केशव अगस्ती आज नेहमीप्रमाणे उशीराच उठला..... आता उठवायला सीमा नव्हती, वाजायला आलार्न नव्हता, गोंधळ घालायला आल्हाद नव्हता आणि ... ... आणि तो आता कधीच उठला नाही तरी ह्या जगाला घंटा फरक पडणार नव्हता. कंपनीत गेल्यामुळे ज्या काही चार दोन डोक्यांना तो दिसायचा त्यांनाही आता भेटणार नव्हता...लॉक डाऊन मुळे तो पुरता घरांत अडकून पडला होता. Work from home च्या नावाखाली दुपारी 3 पासून मध्यरात्री पर्यंत बराच वेळ त्याची शिफ्ट चालायची... अश्या रटाळ मीटिंग्जना अंत नसतो. तो आता का जगतोय ? कुणासाठी जगतोय ? ह्या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नव्हती. सीमा घर सोडून गेल्यापासून आयुष्य उदास, केविलवाणे झाले आहे असे त्याला वाटायचे . सीमावर त्याचे किती प्रेम होते ह्या प्रश्न अलाहिदा ....पण बायको दुसऱ्याचा हात धरून पळून गेलीये म्हणून लोक सतत हळहळायचे, सतत कुणीतरी त्याची कीव करायचे... ह्या साऱ्याचा त्याला उबग आला होता. आता आपली जगण्याची इच्छाच उरली नाही असे रोज सकाळी उठल्यावर त्याला वाटायचे. तशी सीमा अगदीच पळून गेलेली नव्हती तर रीतसर सांगून सवरून निघून गेली होती... गेली दहा वर्षे ती एकतर्फी केशवशी जुळवून घेत होती.... जोवर केशवशी आई होती तोवर तिला एक प्रकारचा आधार वाटत असावा... मात्र आई डिसेंम्बर अखेर गेली आणि सीमाने 12 जानेवारी 2020 ला शांतपणे ती घरातून निघून जाणार असल्याचे सांगितले.... आणि केशवच्या आयुष्याचे बारा वाजले. ती तिच्या विधुर बॉस अनुराग बोस सोबत लिव्ह इन मध्ये राहणार असल्याचा निर्णयही तिने स्पष्टपणे केशवला सांगितला. त्यामुळे त्याची संमती किंवा घटस्फोट ह्याचीही तिला गरज उरलेली नव्हती. ह्या सगळ्यांत सर्वाधिक वाईट गोष्ट म्हणजे ती त्यांचा आठ वर्षांचा मुलगा आल्हादला आपल्या सोबत घेऊन गेली. अर्थात... केशव त्याला भेटू शकणार होता , त्याला तिची हरकत नव्हती पण आता लॉक डाऊन मध्ये केशवला तेही शक्य होईना. आल्हाद हे त्याच्या नीरस आयुष्यातले एकमेव चैतन्याचे अस्तित्व होते.
मध्यरात्री नेहमीप्रमाणे काहीतरी तोंडात टाकून तो आडवा झाला आणि त्याला जुना वाडा बोलावतो आहे असा भास होऊन तो अचानक जागा झाला. तो घाबरून जागा झाला तेव्हा घामाघूम झाला होता.. त्याला चांगलीच धाप लागली होती. तो पाणी प्यायला म्हणून उठला , तोंडावर पाणी मारून तो नीट जागा झाला होता. अजूनही वाडा त्याला बोलावत होता... "केशवा ! केशवा! बाळा ..ये रे किती वाट पाहू" कुजबुजत्या आवाजात त्याला तळमळीने घातलेली साद त्याला अजूनही ऐकू येत होती... हा ... हा भास नक्कीच नव्हता. त्याने आईच्या खोलीकडे धाव घेतली. आईच्या कपाटाच्या तळाशी एक छोटीशी लाकडी पेटी होती. पूर्वी स्त्रियांच्या दागिन्यांची पेटी असायची तसे काहीसे रुपडे असणारी ही पेटी चंदनाच्या लाकडातील होती... पेटी उचलतात चंदनाचा सुगंध सभोवती दरवळू लागला... पेटीच्या पितळी कडा अंधारात एखाद्या मांजराचे डोळे चमकून जावे तश्या चमकून गेल्या.. त्याने