देवस्थळी कुटुंब गेली 15 वर्षे आमचे शेजारी... देवस्थळी काका म्हणजे साधा, सरळ, पापभिरू माणूस.. न कोणाच्या अध्यात न मध्यात. झेड. पी.त क्लार्क होते... आपण बरे नि आपले काम बरे अश्या वृत्तीचे..... वरच्या पैशाचे काळे मार्ग त्यांनी त्यांच्यापुरते बंद केले होते. "पैसा एका मर्यादेच्या वर आला की तो सुख आणत नाही तर मनःस्तापाची गाठोडी घेऊन येतो..." असे ते नेहमीच म्हणत. देवस्थळी काकू गृहिणी .. फारश्या अपेक्षा नसणाऱ्या , नवऱ्याच्या आणि मुलांच्या आनंदात सुख शोधणाऱ्या. त्यांना दोन मुलगेच...मोठा सदानंद आमच्याहून 6 वर्षे मोठा...आम्ही त्याला सदादा म्हणायचो .... मी आणि धाकटा अभिजित वर्गमित्र. सदानंद आणि अभिजित दोघेही अतीशय हुशार, वर्गातल्या पहिल्या तिनातले ... जोडीला मेहनती आणि अभ्यासू. फरक एवढाच होता की अभिजीतच्या महत्वाकांक्षा मोठ्या होत्या, त्याची स्वप्ने सुद्धा मोठी असत. चित्रकलेच्या तासाला आम्ही जेव्हा बाग, कौलारू घरे, डोंगर वगैरे काढायचो तेव्हा त्याने आलिशान बंगला आणि मर्सिडीजचे चित्र काढलेले असायचे. विज्ञानाच्या प्रयोगांसाठी जेव्हा आमचा विषय ओल्या कचऱ्यापासून खत वगैरे असायचा तेव्हा त्याने विमानतळावरचे सिग्नलिंग उभे केले असायचे. 'मी अंतळारवीर झालो तर....' , 'मी राष्ट्रपती झालो तर... ' किंवा 'मी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर झालो तर.... ' अश्या प्रकारचे निबंध हा पठ्ठ्या इतके भारी लिहायचा की त्याला पैकीच्या पैकी गुण मिळत ; बरेचदा सुंदर हस्ताक्षराचे अधिक 2 गुण त्याचेच असायचे. हा नक्कीच मोठेपणी कुणीतरी मोठ्ठा माणूस होणार ह्याची आम्हा सगळ्या मित्रमंडळींना खात्रीच होती.
सदादा हुशार असला तरी शांत होता, हळवा होता..... त्याचे सगळे शिक्षण त्याने गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून पूर्ण केले. भरमसाठ पैसे भरून पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे नाही असा निर्णय त्याचा त्यानेच घेतला.. मिळेल तो जॉब स्वीकारून Online MBA course ची निवड केली. पुढे 2/3 वर्षांतच उत्तम बढतीसह चांगल्या नावाजलेल्या कंपनीत रुजू झाला. "ह्या सगळ्या स्ट्रगल मध्ये आयुष्याची महत्वाची वर्षे त्याने फुकट घालवली", असे आमचा दोस्त अभि म्हणायचा... अभि म्हणतो म्हणजे बरोबरच असेल .. आम्ही काठावर पास संघटनेचे आजीवन सभासद. आमचा रिझल्ट लागला की अभिचे मार्क पाहून आम्हाला चार शिव्या जास्तच पडायच्या. "जरा शीका काहीतरी त्या पोराकडून..." ह्याच वाक्याने सुरुवात करून साधारण आमचे सगळ्यांचे तीर्थरूप शेलकीच्या शिव्या घालत. अभिला IIT पवई लाच ऍडमिशन हवी होती त्यासाठी त्याने प्रचंड ढोरमेहनत केली. तिथून सुट्टीसाठी घरी आलेला अभि आंतरबाह्य बदलला होता.. त्याने पाहिलेल्या नव्या जगात केवळ पैसा आणि यशाची नशा होती... हो! नशाच म्हणायला हवे कारण त्या मार्गावरही कुठे थांबायचं हे माहितीच नसतं . मला जे जाणवलं अगदी तसच आमच्या इतर मित्रांना सुद्धा जाणवलं होतं. संध्याकाळी कट्टयावर जग्या आणि संज्या सुद्धा मला म्हणाले,
"विकी यार अभि आता आपला दोस्त नाही राहिला... मोट्टा मानूस झाला बाबा!" ...
