फॉलोअर

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

गौराई, सोन्याच्या पावलांनी ये!


                   नांदुरा तालुक्यातलं शेंबा तसं इवलसं आणि बरच आडवळणाच गाव. तेथील जोशी कुटुंब "शेंबेकर जोशी " ह्याच नावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. गोपाळ शास्त्री जोशी मोठे विद्वान ज्योतिषी... उभी हयात त्यांनी पौरोहित्य करून अत्यंत कर्मठपणाने सगळ्या शास्त्र नियमांचं पालन करत घालवली....त्यांना चार पुत्र आणि दोन कन्या. मोठे नाना जोशी गावातल्याच शाळेत शिक्षक म्हणून लागले... त्यांचे सारे आयुष्य त्या इवल्या गावातच गेले. थोडाफार शेतीवाडीचा पसारा , गावातलं जुन्या धाटणीचं घर, जोडीला पौरोहित्य आणि ज्योतिष्य..... ह्या साऱ्या व्यापात ते कायम गुंतलेले असायचे. सोवळे ओवळे व्रतानुष्ठान , सणवार ह्यांचे त्यांनी गोपाळ शास्त्रींइतकेच कर्मठपणाने पालन केले. नानांच्या अर्धांगिनी माई म्हणजे मूर्तिमंत ममता... धाकटे दिर, नणंदा, जावा, पुतणे, भाचे त्यांची लेकरं सगळ्यांना धरून चालणाऱ्या... आल्यागेल्याचे अगत्याने करणाऱ्या, सगळ्या सणवारांचे , कुळधर्माचे  नीट निगुतीने पालन करणाऱ्या ....स्वभावाने अत्यंत तापट असणाऱ्या आपल्या सासऱ्यांचे सारे त्यांनी तोंडात खडीसाखर ठेऊन केले. गोपाळ शास्त्रींना आपल्या ह्या सुनेचा अतिशय अभिमान होता. अगदी शेवटी मुखात पाणीही माईंच्याच हाताने घेतले त्यांनी. हृदयात प्रेमाचा अथांग सागर असणाऱ्या माईंची कूस रिकामीच होती... एक दोनदा पदरात अर्धवट माप टाकलं देवानं...ते फळलं मात्र नाही पण त्यांची कशाबद्दलच कधीच तक्रार नव्हती. नाना आणि माई कायम समाधानी असायचे... देवानं जे दिलं ते आपल्यासाठी सर्वोत्तम असणार ह्याची त्यांना खात्रीच होती. त्या जोडप्याच्या चेहऱ्यावर असीम समाधानाचं तेज सतत विलसत असायचं... शक्य होईल तशी प्रत्येकाला मदत करायची आणि कुणाकडूनच काहीच अपेक्षा ठेवायची नाही , हे त्यांचं तत्त्व. पाठच्या भावंडांनाही नाना सढळ हाताने मदत करायचे... "ठेवून तरी काय करायचं आहे ?" असं ते नेहमी माईंना म्हणत. 
                      त्यांच्या घरात मूल नसूनही घर कधीही रिकामं नव्हतं.. पिढ्यानपिढ्या पुजले गेलेले तेजस्वी देव त्यांच्यापाशी होते .. आणि खरं सांगायचं तर एखादं घर व्यापून उरतील एवढ्या संख्येत होते. ह्या देवांच्या पूजा अर्चनेतच तर  त्यांचे दिवसाचे कित्येक तास अगदी आनंदाने जात असत... त्या जुन्या घरातील शिसवी देव्हारा अर्धी खोली व्यापेल एव्हढा मोठ्ठा होता. सुरेख नटलेला कुलस्वामिनी आई रेणुकेचा तांदळा... नवरात्रात अगदी झगमगून जाई... त्यापुढे भजने गाताना माई तल्लीन होत . पितळी घडीव हत्तीच्या अंबारीत आरूढ झालेली चतुर्भुज महालक्ष्मीची कोरीव चांदीची मूर्ती ....