माझ्या एका जवळच्या मित्राचे लग्न जेमतेम सहा महिन्यांत मोडायच्या बेतात आले होते. हल्ली असे सर्रास होते... अगदी महिना दोन महिन्यांतही लग्न मोडतात ...त्यामुळे ह्यात काही नवल नव्हतेच. नवल वाटण्याजोगे होते ते लग्न मोडण्याचे कारण .... "देव!" ... आहे ना गंमत... दोघांच्याही देवाबद्दलच्या संकल्पना पराकोटीच्या भिन्न होत्या, शिवाय माझीच संकल्पना कशी योग्य आहे हे पटवून देण्याचा अट्टाहास होताच. माझा मित्र टोकाचा कर्मठ तर पत्नी कर्मावर श्रद्धा ठेवून असणारी.... त्यानी स्वतःपुरती त्याची श्रद्धा पाळावी , देवाच्या पूजा , मंदिरात जाणे , व्रतवैकल्ये , उपास ..आरती सगळे करावे पण तिला गृहीत धरू नये ... असे तिला वाटले तर चुकले कुठे?? उलट मित्राचे म्हणणे असे होते की हिने माझ्यासोबत फार नाही पण किमान मंदिरात यावे, पुजेला बसावे.... बाकी मीही तिच्याकडून फार अपेक्षा नाही करत....🤷 एकाच धर्माच्या एकाच जातीच्या नव्हे तर अगदी पोटशाखाही समान असणाऱ्या लोकांची ही गत व्हावी???😯🤔 मला नवल वाटतंय ते ह्याचं👍 खरंतर जोडप्यांतच काय पण जगभरातला हा वादाचा मुद्दा .... आपापली निर्गुणाच्या उपासनेची पद्धत भिन्न असू शकते हे कुणी समजून घ्यायलाच तयार नाही... भांडणे "देव" ह्या संकल्पनेमुळे होत नसून ती ही संकल्पना लादण्यातून होत असतात... आपण सहज का स्वीकारू शकत नाही की दुसऱ्या माणसाची देव ही संकल्पना निराळी असू शकते?? अर्थात वादाच्या क्षणी कुणालाच ते पटत नाही हा भाग आणिक वेगळा.
"देव" ही किती खोल दडलेली, अगदी स्वतःची अशी वैयक्तिक भावना आहे.... मोठं होत जातांना ती आपसूक घडत जाते.. कधी बिघडते अन् नव्याने बनत जाते. कधी आयुष्याला पार उलटेपालटे करून टाकणारी घटना घडते आणि एखादा नवा "देव" भेटतो.... कुणाला हा देव एखाद्या विशिष्ट मूर्तीत भेटतो... कुणाच्या समईने उजळलेल्या देवघरात दिसतो तर कुणाला विशिष्ट मंदिरात. कुणाला आईत दिसतो तर कुणाला गाईत.... कुणा नास्तिकाला तो कर्मामध्ये दिसतो तर कुणाला एखाद्या गरजूला मदत करून.... कुणाला एखाद्या स्वामी किंवा गुरुमध्ये देव दिसतो तर कुणाला एखाद्या ग्रंथात...... एक मात्र नक्की "जितुकी मानस तितुकी नावे" प्रत्येकाच्या जडणघडणीत देवही घडत जातो. मग माझा देव श्रेष्ठ तुझा नाही हा अट्टाहास का?? देव असा लादता येत नाही. नव्हे तो लादूनही लादला जात नाही... होते फक्त कृती....निरर्थक उपचार. भीती दाखवून किंवा आमिषे दाखवून धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला असा देव बदलता येत असेल का हो??? मला नेहमी प्रश्न पडतो. स्वेच्छेने एखादी सज्ञान व्यक्ती जेव्हा काही तत्वांनीं प्रभावित होऊन धर्मांतर करते तेव्हा कदाचित देव बदलणे शक्य असेलही .... पण अन्यथा "देव" असा सहजी बदलता येत नाही म्हणूनच तो तसा लादताही येत नाही.