भर्रकन लाईट लावला... उजेडातही तो आवाज त्याला ऐकू येतच होता... त्याने पेटी उघडून आतले सामान घाईने बाहेर काढले. आत काही फोटोग्राफ्स होते. त्याचे आजी आजोबा आणि आजोबांच्या कडेवर त्याचे बाबा, दुसऱ्या फोटोत आई बाबा आणि बाबांच्या कडेवर तो... तिसरा फोटो त्यांच्या वडिलोपार्जित वाड्याचा... बरोबर ! हाच तो वाडा जो त्याला स्वप्नात दिसला होता. फोटोतूनही जणू वाडा रडतोय असा भास त्याला झाला. अचानक त्याला आठवलं त्याची आजी जिवंत होती ती अजूनही असावी त्या वाड्यात... काय बरं वय असेल तिचं 90 च्या वर नक्कीच असेल. त्याच्या अगदी लहानपणी बाबा असतांना बरेचदा तो त्या वाड्यात सुट्टीसाठी जायचा. आजी तेव्हा त्याचे कित्ती लाड करायची... तो मागेल ते हजर करायची त्याच्यासाठी... मग तो लाकडी घोडा असो, मोठ्ठे विमान किंवा सायकल. गाई गुरे, शेती , मोकळी हवा सारे त्याला फार आवडायचे.. तो बारा वर्षांचा होता तेव्हा त्याचे बाबा एका अपघातात गेले... नंतर त्यांच्या जागी आई नोकरीत लागली. तिनेच केशवला लहानाचे मोठे केले पण काय झाले कोण जाणे तिने गावाकडे जाणेच सोडले...आजीचे नावही ती त्याला घेऊ देत नसे. उभे आयुष्य केशवने अंधेरी ईस्टला काढले.. हळूहळू त्याला साऱ्याचा विसर पडला.... आज काय झाले होते कुणास ठाऊक पण त्याचे जुने घर त्याला बोलावत होते... कदाचित आजीचे काही बरे वाईट??.... इतके वर्षांत आजीशी त्याचा काहीही संपर्क नव्हता त्यामुळे ती आहे की नाही हेही त्याला कळत नव्हते. शेवटी त्याने ठरवले आपला वडिलोपार्जितला वाडा शेती वगैरे सारे पाहून तर येऊ . तसेही आता एकटेपण फार खायला उठते आहे बदल हवाच होता. आणि ऑनलाईन काम तो कुठूनही करूच शकला असता. त्याने मनातल्या मनात जायचे निश्चित केले आणि त्याला ऐकू येणारे आवाज बंद झाले.
दुसऱ्या दिवशी त्याने जुजबी सामान, थोडे कोरडे खाणे, लॅपटॉप; टॅब ; मोबाइल चार्जर वगैरे सगळे गॅझेट्स बरोबर घेतले.... ऑनलाइन पोलीस परमिशन काढली... आजी एकटी आहे , त्यामुळे तातडीने गावाकडे जायचे असल्याचे कारण नमूद केले आणि काय आश्चर्य लगेच दोन मिनिटांत त्याला परवानगी मिळाली सुद्धा. लगेच त्याची स्कॉर्पियो काढून तो सर्वेश्वरीला निघाला सुद्धा.... सर्वेश्वरी ह्या नावाचे पिटुकले गाव त्याचे मूळ गाव ...महाराष्ट्र आंध्रप्रदेश च्या बॉर्डरवरचे खेडे. इतके दुर्गम की तिथे थेट जायला बसेस नव्हत्या ... 2 फाट्यांवर वेगवेगळ्या काळीपीवळी बदलून आत जावे लागे... सर्वेश्वर महादेवाचे एक प्राचीन दगडी मंदिर तिथे होते... हे मंदिर सुमारे 1300 वर्षे जुने... अतिप्राचीन, यादवकालीन .