"ती" म्हणजे कुणीतरी बिचारी... सतत अन्याय झेलणारी आणि "तो" अन्याय करणारा, क्रूरकर्मा वगैरे असे ढोबळ साचे आपण बनवलेले आहेत. प्रत्यक्षात पडताळून पाहिले तर 99% हे खरेही आहेच ना! पण उरलेल्या 1% मध्ये काही असेही बिचारे पुरुष आहेत ज्यांचा काहीही दोष नसतांना ते होरपळले आहेत, कदाचित त्यांनी खूप सोसलं आहे... ह्या कथांची प्रत्यक्ष साक्षीदार होताना "त्याच्या" वेदना, "त्याची" दुःख अगदी दाहकपणे मी पाहिली आहेत, अनुभवली आहेत .. त्यांनाच कथारूपाने मांडतेय.. अर्थातच नावे गाळून कथास्वरूप देऊन... "पुरुषस्पंदन" मधील प्रत्येक कथा निराळी तरीही एका समान धाग्यावर बेतलेली आहे.
कथा १ :- अनभिज्ञ
ज्योती मावशीचा पहाटे साडे चार वाजता फोन आला आणि मनांत शंकेची पाल चुकचुकली. बरं तिने स्पष्ट काहीच सांगितलंही नाही . नुसतेच "ताबडतोब ये ग!" म्हणून रडायला लागली. ह्या अवेळी फोन म्हणजे काहीतरी गडबड नक्कीच आहे... काकांची तब्येत पुन्हा बिघडली की काय? दोन महिन्यांपूर्वी असेच पहाटे बीपी शूट झाले होते.. ह्या साऱ्या विचारचक्रात मी मावशीच्या घरी पोहोचलेही. ज्योती मावशी म्हणजे माझं लोकल माहेर... खरंतर ती आईची चुलत बहीण पण मी लग्न होऊन तिच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये रहायला आले आणि आमचे गुळपीठ वाढत गेलं. वेळ मिळेल तश्या आम्ही मावशी भाच्या एकमेकींकडे पडीक असतो , एकत्र खरेदीला जातो, कोणताही पदार्थ एकमेकींना दिल्याशिवाय खात नाही आणि आमच्या गप्पा काही संपत नाहीत. .. तिला एकुलता एक मुलगा क्षितीज ...मुलगी नाही म्हणून माझ्यावर विशेषच माया. आनंद असो वा गंभीर काही.. पहिला फोन एकमेकींना करून हक्काने बोलावले जाई. मी पोहोचले तेव्हा घराभवती गर्दी जमलेली दिसली.. आणि काळजाचा ठोकाच चुकला. कशीबशी गर्दी मोडत घरात गेले तर अवकळा पसरलेली... घरांत स्मशान शांतता होती. चारच दिवसांपूर्वी ह्याच घरातून सनई चौघड्याचे मंगल सूर निघत होते.... हे सांगूनही खरं वाटत नव्हतं. काका शून्यात नजर लावून बसले होते... मला अशुभाची चाहूल लागली. मला पाहताच मावशी कोसळली... माझ्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागली.
तिला शांत करत मी नेमकं काय झालं ते विचारू लागले... काकांना पहाटे 3 च्या सुमारास जाग आली..ते पाणी प्यायला म्हणून उठले तर क्षितीज गळफास लावून घेतांना त्यांना दिसला... मोठाच अनर्थ टळला. त्याला झोपेचे इंजेक्शन देऊन शांत केले होते... मी आधी सगळ्या जमलेल्या शेजारी आणि बघ्यांचे आभार मानले आणि त्यांना आपापल्या घरी परतण्याची विनंती केली. गर्दी ओसरली आणि मी तडक किचन गाठत कडक चहा करून आणला.. मावशी आणि काकांना काय करावे काहीच सुचत नव्हतं. खरंच परिस्थितीच अशी होती की काय करावे सुचत नव्हतं. मी क्षितीजला समजावेन, आपण एखाद्या सायकायट्रिस्टला दाखवू असे काहीबाही बोलून मी त्यांची समजूत काढली. क्षितीज अतिशय साधा...सरळ रेषेत चालणारा मुलगा. निर्व्यसनी, उमदा स्वभाव ,साधे सरळ चौकटीतले आयुष्य जगण्याची स्वप्ने पाहणारा मुलगा. शाळेतील वर्गात मधल्या बाकावर बसणारी मुलं असतात ना! त्यातलाच हा... म्हणजे रूपाने, बुद्धीने चारचौघांसारखा. वर्षीचे वर्षी पास होऊन इंजिनिअरिंग पूर्ण केले... दोन तीन लहानमोठे जॉब बदलत चांगल्या नोकरीत लागेपर्यंत 28 वर्षांचा पूर्ण झाला. स्वतः स्वतःचा जोडीदार निवडेल अश्या प्रकारचा नव्हताच तो... मग काय रीतसर कांदे पोह्यांना सुरुवात झाली.
