विस्तीर्ण वाळवंट, उष्ण हवेचे झोत,उडणारी भुरभुरीत वाळू.....विराजसनी डोळे उघडले.क्षणभर आपण कुठे आहोत ह्याहीपेक्षा आपण जिवंत आहोत का??... हा प्रश्न त्याला स्पर्शून गेला. त्याने थोडीशी हालचाल करण्याचा प्रयत्न केलाय आणि जाणवल्या त्या अंगभर धावणाऱ्या वेदना, ... कुठे आणि किती जखमा झाल्या आहेत तेही न जाणवावे ... इतक्या वेदना!जेव्हा मेंदू वेदनेने दिलेल्या बधिरतेतून बाहेर पडला तेव्हा विराजसला काही सुसंगत घटनांची जाणीव झाली...
"आपण... आपण तर काल घर... बाडमेर... मिग 21... जैसलमेर..."
त्याला कालच्या घटना विस्कळितपणे आठवत होत्या...मेंदूवर ताण देऊन त्याने सर्व घटनांची सुसंगती लावली. तो Air Force मध्ये गेली दोन वर्षे पायलट ह्या पदावर काम करत होता. राजस्थानातील जैसलमेर पलीकडच्या काही भागात मोठ्या प्रमाणात घुसखोरी आणि आतंकवादी कारवाई झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे विराजसला तातडीने त्याच्या छोट्याश्या टीमसह बाडमेरच्या Air force base ला रवाना व्हावे लागले. लगेचच तो मिग-21 ह्या लढाऊ विमानात बसून घटनास्थळाकडे रवाना झाला. पाकिस्तानच्या सीमेलगत असणाऱ्या ह्या वाळवंटी प्रदेशातून ह्यापुर्वी फारशी आक्रमणे झालेली नसल्याने , फार खबरदारी न घेता, जरा तातडीनेच ही मोहीम आखण्यात आली होती.... नंतर बॉम्बचे आवाज, विमानाची घरघर, मिगचे पेट घेणे आणि रों रों वाहणारा वारा... ह्यापलीकडे काही केल्या त्याला आठवेना..... हळूहळू विराजसच्या मेंदूला पुन्हा एकदा बधिरता आली.
त्यानंतर बराच वेळ विराजस तसाच वाळूत पडलेला असावा... किती वेळानंतर कुणास ठाऊक? तो उठून बसला. संध्याकाळची वेळ असावी...उन्हे अंधाराने हळूहळू गिळायला सुरुवात केली होती. दूरवर फक्त वाळूचे ढीग दिसत होते... अवाढव्य, बेढब, अक्राळविक्राळ दैत्यासारखे! चटका देणारी वाळू आता गारव्याकडे सरकू लागली.
"या भयाण निर्जन वाळवंटात आपण एकटे आहोत... आता जिवंत असणेही मेल्यागतच म्हणायचे" ....
असा विचार आला अन् जाणवली ती थंड हवेची झुळूक... अगदी बर्फ़ाइतकी थंड झुळूक... पार आरपार जाणारी. ... अन् हसण्याचा मंजुळ किणकिणाट. त्या आवाजासरशी त्याने चटकन मागे वळून पाहिलं.एक राजस्थानी स्त्री.. तरुण असावी..., गोड हसत त्याच्याकडे पाहत म्हणाली ,
"बाबू! रेत में खो गये क्या ??"
थोडीशी राजस्थानी ढंगातील तिची हिंदी ऐकून त्यालाही हसू आलं. त्याहीपेक्षा एव्हढ्या विस्तीर्ण वाळवंटात आपण एकटे नाही, कुणाची तरी सोबत आहे, आता काहीतरी करता येईल हा विश्वास त्याला आश्वासक हास्य देऊन गेला. राजस्थानी मळकट लालसर रंगाचा तिचा पोषाख असावा... अंधारात स्पष्ट दिसत नव्हते .. मनुष्याकृती तेव्हढी ठळक दिसत होती. तिकडच्या पद्धतीप्रमाणे पांढरे कडे पार दंडापर्यंत घातले असावेत... कपाळावर टप्पोरं काहीतरी.. दागिना असावा चमकत होतं...
"एव्हढ्या लांबच लांब पसरलेल्या वाळवंटात तू एकटीच कशी??.. "
हा प्रश्न विराजसच्या मनात आला... आणि सहेतुक हातातल्या पाण्याच्या घड्याकडे बोट करत ती म्हणाली...
"हम वैसे भी तो अकेलेही आते जाते है ना बाबू!"
म्हणत पुन्हा एकदा आपलं किणकिणाटी हास्य पसरवून टाकलं. त्या हास्याचा आवाज काचेच्या बंगड्यांसारखा होता.. विराजसला आठवलं...आई घालायची हिरवा चुडा.. किणकिण! किणकिण! त्याच्या कानात तोच नाद रेंगाळत राहिला.
विराजसने आपला परीचय करून देताच तिनं आपलं नाव सांगितलं... "रज्जो!"
अचानक चमकून त्यानं विचारलं...
"हा पाकिस्तान तर नाही ना! त्यापेक्षा मेलेलं बरं!"