हळूहळू अभिचं आणि आमचं जग दूरावत गेलं... मी मात्र अगदी शेजारीच राहत होतो.. त्यामुळे त्याचा सगळा हाल-हवाल आपसूक कळायचा. सदादाच त्याच वर्षी लग्न झालं... वहिनी जवळच्या शाळेत शिक्षिका, अतिशय सोज्वळ, लाघवी.... सोसायटीत सगळे जण त्यांचे कौतुकाने नाव घेत. देवस्थळी काका काकूंची ह्या सुनेवर लेकीसारखी माया. सगळे सणवार, रीती भाती, पाहुणे सारं ती हसतमुखाने सांभाळून घ्यायची. सदादाला बच्चूच्या येण्याचे वेध लागले... आता हे चार खणी घर लहान पडू लागलं. त्याने एक प्रशस्त बंगलाच घेतला... बंगला जरा जुनाच होता पण त्याची रंगरंगोटी, डागडुजी करून तो अगदी नव्यासारखा दिसू लागला. त्याच्या घरभरणीच्या कार्यक्रमात अभिची भेट झाली...सहज काहीतरी बोलायचे म्हणून मी म्हणालो,
"अभि बंगला कसला प्रशस्त आहे... आता तुम्हा सगळ्यांना एकत्र राहतांना अडचण होणार नाही."
तोडून टाकल्यागत अभि म्हणाला...
"मी इथे कशाला येतोय... तशी सदादाला दुसऱ्यांच्या जुनाट वस्तू वापरायची सवय आहेच... नवा असता तर वेगळी गोष्ट होती... रिसेलचा आहे .. ठीक आहे."
नेमके वहिनींनी हे ऐकले आणि डोळ्यांतले पाणी कुणाला दिसणार नाही असे पुसूनही टाकले.. माझ्या मात्र तोंडात मारल्यागत झाले... पुढे अभि स्वतःहून काही बोलेपर्यंत मी तोंड उघडत नसे. देवस्थळी कुटुंब आता बंगल्यात शिफ्ट झाले... आता हळूहळू आमचा संपर्क कमी कमी होत गेला. कधीतरी दूध बाजारात काका भेटायचे , कधीतरी सदादा मंडईत भेटायचा ... आवर्जून थांबून आपुलकीने चौकशी होई... पहिल्या लेकाच्या पाठीवर सदादाकडे गोड परी आली होती. तिला पहायला जाण्याच्या निमित्ताने आई निघाली.. मग तिला सोडायला म्हणून आमची वर्णी लागली. सुट्टीसाठी म्हणून अभि आला होता.. अभि अपेक्षेप्रमाणे कॅम्पसमधेच सिलेक्ट झाला होता... त्याला सुरुवातच ऐंशी हजारने मिळाली होती... आयुष्यात एव्हढे पैसे वर्षभरात एकत्र न पाहिलेल्या आम्हाला कोण कौतुक वाटलं... त्याचं अभिनंदन करायला गेलो तर तो तोंड पाडून बसला होता... लाखाच्या घरात किमान स्टार्ट मिळणार ही खात्री असल्याने तो नाराज झाला होता... पुढे अभि वाढता पगार वाढती पोस्ट ह्यांच्या मागे धावत सुटला... लग्नाला तसा उशीरच झाला... आईवडिलांनी आणलेली स्थळे अभि धडाधड नाकारत सुटला... त्याला किमान 70 हजार पगार कमवणारी मुलगी हवी होती. मी त्याला म्हणालो ही..
"तू एव्हढा गडगंज पैसा कमावतोय कश्याला हा हव्यास..??"