उत्तम पगार , मावशी आणि काकांशिवाय जबाबदारी नाही, काका बँकेत असल्याने त्यांनी बऱ्यापैकी पैसे जोडून ठेवलेले, दोन प्रशस्त फ्लॅट एकत्र करून सुंदर इंटेरिअर करून घेतलेले घर, गावाकडे जमीन, 2 गाळे आणि 1 फ्लॅट भाड्याने दिलेले... अश्या सगळ्या जमेच्या बाजू असूनही क्षितीजचा विवाह योग काही जुळून येईना. ह्या साऱ्यात जवळपास 3 वर्षे गेली... हौसेनी सुनेचे कौतुक करायला आसुसलेली ज्योती मावशी हिरमुसली, काळजी करू लागली.
"हल्लीच्या मुलींच्या अपेक्षाच कळत नाहीत मला... अजून हवंय तरी काय ह्यांना...?"
असं ती कळवळून म्हणायची..😢 खरंय हल्ली मुलींना नेमकं काय हवं असतं कोण जाणे? बरेचदा मुलगी ह्यांना पसंत पडायची आणि तिचा नकार येई. शेवटी ह्या योगांच्या गोष्टी. नुपुराचं स्थळ आलं आणि योग जुळून आला. आईवडील सामान्य परिस्थितीतले दोन बहिणी त्यातली ही धाकटी.बुद्धीने बेताचीच असणारी नुपूर दिसायला देखणी... मनमोकळी ,खळखळून हसणारी, पाहता क्षणी प्रेमात पडावे अशीच. ब्युटी पार्लरचा कोर्स केलेली नुपूर घरगुती वळणाची मावशीला अगदी हवी तशी सून आणि क्षितीजला मनाजोगी पत्नी मिळाली. काकांनी देखील लगेच एक गाळा खाली करून घेऊन सुनेला पार्लर काढून देण्याचे ठरवले.ज्योती मावशीला आपल्या होणाऱ्या सुनेला कुठे ठेऊ कुठे नको असे झाले. थाटात साखरपुडा झाला... अर्थातच सगळा खर्च ज्योती मावशी आणि काकांनी केला. साखरपुड्यालाच होणाऱ्या सुनेवर पैठणी, सोन्याचा नेकलेस आणि गिफ्ट्सची लयलूट करण्यात आली. नुपुरच्या वडिलांचं साधं स्टेशनरीचं दुकान त्यात मोठ्या लेकीच्या लग्नात बराच खर्च झालेला त्यामुळे त्यांनी हात वर केलेले. लग्नाचा खर्चही विभागून करायचे ठरले.लग्नाचा मुहूर्त सहा महिन्यानंतरचा नक्की झाला.
नुपूर क्षीतीजच्या सतत भेटीगाठी होऊ लागल्या, फोनवर बोलणे,हॉटेलला; सिनेमाला जाणे... सारे सारे आलबेल होते. नुपूर सुद्धा खूप खुष दिसत होती. हनिमूनसाठी सिंगापूर, थायलंडचे बुकिंग झाले... दोघेही आनंदात होते. मावशी बाईंच्या उत्साहाला तर उधाणच आले होते.. मी बरेचदा तिच्याकडे असायची. पाहुण्यांच्या याद्या, देण्याघेण्याचे आहेर, लग्नातला मेन्यू असं सारं ठरवून झालं.. आजकाल नवरा नवरी एकमेकांना मॅचिंग असणारे कपडे खरेदी करतात... नवा ट्रेंड! मग काय दोघेही आपल्या मित्र- मैत्रिणींसह खरेदीला गेले. लग्नाच्या सगळ्या धावपळीत काहीतरी बिनसलं असेल असा संशयसुद्धा कुणाला आला नाही.क्षीतीज नव्या संसाराच्या स्वप्नात रंगून गेला होता... होय! मुलांची सुद्धा असतात ना स्वप्ने... सतत बोलतांना ,
"ताई! हा पदार्थ तू नुपुरला शिकव म्हणजे मग तुला त्रास द्यावा लागणार नाही."