मार्गशीर्षातले गुरुवार डोळे ठरत नसत तिच्यावर... तळहातात मावणार नाही एव्हढा लंगडा बाळकृष्ण ... हा मोठ्ठ गोड होता... गोकुळाष्टमीला त्याला झुल्यात झुळवून कृष्णजन्माचा सोहळा त्या करत आणि जणू आपलं मातृत्व उचंबळून आल्याचे त्यांना जाणवायचे... त्याच्याच शेजारी वैराग्याची मूर्ती श्रीदत्तप्रभू गाईसह विराजमान होते. चांदीच्या कोंदणात शाळीग्राम होता... बालाजी, विठोबा रखुमाई,  शिवपिंडी आणि नाग , खंडोबाचा टाक ... सारे सारे चांदीचे, अगदी घंटा आणि शंखाची बैठक सुद्धा चांदीचे. देवघरात मध्यभागी ठाण मांडून बसलेली मोठी चांदीची सिद्धीविनायकाची मूर्ती जरा कोपिष्ट वाटायची... पण शेजारीच असणारे गौरींचे मुखवटे जणू त्याला "शांत रहा" सांगत असाव्या. ह्या गौरींवर त्यांचे विशेष प्रेम होते. गौरीचे चांदीचे दुधाळ चेहरे पाहिले की त्या तृप्त होत... त्यांच्याकडे हे मुखवटे रोजच्या पूजेत असायचे. एव्हढे सगळे चांदीचे देव गोपाळ शास्त्रींनी आणि त्याहीपुर्वी त्यांच्या पूर्वजांनी कसे सांभाळले कोण जाणे?? लुटपाट, परकीय आक्रमणे ह्यातून ते शाबूत राहिले.गोपाळ शास्त्रींनी तर उपवास काढून सुद्धा दिवस काढले पण देव सांभाळले. सकाळपासून देवाच्या पूजेची फुले काढ, हार कर, रांगोळ्या काढ, गंध उगाळून दे, नैवेद्याला कर ह्या सगळ्यात माईंचा वेळ छान जाई. पुढे नाना जीव लावून पूजा करत.. ते डोळे भरून पाहणे त्यांना फार आवडायचे.गौरी-गणपतीला सारे कुटुंब एकत्र जमायचे...एव्हाना त्यांच्या दिरांना सुना, जावई सुद्धा आले होते, नातवंडे झाली होती. तीन पिढ्या एकत्र येत सारे सणवार करायच्या. नानांची ईश्वर सेवा फळाला आली... गुरुचरित्राचे पारायण करता करता त्यांना देवाज्ञा लाभली. वय वर्षे 82 .. योग्य वेळी सोनं झालं त्यांचं. आयुष्यभर औषधाची गोळी नाही की दवाखान्याची वाट धरावी लागली नाही.
                    सगळे जमले, भावंडांचं खरोखरीच प्रेम होतं थोरल्या भावावर.... तिसऱ्या दिवशी सावडणे पार पडले आणि कुटुंबातील पुरुष मंडळींची चर्चा, वाटाघाटी सुरू झाल्या...हल्ली सगळ्यांना व्यवहार उरकण्याची घाई झालेली असते. माई नानांपेक्षा दहा वर्षांनी लहान असल्या तरी त्यांचेही वय सत्तरी ओलांडलेले.. आता त्यांना हा व्याप झेपायचा नाही... म्हणून सगळे विकून निर्गत लावून जाण्याचे ठरले. माईंना आपल्याकडे नेण्याची सगळ्यांची तयारी होती, तसा माईंचा कुणालाही त्रास नव्हताच. आलटून पालटून त्या राहतील सगळ्यांकडे असा परस्पर निर्णय देखील घेतला. थोरल्या पुतण्यानी शेतीची चालू बाजारभावाने किंमत काढून आणली, धाकट्या दिराने घरासाठी ग्राहक आणले सुद्धा. सध्या दिवसवारे आटोपले की माईंना डोंबिवलीचे दिर घेऊन जाणार होते, आवश्यक जुजबी सामान बांधण्यास सुरुवात करायचे सूतोवाच त्यांनी केले. घरातले सामान  गरज आणि जागेनुसार भराभर वाटून घेतल्या जाऊ लागले.  ह्या सगळ्यात माईंना काय वाटत होतं ह्याचा विचार कुणीच करत नव्हते. माईंची नणंद बयो आत्या अखेर ओरडली..

