करत म्हणाले..

"छानच झालाय..काकूनी केला.. चंदू येणार म्हणून..."

त्यांचा हा भाऊ पूर्वी एअर फोर्स मध्ये होता. सुट्टीत घरी यायचा... मी त्यांना जरासे चिडवत म्हणाले... तुमची काकू तुम्हाला एकट्यालाच बरे देते... त्यावर

"इतक्या सगळ्यांना देण्याइतके नसतील केले... मला मात्र घासातला घास काढून देते."

पुढे पुढे त्यातच त्यांचा आनंद आहे असे लक्षात आल्यावर आम्हीही त्यांना चालू काळात ओढत नसू. मग त्यांची भावंडे त्यांच्या कल्पनेच्या जगात भेटून गप्पा मारून जात... आणि ते खुश असायचे. कधीकधी बेमालूम खोटेही बोलायचो..

"गपिष्ट मिल्या आला पण माझ्याशी न बोलताच निघून गेला..." 

असा त्यांनी एक दिवस नादच घेतला थोड्याथोड्या वेळानी ते हेच वाक्य म्हणायचे... आता ते मिल्या म्हणत असणारा माझा मिलिंद काका दोन नातवंडांचा आजोबा झालाय हेही त्यांच्या गावी नव्हते... शेवटी , " हे काय आत्तापर्यंत इथेच होता चहा घेऊन गेला. " असे सांगितले आणि ते शांत झाले.
त्यांचा सगळ्यांत धाकटा आता पन्नाशीच्या वर असणारा त्यांचा भाऊ मनोज काका... त्यांच्या जगात अजूनही छपरावर पतंग उडवत असायचा..

"पतंगाच्या नादी लागला की ह्या मन्टयाला भुकेचेही भान नसते... त्याला बोलावं जेवायला ...सांग बाबा थांबलाय..."

माझ्या बाबांना सगळे नातेवाईक आणि सगळा गाव "बाबा" म्हणायचा.... ऐन पितृपक्षात एके दिवशी त्यांनी आईला घाबरवून सोडले... त्यांना त्यांची आई, दादा आणि आजी दिसू लागले... ते सगळे बोलावताहेत असे ते सतत सांगू लागले....आई चांगलीच घाबरून गेली... पण खरं सांगू पितरांचे आत्मे येतात बोलावतात वगैरे सगळ्या मनाच्या समजूती... एक सलाईन आणि एक अँटीबायोटिकचे इंजेक्शन ह्यांनी सोडियम लेव्हल नॉर्मल झाली आणि ते वर्तमानात परतले..
पुढे घरी बाप्पाचे आगमन झाले..
 हे सगळे दिवस त्यांनी अतिशय आनंदात काढले... मात्र एक सूक्ष्म बदल आत्ता मला जाणवतो आहे तो म्हणजे... ते कमालीचे शांत होत गेले. कुठला त्रागा नाही की चिडचिड नाही, संताप नाही, कधीकधी मूकपणे अश्रू ढाळत असायचे बास! अश्या वेळी पोटातून तुटायचे... पण लहान मुलासारखे त्यांना पोटाशी धरता येत नव्हते..
  मला काहींना काही कामानिमित्त घराबाहेर जावेच लागायचे... ते आधीच तोळामासा त्यांना चुकूनही संसर्ग होऊ नये म्हणून मी अंतर राखून वागायचे...
हा कोरोनाचा धुमाकूळ नसता तर.... फार वेगळे झाले असते नाही चित्र!  कदाचित ... कदाचित... असो!😢
क्रमशः
यशश्री रहाळकर

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

इह जन्मनी .. भाग १

आज बाबांच्या अस्थी विसर्जन करून आले आणि त्यांच्या स्थायू अस्तित्वाशी असणारा संबंध खऱ्या अर्थाने संपला. कणातून विश्वाकडे, स्थूलातून सुक्ष्माकडे आणि चलातून अचलाकडे नेणारा त्यांचा प्रवास कदाचित पूर्वीच सुरू झाला असावा... माणूस असणे आणि जाणे ह्या दोन घटनांमध्ये एका श्वासाचं अंतर आहे असे जर वाचनात आले असेल ना .... तर ते साफ चूक आहे. आयुष्य आणि मृत्यू ह्या दोहोंच्या मध्ये एक विशाल अपरिहार्य पोकळी असते... ही पोकळी काही क्षणांची, काही तासांची , काही दिवसांची किंवा न संपणाऱ्या प्रदीर्घ काळाची असू शकते ... बाबांसाठी ही पोकळी 3 वर्षे आणि 6 दिवसांची होती...ह्या पोकळीत जगणारा माणूस खऱ्या अर्थानं माणूस म्हणून आयुष्य जगत नसतो. जगाच्या दृष्टीने तो जिवंत असला तरी प्रत्यक्षात मनानी रोज रोज स्वतःला मारत असतो. एखाद्या घड्याळाचे सेल संपत आले की काय होतं??? हळूहळू ते मागे पडू लागतं, त्यात दिसणारी काळ;वेळेची गणितं वेगळी असतात.... एक क्षण झटकन येतो आणि ते थांबतं... बास! असंच काहीसं प्रत्येकाचं होत असतं. फक्त प्रत्येक घड्याळाचा मागे पडण्याचा आणि स्थिरावण्याचा आवेग वेगवेगळा असू शकतो. घड्याळात पुन्हा नवे सेल घालून त्याला ताज्या दमाने सुरू करता येतं ... पण माणसांचे दुर्दैवाने तसे होऊ शकत नाही...  एव्हढाच काय तो फरक. 

