आज बाबांच्या अस्थी विसर्जन करून आले आणि त्यांच्या स्थायू अस्तित्वाशी असणारा संबंध खऱ्या अर्थाने संपला. कणातून विश्वाकडे, स्थूलातून सुक्ष्माकडे आणि चलातून अचलाकडे नेणारा त्यांचा प्रवास कदाचित पूर्वीच सुरू झाला असावा... माणूस असणे आणि जाणे ह्या दोन घटनांमध्ये एका श्वासाचं अंतर आहे असे जर वाचनात आले असेल ना .... तर ते साफ चूक आहे. आयुष्य आणि मृत्यू ह्या दोहोंच्या मध्ये एक विशाल अपरिहार्य पोकळी असते... ही पोकळी काही क्षणांची, काही तासांची , काही दिवसांची किंवा न संपणाऱ्या प्रदीर्घ काळाची असू शकते ... बाबांसाठी ही पोकळी 3 वर्षे आणि 6 दिवसांची होती...ह्या पोकळीत जगणारा माणूस खऱ्या अर्थानं माणूस म्हणून आयुष्य जगत नसतो. जगाच्या दृष्टीने तो जिवंत असला तरी प्रत्यक्षात मनानी रोज रोज स्वतःला मारत असतो. एखाद्या घड्याळाचे सेल संपत आले की काय होतं??? हळूहळू ते मागे पडू लागतं, त्यात दिसणारी काळ;वेळेची गणितं वेगळी असतात.... एक क्षण झटकन येतो आणि ते थांबतं... बास! असंच काहीसं प्रत्येकाचं होत असतं. फक्त प्रत्येक घड्याळाचा मागे पडण्याचा आणि स्थिरावण्याचा आवेग वेगवेगळा असू शकतो. घड्याळात पुन्हा नवे सेल घालून त्याला ताज्या दमाने सुरू करता येतं ... पण माणसांचे दुर्दैवाने तसे होऊ शकत नाही... एव्हढाच काय तो फरक.
"बाबांना काय झाले होते? नेमके ते कश्याने गेले?"
ह्या प्रश्नाचं वैज्ञानिक उत्तर काहीही असलं तरी माझ्यापुरतं उत्तर आहे, "त्यांची जीवनेच्छा संपल्याने..." नाट्यसंगीत, वाचन ह्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या ,अतिशय प्रसन्नपणे ,समाधानाने आयुष्य जगणाऱ्या माझ्या बाबांना मी कित्येकदा मरणासन्न अवस्थेत तडफडतांना पाहिलं आहे, वेदना असह्य झाल्याने तळमळतांना... रडतांना, चिडतांना, देवाकडे मरणाची भीक मागताना सुद्धा पाहिलं आहे. कित्येकदा ते देवाशी भांडायचे सुद्धा... माझ्याशी भांडायचे आईशी भांडायचे... कारण आम्ही त्यांना वाचवलं आहे ,असं उगाच त्यांना वाटायचं... वास्तविक कुठे वाचवू शकलो आम्ही त्यांना?? कदाचित त्यांचं आजचं जाण उद्यावर ढकलत गेलो.. इतकंच करू शकलो.
एका अपत्याच्या आयुष्यातला सगळ्यांत कठीण परीक्षेचा काळ म्हणजे आई किंवा वडिलांचे आजारपण.... त्यातही माझा पेपर जरा जास्तच अवघड होता. तुम्ही जर एकुलते एक अपत्य असाल तर जन्माला येतांनाच कर्णाच्या कवच-कुंडलांसारखेच तुम्ही भक्कमपणा घेऊन येणार ही सगळ्यांची खात्रीच असते. जन्माला आल्यापासून परफॉर्मन्स प्रेशर नावाचं जीवघेणं शस्त्र तुमच्या डोक्यावर टांगून ठेवलेलं असतं... सगळीकडेच किमान distinction तर मिळालेच पाहिजे... तुम्हाला रडायची संधी नसते आणि कोसळायचा हक्कही नसतो. बाबा गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सांत्वनाला?? केलेल्या एका फोनवर पलीकडली व्यक्ती मला अत्यंत कुजकटपणे म्हणाली,
"तू इतकं शांतपणे बोलूच कशी शकतेस? मला वाटलं तू बोलू सुद्धा शकणार नाहीस.. लगेच सावरली तू???"
वेळ अयोग्य होती आणि माझ्याकडे वाद घालण्यासाठीची शक्ती संपलेली होती... मी स्वतःलाच विचारले... Do I have any other option?? दुर्दैवाने आम्हा एकुलत्या एक अपत्यांच्या प्रश्नपत्रिकेत MCQ नसतात... असतात त्या रिकाम्या जागा भरा... कधी आईचा बाप होऊन तिला कुशीत घेऊन मनसोक्त रडू द्यावं लागतं तर कधी बापाची आई होत त्याला मायेनं जेऊ घालावं लागतं... ह्या सगळ्या व्यापात मोठं होणं ,समंजस होणं , जबाबदार होणं हे आपसूक घडत जातं. आणि सावरायचंच म्हणाल तर ह्या वेळी ते सहज शक्य होतं... "ह्या वेळी" हे शब्द मी जाणीवपूर्वक उच्चारते आहे... कारण ह्या पूर्वीच्या अनेक मरणांतिक प्रवासातील एक सोबती मी होते... माझ्या घरापासून हॉस्पिटल मोजून साडे एकोणीस मिनिटांचं अंतर.... मात्र अम्ब्युलन्स मध्ये प्राणांतिक वेदनेने तडफडणाऱ्या बापाशेजारी अगतिकपणे बसून हीच साडे एकोणीस मिनिटे किती प्रदीर्घ असतात हे अनुभल्याशिवाय कळत नाही. माझ्या आणि त्यांच्याही दुर्दैवाने ही काळाची वेळ मी अनेकदा जगले... बाबांची तब्येत 3/4 महिन्यांच्या अवकाशाने अचानकपणे गंभीर व्हायची... ऐन मध्यरात्री त्यांना हॉस्पिटलमधील ICU मध्ये ऍडमिट केल्यावर बाहेर उभी राहून होणारी घालमेल किती जीवघेणी असते हे कदाचित शब्दांत व्यक्तच होऊ शकत नाही.