आता मात्र रज्जो गंभीर होत म्हणाली..
"रेत का कोनो मुल्क ना होवे बाबू! हवासी बहे है... जहॉं हवा ले जावे । "
तिच्याकडे चमकून पाहताना विराजसला जाणवलं ते तिचं तरल व्यक्तित्व, जणू काही ती धुकं आहे. तिच्या काळ्याभोर डोळ्यांत एक सुप्त गूढ आकर्षण आहे आणि चेहऱ्यावर मात्र निरागस बालकाचं तेज. तो भारावल्यासारखा तिच्यापाठी चालू लागला .. जणू ती त्याला ओढून नेतेय कुठंतरी पार दूर दूर.. प्रत्येक पावलाला ठणकणारी वेदना मस्तकात जात होती; पण या वेदना आनंददायी होत्या.. कारण अभावितपणे प्रत्येक अवयव जिवंत असल्याची साक्षच त्या देत होत्या.
रज्जो चांगलीच बडबडी होती . त्यामुळे विराजसला आपण कुठं नी किती चाललोय काsही कळत नव्हतं. अतीव वेदनांनी देहभान खरंतर केव्हाच मागे पडलं होतं. आता फक्त ओढ होती बाहेर पडण्याची... रज्जो अचानक म्हणाली,
"बाहर कहॉं जाएंगे बाबू??"
भानावर येत विराजस म्हणाला,
"तुला ग कसं कळलं माझ्या मनातलं?"
रज्जो आपले काळेभोर डोळे रोखीत म्हणाली,
"सभी को बाहर जाणा है बाबू!...बस हमें लगता है की पहुचनें का ठिकाना अलग है। "
साधीशी खेडवळ रज्जो जीवनाचे गंभीर तत्वज्ञान देऊ लागायची तेव्हा तो अविश्वासाने पाहत रहायचा.
पडणाऱ्या दाट काळोखासोबत रज्जोचं अस्तित्व अधिक गडद होत जाणारं त्याला जाणवलं. तिच्या घड्याकडे पाहत तो म्हणाला,..
"पाण्यासाठी फारच लांब चालावं लागतं तुम्हाला... मैलन् मैल चालल्यावर घडाभर पाणी... पीके नाहीत... बंजर जमीन...नुसती रेती. काय हाल आहेत इथे?? कसे काय जगता तुम्ही लोक?"
चार पावलं पुढे चालणाऱ्या रज्जोने पाठमोर पाहिलं... आता तिच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळले होते त्याच्या जागेवर एक खुनशी भाव उमटला आणि ती म्हणाली,
"आप के हवाईजहाज ने तो हवा में ही उडा दिया होता बाबू! ... रेत ने बचा लिया। उसी रेत सें बैर काहे का??"
तो मुकाटपणे तिच्यापाठी चालू लागला. दूरवर कुठेतरी दिवे लुकलुकत होते. चिवट जिद्दीने स्वतःला ओढत ...एकेक पाऊल मोठ्या कष्टाने टाकत ... विराजस तिच्यापाठी चालत राहिला. ती कुठेही न थांबता संथ गतीने चालत होती. "जरासं टेकावं ..." हा विचार विराजसच्या मनात आला आणि त्याच क्षणी रज्जो जरा चढ्या सुरात ओरडली..
"रुकना नहीं है बाबू! .... रेत निगल जाती है। आप आज रुक गये तो समझ लो ऐसा ही एक रेत का टिला कल आप के उपर होगा । "
अतीव थकवा , ग्लानी त्याला ओढत होती आणि त्याच वेळी जगण्याची चिवट जिद्द त्याला खेचून नेत होती. आता तो काहीही न बोलता रज्जोच्या पाठीमागे निघाला... काहीकाळ निःशब्द शांततेत गेला... रों रों हवेचा आवाज आणि त्यात वाळूची रेशमी सळसळ... एव्हढाच काय तो आवाज. आता रज्जो ने बोलायला सुरुवात केली... ती अस्खलित बोलत होती... त्यातला काहीच भाग विराजसच्या कानातून मेंदूपर्यंत पोहोचत असावा...
"शहरी बाबू!..जिंदगी रेत की तरह तो होती है... मुठ्ठी में पकड नहीं सकते, छूट जाती है। कोई नहीं पकड सकता, फिसल जाती है। कुछ नहीं उगाती बंजर है... जिंदगी भी कहॉं कुछ देती है बाबू ??.... पानी पकडती नहीं ये रेत... पानी जो सबसे जरुरी है ...छोड देती है । हमारी जिंदगी भी सबसे जरुरी सब कुछ तो यहीं छोड ही देती है... ।"
मध्यरात्रीच्या मिट्ट काळोखात तिचे डोळे काजव्याप्रमाणे चमकले. बऱ्याच वेळाने विराजसने विचारले,
"जीवन रेतीसारखं म्हणतेस तर मग रेती तुला फारच प्रिय दिसतेय."
खळखळून हसत रज्जो म्हणाली,
""ये बात समझने तक तो जिंदगी हीं प्यारी थी बाबू! आपकी भी होगी ना..??"
