जवळपास सहा वर्षांनंतर ...अभिषेक व्यसनमुक्त होऊन केंद्रातून बाहेर पडला तेव्हा त्याचं वय 25 वर्षे होतं, शिक्षण अपूर्ण .. मॅट्रिक नापास.. केंद्रात थोडे फार काम करवून घेतले होते. त्यातूनच त्याला गाड्या दुरुस्त करण्याची आवड निर्माण झाली होती... मालती ताईंनी शब्द टाकून त्याला एका ITI कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून दिली होती. सकाळी कॉलेज असायचे, दुपारी 2 ते 7/ 8 वाजेपर्यंत तो एका गॅरेजला काम करायचा.. रात्री थकून झोप चटकन लागायची... आणि थोडे पैसेही मिळायचे... तसा प्रश्न पैश्यांचा कधी नव्हताच. उलट गरजेहून जास्त मिळालेल्या पैश्यांचा होता... मालती ताईंनी त्याच्या आईवडिलांना ,
"अभिला पैसे पाठवून मारण्यापेक्षा विष का देत नाहीत तुम्ही? "
असा थंड डोक्याने प्रश्न विचारल्यावर त्याच्यावर होणारा पैश्यांचा पाऊस थोडा घटला होता.. पण आता त्याला ते पैसेच नको होते. केंद्रातून बाहेर पडल्यावर औरंगाबादला आजीच्या जुन्या घरात रहायचा निर्णय त्याने कळवून टाकला. आजी ... त्याच्या वडिलांची आई ...; एकटीच तर राहत होती तिनेही होकार दिला ... तशी थोडी भीती तिलाही वाटली असेल पण नातवाच्या प्रेमापुढे कदाचित तिची भीती दुबळी ठरली. दोघांनाही एकमेकांची सोबत झाली.. तशी अबोल सोबत म्हणायची कारण अभि फारसा बोलत नसायचा .. मात्र आजी सांगेल ती सगळी कामे चटाचटा करायचा..भाजी आणून देणे, दळण आणणे, बिल भरणे वगैरे वगैरे. दर पाच दिवसांनी मालती ताईंचा फोन यायचा तेव्हा मात्र अर्धा तास मोकळेपणाने बोलणे व्हायचे.. मालती ताई सप्रे म्हणजे त्याच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका... स्वतःचा तरुण लेक व्यसनाला बळी पडल्यानंतर तरुण मुलांच्या व्यसनमुक्तीला सर्वस्व वाहून घेतलेली प्रेमळ माऊली. अभिषेक नेहमी मालती ताईंना म्हणायचा..
"तुम्ही माझ्या आई का नाही हो झालात?"
त्यावर मालती ताई म्हणायच्या, "तू ज्या दिवशी व्यसनमुक्त होऊन नीट आयुष्य जगू लागशील त्या दिवसापासून मी तुझी आई असेन!"
आता ह्या माऊलीच्या शब्दांखातर तो नीट वागू लागला.. पौगंडावस्थेत जडलेल्या व्यसनावर त्यानी मोठ्या धैर्याने मात केली.. एक चांगलं आयुष्य जगायचे वचन मालती ताईंना देऊन तो केंद्रातून बाहेर पडला. त्याचं आयुष्य साचलेलं डबकं असलं तरी ह्या सहा सात वर्षांत सगळ्यांची आयुष्ये धावत पुढे गेली होती.. आधीच त्याच्या आयुष्याची काय कमी फरपट झाली होती ?? ..आता त्याला कुणाच्याच पाठी धावायचे नव्हते तर स्वतःच्या गतीने एक शांत आयुष्य जगायचे होते. आई किंवा बाबा कुणाचाही फोन आलाच तर तो न बोलता आजीकडे देत असे... स्वतःला शांत आणि आनंदी ठेवायचे सगळे प्रयत्न तो करणार होता.. तसं त्याने मालती ताईंना वचनच दिलं होतं.
रविवार मात्र त्याच्या अंगावर येई.. मग तो सरळ वाट फुटेल तिकडे चालून थकला की परत येई... बाकी बाह्य जगाशी त्याने फारसा संबंध ठेवलाच नव्हता, त्यापेक्षाही त्याला तो नकोच होता... नको ती स्पष्टीकरणे, नको ते प्रश्न आणि नको ते त्याच त्याच जळजळीत जाणिवांचे न सुटणारे कोडे.
जळजळीत भावनेसरशी त्याला आतडी जाळून टाकणाऱ्या दारूची तीव्र तलफ आली.... थोडी थोडकी नाही तर गेली आठ नऊ वर्षे तो ऍक्टिव्ह अल्कोहोल ऍडिक्ट होता... हळूहळू कमी करत करत त्याने बऱ्याच निग्रहाने त्यावर नियंत्रण मिळवले होते पण संयम बरेचदा डगमगायचा. अश्या वेळी तो मालती ताईंना फोन करायचा, अधून मधून केंद्रात जाऊन व्यसनमुक्तीच्या प्रवासातील आपले अनुभव सांगायचा. बरेचदा अदालत रोडवर चालत निघायचा आणि फॅमिली कोर्टातील एखाद्या सेशनला जाऊन बसायचा.