"विकी तुला कळणार नाही यार... पुणे बंगलोर अश्या शहरांत उच्चभ्रू वस्तीत रहायचे म्हणजे कितीही पैसा कमीच पडतो."
"पैसा हे सुख मिळविण्याचे साधन नसून जीवनाचे साध्य आहे "... ह्या विचारसरणीवर अभिचा प्रवास सुरु झाला होता. वयाच्या पस्तिशीत अखेर अभिला ऐंशी हजार पगार असणारी बायको मिळाली... तिच्या काही अटी होत्या .. त्या अभिने मान्य केल्या, कदाचित वय वाढल्याने कराव्या लागल्या. ती नाशिकला येऊन राहणार नाही, ती तिची नोकरी सोडणार नाही, तिचे स्वातंत्र्य तिची स्वायत्तता.. वगैरे सारीच नाणी तिने वाजवून घेतली. रिसेप्शनला बॉब कट , वन पीस घातलेल्या सुनेची ओळख करून देणे सुद्धा देवस्थळी काका काकूंना लाजिरवाणे झाले..
"नवीन सूनबाई हॉटेलात उतरल्या होत्या म्हणे..."
आमच्या मातोश्रींना एक सखी सांगत होती.
पुढे पाच सहा वर्षे अभि आणि वहिनींचे फॉरेनचे दौरे, प्रमोशन, जास्त पगार, नवी नोकरी, अजून जास्त पगार हे चक्रवाढ गतीचं आयुष्य सुरळीत सुरू असावे. एक दिवस गंगेवर देवस्थळी काका भेटले. त्यांनी अभिला मुलगा झाल्याचे सांगितले.. त्यांचे अभिनंदन करत मी अभिचा नंबर मागून घेतला. अभिला अभिनंदनासाठी खास फोन करू म्हणून मी फोन केला... 42 व्या वर्षी अभि बाप झाला होता.. ह्या वयात अर्धा संसार आटपतो इतरांचा.... पण अभिची गोष्टच वेगळी होती.
"अभि .. विकी बोलतोय रे! तुम्हा दोघांचे अभिनंदन.. आईबाबा झालात.. बाळ कसे आहे आणि वहिनींची तब्येत?? "
"थँक्स... आम्ही मूल नको असेच ठरवले होते. You know DINK culture...Double Income No Kid... आम्हाला हे मूल जन्माला घालणं वाढवणं वगैरे साठी वेळ नाही... we both are too busy... आम्हा दोघांचे आईबाबा फारच मागे लागले आणि लोकांना सुद्धा फार प्रश्न पडायचे .. मग ठरवलं आम्हाला मूल होऊ शकत नाही असा कुणी शिक्का मारायला नको."
मला पुढे बोलायची इच्छाच उरली नाही. काही महिन्यांनी काका जुन्या घरात नवा भाडेकरू टाकण्यासाठी आले... बराच वेळ आईबाबांशी बोलत बसले होते.
"अभि आणि सूनबाई सध्या पुण्यात आहेत...अभिच्या बायकोने मुलाला जन्म दिला तसे त्या बाळाला आईवडिलांकडे सोडून 2 महिन्यात ती पुण्याला गेली. आता बाळ औरंगाबादला असते... हक्काचा नातू असून पाहता येत नाही, खेळता येत नाही की भेटताही येत नाही... "
काकांनी डोळे टिपले.
"कधीकधी वाटतं नातवाला जाऊन घेऊन यावं पण आता ही सुद्धा थकलीये शिवाय धाकट्या सूनबाईंना ते आवडणार नाही. माय बाप ,आजी आजोबा, काका काकू, दादा ताई सगळी नाती असून पोर पोरक्यासारखं वाढतंय.. काळीज तिळतीळ तुटतं .. पण इलाज नाही."
देवस्थळी काका गेल्यावर आयुष्यात पहिल्यांदा आमच्या तीर्थरूपांनी खांद्यावर हात ठेवत म्हटलं..