"मेल्यांनो ! रडू तरी द्या तिला पोटभर का मोळी बांधून नेताय तिचीही."

ऑफिसर पुतण्या टेचात म्हणाला..
" बयो आत्या.. हे सगळं आम्हालाच निस्तरायच आहे. तू काय चार दिवसांनी तुझ्या घरी निघून जाशील. पुन्हा पुन्हा सुट्ट्या खर्चून इथे येणं कुणाला जमणार आहे?"

त्याचीच री ओढत दुसरा पुतण्या म्हणाला..
"एखाद्याने येऊन भागणार नाही सगळे असतांना काय तो सोक्षमोक्ष लावून टाका."

सगळ्यांत धाकटी बेबी आत्या सगळ्यांना दटावत म्हणाली..

"कुंकू काय पुसले ..तिचे मालक झालात तुम्ही? तिला विचारलं का कुणी ..काय करायचं आहे? येते आहेस का आमच्याकडे ?"
पांढऱ्या कपाळाची वेदना तिने अनुभवली होती.

मॉडर्न पुतणसून टोमणा मारत म्हणाली...

"मुली म्हणून तुमचाही वाटा पडेलच की ह्यात सगळ्यांचा फायदा होतोय तर कश्याला खोडा घालताय."

"आम्हाला काही नको."
दोघी आत्या एकाच वेळी म्हणाल्या. बयो आत्या शांतपणे म्हणाली....

" आयुष्यभर चोळीबांगडी पुरवली भावाने आता तो गेल्यावर त्याच्या घराचे वासे मोजून काय करायचं...?"

बयो आत्या आणि बेबी आत्या तश्या परिस्थितीने अगदी बेताच्या,  बयो आत्याचा नवरा एका मंदिरात पुजारी,मुलगाही फार शिकला नाही त्याचे जोडीला दुकान,घरी सून 2 नातवंडे.धाकट्या मुलीचे लग्न व्हायचे होते. बेबी आत्याला फार तरुणपणी वैधव्य आले होते ..तिला दोन मुली एक मुलगा . थोडी शेती आणि एक छोटे दुकान ,परिस्थिती अगदी हातातोंडाशी गाठ. मात्र जे आपलं नाही त्याचा हव्यास न धरण्या इतक्या त्या स्वाभिमानी नानांच्या बहिणी होत्या. माई मेलेल्या मनाने उठल्या सगळ्या पुरुषांदेखत येऊन बसत म्हणाल्या..

"तुमचे सगळे मला मान्य आहे. म्हणाल त्या कागदांवर सह्या देते फक्त देवांचं काय ठरवलं आहे?"

माईंचा प्रश्न न कळल्या सारखे सगळ्यांचे चेहरे प्रश्नार्थक झाले. माई आपला मुद्दा स्पष्ट करत म्हणाल्या..

"माझेही आता वय झाले आहे. ह्यांच्या पश्चात किती जगेन माहीत नाही.. मात्र हे सगळे देव्हाऱ्यातले देव तुम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. इतके वर्षे आम्ही दोघांनी मनोभावे पार पाडली. हे सारे शेंबेकर जोशींचे वंशपरंपरागत देव... आता तुम्ही सांभाळायचे."

सगळ्यांचे उतरलेले चेहरे न्याहाळून त्यांनी पुन्हा एकदा जोरकसपणे आपला मुद्दा मांडला...

"सगळे एकट्याने न्यायला हवे असे काही नाही हो!  सोयीप्रमाणे दोन दोन वाटून घ्या. कुळधर्माचा ताणही येणार नाही ."
       