"बाबांना काय झाले होते? नेमके ते कश्याने गेले?"

ह्या प्रश्नाचं वैज्ञानिक उत्तर काहीही असलं तरी माझ्यापुरतं उत्तर आहे, "त्यांची जीवनेच्छा संपल्याने..." नाट्यसंगीत, वाचन ह्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या ,अतिशय प्रसन्नपणे ,समाधानाने आयुष्य जगणाऱ्या माझ्या बाबांना मी कित्येकदा मरणासन्न अवस्थेत तडफडतांना पाहिलं आहे, वेदना असह्य झाल्याने तळमळतांना... रडतांना, चिडतांना, देवाकडे मरणाची भीक मागताना सुद्धा पाहिलं आहे. कित्येकदा ते देवाशी भांडायचे सुद्धा... माझ्याशी भांडायचे आईशी भांडायचे... कारण आम्ही त्यांना वाचवलं आहे ,असं उगाच त्यांना वाटायचं... वास्तविक कुठे वाचवू शकलो आम्ही त्यांना?? कदाचित त्यांचं आजचं जाण उद्यावर ढकलत गेलो.. इतकंच करू शकलो. 

एका अपत्याच्या आयुष्यातला सगळ्यांत कठीण परीक्षेचा काळ म्हणजे आई किंवा वडिलांचे आजारपण.... त्यातही माझा पेपर जरा जास्तच अवघड होता. तुम्ही जर एकुलते एक अपत्य असाल तर जन्माला येतांनाच कर्णाच्या कवच-कुंडलांसारखेच तुम्ही भक्कमपणा घेऊन येणार ही सगळ्यांची खात्रीच असते. जन्माला आल्यापासून परफॉर्मन्स प्रेशर नावाचं जीवघेणं शस्त्र तुमच्या डोक्यावर टांगून ठेवलेलं असतं...  सगळीकडेच किमान distinction तर मिळालेच पाहिजे... तुम्हाला रडायची संधी नसते आणि कोसळायचा हक्कही नसतो. बाबा गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सांत्वनाला?? केलेल्या एका फोनवर पलीकडली व्यक्ती मला अत्यंत कुजकटपणे म्हणाली,

"तू इतकं शांतपणे बोलूच कशी शकतेस? मला वाटलं तू बोलू सुद्धा शकणार नाहीस.. लगेच सावरली तू???"

वेळ अयोग्य होती आणि माझ्याकडे वाद घालण्यासाठीची शक्ती संपलेली होती...  मी स्वतःलाच विचारले... Do I have any other option??  दुर्दैवाने आम्हा एकुलत्या एक अपत्यांच्या प्रश्नपत्रिकेत MCQ नसतात... असतात त्या रिकाम्या जागा भरा... कधी आईचा बाप होऊन तिला कुशीत घेऊन मनसोक्त रडू द्यावं लागतं तर कधी बापाची आई होत त्याला मायेनं जेऊ घालावं लागतं... ह्या सगळ्या व्यापात मोठं होणं ,समंजस होणं , जबाबदार होणं हे आपसूक घडत जातं. आणि सावरायचंच म्हणाल तर ह्या वेळी ते सहज शक्य होतं... "ह्या वेळी" हे शब्द मी जाणीवपूर्वक उच्चारते आहे... कारण ह्या पूर्वीच्या अनेक मरणांतिक प्रवासातील एक सोबती मी होते... माझ्या घरापासून हॉस्पिटल मोजून साडे एकोणीस मिनिटांचं अंतर.... मात्र अम्ब्युलन्स मध्ये प्राणांतिक वेदनेने तडफडणाऱ्या बापाशेजारी अगतिकपणे बसून हीच साडे एकोणीस मिनिटे किती प्रदीर्घ असतात हे अनुभल्याशिवाय कळत नाही. माझ्या आणि त्यांच्याही दुर्दैवाने ही काळाची वेळ मी अनेकदा जगले... बाबांची तब्येत 3/4 महिन्यांच्या अवकाशाने अचानकपणे गंभीर व्हायची... ऐन मध्यरात्री त्यांना हॉस्पिटलमधील ICU मध्ये ऍडमिट केल्यावर बाहेर उभी राहून होणारी घालमेल किती जीवघेणी असते हे कदाचित शब्दांत व्यक्तच होऊ शकत नाही. 
              मे महिन्यात 12 दिवसांचं त्यांचं अखेरचं हॉस्पिटलायझेशन  .. तिथून निघतानाच ते म्हणाले होते ,