"टी. व्ही. / सिनेमातील खोटी खोटी पात्रे पाहण्यापेक्षा ही खरीखुरी पात्रे अधिक मनोरंजक असतात .."
असे नेहमीच त्याच्या मनात यायचे... तशीही आयुष्यातली बरीच वर्षे त्यानेही कोर्टात खेटे घालून घालूनच संपवली होती. तिथे त्याला एकप्रकारे उबदारपण जाणवे... सगळ्या मनाच्या आठवणींनी पार चिंध्या केल्या की त्या गोळा करून तो परत येई. हे ऐन पौगंडावस्थेत भोगलेलं हलाहल आतपर्यंत जाळत गेलं की त्याची दारूची तलफ आपसूक भागत असे.
आजही तो असाच उध्वस्त मनाने फॅमिली कोर्टात येऊन कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसता झाला... दोन मुलांच्या कस्टडीची केस होती... आई आणि वडील विभक्त झाले होते, दोघांनाही लग्ने करायची होती आणि ही मुले नावाची ब्याद कुणालाच नको होती.. दोघेही त्यासाठी पैसे मोजायला तयार होते... अभिला गलबलून आलं... मनाचा दगड झालेल्या त्या 8/9 वर्षाच्या मुलाकडे त्यानं पाहिलं... बिच्चारा! मुलांना कुणाकडे जायचं आहे असे कोर्टानं विचारलं... ह्या प्रश्नाचं उत्तर किती कठीण असतं...? नवरा बायकोचे वाद टिपेच्या सुरात वाढले आणि कोर्टाने पुढील तारीख दिली. अभिषेक बाहेर पडला.. गेट शेजारच्या टपरीवर चहा पिऊ लागला.. त्या निष्पाप पोराच्या जागी तो स्वतः उभा असल्याचं त्याला दिसलं... चालत घरी परत निघाल्यावर त्याचं मन मात्र कधीच भूतकाळात चालतं झालं होतं.
तो लहान असतांना... किती छान ,गोड ,सुखी संसारासारखं चित्र होतं त्याच्या घराचं... त्याचे आईवडील दोघेही उच्चशिक्षित मोठ्या पदावर कार्यरत.. घर कसलं भला मोठा बंगला, गाड्या , नोकर चाकर सारं वैभव जन्मजात त्याला मिळालं. वडील ऑर्डीनन्स फॅक्टरीमध्ये अधिकारी तर आई LIC मध्ये चांगल्या पोस्ट वर.... एकुलत्या एक अभिषेककडे सगळे सगळे होते फक्त आईबाबांचा सहवास सोडून...दोघेही त्यांच्या कामांच्या व्यापात मिटींगमध्ये बुडालेले... दोघांचे वाद भांडण कधीही झाले नाही ...पण जोपर्यंत चोपडे साहेब प्रकरण उद्भवले नव्हते.... फक्त तोपर्यन्त.
शहरातल्या उच्चभ्रू पालकांची मुले जायची त्या शाळेत अभिषेकला घातले होते. लहानपणापासून आपल्याला छान मार्क मिळाले ,बक्षीस मिळाले की मम्मी पप्पा खुश होत असत हे त्या चिमण्या जीवाला कळले होते... त्यासाठी सतत त्याची धडपड सुरू असायची. सरळमार्गी अभिषेक घर, शाळा, क्लासेस मध्ये व्यस्त असायचा... अधून मधून सुट्टीत तो औरंगाबादला जायचा किंवा आजीआबा त्याच्याकडे येत.
तो दहावीला होता तेव्हाची गोष्ट... एक दिवस मम्मी घरी येतांना भला मोठा पिझ्झा बॉक्स घेऊन आली... तिच्यासोबत कुणीतरी साहेब होते... त्यांना ऑफिसचे महत्वाचे काम करायचे होते... आईने अभिला पाचशेची नोट देत ,"बाहेर फिरून ये , मित्रांसोबत मज्जा कर ." असे सांगितले. पहिल्यांदा त्याला काहीच वाटले नाही पण हळूहळू हे असं बरेचदा घडू लागलं. अर्धवट वयात असणाऱ्या अभिला हे खटकत होतं पण नेमकं काय खटकतंय हेही कळत नव्हतं. पुढे त्या साहेबांचं नाव चोपडे साहेब असून.. ते नवीनच बदलून आल्याचेही कळलं. काळा ,दांडगट रेड्यासारखा चोपडे त्याला अज्जिबात आवडला नव्हता.. त्याच्याकडे येणाऱ्या पाचशेच्या नोटांची संख्या हळूहळू बरीच वाढू लागली... तसे त्याच्या भवती फुकट्या, वाया गेलेल्या मुलांचे टोळके बनले... त्याचा बराचसा वेळ मॉल ,सिनेमा ,गेमझोन मध्ये जाऊ लागला. सहज उत्सुकता, गंमत म्हणून आणि खिशात बक्कळ पैसा खुळखुळत होता म्हणूनही अश्याच एका मित्रासोबत तो पबला गेला.. पहिल्यांदा त्याने दारू चाखली..... मग वाईन, बिअर, व्हिस्की, रम... नावं फक्त वेगळी.... अभिला दारूची चटक लागली. गंमत म्हणून खेळलेला जुगार , कसिनो, कार्ड्स तो सहज जिंकायचा.. मग काय अजून पैसे अजून दारू. सांभाळायची अक्कल नसतांना मिळालेला पैसा अधिकाधिक दुर्दैवाकडे फेकत जातो..अभि वाहावत गेला.
