फॉलोअर

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

"पुरुषस्पंदन" कथा २ :- नाकर्ता


अश्विन आणि आशाचं लग्न बरंच उशिरा झालं. आशा 32 वर्षे पूर्ण तर अश्विनने पस्तिशी गाठली होती. आशा समाजशास्त्र विषयाची प्राध्यापिका ... बरीच वर्षे नॉन ग्रँट वर अक्षरशः विनावेतन काम केल्यावर तिच्या कॉलेजला ग्रँट मिळाली. मग मात्र तिची बॅक डेटेड अपॉइंटमेंट दाखवून सगळा पगार घसघशीतपणे हातात पडला. आता तिने Ph.D. साठीही प्रयत्न सुरू केले होते. तिच्या जातीच्या मानानं तिचं वय आणि शिक्षण दोन्हीही खूपच जास्त झालं होतं. त्यात आशाच्या मोठ्या दोघी बहिणींच्या गडगंज सासरी त्यांचे नवरे नित्यनेमाने दारू पिऊन मारहाण करायचे. ह्या साऱ्याची घृणा वाटून आशाने निर्व्यसनीच मुलगा असावा एव्हढीच एकमेव अट घातली... तो काही मिळेना. त्यात ही प्राध्यापिका म्हणजे कायम तिच्याच शहरात राहण्याची तयारी हवी... तेही शक्य होईना. दुसरीकडे अश्विन घरातला सगळ्यांत मोठा ... वडिलांच्या माघारी पाठच्या तीन बहिणींचे सुस्थळी विवाह करून मुक्त होईतो आईने राम म्हटले. तसा एकटाच उरलेला अश्विन निर्व्यसनी होता आणि ऍडजेस्टमेंट करणे ... त्याचा सहज स्वभाव होता. एका मध्यस्थाने पुढाकार घेतला दोघांची गाठ घालून दिली... आवश्यक ती बोलणी झाली आणि साध्या पद्धतीने लग्न पार पडले.

लग्नाच्या आधीच अश्विनने स्पष्टपणे आपल्या परिस्थितीची कल्पना आशाला दिली होती. अश्विन एका शिक्षण संस्थेत क्लार्क होता.. शिक्षणही जेमतेमच.. पगार पंधरा हजार. आईवडिलांचे होते नव्हते सारे बहिणींच्या लग्नात संपून गेले होते. ह्याउलट आशा प्राध्यापिका होती, महत्वाकांक्षी होती तिला प्रगती करत पुढे जायचं होतं, तिचा पगार लग्नाचे वेळी चाळीस हजारांच्या आसपास होता. पगाराची दरी सोडली तर दोघांनाही जोडीदाराची गरज होती आणि दोघेही सामंजस्याने संसार करत होते. फक्त आशा वाशीमला तर अश्विन यवतमाळला... नव्या नवलाईच्या दिवसांत सतत होणाऱ्या भेटीगाठी हळूहळू कमी होऊ लागल्या. प्रवासाचा कंटाळा येऊ लागला... सतत एकमेकांसोबत राहून , सुखदुःख वाटावेत , गप्पा माराव्यात अशी ओढ दिवसेंदिवस तीव्र होऊ लागली. त्यातच आशाला एकदा खूप ताप भरला... टायफॉईड असावा पण अंगावर काढल्याने दुखणं चांगलंच वाढलं. शनिवारी रात्री उशिरा नेहमीसारखा अश्विन घरी आला तर आशा तापाने ग्लानीत अर्धमेली होऊन तळमळत होती. तिला हॉस्पिटलाईज करावे लागले...पुढचे पंधरा दिवस अतिशय  कठीण होते . आशा अगदी देवाच्या दारातून परतली. अश्विनने खूप प्रेमाने तिची तब्येत अगदी नीट होईपर्यंत सारं सांभाळलं. मुळात एकटा राहत असल्याने नीटनेटकेपणा, स्वयंपाक, घर व्यवस्थित ठेवणे सारेच तो उत्तम करायचा. तो असेपर्यंत आशा निर्धास्त होती , मात्र तो जायला निघालो तसे तिने एकवटलेला सगळं धीर सुटला... 

"मला एकटीला रहायचं नाही .. अश्विन जाऊ नका ."
असे म्हणत ती रडायला लागली. अश्विनची पाऊलही जड झाली... त्यालाही आशाला सोडून जावे वाटत नव्हते पण सुट्टी तरी किती मिळणार ?? अखेर दोघेही परस्पर सामंजस्याने ह्या निर्णयावर आले की ,

"आता येथून पुढे आपण एकत्र जगायचे ... नाहीतर सगळे आयुष्य एकट्याने सरले की हाती काहीच उरणार नाही."