काही लहान-मोठ्या सामाजिक उपक्रमांत सहभागी होतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.... काही परिचित गडगंज श्रीमंत होते, पैसेच काय डॉलरही घरी धबधब्यागत येत असताना अश्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांत द्यायला 10₹ सुद्धा त्यांच्याकडे नव्हते.... ह्या उलट काही लोकांवर स्वतःच्या एका भाकरीतली चतकोर सहज देण्याचे संस्कार होते. त्यामुळे "पैसा आहे म्हणून देताहेत " हा सगळ्यांत चुकीचा समज आहे.... दातृत्वातील देव ज्यांना भेटला आहे तेच केवळ अश्या वेळी मदत करतात हा माझा अनुभव आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचे, एखाद्या गरजूला मदत करण्याचे आणि त्या कार्यात देव पाहण्याचे . .प्रत्येकाला जमत नाही. मंदिरात मोठमोठ्या देणग्या देऊन , स्वतःच्याच घरातल्या देवांना सोन्या-चांदीने मढवून भेटणारा " देव " त्यांना अधिक आपला वाटतो... त्यामुळे सुरुवातीच्या काळात वाटणारे नवल हल्ली मला वाटत नाही... ज्याचा त्याचा देव निराळा.... हे एकदा समजलं की माणसांची गंमत वाटते.
काही लोकांचा पैसा हाच देव असतो... वाट्टेल ते करून भरपूर पैसा मिळवायचा एव्हढीचं त्यांची भक्तीची व्याख्या असते मात्र त्या पैश्याचा उपभोग न घेतल्याने आणि अजून तरी मेल्यावर सोबत न्यायची सोय नसल्याने त्यांचा हा "देव" तिजोरी, लॉकर आणि कुठे कुठे गाडून अक्षरशः कुजतो. लक्ष्मी आणि अलक्ष्मी ही दोन रूपे श्रीसूक्तात यथार्थ वर्णिली आहेत... वाम मार्गाने येणारी अलक्ष्मी सुख, समाधान, मनःशांती देऊ शकत नाही.
फार पूर्वी चांदोबा नावाचं बालमासिक होतं... त्यात वाचलेली एक कथा अजूनही जशीन तश्शी आठवते. एक गरीब गरजू इसम देवळात देवीचे दागिने चोरी करायला जातो.... देवीच्या दागिन्यांना हात लावताच अचानक त्याचं मन त्याला खाऊ लागतं, हात थरथरतात... तो चोरी न करताच निघून जातो. त्याच गावातील एक कुणी श्रीमंत माणूस संधी मिळताच सोन्याचे दागिने स्वतःकडे लपवून देवीला खोटे दागिने चढवतो.... जिथे मनात पाप, वाईट विचार येत नाहीत ती जागा देव! चोरासाठी मंदिरात देव आहे अन् धनिकासाठी तो तिथं नव्हताच.... आहे ना गंमत! ही साधीशी गोष्ट माणसं ऐकतात पण समजून मात्र घेत नाहीत. दुसऱ्याचा देव बदलवण्याच्या नादात भांडत राहतात. सध्या 'सोशल मीडिया' नावाचं मुक्तपीठ आहे... वाट्टेल ते लिहायला आणि नंतर कडाडून भांडायला. आता वटपौर्णिमा आली की ....वडाचे झाड लावा... इथपासून ते वडाला पुजणाऱ्या किती बावळट इथपर्यंत चर्चा होतात. ज्यांना तुकोबारायांप्रमाणे "वृक्षवल्ली आम्हा सोयरे" वाटतात, त्यांना निसर्ग हा देव वाटतो. मात्र ज्यांना परंपरांचे पालन करून देव मिळतो असा विश्वास आहे त्यांना हे कसे पटणार?? आणि का पटावे? एखादी स्त्री मनोभावे वडाचे पूजन करते... तिचा देव त्यात आहे... तिचा देव उपासात आहे... त्या वडाभवती प्रदक्षिणा मारून तिला जो आनंद मिळतोय त्या बदल्यात तिला दुसरे काही कसे चालणार?? ह्या विचार धारेत बदल होत आहेत ते होत राहणारच... पण म्हणून हे लादण चूक आहे... मुळात कोणतीही क्रिया बळजबरी केली तर उरकली जाते ... भक्ती तर फार उच्च तन्मय अवस्था आहे. शिवरात्र आली ... दुधाच्या अभिषेकावर टीका , दिवाळी आली दिव्यातील तेलावर टीका... त्याऐवजी गरिबांना द्यावे असे म्हणणे ...त्यांना पटणार नसते कारण त्यांचा देव वेगळा आहे. कुणी मंदिरात जातंय, कुणी पंचोपचार पूजन करतंय, कुणी कडक सोवळं पाळतंय... ह्याचं मला मुळीच कौतुक वाटत नाही... तसाच मला त्यावर टीका करण्याचाही मुळीच अधिकार नाही... ज्याचा त्याचा देव, ज्याची त्याची पूजनाची रीत , ज्याच्या त्याच्या पद्धती... ह्यात वेगळेपणा आहे म्हणून माणूस वेगळा होत नाही.... हे तत्वज्ञान माणसांना कधी कळेल कुणास ठाऊक?