कसे कोण जाणे त्याच्या डोळ्यांपुढे ते मंदिरही उभे राहिले. आजी रोज सकाळी मंदिरात जातांना त्याला घेऊन जायची. नाजूक बांधा, चाफेकळी नाक, गोरा रंग , पिंगट तपकिरी डोळे आजी देखणीच होती... अगदी मुलायम सायीसारखा तिचा स्पर्श केशवला अजूनही तसाच्या तसा आठवला. बाबांच्याकडे मात्र यातली एकही रूपाची खूण नव्हती... तशी ती आपल्यालाही मिळाली नाही... फक्त एक सोडून पिंगट तपकिरी डोळे... त्याचे डोळे अगदी आजीसारखे होते. चांगलाच लांबचा रस्ता कापायचा म्हणून जरा लवकरच केशव निघाला खरा पण लॉक डाऊनमध्ये फारशी वाहने रस्त्यावर नसल्याने तो झपाट्याने पुढे निघाला . जवळपास 25 वर्षांनी तो आपल्या मूळ गावी निघाला होता मात्र आश्चर्य हे की त्याला कुठेही रस्ता विचारायला थांबावे लागत नव्हते.. गुगल मॅप कधी नव्हे तर झपाट्याने पळत होते... पुढच्या गावांच्या पाट्या अंधारात दिवे लागल्यागत चमकून जात होत्या... त्याचा गाव त्याचा वाडा त्याला मार्ग दाखवत होता. सर्वेश्वर मंदिराच्या दक्षिणेला मोकळे माळरान ओलांडले की काळाशार भव्य दिंडी दरवाजा लागे ... माणसांना जायला यायला त्यात एक पिटुकले दार होते... मग भलेथोरले अंगण पार केले की दिसायचा चौसोपी वाडा . पडवी ओलांडली की मोठा चौक त्यात मोठा कोरीव हौद आणि पितळीचे घंगाळ तिथे पाय धुवून आत जायचे... उजव्या बाजूच्या चौसोपीत भली मोठ्ठी बंगळी त्याचा कर्र कर्र असा आवाज घरभर घुमत असायचा... बंगळीच्या पितळी कड्या हत्तींच्या सोंड एकमेकांत अडकवलेल्या अश्या आकृतींच्या होत्या... त्यावर पांढरी शुभ्र सोनेरी काठाची रेशमी नऊवारी चोपून नेसलेली आजी बसलेली असे. आजीजवळ बहुतेक पानाचे चांदीचे तबक असायचे त्यातला सुरेख नक्षीकाम केलेला चांदीचा अडकित्ता उन्हे पडली की आगळ्या तेजाने लकाकायचा ... त्याच्या टोकांशी घुंगरे अडकवलेली होती... आजी सुपारी कातरायची तेव्हा त्याचा छुन छुन असा आवाज अख्ख्या घरांत ऐकू यायचा.आजी आंध्रकडच्या गावातली असावी... तिचे उजव्या बाजूचे नाक टोचले होते.. त्यात पांढरे शुभ्र मोत्याचे फूल असायचे. तिच्या अंगावर मोजकेच पण वजनदार सोन्याचे दागिने कायम असत... हे सारे जणू डोळ्यांपुढे नाचतेय... का आठवतयं हे सारं?? आणि आजच का आठवतंय?? तेही इतक्या बारीक बारीक बारकाव्यांनीशी. बराच वेळ ड्रायव्हिंग करून आणि आठवणींच्या गर्तेत गुंतून पडल्याने केशवचा मेंदू चांगलाच शिणला होता... रस्त्यावरच्याच एका ढाब्यापाशी तो थांबला. गर्दी नव्हतीच फारशी... सर्वांत आधी त्याने आपल्या ऑफिसला तातडीच्या रजेसाठी मेल केला आणि आपल्या गावी जात असल्याने तिथे पोहोचताच संपर्क करण्याचे आश्वासन दिले. मग मस्त खाटेवर बसून त्याने बटर रोटी, दाल तडका आणि लस्सी चापली.. आपल्याला बऱ्याच वेळची कडाडून भूक लागली आहे हे तेव्हा कुठे त्याला जाणवले. यथेच्छ जेवल्यावर सावलीतल्या खाटेवर त्याने मस्त ताणून दिली.... आणि पुन्हा तेच स्वप्न, "केशवा! केशवा! बाळा ये रे किती वाट पाहू?" ,.... वाडा त्याला बोलावत होता... पुन्हा धडपडत तो जागा झाला. "केशवा!" अशी हाक त्याला आजीच मारायची... पण तो आवाज आजीचा नव्हता... आवाज वाड्यातू येत होता... वाड्याच्या सळया, छप्पर, खांब, पडवी , सोपे सगळे सगळे त्याला अजीजीने बोलावत होते... काहीतरी तातडीचे आहे... लगेच निघायला हवे... असा विचार करत तो उठला . एक कप चहाने जरा तरतरी आली नि तो मार्गस्थ झाला.