आशाची नोकरी स्थिर , पगार उत्तम. .... अश्विनने नोकरी सोडली आणि तो कायमचा आशा सोबत वाशीमला स्थायिक झाले. सुरुवातीला तिथेच मिळेल अश्या लहान मोठ्या नोकरीसाठी खूप प्रयत्न केले पण चाळीशीत कोण जॉब देणार? शेवटी त्याने घर सांभाळायचे ठरवले. लोकांनी यथेच्छ टिंगल केली... 

"हाऊस वाईफ सारखा हा हाऊस हजबंड आहे .."

इथपासून तर ..

"आशा मॅडमचा घरगडी ..!"

इथपर्यंत टोमणे त्याने शांतपणे पचवले. बाहेर जग काहीही म्हणो... आशा आणि अश्विनचा संसार दुधात साखर विरघळून जावी असाच होता... फक्त इतर उदाहरणात ही साखर स्त्री असते.. इथे मात्र ती भूमिका अश्विनच्या वाट्याला आली आणि त्यानेही ती उत्तम निभावली. आर्या आणि अनिषच्या जन्माने त्यांचा संसार दोनाचा चार झाला. आशाची डॉक्टरेट पूर्ण झाली... तिची काही पुस्तके, संशोधने प्रकाशीत झाली... उत्तम वक्ता म्हणून तिचं नाव झालं आणि ठिकठिकाणी आवर्जून तिला आमंत्रण दिलं जाऊ लागलं. कधी कुठली अभ्यास परीषद, कुठली कॉन्फरन्स , कुठले मंडळ, चर्चासत्र ... आशा वक्ता म्हणून जायची आणि अक्षरशः व्यासपीठ गाजवायची. आशा तिच्या संसारात समाधानी, तृप्त होती. त्यांचं छान टुमदार घर आणि उबदार घरकुल होतं. तिच्या साऱ्याच कर्तृत्वात अश्विनचा मोठा वाटा होता आणि हे ती प्रांजळपणे कबूलही करत असे. 

मुलांना अगदी तान्हे असल्यापासून अश्विननेच सांभाळले होते.. पुरुष असल्याने आई होऊ शकला नाही इतकेच पण आईच्या म्हणून असणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यानेच पार पाडल्या होत्या. आपल्या दोन्ही मुलांवर त्याची विलक्षण माया होती... स्वतःचे बाहेरचे जग नसल्याने त्याचं घर आणि कुटुंब हेच त्याचं संपूर्ण जग होतं. सकाळी मुलांना उठवणे, तयार करणे, शाळेत सोडणे, class ला नेणे आणणे, अभ्यास घेणे, त्यांच्या आवडीचे पदार्थ करणे... एव्हढेच नाही तर त्यांची दुखणी, आजारपणे काळजी घेऊन, रात्री जागून त्यानेच पार पाडली होती. आशा असतांना किचनचा भार त्याच्यावर फारसा पडत नव्हता पण आशा बाहेरगावी असली की किचनही तो उत्तम सांभाळायचा. कधी कामाची बाई आली नाही तर सिंक मध्ये खरकटी भांडी आशाची वाट पाहत पडलेली नसत ... कधीच अश्विनने ती घासून ठेवलेली असायची... त्यातही त्याला लाज , कमीपणा कधीच वाटला नाही. सकाळी उठून आवरून नाश्ता करून अश्विन सार्वजनिक वाचनालयात जायचा... तिथे तासभर बसून वाचन आणि पुस्तके बदलून आणणे .. ही कामे होत. तेव्हढाच त्याचा हक्काचा एक तास बाकी सगळा वेळ फक्त कुटुंबाचा. आशा आणि त्याच्यामध्ये  पुरुषी अहंकाराची दरी नव्हती आणि मी कमवती हा अभिमानाचा डोलाराही नव्हता. घरात येणारा पैसा कुणीही कमावला तरी तो सगळ्या कुटुंबाचाच आहे अशीच दोघांचीही भावना होती. आशाने तर सर्व आर्थिक व्यवहार अश्विनवर सोपवले होते... ते CA शी बोलणं, पैसे invest करणं, इन्शुरन्स, टॅक्स सगळं सगळं तिला भलतंच कटकटीचं वाटायचं. अश्विन हे सगळं जबाबदारीने पार पडायचाच आणि एक पै देखील उधळणार नाही हा दृढ विश्वास तर होताच.