"विकी ! तू अभि कडून काहीच शिकला नाहीस हे फार बरे केले बाबा."
काळ आपल्या वेगाने पुढे सरकत होता.... सतत ताण, स्पर्धा, धावपळ, हव्यास... काय परीणाम व्हायचा तोच झाला.. ऐन पन्नाशीत अभिला हार्ट अटॅक आला.. तो अटॅक इतका मेजर होता की तातडीने त्याची बायपास करावी लागली. हृदयाने अतिताणाने कामच कमी केले होते... ठिकठिकाणी ब्लॉकेजेस... इथून पुढे जिवंत रहायचे असेल तर लाईफ स्टाईल बदलण्याचे डॉक्टरांनी खडसावताच..... अभिने अर्ली रिटायर्ड प्लान निवडला... पैसा बेसुमार कमवून ठेवला होताच त्याने.. पुढे consultation firm किंवा स्पर्धा परीक्षांचे क्लासेस सुरू करण्याचा त्याचा विचार होता. नोकरी सोडली आणि एक प्रचंड मोठी पोकळी त्याच्या आयुष्यात निर्माण झाली... मानसिक समस्यांनी ग्रस्त होत त्याला मानसोपचारांची गरज भासू लागली. सदादाने त्याला आरामाला नाशिकला ये म्हणून आग्रह केला...त्याचे आई बाबा आता बरेच थकले होते.. कसा कोण जाणे अभि यायला तयार झाला... आयुष्याची किंमत मोजून अभि माणसांत आला होता... आता तो स्वतःहून बरेचदा मला फोन करायचा. मित्र मंडळींच्या जुन्या आठवणी काढून चौकशी करायचा... आम्ही कट्टा मित्रमंडळ रोज सकाळी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला नेमानी जमायचो.. चकाट्या पिटत कुटाळक्या करत चहा पिऊन घरी यायचो... आम्हाला कधी हास्य क्लब वगैरे लागले नाहीत.. तसेच आम्ही मजेत असायचो.
एकदा अभि सुद्धा मॉर्निंग वॉकला आला... आम्ही नेहमीसारखे संज्याची खेचत खिदळत होतो.... काय वाटले कुणास ठाऊक?? अभि माघारी वळला... आम्ही सगळ्यांनी त्याला पाहिला... मी त्याच्या पाठी धावत सुटलो....
"पन्नाशीत किती पळवशील लेका!"
म्हणत त्याच्या पाठीवर थाप मारली... अभि रडत होता... त्याला नेहमीच्या चहाच्या टपरीवर घेऊन गेलो... थोड्या वेळाने तो शांत झाला...
"आयुष्यात खूप काही गमावलं मित्रा मी..."
मी गप्प राहून त्यालाच बोलू दिलं..
एका गेटकडे बोट दाखवून तो म्हणाला...
"तो मला त्याच्या सोबत मंदिराजवळच्या पांजरपोळात घेऊन गेला... म्हणाला इथे म्हातारी गुरे, रस्त्यावरच्या गायी आणि त्यांची नको असलेली वासरे आणून ठेवतात... त्यांना भरपूर खायला प्यायला , पशु आहार वगैरेही देतात.... उत्तम निगा राखतात त्यांच्या आरोग्याची ... पण एक मात्र त्यांना मिळत नाही जे गोठ्यातल्या जनावरांनाही मिळतं... 'मायेचा स्पर्श'.... पुढे माझा लेक काहीही बोलला नाही. मी काय समजायचं ते समजून गेलो."
मी मूकपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवला . छोकरा खरंच हुशार होता अगदी बापाच्या एक पाऊल पुढे होता.
"विकी ... मायेचा स्पर्श नसेल तर आपले म्हातारे मायबाप , आपली पोरं सगळ्यांचं जगणं पांजरपोळ होतं रे! फक्त पैसा पुरेसा नसतो... खूप काही लागतं त्या पलीकडचं. "
अभि पुन्हा रडू लागला... त्याच्या सांत्वनाला माझ्याकडे शब्दच नव्हते.
🔏©️ यशश्री रहाळकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!