                     बैठकीत एकदम स्मशानशांतता पसरली... वडिलोपार्जित मिळणारा पैसा, जमीन, वस्तू सगळ्यांना हवे होते पण कुळाचाराचे देव मात्र नकोसे झाले होते.प्रत्येकाने आपापली कारणे पुढे केली. नानानंतरचे डोंबिवलीचे दिर म्हणाले,

"वहिनी मला एकच लेक.. ती लग्न करून तिच्या घरी नांदतेय.  माझं घर  मुंबईतलं.. हे एव्हढंस टीचभर ..कसं व्हायचं? बरं ! नानांनंतर मी मोठा म्हणजे आज ना उद्या माझा नं लागायचा.. देव नेऊन काय करू सांगा? पुढे कोण करणार त्यांचे?"

धाकटा दिर तोऱ्यात म्हणाला..
"तुम्हाला तर माहितीच आहे माझा अनी.. जपानला गेलाय. वर्षभरात तो सेटल झाला की आम्हीही कायमचे तिकडेच जायचे म्हणतोय. जपानला देवांचं काही व्हायचं नाही.. अहो साधा आपला किराणा तिथं सोईनं मिळत नाही."

मधल्या दिरांना दोन मुलगे .. एक औरंगाबादला , मोठा ऑफिसर दुसरा बंगलोरला दोघांचाही मोठी घरं... माई मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहू लागल्या..एकदम चर्चेत उडी घेत जाऊच म्हणाली 

"माझ्याकडून आशाच करू नका माई. गुडघे झिजले माझे operation करायचे आहे पुढच्या महिन्यात त्यात माझ्या घरचे सगळे वातावरण मॉडर्न ... आमच्या हाय फाय कल्चरमध्ये काही हे सूट होणार नाही. चार दिवस इथे येऊन करणं वेगळं आणि देव नेणं वेगळं."

निराश होऊन माई म्हणाल्या... 
"काय करूयात मग .. मला झेपेल तेव्हढं दिवस..."

त्यांचं वाक्य तोडत मॉडर्न पुतणसून उद्गारली..
"आता तुमच्या नियमांप्रमाणे हळद कुंकू तरी चालणार आहे का देवाला लावायला?? कश्याला नसता व्याप वाढवताय ह्या वयात... चांगली अस्सल जुनी चांदी आहे विकून टाका .. पैसे नानांच्या नावे एखाद्या संस्थेला देऊन मोकळे व्हा."

आयुष्यभर प्राणप्रिय असलेल्या ह्या देवांचा इतका भार
 होईल असं कधीही माईंना वाटलं नव्हतं. आज त्या खऱ्या अर्थानं एकट्या पडल्या होत्या. हात जोडून देवापुढे बसत त्या अखंड अश्रू ढाळत होत्या. नानांच्या पश्चात कुणाचाही स्पर्श न लाभलेले देव निस्तेज दिसत होते ... माईंना पोटच्या पोरांप्रमाणे त्या देवांना घट्ट कवटाळून रडावसं वाटत होतं पण सुतक असल्याने तेही शक्य नव्हतं. गौरींचे मुखवटे ह्या साऱ्यात तितकेच दुधाळ स्निग्ध आहेत असा भास त्यांना झाला.. त्यांच्याही नकळत त्यांनी हात जोडले....

"आई गौराई आता तूच काहीतरी मार्ग काढ... ह्या घराण्याची निष्ठा , नानांनी आयुष्यभर केलेली निरपेक्ष सेवा सारे तुझ्या पायाशी वाहतेय."

बयो आत्या आणि बेबी आत्या हा सारा तमाशा शांतपणे पचवत होत्या... त्यांनी आपल्या घरी फोन केले काय विचारलं कुणास ठाऊक? मात्र दोघींचं कशावर तरी एकमत झालं... ह्या जोश्यांच्या माहेरवाशिणी जेष्ठा कनिष्ठा होत माईंच्या हाकेला धावून आल्या.. दुसऱ्याच दिवशी बैठकीच्या खोलीत त्यांनी कुळाचाराचे सगळे देव दोघी मिळून वाटून घेणार असल्याचे सांगितले. ... आणि ह्या प्रकरणावर पडदा पडला. आतल्या खोलीत माई गौराईने लाज राखली म्हणत नतमस्तक होत होत्या. बयो आत्यामाईला म्हणाली..
"मुली झालो म्हणून काय ग झालं.. जोश्यांच्याच लेकी आहोत ना! तसेही ह्या वर्षी गौरी बसवायचे मनात होतेच.. सुनाही हौशी आहेत आमच्या.. "

बेबी आत्या माईंच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली,
"मनात होतेच फार हो ! पण एक शब्द घरीही विचारून घेतला आपापल्या. सगळे आनंदाने तयार झाले.आम्ही दोघी जवळच्याच गावी सहज जाऊ एकमेकींकडे मदतीला... तेव्हढीच भेट होईल. नवरात्र माझ्याकडे बरं माई."