मे महिन्यात 12 दिवसांचं त्यांचं अखेरचं हॉस्पिटलायझेशन .. तिथून निघतानाच ते म्हणाले होते ,
" हे शेवटचं... आता काहीही झालं तर मी हॉस्पिटलंच तोंड पाहणार नाही."
त्यांनी त्यांचे शब्द खरे केले... हळूहळू सगळ्यांतून अंग काढून घेत विरक्तीची वाट चालतांना मी रोज रोज त्यांना पाहत होते.... एके पहाटे ते उठलेच नाहीत झोपले ते कायमचे... मृत्यू सुंदर असतो चिरंतन असतो ... हे कवी ग्रेस म्हणत ते मी प्रत्यक्ष घडताना पाहिलं... त्यांची तडफड झालीच नसावी, अत्यंत शांतपणे त्यांनी मृत्यूला कवटाळलं... 😢
"झोपेतच गेलेच कसे? तुम्हाला आवाज दिला नाही का? घरघर लागली नाही का? तुम्हाला कळलं कसं नाही...???"
अश्या प्रकारची उलट तपासणी एका अत्यंत महान व्यक्तीने घेतली... ह्या चौकशीला सामोरे जातांना माझ्या वडिलांचं निष्प्राण शरीर माझ्यापुढे अचेत पडलेलं होतं ....ही साधी माणुसकीची भावनाही लोकांना का कळत नसावी..? बरे ह्या आदरणीय व्यक्तीने गेल्या तीन वर्षांत बाबा कसे आहेत किंवा आहेत की नाहीत ?? ह्याचीही दखल घेतलेली नव्हती. अश्रू खारट का असतात हे मला त्या दिवशी नेमकेपणाने कळलं... आपल्या आपल्या म्हणणाऱ्या कुणीतरी तुमच्या दुःखावर मीठ चोळलेलं असतं म्हणून ते खारट होत असावं. रात्री अकरा वाजता आमच्याशी सुसंगतपणे बोलणाऱ्या "आता मी झोपतो" म्हणत गाढ झोपणाऱ्या बाबांची ती काळ झोप होती हे स्वप्नातही वाटलं नाही.... मात्र त्यापूर्वी अनेकदा ICU चे दार बंद होताना ही भीती वाटली होती... प्रामाणिकपणे सांगते... त्या थंडगार हवेच्या झोताचे दार बंद झाले की कधी उघडेल आणि उघडलं तर आतला माणूस परत येईल की नाही ही खात्रीच नसते.
"तू खूप केलंस ग त्यांचं..." अनेक जण म्हणाले... खरं सांगू मी फक्त कर्तव्य केलं... आईवडील जे तुमच्यासाठी लहानपणी करतात तेच त्यांच्या म्हातारपणी तुम्ही करणे अपेक्षित असते... आपला धर्म आपले संस्कार हेच सांगतात. पण तुम्ही कर्तव्य करीत असतात... आणि मग त्यापुढे प्रेमाचं पारडं हलकं हलकं होत जातं... हे तुमच्या स्वतःच्याही लक्षात येत नाही. शेवटी तुम्ही स्वतः एक हाडामासाचा माणूस असता.... एक स्वार्थी जीव . क्षण असेही येतात जेव्हा तुम्ही अगतिक , हतबल होता आणि स्वतःच्या नशिबाला कोसू लागता ... क्षण असेही येतात जेव्हा पोटातून तुमची आतडी पिळवटून निघतात पण तुम्ही काहीही करू शकत नाही ... काही लाजिरवाणे क्षण असेही असतात जेव्हा आपल्या आईची फरपट असह्य होते आणि तुम्ही चिडता, रागावता, ओरडता... त्या साऱ्या क्षणांचं ओझं मरेपर्यंत उतरणार नसतं... अवघड असतो तो इथून पुढचा प्रवास ... त्या साऱ्या कठोर क्षणांसाठी स्वतःच स्वतःला माफ करता यायला हवं...
बाप नावाच्या घनगर्द झाडाला कोसळताना पाहणं सोपं नाही ... ज्याच्या सावलीच्या भरवश्यावर बिंधास्त आयुष्य जगत असतो ते नसताना जे उन्हाचे चटके बसतात ते काळीज सोलवटून टाकणारे असतात...😢
******** क्रमशः*********
©️🔏 यशश्री रहाळकर
Apratim ... as usual
उत्तर द्याहटवा