हळूहळू आजूबाजूच्या लोकांसाठी ह्या जोडप्याचा विषय शिळा झाला. काळाच्या ओघात अशी तुरळक जोडपीही दिसू लागली... बायकोचं कमावणं नवऱ्याचं घर सांभाळणं ह्या विषयातलं नाविण्य संपलं. आयुष्य कुणासाठी थांबत नाही... आशा आणि अश्विनची लेक आर्या 18 वर्षांची झाली... बारावी तिने उत्तम मार्कांनी पास केलं पण एन्ट्रन्स एक्सामला स्कोर घसरला... मनाजोगं कॉलेज काही मिळेना... त्यामुळे नैराश्याने ह्या वयातल्या मुलांची होते तशीच तिचीही चिडचिड होऊ लागली... ह्या फुलपंखी वयात सारे मनाजोगे व्हायला हवे असते. त्यात आर्या म्हणजे लाडोबा.. अश्विनने तिला एखाद्या राजकुमारी सारखे वाढवलेले... जात्याचं बापाची लेकीवर अधिक माया आणि त्यात अश्विनसाठी आर्या म्हणजे जीव की प्राण. तिला ह्याहून उत्तम स्कोर नक्कीच मिळेल अशी खात्री आपल्या लेकीबद्दल त्याला होती म्हणूनच तो आर्याला पुन्हा एन्ट्रान्स एक्साम देण्याविषयी सतत समजावून सांगत होता...

"हे बघ पिल्लू.. तुला नक्कीच याहून चांगला स्कोर मिळेल.. तू एक वर्ष गॅप घे आणि झोकून देऊन प्रयत्न कर...खूप अभ्यास कर. मला खात्री आहे तुझा गव्हर्नमेंट कोट्यातून नंबर नक्की लागेल."

"पप्पा.. आयुष्यातलं एक वर्ष ... वर्ष किती मोठं असतं माहिती आहे?? वाया जाईल पप्पा.. आणि नाहीच मिळाला स्कोर चांगला तर...?"

"तू असा negative विचार का करतेस?? पिल्लू नक्की मिळेल तुला उत्तम स्कोर.. मला पूर्ण विश्वास आहे."

एकमेकांच्या विरोधाचे सूर लागले आणि संभाषणाला धार चढत गेली... आर्याच्या मते, तिच्या इतर मैत्रिणींसारखी भरमसाठ डोनेशन्स भरून तिला हव्या त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन द्यावी तर अश्विनच्या मते, तिने एक वर्ष गॅप घेऊन पुन्हा प्रयत्न करावेत आणि गव्हर्नमेंट कोट्यातून प्रवेश घ्यावा. प्रकरण हातघाईवर आले.. बाप लेकीचं हे वाद अखेर आईच्या कोर्टात गेले...

"आई माझ्यासाठी तुझ्याकडे पैसेच नाही आहेत का? सगळं डबोलं तुझ्या लाडक्या अनिषसाठीच ठेवणार का?"

"आर्या काय बोलतेस तू.. पिल्लू आईशी नीट बोल.." अश्विनने दरडावले.

"हे बघ आई मी स्पष्टच सांगतेय माझ्या सगळ्या मैत्रिणी रग्गड डोनेशन भरून ऍडमिशन घेताहेत त्यांच्या ड्रीम कॉलेजला.. मलाही ऍडमिशन हवीय.. शिकेन तर त्याच कॉलेजला..."

तिचे बोलणे मध्येच तोडत अश्विन म्हणाला..

"पिल्लू तू त्याच कॉलेजला घे ऍडमिशन .. फक्त त्यासाठी थोडी मेहनत घे, मेहनतीने मिळवलेल्या गोष्टीतील आनंदच वेगळा असतो..."

"पप्पा मेहनती बद्दल तू बोलतोयस?? तू तर ह्या विषयावर बोलूच नकोस... आई मी तुला विचारतेय तुझ्याकडे माझ्यासाठी पैसे आहेत की नाहीत??"

आर्याने इतके तोडून बोलल्यावर, अपमान केल्यावरही अश्विन त्याकडे दुर्लक्ष करत  होता.. त्याला फक्त आपल्या लेकीचं भलं व्हावं वाटत होतं.. आर्याने कोणतेही शॉर्टकट्स वापरू नयेत. तिने मेहनत करावी आणि यश मिळवावं.. अशी प्रत्येक बापाची असते तशीच आणि तेव्हढीच अपेक्षा होती त्याची. आपला मुद्दा रेटत अश्विन पुन्हा म्हणाला...