रस्ता निर्मनुष्य होता... एखादी वेगवान गाडी किंवा एखादाच ट्रक त्याला ओलांडून जायचे... क्वचित कुठेतरी गुराखी गुरे घेऊन रस्त्याच्या कडांना दिसायचे. गुरे पाहताच त्याला आठवले ...वाड्याच्या मागच्या अंगणात गुरे बांधलेली असायची . आजीकडे गावातली सर्वोत्तम गुरे होती.. काळी कपिला आणि तिचे शुभ्र वासरू तर अतिशय देखणे होते... मागच्या बाजूला गडी माणसांसाठी एक दरवाजा होता... बाकी संपूर्ण वाड्याला दगडाची मजबूत तटबंदी होती. चौकाच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही हातांना मोठमोठ्या खोल्या होत्या.. एकूण दोन मजल्याच्या वाड्यात नेमक्या खोल्या किती असाव्यात बरं?? डाव्या हाताची प्रत्येक खोली एखाद्या मंगल कार्यालयासारखी भली मोठ्ठी लांबच लांब होती त्यात अतिशय सुरेख झुंबरे चमकत असायची... उजव्या बाजूच्या बंगळी मागच्या सगळ्या खोल्या प्रामुख्याने वापरात होत्या... सगळ्यांत टोकाला स्वयंपाकघर ... आपण सुट्टीत गेलो की आईचा बहुतेक वेळ तिथेच जाई... त्याच्या शेजारून एक सुरेख लाकडी जीना गच्चीत जायचा... ही वाड्यातली सगळ्यांत प्रसन्न जागा... उन्हाळ्यात केशव आणि बाबा गच्चीत झोपायचे... आकाश पांघरून चांदण्या न्याहाळत झोपण्यातली गंमतच काही वेगळी होती. जिन्याला लागून पुन्हा एक छोटासा चौक आणि पल्याड न्हाणीघर होतं. ह्या चौकात मोठा पितळी बंब असायचा ... केशव चौकातच भरपूर पाणी घेऊन अंघोळ करायचा. चौकाशेजारी बैठकीची व्यवस्था होती...तिथे शुभ्र पांढऱ्या चादरी गाद्यांवर अंथरून लोड तक्के ठेवलेले असायचे... तिथेच बाबा वाचन करत बसायचे... त्याला सारे आठवले म्हणण्यापेक्षा डोळ्यांपुढे उभेच राहिले. बैठकीच्या खोलीशेजारी देवघर होते तिथे मंद समईचा प्रकाश असायचा... त्यातही सुरेख फुलांची सजावट केलेले देवघर उजळून निघायचे. त्याच्याच शेजारी आजीची खोली होती ...आजीच्या खोलीत कुणीही जायचे नाही... तिला आवडत नसावे... केशव आणि आईबाबा गेले की आजी बाहेरच असायची... मात्र तिच्या खोलीला मोठ्ठे पितळी कुलूप घालून त्याची चावी तिच्या कमरेला लटकत असायची... त्या खोलीत काय होतं... ह्याची उत्सुकता त्या बालवयात कधीही वाटली नाही .. मुळात वाडा एव्हढा मोठा होता की तशी गरजही पडली नाही. वाडा पुन्हा पुन्हा तीव्रतेने त्याला बोलावत होता. ह्या जुन्या वास्तूंत कमालीचे सामर्थ्य असते.. त्याने कुठेतरी वाचलं होतं. हेच सामर्थ्य, हीच आकर्षण शक्ती त्याला तीव्रतेने बोलावू लागली..सोनगाव फाट्यावरून उजवीकडे वळतात त्याला वाडा जणू प्रकाशात उजळला आहे असा भास झाला... उन्हे केव्हाच उतरली होती... संध्याकाळ सरून रात्रीचा काळोख मिट्ट होऊ लागला आणि तो पिंपळस फाट्याला पोहोचला तो रस्ता शोधणार तोच एक माणूस जणूकाही त्याचीच वाट पाहत उभा असावा...
"सर्वेश्वरी कोणत्या बाजूला आहे भाऊ??"
"अगस्ती वाड्याचे पाहुणे का ?"
केशव विस्मयाने म्हणाला..
"हो! पण तुम्हाला कसं कळलं??"
"चाला चाला! सांगतो जातांनी " म्हणत गाडीत बसत तो रस्ता दाखवू लागला.... तो अगस्ती वाड्यातील गडी धनाजी होता... आजीने त्याला खास केशवासाठी तिथे उभं केलं होतं..