"नुपूर आली ना आई की आराम कारायचास तू!"
असा सतत नुपुरचा उल्लेख असायचा. नुपूर हे नाव सुद्धा इतकं आवडलं होतं त्याला की लग्नानंतरही तसंच ठेवेन म्हणायचा. सगळं सुरळीत म्हणता म्हणता दुधात मिठाचा खडा पडलाच... ऐन लग्नाच्या दिवशी सिनेस्टाईल नुपूर घरातून पळून गेली. होय! हा प्रसंग कोणत्याही सिनेमातला नाही तर प्रत्यक्षात घडला आहे... अंगावरच्या दागिन्यांसह कपडेलत्ते घेऊन नीट नियोजन करून नुपूर पळून गेली.आदल्या रात्री श्रीमंतपूजनाला मावशीने सगळे दागिने तिला घातले होते जवळपास दहा तोळ्यांचे दागिने, चाळीस हजाराचे कपडे घेऊन भर मांडवातून नुपूर पळून गेली. लग्नाच्या मांडवाचे युद्धभूमीत रूपांतर झाले... नुपुरचा अगतिक बाप रडत , हात पसरत करुणा भाकत होता. त्यांना नुपूर असे काही करेल ह्याची सुतराम कल्पना नव्हती, असे ते वारंवार सांगत होते. "तिचे आधीच लफडे होते तर आम्हाला का फसवले?" म्हणत क्षितिजचे नातेवाईक हमरीतुमरीवर आले...नुपुरच्या वडिलांचे नावे पोलीस कँप्लेन्ट झाली... फसवणुकीचा, दागिने लुबाडण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक झाली... आणि नुपुरचा शोध सुरू झाला. सगळे काही होऊन, अतिशय अपमान होऊन रिकाम्या हाती क्षितीजचे वऱ्हाड घरी परतले. सोसायटी, आप्त परिवारात चर्चेला विषय मिळाला. मावशी काकांना तर जबर धक्का बसलाच पण हळवा क्षितीज मनातून उध्वस्त झाला...
"तिला दुसरा कुणीतरी आवडतो , हे तिने सांगायला हवे होते. आम्ही कित्ती गप्पा मारायचो... मला कधीही साधा संशय सुद्धा आला नाही."
डोळ्यांतली संसाराची स्वप्ने फसवणुकीने धुवून निघालेला क्षीतीज कळवळून म्हणायचा . त्यालाच काय आमच्यापैकी कुणालाच साधा संशयही आला नाही... इतकं नूपुरचं वागणं मोकळं होतं... काय झालं कोण जाणे? सगळं समजशक्ती पलिकडलं होतं.
चार दिवसांत पोलिसांनी नुपुरला तिच्या प्रियकरासोबत पकडले... त्यांनी लग्न केले होते. सगळे दागिने चीजवस्तू ताब्यात घेऊन केस मागे घ्यावी अशी विनंती नुपुरने केली. क्षीतीजने पोलीस स्टेशन गाठत नुपुरला जाब विचारायचे ठरवले... अशी फसवणूक करून काय मिळालं तिला? स्पष्ट सांगितले असते तर लग्नाच्या आदल्या दिवशीही लग्न थांबवता आलेच असते ना! नुपुरला भेटून घरी परतलेला क्षितीज पार कोलमडला होता ... कुणाशी एक अवाक्षरही न बोलता त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि हा असा प्रकार करून जीव द्यायचा प्रयत्न केला. त्याच्या जिव्हारी लागले हे खरे! पण म्हणून काय जीव द्यायचा??
क्षीतीज दुपारपर्यंत झोपूनच होता तो उठला तसे मावशीने मला बोलावून घेतलं... काका भयंकर संतापले होते...