"पिल्लू प्रश्न पैश्यांचा नाही .. तू मुद्दा लक्षात घेतच नाही आहेस... पैसे आहेत तुझ्या भविष्याची तरतूद सर्वांत आधी करून ठेवलीये आम्ही.. तुझं शिक्षण तुझं लग्न अगदी काही काही कमी पडणार नाही..."

आर्या पुन्हा तुटकपणे म्हणाली..

"आई मी तुझ्या पैश्यांबद्दल विचारतेय.. मी जॉब लागल्यानंतर तुझे पैसे परत करेन पाहिजे तर तसे लिहून घे.."

आर्याचं एकेक वाक्य आशाला नामोहरम करत होतं... सगळ्या जगभर कुटुंबसंस्थेची उत्क्रांती आणि सामाजिक सामंजस्यावर भाषणे देणारी आशा आज तिच्याच लेकीकडून पराभूत झाली होती. आत्तापर्यंत फक्त ऐकून घेत शांत बसलेली आशा कडव्या स्वरात म्हणाली..

"आर्या ! पप्पा काय म्हणताहेत ते एकदा समजून घेण्याचा प्रयत्न कर... ते शत्रू नाहीयेत तुझे... "

आर्या बेलगामपणे किंचाळली..
"ते कोण होतात ठरवणारे तू सांग.. पैसे तू कमावतेस ना... दीड दमडीही न कमावणाऱ्या कर्तुत्वशून्य माणसाने निर्णय घ्यायचा नाहीये माझ्या भविष्याचा.. मला ते चालणार नाही."

तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत आशाने काडकन कानाखाली जाळ काढला... 
"यापुढे एक अवाक्षर बोललीस ना तर बोलायच्या लायकीची ठेवणार नाही तुला.. स्वतःच्या वडिलांबद्दल असे अपशब्द बोलतांना लाज कशी वाटली नाही तुला? "
आशाचे डोळे आग ओकत होते.

"वाटली ना आई खूप लाज वाटली जेव्हा मला वर्गात कुणीतरी विचारायचं तुझे पप्पा काय करतात?? तेव्हा उत्तर नसायचं माझ्याकडे .... सगळे टिंगल करायचे.. सगळे हसायचे माझ्यावर .. तेव्हा खूप लाज वाटायची. माझ्या मैत्रिणींचे पप्पा पाहते ना तेव्हाही खूप लाज वाटते मला..लाज वाटते मला रिकामटेकडा नाकर्ता बाप असल्याची..."

आशा हतबुद्ध होऊन पाहत राहिली.. हे एव्हढं विष साचलं होतं हिच्या मनात... आपलं खरंच मुलांकडे दुर्लक्ष झालं आहे. दाणादाण पावलं आपटत आर्या तिच्या खोलीकडे वळली .. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आशा थक्क होऊन पाहत राहिली. क्षणभर तिला आपल्या खांद्यावरील पत्नी ह्या जबाबदारीचेही भान आले.. अश्विन पायात चप्पल घालून घरातून निघून गेले होते. आपल्याला जे शब्द काळजाला चटका लावून गेले ते अश्विनचं काळिजच जाळत गेले असणार ह्याची तिला खात्री होती. स्वतःच डोकं आणि मन शांत करायला अश्विन लांब चालत निघाला होता... लेकीचे "नाकर्ता रिकामटेकडा " हे शब्द घणाचे घाव घातल्या प्रमाणे त्याचं डोकं फोडत होते..

रात्री उशिरा दमून भागून थकल्या मनानं घरी परतलेल्या अश्विनची पावलं जड झाली होती... काळजीने अर्धमेली झालेली आशा दारातच आत बाहेर करत होती.. अश्विनला पाहताच तिच्या जीवात जीव आला. आशाच्या मांडीवर डोकं ठेवून अश्विनचं डोळे झरू लागले... त्याला ढसाढसा रडावसं वाटत होतं.. पण अखेर पुरुष होता तो रडणार तरी कसा?? आज तो खूप काहीतरी मौल्यवान हरवून बसला होता. आशा मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली..

"अर्धवट वय आहे तिचं.. ह्या वयात कळत नाही काय चांगलं काय वाईट... विसरून जा सगळं."

पाझरणाऱ्या डोळ्यांनी आशाचे हात हातात घट्ट धरत अश्विन म्हणाला..

"प्रत्येक बाप त्याच्या मुलीसाठी हिरो असतो.  मला नाही होता येणार का ग ??.. मी हा असा नाकर्ता.... माझ्या मुलांना माझी लाज वाटावी असं काही केलंय का मी??"

✒️ यशश्री रहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!