"पण आजीला कसं कळलं मी येणार आहे ते?"
केशव स्वतःशीच पुटपुटला. धनाजी केशवला घेऊन वाड्यासमोर आला... लगेच तो भला मोठा दिंडी दरवाजा उघडून त्याला आत घेण्यात आले... गडी माणसे दिमतीला तयार होती.... वाडा अजूनही तसाच मजबूत होता जरासा जुना झाला होता एव्हढेच... चौकात पितळी घंगाळ चमकत होते ... पायावर पाणी घेऊन त्याने पाहिले तर आजी नेहमी सारखी बंगळीवर बसलेली होती. आता वय झाले होते त्यामुळे सुरकुत्यांचे जाळे अंगभर पडले होते... प्रसन्न हसत तिने त्याचे स्वागत केले...
"केशवा! बाळा कसा आहेस?"
होकारार्थी मान डोलावत केशव आजीच्या पाया पडला... गडी माणसांनी सामान आणून आत ठेवले... त्याचे आंघोळीचे ऊन पाणी काढले... मनसोक्त केलेल्या अंघोळीमुळे सगळा प्रवासाचा क्षीण दूर झाला. सवयीने देवघरात जाऊन देवाला नमस्कार करून तो बाहेर आला... गरमागरम जेवण तयार होतेच ... आजीने बाजूला बसत आग्रहाने त्याला खाऊ घातले...त्याच्या मनांत उमटलेले प्रश्न जसेकाही वाचून आजी म्हणाली ,
"बोलू हो केशवा ! सविस्तर बोलू... आधी पोटभर जेवून तर घे."
आई गेल्यावर एव्हढ्या मायेने पहिल्यांदाच कुणीतरी त्याला जेवू घालत होतं. आजी चांगलीच थकली असावी जराजर्जर म्हणतात ना तशी... केशवचे जेवण होताच ... तो बैठकीच्या खोलीत आडवा झाला... कामाच्या बाई ,गडीमाणसे झाकपाक करून आवरून निघून गेली... एव्हाना केशवला गाढ झोप लागली ... आणि पुन्हा तेच स्वप्न... वाडा त्याला बोलावत होता...
"केशवा! केशवा! बाळा ये रे किती वाट पाहू?"
पूर्वीसारखाच धडपडत घामाघूम होत केशव जागा झाला... समोर आजी जणूकाही ह्याच क्षणाची वाट पाहत तिष्ठत थांबली होती.. आजीने भांडभर पाणी पुढे केलं..
"केशवा! तू थकला आहेस बाळा... कळतंय मला . पण माझ्याकडे फार वेळ नाही रे बाळा."
आजी म्हणाली आणि केशव धडपडत उठून बसला.
तिथून केशव अगस्तीचा वाड्यातल्या रहस्याचा प्रवास सुरु झाला. आजी केशवला आपल्या खोलीचे दार उघडून आत घेऊन गेली.. आतले कपाटाचे दार उघडताच एक छोटासा लाकडी जिना लागला... हा जिना डाव्या बाजूच्या खोल्यांना जोडणारा असावा ... ते सरळ रेषेत चालत टोकाला डावीकडे वळले... एक अडगळीची खोली होती... त्यात बऱ्याच मोडलेल्या वस्तूंचे भंगार पडले होते.. आजी आपल्याला इथे का घेऊन आलीये?? केशवला कळेना.... आजीने एक मोडके लाकडी दार बाजूला केले आणि डोळे दिपवणारा प्रकाश पडला.... तिथे एक भनोशी होती... भिंतीतले गुप्त कपाट जे सहजी कुणालाही दिसले नसते...
"केशवा! केशवा! किती उशीर केला रे किती वाट बघायची बाळा."
भानोशी बोलू लागली...
" हा काय प्रकार आहे आजी ???"
केशव किंचाळला. आजवर अनैसर्गिक शक्तींवर विश्वास नसलेला केशव भीतीने पांढरा पडला होता. आजीने त्याला शांतपणे सांगितले ,
"सगळे सांगते ... नमस्कार कर आणि निघ...!"
पडत्या फळाची आज्ञा घेऊन केशव बाहेर पडला... आजी बोलत होती...
"तुझा वारस आला आहे... आता लवकरच तुला भरपूर इच्छांचा बळी मिळेल... आता मला मुक्त कर."