"स्वतः जीव देण्यापूर्वी आम्हा म्हाताऱ्यांना विष पाज..."
असे काहीबाही ते बडबडत होते. क्षीतीज एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडू लागला मावशीने त्याला पोटाशी धरलं... त्याला समजावण्याचा सुरात मी म्हणाले..
"बरं झालं ना रे बाबा! तू वाचलास ...लग्न झाल्यावर ही पोरगी पळून गेली असती तर तू कुठलाच नसता राहिला."
क्षीतीज कळवळून रडू लागला... एखाद्या पुरुषाला असं धाय मोकलून रडतांना मी पहिल्यांदाच पाहत होते. क्षितीज म्हणाला...
"माझंच चुकलं ताई..... फार मोठी चूक झाली माझी."
नेमकं काय बिनसलंय ह्याचा अंदाज घेत आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. क्षीतीज पुढे सांगू लागला...
"नुपूर कुणासोबत पळाली माहिती आहे... माझा मित्र बंड्या जगताप..."
आमचे डोळे इतके विस्फारले गेले की बुबुळेच बाहेर यावीत... बंड्या क्षीतीजचा बालमित्र, फारसा शिकला नाही, वडिलांच्या छोट्याश्या पानाच्या टपरीवर बसायचा. दिसायला देखणा, राहणी छानछौकीची... एकदम हिरो सारखी. कुणीही पाहताच इम्प्रेस व्हायचे. बोलण्यात मिठ्ठास , कामात चटपटीत... त्याची आणि क्षितीजची मैत्री म्हणजे एक गूढच होतं.... तसा तो सतत मदतीला धावून यायचा... माणूस चांगला होता, मित्र म्हणून मदतीला धावून येणारा होता.
"नुपूर आणि बंड्याचे... जुळले कधी आणि कसे??"
मावशीने उत्सुकतेने विचारलं...प्रचंड पराभूत नजरेनं क्षीतीज उत्तरला..
"आमच्या लग्नाच्या कपडा खरेदीच्या वेळी..."
पुन्हा एकवार स्मशान शांतता पसरली... अरे देवा! हे काय भलतंच. म्हणजे मित्राच्या लग्नाच्या कपडा खरेदीला सोबत म्हणून गेलेल्या बंड्या जगतापने नुपुरला पटवले होते. कुठल्याश्या चाळीत दीड खणी घरात सहा माणसांमध्ये नुपुरला राहणं शक्यच नव्हतं मग वेगळं घर घ्यायचं तर पैसा हवा ... म्हणून हा सगळा पळून जाण्याचा प्रकार केला. सहा महिने ज्याच्याशी लग्न जुळले होते त्या मुलाच्या भावनांशी काडीमात्र घेणेदेणे नसावे ह्या बयेला?? जेमतेम महिना भराच्या ओळखीत ती म्हणे बंड्याच्या प्रेमात पडली होती... आणि जे क्षीतीज बद्दल कधीही वाटले नाही ते तिला ह्या महिनाभरात बंड्या बद्दल वाटले होते..... ह्या सगळ्या मुर्खपणाला ती प्रेमाचे उदात्त नाव देत असली तरी हा शुद्ध मूर्खपणा होता. बंड्या देखील मित्राच्या होणाऱ्या बायकोच्या प्रेमात पडला आणि तिला पळवून नेण्याइतका का पुढे गेला ?? ... हे सारेच अगम्य , अतर्क्य होते. ह्या सगळ्या लग्नाच्या उत्साहात आम्हीच काय नुपुरचे आई वडील देखील तिच्या आणि बंड्याच्या ह्या प्रेम प्रकरणाबद्दल अनभिज्ञ असावे. क्षीतीज सध्या डिप्रेशनवर मानसोपचार घेतो आहे... मावशी आणि काका मनातून कोसळले आहेत... आता लग्न ह्या विषयाची त्या भरल्या आनंदी घराने धास्ती घेतली आहे.
ज्योती मावशी म्हणते ते अगदी खरंय..
"हल्लीच्या मुलींना नेमकं काय हवं असतं .. कोण जाणे?"
✒️ यशश्री रहाळकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!