फॉलोअर

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

बहार येईल!


बहार येईल!

खुल्या आभाळाखाली उपाशीच झोपलेली चिमुरडी म्हणाली,
ह्या चांदण्यांच्या ठिणग्या पेटल्या रसरशीत... 
आणि ... चंद्राची टम्म फुगलेली भाकर झाली तर ...
काय बहार येईल!

तिचा नवरा दुर्गा देवीचा निस्सीम भक्त...
शतचण्डिच्या अनुष्ठानाला शेजारी बसल्यावर तिला वाटलं,
ह्या वेळी तरी मुलीला जन्माला येऊ दिलं तर ...
काय बहार येईल!

तिच्या देहावर पांचट शेरेबाजी करणाऱ्या ग्रुपची..
बॉस म्हणून प्रमोट झाल्यावर तिला वाटलं,
ह्यांनी कधीतरी मला माणूस मानलं तर  ...
काय बहार येईल!

संसारासाठी गुडघे झिजेपर्यंत धावपळ केल्यावर
उतारवयात थकून गेलेल्या तिच्या मनात आलं,
आत्ता मला कुणीतरी आयता घोटभर चहा दिला तर ...
काय बहार येईल!

उठसूठ रुसून बसत तोरा मिरवणाऱ्या वरमायकडे पाहून..
मुलीची आई बोलती झाली... 
माझ्या लेकीला ह्यांनीही लेक मानलं तर ...
काय बहार येईल!

पाठच्या बहिणीला छेडणाऱ्या टवाळाला..
यथेच्छ चोपल्यावर तिला वाटलं...
ह्याच्या आईने ह्याला 'स्त्री'चा सन्मान शिकवला तर ...
काय बहार येईल!

जावेच्या डोहाळजेवणाला वांझोटी म्हणून,
तिला अशुभ म्हणत घरातल्या घरात टाळलं
त्यापेक्षा बाळाची यशोदा आई म्हणून बोलावलं तर ...
काय बहार येईल!

वडिलांना न दुखावता गुपचूप आईकडे पैसे देणाऱ्या लेकीला आणि ....
लग्नानंतर वेगळ्या निघालेल्या लेकाला आठवत वडील म्हणाले...
लेकीलाच म्हातारपणाची काठी मानले तर...
काय बहार येईल!

आयुष्यभर कुजकट टोमणे आणि सतत पाणउतारा केलेल्या,
पाय मोडून अंथरुणावर पडल्यावर मनापासून सेवा करणाऱ्या सुनेला पाहून सासू म्हणाली...
वाईट वागूनही ही इतकी चांगली वागतेय हिच्याशी चांगलीच वागले तर ...
काय बहार येईल!

नवरात्रात देवीची मनोभावे पूजा करतांना..
प्रत्यक्षात प्रत्येक स्त्रिला गुलाम म्हणून न चिरडता 
माणूस म्हणून सन्मान दिला तर ...
काय बहार येईल!

यशश्री रहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!