पुन्हा त्याच मार्गाने पायऱ्या उतरत दोघे आजीच्या खोलीत आले. केशव आजीच्या पायाशी भेदरलेल्या सशागतबसला. आजीने अतिशय मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला... आजी बोलू लागली.
"केशवा ! तुला भानोशी बोलावत होती.... हे तुझ्या लक्षात आलेच असेल... माझे वडील ह्या वाड्यात नोकर म्हणून आले... आयुष्यभर त्यांनी पाणक्या म्हणून पाणी भरलं इथे... त्या अडगळीच्या खोलीत त्यांचा संसार होता...ह्या वाड्यात आपल्या लेकीने राणी होत राज्य करावं हे त्यांचं स्वप्न होतं. मात्र ते सहजी शक्यच नव्हतं. आपली लेक ह्या वाड्याची मालकीण व्हावी, ह्याच इच्छेने त्यांना पुरतं झपाटून टाकलं . आपल्या ह्या इच्छेसाठी त्यांनी जीवाचं रान केलं.. कुठल्याश्या मांत्रिकाकडून इच्छापूर्ती मंत्र शिकून आले....मात्र इच्छा एकट्या येत नाहीत बाळा.. त्या येतात दुसऱ्या इच्छेची जोड घेऊनच..."
आजीला धाप लागली होती..... क्षणभर थांबत पुन्हा आजी भराभर बोलू लागली...
"वेळ फार थोडा आहे रे माझ्याकडे ! एका इच्छेची पुर्ती व्हायची असेल तर तितक्याच ताकदीच्या दुसऱ्या इच्छेचा बळी द्यावाच लागतो... हेच इच्छापूर्ती मंत्राचे रहस्य आहे. त्याच बळी दिलेल्या इच्छांवर ही भानोशी आपली शक्ती टिकवून ठेवते आहे. ह्याच भानोशीत माझ्या वडिलांनी आपल्या शक्ती साठवून ठेवल्या आणि मी त्या वापरत गेले... तू ह्या भानोशिकडे काहीही माग तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल... मात्र ह्या जगात काहीही फुकट मिळत नाही त्याची किंमत मोजावीच लागते... त्याच्याच ताकदीची , त्याच्याच तीव्रतेची दुसरी इच्छा मारून तिचा बळी द्यायला हवा."
केशव चक्रावून पाहत होता...
"केशवा! वाटतं तेव्हढं सोपं नाही हे पण ह्यातून आपण आपला फायदा करत जायचा... आता असं बघ तुझ्याकडे दहा रुपये आहेत त्यातून तुला साखर घ्यायची आहे किंवा तांदूळ... तू साखरेची निवड केली म्हणजे तांदूळ खरेदीचा बळी गेलाच ना !...
मी ह्या घरची सून व्हावी म्हणून माझ्या बाबांनी स्वतःच्या सर्व सुखांचा बळी दिला. माझी आई, माझी भावंडे सगळे चार दिवसांत गेले.. पुढे बाबांनी सगळी सत्ता माझ्या हाती यावी म्हणून स्वतःला सुद्धा पणाला लावलं... मात्र त्यापूर्वी त्यांच्या शक्ती ह्या भानोशीत प्रवाहित केल्या...."
काय भयंकर आहे हे?? देवा रे! मी नक्की माणसांत आलोय ना?
केशव मनांत म्हणाला. आजी पुढे सांगू लागली.
" ह्या भानोशीने मला जे जे हवे होते ते सगळे पुरवले... फक्त तुम्हाला निवडता यायला हवे... तुझे वडील माझा मुलगा... माझा वारस जन्माला यावा म्हणून दोन मुलींची आई होण्याच्या इच्छेचा मी बळी दिला... तुझ्या बाबांना हे रहस्य माहीत होते मात्र त्यांनी फक्त एकदाच त्याचा वापर केला ... अखेरचा. तुझी आई तेव्हा गंभीर आजारी होती तू लहान होतास ... त्यांनी आपल्या जगण्याच्या इच्छेचा बळी देऊन तिला वाचवण्याची इच्छा पूर्ण केली. मात्र हे सत्य जेव्हा तिला कळलं तेव्हा तिने तुझे इथले संबंध कायमचे तोडून तुला दूर केलं... पण तुला कुठेही ठेवलं तरी तुला येणं भागच होतं... केशवा! तू वारस आहेस इथला...आता इच्छापूर्ती शक्तीला तुझी गरज आहे.. माझे वय झाले तसतशा माझ्या इच्छा कमी कमी होत गेल्या ... मात्र भानोशिला बळी लागतोच इच्छांचा... आता मी जातेय सगळं तुझ्याकडे सोपवून...