गावातील अनेक वर्षांचे घरोब्याचे संबंध असणाऱ्या काकू मुलीचं लग्न ठरल्याचे पेढे घेऊन आल्या... त्यांना झालेला आनंद मनातून चेहराभर नाचत होता. काकू पहिलं वाक्य काय म्हणाल्या असतील... " इतकं छान ठिकाण आहे दोनच देव आहेत घरात बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा.. अगदी आधुनिक आहेत लोक." माझ्या डोळ्यांसमोर त्यांच्या घरातील भले मोठे देवघर आणि त्यातले डझनांनी टाक आले, जवळपास प्रत्येक नवरात्र, पौर्णिमा, नवमी त्यांच्याकडे कुलधर्म असायचा. वर्षोनुवर्षे हे देव सांभाळता सांभाळता ही माऊली क्षीणून गेली असावी... त्यांचे पती म्हणजे नाना भलतेच कर्मठ, घरातले थोरले, सगळे देव गावीच... नाना असेपर्यंत मन मारून त्यांनो सगळे केले... नानांनंतर देव कुणी नेईना... मग काकूंनी सरळ देवळात नेऊन ठेवले. पूर्वीच्या काळी येणारी सून मुकाट्याने घरातील देव व तत्सम रुढींचे पालन करायची. अगदी माझ्या एक पिढी आधीपर्यंत स्त्रिया नोकरी करून ओढाताण करत रेटायच्या सारे. आता मात्र सगळं पूर्वीसारखं असणार नाहीये. मुळात घरी सून म्हणून येणारी मुलगी तिचे विचार ठामपणे घडवून येणार... सासरची देवाची संकल्पना तिला पटली तर ठीक नाहीतर धुडकावून लावणार.... त्यात वेगळ्या जातीची, वेगळ्या धर्माची अगदी वेगळ्या देशात वाढलेली मुलगी सून झालीच तर संपलेच... म्हणूनच ज्याचा त्याचा देव प्रत्येकानं आपल्या पुरता सांभाळावा. घरात येणाऱ्या मुलीला समजावून पहावा पटले तर ती नक्कीच करेल पण नाहीच पटले तर.... ही मानसिकता असायला हवी. शेवटी एकदा देव ज्याचा त्याचा वेगळा आहे हे कळलं ना की सारं सोपं होतं जातं...👍
तिन्हीसांजेला समईच्या प्रकाशात लख्ख उजळून निघालेले पितळी देव पाहिले की मनापासून हात जोडले जातात... शुभं करोति! आपसूक बाहेर पडते... मनातली भीती, ताण, काळजी संपून शांत वाटतं... वर्षोनुवर्षे आजीला, आईला असे देवापुढे प्रसन्न बसलेले पाहून माझ्या मनात मला हाच देव दिसतो.... माझ्या मुलीच्या मनातही तो तसाच राहील कदाचित...☺️ आपल्या मुलांचा देव आपण नक्कीच घडवू शकतो... चोरी करू नये, खोटं बोलू नये हे कृतीतून पटवून देत, घरातल्या वृद्धांचे मायेने करून सेवेतील देव , गरजूला मदतीचा हात देत दानातील देव,...झाडांची , पशुपक्ष्यांची काळजी घेत, प्रदूषण टाळत निसर्ग देवतेचं पूजन करण्याचं आपसूक कळेल त्यांना👍
✒️यशश्री रहाळकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!