 " हे शेवटचं... आता काहीही झालं तर मी हॉस्पिटलंच तोंड पाहणार नाही."
त्यांनी त्यांचे शब्द खरे केले... हळूहळू सगळ्यांतून अंग काढून घेत विरक्तीची वाट चालतांना मी रोज रोज त्यांना पाहत होते.... एके पहाटे ते उठलेच नाहीत झोपले ते कायमचे... मृत्यू सुंदर असतो चिरंतन असतो ... हे कवी ग्रेस म्हणत ते मी प्रत्यक्ष घडताना पाहिलं... त्यांची तडफड झालीच नसावी, अत्यंत शांतपणे त्यांनी मृत्यूला कवटाळलं... 😢

"झोपेतच गेलेच कसे? तुम्हाला आवाज दिला नाही का? घरघर लागली नाही का? तुम्हाला कळलं कसं नाही...???"

अश्या प्रकारची उलट तपासणी एका अत्यंत महान व्यक्तीने घेतली... ह्या चौकशीला सामोरे जातांना माझ्या वडिलांचं निष्प्राण शरीर माझ्यापुढे अचेत पडलेलं होतं ....ही साधी माणुसकीची भावनाही लोकांना का कळत नसावी..? बरे ह्या आदरणीय व्यक्तीने गेल्या तीन वर्षांत बाबा कसे आहेत किंवा आहेत की नाहीत ?? ह्याचीही दखल घेतलेली नव्हती. अश्रू खारट का असतात हे मला त्या दिवशी नेमकेपणाने कळलं... आपल्या आपल्या म्हणणाऱ्या कुणीतरी तुमच्या दुःखावर मीठ चोळलेलं असतं म्हणून ते खारट होत असावं. रात्री अकरा वाजता आमच्याशी सुसंगतपणे बोलणाऱ्या "आता मी झोपतो" म्हणत गाढ झोपणाऱ्या बाबांची ती काळ झोप होती हे स्वप्नातही वाटलं नाही.... मात्र त्यापूर्वी अनेकदा ICU चे दार बंद होताना ही भीती वाटली होती... प्रामाणिकपणे सांगते... त्या थंडगार हवेच्या झोताचे दार बंद झाले की कधी उघडेल आणि उघडलं तर आतला माणूस परत येईल की नाही ही खात्रीच नसते.

"तू खूप केलंस ग त्यांचं..."  अनेक जण म्हणाले... खरं सांगू  मी फक्त कर्तव्य केलं... आईवडील जे तुमच्यासाठी लहानपणी करतात तेच त्यांच्या म्हातारपणी तुम्ही करणे अपेक्षित असते... आपला धर्म आपले संस्कार हेच सांगतात. पण तुम्ही कर्तव्य करीत असतात... आणि मग त्यापुढे प्रेमाचं पारडं हलकं हलकं होत जातं... हे तुमच्या स्वतःच्याही लक्षात येत नाही. शेवटी तुम्ही स्वतः एक हाडामासाचा माणूस असता.... एक स्वार्थी जीव .  क्षण असेही येतात जेव्हा तुम्ही अगतिक , हतबल होता आणि स्वतःच्या नशिबाला कोसू लागता ... क्षण असेही येतात जेव्हा पोटातून तुमची आतडी पिळवटून निघतात पण तुम्ही काहीही करू शकत नाही ... काही लाजिरवाणे क्षण असेही असतात जेव्हा आपल्या आईची फरपट असह्य होते आणि तुम्ही चिडता, रागावता, ओरडता... त्या साऱ्या क्षणांचं ओझं मरेपर्यंत उतरणार नसतं... अवघड असतो तो इथून पुढचा प्रवास ...  त्या साऱ्या कठोर  क्षणांसाठी स्वतःच स्वतःला माफ करता यायला हवं...  

बाप नावाच्या घनगर्द झाडाला कोसळताना पाहणं सोपं नाही  ... ज्याच्या सावलीच्या भरवश्यावर बिंधास्त आयुष्य जगत असतो ते नसताना जे उन्हाचे चटके बसतात ते काळीज सोलवटून टाकणारे असतात...😢

******** क्रमशः*********
©️🔏 यशश्री रहाळकर