मात्र एक लक्षात घे... तू कुठेही गेलास तरी तुझी ह्यातून सुटका नाही... माणसाची इच्छांमधून सुटका नाही... तुझ्या मनातल्या इच्छा भानोशी पूर्ण करेल तिला दुसऱ्या इच्छेचा बळी दे."
आजी थकून गाढ झोपली... दुसऱ्या दिवशी गडी माणसे कामावर आली मात्र आजी काही उठली नाही.. आजी नातवासाठी डोळ्यांत प्राण आणून थांबली होती.... असेच लोक म्हणत होते. आजीचे सगळे क्रियाकर्म रीतसर पार पडले... आता कामाला लागले पाहिजे म्हणत केशवने लॅपटॉप उघडला... आजीच्या जाण्याचे कळवले असले तरी बरीच कामे त्याच्या नावाने राखून ठेवली होती...
"आत्ता एक कडक कॉफी मिळाली तर कित्ती बरं होईल " त्याच्या मनात आले... "त्याच्या सोबत ऑफिस असते तर बन मस्का सुद्धा घेतला असता."
"बन मस्का सोडून देतो पण कॉफी तर हवीच" ... असा विचार मनांत आला नाही तोच स्वयंपाकाच्या बाईने त्याच्यासमोर कॉफी आणून ठेवली... बराच वेळ केशव विचार करत होता... हा निव्वळ योगायोग असेल..
दुसऱ्या दिवशी त्याने भानोशीची परीक्षा पाहण्याचे ठरवले...
"आत्ता मस्त गरमागरम जेवणाची इच्छा झालीये पण जेवण नाही मिळालं तरी चालेल एक पिझ्झा मिळावा बास!"
केशव अगस्ती मनातल्या मनात हसत होता ... ह्या खेड्यात जिथे बस येत नाही तिथे पिझ्झा कसा येणार?? पण त्याचा अंदाज साफ चुकला.. थोड्याच वेळात धनाजी स्वयंपाकाची बाई आजारी आहे तर आज येणार नसल्याचे बोलला... फाट्यापर्यंत जाऊन काहीतरी खायला आणून देतो म्हणाला... त्याने काय आणू विचारले असता "काहीही आन ." केशव म्हणाला... थोड्या वेळात गडी पिझ्झा घेऊन हजर झाला... त्याचा एक मित्र लॉकडाऊनमुळे शहरातून गावात परतला होता... त्याने झक्कास पिझ्झा करून विकायला सुरू केले. केशव खुश झाला... हळूहळू त्याला अनेक लहान मोठ्या अनुभवांतून कळून चुकले ... भानोशी खरंच इच्छा पूर्ण करते... कधीकधी त्याला परत जावं वाटायचं तर मन म्हणायचं काय आहे तिथे तरी...इथेच वाड्यात राहण्याची त्याची इच्छा पूर्ण होई.
एकदा त्याचा लेक आल्हादचा फोन आला... त्याला घरात बसून बोअर होत होतं... बाबा तुजला भेटावस वाटतं... लेक म्हणाला.... आणि त्याला भेटायची केशवला तीव्र इच्छा झाली. आपला लेक आपल्याला मिळावा सीमा कधीच नाही भेटली तरी चालेल ... अशी इच्छा त्याच्या मनांत आली. दुसऱ्याच दिवशी तालुक्याच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याला फोन करून बोलवण्यात आले काय झाले त्याला कळत नव्हते?? सीमाचा काल खून झाला होता , तिचाच बॉस कम प्रियकर अनुराग ने तो केला असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. आल्हादची कस्टडी त्याच्या वडिलांकडे केशव अगस्ती कडे सोपविण्यात आली होती... त्याच्या प्रवासाच्या परमिशनवरून आणि ऑफिसमधून तो गावी गेला असल्याचे कळले... केशवकडे आल्हादला सोपवण्यात आले... बाबा म्हणत तो केशवच्या गळ्यांत पडला. केशव त्याला घेऊन वाड्यावर परतला....भानोशी आहे ...खरंच आहे ... केशवला खात्री पटली.
🔏©️ यशश्री रहाळकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!