"आणि तुझ्याशिवाय काही उमजायचे नाही आम्हाला. तू तर हवीच. गौरीला औक्षण तूच करायचे दर वर्षी सारखे.."
बयो आत्या प्रेमाने म्हणाली... आणि माई आपल्या ह्या जेष्ठा कनिष्ठांच्या गळ्यात पडून गदगदून रडू लागल्या.
ज्यांना जे जे हवं होतं ते ते बाजूला काढण्यात आलं.. आता नानांच तेरावं झालं की निघायचं... घर आणि जमिनीचे व्यवहार .. लगेच होणार नव्हते पण प्राथमिक चर्चा होऊन पुढे करायचे ठरले.... नानांचे एक स्नेही दंडे वकील तेराव्याला घरी अचानकपणे आले... नानांचे मृत्युपत्र त्यांच्याकडे ठेवलेले असून त्याचे सगळ्यांसमक्ष वाचन 13व्या दिवशी व्हावे अशी त्यांची इच्छा असल्याचे म्हणाले. जणू काही नानांना मृत्यू दिसला असावा.. सगळे भवताली गोळा झाले..
दंडे वकिलांनी मृत्युपत्र इन्व्हलप मधून बाहेर काढलं आणि वाचन सुरू केलं.आश्चर्याची गोष्ट अशी की त्यात त्यांचे नसून त्यांचे वडील गोपाळ शास्त्रींचे मृत्युपत्र होते... सगळे चाट पडले. ह्याबद्दल कुणालाच कल्पना नसावी.

"माझे राहते घर आणि माझ्या नावे असणारी शेतजमीन ही माझी म्हणजे श्री गोपाळ शास्त्री जोशी ह्यांची आपकमाई आहे... ह्यातले वारसा हक्काने काहीही मला मिळालेले नाही तर मी कष्टाने ते प्राप्त केले आहे ... त्यामुळे मी पूर्ण शुद्धीत त्याचा माझे मृत्यूपश्चात विनियोग करू इच्छितो...मला वारसा हक्काने मिळालेलीे पिढीजात संपत्ती म्हणजे आमचे घराण्याचे देव... त्यांचे कुळधर्म आणि पूजन करेल तोच माझा वारसदार असणार आहे... माझ्या अपत्यांपैकी जो ही जबाबदारी पेलेलं त्याच्या किंवा त्यांचे नावे मी माझी संपूर्ण इस्टेट करीत आहे. आपले अवघे आयुष्य ह्या घरासाठी वेचणारी माझी लक्ष्मीरूपिणी सून आपले संपूर्ण आयुष्य ह्या घरात काढण्याची हक्कदार आहे ती हयात असेपर्यंत हे घर विकण्याचा कुणालाही अधिकार नाहीेे"

सगळ्यांची तोंडे पाहण्याजोगी झाली होती... नानांच्या वडिलांनी आपल्या हयातीतच हे मृत्यूपत्र बनवले असून नानांना त्याची माहिती होती पण त्या हक्कांचा वापर करण्याची वेळ परमेश्वराने त्यांच्यावर आणली नाही. वकिलाने कायदेशीर दृष्ट्या मृत्युपत्राची सत्यता वगैरे बाबींवर जोर दिला... सगळे रिकाम्या हाती परतणार होते. जोश्यांच्या देवांनी चांगलाच दणका दाखवला होता. बयो आत्या आणि बेबी आत्याकडे मात्र गौराई सोन्याच्या पावलांनी आल्या होत्या.

🔏©️ यशश्री रहाळकर


1 टिप्पणी:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!