तिच्या ह्या प्रश्नासरशी त्याला त्याची "जिंदगी"... ज्याला तो आयुष्याचा अविभाज्य भाग मानत होता ते सगळे आठवले. त्याला आठवले त्याचे आईबाबा... प्रसन्न निर्मळ चेहऱ्याचे. धाकटा भाऊ तेजस बरोबरची दंगामस्ती, त्याचा मित्रपरीवार, त्यांची मौजमजा. त्याला आठवला नुकताच झालेला त्याचा साखरपुडा... प्राजक्ता त्याची प्रेयसी आता त्याची भावी पत्नी..... त्याच्या हृदयात अनेक सुखाच्या, आनंदाच्या क्षणांच्या आठवणींचे कारंजे उसळत राहिले. जीवनाची ओढ आता अधिकच तीव्र झाली.जोरकसपणे पावलं टाकत तो चालू लागला.
रज्जो मागे वळली, क्षणभर थबकली आणि म्हणाली,
"मैं तो आपके तरफ की णा होऊ...नाही आप मणे जाणो है...तो काहें पीछे पीछे चल दिये बाबू!"
तो सुद्धा जरासा विचारात पडला आणि म्हणाला...
"तू मला पलीकडे घेऊन जाशील असा विश्वास वाटला मला."
"इस पार से उस पार..."
म्हणत रज्जो खळखळून हसली. हळूहळू उजाडायला लागले होते. अख्खी रात्र तो रज्जोच्या पाठीमागे चालत होता. उगवणाऱ्या दिवसाबरोबरच रज्जो हळूहळू जणू विरळ होत जातेय, असं त्याला वाटू लागलं. अतीव श्रमाने किंवा वेदनांमुळे असे भास होत असावे... असंही त्याला वाटून गेलं.
एका ठिकाणी जणू थबकल्यासारखी थांबत रज्जो म्हणाली...
"जाओ बाबू उसपार..! आपका इसपार का कारवाँ यहीं से खत्म । "
तो भारावल्यासारखा आज्ञाधारकपणे चालत राहिला. काही पावलांवर त्याला एक छोटीशी वस्ती, एक गाव काही माणसं दिसली... त्याला भरून आलं. मन जड झालं डोळे भरून अत्यानंदाने वाहू लागले... तो माणसांच्या जगात होता... निरोप घ्यायला म्हणून तो पाठमोरा वळला... तर.. तर .. हवेत विरून जाणारी रज्जो त्यानं पाहिली... धक्क्याने तो जागीच कोसळला....
पुढच्या सगळ्या घटना वेगाने घडत गेल्या... गावातील चावडीवरचे लोक त्याच्या मदतीला धावले, त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, एअर फोर्स बेस बाडमेरला संपर्क साधण्यात आला, त्यांच्या विशेष रेस्क्यू एअर अम्ब्युलन्स हेलिकॉप्टरने तो सुखरूप त्याच्या जगात पोचलाही. विराजस जिवंत असणे हा नक्कीच एक चमत्कार मानण्यात आला....एकूण परिस्थिती पडताळून पाहता तो जिवंत असण्याची... किंवा अगदी त्याचे प्रेत सापडण्याची आशासुद्धा सोडून देण्यात आलेली होती... अगदी विमानाच्या स्फोटातून तो वाचला असता तरी वाळवंटात कुठेतरी निर्जन जागी गाडला जाण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती ... हवालदिल झालेल्या त्याच्या आप्तेष्ट आणि कुटुंबियांसाठी त्याचे पुनरागमन सुखद धक्का होता. त्याची मोडलेली हाडे सांधण्यासाठी आणि जखमा भरून शरीर पूर्ववत होण्यासाठी काही महिन्यांचा अवधी गेला.
विराजसला आजही त्या प्रसंगाची कल्पना करवत नव्हती... रज्जो खरंच होती की भास होता त्याचा?? रात्रभर तो एका भुतासोबत होता का?? ते भूत होते किंवा अमानवी शक्ती म्हणूया किंवा... वाळवंटातील एखादा वाटाड्या ... असेल कदाचित. तिने त्याला त्याच्या जगात परत आणलं होतं... स्वतःशी समजल्यागत हसत विराजस म्हणाला...
"रज्जो... म्हणजे जीवनेच्छा !पल्याड गेलेल्याला परत अल्याड आणणारी."
विषम परिस्थितीत ...आपल्या माणसांच्या आठवणी, आपल्या आयुष्यातले आनंदाचे क्षण आपल्याला जगण्याची उमेद देतात... हाच रज्जू हाच रेशमी धागा आपल्याला जीवन -मरणाच्या सीमारेषेवर जीवनाच्या बाजूकडे बांधून ठेवत असतो ... "रज्जो!" ... रज्जो आणि तिच्या गप्पांमधून उलगडलेलं आयुष्याचं गणित त्याला जीवनाचा एक वेगळा दृष्टिकोन देऊन गेलं. खरंच तर होतं तिचं...
"जिंदगी रेत की तरह है बाबू! पकडके रखना चाहोगे तो छूट जायेगी...।"
✒️ यशश्री रहाळकर