एक दिवस जवळचे पैसे संपले म्हणून पैसे घ्यायला घरी परत आलेल्या अभिने त्याच्या जवळील लॅच की ने दार उघडले. घरांत कुणाचा तरी दबलेला आवाज त्याला ऐकू आला... म्हणून शोधाशोध करत असताना... त्याने चोपडे आणि त्याच्या मम्मीला नको त्या अवस्थेत पाहिले.
त्याच्या पायाखालची जमीन सरकली... आजवर मिळणाऱ्या पाच -पाचशेच्या नोटांचे अर्थ क्षणभरात त्याला कळले. हे सगळे पप्पांना कळू नये म्हणून पुन्हा नोटांवर नोटा त्याला मिळू लागल्या... त्याला स्वतःचीच किळस वाटू लागली... आणि तो अधिकाधिक व्यसनाच्या विळख्यात सापडला... अपेक्षेप्रमाणे दहावीला तो नापास झाला. कधीतरी वडिलांनाही चोपडे प्रकरण कळलं... आणि मग सुरू झाली धडपड एकमेकांना नामोहरम करण्याची. मम्मी त्याच्या पप्पांना डिव्होर्स द्यायला तयार नव्हती... आणि चोपडेला सोडणेही तिला मान्य नव्हते... फॅमिली कोर्टात केस उभी राहिली.. वडिलांनी आईवर व्यभिचाराचा आरोप केला होता.. तो खरा असला तरी त्याचे असे सार्वजनिक वाभाडे निघायला नको होते. तुफान पेपरबाजी झाली... ह्या आंबट बातमीला मसाला चोळून पुढे करण्यात आले... त्यात कधीतरी अभिने त्यांना रंगेहात पकडल्याचेही वडिलांनी पुढे केले... त्यालाही साक्षीला बोलवण्यात आले...
सतरा अठरा वर्षाच्या त्या पोराच्या मनाचे काय झाले असेल?? कुणीही विचार केला नाही. अभिच्या जगात तो टिंगलटवाळीचा विषय झाला होता... त्याची पाठ वळली की मुले "चोपडे कुठे आहे रे?" असे ओरडायचे. एकदा तर एकाशी त्याची मारामारी झाली आणि तो मुलगा थेट म्हणाला..
"तुझ्या आईचे आधीचे बॉस पण घरी यायचे का रे?? तू तुझ्याच बापाचा आहेस ना?"
अभिने त्याला अर्धमेला होईपर्यंत तुडवला.. अखेर पोलिसांनी त्याला उचलून चार दिवस कोठडीत ठेवले. चार वर्षांनी डिव्होर्स झाला आणि आई वडिलांनी वाटा वेगळ्या झाल्या.. वडिलांनी दुसरे लग्न केले.. आईने तसेच राहायचे ठरवले... आणि अभिषेक बाटलीत बुडून गेला... विचारांच्या गर्तेत घर कधी आलं त्याला कळलंच नाही. घरात अंधार होता.. आजी म्हणाली,
"आपलेच लाईट गेले रे ! काही कळत नाहीये."
अभिने थोडी खटपट केली आणि दिव्याच्या प्रकाशाने घर उजळून निघालं. त्याने आजीला प्रसन्न हास्य देत .. हातानेच थांबवलं
"उशीर झालाय ना! आता काही करत बसू नकोस.. मी मस्त तुझ्या आवडीची पावभाजी आणतो."
पिशवी घेत पायात चपला सरकवीत तो निघालाही. आजी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली... तिला अजूनही समुपदेशनाच्या वेळेचं त्याचं टाहो फोडून रडणं आठवत होतं..
"प्रत्येकासाठी आपली आई गंगा असते... पवित्र, सुंदर. तिची अशी गटारगंगा झाल्याचं पाहिलं आणि मी बाटलीत बुडत गेलो."
अभिषेकचे सुदैव म्हणायचे की त्याच्यासाठी मालती ताईंसारखी समुपदेशक होती, मार्गदर्शक होती.. पण सोन्यासारखं आयुष्य विस्कटलं .. त्याचं काय?
✒️ यशश्री रहाळकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!